All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Wednesday 28 February 2018

" अनूजा ... !! (भाग पहिला ) "



           आळसावलेली सकाळ... त्यात गुलाबी थंडी... मऊ मऊ गादी, जाड मोठ्ठी चादर.. कशाला कोण जागे होईल मग. परंतु घडयाळाच्या काटा सांगत होता. " वेळ झाली जागे होण्याची " .. थोड्याश्या नाखुशीने अनुजा त्या " स्वर्गीय आनंदातून " बाहेर आली. खिडकी जवळ आली तर समोर पांढरी शुभ्र बर्फाची चादर .. खिडकी उघडली असता, थंड वारा शिरला आत... जणू काही आत शिरायची वाटच बघत होता तो खोडकर वारा... अनुजाचे अंग थंडीने शहारलं. रोमांचित झाली अगदी. बघता बघता "बर्फवृष्टी" सुद्धा सुरु झाली. किती छान !! वातावरण आणखीच थंड झालं. अनुजाने बर्फ झेलायला खिडकी बाहेर हात काढला... त्याच वेळेस मागून तिला कोणीतरी मोठयाने हाक मारली.. " अनू !! " 

            त्या मोठ्या हाकेने अनुजा खाड्कन जागी झाली. क्षणभरासाठी काहीच कळलं नाही तिला. आजूबाजूला बघू लागली. पडकी-तुटकी लाकडाची झोपडी.. बाहेर तुफान वारा, पावसाचा आवाज. तुटक्या छप्परातून खूप ठिकाणातून "पाऊस" डोकावत होता. त्या तुटक्या पलंगावरून अनुजा दरवाजाकडे आली. क्षणभरासाठी पूर्ण झोपडी हलते -डुलते आहे असा भास झाला तिला. दरवाजा उघडताच समोर विशाल , अथांग समुद्र.. खवळलेला समुद्र... मुसळधार पाऊस.. पावसाचे मोठे मोठे थेंब, टाचण्यासारखे टोचत होते शरीराला. झोपडीत नसून आपण एका नावेवर आहोत , हे अनुजाच्या ध्यानात आलं. समोर वादळ.. नावं (बोट ) किती वेळ त्यात तग धरून राहिलं ते ठाऊक नाही. लाटांवर लाटा आदळत होत्या. नावं तर नुसते हेलकावे खात होती. आता काही खरं नाही आपलं, अनुजाला कळून चुकलं.. देवाची प्रार्थना करण्याशिवाय पर्याय नाही आता. म्हणून ती गुढग्यावर बसली. आणि देवाचा धावा करू लागली. समोरून एक राक्षसरुपी मोठ्ठी लाट येताना दिसली तिला. तशीच उभी राहिली. काहीतरी करावेच लागेल, असा विचार मनात येईपर्यंत लाटेने तिला त्या नावेसकट गिळून टाकलं... कशीतरी अनुजा पाण्यातून स्वतःच डोकं बाहेर ठेवण्याचा प्रयन्त करत होती. एक लाडकी फळी हाताला लागली. त्याचा आधार घेत ती पोहत होती. समुद्र काहीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याला आज अनुजाला पोटात घेयाचेच होते. इतक्यात "अनू !! " एक जोरदार हाक तिला ऐकू आली तिला.. लगेच तिने मागे वळून बघितलं. 

                पुन्हा एकदा अनुजाला जाग आली. एका तंबूत झोपली होती ती.समुद्र कुठे गेला.. काय चाललंय नक्की.. म्हणत ती तंबूतून बाहेर आली. एका डोंगरमाथ्यावर उभी होती अनुजा. समोर उगवता सूर्य.. किती छान द्रुश ते !! एवढ्या उंचावर उभी होती कि, पायाखालून ढगांच्या रांगा लागल्या होत्या. जणूकाही शाळाच भरते आहे त्यांची.. अनुजाला गंमत वाटली. पक्षांची सुद्धा पहाट झालेली. थवेच्या थवे निघाले होते. डोंगर -दऱ्या, झाडे-झुडुपे... सर्व काही जागं होतं होते. हे सर्व अनुजा इतक्या उंचावरून पाहत होती. ढगांना हात लावायचा मोह तिला आवरता आला नाही. खाली वाकून ती एका ढगाला स्पर्श करणार तर पुन्हा " अनू !! " अशी हाक ऐकू आली. 

                 जागी झाली अनूजा. यावेळेस चादरीत होती. डोळे किलकिले करून बघू लागली. कुठे आहोत आपण. एक मोठी खोली. त्यात अस्ताव्यस्त पडलेलं सामान. "अगं अनू !! उठं गं बाई ... उठं.. अजून किती झोपणार आहेस ... उठं लवकर नाहीतर पाणी मिळणार नाही आंघोळीला... " अनूजा झोपूनच आवाजाच्या दिशेने पाहू लागली. एक तिच्याच वयाची मुलगी... सामान आवरत होती. अनूजा बेडवर उठून बसली. " झालं .. हि आणि हिची स्वप्न.. " ती मुलगी अनूजा जवळ आली. " अनूजा मॅडम... आपण आता हॉस्टेलवर आहात. तुम्ही बेडवर आहात. हि खरी परिस्तिथी आहे. " अनूजा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. " last year.. शेवटचा पेपर... result... !! " असं ती मुलगी अनूजा समोर ओरडत होती. "Result... !! " हे ऐकून अचानक अनूजा भानावर आली. स्वप्न बघत होतो परत. तीच ती विचित्र स्वप्न. आता खऱ्या अर्थाने अनूजा वर्तमान काळात जागी झाली. 

              " थँक्स सई !! जागं केलंस .. खूप खूप थँक्स... " अनूजाने सईला मिठी मारली. " ते जाऊ दे... पहिली अंघोळीला जा.. " अनूजा गेली अंघोळीला. अनूजा....शांत स्वभाव, फारच कमी बोलणारी.. पण एकदा ओळख झाली कि कितीही वेळ न दमता, न थांबता बोलणारी...अशी मुलगी. आवाज लहानपणापासून गोड अगदी.. गाणी गाण्याची आवड, मुळात स्वभावच गोड तिचा, त्यामुळे ते तिच्या आवाजातूनही दिसून यायचे. नृत्यातही निपुण. कितीतरी पुरस्कार मिळालेले तिला. मनापासून नृत्य केले तर त्याचे फळ मिळणार ना... वाचनाची आवड सुद्धा प्रचंड. अभ्यासू होतीच, पण बाकीचे , अवांतर वाचन त्याहून जास्त. पुस्तकी किडा म्हणा हवे असेल तर. भटकायला तर सांगूच नये कोणी तिला. मनात आलं तर कॉलेजला दांडी मारून ,स्वारी निघाली फिरायला. सोबतीला रूम-पार्टनर सई आणि सईचा बॉयफ्रेंड सागर.. जबरदस्ती दोघांना फिरायला घेऊन जायची. हे दोघे तिच्या खूप जवळ होते. सागर तर तिला शाळेपासून ओळखायचा. सईची ओळख नंतर कॉलेजमध्ये झाली , ती सुद्धा " सागरची गर्लफ्रेंड" म्हणून... पुढे शिक्षणासाठी तिघेही पुण्यात आले आणि सई अनूजाची रूम-पार्टनर झाली. सागरनेही तिथेच जवळपास एक रूम भाड्याने घेतली होती. १२ वी नंतर तिघेही त्यांच्या कुटुंबापासून दूर, पुण्यात आले होते. 

               अनूजाचा स्वभावच छान होता. त्यामुळे एक वेगळीच ओढ असायची तिच्याबद्दल लोकांना. म्हणूनच लहानपणीचे मित्र-मैत्रीण आताही तिच्या "contact" मध्ये होते. ज्या लोकांना भेटायची, त्यासोबत एक आपलेपणा होऊन जायचा तिला. अनूजाचा देवावर खूप विश्वास.. देव असतो सदैव आपल्यासोबत, असं तिचं म्हणणं. सई आणि सागरला तिच्यामुळे सवय लागलेली देवळात , चर्चमध्ये जायची. अशी हसरी अनूजा. "अनू " हे तिचे लाडाचे नाव.. आडनाव तर कधीच कळू दिलं तिने. कॉलेजच्या रजिस्टर वर सुद्धा " स्वतःच नावं, वडिलांचे नावं " इतकंच... विचारलं कि बोलायची, आडनाव लावलं कि लोकं लगेच धर्म ठरवतात. मग त्यावरून लोकांच्या नजारा बदलतात. वगैरे... वगैरे. देवळात जायची , तशी चर्च मध्ये जायची. तिथून तर तिला खास बोलवायचे... गाणी गाण्यासाठी... चर्चमध्ये "Prayer" साठी... एवढ्या छान आवाजात कोणाला आवडणार नाही ऐकायला प्रार्थना... अनूजा आवडीने करायची सर्व.   

               ३ वर्ष झाली या तिघांना पुण्यात येऊन. पण पुण्यात येऊन एक विचित्र सवय लागली होती अनूला, वाचनाची... ती सवय तर आधीपासून होती तिला, परंतू पुण्यात ग्रंथालये खूप सापडली तिला. त्यातून काहीतरी भयंकर , गूढ, शापित , भयकथा , कादंबरी वाचनाचे वेड लागले. सतत काहीतरी असंच वाचत बसलेली असायची. अभ्यास झाला कि तेच काम.. सईसुद्धा ओरडायची तिला, अनूजा कसली ऐकतेय तिचं. या सर्वांचा परिणाम , रात्री झोपेत तिला कसलीही , विचित्र स्वप्न पडायची. वेगळ्या जगात निघून जायची. अर्थात या सर्वांचा परिणाम तिने अभ्यासावर होऊ दिला नाही कधी. वर्गात पहिल्या ३ मध्ये तिचा नंबर असायचा. तरीसुद्धा हि सवय वाईट होती ना.. सईचे गेल्या २ वर्षांपासून सकाळचे हेच काम. अनूला जागं करायचे. मग तिच्या समोर सध्याची परिस्थिती मोठयाने बोलायची. कारण कधी कधी अनू जागी झाली तरी आता आपण कुठे आहोत हेच समजायचे नाही तिला. पूर्ण भानावर येईपर्यंत सई तिच्यासमोर ओरडत बसायची. मग एक एक "Link" लागली कि अनू वर्तमानात यायची. 

                आजही सकाळचा "कार्यक्रम" आटोपून दोघी तयार झाल्या. त्यांना आता बाहेर फिरायला जायचे होते...भटकायला नाही , तर एखादी रूम बघायला. शेवटच्या वर्षाचा निकाल लागला होता. नेहमी प्रमाणे अनूला छान टक्के मिळाले होते. कॉलेजमध्ये येणाऱ्या काही कंपनी मधून तिला जॉबची ऑफर सुद्धा मिळाल्या होत्या. प्रॉब्लेम होता तो राहत्या जागेचा. तीन वर्ष कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होत्या. कॉलेज संपलं. जागा खाली करावी लागले. त्यासाठी हे तिघे फिरत होते. सागर, सई पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी , कुटूंबासोबत राहणार होते व तिथेच जॉब वगैरे करणार होते. अनूजा मात्र इथेच राहून काहीतरी , स्वतंत्र करणार होती. तसं तिने घरी सांगून परवानगी मिळवली होती. 

अशातच दोन महिने गेले. कॉलेजने आणखी दहा दिवस मुदत वाढवून दिली अनूजाला .
" काय करायचं अनू ?" सईचा प्रश्न. " तू तुझ्या घरीच जा ना.. तिथेही मिळेल तुला चांगला जॉब. तसही इथे जागा मिळणार नाही.असं वाटते आहे. मग इथे थांबून काय फायदा. " सईने छान मुद्दा मांडला. 
" सई, मला जरा फील करू दे हे सगळं... एकट्याने राहायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. हे सगळं काय असते ते समजून घेऊ दे मला. ",
" पण... गेली ३ वर्ष तर स्वतंत्रच आहेस ना... " सागर सुद्धा होता तिथे. बोलून घेतला पट्कन त्याने. 
" हो, तरीसुद्धा ... मला actually पुणे आवडू लागलं आहे... so, मी इथेच जॉब करिन. घर काय मिळेल कुठेतरी राहायला. " अनूजा confidence ने बोलली. सागर, सई काही बोलू शकले नाही पुढे. त्यांना पुढच्या दिवशीच निघायचे होते. जास्त वाद न घालता , अनूजा साठी बाकी काही सामान वगैरे घेऊन दोघे आपापल्या घरी निघाले. 

               पुढचा दिवस, अनूला जाग लवकर आली. स्वप्न येऊन सुद्धा ,आपण स्वतः जागे झालो.. लवकर उठलो. याचाच जास्त आनंद झाला तिला. सकाळची कामे आटोपून , एकटीच "रूम" बघायला निघाली. दोन -तीन ठिकाणी जाऊन सुद्धा काही हाती आलं नाही. निराश होऊन हॉस्टेलवर आली. आणखी पुढच्या दोन दिवसात , अनूजाला ऑफिस जॉईन करायला सांगितलं होते. काय करणार मग. पहिलाच जॉब.. झाली रुजू. पहिल्याच दिवशी छान ओळख झाली खूप जणांशी. दुसरा दिवसही छान गेला. काम सुरु झालं अनुचे. अनूला फक्त चिंता होती ती जागेची. इतक्या दिवस फिरूनही, मनासारखी जागा कूठे मिळतच नव्हती. 

                तिसरा दिवस, अनू वेळेवर पोहोचली ऑफिसमध्ये. नवीन मैत्रिणी बरोबर चहा , कॉफी झाल्यावर आपल्या कामाला सुरुवात केली. जेवणाच्या वेळेला अनू भेटली सर्वाना. परंतु जरा तणावात होती. एकीने विचारलं तेव्हा अनू बोलली. " तीन दिवस राहिले आहेत फक्त माझ्याकडे. कॉलेजचे हॉस्टेल सोडावे लागेल. किती दिवस झाले, रूम शोधते आहे.. कोणी देतच नाही rent वर रूम ..म्हणून जरा tension आहे. ",
" इतकंच ना.. माझ्या माहितीची एक काकू आहेत.. त्या देतील जागा राहायला.. छान बाल्कनी सुद्धा आहे... फक्त आपल्या ऑफिसपासून दूर आहे खूप " ,
" चालेल.. निदान राहायला जागा तरी मिळेल.. " मैत्रिणीने पत्ता दिला.
तिने सांगितल्याप्रमाणे राहायला जागा मिळाली. भाडे कमी असले तरी जागा इतकी मोठी नव्हती. बाल्कनी मात्र होती. ऑफिसपासून अंतर खूप. बसनेच १.३० तास लागायचा. पर्याय नव्हता ना.. पहिला पगार झाला कि एक "scooty" बुक करू आणि E.M.I. ने पैसे भरू , असा विचार अनूजाने केला. 

              विचार केल्याप्रमाणे केलंही तिने. actually, scooty मुळे प्रवास अधिक सुखकर झाला होता. त्यात मनात आलं तर कुठेही भटकायची , वर scooty असल्याने कशासाठी थांबायची गरजच नव्हती आता. सांगायचं झालं तर अनूजा settle होतं होती. पहाटेच्या स्वप्नाचा त्रास सोडला तर बाकी सर्व छान सुरु होते. दोन महिने झाले. सकाळी ऑफिसमध्ये छान वेळ जायचा. संध्याकाळी उगाचच वेगळ्या रस्त्याने, scooty वर भटकत -भटकत घरी जायचे. रात्री जेवण करायचे. जमलं तर स्वतःच्या घरी कॉल करायचा आणि सगळी कामे आटोपली कि झोपून जायचे. शनिवार , रविवार सुट्टी असल्याने आणखी फिरायला भेटायचे.. कारण ३ वर्ष अभ्यास आणि कॉलेज शिवाय तितकंसं पुणे अनू फिरलीच नव्हती. तर यासाठी हा खटाटोप.

             अश्याच एका दिवशी, अनू घरी निघाली. यावेळेस तिने, ऑफिसच्या मागच्या बाजूचा रस्ता निवडला भटकण्यासाठी.पाच मिनिटं झाली असतील, सिग्नल लागल्याने एका ठिकाणी scooty थांबली. या रस्त्याने प्रथमच निघाली होती ती. तर आजूबाजूला बघणं सुरु झालं. पुढे एक रस्ता दिसला. काहीतरी वेगळं वाटलं म्हणून  scooty  तिथे वळवली. 
" ये पोरी !!! कुठे जातेस तिथे ... " ट्रॉफिक पोलिसाने हटकलं. 
" काही नाही काका. त्या वाटेने निघाली होती. ",
" कशाला... कोणी वावरत नाही तिथे... हा सरळ रस्ता दिला आहे ना.. तिथून जा कुठे जायचे तिथे... " पोलीस ओरडला तिला. जराश्या नाखुशीने अनूजाने scooty  पुढे घेतली. घरी आली तरी तेच विचार तिच्या डोक्यात. काय असेल त्या वाटेवर... का अडवलं मला. 

               दुसऱ्या दिवशीही तेच, पोलिसाने पुन्हा अडवलं.काहीच कळायला मार्ग नाही. का जाऊ देत नाहीत. नक्कीच काहीतरी असणार तिथे. पुन्हा एकदा तिथे यायला हवे , असा विचार करून पुढच्या दिवशी , ऑफिसच्या लंच टाईम ला तो चालत निघाली. त्या वाटेजवळ आली. जाऊ का पुढे असा विचार करत होतीच , कि मागून आवाज आला .
" काय पाहिजे मॅडम.. " मागे तोच ट्राफिक पोलीस. 
" काही नाही.. फक्त बघत होते. " म्हणत अनूजा निघाली. 
" तुम्ही त्याच मॅडम ना.. दोन दिवस सारखा प्रयन्त चालू होता.. या रस्त्याने जाण्याचा.. तुम्हीच ना त्या... ",
" हो.. मीच ती.. पण का अडवता मला... ",
" अहो मॅडम.. तो रस्ता वापरत नाही कोणी... इथून पुढे जंगलात जाते वाट... खूप वेळाने , दुसरा रहदारीचा रस्ता सुरु होतो.. ",
" मग कुणीच वापरत नाही का रस्ता ",
" पायी जाणारे सुद्धा वापरत नाहीत . पावसात तर झाडं पण पडतात त्या वाटेने.. ऐका माझं.. नका जाऊ... ",
"ठीक आहे.. " म्हणत अनू ऑफिस मध्ये परतली. 

                     नंतर मात्र तिने त्या रस्त्याचा विषय सोडून दिला. आणखी पुढे दोन गेले. छान सुरु होते अनूचं. मधेच दोन-तीन वेळेला स्वतःच्या घरी जाऊन , आई-वडिलांना भेटून आली होती. पगार वेळेवर बँकेत जमा होतं असल्याने , हातात पैसे येत होते. scooty चं हप्ते तिने फेडून टाकले. त्यात पावसाळा तोंडावर आलेला. अनूजाचा आवडता विषय. कॉलेजमध्ये असताना सई ,सागर बरोबर खूप फिरलेली पावसात. यावर्षी एकटीच होती ती पुण्यात. आता सागर ,सई फक्त भिजायला तर पुण्यात येणार नव्हते ना... एखादी सुट्टी काढून जाऊ एकत्र फिरायला, मनातच विचारांच्या इमारती बांधत होती अनू.  

                   पावसाळा सुरु झाला एकदाचा , त्यात पहिला पाऊस रविवारीच अवतरला... एखाद्या मित्रासारखा, surprise घेऊन.. अगदी सकाळीच... अनूजा जाऊन मनसोक्त भिजली... मन भरलं तशी आत येऊन फ्रेश झाली. बाहेर येऊन बघितलं तरी पाऊस सुरूच.. कॉफीचा वाफाळता कप आणि आवडीच्या लेखकाचे पुस्तक, त्यात आवडीची कथा उघडून अनूजा बाल्कनीत बसली होती. किती छान वातावरण ना.. !! रमायची अश्याच वातावरणात अनू . पावसाशिवाय आपण जगूच शकत नाही असं वाटायचं तिला. 

                तर आवडीचा ऋतू सुरु झाला, तसं पायाला भिंगरी लागली पुन्हा अनूच्या. ऑफिस सुटलं कि नुसतं भटकत राहायचं. असं सुरु असताना, एके दिवशी पुन्हा अनूजा ऑफिसच्या मागच्या रस्त्याने गेली, भर पावसात.. त्यात आज लवकर सोडलं होते ना ऑफिस. खूप पाऊस होता आज. त्या सिंगलवर गाडी थांबली अनूची. "त्या" रस्त्याकडे नजर गेली तिची. विजेचा लखलखाट, अगदी त्याचं वेळेस. सकाळची ११ ची वेळ, तरीसुद्धा खूप अंधारून आलेलं. त्यात विजांचे नृत्य चालू होते. अनूने निरखून पाहिलं. ट्राफिक पोलीस नव्हता जागेवर. आजूबाजूला कोणाचं लक्ष नाही बघून अनूने गाडी त्या वाटेकडे वळवली. जरासा उतारचं होता. त्यात पाण्याने निसरडा झालेला. अनू गाडी सावकाश चालवत होती. 

                 सुरुवातीचा रस्ता तरी चांगला म्हणावा, इतका पुढचा रस्ता खराब होता. त्यात त्या पोलिसाने सांगितलं ते खरं होतं. जंगल सुरु झालं. आपण उगाचंच आलो या रस्त्याने असं वाटू लागलं. मागे वळून जाऊया , असा विचार केलाच होता तिने, तर मागे एक मोठ्ठ झाड बरोबर रस्त्याच्या मधेच पडलं. आता पुढे जावेच लागणार. त्यात वेगाने वारे वाहत होते. आता तर डोक्यावर झाडांच्या लहान-सहान फांद्या पडू लागल्या होत्या. वाटेवरचे खड्डे आणि हेल्मेट वर पडणाऱ्या फांद्या चुकवत अनूजा वेगाने पुढे जात होती. त्याचवेळेस समोरून अधांतरी आलेली एक फांदी आणखीच खाली आली. ते टाळणे अनूजाला शक्य नव्हतं. जोरात धडकली. थेट डोक्याला लागलं. त्या धक्क्याने मागेच उडाली अनू. डोक्यावर हेल्मेट असून सुद्धा खूप लागलं अनूला. scooty पुढे जाऊन पडली. अनूच्या डोक्यातून रक्त वाहत होते. थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. 

                  डोळे उघडले तर बर्फाळ प्रदेशात, बर्फावर झोपली होती. उभी राहिली तर दूरवर नजर जाईल तिथे बर्फच बर्फ. कोणाला हाक देणार. पुढे जाऊन बघू , म्हणत पाय पुढे टाकला तर खाली कोसळली. पडली ती थेट फुलांच्या चादरीवर... किती वेगवेगळ्या प्रकारची फुले... असंख्य फुले... दुसरा काहीच नाही तिथे..सुगंध दरवळत होता सगळीकडे. कुठे बघू  नी कुठे नको असं झालं अनूला. एक लक्षात आलं तिच्या, या एवढ्या फुलात गुलाब नव्हता कुठेच. एक वेडी आशा असते ना मनात.. आणखी छान , उत्तम मिळावे.. अशी.. अनूला तसेच वाटले. इतकी फुले होती समोर तरी गुलाबच पाहिजे होता तिला. शोधू लागली. जरा पुढे आली तर थोड्याच अंतरावर एक गुलाब दिसला. एकच गुलाब होता समोर, त्या फुलांच्या गालिच्यावर उठून दिसत होता. अनूजा धावतच त्याच्याकडे पोहोचली. पट्कन गुलाब हातात घेतला. गुलाबाचे काटे टोचले. " आई गं !!! " अनूजा कळवळली. गुलाब हातातून पडला. बोटातून रक्त यायला लागले. अनूजाने बोट तोंडात पकडले, डोळे आपोआप मिटले. 

                     यावेळेस अनूजाचे डोळे उघडले ते विचित्र आवाजाने.. हळूच डोळे उघडले तिने. कुठे होती कळतंच नव्हतं. अंधार सगळीकडे... बहुदा गुहेत आहोत,असा अंदाज अनूजाने लावला. मघाशी इतकी फुले होती, कूठे गेली सर्व. त्यात त्या फुलांच्या सुगंधाची जागा, आता कसल्याश्या कुजकट वासाने घेतली होती. सगळीकडे बंदिस्त... समोरचा हात दिसत नाही इतका काळोख. अनूजा अंदाज लावत , चाचपडत जात होती पुढे. काहीश्या अंतरावर प्रकाश दिसला तिला. त्याच्या रोखाने पुढे निघाली. उजेडा समीप आली. गुहाच होती ती. वरच्या बाजूला असलेल्या , एका भगदाडातून सूर्याचा प्रकाश खाली पोहोचत होता. अनूजा वर बघू लागली. अचानक, समोरून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. समोरून, काळोखातून दबक्या पावलांनी कोणीतरी चालत येतं आहे हे अनूजाने ओळखलं. गुरगुरण्याचा आवाज आता अधिक जवळ आला. 
                  
                       काळोखातून एक मोठी आकृती हळूहळू समोर येतं होती. प्रथम पिवळसर, लाल डोळे दिसले. त्यानंतर नाक, भरदार आयाळ ,भव्य माथा , टवकारले कान आणि रक्ताने माखलेले दात....अनूजा त्या सिंहाकडे बघतच राहिली. काय देखणं रूपं त्याचे... त्याहीपेक्षा देखणं शरीर... प्रचंड ताकद असणार यात. अनूजाला बघूनच तो गुरगुरत होता. नुकताच शिकार करून आला असावा, पण आपण इथे कुठे आलो, विचार करू लागली अनूजा. आणि सिहांने मोठयाने डरकाळी फोडली. केवढा मोठ्ठा आवाज.. कान दडपून गेले अनुचे. शिवाय एवढा मोठ्या आवाजाने अनूजा खाली पडली. अनू सावरत होती स्वतःला, कि सिहांने पवित्रा घेतला. आणखी एक डरकाळी फोडली आणि अनू कडे धावला. मोठी उडी घेतं अनूकडे झेपावला. भीतीने अनूने डोळे मिटून घेतले आणि जिवाच्या आकांताने ओरडली. 

                        शांतता..... अनूने डोळे उघडले. बेडवर झोपलेली... आजूबाजूचा कानोसा घेऊ लागली. बेडजवळच खिडकी होती. बाहेर पाऊस पडत होता. उघड्या खिडकीतून , पावसाचे काही थेंब , वाऱ्यावर स्वार होऊन उगाचच आत येतं होते. त्याचं थेंबानी अनूला जागं केलं होते. अनूजा बेडवर उठून बसली. इतका वेळ स्वप्न सुरु होती तर... अनूजा आळस देत विचार करत होती. तरीही आजूबाजूला पाहिलं असता आपण वेगळ्याच ठिकाणी आहोत ते लक्षात आलं तिच्या. डोक्यावर मलमपट्टी केलेली. त्यातून कळा यायला लागल्या. आपण पडलो होतो, एका फांदीला आपटून , हे अनूला आठवलं. पण नक्की कूठे आहोत हे उमजत नव्हतं.  

                       ती खोली देखील मोठी होती. बेड ३ माणसांना पुरेल एवढा मोठा. खोलीच्या भिंतीवर, सुंदर नक्षीकाम केलेल्या तस्वीर, भरजरी पडदे... स्वच्छ गालिच्या.. पूर्ण खोली स्वच्छ होती. कूठे नाव ठेवायला जागाच नाही. इतकं सगळं नीटनेटके आणि छान... अनूजा बेडवरुन खाली आली. अंगावरचे कपडे सुद्धा तिचे नव्हते. माझे तर नक्की नाहीत हे कपडे ... कोणाचे आहेत... कोणी आणले मला इथे... त्याहीपेक्षा कुठे आहोत आपण...पुरता भुगा झाला डोक्याचा विचार करून.. त्या खोलीचा  दरवाजा उघडून अनू बाहेर आली. फक्त खोलीच मोठी नव्हती, ती इमारत एखादा महाल वाटावा इतकी मोठी होती. बहुदा हॉटेल असावं असा अंदाज लावला तिने. 

                        अनूजा आणखी पुढे आली. आणखीही खोल्या होत्या तिथे. स्वच्छता तर खरचं !! , अनूजा खुश झाली. प्रत्येक खोली बाहेर एक मोठी फुलदाणी. त्यात वेगवेगळ्या रंगाची, प्रकारची फुले.. छान सुगंध सगळीकडे. फक्त कोणी माणसं दिसत नव्हती. एवढं छान, मोठ्ठ हॉटेल आणि एकही माणूस नाही, कमाल आहे... अनूजा सगळं न्याहाळत पुढे जात होती. हॉटेलचं होतं ते. खाली बघितलं असता, छान गालिच्या होता जमिनीवर.. एक मोठ्ठ काचेचे झुंबर छताला लावलेले. खाली हॉलमध्ये काही खुर्च्या लावलेल्या, निवांत बसण्यासाठी. छान ना एकदम. पण अनुचं लक्ष तिच्या समोर असलेल्या खिडकीकडे गेलं. बाहेर अजूनही पाऊस होता. खिडकी मोठी होती, बंद होती. खिडकीच्या काचांवर , पावसाचे थेंब जोराने आदळत होते. त्याचा वेगळाच ध्वनी निर्माण होतं होता. आणखी एक, " अनू !! " असं एक अस्पष्ट आवाज तिला ऐकू येत होता. खिडकी उघडण्यासाठी अनू पुढे आली. खिडकी उघडणार , इतक्यात " शुभ प्रभात बाईसाहेब " असा मागून आवाज आला. दचकली अनूजा. मागे वळून पाहिलं तर एक मुलगी, साधारण २५ - २६ वर्षाची असावी, तिच्या मागे उभी होती. तिनेच आवाज दिला होता. 
" कश्या आहात तुम्ही.. " अनूजा तिच्याकडे जरा संशयाने बघत होती. 
" मी ठीक आहे.. जरा डोकं दुखते आहे पण आहे बरी मी ..  " अनूजाने उत्तर दिलं. 
" तुम्ही बाहेर का आलात... आराम करायचा ना... आणि त्या खिडकीजवळ काय करत आहात.. " ती मुलगी बोलली. 
" खिडकी उघडत होते. " 
" नका उघडू... पावसाचे पाणी आत येईल... चिखल होईल... मग साहेब ओरडतील आम्हाला... तुम्ही आत जा.. " 


अरे !! कोण आहे हि.. मला ओरडते कशी.. " आधी सांग. मी कुठे आहे.. हि जागा कोणती .. कोणी आणलं मला इथे ... ",
" बाईसाहेब... सगळं सांगते.. आधी आत चला तुम्ही. " काय चाललंय नक्की, काही कळत नव्हतं अनूला. ती मुलगी अनूला पुन्हा त्याच रूममध्ये घेऊन आली. 
" बसा. तुम्हाला वैद्यांनी आराम करायला सांगितला आहे.. " ती मुलगी बोलतच होती. 
" एक मिनिट... कोण आहेस तू ... आणि त्याआधी सांग.. कुठे आहे मी. ",
" मी नंदा.. इकडे साफसफाई करते... लोकांची सेवा करते. ",
" पण मी आहे कुठे नक्की.. ??" ,
" तुम्ही,  या आमच्या हॉटेलमध्ये आहात. दोन दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलात. डोक्याला जखम.. मग धावपळ करत तुम्हाला इथे आणलं. वैद्यांनी मलमपट्टी केली. ",
" म्हणजे दोन दिवस.... " ,
" हो...  दोन दिवस बेशुद्ध होता तुम्ही... " ,
"आणि माझी scooty.... helmet.... ते कुठे आहे.. " अनूजाच्या या प्रश्नावर नंदाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. 
" काय बोललात.. हेम... आणि दुसरं... सकू... काय असते ते... " ,
"common yaar.... scooty, helmet माहित नाही... कुठे ठेवलं आहे ते सांग.. ",
" बाईसाहेब.. खरंच माहित नाही तुम्ही काय बोलत आहात ते.. आणि तुम्ही इंग्लिश सुद्धा बोलता... इकडच्या नाही वाटते तुम्ही... ",
" इकडच्या म्हणजे... पुण्यातच आहे ना मी.. इकडे बाहेरच्या रस्त्यावर तर माझा accident झाला ना... बरोबर ना... ते आठवते मला.. ",
" हो, पुण्यातच आहात तुम्ही.. परंतु तुम्ही काय बोलता ते नाही कळत मला... ",
" पण कोणत्या हॉटेल मध्ये आहे.. त्या रस्त्यावर हॉटेल तर नव्हतंच... ",
" कसं शक्य आहे... गेली ३०-४० वर्ष हॉटेल इथेच आहे... " नंदा बोलली. काय बावळटासारखं बोलते आहे हि. 
" मॅनेजर कडे जाऊ चल... " पुन्हा प्रश्नचिन्ह... हिला इंग्लिश कळत नसावं. 
" अगं ... हे हॉटेल कोण चालवते... त्या साहेबांकडे घेऊन चल मला.. " ,
" हा.. तसं बोला ना.. चला जाऊया.. " म्हणत नंदा अनुजाला घेऊन एका दुसरा रूममध्ये गेली.   

                  ती रूमसुद्धा छानपैकी सजवली होती. खिडक्यांना किंमती पडदे लावलेले होते. भितींवर छान छान पेंटिंग, भिंतींना लागून मोठी कपाटे, त्यात पुस्तके भरलेली... समोर एक मोठठं टेबल आणि त्याबाजूला एका खुर्चीवर, एक गृहस्थ काहीतरी लिहीत बसले होते. डोक्यावर पगडी सारखं काहीतरी. मिश्या एवढ्या मोठ्या कि ओठ आहेत कि नाही तेही दिसत नव्हतं. पोशाख तर एखाद्या राजाच्या दरबारातील सेनापती सारखा... फक्त तलवार नव्हती इतकंच... असो, आपण ज्या कामासाठी आलो आहोत ते करू.. अनूजा मनात म्हणाली. 

"अहो साहेब !! या बाईसाहेबाना तुम्हाला भेटायचे होते. " नंदा साहेबांकडे पाहत बोलली. त्या माणसाने अनूजाकडे पाहिलं. 
" अरे व्वा !! तुम्हाला जाग आली.. खूप बरं वाटलं. बसा , बसा खुर्चीवर.. ",
" ते जाऊ दे.. आधी सांगा.. मी कुठे आहे... इथे कोणी आणलं मला... माझी scooty कुठे आहे... " ,
" या बाईसाहेब...तेच ते बोलत आहेत सारखं.. तो शब्द सुद्धा किती कठीण आहे बोलायला. शिवाय इंग्लिश सुद्धा बोलतात बाईसाहेब... ", नंदाने लगेच माहिती पुरवली. 
" हो का.. बरं.. मी सांगतो सगळं... दोन दिवसापूर्वी, आमच्या राखणदाराला जंगलाच्या बाजूने एक मोठी किंकाळी ऐकू आली. भर पावसात , तेही सगळंच्या वेळी.. असं कधीच ऐकलं नव्हतं त्याने.. धावत गेला तर तुम्ही निपचित पडलेल्या होता.. डोक्याला जखम... आजूबाजूला कोणी नाही... तसंच उचलून आणलं त्याने... हि नंदा... तीच सेवा करते आहे गेले दोन दिवस तुमची... ",
"हो.. ते आठवते .. मी पडली होती ते.. तिथेच माझी scooty होती.. ",
" पुन्हा तेच.. तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात.... कोणत्या प्रकारचा दागिना आहे का तो ... " अनूजाने कपाळावर हात मारला. जखम झालेली ना.. कळ सुद्धा गेली डोक्यात. 
" अरे... two wheeler... दुचाकी वाहन... " यावर ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. 
" तुमच्याकडे दुचाकी होती.. ?? " त्या साहेबांनी विचारलं ,
" का... कधी बघितली नाही का... ",
" ऐकलं आहे फक्त... भारतात कुठे आहे... चार चाकी आहेत, त्या सुद्धा त्या इंग्रजांकडे.. परदेशात आहेत असं म्हणतात दुचाकी.. तुम्ही परदेशातून आला आहात का ? " त्या साहेबांनी उलट अनूला प्रश्न केला. 
" काय चाललंय तुमचं.. माझा मोबाईल... पाठीला लावलेली बॅग.. ते तरी कूठे आहे.. " अनुचा पुढचा प्रश्न.. 
" बॅग तर नव्हती.. " नंदा बोलली. 

" हा...आता कसं पकडलं.. इंग्लिश समजतं नाही ना, बॅग तर इंग्लिश शब्द आहे.. मग आता कसं कळलं.. " अनूजा.. 
" बाईसाहेब, हे हॉटेल इंग्रजांनी बांधले. त्यांची ये-जा असते इथे.. म्हणून काही शब्द कळतात. हॉटेल, बॅग, रूम, कार... हे शब्द रोजचे आहेत... " अनूजा वेडी होणार होती आता. काही कळलं तिला.. 
" हा... आता समजलं मला... कोणीतरी मला फसवत आहे ना... बकरा करत आहे ना... कोण आहे... सई, सागर.. या बाहेर या.. बस झालं आता.. हरले मी..कॅमेरा कुठे आहे... आणि तुम्ही दोघे... किती छान acting करता... व्वा !! " अनू टाळ्या वाजवू लागली. ते दोघे पुन्हा आश्चर्यचकीत.. 
" नंदा, या बाईसाहेबाना घेऊन जा रूममध्ये... डोक्याला लागलं म्हणून परिणाम झाला असं वाटते.. " नंदा अनूला घेऊन जाऊ लागली. 

" ये सोड !! " अनूने नंदाचा हात झटकला. " मला माहित आहे.. तुम्हीच कुठेतरी माझं सामान, scooty विकून टाकली आहे.. पोलिसांकडे तक्रार करते.. बघते तुम्ही कसे वाचतात ते.. " अनूजा स्वतःच बाहेर आली. 
" तुम्ही नाही जाऊ शकत... थांबा बाईसाहेब.. थांबा... !! " नंदा तिच्या मागोमाग.. अनूजा धडाधड जिने उतरत खाली आली. मघाशी रिकाम्या असलेल्या खुर्च्या आता माणसांनी भरलेल्या होत्या. अनूजाकडे सगळेच बघत होते. अनूजा हॉटेलच्या दरवाजाकडे निघाली... धावतच.. अचानक समोरचं सगळं भोवती फिरायला लागलं. अनूजा जागच्या जागी थांबली. चक्कर आली होती तिला. तोल गेला... " बाईसाहेब !! " मागून नंदा जोरात ओरडली.   

                  पुढचं काही आठवलं नाही अनूला. तिला जाग आली तेव्हा त्याचं मोठ्या बेडवर झोपली होती. शेजारी खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत आत येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी तिला जाग आली. अनूजा बेडवर उठून बसली.. कालसुद्धा असंच तर झालेलं. कालपासून पाऊस थांबलाच नाही का, अनूजा खिडकीबाहेर पाहत मनात म्हणाली.पण जे अनुभवलं ते स्वप्न होतं कि खरंच तसं घडलं होतं.. कदाचित स्वप्न असावं, परंतु हि रूम तर तीच आहे, जिथे मी काल झोपले होते. इतक्यात नंदा आली.म्हणजे कालचे सगळं खरं होतं. " कश्या आहात तुम्ही.. आता बरं वाटते आहे ना... काल धावता धावता भोवळ आली तुम्हाला.. पोटात काही नाही ना तुमच्या... म्हणून ताकद नाही शरीरात... हा घ्या नाश्ता... " अनूला खरंच भूक लागली होती. नाश्ता खूप रुचकर होता, तरीही अनूच्या डोक्यात तेच विचार. 

                  नाश्ता करून , फ्रेश होऊन अनूजा हॉटेलमध्ये फेरफटका मारू लागली. भिंतीवर मोठी मोठी पेंटिंग्स होती. बहुदा हाताने काढली असावी. त्यात जास्त करून इंग्लिश सरदार, मान्यवर लोकांचे फोटो. फिरता फिरता अनूजा खाली आली. खाली साफसफाई सुरु होती. नोकराचे कपडे देखील राजेशाही. डोक्यावर पगडी वगैरे. त्यात नंदा सुद्धा होती. तिचे कपडे सुद्धा बघण्यासारखे.. काल पासून जास्त लक्ष दिलं नाही तिच्याकडे.. साडी परिधान केली होती तिने. त्या साडीवरचे नक्षीकाम बघण्यासारखे... सुरेख अगदी. आज खाली काही माणसे पण होती. चहा, कॉफी घेत असावेत. अनूजाकडे लक्ष न देता, आपापल्या पेल्यातील गोष्टी संपवत होते. टेबलावर काही newspaper ठेवले होते. बरेचशे इंग्लिश, एकच मराठी वृत्तपत्र दिसतं होतं. अनूजाने उचललं. 

"केसरी !! " अनूजाला धक्का बसला. " असा का वाटतो आहे हा पेपर... paper quality अशी का... खूप जुना असल्या सारखा वाटतो.. " अनूजा एकटीच बडबडत होती. 
" आजचाच आहे तो... " मागून एक तरुण बोलला. " तुम्ही त्या मानाने नवीन वाटता इथे... " तोच तरुण पुन्हा बोलला. 
" आजचा आहे हा पेपर.... मग यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लेख का लिहून आले आहेत.. हे फोटो वगैरे.. " अनूने पटकन वाचून घेतलं. 
" आजचाच आहे.. तारीख बघा... " अनूजाने तारीख बघितली. 

" १८ ऑगस्ट १८९९ ".... काय !!... हे काय अशी तारीख.. तिने बाजूला असलेले इंग्लिश पेपर बघितले. सगळीकडे एकच तारीख... आणखी धक्कादायक, अनूजाला चक्कर येते आहे असं वाटलं. परंतु सावरलं स्वतःला तिने . 

तो तरुण तिला पकडण्यासाठी पुढे आला. खुर्चीवर बसवलं त्याने अनूला. 
" नंदा !! पाणी घेऊन ये पट्कन... यांना चक्कर आली " नंदा धावतच गेली. 
" मी बरी आहे.... ठीक आहे.. " अनूजा आजूबाजूला पाहत म्हणाली. नंदा पाणी घेऊन आली. 
" बाईसाहेब !! औषध नाही घेतलं ना तुम्ही.. मी घेऊन येते... " नंदा पुन्हा धावत गेली. 
" तुम्हाला बरं नाही तर कशाला फिरता अश्या.. रूममध्ये आराम करायचा ना... पण झालंय काय नक्की... अशक्तपणा आला आहे का.. " त्या तरुणाने पुन्हा विचारलं. 
" अशक्तपणा नाही.. हि तारीख बघून चक्कर आली. ",
" का .. काय झालं.. ? " ,
"  १८ ऑगस्ट १८९९... सगळ्या पेपर्स मध्ये हीच date आहे... ",
" मग त्यात काय.. आजचीच तर तारीख आहे ना ..." ,
" हेच तर.. हे कसं possible आहे.. ? ",
" तुम्ही इंग्लिश छान बोलता.. परदेशातून आलात का... तरी भारतीय वाटतात.. ",
" अरे यार !! पुन्हा तेच.. इंग्लिश मध्ये बोलता वगैरे.. काय चाललंय.. पुण्यात कोणी इंग्लिश बोलत नाही का.. scooty माहित नाही.. असं वागतात कि काही माहीतच नाही... खूप झाला खोटारडेपणा, फसवणूक... वैताग आला आता.. मला आताच्या आता निघायचे आहे. " इतक्यात नंदा आली. 
" आधी ठीक व्हा तुम्ही.. " ,
" नको आहेत गोळ्या मला... " अनूने नंदाच्या हातातल्या गोळ्या फेकून दिल्या. 
" साहेबांच्या परवानगी शिवाय कोणीच बाहेर जाऊ शकत नाही. " नंदा बोलली. 
" मी आदित्य " तो तरुण बाहेर आला. " नंदा खरं बोलते आहे.. इथे जो एकदा येतो, तो पुन्हा बाहेर जाऊ शकत नाही.. ",
" काय सुरु आहे... " अनूला खूप राग आला. " सगळी फालतुगिरी सुरु आहे.. बाहेर जाऊ देत नाहीत... आणि ती तारीख... आजची तारीख कशी असू शकते. ",
" म्हणजे ? " आदित्य बोलला. 
" मी ऑफिस मधून निघाली होती. या वाटेने scooty वरून निघाली होती. एका फांदीला डोकं आदळलं आणि बेशुद्ध झाली. शुद्ध आली तेव्हा इथे होते.. मला चांगलं आठवते, तेव्हा तारीख होती... १० ऑगस्ट , २०१८... मग इथे , पेपर्स... १८९९ ची तारीख का दाखवत आहेत.. ?? " अनूजा रागात ओरडली. 
" कारण हीच तारीख आहे आजची.. " हॉटेलचे "साहेब " पायऱ्या उतरत बोलले. 

" तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे... तुम्हाला आरामाची गरज आहे.. तर गुपचूप तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा .. " जरा मोठ्या आवाजातच बोलले साहेबराव. 
" नाही जाणार.. आणि मला आता इथे थांबायचेही नाही... मी निघाले आत्ताच.. " अनूजा पुन्हा मोठ्या आवाजात बोलली. त्यावर साहेबराव मोठयाने हसले. 
" इथे पाहुणे येतात, ते त्यांच्या मनाने.. जातात ते माझ्या मनानी... ",
" हो का !! ... बघते आता कोण अडवते मला ते.. " म्हणत अनूजा धावत सुटली. 

              आजूबाजूला बसलेले सर्वच उभे राहिले. अनूजा धावत दरवाजापाशी आली. रखवालदाराने दरवाजा उघडला. बाहेर पाऊस.. तरी अनू धावत गेली बाहेर. समोर मोठ्ठा बगीच्या... त्यातून समोर असलेला मोठा लोखंडी गेट.. अनूने धावण्याचा वेग वाढवला. आता १०-१२ पावलात गेट जवळ पोहोचणार, तर एकाएकी अनूचा श्वास कोंडू लागला. तरी अनूजा थांबत नव्हती. हळूहळू चालत, श्वास घेण्याचा प्रयत्न करत गेटपाशी पोहोचत होती. दोन हाताचे अंतर राहिले असता... आता श्वास घेऊच शकत नाही.. असं वाटलं अनूला आणि अनू खाली कोसळली. पाऊस कोसळतच होता. अनूजा श्वास घेण्याचा प्रयन्त करत होती. आभाळाकडे डोळे लागलेले... विजा चमकत होत्या. आभाळ आणखी अंधारु लागलं होतं.... विजेच्या लखलखाटामुळे डोळे दिपून जात होते अनूचे. थोडयावेळाने "साहेब" बाजूला येऊन उभे राहिले. नंदा छत्री धरून उभी होती. विजांच्या प्रकाशात साहेबांचा चेहरा भयावह वाटत होता. " मी बोललो ना... इथून कोणी जाऊ शकत नाही.. " साहेब हसले. वर आभाळात विजा एकमेकांवर आदळत होत्या... पावसाचा जोर वाढत चालला होता... " कोणीच जाऊ शकत नाही... " साहेब पुन्हा हसले.  


--------------------------------------To be continued --------------------------------------

Followers