All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Friday 19 April 2019

" भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली " (भाग दुसरा )


                कुठेतरी चिमण्यांचा कलकलाट होतं होता. दुरुनच येतं होता आवाज, मधूनच कोकीळ त्याचे मधुर स्वर काढत होता. वाऱ्याचा अगदी मंद असा " सू ... सू ... " आवाज, झाडाच्या पानांची मग प्रचंड सळसळ करी. अंग शहारून जायचे. थंडावा तर आहेच. आकाश हे सर्व डोळे मिटून अनुभवत होता. कदाचित स्वप्न असावे , डोळे उघडले तर संपून जायचे. पण तसे काही होणार नव्हते. कारण ..... कारण तो जे डोळे मिटून अनुभवत होता , ते प्रत्यक्षात त्याच्या आजूबाजूला घडत होते. 


                आकाश सकाळपासून त्या माळरानावर लोळत पडलेला. काय माहित कसला आनंद झालेला त्याला. घड्याळात पाहिलं शेवटी त्याने. किती वेळ झोपून होतो... कळलंच नाही. घड्याळात दुपारचे १२ वाजले होते. अरेच्या !! कसा वेळ गेला ना भुर्रकन. उठून उभा राहिला. कपड्यांना सगळी लाल माती. आकाशने स्वतःवर नजर फिरवली. काय तो अवतार झाला आहे माझा. सुप्री असती तर ओरडली असती. स्वतःशीच हसला. दुपार झाली तरी ऊन कसे नाही. असा क्षणिक विचार आला त्याच्या मनात. पुढे जाऊ.. पण त्याआधी हि लाल माती साफ करूया का .. असाही विचार केला. राहू दे ... मातीच तर आहे, म्हणत बॅग पाठीवर लावली आणि पुढे असलेल्या एका लहानश्या डोंगरावर नजर गेली. तिथे जाऊन आजूबाजूला काय आहे ते पाहू आणि पुढचा रस्ता ठरवू , म्हणत निघाला आकाश. 


                पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात पोहोचला त्याच्या शिखरावर. आभाळच भरलेले असल्याने सूर्यदेवाचे दर्शन कसे होणार. आकाश सभोवताली असलेल्या निसर्गाचे दर्शन घेऊ लागला. समोर दोन सुळके , म्हणजे आकाश उभा असलेल्या छोटा डोंगर, त्यामानाने मोठे. एक सुळका तर काळ्या ढगांनी आछ्च्यादित होता, जणू काही बुरखा परिधान केलेला .... किंवा म्हणावे तर काळ्या रंगाची जाड गोधडी अंगावर घेऊन भर दुपारीच गाढ झोपलेले महाशय. दुसऱ्या सुळक्याला त्याची काही पर्वा नसावी. त्याच्या माथ्यावर काही उगीचच रेंगाळलेले ढग आराम करत होते. त्याच्या पायथ्याशी असलेले , दगडातून कोरून काढलेले मंदिर स्पष्ट दिसत होते. भाविकांची गर्दी वगैरे असे काही नसले तरी , काही डोकी निवांत बसलेली दिसत होती आकाशला. वर आभाळात दूरवर मोठ्या काळ्या ढगांची गर्दी मात्र होताना दिसत होती. त्यासोबत वाऱ्यानेही आता वेग पकडला होता. पावसाळा अजून सुरु झाला नाही. हे ढग फक्त त्याच्या आगमनाची तयारी करत आहेत. हे आकाशला माहित होते. पुढच्या १ तासात पाऊस इथे येईल, असा प्राथमिक अंदाज आकाशने लावला. त्याआधी एक जागा बघून आपला तंबू उभा करू, असं मनात म्हणत आकाश खाली असलेल्या गावाकडे निघाला.   

===========================================================

  
" मॅडमजी कुठल्या विचारात आहात .... " कादंबरीने पूजाला आवाज दिला, तशी ती भानावर आली. पूजा आज पहिल्यांदा इतकी शांत बसली होती. 
" काही नाही .... असंच " पूजाने उत्तर दिलं. 
" नाही... कुछ तो बात है .... एवढी शांत कधीच नव्हती तू ... सांग काय झालं " कादंबरी तर मागेच लागली. पूजाने तिच्याकडे बघत दीर्घ श्वास घेतला. 
" पुढच्या प्रवासाचा विचार करत होती. " ,
" त्यात काय विचार .... आपलं तर ठरलेलं आहे ना कुठे जायचे ते... मग ?? " ,
" तस नाही ग ... बबडे ... " पूजाने कादंबरीचा गालगुच्चा घेतला . गळ्यात हात टाकून बसली तिच्या. 
" यावेळेस काहीतरी वेगळा प्लॅन केलेला आहेस वाटते... " कादंबरीने पुन्हा विचारलं. 
" सांगीन ... आजचा दिवस तरी कुठे जाणार नाही.. so , जेव्हा निघू ... तेव्हाच सांगीन कुठे निघालो आहोत तर ... " पूजाच्या या वाक्यावर कादंबरीने जीभ बाहेर काढत वेडावून दाखवलं. आणि कॅमेरा सावरत निघून गेली फोटो क्लीक करायला. 

===========================================================


" सुप्रिया ... मला तुझे वागणे पटलेले नाही .... जॉब का सोडते आहेस... " सुप्रीच्या सरांनी तिला विचारलं. 
" सर काही पर्सनल कारणे आहेत.. " ,
" मला माहित आहे, आकाश गेला आहे पुन्हा फोटोग्राफी साठी " सुप्रीने मानेनेच ' हो ' म्हंटले. 
" बघ , मला कळते तुला काय वाटतं असेल ते . तुला त्याची काळजी वाटणे सहाजिकच आहे. तुलाही त्याच्या सोबत राहावे असेच वाटतं असणार. तरी त्यासाठी जॉब सोडणे हा मार्ग नाही ना.... तू पाहिजे तर सुट्टी घे , तुझ्या सुट्ट्या हि बाकी आहेत खूप... १०-१५ दिवस सुट्टी घे पण जॉब नको सोडूस.. कारण तुझ्यासारखी माणसं भेटत नाही आता, त्यामुळे विचार कर. तुला जॉब सोडायला तर देणार नाही मी. ... " सुप्री नाईलाजाने सरांच्या केबिनमधून बाहेर आली. 

संजना तिची वाट बघत होती. " काय गं .. सरांनी कशाला बोलवलं होते. " ,
" सरांनी नाही... मीच गेले होते. " ,
" का गं " ,
" जॉब सो...... डा...... य...... चा......  वि...... चा...... र...... "  सुप्रीने संजनाला सांगितले नव्हते काही. 
" काय वेडी-बिडी झालीस का तू .... जॉब का सोडतेस आणि मला सांगावेसे वाटते नाही तुला .... बावळट .. मूर्ख... " संजना तापली. 
" बघ रे गणू ... गरिबाला किती बोलतात सगळे... " सुप्री एवढंसं तोंड करून बोलली. 
" अगं पण आधी मला तरी सांगायचे ना ... जॉब का सोडतेस  .... " सुप्री गप्पच . 
" आकाश गेला म्हणून ... " सुप्रीने यावर पुन्हा मान हलवली. तशी संजनाने सुप्रीच्या डोक्यावर टपली मारली. 
" मंद ..... त्यादिवशी एवढे समजावून सांगितलं तुला... आकाशने सुद्धा मन मोकळे केले ना.. किती दिवस तो तरी दूर राहणार त्या निसर्गापासून ... जाऊ दे ना थोडे दिवस तरी... " ,
" त्याच्या जवळच चालली होती... " ,
" राहू दे एकटे जरा त्याला... आता नाही गेला तर लगेच निघाली मागून त्याच्या ... " ,
" अगं पण .... " ,
" आहेत ना इतके लोकं त्याच्या सोबत तिथे ... त्या कॅम्प मध्ये मस्त फोटोग्राफी करत असेल.. कशाला काळजी करतेस... ",
" तेच तर... " सुप्रीने आजूबाजूला पाहिलं. " चल बाहेर ... सांगते... " सुप्री संजनाला बाहेर खेचत घेऊन आली. 

" काय झालं एवढं... " ,
" अगं आकाश ... आकाश .... " ,
" हो... माहित आहे... तो फोटोग्राफीच्या स्पर्धेसाठी त्या कॅम्पला गेला आहे ना.. " ,
" तेच तर सांगायचे होते तुला , आज ३ दिवस झाले ना... आकाशला तिथे जाऊन... त्याने तिथे पोहोचल्यावर कॉल केला नाही. म्हणून मीच काल त्याला कॉल लावला. range मध्ये नव्हता म्हणून लागला नाही. तर मी त्या कॅम्पच्या आयोजकांना कॉल केला. त्यांनी सांगितलं आकाश नावाचा कोणी आलाच नाही तिथे. पैसे भरून सुद्धा तो गेला नाही तिथे. त्यानंतर लगेचच आकाश चा मेसेज आला कि पोहोचलो. आता तो कुठे गेला ते त्यालाच माहित. पुन्हा भटकंती करायला गेला एकटा ... त्यासाठीच त्याला एकटे सोडत नव्हते मी .. " सुप्रीचे बोलणे ऐकून संजना सुद्धा काळजीत पडली. 

" नक्की कुठे गेला .... " संजनाचा प्रश्न. 
" आता मला माहित असते तर .. " सुप्री बोलली. 
" म्हणून चालली आहेस का त्याला शोधायला... कुठे शोधणार सांग .... " संजनाच्या या प्रश्नावर सुप्रीला प्रश्न पडला. 
" तिथे जाऊन बघायचे ना ... " ,
" असो ... सर काय बोलले मग... जॉब सोडला का तू ... मी काय करू इथे तुझ्याशिवाय ..." संजना भावुक झाली. 
" बघ रे गणू... जरा बुद्धी दे येडूला... सर ऐकत नाहीत. बोलले , हवी तर सुट्टी घे. जॉब नको सोडूस. तुझ्यासारखी माणसं भेटत नाहीत आता.. असं बोलले. " ,
" हा ... हे खरं .. तुझ्यासारखी अर्धी डोक्याची माणसं कुठे भेटतात आता ... अगदी बरोबर बोलले सर.. " संजना हसत म्हणाली. 
" बघ रे गणू .... किती दुष्ट असतात माणसं ... गरीब आहे ना मी... काय करणार. " संजनाने सुप्रीला मिठी मारली. 

" मग जाणार आहेस का ",
" होय ... एकटीनेच जावे लागेल. म्हणून तुला बाहेर येऊन सांगितले. बाकी कोणी ऐकलं असतं तर तेही आले असते माझ्या मागे. ",
" मलाही सुट्टी देणार नाहीत सर .. जाशील ना एकटी... ", 
" हो गं .. गणू आहे कि सोबत .. मग काय को डरने का .. " ,
" तुझाच जय महाराष्ट्र ... !! " दोघीही हसू लागल्या.  

===============================================================


                 आकाशला आता खूप मोकळ मोकळं वाटतं होते. गेले ३ दिवस नुसता भटकत होता. कोणाचेच आणि कसलेच tension नाही. कोणाला फोन करायचा नाही कि कोणाचा फोन येणे नाही. असा विचार आला मनात आणि त्याला आठवलं. सुप्रीला तर फक्त मेसेज केला, फोन करायला पाहिजे. लगेच त्याने मोबाईल बाहेर काढला. range कुठे होती. या मोबाईलचे असेच असते, जेव्हा पाहिजे असतो तेव्हा उपयोग नाही होतं. बाकीचे तासनतास कसे डोके खुपसून बसलेले असतात काय माहित मोबाईल मध्ये. त्याने पुन्हा मोबाईल बॅगेत टाकला. आणि गावात फेरफटका मारू लागला. 

                गाव तसं लहानच होते. तरी आखीव -रेखीव होते. कौलारू घरे, प्रत्येक घरासमोर एक छोटेसे अंगण. एका बाजूला आमराई होती. केवढी मोठी ती... पावसाळा सुरु झाला नसला तरी आंबे संपले होते. बाकी त्या आंब्यांचा मधुर सुवास तेव्हढा मागे राहिला होता. आकाश आपसूकच वळला तिथे. आमराईत आत शिरणार तोच त्याच्या रखवालदाराने त्याला अडवलं. त्याने आकाशला निरखून पाहिलं. 

" शहरातले वाटता.. हि आमराई आहे... वाट चुकलात वाटते... आत कोणाला जायला नाही.. " ,
" मी काही घेणार नाही... फक्त फोटो काढायचे होते... तुम्ही बोलता तर नाही जात... " आकाशने हसून निरोप घेतला. 
" थांबा थांबा ..... तुम्ही चांगले वाटता... फोटो काढायचे आहेत तर जावा आत ... पण चुकलात तर आत मध्ये... गर्द झाडी आहे ना आत ... " त्या वाक्यावर आकाशला हसू आलं. आपण पण आठवणींना असंच म्हणतो ना ... 

" का हसलात .... आणि इथेच का आलात... " आकाश आतमध्ये शिरला सुद्धा , त्याच्या मागे मागे ते रखवालदार. " तुम्ही हरवलात तर कुठे शोधत बसणार .... म्हणून आलो मागे ... " आकाशने विचारण्याआधीच त्यांनी सांगून टाकले. आकाश पटापट फोटो काढत होता. मध्येच थांबून बघत राहायचा कुठेतरी. 
    
" मी लहान होतो ना .... तेव्हा एकदा... माझ्या वडिलांसोबत आलेलो... अश्या ठिकाणी, जागा हीच होती का माहित नाही.... पण अशीच आमराई होती. मोट्ठी... त्या आमराईच्या दुसऱ्या टोकाला एक लोखंडी बाक होता, तिथे बसवले होते मला आणि जाताना सांगून गेले, मी येईपर्यंत जागचे हलायाचे नाही... तसाच बसून होतो.. किती वेळ माहित नाही.... पण तेव्हा पासून या निसर्गाची सवय लागली असं वाटते. " आकाश सांगत होता आणि तो ऐकतं होता. 

आकाशचे फोटो काढणे सुरूच होते. " तुम्ही फोटोग्राफर आहात का... " त्याचा प्रश्न. 
" हो ... " ,
" मग गावात का आलात ... फोटोसाठी का .. " ,
" सहज... मला आवडते गावं " त्याची बडबड सुरूच होती. मध्ये मध्ये थांबून आकाश फोटो काढतच होता. बराच वेळ चालत चालत ते दोघे आमराईच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले. 
" तो बघा ..... तुम्ही बोललात तसंच लोखंडी बाक आहे.. " आकाशने हि पाहिलं ते. खरच कि !!

आकाश बोलला तसा लोखंडी बाक होता तिथे, गंजलेला.. इतक्या वर्षात पाऊस - पाण्याने त्याची तशी अवस्था झाली असावी. आकाशने हात फिरवला त्यावरून. 

" मला इथे ४-५ वर्ष झाली रखवालदारी करून. एवढ्या वर्षात मी कधी आलोच नाही इतका आतमध्ये. मालकाने सुद्धा इथे कधी पाठवले नाही मला. हा बाक आहे हे माहीतच नाही मला. तुम्हाला बरी आठवण राहिली एवढ्या वर्षात... मानलं पाहिजे तुम्हाला... " तो रखवालदार म्हणाला. आकाश मनोमन हसला. 

" आठवणी कधीच पाठ सोडत नाहीत. वडिलांनी तेव्हा बसायला सांगितले होते. कुठे गेलेले माहित नाही. शहाण्या बाळासारखा बसून राहिलो होतो इथे. शांत .... आजूबाजूला.... फक्त वाऱ्याचा आभास , झाडांची पाने डोलायची त्या वाऱ्यावर ... त्यांचा आवाज आणि पक्ष्यांची किलबिल... संध्याकाळ पर्यंत बसून होतो एकटाच...  वडील तर विसरून गेलेले मला. आई आलेली धावत धावत शोधायला... आठवत नाही... त्यानंतर कधी वडिलांनी मला सोबत फिरायला नेले असेल... " आकाशने पुन्हा त्या लोखंडी बाकाकडे पाहिलं. " मनात घट्ट जागा करून गेली ती आठवण... " 

==========================================================

पूजा - कादंबरीचा पुढचा प्रवास सुरु झालेला. एका वळणावर मुक्कामाला थांबले सगळे. दुपार होती. जेवणाची तयारी सुरु होती. कादंबरी जेवण करण्यात मग्न होती. पूजा मात्र कुठंतरी हरवली होती. खूप वेळ पूजाचा काही पत्ता नाही म्हणून कादंबरी तिचा कानोसा घेत पुढे आली. बघते तर पूजा काहीतरी लिहीत बसली होती. कादंबरी हळूच वाकून बघून आली. 

" काय लोकं किती बिझी झालीत... बघत पण नाहीत ... " तसा पूजाने तिच्या पायावर चिमटा काढला. 
" लिहिते आहे काहीतरी .... आपल्या ब्लॉगसाठी... " कादंबरी शेजारीच बसली तिच्या. 
" मॅडमजी ... आपण सध्या तरी कोणत्या ठिकाणी पोहोचलो नाही. मग कश्याबद्दल लिहिते आहेस तू.. तसे मला फोटो काढता येतील ना ... " पूजाने कादंबरीकडे पाहत एक उसासा सोडला. लिखाण बंद केले 

" किती घाई असते ना तुला... सांगेन बोलली ना... अजून ठरले नाही कुठे जायचे ते... " तस कादंबरीने तिच्या डोक्यात टपली मारली. 

" जायचे कुठे माहित नाही आणि माहित नसलेल्या ठिकाणाची माहिती लिहीत बसली आहेस.. वेडी-बिडी झालीस कि काय... " पूजा काय बोलणार यावर. 

" जागा माहित आहे फक्त रस्ता नवा आहे. सगळे तयार असतील तर निघू... तिथे ... " पूजा उठली आणि जेवणाची तयारी सुरु होती तिथे आली. 

सर्व जेवायला बसले. " मी काही बोलू का.. " कादंबरी सहित सर्वांनी पूजाकडे पाहिलं. " पुढचा प्रवास ठरल्याप्रमाणे होतं नाही आहे. " तसा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. 

" का ... काही प्रॉब्लेम झाला आहे का... " एकाने विचारलं. 

" नाही. आपण दरवर्षी पावसाळ्यात, जेव्हा शहरातून पुन्हा गावाकडे निघतो, तेव्हा एक ठरलेली वाट असते आपली. फक्त तीच बदलली आहे मी.. " , 
" तेच ... आपण इतकी वर्ष हा प्रवास करतो आहे. पावसाळ्यात तोच मार्ग जास्त सोयीचा आणि सुरक्षित वाटतो. म्हणून आपली ठरलेली वाट आहे ती.. " त्या 'जिप्सी ' ग्रुप मधल्या सर्वात जुन्या, मोठ्या व्यक्तीने प्रश्न काढला. 

" सगळं ठीक.. पण या वेळेस ... जरा बदलायचा विचार करते आहे. म्हणून वाट सुद्धा बदलली. कोणालाच त्रास होणार नाही, किंबहुना एक वेगळा अनुभव... इतक्या वर्षात काही नवीन केल्याचे सुख मिळेल सर्वांना... " पूजा छान बोलली. पटलं सर्वाना. जेवण संपली आणि सगळ्यांनी पूजाला संमती दर्शवली. पूजा खुश. संध्याकाळी आभाळ भरले. पावसाचा वावर जरी जाणवत नसला तरी थंडावा आलेला. पूजा - कादंबरी त्यांच्या तंबूंत बसलेल्या होत्या. तंबूच्या दारातून थंड हवा आत येतं होती. 

" नक्की ... का ... असं.........  तुला....... क....... रा ........ वं........ सं........  वा ....... ट........ लं " कादंबरीचा लांबलचक प्रश्न. पूजा बाहेरच वातावरण न्याहाळत होती. 
" वाटलं सहजच... " ,
" सांग कि " कादंबरीने तिच्या खांद्यावर हात टाकला. 
" काही शोधायचे आहे. " ,
" काय हरवलं आहे " ,
" हरवलं काही नाही... आठवणी, काही आठवणी लहानपणी मागे सोडून आली. त्या अश्याच विखुरल्या आहेत. त्यांनाच वेचायला जायचे आहे... सारे तयार आहेत ... येशील ना तू ... " ,
" मग काय ... तुझ्या सोबत किधर भी डार्लिंग .... एका पायावर ..... एका पायाच्या बोटावर .... एका पायाच्या बोटाच्या नखावर सुद्धा... " पूजा हसली तिचे डायलॉग ऐकून.... " कार्टून आहेस खरच " 

========================================================== 

विचार करता करता डोकं दुखायला लागलं. सुप्री डोक्याला हात लावून बसलेली. संजना चहा घेऊन आली. 
" उरलेलं डोकं पण गेलं वाटते. " संजना सुपारीला हसून बोलली. 
" बोला बोला ... गरिबांना काय पण बोलतात लोकं .. " ,
" तुला काय झालं डोकं पकडायला. " ,
" आकाश गं ... " ,
" हा ... त्याचा आलेला का कॉल ... मेसेज.. " संजनाने लगेच विचारलं. 
" एकदा आलेला .. पण आवाजच येतं नव्हता त्याचा. पुन्हा केला मी, तर लागला नाही. मेसेज आलेला कि मी सुखरूप पोहोचलो. कुठे आहे ते सांगितलं नाही. मी उद्या निघायचं ठरवलं आहे. पण जाऊ कुठे " सुप्रीने अडचण सांगून टाकली एकदाची. 

तश्या दोघी विचार करू लागल्या. " एक मनात आलं माझ्या म्हणजे बघ हा... " संजना बोलली. 
" बोल तर ... " ,
" आपल्याला तो फोटोग्राफी चा कॅम्प कुठे आहे ते माहित आहे... तो तिथे नाही गेला तर दुसऱ्या वाटेने गेला असेल. बरोबर ना... " सुप्रीला पटलं ते. 
" जरी दुसऱ्या वाटेने गेलो तरी लहान नसेल ना ती जागा... भटकायला लागेल ना... एकटी कशी जाणार हि गरीब मुलगी... काय माहित... " सुप्री स्वतःला उद्देशून बोलत होती. संजनाकडे तिरक्या नजरेने बघत बोलत होती.  

संजनाला कळला सुप्रीचा उद्देश. " ब्लॅकमेल बरोबर करता येते तुला.. " तिचा गालगुच्च्या घेत संजना बोलली. 
" येते मी सोबत पण घरी काय सांगायचे. ते तरी ठरले का तुझं... किती दिवस लागणार , त्याच्या तरी प्लॅन आहे का .. " संजनाच्या या सर्व प्रश्नावर सुप्रीने पुन्हा डोक्याला हात लावला. 
" विचार केला नाही या सर्वाचा ... आकाश असतो ना सोबत ... तोच काय तो विचार करतो . आपलं डोकं कोण कशाला वापरतो आहे.. " सुप्रीच्या या वाक्यावर दोघी हसू लागल्या. 
" बरं ... सांगू काहीतरी..... आधी सरांना काय काय सांगावे ते बघावं लागेल. तुझे झालं आहे सांगून , मला घरी कोणाला तरी आजारी पाडावे लागेल ... पण मला माझी सुट्टी मुळे कट्ट केलेली सॅलरी तुझ्याकडून पाहिजे हा... जास्त लाड नाही करणार ... " , 
" किती करते ना तू माझ्यासाठी... " सुप्रीने तिला कडकडून मिठी मारली.  
" एकच पीस आहेस तू ... तोही देवाने माझ्या गळ्यात बांधला आहे. मग , सांभाळावे लागेल ना ... " तश्या दोघी पुन्हा हसू लागल्या . 

==========================================================


"तुम्ही शहरात असताना पण... तरी बरीच माहिती आहे तुम्हाला निसर्गाची.. " आकाश अजूनही त्या रखवालदारासोबत होता. त्या आमराईत दुपारपासून थेट संध्याकाळ पर्यंत दोघांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. 

" मी भटकत असतो ... फोटोग्राफी साठी, माझी नोकरी तीच आहे.. म्हणून माहिती मला. " आकाशचे उत्तर. 

" आणि बायको, मुलं ... त्यांना सोबत घेऊन फिरता का... " आकाश हसला त्यावर. 
" आणि सारखे हसत असता तुम्ही .... का ते " ,
" लग्न झालं नाही अजून, पुढल्या २ वर्षात होईल " 
" असं आहे तर... पण साहेब , एका सांगा.... लग्न झालं नाही म्हणून असं मोकळं फिरायला , भटकायला मिळते... संसारात अडकलात कि पोरं-बिर ...घर ... नोकरी ... यात अडकून पडणार कि असे फिरत बसणार... " 
त्याचा प्रश्न तर बरोबर होता. समोर संध्याकाळचा सूर्य... आमराईत लपत-छपत मावळत होता. सोबतीला पाहुणे म्हणून आलेले पावसाचे काळे ढग होते. पक्षी एव्हाना आपापल्या घरट्यात परतले होते. आमराईत स्वतःच्या घरात नुसता कलकलाट करत होते सर्वच. आमराई जणू जिवंत झालेली. त्या रखवालदाराने बरोबर विचारलं. सुप्री सोबत एकदा संसाराच्या बंधनात अडकलो तर जमेल का अशी भटकंती पुन्हा मला ... कदाचित नाही..  

विचारात गढून गेलेला आकाश हेही विसरला , कि संध्याकाळच्या आधी तंबू उभा केला पाहिजे. मोठा प्रश्न उभा राहिला. " चला माझ्या घरी ... इथून ५ - १० मिनिटावर माझे घर आहे, आमच्या मंडळी खूप छान जेवण करतात. " आकाशचा प्रश्न सुटला. रात्री त्याकडेच जेवण करून त्याच्या घराच्या ओसरीत झोपी गेला 

==========================================================

पूजाची सकाळ आज अंमळ लवकर झाली. कसल्याश्या आवाजाने झोप मोड झालेली. तंबूच्या बाहेर आली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ७:१५ झाले होते. हवेत कमालीचा थंडपणा वाढला होता. सहजच तिचे लक्ष वर आभाळात गेले. मागून कादंबरी सुद्धा जागी झाली. 

" काय गं पोरी... झोप-बीप आहे कि नाही तुला... मला पण जागे केलेस ना... " डोळे चोळत ती पूजाच्या शेजारी येऊन उभी राहिली. पूजा अंदाज बांधत होती वातावरणाचा. 
" पाऊस येतो आहे ... ", 
" ह्या .... एवढच ना... पहिल्यांदा पडतो आहे का... एवढी वर्ष तर बघतो आहोत आपण पाऊस... नवीन काय.. " कादंबरी अजूनही आळस देतं होती. 
" हो ... दरवर्षी येतो पाऊस, पण या वर्षी ना .... काही वेगळं फील होते आहे. " ,
" का ... त्याची आठवण येते आहे का .. तुझा ' तो'......  " ,
" नाही .... म्हणजे हो ... या वेळेला ना , खूप काही वाटते आहे.... माहित नाही का... त्याच्या आठवणी दाटून आल्या आहेत... " पूजाचा गळा दाटून आला. कादंबरीने तिच्या खांद्यावर हात टाकला. 
" होता है ... " कादंबरी आणखीनच बिलगली. " पूजा ... जाऊ दे ना ... पुढे काय करावे तर सांग... " पूजा भानावर आली. 
" हो.. थांबावे लागेल इथेच ... पावसात नको ना प्रवास.... "

==========================================================

आकाश आभाळाकडेच बघत होता. त्याने त्याची सॅक तयार केली. रात्र त्याने त्या ओसरीत काढली होती. " काय झालं साहेब... पाऊस येतो आहे ते बघता का .. " ," होय.. " आकाशने सॅक पाठीवर लावली. " चला मी निघतो आता... कालचे जेवण छान होते ... आभारी आहे, पाऊस येण्याच्या आत निघतो पुढे... " ," किती हि जलद धावा तुम्ही... त्याला जर भेटायचे असेल ना तुम्हाला .... गाठेल कुठंही तुम्हाला ... " रखवालदाराने छान वाक्य म्हटले. आकाशला पटलं ते. निरोप घेऊन निघाला.  

==========================================================

" पाऊस "

ज्या डोंगर माथ्यावर मातीचा करडा- राखाडी रंगच आपले वर्चस्व दाखवत असतो, त्याठिकाणी हिरव्यागार रंगाची साय पसरावी.... हि जादू कोणाची. नाहीतर सात - आठ महिने आभाळाचा एकच रंग.... निळा, त्यावर कधी काळ्या गडद तर कधी इंद्रधनूच्या सात रंगाची मेजवानी घेऊन येणारा.. कोण तो... लाखमोलाची हजेरी लावत येतो तो... किंबहुना , त्या वर्षभरापासून मळलेल्या पायवाटा... नुसत्या कोरड्या ठक्क... तिथेही रानटी का होईना, रंगीबेरंगी फुलांची रास पैदा करतो ... वाटेच्या दोन्ही बाजूंना.... जमीनदार तो ... आला कि अगदी गाजत - वाजत येतो विजांसोबत.... जीवन देणारा जमीनदार ... या काळ्या जमिनीचा खरा मालक !! आला कि हात अजिबात आखडता घेतं नाही, सर्वाना समान वाटणी त्याची. आभाळ कायमचं काळभोर आणि बरसायच्या तयारीत. त्याने सांगितलं कि नुसतं बरसायचं. सोबत घेऊन येतो तो धुक्याची चादर. मग आठवण होते ती भग्न झालेल्या तट- बुरुजांची, पाय आपसूकच वळतात तिथे. तिथे पोहोचताक्षणी वाऱ्यासोबत आलेला ओल्या मातीचा गंध भोवताली फेर धरू लागतो . गड- किल्ले त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगू लागतात आणि त्यासोबत आठवण होते ती आभाळाएवढा पराक्रम करणाऱ्या आपल्या पूर्वजांची. मनात पावसाच्या गंधासोबत त्या इतिहासाची जाणीव होते आणि छाती आणखीनच फुगते. एक - दोन दिवसापूर्वीच मातीतून नुकत्याच वर आलेल्या कोंबांनाही पावसाची जाणीव होते. झाडे डोलू लागतात. पक्षी नव्याने घरकूल बांधतात आणि काळी माती सुद्धा मग आपल्याशी बोलू लागते. एका मोठ्या उत्सवाला सुरुवात होणार असते. जमीनदार येणार असतो ... खरा मालक.... पाऊस !!  

पूजाने ते वाचून दाखवलं. तिच्या डायरीमध्ये लिहिलेलं होते ते. आजूबाजूला बसलेल्या तिच्या ग्रुप मधल्या सर्वांना आवडलं ते. वर पावसाने फक्त काळोख करून ठेवला होता. ५- १० मिनिटांनी वारा जोरात वाहू लागला तसे सर्व आपापल्या तंबूत जाऊन बसले. 
" किती छान लिहिलं तू .......कधी दाखवलं नाही ते. " ,
" मी नाही... त्याने लिहिलं आहे ते... एकदा असच बोलले त्याला... पावसाबद्दल लिहितो का , तेव्हा त्याने हे डायरीत लिहून दिलं मला. असाच होता क्षण. पावसाची सुरुवात होणार होती तेव्हा " पूजाने त्या लिखाणावरून हात फिरवला.  

कादंबरीने फक्त छान smile केले त्यावर. हसत बाहेर लक्ष टाकलं तिने. आभाळ गच्चं भरलेलं होते. तरी पाऊस सुरु झाला नव्हता. ती तंबूमधून बाहेर आली. " कुठे चालली... पाऊस येतो आहे.. " ," जास्त दूर जाणार नाही.. " म्हणत कादंबरी त्या ठिकाणापासून जरा दूर आली. एका झाडाखाली उभी राहिली. भरलेल्या पावसाकडे पाहत होती. तिचेही काही खास नातं होते पावसाशी. कारण अश्याच एका पावसात तिने घर सोडायचा निर्णय घेतला होता .  

==========================================================

" कुठे आहेस .... हॅलो .... आवाज येतो आहे का ... " सुप्रीने आकाशला कॉल लावला. 
" हॅलो... हॅलो... सुप्री ... हॅलो... काहीच ऐकू येतं नाही.... " आकाशचे हेच उत्तर आणि कॉल कट्ट झाला. पुन्हा कॉल लावला तरी पुन्हा तेच, वैतागून तिने मोबाईल बाजूला ठेवला. 
" काय करायचे या माणसाचे... " सुप्री वैतागत बोलली. संजना तिच्यासोबत स्टेशनवर होती. तिची नजर आभाळाकडे गेली. पाऊस जमावाजमव करत होता आभाळात.   त्यात यांची ट्रेन उशिराने होती. पाऊस सुरु होण्याच्या आत ट्रेन आली पाहिजे असा विचार संजना करत होती. दुपारचे ४ वाजत होते. तेव्हाचीच ट्रेन होती. काही कारणाने उशीर झालेला. तेव्हा घोषणा झाली कि गाडी आणखी १५ ते ३० मिनिटे उशिरा आहे. 

" याचा अर्थ ... आपल्याला पोहोचेपर्यंत रात्र होईल. " संजनाने अंदाज लावला. 
" त्याचा फोनही लागत नाही बघ. कुठल्या डोंगरावर जाऊन बसला आहे कोण जाणे.... " सुप्री बोलली आणि स्वतःच हसली. संजनाही हसली. गाडी येईपर्यंत या दोघींच्या गप्पा गोष्टी पुन्हा सुरु झाल्या.  

==========================================================

" कादंबरी .... तुला कळते आहे का ... काय बोलते आहेस ते... ", 
" हो काका ... पूर्ण शुद्दीत आहे मी .. तुम्हीच झोपेत असल्या सारखं बरळत आहात. " कादंबरीने उलट उत्तर दिलं. 
" व्वा !! एवढी मोठी झालीस.... पाठी मागे तर बोलतेस, आता सरळ तोंडावर उलट बोलते आहेस.. " ,
" तुम्हीच शिकवलं हे ..... " ,
" कादंबरी !! " काकांचा पारा अधिक चढला. " तुला शिकवलं ना इतके ... हाच गुन्हा झाला आमचा... , म्हणून इतकी पोपटासारखी बोलते आहेस .. " काकांचे डायलॉग सुरु झाले. 
" wow !! किती बर झालं असतं ना... पोपट असते तर... उडूनच गेली असती. " त्या उत्तरावर सारेच गप्प झाले. 

 " पण मी म्हणते.... काय कमी आहे त्या मुलात... चांगला जॉब आहे... घर सुद्धा आहे... " काकींनी सुरुवात केली. मधेच तिचे वाक्य कादंबरीने तोडलं. 
" मी जवळपास तुम्हाला आता ५० वेळा सांगितलं आहे. नको आहे तो विषय. पुन्हा पुन्हा काय तेच.... वैताग आला मला. " ,
" म्हणजे लग्न करायचे आहे कि नाही... " कादंबरी शांत झाली. 
" बोल ना ... काहीतरी... " काकांनी पुन्हा विचारलं. कादंबरीने एक कटाक्ष टाकला काकांवर आणि बाहेर निघून गेली.  

गेल्या आठवडाभर हेच सुरु होते घरात. त्याचे tension, शिवाय ऑफिस मध्ये प्रचंड काम वाढले होते. बॉस सारखा मागे लागलेला असायचा. " जमत नसेल तर दुसरीकडे जॉब शोधा. " , हे वाक्य तर ठरलेलं. काम करून सुद्धा असं ऐकावं लागत असेल तर कसं मन रमणार तिथे, तरी दिवस ओढायचा म्हणून ओढत होती. त्यातून घरी आलं कि काका- काकींचे सुरु व्हायचे. लग्न कर .... लग्न कर .... त्रास नुसता. मानसिक त्रास... त्यातून एक विरंगुळा तो फोटोग्राफीचा. सुट्टी असली कि किंवा घरी पुन्हा मनस्ताप सुरु झाला कि कादंबरी निघायची फोटोग्राफी साठी.  पाऊस इतका आवडायचा नाही तिला, तरी पावसात निसर्गात होणारी रंगाची उधळण तिला जास्त आवडायची... फोटोग्राफीसाठी. 
" काय ठरवलं आहेस कादंबरी " आज पुन्हा काकींनी विषय काढला. कादंबरी ऑफिसमधून नुकतीच घरी आलेली. आल्या आल्याचं पहिला प्रश्न आला. 
" काका - काकी .... शेवटचं सांगते .... मला नाही इतक्यात लग्न नाही करायचे.. " ,
" अगं पण का ... का नाकारत आहेस त्याला... " , 
" त्याच्यात काहीच कमी नाही , पण मला अजून खूप काही करायचे आहे Life मध्ये... या लग्नात वगैरे अडकली तर काहीच करता येणार नाही पुढे.... " ,
" म्हणजे अजून किती वर्ष तुला पोसावे लागेल ... ते तरी सांग ... " काका रागाच्या भरात जे बोलायला नको होते ते बोलून गेले. कादंबरीला वाईट वाटलं. सारखी हसत असणारी कादंबरी , त्यादिवशी मात्र एकटीच , शांत बाल्कनीत जाऊन बसली होती कधीची. पुढचे काही दिवस तसे शांतच गेले तिचे. ऑफिसमध्ये सुद्धा गप्प गप्प असायची. 

                अश्याच एका दुपारी, ऑफिसमध्ये चहाची वेळ झाली. कादंबरी तिच्याच विचारात. चहाचा कप घेऊन गच्चीवर आली. पावसाळा सुरू होणार होता. आज आभाळ आलेले भरून. खूप दिवस मनात काही धुसफुसत होते तिच्या. पावसाची चाहूल लागली तशी पुन्हा तिच्या ऑफिसमध्ये येऊन बसली. पुढच्या काही मिनिटात पावसाने सुरुवात केली. कादंबरी पुन्हा खिडकीपाशी आली. पाऊस रिमझिम पडत होता तरी थंडावा आला होता. कादंबरीचे डोळे भरून आलेले, कारण काही विचार केला होता तिने आणि पक्का विचार केला होता. पावसासोबत मनातल्या भावना डोळ्यावाटे वाहत होत्या. कितीवेळ ती पावसाला पाहत होती माहित नाही. ठरलं शेवटी. जागेवर येऊन बसली. पटापट resignation letter टाईप केलं. बॉसला मेल केला. बॉसच्या उत्तराची वाट बघत राहिली नाही. आपले सामान घेतले आणि बाहेर पडली ऑफिसच्या. कोणालाही न सांगता. बाहेर पाऊस सुरूच होता. तशीच भिजत भिजत ती घरी आली. 

आज दुपारीच कशी आली हि, काकींच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह. काका त्याच्या कामाला गेले होते. कादंबरीने काकीकडे एकदाच पाहिलं. तिच्या खोलीत गेली. सर्व सामानाची बांधाबांध केली. संध्याकाळ झाली. काका आले घरी. 
" काय सुरु आहे कादंबरी " ,
" सामान आवरते आहे " तिचे थंड उत्तर. 
" का ? " ,
" निघते आहे मी .. " ,
" कुठे ? " काकीला तर धक्का बसला. 
" माहित नाही पण इथे थांबणार नाही..... मला माहित नव्हतं कि मी कोणावर तर ओझं झाली आहे ते.. " यावर काका मान खाली घालून उभे राहिले. " पुन्हा मला कोणावर पोसायची वेळ येऊ नये म्हणून निघाली आहे, तुम्ही मला एव्हडी वर्ष सांभाळलंत त्यासाठी खूप आभारी आहे मी तुमची.. जन्मभर " ,
" पण अशी जाऊ नकोस... " काकी बोलत होत्या. 
" नको .... आणि खरं सांगावे तर मला नाही जमत आता , इतकी tension घेयाला... माझे खांदे झुकत चालले आहेत... अपेक्षांच्या वजनाने... " ,
" पण जाणार कुठे ... " , 
" माहित नाही .... पाय दुखेपर्यंत आणि पाय नेतील तिथे जाणार ... कदाचित या शहरापासून दूर... जिथे माझ्याकडून कोणी आणि मी कोणापासून कोणतीच अपेक्षा ठेवणार नाही... अशी जागा शोधून काढीन आणि तिथे जाईन.... " एवढं बोलून कादंबरी घरच्या बाहेर पडली. कादंबरी बाहेर आली तेव्हा पाऊस थांबला होता तरी थंड हवा वाहत होती. तिने वर पाहिलं आभाळात,  पाऊस  भरत होता... नव्याने तयारी करत होता. 

कादंबरीला अचानक आठवलं सगळं. एक तो दिवस आणि आजचा दिवस. आठवण होते त्यांची, तरी माघारी गेले नाही कधी. आई-वडील कुठे गेले , का गेले , माहित नाही... तेव्हा लहानपणापासून काका- काकींनी सांभाळलं. पण कधी तरी येणार होती हि वेळ. आलीच. कादंबरी समोरच पाहत होती. दुपारची वेळ तरी काळोखी दाटलेली. वर काळोख आणि खाली उजळ जमीन. जणू काही चित्रकाराने रंग उधळले असावेत या मोठ्या कॅनवास वर. समोर गावात झाडाच्या पानांची सळसळ सुरु होती. पक्षी घराकडे परतत होते. पावसाची चाहूल लागलेली ना . उन्हाळ्याचे बहावा - गुलमोहोर आता अंग झटकत होते. त्यामुळे पावसाच्या आधीच बहावा- गुलमोहोराचा लाल -पिवळा पाऊस पूर्ण गावभर उतू गेलेला दिसतं होता. गावातली लहान- सहान पोरं ... जमा होतं होती, पावसात चिंब भिजण्यासाठी. वाऱ्यासोबत सुकलेला पाला - पाचोळा , लहानश्या वावटळीत फेर धरत होता. एवढ्या दुरून सुद्धा कादंबरीला ते सर्व स्पष्ट दिसत होते. कादंबरी अजूनही तिथेच उभी होती. हसताना सर्वांसोबत आणि रडू आले तर अशी एकटीच राहायची ती. हसरे चेहरे , हसतानाच छान वाटतात. असे तिला वाटायचे. पावसाने सुरुवात करण्याआधी कादंबरी शांत येऊन बसली तिच्या तंबूत. 

===========================================================

सुप्री- संजनाची गाडी आली एकदाची आणि त्यांचा प्रवास सुरु झाला. 
" काय गं ... काय सांगितलं घरी तू.. " ,
" काय सांगणार ... खोटेच बोलली ना ... मैत्रिणीचे लग्न आहे असं सांगितलं. दोन्ही ठिकाणी. घरी आणि सरांना... आता सरांना काय माहित आहे सर्व.. मी तुझ्यासोबतच जाणार ते.. हे माहीत असते त्यांना. so , ते झालं... पण घरी किती चौकशी केली. कोणती मैत्रीण , नाव काय.. कुठे राहते... सांगितलं मग ... गावाला लग्न आहे.. म्हणून चालली.. तू काय सांगितलं घरी " ,
" सवाल आहे काय ... तुझंच नाव सांगितलं... बोलली , संजना सोबत चालली आहे.. तिला सोबत पाहिजे म्हणून मला घेऊन जाते आहे.. " सुप्रीच्या या वाक्यावर संजनाने हात मारला कपाळावर. 

" तरी कुठे शोधायचे आकाशला ... ठरवलं आहे का ... " संजना... 
" नाही तस ... पण त्याला मेसेज करून ठेवला आहे... आहेस तिथे थांब.. कॉल तर लागत नाही... " सुप्रीने सांगितलं. बाहेर पावसाची काळोखी तशीच होती. पहिला पाऊस ना !! संजनाचे लक्ष खिडकीच्या बाहेरच होते. 
" तुला काय झालं ग .... एकदम शांत झालीस. " सुप्रीने संजनाला कोपराने ढकललं. 
" नाही... मनात विचार आला. आकाशचा... तुला पटणार नाही म्हणून बोलली नाही... " ,
" बोल तर ... पटेल कि नाही ते नंतर... " ,
" ok ... बघ हा ... आकाशाला तू अडकवून ठेवले आहेस , असं मला वाटते. राग नको मानू हा... " ,
" का ... अस कस वाटलं तुला ... " ,
" मी आणि तुही पाहिलं त्याला ... २ वर्ष इथे शहरात थांबून होता... कसा डोळे भरून आभाळाकडे पाहत असायचा. आणि आता त्याला त्या फोटोग्राफी कॅम्प साठी पाठवलं तर कसा त्याच्या मूळ स्वभावाकडे वळला तो..... बघ ना ... त्याला सुप्रीला कॉल करावा हे लक्षात सुद्धा नाही. तुमचे नाते छानच आहे... त्यात काही वादच नाही. पण पुढे कधी पुन्हा अशी घालमेल सुरु झाली कि नाही राहवणार त्याला... हे मात्र नक्की... जशे ते पिंजऱ्यात पक्षी कसे सारखा उडायचा प्रयत्न करत असतात तसा आकाश वाटला मला. सॉरी सुप्री... but मनात जे आले ते बोलली... " संजनाच्या बोलण्यात तथ्य होते. सुप्री काही न बोलता तशीच खिडकीपाशी डोकं ठेवून बाहेर बघू लागली. 

===========================================================

            आकाश भरभर चालत होता. तरी पाऊस गाठणार हे माहित होते त्याला. समोर एक मंदिर दिसतं होते. त्यापुढे गाव होते. गावाकडे न जाता आकाशची पावलं देवळाकडे वळली.  एक गणपतीची मूर्ती सोडली तर मंदिरात कोणीच नव्हते. मंदिर गावापासून तसं लांबच होते, जरा वरच्या बाजूला. आकाशने बॅग खाली ठेवली आणि आजूबाजूला न्याहाळू लागला. बऱ्याच दिवसांनी आकाश असा निवांत बसला होता. समोर काही अंतरावर कसलीशी शेतं वाऱ्यावर डोलत होती. मंदिराच्या आजूबाजूला कोणीतरी जाई-जुईची झाडे लावली होती. बरीच फुले फुलली होती. वाऱ्यासोबत तो सुगंध दरवळत होता. जणू काही समोरच्या त्या काळ्या - तांबड्या मातीलाही जाई-जुईचा गंध आलेला होता. हिरव्या झालेल्या झाडाचा रंग, आता आजूबाजूला मिसळून गेला होता. माणसाशिवाय असलेले जंगलच आता गर्दी करून कोणीतरी येणार आहे, त्याची सर्व वाट बघत आहेत असेच भास होत होता.  

           मधेच एखादी वीज चमकून जायची, भर दुपारी ... रात्रीलाही लाजवेल असा काळोख केला होता पावसाने. सूर्यदेवाचे काहीच चालणार नाही. मृग नक्षत्राची सुरुवात होती ती. गावात लक्ष गेलं आकाशचे. कौलारू घरे. काही शेणानी सारवली असतील ना. पहिल्या पावसात त्या शेणाचा गंध मिसळून एक वेगळंच रसायन तयार होईल. मग उधळतील मनांचे घोडे. वेडावून जायला होते अश्याने अगदी. आता तरी कमीच धावपळ दिसत आहे गावात. पावसापासून आपले सामान आवरत असतील. पण पावसाने एकदा का सुरुवात केली कि येतील सर्व बाहेर भिजायला. पहिल्या पावसात.... शहरात तर नाकं मुरडतात लगेच. या गावकऱ्यांना माहित पावसाची किंमत. आकाश स्वतःशीच हसला. 

           पाचच मिनिटात पावसाची सुरुवात. पहिला पाऊस !! आकाश मनोमन सुखावला. पानांवरती मोती सांडावे ,असेच काही घडत होते समोर. मित्र आलेला भेटीला.  गावाकडे जाणारी वळणवाट आता दिशेनाशी झालेली. वेगवेगळे , छोटे छोटे पाण्याचे ओहोळ .....  त्या पायवाटेवर एकमेकांना भेटत - मिठी मारत , एकमेकांच्या हातात हात घालून चालते झालेले. गावाकडच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनाला सुद्धा गाणी सुचत असतील आता.  बाया- बापड्यांचे पाय आपसूकच , ती आभाळातून पडणारी ओली नाणी वेचायला बाहेर पडलेली असतील. वाऱ्याने सुद्धा पायात पैंजण बांधावे आणि बेभान होऊन ताल धरावा त्याने, असच वाटतं होते. मनाला तो हिरवा मोह होणारच मग.. समोरच्या शेतात काही ठिकाणी भर पावसात धुक्याची चादर पसरली होती निसर्गाने. एका कोपऱ्यात , घरांच्या नजरा चुकवून आलेल्या तरुण पोरी... सर्वा देखत भिजता येतं नाही म्हणून ... गुपचूप तिथे भिजत होत्या... आनंद अनुभवत होत्या. कुठे एका झाडावर पक्ष्यांचे एक जोडपं एकमेकाला बिलगून बसलेलं होते, मातीचा गंध तर आता जाई-जुईच्या फुलांचाही वरचढ होऊ घातला होता. आकाशला हे नवीन नव्हतं तरी दूर राहिल्याने कदाचित त्याची किंमत कित्येक पटीने वाढली होती. 

          अचानक त्याला काही आठवलं, त्याचा पहिला प्रवास... असंच ते पहिलं निसर्गाचं दर्शन... हरपून गेलेलो ना. आकाशला जुने दिवस आठवले. तेव्हा तर अगदी नवखा होतो मी या निसर्गाला आणि पावसालाही. तरीही सामावून घेतलं मला त्याने. मलाही आणि पूजालाही. अरेच्या !! पूजा .... किती वर्षांनी आठवण झाली तिची. एकत्र प्रवास सुरु केलेला ना आम्ही. किती भटकायचो.  त्यानंतर तो जिप्सी लोकांचा ग्रुप येऊन भेटला आम्हाला. जवळपास ३-४ वर्ष एकत्र होतो आम्ही. त्यानंतर वेगळे झालो आम्ही. कशी असेल पूजा. तिला आठवत असेन का मी... निरोप घेताना बोललो होतो तिला, मनात एक लहानशी जागा ठेव माझ्यासाठी.... छान जमायचे आमचे, छानच हसायची. प्रत्येक वेळेला कधी वेगळं शोधत असायची. प्रत्येकाला मदत करावी असे तिचे म्हणणे आणि करायची सुद्धा मदत. छान बोलायची. छान कविता करायची. आता करत असेल का कविता... त्यापेक्षा आता फिरत असेल कुठे का .... मी तरी २ वर्ष शहरात होतो. पुन्हा भेट झालीच तर बोलेल... २ पावसाळे जास्त बघितले तुझ्यापेक्षा... सुप्री तेव्हाच भेटली असती तर कदाचित एवढा फिरलो नसतो किंवा इतके भटकंती करूही शकलो नसतो. अचानक त्याला त्या रखवालदाराचे वाक्य आठवलं. खरंच का... लग्नानंतर हि अशी भटकंती बंद होईल ..... म्हणजे ..... हि शेवटची भटकंती आपली... 

            असा विचार आला आणि वीज कडाडली. आकाश त्या सर्व विचारातून बाहेर आला क्षणात, समोर घडत असलेल्या प्रत्येक क्षणात जगावे असेच ठरवले होते ना आपण. मग आता का पुढचा विचार करावा, येतील ते क्षण छानच असतील , आणि ते सुंदर कसे बनवायचे ते सांगायला निसर्ग आहेच. पावसाचा थंडावा चहुबाहुला पसरला होता. सर्व धरतीला त्याने आता कवेत घेतलं होते. आकाश त्या मंदिरात पहुडला. झोप लागली तर... चिंता नाही... वीज येईल झोप मोडायला आणि भानावर आणायला... तोपर्यंत आठवणीत रमून जाऊ . आकाश खूष  होता. सॅक डोक्याखाली घेतली आणि तसाच झोपून तो पहिला पाऊस बघू लागला. इतकं विशाल तरी ओलं झालेलं आभाळ खाली त्याच्या भेटीला आलेलं ना !!

 
=======================================    to be continued...................Followers