All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday, 16 February 2016

एक होता राजा…. (भाग दोन )

                  बघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती. जाणार तरी कसं देयाला.… निलम विचार करत होती. त्या टपरीवरच्या "मिटिंग" नंतर एकदाही भेट नाही तिघांची, वा फोन नाही कोणाचा.…. साधा miss call सुद्धा नाही. massage तर लांबची गोष्ट. राजेशने तर बोलणं सोडलं होतं जवळपास. गप्प-गप्प असायचा. मंगेशने सुद्धा या २-३ महिन्यात निलमला फोन लावला नाही. पत्रिका तर दिलीच पाहिजे, राजेशच्या आईसमोर जायची हिम्मत नव्हती निलमकडे. राजेशसमोर तर मुळीच नाही. शेवटी न राहवून निलमने मंगेशला call लावला. 

" Hi मंगेश…",
"Hi… " एवढंच बोलला मंगेश.
" कसा आहेस मंगेश ? ",
"मी ठीक आहे… ",
" आणि राज… " निलम थांबली बोलता बोलता. 
" आणि कोण… राजेश… राजेश म्हणायचे आहे का तुला… " निलम काही बोलली नाही त्यावर. " राजेशचं विचारत असशील तर तुला स्पष्टच सांगतो… मला माहित नाही… ok ?? " निलमला वाईट वाटलं. 
"बरं, काय काम होतं… कशाला फोन लावलास.",
"भेटायचं होतं तुला… ",
"कशाला?",
"प्लीज यार मंगेश…. एकदा भेटूया ना आपण. ",
"ठीक आहे. मी येऊ शकतो… पण राजेशचं मी काही सांगू शकत नाही, आणि मला फोर्स पण करू नकोस… " निलम गप्प झाली.
" उद्या भेटू, त्याच टपरीवर… रात्री ९ च्या दरम्यान… चालेल का… ",
"हो… हो, चालेल पण नक्की ये, वाट बघते तुझी." 

बोलल्याप्रमाणे, मंगेश ९ वाजता टपरीजवळ आला.राजेश आधीच निघून गेलेला घरी. निलम आलेली तिथे. 
" Hi मंगेश… " निलमने मंगेशला येताना बघताच, त्याच्या मागे कोणी आहे का ते पाहिलं. मंगेशला कळलं ते." मी एकटाच आलो आहे, त्याला सांगितलं नाही हे मी.",
"सांगायचे ना, एकदा तरी… ",
"तो आला असता, असं वाटतं का तुला." निलम खाली बघू लागली. "बरं, ते जाऊ दे, काय काम होतं ते सांग." निलमने लग्नाचे निमंत्रण हातात ठेवलं. " अरे व्वा…. very good." मंगेशने तिचं अभिनंदन केलं.
" दोन पत्रिका… मी तर एकटाच आहे." ,
"एक राजा साठी… ",
" तू दे ना मग…. माझ्याकडे कशाला… साखरपुड्याचे आमंत्रण देयाला तर आली होतीस ना घरी त्याच्या…. मग आता सुद्धा जाऊ शकतेस त्याच्याकडे आणि हो, आता तो घरी भेटेल पण तुला… ",
" प्लीज मंगेश, असा का वागतोस…",
"असंच… आणि sorry , तुला वाईट वाटलं असेल तर… ",
"आणि engagement ला का आला नाहीत दोघे." त्यावर मंगेश हसला फक्त.एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आम्ही कूठे दिसणार हिला."चल bye… देतो मी पत्रिका राजाला… " मंगेश निघाला. 


            लग्नाचा दिवस, खूप मोठा सोहळा… केवढा मोठ्ठा हॉल… सगळी मोठी माणसं, पुरुष मंडळी सुटा-बुटात तर बायका-मुली… भरजरी साड्या आणि महागातले ड्रेसेस मध्ये, श्रीमंती तर डोळे दिपवणारी. निलम त्या लग्नाच्या साडीत, दागिन्यात राणी दिसत होती अगदी. तिचा होणारा नवरा, स्वप्निल… त्याने सुद्धा राजा सारखा पेहराव केला होता. भव्य-दिव्य लग्न अगदी… अर्थात त्या दोघांच्या परिस्तिथीला साजेशा असा. या सर्व लवाजम्यात, मंगेश एका कोपऱ्यात उभा राहून ते सर्व पाहत होता. त्याला माहित होतं, कि हा सोहळा मोठा असणार, मोठी नावाजलेली माणसं येणार म्हणून त्याने एक सूट भाड्याने घेतला होता, एका दिवसासाठी. तरीसुद्धा त्याला अवघडलेलं वाटतं होतं. सरतेशेवटी, गिफ्ट्स आणि फोटोशेसन ची वेळ आली. सगळे एका मागोमग एक असे, त्या जोडीला स्टेजवर जाऊन गिफ्ट देत होते, फोटो काढत होते. मंगेश गेला स्टेजवर… निलमला किती आनंद झाला. " अभिनंदन निलम… " मंगेशने दोघांचे आभिनंदन केलं." राजा…. राजा नाही आला. " निलमचा प्रश्न… नकारार्थी मान हलवली मंगेशने… "थांबा सर… एक फोटो… " फोटोग्राफरने मंगेशला थांबवलं. हातानेच 'नको' अशी खूण केली आणि मंगेश स्टेजवरून खाली उतरला. तसाच बाहेर निघाला. जाता जाता वळून बघितलं एकदा… सोहळा खूप छान आहे… राजा-राणीचा जोडा… तसाच पेहराव आहे अगदी दोघांचा. निलम एखादी राणीचं दिसते आहे आज… फक्त तिचा राजा वेगळा आहे… मंगेशच्या मनात विचार चमकून गेला…. आणि घरी निघाला तो. 

               निलम लग्न झाल्यानंतर एका आठवड्याने दुबईला गेली राहायला. आठवड्यात तिची सगळी कामं पूर्ण करून घेतली तिने. स्वतःची बदली करून घेतली तिथे. इकडच्या सामानाची आवराआवर करून घेतली. तिच्या मित्र-मैत्रीणीना, नातेवाईक… सगळ्यांना भेटून आली. आणि बरंच काही… एक-दोनदा , मंगेश,राजेश आणि त्याची आई… यांना भेटायचा विचार तिच्या मनात आला होता, पण गेली नाही.दररोज राजेशला एक call करावा असं वाटे, पण तेही जमलं नाही तिला. शेवटी त्याचा विचार करत करत निलम दुबईला गेली कायमची… आणि आपला राजा.… तो राहिला इथेच, त्याच्या आईसोबत, सोबतीला मंगेश होताच… राजा-राणीची कहाणी अपूर्ण राहिली. 
---------------X------------------------X-------------------------X----------------------X------------------

             त्या दिवशी, खूप पाऊस होता… मुसळधार अगदी. समोरचं काय दिसेल तर शप्पथ… निलम कशीबशी गाडी चालवत होती…. शिवाय, या रस्त्यांची तिला सवय राहिली नव्हती आता. airport वरून थेट ती घरी निघाली होती. तब्बल १५ वर्षांनी निलम पुन्हा भारतात येत होती,ऑफिसच्या कामानिमित्त. पहिली, २ दिवस दिल्लीला होती. त्यानंतर मुंबईला येत होती. इतक्या वर्षांनी तिला रस्ते कसे लक्षात असणार ना… १५ वर्षात खूप बदल होते मुंबईत. रस्ते, नवीन इमारती… खूप बदललेलं होतं, त्यात पावसाचे दिवस. त्यामुळे अजून त्रास होतं होता निलमला गाडी चालवताना. निलमचे मम्मी-पप्पा तिथेच राहत होते अजून. त्याच सोसायटी मध्ये. निलमचे काम होते मुंबईला आणि मम्मी-पप्पांना भेटण्यासाठी मुंबईला आली होती. 

           "काय वैताग आहे या पावसाचा… " निलम घरात येत म्हणाली. "ये… ये…" तिच्या पप्पांनी तिचं स्वागत केलं. "आणि काय झालं एवढं… पाऊसच तर आहे ना… " पप्पा हसत म्हणाले. " अहो… तिथे कुठे असतो पाऊस… म्हणून तिला त्रास झाला असेल… " निलमची मम्मी म्हणाली. " ते जाऊ दे… तू कशी आहेस… किती  वर्षांनी बघते आहे तुला… " घट्ट मिठी मारली आईने तिला. निलमला बरं वाटलं… 
" काय चाललंय माय-लेकीच…. मी सुद्धा आहे इथे… शिवाय ४ वर्षापूर्वी तर गेलेलो ना तिला भेटायला.… मग तेव्हा तर भेटली होतीस ना… ","तरी पण… ","ok बाबा… भेटा तुम्ही… पण तिला पहिलं फ्रेश तर होऊ दे… ","हा मम्मी… पहिली फ्रेश होते… खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत…. " निलम आत गेली फ्रेश होण्यासाठी…. आणि तिची आई, तिच्या आवडीचं जेवण बनवायला किचनमध्ये गेली. थोड्यावेळाने त्यांच्या गप्पा रंगल्या, जेवणाच्या टेबलावर… मस्तपैकी जेवण झालं. झोपायची वेळ झाली. निलमला झोप येत नव्हती. ती जागीच होती. बाहेर पाऊस सुरु होता. शेवटी बाल्कनीत येऊन उभी राहिली. मम्मी शेजारी कधी येऊन उभी राहिली ते कळलचं नाही. 
"काय निलम…. झोप येत नाही का…. ",
"हम्म… तशी झोप कमीच झाली आहे माझी… तिथे असताना सुद्धा उशिराच झोपते मी.… कामच चालू असते ना…. ",
"कशाला एवढं काम करायचं आणि कोणासाठी…. " निलम फक्त पावसाकडे पाहत होती. 
" किती वर्षांनी बघते आहे पाऊस मी… १५ वर्ष झाली ना… " ,
"हो… तिथे गेल्यापासून असा पाऊस कधी बघितलाच नसशील ना… आता आलीस तेव्हा किती वैतागून पावसाबद्दल बोलत होतीस…. तेव्हा लग्नाआधी…. किती भिजायचीस पावसात…. ",
"नको मम्मी…. पुन्हा त्या आठवणी नको…. झोपते मी आता… तू पण जाऊन झोप आता… " निलम झटपट तिच्या बेडरूम मध्ये गेली झोपायला.  

                पण झोप तर आली पाहिजे ना… तशीच तळमळत होती बेडवर निलम. शेवटी उठली पुन्हा आणि खिडकीजवळ आली. पाऊस तसाच कोसळत होता. इतक्या वर्षांनी बघत होती ना ती पाऊस.…. नकळत भूतकाळात गेली ती. काय वेड्यासारखी भिजायची ना पावसात… या सोसायटीमध्ये तर फार कमी भिजली असेन,राजाच्या चाळीत तर मुद्दाम भिजायला जायची… राजाची आई, मस्त भजी बनवायच्या… त्याची चव अजून रेंगाळते जीभेवर… कधी पावसात गरमा-गरम चहा व्हायचा त्या टपरीवर, निदान २ कप तरी… किती छान ना…. पावसात भिजत भिजत चहा पीत बसायचो… आम्ही तिघेच…मी,मंगेश आणि राजेश…अचानक निलमच्या डोक्यात राजेशचा विचार आला.… राजा… कसा असेल ना तो… त्या टपरीवरची भेट शेवटची… मंगेश लग्नाला तरी आलेला, राजेशला तर त्या दिवसापासून पाहिलंचं नाही मी… किती मनात होतं त्याच्याशी बोलावं एकदातरी…हिंमत झाली नाही कधी… सांगायचं होतं मनातलं, ते सुद्धा राहून गेलं… गालावर काही पडलं तिच्या, गालावून हात फिरवला तिने… पाण्याचा थेंब… पावसाचं पाणी होतं का ते… नाही… तिच्या डोळ्यातूनच येत होतं पाणी… तेही कळलं नाही तिला… तशीच उभी राहिली पावसाकडे पाहत… आज काही झोप येणार नव्हती तिला. 

            निलम मुंबई ब्रांचला जाऊ लागली. त्यासाठीच तर आली होती ना ती. २ दिवस झालेले, पुन्हा कामात गुंतली निलम. उशिराच निघायची ती ऑफिसमधून. त्यादिवशी काम लवकर संपलं, खूपच लवकर…. निघाली घरी कारमधून.बाहेर मुख्य रस्त्यावर आली. जरासं ट्राफिक लागलं. गाडीतूनच आजूबाजूला पाहू लागली. अचानक तिला आठवलं, राजेश आणि मंगेशचं ऑफिस जवळच होतं ना.  जाऊया का तिथे… कदाचित भेट झाली तर. निलमने गाडी तिकडे वळवली. किती वर्षांनी आली होती तिथे. अनोळखी सगळं. निलम कार मधून उतरली. काहीच ओळखीच नाही. ती पुढे आली. राजेश-मंगेशचं ऑफिस होतं, तिथे आता अर्धवट बांधकाम सुरु होतं. मग तिथे उभ्या असलेल्या watchman ला विचारलं तिने… " ते ऑफिस….ते तर कधीच बंद झालं, ते पाडून हि नवीन इमारत बांधत आहेत.","मग त्या ऑफिस मधले कर्मचारी… ते कूठे गेले, माहित आहे का तुम्हाला… " त्याने नाही म्हणून मान हलवली. निलम नाखुशीने निघाली. गाडी सुरु केली. आता ट्राफिक थोडं कमी झालेलं. त्या bus stop जवळ आली. राजेशची आठवण एकदम उफाळून आली तिच्या मनात.… मुद्दाम थांबून रहायची मी… त्या दोघांची वाट बघत… मग एकत्र जायचो घरी. गप्पा मारत मारत कधी घरी पोहोचायचो, कळायचे नाही. काय दिवस होते ते. निलमला सगळं जुनं आठवत होतं. या २ दिवसात वेगळ्या रस्त्याने घरी आलेली ती. आज तिला "त्या" रस्त्याने जावसं वाटलं. त्याच जुन्या रस्त्याने कार घेऊन गेली ती. त्यावेळी कसा होता हा area… आणि आता,… एका मागोमाग एक चाळी होत्या इथे… आता तर इमारतीच दिसत आहेत. निलम हळू हळू कार चालवत होती, बाहेर बघत बघत. एका ठिकाणी गाडी थांबवली तिने. उतरली गाडीतून. छानपैकी बाग होती तिथे. निलम तिथेच घुटमळत होती. इकडेच तर ती चहाची टपरी होती ना.… एवढी वर्ष इकडेच चहा घेयाला यायची मी. तोडली वाटते ती टपरी. अडचण होत असेल ना त्या सोसायटीवाल्यांना…आपण सुद्धा सोसायटी मध्ये राहतो ना… निलम स्वतःशीच हसली. थोडावेळ थांबली अजून. आणि गाडीत बसून पुढे आली. काही मिनिटांवर चाळ होती ती, राजेश-मंगेश रहायचे ती… लांबूनच बघितलं तिने. ती चाळ मात्र तशीच होती. निलमला हायसं वाटलं. गाडीतून उतरून जाऊया असं क्षणभरासाठी तिच्या मनात आलं. पण मनातच ठेवलं तिने. गाडी start केली, गेली निघून घरी तिच्या. 

                पुढचे २-३ दिवस, निलमचा तोच उपक्रम.… ऑफिस मधून निघाली कि मुद्दाम त्या रस्त्याने यायची. क्षणभर का होईना… थांबायची चाळीकडे बघत… तशीच निघून जायची.आता तर मुंबईतले काम सुद्धा होतं आलेले. एकदातरी भेटायला हवे राजाला… खूप वेळा मनात आलं, तसंच राहिलं मनात. अशीच एकदा तिने गाडी थांबवली आणि चाळीकडे बघू लागली. त्याक्षणी, अचानक कोणीतरी गाडी समोर येऊन उभं राहिलं. बघते तर मंगेश,… मंगेशला सुद्धा निलमला बघून आश्चर्य वाटलं. "अरे तू… " मंगेश बोलला. तशी निलम गाडीच्या बाहेर आली. 
" अरे… निलम, कशी आहेस… किती वर्षांनी बघतो आहे तुला…", मंगेश उत्साहात विचारात होता अगदी. निलमला सुद्धा आनंद झाला मंगेशला बघून. 
"पण… तुला कसं कळलं, गाडीत मी आहे ते. ",
"मला कसं कळणार ते… ",
"मग गाडीच्या समोर आलास ते… ",
"ते होय… अगं, तुझी गाडी बघतो आहे, गेले ४-५ दिवस… गाडी थांबायची, कोणी बाहेर यायचे नाही, आणि ५ मिनिटांनी निघून जायची. म्हणून आज बोललो, बघू कोण आहे ते. तर तू निघालीस." मंगेश हसत हसत म्हणाला. 
" अगं… मग यायचे ना वर घरी… का आली नाहीस." निलम त्यावर काही बोलली नाही. "चल… आता येतेस का…",
"न… नको, आज नको… काम आहे घरी… नंतर येईन कधीतरी." मंगेश त्यावर हसला.
" का रे हसलास… ",
"असंच…. तुला आवडत नसेल आता… चाळीत कशी येणार तू… ते जाऊदे… इकडे कशी…",
"मुंबईला काम होतं… actually, दोनच आठवडे झाले… पहिली दिल्लीला होते… आता मुंबई ब्रांचला काम होतं. म्हणून आली इंडिया मध्ये.",
"अच्च्चा… आनंद आहे… मला वाटलं,भेटायला आलीस… " निलम खोटंखोटं हसली. थोडावेळ असाच गेला. कोणीच बोललं नाही. 
निलम बोलली मग, " काय चाललंय मग… ",
"माझं… मजेत चालू आहे… ",
"लग्न केलंस… ",
"हो मग… तुला mail केली होती लग्नपत्रिका… तुला भेटली का माहित नाही… नाहीतरी तू कूठे आली असतीस…" पुन्हा गप्प निलम." आणि एकटीच आलीस का इंडियात… कि मिस्टर आहेत सोबत.एकदा ये घेऊन गरीबाकडे… त्यांनी तर अशी चाळ पण बघितली नसेल ना कधी… " मंगेश हसत म्हणाला. निलम शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती.

"अरे हा… तुझी पोस्ट पण वाढली असेल ना आता. ",
"हो… manager आहे आता. " ,
" Wow !! ग्रेट यार… ".
"आणि तुमचं ऑफिस…. बंद झालं ना… " ,
"अरे व्वा !! तिथे पण जाऊन आलीस.पण इथे यायचे नाही ,अस सांगून ठेवलं आहे वाटते नवऱ्याने… "मंगेश तिला चिडवत म्हणाला. 
" मंगेश प्लीज… " निलम रागात म्हणाली. 
"राग आला का…. त्यांना बोललो म्हणून… राहिलं मग… मस्करी करत होतो… खूप वर्षांनी भेटलीस ना म्हणून मस्करी केली.",
"तसं नाही रे पण…. "निलम थांबली बोलता बोलता. "चल,मी निघते… घरी पोहोचायला उशीर होईल मग… " मंगेशला कळलं ते. 
"sorry यार… प्लीज रागावू नकोस… खरंच मस्करी केली मी. तेवढातरी अधिकार आहे ना या मित्राला… बरं… त्यांची माफी मागतो मी… झालं का समाधान, मला फक्त विचारायचे होते कि ते पण आले आहेत का… " निलम गप्पच. 
"बोलं गं… sorry बोललो ना आता… ",
"तो नाही आला… ",
"ok, ठीक आहे… कामातून वेळ मिळत नसेल, कसे आहेत ते… ",
"मला माहित नाही." मंगेश अचंबित.
"म्हणजे… ? ",
"नाही माहित… ",
"अरे… माहित नाही म्हणजे काय… ",
"आम्ही नाही राहत एकत्र…तो कूठे असतो ते मला माहित नाही.",
"काय चाललंय… निलम,काय झालं."निलम शांत. मंगेशला कळत नव्हतं काय ते.
" निलम… एक काम करू… तुला वेळ असेल तर… इकडे पुढे एक छोटंसं हॉटेल आहे. मी तिथे जातो आहे चहा घेयाला. तू पण चल… असं रस्त्य्यात नको बोलणं… " निलम तयार झाली. गाडीत बसून दोघे पोहोचले हॉटेलमध्ये. 

चहाची order दिली मंगेशने. चहा आला." हा… काय झालं नक्की निलम… एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे.",
"आमचा divorce झाला आहे." मंगेश उडालाच.
"काय बोलतेस तू… " निलम काही न बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून shock मध्ये, निलम शांतपणे चहा पीत होती. मंगेश थोड्यावेळाने पुन्हा बोलला.
" मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकल आहे , बरोबर ना निलम… ",
"नाही, जे ऐकलंसं ते खरं आहे.",
"कधी झालं हे… " ,
" लग्नाच्या second anniversary ला… मी त्याला गिफ्ट दिले divorce papers… त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो.",
"का असं ?".
"जमलं नाही मला… ",
"काय जमलं नाही." ,
"त्याच्या सोबत राहणं जमलं नाही मला.",
"तू काय बोलते आहेस… तुला तरी कळते का… " ,
"सांगते सगळं… पहिला तो चांगला वागायचा.म्हणजे सुरुवातीला… तेव्हाचे दिवस छान होते, तो वेळेत घरी यायचा…. मोठा flat आहे दुबईला त्याचा… छान वाटायचं मोठ्ठ घर तेव्हा. वरचेवर तो दुबई दाखवायला घेऊन जायचा. कधी कधी घरी पार्टी असायची. मज्जा यायची तेव्हा. वाटायचं किती छान life झाली माझी… आता खऱ्या अर्थाने settle झाली मी, असंच वाटायचं. हे फक्त सुरुवातीला हा… नंतर त्याने खरी life काय आहे ते दाखवून दिलं. माझं मुक्त वागणं त्याला आवडायचे नाही. कोणा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलणं त्याला नको असायचे. उशिरा यायचा ऑफिस मधून. कूठे बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तर वैतागायचा. वर बोलली मी एकटी जाते तर बोलायचा, दुबई माहित नाही तुला अजून. चडफडत घरी थांबायला लागे. कधी कधी सुट्टीच्या दिवशीपण कामावर तो, मग एकटीच त्या घरात… TV बघून तरी किती बघणार ना… सुरुवातीला आवडणारं ते मोठ्ठ घर, खायाला उठायचे अगदी. वेडी होऊन जायचे मी… मग हा यायचा रात्री उशिरा.…. न बोलता तसाच झोपायला जायचा. नंतर नंतर तर, त्याच्या ऑफिसच्या सिनिअरने काढलेले राग माझ्यावर काढायचा.… भांडणं सुरु झाली ती अशी…. उगाचच कसलेशे वाद काढत राहायचा. रोजच्या रोज भांडणं… भांडण झालं कि हा जाऊन बसायचा त्याच्या reading room मध्ये. तिथेही काम करत बसायचा.… मी एकटी पडली होती.… रडत बसायचे मग. एकदा खूप ताप होता अंगात… मला वाटलं तेव्हा तरी थांबेल तो…बोलला,"डॉक्टर येतील, त्यांना call केला आहे मी… मी थांबू शकत नाही… महत्त्वाची मिटिंग आहे. आणि निघून गेला. ताप खूप होता म्हणून हॉस्पिटलमध्ये होते ३ दिवस…. हा माणूस… ३ दिवसात फक्त एकदा आला,मला बघायला… ते पण कशाला, तर त्याची कार बंद पडली होती आणि माझ्या कारची चावी भेटत नव्हती म्हणून…. चावी कूठे आहे ते विचारलं,डॉक्टरसोबत काही बोलला आणि निघून गेला… म्हणजे मी कोणीच नाही का याची… तेव्हा ठरवलं, बस्स झालं!!  बरी होऊन घरी आली. तेव्हा याने पार्टी ठेवली होती. मला वाटलं माझ्यासाठी….तेही चुकीचं होतं. पार्टी होती एक मोठा प्रोजेक्ट भेटल्याची… तेव्हा आपण हे सगळं खोटं खोटं, बनावट जीवन जगतो आहे, याची जाणीव होऊन गेली. पार्टीत आलेल्या लोकांसमोर उगाचच खोटी smile देयाची… आपण किती सुखी आहोत ते दाखवायचं…. कशाला ते.… जीव गुदमरत होता माझा,त्या मोठ्या घरात.… मग एकदा तो लवकर आलेला घरी, वाटलं हीच वेळ आहे बोलायची… बोलून टाकलं मनातलं सगळं… तो शांत होता, आणि शांतपणेच बोलला, divorce papers घेऊन ये… मी sign करतो. सगळे divorce papers तयार होण्यास वेळ लागला आणि बरोब्बर… लग्नाच्या second anniversary ला पेपर्सवर sign झाली…. वेगळे झालो." निलमचं बोलणं संपलं.

              मंगेश स्तब्ध झाला होता. आपल्याला काय वाटतं होतं आणि काय झालं हे… काय बोलावं कळत नव्हतं… शेवटी बोललाच मंगेश…
" अगं… मग आम्हाला का सांगितलं नाहीस… मित्र होतो ना… आणि एवढी वर्ष कूठे होतीस मग… ",
"तिथेच दुबईला… माझी पोस्ट वाढली होती ना, मग कंपनीने घराची व्यवस्था केली. तिथेच होती राहत मी.",
"इकडे का आली नाहीस पुन्हा… ",
"कशी येणार होती मी इथे… आणि कोणत्या तोंडाने… सगळं मागे सोडून अगदी अभिमानाने गेली होती India सोडून. सगळे परतीचे मार्ग मीच बंद केले होते ना… कोणत्या वाटेने येणार होती परत… " निलमच्या डोळ्यात पाणी आलं. ते आवरलं तिने. चहा संपवला.
" त्या टपरीवरच्या चहाची सर नाही ना या चहाला… " विषय बदलला मुद्दाम निलमने.
"हम्म… " मंगेश बोलला. 
" कधी तोडली रे ती टपरी… ",
"झाली… ३ वर्ष तरी झाली असतील. त्या सोसायटीला त्यांची बाग करायची होती ना आणि टपरीमुळे त्या बागेचं "सौदर्य" झाकलं जात होतं… तोडली म्हणून.",
"आणि तुझा जॉब कसा चालू आहे… ",
"छान… तोही छान आहे… आता इकडे जवळच जॉब आहे आमचा. salary सुद्धा चांगली आहे. प्रवासाचा खर्च नाही कि दगदग नाही.…. ",
"तेव्हाचं आठवतंय… एकत्र यायचो कार मधून…." निलमला आठवण झाली आणि हसली ती. 
" राजासाठी थांबायचीस ना मुद्दाम… " मंगेश… निलम काही बोलली नाही त्यावर. 
" बोल आता तरी निलम… " खूप वेळाने निलमच्या तोंडातून शब्द आले. 
"हो… मुद्दाम त्याच्यासाठीच यायची मी आणि थांबायची… छान वाटायचं बोलताना त्याच्याशी… कायम तो जवळ असावा असं सुद्धा वाटे मला… ",
"मग कधी बोलली नाहीस ती.",
"नाहीच बोलू शकले… माझ्या पप्पांना राजा आवडायचा पण फक्त मित्र म्हणून… त्यांच्या मनात वेगळेच विचात होते…जावयाबद्दल आणि त्यांना भेटला तसाच जावई… मी फक्त त्यांच्यासाठी लग्न केलं हे… राजा मनापासून आवडायचा मला.",
"खूप मोठी चूक केलीस निलम… ",
"हो… म्हणून तर एवढी वर्ष वनवासात होती जणूकाही… एकटीच राहायची तिथे.… पप्पा-मम्मी सांगायचे,परत ये मुंबईला… मीच नाही आले… वाटायचे, राजा समोर आला काय बोलेल… आयुष्यात बहुतेक निर्णय बरोबर घेतले मी… हा एकाच निर्णय चुकला माझा." निलम सांगत होती." एवढी वर्ष, खूप काही मीस केलं मी रे … इकडचे सण, पाऊस, या वास्तू, आपल्या भेटण्याच्या जागा आणि… ",
" आणि राजेशला… बरोबर ना… " मंगेशने तिचं वाक्य पूर्ण केलं.
" हो… आज बोलू शकते मी… राजाला खूप मीस केलं मी… " पुन्हा शांतता… मंगेश निलमकडे पाहत होता आणि निलम बाहेर कूठे तरी. 

" राजा… कसा आहे रे… " निलमने विचारलं. 
" राजा ना… मस्त आहे अगदी." निलम जरा हसली. 
" त्या टपरीवर भेटलो होतो ते शेवटचं. लग्नात सुद्धा आला नव्हता राजा ना. माझा राग आला असेल म्हणून आला नसेल कदाचित.",
"नाही ग… राजाला कधी बघितलस का कोणावर रागावलेलं… आईंना खूप ताप होता त्यादिवशी… तरी ती सांगत होती, तू जा लग्नाला… पण राजा आईला सोडून येणार होता का… नाही ना… तेच कारण होतं, लग्नाला न येण्याचं.",
"तसाच आहे का अजून राजा… ",
"तसाच म्हणजे… स्वभाव तर तसाच आहे, जो लहानपणापासून आहे. फक्त जरासा जाडा झाला आहे बस्स.… तेव्हा कसं, तुझ्यासमोर यायचे म्हणून टापटीप असायचा. जेवणाकडे लक्ष असायचे. बाहेरचं तेलकट, तुपट खायचा नाही. फक्त तुझ्या सोबत असायचा म्हणून हे सगळं करायचा.… तू निघून गेल्यावर कशाला पाहिजे ते… शिवाय कधी आईला बरं नसलं कि बाहेरचं खाणं होयाचे ना… वेळेअवेळी जेवण… सुटला आहे जरासा… ",
"मी नव्हते, पण तू तरी होतास ना…",
" मी… मी कधीच सोडणार नाही त्याला… तशी शप्पतच घेतली आहे मी. बायकोला पण लग्न करायच्या आधी सांगून ठेवलं आहे मी.… कधी काही झालं आणि तुमच्या दोघांमध्ये जर कोणी निवड करायला सांगितली,तर मी राजेशची निवड करणार. अशी माणसं आता दुर्मिळ होत आली आहेत. माझ्यासोबत आहे एक, तेच माझं नशीब… आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला सोडणार नाही मी, हे नक्की… " निलम सगळं ऐकत होती.
" आणि राजाची family…",त्यावर मंगेश हसला. 
"येऊन बघ एकदा… मोठी family आहे राजाची आता… आणि त्यात तो खूप आनंदी आहे, सुखी आहे." निलम गप्प झाली त्यावर.

बोलता बोलता रात्रीचे ९ वाजले. निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या. 
"चल निलम… छान वाटलं बोलून, इतक्या वर्षांनी… नशीब आठवण तरी ठेवलीस आमची… ",
"हो रे… तुम्हाला कुठे विसणार होती मी…",
"बरं…. आता किती दिवस आहेस इंडिया मध्ये…",
"actually…मी आता बदली करून घेणार आहे, प्रोसेस सुरु झाली आहे, दिल्ली ब्रांचला बदली करून घेईन.",
"आणि इकडे नाही येणार का… ",
" may be नाही… पप्पा-मम्मीनी ठरवलं आहे, ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील. पप्पा तर retire झालेत ना…. मग तसं पण काम नाही त्याचं इथे… सगळेच तिथे राहू मग… पण अजून नक्की नाही… ",
"ठीक आहे… पण जाण्याआधी, एकदातरी…. राजेशला भेटून जा… कारण आता फक्त या २ चाळी शिल्लक आहेत…  त्या पाडल्या तर कूठे जाऊ ते माहित नाही आम्हाला… बघ , जमलं तर… " म्हणत मंगेश निघून गेला. निलम तशीच उभी होती विचार करत.

                 पुढच्या २ दिवसात निलमचं मुंबईतलं काम संपलं. अजून २ दिवसांनी परतीचा प्रवास सुरु होणार होता तिचा. पुन्हा एकदा निलम त्या रस्त्याने आली. चाळीसमोर कार थांबवली आणि बघत बसली चाळीकडे. काय मनात आलं तिच्या. उतरली गाडीतून आणि आली चाळीत… जुने दिवस आठवले… पुढच्या महिन्यात गणपती आहेत बहुतेक… चाळीत मंडपाची तयारी चालू होती, त्यावरून तिने ओळखलं. त्या सार्वजनिक आरत्या आठवल्या तिला.… मस्त मज्जा करायचो. रात्रभर जागायचो, मग कॉलेजला lecture ला झोप यायची. निलमला हसायला आलं. राजाची आठवण झाली पुन्हा तिला. चाळीकडे मोर्चा वळवला तिने. तिसरा मजला ना… हो, तिथून ५वी खोली… असेल का राजेश घरात… ८ वाजले होते रात्रीचे… निलम पोहोचली राजेशच्या खोली जवळ.… या बाल्कनीत किती वेळा गप्पा मारत उभे असायचो आम्ही…. तासनतास गप्पा चालायच्या तिघांच्या… मंगेशचं घर शेजारी… त्या खोलीला कुलूप होतं… बाहेर गेला असेल मंगेश कदाचित… राजेशच्या खोलीचं दार बंद, पण कुलूप नाही… म्हणजे आतून बंद असेल… आत असेल कोणीतरी… राजेश may be… निलमने दरवाजा ठोठावला.

"कोण पाहिजे तुम्हाला ? ",एका लहान मुलीने दरवाजा उघडला.
"राजा… ",
"राजा… कोण राजा… ?",
"sorry, sorry…. राजेश… इकडेच राहतो ना… ",
"बाबा… बाबा पाहिजे का तुम्हाला… बाबा आला नाही अजून",
"मग कोण आहे का घरात … ",
"आज्जी आहे ना… थांबा हा जरा… " म्हणत ती मुलगी धावत आत गेली. राजाची मुलगी वाटते… छान आहे, मंगेश बोलला होता ना छान family आहे त्याची… निलम मनातल्या मनात बोलली. 
" हि बघा आज्जी… "त्या लहान मुलीने राजेशच्या आईचा हात धरून बाहेर आणलं. 
" कोण आहे ग बबडी… ?" राजेशची आई म्हणाली. निलमला पाहिलं आणि थक्क झाली. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. " रा… राणी ना तू… ",हो आई… " आणि दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ तश्याच रडत होत्या दोघी. खूप वेळानंतर दोघी शांत झाल्या. " ये … आत ये. " म्हणत राजेशच्या आईने तिला घरात आणलं."बस हा… पाणी आणते." आई लगबग करत गेली. निलम ती खोली बघू लागली. तशीच अगदी. काहीच फरक नाही. जशी शेवटची पाहिली होती तशीच. आई सुद्धा तश्याच आहेत, फक्त केस पांढरे झाले आहेत… आणि घरात ३ लहान मुलं… सगळी कुतूहलाने निलमकडे बघत होती. " हे घे पाणी… " निलमने ग्लास घेतला. 

आई निलमच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती, डोक्यावरून हात फिरवत होती. आनंद तर चेहऱ्यावर दिसत होता तिच्या. 
" कशी आहेस ग राणी… ",
"कशी वाटते तुम्हाला?",
" अगदी आहेस तशीस आहेस, जरा बारीक झाली आहेस…जेवत नाहीस का ?", निलम हसली त्यावर.
"जेवते आई… काम जास्त असते ना म्हणून… ",
"जरा स्वतःकडे पण लक्ष देयाचे ना… ",
"हो आई… नक्की देईन. "छान वाटतं होतं निलमला… तिलाही किती आनंद झाला होता. 
" मग, कधी जाणार आहेस दिल्लीला राहायला ? ",त्यावर मात्र निलम चाट पडली.
" आई !!! तू… तुम्हाला कसं माहित ?",
"मंगेश… ज्यादिवशी तुमची भेट झाली ना, त्याचरात्री मला सांगितलं सगळं त्याने. ", निलमला मंगेशचा राग आला. आईंना कळलं ते. 
" मंगेश पण माझाच मुलगा आहे ना… तू मुलगीच आहेस ना माझी, त्याला खूप वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल… सांगावसं वाटलं म्हणून सांगून टाकलं त्याने." ,
" आणि राजाला…. " ,
"घाबरू नकोस, त्याला माहित नाही हे आणि सांगणार सुद्धा नाही त्याला…. ", निलमला हायसं वाटलं. 
" आई… मला सांगायचे नव्हते कोणाला, मंगेश विचारू लागला म्हणून सांगितलं त्याला.",
"म्हणजे तू राजेशला ओळखलं नाहीस… " ,
"त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्याच्यासमोर आली नाही कधी. " निलम ते बोलून शांत बसली. 

"कसा आहे राजा… ?",
"राजा ना… बघ आता येईल थोड्यावेळात… ",
"ऑफिसला गेला आहे का ? ",
"नाही गं, पुढच्या महिन्यात गणपती आहेत ना, तो खालीच आहे मंडपाजवळ… तुला दिसला नाही वाटते तो… " ,
" नाही…. पण मला भेटायचे आहे त्याला… " तेवढ्यात राजेश दारात हजर… निलम उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. राजेशचं लक्ष तिच्यावर गेलं, तोही तिच्याकडे बघू लागला. " बाबा !!! …. " म्हणत तिन्ही मुलं राजेशला जाऊन बिलगली तेव्हा राजेश भानावर आला. "बाबा… खाऊ काऊ आणला… " एका मुलाने विचारलं. " नाही रे… उद्या आणीन हा नक्की. " तशी तिन्ही मुलं जाऊन पुन्हा अभ्यासात गुंतली. 

                   राजेश घरात आला. आईने पाणी आणून दिलं. राजेश निलमकडे पाहत नव्हता आता. पण निलम त्याच्याकडेच बघत होती अजूनही. निरखून अगदी. राजा खूप बदलला होता आता. अर्थात मंगेश बोलला तसा. त्याची हेअर स्टाईल खूप आवडायची निलमला. आता सुद्धा तशीच होती, फक्त काही पांढरे केस बऱ्यापैकी काळ्या केसांतून डोकावत होते… पहिलं एकदम क्लीन शेव असायचा, आता दाढीही पांढरी होती बहुतेक.… पहिला बारीक म्हणजे ठीकठाक होता शरीरयष्टीने… आता त्याने घातलेल्या त्या ढगळ शर्टातून वाढलेलं पोट दिसत होतं. पहिला नेहमी उत्साही असणारा राजा, आता थकलेला वाटत होता. 
"कशी आहेस ?", राजेशच्या त्या प्रश्नाने निलम भानावर आली.
" हं… हा , छान आहे मी… तू कसा आहेस… ",
" मी…. कसा वाटतो तुला… " ,
" छान वाटतोस. ",
"छान… ??" राजेश हसला. 
" का रे हसलास… ",
"कुठल्या angel नी मी तुला छान वाटतो…" पुन्हा हसला राजेश… हा, ते एक होतं… त्याचं हसू …. अगदी लहान गोंडस बाळासारखा हसायचा तो. ते तसंच होतं अजून. हसू आवरत राजेश बोलला.
" कधी आलीस मुंबईला",
"कालच आली आणि तुला भेटायला आली." खोटं बोलली निलम. 
" अजून किती दिवस मग… आणि मिस्टर असतील ना सोबत… ",
"काम होतं ना मुंबईला, म्हणून एकटीच आली आहे, त्याला वेळ नाही ना भेटत, नाहीतर आला असता तोही. ",
"हा… काम असतील ना खूप… बरोबर मग. " निलमला वाईट वाटत होतं.आपण जास्त काही थांबू शकत नाही राजासमोर म्हणून ती उठली. "चल मग… निघते मी, घरी काम आहे थोडं… नंतर भेटू कधीतरी… ","ठीक आहे." म्हणत राजेश सुद्धा उठला.

                    खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि जोरात पावसाला सुरुवात झाली." थांब निलम… पाऊस थांबला कि जा… भिजशील उगाच… " निलम थांबली. आता, दोघे त्या बाल्कनीत उभे राहून पावसाकडे बघत होते. राजेशची आई… दोघांना आतूनच पाहत होती. किती वर्षांनी ते असे उभे होते. निलम बोलली थोड्यावेळाने.
"भिजतोस का अजून पावसात…. मी तर किती miss केलं पावसाला… "राजेशने smile दिली.
"तिथे दुबईला नसेल ना पाऊस वगैरे… तुला खरं सांगू… मला पाऊस असा आवडला नाही कधी. शाळेत असताना तर, बाहेरच पडायचो नाही मी, पाऊस सुरु झाला असेल तर…. वाटायचं, आपण विरघळून जाऊ आपण पावसात. तरी लहानपणी कूठे अक्कल असते एवढी… पण नाही आवडायचा पाऊस मला. फक्त तू भिजायला यायचीस म्हणून… तुझ्यासाठी मी भिजायचो पावसात… मला थंड सहन होत नाही ना… लगेच शिंका सुरु होतात.",
"मग कशाला भिजायचं?",
"तू असायचीस ना म्हणून… तुझं भिजून झालं कि तू घरी जायचीस. आणि मी इथे शिंका देत बसायचो." राजेश हसत म्हणाला.
" तुला थंड चालत नाही, मग…. मी ice -cream देयाचे ते… ",
"तुझ्यासाठी फक्त… नाहीतर इकडे कूठे , कोणाला सवय आहे ice-cream ची… ",
"अरे… पण आधी सांगायचे ना… ",
"कशाला… तुझ्यासाठी काहीही करायची तयारी असायची माझी तेव्हा… "निलमला काय बोलावं ते कळत नव्हतं. 

पाऊस काही कमी होतं नव्हता. निलमच्या डोक्यात खूप विचार सुरु होते.विचारू का राजेशला…. नको… विचारूया…. पुन्हा नको… शेवटी विचारलं तिने.
"खूप miss केलंस का मला",राजेशने एकदा पाहिलं निलमकडे… 
"खूप……. खूप म्हणजे खूप, सांगता येणार नाही एवढं… सगळीकडे तुलाच शोधात असायचो. दिवस सुरु झाला कि पहिला मोबाईल चेक करायचो… तुझा एखादा missed call , निदान massage तरी… ते नाही दिसलं तर दिवसभर वाट बघायचो तुझ्या call ची… ते घडलंच नाही कधी, तरी रोज करायचो. ऑफिस मधून निघालो कि मुद्दाम २-३ बस सोडून द्यायचो. वाटायचे…. आता तू कार घेऊन येशील… मग तिघे तश्याच गप्पा मारत घरी जाऊ… मंगेश वैतागून मग मला बळजबरीने बसमध्ये कोंबायाचा…. त्यानंतर घरी आलो कि पुंन्हा तेच… तुझ्या call ची किंवा massage ची वाट बघत बसायचो.…. एवढ्या वर्षात तसं काही घडलंच नाही." निलम शांतपणे ऐकत होती. "त्यानंतर…. हे उत्सव,सण आणि हा पाऊस…. वाटायचं, एकदातरी येशील पावसात भिजायला…. आणि आलीस कि खालूनच आवाज देशील…. "ये राज्जा !!!!! ये भिजायला… " मला आवडायचे ते… त्या टपरीवर… आता तोडली ती… जाऊन चहा पीत बसायचो, एकटाच जायचो… तू नसलीस तरी, २ चहा सांगायचो. तू काही यायची नाहीस. थोड्यावेळाने तो थंड झालेला चहा मीच प्यायचो.…. रंगपंचमीला कशी धावत यायचीस खोलीत,रंग लावायला… आठवतेय. " निलमने होकारार्थी मान हलवली."एवढ्या वर्षात एकदाही बाहेर गेलो नाही मी रंगपंचमीला… आई बोलायची, जा खेळायला… मी बोलायचो, निलम येऊन घेऊन जाईल,तेव्हा जाईन मी… दिवाळीत पण… तुझा फराळ वेगळा काढून ठेवायचो मी… दरवर्षी हा, न चुकता… शेवटी तो खराब व्हायचा आणि आई टाकून द्यायची मग… म्हणजे खरंच…. सांगता येणार नाही एवढं miss केलं तुला… " निलमच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं. "तुला आठवतंय…. आपण तिघे फिरायला जायचो ते… कित्ती मज्जा करायचो… movie बघायला जायचो… महिन्यातून एकदातरी.… मी पैसे साठवून ठेवायचो त्यासाठी. तू निघून गेल्यावरही, मी २ तिकीट काढून ठेवायचो,अर्थात गेलो नाही कधी movie ला… तू घेऊन जायचीस म्हणून मी जायचो… एकटा जाण्याची हिंमत नव्हती माझ्यात… तरी दर महिन्याच्या , एका रविवारची २ तिकीट काढून ठेवायचो. आणि वाट बघायचो तुझी. कधीच आली नाहीस तू. जास्तच आठवण झाली कि तुझा फोटो बघत बसायचो. ठरवायचो, कंटाळा येईपर्यंत बघत राहीन फोटो… कंटाळा तर कधी आलाच नाही असा… हा, पण वेडं लागलं होतं, तुझ्या फोटोबरोबर बोलायचं…. आई बोलते कि वाईट सवय पटकन लागते… कितीवेळ तुझ्या फोटोसोबत गप्पा मारायचो… आपण जसं बोलायचो ना, अगदी तसचं… ऑफिसमध्ये काय झालं दिवसभर… ते सगळं तुला सांगायचो, सगळा त्राण नाहीसा होत असे तेव्हा…. " निलमच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. पटकन पुसून टाकलं तिने,राजेशला न दाखवता. 

"एवढं प्रेम करायचास माझ्यावर… सांगितलं नाहीस कधी ",
"सांगणार होतो गं… राहून गेलं ते… तू केरळला गेली होतीस ना… त्याच्या आधीच विचारायचे होते… राहून गेलं, सगळ ठरवलं होतं मी… तू नकार दिला असतास तरी त्यात आनंद मानला असता, होकार दिला असतास तर काहीतरी वेगळंच झालं असत म्हणा… किती स्वप्न पाहिली होती मी… आपली जोडी छान दिसायची ना, आई म्हणायची… राहून गेलं ते सुद्धा…" राजेश मनापासून सांगत होता.निलम बोलली,
"मग आता सुखी आहेस ना संसारात… किती छान बाळं आहेत तुझी… अरे हो…. तुझी बायको नाही दिसली… जॉबला आहे का ?", राजेश नाही म्हणाला.
"लग्न तर करायला हवं ना, बायको असायला… " ,
"means…अरे मग हि मुलं…. तुला बाबा म्हणतात ना… मला काही समजत नाही आहे. " ,
"आठवतेय तुला, मी त्या रस्त्यावरच्या मुलांना मदत करायचो ते… एकदा मंगेश बोलला कि यांना मदत करतोस ते चांगलं आहे, पण अनाथाश्रमात तर त्या मुलांना माहित पण नसते… कोण पालक आपले… तेव्हा वाटलं, त्यांचा पालक होऊ आपण… म्हणून या दोघांना घेऊन आलो. एकाच दिवशी आलेले हे दोघे, लहान बाळ होती… ",
"आणि ती लहान मुलगी… " ,
"हा…. ती मला अशीच सापडली होती,रस्त्यात… एका रस्त्याच्या कडेला कोणीतरी ठेवून दिली होती… काहींना आवडत नाही ना मुली… टाकून दिलं असेल मग, आलो घरी घेऊन मग… तिचं नावं सुद्धा 'निलम' ठेवलं आहे मी." राजेश हसला. 
"अरे… लग्न का केलं नाहीस तू… ",
"तुझी माझ्या मनातली जागा कोणी कधीच घेऊ शकत नाही.…. तुझ्या जाण्याने एक,खूप मोठी जागा रिकामी झाली होती… त्यात दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करू शकलो नाही मी कधी…. मग लग्न करून एखाद्या मुलीचं आयुष्य कशाला बरबाद करायचे… तिच्यावर प्रेम करणार नसेन तर त्या लग्नाला काही अर्थ नव्हता… म्हणून केलं नाही… तसं पण माझं कुटुंब छान आहे आता… तुला कसं वाटते…" निलम काही बोलली नाही त्यावर."हा… एक बरं वाटते, तुझ्याकडे बघून… खूप छान दिसतेस… एवढी वर्ष तिथे राहून सुद्धा बदलली नाहीस तू… आठवण ठेवलीस मित्राची… छान… त्यातून एक गोष्ट, एवढं सुखी ठेवू शकलो नसतो तुला, जेवढी आता आहेस… पण मला जेवढे प्रयन्त करता आले असते तेवढे केले असते मी.… तरी आता बरं वाटते…. नाहीतर हि मुलं कूठे भेटली असती ना मला…" निलमला आता रडू येत होतं… कसबसं आवरलं तिने स्वतःला… 
" अजून फोटो बघतोस का माझे… ",
"हा… कधी जास्त आठवण झाली कि… तसं हि तू नेहमी असतेस हृदयाजवळ… " राजेशने त्याच्या शर्टाच्या खिश्यातून निलमचा एक फोटो काढला… निलमने ओळखला फोटो… एकदा दोघेच फिरायला गेले होते तेव्हा राजेशनेच काढला होता तो फोटो. मस्त lamination करून ठेवला होता फोटो… आता निलम खरंच रडू लागली. राजेशला फोटो परत केला आणि त्याला घट्ट मिठी मारली. 

थोडावेळ दोघे तसेच होते. निलमने त्याला मिठी मारली होती,मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. "असं बरं नाही गं आता… तुझं लग्न झालंय… मिस्टरांना काय वाटेल तुझ्या… " पाऊस थांबला होता… " पाऊस थांबला आहे तो पर्यंत निघ तू… शिवाय घरी काम सुद्धा आहे ना घरी तुझं… " निलमने डोळे पुसले आणि निघाली. " बघ… जमलं तर…. पुढच्या महिन्यात इथे सार्वजनिक गणपती आहेत… बहुतेक शेवटचा असेल यावर्षी…. माहित नाही… चाळ तोडून इमारत बांधायची आहे… try कर हा… पुढच्या महिन्यात…" निलमने होकारार्थी मान हलवली."चल… कार पर्यंत सोडतो तुला… " निलम आणि राजेश कारजवळ आले, निलम बसली गाडीत. निघायचा विचार नव्हता तिचा. राजेशला समजलं.
" जेवून जातेस का… ",
"नको… एक शेवटचं विचारू का… ",
"हो… विचार ना…",
"स्वतःसाठी काही केलंस का कधी…. आतापर्यंत… " राजेश उगाचच हसला.
" तुला आठवतेय का मला माहित नाही. आपण नाटक केलं होतं कॉलेजमध्ये… ",
"हो… ते कसं विसरणार…तेव्हापासून ओळख झाली आपली… म्हणून तर तुला 'राजा' बोलते मी… राजा झालेलास ना तू… ",
"हो… राजा केलेलं मला… त्यात एक dialogue होता मला… अजून आठवतो मला… "राजाला स्वतःच असं आयुष्य नसतेच.प्रत्येक वेळेस त्याला दुसऱ्यासाठीच जगावं लागते… एक राजा जातो,दुसरा येतो. फक्त नाव बदलतं… जबाबदारी तीच राहते…. त्याची प्रजा आनंदात रहावी म्हणून… "…. तसाच जगतो आहे मी. बस्स, बाकी काही नाही." तितक्यात वरून राजेशच्या "निलम" ने हाक दिली." बाबा… जेवायला ये. " तेव्हा राजेश निघाला. " Thanks निलम… आठवण ठेवल्याबद्दल… पुन्हा आपली भेट होईल का ते माहित नाही… तरी माझी निलम माझ्याजवळच आहे… एक ती… आणि एक हि… " राजेशने शर्टाच्या खिशाला हात लावला. निलमने गाडी स्टार्ट केली आणि घरी निघून आली, खूप रडली. 

                  रात्रीचे १२ वाजत होते. पुन्हा पाऊस… थोडासा रिमझिम असा, सोबतीला गार वारा… गणपतीच्या मंडपात मंडळी त्यांचे काम करत होती. राजेश घरी येऊन झोपला होता शांत… तिकडे निलम, तळमळत होती आजही… तिच्या त्या महागड्या, मऊ अश्या बेडवर तिला झोप येत नव्हती.काहीतरी टोचत होतं तिला… उठली आणि बाल्कनीत येऊन रडू लागली पुन्हा… पावसाच्या सोबतीने… इकडे राजेश, त्या थंड झालेल्या जमिनीवर शांत झोपला होता. त्याच्या वर खाली होणाऱ्या मोठ्या पोटावर त्याची चिमुकली निलम झोपली होती आणि बाजूला अजून एक मुलगा… त्यातल्या एकाला झोप येत नव्हती… तो आजीजवळ बसला होता… त्याचे नावं राजेशने " राजा" ठेवलं होतं. आजी तिचं आवडीचं गाणं ऐकत होती. "याद पिया कि आये… " सोबतीला राजेश आणि निलमचे विचार होते. राहून राहून तिला तेच वाटतं होतं, यांची जोडी जमायला पाहिजे होती. गाणं संपलं. तिला वाटलं, राजा झोपला असेल… पण तो जागाच होता.
" काय रे… झोप येत नाही का आज… ",
"नाही ना… आज्जी, एक गोष्ट सांग ना…. छान अशी…. राजा-राणीची… "छोटा राजा तिच्या मांडीवर जाऊन झोपला. 
"हं… सांग आता." ,
"आठवते आहे… थांब जरा… हा आठवली. एक आटपाट नगर होते, तिथे एक राजा राहत होता… मग ",
"आज्जी… आज्जी… ",
"अरे काय… ? " ,
" प्रश्न आहे एक…",
"गोष्ट तर पूर्ण होऊ दे… ",
"नको… मला सांग आधी… शाळेत शिकवलं मला, शिवाजी महाराज… ते राजा होते ना… त्याच्यासोबतीला पण खूप राजा होते… मग, गोष्टीत असा का म्हणतात, एक राजा होता… म्हणून."आजीला त्या बाल-प्रश्नावर हसू आलं. 
" सांगते हो… झोप तू… " आजीची नजर झोपलेल्या राजेशवर गेली. कसा शांत निजला होता तो. 
"सांग ना आज्जी… ",
"सांगते… राजा खूप होते… खूप सम्राट होऊन गेले… खूप जणांनी राज्य केलं. पण जो मनावर राज्य करतो, आपल्या प्रजेची काळजी घेतो, तो खरा राजा… लोकांच्या मनावर राज्य करणारा खरा राजा… तसे फार कमी झाले आतापर्यंत… आणि फार कमी लोकांना तो तसा राजा बघायला भेटला." पुन्हा तिने राजेशकडे नजर टाकली. स्वतःशीच हसली. " समजलं ना आता तुला….चल, तुला आता एक वेगळीच गोष्ट सांगते… गोष्टीच नावं आहे,…. एक होता राजा… "

---------------------------------------------------- The End ----------------------------------------35 comments:

 1. अप्रतिम..
  हृदयस्पर्शी..

  ReplyDelete
 2. Khup chhan an title pan perfect match aahe story la "Ek hota raja"

  ReplyDelete
 3. Khup chan. ....... mast ch ahe

  ReplyDelete
 4. तुमची गोष्ट नेहमीच खूप मस्त असते. मी सगळ्या stories वाचल्या आहेत. पण एक जाणून घ्यायची उत्सुकता आहे. ह्या गोष्टीला open-ended का ठेवलेय? I mean, it's your world, but I am curious to know your thoughts.

  ~MT

  ReplyDelete
 5. khupch chan aahe....
  aavdli aaplyala

  ReplyDelete
 6. Kharach khup chan.khup mast lihita tumhi.me saglya stories vachlya ahet tumchya.really heart touching stories astat.

  ReplyDelete
 7. Nice very heart touching story khupch kami lokana milat as prem

  ReplyDelete
 8. Very nice, heart touching story.

  ReplyDelete
 9. Yaar ,kiti Chan story lihtos.. Ekdum kaljalach hat ghaltos...

  ReplyDelete
 10. Khupach mast. Thanks for sharing.

  ReplyDelete
 11. Chhaan....mast....bt ending la doghe ektra zale pahije hote yaar

  ReplyDelete
 12. Sir end khup heart touchable hota...
  Vatl end vegla hoil nd zala veglach
  Tumchya vicharana SALAM...

  ReplyDelete
 13. kahani purn jhaleli nahi ti kripaya purn karavi ..........chhan vatali manala sparsh karnari kahani.

  ReplyDelete
 14. कथा खरंच खुप छान आहे जुन्या आठवणी जागवल्या आपला खुप खुप आभारी आहे.
  ... शोले ...

  ReplyDelete
 15. Story Kupch Chan Aaahe....Pn Ending purn nahi jhal as vatat.. pls ya pudhehi story lihavi hi...

  ReplyDelete
 16. Khup Chan man dukhaun takals

  ReplyDelete
 17. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 18. story apurnch ka thevli...purnhi hou shakli asti...pn trihi khup mast ahe...

  ReplyDelete
 19. KATHA KHUP CHAN AHE, DOLYATUN PANI KADHANARI, PAN APURN AHE SHEVAT KARAVA YA KATHECHA....

  ReplyDelete
 20. KATHA KHUP CHAN AHE, DOLYATUN PANI KADHANARI, PAN APURN AHE SHEVAT KARAVA YA KATHECHA....

  ReplyDelete
  Replies
  1. Kdhi kdhi khi kathancha shevat zalela nasnach changl ast ashya kathanna Short stories mhantat daily jivnavr adharit

   Delete
 21. KHUP SUNDAR AAHE. MALA STORY KHUP AAVADLI, PAN SHEVAT APURN AAHE.......

  ReplyDelete

Followers