All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 23 January 2016

एक होता राजा…. (भाग एक )

"Hello….Hello…. राजेश… ",
" हा… बोलं गं… ",
"अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?",
"थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला. 
"हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ",
"हा… आता येतो आहे clear… कसा आहेस तू…",
"मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… ",
"हो का…. तूला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. ",
"ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… " त्यावर निलम हसली. " तू पण ना राजेश… बरं ते जाऊ दे… तुला एक good news सांगायची आहे." राजेशला त्याचचं टेंशन होतं. 
" हा … बोलं…" जरा चाचरत बोलला राजेश. 
" अरे…. लग्न ठरलं माझं…" राजेशच्या मनात लागलं कूठेतरी. " हो… " तेवढंच बोलला राजेश. 
" अरे… हो काय… अभिनंदन नाही करणार का ? " ,
"हं … हो… congratulations निलम." राजेश उगाचच आनंदाचा आव आणत बोलला. " चल… तुला नंतर call करतो. बॉसने बोलावलं आहे." राजेश खोटंच बोलला. "Ok…. Bye then…. भेटू संध्याकाळी… " म्हणत निलमने call कट्ट केला.   

                    तसाच थोडावेळ उभा होता राजेश. निलमचं लग्न ठरलं… कधी… कळलचं नाही मला. तिने तरी सांगायचे होते ना मला… हं… तिला ते सांगणं महत्वाचं वाटलं नसेल मला कदाचित… राजेश विचार करत उभा होता." अरे राजा…. " मागून कोणीतरी आवाज दिला. तेव्हा राजेश भानावर आला. मंगेश होता तो. " अरे राजा… इकडे काय करतो तू ? … चल ना, lunch time झाला,जेवायचे नाही का… " राजेशची भूक पळून गेली होती.
"नको रे… भूक नाही… तू जा जेवून घे." ,
"Tiffin आणला नाहीस का…नसेल तर माझ्याकडे आहे तो अर्धा-अर्धा share करू… चल. ",
"tiffin आहे रे… पण… " मंगेशने ओळखलं, राजेश जरा नाराज आहे ते. 
"काय झालं राजा… ",
"काही नाही… जा तू, जेवून घे… मी येतो आत थोडयावेळाने." मंगेशने त्याला जबरदस्ती केली नाही मग. तो गेला आत ऑफिसमध्ये. राजेश बाहेरच थांबला विचार करत. 

              आज सगळा दिवस, राजेश कसल्याश्या विचारात होता. मंगेशला कळलं ते. त्याने पुन्हा त्याला विचारलं नाही. संध्याकाळ झाली, ऑफिस मधून निघायची वेळ… मंगेश राजेश जवळ आला. " राजा… " राजेश तसाच बसून खुर्चीवर. " ये राजा… " मंगेशने पुन्हा हाक मारली. 
" हं… हा… काय… काय झालं… ",
"अरे निघूया ना घरी… चल.",
"हा… सामान आवरतो मग निघू. "राजेशने पटपट सामान आवरलं आणि निघाले दोघे. Bus stop वर पोहोचले. ऑफिस ते bus stop … १० मिनिटाचा रस्ता. या वेळात राजेशने एक शब्द काढला नाही तोंडातून. मंगेश सुद्धा काही बोलला नाही मग. पाचचं मिनिटं झाली असतील तिथे येऊन, अचानक निलमची गाडी आली समोर." हे निलम… " मंगेशने निलमला हाक मारली. धावतच गेला गाडीजवळ. 
" अरे… कधी आलीस केरळ वरुन…",
"पहिला गाडीच्या आत तर ये.… घरी सोडते दोघांना. " मंगेश पटकन जाऊन बसला गाडीत. राजेश तसाच उभा bus stop वर. निलम आणि मंगेश एकमेकांकडे पाहू लागले. मंगेश गाडीतून उतरला… " अबे… राजा, ये राजेश… चल ना पटकन… नाहीतर ट्राफिक जाम होईल पुन्हा." मनात नसताना राजेश गाडीत, मागच्या सीटवर जाऊन बसला. आता ही सुद्धा नवलाईची गोष्ट होती, निलम आणि मंगेश साठी. निलम सोबतच म्हणजे तिच्या बाजूलाच बसायचा गाडीत नेहमी. आणि आज चक्क मागच्या सीटवर. मंगेश पुढे बसला. निलमने राजेशकडे एक नजर टाकली आणि गाडी सुरु केली.  

"बरं… कधी आलीस आणि कशी झाली केरळ ट्रीप… ?", मंगेशने विचारलं. 
" धम्माल रे… काय मस्त वातावरण असते रे तिथे… म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असं… beautiful environment… अरे राजाने फोटो दाखवले नाहीत का… काय रे राजा… " राजेश गाडीच्या बाहेर बघत होता. त्याचं लक्ष बाहेरच होतं, त्याच्याच दुनियेत… मंगेश राजेशकडे बघत होता. निलमला कळलं नाही, कि राजेश का उत्तर देत नाही ते. विषय बदलण्यासाठी मंगेश बोलला. 
"बरं झालं हा, तू भेटलीस ते… नाहीतर अजून कितीवेळ बसची वाट पहावी लागली असती देव जाणे… मग तिथून ट्रेनची वाट बघायची… कटकट नुसती… आज आरामात घरी.",
" घरी नको निलम… स्टेशनला सोड. " खूप वेळाने राजेश पहिल्यांदा बोलला.
" अरे… स्टेशन कशाला… सोडते ना घरी.",
"नको… तुला लांब पडेल ते." ,
" काहीच काय राजा… इतर वेळेस सोडते ना घरी दोघांना… तेव्हा असं बोलला नाहीस कधी.",
"तसं नाही… पण आज लवकर जायचे आहे घरी… ट्रेनने लवकर पोहोचेन, कार पेक्षा.",
"राजेश… मित्रा… कारने आरामात जाऊ कि…" मंगेश मधेच बोलला.
" तुला कारने सोडेल ती, मी ट्रेनने जातो आहे…" राजेश बोलला. मंगेश गप्प झाला. निलमने दोघांना स्टेशनला सोडलं आणि ती गेली पुढे निघून. 

                   ३ character's … निलम,राजेश आणि मंगेश… तिघे जवळचे मित्र. त्यातले राजेश आणि मंगेश, हे दोघे लहानपणापासूनचे मित्र… एकाच शाळेत नसले तरी एकाच चाळीत, शेजारी-शेजारी होते. निलमची ओळख कॉलेजमधली. त्यात मात्र तिघे एकत्र होते. फक्त निलम commerce ला होती आणि हे दोघे Arts ला होते. शाखा वेगळ्या असल्या तरी त्याचं भेटणं असायचं रोज. आता निलम आणि त्यांची ओळख कशी…? ११ वीला असताना, एक नाटक बसवलं होतं कॉलेजमध्ये. त्यात या तिघांनी भाग घेतला होता. राजेशला मूळातच आवड अभिनयाची. मंगेशने राजेश होता म्हणून स्वतःच नाव दिलं होतं नाटकात. तर निलम फक्त एक टाईमपास करण्यासाठी म्हणून ते नाटक करत होती. नाटक पूर्ण तयार झालेलं. कास्टिंग तेवढी बाकी होती. राजेश छान अभिनय करायचा. त्यामुळे त्याला प्रमुख भूमिका होती. नाटक पौराणिक विषयावर आधारित होते. त्यात राजेश " राजा" चा रोल करत होता. राजेशच्या सांगण्यावरून, मंगेशला प्रधानमंत्री केलं होतं. ऐनवेळी राणीची भूमिका करणारी आजारी पडली आणि फक्त टाईमपास साठी आलेली निलम… तिच्या वाटणीला "राणी" चा रोल आला तो, ती चांगली दिसायची म्हणून. नाटक छान बसलं आणि सगळ्यांना आवडलं सुद्धा. त्याच्या तालिमी चालायच्या रोज कॉलेजमध्ये. रोज भेटणं व्हायचं तिघांचे. त्यातून मैत्री झाली तिघांची. नाटक संपल तरी मैत्री राहिली. ११ वी संपून १२ वी सुरु झाली. निलमचा तिचा असा ग्रुप होता, परंतू या दोघांबरोबर आपलं tuning छान जुळते, हे तिला समजलं होतं. मग काय, ११ वीत सुरु झालेली friendship… अगदी १५ वी म्हणजे कॉलेज सुटे पर्यत होती. 

                       राजेश…. चाळीत राहणार एक सर्वसामान्य मुलगा. ४ वर्षाचा असताना, एक दिवस अचानक… कोणाला न सांगता, त्याचे वडील कूठेतरी निघून गेले… का गेले ते फक्त आणि फक्त त्यांनाच ठावूक… ते अजूनही परत आलेले नाहीत. छोट्या राजेशला आईनेच सांभाळलं. वडील अचानक निघून गेल्याने, त्याच्या बाल मनावर परिणाम झालेला. तेव्हापासून राजेश काहीसा अबोल. जास्त कोणाशी मिसळणे नाही… फारच कमी बोलायचा. कधी कधी तर स्वतःमधेच गुरफटलेला. साधा, सरळमार्गी. कोणाचं वाईट करू नये आणि कोणाविषयी वाईट चिंतू नये. अश्या मनाचा. पण खूप हळवा. भावूक मनाचा. रस्त्यावरल्या किती मुलांना तो मदत करायचा. स्वतः गरीब होता तरी पोटाला चिमटा काढून त्यातलं त्या मुलांना देयाचा थोडंतरी… आईचा खूप जीव राजेशवर. कधी कधी तिला त्याच्या साधेपणाची चिंता वाटायची. कोणावरही विश्वास ठेवायचा लगेच, म्हणून.… राजेशला सगळे "राजा" बोलायचे.Thanks to मंगेश, कॉलेजमध्ये नाटक केल्यापासून आणि नाटकाच्या सवयीमुळे…. मंगेशने प्रथम राजेशला "राजा" बोलायला सुरुवात केली. मग हळू हळू संपूर्ण चाळ त्याला "राजा" याच नावाने ओळखायला लागली. तरी सुद्धा तो "राजा"च होता… सगळ्यांना आवडायचा तो. काही वाईट गुण नव्हता त्यात. शिवाय गरीब मुलांना मदत करायचा. राजेश नावाने आणि मनाने सुद्धा " राजा " होता. 

                    मंगेश…. राजेशचा मित्र. चाळीत शेजारी शेजारीच रहायचे. स्वभाव मात्र राजेशच्या उलट अगदी. मंगेश सगळ्यात मिळून मिसळून वागणारा. दुनियादारी माहित असलेला. बडबड्या… समोरचा अनोळखी असला तरी  काही वेळातच त्याच्याबरोबर ओळख करणारा. सांगायचं झालं तर एकदम मस्तमौला माणूस. त्याच्या अश्या स्वभावामुळे त्याचे खूप मित्र होते. पण राजेश त्याला जवळचा वाटायचा. तो समजून घ्यायचा राजेशला. जणू काही त्याला राजेशच्या मनातलं कळायचं. दोघांमध्ये एक गोष्ट common होती… कोणालाही मदत करायला तयार असायचे नेहमी. 

                   आणि राहिली निलम… या दोघांपासून भिन्न…. सगळ्याच बाबतीत… हुशार, इतर गोष्टीपेक्षा अभ्यासात जास्त आवड. पहिल्यापासून काहीतरी मोठ्ठ करून दाखवायचं हे ध्येय. घरची परिस्तिथी श्रीमंतीची, त्यामुळे लागेल ते आणि लागेल तेव्हा हातात देण्याची घरच्यांची तयारी. त्याचा गैरवापर कधी केला नाही निलमने. बारीक शरीरयष्टीची, दिसायला एकदम अप्सरा वगैरे नसली तर छान होती दिसायला. "नाकी-डोळी नीटसं "…. एखादी आपली 'Best Friend' असते ना, जिच्याबरोबर आपण आपले "secret, personal matter" share करतो ना…. अगदी तशीच होती निलम. कॉलेजमध्ये जास्त कोणाशी मुददाम मैत्री केली नाही तिने. होत्या त्या तीन मैत्रिणी फक्त. नाटकाच्या तालिमी सोबत राजेश, मंगेश यांची भेट झाली. राजेशचा स्वभाव आणि मंगेशची दुनियादारी आवडली तिला. म्हणून त्यांच्यासोबत "दोस्ती" आपोआप झाली तिची, ती कायमची. 

                तसे तिघे एकाच area मध्ये राहायचे. राजेश, मंगेश चाळीत… तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर निलमची सोसायटी होती. बहुतेकदा तिघे कॉलेजमधून एकत्र घरी यायचे. निलमला चाळीतल्या त्यांच्या घरात खूप आवडायचं. कधी कधी परस्पर राजेशच्या घरीच जायची निलम,त्याच्या आईला भेटायला. राजेशची आई जेवण छान बनवायची. कधी सुट्टी असली कि निलम मुददाम राजेशच्या घरी जायची जेवायला. आता निलमच्या घरी ते माहित होतं. त्यांना राजेश आणि मंगेश बाबत माहिती होती. त्यामुळे त्यांना या मैत्रीत काहीच प्रोब्लेम नव्हता. अशीच त्यांची मैत्री होती…. छान अशी. 

               त्यात खंड पडला तो कॉलेज संपल्यावर. निलमला M.B.A. साठी बंगलोरला जायचे होते. राजेश तसा अभ्यासात हुशार नव्हता. पास झाला तेच बरं झालं. त्याला कूठे जाता येणार होतं M.B.A. साठी, शिवाय तेवढे पैसे आणि M.B.A. साठी लागणारी हुशारी त्यात नव्हती. मग काय करणार ना… कॉलेज संपल्या संपल्या नोकरीला लागला. निलमपासून दूर होणं त्याला रुचलं नव्हतं… कसं ना, ५ वर्षाची मैत्री कशी break होणार पटकन. सुरुवातीला तसंच वाटलं राजेशला. राजेश इथे तर निलम बंगलोरला. मोबाईल काय साधा घरी फोनही नव्हता राजेशकडे. काही फोन वगैरे असतील तर ते मंगेशच्या घरी यायचे. मंगेशला राजेशचे मन कळायचं. त्यानेच मग स्वतः पैसे साठवून राजेशला एक "second hand"मोबाईल घेऊन दिला. नकोच म्हणत होता राजेश. पण जबरदस्ती केली तेव्हा त्याला मोबाईल घ्यावा लागला. निलमकडे साहजिकच होता मोबाईल. मंगेशने लगेच तिला फोन लावला आणि या दोघांचे बोलणे पुन्हा सुरु झालं.

                तीन वर्ष होती निलम बंगलोरला. एकदाही मुंबईला आली नाही. पण या दोघांचे बोलणं असायचं नेहमी, दिवसातून एकदा तरी. मैत्री तुटू दिली नाही तिघांनी. दरम्यान, राजेश आणि मंगेशला चांगला जॉब मिळाला होता. जरा लांब होता, तरी salary बऱ्यापैकी ठीक होती. पैसे साठवून राजेशने स्वतःला आणि मंगेशला गिफ्ट म्हणून नवीन मोबाईल घेऊन दिला. रोज call करायची निलम. दिवसभरात काय काय झालं ते सांगायची राजेशला. कधी घरी असताना call आला तर आई बरोबर गप्पा व्हायच्या. आईला बरं वाटायचं. लांब जाऊन पण 'राणी' विसरली नाही आपल्याला आणि 'राजा' ला सुद्धा. निलमला राजेशची आई "राणी" म्हणूनच हाक मारायची. कधी कधी मंगेशसमोर बोलून दाखवायची,"राजा आणि राणीचा जोडा छान दिसतो." मंगेश हसायचा, त्याला माहित होतं…. राजेशला निलम खूप आवडायची. फक्त अबोल स्वभावामुळे तिला कधी बोलून दाखवलं नव्हतं. 


              M.B.A. चे शिक्षण पूर्ण करून निलम मुंबईत आली. आणि आल्या आल्या एका मोठया कंपनीत रुजू झाली. खूप हुशार निलम… त्यामुळे फक्त सहा महिन्यातच तिची पोस्ट वाढून assistant manager झाली. योगायोग बघा किती. निलमचे ऑफिस आणि या दोघां मित्रांचे ऑफिस, एकाच ठिकाणी… काही मिनिटांच्या अंतरावर. पुन्हा तिघे एकत्र आले. निलमला कंपनीने प्रवासासाठी कार दिली होती. मग काय… कधी लवकर निघाले तर तिघे एकत्रच घरी यायचे. छान चाललेलं तिघांचे.… निलम आता खूप छान दिसायची. किती फरक पडला होता तिच्या personality मध्ये. जास्त confident झाली होती ती. पण आपला राजेश तसाच राहिला होता, अबोल… अजून पुढे ३ वर्ष निघून गेली. या तिघांची मैत्री जास्तच घट्ट झाली होती. ऑफिसमधून निघाले कि निलम सोबतच घरी यायचे. सुट्टी असली कि निलम राजेशकडे यायची. आईला भेटायला. छान गप्पा जमायच्या मग. वरचेवर फिरायला जायचे तिघे. मंगेश कधी कधी मुद्दाम बहाणा काढून घरी थांबायचा. दोघांना एकत्र काही वेळ मिळावा म्हणून, पण राजेश कसलं तिला मनातलं सांगतोय. मग मंगेशला राग यायचा. बोलून दाखवायचा राजेशला सरळ… राजेश फक्त हसण्यावर न्यायचा. त्यालाही वाटायचं… एकदा तरी विचारावे लागेल तिला. 

             असेच दिवस जात होते. त्यात पुन्हा खंड पडला तो निलमच्या केरळ ट्रीपमुळे. ऑफिस टूर होती. शिवाय कामही होतंचं. पण त्याआधी मंगेशला एक खबर लागली होती. आणि ती म्हणजे, निलमच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे याची. निलम मोठया पोस्टवर होती,हूशार होती, salary चांगली होती. त्यामुळे समोरूनच तिला किती चांगली 'स्थळं' येत होती. राजेशला याची कल्पना होती. त्याच्या मनात धाकधूक होती त्याचीच. त्याने ठरवलं होतं कि आपणच तिला विचारू आधी. त्यात ती केरळला गेल्याने तो विचारू शकला नाही. ४ महिने चालली तिची केरळ ट्रीप… मुंबईला कधी आली ते सांगितलंच नाही…. आणि सांगितलं ते थेट…. लग्न ठरल्याची बातमी. 

               निलमच्या लग्नाची बातमी ऐकल्यापासून राजेश जरा बावरलेला होता. ऑफिस ते घर… मंगेश आणि राजेशचा रोजचा प्रवास…. निलम आणि यांची भेट झाली तरच ते तिच्या कारने घरी यायचे नाहीतर ट्रेन आहेच. ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली तरी या दोघांच्या गप्प्पा गोष्टी चालू असायच्या. मंगेश उभ्या उभ्याच, त्या गर्दीत मस्करी, भंकस करत असायचा. त्यामुळे तो दीड तासाचा प्रवास छान व्हायचा…  मात्र आज राजेश शांतच होता, त्यात आज अचानक window seat मिळालेली. म्हणजेच दरवाज्याजवळ टेकून उभा रहायला भेटलं होतं. मंगेश सवयीप्रमाणे बडबड करत होता. राजेश ट्रेनमधून मागे पळणाऱ्या देखाव्याकडे पाहत होता. मंगेशने उगाचच दोन-तीनदा त्याला हसवण्याचा प्रयन्त केला. पुरता फसला प्रयन्त त्याचा. अर्थात मंगेशला, निलमच्या लग्नाची गोष्ट ठावूक नव्हती. आणि राजेश वा निलम, दोघांपैकी एकानेही त्याला सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्याला राजेशच्या Mood off चे कारण कळत नव्हतं. 


             राजेश तसाच घरी आला. हात-पाय धुतले आणि शांतपणे एका जागी जाऊन बसला. आई जेवण बनवत होती. राजेशला तिने आलेलं पाहिलं. राजेश दमून आला कि असाच एका कोपऱ्यात जाऊन शांत बसायचा. खिडकीतून बाहेर बघत बसायचा. घरात TV नाही, त्याला आवड सुद्धा नव्हती TV ची, आई सकाळपासून कामात. मग कशाला पाहिजे TV घरात.… हा… करमणुकीसाठी एक टेपरेकोर्डर होता घरात. तो लावायचा कधी तरी. त्यात केसेट्स लावू शकत होते. वडिलांची आवड ती… बऱ्याच जुन्या गाण्याच्या केसेट्स होत्या राजेशच्या घरी, त्यात बहुतेक शास्त्रीय संगीताच्या.… वडिलांची ती आवड राजेशला पण होती.… शास्त्रीय संगीत… ते लावून बसायचा कधी कधी, मंगेश बोलायचा कि, कशाला रडगाणी लावतोस. राजेशची आई हसायची मनसोक्त. कारण काही गाणी मुद्दाम शोधून शोधून मंगेशने राजेशच्या मोबाईलमध्ये भरून ठेवली होती. फावल्या वेळात राजेशला ऐकण्यासाठी…त्यातून शोभा गुर्टू यांचे " याद पिया कि आये… " हे गाणे राजेशला विशेष आवडायचे. आईला सुद्धा तेच गाणं जास्त आवडायचे. वरचेवर लावायचा ते गाणं राजेश. का आवडते असं विचारलं तर सांगायचा, हे गाणं ऐकलं कि सगळा त्राण निघून जातो शरीरातून, मन फ्रेश होते अगदी. 

                    आज राजेश तसाच खिडकीबाहेर बघत बसला होता. " राजा…. " आई त्याच्या जवळ आली. राजेश त्याच्याच विचारात.…. डोक्यावरून हात फिरवत आईने विचारलं," काय झालं रे राजा…. " , राजेशने मान हलवून नकार दिला.
" जेवतोस ना…. ",
"नको आई, भूक नाही आज… ",
" का रे… काय झालं… बाहेर खाऊन आलास का काही… ?",
"नाही… पण नको आज जेवायला.",
"बरं… ठीक आहे." आईला त्याचा स्वभाव माहित होता. काही झालं तरी मनातलं सांगणार नाही कधी…. आईने सगळी जेवणाची भांडी झाकून ठेवली. राजेशला कळल, आपण जेवलो नाही तर आईसुद्धा जेवणार नाही. तसा तो उठला… "आई… चल, जेवायला बसू." आई हसली त्यावर. मनात नसताना सुद्धा केवळ आईसाठी तो जेवायला बसला. असा होता राजेश… भोळा अगदी. 

                    पुढचे २ दिवस, तसच अगदी. राजेश गप्प गप्पच होता. मंगेशला समजत नव्हतं कि नक्की काय झालं आहे ते. ऑफिसचं काम झालं कि निघायचे घरी… निलमची वाट बघणं नाही कि तिला call नाही. तिसरा दिवस तसाच गेला राजेशचा, शांत अगदी. काम झालं ऑफिसचं आणि नेहमी सारखा निघाला मंगेश बरोबर घरी. त्यादिवशी पण निलम त्याला सकाळपासून call करत होती. एकदाही त्याने call उचलला नाही. न राहवून मग तिने मंगेशला call करून राजेशबद्दल विचारलं. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं राजेशच. म्हणून त्याने निलमचा call उचलला नसेल. त्यासाठी, राजा सकाळपासून बॉस सोबत आहे म्हणून त्याने call उचलला नाही, असं खोट सांगितलं. निलमचा call कट्ट करून तो राजेश जवळ आला. मोबईल तर शेजारीच होता. राजेश कामात गुंतलेला. मोबाईल उचलून त्याने चेक केला. २२ missed call निलमचे. "राजा… " राजेश कामातच. " अरे राजेश…. माणसा, आहेस का जमिनीवर…. " तेव्हा राजेशने एक थंड नजर टाकली मंगेशवर. "अबे…. काय झालंय तुला…. राणी कधीपासून call करते आहे तुला… हे बघ, २२ missed call आहेत.… कूठल्या जगात आहेस रे… "," ह्म्म्म… " मंगेशकडे न बघता त्याने उत्तर दिलं आणि पुन्हा कामात लक्ष घातलं त्याने. काय झालंय याला… पहिला तर कधी वागला नाही असा.… आणि निलमचा फोन….असं कधीच झालं नाही कि त्याने तिचा call receive केला नसेल. मग आज का ? मंगेश विचार करत करत त्याच्या जागेवर जाऊन बसला. 

संध्याकाळ झाली तरी निलम त्याला call करत होती. दोनदा call receive केला नाही राजेशने. त्यानंतर मोबाईल बंद करून ठेवला. मंगेश सर्व पाहत होता. मंगेशला call आला निलमचा. 
" अरे… राजा call receive का करत नाही आणि आता तर स्विच ऑफ येतो आहे. अजूनही तो बॉस बरोबर आहे का",
"हं… हो गं, सकाळपासून तो आतच आहे बॉसच्या केबिनमध्ये… तुझं काही काम होतं का… ",
"नाही रे, असंच… तुम्ही निघत आहात का दोघे… मी थांबते मग, bus stop वर या दोघे, कारने जाऊ घरी आज.",
"ok" म्हणत मंगेशने call कट्ट केला. 
" राजा, येतो आहेस ना, निलम वाट बघत आहे. " ,
"तू जा पुढे…. मला थोडा वेळ लागेल… ",
"चल ना राजा… उद्या कर काम ते, चल लवकर… ",
"मंगेश खरंच जा… मला वेळ आहे निघायला अजून… प्लीज जा… " नाराजीने मंगेश निघाला. Bus stop वर निलम वाट बघत होती. 
" Hi मंगेश… ",
"Hi… ",
" अरे, राजा कूठे आहे… ? " निलम राजेशला शोधू लागली. 
"अगं… sorry, त्याला जरा काम आहे म्हणून थांबला आहे तो.",
" ok… ok , चल मग तुला सोडते घरी." ,
"नको गं… जाईन ट्रेनने." निलमने त्याचा हात पकडला आणि गाडीत बसवलं. 
"म्हणे जाईन ट्रेनने…. काय झालंय रे तुम्हा दोघांना… ",
"तसं नाही गं, पण राजा नाही ना सोबत म्हणून…",
"अरे… किती वेळा call केला त्याला.… एवढा काय बिझी आहेत आज राजे… " ,
" आज खूप काम आहे ना त्याला… बरं, काही काम असेल तर सांग मला, मी सांगेन तुझा निरोप त्याला." ,
"हे घे… " म्हणत निलमने साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका मंगेशच्या हातात ठेवली. 

मंगेश दचकला. " अरे… हे काय… ",
"माझ्या engagement चे invitation… " मंगेशला धक्का बसला. निलमकडे बघत राहिला.
"अरे, असा काय बघतोस…जसं काही तुला माहीतच नाही.",
"मला कसं कळणार ? ",
" राजा बोलला नाही तुला… " मंगेशने नकारार्थी मान हलवली.
"त्याला तर पहिलच सांगितलं… आणि त्यालाच पहिलं invitation देयाचे होते म्हणून तर call करत आहे सकाळपासून." मंगेश अजून त्या धक्यातून सावरला नव्हता. "पण तुझं नशीब चांगलं आहे हा… तुला पहिलं invitation… " मंगेश खोटं खोटं हसला. 
" अभिनंदन… " ,
" Thanks… नक्की यायचे हा… " ,
"हो नक्की… " मंगेश निमंत्रण पत्रिका पाहू लागला. स्वप्नील दामले…. म्हणजे ब्राम्हण… " दामले म्हणजे ब्राम्हण ना… " मंगेशने विचारलं. 
" हो… का रे ? ",
" नाही,सहज विचारलं… तू बोलायचीस ना, आमच्याच जातीचा पाहिजे घरच्यांना… ९६ कूळी मराठा… मग आता ब्राम्हण… म्हणून विचारलं… " त्यावर निलम काही बोलली नाही.…. शांतता… थोडयावेळाने निलम बोलली,
" पपांच्या ओळखीचा आहे तो… चांगलं स्थळ आहे म्हणून आवडला पप्पांना तो. engineer आहे ….दुबईला असतो, कधी कधी मुंबईला येतो… मोठे मोठे प्रोजेक्ट केले आहेत त्याने. मग घरी आवडला तो.",
"आणि तुला… ",
"हा… चांगला आहे. मला सुद्धा बाहेर जायचे होते, इंडियाबाहेर… मग बरं झालं ना… " निलम हसली. 
" ok… ok, ठीक आहे, छान. ",
"राजेशला निमंत्रण पत्रिका कधी देऊ… तुझ्याकडे दिली असती पण मला स्वतः त्याला देयाची होती.",
"उद्या दे ना मग…",
"नाही ना… उद्या पासून सुट्टीवर आहे मी. आपली भेट नाही होणार संध्याकाळी… चार-पाच दिवसतरी… ",
"मग… आईंना दे…",
"हा… आताच जाऊ देयाला ना… " निलम आनंदात सांगत होती. मंगेश मात्र राजेशचा विचार करत होता. हेच कारण होतं त्याच्या शांत असण्याचे.

                       निलम, मंगेशसोबतच राजेशच्या घरी आली." आई… !!! " म्हणत म्हणत निलमने राजेशच्या आईला मिठी मारली. किती दिवसांनी भेटत होत्या दोघी. राजेशच्या आईला किती आनंद झाला. मंगेश दारातच थांबला. 
" ये… ये राणी, कित्ती दिवसांनी आलीस घरी. कोणी ओरडलं का इकडे येतेस म्हणून… " राजेशची आई मस्करीत बोलली. 
" काय आई… तुम्हीपण ना… मला कोण ओरडणार… कोणी ओरडलं तरी मी काय थांबणार आहे का इकडे यायची… " दोघीही हसायला लागल्या.
"बरं… कधी आलीस केरळ वरून…",
"झाले चार-पाच दिवस… राजा बोलला नाही का… " ,
"नाही… ",
"काय झालं ते कळत नाही त्याला… हम्म… ते असू दे, आई… हि घ्या , निमंत्रण पत्रिका… ",
"कसली गं… ",
"माझं लग्न ठरलं आहे आणि पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. त्याचं आमंत्रण देयाला आले मी. पाया पडते हा आई… " निलम राजेशच्या आईच्या पाया पडली. धक्कादायक एकदम… मंगेश दारातच होता. आईने त्याच्याकडे पाहिलं. 
" आई… नक्की यायचं हा… ",
"हं… हो, अजून मोठी हो… " असा आशीर्वाद दिला निलमला. 
"चला आई, निघते मी. या निमंत्रण पत्रिका वाटायच्या आहेत ना… आणि राजाला सुद्धा सांगा हा… येते मी… चल मंगेश, Bye… " म्हणत निलम निघून गेली. 

                 मंगेश बाहेरच उभा होता. आईने त्याला विचारलं," राजेश नाही आला का रे… ? ","नाही… पण येईल तो जरा उशिराने… काळजी घ्या त्याची." मंगेश त्याच्या घरात आला. तसाच जाऊन झोपला. राजेशची आई, खूप वेळ त्याची वाट बघत होती. जरा उशिरानेच आला राजेश. रात्रीचे ११.३० वाजले होते. हात-पाय धुतले, फ्रेश झाला. त्या खिडकीजवळ जाऊन बसला. पुन्हा उठला. आणि टेपरेकोर्डेर लावला. आवडतं गाणं लावलं. " याद पिया कि आये… " ध्यानस्त झाला. खिडकीबाहेर कूठे तरी दूर पाहू लागला. संपूर्ण चाळ झोपली होती. नीरव शांतता पसरली होती. त्यात त्या गाण्याचा आवाज अधिक वाटत होता. शेजारीच मंगेश राहायचा. त्यालाही ते ऐकू येत होतं. पडल्या पडल्याच तोही ते गाणं ऐकत होता. त्या शांततेत ते गाणं मनात कूठेतरी लागत होतं. 

राजेशची आई, कधीपासून त्याला बघत होती. किती स्वप्न पाहिली होती तिने. निलम-राजेशची जोडी… आता ते शक्य नव्हतं. पण राजेशला कसं समजावायचे… शेवटी राजेश जवळ आली ती.  
"राजा जेवतोस का ? " तिला माहित होतं, तो जेवणार नाही ते, तरी विचारलं. 
" नाही… नको मला, आज खूप उशीर झाला आहे ना… " राजेश बाहेरच बघत म्हणाला.गाणं तसच चालू होतं. आईच्या काळजात कालवाकालव सुरु होती. खूप धीर करून बोलली,
" राणीचं लग्न ठरलं ना… " राजेशने एक नजर टाकली आईकडे. 
"तुला कसं कळलं ते… ",
"ती स्वतः आलेली, साखरपुड्याचे आमंत्रण घेऊन… ",
"हम्म… " राजेश पुन्हा बाहेर बघू लागला. "चांगलं झालं ना आई, निलमचं…. ",
"अरे पण तुझं प्रेम…. ",
"नाही गं आई… असं नको वाटून घेऊस… नाहीतरी, ती कूठे …. मी कूठे…. मैत्री केली तिचं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. " राजेश उगाचच हसला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. राजेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. 
" राजा… नको रे असा राहत जाऊस… इतका साधा नको राहूस रे…आजकालच्या दुनियेत नाही राहत रे असा कोणी. ",
"आई, स्वभाव आहे ना तो … कसा बदलणार… थोडे दिवस वाटेल निलम बद्दल… मग… ",
"मग काय… " ,
" नंतर सवय होईल ना… म्हणून आता पासून सवय करतो आहे , तिच्यापासून दूर रहायची… " ,
"किती दिवस असा राहणार… ",आई रडत म्हणाली.
" माहित नाही… कोणीतरी दूर जाते… ते दुःख कसं असते ते माहित आहे मला. पहिलं बाबा गेले सोडून आणि आता निलम… " राजेश बोलता बोलता थांबला, आईला खूप वाईट वाटलं. "याद पिया कि आये…. " गाणं तसंच सुरु  होतं.आणि आई… राजेशला पोटाशी घेऊन रडत होती. 

पुढचा दिवस… राजेश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. पुन्हा निलम त्याला सकाळपासून call करत होती. राजेशने एकदाही उचलला नाही. मंगेशला कळत होते कि राजेशला काय वाटतं असेल मनातून. तरीसुद्धा राजेश जवळ आला तो.
"चल… " मंगेशने राजेशला सांगितलं. 
"कूठे ? ",
"चल जरा… बाहेर, बोलायचे आहे.",
"आता नको, काम आहे. रात्री घरी गेलो कि बोलू.",
"प्लीज राजा… तुला तुझ्या आईची शप्पथ आहे." राजेश नाईलाजाने उठला. आणि बाहेर आला. 
" राजेश… मला कळते आहे, तुझ्या मनात काय चालू आहे ते… पण एकदा बोल तरी तिच्याशी.… ",
"काय बोलू… ",
"अरे तुझ्या मनातलं सांग ना तिला… ",
"काय बोलतो आहेस तू… आता तीन दिवसांनी साखरपुडा आहे तिचा… आणि मनातलं सांगू… ",
" अरे पण, बोल ना तिला… इतके call करते ती… एकदा बोल ना… " राजेश तयार नव्हता बोलायला. शेवटी मंगेशने call केला निलमला. 
" Hi… अरे राजा कूठे आहे… कधीपासून call करते आहे त्याला… भेटली का निमंत्रण पत्रिका त्याला …." निलम बोलली. 
" हा… भेटली. पण तुला भेटायचे होते जरा… कधी भेटशील… ",
"आता तर मी निमंत्रण पत्रिका वाटत आहे friends कडे… रात्री भेटू… चालेल ना. " ,
"हो… चालेल, रात्री भेटू… ८ वाजता, तिथेच… चहाच्या टपरीवर",
"ok, चालेल… " मंगेश - निलमचं संभाषण संपलं. 

                    संध्याकाळी मंगेश, राजेशला जबरदस्ती घेऊन गेला. राजेशला लवकर निघायचे नव्हते. ८ वाजता बरोबर पोहोचले दोघे त्या टपरीवर.… तिघे अगदी कॉलेजमध्ये असल्या पासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबत आणि टाईमपास करत. चाळीपासून जवळच होती टपरी. निलम तर आधीच आलेली. 
" काय रे राजा… कालपासून call करते आहे तुला, एकदाही उचलला नाहीस…. " राजेश गप्पच. निलम मंगेशकडे पाहू लागली. मंगेशला समजलं ते. त्यानेच विषय सुरु केला. 
" निलम, मला काहीतरी बोलायचे आहे.",
"हं… बोलं.",
"मला माहित नाही, हि योग्य वेळ आहे का नाही बोलायची… ", 
"हा… काही असेल ते आत्ताचं बोलून घे हा…. कारण लग्न झाल्यावर मी भेटणार नाही." निलम हसत म्हणाली.
"म्हणजे… " मंगेश बोलला.
"अरे, लग्नानंतर direct… दुबई.",
"म्हणजे… तिकडेच राहणार का तू ? ",
"हो.",
"आणि जॉब ? ",
"आमची branch आहे ना तिकडे, दुबईला… मग तिकडेच जॉब करणार. Transfer करून घेणार मी." मंगेश… राजेशकडे पाहू लागला. राजेश शांतच होता. 
"अरे पण या राजाला काय झालं आहे… बोलत का नाही." ,
"तेच सांगायचे होते.",
"मंगेश प्लीज…नको." राजेश खूप वेळाने बोलला.
"गप्प बसं राजा… बोलू दे… निलम." मंगेश निलमकडे पाहत बोलला."तुला वाटत नाही. तुझा निर्णय चुकला आहे ते.… जोडीदार निवडण्याचा.",
"what do you mean… ",
"तुला खरंच… त्याच्याशी लग्न करावेसे वाटते कि… घरच्यांसाठी लग्न करते आहेस… ?",
"मला अजूनही कळत नाही… तूला काय सांगायचे आहे ते.… ",
"एवढीही बनाव करू नकोस निलम, जसं काही तुला कळतच नाही… मी राजेशबद्दल बोलतो आहे." तेव्हा निलमच्या चेहऱ्याचे expression बदलले. "त्याचं प्रेम होतं तुझ्यावर, ते माहित होतं ना तुला… तरी तू… ",
" अरे… पण… घरी कसं सांगू मी हे… आणि आता काही होऊ शकत नाही. " निलम बोलली. मंगेशकडे बोलण्यासारखे काहीचं नव्हतं. सगळेच शांत झाले. निलम राजेशकडे पाहत होती. 
" राजेश… अरे पण आपण मित्र तर राहू शकतो ना… बोल ना काहीतरी.… बोलत का नाहीस माझ्याबरोबर. ",
"तुझ्यापासून दूर रहायची सवय व्हावी म्हणून… " राजेश शांतपणे बोलला." मला वाटते आपण पुन्हा नको भेटायला. call पण नको करूस. तुला आणि तुझ्या घरी चालायचे ते… तुझ्या जोडीदाराला आपली Friendship कळणार नाही, may be… ",
"म्हणजे Friendship पण नको का तुला. " निलम रागात बोलली. 
"तसं नाही… पण सवय झाली आहे तुझी… जरा वेळ लागेल ना, लग्नानंतर अश्या भेटी होणार नाहीत पुन्हा. म्हणून बोललो…. चल Bye… निघतो मी, आई वाट बघत असेल. " म्हणत राजेश निघाला. निलम गाडीत जाऊन बसली. मंगेश सुद्धा निघाला. निलमने मंगेश समोर गाडी थांबवली आणि बोलली.
"मी घेतलेले कोणतेच निर्णय चुकलेले नाहीत… हा निर्णयसुद्धा…" गाडी start केली… गेली निघून. 

                    साखरपुड्याचा दिवस आला. रविवारचं होता. त्यामुळे ऑफिसचे कारण नव्हतेच. आईने सांगितलं म्हणून राजेश तयार झाला. मंगेश होता सोबतच. गिरगावला साखरपुडा होता… साखरपुडा काय, लग्नच होतं ते जणू काही… एवढा खर्च केला होता. श्रीमंती दिसूनच येत होती त्यांची. मंगेशचे डोळे दिपून गेले. निलम तर किती छान दिसत होती आज. गुलाबी रंगाची साडी… त्यावर गळ्यात, हातात दागिने. उजळून दिसत होती अगदी. त्यांची जोडी तर द्रुष्ट काढण्यासारखी होती. राजेश त्यांच्याकडेच पाहत होता कधीचा. मोठे मोठे पाहुणे आलेले समारंभाला. त्यात हेच दोघे साधे वाटत होते. म्हणून सगळ्यात शेवटच्या रांगेत बसले होते. हळूहळू एक-एक जण त्या जोडप्याचे अभिनंदन करत होते. राजेशला तिथे पुढे जायची इच्छ्या नव्हती.… मंगेशला हिंमत होत नव्हती पुढे जाऊन तिचे अभिनंदन करण्याची. थोडावेळ दोघे बसले आणि मागच्या मागे निघून गेले. छान सोहळा झाला. रात्रसुद्धा झाली होती. रात्रीचे १० वाजलेले. तिथून गिरगाव चौपाटी जवळच होती. 
" चल… जरा बसू चौपाटीवर… " राजेश मंगेशला बोलला. 
" अबे… वाजले बघ किती… पुन्हा घरी जायला उशीर होणार… आणि आता चौपाटीवर कोणी नसेल.",
"तू जा… मी जातो चौपाटीवर…" राजेश निघाला. मंगेश मागोमाग.…. बसले थोडावेळ… मंगेशने इतरत्र नजर फिरवली.कोणी कोणीच नव्हतं. राजेश समुद्राकडे पाहत होता. मंगेशला बोलायचे होते राजेश बरोबर. 
" राजा… मला बोलायचे होते.… तुझ्याशी.",
"हं… बोल.",
"तू का सांगितलं नाहीस तिला कधी मनातलं… " राजेश हसला फक्त. 
"बोल ना हसतोस काय ?",
"काही नाही रे… असंच हसायला आलं… " राजेश, मंगेशकडे न पाहताच म्हणाला. 

" हा जानेवारी महिना आहे ना… मार्चमध्ये लग्न आहे बोलली ना ती. ",
"हो… मग.",
"नाही रे… असचं… आणि लगेचच दुबईला जाणार ना निलम.…. हम्म, यावर्षी रंगपंचमीला नसेल ना ती… ",
"काय बोलतो आहेस तू… " मंगेश राजेशकडे पाहत म्हणाला. 
" दरवर्षी असेत ना ती… चाळीत येऊन रंगपंचमी खेळायची.… पुन्हा गुढीपाडवा, त्यादिवशी आपण जायचो त्यांच्याकडे… गुढीला पाया पडण्यासाठी…. नंतर १ मे, मुद्दाम कूठेतरी फिरायला जायचो आपण…तेव्हा पण नसेल ती,… जून,जुलै मध्ये येणाऱ्या पावसात नसेल ती, मग… गोविंदाला "हंडया" बघायचा हट्ट करायला नसेल ती… यावर्षी गणपतीमध्ये चाळीतल्या सार्वजनिक आरतीला नसेल ती… मला गरब्याला सुद्धा कोणीतरी नवीन जोडीदार बघावा लागेल ना… ती तर नसेलच यावर्षी कोणत्याच सणांमध्ये…. " आणि राजेश हसायला लागला. थंडीचे दिवस होते. त्यात समुद्रकिनारा… थंड, बोचरा वारा… राजेशचे ते बोलणे ऐकून मंगेशच्या अंगावर शहारा उठला… कसं सहज बोलून गेला तो. 

"राजेश…. तू तिला आधीच का सांगितलं नाहीस हे… ",
"कसं सांगू मंगेश तिला… सांग मला, कसं सांगू… , बघितलंसं न आता… किती खर्च केला त्यांनी साखरपुड्याला, त्यात मी कूठे बसतो सांग… ती manager आहे आणि मी साधा चाकरमानी… तिचं सगळं काम मोठ्या माणसाबरोबर असते… त्या लोकांना काय सांगणार होती ती, माझा नवरा साधा जॉब करतो… कसं जमणार होतं आमचं.… निलमचं घर बघितलंस ना, लग्न करून तिला का चाळीत आणलं असतं का मी… साधा TV नाही माझ्याकडे… तिच्या नवऱ्याचा पगार माहित आहे तुला, १.५ लाख… माझा किती, १५,०००… फरक, १.३५ लाख… निलमने गेल्या महिन्यात ६००० ची फक्त shopping केली.… आपल्या खोलीचे भाडे ८०००… त्यात घरातलं राशन, वस्तूसाठी पैसे, आपल्या प्रवासाचा खर्च… त्या अनाथ मुलांसाठी करतो तो खर्च… एवढं सगळं करून १५,००० मधले उरतात ते फक्त ३००० रुपये हातात. त्यातून बँकेत टाकतो पैसे… कस सांभाळणार होतो निलमला मी आणि बोलतोस तिला आधी का विचारलं नाहीस ते… कसं सांगू रे… इकडे ऑफिस मधून सुटलो कि पहिला विचार येतो… बस वेळेवर मिळेल का, वेळेवर भेटली तर नेहमीची ट्रेन मिळेल… ती चुकली कि पाऊण तास थांबा… मग घरी पोहोचायला उशीर, आई तशीच राहते मग न जेवता… निलमला तिच्या गेल्या वाढदिवसाला वडिलांनी कार गिफ्ट दिली… शिवाय कंपनीची कार आहेच… मला जमणार होतं का ते…" राजेश थांबला बोलायचा. मंगेशला भरून आलं होतं. दोघेही समुद्राच्या येणाऱ्या - जाणाऱ्या लाटांकडे बघत होते. 

खूप वेळाने राजेश बोलला. "निलम सांगत होती, तो दुबईला मोठा engineer आहे, मुंबईत स्वतःचे दोन Flats आहेत. १.५ लाख पगार, दुबईत असतो… वरचेवर india मध्ये येतो. खूप छान मुलगा भेटला तिला… शिवाय तिचं एक स्वप्न होतं, निलमला world tour करायची होती… मला ते काही जमलं नसतं कधीच… आता तरी निलम जगभर फिरू शकेल… " राजेश हसत म्हणाला. 
" पण यार… असं कसं रे …. " मंगेश खूप वेळाने बोलला." किती वर्ष एकत्र आहोत आपण… त्यात तुम्ही दोघे किती जवळ… कधीच वेगळे झाला नाहीत तुम्ही,तुम्हा दोघांना ते जमलंचं नाही… दूर जाणं, रोज एकतरी call असतो ना तुमचा एकमेकांना… नाहीतर मेसेज तरी चालू असतात… आणि निलम, तू एक reply केला नाहीस तर किती बेचैन व्हायची. मला call करून तुझी चौकशी करायची… मग सांग, एवढ्या वर्षांत एकदातरी, असा दिवस गेला का… कि ज्या दिवशी तुम्ही बोलला नाहीत." राजेशने नकारार्थी मान हलवली. 
" मग आता हे असा का, मध्येच कुठून गरिबी - श्रीमंती आली रे… " राजेशने मंगेशच्या खांदयावर हात ठेवला. " आता झालं ना चांगलं तिचं… बस ना मग, आपल्याला काय पाहिजे अजून." मंगेश शांत झाला. अजून थोडा वेळ बसले दोघे. मंगेश उठला मग…"चल राजा… घरी जाऊ… "राजेश बसूनच होता… " मी बसतो आहे थोडावेळ अजून… खूप दिवसांनी समुद्र किनारा बघतो आहे… "मंगेश पुढे काही बोलला नाही. निघून गेला तो. 

                        आता , तिथे फक्त राजेशच होता.… सोबतीला थंड वारा, धीरगंभीर असा लाटांचा आवाज आणि राजेश,… राजेशला जुन्या गोष्टी आठवत होत्या. कॉलेजच्या गोष्टी, त्यांच्या friendship च्या… एकत्र जेवायचे राजेशच्या घरी येऊन. सुट्टी असली कि अभ्यास करण्याच्या बहाणा करून निलमचे घरी येणे… अभ्यास बाजूलाच, गप्पा-मस्करी भंकस… मस्त चालायचं. त्यात कधी कधी आई सहभागी होत असे.… गरबा खेळायला यायची निलम मुद्दाम… इतकी वर्ष ते दोघे "बेस्ट जोडी" चा पुरस्कार घेत होते. छान जमायचं दोघांचं… गणपतीच्या शेवटच्या दिवशी, जागरण करताना… किती धम्माल करायची निलम… कोजागिरीला शेकोटी भोवती कसे फेर धरायचे निलम आणि मंगेश… आठवणी येताच राजेश एकटाच हसत बसला होता. मग जॉबला लागलो, तरी एकत्र होतो. गाडीतून येताना एक - दीड तासाचा प्रवास कसा पटकन संपायचा. त्याच गप्पागोष्टी, मजा-मस्करी.… दिवसभराच्या ऑफिसच्या गोष्टी सांगताना सगळा त्राण नाहीसा होत असे. आणि सुट्टीच्या दिवशी, कूठेतरी बाहेत फिरायचा plan.… तिघेच जण, मी , निलम आणि मंगेश… कधी कधी मंगेश सांगायचा, पोटात दुखते… डोकं दुखते.… नाटकी नुसता… उगाचच…,निलम सोबत मी एकटं जावं म्हणून… राजेशच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अचानक त्याला आजचा दिवस आठवला. सगळं हसू नाहीस झालं चेहऱ्यावरचे… स्वतःचा राग आला त्याला. बाजूला एक लहानसा दगड होता. उचलला,जोरात भिरकावला समुद्रात आणि मोठयाने ओरडला." आ…. " पुन्हा पुन्हा ओरडत होता, घसा दुखेपर्यंत…मग चालत समुद्राजवळ गेला,वाळूत बसला आणि वाळू हाताने उचलून समुदात भिरकावू लागला, ते थकेपर्यंत… शेवटी हात दुखले… शांत झाला. डोळ्यात पाणी जमा झालेले… एकदाही रडला नव्हता तो इतक्या वर्षात… वडील सोडून गेले तेव्हासुद्धा नाही, सगळी दुःख अशीच मनात साठवून ठेवलेली त्याने… पुन्हा मोठयाने बडबडू लागला समुद्राकडे बघत " काय चूक होती माझी यार !!! सांग ना… काय चूक होती, प्रेम केलं होतं ना मी, तिचं पण प्रेम होतं ना माझ्यावर… मग मलाच का शिक्षा, एवढी वर्ष होतो ना एकत्र… असं कोणी अचानक सोडून जाते का कोणी… एवढं मोठ्ठ भगदाड पडलं आहे तिच्या जाण्याने मनात…. ते कसं भरायचं आता…सांग मला." पुन्हा दोन्ही हाताने वाळू समुद्रात फेकू लागला… दमला शेवटी आणि ढसाढसा रडू लागला. 

                    खूप वेळाने राजेश शांत झाला… मनातलं बाहेर काढलं होतं त्याने… घड्याळाकडे पाहिलं त्याने… रात्रीचे ११ वाजले होते. शेवटची ट्रेन निघायच्या आधी स्टेशनला पोहोचलं पाहिजे. राजेशच्या डोक्यात विचार आला पटकन. डोळे पुसले, रुमालाने चेहरा पुसला. कपड्यावरची वाळू झटकली आणि निघाला.… थांबला, वळला… समुद्राच्या लाटाजवळ आला… खाली वाकून समुद्राला "sorry" म्हणाला… मनातला राग काढला होता ना त्याने समुद्रावर… एकदा बघितले त्याने समुद्राकडे… तो तसाच होता, पहिल्यासारखा… राजेश निघाला घरी… शेवटची ट्रेन सुटण्या अगोदर… 


------------------------------------to be continued---------------------------



Followers