All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday 29 October 2019

तिच्या मनातला " तो " आणि त्याच्या मनातली "ती " (भाग एक )

ती : - खूप दिवसांनी आज दिसला "तो " .. अजूनही तसाच आहे... का बदलला नाही... कि बदलावे वाटले नाही. नेहमीच्या बस स्टॉप उभा... त्यात वेगळ्या शैलीत उभा .... हाताची घडी घालून बस स्टॉपला रेलून उभे राहणे .... येणा- जाणाऱ्या प्रत्येकाला अगदी निरखून पाहणे. कधी विचारलं की हसून बोलायचा ... " नाही गं .... असच बघतो , स्वभाव कळतात प्रत्येकाचे .... त्याच्या चालीतून ..... " कुणास ठाऊक खरं काय ते , मलाही सुरुवातीला असंच बघायचा... विचित्र वाटायचे ते..   , एकदा बोलला हि होता, " मला तुला पाठमोरे चालताना बघायला आवडते ... " कसे awkward वाटलं होते तेव्हा... तरी त्याचे मन किती साफ हे मलाच माहित , इतरांपेक्षा....

एकाच सोसायटी मध्ये राहायचो आम्ही... इतकेच कॉमन आमच्यामध्ये .... शाळा , कॉलेज....  दोन्ही वेगवेगळी,.... हा ... तो बस स्टॉप .... तो मात्र एकच दोघांचा .... शाळेत जाताना आणि कॉलेजमध्ये जाताना सुद्धा... एक-दोन बस सोडल्या तर बाकी बस सुद्धा सारख्या... शाळेत जाताना आई असायची सोबत... तो असायचा नेहमीच बस स्टॉप वर ... त्याच्या style मध्ये उभा.... तसाच उभा... त्याची बस नेहमीच उशिरा का यायची ... हे कळायचे नाही. माझी बस यायची तरी तसाच उभा ... किंवा तो आधीची बस सोडत असेल असे वाटायचे. बाकी शाळेत असताना कधी बोलणे झाले नाही कि मैत्री नाही .... कॉलेज मध्ये गेलो तेव्हा गट्टी जमली. कॉलेज जरी वेगळे असले तरी रस्ता एकच... त्याचे कॉलेज जरा पुढे होते माझ्या कॉलेजच्या. एकत्र जायचो मग. कॉलेजमधून निघताना ही ... कधी मी त्याच्या कॉलेज जवळ , तर कधी तो यायचा मला नेयाला. एकत्रच घरी यायचो मग. बसने यायला ४०- ४५ मिनिटांचा रस्ता, छान वाटायचे त्याच्यासोबत... बोलायचा फार कमी..... पण जे बोलायचा , ते " भारी , कमाल , बहार ... " या कॅटेगरी मधले असायचे. कानात कायम इअरफोन... अर्थात गाणी कमी आवाजात लावायचा. माझ्या आवडीची गाणी मुद्दाम भरून ठेवलेली त्याने.... मोबाईल मध्ये.... छान वेळ जायचा आमचा ... ना !!

तो : -  " ती " च...होती ना बस मध्ये..... हो, हो ..... तीच होती. घरी आलेली असावी ... माहेरी... दिसली कशी नाही मग .... किंवा इथूनच निघाली असावी कुठेतरी... एकटीच होती... एकटी का ?? , सोबत तिचा मुलगा असतो ना ... मागच्या वेळेस दिसली होती तेव्हा साधारण दीड वर्षाचा असावा मुलगा तिचा.... आता दोन - अडीच वर्षाचा असेल.... जराशी .... जराशीच हा .... जाडी झाली आहे. गाल कसे गोबरे झाले आहेत. तेव्हा कशी सडपातळ होती. छान दिसायची. आताही छानच दिसते म्हणा. फक्त पहिली मनापासून हसायची... ते हसू  कुठे दिसत नाही तिच्या चेहऱ्यावर, तिची आजी भेटली कि सांगते. हसतच नाही आता ती. actually , तिच्या हसण्यानेच तिच्याकडे लक्ष गेले होते माझं. सोसायटीमधेच राहायची ती. तीच कुटूंब.... शाळेत असतानाच आवडायची ती. माझ्या शाळेत नव्हती तरी आमचा रस्ता एकच. कधी कधी एकाच बस मध्ये असायचो. तिची आई असायची सोबतीला. एकदा असेच झाले. बसची वाट बघत होतो. ७वीत असेन, कदाचित. तेव्हा तिला हसताना पाहिलं होते. त्या वयात प्रेम वगैरे फक्त ऐकून होतो.. तिचे ते हसणे बघितलं आणि मनात झालं काहीतरी... अचानक केवड्याचा सुगंध मनात दरवळत होता..... तेव्हा पासून ..... तिला बघण्यासाठी खास १०-१५ मिनिटं लवकर जायचो बस स्टॉप वर. तिची भेट चुकू नये म्हणून. तिची वाट बघायला आवडायचे. आधीची बस सोडून तिची वाट बघायचो. त्यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांकडे बघणे होयाचे. प्रत्येकाची वेगळी चाल.... चालण्याची पद्धत... मजा वाटायची. मग ती यायची... तिच्याकडे बघत बसायचो. आधी घाबरायची मला बघून. नंतर झाली सवय तिला. आधी वेगवेगळी बस असायची , नंतर तिच्या सोबत बस मध्ये... तिच्या आधी माझी शाळा.... कॉलेजला गेलो तेव्हा सुद्धा तसेच... शाळेत असताना बोलणे झाले नाही कधी आमचे... कॉलेजला गेलो आणि एकाच सीट वर बसून प्रवास सुरु... साधारण १०वी च्या शेवटाला आमची मैत्री झालेली. त्यामुळे नंतर ती माझ्याशी मोकळे पणाने बोलायची . तरी हे सर्व सोसायटी बाहेर हा .... भीती वाटायची तिला .... साहजिकच होते ते .... तरी तिची सोबत आवडायची.  

ती : - शी !! बाई .... छान वारा येतं होता खिडकीतून.... तर हा मेला पाऊस आला....त्यात हे ट्रॅफिक... शी !! .... त्रास नुसता या पावसाचा... हम्म ... तरी त्यालाही कुठे आवडायचा पाऊस... " चिकचिकपणा असतो नुसता पावसात " असे बोलायचा पावसाला. बरोबर तर होते... एकदा त्याच्याकडे छत्री नव्हती. माझ्याकडे होती ती एकटी पुरती. आमचा प्रवास बस मधून असला तरी ... बस स्टॉप ते सोसायटी... या प्रवासात भिजून गेलो होतो. घरी खोटे कारण सांगितले भिजण्याचं....  पण बसमध्ये ... किंवा प्रवासात .... तो सोबतीला असताना , आलेला पाऊस छान वाटायचा. त्यात त्याची ती मोबाईल मधली गाणी... अहाहा !! सुखद वाटायचे. कधीकधी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून शांत पडून राहायची. त्यालाही आवडायचे ते. आमचा बस स्टॉप येई पर्यंत तो कधी बोलायचा नाही. कदाचित तिथूनच मला त्याच्या प्रेमाची चाहूल लागली होती. शाळेत असताना कधी वाटलं नाही त्याच्याबद्दल , कॉलेजला गेल्यावर त्याच्याबद्दल भावना तयार झाल्या मनात.  

तो : - पाऊस सुरु झाला पुन्हा... पावसाळा आला कि कॉलेज मधले दिवस आठवतात.... अश्याच एका पावसात तिला बीचवर घेऊन गेलो होतो. तस सांगावे तर पाऊस , मी आणि ती .... यांचा काहीच संबंध नाही. पावसाबद्दल माझ्या सारखीच अरसिक ती ,.... पावसात लोकांना काय रोमँटिक वाटते हा प्रश्न पडायचा तिला. एकदा एका छत्रीतून सोसायटीच्या gate पर्यंत आलेलो. कोणी बघितले नव्हते आम्हाला ... पण तेव्हाच माझ्या डोक्यात आलेलं. एकदा पावसात बीचवर घेऊन जाऊ हिला... ठरवलं आणि गेलो. तेव्हाच तिला मनातलं सांगितलं होते. पाऊस नव्हता तरी पावसाळी वातावरण होते त्यादिवशी... हसली होती छान , मी विचारलं तेव्हा.... तेवढेच... उत्तर दिले नव्हते. ४-५ दिवसांनी बोलली होती, तेव्हाही पाऊस होताच... तेव्हाच , एकच दिवस पाऊस आवडला होता. त्यानंतर त्याने फक्त आयुष्यात वादळे आणायचे काम चोख बजावलं.

ती : - त्याने लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा हसले होते. पण आतून घाबरले होते. घरी कळलं तर काय होईल... हाच विचार आलेला. चार दिवस तर मनाची तयारी करण्यात गेले. शेवटी , त्याला होकार दिला. होकार ऐकून किती गोड हसला. मनापासून..... तसा तो जास्त एक्सप्रेस होयाचा नाही. पण तेव्हा पासून आमचे प्रेम official झालं. कॉलेज संपेपर्यंत ते आणखी घट्ट झालं. एक-दोनदा घरी आमचे " प्रकरण " कळले होते, तरी माझ्यावर घरच्यांचा विश्वास होता, मी असं काही करणार नाही म्हणून. खरं काय ते मलाच ठाऊक. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मस्त फिरायला गेलो होतो. तिथे मात्र माझ्या चुलत भावानेच पकडलं मला ; मग काय... घरी नुसतं रामायण - महाभारत... जरा काळजी म्हणून पुढचे २-३ महिने आम्ही दोघेही गप्पच. कॉलेजचे result लागले आणि दोघे लगेच जॉबला लागलो. जॉबमुळेच आम्ही पुन्हा भेटू लागलो. 


तो :-   " ती " आधीपासूनच बिनधास्त...मला सुरुवातीला घाबरायची तेवढंच... आणि घरच्यांना थोडेफार... नाहीतर कोणाला घाबरायची नाही. infact , मीही घाबरायचो कधी कधी...  तिच्या आईला विशेष घाबरायची. कधी कॉल केला तर गुपचूप तिच्या रूममध्ये जाऊन बोलायची. तेही किती हळू आवाजात. आईपासून लपून बोलायची. कधी कधी तर अचानक आई आली रूममध्ये ... फोन डायरेक्ट कट्ट !! हसायला यायचे मग. पण बोलायचो आम्ही... वेळेचे भान नसायचे मग. जॉब वरून मग फिरायला ठरलेलं आमचे, एकदा मात्र बाबांनी पाहिलं होते दोघांना. घरी येऊन उपदेशाचे डोस मिळाले ... जरा जास्तच... तिच्या घरीही कळलं. आम्ही पुन्हा एकत्र आलो ते. मग काय होणार ... तेच जे movie मध्ये असते तसेच.


ती : - पुढे अपघात झालेला दिसतो .. पावसामुळे .... भांडण !! आवाज तर येतो आहे .... हम्म....  आमच्या घरी झालेलं ते ....  केवढा मोठा राडा ... आणि काय ते .. अख्या सोसायटीला कळावे म्हणून घरातले एवढ्या मोठ्या आवाजात ओरडत होते , काय माहित. त्यात शेजारी - पाजारी... सिनेमा लावला आहे, आणि तो बघायलाच पाहिजे, असे सर्व येतं होते... आवर्जून अगदी !! त्यानंतर ते आलेच .... रडणे वगैरे... जसा काय केव्हडा मोठा गुन्हा केलेला मी प्रेम करून. ... तरी आला माझा हिरो .... माझी साथ देयाला... माझ्या घरी... माझ्यासाठी... मी कशाला मागे राहू मग... मीही २-३ फिल्मी डायलॉग टाकले... पण झालं ते बर झालं एका अर्थाने.... त्याचे माझ्यावर किती प्रेम आहे ते कळलं. कधी कोणाला न बोलणार , कधी न रागावणार... भांडला माझ्यासाठी... पाणी आलेलं डोळ्यात ... ते त्यासाठी.. त्यानेच पुढाकार घेतला मग .... आमच्या लग्नासाठी.... आधीच इतका तमाशा झालेला , तरीही एक बैठक झाली.... लग्नाची बोलणी करायला. कारण मी तर अजिबात ऐकणार नव्हते. मला त्याच्याशीच लग्न करायचे होते. २ दिवस जेवली नाही. केवढी भूक लागायची... तरी पक्के केलेलं. नाही म्हणजे नाहीच.... तयार झालेच शेवटी... प्रेम जिंकले.... त्यांना काय माहित... तो किती परफेक्ट होता माझ्यासाठी .... शेवटी झालं लग्न...

छान !! मंतरलेले दिवस होते ते.... एकाच सोसायटीमध्ये ना ... माहेर - सासर... छान वाटायचे मला. तोही किती चांगला ... हे आमच्या घरी कळायला थोडा वेळ लागला. पण जेव्हा समजलं तेव्हा त्यांना मी इतका त्याच्यासाठी का हट्ट करत होते ते कळलं. दोन्ही कुटूंब एकत्र आली.. सगळ्यांना आमचे प्रेम पटले... फक्त ... त्या देवाला .... त्याला पसंत नव्हते ... आमचे एकत्र येणे... !!  

============================ to be continued ================

1 comment:

Followers