All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 30 July 2016

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)


             आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. त्या थंड वाऱ्याच्या झोतानेच त्याला जाग आली होती. आकाश त्याच्या तंबू मधेच पहुडला होता. डोळे उघडले आणि तंबू मधून डोकं बाहेर काढलं. छान वारा सुटला होता. प्रसन्न वातावरण अगदी, तसाच डोळे चोळत बाहेर आला. अंग आळोखे - पिळोखे देत वाकडं-तिकडं करत आळस दिला. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ७.३० वाजत होते. तरीही अजून सूर्य देवाचे आगमन झाले नव्हते. आकाश तंबू पासून जरा पुढे आला. आजूबाजूला बघू लागला. 

              समोरच्या डोंगरावर राजमाची पुन्हा जोरदार पावसाच्या तयारीत गुंतून गेली होती. नुकताच पडून गेलेला पाऊस जणूकाही सांगून गेला होता, तयारीत राहा, जोरदार येतो आहे पुन्हा. त्या बाजूचा सर्व परिसर धूक्यात हरवून गेला होता. जसं काही पांढऱ्या शुभ्र रंगाची शालच पांघरली होती तिथे..... तीनच रंग होते त्या परिसरात, आभाळाचा काळसर रंग, धुक्याचा शुभ्र रंग आणि राजमाचीचा करडा हिरवट रंग.... किती छान द्रुश्य होतं ते. आकाश पुन्हा तंबूत आला. त्याने त्याचा कॅमेरा उचलला. आणि पटापट ३-४ फोटो काढून घेतले. शहरात कूठे दिसते असं द्रुश्य,बरोबर ना... 

            ५ - १० मिनिटं आकाश ते सर्व पाहत होता. समोरच वातावरण अधिक गडद होऊ लागलं होतं. राजमाची तर आता जवळपास दिसेनाशी झाली होती. बोचरा वारा सुरु झाला.शहारलं अंग आकाशचं. पावसाची चाहूल होती ती. आजूबाजूला नजर फिरवली असता चोहोबाजूनी हत्तीच्या आकाराचे मेघ जमा होतं होते. त्यांचा रंगही हत्ती सारखाच काळा, सोबतीला वारा होताच. मधेच एखादी पांढरी शुभ्र लकेर ढगांमध्ये चमकून जायची. विजेचा आवाज अस्पष्ट असा असायचा. थोडावेळ असाच शांततेत गेला. कूठेतरी दूर असा एखादा पक्षी उगाचच ओरडायचा, थोड्यावेळाने त्याचा आवाज ऐकून त्याला प्रतिसाद देयाचा कोणीतरी. आकाश ते सर्व मनात भरून घेत होता. अचानक प्रचंड थंड वाऱ्याचा झोत आकाश कडे झेपावला. गारठून गेला आकाश अगदी. पावसाची नांदी होती ती. दूरवरून येणारा पाऊस आकाश बघत होता. काही क्षणात तो आपल्यापर्यंत पोहोचेल हे आकाश जाणून होता. पट्कन एक फोटो काढला आणि कॅमेरा पावसापासून वाचवण्यासाठी त्याच्या तंबूत शिरला. 

           पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू झाली. हत्तीचं जणूकाही त्यांच्या सोंडेतून सर्व ठिकाणी पाणी ओतत होते. मधेच एखादी वीज चमकून आपलं अस्तित्व स्पष्ट दाखवून जात होती. सर्व धरित्री चिंब होत होती. समोर राजमाची अक्षरशः स्नान करत होती. तो निसर्गरम्य सोहळा आकाश डोळे भरून बघत होता. छान वातावरण अगदी...... तास-दीड तास तो सोहळा चालू होता. त्यानंतर हळूहळू सूर्यदेवाचे दर्शन होऊ लागले तसा पाऊस आता जाईल असा अंदाज आकाशने लावला. तसे झाले सुद्धा. १० - १५ मिनिटात पाऊस थांबला. आकाश पुन्हा तंबूच्या बाहेर आला. आभाळ बऱ्यापैकी मोकळं झालं होतं. सूर्यदेव त्यांच्या कामाला लागले होते. आजूबाजूचा सर्व परिसर धुवून गेला होता. समोरची राजमाची हिरव्या रंगाने नटली होती. किती उजळून दिसत होती आता ती. धुकं सुद्धा आता विरळ होतं होता. पायथ्याशी असलेली गावं आता दिसू लागली होती. आकाशने त्याच सामान , तंबू पुन्हा बांधायला घेतला. निघायची वेळ झाली ना. सामान बांधून झालं, त्याने घड्याळात पाहिलं, सकाळचे ९.३० वाजलेले. तरी पायथ्याशी असलेली गावं अजून सुस्तावलेली भासत होती. मधेच एखादा पक्षी उगाचच केकाटत जात होता. आकाशने त्याची सॅक पाठीवर लावली. पुन्हा एकदा वारा वाहू लागला होता. आकाशचे पाय निघत नव्हते. , तरी काय करणार ना... पुन्हा जावे लागेल शहरात. एकवार त्याने  राजमाची कडे नजर टाकली आणि परतीच्या प्रवासाला लागला. 

             आकाश एका मॅगझीन साठी फोटो काढायचा. तो एक professional photographer होता आणि traveler सुद्धा. भटकंती करायला खूप आवडायची त्याला. त्याने काढलेले फोटो तर किती फेमस होते. कितीतरी पुरस्कार मिळाले होते त्याला. ते मॅगझीन सुद्धा त्याने काढलेल्या फोटोज वर चालायचे जणूकाही. कारण बहुतेक लोकं आकाशने काढलेल्या फोटो साठीच ते मॅगझीन विकत घेयाचे. खूप फॅन्स होते त्याचे. एवढे छान फोटो क्लीक करायचा आकाश. 

             पण एक होतं त्याचं. तो कधीच समोर यायचा नाही. एवढे फॅन्स होते त्याचे, पण एकानेही त्याला पाहिलं नव्हतं किंवा त्याचा फोटो बघितला होता. फेसबूक वर त्याने एक फोटो टाकायचा बाकी, धडाधड कंमेंट्स, likes चा नुसता पाऊस पडायचा. तरीही FB वर त्याचा स्वतःचा असा एक फोटो नव्हता. एवढे पुरस्कार त्याला मिळालेले, तरी एकदाही तो स्वतः पुरस्कार घेण्यासाठी गेला नाही किंवा सोहळ्याला हजेरी लावली नव्हती. अलिप्त रहायचा. त्याला त्याचे घरचे आणि ऑफिस मधले.... एवढेच काय ते जवळचे, निदान मानवाच्या वस्तीतले तरी. घरीसुद्धा परिस्तिथी छान अशी. आई-वडील सरकारी नोकरीत. मोठया भावाचा बिझनेस. त्यामुळे आकाशला तशी काम करायची गरजच नाही. आई-वडिलांनी सुद्धा बिझनेस मध्ये लक्ष देयाला सांगितलेले. पण त्याचं मन रमायचं नाही त्यात. त्याला निसर्गच आवडायचा. त्याचे मित्र सुद्धा तेच, झाडं-पशु-पक्षी... निसर्ग. त्याचं निसर्ग हेच पहिलं प्रेम.... त्याला जणू काही माणसांचा तिटकारा होता. पण कधी गरजूला लगेच मदत करायला जायचा पुढे. फोटोग्राफीची आवड कधी पासून लागली ते माहित नाही. पण तो स्वतःच शिकला ते कसब आणि वर्षांच्या अनुभवाने त्याची फोटोग्राफी एवढी सुधारली. तो त्याच्या घरी सुद्धा राहायचा नाही. ऑफिस मध्ये ही क्वचित दिसायचा. त्याचं सगळं सामान एका मोठया सॅक मध्ये भरून ठेवलं होतं त्याने. ती सॅक घेऊनच कूठे कूठे फिरत बसायचा एकटाच. वाटेल तिथे जाऊन राहायचा. बहुतेक वेळेस तो राना-वनात, दऱ्या-खोऱ्यात फिरत राहायचा आणि फोटोग्राफी करत रहायचा. महिन्यात २ - ३ दिवस ऑफिसमध्ये यायचा, काढलेले फोटोज वर काम करून ते प्रसिद्ध करण्यासाठी मॅगजीन कडे देऊन टाकायचा. त्याची सॅलरी जमा झाली का ते बघायचा, पाहिजे तेवढे पैसे काढून पुन्हा प्रवासाला निघायचा.
------------------------------------------------------------------------------------------------------
"ओ काका.... इसको जरा दो पुरी जादा देना... दो दिन से इसने कूच खाया नही .... " सुप्री , त्या पाणीपुरी देणाऱ्या माणसाला बोलली. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, तरी त्याने दोन पाणीपुरी जास्तच दिल्या संजनाला.

 " काका, आता हिला दिला तसं मला पण द्या ना.... मी पण दोन दिवस जेवली नाही आहे." सुप्री एकदम काकुळतीने बघत म्हणाली. तसा तो हसला. पाणीपुरी खाणारे सगळेच हसू लागले. extra पाणीपुरी दिली त्याने, वर बोलला देखील.
" तुम दोनो तो खाते-पिते घर कि लागती हो... दो दिन तो बहुत होते है, मुझे पता था तुम्ह मजाक कर रही हो, मैने ऐसे हि देदी... हमेशा हसते रहना.... " संजना ने छानशी smile दिली आणि दोघी संजनाच्या scooty वर बसून निघाल्या. 

" काय ग खुळे.... काय बोललीस त्याला, मी जेवली नाही दोन दिवस... कुठल्या अँगलने वाटते तरी का मी तशी.... पागल. " संजना सुप्रीला म्हणाली. 
"अगं... पण दोन-दोंन extra पाणीपुरी तर भेटल्या ना... " सुप्री डोळा मारत म्हणाली. 
" तू पण ना खरंच... कधीतरी मार खायाला लावणार आहेस, तुला पण आणि मला पण." संजना scooty चालवत म्हणाली. 

                   संजना आणि सुप्री.... म्हणजेच सुप्रिया... दोघी शाळेपासूनच्या मैत्रीणी. दोघींचा स्वभाव सुद्धा जवळपास सारखाच. मध्यम शरीरयष्टी, उंचीही जवळपास सारखी . दिसायला जरा वेगळ्या होत्या दोघी. संजना जरा सावळी होती. सुप्रिया बऱ्यापैकी गोरी होती. सुप्री नुसतीच हसत राहायची, काहीही कारण काढून... संजना सुद्धा हसरी होती, पण उगाचच हसत राहायची नाही. दोघी लहानपणापासून एकत्र असल्या तरी खूप वेळा भांडण सुद्धा झाली होती. अगदी टोकाची भांडण. तरीसुद्धा त्या अजूनही सोबत होत्या. संजना तिला "सुप्री" बोलायची. पण सुप्रियाचे एक काही धड नव्हतं. कधी संज्या तर कधी संजू बोलायची.... असो, कोणत्या नात्याने त्या अजून सोबत होत्या , ते त्यांच्या घरी सुद्धा कळत नव्हतं. फारच कौतूक होतं दोघींचं. शाळेत एकत्र, कॉलेज एकत्र आणि आता जॉबला सुद्धा एकत्र होत्या. सकाळ झाली कि जॉबला जायचे आणि संध्याकाळ झाली कि फिरायला जायचं हेच होता त्यांचं आयुष्य. दोघींचं विश्व फक्त. त्यात तिसऱ्या कोणाला प्रवेश नव्हता, अजिबात नाही. 

                    पावसाळा सुरू झालेला. या दोघीना खूप आवडायचा पाऊस, त्यात भिजायला तर किती आवडायचं. विशेष करून सुप्रीला, पावसाळ्यात तर दर रविवारी या दोघींच्या पिकनिक ठरलेल्या. कधी ऑफिसच्या ग्रुप बरोबर, तर कधी त्यांच्या मित्र-मैत्रिणी सोबत, कधी फॅमिली सोबत आणि तसंच कोणी भेटलं नाही तर दोघीच जायच्या भिजायला. दोघीना एकमेकांशिवाय करमायचे नाही. अशीच त्यांची मैत्री होती, अतूट अशी. पण यंदाच्या पावसात काहीतरी वेगळं होणार होतं. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                  पावसाचे दिवस, त्यात रस्तावर पाणी साचलेलं. संजनाला scooty वर असताना मुद्दाम पाण्यातून गाडी घेऊन जायची सवय. उडणारे पाणी बघून तिला वेगळाच आनंद मिळायचं. त्यात सुप्री मागे असली कि विचारूच नका. ती संजनाला बरोबर सांगायची कि कुठे पाणी साचलेलं आहे ते, मग काय.... संजना गाडी वळवायची तिथे... हा पण ,ते पाणी लोकांवर उडणार नाही याची काळजी मात्र दोघी घ्यायच्या. 

                 त्यादिवशी तसंच झालं.... रस्ता बऱ्यापैकी रिकामा होता. दोघी ऑफिसला निघाल्या होत्या scooty वरून. समोर रस्त्यावर पाणी साचलेलं. perfect scene एकदम. मग काय , निघाल्या दोघी सुसाट. भुर्रकन पाणी उडवलं. त्याचदिवशी, आकाश शहरात आलेला. तो काम करत असलेल्या मॅगझीनचे एक नवीन ऑफिस उघडले होते, ते बघण्यासाठी आकाश निघाला होता, नेमका त्याचं रस्त्याने. संजनाने पाणी उडवायला आणि आकाश समोर यायला एकचं वेळ झाली. आकाशने पटकन कॅमेरा मागे घेतला. तरीही स्वतःला त्या चिखलापासून वाचवू शकला नाही. चिखलाची एक छानपैकी नक्षी त्याच्या शर्ट आणि जीन्स वर दिसत होती आता. कॅमेरा थोडक्यात बचावला, तरीही थोडासा चिख्खल लागला कॅमेराला. संजनाला कळलं ते. तिने गाडी थांबवली. पण मागे बघायची हिंमत होतं नव्हती. सुप्रीने, आकाशकडे बघत लगेच एक smile दिली. " sorry uncle..... " म्हणाली, संजनाला scooty चालू करायला सांगितलं आणि दोघी पटकन नजरेआड झाल्या. 
 
               आकाश त्या दोघींकडे पाहत होता. त्यांच्यावर तरी काय रागवायचे. माणूस जातंच अशी असते, दुसऱ्यांना त्रास देयाचा फक्त आणि त्रास झालेला पाहून हसायचं. आकाश मनातल्या मनात म्हणाला. त्याला कूठे भावना होत्या. राग तर कधी यायचा नाही त्याला. कधी कधीच हसायचा. ते सुद्धा एखाद्या पक्षाचा आवाज ऐकून. त्या दोघी निघून गेल्या, तसा त्याने मागे लपवलेला कॅमेरा बाहेर काढला. हलकासा लागलेला चिख्खल पुसला. कपडे जरा झटकले आणि निघाला. 

"काय गं मंद.... सांगता येत नाही का , म्हणे कोण नाही रस्त्यावर... तो काय भूत होता का मग... " संजना रागातच म्हणाली सुप्रीला. 
" अरे... हे बरं आहे , तुझ्या बदली मी बोलली ना सॉरी त्याला... " ,
" आणि तो काय अंकल होता का.... सॉरी अंकल बोललीस ते. एकतर चिख्खल उडवला, त्यात त्याला अंकल म्हणालीस... दोनदा अपमान केल्यासारखं झालं ते.... " संजना scooty थांबवत म्हणाली. 
" हा... ओरड आता मलाच.. गरीब आहे ना मी,.... गरीब लोकांना सगळेच ओरडत असतात. ओरडा तुम्ही श्रीमंत लोकं... " सुप्री तोंड एवढंसं करत म्हणाली. 
" ये नौटंकी.... झाली नाटकं सुरु परत.... चल जायचे नाही का ऑफिसला.... नाहीतर सर येतील. " सरांचे नावं ऐकताच सुप्री पटकन scooty वरून उतरली आणि दोघी झटपट ऑफिस मध्ये आल्या. 


दोघीनी त्यांचे computer चालू केलेच होते, तेवढ्यात ऑफिस मध्ये एकाने announcement केली.
" एक मिनिट... जरा सगळ्यांनी लक्ष द्या इकडे.... आपल्या ऑफिसच्या मजल्यावर, कोपऱ्यात एका मॅगझीनच्या ऑफिसचे उद्घाटन होत आहे. तर त्यांनी आपल्या सर्वाना आमंत्रण दिलं आहे. बॉसची permission मिळाली आहे. सगळ्यांनी आता तिथेच चला, ते आपली वाट बघत आहेत. चला लवकर. " तसे सगळे उठले. 
" चला... आजच्या नाश्त्याची सोय झाली." सुप्री संजनाला बोलली. ते आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा ऐकलं. सगळेच हसायला लागले. 
" गप्प गं येडे.... म्हणून तुला कूठे घेऊन जात नाही मी ." संजना पुढे काही बोलणार, इतक्यात तिचं लक्ष मॅगझीनच्या नावाकडे गेलं." wild india " .... "सुप्री... नावं बघ मॅगझीनचं... " सुप्रीने नावं बघितलं आणि मोठयाने ओरडली. " Wow !!!!!!! " अचानक झालेल्या आवाजाने सगळे तिच्याकडे बघू लागले. 
" काय झालं ? काय झालं ? " सगळे विचारत होते. 
" अरे.. तुम्हा कोणाला माहित नाही का.... हे मॅगझीन... "आकाश", त्याची फोटोग्राफी... आठवलं का... " तेव्हा लक्षात आलं सगळ्यांच्या. आकाशला कोण ओळखायचे नाही. .... निदान त्याने काढलेल्या फोटोज वरून तरी. अर्थात त्याला कोणी पाहिलं नव्हतं. आजतरी आकाशला बघायला मिळेल, याची उत्सुकता लागली सगळ्यांना. 

एव्हाना सगळे जमले होते, उद्घाटनासाठी. तरीही काही सुरु होतं नव्हतं. सुप्रीला भूक लागली होती. तीच पुढे जाऊन बोलली.
" ओ काका, कोणाची वाट बघत आहेत. नाहीतर ते थंड होईल ना नास्ता... मग बरोबर नाही लागतं थंड थंड..... " तसा तो हसला आणि म्हणाला. 
" आमच्या मोठया ऑफिस मधून एक जण येणार आहे. तो आला कि सुरु करू. " त्याने आकाशचे नावं घेणे मुद्दाम टाळलं. १० मिनिटे गेली असतील. मागून एक जण पुढे आला. केस विस्कटलेले, वाढलेली दाढी, पाठीवर मोठी सॅक, गळ्यात कॅमेरा आणि अंगावर घातलेल्या कपड्यांवर चिख्खल.... सगळ्याचे लक्ष त्याच्याकडेच गेलं.
 " माझ्यासाठी थांबायची काही गरज नव्हती सर... तुम्ही सुरु करा. " आपण ज्या माणसाला नास्ताचे विचारलं, तो त्या मॅगझीनचा बॉस होता ते सुप्रीला कळलं. तशी ती जराशी मागे झाली. 
" अरे !! काय हे... अंगावर चिख्खल कसा उडाला.... " तोपर्यत आकाशची नजर सुप्रीकडे गेली होती. त्याने तिला लगेच ओळखलं. 
" काही नाही सर, शहरात आलं कि होतंच असं... " उद्घाटन झालं आणि सगळे नास्ता करायला गेले. 
" श्शी !!! काय ते ध्यान त्या माणसाचे... " संजना म्हणाली.
" मॅडम, ते ध्यान आपल्यामुळेच झालं आहे... आठवला का मघाचचा अंकल... " संजनाची ट्यूब पट्कन पेटली. सुप्रीला न सांगताच उलट पावली निघून आली. आकाश वॉशरूम मध्ये जाऊन कपडे स्वच्छ करून आला. 


सुप्री सगळ ऑफिस बघत होती. फोटोज सगळेच छान होते, specially आकाशने काढलेले फोटो...... जमलेले सगळेच ते फोटो बघत होते. सुप्रीचं लक्ष फोटो वरून एका कोपऱ्यात गेलं. आकाश आपला कॅमेरा चेक करत होता. सुप्री त्याच्या जवळ गेली. 
" पुन्हा एकदा सॉरी... " आकाशने सुप्रीकडे फक्त एकदाच पाहिलं... आणि पुन्हा कॅमेरा साफ करू लागला. 
" नास्ता नाही करत का तुम्ही... थंड होईल मग, already तुमच्यामुळे उशीर झालेला .... " सुप्री बोलता बोलता थांबली. आकाशची काहीच reaction नाही. तो शांतपणे कॅमेऱ्यावर उडालेला चिख्खल साफ करत होता. सुप्रीला काहीतरी विचारायचे होते. चुळबुळ चुळबुळ चालू होती तिची. त्यात आकाश काहीच बोलत नव्हता. पुन्हा विचारलं तिने. 
" तुम्ही कॅमेरामन आहेत का.... सॉरी... सॉरी, फोटोग्राफर आहात का... ",
"हो" आकाश बोलला शेवटी... 
" अरे व्वा !!!! म्हणजे तुम्ही आकाशला नक्की ओळखत असणार ना... " त्यावर तो सुप्रीकडे बघायला लागला. "म्हणजे...... हे फोटो त्यानेच काढेल आहेत ना म्हणून.... कसला भारी फोटो काढतो ना तो... भारीच आहे एकदम तो..." आकाशला जरा गंमत वाटली. त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. 
" तुम्ही पाहिलं आहे का त्याला.... " आकाश चा पहिला प्रश्न... 
" तसं पाहिलं नाही कधी.... पण एवढे छान फोटो काढणारा पण छानच असेल ना..... म्हणून विचारलं तुम्हाला कि कधी पाहिलं आहेत का त्याला, I mean रोजच भेटत असेल ना तुम्हाला... " आकाशने नकारार्थी मान हलवली आणि कॅमेराकडे लक्ष दिलं. सुप्रीचा नास्ता संपला होता. तिच्या ऑफिस मधले कर्मचारी आता माघारी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले सुद्धा. तशी सुप्री निघाली. परत थांबली. 
" excuse me..... तुमचे नावं नाही सांगितले तुम्ही.... एवढा वेळ बोलत होतो आपण, नावं राहिलं कि राव... माझं नावं सुप्रिया... पण सगळे "सुप्री" च बोलतात. तुमचं नावं काय... " सुप्रीने हात पुढे केला.
" ..... अंकल.... " आकाशने डोकं वर न करताच उत्तर दिलं. पुढे केलेला हात सुप्रीने तिच्याच डोक्यावरून फिरवला. आकाशकडे जीभ बाहेर काढून दाखवली आणि निघून गेली. 

आकाशचे सर आता त्याच्याजवळ आले. " काय मग... कसं वाटलं नवीन ऑफिस..... आकाश... ",
"ठीक आहे... तसं पण मला कूठे आवडते शहरात..... त्यामुळे आहे ते चांगलंच असणार ना माझ्यासाठी... , बरं... काही फोटोज आणले आहेत, ते पाठवून देतो... " ,
"चालेल. आणि किती दिवस आहेस आता इकडे... ",
"बहुतेक हा आठवडा आहे मी, काल घरी जाऊन आलो तर आईची तब्येत ठीक नाही... त्यासाठी थांबतो आहे.... या ऑफिसमध्ये आलं तर चालेल ना आठवडाभर.... ",
" तू कूठेही कामं करत बस.... दोन्ही ऑफिस मध्ये तुझं स्वागतच असेल... फक्त शहरात राहत जा रे... काय असते तिथे राना-वनात " त्यावर आकाश हसला फक्त. 
" तिथे खूप काही असते म्हणून तर तिथे जाऊन राहतो मी." त्याचे सर काय समजायचे ते समजले. 

सुप्री आली जागेवर. संजनाने कधीच काम सुरु केलेलं... 
" काय गं पोरी..... काय मस्त नास्ता होता, माहित आहे का तुला.... सॉलिड एकदम !! " सुप्री खुर्चीवर बसत बसत बोलली. 
" गप गं.... आणि तुला त्याने ओळखलं असेल ना..... काही बोलला का तो... ",
" तो अंकल..... म्हणून आली नाहीस ना, त्याला काय घाबरायचे... " ,
"पागल... त्याच्या अंगावर चिख्खल उडवला ना... आणि काय घाबरायचे बोलतेस... ओरडला असता तर.... " ,
" तो काय ओरडेल मला.... आईलाच नावं सांगेन त्याचं... " तश्या दोघी हसायला लागल्या. ऑफिस सुटल्यावर सुद्धा सुप्री, संजनाची नजर चुकवून पुन्हा त्या ऑफिस मध्ये डोकावून आली. आकाश दरवाज्याचा अगदी बाजूलाच काम करत बसला होता. सुप्रीला त्याने आता डोकावताना पाहिलं. " ओ अंकल... आकाश आला आहे का आज... " तिने बाहेरूनच विचारलं. आकाशने पाहिलं तिच्याकडे आणि कामाला लागला त्याच्या पुन्हा. पुन्हा सुप्रीने जीभ बाहेर काढून वेडावून दाखवलं आणि संजनाच्या scooty वर येऊन बसली. 

               दुसऱ्या दिवशी सुद्धा, जश्या दोघी ऑफिसला आल्या तशी सुप्री, पटकन जाऊन बघून आली. लपूनचं बघत होती ती. आकाश कधी मागे येऊन उभा राहिला ते कळलंच नाही तिला. खूप वेळ लपून-छपून बघून सुद्धा काहीच दिसत नाही म्हणून सुप्री निघाली, तर मागे आकाश. आकाशने हातानेच खूण करत " काय चालू आहे ? " असं विचारलं. " काही नाही.... आकाश आला आहे का ते बघितलं. " आकाश काय बोलणार त्यावर. शांतपणे ऑफिस मध्ये आला. मागोमाग सुप्री सुद्धा आली. आकाशने त्याची सॅक ठेवली आणि खुर्चीवर बसणार तर मागे सुप्री. 
" आकाश कधी येणार आहे... " आता मात्र आकाशला बोलावंच लागलं. 
" जर तुम्ही त्याला पाहिलंच नाही कधी... मग इथे काल पासून कशाला डोकावून बघत आहात... आणि तो आला तरी तुम्हाला कुठे कळणार आहे.... जा तुम्ही आता.... ",
" काय ओ  तुम्ही... एकदा भेटले असते तर काय बिघडलं असतं.... त्याची खूप मोठी फॅन आहे मी.... मी आणि माझी मैत्रीण संजना.... एकदाच बघायचं होतं ना त्याला... एकदाचं फक्त, गणू शप्पत..... ",
" गणू कोण आता ? " ,
"अहो गणू म्हणजे गणपती बाप्पा... माझ्या जवळ आहे ना तो खूप म्हणून त्याला गणू बोलते मी... ",
"ते ठीक आहे, पण बघून त्याला काय करणार आहेत तुम्ही... नाही येत तो इथे... जा तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये... नाहीतर तुमची तक्रार करावी लागेल मला." तशी सुप्री पटकन बोलली. 
" नको नको...  तक्रार नको, जाते मी... मी काय गरीब आहे ना म्हणून मला सगळे ओरडत असतात. " सुप्री निघून गेली ऑफिस मधून, पण तिच्या बोलायच्या पद्धतीची आकाशला गंमत वाटली. 

                 संध्याकाळी पुन्हा तेच... आकाशचे ऑफिस बऱ्यापैकी रिकामं झालं होतं. आकाशने बाहेर सहज नजर टाकली असता कोणीतरी लपून बघते आहे असं वाटलं त्याला. तसा तो पटकन बाहेर आला. सुप्री तर होतीच, पण अजून एक मुलगी त्याला बघून पळून गेली. आकाश तिच्या पाठमोऱ्या धावणाऱ्या आकृतीकडे बघत होता. आकाश बाहेर आला तशी सुप्री नीटनेटकी उभी राहिली. 
" हे काय आता नवीन... ती मला बघून पळून का गेली... " सुप्री हसू लागली. 
" ती ना... तुमच्या अंगावर त्यादिवशी नक्षीकाम केलेलं ना... ती होती.... माझी मैत्रीण... संजना. " .
" हो का... मग तुम्ही का पळून नाही गेलात... ",
" मी कूठे घाबरते तुम्हाला... कूणालाच घाबरत नाही... एक गणू सोडला तर सुप्री किसीसे डरती नाही... " आकाशला हसायला आलं जरा.
" ओ सांगा ना... तो आकाश आला आहे का... " आता काय बोलू हिला, आकाश मनात विचार करू लागला. 
" त्याने ना हा जॉब सोडला... तो नाही येत इथे... ",
" ह्या... बनवा मला येडं..... मग फोटो कशाला लावले आहेत इकडे... त्याने क्लीक केलेले.... detective सुप्री को फसाना आसन नही... " आकाश हसला पुन्हा. शिवाय पहिल्यांदा कोणाशी तो एवढा वेळ बोलत होता. 
" तुम्ही अश्याच आहेत का लहानपणापासून, कि आज काही स्पेशल आहे... आणि इकडे सगळं बरोबर आहे ना तुमचं.... " आकाश डोक्याला बोट लावून म्हणाला. 
" actually... मी ना खूप वेळा डोक्यावर पडली आहे.... तशी संजना पण पडत असते पण ती तोंडावर पडली होती... ",
" छान.. चला बाय.. मला काम आहे.... जा तुम्ही आता... " म्हणत आकाश आता ऑफिसमध्ये आला. 
" पण उद्या परत येणार मी सकाळी... आकाश आला कि त्याला थांबवून ठेवा... चलो बाय.... " सुप्री गेली आणि पुन्हा आली. " तुमचं नावं तर सांगा... " ,
"माझं नावं "A"... ", 
"हे कसं नावं... ",
"A,B,C,D.. मधलं पहिलं अक्षर "A".... bye आता.... काम करू दे... " सुप्रीने परत वेडावून दाखवलं आणि निघून गेली. 

              अश्याप्रकारे, रोज सकाळ-संध्याकाळ सुप्री, आकाशला येऊन सतावत होती, निदान आठवडाभर तरी. कधी कधी संजना असायची. पण मागेच असायची ती. आठवड्यानंतर आकाश पुन्हा आपल्या भटकंतीसाठी निघाला. सुप्री त्यालाच शोधत होती. दोन दिवस तो दिसला नाही म्हणून त्या ऑफिस मध्ये विचारायला गेली. 
" ते सर ना.. ते गेले कधीच... दोन दिवस झाले. " एकाने सांगितलं. 
" मग परत कधी येणार ते.... ",
"परत येतील का ते माहित नाही. कारण ते आमच्या main branch मध्ये असतात... " ,
"मग तुम्ही आकाशला बघितलं का... तो कधी येणार आहे इकडे... ",
" ते सर पण main branch ला असतात." सुप्रीचं तोंड एव्हडंसं झालं. तसाच चेहरा करून ती तिच्या जागेवर येऊन बसली. 
" काय झालं गं तुला ? " ,
"अरे तो गेला निघून.. ",
" कोण तो ? " ,
"मिस्टर A " ,
" कोण ? " ,
"अरे तो... तू त्याच्या अंगावर चिख्खल उडवला होतास, त्याला बघितलं कि पळून जातेस ती... ", 
"हो गं कळलं ते... बरं झालं मग... " संजना आनंदात म्हणाली. 
" काय बरं... तो आकाशला ओळखायचा, त्याने आपली भेट करून दिली असती ना... " ते ऐकून संजना पण जरा नाराज झाली. 
" ते जाऊदे आता.... आपली ऑफिसची पिकनिक जाते आहे.... ४ दिवस... मस्त ना... ",
" WOW !!! " ते ऐकून सुप्रीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. "चल, तयारी करायची आहे. " 

                   चार दिवस सहल होती त्यांची.... तशी दरवर्षी पावसात सहल जायची त्यांची.... प्रत्येकवेळेस एक-एक दिवसच जायची. यावेळेस मात्र जरा जास्त दिवसांची ठरवली होती. एका अनोळखी ठिकाणी जायचे हे ठरले होते.एकूण २० लोकं तयार झाले. त्यात मुलींची संख्या होती बऱ्यापैकी. राहायचे होते म्हणून प्रत्येकी दोन माणसांमागे एक असे तंबू सुद्धा घेतले होते. प्रत्येकाकडे त्या भागाचा मॅप बनवून दिला होता, त्यातल्यात्यात कोणी हरवू नये म्हणून. सर्व तयारी झाली आणि सगळे निघाले. प्रथम गाडीने प्रवास करून ते ठरलेल्या जागी पोहोचले. प्रवास सुरु झाला. २० जणांमध्ये संजना, सुप्री सुद्धा होत्या. त्यातल्या त्यात ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव होता ते पुढे होते. सगळ्याकडे त्या भागाचा मॅप असला तरी नकाशात प्रत्येक गोष्टी दिसत नाहीत ना. तरीही ते चालत होते, अंदाज लावत लावत. सुमारे २.३० तास ते चालतच  होते. त्यात पाऊस. रस्ते निसरडे झालेले. बहुतेक जणांचे "पडून" झालेले. अश्याच एका ठिकाणी ते पोहोचले आणि finally त्यांना कळलं कि आपण वाट चुकलो आहोत. 

                तसे ते सगळेच एकत्र होते. पण एका चुकीच्या निर्णयामुळे सगळेच हरवलेले होते. त्यात भरीसभर म्हणून तो २० जणांचा ग्रुप आता एक जंगलात उभा होता. अनोळखी ठिकाणी जाण्याचे धाडस आता त्याच्या अंगाशी येणार होते बहुतेक. काय करावे सुचेना. दुपार झालेली, पोटात कावळे ओरडत होते. पावसाने अजूनच काळोख केलेला. त्यात जंगलात म्हणे रात्र लवकर होते, असं कोणीतरी माहिती पुरवली. म्हणजे लवकरात लवकर एका सुरक्षित ठिकाणी जावेच लागणार. चार-पाच जण पुढे गेले. एक माळरान शोधून आले. १० मिनिटात पोहोचले तिथे. तिचेच एका लहान डोंगराच्या आडोशाला तंबू लावायचे ठरले. लगेच दुसरा प्रश्न पुढे... तंबू तर घेतले होते मोठया हौशेने... ते बांधता कोणाला येतात... पण करणार काय ? पुस्तकात दिसेल तसं कसेतरी उभे केले तंबू.... कोणी कल्पना तरी केली होती का त्यात राहायची. रात्र अनुमान केल्याप्रमाणे लवकर झाली. भूक तर लागली होती. प्रत्येकाने प्रवासात खाण्यासाठी बिस्किट्स घेतली होती म्हणून बरी. नाहीतर उपाशीच झोपावं लागलं असतं. कशी-बशी रात्र काढू, सकाळी पुन्हा प्रवासाला निघू, असं ठरवून सगळेच दमलेले झोपी गेले. 


              सकाळ उजाडली तीच विजेच्या गडगडाटाने.... सुप्रीला जाग आली तशी तिने घडयाळात पाहिलं. सकाळचे ७ वाजले होते. संजनाला सुद्धा जाग आली. सगळेच आपापल्या तंबू मधून बाहेर आले. वर आकाशात कसले भयानक आवाज येत होते. बेभान वारा वाहत होता. पाऊस नसला तरी हवेत कमालीचा गारवा होता. विजा जणूकाही एकमेकींवर आढळत होत्या. सगळेच घाबरलेले. परस्पर सगळ्यांनी आपलं सामान बांधायला सुरुवात केली. १० मिनिटात सगळे तयार झाले. पण जायचे कुठे आता ? मागे तर जंगल आणि पुढच्या वाटेचा पत्ता नाही. वारा सुद्धा " सू....  सू.... " करत आवाज करत होता. भयाण वातावरण अगदी. ग्रुप मधल्या २ मुली रडू लागल्या. कोणालाच पुढे काय करावं ते कळत नव्हतं. 

             तेव्हाच त्यातल्या एकाला , दूर कोणीतरी एक मानव सद्रूक्ष आकृती दिसली. " हे... तो तिकडे आहे कोणीतरी... त्याला माहित असेल इकडचे काही... " सगळेच त्याच्याकडे बघून हातवारे करू लागले, ओरडू लागले. त्या सुसाट वाऱ्यात आणि विजांच्या कडकडाटात कूठे जाणार आवाज त्याला. तरी देखील तो गोंगाट ऐकून तो जाणारा माणूस क्षणभर थांबला. "अरे.... त्याने आपल्याला बघितलं वाटते.... ओरडा अजून जोरात... " संजना म्हणाली. तसे सगळे अजून मोठयाने ओरडू लागले. सुप्रीला तर फार मज्जा येत होती तसं करताना. मधेच हसत पण होती ती. " काय गं... तुला काय एवढं हसायला येते आहे... " संजनाने विचारलं. " भारी वाटते ना असं ओरडायला... घरी जरा आवाज केला कि आई धपाटा मारते पाठीत ..... असं वेड्यासारखं ओरडला कि कसं मोकळं मोकळं वाटते.. " संजनाने कपाळावर हात मारला. 

ती व्यक्ती आता स्पष्ट दिसू लागली होती. सगळेच पुढे गेले त्याला भेटायला. सुप्री सर्वात पुढे... 
" अरेच्या !!! याला तर ओळखते मी " सुप्री म्हणाली. संजनाने निरखून बघितलं. तसं ओरडणं बंद करून मागेच राहिली. 
" तू ओळखतेस त्याला... " एकाने विचारलं. 
" हो... माझा friend आहे तो. " तो जवळ आला तसा सुप्रीने हात पुढे केला. 
" Hello... mister A "... हो.. तो आकाशच होता. त्या सगळ्यांना तिथे बघून त्याला आश्यर्य वाटलं. 
" इकडे कूठे तुम्ही.... आणि या सर्वाना कशाला आणलंत इथे... " आकाशने सुप्रीकडे बघत विचारलं. 
" मी नाही आणलं. मलाचं घेऊन आले आहेत सगळे... " आकाशच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह.... काय हि .... इकडे प्रसंग काय आणि हिला मस्करी सुचते आहे... संजना मनात म्हणाली. तिलाच पुढे यावं लागला आता. 
" एक मिनिट , मी सांगते... आम्ही इकडे पिकनिकला आलो होतो... आणि आम्ही हरवलो आहोत.. तुम्हाला इकडचं माहित आहे का .... रस्ते वगैरे... " संजनाने काकुळतीने विचारलं. 
" ओ... mister "A"... हीच ती.... तुमच्या अंगावर चिख्खल उडवणारी पोरगी... " सुप्रीने मोठयाने सांगितले. तसं संजनाने हाताने तिचं तोंडच बंद केलं. आकाशने एकदा पाहिलं संजनाकडे. नंतर बोलला. 
" रस्ता सांगेन मी... पण आता इथे थांबू नका... धोका आहे इथे... चला पटकन माझ्या बरोबर.. " सगळेच सामान उचलून त्याच्या मागोमाग गेले. तोपर्यत आकाशात ढगांची गर्दी झालेली. वारा नुसता घोंगावत होता. पुढे एक लहानशी गुहा होती. आकाशने सगळ्यांना आत जाण्यास सांगितलं. गुहा लहान असली तरी २० जणांसाठी खूप होती ती. सगळे आत आलेले पाहून आकाश सुद्धा आत आला. 

" सगळ्यांनी रिलॅक्स व्हा.... पाऊस थांबला कि पुढचा प्रवास करा... " आकाश त्याच्या पाठीवरची सॅक खाली ठेवत म्हणाला. 
" पण पाऊस कूठे आहे आता, वाराचं तर आहे ना... " संजना हळू आवाजात म्हणाली. आकाश गुहेच्या तोंडाजवळ उभा होता. त्याने हाताने खूण करून सगळ्यांना बाहेर बोलावलं. सगळेच सामान ठेवून त्याच्या मागे येऊन उभे राहिले. 
" ते बघा... " आकाशने बोट वर करून सांगितलं. " त्या ढगांची रचना सांगते आहे कि वादळ येणार आहे... जोराचे वादळ.... सोबतीला पाऊस सुद्धा असतो. " सगळ्याचे डोळे, वर आभाळाकडे लागले. ढगांची गोलाकार संरचना होत होती. ५ मिनिटांतच पावसाने मुसळधार सुरुवात केली. तुफान वारा सोबतीला, विजांचा आवाज.... आकाश सोडून बाकी सगळेच घाबरले होते. आकाश शांतपणे बाहेर बघत बसला होता. एक तास तरी ते वादळ चालू होतं. त्यानंतर मात्र पावसाने आवरतं घेतलं.  

पाऊस गेलेला पाहून आकाश बाहेर आला. बाहेरचं वातावरण त्याने पाहिलं. " या आता बाहेर... " आकाश म्हणाला तसे सामान उचलून सगळा ग्रुप बाहेर आला. सुप्रीच पुढे होती. 
" WOW !!!! काय मस्त वातावरण आहे ना... " सुप्री आनंदात म्हणाली. तिच्या बाजूला संजना उभी होती. आकाशकडे चोरून बघत होती. कळलं ते त्याला. 
" चला निघूया आता... " म्हणत आकाश निघाला. त्याच्या मागोमाग सगळेच... "तुम्ही पिकनिकला आला आहेत ना.. मग अश्या ठिकाणी का आलात ? " आकाशचा प्रश्न. 
" अश्या ठिकाणी म्हणजे ? " त्यातल्या एकाने उलट प्रश्न केला. 
" अश्या ठिकाणी म्हणजे.... या इथे सहसा कोणी येत नाही... आणि पावसात तर बिलकूल नाही.. इथे दरडी कोसळण्याचे प्रमाण खूप आहे. त्यात रहायला कूठे सोयच नाही. " सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह... तो काय बोलतो आहे कोणालाच कळतं नव्हतं. आकाशच्या लक्षात आलं ते. 
" चला.... मघाशी तुम्ही जिथे उभे होतात, तिथे जाऊ पुन्हा... " आकाशच्या मागोमाग सगळे. आकाशने त्यांना लांबूनच दाखवलं. सकाळी ज्या सपाट माळरानावर तंबू होते, तिथे आता बरेचशे मोठे दगड पडलेले दिसत होते. " कळलं... मी का बोललो ते... तुम्ही ज्याचा आडोसा घेऊन तंबू लावलेले होते, त्या डोंगरावरचे ते दगड आहेत... "... काळजात धस्स झाला सगळयांच्या...." हि जागा खूप सुंदर दिसते पावसात ...चहुबाजुकडे नजर फिरवली तरी   ... एकचं रंग... हिरवा.. " ,
" किती छान ना ... " संजनाच्या तोंडातून अचानक बाहेर आले शब्द. 
" छान ना... हो , खूप छान... पण त्यात तुम्हाला एक तरी गाव, वस्ती दिसते का ते पहा. " सगळे माना वर वर करून पाहू लागले. 
" नाहीच दिसणार... कारण हि सर्व जंगलं आहेत... मानववस्ती तर दूर-दूर पर्यंत कुठेच नाही. संकटात सापडला तर साधं पाणी विचारायला सुद्धा कोणी येत नाही. डोंगर,दऱ्या, झाडं.... पशु-पक्षी.... याशिवाय कोणीच राहत नाही इथे.... मग पिकनिकचा प्लॅन कोणी केला इथे येण्याचा... " कोणीच काही बोलत नाही म्हणून सुप्रीचं बोलली. 

"आम्ही रस्ता हरवलो.... दुसरीकडे जायचे होते आम्हाला, भलतीकडेच आलो. तसे सगळ्यांकडे मॅप आहेत, तरी कसे हरवलो काय माहित ? " आकाश हसला त्यावर... 
" इकडे नकाशे वगैरे असा काही चालत नाही. फक्त डोळ्यासमोर जे दिसते ते खरं असते. ",
"पण आता आम्हाला घरी जायचे आहे... आम्ही ज्या ठिकाणी गाडीने उतरलो , तो रस्ता तरी माहित आहे का तुम्हाला. तिथे गेलो कि कोणतेतरी वाहन मिळेलच ना आम्हाला. " अजून एकाने मधेच विचारलं. 
" म्हणून विचारलं मी, कि इथे येण्याचा प्लॅन कोणाचा होता..... कसलीच माहिती नाही तुम्हाला इथली. तुम्ही ज्या गाडीने आलात, तो शेवटचा दिवस होता... त्या गाडयांचा... आता पुढे दोन महिने या भागातले सर्व रस्ते बंद असतात.... झाडे पडतात, दरडी कोसळतात... अपघात होतात म्हणून.... आता काय ऑपशन्स आहेत तुमच्याकडे.... " सगळेच एकमेकांकडे बघू लागले.  


"तरी मी सांगत होतो... नको अश्या ठिकाणी पिकनिक.... कोणी ऐकलंच नाही माझं... " त्यातला एक मुलगा बोलला. 
" तरी मी सांगत होतो... नको अश्या ठिकाणी पिकनिक.... " सुप्री वेडावत, त्याची नक्कल करत म्हणाली. 
" आणि मग , पिकनिकच्या आदल्या दिवशी कशाला उडत होतास.... उंच ठिकाणी उभा राहून सेल्फि काढणार.... झाडावर उलटा लटकणार.... नदीत पोहणार.... ह्याव नी त्यावं.... उगाचंच.. " सुप्री रागात म्हणाली. 

" शांत राहा रे सगळे... " एक मोठा मुलगा म्हणाला. " तुम्ही सुद्धा एकटेच आहेत कि हरवला आहेत... कारण तुम्ही एकटेच दिसलात आम्हाला इथे... " आकाशने त्याच्याकडे बघितलं. 
" मी फोटोग्राफर आहे. मला ट्रॅव्हलिंग करायला आवडते. म्हणून एकटाच भटकतो. त्यामुळे मला या भागाची चांगली माहिती आहे. मी तुमचा आवाज ऐकून माघारी आलो, नाहीतर एव्हाना दूर गेलो असतो.",
"मग तुम्हाला माहित आहे का एखादा रस्ता.... जिथून आम्हाला शहरात जाण्यासाठी एखादं वाहन मिळू शकेल आता. " ,
" ते जरा अशक्य वाटते मला... एक तर जंगल आहे, त्यात डोंगरातून वाटा जातात. पावसामुळे , असलेले रस्ते सुद्धा बंद आहेत. त्यामुळे तुम्हाला चालतच प्रवास करावा लागेल. " आकाश विचार करून म्हणाला. " हा... एक गाव आहे... तिथे तुम्हाला गाडी भेटली तर... लांब आहे... चालत चालत गेलात तरी खूप वेळ लागणार....",
" साधारण किती तास लागतील... ", त्या मुलाने पुन्हा विचारलं. 
" तास नाही दिवस... जर तुमच्या चालण्याचा वेग चांगला असेल तर ९ - १० दिवसात पोहोचाल तिथे... " ,
" ९-१० दिवस " एका मुलीला चक्कर यायची बाकी होती. सगळेच विचारात पडले. खूप वेळ झाला तरी कोणीच काही बोलत नव्हतं. आकाश बोलला शेवटी. 
" लवकर काय तो निर्णय घ्या.... मलाही दुसरी कडे जायचे आहे. " दुसरा पर्याय नव्हता. सुप्रीने सगळ्यांना तयार केलं. 
" one question .... mister A " सुप्रीने विचारलं. " ९-१० दिवस लागणार तिथे जायला. मग एवढे दिवस भूक नाही लागणार का... " ,
" Good question... " आकाश म्हणाला. " जंगलात खूप प्रकारची फळ आणि कंदमुळं मिळतात खायला.... शिवाय, जंगलात आदिवासी भेटलेच तर तिथे हि काही मिळू शकते... ",
"आदिवासी ?",
" हो.... आहेत इथे कुठे कुठे.... पण चांगले आहेत ते .... मदत करतात वाटसरूंना.... तर निघायचं का आता.... अजून कोणाला प्रश्न नसतील तर.... " सगळ्यांनी माना हलवल्या... आकाशने सगळ्यांकडे एक नजर टाकली... "चला मग ...प्रवास सुरु करू... " 



to be continued...........................


Followers