( Note : ही गोष्ट आहे १९९० च्या दशकातली. त्यावेळी mobile फोन तर नुकतेच आलेले होते पण भारतात ते फारच कमी आलेले होते, आणि ते फक्त श्रीमंत लोकांसाठीच होते जणूकाही. Computer जरी असले तरी इंटरनेटचा जमाना म्हणावा तेवढा पसरला नव्हता. अजूनही पत्र येत होती घरी , पोस्टमन काकांच्या हातातून . मुले अभ्यास झाल्यावर घरात कमी आणि मैदानावर जास्त दिसायची. तेव्हा क्रिकेट आणि फुटबॉल सारखे खेळ हे "Computer" न खेळता , मैदानावरच खेळले जायचे. शाळेत मुलं मनापासून अभ्यास करायची. तेव्हा मराठी शाळेतून " मराठी" मध्येच शिकवला जायचे. आणि मराठी शाळेचं नवीन वर्ष हे " १३ जून " ला सुरु व्हायचे. याचकाळात मीही लहान असल्याने त्या काळातलं सुख मी अनुभवू शकलो. वाचकांनी तो काळ आठवून पुढील गोष्ट वाचावी . )
' १३ जून , आज शाळेचा पहिला दिवस , लवकर निघायला हवं ना. सगळी तयारी झाली आहे. कालच bag भरून ठेवली, नाहीतरी पहिला आठवडाभर " शाळा " अर्धा दिवसच असणार. रात्री पाऊस पडून गेला,छत्री घ्यावी लागेल ना. अरे ..... तार तुटली आहे. काय करायचा आता ? जाऊ दे . आता पुरती घेऊ या. दुपारी घरी आलो कि सांगेन आईला, ती आणेल शिवून छत्री. घडयाळ........घडयाळ........कूठे आहे यार ? कूठे ठेवलं मी ? आई ..... माझं घडयाळ बघितलास का ? भेटलं....... भेटलं गं आई , बूट ...... बूट नको ना. पाऊस आहे कूठे बूट घालतोस, पावसाळी चप्पल घालूया........... किती वाजले..... ७ ला ५ मिनिट कमी...... Perfect Timing .... चला निघूया...... आई " शाळेत जातो मी ".......
शाळा .............. असं म्हणतात कि जगताना जर स्वर्ग अनुभवायचा असेल तर तो शाळेत घालवलेला प्रत्येक क्षण ...... प्रत्येकाने तो " स्वर्गानुभव " घेतला असेल ना. ते जग वेगळच असते. तसंच एक जग " विवेक " च सुद्धा होतं. त्यात होते, त्याचे वर्गमित्र, शाळेतल्या मित्रांचा एक छोटासा ग्रुप , त्याचा Best Friend नितीन आणि एक "ती"...... त्याला आवडणारी…
" विवेक " आणि " ती " ची अशी काही ओळख नव्हती. फक्त एका शाळेत होते दोघे इतकचं. आणि एकाच वर्गात. त्याला ती सुरुवातीपासूनच आवडायची. खूप आवडायची. घारे डोळे, लांब सडक केस पण शाळेत मुलीनी केस मोकळे सोडायला Permission नव्हती. म्हणून ती वेणी घालून यायची. छान वाटायची. सावळा रंग आणि हसली कि गालावर मस्त " खळी " पडायची तिच्या. Actually " ती "ला एकदा हसताना 'विवेक ' ने पाहिला होतं आणि त्या " खळी " वरच तो वेडा झाला होता. तो तिला फक्त पाहताच राहायचा, पण लपून छपून. कोणाचं लक्ष नसेल तेव्हा. दोन वर्षापूर्वीच " ती " शाळेत आली होती. std ६ मध्ये असताना " ती " प्रथम त्याच्या वर्गात आली. आज दोन वर्ष झाली तरी एकदाही तो " तिच्याशी " बोलला नव्हता. कधीच नाही. कसली तरी भीती वाटायची त्याला. एक - दोनदा " तिच्या " शी बोलायचा चान्स आला होता. पण तो गेलाच नाही बोलायला ; घाबरला तो.
७ वाजून ५ मिनिट झाली. " बरोबर आलो अगदी. आता येईलच ती." विवेकने घडयाळ बघत चालण्याचा speed कमी केला. शाळा त्याच्या घरापासून फार लांब नव्हती. म्हणून विवेक चालतच शाळेत जायचा. आणि येतानाही चालतच घरी यायचा. अगदी सरळ रस्ता होता शाळेत जाण्यासाठी. विवेकचा चालण्याचा speed चांगला होता. त्यामुळे तो २० मिनिटामध्ये शाळेत पोहोचायचा. शाळा ७.३० ला सुरु व्हायची सकाळी . ६.५५ ला घरातून निघालो कि ७.१५ पर्यंत शाळेत , असे त्याचं calculation होते. म्हंणून त्याला घडयाळ लागायचेच. " ती " कूठे राहायची हे प्रथम विवेकला माहित नव्हते. शिवाय त्या भागात त्याच्या वर्गातले इतर कोणीच राहायचे नाही त्यामुळे शाळेत जाताना तो एकटाच जायचा , येताना मात्र मित्रांबरोबर गप्पा मारत , फिरत फिरत वेगळ्या वाटेने घरी जायचा.
एकदा तो शाळेत जात असताना अचानक त्याचं लक्ष " तिच्याकडे " गेलं." अबे !! ..... हि कुठून आली ?" विवेक तर बावरूनच गेला. "ती" ने त्याला बघितलं नव्हता. कारण ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती शिवाय त्याच्या पुढे चालत होती. "हिने बघितलं तर प्रोब्लेम होणार. " म्हणून तो काही तिच्या पुढे गेला नाही. तीही तिच्याच धुंदित हळूहळू चालत होती. " किती हळू चालते हि " तिच्यामुळे विवेकालाही पुढे जाता येत नव्हता. शेवटी रस्ता ओलांडताना दोघांची नजरानजर झाली. तिने त्याला न बघितल्यासारखं केलं आणि आता ती झपझप चालत निघून गेली. विवेकला काही कळलंच नाही." तिने मला बघितलं कि नाही? " घड्याळाकडे लक्ष गेलं त्याचं "मेलो......... आज बाई बाहेर उभा करणार वाटते" तसा तो धावतच गेला. वेळेआधी पोहोचला तो पण सगळ्यात शेवटी. घाम फुटला होता धावून. " काय रे कुत्रा लागला होता वाटते मागे " विशालने विवेकला विचारले " नायतर राकेश लागला असेल मागे ." नितेश मधीच बोलला [ राकेश कडे एक कुत्रा असल्याने त्याला वर्गातले सगळे " भू ... भू ..." असे चिडवायचे .] " नित्या .............दात आले वाटते तुला , थांब बघतो तुला. " राकेश नितेशला मारणार इतक्यात वर्गशिक्षीका आल्या." साल्या ....... नंतर बघतो तुला."राकेश रागातच बोलला. आणि त्याचबरोबर वर्ग सुरु झाला. बर, विवेकला कळलं होतं कि तिचा पण तोच रस्ता आहे शाळेत जाण्याचा. कारण आता बहुतेक वेळेला त्यांची भेट व्हायची. अर्थात विवेक मागे मागे चालायचा. पण हे conform होते कि " ती " याच रस्त्याने जाते , त्याचबरोबर त्या रस्त्यालाच एक गल्ली देखील आहे आणि त्याच गल्लीतून ती बाहेर पडते , असा शोध त्याने लावला होता. अगदी ती त्या गल्लीतुने " ७ वाजून ५ मिनिटांनी " बाहेर पडते, हे देखील त्याला कळले होते." किती great आहे मी " स्वतः तो खूष झालेला. आता काय ............ रोजच त्याला " ती " शाळेत जाताना दिसणार होती. बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी , Perfect एकदम. त्याचवेळेस ती तिथून निघायची. विवेकसुद्धा वेळेवर तिथे यायचा. तिला काही कळू नये म्हणून उगाचंच त्याच्या शूजची लेस सुटायची. उगाचच लेस बांधण्याचा " बहाणा " करायचा, ती पुढे जाईपर्यंत. गेली २ वर्ष तर हेच चालू होतं . मधेच सुट्टी असली कि त्याला करमायाचे नाही. अशीच सुट्टी लागली होती , ती म्हणजे std ७ ची Final Exam संपल्यानंतरची. आता विवेक आणि ती ८ वी ला जाणार होते. १३ जूनची किती आतुरतेने वाट पाहीली होती त्याने,आणि शेवटी "तो" दिवस उगवला. " १३ जून " तो पोहोचला त्या ठिकाणी. पायात शूज नसल्याने " लेस सुटायचा " प्रश्नच नव्हता.
" ७ . १० झाले . अजून कशी आली नाही . " विवेक मनातल्या मनात बोलला. जास्त वेळ थांबून फायदा नाही, नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर होईल. म्हणून विवेक शाळेकडे नाईलास्तव निघाला. " किंवा आज ती लवकर गेली असेल शाळेत " तसा तो लवकर पोहोचला वर्गात,पण वर्गात ५-६ डोकी सोडली तर कोणीच नव्हते वर्गात. त्यातूनही त्याच्या मित्रापैकी फक्त राकेशच आलेला होता. " नशीब तू तरी आलास विक्या. मला वाटलं आज या " scholar " मुलांबरोबर बसावं लागतं कि काय ? " राकेश विवेकला बोलला , परंतु विवेकच लक्ष कुठे होतं त्याच्या बोलण्याकडे. तो " तिला " शोधत होता, " ती " नव्हतीच वर्गात. ७.३० वाजले तशी शाळा भरल्याची घंटा झाली. वर्गात तशी कमीच मुलं होती,खूपच कमी. विवेकच्या group मधली मुल पण नव्हती. " नाहीतरी आज आणि आठवडा भर " Half Day " आहे ना शाळा. म्हणून आज बहुतेकांनी शाळेला " कल्टी " मारली असेल रे ." राकेश बोलला. " हो रे लक्षातच नाही आलं माझ्या." अर्ध्या दिवसाने विवेक घरी आला. आज त्याला दिवसभर करमणार नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच. ७.०५ ला तो पोहोचला तरी " ती " आलीच नाही, बरं , वर्गातसुद्धा नाही. कालच्या मानाने , आज खूप जण आलेले होते, ७-८ मुलं सोडली तर बाकी सगळा वर्ग भरला होता. पण " ती " नव्हती. " गेली कुठे हि ? " , अभ्यास सुरु झाला नव्हता,ती वर्गात नव्हती, शाळा अर्धा दिवस सुटत होती आणि विवेकच मन लागत नव्हतं. माहिती काढल्यावर कळलं कि त्या ८ मुलांपैकी ५ जण गावाला गेलेले होते आणि ३ जणांनी शाळा " सोडली " होती. पुढच्या २ दिवसात गावाला गेलेल्या ५ पैकी ४ मुलं आली होती. आता उरलेले ४ जण........ त्यापैकी २ मुल आणि २ मुली...... " बापरे ..... तिने शाळा सोडली कि काय ? " विवेकच्या डोक्यात विचार आला. " कोण कोण गेलं शाळा सोडून ." विवेकने उगाचच तो विषय group मधे काढला. " अरे यार .... तो चव्हाण आणि पाटील गावाला गेले आहेत. पाटील येईल ना आज गावावरून. तो येणार उद्या शाळेत. चव्हाण माहित नाही केव्हा येणार ते, त्याने सोडली असेल शाळा. " ;"आणि त्या दोन मुली.... "," तुला काय करायचं आहे त्या पोरींच ? " ,"मला काय करायचा आहे ? असंच विचारलं मी ."विवेक म्हणाला," हा..... ती वाघमारे होती ना ..... अरे ती रे.... ती म्हणायची सारखी .... काय वर्ग आहे,,काय शाळा आहे.... मोठी शानीच होती ना…. ती गेली सोडून ..... आणि … आणि ती होती ना " घारी " [ घारी म्हणजे " घाऱ्या डोळ्यांची " ]..... तिचा काय माहित नाय…गेली असेल ती पण बया.... " हे ऐकून विवेकच्या छातीत कळ आली जरां. " झालं ..... संपल सगळं . आता शाळेत काही अर्थ नाही." मात्र एक होतं कि आठवडा संपत आला तरी त्या चौघांपैकी कोणीच आलेले नाही शाळेत. विवेकला कशातच रस नव्हता आता, अश्याप्रकारे शाळेचा पहिला आठवडा संपला . दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस. आजपासून शाळा पूर्ण दिवस असणार होती. विवेक वेळेवर पोहोचला शाळेत. आता तो त्या रस्त्यावर " ती " ची वाट बघत नव्हता ना. " ती शाळा सोडून गेली हे नक्की " असं त्याने मनाशी ठरवलं होतं .
"काय रे विक्या ....... गप गप असतोस हल्ली ..... काय झालं बे तुला ? " राकेशने विवेकला विचारले. विवेक काहीच बोलला नाही. " आल्यापासून हा मान खाली घालून बसला आहे.......... नितीन, तुला माहित आहे का रे ? काय झालं त्याला." विशालने नितीनला विचारलं, त्याने मानेनेच नकार दिला. वर्गशिक्षिका वर्गात आल्या आणि त्यांनी " हजेरी " घेण्यास सुरुवात केली. " एक नंबर "," present miss "," दोन नंबर "," present miss " आणि अश्याप्रकारे वर्गशिक्षिका हजेरी घेत होत्या. " सोळा नंबर "......... " सोळा नंबर ? ''...... विवेक अजूनही तसाच बसून होता मान खालीघालून, लक्ष कुठे होतं त्याचा. " अबे .... विक्या ... उठ झोपलास काय ? " संकेतने विवेकला हलवलं. तसा तो जागा झाला. " हा ....... हो…. present miss" ," काय विवेक अजून झोप पूर्ण झाली नाही वाटते ?"," Sorry miss ".... बोलून तो खाली बसला. हजेरी चालू होती. आणि …. " ६१ नंबर "," present miss " … " ६१ नंबर ? " ," कोण बोलला ? ....... हा तर तिचा नंबर आहे. ' no. ६१ .... सई देशपांडे ' . त्याने पटकन तिकडे नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावर शेवटी हसू आलं. केवढं tension होतं , तेवढं सगळं कुठच्या कुठे गेलं. " सई तू गेला आठवडाभर गैरहजर होतीस . " ," हा madam , गावाला गेलेले ना म्हणून ."," मग ' सुट्टीच letter ' आणलस का ? आणि वर्गात केस मोकळे ठेवायला permision नाही आहे माहित आहे ना. "," sorry miss . आज सकाळीच आले ना गावावरून म्हणून घाई झाली थोडी. उद्या आणते letter " ," ठीक आहे " विवेक तर अजूनही हसत होता. त्याच्या बाजूला बसणाऱ्या संकेतला तो का हसतो आहे ते कळतच नव्हतं. पहिला lecture संपल्यावर त्याने विचारलं ," तू बरा आहेस ना.. आलास तेव्हा गप होतास आणि आता उगाचच हसतो आहेस " , "तू गप रे तुला नाही कळणार."
पुढच्या lecture ला कोणीच शिक्षिक आले नाहीत. त्यामुळे वर्गात गोंधळ सुरु झाला. नुकतेच सर्व गावावरून आलेले,मग गावच्या गोष्टी सुरु झाल्या. सगळे आपापसात बोलण्यात दंग होते. " सई " सुद्धा तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत होती. विवेक मात्र तिच्याकडेच बघत होता. " सई " ज्या ठिकाणी बसायची त्या बाजूला खिडकी होती आणि आज छान हवा सुटली होती. त्यातूनही सईने आज केस मोकळे सोडले होते. हवेच्या येणाऱ्या प्रत्येक झुळूकेबरोबर तिचे केस भुरुभुरु उडायचे. मग ती हलकेच तिचे केस चेहऱ्यावरून बाजूला करायची. असं कितीतरी वेळ चालू होतं. " आज तर स्वर्गातच आहे मी." विवेक पुटपुटला. " लेका स्वर्गात नाही शाळेत आहेस तू ." संकेत त्याला चिडवत बोलला. " मला माहित आहे आपली नजर कुठे आहे ती ." तसा विवेक थोडासा बावरला. " काही नाही . काम कर स्वतःच, समजलं ना."," मला माहित आहे ..... मला माहित आहे. "," सांग ना मग साल्या." राकेश पुढे येत म्हणाला,तसं सगळ्या मित्रांनी आपले कान टवकारले. " अरे हा विक्या ना ..... तिकडे.... खिडकी .... ", " गप हा संक्या, मारीन नायतर ." विवेक घाईतच बोलला." तू सांग रे , मी बघतो विक्याला ."," अरे हा ना त्या खिडकीबाहेर " कैऱ्या " लागल्या आहेत ना,तिकडे बघत होता. " तसं विवेकच tension कमी झालं." हाडं..... हाडं.....मला वाटलं कोणा पोरीला लाईन देतो आहे. हाडं संक्या." राकेश उठला आणि संकेतच्या डोक्यावर एक टपली मारली, तसं सगळ्यांनी आपले हात साफ करून घेतले संकेतवर. विवेकने सुद्धा मनापासून हसून घेतलं. पण काही म्हणा ........ खरंच आज ती खूप सुंदर दिसत होती. वाऱ्यावर उडणारे मुलायम केस आणि ते केस बाजूला केल्यावर दिसणारी गालावरची " खळी " ... आहाहा... छान एकदम...
मधली सुट्टी झाली तशी सगळी मुलं पटापट डब्बा खाऊन मैदानावर पळाली. मुली वर्गातच बसून उरलेल्या गप्पा मारत होत्या. विवेकचा group सुद्धा मैदानावर पळाला होता. फक्त विवेक आणि संकेत अजूनही मैदानावर पोहोचले नव्हते. विवेक तर काय आज हवेतच होता. " विक्या, एक विचारू का तुला ? " संकेतने विवेकाला मधेच थांबत विचारले. " बोल ना..... त्यात विचारायचे काय ?" विवेक बोलला , " तू त्या "सई" कडे बघत असतोस ना."," चल्ल रे .... काय पण बोलू नकोस हां "," काय पण नाही, २ वर्ष तुझ्या बाजूला बसतो मी वर्गात. तुला काय आता ओळखतो मी."," तसं काही नाही आणि कोणी सांगितलं तुला ? "," कोणी कशाला सांगायला पाहिजे, तुझ्या चेहऱ्यावरून दिसते रे ते." तसा राकेश पुन्हा वर धावत आला आणि या दोघांना बोलताना पाहून त्याचं डोकच फिरलं , एक धपाटा मारत संकेतला बोलला ," काय सायबानू .... आता काय मुहूर्त काढनार काय.......मैदानावर यायला. .... चला लवकर. "," आज नको यार राक्या, जरा काम होता संकेत कडे '' विवेक बोलला ," मरा दोघे पण .... यायचं तर या .... नायतर गेलात उडत." म्हणत धावतच गेला राकेश मैदानावर. राकेश गेला तसा विवेकने संकेतकडे बघितल, आता काय सांगायचा याला.. " बोल ना. तुला ती सई आवडते ना . तिच्याकडे बघत असतोस ना रोज." ..... " नितीनला सुद्धा माहित आहे. " ," काय ?.. " ," हेच कि तुला सई आवडते ती." आता काहीच पर्याय नव्हता विवेककडे.'' हो.रे... आवडते मला ती. अरे पण नितीनला कोणी सांगितलं."," वेड्या ... तुझा तो best friend आहे ना. त्याला कळते तुझं सगळं आणि मी पहिलं त्यालाच विचारून conform केलं हे. कळलं का भाऊ ? " , " असं होय. पण संक्या please कोणाला सांगू नको यार. आपल्यातच राहू दे हा. " , " हो रे , सांगायचा असता तर आजच सांगितलं असता ना मी. " तसा विवेक शांत झाला. " चल ... चल मैदानावर, नायतर तो " भू .... भू ... " पुन्हा येईल भुंकत " संकेत बोलला तसे दोघे पळाले.
असं होतं विवेकच जग... त्यात त्याचे ५ मित्र आणि एक " सई ".... ५ पैकी राक्या म्हणजेच राकेश थोडासा मस्तीखोर होता,अंगानेही धिप्पाड होता,वर्गातले त्याला जरा घाबरूनच असायचे. पण अजून पर्यंत त्याने कोणावर हात उचलला नव्हता.तसा तो प्रेमळ होता पण अभ्यासात जरासा मागे होता. त्याची ती कमी नितेश पूर्ण करायचा , त्याला अभ्यासात मदत करून. त्याच्यामुळेच राकेश ८ वी पर्यंत आला होता. राकेश सोडला तर बाकी सगळे हुशार होते. अगदी पहिल्या १० मधले नसले तरी first class काढायचे नेहमी. तेवढीच मस्ती आणि तेवढाच अभ्यास. त्यातल्यात्यात " नितीन " विवेकचा Best Friend होता,अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून त्यांची मैत्री होती. एका बेंच वर जरी बसत नसले तरी त्यांना एकमेकांच्या मनातले बरोबर कळायचे. नितीन खूप कमी बोलायचा. संकेत आणि विवेकची सुद्धा चांगली मैत्री होती, त्या दोघांचं चांगलं जमायचं म्हणून संकेत विवेकच्या बाजूची जागा पकडली होती. एका बेंचवर २ मुलं. विवेक डबा घेऊन जायचा नाही कधीही, मग त्याच्यासाठी संकेत डबा घेऊन जायचा. विशालला गणिताची खूप चांगली माहिती होती, वर्गात जरी पहिला आला नसला तरी Maths मध्ये दोन्ही वर्गात मिळून नेहमी पहिला यायचा. सगळा वर्ग maths मधे काहीही प्रोब्लेम आला तर त्यालाच विचारायचे .. अगदी मुली पण.... त्याला त्याचा कधी गर्व नाही झाला. नितेश... जरा वेगळंच रसायन होतं. त्याला इतिहास खूप आवडायचा. अगदी इतिहासच पूर्ण पुस्तकच पाठ असायचे त्याला." याला बर सगळ लक्षात राहते बे. कोणता राजा केव्हा पृथ्वीवर आला,केव्हा ढगात गेला, कोणत्या देशाने कोणत्या देशावर कधी बॉम्ब टाकला, किती लोकं नरकात गेले. मग कोणता तह काय फह केला.... वाटते जेव्हा या घटना घडायच्या तेव्हा हा तिकडे असायचा .... चणे खात." राकेश बोलायचा कधी कधी. आणि शेवटी राहिला तो विवेक. विवेक सुद्धा तसा शांत होता,पण मस्ती करायला लागला कि कोणालाच नाही ऐकायाचा. अभ्यासात हुशार होता. त्याला जास्त गोडी होती ती निसर्गाची. मुक्त उडणारी पाखरं, हिरवीगार झाडं, वनराई, फुलं... सगळं आवडायचं त्याला. रमायचा अगदी तो त्यामध्ये. " सई "..... प्रेमळ, मनमिळावू, हसरी होती. मोजक्याच मैत्रिणी होत्या तिच्या वर्गात. अभ्यासात पुढे असायची, पहिल्या ५ मध्ये असायची. एकंदरीत ..... असं होतं विवेकच जग आणि त्यातच गुरफटलेला असायचा नेहमी. सुंदर जग होतं ना . मैत्री तर एवढी घट्ट होती कि सगळ्या शाळेला माहिती होती. माझ्या या जगाला कोणाची नजर लागू नये असं विवेकला सारखं वाटायचं, तसा तो जपायचाही सगळ्यांना. पण म्हणतात ना आपल्या हातात काहीही नसते ..... बरोबर ना ….
to be continued....................