All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Friday 20 July 2018

भटकंती.... पुन्हा एकदा ( भाग तिसरा )



आकाशच्या आवाजाने सईची झोपमोड झाली. " ओ मॅडम, उठा लवकर.. जायचे आहे ना फोटोग्राफी साठी.. " सई तंबूमध्ये झोपलेली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ६:३० वाजले होते. काल मुद्दाम , आकाश बोलला म्हणून तिने मोबाईलमध्ये ७ चा अलार्म लावला होता. तर हा आला ६:३० लाच... तरी तो हाका मारतो आहे म्हणून बाहेर आली सई. " इतक्या लवकर... ७ वाजता निघू ना... बाकीचेही झोपेत असतील." सई डोळे चोळत म्हणाली. 
" उद्या पुन्हा येणार आहात का इथे... " ,
" का ? " ,
" कारण आता जे दिसेल ना... ते पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळीच पुन्हा यावे लागेल. तुम्हाला फोटो पाहिजे होते म्हणून जागे केलं. झोपा तुम्ही... " आकाशने पाठीवरली सॅक खाली ठेवली. 
" नको नको.... थांब... मी बाकीच्यांना जागं करते. " सईने पटापट बाकी ग्रुपला जागं केलं. काय वैताग आहे, असेच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर. एकंदरीत , हा माणूस वेडा आहे.. आणि तो आपल्याला हि तसंच समजतो , असं वाटू लागलं होते या ५-६ जणांना. 

" माझ्या मागोमाग चला फक्त, ते tent वगैरे राहूदे इथेच. फोटो काढून झाले कि परत येऊच... " आकाश. 
" किसीने सामान ले लिया तो ? " एकीने प्रश्न केला. 
" इथे कोण येणार आहे.. तोही यावेळेस.... चला.. " 
आकाशवर एव्हाना सर्वांचा विश्वास बसला होता. तो निघाला तसे बाकी निमूटपणे त्याच्या मागोमाग निघाले. 
" जास्त दूर नाही आहे. इथे जवळच एक पडका किल्ला आहे.. तिथेच जातो आहोत आपण . " आकाश पुन्हा एकटाच बडबड करत होता. 


          समोरचं काही दिसतं नव्हतं. पाऊस नसल्याने सर्वत्र धुकं पसरलं होतं. त्यात धुकं कोणतं आणि ढग कोणते, काहीच कळत नव्हतं. आकाश चालत होता म्हणून आपण चालायचं , हेच माहित सर्वांना. १५-२० मिनिटांनी अशीच एक " चढाई " करून झाल्यावर , आकाश एका ठिकाणी थांबला. त्याच्यामागे हे सर्व. " what happens... ? " मागून एकाचा प्रश्न आला. आकाशने वळून पाहिलं सर्वांकडे. " पायाखाली बघितलं का.. ? " आतापर्यंत सर्वच आकाशच्या पाठीकडे बघत वर आलेले. त्याने सांगितल्याबरोबर सगळ्यांनी खाली बघितलं. 


         सूर्योदय होतं होता. त्याचा काही प्रकाश त्याच्या आधीच पुढे आला होता. त्यामुळे थोडं अंधुक दिसतं होते. पायाखाली.... ढग होते त्यांच्या. विसाव्याला आले असावेत.सर्वच ठिकाणी पांढरा धूर असावा , असच काहीसं. कोणालाही कळेना काय होते नक्की... " what is this... " आणखी एक प्रश्न. " माहित नाही... कदाचित ढग असतील... असंच असते इथे पहाटेला ... याच वेळेस... रोज.. पण या साठी नाही आणलं तुम्हाला... " आकाशने सर्वाना पुढे येण्यास सांगितलं. 

          
          त्या धुक्यात हरवलेल्या जमिनीवर , दबकत दबकत चालत सर्व पुढे गेले. अंधुक दिसतं होते. तुटलेले बुरुज दिसत होते. तिथेही न जाता , आकाशने एका जागी उभं राहायला सांगितलं. " सूर्य येईल थोड्यावेळाने ... तोपर्यंत कॅमेरे बंद करून ठेवले तरी चालतील हा... हे आजूबाजूचं अनुभवा... बघा किती छान वाटते ते.. " आकाशने बोलणं संपवलं आणि सर्व शांत झालं. आजूबाजूची सृष्टी, काय ते बोलत होती आता. समोर एक मोठी दरी दिसत होती. अस्पष्ट अशीच... त्यात एक मोठ्ठा धबधबा होता... नाही नाही... ते तर ढग होते. खाली प्रवास करत होते ते... अगदी डोंगरमाथ्यावरून पांढरा शुभ्र धबधबा कोसळावा , असंच वाटतं होते. यांच्या पायाखालून सुद्धा ते ढग खाली कोसळत होते. स्वर्गीय आनंद. त्यातून, खाली असलेल्या गावात पहाटेची भजनं, आरत्या... यांचा अस्पष्ठ आवाज कानास पडत होता. ते झालं कि वाऱ्याचा आवाज... मुद्धाम कानात घुसुन गुदगुल्या करत होता. वाराही आता छान वाहू लागला होता. पूर्वेला सूर्यदेवाचे आगमन कधीच झालं होतं. तरी या ढग- धुक्याच्या खेळाने ते जरा लांबवला होते. मग आले सूर्यदेव दर्शन देण्यासाठी. उजळू लागली डोंगराची शिखरे. जणू दोन्ही हात जोडून ते सूर्यदेवाला नमस्कार करत आहेत असं वाटतं होते. वाऱ्याने जोर पकडला तसं धुक्याचे लोट... कुठून कुठून येऊन त्यात मिसळू लागले. त्या तुटक्या बुरुजांना... त्या गडमाथ्याला कवेत घेऊ लागले. आता धुक्याचं सैन्य , सईच्या ग्रुपकडे झेपावलं. काही सेकंदांत त्या सर्वाना लपेटून टाकलं. गार गार सगळं. थंडी वाजत होती. त्या सोबतीला पाण्याचे थेंब... भिजून जायला होतं होते. शहारून गेले हे सर्व. तरी तो थंड वाऱ्याचा स्पर्श हवाहवासा वाटतं होता. हळूहळू सूर्याचा प्रभाव आणि वाऱ्याची सोबत , यापुढे धुक्याचं काही चाललं नाही. आवरतं घेतलं त्याने. धुकं आवरलं तशी पायथ्याखालील गावे दिसू लागली. झाडाझाडातून डोकावणारी कौलारू घरे. .. लालसर वाटा... आणि अशातच पक्षांचा एक मोठ्ठा थवा त्याच्या अगदी समोरून उडत गेला. काय तो अनुभव वर्णावा !!  झोपून राहण्यापेक्षा .... असं काहीसं स्वर्गीय अनुभव मनात भरून ते त्यांच्या सामान असलेल्या ठिकाणी आले पुन्हा. अद्भुत आहे हा प्राणी.. हाच विचार सईच्या डोक्यात.  

========================================================

तिथे दुसऱ्या टोकाला . सुप्री आणि तिच्या मैत्रिणींनी , खाली गावात जाऊन , अंघोळ वगैरे उरकली होती... लवकर निघायचे म्हणून. अमोल अजूनही झोपलेला. 
" ओ... अमोल सर, जागे व्हा... निघायचे आहे... " सुप्री अमोलच्या तंबू बाहेरूनच त्याला हाका मारत होती. अमोल जागा झाला. 
" काय यार... किती दिवसांनी एवढी छान झोप लागली होती... आणखी ५ मिनिटं झोपलो असतो तर काय झालं असतं .. " अमोल आळस देतं होता.
" जरा डोळे उघडा... आजूबाजूला बघा... तुमचाच तंबू आहे... बाकीचे निघाले... तुम्हाला सोडून गेलो तर पगार मिळणार नाही आम्हाला , म्हणून उठवलं तुम्हाला... " अमोलचे डोळे उघडले. खरंच, बाकीचे तयार होते निघायला. 
" अरे !! पण माझी अंघोळ... " अमोल.. 
" पाऊस आला कि भिजा त्यात... आपोआप होईल अंघोळ.. नाहीतर तुम्ही थांबा इथे , आम्ही बाकीचे निघतो... " सुप्री हसत म्हणाली. " न ... नको, आटोपतो लगेच... " अमोल धडपडत आवरू लागला. त्याची धावपळ बघून बाकीचे हसू लागले. 


कोमलने पुढच्या वाटा आधीच शोधल्या होत्या. त्यामुळे पुढच्या गावात लवकरात लवकर कसं पोहोचता येईल हे कोमलला तरी माहित होतं. निघाले सगळेच. अमोलचे पुन्हा "click , click " सुरु झालं. मागेच होता तो . 
" oh !! NO !! " मागून अमोलचा आवाज आला. सगळेच थांबून काय झालं ते बघू लागले.
 " काय झालं " कोमलने विचारलं. 
" अगं.. याची बॅटरी संपत आली आहे... " संजनाने डोक्याला हात लावला. " शिवाय मोबाईल सुद्धा चार्ज करायचा आहे... कुठे करूया... " अमोल जरा काळजीत होता. 
" what !! म्हणजे तुम्ही मोबाईल आणला आहे सोबत... " एका मुलीने आश्चर्याने विचारलं. 
" म्हणजे... बाकी कोणाकडे नाहीत का मोबाईल ... " आता अमोलची वेळ होती आश्चर्यचकित होण्याची. " कोणाकडे नाहीत मोबाईल... infact तसंच ठरवलं होतं सुप्री - संजनाने... " कोमलने अमोलकडे पाहत म्हटलं. 
" हो का... मला कोणी बोललंच नाही.. " अमोलने सुप्रीकडे बघितलं. 
" असो .. का घेतला नाही ... कोणी सांगेल का मला.. ",
" तोच प्रॉब्लेम... चार्जिंग चा... शिवाय थोडे दिवस दूर ठेवला तर चालतो मोबाईल स्वतःपासून दूर.... त्यासाठी हा निर्णय. " 
" ठीक आहे... जर काही अडचण आली तर उपयोगी पडेल.. तरी कॅमेरा चार्ज करावा लागेल ना.. त्याच काय... " अमोलचा प्रश्न होताच. 
" पुढे गावात थांबलो ना... कि करा किती पाहिजे एवढा चार्ज मोबाईल आणि कॅमेरा.... चला आता.. " सुप्री वेडावत बोलली. " चला मग " अमोल तिच्या शेजारीच येऊन उभा राहिला. 
" आता काय माझा हात पकडून चालणार आहात का..." सुप्रीचा प्रश्न. 
" जमलं तर करिन... " अमोल बोलून गेला. 
" हो का ... मग संजूचा हात कोण पकडणार.. तिला मीच लागते सोबतीला... नाहीतर घाबरते बिचारी... हो कि नाही संजू... " ,
" गप ग येडे... अमोल सर तिचं ऐकू नका आणि तिच्या नादाला हि लागू नका.. तुम्ही तुमचे फोटो काढा... " संजनाने बोलणं संपवलं , सुप्रीचा हात पकडून प्रवास सुरु केला पुन्हा.  

=========================================================

सई तर अजूनही त्या स्वप्नांच्या दुनियेत होती. " काय मॅडम... चला ... निघावं लागेल आता. " आकाशने हाक दिली. सईने लगेच सामान बांधायला सुरवात केली. 
" By the way... इथे कुठे चार्जिंग करायला मिळेल का.. " सईने आकाशला प्रश्न केला. आकाशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. 
" काय असते ते... म्हणजे शब्द ओळखीचा आहे , पण विसरलो बहुदा.. " आकाशने खरं उत्तर दिलं. 
" अरे मोबाईल आणि लॅपटॉप... यांची बॅटरी असते ना.. तिला चार्ज करावं लागते... शिवाय कॅमेरा आहेच... आणि या सर्वांकडे सुद्धा कॅमेरा आहेत ना... त्यांनाही लागेल चार्जिंग... " सई... 
" खाली गावात गेलो कि तिथे करू शकता, तरी आधी बघव लागेल वीज आहे का गावात... ",
" का ? " .
" गावात वीज नसते कधी कधी...  तरी काय असते ते लॅपटॉप... फोन ला मोबाईल बोलतात हे कळलं " सईने बॅग मधून लॅपटॉप बाहेर काढून दाखवला... 
" याला बोलतात लॅपटॉप... " आकाशने दुरुनच पाहिलं. "
 साधारण किती वेळ लागतो ... चार्ज होण्यासाठी... " ,
" तसं ४ तास लागतात.... आणि हा जुना हि झाला आहे नाहीतर लवकर होते चार्जिंग... " ,
" असं आहे तर... पण एक सांगू, मोबाईल .. कॅमेरा तेवढा चार्ज करून घ्या. तो होईल ना लवकर.. एकतर गावात वीज नसते ना कधी, त्यात तुम्ही एवढा वेळ वीज वापरली तर बरं दिसत नाही ते.. तरी बघा विचार करून... " सईला पटलं ते. सर्व गावात उतरले. 

===========================================================

"हॅलो .. ओ मॅडम ... हॅलो.. " अमोल सुप्रीला मागून आवाज देत होता. सुप्री मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करत होती. 
" काय झालं अमोल... ? " कोमल थांबली. 
" अरे कॅमेरा आणि मोबाइल... चार्ज करायचा आहे. तुम्ही कोणी थांबतंच नाही. गावात तर आलो कधीच.... मग थांबू ना थोडं... " कोमलने घड्याळात पाहिलं. अरेच्या !! सकाळचे ११:३० वाजले...एवढं चालत होतो आपण. वेळ कधी गेला कळलंच नाही. कोमलने सगळ्यांना थांबवलं. 
" हो ना... खूप चाललो आज... कमाल केली सगळ्यांनी... " संजना... 
" का थांबलो.. " सुप्री मागे येत म्हणाली. 
" मॅडम ... हे चार्जिंग करायचे आहे, शिवाय आपल्याला हि चार्ज व्हावे लागेल ना.. पोटात काही नको का... " अमोल... खरंच , एवढे चालले होते ते. थांबले तेव्हा भुकेची जाणीव झाली. थांबले. सुप्री-संजना आणि कोमल, जेवणासाठी काही मिळते का ते बघण्यासाठी गावात शिरल्या. अमोल मोबाईल आणि कॅमेरा घेऊन कुठे चार्ज करता येईल , ते शोधायला निघाला. बाकीचे तंबू बांधण्यात गुंतले. 

==============================================================

" काय खाणार गं " आकाशने सुप्रीला विचारलं. 
" काहीही... तू बनवणार असशील तर कुछ भी खाऊंगी.... " सुप्रीने डोळा मारला आकाशला. 
" सांग गं सरळ, बाकीच्यांनाही आणायचे आहे... ",
" तू बनव ना.. येते ना तुला बनवता. ",
" जा... आज जास्त काही मिळणार नाही... त्या गावात सुद्धा कोणी दिसत नाही... " आकाश. 
" बनव ना रे तू जेवण... मला तुझ्या हातचे खायचे आहे.. ब.. न... व.... ना.... रे .... " सुप्री लाडिक आवाजात बोलत होती. 
" जास्तच लाडात आली आहेस... हा.... " सुप्री त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. 
" किती दिवस झाले... तुला आठवते का... शेवटचं कधी एकत्र... दोघेच ...... निवांत काही खात बसलो होतो... " आकाश आठवू लागला. खरंच, किती दिवसांनी तो या सर्वांसोबत होता. 
" हो... काय करणार ना... कामचं आहे माझं.. नाहीतर घरी बसावं लागेल. दुसरं काहीच येतं नाही मला , फोटोग्राफी शिवाय.. " ,
" चालेल ना... मला रोज तुझ्या हातचं जेवण मिळेल. मी जॉब करते, तू घर सांभाळ. नाहीतरी घरी बसलास ना, तर माझ्याशिवाय दुसरी कोणीच राहणार नाही तुझ्यासोबत आणि भेटणार सुद्धा नाही... so .... " सुप्री त्याला चिडवत म्हणाली. 
" हो का... थांब बघतो तुला... " सुप्री पळाली, आकाश तिच्या मागोमाग धावला. 

सुप्री अशीच मधेच आठवणीत हरवून जायची. जेव्हा जेव्हा बाहेर जायचे, तेव्हा आकाश सोबतच असायची. त्याला अजिबात सोडायची नाही. जेवणाचे बघायला जाताना सुद्धा आकाश सोबतच असायची ती. म्हणून तर यावेळेस जेव्हा जेवणाची व्यवस्था करताना सुप्री पुढे होती. आकाशने शिकवून ठेवलं होतं ना, तसेच काही तिने विकत घेतलं गावातून. तिघी निघाल्या पुन्हा त्यांच्या जागी. अचानक संजनाचे लक्ष गेले एकीकडे. 
" कोमल... ती बघ... तशीच मूर्ती.."  यावेळेस सुप्रीने सुद्धा पाहिली मूर्ती. तिघी त्या गणपतीच्या मूर्ती जवळ गेल्या. सुप्रीला अश्या मूर्तीबद्दल काहीच माहित नव्हतं. कोमल ,संजना शोधू लागल्या काही लिहिलं आहे का मुर्ती खाली. तर तिथेहि तीच गत.. भटक्याने काय लिहून ठेवलं होते, ते नव्हतेच तेथे. त्या तिघींना बघून एक बाई त्याच्याजवळ आली. 
" भटक्याची मूर्ती हाय ती... त्यानं उभारून ठेवली आणि गेला भटकायला.... " ,
" हो... कळलं ते.. पण या खाली काही लिहून ठेवतो ना तो... " ,
" व्हय व्हय... लिवतो तो ....,", 
" हा तेच.... काय लिहितो तो... " ती बाई विचार करू लागली. 
" नाय राहिलं डोस्क्यात... " सुप्री मागेच होती या संभाषणात. ती पुढे आली आणि मूर्ती निरखून पॉहू  लागली  
" अशी कोणी बनवली गणूची मुर्ती... " सुप्रीचा प्रश्न. 

" हा... आठवलं... त्यो असाच बोलायचा ... तुमच्या सारखं... भटक्या... आणि तेच लिउन ठेवलं होता त्यानं.. " ,
" काय ते ... " ,
" माझा गणू... " 
" काय " सुप्री किंचाळली. संजनाने सुद्धा ऐकलं ते. 
" खरंच तसं लिहितो तो... " सुप्रीच्या डोळ्यात पाणी जमा झालं. 
" व्हय... लिवतच नाय... बोलतंय बी मदे मदे ते येडं... माझा गणू .... माझा गणू... " ती बाई हसतच पुढे निघून गेली. कोमलला यातलं काहीच कळलं नाही. 
" सुप्रिया ... काय झालं ? " कोमलला तिने घट्ट मिठी मारली. थोडावेळ कोमल blank झालेली, काय झालं हिला नक्की. 
" थँक्स कोमल... खूप खूप थँक्स.. " तिची मिठी सोडली आणि तिने संजनाला मिठी मारली. दोघी रडत होत्या, हसत होत्या. 
" काय झालं... सांगेल का कोणी मला... " कोमल... 
"आता नक्की झालं, तो आकाशच आहे... " सुप्री डोळे पुसत हसत होती. 
" कसं काय ? " ,
" गणू.. सुप्रीमुळेच आकाशला सवय लागली होती... गणपतीला गणू बोलायची. पण तो अश्या मूर्ती का बनवतो आहे इथे , हे कळत नाही. " संजना. 
" चला म्हणजे... एक बरं झालं... भेटला तो आपल्याला... " कोमलला आनंद झाला. 
" तरी प्रश्न आहेचं.. " सुप्री .. 
" गेला एक वर्ष... शहरात का आला नाही तो... इथे का भटकतो आहे.. " 
" ते नंतर, आधी त्याला भेटू ना... " संजना. 
" त्या आधी जेवायला हवे ना आज ... बाकीचे वाट बघत असतील आपली... " ,
" हो हो ... " निघाल्या तिघी. सुप्री पुन्हा मागे वळली. त्या गणपतीच्या मूर्तीला पाया पडली. " थँक्स गणू.. खूप खूप थँक्स... " आताही डोळे पाणावले तिचे. एक वेगळाच आनंद मनात घेऊन सुप्री निघाली. 

====================================================

             बघता बघता संध्याकाळ होतं आली. आज सई आणि तिचा ६ जणांचा ग्रुप एका गावात थांबले होते. एका देवळाच्या मागेच त्यांनी तंबू उभे केले होते. रात्रीचं जेवण देवळात मिळणारं होते, तर सगळ्यांनी तिथेच जेवण करायचे ठरलं. आकाश नव्हता सोबत. बाकीचे चालून थकले त्यामुळे बसल्या जागीचं आराम करत बसले होते. सई निघाली गावात फेरफटका मारायला. जरासं धुकं जाणवतं होते. कमालीची गोष्ट ना, पावसाळयात सुद्धा धुकं.. संद्याकाळी... बोचरा थंड वारा होता सोबतीला. गावातून फिरताना सई सगळीकडे पाहत चालत होती. किती छान हे, शहरातली आधुनिकता नव्हती इथे, कोणालाच घाई नव्हती आरामात सुरु होते सर्व, म्हातारी माणसं गप्पा मारत बसली आहेत. कोणी मोबाईल वर चॅटिंग , whatsapp करत बसलेली नव्हती. गाई ,त्यांचं सकाळचं काम संपवून वासरासहित गोठयात परतत आहेत. शेतावर गेलेले , आपल्याच नादात..... काही गुणगुणत घरी निघाली आहेत. काही लहान मुलं खरे खुरे 'मैदानी खेळ" खेळत आहेत. आणि एका कोपऱ्यात , आकाश काहीतरी करत बसला होता. सई गेली त्याच्याजवळ. त्याचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. गणपतीची मूर्ती होती. तिलाच पुन्हा पुन्हा माती लावत होता. हा... बोलला तर होता ... सगळीकडे गणपती बनवतो... यानेच बनवली असेल हि... "काय करतो आहेस... " सईने शेवटी विचारलं. 

आकाशचं काम झालं होते तसही. तिने विचारल्यावर लगेच तिच्याकडे नजर गेली. 
" हे गणू साहेब.... त्याची जरा डागडुजी करतो आहे. पावसाने खूप दिवस अंघोळ झाली ना. म्हणून जरा... " आकाश मंद हास्य करत होता. 
" पाऊस तर नाही आहे ना... आणि हो... तुला कळतो ना निसर्ग.. मग थंडीत पडणार धुकं... पावसाळ्यात कसं काय... सकाळचे कळू शकते... आता कसे... बघ गावात, कसं धुकं पसरलं आहे... " सई किती उत्साहात सांगत होती. " म्हणजे मी हे सगळं पहिल्यांदा अनुभवते आहे.. शहरात कुठे असते असं काही... " ,
" धुकं ना...असतेच, शहरात धूर असतो. गावात धुकं... पावसातही असते हा.. निसर्गाचा खेळ.. मागे धुकं पाहिलंत ना... समोर बघा... " असं बोलून आकाश सुद्धा समोर बघू लागला. 


             समोर एक मोठ्ठा डोंगर होता. पाषाण पुरुष. कधी पासून उभा होता काय माहित, हिरव्या रंगाची शाल पांघरून शांत डोळे मिटून बसला असावा. ध्यानस्थ !! त्याच्या अंगा-खांद्यावर झाडांचे जंगल. घरी परतलेल्या पक्षांचा कालवा नक्की सुरु असेल तिथे. धुकं तर तिथेही दिसतं होते. एखादं ठिकाणी गडद पांढरा रंग उठून दिसतं होता, त्या हिरवळी मध्ये... किती दाट धुकं असावं तिथे. त्याच्या माथ्यावरून जाणारे ढग, त्याला स्पर्श करावा आणि पुढे जावे, हेच करत होते. आकाश मधेच बोलला." या डोंगराला ना... गावातले सगळेच " आजोबा " बोलतात... कित्येक वर्षांपासून तसाच उभा आहे... " त्या आजोबाच्या माथ्याला स्पर्श न करू शकलेले ढग ,त्याच्या कुशीत विसावत होते.... हळूच, त्याला कळूही न देता. आणि .... त्या आजोबाच्या मागे, धुक्याची एक मोठी भिंत उभी होती जणू... या सर्व चित्रामागे, सूर्यास्त होतं होता. अगदी बरोबर त्या आजोबाच्या पायथ्याशी. तसेच वाटतं होते. दिवसाचा कारभार संपवून , आणि आजोबांशी नतमस्तक होऊन सूर्य विश्रांती साठी निघाला, असं कुणी म्हटलं असतं तरी ते वावगं ठरू नये. सई हरखून गेली..अंगावर शहारा आला.  

बघतच राहिली ती. तितक्यात काही लहान मुलं आली आकाश जवळ. " दादा... चल ना, खेळायला... " म्हणत त्याचा हात पकडून घेऊन गेली. सई बघत होती सर्व. काहीवेळाने सईजवळ एक बाई येऊन उभ्या राहिल्या. 

" नमस्कार !! तुम्ही ओळखता का भटक्याला... " त्यांनी सईला विचारलं. 
" नाही... actually ४-५ दिवसच झाले त्याची भेट होऊन. " ,
" असं आहे का.... मला वाटलं , तुम्ही शहरातल्या दिसता.. तर त्याला घेऊन जायला आलात. " ,
" म्हणजे तुम्हाला माहित आहे , तो इथला नाही ते... तुम्ही कोण आहात ? " सईला प्रश्न पडला. 
" मी पाटील बाई, हि शाळा दिसते ना समोर... तिथे शिक्षक आहे मी. आता शाळा सुटली. मुलांनी बघितलं त्याला म्हणून घेऊन गेली खेळायला. ",
" म्हणजे सगळेच ओळखतात ना त्याला... " सई.. 
" हि शाळा आहे ना... त्याच्यामुळेच सुरु झाली पुन्हा... मोडकी-तोडकी शाळा होती. त्यात कोणीच यायचे नाही शिकायला. किती प्रयन्त केले मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी. घरोघरी जाऊन विनवले, मुलांना शाळेत पाठवा... कोणीच तयार नाही. एक दिवस, हा कुठून आला काय माहित, झोपायला जागा मिळेल का विचारत होता. कोणीच तर नसायचं शाळेत .. झोप बोलली त्याला .... नंतर विचारू लागला.... हि शाळा आहे का... त्याची भाषा ऐकून, तो गावातला नाही हे समजलं. त्याला सांगितलं मी सर्व. एक दिवस राहिला शाळेत. गेल्या निघून पुढच्या दिवशी. २ दिवसांनी परत आला तेव्हा गावकरी होती सोबत. त्यांना मदतीला घेऊन, त्याने उभी केली शाळा पुन्हा. परत, गावात जाऊन काय बोलला माहित नाही... शाळा पुन्हा सुरु झाली. आता तर न चुकता मुलं येतात रोज... इतकी येतात कि सकाळ आणि दुपार , २ वेळेस घ्यावी लागते शाळा... कमाल आहे ना... आम्ही सांगत होतो तेव्हा कोणी तयार नव्हतं.. याने काय जादू केली.. सगळेच तयार झाले... आणि ऐकतात हा सगळे त्याचं... " पाटील बाई. 

" इकडेच होता का तो... आधी... " ,
" एक वर्ष होतं आलं, २ आठवडे होता गावात. बरीच कामे केली त्याने गावात. लहान मुलांचा तर लाडका दादा झाला होता तो. आणि एक दिवस अचानक निघून गेला , कोणाला न सांगता. वाईट वाटलं सर्वाना. तरी पुन्हा येईल म्हणून वाट बघत होते सर्व. तो कालच आला पुन्हा गावात, हे ऐकलं मी. आज बघितलं त्याला.. छान वाटलं. त्या तो नक्कीच शहरातून आलेला आहे, हे मला माहित होतं. तू दिसलीस , वाटलं... भटक्याचा प्रवास संपला आता.... तर तुही नवीन आहेस त्याला... " ,
" हो... पण खूप छान माणूस आहे ना... तुम्हाला त्याचं नावं माहित आहे का " ,
" तो गेला ना इथून ... तेव्हाच त्याला गावातले "भटक्या" बोलायचे.... भटक्याचा अर्थ, प्रत्येक गावात बदलतो. लोकांना वाटते, सारखा भटकत असतो म्हणून भटक्या.... पण या गावातल्या लोकांनी मुध्दाम नाव ठेवलं ते... मग सगळेच त्याला भटक्या बोलू लागले... " 

" काय वेगळं... " सई .... 
" या गावात भटक्या म्हणजे देवदूत.. देवाचा माणूस... असं म्हणतात कि देवदूत... आपल्या सारखं रूप घेऊन, या पृथ्वीवर फिरत असतात. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी... तसंच काहीसं केले त्याने या गावात... लोकांनी म्हणून त्याला " भटक्या " नाव ठेवलं. शेजारच्या गावातून सुद्धा त्याचे किस्से ऐकायला मिळायचे... लोकांना सुधारलं त्याने.. अडचणी गायब केल्या... पण त्याच्या अडचणी कळत नाही कोणाला. हे दुःख आहे, बघा जमते का तुम्हाला... आम्ही तर जात नाही शहरात. तुम्ही मदत करू शकता त्याला. " पाटील बाईंच्या त्या वाक्याने सईला विचार करायला भाग पाडले. आकाश समोरच त्या मुलासोबत खेळत होता. 

" तू नावं विचारलंस ना त्याच... बाकीच्यासाठी तो भटक्या आहे... मी त्याला वेगळंच नाव ठेवलं आहे.. " ,
" काय ? " ,
" तो एवढा छान बोलतो ना.. जे बोलतो ते मनापासून असते... मलाही त्याने "ताई " केलं, बरं का... तुलाही अनुभव आला असेल त्याच्या बोलण्याचा... पावसावर खूप प्रेम करतो तो.. बोलतो ना कधी... " तुम्ही पाऊस बघितला आहे का ? " हसल्या पाटील बाई स्वतःशीच. " तरी एकदा दाखवला हा त्याने ... पाऊस कसा बघायचे ते... सुंदर अगदी... " पाटील बाईंनी सई कडे बघितलं. 
" तू बघितला आहेस का पाऊस कधी.. " सईने नकारार्थी मान हलवली. 
" तो बघ समोर.. " त्यांनी आकाश कडे बोट दाखवलं. " त्याला पाऊस म्हणते मी... अचानक येतो... सर्वांना खुश करतो आणि निघून जातो... पाऊसच तो... सगळ्यांना हवाहवासा वाटणारा... पाऊस... " पाटील बाई निघून गेल्या. 

              सई आकाशकडे पाहत होती. किती रमला होता तो त्या मुलांमध्ये. किती गूढ माणूस आहे हा... स्वतःच अस्तित्व माहित नाही.. तरी किती आनंदात, स्वतः पेक्षा दुसऱ्याचं सुख बघणारा... असा पहिलाच व्यक्ती बघितला मी. त्या बाई बोलल्या ते अगदी बरोबर, पाऊसच आहे हा... सतत भटकत राहायचे.. वाऱ्यावर स्वार होऊन... वाट मिळेल तिथे. वारा नेईल जिथे.... कोणताही अटकाव नाही, बंधन नाही.. फक्त भटकत राहायचे आणि बरसत रहायचे. सईच्या मनात काही जाणवू लागलं होतं आकाश बद्दल.   

==================================================

" तुमच्या दोघांचे कधीपासून relation आहे रे .. ? " सुप्री खोटा राग चेहऱ्यावर आणत विचारत होती. आकाश बुचकुळ्यात पडला. " कोणाबद्दल बोलतो आहेस तू... " आकाश सुप्रीकडे पाहू लागला. एका उंच ठिकाणी बसले होते दोघे. समोर डोंगरांच्या रांगा होत्या. तिथून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ढग एकामागोमग एक चालले होते. त्यांचेही ट्रॅफिक जॅम झालं असावं.. एक नदी वाहत होती, उगम स्थान त्याचं डोंगराच्या रांगेतील एका दरीत. लाल रंगाचे पाणी... लालेलाल सापच जणू... पुढे जाऊन गडप होत होती कुठेतरी. " तुमच्या दोघांचं.... पाऊस आणि तू... " सुप्री हसायला लागली. आकाशला हि हसायला आले त्यावर. 

" पाऊस !! ..... पाऊस ना, खूप जिव्हाळ्याचा आणि तेव्हढाच कमजोरीचा विषय आहे माझा...  जास्त करून 'कमजोरी 'च आहे असं म्हणालीस तरी चालून जाईल. चारचं महिने येतो वस्तीसाठी, पण पूर्ण वर्षभरासाठी डोक्यात काही ना काही भरवून जातो. त्यातलं बरंचसं चांगलंच असते, तरीदेखील काहीतरी वेगळं.. नेहमीच्या जगण्यापेक्षा अगदी भन्नाट करायला सांगतो.. दरवेळेस आला कि... मग काय, "मित्राचं" ऐकावंचं लागतं. त्यात, बोलणारं आणि अडवणारं कोणी नसेल.. सोबतीला, पाठीवरची सॅक आणि जमवून ठेवलेला अनुभव असला ना... नाही थांबवता येतं स्वतःला... निघून जातो मी ...कधी कधी अनोळखी वळणं , वाटा मिळतात. हरवतो कुठेतरी... पण मला काय वाटते सांगू, हरवलेलं बरं असते कधी कधी... त्याशिवाय , नवीन वाटा कश्या सापडणार ना... कसं ना.. उरलेल्या दिवसात , मन तुडुंब भरलेलं असते भावनांनी.. त्यांना मोकळी वाट मिळते ती "हा मित्र" आला कि.. आजूबाजूला कोण नसलं तरी चालेल, तसंच बसून राहायचं पावसात... ऐकायचं त्याला... प्रत्येक थेंबातून तो एक वेगळीच कहाणी सांगत असतो... त्याची आणि दुसऱ्यांची सुद्धा... भिजणारे खूप असतात, त्याही पेक्षा 'मित्राला' नावं ठेवणारे अधिक.. तरी, आयुष्यात एकदातरी... काहीच ठरवायचं नाही, मनात फक्त वारा भरून घेयाचा, पाठीवर सॅक चढवायची आणि या "मित्राचा" हात पकडून निघून जायचं, तो घेऊन जाईल तिथे.. ओळखीच्या वाटा अनोळखी करण्यासाठी आणि स्वतःला हरवून जाण्यासाठी... "    

                  सुप्रीला अचानक आठवलं ते. समोर तसंच दृश्य होते ना काहीस. एकटीच येऊन बसली होती कधीची. पावसाला मित्र मानणारा, असा जाऊच शकत नाही सोडून, त्या पावसाला तरी कसं जमणार होते ते.... मित्राला अडचणीत टाकायला. पण इतका वेळ आकाश का समोर आला नसेल. रागावला तर नसेल ना माझ्यावर... नाही, त्याला तर राग येतंच नाही कधी.. मग काय कारण असेल... सुप्री रात्र झाली तरी तेच ते विचार करत बसली होती.  

                 पुढचे २ दिवस असेच फिरण्यात गेले. सुप्री आणि तिचा ग्रुप , पुढे पुढे जात होते.. प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी.. तिला आकाशच्या खुणा सापडत होत्या. गावातले सांगायचे... भटक्या असा होता , तसा होता... बोलण्याची पद्दत.. कसा सर्वाना मदत करतो.. वगैरे. आता तर १०० % पक्के झाले होते कि ती आकाशच आहे. पण संजना जरा चिंतेत होती... कारण अमोल....... २ दिवस तर तो तिच्यासोबतच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत. सुप्री तर नेहमीसारखी वागत होती त्याच्याबरोबर... परंतु अमोल मात्र वेगळा वाटतं होता संजनाला. 
" सुप्री !! जरा बोलायचं आहे तुझ्याशी.. " रात्रीचं जेवण झालं तर अमोल सुप्री सोबत गप्पा मारत बसला होता.
" येते... या अमोल सरांना राजा-राणी ची गोष्ट सांगते आहे.. नाहीतर झोप येतं नाही त्यांना... " सुप्रीच्या या डायलॉग वर अमोलसुद्धा हसला. 
" हसू नकोस... चल बोलायचं आहे " ,
" बसा.. ओ संजना मॅडम... किती छान वातावरण आहे... ",अमोल .... 
" नको... नंतर, उद्या बोलू... आता जरा सुप्री बरोबर पर्सनल बोलायचं आहे... " ,
" ok ok ... जा तुम्ही... आहे मी इथेच... वाट बघतो तुमची... ", 
" उद्या ... जमल्यास लवकर निघू... जमलं तर पहाटे ६:३० ला. तर आज सगळ्यांनी लवकर झोपा... " कोमलने आधीच सांगितलं. त्यामुळे सगळेच लवकर झोपायला गेले. 

                    अमोल मात्र २ दिवस खूष होता. सुप्रीला आणखी समाजवे , असं त्याने ठरवलं होते. म्हणून तिच्यासोबतच रहावं हे त्याने ठरवलं आणि केलं सुद्धा. खूप छान होती ती फीलिंग. २ दिवसात त्याने तिला खूप मदतही केली होती. सुप्रीसुद्धा आकाशचे कळल्यापासून जरा मोकळी झाली होती मनाने... खुलली होती. तिच्यातला बदल आपल्यामुळेच आहे, असं वाटतं होते अमोलला. ती आपल्यासोबत किती खुश असते, हे अमोलच्या मनात कुठेतरी कोरलं जातं होतं. तिला आपण आवडतो, आपली सोबत तिला सुखावते, असा समज अमोलला झाला. त्या स्वप्नातच तो झोपी गेला. 

" काय करते आहेस तू ... " संजना जवळपास ओरडलीच सुप्रीला. 
" काय होतंय नक्की तुला.. " सुप्रीला प्रश्न पडला. 
" दोन दिवस झाले... बघते आहे मी. अमोल सर तुला सोडतच नाही आहेत. त्याच्या मनात काय आहे माहित आहे ना तुला.. तरी तुही का अशी वागते आहेस.. " ,
" संजना,... आधी शांत हो... " सुप्रीने संजनाला शांत केलं. 
" मला माहित आहे अमोल सरांच्या मनात काय आहे ते... ते तर आधीपासूनच माहित आहे मला. ",
" मग ? " ,
" त्यांना आकाशबद्दल काहीच माहित नाही. आणि त्यांना माझ्या बद्दल हि माहित नाही. त्यांना सांगायचे होते. आता वेळ आली आहे असं वाटते आहे... " ,
" मग सांगून टाक ना.. त्यांच्या मनात काही वेगळं येण्याआधी... बघ, आता आकाशसुद्धा आला आहे.. कसं सांभाळणार आहेस दोघांना तू... " संजना बरोबर बोलली. सुप्री रात्रभर विचार करत होती. 

=========================================================

सईची सकाळ लवकर झाली. सकाळी ७ चा अलार्म असला तरी एक तास आधीच, म्हणजे ६ वाजता जाग आली. बाहेर आली तर सगळीकडे धुकं पसरलेलं, आकाश बाहेरच उभा. सईला तंबूमधून बाहेर आलेलं पाहिलं त्याने. 
" काय झालं आहे नक्की... एवढं धुकं कसं... " सई आकाश जवळ येतं म्हणाली. 
" मलाही कळत नाही आहे.. असं पहिल्यांदा झालं आहे.. मला वाटते ना.. वादळाची शक्यता आहे.. " सई घाबरली.. 
" वादळ !!......  आता येते आहे का " सईने घाबरत विचारलं. या दोघांचा आवाज ऐकून बाकीचेही बाहेर आले. 
" आता नाही येतं, तसं वाटते आहे मला ... कारण पावसात असं दाट धुकं पडते ना.. तेव्हा वादळ येणार असते असं गावातले म्हातारी लोक बोलतात... " आकाश सारखा वर आभाळात बघण्याचा प्रयन्त करत होता. पण काही दिसेल तर शप्पत. 
" then.... what to do... " एकीने मागाहून विचारलं. 
" निघूया आताच " आकाश त्याचेही सामान आवरू लागला. 
" पण कुठे जायचे.. " सईचा प्रश्न. 
" एखाद्या उंच ठिकाणी... या गावात तरी कमी आहेत अश्या जागा.. मला वाटते नदी पलीकडे जावे लागेल.. निघूया का.... " आकाशने विचारलं. तसे सगळेच निघाले. 

==========================================================

तिथे कोमलने ठरवल्याप्रमाणे , पहाटे ६:३० ला  निघाले. " इतक्या लवकर का निघालो आज. " एका मुलीने विचारलं. झोपचं पूर्ण झाली नव्हती कोणाची. अमोल सहित बाकी सर्वच आळसावले होते. 
" या नदीच्या पलीकडे एक गाव आहे.. तिथे जायचे आहे.. आणि तिथे जायचे असेल तर लवकर निघावे लागेल... नाहीतर रात्र होईल पोहोचेपर्यंत. म्हणून लवकर.. " अमोल धावतच पुन्हा सुप्री जवळ आला. एकत्रच चालत होते दोघे... 
" केवढं धुकं आहे ना... खरंच धुकं आहे कि कुठे आग लागली आहे... " अमोलच सुरु झालं. 
" काय अमोल सर... एवढं पण नाही समजत का.. धुकं आहे... माझ्यासोबत राहू नका जास्त... असेल तेवढी हि निघून जाईल बुद्धी.. " सुप्री हसत बोलत होती. 
" चालेल... पण छान वाटते तुझ्याबरोबर.... अगदी हलकं वाटते. तुझ्यासोबत बोलताना... " ,
" काय होतंय नक्की... ताप वगैरे आला आहे का तुम्हाला.. उगाच झाडावर चढवू नका... उतरता येत नाही मला. " आजूबाजूचे सर्वच हसले. 

            कोमल सुद्धा हसत होती. पण खरंच,  इतकं धुकं कधी पाहिलं नव्हतं. तिच्या अंदाजाप्रमाणे, पुढे १० मिनिटांवर एक लोखंडी पूल असायला हवा. इथे शेजारी कोण चालत आहे ते दिसत नव्हतं, पुढचा पूल काय दिसणार. " थांबा इथेच... तो ब्रीज कोणत्या दिशेला आहे ते बघून येते.. " असं म्हणत कोमल पुढे निघून गेली. 

==============================================================

" माझ्या अंदाजानुसार, इथेच कुठेतरी एक लोखंडी पूल आहे. त्यावरून पलीकडच्या गावात जाऊ शकतो. " आकाश आजूबाजूच्या परिस्तिथीचा आढावा घेत होता. 
" इतकं का धुकं पसरलं आहे. " सईचा प्रश्न.
" वैज्ञानिक कारण माहित नाही, पण गावात जुन्या लोकांकडून ऐकलं आहे... हे धुकं म्हणजे ढग असतात एकप्रकारचे ... असे वादळी वारे वाहू लागेल ना. कि वारा काय करतो, मोठया काळ्या ढगांना जागा करून देण्यासाठी , हे पांढरे ढग बाजूला करतो.... त्यांना ढकलून देतो. मग हे पांढरे ढग, वाट मिळेल तिथे पळतात. एखादा ढग जरी खाली आला ना... मग त्याच्या मागोमाग बाकीचे ढग सुद्धा खाली येतात. म्हणून हे धुकं, असं बोलतात. आणि असं असेल सुद्धा. वर आभाळात गर्दी झाली आहे काळ्या ढगांची. " आकाश बोलत होता. काळजीपूर्वक चालत होता. 
" पर.. तुफान आ रहा है ना ...then, हम उपर क्यू जा रहे है.. because, it too windy up there ... right .... ? " सईच्या मित्राचा प्रश्न बरोबर होता. 
" प्रश्न बरोबर आहे... पण आपण आता ज्या ठिकाणी चालत आहोत ना.... तो नदीचा किनारा आहे... वादळात नदीला अचानक पूर येतो. त्या पाण्यापासून वाचण्यासाठी वरच्या ठिकाणी जावे नेहमी. वरच्या ठिकाणी , वारा -पाऊस  या पासून वाचू शकतो. पण पाण्याची ताकद माहित नसेल तुम्हाला कदाचित... " आकाश बोलता बोलता शांत झाला. " पाण्याचा आवाज येतो आहे बघा.... आपण तरी दूर आहोत नदी पासून, तरी आवाज येतो आहे. " सारेच कान देऊन ऐकू लागले. खरंच पाण्याचा जोरात आवाज येतं होता. आवाज ऐकूनच काटा आला अंगावर. 

===========================================================

" मला भेटला तो लोखंडी ब्रिज, चला पटपट... " कोमल पुन्हा या सर्वा जवळ आली.. " पटपट कसं चालणार... पुढचं काही दिसत नाही. " एक जण पट्कन बोलून गेला. तरी जावेच लागणार होते. पुढच्या १५ मिनिटात, ते पोहोचले तिथे. आणि सर्वाना नदी दिसली. 
" बापरे !! " सुप्री घाबरली.. 
" काय झालं ... " अमोल मागेच होता. 
" पूर येतो आहे नदीला... " आधीच त्या आवाजाने सगळे घाबरले होते. त्यात सुप्री बोलली , आणखी घाबरले. 
" तुला कसं माहित... " अमोल नदीच्या दिशेने पाहत बोलला. 
" आकाशने शिकवलं आहे... " सुप्री पट्कन बोलून गेली. अमोल जरा आश्चर्यचकित झाला. तरी त्याचं लक्ष नदीकडे होते. सुप्रीने जीभ चावली. 
" चला लवकर... हा ब्रिज ओलांडलाच पाहिजे... " कोमल बोलली. 
" अरे पण , काही दिसतंच नाही... कसं जाणार पलीकडे... " सगळेच त्या नदीपासून दूर थांबले होते. 

पलीकडे, आकाश , सईचा ग्रुप येऊन पोहोचला. तेही पाण्याला बघून घाबरले. " पण जाणार कसं... ब्रिज चांगला आहे का ते सुद्धा माहित नाही... " तेही थांबले. 
" एक काम करूया... मी पुढे जाऊन बघतो. " ,
" नको... wait... तू नको जाऊस.. दुसऱ्या कोणाला तरी पाठवू... तुलाच माहित आहे इकडचं... तू कुठे हरवला तर कुठे जाणार आम्ही... " सई काळजीने बोलली. आकाशला केवढं हसू आलं. लाजली सई त्यावर. " ok ok नाही जात ", त्या ६ जणांमध्ये २ मुली , ४ मुलं. त्या मुलांपैकी धडधाकट असलेल्या एकाला पुढे पाठवलं. चाचपडत तो एका बाजूने धरून चालत पुढे गेला. पलीकडे गेला सुद्धा. पलीकडे उभ्या असलेल्या सुप्री-संजनाच्या ग्रुपला दिसला तो. कोमल गेली पुढे. 

" चांगला आहे ना ब्रिज... " ,
" मुझे मराठी नही आता... " त्याने उत्तर दिलं. 
" ब्रिज बराबर है ना... हमे उस तरफ जाना है... " ,
" हा.. मेरा भी ग्रुप उधर है... उनको यहा आना है... " कोमल आणि त्याचं संभाषणं सुरू होते. 
" तो एक काम करते है.... मै अभी रिटर्न जाता हू.... आप अपने ग्रुप को left side से ले आना...मै right side से मेरे दोस्तो के साथ आता हू... ब्रिज पर कुछ दिख नही रहा... ऐसे चले तो आपस मै टकरा जायेंगे... चलेगा ना.. " ,
" Done ... " कोमलला पटलं. सारेच त्या ब्रिज जवळ आले. सईचा मित्र पुन्हा दुसऱ्या बाजूला गेला. त्याने काय घडलं ते सांगितलं. उजव्या बाजूने सईचा ग्रुप निघाला हळूहळू. आकाश मात्र सगळ्यांत शेवटी जाणार होता. तिथून कोमल आधी निघाली. तिच्या मागोमाग बाकीचे. सुप्री का कुणास , मागे थांबली. 

                  इतकं धुकं त्या नदी आणि पुलावर, कि उजव्या-डाव्या बाजूने जाण्याचा निर्णय योग्य होता. समोरचं , आजूबाजूचं अजूनही दिसतं नव्हतं, तरी फक्त अंदाज लावून चालायचे ठरवलं होतं सगळ्यांनी. पण त्या धुक्यामुळे या सर्वांची भेट टळली, नाहीतर तेव्हाच आकाश सुप्रीच्या ग्रुपला दिसला असता. सर्व त्या धुक्यात शिरले तसे शेवटी आकाशहि शिरला. आकाश आत गेला आणि कोमल-संजना दुसऱ्या बाजूने बाहेर आल्या. सुप्री दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ग्रुप मध्ये आकाशलाचं बघत होती. सईचा पूर्ण ग्रुप बाहेर आला. यांचा सर्व ग्रुप पुढे निघून गेला होता, सरतेशेवटी... आता पलीकडून कोणी येणार नाही... हे सुप्रीला कळलं आणि ती सुद्धा त्या धुक्यात शिरली. जोराचा वारा आला. सुप्रीने डोळे बंद करून घेतले. तिला सगळीकडून धुक्यानी लपेटून टाकलं. आकाशच्या बाजूचे धुकं विरळ झालं आणि तो त्यातून बाहेर येताना वेगळाच भासला सईला. आकाश पुढे निघून गेला. धुक्याने पुन्हा आपली जागा घेतली. सुप्रीने डोळे उघडले, मागे वळून पाहिलं... मागे आता पुन्हा धुकं होते. सुप्रीने उसासा टाकला आणि पुढे गेली. 

              थोडेच चालले असतील. सुप्रीचं लक्ष सहज वर आभाळात गेलं. वादळ येते आहे. सुप्रीच्या मनात आलं लगेच. त्यात नदीला पूर येण्याची शक्यता तिने मघाशीच सांगितली होती. " कोमल !! आता आपल्याला पटापट चालावे लागेल. पाऊस येतो आहे मोठा.. आणि जमलं तर एखाद्या उंच ठिकाणी जावे लागेल.. " सुप्रीने आता पर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. म्हणूनच कोमलने सुप्री बोलल्याप्रमाणे करायचं ठरवलं. 

              आकाशचा अंदाज बरोबर होता. तिथून पुढे एका डोंगरवजा ठिकाणी चढाई केली त्यांनी. विजेचा अस्पष्ट आवाज आला. आकाशचे लक्ष वेधलं त्याने. " बोललो होतो ना.. या गावातल्या लोकांचं कधीच चुकत नाही. " सर्व जण वरती पाहू लागले. ढग वर आभाळात , एकमेकांभोवती गोल गोल फिरत होते. आणि आता वाराही वाहू लागला होता. त्यामुळे दाट धुकं आता विरळ होतं चालले होते. " पण tent कुठे लावायचे... वाराही आहे ना... " सई आकाशला थांबवत म्हणाली. " तंबू नको... राहणार नाहीत ते जोराच्या वाऱ्यात.. जास्त असते तर काही प्रयत्न केला असता. आपल्याकडे मोजून ६ तंबू आहेत... त्यापेक्षा एखादी गुहा... वगैरे असेल तर बघा सगळ्यांनी... तिथेच थांबू " सईने बाकी ग्रुपला समजावलं आणि सगळे लागले कामाला. 

============================================================

" कधी कधी ' पहाट ' आळसावलेली असते. तिला झोपेतून बाहेर यायचे नसते, धुक्याची चादर अंगावर लपेटून घेते मग..... पुन्हा पुन्हा .....समोरचं काही दाखवत नाही आणि तिच्या सोबतीला आपल्याला हि ओढून घेते धुक्यात... नदीचे काठ , मग आवाज देऊ लागतात.... दूर व्हा !! दूर व्हा !! ... वाटा हरवून जातात आणि वारासुद्धा वैरी वाटू लागतो... तेव्हा समजून जायचे.. काळ्या ढगांची सेना येतं आहे... वादळाला घेऊन... " 

आकाश बोलायचं असं... .. सुप्रीला आठवलं. वादळ येते आहे, याच्या खुणा त्याने अश्या सांगितल्या होत्या सुप्रीला. हे सर्व सुखरूप होते... पण नाही... आकाशने सांगितलं होते, असं वातावरण तयार झाले ना कि नदी पासून दूर राहायचं. वरच्या बाजूला, उंच ठिकाणी जायचे. सुप्री अशीच एक जागा बघत होती. 

" या बाजूला उगाच आलो... त्या बाजूला उंच जागा तरी होती. " सुप्री बोलत होती. 
" मग आता जाऊया का पुन्हा मागे.. " एकीने विचारलं. 
" नको... आता तेवढा वेळही नाही आहे... पुढे गावात पोहोचायला ही वेळ लागेल... " बोलता बोलता सुप्रीच लक्ष एका ठिकाणी गेलं. " तिथे .... वर जाऊया... " सुप्रीने बोट दाखवलं. 
" आता वर कशाला.. " अमोल वैतागला. 
" नदीला पूर येतो.... वादळात, आणि आताही नदीचं पाणी वाढले आहे... पाण्यापासून दूर रहावे अश्यावेळी... आकाशने सांगितलं आहे असं.. " सुप्री पुन्हा अजाणतेपणी बोलून गेली. आणि झपझप पावलं टाकतं पुढे गेली. " आकाश ? " हे नावं आताच २ वेळेला ऐकलं मी... आपल्या ऑफिस मध्ये तर कोणी नाही आकाश नावाचा... मग कोण... विचार करतच अमोल चालू लागला. 

सुप्रीने बरोबर जागा निवडली. नदीपासून दूर आणि बऱ्यापैकी वर होती. सपाट जागा..... आजूबाजूला झाडे नाहीत ... होती ती खूप दूर होती. एका बाजूला मोठा कातळ ( खडक ) त्यामुळे जोराची हवा अडली जाणार होती. राहिला प्रश्न तंबूचा.. तर सुप्रीच्या लक्षात होते, एकदा असाच प्रसंग होता. जोराचा वारा वाहत होता. पाऊसहि येणार होता. संशक्षण हवेच म्हणून आकाशने सांगितलं " सर्वच तंबूंची गोलाकार रचना करावी, एकमेकांना चिटकून... आणि त्यांची तोंडे (दरवाजे ) आतल्या बाजूला करावीत , म्हणजेच सर्वच तंबू जोराच्या वाऱ्यापासून सुरक्षित राहतील. " सुप्रीने तसंच सांगितलं आणि सगळे कामाला लागले. 

========================================================

" उधर एक जगा है.. हम सब रह सकते है उधर ... " सईच्या मित्राने एक जागा शोधली होती. एक लहानशा भोगदा म्हणावा अशीच जागा होती ती. छान वाटली आकाशला.. " थांबू इथेच.. " आकाशने त्याची सॅक खाली ठेवली. 
" तुम्ही सर्व आतमध्येच थांबा.. मी बाहेरचा आढावा घेतो... " आकाश निघाला. 
" नको... तू पण थांब ना इथे... वादळ आहे ना बाहेर.. " सई घाबरत म्हणाली. आकाश हसला त्यावर... 
" मी आहे इथेच .. " आकाश आला बाहेर.  

========================================================

सर्व तंबू बांधून झालेले, सुप्रीने एक नजर टाकली त्यावर. सर्व ठीक आहे, असं मनात म्हणत ती त्यांच्यापासून जरा दूर आली. राहून राहून तिला वाटतं होते.... मघाशी जो ग्रुप शेजारून गेला... त्यात नक्की आकाश होता..... का माहीत नाही, पण तिला वाटतंच होतं. तो ग्रुप सुद्धा जास्त दूर गेला नसेल. उभ्या असलेल्या जागूनच ती दूरवर बघायचा प्रयन्त करत होती. काही अंतरावर मोठी होतं चाललेली नदी.. त्यापासून थोड्या अंतरावर, एक लहानसा तरी बऱ्यापैकी उंच असा डोंगर... त्यावरच ते गेले आहेत... असा अंदाज सुप्रीने लावला. 

अमोलने आधीच तिला जाताना बघितले होते जाताना. तरी त्याचं लक्ष वर आभाळाकडे होते. पाऊस खूप वेळा बघितला होता त्याने. वादळाची पहिलीच वेळ त्याची. आभाळ फक्त काळं - काळं दिसतं होतं. घड्याळात बघितलं त्याने.. सकाळचे १० वाजत आलेले, तरी सूर्यदेव काही दिसतं नव्हते. वारा सुरु होताच. सगळीकडे अगदी निराशेचे वातावरण वाटतं होते. अमोलच्या मनात चलबिचल सुरु झाली. तरी सुप्री एकटीच गेलेली आहे... पाऊस कधीही सुरु होईल... म्हणून अमोल मागोमाग गेला. 

===========================================================

आकाशला कळून चुकलं होतं. आजचा दिवस काही बरोबर नाही. दुपारचं जेवण सुद्धा कठीण आहे मिळणे, असंच वाटते. तो असाच चालत चालत आणखी बाहेर आला.खाली नजर टाकली तर पलीकडे त्याला गोलाकार तंबूंची रचना दिसली.. कुठे बघितलं आहे का हे मी.... पट्कन विचार आला त्याच्या मनात... नाहीच आठवलं... कोण आहेत हि माणसं... कोणी दिसते का बघू लागला... आणि जोरात वीज कडाडली. 

============================================================
 
अमोल चालता चालता जागीच थांबला. actually, घाबरला. सुप्रीने अमोलला येताना बघितलं.
" तुम्ही का आलात... पाऊस येईल कधीही... " ,
"अरे !! तू एकटी आलीस... तुझी काळजी मी घेणार नाही तर कोण घेणार.. " अमोल सुप्रीच्या समोर येऊन उभा राहिला. 
" तुम्ही जा आधी... इथे नका थांबू... " सुप्री जरा त्रासिक आवाजात बोलली. 
" तू पण चल ना.. तुझ्याशिवाय नाही जाणार... " सुप्रीच्या मनात आधीच घालमेल सुरु होती.त्यात अमोल. चिडचिड झाली तिची. 
" अमोल सर.... का करताय असं.. नाही आवडत मला... " अमोलला हे नवीन होतं. 
" तुझी काळजी... " ... 
" नका करू काळजी... प्लिज !!! " सुप्रीने त्याच वाक्य मधेच तोडलं. अमोल तिच्याकडे बघतच राहिला..... थोड्यावेळाने बोलला. 
" मी आधीच सांगणार होतो... तू मला खूप आधीपासून आवडतेस... तू येणार म्हणून मी या पिकनिक साठी तयार झालो. वाटलं हीच वेळ आहे तुला जाणून घेण्याची... म्हणून सतत तुझ्या सोबत आहे. चांगली वेळ बघून तुला propose..... " ,
" थांबा अमोल सर... " सुप्रीने पुन्हा त्याचं वाक्य तोडलं. त्याचबरोबर आभाळात आणखी एक वीज चमकून गेली. 
" पुढे काय बोलणार होता ते माहित आहे मला... मला नाही बोलायचं या विषयावर... " सुप्री आणखी त्रासिक झाली. 
" पण उत्तर दे ना.. मी आवडत नाही का तुला... सांग ? " ,
" तसं नाही... पण... " ,
" पण काय... " ,
" कारण माझं प्रेम आहे कोणावर तरी... खूप प्रेम... " सुप्री बोलत होती. सोसाट्याचा वारा सुरु झालेला, आभाळात विजा नाचत होत्या नुसत्या... 

========================================================

आकाशचं लक्ष... त्या तंबूपासुन थोडं दूर गेलं. दोन व्यक्ती तिथे उभ्या दिसल्या. एक मुलगा आणि एक मुलगी... एकमेकासमोर उभे... चेहरे काय दिसणार एवढ्या दुरून... वादळात काय करतात हे दोघे... वारा इतका जोरात वाहत होता ना वरती.. पहिल्यांदा त्याला त्याच्या मोठ्या , वाढलेल्या केसांचा त्रास होतं होता... सारखे त्याच्या डोळ्यासमोर येतं होते. तरी आकाश त्यांना बघत होता. संध्याकाळ व्हावी इतका काळोख... त्यांना आधीच त्या तंबूंमध्ये जायला हवे. आकाश अजूनही त्या दोघांकडे बघत होता. 

==========================================================

" खोटं बोलतेस ना.. मला फसवण्यासाठी... " अमोलला वाटलं नेहमी सारखी मस्करी करत आहे. 
" नाही सर, खरंच... माझं प्रेम आहे एकावर... " सुप्री. त्यावर अमोलचा चेहरा पडला. 
" मी तुला गेले ६ महिने ओळखतो. एकदाही असं वाटलं नाही... तुझा कोणी बॉयफ्रेंड असेल असं. एकदाही भेटायला आला नाही... एकदाही फोन नाही किंवा तुझ्या तोंडून उच्चार नाही... प्रेम आहे त्याच्यावर ना... असतो कुठे तो... " अमोलचा स्वर बदलला. सुप्री काहीच बोलली नाही त्यावर. कुणीच काही बोलत नव्हतं. 
" सांग ना... कुठे असतो तो... " ,
" त्यालाच शोधायला आलो आहोत आपण... " सुप्रीने मान खाली करत उत्तर दिलं. 


" what !!! काय बोलते आहेस तू... आपण त्याला शोधायला आलो आहोत... म्हणजे ?? " अमोलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. 
" हो अमोल सर... आकाश एका वर्षापूर्वी अपघातात हरवला. त्याला शोधण्याचा खूप प्रयन्त केला आम्ही. सापडलाच नाही. आशा सोडून दिली होती मी. पण कोमलच्या मैत्रिणीला त्याच्या सारखाच एक या आसपासच्या गावात दिसला होता. त्यामुळेच हा पिकनिकचा प्लॅन केला. " अमोल हसला त्यावर. 

" एक वर्षांपूर्वी हरवलेला माणूस... त्याला शोधत आहात... वेडेपणा आहे हा.. " ,
" हो.. वेडेपणा आहे... वेडीच आहे त्याच्यासाठी.. खूप वेडी.. " ,
" अगं... पण तो आहे अजूनही.. कश्यावरुन... " अमोल रागात बोलला. 
" आहे... त्याच्या खुणा मिळत आहेत.. आहे तो... इथेच कुठेतरी आसपास.. फक्त समोर येतं नाही अजून... " ,
" सुप्रिया !!! ....... काय सुरु आहे... जो नाहीच आहे त्याची वाट बघते आहेस... आणि जो समोर आहे ... त्याची किंमत नाही. " ,
" तसं नाही अमोल सर... पण खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर... त्याच्या शिवाय कशी राहू मी .. आधी ४-५ वेळेला त्याला शोधायचा प्रयन्त केला, भेटलाच नाही... त्यामुळेच मी या ट्रेकिंग साठी तयार नव्हते. " ,

" तर हे कारण होते... मला वाटलं मी जातो आहे म्हणून तू माघार घेते आहेस.. " अमोल बोलता बोलता थांबला. कारण पाण्याचे काही थेंब त्याच्या गालावर पडले होते. " तुझं प्रेम होतं ना कोणावर.... मग इतक्या दिवसात एकदाही सांगावस वाटलं नाही तुला... आपण तर मित्र होतो ना आधीपासूनच... तेव्हा सांगितलं असतं तर मी तुझ्याबद्दल कधीच असा विचार केला नसता... " , अमोलच्या वाक्यात दुःखाची लकेर होती. 

" sorry अमोल सर... मला तुमच्या मनातलं कळायचं. परंतु तेव्हाच तुम्हाला सांगितलं नाही हेच चुकलं माझं.. त्यावेळी , मी त्या धक्क्यातून बाहेर पडत होते. कोणतंही नवीन relation नको होतं मला. आता , आकाशही परत आला आहे... मग तुमचा विचार कसा करू मी... खरंच sorry ... मुलांनाही मन असते.. ते आकाशमुळेचं समजलं मला. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आधीपासून तुमच्यापासून एक अंतर ठेवलं मी. तुम्हाला कळलं असेल ते कधी कधी.. पण खरंच , आकाश नसता तरी तुमच्या सोबत मी किती प्रामाणिक राहिले असते माहित नाही मला..त्याच्या शिवाय कोणीच नाही मनात... आता तर त्याचं अस्तित्व आहे... इथे सगळीकडेच.. प्लिज ... वाईट वाटून घेऊ नका.. तुम्ही खूप चांगले आहात.. तुम्हाला छान जोडीदार मिळेल. गणू तुमची इच्छा पूर्ण करेल ती. इथे माझंही आयुष्य पणाला लागलं आहे ना.. भेटलाच पाहिजे तो... आणि पुन्हा तुमची माफी मागते मी... खूप प्रेम आहे आकाशवर... माफ करा मला.. " सुप्रीच्या डोळ्यात पाणी आलं आणि निघून गेली ती. 

                  पुढच्या २-३ मिनिटात जोराचा पाऊस सुरु झाला. मुसळधार पेक्षा जास्त... असाच काहीसा. अमोल तसाच भिजत उभा.. पावसाचे थेंब चेहऱ्यावर नुसते टोचत होते... त्यापेक्षा जास्त टोचलं होतं ते मनाला. त्याच्या बाबतीत पहिल्यांदा होतं हे. काही गोष्टी स्वप्नांतच छान वाटतात... प्रेम करणे... चोरून बघणे... छान छान बोलणे... जागेपणी सर्व भास असतात... फक्त भास... सुप्रिया बोलली ते बरोबर. मुलांनाही मन असते... वाईट वाटते कधी मुलांनाही... अमोल तसाच कुठेतरी बघत विचार करत होता. काय विचार करून आलेलो या भटकंतीला, सुप्रीला समजून घेऊ आणखी... तिच्या जवळ पोहोचू... मनात जागा करू तिच्या. अमोलने नाराजीने मान हलवली. केवढा तो वारा सुटला होता. समोर, दूर असलेली पैकी एक -दोन झाडे पडताना हि दिसली अमोलला. विजांचा आवाज होताच.. आणखी काळोख होत होता... भीतीदायक वातावरण अगदी. प्रेम करते दुसऱ्या कोणावर.... नावं काय बोलली... हा ... आकाश.. बरोबर... आधीही दोन-तीनदा नाव घेतलं तिने.. जाऊदे... उगाचच प्रेम केलं तिच्यावर... आपलंच चुकलं. तरी कोण आहे हा आकाश... ज्यासाठी तिने मला नकार दिला... असा विचार करत होताच तो.. 

                   आणि केव्हढ्याने वीज चमकली... केवढा तो प्रकाश.. !! क्षणार्धात कोणी दिवा लावावा आणि चट्कन बंद करावा , असं झालं ते. अमोलचे डोळे दिपून गेले. अमोलने वरच्या दिशेला पाहिलं. समोरच्या डोंगरावर त्याला मानवसद्रुश्य आकृती दिसली. चेहरा तर दिसतं नव्हता. उंच ठिकाणी उभा आहे, त्याचं लक्ष आपल्याकडेच आहे, हे अमोलने ओळखलं....... मुसळधार , टोचणारा पाऊस.. सोसाट्याचा वारा आणि ती व्यक्ती.. त्याच्या मागे विजांचा कडकडाड होतं होता. इतक्या दुरुन सुद्धा त्याचे वाऱ्याने उडणारे केस अमोलला दिसतं होते. खरंच का, सुप्रीचा आकाश परत आला आहे का ... अमोल त्या पावसात अजूनही त्या समोरच्या व्यक्ती कडे बघत होता. पाठीमागे आभाळात सुरु असलेल्या... विजेच्या तांडवात, त्या प्रकाशामध्ये तो अजूनच उजळून दिसत होता.. एखाद्या युगपुरुषासारखा.. वादळात, अखंड पावसात...एका जागी पाय रोवून उभा... अमोलच्या मनात सुद्धा एक वादळ आकारास येतं होते. खरंच.. आला आहे का आकाश... मनात प्रचंड विचार आणि समोर विजेच्या खेळात उभा असलेला कोणी... अमोल अजूनही त्याच्याकडे बघत... सोबतीला वादळ होतंच... वर आभाळातही आणि मनातही ....... !!  


---------------------------------------------------------- to be continued

Followers