All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 13 October 2018

" रातराणी.... (भाग १ ) "

          तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... 

 विनयला जाग आली कसल्याश्या आवाजाने.. हळूच डोळे उघडले त्याने. बाजूला चंदन होताच, 
" बाहेर पाऊस पडतो आहे का रे.. "  
" नाही ...आता कसा पाऊस.. हिवाळा सुरु आहे... पावसाळा संपून २ महिने झाले... झोप तू... तूला भास झाला असेल.. " ,
" नाही रे... अजूनही आवाज येतो आहे पावसाचा मला... माझ्या कानात घुमतो आहे आवाज त्याचा... सरींचा... पागोळ्यांचा... पानावर पडणाऱ्या थेंबांचा... " चंदनला गहिवरून आलं. 
" झोप शांत... नको करुस विचार... " 

विनय तसाच उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत होता. चंदन बघत होता त्याच्याकडेच. कसा होता आधी... किती बोलके , पाणीदार डोळे... आता खोल गेले होते.. निस्तेज.... कसलेच भाव नसलेले... जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा कसा होता ना... चंदनला आठवलं काही.. " विनय... आठवतो का तुला... तुझा ऑफिस मधला पहिला दिवस... सारखा बोलतोस ना, कधी विसरणार नाही ते दिवस म्हणून... " विनयला आठवलं ते... एक छान smile आली त्याच्या सुकलेल्या ओठांवर.... अलगद डोळे मिटले त्याने .. आणि ते दिवस आठवू लागला. 

============================================================

" ओ साहेब... तीतं नका लावू गाडी... अवि साहेब गाडी लावतात तीतं... " watchman धावत आला. तोपर्यंत विनयने त्याची bike पार्क केली होती. 
" राहू दे ना काका... याच ऑफिस मध्ये आहे मी जॉबला... ज्यांची हि पार्किंग आहे. " विनय सांगत होता. 
" हो सर.... पन अवि साहेब ऐकणार नाहीत... " आणि मागून bike चा आवाज आला. 
" घ्या.. आले ते साहेब... आता तुमीच काय ते बघून घ्या... " एक bike येताना दिसली त्याला. त्यावर जाडसर मुलगा.. जाडसर नाही... जाडाच होता तो. डोळ्यावर गॉगल... मध्यम उंची.. विनय निरखून पाहत होता त्याला. बघे पर्यंत आला तो विनय जवळ bike घेऊन. 

" ओ काका... कोणाची गाडी हाय इथं.. " अव्या bike वर बसूनच ओरडला. त्यांनी जागेवरूनच, विनय कडे बोटं दाखवलं. अव्याने विनयला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहिलं. 
" ओ !! इथे फक्त आमच्या ऑफिस मधलेच गाडी लावू शकतात.. वाचता येतं नाही का... दुसरीकडे लावा गाडी... " ,
" मी याच ऑफिस मध्ये जॉबला आलो आहे.. जागा मोकळी होती म्हणून लावली bike .. " ,
" आमच्या ऑफिस मध्ये... कधी दिसला तर नाही...ते असुदे... माझी जागा आहे ती... तुमची गाडी काढा तिथून... " अविचा आवाज जरा वाढला. 
" अहो .. असू दे कि... इथे सावली सुद्धा आहे bike साठी.... " अवि तापला. 
" ओ काका !!! शांतपणे सांगतो तर कळत नाही का... अ पासून भ पर्यंतच्या बाराखडीच्या... सर्व शिव्या येतात मला.. आणि लिहून सुद्धा देऊ शकतो.. पण ते ऑफिसच्या बाहेर.... देऊ का example ... " अविचा चढलेला आवाज ऐकून आणखी एक मुलगा धावत आला तिथे. 

" काय झालं अव्या.. सकाळ सकाळ.... तुझा आवाज त्या गेट पर्यंत येतो आहे.. " ,
" अहो .... इथे जागा मोकळी होती म्हणून लावली गाडी... त्यात आज माझा पहिला दिवस आहे ऑफिस चा... मला काय माहित यांची जागा आहे ते.. " विनय कळवळून बोलला. 
" असं आहे तर... अव्या ... जाऊ दे ... एक दिवस माफ कर... त्याला माहित नाही ... उद्या नाही लावणार गाडी तिथे... " अव्याचा राग शांत झाला. 
" तू मध्ये आला म्हणून... नाहीतर... " अव्या पुन्हा विनय कडे पाहू लागला. " आज पहिला दिवस आहे तुझा... पहिलं दिवस देवाचा.. म्हणून सोडून दिलं तुला... उद्या दिसली ना तुझी bike इथे... तर समोर बघ, तिथे मोठा नाला आहे.. त्यात दिसेल तुझी bike पार्क केलेली.. " अविने त्याची bike दुसरीकडे लावली आणि तावातावाने निघून गेला. 

" खरंच आमच्या ऑफिसला जॉईन झालास तू.... बघितलं नाही कधी... " ,
" पाहिलंच दिवस ना माझा... ",
" अरे हा ... बोललास तू.. " ,
" but थँक्स,... तुम्ही आलात म्हणून नाहीतर मारलं असतं मला.. " ,
" हो... उद्या पासून जरा बाजूलाच लाव तुझी bike .. by the way ... मी चंदन... ", 
" Hi .. मी विनय .. " दोघांनीही हात मिळवले. 
" कोणत्या डिपार्टमेंट मध्ये आहेस.. " .
" मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे... IT डिपार्टमेंट मध्ये जॉईन केलं आहे.. " ,
" अरे व्वा !! मी पण तर  IT डिपार्टमेंट मध्येच आहे.. छान.... बरं , चल आता... वेळ झाली ऑफिसची.. " दोघे बोलतच ऑफिस मध्ये शिरले. 
" wait !! .... तुझा interview कोणी घेतला.. IT डिपार्टमेंट मध्ये तर मीच घेतो interview ... " चंदन आश्चर्यचकित झाला. 
" actually , मोठया सरांनी घेतला interview ... " विनय हळू आवाजात म्हणाला. 

" ओह्ह !! .... मोठीच सेटिंग आहे... मज्जा आहे तुझी... " चंदन हसत म्हणाला. 
" तसं नाही सर ... मी फक्त experience साठी आलो आहे. ", 
" मस्करी केली रे... आणि सर काय... चंदन बोल... तुझ्या एवढाच आहे मी.. " ,
" तरी.. माझ्यापेक्षा जास्त वर्ष झाली ना इथे.. मोठेच तुम्ही... " विनयच्या त्या वाक्यावर चंदन हसू लागला. 

" एक सांगतो तुला.... विनय ना... हा... या आपल्या field मध्ये कोणी कोणाचे सर , मॅडम नसते..ते मोठे बॉस आहेत ना... त्यांना सर चालते बोलले तर ...  त्यामुळे एकेरी बोलला तरी चालेल सर्वांना... " ,
" सर नाही.... तर मग... friend हाक मारू का... ते चालेल ना... " त्यावर चंदन ने विनयच्या खांद्यावर हात ठेवला... 
" एकवेळ सर चालून जाते... मित्र , friendship ... नाही चालत इथे आता... office colleagues आहेत सर्व आता.. असंच बोल " विनयला काही कळलं नाही.. " चल आता कामाला लाग.. " चंदनने त्याचा PC सुरु केला. 

" मी जरा मोठ्या सरांना भेटून येतो... " विनय सरांना भेटायला गेला. चंदन आणि इतर कामाला लागले. दिवसभरात विनयने त्याचे काम समजून घेतले. ऑफिस ची थोडी तोंडओळख करून घेतली. वेळ झाली तसा संध्याकाळी घरी निघून गेला.  

पुढल्या दिवशी , विनयने आठवणीने त्याची bike दुसऱ्या जागी लावली. चंदन आणि आणखी १-२ सोबत ओळख... चंदन पहिल्या दिवशी भेटला म्हणून .... आणि बाकीचे , याची मोठया सरांची ओळख होती म्हणून विनयला ओळखत होते. हळूहळू समजलं त्याला... इथे काहीतरी वेगळं आहे. १ ऑगस्ट ला जॉईन झालेला तो... आता त्याला १२ दिवस झाले होते ऑफिस मध्ये. 

" हे चंदन... १५ ऑगस्ट जवळ आला आहे. " ,
" मग ? " , चंदनने त्याची pc मध्ये घुसलेली मान बाहेर न काढताच विचारलं... 
" अरे !! मग साजरा नाही करत का .. decoration.... पार्टी वगैरे.. " विनय किती उत्साहात सांगत होता. 
" तुला कोणी सांगतील हे असं... इथे नसते पार्टी वगैरे.. " चंदन विनय कडे पाहत म्हणाला. 
" ते लंच हॉल मध्ये ... फोटो लावले आहेत ते... " ,
" ते जुने आहेत.. आता काहीच सण साजरे होतं नाहीत ... " चंदन पुन्हा कामाला लागला. 
" का पण "...... विनय .... 
" काय करायचे आहे तुला... काम नाही का तुझ्याकडे.. नसेल तर गप्प बसून राहा.. " चंदन जरा रागात बोलला. विनय शांत बसून राहिला. मग चंदनलाच कस तरी वाटलं. 
" सॉरी यार... पण हा विषय नको... आपण lunch time ला बोलू ... चालेल ना... " विनयला पटलं. 

दुपारी जेवताना दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. " हे फोटो २ वर्षांपूर्वीचे आहेत.. तेव्हा शेवटचा सण... नाताळ साजरा झाला होता. तेव्हापासुन ... गेल्यावर्षी ... एकही सण ... काही celebration झालेलं नाही या ऑफिसमध्ये... ", 
" पण व्हायचे ना .... celebration... आता का होतं नाही... " ,
" व्हायचे... म्हणजे नुसता धिंगाणा.. असायचा ऑफिस मध्ये... आता कस शांत वाटते.. बिलकुल नव्हतं असं ... गजबजलेलं असायचं... प्रत्येक दिवस छान असायचा... दर friday ला दुपारनंतर काहीतरी कार्यक्रम असायचा. आता काहीच होतं नाही... काही गैरसमज झाले... भांडणं झाली... याला एक वर्ष झालं... सगळं बंद झालं... " , 
" कोणामध्ये भांडणं झाली... " ,
" एक टीम होती आमची... म्हणजे सगळ्या ऑफिसमध्ये काही active मंडळी होती या टीम मध्ये... तशी ५ जणांची टीम होती. तेच सर्व ठरवायचे... त्यातच भांडणे झाली. टीमचं ब्रेक झाली... कोण करणार साजरे सण... "  

" पुन्हा ती टीम active होणार नाही का ... " , 
" नाही ... अशक्य वाटते... सगळयांना इगो असतो ते माहित आहे ना तुला.... या सर्वाना , इतरांपेक्षा जरा जास्तच आहे. इगो दुखावला, भांडणे झाली. सगळे वेगळे झाले... ", 
" होते कोण ... " ,
" ५ जणांची टीम.... त्यातला एक मी... बाकीचे चार... जबरदस्त आहेत... जंगलात जसा सिंह असतो, सगळ्यांवर वर्चस्व गाजवणारा... तसेच, हे ४ जण ऑफिस dominate करतात.. एकाला  तर भेटलास त्यादिवशी... " ,
" अवि सर .. ? " ,
" सर नाही... अव्या ... अविनाश, दुसरी दिक्षा, तिसरी अनुजा आणि शेवटी हेमंत... " ,
" झाली ना टीम... मग एकत्र आणूया त्यांना... " चंदन हसला या वाक्यावर... " खरंच बोललो मी, try तर करूया ना.... पण हसतो का तू... " ,
" सोप्प नाही ते... तू नवीन आहेस... एकाला तरी ओळखतॊस का.. एकदाच तो अवि भेटला तेव्हा काय हालत झाली होती ... माहित आहे ना.. " ,
" हो .. पण तू तरी ओळखतॊस ना .. तू करून दे ओळख.. तुला सगळ्यांची माहिती असेल ना.. "..... विनय 
" मग काय... ऑफिस मधल्या सगळ्यांचा biodata माझ्याकडे आहे... कुठे राहतात पासून कधी जन्म झाला , कोण कोणाची GF , BF आहे .. कोणाचे काय चालू आहे... ते सगळं सांगू शकतो मी.. " चंदनने स्वतःची कॉलर वर केली जरा. " तुझी सुद्धा बरीच माहिती आहे , बरं का " 

" माझी ? कसं काय " ,
" आपली माणसं आहेत ना ऑफिस मध्ये... माहिती काढणारी.... विश्वास नाही ना... तुझी माहिती सांगतो... पूर्ण नावं ... विनय देशपांडे... वय २७... जन्म ठिकाण : रत्नागिरी ..... मोठया सरांशी खास ओळख.... कारण गावाला शेजारीच घर.... सिंगल आहेस... घरी फक्त वडील... ते गावाला... शिक्षण : software engineer .... मुंबईत शिकलेला... पण इथे येण्याचे कारण जॉब नाही... वेगळं काही आहे... बरोबर ना... " विनय " आ " वासून पाहत होता. " सगळंच माहित आहे तुला... कमाल आहे हा... " विनयने चंदनाला टाळी दिली. 

============================================================

विनयने पुन्हा डोळे उघडले. सकाळ झालेली. त्याच्या बेडच्या बरोबर समोर एक मोठ्ठ घड्याळ होते. सकाळचे ८:३० वाजले होते. अरे ... कालपेक्षा जास्त झोपलो आज. विनय उठून बसला. आणि त्याच्या आवडीच्या सुगंधाने मन मोहून गेलं. बाजूलाच एका basket मध्ये ... रातराणीची फुले होती... व्वा !! विनयला प्रसन्न वाटलं. १-२ फुलं हातात घेतली त्याने. मनसोक्त सुगंध भरून घेतला मनात. आणि पुन्हा जागच्या जागी ठेवली ती फुलं. दिक्षा.... दिक्षाचं आणते रोज , इथे हि फुले... आणि न चुकता.. कुठे मिळतात हिला रोज...आणि काय तो सुगंध.... पूर्ण खोली भरून गेलेली त्याच सुगंधाने.... दिक्षा सारखी विचारते ना... का आवडते रातराणी... माझं एकच उत्तर... एकदा जवळ करून बघ या फुलांना.. सोडणार नाहीस कधी.. ... विनय हरवून गेला आठवणीत. 

===========================================================

" कोणते फुलं आवडते रे तुला... , मला तर लाल गुलाब आवडते... " .......दिक्षा... 
" गुलाबासारखी तर आहेस... " विनय हसत म्हणाला. 
" कधी तरी नॉर्मल बोलत जा... " ,
" नॉर्मल तर बोललो ना... एव्हडी काय रिऍक्ट करतेस लगेच.. " , दिक्षा त्यावर फुगून बसली. गप्पच झाली. आणि तिचा राग गेला नाही तर बोलणारचं नाही हे विनय ला चांगलं ठाऊक होते. विनयचं बोलला मग. 
" मला ना... रातराणी आवडते... खूप .. खूप पेक्षा जास्त.. प्रेमातच आहे तिच्या मी... " यावर दिक्षा विनय कडे बघू लागली.  
" मला गुलाब बोलतोस आणि रातराणी आवडते.... खरंच... तू ना विचित्र आहेस... " ,
" आवडते तर आवडते.... मला तर तीच सोबत असावी असे वाटते नेहमी.. ",
" काय असते रातराणीत ... जे गुलाबात नसते... " दिक्षाचा प्रश्न... 
" रात्रीचं फुलते... रात्रीचं आयुष्य तिचे... कोणाच्या अध्यात ना मध्यात.... कोणाच्या ध्यानीमनी नसतात , नकळत फुलते आणि तिच्या सुगंधाने सर्वांना जवळ ओढून घेते. मोहवून टाकते ती रातराणी.... रात्रीचं राज्य तिचं... गुलाबाला जरी फुलांचा राजा मानतात ... तरी... रात्रीची राणी तिचं .... रातराणी... " विनय कसला भारी बोलत होता. दिक्षा पहिल्यांदा त्याचे असे बोलणं ऐकत होती. नाहीतर असं काही बोलायला लागला तर तिला राग यायचा. 

" एवढी का आवडते तुला .. " दिक्षाच्या आवाज जड झाला होता भावनांनी. 
" आपलं आयुष्य तसंच असावे असं वाटते मला. या जगण्याच्या धावपळीत रातराणी सारखे फुलायचे आहे मला..... आयुष्य जरी लहान असेल तरी चालेल, तरी त्या आयुष्याच्या सुगंधाने ... काही काळ का होईना... सर्वांना जवळ आणायचे आहे... सर्व माणसं जवळ हवी आहेत मला अशीच.... कधीही सोडून न जाण्यासाठी... " विनय थांबला बोलायचा. त्याच्या हातावर पाण्याचे थेंब पडले होते. पाहिले तर दिक्षाच्या डोळ्यात पाणी. " काय गं... का रडतेस... " दिक्षाने डोळे पुसले पटकन. 
" काही नाही... चल घरी निघू.. " ,
" अरे !! ice cream राहिलं ना.. तुला पाहिजे होते ना... " ,
" नको ... राहूदे आता... नंतर खाऊ कधी.. "  

विनयला आठवलं अचानक ते संभाषण... किती वेडेपणा करायची दिक्षा.... अजूनही करतेच म्हणा.. पण कमी झाला आहे तो वेडेपणा.. का ते कळत नाही. पहिली भेट तर न विसरण्यासारखी. विनयला दिक्षा सोबतची पहिली भेट आठवली. 

" excuse me !! " विनयला मागून आवाज आला. मागे वळून पाहिलं त्याने. 
" चंदन कुठे आहे ? " एक मुलगी चंदनाला विचारत होती. 
" चंदन नाही आहे जागेवर... " विनय बोलला. 
" ते मलाही दिसते आहे... जागेवर नाही ते... कुठे गेला आहे... " तिने विचारलं. 
" माहित नाही...आला कि सांगतो त्याला.. तुम्ही आलेलात ते... नाव काय तुमचं ma'am ... " ,
" ma'am ??.... एवढी मोठी दिसते का तुला... anyway , चंदनला मेसेज करून ठेवते मी.. " एवढं बोलून निघाली... पुन्हा थांबली. " आणि तो शेजारी फोन ठेवला आहे ना.. तो वाजला कि उचलायचा असतो... show साठी नाही ठेवला.... " निघून गेली ती. विनयच्या लक्षात आलं. शेजारचा landline फोन कधी पासून वाजत होता. उचलला नव्हता त्याने. 

चंदन आला १० मिनिटांनी, " कुठे गेला होतास... एक मॅडम बडबडून गेल्या तुझ्यामुळे... " ,
" कोण आलेलं ? " ,
" नावं नाही सांगितलं... तुला मेसेज करून ठेवते असं बोलून पुढे बोलल्या , फोन वाजला कि receive करायचा... तुझा फोन मी कसा उचलणार... बरोबर ना... " विनयने सगळी हकीकत सांगितली. 
" अशी बोलली का ... बरं " चंदनने मेसेज बघितला. 
" व्वा !! चांगलीच व्यक्ती भेटली तुला.. " ,
" का ... काय झालं... ".... विनय ... 
" आधी सांग... तिला मॅडम वगैरे काही बोललास का.... " ,
" हो रे ... पण तुला कसं कळते सगळं... " ,
" तिला आवडतं नाही.... एकेरी बोलायचे तिच्याशी... तुला ओळख करून देणारच होतो या ४ जणांची... पण असं वाटते... तूच भेटशील त्यांना अधे-मध्ये... " ,
" म्हणजे " विनयला कळलं नाही. 
" दिक्षा.... दिक्षा होती ती... या ४ जणांमधले सर्वात सुंदर असे पात्र... " इतक्यात चंदनच्या शेजारील फोन वाजला. " हो... येतो आहे... आलोच... " चंदन निघून गेला. 

१५ मिनिटांनी आला. " दिक्षा ...... विचारत होती तुला... कोण नवीन जॉईन झाला आहे.... सांगितलं तुझ्याबद्दल... गाववाली आहे तुझी... " चंदन हसत म्हणाला. 
" मी त्यांना ma'am बोललो म्हणून राग आला का त्यांना... " विनयने विचारले. 
" नाही रे... राग का येईल.. तसा राग पट्कन येतो तिला... पण जातो सुद्धा पट्कन... आणि तिला एकेरी बोल... नाही आवडतं तिला मॅडम बोललेले... " ,
" तुला कसं माहित एवढं... " विनयला नवल वाटलं. 
" हो... २ वर्ष झाली ओळखतो तिला.. ऑफिस मध्ये जे ४ महत्वाचे character आहेत ना ... त्यातले सर्वात strong character....   strong character का तर... कोणतीही परिस्तिथी असेल तरी घाबरत नाही... खूप छान मुलगी आहे... सावळी असली तरी दिसायला छान... नजर काढून टाकावी अशी... कारण एक वेगळंच सौंदर्य आहेत तिच्यात... कदाचित तिलाही हे माहित नसावे... इतकी सुंदर वाटते ती कधी कधी... मनातून सुद्धा तितकीच सुंदर.. कोणाबद्दल काहीच नसते तिच्या मनात... मुलींना कसे दुसऱ्या मुलीबद्दल राग , द्वेष असतो... jealous वाटते.. हे तिच्या मनात नाहीच... शुद्ध , सुंदर मन... कुठे असते सांग अशी मुलगी... जे मनात तेच चेहऱ्यावर... नाकी डोळस नीट... म्हणतात ना तशी अगदी... सगळ्या सोबत हसून बोलून राहणारी.. आणि हा... तिची smile इतकी सुंदर आहे ना... कोणीही वेडे होईल ते हास्य बघून.... हसली कि वाटते कळ्यांची फुले होतील.... कधी कधी वाटते एक सुंदर स्वप्न पडलं असेल देवाला .. तेव्हा इतकी सुंदर smile त्याने घडवली... कमाल आहे ना... मध्यम शरीरयष्टी... त्यात तिचा dressing sense इतका सुंदर आहे ना... विचारू नकोस.. म्हणजे तिचे ड्रेस खरंच बघण्यासारखे असतात... त्यात ती रोज नवीन hair style करून येते... तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते. ग्रेट आहे ती... खरच... कामात सुद्धा चोख... कधीच टाईमपास करताना दिसणार नाही. अनोळखी सोबत कमी बोलते. पण एकदा ओळख झाली कि मग थांबत नाही बोलायची. हे आत्ताच , messaging ... chatting नाही आवडत तिला.. जे असेल ते समोर बोलावं असं तिचं म्हणणं. " चंदनने त्याचे बोलणे संपवले. 
" wow !! खूप छान आहे रे ती. " ,
" आहेच ती तशी.. वेगळीच आहे....  बघ ना, एवढ्या गोड मुलीच्या कोण प्रेमात पडणार नाही... पण तिचा विश्वास नाही प्रेमवर... तीही कोणाच्या प्रेमात नाही अजून. सगळयांना मित्र मानते. " ,
" पण मैत्रीच्या पुढेही एक विश्व आहे ना.. " ,
" ते तिला समजावणार अजूनही तिला भेटला नाही... पण तिला कोणी चांगलाच भेटणार हे नक्की..वेड्यासारखं प्रेम करणारा भेटणार बघ तिला.. यात शंकाच नाही... दिक्षाचं meaning माहित आहे का इंग्लिश मध्ये... Gift of God .... तशीच आहे ती... देवाची सुंदर अशी रचना... दिक्षा  !! " 
============================================================

विनय पुन्हा आठवणीत गेलेला. " रे भावा .... जेवायला आणले हाय.. हा घे डब्बा.. " अविनाश आवाज देतंच आला. 
" रे... तुझीच वाट बघत होतो. " ,
" आणि तू चल हा लवकर बरा होऊन... तिथे सगळे वाट बघत आहेत तुझी.. कोणाला करमत नाही तिथे... डॉक्टरला सांगतो, उद्या सोडायला तुला... जरा दम दिला कि होईल काम.. क्या !! " अविनाश विनय जवळ बसला. 
" तू पण ना ... खरच .." विनय बोलला तशी अविनाशने त्याला मिठी मारली. 
" खरंच यार ... चल लवकर.. नाही बर वाटतं त्या ऑफिसमध्ये... असाच बसून रहा.. काही नाही केलंस तरी चालेल.... पण तू ये ऑफिसला... " ....अवि.. 
" नाही रे... डॉक्टर सोडणार नाहीत.. " अवि नाराज झाला. तेवढ्यात त्याचे लक्ष रातराणीच्या फुलांवर गेले. 
" वहिनी आलेल्या वाटते... " विनयला त्याने कोपराने ढकललं. 
" गप्प रे... काही पण असते तुझं... " विनयला हसू आलं. तरी त्याचे लक्ष घड्याळात गेलं. 
" तू जा... तुला लेट होईल परत जायला ऑफिसमध्ये.. "
" ते सोड .. आपलंच ऑफिस आहे.. आधी सांग... झोप लागली का तुला बरोबर.. " विनयचा चेहरा शांत झाला त्यावर. " तेच स्वप्न का पुन्हा " अवि सावरून बसला जरा. 

" मला सांग... काय असते नक्की त्या स्वप्नात ... जरा detail मध्ये सांग... " ,
" समुद्रकिनारा .... असा दूरवर पसरलेला समुद्रकिनारा.... जरा पांढरी , जरा करड्या रंगाची मऊ मऊ वाळू.. वाळूवर जागोजागी शंख-शिंपले... थंडगार वारा.. आणि अथांग पसरलेला समुद्र.... एकटाच चालत असतो तिथे मी.. मी हि पांढरे शुभ्र कपडे परिधान केले आहेत. एक पांढरा सदरा आहे अंगावर... चालतो आहे असाच... किनाऱ्यावर नजर जाईल तिथवर कोणीच नाही... समुद्रात सुद्धा काही होड्या दिसतात दूरवर.. पुसट अश्या.. मग मी हि चालत राहतो , शंख-शिंपले वेचत.. ओंजळीत सुद्धा मावत नाही इतके.. तसाच ते ओजंळ भरून चालत जातो पुढे.. आणि अचानक एक सुगंध येतो... ओळखीचा.. रातराणीच्या फुलांचा.. विचित्र जरा, कारण सकाळी फुलतं नाही रातराणी... तरी सुवास येतो... त्या सुवासाचा माग काढत जातो तर पुढे एक मोठ्ठे झाडं दिसते रातराणीचे... तेही विचित्र.. रातराणी वडासारखी वाढत नाही... तरी तेवढ्याच उंचीचे झाड दिसते..आणि त्याखाली कोणी तरी बसलेलं दिसते... " ,
" कोण ? " अविने कुतूहलाने विचारलं. 
" नाही माहित. एका विशिष्ठ अंतरावर थांबतो मी. तिथे एक अद्रुश्य भिंत आहे... काच कशी असते , दिसत नाही ... तशी... त्यापुढे जाऊ शकत नाही.  पोहोचायचे आहे मला तिथे.... खुणावते ती रातराणी.. सारखी " विनयचं बोलून झालं. 
" का आवडते रे तुला रातराणी... " ,
" आईमुळे.. मी लहान होतो ना... गावाला राहायचो.. तेव्हाची गोष्ट.. शेजारी-पाजारी सर्वच मोठी मुले..माझ्याशी खेळायला कोणी नसायचे. मग आईनेच सांगितलं होते... झाडांशी मैत्री कर... आणि तिनेच , एक रातराणीचे रोपटे आणून दिले होते. जप बोलली तिला... खूप नाजूक असते ती... ती माझी पहिली मैत्रीण .. बरं का.. मग काय, खूप छान गट्टी जमली आमची... तिच्याशी गप्पा मारायचो... जेवायला देयाचो तिला. चपाती- भात देयाचो तिला... ते आठवलं कि हसायला येते आता. त्यात आई खूप लवकर गेली माझी देवाघरी... तीची आठवण एकच, तेच रातराणीचं रोपटं... तेव्हाही खूप रडलो होतो... त्या झाडाशी बसून.. " आताही विनयचे डोळे भरत आलेले. 

" घेऊन जाऊ का ती फुलं.... रडतो कशाला.. साल्या.. मला पण केलंस ना emotional.... " अविने डोळे पुसले. 
" नको रे... जीव आहे त्या फुलांत माझा.. म्हणून तर दिक्षा न चुकता घेऊन येते... " ,
" तू लावलं आहेस ना झाड... ऑफिसच्या बाहेर... त्याचीच फुल आहेत हि... " अविनाश निघाला. परत आला. 
" तू तयार राहा... उद्या आला नाहीस ना... उचलून घेऊन जाईन... " तडतडत निघून गेला... 
" काय माणूस आहे ना... पहिला कसा भेटला होता.. आणि आता... " विनय हसला स्वतःशी. 

===========================================================

" by the way... दिक्षा काय काम करते. " जेवता जेवता विनयने विचारलं. 
" हा रे .... तुला माहीतच नाही ना... कोण कोण काय करते ते... दिक्षा, आपले सर्व graphics चे काम असते ना... ते करते... तो ग्रुप आहे ना ... designer चा... तिथे असते ती. मोठ्या पोस्ट वर नाही तरी तिचे designing sence छान आहे म्हणून तिचेच विचार घेतात सर्व.. त्यानंतर अव्या... अव्या आपल्या sales department मध्ये आहे. " चंदन बोलत होता. 
" अविनाश आणि sales मध्ये... कसं possible आहे... " ,
" त्याच्या भाषेवर नको जाऊ.. तो मराठीत तसाच बोलतो सर्वांशी.. आणि त्याचे इंग्लिश ऐकलंस ना.. चाट पडशील... खरं सांगायचे झाले तर तो आहे म्हणून आपला sale वाढला आहे... " विनयला समजलं. 
" ४ मधले २ तर भेटले... बाकी दोघे कुठे आहेत... " विनय विचारतच होता, तर त्याला समोरून एक मुलगा येताना दिसला. तिथे जेवत असलेल्या सर्वांचे लक्ष त्याकडे गेलं. विनयच्या लक्षात आलं ते. तोही त्याकडे बघू लागला. उंच गोरापान , घारे डोळे... perfect dressing... त्याला साजेसे पायात शूज... आणि साजेशी उंची... एकदा मॉडेल यावा अशी त्याची entry झाली. विनय भारावून गेला.
" काय personality आहे यार ... " विनय चट्कन बोलला. 
" आहेच तसा तो... " चंदनही त्याकडे पाहत म्हणाला. 
" म्हणजे असं अचानक मनात आलं त्याकडे बघून ... आपण काहीच नाही रे त्यामानाने... बघ ना.... जेवण सोडून सगळेच त्याकडे बघत आहेत.. " विनयने उसासा टाकला. 
" तिसरे पात्र... हेमंत... राजबिंडा .... राजाच म्हणू शकतोस... मार्केटिंग मध्ये आहे.. ऑफिस मधल्या बऱ्याच मुली मरतात याच्यावर...  हे बघूनच कळलं असेल ना तुला... पहिले अव्या आणि हेमंत ... एकत्र काम करायचे. रोज एकत्र यायचे हि ऑफिसला... ती भांडणे झाली आणि यांचे बोलणे कमी झाले... मित्रच होते घट्ट ... हा हेमंत, त्याच्या लुक मुळे आणि बोलण्यामुळे... समोरच्याला मोहवून टाकतो.. अव्या आणि हा... दोघांनी किती नवीन प्रोजेक्ट मिळवून दिले... कसला भारी बोलतो हा.. तरी गर्विष्ठ खूप... कारण काय... त्याचे रूप... अशी personality कोणालाही भुरळ घालते. तरी जास्त बोलत नाही कोणाशी... अव्या सगळ्यांशी बोलतो.. हेमंत , त्याचे काम असेल तरच बोलतो... मुलींना आवडत असला तरी त्याचा attitude नाही आवडत. even , मुलींना देखील complex निर्माण करतो हा.. " चंदन विनयकडे पाहत बोलला. 

" मला झाला बाबा complex ... खरंच , solid आहेत सर्व... " विनयने चंदनच्या पाठीवर थाप मारली. 
" आणखी एक बाकी आहे... ", 
" कोण ? " ,
" दिसेल बघ तुला... वीज आहे... दिसेल तेव्हा डोळे दिपून जातील.." 

===========================================================


                    विनयला आज काम नव्हतं. infact , कालच त्याचे काम झालेलं. मग काय करणार, ऑफिसमध्ये असंच बसून सुद्धा कंटाळा आला. " मी जाऊन येतो खाली .. " विनयने चंदनला सांगितलं आणि तो खाली आला. त्याच्या bike वर येऊन बसला. बघितलं तर कोणीच नव्हते तिथे.... बरं झालं, निवांत गाणी ऐकूया. कानाला हेडफोन लावले आणि आवडीची गाणी सुरु केली मोबाईलवर. छान , मंद वारा वाहत होता. पावसाचे काही रेंगाळलेले ढग, उगाचच आभाळभर फिरत होते वाऱ्यासोबत. थंड हवामान...  एकंदरीत , खूपच छान वातावरण होते. त्यात मोबाईल वर त्याच्या आवडीच्या गजल सुरु होत्या. 

                   अश्यातच एक scooty आली. एक मुलगी त्यावर. विनयचं लक्ष गेलं तिच्यावर. तोंडावर स्कार्फ बांधलेला. चेहरा दिसतं नव्हता. पण डोळे... अहाहा !! काय डोळे होते ते.. एखाद्याने नजरेचे बाण चालवावे आणि ते आपण काही तक्रार न करता झेलावे , तसं झालं विनयचे. बघतच राहिला त्या डोळ्यात. तिने त्याच्या पासून काही अंतरावर scooty पार्क केली. नकळत तिची नजर विनयच्या नजरेला भिडली..... क्षणभरासाठीच... आणि विनयच्या मोबाईल वर गाणे लागले.... " होशवालों को खबर क्या.... ,बेखुदी क्या चीज़ है..... ,इश्क कीजिये फिर समझिये, ज़िन्दगी क्या चीज़ है.... " ... अगदी कमाल ना... अद्भुत होते ते काहीसं... filmy situation.. !!

                   तिने मग विनयकडे पाठ केली आणि तिची scooty सरळ उभी केली. हळूच चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. अजूनही पाठीमोरीच ... बरं का... , विनय कधीचा बघत होता तिला. फिक्कट निळ्या रंगाचा ड्रेस तिचा. महागातला असणार नक्की. पायात सॅंडल सुद्धा भारी. हवेचा झोत आला तिच्या दिशेने. तिच्या perfume चा सुगंध... विनयच्या नाकातून थेट मनात शिरला. व्वा !! शहारून सोडलं हिने तर...  सगळं slow motion मध्ये सुरु आहे असंच विनय ला भासत होते. 

                   हळूच ती मागे वळली..केसांच्या बटा चेहऱ्यावर आल्या त्या वाऱ्यामुळे. एक हलकासा झटका देतं तिने ते केस मागे नेले. दिसला पूर्ण चेहरा तिचा. डोळ्यांनी तर आधीच वेड लावलं होतं. त्यात भर पडली ती त्या आखीव -रेखीव चेहऱ्याची... गोरी.. उजळ चेहरा... विनय तर गपगार झाला ते सौंदर्य बघून .. त्यात कानात ते कातिल गाणे सुरु होते... ती हलके हलके पावलं टाकत विनयच्या बाजूने गेली. जाता जाता एक कटाक्ष टाकला तिने विनय वर... नजरानजर झालीच पुन्हा.. त्यावेळी सुरु असलेली गाण्याची ओळ विनयच्या कानात सामावून गेली.... " उनसे नज़रें क्या मिलीं.... , रौशन फिज़ाएँ हो गयीं... , आज जाना प्यार की... जादूगरी क्या चीज़ है... " ... विनयचा जीवच गेला तिथे. कोणी बघा किंवा बघू नका... मी माझं अस्तित्व दाखवणारच... , असा attitude तिचा... गेली पुढे ती, विनय तर ती पार नजरे आड होईपर्यत बघत होता. एका क्षणाला ती आत वळली. वाकून बघता बघता bike वरून तोल गेला विनयचा. पडता पडता सांभाळलं स्वतःला त्याने.  

विनय थोड्यावेळाने जागेवर येऊन बसला. आणि बसला तो बसलाच. कितीतरी वेळ तसाच बसून होता तो. 
" काय झालं रे.. " चंदनने विचारलं. 
" विचारू नकोस... काय बघितलं ते सांगता येणार नाही.... " चंदनला हे विचित्र वाटलं. 
" सकाळी सकाळी भूत बघितलंस कि काय... " ,
" नाही रे... एक मुलगी दिसली खाली... मला तिचे वर्णन करता येणार नाही... म्हणजे काहीतरी जबरदस्त होती ती... डोळे दिपून गेले. " चंदन समजून गेला. 
" हि होती का... " त्याने मोबाईल मध्ये असलेला एक फोटो दाखवला. 
" हीच... हीच होती ती... पण तुला कसं कळलं हे सुद्धा " विनय सावरून बसला. 
" बोललो होतो ना.. वीज आहे ती ... दिसेल तेव्हा डोळे दिपून जातील... तसेच झाले ना.. " ,चंदन हसत म्हणाला . 
" म्हणजे .... अनुजा... " चंदनने होकारार्थी मान हलवली. 
" yes my friend .... HR आहे ती आपल्या ऑफिसमध्ये... काही दिवस सुट्टीवर होती... आजच पुन्हा जॉईन करणार होती.. तेव्हाच तुला दिसली आज.. इतक्या उशिरा... नाहीतर ती ९ ला हजर असते. " ,
" HR ...HR  बोललास का.. " ,
" हो, HR  आहे ती... त्यामुळे जरा सांभाळून वाग तिच्याशी.. " ,
" तापट आहे का .. चेहऱ्यावरून तर वाटत नाही... " ,
" आधी माझे बोलणे तर पूर्ण होऊ दे रे... " ,
" सॉरी सॉरी... बोल तू.. " ,
" तापट नाही... पण तिला कसे सर्व perfect लागते. चुका केलेल्या आवडत नाहीत. शिस्तप्रिय आहे खूप. मोजकेच बोलते. परंतु त्या हेमंत सारखा attitude नाही हा.... बडबड अजिबात आवडत नाही. काम एके काम... तुला ती अशीच.. उगाच कुठे बोलत उभी दिसणार नाही... फिरताना दिसणार नाही... पण मला वाटते, तुझ्याशी पटेल तिचे... ", 
" कस काय .. " ,
" तीही कविता करते... तू सुद्धा.. " ,
" वा !! तुला हे हि माहित आहे तर ... मी कविता करतो ते... " ,
" मला सगळे कळते रे... कविता करतोस ... गाणी गातोस... गिटार वाजवायचे वेड आहे.. तिचे सुद्धा हेच छंद आहेत.. " ,
" तरी किती भारी दिसते ना ती.. तो हेमंत कसा handsome आहे... त्यापेक्षा सुद्धा किती सुंदर आहे हि.. " ,
" हेच आवडत नाही तीला... तिची स्तुती...ऑफिसमधल्या प्रत्येक मुलीचा एकच विषय ... अनुजा... फक्त दिक्षाच आहे, जी तिच्या समोर उभी राहू शकते. बाकी कोणालाच जमत नाही ते. घाबरत नाहीत तरी एक प्रकारचा दरारा आहे तिचा. नजर बघितली ना तिची.. काहीतरी feel झालं असेल नक्की... " ,
" अरे .... फील बोलतोस... थेट हृदयाला भिडली ती नजर.. अजूनही जाणवते आहे मला. भेदक नजर. त्यात ती दिसायला सुंदर. बघ.. आताही शहारा आला अंगावर. " .....विनय... 
" तिला वीज का बोललो ते समजलं असेल तुला.. बरेच जण, फक्त तिला बघायला येतात ऑफिसमध्ये.. . तुला माहित नाही.. तिचा time ठरलेला आहे... बरोबर सकाळी ९ वाजता येते ती... त्या पार्किंग पासून आपल्या ऑफिसच्या लिफ्ट पर्यंत मुलं उभी असतात... तिला बघायला फक्त. आणि हे सर्व तिलाही माहित आहे.. पण ती कोणाला भाव देतं नाही... हेही तितकंच खरं.... तर जरा सांभाळून .. बरं का... " चंदन पुन्हा कामाला लागला. विनयने त्याचे काम सुरु केलं तरी त्याच्या डोळ्यासमोरून अनुजा जातंच नव्हती. 

" म्हणजे एक कळलं " विनय थोड्यावेळाने बोलला. चंदन त्याकडे वळला... " सगळेच ग्रेट आहेत... " ,
" बोललो होतो आधीच.. हे चार जणं या ऑफिस वर राज्य करतात. आपले मोठे सर आहेत बॉस म्हणून.. तरी हे आहेत म्हणून ऑफिस आहे. आणि म्हणूनच हे ४ होते त्या टीम मध्ये... घट्ट मित्र चौघेही... आता फक्त कामापुरतेच बोलतात. " , 
" त्यात तुही होतास ना.. " ,
" होतो.. अजूनही आहे... पण हे चौघे खूप छान मित्र होते.. एकत्र जेवण.. एकत्रच निघायचे घरी. यात एकी होती म्हणून हे सर्व ऑफिस छान आनंदी होते... आता बघ कस शांत शांत असते.. ", 
" एकत्र आणू यांना.. ", 
" सोप्प नाही ते... पाहिलंस ना... किती जबरदस्त आहेत ते... ते एकत्र होते ती देवाची कृपा... पुन्हा एकत्र येतील का माहित नाही... प्रत्येकाला सांभाळणे ... खरच कठीण आहे.. " ,
" मी करतो प्रयन्त... " विनय मनापासून बोलला. 
" कर try .. पण बघ... सांभाळून जरा... " 

===============================================

विनयच्या डोळ्यासमोरुन गेला हा सर्व सिनेमा. काय दिवस होते ना ते.... मंतरलेले दिवस अगदी. किती प्रयन्त केले या सर्वांना एकत्र आणण्यासाठी. पण सुरुवात झाली ती ... त्या दिवशी. 

" चंदन .... तू सगळ्यांना मेल करू शकतोस ना एकाचवेळी... " ,
" सगळे म्हणजे कोण ? " ,
" पूर्ण ऑफिसला.. " ,
" का... आणि कसला मेल " ,
" अरे आज दुपारी ४ वाजता मी एक कार्यक्रम ठेवला आहे. मी गाणी गाणार आहे. " चंदन हसला त्यावर.... 
" कोणी permission दिली... " , 
" मोठ्या सरांनी... " ,
" हो हो... विसरली मी.. तुझी ओळख मोठ्या केबिन मधली आहे... तरी , माझ्या मित्रा... तुला आजच एक महिना झाला इथे... तुला कोण ओळखते... एक मी सोडलो तर इतर ४-५ जण.. कोण येणार ऐकायला .. " ,
" तरी कर ना मेल... " शेवटी चंदनने त्याचे काम थांबवले आणि विनय समोर बसला. 
" हे बघ विनय.. तुला गाणी गायची आहेत, गिटार वाजवायचे आहे ... मी येतो ऐकायला. पण हे मेल वगैरे नको... तसही इथे कोणाला interest नाही या सर्व प्रकारात आता...त्यात पुन्हा भांडणे वगैरे नको.. तुला permission मिळाली आहे... तू वाजव... मी इथे वेळेवर.. बाकीच्यांना मेल नकोच.. ठीक आहे ना ... " एवढं बोलून चंदन त्याच्या कामात गुंतला. 

              सगळे कामात होते. अचानक गिटारचा आवाज येऊ लागला. चंदनने घड्याळात पाहिलं. ४ वाजले होते. " याने सुरुवात केली वाटते .. " चंदन मनातल्या मनात बोलला. खरंच त्याने गाणे सुरु केले होते. चंदनने त्याचे हातातले काम पटापट संपवून १५ मिनिटांनी पोहोचला तिथे. त्या आधीच १०-१५ जण होते तिथे. अरे व्वा !! मला तर वाटलं होते कि मीच असेन ... इथेतर आधीच आले आहे audience... सुंदर आवाज लागला होता विनयचा शिवाय आवाजही खणखणीत.. गिटार वर सुद्धा छान सूर लागले होते. एकंदरीत पाहता पहिलं गाणे फारच छान झालं. टाळ्या वाजल्या. चंदनने आजूबाजूला पाहिलं ... किती गर्दी झाली होती. पण महत्वाचे... एका कोपऱ्यात दिक्षा आणि चहाच्या मशीन जवळ अविनाश... हे सुद्धा होते. आवाजच इतका छान होता... सगळेच आकर्षित झाले. दुसरे गाणे सुरु केले त्याने. ते गाणे मध्यावर असताना, अनुजाची entry झाली. बहुदा , ती सुद्धा गाणी ऐकायलाच आली असावी. कारण परत फिरून न जाता , एका ठिकाणी उभी राहिली ती सुद्धा... सुंदर झालं दुसरं गाणे हि... पुन्हा टाळ्या वाजल्या... चंदनने नजर फिरवली. जवळपास सर्व ऑफिस होते आता तिथे... कमाल केली याने. 


                 आणखी १५ मिनिटे विनयचा कार्यक्रम झाला.  खास करून मोठे सर सुद्धा काही वेळेसाठी आलेले. एकंदरीत छान झालं सगळं. एका वर्षानंतर असं काही झाले होते ऑफिस मध्ये, त्यामुळे तिथे जमलेले सारेच खुश झाले. थोडे काही बोलावं म्हणून विनयने गिटार बाजूला ठेवली आणि उभा राहिला. " Hi ... मला ओळखत नाहीत जास्त लोकं अजूनही... मी विनय... आजच मला १ महिना झाला या ऑफिसमध्ये. मला कोणालाही इंप्रेस करायचे नव्हते. फक्त इथल्या लोकांशी ओळख करायची होती. मी ऐकलं आहे कि इथे आता पाहिल्यासारखे कार्यक्रम होतं नाहीत, खरंही असेल ते.. तरी मी एक छोटा प्रयन्त करून पाहिला... I hope ... तुम्हाला आवडला असेल... " सगळ्यांनी " हो !! " म्हटले. " thanks !! " विनयला आनंद झाला. " आणखी काही बोलू का... मी एक महिना बघतो आहे.. कोणी कोणाला साधं " good morning " सुद्धा बोलत नाही. का ते माहित नाही... निदान त्याला पैसे खर्च करावे लागत नाहीत असे वाटते मला... हेच बोलायचे होते... आजचा दिवस आणि हा आठवडा सुद्धा गेला. येणाऱ्या सोमवार पासून .. मी सुरु करणार आहे हे असे बोलायला... तुमचा समोरून रिप्लाय आला नाही तरी काही नाही... मी बोलणार.. चालेल ना.. " सर्वांनी माना डोलावल्या. हे ऐकायला त्या ४ पैकी फक्त अव्या थांबला होता. हेमंत तर आलाच नाही. दिक्षा , अनुजा आधीच निघून गेलेल्या. 

चंदन हळूच अविनाशच्या शेजारी जाऊन उभा राहिला. " काय अव्या... काय बोलतोस.. इथे कसा... " ,
" असाच...काय नाय....  आपल्या ऑफिस मध्ये कोण आलं गिटार घेऊन.. ते बघायला आलो... बरा भेटला हाय timepass .... पण सांग त्याला.. जास्त दिवस चालणार नाय ते... " ,
" का ? " ,
" माहित आहे ना तुला चंद्या... आणि परत विचारतोस... कोणाला आवडत पण नाय आता हे.. " ,
" आवडत नाही... हि गर्दी आपल्या ऑफिसमधलीच आहे ना.. आणि आवडलं म्हणून तुही थांबलास ना... बघ... बदलेलं आता सर्व.. " अव्याने चहाचा कप घेतला... एकदा चंदनकडे , नंतर विनयकडे एक नजर टाकून निघून गेला. 

आणि खरंच, फरक तर जाणवतं होता. कारण त्या दिवसापासून विनयला सगळेच ओळखायला लागले होते. शिवाय " गुड मॉर्निंग " बोलणे सुरु झालेलं. सर्वच बोलत नसले तरी सुरु तर झाले होते. 
" Good morning दिक्षा... " चंदन दिक्षाच्या डेस्क जवळ आला. दिक्षाने कामातून डोकं वर काढलं. 
" हे काय नवीन.. " ,
" सहज... रिप्लाय तर दे Good morning चा... " ,
" हो हो ... Good morning .. पण मधेच का.. " ,
" मधेच कुठे दिक्षा... हे आपण आधीही करायचो... विसरलीस का... " ,
" हो... विसरले... आणि तुही विसरून जा... " ,
" दिक्षा... काही नवीन होते आहे... तर होऊ दे ना ... " चंदनच्या या वाक्यावर दिक्षा काही न बोलता कामात गुंतली. 

                दिवस पुढे जात होते तशी विनयची ओळख वाढत होती. दर शुक्रवारी त्याचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला. आतातर सगळे यायचे, हेमंत सोडला तर बाकी सगळयांची हजेरी असायची. तो "फरक " सगळ्यांनी आपलासा करून घेतला होता. पण आता विनयला काहीतरी वेगळं करायचे होते. चंदनला त्याने त्याचे मनोगत सांगितले. 
" अरे बाबा.... काय वेड-बीड लागलं आहे का... ", 
" वेडेपणा काय त्यात... तिला जाऊन फक्त बोलवायचे आहे... " .... 
" हे बघ... तू तिला फक्त बघितलं आहेस ... ३-४ वेळेला.. मी ओळखतो तिला.... सांगतो ते ऐक... नको भलता प्रयत्न करुस... ",
" ok .... एक काम करू... मला घेऊन चल तिच्या पाशी... मीच बोलतो ... " हा काही ऐकणार नाही... म्हणत चंदन तसाच त्याला घेऊन गेला अनुजाकडे. 

" Hi अनुजा... " चंदन, तसं अनुजाने मागे वळून पाहिलं. विनयशी नजरानजर झाली. तीच ती घायाळ करणारी नजर, विनय तर वेडाच होता त्या नजरेचा. पण यावेळेस त्याने सांभाळलं स्वतःला. 
" बोल चंदन... " अनुजा बोलली. 
" हा विनय... याला ओळखतेस ना.. " अनुजाने एकदा नजर फिरवली विनय वर. 
" हम्म " अनुजाने पुन्हा कामात डोकं घातले. " याला काही बोलायचे आहे तुझ्याशी... मी निघतो... " चंदन सटकला तिथून. 

" बसा मिस्टर विनय... " अनुजाने कामात लक्ष असतानाच त्याला बसायला सांगतले. " तुम्ही बोला.. मी ऐकते आहे. " ,
" या महिन्यात तुमचा birthday होता ना.... " विनयच्या या वाक्यावर तिने तिचे काम थांबवले क्षणभर. 
" So ... then ... ??" , 
" उद्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे... या महिन्यात ज्याचे वाढदिवस होते , त्या सर्वांचा एकत्र बर्थडे सेलेब्रेट करणार आहोत.. मोठ्या सरांची permision आहे... " ,
" तर ... " ,
" तर उद्या या बरोबर ४ वाजता केक कापण्यासाठी.... " अनुजा बघत राहिली त्याकडे... थेट आमंत्रण... 
" मिस्टर विनय ... तुम्ही गाता छान ... गिटार वाजवता... कामात छान आहात... याचा अर्थ असा नाही कि तुम्ही जी गोष्ट कराल ती छान च असेल.." ,
" छानच आहे ना... सगळयांना आवडलं, म्हणून तयार झाले ना.. तुम्ही राहिला होता म्हणून सांगायला आलो. " ,
" मग जे तयार आहेत ना... त्यांना घेऊन करा celebration.. मला काही interest नाही...  तुमचे बोलणे झाले असे समजते मी. जाऊ शकता तुम्ही....  "  आणि अनुजा पुन्हा कामाला लागली.  

" मला माहित आहे, मी नवीन आहे इथे.. तरी बोलतो... दिवसाचे २४ तास, त्यातले झोपेचे ८ तास सोडले तर उरलेल्या १६ तासातले.... जवळपास १० तास आपण इथे ऑफिस मधे असतो. घरी गेल्यावर सुद्धा घरातल्याशी इतके बोलणे होतं नाही , जेव्हडे आपण  इथल्या लोकांशी बोलतो. एक प्रकारचे कुटुंबच आहे ना हे सगळे.. आणि कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस आपणच साजरा करणार ना.. माहीत आहे तुम्ही कामात सतत बिझी असतात.. म्हणून ... जास्त नाही... फक्त १०-१५ मिनिटांसाठी वेळ काढा... थँक्स.. " म्हणत विनय निघून गेला. 

                   विनय निघून गेला तरी अनुजा तिच्या बोलण्याचा विचार करत होती. कारण पहिल्यांदा असं कोणी तरी थेट बोलत होते कोणी. बरेच जण बोलायचे तिच्याशी, काही कामानिमित्त ... आणि उरलेले तिची स्तुती करण्यासाठी फक्त....एक दिक्षा सोडली तर तिच्याशी पर्सनल बोलायला कोणीच नव्हते. आतातर दिक्षाशी बोलणे होतं नाही. आधी बोलायचो तरी. तिलाही आठवलं, घरी कोणाच्याही लक्षात नाही , या महिन्यात माझा वाढदिवस होता ते. संद्याकाळी घरी पोहोचली तेव्हा तिने पहिले आईला विचारलं. " मॉम .... या महिन्यात काही होते का... माझ्या लक्षात नाही. तुला आठवते का बघ. " आईला तर नाहीच , तिच्या वडिलांनाही विसर पडलेला. अनुजा रात्री न जेवताच झोपली. हे आपल्या जगात बिझी असतात, पप्पा त्यांच्या बिजनेस मध्ये आणि आई तिच्या मैत्रीणी मध्ये... माझ्यावर लक्ष तरी कुठे असते यांचे.... आज जेवली नाही ,ते सुद्धा माहित नाही यांना. ऑफिस मधल्या सगळ्या लोकांचे मेल आले वाढदिवसाच्या शुभेच्छाचे. पण खरच का ... इतके सगळे बिझी झालेत कि आपणच वेगळे राहत आहोत या पासून... रात्रभर विचार करत होती. 

                ठरल्याप्रमाणे, पुढल्या दिवशी सर्व ४ वाजता जमा झाले. विनयने नजर टाकली सर्वावर. त्या " ४ " पैकी कोणीच नव्हते. जरासा नाराज झाला स्वतःवर. पण पुढच्याच क्षणाला जरा कुजबुज सुरु झाली. कारण अनुजा आलेली ना. सगळयांना आश्चर्य वाटलं. त्याचीच कुजबुज होती ती. पण ती आली तशी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. विनय त्यावर काही बोलणार तर अनुजाचं बोलली... " मी फक्त cake cutting .... बघायला आली आहे.. जास्त कोणी फोर्स करू नका.. " ती आलेली हेच खूप होते. उरलेल्या लोकांनी केक कापला, मिळून खाल्ला. सारेच आनंदात. पहिले असे असायचे सोहळे इथे. त्यामुळे सगळ्यांना आवडले हे. अनुजा केक खाण्यास थांबली नाही. तरी विनयने ४ डिश मध्ये केक घेतला. " त्या " चौघांसाठी ४ डिश... पहिला तो अनुजाकडेच गेला. तिच्या पुढ्यातच केक ठेवला. 

" मला माहित आहे, तुम्ही असलं काही खात नसणार. तुमचा फिटनेस पाहिला कि कळते ते, तरी लहानसा तुकडा आणला आहे... तुम्ही आलात , खूप बरं वाटलं... प्लिज .. एवढंसं खा... प्रेमाने आणला आहे. " विनय केक ठेवून पट्कन निघून गेला. अनुजाला हसू आले. पण काही म्हणा... तिलाही बरं वाटलं. 


पुढचा स्टॉप , अव्या.. विनय जरा घाबरतच त्याच्या डेस्क वर गेला. स्वारी कामात बिझी. विनयने गुपचुप त्याच्या समोर डिश ठेवली आणि सटकला. अव्याने एकदा पाहिलं केक कडे... आणि विनयला हाक मारली.. 
" अय बुलेट... " ,विनय थांबला 
" बुलेट ?? " विनयने उलट विचारलं. 
" बुलेटचं आहे ना तुझ्याकडे... तुझं नावं लक्षात नाही... ये इकडं... " अव्या केक खात म्हणाला. विनयला जरा भीती वाटली. " बस " घाबरतच बसला. 
" मी येणार होतो.. मुद्दाम आलो नाय .. पुन्हा कोणी बघितलं तर भांडणं होतील म्हणून.. तुला का थांबवलं... बोलायचं होता तुझ्या बरोबर... " ,
" बोला ... " ,
" गेल्या महिन्याभरात तुला सगळं ऑफिस ओळखायला लागलं... हिरो झालास तू.. गाणी म्हणतोस ... गिटार वाजवतो... हे आवडते सगळ्यांना... पण त्यापेक्षा सगळे जमतात एकत्र ... ते आवडलं मला... महिन्याभरात वातावरण बदलून टाकलास मित्रा... मानलं पाहिजे तुला... सगळे एकत्र जमतात.. गप्पा मारतात.. हसतात , बोलतात , मस्करी करतात.. छान वाटते.. असंच होते पहिले ऑफिस... फक्त एक... हे जे सुरु केलं आहेस ना.. ते सांभाळून कर.. कारण तुला भूतकाळ माहित नाही.. असो, छान वाटलं... केक सुद्धा लय आवडला. तूच आणला असणार.. आणि हा अनुजाच्या आवडीचा आहे... हेही माहित आहे मला.. ", 
" हो.. आधी तुमच्याकडे होते ना हे.. कोणता केक आणायचा ते... चंदन ने सांगितलं मला.. " ,
" बरं... आता आला आहेस तर जरा माझ्या PC च काम आहे बघ... " ,
" ५ मिनिटांनी येतो.. " चंदन हेमंतच्या दिशेने गेला. 

" Hi हेमंत.. हे तुझ्यासाठी ... " विनयने हेमंत समोर डिश धरली. 
" हे बघ.. तुझं नाव काय आहे माहित नाही मला.. आणि त्यात इंटरेस्ट पण नाही. " ,
" अरे पण केक आणला आहे फक्त तुझ्यासाठी.. तू नव्हता ना तिथे... " विनय बोलला. 
" तो घेऊन जा... आणि सरळ सांगतो... मी नेहमी तोंडावर बोलतो... सरळ बोलतो... ते फिरवून फिरवून बोलणे जमत नाही. ऐक... हे जे तू सुरु केलं आहेस ना... सगळा बनाव आहे. कोणाला इंप्रेस करायचे आहे माहित नाही... मोठ्या सरचा चेला आहेस म्हणून सगळं खपवून घेतो आहे.. तरी... जोपर्यंत मी आहे इथे तोपर्यंत दुसरं कोणीच माझ्या समोर उभं राहू शकत नाही.. जास्त दिवस टिकणार नाही हे... हेमंत नाव आहे माझं.... लक्षात राहू दे...  " असं म्हणत हेमंत निघून गेला. काय झालं याला... मी तर फक्त केक देयाला आलो होतो. आणि मी कुठे कोणाला इंप्रेस करतो आहे. येडाच आहे हा... स्वतःशीच हसला विनय आणि दिक्षा कडे गेला. 

" Hi .... " विनयने दिक्षाला हाक मारली. तिने कानाला इअरफोन लावले होते. " Hi .. " विनयने पुन्हा हाक मारली. तरी तीच लक्ष नाही. मग विनयने केक तिच्या पुढ्यात ठेवला. 
" हे काय ? " तिने वळून पाहिलं विनयकडे. 
" याला इंग्लिश मध्ये cake असे म्हणतात ... तुझ्यासाठी आणला. ", 
" थँक्स .. पण नको आहे मला... नाही खात मी... नाही आवडत मला... " , 
" पहिलं तर आवडायचे ना... " विनयच्या या वाक्यावर दिक्षा काही बोलली नाही. " काही नसते असे.. मज्जा करायची. छान जगायचे... का कोणावर रुसून राहायचे.. कोणाशी अबोला धरायचा ... कशाला ते.. आणि तुम्ही आधी तर मित्र होता ना सगळे छान.. मग... " दिक्षा केक कडे पाहत होती. 
" खा ... तुझ्यासाठीच आणला आहे... तू आली नाहीस तिथे... आली असती तर बर वाटलं असते मला..नक्की खा... पुन्हा सांगतो.. असं नाही राहायचे गप्प गप्प... एकच life आहे ना... जगून घेयाचे प्रत्येक वेळेस .. " दिक्षाने केक घेतला हातात. " आणि हा आणखी एक.. " विनयने आणखी एक डिश ठेवली तिच्या समोर. 
" हा कशाला आता... " ,
" हा तुझ्या ड्रेस साठी.. मला blue color खूप आवडतो... आणि तुझे ड्रेस खूप छान असतात, त्याबद्दल खूप ऐकलं होते... म्हणून एक माझ्याकडून केक.. दुसरं कारण, तुझ्या आता येणाऱ्या smile साठी... .. आली बघ... " खरच , ते बोलणं ऐकून दिक्षाच्या चेहऱ्यावर smile आली. " मला तुझी smile खूप आवडते... " विनय हसतच निघून गेला. 

                 विनयला सगळं आठवतं होते. दोन महिने झाले ना आज. आपण हॉस्पिटल मधेच आहोत. सगळे येतात चौकशी करायला. हे चौघे येतात अधूनमधून .... अव्या रोज येतो डब्बा घेऊन दुपारचा. दिक्षा, मी सकाळी जागे होण्याआधी रातराणीची फुलं घेऊन येते. अनुजा फार कमी वेळेस येते. हेमंत तर येतोच , दर २ दिवसांनी... सुरुवातीला खूप विचित्र होता ना... पण नंतर चांगला बोलायला लागला. नेहमी कसा राग राग करायचा माझा. तशीच एक भेट आठवली त्याला.   

त्यादिवशी, विनय ऑफिसच्या आवारात असलेल्या बागेत काही करत होता. चंदन आणि अव्या होता तिथेच. हेमंत आला गेटमधून. विनयला बघितलं त्याने. मुद्दाम हसला त्याला बघून. 
" हेच होणार होते... सारखा पुढे पुढे करतो ना... कचरा उचलायला लावला शेवटी.. " चंदनने ऐकलं ते.. 
" हेमंत... नीट बघ... रोपटं लावतो आहे तो... कचरा नाही उचलत... " हेमंत ने पुन्हा बघितलं त्याकडे. 
" तरीही... मातीतच राहणार तू... माझी बरोबरी करू शकत नाही तू.... " गॉगल लावला डोळयांवर आणि निघून गेला. अव्याने सुद्धा ऐकलं ते.. 
" याला देऊ का खर्चापाणी... " अव्या बडबडला. 
" नको.. राहू दे... प्रत्येक वेळेला काय मारामारी.. आणि विनय... आवर आता तुझे.. झालं ना झाड लावून... " ,
" झाडं नाही रे... रातराणी... " विनय प्रेमाने म्हणाला. 
" हो हो... रातराणी... चल आता.. " अव्या बोलला. दोघे गेले पुढे. विनय बागेतून बाहेर आला. तर समोरून दिक्षा येतं होती. तसाच झट्कन वळला आणि दिक्षा कडे पाठ केली त्याने. तिलाही त्याचा तो अवतार बघून हसायला आले. 

" wow !! congratulation... !! " , दिक्षा मागून पुढे आली. विनयला कसंसं झालं.. 
" कश्याबद्दल.. " विनयला कळलं नाही. 
" promotion झाले म्हणून... " आणि दिक्षा स्वतःच हसली. 
" हाहाहा.... very funny ... मी जरा बागेत काम करत होतो. ", 
" कोणी सांगितलं का हे झाड वगैरे लावायला.. कि माळी तुला पैसे देतो याचे पण... " पुन्हा हसली... 
" by the way .... त्याला झाडं नाही... रोपटे असे म्हणतात... शुद्ध मराठीत... समजलं का मॅडम.. " ,
" हो हो... समजलं " दिक्षाने मान हलवली. हे दोघे बोलत बोलत लिफ्ट जवळ आले. 
" जरा ते बटन दाबा ना मॅडम.. माझे हात खराब आहेत म्हणून... नाहीतर मीच मदत केली असती तुम्हाला.. " उगाचच टोमणा मारला विनयने. 
" हो सर... करते हा तुम्हाला मदत... " लिफ्ट आली तसे दोघे आत शिरले. विनयला तिने निरखून पाहिलं. 
" काय ते ध्यान... असाच बसणार आहेस का ऑफिस मध्ये... ", 
" किती काळजी करतेस ना माझी तू .... थँक्स... " विनय मस्करी करत बोलला. 
" excuse me... काळजी वगैरे काय... कपडे खराब आहेत... ऑफिस मध्ये सगळे मातीचे पाय उमटणार.. म्हणून बोलते आहे. ... बाकी काही नाही.. " ,
" हो हो... तुझा ड्रेस पण खराब होईल ना मग.. पण एक सांगू का.. means तुला इंप्रेस करायला बोलत नाही... चंदन बोलला होता.. तुझे dressing sense छान आहे खूप... दिसते रोज ते... तुला बघितलं ना ऑफिसमध्ये तर बघावंसं वाटते सारखं.. तरी असं वाटते कि तुझ्यामुळे त्या ड्रेसना चारचाँद लागत असतील... बरोबर ना... " दिक्षा लाजली जरा.. पण तिने लगेच आवरलं ते लाजणे... लिफ्ट सुद्धा थांबली होती. 
" मस्का लावून झाला असेल तर.. जा कपडे change करून ये... माती लागली आहे सगळी कडे... " असं बोलून दिक्षा लगेचच निघून गेली. actually , तिला हसू येतं होते विनयच्या बोलण्याचे... ते हसू थांबवत पळतच जागेवर आली. विनयलाही समजलं होते ते. कपडे साफ करण्यासाठी जावे लागणारच होते, नाहीतर मागून गेलो असतो. विनय मनातल्या मनात हसला. 

काय छान दिवस होते ना ते. दूर गेलेले एकत्र येतं होते हळू हळू. हेमंत तेव्हा नाटकं करायचा उगाचच. अव्या तर मित्रच झालेला. अनुजा सोबत तेव्हाही भीती वाटायची.. आताही वाटते म्हणा. त्याचे विचार सुरु होते. आणि अनुजा आलीच त्याला बघायला. विनय जिथे ऍडमिट होता.. त्या रूमला लागूनच एक बाल्कनी होती. तिथेच उभा होता विनय. 
" काय रे... आराम करायला सांगितलं ना.. मग इथे काय करतोस... " आल्या आल्या विचारलं तिने. 
" आठवणी... आपले जुने दिवस आठवतं होतो... " ,
" पुन्हा तेच तेच... " ,
" काय करू... आठवणी आहेत त्या... येणारच पुन्हा पुन्हा परतुनी... बरं ते जाऊदे .. तू कविता करणार होतीस ना... केलीस कि नाही... " ,
" हो...  केली आहे...तुला आवडेल का माहित नाही... तू बोलला म्हणून केली. " ,
" बरं आहे ना मग... मी बोललो म्हणून लिहिते तरी..किती मुडी असतात ना कवी... " तशी अनुजाने त्याच्या पाठीवर चापट मारली. 
" किती आगाऊ आहेस तू... " ,
" ऐकव आता .. कि मुहूर्त काढणार आहेस... " विनय हसत बोलला. 
" थांब ... " अनुजाने एक दीर्घ श्वास घेतला. 

" Comeback like rains.
Be the soft drizzle ,
or  be the storm if you may.
And I promise to hold my hands out of the window,
And listen to the thunder without flinching my eyes.
But you have to comeback like rains,
All of sudden-
Taking over my entire sky,
Not leaving a space behind,
So you must comeback like rains." 

झाली कविता... छान संध्याकाळ होती. मावळतीचा सूर्य होता सोबतीला. विनयला गलबलून आलं. अनुजाला समजलं ते. " बघ ... म्हणून करत नव्हते कविता. तुला वाईट वाटलं ना..... सॉरी, खरच सॉरी... " आता अनुजाच्या डोळ्यात पाणी आलेलं. तशीच " Bye " म्हणत धावतच बाहेर आली. विनय समोर रडायचं नाही कोणी, असं ठरवलं होते सर्वानी. एका झाडाआड गेली. मनसोक्त रडली. नाहीच थांबवू शकली स्वतःला. तिची scooty सुरू केली आणि परतीची वाट धरली तिने.  तरी पाणी होतेच डोळ्यात... बाजूलाच एक बाग दिसली तिला. जाऊन बसली तिथेच. " का केलंस विनय तू असं... का नाही सांगितलं आधी ... का आलास माझ्या life मध्ये.. " एकटीच रडत बसली. थंडीचे दिवस. कातरवेळ.. संधीछाया.....  आठवलं तिला काही.... 

===========================================================

अनुजा एका महत्वाच्या कॉल वर होती. त्यामुळे वर ऑफिसमध्ये न बोलता, खाली पार्किंगमध्ये फोनवर बोलत होती. पुढच्या १५-२० मिनिटांनी तिचे बोलणे संपले. निघायला वळली तर समोर विनय. त्याच्याच बुलेट वर बसलेला आणि कानात इअरफोन... गाणी ऐकत बसलेला. अनुजा तशीच त्याच्या जवळ आली. ती जवळ आली तस त्याने कानातले इअरफोन काढले. 
" मिस्टर विनय... आपले ऑफिस वर आहे. हा तळमजला आहे... शिवाय पार्किंग...मध्ये आहात.. " ,
" मग ... " ,
" मग तुम्हाला काम नसते का... ऑफिस मध्ये... पहिल्यांदा भेटलात तेव्हा हि इथेच.. अगदी याच जागी पाहिलं होते तुम्हाला... आताही इथेच.. " ,
" हा ... ते.. " विनयला काय उत्तर द्यावे सुचेना... घाबरला नव्हता.. तरी समोर अनुजा होती ना... बाकी मुलींसोबत बोलताना काही वाटायचे नाही. पण हिचे डोळे इतके बोलके होते ना... नशिले होते, धारदार होते.. कि विनय विसरून गेला उत्तर... शब्दच फुटेना तोंडांतून.. अनुजाला समजलं ते. ऑफिसमध्ये बरेच तिच्या मागे होते, त्यात आणखी एक " Add " झाला, असा विचार करत निघाली.  

" excuse me ... अनुजा miss.. " विनयने हाक मारली. " तुम्ही कविता करता ना..." अरेच्या !! याला कसे कळले .. अनुजा विनय जवळ आली. 
" तुम्हाला कसं कळलं ते... " ,
" मला माहित आहे... शिवाय तुम्ही गाता आणि गिटार सुद्धा वाजवता ना... बरोबर ना... " याला कसे माहित हे सर्व... अनुजाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह.. " का बंद केलंत ... तुम्ही तर ऑफिसमध्ये सुद्धा गायचा ना... मग आता का बंद केलंत सारे... " यावर मात्र अनुजाकडे उत्तर नव्हते आणि तिला तो विषयही नको होता. तशीच वळली आणि चालू लागली. विनय काही बोलू लागला मोठयाने.  

" कोण आहेस तू...
सकाळी डोळे उघडल्या वर पहिल्यांदा होणारा किरणांचा स्पर्श,
की हवेत दरवळणारा मोगर्‍याचा सुवास.
कोण आहेस तू...
कोणी तरी मला हळूच बघतय़ ह्याचा होणारा आभास,
की वा-या सोबत मानेवरुन घसरण्यार्‍या केसांमध्ये तुझा होणारा खट्याळ भास.
कोण आहेस तू...
सकाळी किलबिलणार्‍या पक्ष्यांच्या सुरेल गीतां मध्ये
तुझ्या निखळ हास्याचा होणारा भास,
की मी तुझ्या सोबतच आहे असा प्रत्येक क्षणी
येणारा तुझा दिलासा.
कोण आहेस तू...
मन म्हणतं की मी ओळखलयं तुला,
पण दुसर्‍याच क्षणी मनात येणारा प्रश्न,
खरचं, खरचं ओळखलय का मी तुला..
अजून ही माझ मन एकच विचारतो प्रश्न,
काय सांगू ह्या मनाला कोण आहेस तू...
कोण आहेस तू... "
ते ऐकून अचानक थांबली ती. आपलीच कविता हि... तशीच वळून ती विनय जवळ आली.
" तुला ... i mean तुम्हाला कशी माहित हि कविता... " विनयला माहित होते अनुजा नक्की येणार फिरून.
" तुमच्या लॅपटॉपमध्ये सापडली. सॉरी हा... but त्यादिवशी तुम्ही चंदनकडे दिला होता ना लॅपटॉप ... रिपेअर साठी. तर त्याला काहीतरी वेगळे काम होते म्हणून माझ्याकडे दिला. रिपेअर करून झाल्यावर तुम्हाला परत देणार होतो तर तुम्ही निघून गेला होता. मग विचार केला.. आतमध्ये डोकावून बघूया... तर खूप आतमध्ये ... हि कविता सापडली. खूप छान आहे.... मीच किती वेळा वाचली माहित नाही... पाठ सुद्धा झाली बघा. खरच खूप छान आहे. थांबवू नका लिहिणे.. " आता याला काय रिप्लाय करू ... खरच ती कविता अनुजाला खूप जवळची होती. 
" तुम्हाला माहित आहे का ... मला का आवडली कविता... कारण ती तुम्हाला आवडली.. बघा... आपल्या आवडी किती जुळतात... मीही कविता करतो... तुम्हीही करता... गाणी , गिटार तर आहेच... गजल ऐकायला आवडतात... " , 
" जगजीत सिंग ... ना " अनुजा पट्कन बोलली. 
" हो.. तेच तर...आपल्या आवडी खूप same आहेत ना... खरंतर , आपल्याला आधीच मित्र असायला पाहिजे होते... " विनय पट्कन बोलून गेला. अनुजा हसली त्यावर. " सॉरी हा... पट्कन बोललो.. " ,
" its ok .. no problem ... पण मी नाही बनवतं नवीन मित्र आता ... आणि गाणी, गिटार ... सगळे सोडून दिल आहे सध्या... हि कविता कोणालाही ऐकवू नका... please ... " , 
" इतकी छान तर आहे कविता.. तुमच्या आवडी का बंद करता.. वाहू दे त्यांना वाऱ्यासारख्या... बाकीचे जाऊ दे... मित्र तर होऊ शकतो ना आपण.. जर तुम्हाला वाटतं असेल तर.. ".... विनय... 
" मिस्टर विनय ... खूप फास्ट आहात तुम्ही ... आणि मैत्रीचं ... बघूया.. आता ऑफिसमध्ये जाते... तुम्ही सुद्धा या आता ऑफिस मध्ये... काम असते ना.. कि देऊ माझ्याकडेच... " अनुजा हसतच गेली. 

             विनयला सुद्धा मोकळं मोकळं वाटलं बोलून. मग निघाला तोही. लिफ्ट जवळ आला. लिफ्ट वरून खाली आली. दरवाजा उघडला तर दिक्षा लिफ्ट मध्ये. ती काही बोलणार ते विनयचं बोलला. " का सारखं माझ्या मागे मागे... बघावं तिथे मागून येतेस... काय सुरु आहे तुझं... " विनय भरभर बोलून गेला. आणि लिफ्ट मध्ये शिरला.  अरे !! याला काय वेडबिड लागलं आहे का ... दिक्षा बघतच राहिली त्याकडे. पण लिफ्ट चा दरवाजा बंद होताना विनय हसताना दिसला तिला. तिलाही हसू आलं. खरच पागल आहे हा ... 

============================================================

दिक्षाच लक्ष नव्हतं आज कामात. राहून राहून तिला विनयची आठवण येतं होती. काम तसंच बाजूला ठेवलं आणि ऑफिस मधून खाली आली.. कुठे जाऊ आता... मनात म्हणत असताना तीच लक्ष बागेत गेलं... विनयची रातराणी होती तिथे ना.. बहरून आलेली.... कितीतरी कळ्या... रात्रीची वाट बघत होत्या... उमलायचे होते ना त्यांना...  दिक्षा आली तिच्याजवळ. रातराणी वरून मायेने हात फिरवला. विनय असंच करायचा ना ... गोंजारायचा तिला. तिथेच बसली दिक्षा. विनयची आठवण काढत... का आले ते रिपोर्ट... पण .... विनयचं का आला माझ्या life मध्ये... ये ना विनय ... वाट बघते आहे तुझी.. रातराणी तिला आता अस्पष्ठ दिसू लागली .... डोळ्यात पाणी जमा झालेलं ना... 



to be continued.........................................................

Followers