All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Friday, 19 June 2020

" वादळ..... !! " ( भाग १ )


" भरून भरून.........  आभाळ आलंय ,  भरून भरून........." अमेयने रेडिओ लावला तसे पहिले गाणे हेच लागले. रविवारची संथ सकाळ, अमेय नेहमी सारखाच सकाळी लवकरच जागा झालेला. जागा झाला कि सर्वात आधी रेडिओ लावायची सवय , या आधुनिक युगात रेडिओ ऐकणारा निराळाच व्यक्ती, त्यातूनही FM वर लावणारी मराठी गाणी जास्त आवडीची. हे गाणं लागलं आणि अमेय सुखावला.

" हम्म .... पावसाळा सुरु होतो आहे वाटते... जून महिना लागलेला दिसतो ... " त्याचे आजकाल लक्ष नसायचे , कोणता दिवस , कोणता महिना ... कश्यात काही नाही. खिडकीजवळ जाऊन बाहेर आभाळात पाहिले त्याने.

" पावसाचा एक साधा काळा ढग सुद्धा नाही... आणि यांनी गाणी लावायला सुरुवात केली. कोणीतरी जाऊन सांगावे यांना .... बाबांनो ... धीर धरा अजून , पाऊस आला कि लावा पावसाची गाणी. " स्वतः बोलून स्वतःशीच हसला.खिडकी तशीच उघडी ठेवून तो दिवसाच्या तयारीला लागला. अंघोळ वगैरे उरकून फ्रेश झाला. " थोडा चहा टाक गं .... " अचानक बोलून गेला. पुढच्याच क्षणाला त्याला आठवलं कि आपण घरात एकटे आहोत. हल्ली असाच एकटं बडबडायाची सवय लागली होती त्याला. तसाच ते ओले केस पुसत तो किचन मध्ये आला. गॅसवर एका भांड्यात पाणी उकळत ठेवले. साखर टाकली , त्याला हवी तितकीच. चहा म्हणजे अमेयचा जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार होयाची वाट बघत होता. अचानक खिडकीतून जोराचा वारा आत शिरला. चहा पावडर पाण्यात टाकली तेवढयात.


खिडकीचे दारे लावून घेऊ म्हणून खिडकीपाशी आला. फ्लॅट मध्ये राहत असला तरी खिडकीला त्याने खास बनवून घेतलेली लाकडी दारे, लावून घेतलेली . रेडिओ वर गाणी तशीच सुरु होती....

" आला-आला वारा.....  संगे पावसाच्या धारा..... , पाठवणी करा सया निघाल्या सासुरा.....    " खिडकी बंद करायला आलेला अमेय , थंड वाऱ्याच्या स्पर्शाने तिथेच रेंगाळला. तसाच त्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यात सामील झाला. चेहऱ्याला होणार तो थंड स्पर्श त्याला तिथून जाऊ देत नव्हता. किंबहुना त्याला तिथून जायचे नव्हते.

काही आठवलं त्याला .... लख्ख आठवलं. " काही गोष्टी विसरायचा असतील ना .... हे मन ... हे साले मन पण ना ...टोचत राहते सारखे... नुसतं टोचत राहते. अगदी डोळ्यात पाऊस साठेपर्यंत .... टोचत राहतात आठवणी.... " अमेय मनाशी भांडत होताच , घरभर पसरलेला चहाचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. वाफाळलेला चहा त्याने मोठ्या कपात ओतला. दूध हळू हळू ओतत , त्याला चहाचा हवा तसा रंग येईपर्यंत दूध त्यात ओतले. सकाळीच येणारा पेपर वाचत चहा घेयाची सवय . पण आज त्याचा खिडकीशी याराना वाढलेला. चहा घेऊन तिथेच आला पुन्हा. चहाचा पहिला घोट घेणार होताच , तोच रेडिओ वर " breaking news " आली. " एक मोठ्ठ वादळ शहराच्या दिशेने सरकते आहे. " पुढचे काही ऐकण्या आधीच त्याने रेडिओ बंद करून बाजूला ठेवला.

" हम्म .... पाऊस सुरु झाला नाही आणि वादळं यायला लागली. " स्वतःच्याच विचारात. थंड वाऱ्याचा जोर आणखी जरा वाढलेला जाणवला त्याला. खिडकीतून दिसणारे बाहेरचे जग ... चहाच्या प्रत्येक घोटासोबत स्वतःमध्ये सामावून घेऊ लागला.

" गेल्या पावसाळातली भेट आमची... नाही नाही .... पावसा आधीची ओळख .... तीही फोटोग्राफर ..... नावालाच फोटोग्राफर.... एका फोटोग्राफीच्या सेमिनार मध्ये ओळख झालेली. तशी ती नवखीच. तिच्याशी असे खास काही आकर्षण नव्हते सुरुवातीला. सेमिनार मध्ये आलेल्या पैकी एक ... अशीच ओळख... आणि तसेही माझी बायको तिच्या पेक्षा जास्त देखणी. त्यामुळे खास करून मुलींशी असे मुद्दाम बोलणे नाहीच माझे... हा .... तिच्यात काही तरी नक्कीच वेगळे होते. त्याशिवाय का तिच्याकडे आकर्षित झालो मी.. "

वाऱ्याचा जोर किंचित वाढलेला. सोसायटी खालीच असलेल्या मिठाईच्या दुकानात शेवया तळल्या जात होत्या. येणाऱ्या वाऱ्यासोबत तोही सुगंध अमेयच्या घरात पसरला.

" मुकुंदाने शेवया करायला घेतल्या वाटते... काही म्हणा .. चव आहे त्याचा हाताला.. तशी आमच्या " हिच्या " हाताला सुद्धा चव आहे. चहा तर तिनेच करावा. पाहता पाहता २ कप संपून टाकायचो. " अमेयला बायकोची आठवण आली. समोरचा पिंपळ , पानांची सळसळ करत माझ्याकडेच पाहतो आहे , असे क्षणभर अमेयला वाटले.

" सोबत हवी होती अजून तिची. तरी तिचे बरोबर होते म्हणा , घरात लग्नाची बायको असताना , ४ वर्षाचा सुखी संसार असताना ..दुसऱ्या कोणाचा विचार मनात आणणेही पापच .... तस तिने आधीही माझ्या खूप चुका पोटात घातल्या. लग्न झाले आणि ४ महिने जॉब सोडून या फोटोग्राफीच्या मागे लागलो. त्यातले २ महिने असाच घरात बसून, एक शब्द बोलली नव्हती मला. स्वतः काम करून माझेही पोट भरायची. जोपर्यत फोटोग्राफी करून पैसे कमावले नाहीत , तोपर्यत या बेकार माणसासोबत छान जमवलं तिने..... दुसरी बाई ... मुलगी... हि तर अक्षम्य चूक होती ना .. " अमेय मनात बोलत होता. कपातला चहा मात्र येणाऱ्या थंड वाऱ्यासमवेत थंड होत होता.  


रविवारची सकाळ , रस्त्यावर गर्दी असायची .. आज कमीच होती. त्याच्या घरातून समोरच असलेला मासळी बाजार दिसायचा. आणि बाहेर बसणारे भाजीवाले. रविवार म्हणजे जास्त गर्दी होणार दिवस. अमेय तिथूनच भाजी घेऊन यायचा.

" आज फारशी गर्दी नाही. वादळाला घाबरले वाटते सर्व. " अमेय त्याच दिशेने पाहत होता.

" हिला फारच आवड जेवण करायची. बरेच दिवस झाले ... दिवस कुठे ... महिने झाले ... तिच्या हाताचे खाऊन ... " तो मासळी बाजार आता कुठे सुरु होत होता. अमेयला नॉनव्हेज आवडायचे खास करून. " नेहमीच माझ्याच आवडीचे जेवण असायचे, करायची ती.. किती आठवणी काढू तिच्या... रागावूनच गेली. शेण खाल्लेलं ना मी... आईही , अश्याच शब्दात बोलली होती मला... आणि आज ... divorce चे पेपर घेऊन बोलावले आहे तिच्या वडिलांनी.... किती माफी मागितली तिची... रागात होती तरी जाताना वाईट वाटलेले तिला... कळले होते मला. " जोराचा वारा खिडकीला आदळून आत शिरला....

" कदाचित हे येऊ घातलेलं वादळ ... तिच्या आणि माझ्या वेगळे होण्यात बाधा आणत असावे. " घड्याळात पाहिलं तर सकाळचे ९ वाजत होते .

" निघू का .... एवढ्या सकाळी .... तेही रविवारी, सुट्टीच्या दिवशी , इतक्या लवकर जायला नको. किंवा आज नकोच जायला... उद्या घरी येताना जाईन ... " अमेयने कपात पाहिलं तर चहा बाकी होती अजून. थंड झालेली चहा. अमेय चहा ओतून देण्यासाठी पुन्हा किचन मध्ये आला. किचन मधल्या खिडकीतून आभाळाचा एक छान तुकडा दिसत असे. त्या किचन मधल्या खिडकीत अमेय - विभाने बराच काळ व्यतीत केला होता.


" विभा " .... अमेयची बायको. जानेवारीच्या २ऱ्याच तारखेला दोघांचे जोराचे भांडण झालेलं. कारण ..... कारण अमेयची मैत्रीण... close friend म्हणा. तिच्यावरून आधीही लहान भांडणे झालेली. पण त्यादिवशी भांडणाचे कारण मोठे आणि खर्चिक होते. विभा साधी सरळ मुलगी. अमेयचे arrange marriage. खूप प्रेम बायकोवर. तरी आपल्या संसारात कोणी परका तिसरा व्यक्ती नको होता विभाला. अमेय तिच्यावर बराच खर्च करायचा . अर्थात त्याने कमावलेल्या पैशाचे गणित विभाने कधीच विचारले नाही. शिवाय अमेय त्या close friend वर किती खर्च करतो ते माहित होते विभाला. मूग गिळून गप्प राहायची. आधी अगदी नजर लागावी अशी अमेय-विभाची जोडी. पूर्ण सोसायटी मध्ये यांच्यासारखी गोड जोडी नव्हती. अमेयला कधी कधी स्वतःच्या भाग्यावर गर्व वाटायचा, कि इतकी सुंदर व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. made for each other जणू . पण अमेयला काय झाले, अगदी दुसरीच्या मागे लागला. १ जानेवारीला सोन्याचा मोठा किमती दागिना गिफ्ट केला तिला आणि विभाचे डोके आणखी फिरले. डिसेंबर पासूनच या दोघांत जरा धुसफूस सुरु होती. त्यात तेल ओतायचे काम स्वतः अमेयनेच केले.

जोराचं भांडण झाले. अमेय रागात काही-बाही बोलून गेला. विभा आतून खूप दुखावली. तिचे सर्व सामान भरले आणि माहेरी निघून गेली. अमेयचा राग २ दिवस तसाच होता. डोकयात काय सुरु होते त्याच्या , त्यालाच माहित. त्या रागातच त्याने त्या जवळच्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला तिला हा " joke " वाटला. परंतु अमेयने seriously विचारलं तेव्हा तीही गंभीर झाली. " मित्र म्हणूनच ठीक आहोत... " असे ऐकल्यावर अमेयचा पारा आणखी चढला. तिथेही भांडण. शेवटी अगदी तोंडावर नकार देऊन तीही तडतडत निघून गेली. अनपेक्षित होते ते अमेय साठी. पुढल्या २ दिवसांनी राग शांत झाल्यावर अमेयचे डोके ठिकाणावर आले. दोघींची आठवण सातत्याने येत होती. जास्त करून विभाची. " तिची काय चूक होती यामध्ये . चुकलो तर मीच.. इतका का चुकलो मी .... कळलंच नाही. " अमेय त्या खिडकीतून दिसणाऱ्या आभाळाच्या तुकड्याकडे पाहत होता. आताशा कुठे सकाळ होत होती. आणि आभाळ ढगांनी भरायला सुरुवात झालेली.

" खरच वादळ येते आहे... हवामान खाते सुधारले वाटते... अंदाज बरोबर लागला म्हणायचा. " अमेय स्वतःशीच हसला. अमेय आधी बँकमध्ये काम करायचा. अचानक फोटोग्राफीने डोकयात शिरकावं केला. लग्नानंतर फोटोग्राफीच्या मागे हात धुवून लागला. अर्थात जे करायचा ते अगदी मनापासून. काही महिन्यातच तो छान फोटोग्राफी शिकला. छानच असायचे त्याचे फोटो. त्यातून हे असे पावसाळी फोटो छान असायचे. पण त्याने काय पोट भरणार, काहींनी त्याचे प्रदर्शन भरवण्याचा सल्ला दिला. विभाकडून काही पैसे " उसने " घेऊन एक प्रदर्शन भरवले. प्रदर्शनाचे पहिले २ दिवस रिकामेच गेले. तिसरा दिवस खास होता. त्यादिवशी खूपच गर्दी झालेली, शिवाय २ फोटोही विकले गेले. तिथून सुरु झाले. पुढल्या २ दिवसात सर्व फोटो विकले गेले. त्या गोष्टीने अमेयचा आत्मविश्वास वाढला. पुढल्या महिन्यात सुद्धा आणखी एक प्रदर्शन भरवले त्याने. २ दिवसातच अमेय पुन्हा " श्रीमंत " झाला.

मग काय !! अश्या लोकांना फेमस होयाला वेळ लागतो का ... दर २ महिन्यांनी अमेय असे प्रदर्शन भरवायचा, सर्वच फोटोग्राफ विकले जायचे. तेही मोठ्या किंमतीला. फेमस झाला तस फोटोग्राफीच्या सेमिनारला बोलवणे यायचे. नवीन फोटोग्राफरना मार्गदर्शन करावे म्हणून अमेयला बोलवायचे. जॉब पेक्षाही जास्त कमाई होत असे. शिवाय त्याला वाटेल तसे जीवन तो जगू शकत होता. विभा ही खुश. लग्नानंतर अमेय जॉब सोडून भलतंच काही करत होता , हे तिच्या आई-वडिलांना आवडले नव्हते. तरी विभा अमेयच्या पाठी खंबीर उभी राहिली. तिचा तिच्या नवऱ्यावर विश्वास होता. तसं बघावं तर विभा होती म्हणूनच अमेय इतकी मोठी मोठी यशाची पावले टाकत होता. फक्त एका वळणावर तो चुकला. विभाने फक्त घर सोडलेले , मनात मात्र मीच असणार हे अमेयला माहित होते. विभाच्या वडिलांनी divorce चा निर्णय लादलेला.


भांडण होऊन ६ महिने झाले. ना अमेय विभाकडे गेला , ना विभाकडून कोणी अमेयकडे आले. अमेयने ३-४ वेळा विभाशी फोन वर बोलण्याचा प्रयत्न केला पण तिच्या वडिलांनी बोलूच दिले नाही. अमेयला त्याची चूक पूर्ण उमगली होती. विभाने माफही केले असेल. पण बोलणेच होत नव्हते. ३ दिवसापूर्वी तिच्या वडिलांनी अमेयला divorce चे पेपर पाठवून दिले. विभा घरातून गेल्यापासून अमेयचे चित्त थाऱ्यावर नसायचे. सुरुवातीला रिकामे घर एकट्याला खायला उठे. दिवसभर कॅमेरा घेऊन फिरायचा. मात्र संध्याकाळ झाली कि घरी परतावे लागे. दिवस कसातरी फिरण्यात , फोटो काढण्यात निघून जायचा. रात्र कशी घालवावी हा मोठा प्रश्न. अमेयचे आईवडील २० मिनिटावर राहायचे. लग्न होण्याआधी अमेयने हा आताचा फ्लॅट घेतलेला. विभाने घर सोडल्यापासून बराच वेळेला अमेय आईकडे जायचा. मुलाकडून मोठी चूक झालेली , आई चुका पोटात घालते. अमेय तसा गुणी मुलगा , हे आईलाही माहीत. तरी चूक ती चूकच. अमेय फक्त जेवायला जायचा आईकडे. स्वतःच्या हातचे किती करून खाणार. बोलणे असे नसायचे. आईकडे आला तरी गप्प गप्पच.

छान बाल्कनी होती तिथे. तिथून अमेयचा फ्लॅट दिसायचा. अमेय आईकडे आला कि हमखास त्या बाल्कनीत जाऊन स्वतःच्या फ्लॅटची ती खिडकी बघत उभा राहायचा. काय माहित काय सुरू असायचे त्याच्या डोक्यात. आईने जेवायला हाक मारली कि शाळेतल्या मुलासारखा गपगुमान ताटात वाढलेले खायचा आणि " येतो " म्हणत निघून जायचा. आईला त्याचे दुःख कळायचे पण ती तरी काय करणार बापडी. अमेयच्या डोळ्यात दिसायचे तिला. विभाला शोधायचा तो. आपल्या घराकडे असे वेदनेने कोणी बघते का... सांगा मला. कदाचित विभा  आज तरी घरी आली असेल आणि त्या खिडकीत उभी असेल , हेच अमेय बघायचा.

अमेय आज सकाळपासूनच विचार करत होता. घटस्फोट नको आहे , तरी तिच्या घरी मी नको असेन तर सही करू. सही करण्याआधी एकदा तरी विभाला भेटणे आवश्यक आहे. माझ्या मनात तिच्यासाठी जे काही आहे , तेच तिच्या मनात आहे का ते जाणून घेणे गरजेचे होते. तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. बघतो तर केबल वाल्याचा फोन.

" ओ साहेब ... गेल्या महिन्यापासून केबलचे पैसे नाही दिलेत. या महिन्यात तरी सुरु करू का केबल. " अमेयच्या लक्षात आलं. गेल्या महिन्यापासून केबल बंदच आहे.  टीव्ही तरी कोण बघते आता. " नको ... राहू दे बंद , मला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा सांगीन. " म्हणत त्याने कॉल कट केला. विभा असताना लाडिक भांडणे होयाची टीव्ही वरून. अमेयला फुटबॉलचे जाम वेड. रात्र रात्र जागून फुटबॉलच्या मॅच बघायचा. विभाच्या आवडीच्या टीव्ही सीरिअल सुद्धा वाहून जायच्या त्यात. बोलायची विभा ," दोन टीव्ही आणूया घरात.. नाहीतर मीच जाऊन बसते ... शेजारी ... टीव्ही बघायला.. " तो काही राग नसायचा. विभा कशी ..... शांत मुलगी. अमेयचे वेड माहित होते तिला. स्वतःच्या आवडी-निवडी वर तिने अमेयसाठी पाणी सोडले होते. आणि अमेयने काय केले. तस बघावं तर अमेय सुद्धा विभाची खूप काळजी घेयाचा.

अमेय आठवणीतून जागा झाला. विचार केला. त्याची फोटोग्राफीची बॅग उचलली. कॅमरा भरला त्यात .....त्यातच ते डिवोर्स आणि इतर पेपर भरले, निघाला. bike घेऊन जाऊ का.... विचार करतच बिल्डिंग खाली आला. वारा वाहत होता. सकाळीच वादळाची सूचना ऐकली होती त्याने रेडिओवर. जाऊयाच bike घेऊन. विचार करत bike जवळ आला. विभाच्या आवडीची bike हि , नाहीतर अमेयचा प्रवास पायीच. विभा बोलली , मला नाही आवडत पायी पायी.. ठीक आहे , घेऊ bike . अमेयला गाडी घेयाची होती. त्याचा प्रवास हा नेहमीच जवळपास असायचा. वाटलंच तर पब्लिक ट्रांसपोर्ट चा वापर. गाडी घेयाची होती कशाला तर फोटोग्राफीसाठी कुठे दूर जाणे झाले तरच आणि प्रदर्शन लागेल तेव्हा तिथे जाण्यासाठी. विभाचा हट्ट की bike घेऊ, तुझ्या मागे बसून फिरायचे आहे मला. मग काय , विभा साठी bike आणि स्वतःसाठी गाडी घेतली अमेयने. पैशाची कमतरता नव्हती त्याला. फोटोग्राफी करून किती पैसे कमवायचा अमेय हे विभाला माहित. पण तो ती कमाई उधळू नये याची काळजी विभाला असायची. विभाने bike वर बसता यावे यासाठी ८- १० किलो वजन कमीही केले होते. अमेय सुद्धा तिला वेळ मिळेल तेव्हा फिरायला घेऊन जात असे. परंतु गेल्या पावसाळ्यापासून अमेयच्या मागची सीट कोणी वेगळीनेच बुक केलेली. विभाने किती वेळा त्यादोघांना bike वरून फिरताना बघितले होते. बाहेरून कोणी सांगण्या आधीच तिला ते कळलं होते. तरी मौन राहायची नेहमीच.

अमेयने एकदा नजर टाकली bike वर. किती महिने वापरलीच नाही. बहुदा डिसेंबर मध्ये विभा सोबत bike ने गेलेलो. त्यानंतर नाहीच. हेल्मेट घालून bike सुरु केली. व्यवस्थित सुरू झाली bike, " नीट पकडून बस हा ... " अमेय ओघात बोलून गेला. क्षणभर त्याला , त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आहे असेच वाटले. विभा तशीच त्याच्या खांद्याचा आधार घेऊन मागे बसायची. आठवण आली , कंठ किंचित दाटून आला. निघाला bike घेऊन.

वारा तर रोजच्या मानाने जास्तच होता . अमेयचा वेग कमी होता. रविवारची सकाळ झालेली. साधारण सकाळचे ९:३० वाजले होते. रस्तावर जास्त कोणी नव्हतेच, गाड्याही कमी होत्या. वादळाचे सर्वानी मनावर घेतलेले दिसते, अमेय स्वतःशीच हसला. बाजूलाच असलेली चहाची टपरी नजरेस पडली. विभाच्या हातचा चहा पिऊन जमाना झाला , असेच वाटले त्याला. स्वतःच्या हातची चहा पिऊन कंटाळा आला कि तो या टपरीवर यायचा. शिवाय आजची सकाळची चहा तशी आवडली नव्हती त्याला.  सकाळची स्पेशल कडक चहा आवडीची. थांबला. bike फुटपाथ शेजारी लावून हाताने खूण केली. त्याला बघून चहावाला समजून गेला. लागलीच तो तयारीला लागला. अमेय bike वर बसूनच चहाची वाट बघू लागला आणि आसपासचा अंदाज घेऊ लागला. पुढील १० मिनिटात चहावाला त्याची स्पेशल चहा घेऊन आला. छान सुगंध चहाचा. पहिल्या घोटातच फ्रेश वाटले त्याला. इतक्यात समोरून एक मुलगी घाईघाईत चालत गेली. " मयूरी !! " क्षणभर अमेय चमकला. त्या मुलीने चेहऱ्यावर रुमाल लावला होता. नंतर अमेय सावध झाला. " ती इथे कुठे येईल ... " ओळखीचे ड्रेसिंग असल्याने अमेय फसला.


मयूरी नाव तिचे. एका फोटोग्राफीच्या सेमिनार मध्ये भेट झालेली. नवीनच कॅमेरा घेतला होता म्हणून आलेली सेमिनारला. तिथे आलेल्या पैकी हि एकच अशी कि तिचा आणि फोटोग्राफीचा काहीही संबंध नव्हता. उगाचच यायचे म्हणून आलेली. शिवाय त्या सेमिनार मध्ये सांगितलेले तिच्या नक्की डोक्यावरून गेले असणार , हे अमेयला तेव्हाच कळले होते. त्यादिवशीच त्याचे पहिले बोलणे झालेले. जास्त काही बोलले नाहीत फक्त कॅमेरा कसा सेट करायचा , लेन्स कशी साफ करायची हेच. दुसऱ्या सेमिनारला सुद्धा आलेली. त्यादिवशी आलेली ती तिचा नवीन कॅमेरा देण्यासाठी. का , तर फोटो काढता येत नाहीत म्हणून. अमेयला हसू आलं. त्याला काय वाटलं कोण जाणे. तिला सेमिनार संपेपर्यत थांबायला सांगितले. संपले तसे अमेय तिच्या जवळ आला.

" उद्या मी एका ठिकाणी जाणार आहे फोटो क्लिक करायला . तुही येऊ शकतेस, कॅमेरा घेऊन. " अमेय मयूरीला बोलला.

" मला येत नाहीत फोटो काढता. म्हणून हे खेळणे तुम्हाला देयाला आली. मला कुठे घेऊन जाता. " मयूरी मुद्दाम बोलली.

" घाबरू नकोस... फी घेणार नाही. फ्री मध्ये शिकवतो तुला...असे समज .... तुझा कॅमेरा मला नको... तो तुझ्या आवडीने घेतलास ना ... तो तूच वापरावा असे मला वाटते... म्हणून बोललो मी. " अमेय तिला मदत करावी म्हणूनच बोलला. तिने हो - नाही करत मान्य केले.

अगदी ठरल्याप्रमाणे, दोघे गेले. काही फोटोग्राफीच्या ट्रिक शिकवून आणि स्वतःची फोटोग्राफी करून दोघे आपापल्या घरी गेले. असा त्यांच्या मैत्रीचा प्रवास सुरु झालेला. पुढे तिच्या प्रत्येक सेमिनार मध्ये ती असायचीच. कधी कधी अमेयला विचारून त्याच्या सोबत जायची फोटो काढायला. छान जमायचे दोघाचे. मैत्री वाढत गेली. काही दिवसांनी एकमेकांचे मोबाईल नंबर exchange झाले. मग कधीतरी फोनवर गप्पा होयाच्या. हळूहळू चॅटिंग सुरू झाले. अमेयच्या वागण्यातला बदल विभाला समजला होता. मोबाईलचे अजिबात व्यसन नसलेला , आता सतत मोबाईलवर वरचेवर बघत असायचा. आधी कॉल आला कि ५ ते १० मिनिटात ठेवणारा , आता अर्धा - पाऊण तास ... कधी एक तास बोलत असायचा. अमेय - विभाचे bike वरून फिरणेही कमी झालेलं. विभाची जागा मयूरीने कधी घेतली हे अमेयला कळलंच नाही. अमेयची घरी येण्याची वेळ बदलली आणि विभाला काळजी वाटू लागली. त्या दोघांना जेव्हा विभाने पहिल्यांदा बघितले होते तेव्हाच वाईट वाटलेले. तरी त्यांची फक्त मैत्री असावी असेच वाटले होते.  


" इतका कसा गुंतलो तिच्यात .... कळले नाही. " अमेय चहाचा आस्वाद घेत विचार करत होता. योगयोग बघा किती तो .... टपरीवर सुद्धा मराठी गाणी लावली होती त्याने. लता दीदींचे गाणे लागले होते .... 
" असा बेभान हा वारा 
कुठे ही नाव मी नेऊ?
नदीला पूर आलेला...
कशी येऊ? कशी येऊ? "

गाणे ऐकत त्याचे लक्ष वर गेले. वर एक मोठा काळा ढग दिसला त्याला. असं वातावरण त्याला आवडायचे. पाऊस नाही आवडायचा. त्यात फोटो काढणे आवडायचे. मयूरीने नंतर कुठे फोटोग्राफी केली एव्हडी. सोबत असायची पण बरेचदा कॅमेरा आणायची नाहीच. माझ्या सोबत वेळ घालवायचा असायचा तिला. त्या काळात एक वेगळीच धुंदी होती डोळ्यावर. सारखी मयूरीच दिसायची मला. त्या धुंदीत विभा पार झाकोळून गेलेली ना.

अमेयचा चहा संपला. वारा तर वाहतच होता. वर आलेला एकमेव काळा ढग, त्यातून सैरभैर उडणारे पक्षी... किंचित त्यामधून डोकावणारी सूर्य किरणे... अगदी छान वाटावे असे काहीसं .... अमेयचा हात कॅमेराकडे गेला. पण पुढच्याच क्षणाला त्याने विचार झटकून टाकला. विभा गेल्यापासुन कशातच रस वाटेना. त्यातून " डिवोर्स "...... मनाला पटत नव्हते तिला सोडणे, सोडायचे नव्हतेच तिला. अमेय सतत प्रयत्नशील असायचा. तिच्याशी बोलणे नसले तरी तिच्या आई-वडिलांची सतत मनधरणी सुरू असायची. तिची आई , तिला अमेयचे बोलणे पटले होते. मात्र वडील रागात होते. त्यांनीच तर नोटीस पाठवली होती. इतके दिवस विभाला का भेटलो नाही , हेच अमेयच्या मनात सारखे. म्हणून आज निघाला होता.

चहा संपला, अमेय bike सुरु करणार तोच त्याला दूरवर एक मुलगा गिटार घेऊन जाताना दिसला. " एवढ्या सकाळी हा वेडा गिटार घेऊन निघाला .... " अमेयला हसायला आलं. पण लगेच त्याच्या डोक्यात काही आलं. तशीच bike उलट दिशेने आपल्या घराकडे वळवली. घरी आला आणि काही शोधू लागला. पुढल्या १० मिनिटात त्याला हवी असलेली वस्तू मिळाली.


" गिटार " , विभाची गिटार .... विभाला आवडायचे गिटार वाजवायला. रिकामा वेळ मिळाला कि विभा गिटारच्या तारांवर सुरेख ताल धरायची. शिकलेली ती गिटार वाजवायला. हि गिटार तर अमेयने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दिलेली. कधी कधी अमेय थकून संध्याकाळी घरी आला कि विभाला खास आग्रह करून काही ऐकवायला सांगायचा आणि विभाही त्याचे मन कधी मोडत नसे. कान तृप्त होईस्तोवर अमेय डोळे मिटून ऐकत बसायचा.

आज त्याने ती गिटार बाहेर काढली. त्याच्या तारांवरून हात फिरवला. विभा किती प्रेमाने काळजी घ्यायची.मगाशी निघताना बंद करायचे विसरलेल्या खिडकीतून थंड हवा आली आणि तिने अमेयला पुन्हा जवळ बोलावले. विभा त्या खिडकीपाशी बसूनच गिटार वाजवत बसायची. वाऱ्याने उडणारे तिचे केस , तालात तल्लीन झालेली विभा आणि त्याच्या ओठांवर येणारे हलकेसे हसू .... ते बघून दिवसभराचा शरीराचा क्षीण कुठल्या कुठे पळून जायचा. अमेयला शहारून आले. निघावे जलद विभाकडे असे मनात म्हणत अमेयने खिडकी बंद केली , गिटार तशीच पाठीला लावली. बिल्डींग खाली आला आणि जलदच bike सुरु करून निघाला.


नजर भिरभिरतंच निघाला. इतक्यात दुकाने उघडतात ना.... मासळी बाजार सुद्धा इतका म्हणावा तसा भरलेला दिसत नाही. फुटपाथवर माणसांची ये-जा आणि रस्त्यावर गाड्याही कमीच. वारा जोराने वाहत होता. अमेयची bike एका सिंग्नलवर थांबली. तिथून जवळच एक मुलगी फुले घेऊन बसायची. रोजच छान छान फुले असायची तिच्याकडे. विभा तिच्याकडूनच रोज देवा साठी फुले घेयाची... मोगऱ्याचा गजरा तिला जास्तच आवडायचा. केसात माळायची नाही कधीच , तरीसुद्धा रोज २  गजरे घेयाची आणि देवघरातील गणपतीच्या पाया जवळ ठेवायची. अमेयला ती मुलगी दिसली.

लागलीच त्याने bike तिथे वळवली. विभा माहेरी गेल्या पासून तिच्याकडे येणे नाहीच. जरा अवघडल्या सारखा अमेय तिच्याकडे आला.

" दादा !! किती दिवसांनी आलात, ताई सुद्धा येतं नाहीत .... गावाला गेल्या आहेत का ... " तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देणे अमेयने टाळले.

" मोगरा ........ मोगऱ्याचे गजरे आहेत का ... तुझ्याकडे .... " चाचपत बोलला अमेय.

" आहेत ना दादा ... रोजच असतात.... आणि रोजच हे दोन गजरे लपवून ठेवते. ताईंना आवडतात ना , किती दिवस झाले ... रोज २ गजरे बाजूला काढून ठेवायची. तुम्ही कोणी आला नाहीत तर जाताना त्या समोरच्या वडाखाली कसलीशी एक तुटलेली मूर्ती आहे... तिच्या जवळ ठेवून निघून जायची, खरंच दादा .....  तुम्हाला बघून खूप बर वाटलं...  "

तिने अमेयला २ गजरे बांधून दिले. अमेयने त्याचा सुवास मनात भरून घेतला, अशी हि विभा .... नाते जोडून ठेवते ... तिच्यासाठी हि मुलगी गजरे ठेवून देयाची... जरासा भावुक वाटला अमेय. घेऊन जाऊ विभासाठी..... खिशातून १०० ची नोट काढली आणि तिला दिली , " दादा .... सुट्टे नाहीत आहेत माझ्याकडे..... आज वादळ येते आहे ना ... सकाळ पासून आलेच नाही कोणी फुले घेयाला... " अमेयने बळेच तिच्या हातात ती नोट कोंबली...

" राहू दे ... राहू दे .... तुझ्या ताईकडून गिफ्ट समज... " अमेयच्या त्या बोलण्यावर छान हसली ती.

" सांभाळून जा दादा... वादळ येते आहे... "

अमेय bike वर येऊन बसला. तिचे शेवटचे वाक्य त्याच्या कानात राहिले. " वादळ येते आहे ... " अमेयने गजरे सांभाळून बॅगमध्ये ठेवले. पाठीला लावलेली गिटार सरळ केली. " वादळ " या विषयाचे सकाळ पासून गुणगान ऐकत होता तो. हसायला आले त्याला. " वादळ .... हम्म ... आताच्या वादळात , वादळासारखे काही राहिलेच नाही... पचवता येतात हल्लीची वादळे... ज्याचे घर आधीच मोडकळीस आलेले आहे , त्याला कसली भीती या अश्या वादळांची " अमेयने पुन्हा एकवार आभाळात पाहिले. आता बऱ्यापैकी आभाळाने त्याचा निळा रंग सोडून काळा रंग आत्मसात केला होता. वाहणारा थंड वारा चेहऱ्यावर घेतला , डोक्यावर हेल्मेट घातले आणि bike सुरू करून निघाला विभाच्या घराकडे.


================= क्रमश : ==============    


Followers