All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Friday 26 December 2014

Wrong Number…!! ( ( भाग दुसरा )

अक्षता तशीच उभी होती मोबाईलकडे पाहत…डोळ्यातून पाणी. काकूंना काही समजण्यापलीकडे. " काय झालं अक्षता… ? कशाला रडतेस ? काही प्रोब्लेम आहे का ? " , अक्षता तरी गप्पच. काही वेळ असाच गेला. काकूंनी अक्षताला त्यांच्या रूममध्ये आणलं. " हं… बोल आता… रडू नकोस… मला कसं कळणार काय झालं नक्की ते. ", अक्षताने डोळे पुसले, घोटभर पाणी घेतलं. शांत झाली. आणि काकूंना सगळी स्टोरी सांगितली.
 " त्या आजी, तुझ्या ओळखीच्या होत्या का ? " , 
" नाही. " , 
" मग आता काय करणार तू … ? " , 
" काय करू ते कळत नाही." ,
" तो रस्ता मला सुद्धा माहित आहे. तिथे खूप traffic असते. आणि त्या गोलाकार बागेजवळ तर अपघात तर जवळपास नेहमीचाच. शिवाय तू बोललीस , त्या आजींना रात्रीचं दिसत नाही बरोबर. ",
" हो ना… त्या कश्या जातील घरी आता.… काकू… " , 
" खरंच गं… " , 
" आणि त्या फोन पण करत असतील मला, माझा फोन तर बंद आहे.",
" मग लाव ना charging ला फोन. " , 
" तरीसुद्धा फोन चालू होण्यासाठी वेळ लागणारच काकू… " दोघीही विचार करत बसल्या. 

" आता एकच पर्याय उरला आहे, अक्षता. " , 
" कोणता ? " , 
" जे काही झालं ते विसरून जा आता. " अक्षता काकूंकडे बघत राहिली.
 " कसं काय काकू ? त्या तिकडे हतबल होऊन फिरत असतील, वयस्कर बाई… रात्रीचं दिसत नाही त्यांना, घरी जायचं आहे पण रस्ता माहित नाही. फक्त मुलाच्या ओढीने त्यांना अजून घरी जायचे आहे. आणि तुम्ही बोलता विसरून जा… शक्य नाही ते. ", 
" मग तू काय करणार आहेस ? त्यांच्याकडे एकच option होता. तुझा मोबाईल नंबर आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या घरी जायला निघाल्या होत्या. आता तुझा मोबाईल तर बंद आहे. मग त्या काय करणार आता ? . " , 
" म्हणजे … मला काही कळत नाही , तुम्ही काय बोलत आहात ते. " ,
 " यात त्यांच्या मुलाची चुकी तर आहेच,  परंतू तुझी पण चूक आहे. " , 
" माझी ? " ,
" हो… तुझी चूक आहे… तू जर तेव्हाच त्यांना सांगितलं असतेस ना कि तुम्ही जिकडे असाल तिकडेच थांबा, तर बंर झालं असतं. " ,
 " कसं काय ? " , 
" तो Area निदान त्या आजींसाठी तरी safe होता. कदाचित त्यांचा मुलगा त्यांना शोधत आला असता तिथे. " काकूंचं बोलणं बरोबर होतं. मी आजींना तिथेच थांबायला सांगितलं असतं तर फार बऱ झालं असतं. आपलीच चूक आहे. अक्षता दुःखी झाली.  

तशीच ती मोबाईल हातात धरून बसली होती. " काय करणार तू आता अक्षता ? ",  अक्षता विचार करत होती तशीच. " चल. मी चहा करते आहे, घेतेस का तुही ? " . अक्षता तशीच बसली होती. अचानक तिच्या मनात आलं काहीतरी… ती उठली आणि तशीच बाहेर पडली. तश्या काकू तिच्या मागून गेल्या. " अक्षता… अक्षता… कूठे चाललीस ? " , विचारेपर्यंत ती जिना उतरून खाली पोहोचलीही. काकूंचा आवाज ऐकून अक्षता थांबली.
 " कूठे चाललीस तू ? " ,
 " आजींना त्यांच्या घरी सोडायला जाते आहे मी. " ,
 " तुला काय वेड लागले आहे का ? तू बरोबर विरुद्ध दिशेला आहेस आणि आता त्या कूठे असतील ते सुद्धा तुला माहित नाही. " , 
" तरीसुद्धा मला जावेच लागेल, आजींसाठी. त्यांना मला शोधावंचं लागेल, काही झालं तरी. " काकू गप्प झाल्या. 
" ठीक आहे , पण अशीच जाऊ नकोस. थांब जरा , मी येते लगेच. " म्हणत काकू वर घरात धावत गेल्या. आणि लगेच हातातून त्यांचा मोबाईल घेऊन आल्या. 
" घे… हा माझा मोबाईल घेऊन जा. " ,
 " नको काकू… " , 
" नको कशाला, घे… आणि तुझा मोबाईल मी charging ला लावते. " , 
" आणि तुम्हाला नको का मोबाईल . " ,
 " नको… तसे कोणाचे call येत नाहीत. ठीक आहे ना ? " ,
" चालेल , Thanks काकू… तुम्ही माझा मोबाईल charging ला लावा आणि त्या आजींचा call आला पुन्हा तर तुम्ही मला call करा तुमच्या मोबाईल वर " , 
" चालेल चालेल  आणि काही समजलं तर तू मला call कर , घरच्या फोन वर. आणि तिथे कशी जाणार आता ? " , 
" बघते, रिक्षाने जाते, लवकर पोहोचीन तिकडे." , 
" जा लवकर आणि आजींना घरी पोहोचलोस कि मला call कर "," नक्की " म्हणत अक्षता धावत गेली. 

लगेच रिक्षाही मिळाली. आणि अक्षता निघाली. इकडे काकूंनी तिचा मोबाईल charging ला लावला. अक्षता रिक्षातून जात होती. तसं तिला बरोबर विरुद्ध दिशेला जायचे होते , त्यामुळे वेळ तर लागणारच होता. अक्षता पुन्हा विचार करू लागली. आपण निघालो तर आहे आजींना शोधायला. पण त्यांना ओळखणार कसं आपण ? …. कधी पाहिलं तर नाही त्यांना आपण. फक्त त्यांचं वर्णन आहे डोक्यात.… हो… त्यांच्या साडीवरून त्यांना ओळखता येईल. निळ्या रंगाची साडी, त्यावर मोराची नक्षी… आजींचं वय असेल ६०-६१ च्या आसपास. अक्षताच्या मनात एक चित्र उभं राहिलं, आजींचं. अश्याच असल्या पाहिजे. नाहीतर मी त्यांना ओळखूच शकत नाही.  

अक्षताची रिक्षा पळत होती. रिक्षात बसल्या पासून ती सारखी हातातल्या घड्याळाकडे पाहत होती. वेळ काय पटापट जात होता. जणू काही घड्याळाचे काटे नुसते पळत होते. ७.१० वाजता सुरु झालेला प्रवास, ७.३० झाले तरी सुरूच होता. अक्षता तर त्या ठिकाणाची वाट पाहत होती. " जरा जल्दी चलो ना " , अक्षता रिक्षावाल्याला सांगत होती. " अरे madam, ट्राफिक तो देखो… अभी उड के चलावू क्या… "  तशी अक्षता गप्प बसली. ती तिथे पोहोचण्याची वाट बघण्याशिवाय काही करू शकत नव्हती. मजल दरमजल करत शेवटी अक्षता त्या गोल बागेजवळ पोहोचली. बघते तर ७.४५ वाजले होते. रिक्षावाल्याला पैसे देऊन अक्षता धावत त्या बागेजवळ गेली. 

बाग तर समोरच होती. पण अक्षता आजींना शोधत होती. कूठे असतील … रस्त्यावर दिवे होते तरी काळोख होताच. ह्या आजी कूठे गेल्या… अक्षता सैरभैर पाहत होती. आजींचा शेवटचा फोन आला तेव्हा ७ वाजले होते. आणि जवळपास तासभराने ती तिकडे होती. या आजी कूठे तरी गेल्या वाटते, अक्षताला चिंता वाटू लागली. ६ रस्ते होते, कूठल्या रस्त्याने गेल्या असतील आजी… अक्षताने पहिल्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे जाणार इतक्यात बाजूलाच असलेल्या रस्त्याकडे तीची नजर गेली. खूप गर्दी जमली होती तिथे. " Ohhh … No " , अक्षता धावतच गेली तिथे. आजी असतील का तिथे ? अक्षता गर्दीत पोहोचली. खूप गर्दी… अक्षताला काय झालं ते कळत नव्हतं. डोकावून पाहिलं तरी काही दिसलं नाही, " क्या हूआ भाईसाहब ? " , अक्षताने एकाला विचारलं. " ऐ आजकल के लडके…बडी जल्दी होती है सबको… Bike से जा रहा था, स्लीप हो गयी बाईक… " , तरी अक्षता डोकवून पाहत होती. खरोखरंच एक मुलगा होता तिथे बसलेला. खूप जखमी झालेला होता. अक्षताला त्याची काही काळजी वाटली नाही, " Thank You देवा… " म्हणत अक्षता तिथून निघाली. थांबली. पुन्हा उलट फिरून त्या गर्दीत ती आजींना पाहू लागली. तिथे फक्त पुरुष मंडळीच होती. आजी इकडे तर नाहीच आहेत. मग कुठल्या रस्त्याने गेल्या असतील त्या. पुन्हा अक्षता, पहिल्या रस्त्याच्या दिशेने निघाली. बाजूलाच एक खड्डा खणून ठेवला होता. बहुतेक पाण्याचे पाईप टाकण्याचे काम चालू असेल. अक्षता कसल्याश्या भीतीने, त्या खड्यात डोकावून आली. हुश्श !!! कसला सुद्धा विचार करतेस तू… आजींना काही झालं नसेल, त्या सुखरूप असतील. फक्त कूठे तरी गेल्या असतील… पण गेल्या तरी कूठे… कूठे शोधू मी त्यांना… अक्षता विचार करत करत पुन्हा त्या गोल बागेजवळ आली. काहीच सूचत नव्हतं.  

कूठल्यातरी एका रस्त्याने जायला पाहिजे आणि आजींना लवकरात लवकर शोधलं पाहिजे , नाहीतर अश्याच कूठेतरी भटकत जातील त्या.… पण जाऊ तरी कूठे , अक्षता डोक धरून तिकडेच त्या बागेजवळ उभी होती. विचार करत करत ती त्या बागेभोवती फिरू लागली. तेव्हाच, तिची नजर आत, बागेत गेली. बाग तशी रिकामीच होती. आत काही प्रेमी युगुलं तिथे गप्पा- गोष्टी , मस्करी करत बसली होती. पण तिथेच एका दिव्याखाली, एक म्हातारी बाई बसलेली दिसली. जरा निरखून पाहिलं अक्षताने. निळ्या रंगाची साडी… पांढरे केस… याच असतील का आजी… कळत नाही. निळ्या रंगाची साडी तर आहे, पण मोराची नक्षी कशी दिसणार ? जवळ जाऊन पाहूया का … तशी अक्षता आणखी जवळ गेली. एका बाजूने पाहिलं तेव्हा अक्षताला त्या साडीवर मोराची नक्षी दिसली. Perfect एकदम !! याच आजी आहेत. तशी अक्षता लगबगीने त्यांच्याजवळ पोहोचली. आजी अंग चोरून बसल्या होत्या, बाकड्यावर. घाबरीघुबरी नजर. सगळीकडे भीतीदायक नजरेने पाहत होत्या… Yes , याच आजी आहेत, पण घाबरल्या आहेत खूप. 

" आजी… " ,  अक्षताने आजींना हाक मारली. तसं आजींनी वळून पाहिलं. आणि घाबरून लगेच मान वळवली. 
" आजी… आजी…,मी अक्षता… तुम्ही मला फोन करत होतात ना … ती मी , अक्षता. " , हे ऐकून आजींनी लगेच अक्षताकडे पाहिलं. " हो… आजी तुम्ही हरवल्या आहात ना आणि तुम्ही मला फोन करत होतात … मी तुम्हाला तुमच्या घरी जाण्याचा रस्ता सांगत होते फोनवर…. आठवलं ना… " या आजी मला विसरल्या तर नाहीत ना.… हो, नाहीतर त्यांच्या काही लक्षात राहत नाही.
" हो…ग , पोरी. आठवलं … अक्षता ना तू… " , 
" बर झालं आठवलं ते, मला वाटलं विसरलात कि काय … " ,
" नाही गं, पण तू इकडे कूठे आलीस… ? तू तर तुझ्या घरी होतीस ना… " ,
 "हो आजी,पण मला तुमची काळजी वाटली म्हणून आले मी शोधायला तुम्हाला. चला , तुमच्या घरी जाऊ आपण. ", ते ऐकून आजींना किती आनंद झाला. 
" चल… चल पोरी… " , आजींना उभं राहताना सुद्धा किती त्रास होत होता. किती दमल्या असतील ना. 
" चला आजी, आपण रिक्ष्याने जाऊ… मग लवकर पोहोचू. " ,
 " नको, चालत चालत जाऊया. नाहीतरी ते रिक्ष्यावाले नाही आवडत मला. शिवाय घर जवळ आहे ना.",
" तुम्ही दमल्या असाल ना म्हणून " ,
"नाही… चल चालत जाऊया.… बोलत बोलत. ", या आजींना बोलायला खूप आवडते.चालेल ना. माझं पण चालणं होईल ना तेवढं .तेव्हा अक्षताच्या लक्षात आलं कि आजींच्या कमरेला बटवा नाही आहे.

" आजी… तुमचा बटवा कूठे आहे ? पडला कि काय … " ,
 " माहित नाही गं… पडला असेल नाहीतर विसरले असेन कुठेतरी. " बागेत तर नाही आहे, अक्षताने शोधलं. मग गेला कूठे ? … हा… आजी त्या फोनबूथ वर विसरल्या असतील, कदाचित. 
" चला आजी… कदाचित तुम्ही त्या फोनबूथ वर विसरलात बटवा. कूठे आहे तो फोनबूथ ? " , 
" लक्षात नाही, असेल इकडेच कूठेतरी. ".  विसरल्या… आजी पण ना… अक्षताला काहीतरी आठवलं. तिने लगेच काकूंना call लावला.
 " Hello… " ,
 " Hello,  काकू… मला भेटल्या आजी. " ,
 " हो का, बर झालं… कश्या आहेत त्या. " , 
" बऱ्या आहेत आणि मी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जात आहे. " ,
 " हो.  का . छान. " ,
 " हा, काकू … माझा मोबाईल आता सुरु झाला असेल ना… ? " , 
" अरे हो… विसरले मी. थांब हा , चालू करते. " ,
 " OK आणि चालू झाला कि सांगा मला. " , 
" हा… चालू झाला मोबाईल… काय करू आता ? " ,
" शेवटी ज्या नंबर वरून call आला होता , तो नंबर सांगता का मला . " ,
 " शेवटी ना… कोणी शलाका नावाच्या मोबाईल वरून call आला होता. " . शलाका ? काकू अश्या का बोलत आहेत.
 " अहो काकू… शेवटचा नंबर बघा, या आजी त्या टेलिफोन बूथ वर त्यांचा बटवा विसरल्या बहुतेक, त्यांनी तिथून call केलेला शेवटी. शलाकाने त्यांच्या आधी call केलेला मला. " ,
" अगं अक्षता, शेवटचा call शलाकाचाच आहे. " ,
" कसं काकू ? " , 
" अगं call आलाच नाही तर तो दिसेलच कसा मोबाईल वर ? " . या काकूंना काय झालंय … वेड्यासारखं बोलत आहेत , अक्षता मनातल्या मनात बोलत होती.         

तेव्हा आजी म्हणाल्या," जाऊ दे गं अक्षता… नाहीतरी त्यांत पैसे तर नव्हतेच. जाऊ दे बटवा… शिवाय जुना पण झालेला. " ,
" तरी सुद्धा " , 
" नको तो बटवा मला, मला घरी सोड लवकर. मंदारला बघायचे आहे मला." नाईलाजाने अक्षताने काकूंचा call कट केला. 
" चला मग , जाऊया तुमच्या घरी. " निघाल्या दोघीही. 
" तुला माहित आहे ना रस्ता , माझ्या घराचा ? " , 
" तसा माहित नाही मला, पण विचारत विचारत जाऊ. " ,
" चालेल." तसं अक्षताने एकाला त्या गोल मंदिराचा रस्ता विचारला. पाचवा रस्ता. त्या रस्ताने चालत गेलं कि गोल मंदिर लागते, " चला आजी, कळला रस्ता. " 

चालता चालता आजीने अक्षताला विचारले, " तुला नंतर फोन लावत होते मी, पण लागलाच नाही म्हणून या बागेत येऊन बसले मी. " , 
" अहो आजी, माझा मोबाईल बंद झाला, मग तुमचा फोन कसा लागणार मला, बरं … इकडे कोणालाही विचारलं असता ना , तर कोणीही सोडलं असतं घरी तुम्हाला. एव्हाना, तुम्ही मंदार सोबत असता आता.", 
" नको गं , मला भीती वाटते अनोळखी लोकांची. " … खरंच या आजी म्हणजे ना… विचारायचे ना जरा, जाऊ दे…. या घरी गेल्या असत्या तर मला कश्या भेटल्या असत्या ना, बरं झालं , कोणाला विचारलं नाही ते… पण यांचा मुलगा तर नसेल ना फिरत यांना शोधत.      

" आजी, तुमचा मुलगा मोठा आहे ना… " , 
" हो . लग्न झालं आहे, चांगला मोठा आहे तो.",
"मग तुम्हाला शोधायला कसा आला नाही तो.",
"असेल गं, तोही फिरत असेल. मी एकदा घरी पोहोचले कि मग येईल तोही. " . किती आनंदाने सांगत होत्या आजी. खूप प्रेम करतात वाटते आजी, मुलावर .
" खूप प्रेम आहे वाटते तुमचं मंदारवर… ",
" हो..ग, खूप लाडाचा आहे तो. आणि माझी काळजी पण घेतो खूप." . आजींच्या चेहऱ्याची कळी खुलली मंदार विषयी बोलताना. 
" चांगला उंच आहे,अगदी वडिलांवर गेला आहे. " ,
" हो… आणि सून कशी आहे ? ".चालता चालता छान गप्पा चालू होत्या त्यांच्या. 
" आहे बरी. पण मंदार सारखी नाही. जरा राग करते माझा. वय झालेली माणसं तिला आवडत नाहीत बहुतेक. " आजींच्या आवाजातला आंनद कमी झाला जरा.
 " का… ओरडली का तुम्हाला ? " ,
" ओरडते कधी कधी. विसरते ना मी. मग ओरडते मला ती. कूठे काही वस्तू ठेवली कि विसरून जाते ना मी. " नको विषय काढायला सुनेचा... त्यांना आवडत नाही ते... मंदारचा विषय काढते. अजून तरी यांची इमारत लांब आहे तशी.

" दम नाही लागला ना तुम्हाला…",
" नाही … सवय आहे मला चालायची. " ,
" आजी , मंदारला काय आवडते ? ",
" मंदारला ना… फिरायला खूप आवडते. पुन्हा , त्याला ना माझ्या हातचं जेवण आवडते. मग मी सुनबाईला सांगत नाही जेवण करायला, मीच करते. तुला सांगते ना अक्षता, कधी कधी मी मीठ टाकायला विसरते, तरी तो काही बोलत नाही गं… सुनबाई लगेच बोलून दाखवते.… कूठे लक्ष असते तुमचं,मी करते जेवण… मग मी ऐकून घेते तिचं, पण जेवणाच्या बाबतीत नाही. " आजी हसत सांगत होत्या. 
" मग मंदार काही बोलत नाही का बायकोला, तुम्हाला ओरडते तेव्हा. " , 
" मंदार ना… शांत आहे तो खूप. ती ओरडली तरी तिला काही बोलत नाही तो, त्याला पण ते आवडत नाही. मग मला सांगतो तो कि देवळात जाऊन बस तू .मग मी आपली , देवळात येऊन बसते जप करत देवाचा. " आजीबाई चा मुलगा शांत आहे, पण सून जरा तापट वाटते, अक्षता विचार करत होती.

बोलता बोलता त्या दोघी गोल मंदिराजवळ पोहोचल्या ते कळलचं नाही. " आजी… आज्जी , पोहोचलो आपण मंदिराजवळ. " . आजींचा चेहरासुद्धा उजळला. समोरच मंदिर होतं. अक्षता अगदी बरोब्बर घेऊन आली होती आजींना. मंदिराच्या बाजूलाच दोन इमारती होत्या , अगदी लागूनच.
 " आजी… कोणत्या इमारतीत राहता तुम्ही. आजींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. बहुतेक विसरल्या वाटते या. इमारती तर खूप उंच आहेत. 
" आजी, तुम्हाला जमेल का जिने चढायला. लिफ्ट तर असेल ना. " ,
" अक्षता… मला जरा दम लागला आहे गं. मी इकडे बसते देवळात. तू मंदार भेटला कि सांग त्याला, मग तो येईल खाली." ,
" पण आजी, मी कूठे पाहिलं आहे मंदारला. " ,
" अगं, तिकडे पाटी वर त्याचा नांव आहे ना, तुला कळेल. " , OK .. OK , name list मध्ये असेल नावं मंदारच. 
" पण आजी, एवढया इमारतीत मंदार नावाचा एकंच मुलगा आहे का ? " ,
" मला तरी आठवत नाही दुसरा मंदार कोणी आहे ते. " ,
" ठीक आहे आजी. तुम्ही इकडे देवळात बसून राहा, मी येते पटकन. " अक्षता पळत पळत एका इमारतीत गेली. पहिल्याच इमारतीत एक नांव होतं. मंदार सोनावणे. ५ वा मजला. 

अक्षता लिफ्टने लगेच पोहोचली. ५०७ नंबरची रूम. मंदार सोनावणे. अक्षताने बेल वाजवली. एका बाईने दरवाजा उघडला.
" नमस्कार.. ",
" नमस्कार..कोण पाहिजे तुम्हाला ? " .
" तुम्ही , मिसेस सोनावणे का ? ",
" हो.. मीच." ,
" आणि तुमचे मिस्टर आहेत का घरात ? ". 
" नाही,अजून आले नाहीत ते. " , 
" कूठे गेले आहेत ? " . 
" हो, पण तुम्ही कोण आहात आणि कशाला एवढी चौकशी करत आहात ? ",
" त्यांची आई मला सापडली आहे, त्या हरवल्या होत्या ना." हे ऐकून त्या बाईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला.    

" कोण… कोण बोललात तुम्ही ? " ,
" तुमच्या मिस्टरांची आई…म्हणजे तुमची सासू. त्या हरवल्या होत्या ना, भटकत होत्या घर शोधत… त्यांना आणलं आहे मी. " अक्षता आनंदाने सांगत होती. परंतू त्या बाईंच्या चेहऱ्याचे भाव काही वेगळे होते, शिवाय त्या आता गप्प झाल्या होत्या अगदी. 
न राहवून अक्षताने त्यांना विचारलं," तुमचे मिस्टर कूठे आहेत… ? ते सुद्धा त्यांच्या आईला शोधायला गेल्या आहेत ना, त्यांना सांगा फोन करून कि आई भेटल्या आहेत . " तरीही त्या गप्पच. आता मात्र अक्षताला राग आला. आजी बोलल्या त्या बरोबर होतं, त्यांच्या सूनेला वयस्कर मंडळी आवडत नाहीत. मी एवढया लांबून आले, त्या आजींना घरी सोडायला. आपला हरवलेला माणूस घरी आला आहे, त्याचं काहीनाही यांना.
 " अहो… तुमच्या मिस्टरला फोन लावत आहात ना तुम्ही… बोलवा त्यांना. " अक्षताच्या वाढलेल्या आवाजाने त्या बाई दचकल्या, 
" हं… हो, येतील ते आता कामावरून… ". कामावरून ? काय मुलगा आहे. आपली आई हरवली आहे आणि हा चक्क कामाला गेला आहे , कमाल आहे … म्हणून आजींना तो भेटलाच नाही. मला वाटते , मंदारने आजींना मुददाम सोडून दिलं. किंवा मी वेगळ्या घरात आले असेन. 
" Madam… मला वाटते, मी चुकीच्या घरात आले असेन. त्या बाजूच्या बिल्डींगमध्ये आहे का कोणी मंदार नावाचा. ? " , 
" नाही. " ,
" अहो मग… तुमच्या सासू हरवल्या आहेत आणि त्यांचा मुलगा कामाला गेला आहे. तुम्हाला कसलाही आनंद झाला नाही, त्या आल्याचा. कसली माणसं आहात तुम्ही. " तरीही ती बाई शांतच. अक्षता आता जाम भडकली होती. ती पुढे काही बोलणार इतक्यात , मागून आवाज आला.
 " excuse me… काही हवं आहे का तुम्हाला ? " . अक्षताने मागे वळून पाहिलं. एक माणूस उभा होता, ३३-३५ वय असेल . त्याला बघून त्या बाई लगेच बोलल्या,
" मंदार … यांना काहीतरी सांगायचे आहे तुला. ",
" काय सांगायचे आहे ? " , त्यावर अक्षता चिडून म्हणाली,
 " तुमच्या आई सापडल्या आहेत मला. " त्यावर त्याचा चेहरासुद्धा पाहण्यासारखा होता. अक्षता दोघांकडे पाहतच राहिली. अरे… काय चाललंय हे… " तुम्हाला… जाऊ दे , तुला तुझी आई नको आहे का ? ". अक्षता मंदारकडे रागाने पाहत म्हणाली. 

"एक मिनिट… तुम्ही जरा शांत रहा. आणि आपण आत घरात जाऊन बोलूया. ठीक आहे ? ". मंदार म्हणाला. 
" अरे … पण तुझी आई तिकडे खाली देवळात बसली आहे. कधीपासून त्या भटकत होत्या. त्यांना तर घरात घेऊन ये. " ,
 " ठीक आहे, पहिलं तुम्ही घरात तर चला. मी सांगतो सगळं. " . अक्षता रागात होती, तरी तीही दमली होती. आजींना देवळात बसू दे थोडावेळ. त्याही दमलेल्या आहेत आणि इकडचे वातावरण काही बरोबर नाही. सूनबाईला सासू आलेल्या आवडलेलं नाही बहुतेक, थोडावेळ जाऊ दे. वातावरण शांत झालं कि आजींना घरात घेऊन येऊ. अक्षता बसली. 
" मी मंदार आणि हि माझी बायको, स्वाती. " ,
" हो… बोलल्या होत्या मला आजी. सून आहे म्हणून. " .
" हो का… " स्वाती म्हणाली. 
" मग… खूप सांगत होत्या त्या , आम्ही चालत चालत आलो ना. छान गप्पा मारत होतो आम्ही. त्यांना बोलायला खूप आवडते ना. " अक्षता सांगत होती.
" पण तुम्हाला त्यांचा काही प्रोब्लेम आहे का… त्यांना घेऊन ये ना वरती तू . " मंदार आणि स्वाती तशीच बसून होती. यांना सांगून काही फायदा नाही. " मीच घेऊन येते त्यांना " , अक्षता जाण्यासाठी उठली. 
तसं मंदारने तिला थांबवलं, " थांबा जरा, बसा खाली. " , 
" काय आहे आणि काय चाललंय तुमच्या दोघांच ? त्या वस्यकर बाई… कधीपासून एकटया फिरत आहेत… रात्रीचं दिसत नाही म्हणून नाहीतर कधीच पोहोचल्या असत्या घरी. कशाला येत आहेत, फक्त मुलाला बघायचं आहे म्हणूनच ना… आणि इकडे तर कोणाला काहीच फरक पडत नाही. मुलगा कामाला गेलेला, तर सुनेला त्या नकोच आहेत घरात… " , 
" हे बघा …. तुम्ही शांत बसा जरा.. तुम्हाला सगळं सांगतो मी. " मंदार म्हणाला.
 " प्लीज… बसा खाली. " स्वाती म्हणाली तेव्हा अक्षता खाली बसली.     

" तुम्ही ज्या आजींचे वर्णन केलंत, त्या कश्या होत्या दिसायला ? तो तिकडे फोटो आहे, त्या होत्या का ? " , अक्षताने फोटोकडे पाहिलं. भिंतीवरच्या फोटोमधल्या  आजी त्याचं होत्या. अक्षता उठून त्या फोटो जवळ गेली.
" हो … याच तर आहेत. म्हणजे मी बरोबर घरात आले आहे.",
" हो… ती माझीच आई आहे. " ,
" हा….  मग त्या आहेत ना बसलेल्या तिथे… त्यांना घेऊन ये ना वर… " . 
" माझी आई, तिला ६ वर्ष झाली हरवून." अक्षता ते ऐकतच राहिली. 
" ६ वर्ष… कसं शक्य आहे ? त्या तर बोलल्या कि आम्ही दोघे फिरायला गेलो होतो आणि तुमची चुकामुक झाली." ,
" हो… बरोबर आहे ते.. ६ वर्षापूर्वी तसंच झालं होतं. आम्ही दोघे गेलेलो फिरायला. मी आणि माझी आई. तेव्हा गर्दी खूप होती,आईचा हात सुटला आणि गर्दीत ती कूठे चालत गेली ते कळलचं नाही मला. " ,
" मग त्या आजी आणि त्या फोटोतल्या आजी तर एकच आहेत… आणि तू बोलतोस कि ६ वर्षापूर्वी हरवल्या. मग त्या कोण आहेत ? " , 
" एक मिनिट ." म्हणत स्वाती उठून आतल्या खोलीत गेली आणि एक फोटो घेऊन आली. अक्षताने फोटो बघितला. 
" अरे हो… हीच साडी नेसली आहे त्यांनी… In fact, याच तर आहेत त्या आजी." ,
" हा… फोटो, त्याचं दिवशी सकाळी काढलेला होता." स्वाती सांगत होती.
" आजच्याच दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. तेव्हा त्यांचा ६० वा वाढदिवस होता. म्हणून संद्याकाळी घरी पार्टी होती. सासुंना साड्या खूप आवडायच्या, म्हणून मीच हि साडी त्यांना आणली होती. आवडलेली त्यांना. हीच साडी नेसून त्या फिरायला गेलेल्या. आणि हरवल्या. " स्वाती सांगत होती. अक्षताच्या ते सगळं डोक्यावरून गेलं.
" तुम्ही काय बोलत आहात ते मला कळत नाही. तुम्ही खरं सांगत आहात कि खोटं ते माहित नाही. या फोटोमधल्या आजी , त्याचं आहेत … ज्यांना मी इकडे घेऊन आले. आणि अजूनही त्या तिथेच बसलेल्या आहेत,देवळात. " अक्षता म्हणाली.
" OK , तुम्हाला कूठे भेटल्या त्या आजी ? " ,
" म्हणजे मला एक call आला होता, मोबाईल वर . त्याचं आजींनी call केलेला.  तुझा नंबर समजून त्यांनी मला फोन लावला. त्याचं बोलल्या, त्या हरवल्या आहेत ते. मग त्यांना मी सांगितलं कसं घरी जायचे ते. तू त्यांना तुझा नवीन नंबर का नाही दिलास ? माझाही मोबाईल बंद झाला तेव्हा मी आले शोधत त्यांना आणि नशीब भेटल्या मला त्या. मग त्यांना इकडे आणलं मी. " 

" तुमचा नंबर कोणता आहे, मोबाईलचा ? " , 
"८३१९५०७८९० " तो नंबर ऐकून दोघांनाही अचंबा वाटला. अक्षताला ते लगेचच कळलं. 
" काय झालं ? " ,
" तुम्ही ५ व्या व्यक्ती आहात. ". 
" Means what ? " .
" हा नंबर पहिला मंदारचा होता, पण सासू हरवल्या त्याचं दिवशी त्याचा मोबाईल सुद्धा हरवला होता. नंतर त्याने त्यांचा मोबाईल नंबर बदलला होता. आता वेगळा आहे. " ,
"हा… मग त्याचा काय प्रोब्लेम आहे ? " , अक्षताने विचारलं.
" मी सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. मग तुम्हीच ठरवा कि खरं काय नी खोटं ते." .
" पण तुझी आई, ती देवळात बसून असेल ना अजून. तिला तर घेऊन ये आधी. " अक्षता म्हणाली. 
" तुम्ही पहिलं ऐकून तर घ्या, पुढंच नंतर बघू. " स्वाती म्हणाली. अक्षताला काहीतरी गडबड जाणवली. " ठीक आहे, सांगा काय ते ? "


" OK, ६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आईचा ६० वा वाढदिवस होता. तिला माहित नव्हत ते. actually तिच्या काहीच लक्षात राहायचं नाही. पण स्वातीच्या लक्षात होतं ते, म्हणून आम्ही सकाळी घरच्या घरी पार्टी केली, केक वगैरे कापून. आणि संध्याकाळी मोठी पार्टी ठरवली होती, आईला फिरायला खूप आवडायचं. मी तिला घेऊन जायचो नेहमी. त्या दिवशीसुद्धा असंच आम्ही फिरत होतो. काहीतरी होतं त्यादिवशी. नक्की आठवत नाही मला, पण खूप गर्दी होती. त्या गर्दीत माझा मोबाईल कोणीतरी चोराला. त्यात नकळत आईचा हात कधी सुटला ते कळलंच नाही मला. मीही विसरलो मोबाईलच्या नादात. दरम्यान आई कूठेतरी चालत गेली गर्दी सोबत. संध्याकाळची वेळ होती ना आणि आईला काळोखात दिसायचे नाही. कूठे गेली ते कळलंच नाही मला. कितीतरी वेळ तिला शोधत होतो मी. रात्री ११ वाजता घरी आलो. मला वाटलं आली असेल घरी ती. पण आलीच नाही ती. खूप रडलो मी तेव्हा. मोबाईल च्या नादात आईला विसरलो मी. ",

" मग काय केलंत तुम्ही ? आईला शोधायचा प्रयन्त नाही केलास का ? " अक्षताने पुढे विचारलं. 
" केला, खूप प्रयन्त केला शोधायचा. मी आणि मंदारने. जवळपास ६ महिने शोधत होतो. पण त्या भेटल्याच नाही. पोलिसांना सुद्धा नाही. त्यांची Missing Person मध्ये अजून केस चालू आहे, पोलिस स्टेशनमध्ये. " स्वातीने माहिती पुरवली. 

पुन्हा अक्षताच्या डोक्यात काही शिरलं नाही.
" ठीक आहे. मग मला भेटल्या त्या… त्या तर तुझ्या आईचं आहेत ना कि कोणी सारखी दिसणारी दुसरी व्यक्ती आहे ?  आणि मघाशी तू बोललीस , ५ वी व्यक्ती… म्हणजे काय ? " , अक्षताने विचारलं. 
" तुम्हाला जी बाई भेटली किंवा नाही भेटली, त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण तुमचा मोबाईल नंबर आणि या घटनेचा संबंध आहे. " ,
" कोणता संबंध ? " , 
" आई हरवली तेव्हा,तिच्याजवळ तिचा बटवा सोडला तर बाकी काहीच नव्हतं. पैसेही नव्हते. असतील ते पण थोडेच होते. आणि मी माझा मोबाईल नंबर त्या बटव्यात एका कागदावर लिहून ठेवला होता." ,
"हो … आजी बोलल्या तसं मला. " ,

" तर गेल्या ४ वर्षात तुमच्या सारख्याच, ४ व्यक्तींनी मला हेच सांगितलं कि तुमच्या आई भेटल्या मला. पहिल्या वेळेस जेव्हा एक माणूस मला सांगत आला होता आईबद्दल तेव्हा मला किती आनंद झालेला ना. मी तर धावतच गेलेलो, आईला भेटायला. पण ती नव्हतीच तिथे. मला वाटलं, तो माणूस माझ्याबरोबर मस्करी करत आहे. परंतु त्याने मला किंवा माझ्या आईला पहिलं कधीच बघितलं नव्हतं, तरीही त्याने आईचा फोटो बरोबर ओळखला. तुमच्या सारखंच तो आईला मंदिरात बसवून मला बोलवायला आला होता. आई नव्हतीच मंदिरात. तेव्हा सुद्धा खूप शोधलं मी आईला. नव्हतीच ती. तेव्हा त्या माणसाचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. दुसऱ्या वर्षीही तसंच झालं. तेव्हाही मी नंबर घेऊन ठेवला होता. थांबा जरा."म्हणत मंदार उठला आणि त्याने कपाटातून एक फाईल काढली. 

त्या फाईल मध्ये, आजींचा फोटो, त्यांची हरवल्याची तक्रार आणि काही कागदपत्र होती. 
" हे बघा. त्या ४ व्यक्तींचे पत्ते आणि नंबर लिहून ठेवले आहेत. तुम्हीही चेक करा." अक्षताने फाईल घेतली. अक्षताचा चेहरा आता बघण्यासारखा होता. 
" त्यात तुम्हाला एक गोष्ट कळली असेल. सगळ्यांचे मोबाईल नंबर एकच आहेत, जो आता तुमचा नंबर आहे.",

" अरे… हो… नंबर तर एकच आहे, माझाच नंबर आहे हा… पण सगळ्यांचे नंबर सेम कसे ? " ,
" पहिला हा नंबर माझा होता, तो नंतर मी बदलला. तो फिरून पुन्हा use मध्ये आला. तेव्हा तो त्या माणसाला भेटला, त्यानेही तो change केला तेव्हा दुसऱ्याला भेटला. तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला, त्यांना मीच सांगितलं होतं कि नंबर change करा तुमचा. शिवाय मोबाईल कंपनीतसुद्धा मी एक अर्ज केलेला, कि हा नंबर कायमचा बंद करण्यासाठी. आणि आता तो नंबर तुम्हाला मिळाला. बरोबर ना… " अक्षताने होकारार्थी मान हलवली.

" म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ? त्या देवळात बसलेल्या आजी…. " अक्षता बोलता बोलता थांबली. 
" आम्हालाही तेच कळत नाही. जर तुम्हाला आणि त्या इतर ४ जणांना आई दिसली तर मग मला का नाही दिसत." मंदार दुःखी झाला. अक्षता तर अशीच बसून राहिली होती गप्प. थोडावेळ तर कोणीच काही बोलले नाही. आता इकडे थांबून काही उपयोग नाही, अक्षता मनात बोलली. 

" निघते मी." अक्षता म्हणाली.
 " थांबा… मी पण येते सोबत." स्वाती म्हणाली आणि दोघीही इमारतीच्या खाली आल्या. अक्षताने पुन्हा एकदा त्या मंदिरात डोकावून पाहिलं. मंदारच बोलणं बरोबर होतं, त्या नाहीच होत्या तिथे बसलेल्या. स्वातीला ते कळलं होतं.
" हे बघा, तुम्ही जास्त विचार करू नका आता. तो तुम्हाला भास झाला असेल. नाहीतर वेगळं काहीतरी. इतरांचे अनुभव सुद्धा असेच होते, विलक्षण जरा. " , 
" असेच म्हणजे ? " . 
" तुम्ही सांगितलं ना… तुम्हाला call आला, मी हरवले आहे. घरी जायचे आहे. वगैरे वगैरे… तसेच इतर जणांना call आले.",
" हो ? ",
" आणि तुम्हाला call आला तेव्हा ६.३० वाजले असतील ना… ",
"तुम्हाला कसं माहित ? " ,
"  कारण इतर जणांनीसुद्धा तेच सांगितलं. शिवाय ६ वर्षापूर्वी मंदारची आई हरवली तेव्हा ६.३० चा कालावधी होता." अक्षता आता गांगरून गेली होती.

" माझ्या सासुंना तेव्हा वयामुळे काही लक्षात राहायचं नाही. नाहीतर त्या हरवल्या तेव्हाच घर शोधत आल्या असत्या. लक्षात राहायच्या त्या फक्त दोन गोष्टी. एक म्हणजे मंदार आणि दुसरं म्हणजे त्याचा मोबाईल नंबर. शिकलेल्या नव्हत्या त्या , पण तो नंबर मात्र त्यांच्या बरोब्बर लक्षात राहिला होता. म्हणून कदाचित तुम्हाला फोन येत होते. " अक्षता नुसतं ऐकत होती. तितक्यात देवळातले पुजारी बाहेर आले. 


स्वातीने त्यांना थांबवलं." काका,… यांना तुम्ही पाहिलंत का देवळात आलेल्या ते… ? " ,
" हो " . 
" या एकट्याच होत्या का ? कि कोणी सोबत होतं ? " ,
" नाही. एकट्याच होत्या आणि काहीसं बडबडत होत्या एका बाजूला बघून. मला वाटलं कि काही माणस देवाकडे साकडं घालतात ना , तसं काहीतरी करत आहेत. " आणि पुजारी निघून गेले.
" पाहिलंत का … त्या पुजारी काकांनी सुद्धा पाहिलं नाही त्यांना. तुम्ही फक्त ५ जण आहात,ज्यांना त्या दिसल्या आणि इथं पर्यंत आल्या. ",

" पण तुम्हाला का दिसत नाहीत त्या, आम्हालाच का दिसल्या ? " अक्षता बऱ्याच वेळाने धीर करून बोलली. 
" माहित नाही का ते आणि त्यांचं काय झालं ते ही माहित नाही मला. पण एक होतं, त्यांचा खूप जीव होता मंदारवर. कधी मंदारला उशिरा झाला तरी त्या घाबरायच्या. त्यांना नेहमी मंदार त्यांच्या जवळच राहावा असं वाटायचं. आता माझा भूत, प्रेत, आत्मा यांवर विश्वास नाही. पण मंदार खूप अंधश्रदाळू आहे. तो म्हणतो ती मला शोधत असेल. म्हणून जो नंबर पहिला मंदारचा होता आणि त्यांच्या लक्षात होता, त्याचं नंबर वर call आले, तेही आजच्याच दिवशी, त्यांच्या वाढदिवशी, त्या हरवल्या त्याचं वेळेला. फक्त त्या या देवळापर्यंत येतात आणि नंतर त्यांचा काही पत्ता लागत नाही. आता ते काय आहे ते मला माहित नाही." अक्षताला काय बोलावं ते कळत नव्हतं. 

" मला वाटते, जे इतरांनी केलं तेच तुम्ही सुद्धा करा. मोबाईल नंबर बदला तुम्ही. आणि मीही पुन्हा अर्ज करते , तो नंबर कायमचा बंद करण्यासाठी.… खूप जणांना त्याचा त्रास होतो आहे. " . अक्षता अजूनही देवळात पाहत होती. 
" मला वाटते, तुम्हाला आता निघायला हवे. खूप लांबून आला आहात तुम्ही." ,
" हो " , अक्षता भानावर आली. " निघते मी , तुम्ही जा तुमच्या घरी. " , 
" Take Care, आणि सांभाळून जा घरी…. Bye Bye. " 

अक्षता निघाली घरी… काय झालं नक्की… आपण खरोखर भेटलो का आजींना… कि भास झाला आपल्याला. विचार करत करत ती त्या गोल बागेजवळ आली. अचानक तिला काहीतरी आठवलं, काकूंना विचारलं तेव्हा त्या काय म्हणाल्या, कि call आलेच नाहीत तर ते मोबाईल वर कसे दिसणार ?… याचा अर्थ काय ?, तिने काकूंना पुन्हा फोन लावला. 

" Hello काकू… " ,
" कोण बोलतंय ? " ,
" अक्षता बोलतेय. ",
"हा बोल गं अक्षता… आजींना घरी सोडलंसं का ? " ,
" ते नंतर सांगते मी. पहिलं तुम्ही माझ्या मोबाईल वर चेक करा जरा… आणि शेवटचा call कोणाचा होता ते सांगा. " ,
" थांब हा जरा. " म्हणत काकूंनी आलेले नंबर चेक केले. 
" हा… तुला मघाशी बोलले ना मी… शेवटचा नंबर शलाकाचा आहे. ",
" आणि त्यांच्या आधी कोणाचा नंबर आहे ? " ,
"मला वाटते कि तो कोणतातरी कंपनीचा सर्विस call आहे. आणि त्यांच्या आधी तुझ्या एका मित्राचा call आहे.", 
" Thanks काकू. " म्हणत अक्षताने call बंद केला.  

मग आजींनी मला call केलेचं नाही का, विचित्र आहे काहीतरी. आजींचा शेवटचा call , या बागेजवळूनच आला होता… इकडे कूठेतरी टेलिफोन बूथ असला पाहिजे. अक्षताने संपूर्ण बागेभोवती फेरी मारली. एकही टेलिफोन बूथ तिच्या नजरेस पडला नाही. हि गोष्ट जरा डोकं सुन्न करणारी होती. तरीही , अक्षताने तिथेच उभ्या असलेल्या, ट्राफिक पोलिसाला विचारलं, "अहो काका… इकडे एखादा टेलिफोन बूथ आहे का कूठे जवळपास ? " , " नाही madam , इकडे नाही आहे कूठेच, परमिशन नाही आहे इथे टेलिफोन बूथ . मोठा रस्ता आहे ना म्हणून. " , "Thank You . " म्हणत अक्षता पुढे आली चालत चालत. तीन रस्त्यांच्या सुरुवातीला आली ती. इकडे त्या आजी घाबरल्या होत्या म्हणून त्या टेलिफोन बूथ मधल्या बाईंनी त्यांना रस्ता सांगितला होता. तो तरी टेलिफोन बूथ असला पाहिजे इथे. तिने पाहिलं सगळीकडे. एका कोपऱ्यात एक टेलिफोन बूथ दिसला तिला. तशी ती धावत गेली तिथे. एक माणूस होता उभा तिथे. " काका… इथून मघाशी कोणी आजींनी फोन केलेला का … ? आणि इथल्या बाई कूठे गेल्या टेलिफोन बूथ मधल्या. ? " . तो माणूस तिच्याकडे बघतच राहिला. " कोण बाई आणि हा टेलिफोन बूथ , मी २ दिवसांनी उघडला आहे, मला बंर नव्हतं म्हणून. मग कोण कसा फोन करेल इथून."  डोकं बधीर होतं आलेलं अक्षताचं.

काकूंचं बोलणं बरोबर होतं मग. संध्याकाळी मित्राचा call आला म्हणून मला जाग आली. तो call , त्यानंतर एक लोन साठी call आलेला आणि नंतर शलाकाचा call आला तो…. म्हणजे मला भास होतं होता… कसं काय… काकूंचा बोलणं तिला आठवलं पुन्हा," call आलेलेच नाहीत तर दिसणार कसे ? " … call आलेलेच नाहीत मला. … आजींनी call केलेलेच नाहीत, म्हणजे आजी…. त्या थंड हवेत सुद्धा अक्षताला घाम फुटला. 

आजींनी … मला चुकून call केलेलाच नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाच्या मोबाईल वर call केलेले होते सगळे. त्यात त्या आईची काही चुकी नव्हती, त्या आईला मुलाशी भेटायचं होतं फक्त… call चुकीचे नव्हतेच मुळी. अक्षताला आठवलं… आपणच तो मोबाईल नंबर निवडून घेतला होता, आवडला होता म्हणून . आजींचा पहिला call आला तेव्हा आपण त्यांना बोललो होतो , कि तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे. call चुकीचा नव्हताचं. तो नंबरचं चुकीचा निवडला होता, चुकीचा नंबर…… Wrong Number …. !!!!    
   
----------------------------------------------------The End-----------------------------------------------

Friday 5 December 2014

Wrong Number…!! ( ( भाग पहिला )

                   " शट् यार…. चार्जर कुठे राहीला…. " अक्षता तिच्या मोबाईलचा चार्जर शोधत होती घाईघाईत. कुठे ठेवला ते तिला आठवतंच नव्हतं. तशी अक्षता विसळभोळी नव्हती. तरीही आज तिला चार्जर भेटतच नव्हता. खूप शोधला पण चार्जर समोर येण्यास तयार नव्हता. 

                  आता अचानक चार्जरची आठवण कशी झाली ? .  काल ऑफिसमधून उशिरा घरी आली अक्षता. मोबाईल तसाच बेडच्या बाजूला ठेवून झोपी गेली. खूप दमलेली ती ना. नाहीतर रोज ऑफिस मधून आल्या आल्या , खूप लोकांसारखी ती सुद्धा प्रथम मोबाईल charging ला लावते. बरं, रात्री मोबाईल charge केला तरी, सकाळी सुद्धा ऑफिसला जाण्याआधी तिला मोबाईल charge करण्याची सवय. त्यात आज रविवार. सुट्टीचा दिवस म्हणून रोज लवकर उठणारी अक्षता, आज जरा बेडवरच झोपून Time-pass करत होती. आज काही घाई नाही, धावपळ नाही. मस्त time-pass करायचा आज. बेडवर पडल्या पडल्याच मोबाईल वरून तिची chatting चालू होती , friends नी काय काय post केलं आहे FB वर ते चेक करत होती, कोणाचा वाढदिवस आहे वगैरे. सगळी काम झोपूनच चालू होती. 

                थोडयावेळाने तयार होऊन घरातली कामे सुरु झाली. आवराआवर , केरकचरा वगैरे गोष्टी झाल्या आरामात. ऑफिस नसल्याने डब्बा करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुपारचे जेवण बाहेरून मागवले , छानपैकी एकदम. त्यात मध्ये मध्ये मोबाईल बरोबर चाळे चालू होते तिचे. भरपेट जेवून , TV बघत बघत छान दिवस गेला. दुपारची मस्त झोप काढून झाली होती तिची. संद्याकाळचे ५ वाजले तेव्हा तिच्या मोबाईलच्या रिंगने तिला जाग आली. मित्राचा call आला होता. त्याच्या बरोबर जरा वेळ बोलून झाले आणि तिचे लक्ष मोबाईलच्या Battery indicator गेलं. " १६%" एवढीच charging राहिली होती मोबाईल मध्ये. तेव्हा तिला चार्जरची आठवण झाली आणि लागलीच ती चार्जर शोधायला लागली.   

               अर्धा - पाऊण तास कसा गेला कळलंच नाही , चार्जर नव्हताच घरात. ऑफिसच्या bag मध्ये नव्हता. रोजच्या ठिकाणी नव्हता. मोबाईल charge तर केलाच पाहिजे नाहीतर तो बंद होईल. आणि एकदा का मोबाईल बंद झाला कि जवळपास सगळ्या जगाशी संबंध तुटण्यासारखे. सगळे contacts त्यात save केलेले, पाठ कशाला करायला पाहिजे. chatting बंद होईल, FB Update कुठे पाहणार ? , news कश्या कळणार ? . अक्षताला काहीच आठवत नव्हतं. मेंदूवर जरा ताण देऊन तिने आठवण्याचा प्रयन्त केला. काल रात्री, उशिरा आले म्हणून charging लावलं नव्हतं. मग चार्जर bag मधून काढलाच नाही. bag मध्ये तर चार्जर नव्हताच. म्हणजे तो bag मध्ये ठेवलाच नाही. ऑफिस मधून निघताना घाईघाईत तिकडेच राहिला वाटते चार्जर. 

              आता ती काहीच करू शकत नव्हती. शेजारच्या काकूंकडे असा चार्जर आहे, हे तिला आठवलं तशी ती काकूंकडे धावत गेली. पण काकूंचा दरवाजा बंद…… बाहेर गेल्या होत्या कुठेतरी . आता आली ना पंचाईत… आता कुठे जाणार ? , …. मोबाईल तर charge करावाच लागेल नाहीतर तो बंद होईल. निराश होऊन अक्षता तिच्या रूममध्ये आली. मोबाईलचा वापर आता कमीतकमी करावा लागेल, battery फार कमी राहिली आहे. कोणाचा call आला तरी battery कमी होणार, काय करायचं ? काय करायचं ? अक्षता विचार करत बसली होती. 

             घड्याळाकडे पाहिले तिने…. संद्याकाळचे ६.१५ वाजले होते.  काकू आल्या कि पटकन चार्जर घेतला पाहिजे त्यांच्याकडून……… नाहीतर उद्या direct ऑफिसमधे गेल्यावरच चार्जर मिळणार…. " काकू लवकर या…लवकर या…" अक्षता मनातल्या मनात बोलत होती.  इतक्यात मोबाईल वाजला.…. अनोळखी नंबर , " कोणी call केला आता ? " त्रासिक चेहऱ्याने अक्षता मनातल्या मनात बोलली….   " Hello… कोण बोलतंय… " , " हेलो… बाळा… कुठे आहेस तू ? " , बाळा … ?   कोण बाळा …. ?.. " Hello, कोण पाहिजे तुम्हाला ? " , " अरे… तू कोण…. सून बाई का ? " , " नाही …. तुमचा wrong number लागला आहे…sorry. " म्हणत अक्षताने call,  cut केला. पाचंच मिनिटे झाली असतील, पुन्हा call आला.  " हेलो… मंदार…. कुठे आहेस रे तू … " , अक्षताने ओळखलं…. तोच आवाज होता… " Hello,…… हा Wrong Number आहे. तुम्ही चुकीचा Number लावला आहे. ", म्हणत अक्षताने पुन्हा call , cut केला.   

            १० मिनिटे गेली असतील… अक्षता बाल्कनीत उभी होती. मोबाईलची रिंग वाजली पुन्हा, अनोळखी नंबर.  परंतू मघाशी आलेल्या २ call पेक्षा वेगळा नंबर होता. म्हणून अक्षता ने call उचलला. " हेलो… " , " Hello …… कोण बोलतंय ? " , अक्षताने विचारलं. " हेलो, मंदार आहे का ? " अक्षताने यावेळीही ओळखलं , तोच आवाज होता.  एका वयस्कर अश्या , जवळपास ६०-६१ वय असलेल्या बाईंचा आवाज होता. पण यावेळी अक्षताला जरासा राग आला. 

              एकतर मोबाईलची battery कमी, त्यात चार्जर ऑफिसमध्ये राहिला, वरून तिसऱ्यांदा तोच Wrong Number.…" अहो.... तुम्हाला काही कळते का नाही…. दोनदा सांगून सुद्धा… हा Wrong Number आहे , मस्करी खूप झाली हा तुमची…. ", पलीकडून काहीच आवाज आला नाही. थोडयावेळाने मात्र पलीकडून कोणीतरी बोललं, " माफ करा हा…. मला काही सुचत नाही आहे म्हणून हा एकच नंबर पुन्हा पुन्हा लावत आहे…. माफ करा मला. "   यावेळीस पलीकडचा आवाज जरा घाबरा-घुबरा वाटला. अक्षताला जरा गडबड वाटली, तिनेच विचारलं , " Hello madam, …………आहात का …. काही प्रोब्लेम आहे का तुम्हाला ? " पलिकडून आवाज आला , " काही नाही…मी जरा घरचा रस्ता विसरले आहे गं " , " रस्ता विसरलात …. अरे बापरे…. काही आठवते आहे का ते बघा. " अक्षता म्हणाली.  " नाही गं पोरी…. मला आठवतच नाही आहे कुठे जायचे ते… आणि आता वय पण झाले आहे , कुठे राहणार या वयात लक्षात. " अक्षताला त्याच्या आवाजावरून कळत होते कि , आजी खरं बोलत आहेत ते. त्यांच्या आवाजात कमालीची भीती जाणवत होती. " ठीक आहे आजी ………… तुम्हाला आजी बोललं तर चालेल ना " , " हो गं पोरी …. चालेल ."," तुम्ही असं करा…. थोडं आठवण्याचा प्रयन्त करा,…… नक्की आठवेल काहीतरी तुम्हाला . ठीक आहे ना ." अक्षता म्हणाली. " आठवते हा पोरी…. बरं वाटलं गं तुझ्यासोबत बोलून " आणि आजींनी फोन cut केला.   

                 अक्षताने लगेच मोबाईलच्या " battery indicator " वर लक्ष टाकलं. " १४%" शट्ट यार…. काकू लवकर यायला हव्या… , नाहीतर मोबाईल बंद होईल माझा.…. अक्षता मनातल्या मनात बोलत होती. अजून काही मिनिटे गेली असतील… अक्षताचा मोबाईल पुन्हा वाजला. अनोळखी नंबर…. call उचलला. " Hello… ? " ," Hello Madam, नमस्कार…मे Loan के बारे मे आपसे २ मिनिट बात कर सकता हुं ? "  ते ऐकून अक्षताच्या डोक्यात आग गेली. काहीही न बोलता तिने call cut केला. यांना काय दुसरं काम नसते वाटते, कोणालाही कधीही call करतात. एकतर मोबाईलची battery कमी, त्यात call वर call. पुन्हा फोनची रिंग वाजली. Unknown Number…. काहीही न बोलता तिने मोबाईल कानाला लावला, " हेलो …. हेलो … मंदार आहे का ? " , अक्षताने ओळखलं पुन्हा…. त्याच आजी…

                  " Hello…. आजी, तुम्ही परत मलाच फोन लावला आहात. तुमच्या मुलाचा नंबर वेगळा आहे. हा माझा नंबर आहे, माझं नावं अक्षता , तुमच्या मुलाचा नंबर वेगळा असेल, हा नाही. " , " माफ कर हा पोरी…. अगं हाच नंबर आहे ना माझ्याकडे . म्हणून पुन्हा लावला फोन. " , "असं करा . तुमच्या मुलाचा दुसरा नंबर असेल तो मला द्या.…. मी करते call त्याला. " , " नाही आहे गं. " , आजी म्हणाल्या. " नाही आहे म्हणजे ? , असेल बघा . तुमच्या मोबाईलमध्ये असेल बघा. " अक्षता म्हणाली. " मोबाईल कुठे आहे गं पोरी माझ्याकडे…आणि तो मला कळतच नाही कसा वापरायचा…" , " मग तुम्हाला हा नंबर कोणी दिला ? " , " अगं …मंदारने तो माझ्या बटव्यात ठेवला होता कधी …. ऐका कागदावर लिहून ठेवला होता. म्हणून तो नंबर पाहून मी फोन करते आहे. "  


                   अक्षताला आता काहीतरी आहे हे वाटायला लागलं होतं. या आजी खरंच हरवल्या आहेत आणि इकडून तिकडे फिरत आहेत… बापरे ! … " आजी !!   तुमच्याकडे मोबाईल नाही, मग घरातून बाहेर कशाला पडलात आणि एकट्या कशाला आलात बाहेर ? …. बघा ना काहीतरी आठवेल तुम्हाला , घर कुठे आहे ते …. " , " नाही गं आठवत मला …. माझं वयही झालं आहे आता आणि सध्या तर काहीच लक्षात राहत नाही.… रोजच्या औषधांच्या गोळ्या घ्यायला विसरते, कधी कधी सकाळी आठवतच नाही कि देवपूजा केली ते , मग दोनदा - तीनदा देवपूजा करते मी . ते सगळं लांब राहिलं.…. मला माझचं नावं आठवत नाही आता. " असं म्हणत त्या आजींना जरा हसायला आलं. पण इकडे अक्षताला tension आलं होतं. 

                " आजी …. तुम्हाला आठवत नाही ना काही…मग घरातून कशाला एकटया बाहेर आलात. कोणाला तरी घ्यायचे ना सोबत… " , " होता गं मंदार बरोबर… पण आमची गर्दीत चुकामूक झाली आणि तो कुठे गेला ते कळलंच नाही मला… तेव्हा पासून शोधते आहे त्याला मी. " जरा विचित्र होतं ते , मुलगा सोबत असताना आजी हरवल्या कश्या ?…. काय करायचं आता , " OK …. आजी ठीक आहे… तुम्हाला घरी जायचे आहे ना, मी सांगते तुम्हाला पत्ता. आता तुम्ही कुठे आहात ते सांगा पहिले… " पलीकडून आजींचा आवाज आला नाही… थोडयावेळाने आजी बोलल्या, " माहित नाही गं , …… मला नाही कळत मी कुठे आहे ते … ", " आजी , आजूबाजूला कोणी असेल त्याला विचारा ना …. नाहीतर कूठे काही लिहिलं असेल ते वाचून सांगा मला . " , " पोरी…. मी गावची राहणारी… मला काही लिहिता वाचता नाही येत गं आणि या शहरात तर सगळेच अनोळखी मला. कोणाला विचारू मी. भीती वाटते मला." …. अडचणींवर अडचणी., आजींना काय सांगू आता…. खूप वेळ झाला होता बोलता बोलता. तिने battery indicator नजर टाकली. " १० % " … आजींचे बरोबर होते, गावची जुनी लोकं शिकलेली नसतात. त्यात ती सहसा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलत नाहीत. 

               " Hello आजी…. चालेल, नका बोलू कोणाशी…. असं करा… तुमच्या आजूबाजूला काय आहे ते सांगा मला… आणि फोन करा मला. " आजींनीच फोन बंद केला.…. काय नक्की कळत नव्हतं अक्षताला…. कदाचित त्यांचा मुलगाही हरवला असेल… नाही, मोठा असेल मुलगा त्यांचा, मघाशी त्या सूनबाई पण बोलल्या होत्या… म्हणजे लग्न झालेलं आहे मुलाचं. तरी ते दोघे हरवले…. विचार करत होती अक्षता आणि फोन वाजला , " हेलो… अक्षता का … ? " , " हा …. हेल्लो , बोला आजी…आता कूठे आहात तुम्ही,  ते सांगा मला. " , " हा… इकडे ना एक बाग आहे… तिकडे उभी आहे मी. " , " तसं नाही, तुम्ही नाशिक मध्येच आहात ना… ? " , " हो…  हो… " , "ठीक आहे , पण नाशिक मध्ये खूप बागा आहेत. असं काही वेगळं आहे का ? ", "हा… हा… , बागेच्या तोंडावर ना एक हत्तीची मूर्ती आहे गं , पांढरी. ", अक्षताला एकदम आठवलं. एक बाग होती अशीच , नाशिक रेल्वेस्टेशन पासून जवळच. म्हणजेच आजी स्टेशन परिसरात आहेत कुठेतरी…. आजी कूठे आहेत ते कळलं. " OK, आजी, मग तुम्ही कुठे राहता ते आठवा जरा पुन्हा एकदा. ", " नाहीच आठवत गं , खरचं . ".  काय करावं…आजी बोलल्या होत्या कि त्यांना देवपूजेची आवड आहे.…. " आजी , तुमच्या घराच्या आजूबाजूला काही आहे का , एखादी इमारत , मंदिर वगैरे… आठवा जरा . " . थोड्यावेळानंतर आजी बोलल्या , " हो… गं, माझं घर आहे ना, ते एका इमारतीत आहे. त्या इमारतीचं नाव नाही आठवत मला पोरी. त्या इमारतीच्या शेजारी एक मोठ्ठ मंदिर आहे , गणपतीचं…. गोल मंदिर आहे ते . " , " ठीक आहे, आजी. मला थोडयावेळाने फोन कराल का , मी आठवते कुठे मंदिर आहे ते . आणि तुम्ही कुठे जाऊ नका हा … असाल तिकडेच राहा. " म्हणत अक्षताने call cut केला. 

               अक्षता सुद्धा नाशिकला राहायची. पण स्टेशनपासून खूप लांब राहायची. तसं तिला नाशिकला येऊन ५ वर्ष झाली होती. आई-वडील कोल्हापूरला राहायचे. अक्षता जॉबसाठी नाशिकला राहत होती, एकटीच. ती राहत असलेली रूमसुद्धा भाडयाची होती. अक्षता जरी एकटी राहत असली तरी ती खंबीर होती. कितीही कठीण परिस्तिथी समोर आली तरी घाबरून जायचे नाही हे तिला माहित होतं. त्यामुळेच ती स्वतंत्र, एकटी राहू शकली होती. तशी ती जॉब मधेच बीझी असायची, तरीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती शहरात भटकायला जायची एकटीच . अक्षताला नाशिक शहर बऱ्यापैकी कळलं होतं आता. कोणता रस्ता कुठे जातो , एखादा short-cut वगैरे तिला चांगलं माहित झालं होतं. असचं एकदा फिरता फिरता ती त्या गोल मंदिराजवळ गेलेली हे तिला आठवलं… जरा मेंदूवर अधिक ताण दिला तेव्हा तिला आठवलं ते , " हो…. अगदी बरोबर… मी गेले होते तिथे, दोनदा. आणि एक short-cut पण शोधला होता मी तिथे जाण्याचा… " … आणि तेव्हाच त्या आजींचा विचार तिच्या मनात आला, शट्ट यार…म्हणजे आजी कित्ती लांब आहेत त्यांच्या घरापासून. … बापरे !! … अक्षता विचार करत होती आणि फोन वाजला. " हेल्लो अक्षता, " , " हा आजी… मला कळलं आहे कि तुमचं घर कुठे आहे ते … " , " कळलं का !!! …. खूप खूप आभारी आहे गं पोरी तुझी… " , किती आनंद होता त्या आवाजात. " आजी , एक अडचण आहे पण … " , " काय गं पोरी … ? " , " मला त्या Area चं , त्या विभागाचे नावं नाही माहित… मग तुम्हाला काय सांगू मी " आजींना बहुतेक वाईट वाटलं असावं , कारण त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. " Hello…. आजी…. आजी… " , " हो...ग… पोरी…. काय करायचं आता ? " , अक्षता विचारात पडली. " कुठे आहे गं घर माझं, सांग मला मी जाते … " आता आजींना कसं सांगायचं कि त्या किती लांब आहेत घरापासून…. काय सांगू …काय सांगू …   

              आजी मघाशी बोलल्या होत्या, त्यांच्याकडे बटवा आहे. बटवा म्हणजे म्हाताऱ्या, जुन्या लोकांची पर्स, पाकीट. त्यात पैसे तर असतीलच. शिवाय मघापासून त्या call करत होत्या, कदाचित टेलिफोन बूथ वरून. असतील त्यांच्याकडे पैसे मग… " हेलो आजी…. तुम्ही म्हणालात ना मघाशी… तुमच्या मुलाने फोन नंबर लिहून ठेवला होता बटव्यात … "," हो " ," मग तुमच्या बटव्यात पैसे पण असतील ना… "," आहेत गं … पण एक- दोन रुपयाची नाणी आहेत… जास्त नसतील गं… तेच वापरते आहे फोन करायला… "," तरी सुद्धा किती असतील … मोजता का जरा… "," थांब जरा… फोन नाही बंद करत मी … थांब. " म्हणत आजी नाणी मोजू लागल्या.  " अक्षता … ? आहेस का ग पोरी " ," हा बोला आजी… किती आहेत ? ", " जास्त नाही… १६ रुपये आहेत फक्त. " 

              १६ रुपये…. या आजी पण ग्रेट आहेत. आणि त्यांचा मुलगा त्यांच्याहून ग्रेट… १६ रुपयात काय होते… ते सुद्धा चिल्लर. रिक्षावाला, तो घेणारसुद्धा नाही रिक्षात. आजी खूप मोठ्या संकटात आहात तुम्ही. अक्षता मनातल्या मनात बोलत होती , " हेल्लो पोरी… बोल काही… पैसे कशाला पाहिजे होते. " ," आजी , मला नाही. रिक्षाने घरी गेला असता ना तुम्ही. आता १६ रुपयात कश्या घरी जाणार तुम्ही ? " , " अगं… रिक्षाने मंदार असला तरच जाते मी, ते रिक्षावाले अजिबात आवडत नाहीत मला . मला बस सांग ना एखादी…. बसने जाते मी… " , " आजी तुम्ही राहता तिथे बस नाही जात कोणती…. एक जाते, ती सुद्धा खूप लांब थांबते… आता मलाच tension आलं आहे आजी. तुम्ही जाणार कश्या घरी…. " थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. आजीचं बोलल्या मग. " पोरी, मला सांगशील का रस्ता… ? तुला माहित आहे ना… मी जाते चालत चालत… " , " अहो… आजी. , तुम्हाला माहित नाही , तुम्ही किती लांब आहात ते घरापासून. आणि मी सुद्धा राहते , ती विरुद्ध दिशेला. नाहीतर मीच आले असते तुम्हाला घरी सोडायला. " , " नको गं पोरी … , तू सांग मला कसं जायचे ते , मी जाते चालत चालत. " अक्षता काय बोलणार आता. दुसरा option च नव्हता., " आजी , …. तुमचं घर खूप लांब आहे, सरळ रस्त्याने जरी चालत गेलात तरी ४५ मिनिटे लागतात. आणि short cut ने गेलात, म्हणजेच गल्ली-बोळातून गेलात तर ३० मिनिटे लागतील. तुम्ही चालू शकता का एवढं ? " , " हो… गं, गावाला असताना मी खूप चालायची. आता पण चालते. वय झालं असलं तरी पायात ताकद आहे अजून माझ्या. तू सांग मला कसं जायचे ते. मी जाते चालत. " , ते ऐकून अक्षताला जरा हुरूप आला. , " चालेल आजी, मी सांगते तुम्हाला तुमच्या घरी कसं जायचे ते." , " पण सगळा रस्ता नको सांगूस मला. माझ्या काही लक्षात राहत नाही. तू सांगशील पण विसरून जाईन मी. " ,  हो… ते सुद्धा बरोबर आहे. त्यांना लक्षात राहत नाही काही. आणि त्यांना सांगितलेले short-cuts जर त्या विसरल्या तर कुठल्या कुठे जातील भटकत. पुन्हा प्रोब्लेम.    

                 अक्षताला पुन्हा आठवलं काहीतरी… त्या वेगवेगळया गल्यांमध्ये , short-cuts मध्ये, कुठे ना कुठे , एखादं दुसरा टेलिफोन बूथ आहेच. लगेच तिने आजीना सांगितलं , " आजी… आपण असं करूया…, मी तुम्हाला लहान लहान वाटा सांगते. म्हणजे तुम्ही विसणार नाही. " , " हो… चालेल चालेल. " , " मग तुम्ही मी सांगितलेल्या गल्लीत किंवा रस्त्यावर पोहोचलात कि तिथून मला फोन करा. तिथे वाटेवर खूप टेलिफोन बूथ आहेत. मला फोन केलात कि मग तुम्हाला पुढचा रस्ता सांगेन. चालेल ना. " , " चालेल चालेल पोरी … " आजींच्या आवाजात खूप आनंद होता, अक्षताला सुद्धा बरं वाटलं जरा. " चला आजी , मग सुरुवात करूया… तुम्ही तयार आहात ना ? " , " हो… " , " तुमचं काही सामान वगैरे असेल तर ते घ्या बरोबर.… तुमचा बटवा, bag, चष्मा… " , " सामान नाही आहे गं आणि बटवा… तर कमरेला बांधलेला आहे. चष्मा वाटते मी घरीच विसरली . " म्हणजे आजींकडे चष्मा सुद्धा नाही. मग चालत कश्या जाणार घरी आता. " आजी… चष्माशिवाय दिसते का तुम्हाला ? . " , " तसं दिसते गं… पण रात्रीच नीटसं दिसत नाही… कोणी बाजूला उभा असलं तरी नाही दिसणार मला. " अक्षताने घड्याळाकडे पाहिलं. संद्याकाळचे ६.३० वाजले होते. अर्ध्या तासात अंधार होईल आता. घाई करायला हवी. " आजी, आपल्याला घाई करायला हवी आता…. अर्ध्या तासात रात्र होईल , त्या अगोदर घरी पोहोचायला हवं तुम्हाला. " , " हो गं पोरी…. तू सांग मला कुठे कसं जायचे ते लवकर. " आजींच्या आवाजात लगबग होती. 

               " ठीक आहे आजी…. आपण सुरुवात करूया. मी सांगते तश्याच चालत जा म्हणजे आपण लवकरात लवकर पोहचू. " , " हो… हो . " , "चला… नीट लक्ष देऊन ऐका… तुमच्या समोर बाग आहे ना… पांढरा हत्ती. " ," हा… मग तुम्हाला, त्या हत्तीच्या बाजूला एक रस्ता दिसत असेल ना. " , " हो…  आहे एक रस्ता. " , " हा… मग त्या रस्त्याने चालायला सुरुवात करा. तो बहुतेक ५ मिनिटात संपेल.… तो रस्ता संपेल ना , तिकडे गेल्यावर अजून चार रस्ते आहेत. तुम्ही असं करा, तो रस्ता संपला कि मला तिथूनच फोन करा. आणि नक्की फोन करा. चला. " , " करते हा मी फोन तुला… " म्हणत आजींनी फोन बंद केला.     

             फोन अक्षताने बेडवर ठेवला. " ८%" battery राहिली होती मोबाईलची…. या आजी जातील ना बरोबर, वयस्कर आहेत. थोडयावेळाने काळोख पडेल. कश्या जातील. ते जाऊ दे, रस्ता पूर्ण आठवायला पाहिजे आपल्याला. Laptop असता तर Map वरून शोधून काढला असता ना… पण Laptop कुठे घरी आणायला देतात ऑफिसवाले… आठवं रस्ता अक्षता. short-cut , आठवं… आठवं, या काकू कधी येणार काय माहित ? … चार्जर तरी घेतला असता ना… आजींचा call कसा आला नाही अजून… पोहोचल्या का बरोबर… , कि विसरल्या पुन्हा. कितीतरी विचार अक्षताच्या डोक्यात एकाच वेळेस. १-२ मिनिटे गेली असतील, फोन वाजला अक्षताचा, " हेल्लो अक्षता , पोहोचले गं मी… बरोबर अगदी. " ,अक्षताच्या जीवात जीव आला. " छान आजी… आता मला सांगा , समोर काय दिसते ते. " , समोर ना … चार रस्ते आहेत अजून , कुठे जाऊ नक्की. ? " अक्षताने डोळे बंद केले आणि विचार करू लागली. 

                  चार रस्ते… आपण पण असेच गोंधळलेलो होतो तेव्हा, त्यातला एक रस्ता हा त्या मंदिरापर्यंत जायचा, short-cut होता. तिथूनच मग वेगवेगळे लहान रस्ते त्या मंदिरापर्यंत सोडतात. पण चारपैकी नक्की कोणता ? . आजींना काही वाचता येत नाही. नाहीतर कळलं असतं काहीतरी., " आजी , तुम्हाला त्या चार रस्त्यांच्या आजूबाजूला काय दिसते आहे ते सांगा मला. " , " हा… हो … हो. सांगते. हा एका रस्त्याच्या बाजूला एक मोठी काचेची इमारत आहे. दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला , ते रस्त्यावरचे पोलिस असतात ना, त्यांची बसायची जागा आहे वाटते, तिसऱ्या रस्त्याच्या बाजूला , एका ठिकाणी लोकं रांगा लावून उभी आहेत, काहीतरी आहे वाटते तिथे. आणि चौथा रस्ता खूप्प मोठ्ठा आहे गं… " , " बरं आजी ", अक्षता विचार करू लागली. तिच्या नजरेसमोर तो रस्ता येऊ लागला हळूहळू. चौथा रस्ता म्हणजे महामार्ग. , तिसऱ्या रस्त्यावर लोकांनी रांगा लावल्या आहेत, पण कशाला ? . जाऊ दे. दुसऱ्या रस्त्यावर ट्राफिक पोलिसांची चौकी आहे. आणि पहिल्या रस्त्यावर काचेची इमारत म्हणजे बँक आहे…. यापैकी कोणत्या रस्त्याने मी गेले होते… ?  

                  तेव्हाच तिला काहीतरी आठवलं… चालता चालता तिला तहान लागली होती. आणि तिथेच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन तिने कोल्ड ड्रिंक घेतलं होतं. Yes…. बरोबर , त्या हॉटेलमध्ये गर्दी असते, खाण्यासाठी. आणि हॉटेल लहान असल्याने तिथे बाहेरच लोकांच्या रांगा लागतात. तोच रस्ता … तिसरा रस्ता !! , " आजी… आजी !!   तुम्ही तिसऱ्या रस्त्यावरून पुढे चालत राहा. त्या रस्त्यावरून जरा पुढे गेलात कि एक मोठ्ठ वडाचे झाड दिसेल तुम्हाला… मला तरी आठवते कि तिकडे एक झाड होते. कळलं ना कसं जायचे ते… " , " हो…  हो , तू पुढे सांग " , " हा… मग त्या झाडाच्या अगदी बाजूलाच एक वाट दिसेल तुम्हाला. तिथून पुढे चालत जा… आणि ती वाट संपली कि तिथूनच मला पुन्हा फोन करा. चालेल ना, आहे ना लक्षात सगळं… ? " , " हो…ग अक्षता , आहे लक्षात. " , " माझा नंबर तेवढा विसरू नका… नक्की फोन करा मला , वाट पाहते आहे मी तुमच्या फोनची. " आणि फोन cut केला अक्षताने. 

                  battery - : ७ % , प्रत्येक call बरोबर battery ही कमी होत होती.… काकू आल्या आहेत का ते बघू. अक्षता बाहेर आली. अजूनही काकूंचा दरवाजा बंद. तशीच रूम मध्ये आली अक्षता. पण आजींकडे माझा नंबर कसा ?  त्या तर बोलल्या , कि हा नंबर त्यांच्या मुलाने एका कागदावर लिहून त्यांच्या बटव्यात लिहून ठेवला होता, कधी गरज लागली तर call करण्यासाठी. मग त्याच्याकडे तरी माझा नंबर कसा ?  का त्याने असाच उगाचच काहीतरी नंबर लिहायचा म्हणून लिहिला असेल. पण तो असं का करेल ?  शिवाय आजींना माहित असेल कि या नंबर वर फोन केला कि त्यांच्या मुलाला फोन लागतो ते . म्हणजेच आजींनी या नंबर वरून आधीसुद्धा call केले असतीलच ना… त्याचं आणि त्यांच्या मुलाचं या नंबर वरून बोलणं झालं असेलच आधी कधीतरी. म्हणूनच आजी सारखा हाच नंबर लावत होत्या. अक्षताचं डोकं भणाणून गेलं अगदी. डोकं शांत झालं तसं तिच्या लक्षात आलं काहीतरी. एका वर्षापूर्वी, तिचा मोबाईल हरवला होता. आणि नवीन मोबाईल सोबत नंबरही नवीनच घेतला होता तिने. बरोब्बर… !!!  आता कळलं मला, आजींच्या मुलाने सुद्धा नवीन नंबर घेतला असेल सीम कार्ड चा. आणि त्याचा जुना नंबर माझ्याकडे आला असेल. त्याने आजींना नवीन नंबर दिला नाही किंवा विसरला. आजींकडे तोच जुना नंबर आहे. आणि त्यामुळेच त्या मला फोन लावत होत्या. असा प्रकार आहे सगळा. अक्षता मनातच खूप बोलत होती. 

                  लवकरच आजींचा फोन आला, " हेलो अक्षता… पोहोचले गं मी… आता पुढे सांग… " , " आजी…  आता समोर काय दिसते आहे ते सांगा मला. " , " समोर ना… दोन लहान गल्ल्या आहेत वाटते. " , " बरोबर… त्यांच्या आजूबाजूला काय आहे ते सांगा मला. " , " मला वाटते ना, एका गल्लीच्या तोंडावरच साड्यांचे दुकान आहे. " , " तुम्हाला दिसते आहे का ते तिथून. ? " , " हो… गं, समोरच साड्या दिसत आहेत मला, काचेतून. ", आजींच्या आवाजावरून त्या खूष वाटतं होत्या. आजीबाईना साड्या आवडतात वाटते. " आज्जी… तुम्हाला आवडतात वाटते साड्या. " , " हो… खूप आवडतात. आज बघ ना, मंदारने नवीन साडी आणून दिली. " अक्षताला जरा गंमत वाटली. किती खूष होत्या आजी. तिलाही जरा विचारावंसं वाटलं. " कोणत्या रंगाची साडी दिली मंदारने तुम्हाला ? ". " अगं अक्षता… मला ना निळा रंग खूप आवडतो. म्हणून त्याने निळ्या रंगाची साडी आणली, त्याला ना छान अशी मोराची नक्षी पण आहे. तीच साडी नेस म्हणाला, आपण फिरायला जाऊ, छानपैकी नेसली साडी, फिरायला आलो आणि हरवली मी. " बोलताना आजींच्या आवाजात जरा दुःख जाणवलं. " काळजी करू नका आजी. " यावेळात अक्षताने पुढचा रस्ता आठवला होता. तिनेही ते साडीचे दुकान पाहिले होते. ती गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीतून जायचे होते. " आजी , तुम्ही पोहोचाल घरी लवकर. …. तुम्ही त्या दुसऱ्या गल्लीतून चालत जा. आणि गल्लीच्या शेवटी पोहोचलात कि फोन करा. " , " बरं … बाई . " म्हणत आजींनी फोन ठेवून दिला.  

                 मोबाईलची battery " ५ %"… घड्याळात संद्याकाळचे  ६.४५ …अक्षता पुढचा रस्ता आठवू लागली. आता १५ मिनिटांचा रस्ता राहिला आहे फक्त. आजी काळोख व्हायच्या आत घरी पोहोचतील. त्यांच्या Area मध्ये पोहोचल्या तरी खूप झालं. तिथे कोणीतरी ओळखीचं भेटेल त्यांना. मग जातील घरी. अक्षता फोनची वाट पाहत होती. अक्षताला करमत नव्हतं. T.V. लावू का ?  नको उगाच… लक्ष विचलित होईल माझं. ती तशीच बाल्कनीत आली. रस्त्यावरून चालणाऱ्या गर्दीकडे उगाचच बघत उभी राहिली. काही वयस्कर मंडळीही चालत होती , फुटपाथ वरून. त्यांना पाहून , त्या फोनवरच्या आजींची प्रतिमा तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ६० च्या आसपास असेल वय… , आवाजावरून तसंच वाटते, केस पिकलेले असतील. चष्मा तर घरीच राहिला. निळ्या रंगाची साडी, आवडता रंग. त्यावर मोराची नक्षी. छानच एकदम… मुलासोबत फिरायला आल्या आणि हरवल्या. गावात राहणाऱ्या ,  शहरात मुलाकडे आल्या असतील कदाचित भेटायला. लिहिता - वाचता येत नाही. आणि अनोळखी व्यक्ती बरोबर बोलायची सवय नाही. नाहीतर,  एव्हाना विचारत विचारत घरी पोहोचल्या असत्या. बटव्यात असतील २० - २२ रुपयांची चिल्लर, फोन करण्यात ४-५ रुपये गेले असतील, उरले १६ रुपये. , १६ रुपयात रिक्षावाले त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत, बस तर जातंच नाही तिकडे . शिवाय आजींना रिक्षावाले आवडत नाहीत. त्यात आजीबाईना विसरण्याची सवय.…. या वयात नाहीच राहत काही लक्षात… मला वाटते त्यांची स्मरणशक्ती कमी असावी. घराचा पत्ता माहित नाही, इमारतीचं नाव माहित नाही… स्वतःच नावं विसरल्या… मुलाचं नावं तेवढं लक्षात आहे, शेवटी आई कसं विसरणार मुलाचं नावं…   

                  आजींचा फोन आला , अक्षताने लागलीच तो उचलला. " हेल्लो अक्षता … आहेस का गं ? " , " हो… आजी, बोला… तुम्ही कूठे पोहोचलात ? " , " हो गं… आले मी… इकडे गल्लीच्या तोंडावर.","ठीक आहे आजी , पुन्हा सांगा काय आहे समोर ? " , " हो … हो, समोर ना , ३ गल्ल्या आहेत.… कुठे जाऊ ? " , अक्षता विचार करू लागली. ३ तीन गल्ल्या कुठे होत्या.… दोनच तर होत्या. आजी चुकल्या तर नाही ना… " आजी… मी सांगितलं तसंच गेलात ना . " , " हो गं पोरी , साडीच्या  दुकानाची गल्ली सोडून दुसरी गल्ली… बरोबर ना… " ," हो " . मग तिसरी गल्ली कुठून आली… माझ्या आठवणीत तर २ रस्ते होते, नवीन रस्ता बनवला वाटते. " OK … काय आहे ते सांगा समोर तुमच्या. " , " तसं काही सांगता येत नाही गं. " , " काय झालं आजी… " , " अगं काळोख होतो आहे ना . मला जरा भीती वाटायला लागली आहे. " बरोबर होतं… काळोख होत होता. " आजी , घाबरू नका तुम्ही. तुमचं घर आता जवळ आलं आहे. "," मलाही घरी जायचे आहे गं पोरी . " , " जायचे आहे ना… मग सांगा , काय आहे समोर  ?" , " एका ठिकाणी ना, विहीर आहे बहुतेक , कदाचित … दिसत नाही एवढं स्पष्ट, दुसऱ्या वाटेवर… लहानसं घर आहे. तिसरी वाट फारशी नीट दिसत नाही मला. काय करू ? " , अक्षताला नीटसं आठवत नव्हतं. कोणती वाट नेमकी ?  विहीर तर होती तिकडे. तिला ते आठवलं. तिसरी वाट ?  आणि ते दुसऱ्या वाटेवरच घर. ते कधी पासून होते तिकडे. मोठी पंचाईत. अक्षताला हे आठवत होतं कि एका वाटेवरून गेलं कि त्या वाटेच्या शेवटी , एक गोलाकार बाग लागते. परंतू कोणती वाट ते कळत नव्हतं. 

                   " आजी, मला नीटसं आठवत नाही आहे आणि तुम्हाला काळोखात दिसत नाही आहे. एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला आजी आता . " , " काय गं ? " , " तिथे आसपास , शेजारी कोणी असेल ना. त्यांना विचारावं लागेल. ",  आजी त्यावर काही बोलल्या नाहीत. " हेल्लो… हेल्लो , आजी आहात ना ? " , पलीकडून काहीच आवाज नाही. " आज्जी … आज्जी … " , मग आजी बोलल्या. " कोणाला विचारू… मला भीती वाटते गं. " , " आजी , घाबरू नका. तुम्हाला घरी जायचे आहे ना. आणि मला तिकडे नेमकं काय आहे ते माहित नाही. म्हणून तुम्हाला कोणाला तरी विचारावं लागेलच. " , " कसं विचारू आणि काय विचारू ? ". आजी आता खूप घाबरल्या होत्या. अक्षताला आजींचा राग आला. 

                च्यायला … मी यांना पत्ता शोधून देते आहे आणि यांना एवढंसं हि करता नाही येत.पण तिचा राग लगेच मावळला. संकटात सापडलेले कोणीही घाबरणार. आणि या आजी तर गावात राहणाऱ्या आहेत. त्या अजून घाबरल्या. " आजी… शांत व्हा… " , अक्षताने आजींना धीर दिला. " तुम्हाला नाही विचारायचे ना कोणाला… नका विचारू कोणाला,  मी जरा आठवण्याचा प्रयन्त करते पुन्हा. " तेव्हाचं मोबाईल वर message आला. " connect your charger " बघते ते मोबाईलची battery " ३ % " , बापरे !! जास्त वेळ नाही आहे आता. ती घाई करू लागली. 

             " हेल्लो आजी, तुम्ही जिथून फोन करत आहात ना,  तिथे कोणी आहे का बसलेले… म्हणजे टेलिफोन बूथ मध्ये कोणी व्यक्ती आहे का बसलेली ? ", " हो…  हो, एक बाई आहेत बसलेल्या. " , " हा … मग त्यांना देता का फोन जरा . " , " देते हा. " , आजींनी टेलिफोन बूथमध्ये बसलेल्या बाईकडे फोन दिला. " हॆलो ? " , " हेल्लो. नमस्कार. त्या आजी आहेत ना, त्या रस्ता विसरल्या आहेत त्यांच्या घराचा. त्यांना जरा मदत कराल का ? " , " अहो पण… मी त्यांना ओळखत नाही आणि टेलिफोन बूथ सोडून मी नाही जाणार कुठे. ", आता अक्षताला त्या बाईंचा राग आला. 
     
              काय माणसं आहेत आत्ताची. जरा कोणाला मदत नको करायला.सगळा राग अक्षताने कंट्रोल केला आणि बोलली. , " ठीक आहे. तुम्ही नका जाऊ त्यांना सोडायला. पण रस्ता तर सांगू शकता ना तुम्ही त्यांना. " , " हा … रस्ता सांगू शकते त्यांना. " , " OK, मग मला सांगा, तुम्हाला समोर ३ गल्ल्या दिसत आहेत ना. " , " हो. आहेत ना. " , " OK. मग यातली कोणती गल्ली त्या गोल बागेजवळ जाते. तुम्हाला माहित आहे ना , ती बाग. गोलाकार बाग आहे ती. " , " हो . माहित आहे मला.  ह्या मधल्या गल्लीतून पुढे चालत गेलं कि ती बाग लागते. " , " मधली म्हणजे कोणती गल्ली ती त्या आजींना सांगा जरा, प्लीज. " थोडावेळ काहीच आवाज नाही आला फोनवर. नंतर आजीच बोलल्या. " सांगितलं हा मला त्या बाईनी, कसं जायचे ते. " , " OK आजी, तुम्ही त्या गोलाकार बागेजवळ पोहोचलात कि मला तिथून फोन करा. "  या आजी कधीपासून फोन करत आहेत मला. पैसे तरी आहेत ना त्यांच्याकडे आता, " आजी … पैसे आहेत ना फोन करायला. " , " ६-७ रुपये आहेत अजून. चल मी जाते आणि तिकडे पोहोचले कि फोन करते तुला. " म्हणत आजींनी फोन बंद केला.   

            Battery " २ % " , अक्षता बाहेर आली पुन्हा. शेजारच्या काकू अजूनही आलेल्या नव्हत्या. Battery संपत आली आहे मोबाईलची आणि तिकडे आजींचे पैसे संपत आले आहेत. या सगळ्या गोंधळात घड्याळाकडे बघायचे राहून गेले. बघते तर ६.५० झालेले.… बाहेरचा प्रकाश बऱ्यापैकी कमी झाला होता. रस्त्यावरचे दिवे हळूहळू चालू होत होते. मोबाईल वर पुन्हा " connect your charger " चा message आला. काय करू… काय करू… मोबाईल बंद झाला तर आजींना रस्ता कसा सांगू ?…. एक विचित्र गोष्ट होती. आजी कधीपासून फिरत आहेत , घरी जाण्यासाठी. त्यांचा मुलगा काय झोपला आहे अजून… तो कसा शोधत नाही आपल्या आईला ?,   काहीतरी गडबड आहे. नाहीतर तो मोठया रस्ताने शोधत असेल. आणि आजी चालल्या आहेत short-cut ने. … पण या काकू कश्या आल्या नाहीत अजून. 

             अक्षता पुन्हा बाल्कनीत आली. मोबाईल हातातच होता तिच्या. ती विचार करू लागली. पुढचा रस्ता कसा होता ते. गोलाकार बाग होती तिकडे, तशी ती बाग जरा मोठीच होती. तिथून आजींना नीट रस्ता सांगितला पाहिजे.नाहीतर तिथे रस्ता चुकण्याची हमकास तयारी. कारण तिथून वेगवेगळे ६ मोठे रस्ते लागायचे. कोणत्या रस्त्याने जायचे माहित नसेल तर तिथे राहणाऱ्या लोकांचाही गोंधळ उडायचा. मी ही गांगरली होती तिथे गेल्यावर. आणि एका माणसाला विचारलं होतं मी , त्या गोल मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता.… हो… तिथे तेव्हा एक झाड होतं, पेरूचं झाड.… आताही असलं पाहिजे. नाहीतर आजींना रस्ता कसा सांगू… असलच पाहिजे. मोबाईलची battery अजूनही " २ % " . 

             काळोख तर झालाच होता. आजींचा फोन कसा आला नाही अजून… विचार करत होती अक्षता. इतक्यात फोन वाजला. " हेल्लो… आजी … पोहोचलात का ? " , " Hello… अक्षताच आहेस ना… ? " , " हो…  हो, मीच बोलते आहे." , " अरे मी शलाका बोलतेय… कोण आजी ?  माझ्या मोबाईलचा नंबर save आहे ना तुझ्याकडे  " , " अगं… तू होय… मी घाईघाईत फोन उचलला, न बघता. " , " OK , माझं काम होतं जरा तुझ्याकडे अक्षता. " , " आता नको गं प्लीज… माझ्या मोबाईलची battery फार कमी आहे… मी तुला नंतर call करते हा, प्लीज जरा. BYE . " म्हणत अक्षताने call , cut केला. हिने पण आताच call करायला पाहिजे होता का…"१ % "
                       
             आणि अक्षताला बाल्कनीतून शेजारच्या काकू येताना दिसल्या.  त्याचबरोबर आजींचा फोनही आला. " पोहोचले मी अक्षता… समोर बाग आहे मोठ्ठी. " , " आजी… कुठे थांबल्या होता का तुम्ही… वेळ लागला फोन करायला तुम्हाला.? " , " अगं, काळोखात नीट दिसत नाही ना. म्हणून हळूहळू चालत होते. " ," ठीक आहे . " म्हणत अक्षता मोबाईल घेऊन रुमच्या बाहेर आली. काकू जश्या आल्या, तसं तिने लागलीच त्यांच्याकडे चार्जर मागितला. " काकू… या मोबाईलचा चार्जर असेल तर त्या ना लवकर, प्लीज. " , "अगं थांब… दरवाजा तर उघडू दे मला. आणि तुझा कुठे गेला चार्जर ? " , " तो ऑफिसमध्ये राहिला. हा मोबाईल बंद होतं आला आहे, बंद झाला तर मोठा प्रोब्लेम होईल. प्लीज काकू… घाई करता का जरा. " तश्या काकूं दरवाजा उघडून आत पळाल्या. 

             " हेल्लो आजी, आता जरा सांभाळून जा हा… अंधार झाला आहे आणि पुढचा रस्ता गोंधळून टाकणारा आहे." , " सांग मला तू… जाते मी बरोबर. " आजीच्या आवाजात उत्साह होता. " बरं आजी, समोर जी गोलाकार बाग दिसते आहे ना. तिथे तुम्ही जा पहिले.… तिकडे सहा रस्ता लागतात. त्यातला एक रस्ता, त्या गोल मंदिराकडे जातो. त्या रस्ताच्या बाजूला…. " आणि फोन cut झाला. आजींनी फोन cut का केला ? … " हेल्लो… हेल्लो,  आज्जी… ".  फोन cut झाला होता. अक्षताने मोबाईलकडे पाहिलं. आजींनी फोन cut केला नव्हता , अक्षताचाच मोबाईल बंद झाला होता. Battery संपली होती. अक्षता तशीच उभी राहिली मोबाईलकडे पाहत. काकू चार्जर घेऊन बाहेर आल्या. " अक्षता… हा घे चार्जर. " , अक्षता तशीच उभी मोबाईल घेऊन, अक्षताच्या डोक्यात विचार चालू होते.…. तो रस्ता खूप वर्दळीचा आहे, प्रचंड ट्राफिक , मोठ्या गाड्यांची वाहतूक…. त्यात आजींना काळोखात दिसत नाही. घर तसं लांबच आहे अजून त्यांचं… अक्षता काहीच बोलत नव्हती, तशीच उभी होती. काकूंना काहीच कळत नव्हतं. " काय झालं अक्षता… बोल काहीतरी… बोल ना… " , अक्षताच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं…… " आज्जी… !!!! " . 



to be continued..............................

Sunday 5 October 2014

" … बाबा…. "(भाग दुसरा )

                  सुरेखाला जाऊन आता २ महिने होत आलेले. अविनाश आता कुठे सावरत होता. दोन महिन्यात आदित्यने एक-दोनदाच आईची आठवण काढली. छोटी दीपा तर आईला जवळपास विसरलीच होती. आणि त्यांना आईची आठवण येऊ नये म्हणून अविनाशने घरात सुरेखाचा फोटोही लावला नव्हता. 

                    सर्व काही सुरळीत चालू झालेलं पुन्हा. अविनाश नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला होता. आदित्य आणि दीपा मात्र जाम खूष होते. कारणच तसं होतं ना. त्यांचा "बाबा" आता त्यांच्यासाठी खूप वेळ देत होता. सकाळी सकाळी छानपैकी मजा-मस्ती करत आंघोळ व्हायची तिघांची. मग नास्ता करून दोघांनाही शाळेत सोडायला जायचा. शाळा सुटण्याचा अगोदरच त्यांचा बाबा हजर असायचा. आता भार्गवी ताई येत नव्हती शाळेतून घरी आणण्यासाठी. शाळेतून ते तसेच भार्गवीकडे जायचे आणि अविनाश पुन्हा ऑफिसमध्ये. थोडयावेळाने अवि घरी यायचा, तोपर्यंत आदित्य आणि दिपाचा homework झालेला असायचा भार्गवी ताई कडेच. मग बाबा आला कि धमाल सुरु व्हायची. छान जेवण बनवून द्यायचा " बाबा " त्यांना. ते खाऊन मग रात्री गोष्ट सांगायचा. गोष्ट ऐकतानाच झोपी जायचे दोघेही, छान ना…. 

                   त्यात कमी होती ती फक्त सुरेखाची. अविनाश मुलांसोबत कितीही आनंदी वाटला तरी तो आतून पुरता ढासळलेला होता. सुरेखाची खूप आठवण यायची त्याला. एवढा सोन्यासारखा संसार ती अर्ध्यावर सोडून गेली होती. मुलं काय ती तर लहान होती अजून पण त्यांना किती दिवस तो खोटं बोलणार होता. त्याला खूप रडावसं वाटे. पण त्यांच्या समोर तो रडू शकत नव्हता. असा एकही दिवस गेला नसेल कि त्याला सुरेखाची आठवण झाली नसेल. सुरेखा असती तर किती बरं झालं असतं असा विचार तो नेहमी करायचा.  

                 ऑफिसमध्येही अविनाश आता लक्ष देऊ लागला होता. खूप सुट्टया झाल्या होत्या. शिवाय सुरेखाही त्याच ऑफिस मध्ये कामाला होती. त्यामुळे बॉसने ते सगळं सांभाळून घेतलं होतं. तरीदेखील office management ने अविनाशला नोटीस दिली होती. त्यात बॉस त्याची काही मदत करू शकत नव्हता. नोटीस होती कधीही कामावरून काढून टाकण्याची. थोडे दिवस अविनाश त्याच tension मध्ये होता. जॉब त्याला सोडायचा नव्हता. कारण सुरेखाच्या आजारपणात पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. आणि आता तर तो एकटाच कमावणारा होता. बॉसने त्याची नोकरी जाणार नाही याची हमी अविनाशला दिली. " तुझा जॉब जाणार नाही ते मी बघतो. पण आता सुट्टया नाही घेऊ शकत तू . शिवाय उरलेले कामही खूप आहे , तेही तुला संपवावे लागेल. तुझी condition काय आहे ते कळते आहे मला. पण management ला मी Handle करू शकत नाही. तुझा जॉब मी वाचवतो, कसा टिकवायचा हे तुला बघावं लागेल. " बॉस अविनाशला बोलून गेला. 

                आणि पुन्हा एकदा अविनाशची धावपळ सुरु झाली, यावेळेस त्याची नोकरी वाचवण्यासाठी. तसंच सुरु झालं पुन्हा. सकाळी लवकर उठून स्वतः बरोबर त्या दोघांचा डब्बा तयार करायचा, पटापट आंघोळ घालून शाळेची तयारी करायचा आणि तसाच धावत धावत जाऊन शाळेत सोडायचा. तिथूनच तो ऑफिसला पळायचा. पहिला कधीतरी उशिरा येणारा अवि, हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता. आदित्य आणि दिपाला घरी आणण्याची जबाबदारी पुन्हा भार्गवीकडे आली होती.  आता तर रोज भार्गवी त्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी. बरं, शाळेत सोडायला तरी जायचा अविनाश सुरुवातीला,हळूहळू तेही बंद झालं. सकाळीच उठून अविनाश दोघांची तयारी करायचा आणि त्यांना भार्गवीकडे सोपवून ऑफिसला निघून जायचा.खरतरं आदित्यला हे मूळीच आवडत नव्हत, तरी त्याचा बाबा किती धावतो आहे ते तो बघत होता.म्हणून तो काही बोलायचा नाही. भार्गवीचं मग दोघांची काळजी घ्यायची. त्यांना शाळेत सोडण्यापासून संध्याकाळी घरी आणेपर्यंत. घरी आले कि तीच त्यांचा अभ्यास घ्यायची. हल्ली दोघांचे जेवण सुद्धा भार्गवीकडे होऊ लागले होते. अविनाश उशिरा घरी यायचा. एवढया उशिरा घरी येऊन कधी तो जेवण बनवणार आणि त्यांना भरवणार. तो घरी यायचा तेव्हा दिपा झोपलेलीच असायची. आदित्य तेवढा बाबाची वाट बघत जागा असायचा. बाबा आला कि ते घरी जायचे आणि बाबांनी गोष्ट सांगितल्यावर झोपी जायचे. परंतू अविनाश नाही झोपायचा. ऑफिसचे काम करत बसलेला असायचा रात्र- रात्रभर. फार उशिरा झोपायचा. 

               अशातच ३ महिने निघून गेले. अविनाशच्या कामाचे tension जराही कमी झालं नव्हते. आदित्य आणि दीपाला त्यांची आई कधी गावावरून येणार हे माहित नव्हते.त्यांना सांगायलाच कोणी नव्हते. त्यांचा " बाबा " त्यांना काही क्षणासाठीच दिसायचा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना. शेवटचा निवांत वेळ कधी मुलांसोबत घालवला होता ते अविनाशला आठवत नव्हतं. आदित्य आणि दिपा तसे लहान होते,तरी आदित्यला बाबाची धावपळ कळत होती. त्यामुळे बाबाला आपल्याकडून काही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायचा तो.सुट्टीच्या दिवशीसुद्धा अविला मुलांना वेळ देता येत नव्हता. सुरेखा गेल्यापासून भार्गवीची खूप मदत झाली होती. तिच्यामुळे अविनाश कामावर लक्ष देऊ शकत होता,नाहीतर त्याने काय केल असते. धावपळ करून त्याची तब्येत खालावली होती. बॉसला सगळं समजत होते,परंतु तो काही करू शकत नव्हता. कसा हसरा चेहरा होता अविचा , पूर्ण झाकोळून गेला होता अवि ,tension मुळे.   

              अश्यातच एक दिवस, सकाळी अविनाश दोघांना उठवायला गेला तेव्हा दीपाचं अंग थोडं गरम जाणवलं त्याला. तापच होता तिच्या अंगात. तडक त्याने बॉसला call केला. अवि काही बोलणार तेवढयात पलीकडून बॉसचा आवाज आला, " बरं झालं तूच call केलास ते, मीच तुला call करणार होतो. आज एक महत्वाची मीटिंग आहे,Main branch मधले सर येणार आहेत. लवकरात लवकर ये ऑफिसला. " अविनाश समोर बिकट प्रसंग होता, जॉब कि मुलगी. डोक्यावर टांगती तलवार जणू. तसाच दीपाला घेऊन तो भार्गवीकडे आला. " भार्गवी.... दीपाला ताप आला आहे गं …. बघ गं जरा… " भार्गवीने दीपाला घरात घेतलं. आदित्य सोबत होता. " बघशील ना तिला... " अविनाश म्हणाला. भार्गवीने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. भार्गवीने मानेनेच " हो " म्हटलं. तसा तो धावतच गेला ऑफिससाठी. आदित्यला "Bye" ही नाही केलं त्याने आज. दीपाला डॉक्टर कडून तपासून आणले त्यामुळे आज दोघांनाही शाळेत पाठवलं नाही. आदित्य आपल्या बहिणीजवळ बसून होता. भार्गवी त्यांना लांबूनच पाहत होती. थोडयावेळाने आदित्य बाहेर जाऊन बसला. भार्गवी त्याला घरात घेऊन जाण्यासाठी आली. " चल आदित्य, घरात चल … बाहेर कशाला बसतोस… " काहीच बोलला नाही तो. भार्गवीला कससं झालं. " काय झालं रे आदि… " भार्गवी बाजूला जाऊन बसली त्याच्या. " बाबा खूप बदलला आहे ना ताई... "," का रे … काय झालं ? " ,"आता कुठे येतो तो शाळेत सोडायला… घरी पण तूच आणतेस ना. रात्रीच जेवण पण करत नाही. तो तरी जेवतो ते माहित नाही, मला रात्रीची कधीतरी जाग येते तेव्हा पण तो काम करत असतो. झोपतो कधी काय माहित. सुट्टीच्या दिवशी कामाला जातो. पहिला फिरायला घेऊन जायचा. आता घरीच उशिरा येतो. आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आज पण दीपाला बरं नाही ना, तरी तो ऑफिसला गेला. आई तर दोन-दोन दिवस जायची नाही घरातून बाहेर दीपाला बरं नसलं कि. जवळच बसून रहायची. आता रात्रीची गोष्ट पण सांगत नाही. मला वाटते बाबाला आम्ही आवडत नाही आता. " यावर भार्गवीकडे काहीच शब्द नव्हते, तरी ती बोलली," तसं नाही रे… तू बघतोस ना किती धावत असतो ते. त्याच काम वाढलं आहे ना म्हणून तुला तसं वाटत असेल. तुमच्यासाठीच तो करतो आहे सगळं " ,"  आणि आई… तिला काहीच वाटतं नाही आमच्याबद्दल. ती कधी येणार गावावरून तेही सांगत नाही बाबा मला. तुला माहित आहे का ग ताई ? " भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ती तशीच उठून गेली घरात.  

             भार्गवीने अविला call केला," Hello… कशी आहे दिपा … ताप उतरला का ? "," हो… तसा ताप नाही आहे आता. डॉक्टरने औषध दिले आहे. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार आहेत." ," हो ते मी आणतो येताना, तू फक्त दीपाकडे लक्ष ठेव. " म्हणत अविने फोन cut केला. रात्री ऑफिस मधून येतानाच तो डॉक्टरकडे दीपाचे रिपोर्ट आणण्यासाठी गेला. " ये ये अविनाश… बस " ," दीपाचा ताप उतरेल ना डॉक्टर ? " ," ताप उतरला आहे , पण काहीतरी वेगळे सांगायचे आहे तुला. " तसा अवि सावरून बसला. " काय झालं डॉक्टर ? " , " दीपाला आधी कधी मोठा आजार वगैरे झाला होता का ? " ," तसा नाही कधी, का … काय झालं ? "," दीपाला कधी मैदानात नेतोस का खेळायला ? " ,"पहिला घेऊन जायचो, आता वेळ नाही मिळत, तरीही ती जास्त खेळत नाही मैदानात, लहान आहे ना दमते लवकर ती ", तेच सांगायचे आहे तुला …दीपाला दम्याचा आजार आहे. " ते ऐकून अविच्या पायाखालची जमीनच सरकली. " कसं शक्य आहे ? " ," हो… तू आधी कधी तिच्या test's नाही केल्यास ना. आज मला वाटलं म्हणून मी स्वतः हून तिच्या test केल्या तेव्हा मला कळलं. " अवि गप्पच झाला. " एवढया लहान वयात आजार झाला आहे, तो बरा होऊ शकतो वेळेवर औषधे दिली तर. तुला खूप काळजी घ्यावी लागेल . " अविनाश औषध आणि रिपोर्ट घेऊन घरी आला. आदित्य आज त्याची वाट बघत नव्हता. दीपाच्या शेजारीच तो झोपला होता. अविला पाहिलं तशी भार्गवी बाहेर आली. " रिपोर्ट नॉर्मल आहेत ना दीपाचे. " अवि काहीच बोलत नव्हता. भार्गवीने त्याच्या हातातून रिपोर्ट घेतले आणि तीही गांगरून गेली. " आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया दीपाला. एवढया लहान मुलीला "दमा" कसा होऊ शकतो. हे रिपोर्ट चुकीचे आहेत. " भार्गवी रडलेल्या स्वरात म्हणाली. अविनाशने तिला शांत केलं. " हे बघ… डॉक्टरचे रिपोर्ट बरोबर आहेत. चूक आपली झाली आहे, मी लक्ष देण्यात कमी पडलो. sorry सुरेखा …. मी एकटा नाही सांभाळू शकत यांना… " अवि आभाळातल्या चंद्राला पाहून बोलला. थोडावेळ शांतता. " आता एक करायला हवं. तो आजार बरा होऊ शकतो. वेळच्या वेळी औषध घेतली तर. मीही लक्ष देईन पण तुझी जबाबदारी वाढली आहे आता. करशील ना मदत मला… ? " भार्गवीने होकारार्थी मान हलवली आणि अविनाश नेहमी प्रमाणे त्या दोघांना घेऊन घरी आला.  

               दीपाचा ताप उतरला होता आणि दम्याची औषधे सुरु झाली होती. भार्गवीचं लक्ष असायचं नेहमी तिच्यावर. शाळेला घेऊन जाताना आणि घरी आणताना ती दीपाला उचलून घ्यायची, चालून चालून दम लागू नये म्हणून. आदित्यचीही ती काळजी घ्यायची. भार्गवी तर पूर्णपणे गुंतून गेली होती दोघांमध्ये अगदी. पण अविनाशचं tension अजून वाढत जात होतं. आधीच खूप खर्च झालेला, त्यात दीपाच्या आजाराची भर पडली होती. तो खर्च वाढला होता. त्यात शाळेचा खर्च,घरचा खर्च. ऑफिसचे tension. काम संपत नव्हतं. अपूर्ण झोप, शरीराला आराम नाही. नुसती धावपळ. संपूर्ण तेज उतरलं होतं त्याचं. मधे तोही आजारी होता तरी ऑफिसला आलेला होता. अंगावर काढलं होतं त्याने आजार.

              गेले काही दिवस त्याला अस्वस्थ वाटत होतं.गेले दोन दिवस झोपही पुरेशी झाली नव्हती. त्यात आज मीटिंग होती महत्त्वाची. दीपाला सकाळचे औषध देऊन तो निघाला ऑफिसला. घराच्या बाहेर पडला तसा त्याला गरगरल्यासारखं झालं. लगेच त्याने दरवाजाचा आधार घेतला. थोडयावेळाने बरं वाटलं तसा तो निघाला ऑफिसला. मीटिंग पार पडली परंतु एक महत्वाचं काम त्याच्या डोक्यावर येऊन पडलं. दोन दिवसात त्याला ते द्यायचे होते. आधीच इतर कामाचे tension होते, नवीन कामाचं वाढलं होतं. घरी दीपा आजारी, तिला आज पुन्हा डॉक्टरकडे चेकअप साठी घेऊन जायचे होते, Light Bill आले आहे , ते भरायचे आहे. अपूर्ण झोप, अर्धवट जेवण. कितीतरी विचार डोक्यात. ऑफिसमध्ये चालता चालता पुन्हा त्याला चक्कर आली. यावेळेस जवळ काहीच नव्हतं आधारासाठी. तसाच तो खाली पडला. ऑफिस मधल्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये admit केलं लगेच.    

               अविनाशला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला भार्गवीचे वडील होते बसून. " काका …. मी इकडे कसा ? " ," अरे तुला चक्कर आलेली ऑफिस मध्ये म्हणून तुला admit केला इकडे. कालपासून तू इकडेच आहेस." ते ऐकून अविनाश बावरला. " काल…. कालपासून इकडे आहे. आणि आदित्य , दिपा.…. " ," ते आहेत आमच्याकडे… तू आराम कर. " ," नको… चला काका, मला जायला हवं घरी… आदित्य वाट बघत असेल घरी. " काकांनी त्याला थांबवला,"हे बघ…. घाई करू नकोस. तुला डॉक्टर संध्याकाळी discharge देणार आहेत… " ," संध्याकाळी कशाला.... आणि कालच सोडायचं ना… चक्कर तर आली होती फक्त " ." शांत हो जरा अवि… डॉक्टरला तुझाशी काही बोलायचे आहे म्हणून तुला थांबवलं आहे… शांत हो please… " ते ऐकून अविनाश शांत झाला. तो थांबला तर होता हॉस्पिटलमध्ये पण त्याच सगळं लक्ष होत ते आदित्य आणि दीपाकडे. 
               संध्याकाळी डॉक्टर आले. त्यांनी अविनाशला discharge दिला आणि त्याला आपल्या कॅबीनमध्ये बोलावले. " कसं वाटतंय तुम्हाला अविनाश ? ","ठीक आहे जरा. बर वाटतंय . ऑफिसमध्ये कामाचं tension , झोपही झाली नाही आणि काल जेवलोच नाही म्हणून चक्कर आली असेल मला." ,"तुला अशक्तपणा जाणवत असेल ना… आधी कधी आजारी पडला होतास का ? " ,"तसा नाही कधी पण या महिन्यात दोनदा आजारी होतो, येवढा नाही पण ."," OK... मला काही सांगायचे आहे तुला म्हणून तुला बोलावले मी. तुझ्या काकांना सांगितलं आहे मी , पण मला वाटलं कि तुलाही सांगावे. "," बोला डॉक्टर " ," तुला चक्कर येण्याचे कारण अशक्तपणा नाही. " ," मग... " डॉक्टरने एक मोठा pause घेतला, " अविनाश... तुम्हाला Blood cancer आहे. " डॉक्टरचे ते बोलणे ऐकून अविनाश जवळपास कोसळलाच. " काय बोलताय तुम्ही डॉक्टर ? " ," हो अविनाश…. तुमची blood test करताना माझ्या assistant ला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्याने मला बोलवलं. मग मी ही वेगळ्या वेगळ्या test करून पाहिल्या तेव्हा ते conform केला मी. " अविनाशने काकांकडे पाहिलं. ते रडत होते. " काका.... काय झालं हे.... काय करायचं आता ? " अविनाश थोडयावेळाने शांत झाला. " कोणती stage आहे माझी ? " " 2nd stage वर आहात तुम्ही. तो अजूनही ठीक होऊ शकतो. आपल्याकडे medicine आहेत. operation ने ठीक होऊ शकतो. " ," किती वेळ आहे माझ्याकडे ? "," तशी blood cancer ची 2nd stage आहे, तुम्ही अजूनही ठीक होऊ शकता. " ," किती वेळ आहे माझ्याकडे डॉक्टर ते सांगा "," अजून तरी ७-८ महिने … त्या अगोदर operation वगैरे करून तुम्ही ठीक होऊ शकता. आजपासूनच आपण औषधे चालू करूया आणि लवकरात लवकर admit व्हा तुम्ही. तुमच्या कुटुंबाला कळवा हे ","आणि ही औषधे घ्या जाताना." डॉक्टरने काकांच्या हातात चिट्ठी दिली.काका अविनाशला घेऊन खाली आले. दोघेही गप्प गप्प होते. अविनाश अचानक हसायला लागला. " काय झालं अवि ? " काकांनी विचारलं," नाही… काही नाही. डॉक्टर बोलले तुझ्या कुटुंबाला कळव.…… आदित्य,दीपाला त्यांची आई कुठे आहे ते अजून माहित नाही….blood cancer काय असतो ते त्यांना काय कळणार … " ," डॉक्टर बोलले ना तू ठीक होशील ते " ," ठीक… ? ७-८ महिने आहेत आणि ठीक सुद्धा होऊन मी ? "त्यावर काका काही बोलले नाहीत. " काका... मला  वचन द्या " ," कोणतं ? " ," हि गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिलं… भार्गवी आणि काकूला काही सांगायचे नाही… " ," Please काका …. माझ्यासाठी……  Please " मग त्यांना अविनाशचे ऐकावेच लागले.          

              औषधाच्या दुकानातून अविनाश औषध घेत होता. दुकानदाराने एक औषधाचे पाकीट देताना सांगितलं ," ह्या गोळ्या एका महिन्यातच संपवा, याची expiry date एका महिन्याचीच आहे, त्या नंतर ते टाकून द्या. " अविनाश त्याच्या विचारात गुंतला होता. " चल अविनाश... घरी चल , कसला विचार करतो आहेस ? " भार्गवीच्या वडिलांनी त्याला विचारल."Expiry date चा विचार करतो आहे. ","काय ? " ,"आपल्या Birth certificate वर जर आपली Expiry date लिहिली असती तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे सगळी कामं अगोदरच आटोपता आली असती. कोणत tension मागे राहिलं नसतं. " काका निमूटपणे ऐकत होते. " थांबा काका, दोघांना chocolate घेतो… खूप दिवस त्यांना खाऊ आणून नाही दिला मी." म्हणत त्याने दोघांना chocolate घेतलं. 

              आदित्य आजही बाहेर बसला होता बाबाची वाट पाहत. जसा अविनाश गेटमधून आत आला,तसा आदित्यने धावत जाऊन त्याला मिठी मारली. दोन दिवसांनी त्याला "त्याचा बाबा" भेटला होता. " कुठे गेला होतास तू बाबा ? " अविनाशने त्याला उचलून घेतलं. घराच्या दरवाजात दिपाही आनंदाने उड्या मारत होती. खूप दिवसांनी बाबा आज लवकर घरी आला होता. दिपा सुद्धा त्याला जाऊन बिलगली. अविनाशने तिलाही उचलून घेतलं आणि आपल्या घरी आला. भार्गवीला सुद्धा त्या सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. थोडावेळ अविच्या तब्येतीची चौकशी करून ती निघून गेली. मग अविनाश जेवणाच्या तयारीला लागला. छानपैकी त्याने दोघांच्या आवडीचे जेवण केला होता आज. स्वतःच्या हाताने त्याने दोघानाही भरवलं. स्वतःही जेवला. दीपाला औषध देऊन स्वतः औषध घेतलं. दीपा झोपून गेली, आदित्यही झोपला होता. अविनाश मात्र बाल्कनीत येऊन बसला होता. झोप येत नव्हती, एवढं सगळं होऊन झोप कशी लागेल ? . थोडयावेळाने आदित्य बाहेर आला, " काय रे आदी… झोपला होतास ना तू … " ," नाही , मला गोष्ट नाही सांगितलीस तू …. मग झोपू कसा ? " त्याच्यामागून दीपा ही आली. " बाबा …. इकडे का बसलाय ? " , " असंच गं दीपा… बसा इकडे तुम्हीपण. " दोघे अविच्या आजूबाजूला बसले. छान हवा होती बाहेर. थोड्यावेळाने आदित्य बोलला, " कुठे गेला होतास बाबा ? " ," काम होतं रे जरां, म्हणून आलो नाही. घाबरलास का तू ? " , " मी नाही घाबरलो. दीपाला भीती वाटते ना काळोखाची. मग ती रडत होती रात्रीची… " अविनाशने दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला. " घाबरायचं नाही हा बाळा आणि रडायचं पण नाही. मी आहे ना . " दीपाला त्याने मांडीवर उचलून घेतलं. आदित्य पुढे म्हणाला," मला वाटलं तूपण गावाला गेलास… आई सारखा. " अविनाशला कससं झालं." बाबा …. मी कधी होणार मोठा…. आणि मी मोठा झालो कि तूपण मोठा होणार ना अजून. "," हो रे …. खूप मोठा हो…चांगला कामाला जा… चांगला हो… मुलं मोठी होतात रे, बाबा कधी मोठा होत नाही. तो तेवढाच राहतो. " ," बाबा …. आई कधी येणार ? " इतका वेळ शांत असलेली दीपा बोलली. अविनाश कडे उत्तर नव्हते. " कुठे आहे आईचा गाव ? " अविनाशने वर पाहिलं. आज अमावस्या होती त्यामुळे बऱ्यापैकी तारे-चांदण्या चमकत होत्या. " ते बघ.…. वरती… ती चांदणी आहे ना तिकडे आहे तुझी आई… रोज बघत असते तुम्हाला." अविने दीपाला सांगितलं," मग आपण जाऊया का तिकडे…  आईच्या गावाला…. " दीपा म्हणाली. "जाऊया हा…. … नक्की जाऊया….  सगळे एकत्र जाऊया हा आपण…"  अविचे डोळे भरून आले होते. " बाबा… तुझ्या मांडीवर झोपू का…. खूप दिवस झोपलोच नाही तुझ्या मांडीवर आणि मला गोष्ट पण सांग हा… " आदित्य म्हणाला. " झोप हा बाळा झोप… " मग दोघेही त्याच्या मांडीवर डोक ठेवून झोपले. आणि अविनाशने गोष्ट सुरु केली. दोघेही काही क्षणात झोपी गेले. पण अविनाश तसाच बसून होता. गोष्ट तर कधीच थांबली होती. डोळ्यातून पाणी येत होता ना त्याच्या . रडत बसला होता तो कधीचा. खूप दिवसाचं साठलेलं पाणी बाहेर येत होतं. 

           पुढच्या दिवसापासून पुन्हा रुटीन सुरु झालं. दोघांची औषध सुरूच होती. अविनाश जरा बारीक झाला होता. दीपाची काळजी घेण्यासाठी भार्गवी तरी होती. अविनाश कडे कोण बघणार ? त्यात त्याला झालेला आजार. भार्गवीच्या वडिलांनी दिलेलं वचन पाळल होतं. अविने त्यांच्या ऑफिसमध्ये ही सांगितल नव्हते. जॉबच tension कमी झालं नव्हतं. pressure अजून वाढत चाललं होतं. त्यात एकदा अचानक, दीपा शाळेत खेळत असताना तिला दम्याचा attack आला. बेशुद्धच झाली ती शाळेत. अविनाश त्याची मिटिंग तशीच अर्ध्यावर सोडून आला. 

           दीपाला admit केलं होतं लगेच. अविला सुरेखाचे हॉस्पिटल मधले दिवस आठवले. भार्गवीही होती तिथेच. तिच्या आईने तर नवस केला होता देवाकडे, दीपासाठी.  जरा तब्येत बिकट होती दीपाची. सगळ्यांनी मग तिला चांगल्या मोठ्या हॉस्पीटल मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. लगेच admit केलं तिला. डॉक्टरने तिला चेक केलं आणि एक operation करण्याचा निर्णय घेतला. त्याने ती बरी होणार होती. प्रश्न होता तो पैशाचा. एवढी रक्कम अवि आणि भार्गवीच्या कुटुंबाकडे नव्हती. बँक कडून लोन घ्यायचे झाले तरी त्याला वेळ लागणार होता. परंतु अविनाश च्या ओळखीने लोन भेटलं, ते घर गहाण ठेवून. दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे. दीपाच operation झालं. तरी निदान महिनाभर तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. पेचप्रसंग, आधीच हॉस्पिटलमध्ये अविनाशला आठवडा झाला होता. त्यात अजून एक महिना. दीपाला सोडून तो ऑफिसला जाऊ शकत नव्हता म्हणजे जॉब गेलाच. आणि झालंही तसंच. नोकरी गेली अविनाशची. अविनाश management ला काही उत्तर देऊ शकत नव्हता. तो तसाच त्याचा resignation letter घेऊन बाहेर आला ऑफिसच्या .

           भार्गवीच्या घरी ही बातमी पोहोचली होती. ते काही मदत करू शकत नव्हते. आदित्य भार्गवीकडेच असायचा. कधीतरी तो दीपाला पाहायला जायचा हॉस्पिटलमध्ये. अविनाश रात्रीचा तेवढा घरी यायचा. सकाळी उठून पुन्हा हॉस्पिटलमध्ये दीपाकडे जायचा. आता त्याला ऑफिसला जायचे नव्हते काही. दीपा आता बरी होत होती. किमान २० दिवस तरी ती होती हॉस्पिटलमध्ये. अविनाशची औषध चालू होती. खरं तर त्यालाही admit होण्यास सांगितलं होतं.परंतु तो जर admit झाला तर दोघांचे हाल होतील म्हणून त्याने तो विचार बाजूला ठेवला. दीपाला आता घरी सोडलं होतं, औषध चालूच होती तिची. लवकरात लवकर अविनाशला नवीन जॉब शोधावा लागणार होता. त्याच bank account जवळपास रिकामं झालं होतं. लोनचे पैसे बँकेत भरायचे होते. औषधांचा खर्च, घराचा खर्च  यासाठी तरी अविनाशला नवीन जॉब हवा होता. 

           पण नशीबाला अविनाशच सुख नकोच होतं. बँकचे हप्ते भरायला वेळ लागला. अविकडे पैसेच नव्हते भरायला बँकेत. बँकने घर ताब्यात घेतलं. सुरेखा सोडून गेल्यापासून नशीब अविनाश वर रूसल होत. त्याला ते घर सोडावंच लागलं. भार्गवीला तर आज बाहेरचं यायचा नव्हतं. सगळेच रडत होते. भार्गवीच्या वडिलांनी खूप प्रयन्त केले घर वाचवायचे, परंतु बँकवाले तयारच नव्हते. अविनाशने bag भरल्या आणि त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. आदित्य आणि दीपा ,भार्गवीला सोडायलाच तयार नव्हते. त्यांना जावेच लागणार होते. एक कुटुंब वेगळं होणार होतं. अविने आदित्य आणि दीपाला गाडीत बसवून सामान भरलं. " भार्गवी… मी येणार हा भाऊबीजला तुला भेटायला… " अवि म्हणाला आणि भार्गवीने त्याला मिठी मारली," काय झालं हे सगळं …. पहिली वहिनी गेली आणि आता तुम्ही सगळे जात आहात." , " जावेच लागेल ना… आठवतंय तुला मी बोललो होतो ते, आपलं आयुष्य लोकल ट्रेन असते. आज माझं स्टेशन आलं बहुतेक. चल मी निघतो… " ," कुठे रूम घेतलीस तो पत्ता दे मला… आणि दोघांची काळजी घे. नाहीतर दोघांना माझ्याकडे राहू दे. ","नको भार्गवी…. खूप मदत केलीस तू… तुझ्या सारखी बहिण सगळ्यांना भेटू दे. तू नसतीस तर मी काहीच करू शकलो नसतो. thanks for everything thing……. " थोडावेळ कोणीच काही बोलले नाही. अविनाश निघाला तेव्हा सगळेच रडत होते.

          आता प्रश्न होता तो राहायचा. अविनाशने एक रूम बघितली होती, भाडयाने. रूम बऱ्यापैकी होती, तरीसुद्धा मोठ्या घराची सवय असलेल्या दोघांना ती लहान वाटत होती. अविनाशला लवकरात लवकर नवीन जॉब पाहिजे होता. एक मिळाला जॉब. पगार कमी होता, तरी नवीन रूमचे भाडे, दोघांच्या औषधाचा खर्च,म्हणून तो राहिला जॉबला. खर्च तरीही भागत नव्हता. कसबस घर चालू होतं. पैसेच हातात उरत नव्हते. शाळेचा खर्च होताच. अविनाशची तब्येत खूप खालावली होती दरम्यान. वरचेवर तो आजारी पडायला लागला. त्यामुळे कामावर पुन्हा सुट्ट्या होऊ लागल्या. दोन वेळचे जेवण कठीण होऊन गेले. जास्त खर्च औषधांवर होत होता. आदित्यला ते कळत होतं. बाबाची तब्येत ठीक नसते ते त्याला दिसत होतं. शाळेत असताना काही प्रश्न नव्हता, शाळेतून घरी आले कि ते दोघेच असायचे. आपली आई आता परत येणार नाही हे त्याला कळल होतं. आणि भार्गवी ताई नव्हती आता. त्यामुळे तोच दीपाला सांभाळायचा. तिच्या सोबत खेळायचा,तिचा अभ्यास घ्यायचा. तिचं औषधपाणी करायचा. सगळ करायचा. अविनाशने त्याला औषधाचे दुकान दाखवून ठेवलं होतं, कधी काही गरज लागली तर. आदित्य रात्री जेवताना अर्धच जेवायचं. कारण बाबा आपल्यासाठी उपाशी राहतो हे त्याला माहित होतं. आपण कमी जेवलो तर बाबाला जेवायला मिळेल म्हणून उगाचच पोट भरलं म्हणून सांगायचा. 

         अविनाशला आता कळून चुकलं होतं कि आपली last stage चालू झाली आहे. अगदी बारीक झाला होता तो. सारखा आजारी राहायचा. थोडे दिवस तो जायचा ऑफिसला, आजार अंगावर काढून. नंतर त्याला घरातून बाहेर पडणं अशक्य होऊ लागलं. त्या दोघांना कोण शाळेत घेऊन जाणार मग. त्या दोघांची शाळा सुटली तेव्हापासून. अविनाशचा जॉब गेला दरम्यान. औषध आणायला तेवढा बाहेर पडायचा घराच्या. घरातले पैसे संपत आले होते. काय करावं ते सुचत नव्हतं अविला. 

         गेल्या दोन दिवसांपासून शहरात वातावरण जरा तंग होते. तोडफोड , दंगली चालू होत्या. अविनाशच औषध संपलं होतं.घरातले कालपासून जेवले नव्हते कोणी. सगळीच दुकाने बंद होती. अविनाशची तब्येत अजून बिघडली. त्यात दीपाचे औषध संपले. आता काहीतरी करायलाच पाहिजे. दोघांनाही औषधाची गरज होती. पण पैशाची कमतरता होती. अविनाशला चालण्याची ताकद नव्हती. तो कालपासून झोपून होता. त्याने आदित्यकडे पैसे दिले आणि दीपाचे औषध आणायला सांगितले.आज सगळी दुकाने उघडली होती.आविनाशने आदित्यला दुकानाचा रस्ता दाखवला होता. तसा आदित्य निघाला. दीपा अविनाशच्या बाजूला बसली होती. " बाबा…. तुला गोष्ट सांगू का मी….मग तू झोप हा… " दीपा म्हणाली. " सांग हा बाळा… " दीपाने गोष्ट सुरु केली. तिकडे आदित्य दुकानात पोहोचला. दीपाची औषधे घेतली त्याने. आणि तो घरी येण्यास निघाला. 

         इतक्यात मागून आवाज आला. " पळा…पळा…" आदित्यला काहीच कळत नव्हते. दंगल पुन्हा सुरु झाली होती. जो तो पळत होता. आदित्य घाबरला. त्याला कळत नव्हते नक्की काय झालं ते. आदित्य पळू लागला. इकडे अविनाशने घरातून बाहेरचा आवाज ऐकला. आदित्य बाहेर होता. पण अविनाशच्या अंगात तेवढी ताकद नव्हती, उठून बाहेर जाण्याची. आदित्य पळत होता. सगळीकडून लोकं सैरावैरा धावत होती. दुकानांवर दगड फेकत होती. तोडफोड चालू झालेली पुन्हा. आदित्य रस्ता पूर्णपणे विसरला होता. परंतु हातातली दीपाची औषधं वाचवण्यासाठी तो पळत होता. अचानक एका दिशेने एक दगड भिरभिरत आला आणि त्याने आदित्यच्या कपाळाचा वेध घेतला. आदित्यचा तोल गेला आणि तो खाली पडला. हातातली औषधं त्याने खाली पडू दिली नव्हती. तो उठून बसला रस्त्यावर. सुन्न झालेला अगदी तो. डोळ्यासमोर अंधार झालेला. कानाने तर काही ऐकूच येत नव्हतं. थोड्यावेळाने तो भानावर आला. कपाळावर मोठी जखम झाली होती त्याच्या. भळाभळा रक्त वाहत होतं. काय करावं सुचेना. अजूनही रस्त्यावर दंगे चालू होते. तो सावरून उभा राहिला. अंगातला शर्ट रक्ताने लाल झाला होता. हातात दीपाची औषधं. घरी तर जायलाच हवं पण रस्ता कुठे ठाऊक होता, हरवलेला तो. डोक्यात प्रचंड वेदना, रक्त अजूनही वाहत होतं. आदित्य मग एखादा आडोसा शोधू लागला. दंगे थांबले कि घरी जाण्यासाठी. थोडासा चालला आणि पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला. बाजूलाच असलेल्या झाडाखाली जाऊन तो बसला. कालपासून पोटात काही नाही. अंगातली उरली सुरली ताकद त्याने एकटवली आणि पुन्हा तो उभा राहिला. परंतु तेवढा ताण त्याच्या लहान शरीराला जमला नाही. आदित्य तिथेच खाली बसला , हातातली औषधं घट्ट पकडून. 

          दीपाला गोष्ट सांगताना दम लागला होता. तिच्याही पोटात काही नव्हते.औषध संपले होते. ती रडू लागली. अविनाशने तिला हातानेच खूण करून बाजूला झोपायला सांगितले. तशी दीपा त्याच्या छातीला बिलगून झोपली. थोडावेळ तिच्या श्वासांची जाणीव अविनाशला होत होती. हळूहळू कमी होत होत ती कायमची बंद झाली अस अविनाशला जाणवलं. अविनाशने तिला हलवलं. दीपा शांत झाली होती. तेव्हाच अविनाशच्या छातीत एक जोरदार कळ आली … " दिपा…… " अविनाश मोठयाने ओरडला. बाहेर चाललेल्या दंग्यात तो आवाज कोणालाच ऐकू आला नाही.   

         सुमारे दोन तासांनी शहरातलं वातावरण नॉर्मल झालं. पोलिस आता रस्त्यावर उतरले होते. खूप जणांना पोलिसांनी पकडून नेलं होते. अनेकजण जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. अजून काही नाही राहिले ना , हे बघत पोलिस, हवालदार सगळीकडे फिरत होते. दोन हवालदार फिरता फिरता त्या झाडाखाली आले. " अरे बघ…. कोणीतरी बसला आहे इथे…. "," कोण रे…… हो… हो… लहान पोरगा दिसतोय… लपला असेल. डोक्यावर केवढी जखम झाली आहे बघ… सगळा शर्ट भरला आहे रक्ताने."," ये पोरा… चल, तुला हॉस्पिटल मध्ये नेतो… चल रे " आदित्य अजिबात हालचाल करत नव्हता. तेवढयात एक पोलिसांची गाडी येताना दिसली. तशी त्या दोन हवालदारांनी गाडी थांबवली. " साहेब…. तिकडे एक लहान मुलगा बसला आहे, बघा जरा. " तसे Inspector उतरले गाडीतून लगेच." ये मुला… चल तुला तुझ्या घरी सोडतो, कुठे राहतोस तू…. चल. " काहीच हालचाल नाही. Inspector ने खाली बसून त्याला निरखून पाहिलं," बिचारा…. " ,"काय झालं साहेब ? " ," त्याने जीव सोडला आहे… उशीर झाला, जखम खूप मोठी झाली आहे, जास्त रक्त गेल्याने बहुदा…. " ," साहेब काय करायचं याचं… ? " ," थोडावेळ वाट बघा इकडे. त्याचं कोणी येते का शोधत . " म्हणत inspector साहेब निघून गेले. आदित्यच्या डोक्यावर झालेला आघात खूप मोठा होता. त्याचं लहान शरीर त्याला साथ देऊ शकलं नाही. आदित्यचे प्राण निघून गेले होते कधीच, पण त्याने हातातली दीपाची औषधं खाली पडू दिली नव्हती. 

        इकडे अविनाश आणि छोटी दीपा एकमेकांना बिलगून झोपलेले होते,चिरनिद्रा. दोघांचे श्वास कधीच थांबलेले होते कायमचे. अविनाशच्या आयुष्याचे स्टेशन आलेलं होते आणि त्या दोन लहान मुलांचेही. तिघे जण आयुष्यरुपी लोकल ट्रेन मधून उतरून गेलेले होते, कदाचित अविनाश सुरेखाला आणि आदित्य, दिपा त्यांच्या आईला शोधायला निघाले होते. अविनाश म्हणाला होता ना कि सगळे एकत्र जाऊ आईच्या गावाला…. तसेच सगळे मिळून निघाले होते शेवटच्या प्रवासाला.  


---------------------------------------------------------The End-----------------------------------------------------------

Followers