All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 18 April 2020

" माझं - तुझं .... " ( season 1 - episode २ - मोबाईल )


" तू जाने ना.......तू ....... जाने ना......." निनाद तार स्वरात गाणं गात होता. हेमांगी जेवण बनवत होती. आज शनिवार ... weekly off , दोघांनाही... दुपारी जेवणासाठी इडलीचा बेत ठरवला होता हेमांगीने. निनादचा आवाज ऐकला आणि त्याला " नक्की काय झालं " हे बघायला किचन मधून बाहेर आली. कानात इअरफोन लावून निनाद गाणं गात होता. हेमांगी बाहेर आलेली बघून त्याने पट्कन कानातून इअरफोन काढले.

" बघ ... तुलाही माझा आवाज आवडला ना ... ",
"आवाज ऐकूनच बाहेर आली मी...... " ,
" शेवटी तुलाही मान्य करावं लागलं ... मी किती छान गातो ते .... " निनाद स्वतःची स्तुती करण्यात मग्न. हेमांगीने टाळ्या वाजवल्या.
" मी मोठा गायक होणार बघ.... तुला काय वाटते , मला आणखी तालीमीची गरज आहे ना ... मी काय बोलतो, गाण्याचा क्लासच लावतो उद्यापासून ....... उद्यापासून कशाला ... आताच जाऊन चौकशी करतो , जमल्यास admission पण घेऊन टाकतो. काय म्हणतेस ... " निनाद भुवया उडवत म्हणाला.
" काही नको .... " हेमांगी म्हणाली. " मला वाटलं , स्वतःच स्वतःचा गळा दाबतो आहेस कि काय ... म्हणून बघायला बाहेर आली. " हेमांगी हसतच किचनमध्ये गेली पुन्हा. निनाद तिच्या मागोमाग.

निनाद नाराज झालेला... " कसली आवड नाही तुला .... नवऱ्याचं कौतुक करावं जरा .... " हेमांगी इडली काढत होती.
" कौतुक तर आहे तुझं ..... पण गाणं .... नाही जमणार तुला ..... हे खरं .. " पुन्हा नाराज झाला निनाद .... मोबाईल किचन मधेच ठेवून बाहेर गेला. हेमांगीला गंमत वाटली. गॅसवर इडलीचे भांडे ठेवून बाहेर आली. रुसलेल्या नवऱ्याला हसवूया म्हणून बाहेर येतं होती. तर निनादचा मोबाईल वाजला. तो तर किचन मधेच ठेवून गेलेला. तिने बघितला. " निनाद ....निनाद ....तुला कॉल आला आहे कोणाचातरी... " तिने आतूनच आवाज दिला.

मोबाईल घेऊन हॉलमध्ये आली.  " नि .... ना .... द .. !! कोणाचा तरी कॉल आहे ... " निनाद हॉलमध्ये सोफ्यावर गाल फुगवून बसला होता. हेमांगीच्या हातात मोबाईल बघितला.
" तुला मी १०० वर्षपूर्वी सांगितलं आहे... माझ्या मोबाईलला हात लावू नकोस म्हणून..... " निनाद बोलला आणि हेमांगी जागच्या जागी थांबली.
" ok .... जिथे होता तिथे ठेवते .... येऊन घे " तुझा मोबाईल ".... " केस उडवत हेमांगी किचन मध्ये निघून गेली.
" थांब....थांब....हेमा ... अगं मस्करी केली ... हे बघ हसते आहे मी .... हि...हि...हि...!! सहज बोललो , दे मोबाईल... "
निनाद तिच्या मागोमाग ... हेमांगी कसली ऐकते त्याचं.. किचनमध्ये इथे होता तिथेच ठेवून दिला तिने. निनाद मोबाईलपर्यंत पोहोचला तोवर कॉल बंद झालेला. निनादने बघितला.
" बॉसचा कॉल आलेला... बापरे !!! ..... हेमा ...दिला असता वेळेत तर बोललो असतो ना ... काय तू .... " निनाद नकारार्थी मान हलवत म्हणाला. हेमांगीने कमरेवर हात ठेवले.
" बघ ... माझ्याकडे वेळ नाही ... जेवण करायचे आहे... एकदाच सांगते, .... इडली सोबत चटणी पाहिजे ना ... मिक्सरमध्ये वाटायची आहे... जास्त बोललास ना अजून त्या चटणी सोबतच तुझा मोबाईल मिक्सर मध्ये टाकीन.... चालेल तर सांग... " निनाद मोबाईल घेऊन बाहेर पळाला.

हेमांगीने तिचे काम संपवले आणि निनाद कुठे गेला हे बघायला बाहेर हॉलमध्ये आली. नव्हता तिथे ... रागात बोलली त्याला ... नाराज झाला असेल ...... गेला कुठे हा ... हेमांगी विचार करत बेडरूममध्ये गेली. बघते तर बेडरूमच्या गॅलरीत मान खाली घालून बसलेला. खरच नाराज झाला हा ... हेमांगी जवळ जाऊन बघते तर पुन्हा कानात इअरफोन लावून बसलेला. हेमांगीने बाहेर काढले ते...
" मला वाटलं नाराज झाला आहेस ... म्हणून बसला असा तू ... हातात पुन्हा खेळणं घेऊन बसला आहेस .. " ,
" हि... हि... हि... " , निनाद खोटे खोटे हसला ...
" सारखं सारखं काय मोबाईल... सकाळी उठल्या पासून ... रात्री बेडवर सुद्धा .... तेच "  ,
" cool down !! cool down !!.... ठेवतो बाजूला मोबाईल ... " निनादने लगेच मोबाईल खिशात टाकला.
" खिशात नाही ..... " हेमांगी ओरडली.
" मग हातात ठेवतो ... " ,
" तरी पण तेच .. " आता निनाद घाबरला.
" सॉरी सॉरी ... हा बघ ... ठेवला बाजूला ... " तिथे शेजारीच असलेल्या टेबलावर ठेवून दिला.
" आता कस ... शाब्बास !!! good boy ..... " हेमांगीने त्याच्या पाठीवर शाबासकी दिली. " इडली तयार आहे.... अरु आणि संदीप कडे घेऊन जा जरा ... " निनादला बोलली पण निनाद गाल फुगवून उभा. तिला हसू आलं.
" काय झालं रे ... " ,
" दिसत नाही का ... राग आला आहे मला.. हे बघ .... रागाने गाल फुगले आहेत माझे.. ",
" हो का .... बर ... मग गाल फुगवून बोलता येते का माणसाला..... " हेमांगी स्वतःच्या बोलण्यावर हसू लागली.
" शी यार ..... रागावू पण देत नाहीस .. जरा तरी घाबर मला .... मी किती घाबरतो तुला .... " ,
" शाब्बास पोरा .... असाच घाबरत रहा .... " हेमांगीने पुन्हा पाठीवर थाप मारली.
" जाऊन ये आधी .... इडली गरम आहे , लवकर देऊन ये ... तू आलास कि घाबरते हा तुला ..... " तिने हातात २ डबे ठेवले निनादच्या.
" कमाल आहे तुझी .... " म्हणत संदीपकडे गेला. एका हाताने बेल वाजवली. संदीपाने उघडला दरवाजा.
" Hi वहिनी ... कमाल आहे का ... " निनाद बोलला. संदिपा confused... " सॉरी सॉरी ... संदीप आहे का .... " ,
" असं बोला ना भावोजी .... संदीप आताच बाहेर गेला आहे ... पाय मोकळे करायला ... " ,
" वा !! तुम्हाला पण सुट्टी असते शनिवार - रविवार ... पण बिजनेस आणि सुट्टी ... " ,
" अहो भावोजी... आम्हीच ठरवलं आहे अशी सुट्टी घेण्याचे.. रविवारी फक्त सुट्टी असते सर्वांना... आज सुरू असते ऑफिस.. बाकीचे आहेत ना काम करणारे ... ते सांभाळतात एक दिवस... " ,
" छान छान ... पण मला भावोजी बोलू नका ... खूप मोठा असल्यासारखे वाटते... नावाने बोलू शकता.... " संदिपाने मान डोलावली.
" एकेरी बोलीन हा .... " ,
" thank you .... इडली दिली आहे हेमाने ... संदीपला पण द्या ... येतो मी... अरुच्या घरीही असतील ना सर्व आज .... ",
" हो हो ... सर्वच भेटतील तुला .... " निनाद अरुकडे गेला.

अरुनेच दरवाजा उघडला. " Hi डुग्गु .... " ,
" Hi अरु .... आज चक्क घरात तू .... आईने बाहेर काढलं नाही तुला ... " निनाद तिची मस्करी करत म्हणाला.
" हो .... असणारच ना मी घरी....हे नवे घर आहे .... जुने घर सोडून आलो ना आम्ही... तसं तर माझ्या पप्पानी सिगरेट तर कधीच सोडून दिली. तुला सांगते ना डुग्गु ... सिगरेट मुळे खूप धूर होतो... मला नाही आवडत धूर .. तो ना ... आमच्या जुन्या सोसायटी मध्ये कधी कधी धुरवाला यायचा.. ते मच्छर असतात ना त्यांना पळवण्यासाठी ..... धूर आला कि मीही पळायचे.... एकदा तर माझा दुसरा नंबर आलेला पळण्याच्या शर्यतीत .... " अरु बोलतच होती आणखी पूढे , निनादने एक इडली पट्कन तिच्या तोंडात कोंबली. " आई - पपांनाही दे ... एकटी नको खाऊस.... " निनाद सटकला तिथून.

निनाद आला घरी पण मोबाईल जवळ नाही हे लक्षात आलं. घाबरला. " हेमा !! हेमा !! "  ओरडतच तो आत आला. हेमा किचन मधून जेवण बाहेर घेऊन येत होती.
" एवढी भूक लागली तुला ..... वाढतेच आहे ... तुला आवडते म्हणून इडली केली मी... " ,
" अगं तस नाही... " ,
" इडली नको ..... कमाल करतोस हा तू ... सकाळीच सांगायचे होते मग ... केली नसती इडली .... " ,
" अगं आई ..... ऐकून तर घे ... एकतर अरु पासून कशी सुटका केली ते मलाच माहित ... निदान तू तरी थांब... बोलू देशील का मला.... " ,
" म्हणजे तुला काय म्हणायचे आहे .... मी तुला बोलू देत नाही ... हे साफ चुकीचे आहे ... " निनाद आता खरच वैतागला.

" एकच सांग ... माझ्या डोक्यावरचे केस तू उपटतेस कि मी स्वतः उपटू ... " निनाद म्हणाला. हेमांगी हसत होती. मुद्दाम करत होती ती.
" अगं , माझा मोबाईल कुठे आहे ते विचारत होतो मी.... ",
" आधी जेवून घे ... मग मोबाईल ..... " .
" दे ना गं .. प्लिज .... कोणाचा तरी कॉल आला असेल... दे ना ... पाया पडतो तुझ्या... प्लिज.....प्लिज.....प्लिज.....!!  " ,
" आधी पाया पड .. मग देते... " शेवटी निनादला पाया पडायला लागलेच.
" दे आता .. " ,
" माझाकडे नाही मोबाईल .... तू विसरलास... तू मघाशी बेडरूम मध्ये ठेवला तिथेच आहे. " हेमांगी बोलली. निनाद आत जाता जाता थांबला. हेमांगीला जीभ काढून दाखवली आणि बेडरूममध्ये गेला.

हेमांगीने वाढायला घेतलं. निनाद मोबाईल घेऊन आला.
" वाईट ...... अगदी वाईट असतात काही माणसं ... " निनादने हेमांगीला टोमणा मारला.
"असू दे वाईट .... तूच नाही का सांगितलं मला ... १०० वर्षांपूवी , मोबाईलला हात लावू नकोस म्हणून.. " हेमांगीने उलट टोमणा मारला.
" पाप लागते असे ... समजलं ना ... कोणाच्या भावनांशी खेळायचे का ... " ,
" हो का ... मग काय तुझ्यासारखं सारखे सारखे मोबाईल वर खेळायचे असतं का ..." इडली खात हेमांगी म्हणाली.
" एक तर game आहे ... त्यात पण ५ life संपल्या कि खेळू शकत नाही.... म्हणे सारखा सारखा game ... " ,
" मोबाईलला तर चिकटलेला असतोस... दिवस रात्र .... आणि किती जुना आहे तो ... इतके नवीन नवीन फोन आले आहेत... घे ना नवीन .... एवढ्या मोठ्या पोस्ट वर आहेस ना ... तुला तुझे office colleagues काही बोलत नाहीत .. " ,
" असू दे ..... जुना असला तरी माझा पहिला मोबाईल आहे हा ... एक मिनिट ..... तरीच ... ऑफिसमधला एक जण त्यादिवशी बोलला...ऑफिसची इमारत जुनी आहे कि माझा मोबाईल... थांब.... त्याला बघतोच सोमवारी.... " निनाद हातातली इडली चुरगळत म्हणाला.
" तरी बरा चालतो.... तुझा जुना मोबाईल... " हेमांगीने पुन्हा टोमणा मारला.
" असू दे हा ... जुना ...... old is gold .... ",
" बघत काय असतोस इतका त्यात ... " ,
" मी जास्त काही ठेवतच नाही यात काही ... एक game .... you tube , आणि whatsapp .....  मेमरी कमी आहे ना म्हणून... you tube वरच गाणी ऐकतो.... एक मिनिट... तू संशय घेते आहेस का माझ्यावर ..... तुला काय वाटते ... सारखा मोबाईल वापरतो म्हणजे माझं काही लफडं सुरु आहे ... असच वाटते ना ... बोल ... " हेमांगी हसली त्यावर...
"चल ... झालं ना खाऊन ... मी आवरते .... " हेमांगी भांडी आवरू लागली.
" ओ हेमा मॅडम ... उत्तर दिले नाही तुम्ही.... " ,
" तुझे काही बाहेर सुरू असेल ... असे वाटणे काय .... स्वप्नांत सुद्धा विचार येणार नाही कधी... " हेमांगी भांडी किचन मध्ये घेऊन गेली.


दारावरची बेल वाजली. निनादने पट्कन हात धुतले आणि दरवाजा उघडायला गेला. दारात अरुचे वडील आणि संदीप होता.
" काय करतो आहेस प्रीतम... " संदीपने निनादला विचारलं.
" निनाद ... निनाद .. नाव आहे माझं.... " ,
" तेच ते ... ये बाहेर गप्पा मारायला....काही करतो आहेस का  " ,
" नाही तस काही नाही ... हेमाला जरा मदत करतो आहे आवरायला. " निनाद बोलत होता तर हेमांगी बाहेर आली.
" Hi वहिनी.... इडली कमाल झालेली... " अरुचे वडील बोलले.
" thank you !! thank you !!..... दारात का उभे तुम्ही..... आत या ना ... " ,
" नको नको .... आम्ही याला घेऊन जायला आलो आहोत.. याला आवडते ना बोलायला .... गप्पा मारायला घेऊन जातो.... " ,
" जरूर घेऊन जा ... सारखा मोबाईल - मोबाईल .... निनाद जा तू ... मी आवरते..... " ,
" आणि हो .. वहिनी... आज रात्रीचे जेवण आमच्याकडे आहे हा .... तेच सांगायला आलो होतो. " , अरुचे वडील म्हणाले.
" कशाला उगाचच त्रास तुम्हाला ... " हेमांगीला बोलूच दिलं नाही पुढे.
" आग्रह करत नाही... तुमच्या मोठ्या बहिणीची ऑर्डर आहे असे समजा ... " अरुचे वडील हसत म्हणाले.

" जाऊ गं हेमा .... एवढा आग्रह करतात तर ..... नको करू रात्रीच जेवण.... " निनाद म्हणाला.
" चल मग ... येतो आहेस ना ... छान पैकी गप्पा मारू... " निनाद या दोघांसोबत निघून गेला. मोबाईल मात्र घरातच ठेवून गेला. हेमांगी तिच्या कामात गुंतून गेली.

तब्बल ३ तासांनी निनाद घरी आला. आला तोच मोबाईल , मोबाईल करत ...
" हेमा कुठे आहे माझा मोबाईल ... दे बरं ... " ,
" मी नाही घेतला... " हेमांगी म्हणाली. निनाद तिच्या पाया पडला.
" दे आता ... पाया पण पडलो. " हेमांगी हसू लागली.
" मी खरच सांगते आहे... मी नाही घेतला मोबाईल ... " ,
" दे ना यार ... खरं बोलते आहेस का ... " निनादच्या या बोलण्यावर तिने कमरेवर हात ठेवले.
" सॉरी सॉरी ... बघतो मीच कुठे आहे मोबाईल ते .... इथेच असेल .... " निनाद शोधाशोध करू लागला.
" थांब ... मी कॉल लावून बघते... रिंग तर वाजेल ना .... " हेमांगीने कॉल लावला तर स्विच ऑफ....
" बंद आहे तुझा मोबाईल... कुठे ठेवला होतास नक्की... ",
" नाही आठवत मला .... आपल्या घरात कोणी आलेलं का.... " ,
" नाही ... कोण कसं येणार ... दरवाजा तर बंद असतो आपला.... तू ना ... बाहेर विसरून आला असणार ... ",
" हो गं .... मी जाऊन येतो .... " निनाद धावतच बाहेर गेला.

संध्याकाळ झाली. काळोख झाला तेव्हा निनाद घरी आला. " गेला माझा मोबाईल .... आता काय करू मी.. "  रडक्या आवाजात निनाद म्हणाला. हेमांगीने त्याचा आवाज ऐकला. ती कोणतेतरी पुस्तक वाचत होती.
" मोबाईल शिवाय बाकी खूप गोष्टी आहेत..... पुस्तक वाच... TV बघ. " हेमांगी पुस्तक वाचतच म्हणाली. पुन्हा गाल फुगवून बसला निनाद.
" कोणाची तरी वाईट नजर लागली.... माझा बिचारा मोबाईल.... " निनाद पट्कन बोलला.
" पुस्तक फेकून मारिन हा ... समजलं ना ... आणि हे काय रडका चेहरा ... असं येणार आहेस जेवायला... " ,
" न...... को...... आ...... हे......  म...... ला...... जे...... वा...... य...... ला.... " निनाद हळूच पुटपुटला.
" मी काही केले नाही आहे... मी बाबा जाणार आहे जेवायला.... कोणाला माझ्या सोबत यायचे असेल तर येऊ शकतात... " पुस्तक बंद करून हेमांगी बेडरूममध्ये गेली.
" माझा मोबाईल ..... " निनाद रडक्या आवाजात सोफ्यावर हात पसरून झोपला.

काही वेळाने हे दोघे अरुकडे जेवायला आले. निनाद तसाच पडक्या चेहऱ्याने आलेला. " welcome !! या या .... तुमचीच वाट बघत होतो सर्व .... " अरुचे वडील होते स्वागत करायला. निनाद खोटे खोटे हसला.
" सर्व ... ?? म्हणजे .... " हेमांगीने विचारलं.
" संदीप आणि संदिपा सुद्धा आहेत... त्यांनाही बोलवतो आम्ही ..... एकत्र जेवलो कि जिव्हाळा वाढतो ना .... तसंही ते आणि आम्ही काय वेगळे आहोत का .... फॅमिली आहे तीही आमची... आणि तुम्हीही फॅमिली मध्ये आहात आता." अरुचे वडील बोलले ते ऐकून हेमांगीचे डोळे चमकले. निनाद आणि ते एकमेकांकडे बघू लागले. छान smile आली तिच्या चेहऱ्यावर. संदिपा आली किचन मधून बाहेर आली.
" हेमा ... दारातच उभी राहणार का ... आत ये ... निनाद .. तुला काय वेगळे सांगावे का ... चल .... " हेमांगी गेली किचन मध्ये. निनाद तसा नाराज होता, मोबाईलचा विचार सारखा... उगाचच बोलत बसला होता या दोघांसोबत. अरु मात्र गॅलरीत मोबाईलवर बोलत होती. निनादचे लक्ष राहून राहून तिच्याकडेच जात होते. जुने दिवस आठवले त्याला... बसल्या बसल्या स्वप्नांत गेला. त्याला दिसू लागलं, मोबाईल वर गाणी ऐकत आहे, game ची एक level पूर्ण केल्यावर नाचत होता slow motion मध्ये... कानात इअरफोन लावून मोबाईल सोबत डान्स करत होता... काय ते दिवस होते ....
" मित्रा .... अरे काय बोलतो आहे मी .... लक्ष आहे कि नाही.... " संदीपने त्याला त्या slow motion स्वप्नातून बाहेर काढलं.
" चला जेवायला.... " हेमांगीने सर्वांना आवाज दिला. सर्वांनी हात धुतले आणि जेवणाच्या टेबलावर जमले. छान बेत जमवला होता. निनादचा मूड नव्हता. त्याने सर्व जेवणाकडे एकदा नजर टाकली. डोळे विस्फारले त्याचे...... मोबाईलची बिर्याणी.... हा काय प्रकार आहे. त्याने बाजूच्या भांड्यात पाहिलं. भरलेला मोबाईल... दुसरीकडे मोबाईलचा ज्युस... मोबाईलचे सलाड.... मोबाईलची कढी ... निनाद डोळे चोळू लागला.
" काय झालं संदीप... " संदीपने निनादला विचारलं.
" त्याच नाव निनाद आहे ... संदीप ... तुझे नाव आहे रे ... " अरुच्या वडिलांनी संदीपला सांगितलं.
" हा तेच ते ... " सर्वच निनाद कडे पाहू लागले. " मी जरा तोंड धुवून येतो ... " निनाद वॉश बेसिन कडे जाऊन तोंड धुवून आला. जागेवर बसला. पुन्हा त्याने सर्व पदार्थाकडे नजर टाकली. आता सर्व नॉर्मल दिसत होते. " करा सर्वांनी जेवायला सुरुवात.. " निनादच बोलला.

जेवत तर होता. तरी त्याचं फारसे लक्ष नव्हते त्यात. संदिपाला कळलं ते.
" काय झालं निनाद .. जेवणात लक्ष नाही... " ,
" काही नाही ... असंच .. " निनाद खोटं खोटं हसला.
" मी सांगतो ... " संदीप म्हणाला. " त्याचा मोबाईल हरवला आहे. " हेमांगीने निनाद कडे पाहिलं.
" तो पण माझ्या सोबत मोबाईल शोधत होता. " निनाद हळू आवाजात म्हणाला.
" हरवला म्हणजे .... " अरुच्या आईने विचारलं.
" हरवला म्हणजे हरवला ... दुसरे कसे सांगणार ... " निनाद म्हणाला.
" जुनाच होता ... हरवला ते बरंच झाल. " हेमांगी भरली वांगी खात म्हणाली.
" मोबाईल हरवला म्हणजे कमालच झाली. " अरुचे वडील म्हणाले.
" होय .... आता काय करणार... " निनाद म्हणाला.
" हो ..... कोण काय करणार ... तरी मोबाईल हरवला म्हणजे.... " अरुचे वडील म्हणाले.
" जाऊ द्या ओ ... फारच दुःख वाटते मला ... " ,
" दुःख तर होणारच ना ... मोबाईल हरवला म्हणजे.... " अरुचे वडील पुन्हा बोलले.
" पुरे ... " अरुची आई बोलली.

" तसा हि जुना होता ... actually , मोबाईल जास्त वापरणे म्हणजे वाईट सवय .... हो ना अरु .. " हेमांगीने चुकून शांतपणे जेवणाऱ्या अरुचे नाव घेतलं.
" हो तर .... मोबाईल जास्त वापरणे म्हणजे वाईट सवयच... , मला बघ डुग्गु... एकही वाईट सवय नाही.. सर्वच चांगल्या सवयी आहेत. आईला कामात मदत करते, कॉलेजचा अभ्यास करते, देवळात जाते. देवळाच्या शेजारी एक गाय असते, तिला खाऊ घालते. गाय चांगली असते. ती दूध देते. दूध मला आवडते म्हणून गाय मला आवडते. तशी म्हैस पण दूध देते. तो आमच्या कॉलेज मध्ये एक मुलगा आहे ना .. निशांत ...तो त्याच्या आईला म्हैस म्हणतो ... मारकुटी म्हैस .... " अरु बोलणे पुढे वाढवत होती तर अरुची आई मधेच बोलली.
" अरु बाळा .... जरा पाणी घेऊन येतेस का ... मी आणले आहे ते कमी वाटते मला... जरा घेऊन येतेस का "  अरु लगेच गेली.

" निनाद भावोजी .... नका टेन्शन घेऊ, मिळेल मोबाईल... घरात असेल तर .... नाहीतर नवीन घ्या... एका वस्तूसाठी आताची वेळ नका वाया घालवू...... " अरुची आई म्हणाली , ते निनादला थोडेतरी पटलं. नंतर छान पंगत जमली. छान झालं जेवण. हेमांगीने आवरायला मदत केली. गप्पा मारत मारत रात्रीचे १०:३० कधी वाजले कळलंच नाही. सर्व कामे झाली तसं निनाद-हेमांगी घरी आले. घरात आल्या आल्या दोघे झोपायला गेले.
" आठवण येते गं ... थोडीथोडी ... " निनाद हळूच म्हणाला.
" आईची का ... " हेमांगी केस बांधत होती.
" मोबाईलची ... " ,
" निनाद .... पुरे आता... उद्या नवीन घे , गेला ना तो जुना .... उद्या घरची साफसफाई करायची आहे... आहे ना लक्षात ... " हेमांगी बोलत होती.
" तेरे बिना भी क्या जीना.... " निनाद रडक्या आवाजात गाणं गात होता. हेमांगीने त्याला उशी फेकून मारली.
" चुपचाप झोप आता... नाटकं नकोत ... उद्या लवकर उठून सफाई करायची आहे... फिरून आल्यापासून जरा साफसफाई केली नाही आपण , चल झोप .. " हेमांगीने त्याला दम देऊन झोपवलं.
सकाळी ८ चा अलार्म लावला होता. हेमांगी जागी झाली. हेमांगीने बघितलं , निनाद नव्हता शेजारी. गेला कुठे. डोळे चोळत ती त्याला बघू लागली. बघते तर गॅलरीत बसलेला. हेमांगी जवळ आली.
" काय रे .... किती वाजता उठलास .... कि झोपलाच नाहीस .... " निनादच चेहरा प्रसन्न वाटत होता.
" झोपलो होतो कि ... किती दिवसानी अशी पूर्ण झोप झाली... " ,
" कसं काय ... रोज तर झोपतोस ना ... " ,
" रोज उशिरा झोपतो ... १२: ३० तरी होतात ..... ते you tube वर गाणी ऐकत असतो किंवा विडिओ बघत असतो. मित्रांसोबत whatsapp वर chatting ..... उशिराने झोप आली कि मोबाईल बाजूला ठेवतो. काल यातलं काहीच झालं नाही... ११ वाजताच झोपलो, रात्रीच जेवण खूप छान झालं आणि मोबाईलही नव्हता. पट्कन झोपलो. आताच म्हणजे ७:३० ला जाग आली. आपोआप .... छानच झोप मिळाली. " निनाद अंघोळीशिवाय प्रसन्न वाटत होता.
" चला देव पावला. काहीतरी डोक्यात गेलं .... " निनाद छान हसला. " कामाला लागू या ... दुपारच्या आत पूर्ण करू ... मग जेवणाचे बघता येईल. " हेमांगीचा प्लॅन पटला त्याला. दोघे लगेचच साफसफाईला लागले. आधी दोन्ही बेडरूम साफ करून झाले. त्यानंतर बाथरूम-टॉयलेट ... सर्वात शेवटी हॉलकडे आले. दोघेही दमलेले.

निनाद त्या सोफ्यावर झोपला. " निनाद यार !! एकतर घामेजलेला आहेस... सोफा खराब करशील ना ... " हेमांगी ओरडली त्याला.
" दमला गं तुझा नवरा ... सुपरमॅन नाही मी. तुझ्याकडे इतकी ताकद कुठून येते... कळत नाही. जरा विश्रांती घेतो मी. " ,
" नको ना निनाद ... घड्याळ बघ.. ११:३० वाजले... मला जेवणही बनवायचे आहे... उठ ना रे ... तेवढा सोफाच राहिला आहे फक्त... त्यावरच झोपला आहेस .. चल .. उठ .... दोघे मिळून साफ करू... " निनाद उठला शेवटी.
" ती सोफ्यावरची गादी... धूळ असेल त्यात.. बाजूला काढून दे ... मी झाडते. " निनादने ती गादी उचलली. आणि निनादचे लक्ष लगेचच त्या गादी खाली असलेल्या मोबाईल कडे गेलं.


" मिळाला !!! " निनाद केव्हढ्याने ओरडला. हातातली गादी त्याने खाली टाकली. हेमांगीने कपाळाला हात लावला. निनादने मोबाईल उचलून हातात घेतला. त्याचा किती वेळा kiss घेतला.
" शी ... निनाद ... !! मूर्खां .... धूळ - घाण लागली असेल त्याला.. त्याचा काय kiss घेतोस..... घाणेरडा कुठला .... ठेव तो आधी बाजूला.. " हेमांगी बोलली पण निनाद आनंदाने उड्या मारत होता.

" तरीच ... याची बॅटरी संपली, म्हणून कॉल लागत नव्हता. हा .... आठवलं.. मी काल मोबाईल सोफ्यावर ठेवून बाहेर गेलो होतो... या गादीच्या फटीतून खाली गेला असणार... thank you देवा ... माझा मोबाईल दिलास मला... हेमा ... चार्जिंग ला लावतो हा मोबाईल... " निनाद गेला बेडरुम मध्ये.
" करायचं का काम साहेब .... कि तुला game खेळायचा आहे... " हेमांगीने निनादला आल्या आल्या विचारलं.
" सवाल काय ... चार्जिंग झालं कि लगेच game सुरु .. अजून काय पाहिजे life मध्ये... " निनादच्या बोलण्यावर हेमांगीचा चेहरा बदलला.
" मस्करी केली गं पोरी ... चल काम संपवू ... " दोघांनी लगेच काम संपवले.

निनाद फ्रेश होऊन त्याच सोफ्यावर बसलेला. हेमांगी सुद्धा तयार झालेली. " साधंसं बनवते जेवायला... दुपारचे १२ वाजून गेले ना.. नाहीतर वेळ होईल जेवायला.... " हेमांगी त्याला सांगून किचन मध्ये जातच होती तर निनादने तिचा हात पकडून शेजारी बसवलं.
" नको काळजी करुस .... बाहेरून मागवू ... दमली असशील ना ... super woman असली तरी थकायला होते ना ... बाहेरून मागवतो मी ... माझ्या मोबाईल वरून .... " निनाद खुश होता.
" व्वा !! आज भलताच खुश आहेस... हा .... मोबाईल मिळाला म्हणून ना... असणारच खुश .... " ,
" मोबाईल मिळाला म्हणून नाही ... काही नव्याने कळलं ... अरुची आई बोलली ते , एखाद्या वस्तूत इतके गुंतणे वाईटच ... काल संध्याकाळ पासून मोबाईल हरवला.. त्या कालावधीत ... अरुचे पप्पा - संदीप ... यांच्या सोबत किती गप्पा मारल्या मी. नंतर अरुकडे जेवलो... तिथेही छान वेळ गेला. थोडावेळ आठवण आली मोबाईलची , तरी तो नव्हता तर जास्त काही फरक पडला नाही. आज बघ... झोप पूर्ण झाली. नंतर इतके काम केले. नाहीतर सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसतो मी.... कोणाचे msg आले का बघण्यासाठी.. आताही मोबाईल पूर्ण charge झाला आहे तरी अजिबात वाटत नाही तो हातात घ्यावा.. amazing feeling आहे हि ... त्यासाठी खुश आहे... " ,
" सुधारला नवरा माझा .... नजर काढू का ... नाहीतर तुझ्या मोबाईलचीच नजर लागेल तुला .. "
हेमांगीच्या बोलण्यावर हसला निनाद. मोबाईल बेडरुममधेच ठेवून हे दोघे एकमेकांसोबत खरोखरची " chatting " करू लागले.


======================== The end ================




Wednesday 15 April 2020

" माझं - तुझं .... " ( season 1 - episode 1 - नवे शेजारी )


हि गोष्ट आहे निनाद - हेमांगी या जोडप्याची. त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची.... हलकं - फुलकं काही ( Note :- या कथे सारख्या अनेक कथा किंवा web series सध्या इंटरनेट वर उपलब्ध आहेत. तसंच काही लिहायचा एक छोटा प्रयन्त... season 1 यासाठीच कि , हे आवडलं तर पुढेही लिहू शकेन ... कथा आणि पात्र काल्पनिक आहेत आणि संबंध आढळलाच तर निव्वळ योगायोग समजावा ]

" निनाद ........ !!! " हेमांगीने जोराने हाक मारली.
" काय गं .... काय झालं .... " लिफ्टच्या बाहेर येत निनादने उत्तर दिलं.
" चावी कुठे आहे... " ,
" कसली चावी... " निनादच्या या उलट प्रश्नावर हेमांगीने कमरेवर हात ठेवले. आधीच प्रवास करून आलेले, त्यात फ्लॅटच्या दोन्ही चाव्या निनादने स्वतःकडे ठेवून घेतल्या होत्या.
" आपल्या गाडीची चावी हवी आहे मला.... देतोस " ,
" गाडीची चावी आता कशाला... गाडी काय वर घेऊन येतेस कि काय... मी बरोबर पार्क केली आहे हा गाडी... excuse me !!! तुला काय म्हणायचे आहे .... मला गाडी पार्क करता येते .... बरं का ... दे टाळी !!! "  निनादने टाळी साठी हात पुढे केला. हेमांगीचा पारा अजून चढला.
" अरे बाळा !!! आपल्या फ्लॅटच्या बाहेर उभी आहे मी .... तर त्याचीच चावी मागणार ना... " ,
" सरळ बोलायचे ना मग.... गाडीची चावी कशाला मागायची... " हेमांगी आता फक्त त्याचे डोक्यावरचे केस उपटायची बाकी होती. निनादला कळलं कि pressure cooker ची शिट्टी कधीही वाजू शकते. त्याने गपगुमान फ्लॅटची चावी हेमांगीच्या हातात दिली.

" ओ .... शूक्..... शूक्..... कोण पाहिजे तुम्हाला... " हेमांगी चावी लावत होती तर मागून आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिलं.
" दिवसा ढवळ्या चोरी करत आहात. तेही माझ्या समोर... अजिबात चोरी होऊ देणार नाही मी... चोरी करणे हा एक अक्ष्यम अपराध आहे. " त्याने तर सुरूच केले बोलणे. या दोघांना काही कळेना. टी-शर्ट.... हाफ चड्डी.... पायात चपला .... असे ते ध्यान.
" तुम्हाला काही गैरसमज होतो आहे... " निनाद बोलत होता तर त्याने मधेच थांबवले.
" कसला गैरसमज ... साक्षात माझ्या समोर घरफोडी करत आहात..... मी हे कदापि होऊ देणार नाही... " आता त्याचे बोलणे हेमांगीच्या डोक्यात गेले. आधीच वैतागलेली. त्यात हा कोण .... कोण जाणे...
" ओ मिस्टर..... हि चावी आणि हे कुलूप .... हे name plate  वर नावं आहे ना ... ते आमच्या दोघांचे आहे. आम्ही राहतो इथे... " ,
" हे कोण बोललं तुम्हाला कि तुम्ही इथे राहता ते " , " काय बोलतो आहे हा माणूस ... anyways ... " हेमांगी काहीतरी बडबडली आणि तिने दरवाजा उघडला. सोबत असलेल्या बॅगामधल्या काही ती आत घेऊन गेली.


" खरच ओ ... तुमचे घर आहे... " तो म्हणाला.
" आता हे कसं कळलं तुम्हाला... " ,
" तुमचा फोटो दिसला कि भिंतीवर ..... " दरवाजाच्या समोर असलेल्या भिंतीवर निनाद-हेमांगीचा मोठा फोटो होता.
" नजर छान आहे तुमची. एवढ्या दूरचे दिसलं तुम्हाला .... " निनादने स्तुती केली.
" मग काय .... असणारच .... उडत्या पक्षाचे मोजतो मी ..... पंख... " ,
" व्वा !!  व्वा !! .... " म्हणत निनादने हात मिळवला.
" तुम्हाला कधी पाहिलं नाही इथे... नवीन आहात का .... " त्याने विचारलं.
" सहा महिने झाले .... हा फ्लॅट घेऊन.... " निनाद बोलला खरा पण विचार करू लागला. " ओ .... नवीन आहात का .... हा प्रश्न मी विचारला पाहिजे तुम्हाला... तुम्ही नवीन आहात... " ,
" हो मग .... मी नवीनच आहे. दोनच दिवस झाले. आम्हीही नवीन फ्लॅट घेतला. तुम्ही आधी दिसला नाहीत कधी.... म्हणून वाटलं कि चोरी करत आहात. माझं नावं संदीप... " ,
" आम्ही ४ दिवस फिरायला गेलो होतो.... by the way .... माझं नाव निनाद ... "  पुन्हा दोघांची "हात मिळवणी " झाली.
" मग .... समीर राव ... कुठे गेला होता नवरा - बायको फिरायला... " संदीपने विचारलं...
" समीर ..... समीर कोण ... " निनादने विचारलं. ....
" तुम्ही... तुमचे नाव विसरलात तुम्ही... " ,
" अहो ... माझं नाव निनाद ... " ,
" तेच ते ओ ... " ,
" बरं जाऊ दे ... आम्ही ना ... " निनाद सांगत होता तेव्हाच हेमांगीने दारातून आवाज दिला.
" निनाद ... आपण कुठे कुठे गेलो होतो ते सांग... फोटो काढले ना आपण ... तेही दाखव.... कोणत्या विमानाने गेलो , कुठल्या हॉटेल मध्ये राहिलो होतो .. तेही सांग .... " , हेमांगी रागात बोलत होती.
" हा हा .... सर्व सांग मला महेश ... मला असे अनुभव ऐकायला खूप आवडतात ... " संदीप निनादला म्हणाला...
" महेश नाही ओ ... निनाद ... " ,
" तेच ते ... तुम्ही सांगा " ,
" चालेल... तुम्हीही फिरता वाटते... छान .... सांगतो हा मी सर्व डिटेल मध्ये... सर्वात आधी ना आम्ही.... " निनाद सांगत होता तर हेमांगी पुन्हा मध्ये बोलली.
" अरे बाळा !! उभा राहून कशाला गप्पा मारता दोघे. पाय दुखले माझे... खाली बसा ... नाहीतर खुर्ची देऊ का आणून... " ,
" चालेल वहिनी... नाहीतर राहू दे .... आम्ही इथेच बसतो दोघे... खाली.... " संदीप म्हणाला पण निनादने तिच्याकडे पाहिलं. पुन्हा ती कमरेवर हात ठेवून उभी. त्याला कळलं कि आता लवकर आत जायला हवे.
" ठीक आहे मित्रा .... पुन्हा कधी तरी .... मी जरा आता फ्रेश होतो ... भेटू नंतर ... " निनाद संदीपचा निरोप घेऊन आता गेला.
" वहिनी ... उद्या चहा साठी येतो हा मी .... thank you .... welcome !! "

" निनाद ... कोणासोबत बोलावे ... काय बोलवे ... कळते ना तुला ... " हेमांगी ओरडलीच.
" अरे , नवे शेजारी आहेत.. जरा ओळख नको का... एकतर आपण गेले सहा महिने फ्लोअरवर एकटे राहतं आहोत... "
निनादचे बोलणे बरोबर होते. नवीनच सोसायटी उभी राहिलेली. त्यात असलेल्या ५ इमारती पैकी एका इमारतीत ७ व्या मजल्यावर यांचा फ्लॅट होता. एका मजल्यावर ३ फ्लॅट फक्त. त्यातूनही यांनी जेव्हा फ्लॅट घेतला तेव्हा पासून हे एकटेच या मजल्यावर. त्यामुळे संदीपला बघून निनाद खुश झालेला.
" अरे हो .... पण आताच आलो कि नाही आपण...... उद्या भेटलो असतो... ",
" ठीक आहे ... सॉरी ना ... " ,
" हम्म .... आणि चहाची ऑफर का केलीस त्याला ... ओळख झाल्यावर बोलावलं असते ना ... " , हेमांगी म्हणाली.
" मी कुठे.... त्यानेच स्वतःच invite केलं स्वतःला .... मी काय करू ... जाऊ दे ना हेमा .... चहा तर मागतो आहे ना ... तेही उद्या सकाळी... किती पिणार तो चहा... एक कप ..... दोन कप.... चालेल ना ... please !!!  please !!!  please !!! " निनादनी जरा लाडी गोडी लावली तर हेमांगी हसू लागली. दोघे फ्रेश झाले.

बॅगेतून आणलेले सामान - कपडे पुन्हा जागच्या जागी लावत होते दोघे. तर दारावरची बेल वाजली.
" आता कोण .... " हेमांगी बोलली.
" मी बघतो थांब ... " म्हणत निनादने दरवाजा उघडला.
" ओ दादा .... किंवा काका ... १ मिनिट... काय बोलू तुम्हाला ... नावाने तर हाक मारू शकत नाही ... मोठे वाटता माझ्यापेक्षा... " एक मुलगी होती दारात.
" संदीप कडून आलीस वाटते ... " ,
" नाही नाही ... आमचे दुसरे घर आहे ... काय बोलू ते तर सांगा तुम्हाला ... " ,
" ह्म्म्म ... " निनाद विचार करू लागला ... " मोठा तर आहेच मी तुझ्यापेक्षा .... माझं वय ३३ ... तुझे किती ... " ,
" माझं ना .... थांबा हा.... मोजते... "  त्या मुलीने बोटांवर मोजायला सुरुवात केली. " निनाद ... कोण आहे ... " हेमांगीने आतून आवाज दिला.
" माझं वय ना .... २१ किंवा २२ असेल ... पण तो संदीप दादा आहे ना ... तो मला " वय वर्ष १० " असे बोलतो ... का ते माहित नाही... मग मीही दादा बोलते तुम्हाला... " ,
" चालेल ना ... " निनादने तिच्याशी हात मिळवला. " नाव काय तुझं .... " ,
" माझं नावं अरुंधती ..... लाडाने मला अरु बोलतात.... मला ना साखर आणायला पाठवले आहे तुमच्याकडे .... आहे का ... " ,
" आहे ना ... ये अशी घरात ... दारात काही मागू नये... " म्हणत निनाद तिला थेट हेमांगी कडे घेऊन आला. हेमांगीने तिच्याकडे पाहिलं... " हि कोण आता ..." असा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर..
" अगं... हीच नाव अरुंधती .. लाडाने अरु अशी हाक मारतात ...... " निनादने ओळख करून दिली.
" Hi ताई ... कश्या आहात... " ,
" Hi .... मी ठीक .... " हेमांगीने उत्तर दिलं.
" तुम्हाला काय बोलतात लाडाने .... " अरुने निनादला विचारलं.
" मला .... " निनाद विचार करू लागला. " बाळा बोलते हि .... पण लाडात नाही ... रागात .. बरोबर ना हेमा ... " बोलत निनादने टाळीसाठी हात पुढे केला. हेमांगीने त्याचाकडे फक्त एक नजर बघितलं.
" हा ...... हि .... हिला साखर हवी होती.... " निनाद घाबरत म्हणाला.
" हा ताई .... मला साखर हवी होती... " अरुने सोबत आणलेली वाटी पुढे केली. हेमांगीने पुन्हा निनादकडे रागात पाहिले. निनाद ' हाताची घडी आणि तोंडावर बोट ' असे करून उभा राहिला.

" काय नावं तुझं ... अरु ... हा ... अरु ... आम्ही दोघे आताच बाहेरून प्रवास करून आलो आहोत. बघते आहेस ना ... सर्व सामान लावायचे आहे अजून... नंतर ... नाहीतर उद्या देते हा साखर ... आता नाही देऊ शकत... " ,
" चालेल ना ताई ... आताच हवी आहे असे काही नाही... आई बोलली कि तुमच्याकडून साखर घेऊन ये... म्हणून आले. आई - बाबा असे मला बाहेर पाठवत असतात मध्ये मध्ये ... तो संदीप दादा बोलतो कि मी खूप बडबड करते ना ... म्हणून असे मला बाहेर काढतात. काय माहित... तुमच्याशी ओळख पण नाही ... आईने पाठवलं म्हणून आली मी तुमच्याकडे ... " हे ऐकून हेमांगीने हात लावला डोक्याला.


" तुम्ही नवीन आहात ना ... " अरुने निनादला विचारलं. निनाद अजूनही तसाच उभा , त्याला माहित होते .... आणखी काही बोललो तर हेमा जीव घेईल.
" आम्ही जुने आहोत ... तुम्ही नवीन आहात.... आता मी सामान लावू का ... तू उद्या येशील का सकाळी. " हेमांगी अरुला बोलली.
" चालेल चालेल.. उद्याच येते मी साखर घेयाला .... मदत करू का सामान लावायला .... " ,
" नको नको ..... हा आहे ना .... तो लावेल सामान ... " निनादकडे बघत हेमांगी बोलली.
" Bye ... " म्हणत अरु निघून गेली.


आता हेमांगीने निनादकडे मोर्चा वळवला. " साखर .... !! seriously ... निनाद ... चाळीत आहोत का आपण ... साखर द्या ... पीठ द्या ... मीठ द्या .... कसा आहेस रे तू ... "  हेमांगी तशी प्रेमळ होती पण सकाळपासूनच तिचा मूड खराब होता. त्यात इथे आल्यापासून काही ना काही होतंच होते. निनाद शेपूट पायाखाली घालून उभा...
" इथे इतके सामान पडले आहे... आणि ते सोडून बरा गप्पा मारत असतो तू ... " ,
" काय गं हेमा .... किती गोड होती ती... डायरेक्ट दादा बोलली मला... तुला ताई ... अजून काय पाहिजे life मध्ये... " निनाद आरामात सोप्यावर बसला.
" हो का ..... ठीक .... हे सामान तू लाव हा सगळं ... मी आत जाऊन झोपते ...अजून काय पाहिजे life मध्ये...... " तणतणतच हेमांगी बेडरूममध्ये गेली.
" अगं .... " निनाद बोलेपर्यंत गेलीही ती. बिचारा निनाद ... बसला सामान आवरत. १५ मिनिटांनी राग निवळला तशी हेमांगी बाहेर आली. बघते तर निनाद एकटाच आपला ... confused झालेला सामान बघून... काहीतरी करण्याचा प्रयत्न ... त्याला बघून हसू आलं तिला.

" किती तो लाडाचा नवरा माझा... " म्हणत ती निनाद जवळ आली. गालगुच्च्या घेतला त्याचा.
" मला वाटलं खरोखर झोपली तू ... आराम कर जा तू ... मी लावतो सामान .... " निनादच्या बोलण्यावर हसू आलं तिला.
" किती रे भोळा तू ... बोलायला आवडते ना तुला खूप ... " ,
" अगं ते काय ... असंच ते ... नवीन शेजारी .... तेही २ -२ ... एकावेळेस .... मज्जा वाटली मला.... बोलायला आले ना कोणीतरी ... " हेमांगीने लाडाने त्याच्या केसातून हात फिरवला.
" सॉरी निनाद ... रागावले तुझ्यावर... पण मी वैतागलेली.... त्यात तुझे हे ... गप्पा मारणे .... असो ..... सॉरी .... चल , मीही मदत करते सामान लावायला .... " निनाद आनंदाला.
" चांगले आहेत गं ते ... आपलेच शेजारी आहेत ना .... " हेमांगी हसू लागली. " तू हसतेस ना ... तेव्हा फार छान वाटते... असे वाटते कि आताच पाऊस पडायला लागेल. " निनाद चेहऱ्यावर पाणी पडते आहे अशी acting करू लागला.
" हो का .... बराच आहेस तू .... "

" please ... रागावू नकोस कधी .... भीती वाटते .... " ,
" का .... मी कुठे काय केले अजून तुला... " ,
" म्हणजे काही करणार आहेस का ... " निनाद खरच घाबरला. हेमांगी पुन्हा हसू लागली.
" किती घाबरतोस रे .... काही करणार नाही तुला.. " निनादला बरं वाटलं. दोघे कामात बिझी झाले. खूपच सामान होते. निनादने हळूच विचारलं.
" मी काय बोकतो ..... सॉरी बोलतो .... हेमा .... " ,
" अरे किती घाबरतोस .... हा .... हा.... हा ... " हेमांगी अजूनच हसायला लागली.
" OK .....मी काय बोलतो .... हेमा .... उद्याची सकाळ होयाला किती वेळ आहे अजून.. म्हणजे बघ हा .... आजची दुपार होईल आता .... मग संध्याकाळ ..... त्यानंतर रात्र ... तेव्हा जाऊन कुठे उद्याची सकाळ होईल ... " निनादचे बोलणे पटलेलं हेमांगीला पण तिने हसू आवरलं.
" कळते आहे ना तुला .... तुला जमत असेल तर आज संध्याकाळी बोलावू .... नाहीतर उद्या सकाळचा प्लॅन फिक्स करू... " हेमांगीला माहित होते. निनादला त्यांच्या सोबत गप्पा मारायच्या होत्या , ओळख करायची होती. निनादला असे मित्र जोडायला खूप आवडते.
" ठीक आहे .. जाऊन सांग त्यांना .... हा पण एक गोष्ट ..... हे सामान नंतर लावू ... आता घाईघाईत नको .... " ,
" yes ... yes ... thank you ... हेमा डार्लिग .. असा गेलो आणि असा आलो. " निनाद आमंत्रण देयाला बाहेर गेला. अरु समोरच उभी. तिलाच सांगतील कि दोन्ही फॅमिलीने चहा साठी संध्याकाळी घरी यावे.

संध्याकाळी ५ वाजता , दोन्ही फॅमिली यांच्या घरी अवतरले. दारावरची बेल वाजली. निनादने दरवाजा उघडला. " Hi .... " समोर संदीप , शेजारी त्याची बायको... मागे अरु , अरुचे आई-वडील.... निनादने स्वागत केले. सोफ्यावर बसले. संदीपने सुरुवात केली.
" बरं का .... हि माझी बायको संदीपा.... आणि हा अजिंक्य .... सकाळीच ओळख झाली आमची... " निनादकडे बोट दाखवत त्याने बायकोला ओळख करून दिली. हेमांगी confused ....
" अरे मित्रा...... माझं नावं निनाद ... अजिंक्य नाही... " ,
" हा ... तेच रे ते .... " , संदीप म्हणाला.
" सॉरी हा .... हा जरा विसराळू आहे .... नाव तर त्याला अजिबात लक्षात राहत नाही. बाकी काही विसरत नाही... पण नाव विसरून जातो... माझं नाव लक्षात राहावं म्हणून लग्नानंतर माझं नाव मीच " संदीपा " ठेवले..... संदीप- संदीपा... " ,
" व्वा !! छान ... " निनाद टाळ्या वाजवू लागला. हेमांगीने त्याच्या टाळ्या थांबवल्या.

" तुमच्या बद्दल सांगा ना काहीतरी ताई " संदीपाने हेमांगीला विचारलं.
" आम्ही दोघे आधी लहान घरात रहायचो. इथे २ bhk कमी किमतीत मिळाला म्हणून लगेच घेतला. दोघेही जॉब करतो ना ... मी government job करते. हा हि मोठया पोस्ट वर आहे. म्हणून घेऊ शकलो मोठे घर.. ",
" छान छान .... " , अरुचे वडील बोलले.
" संदीप जॉब करतो हा मीही... सकाळी तर चोर बोललास मला.. " निनाद स्वतःच्या बोलण्यावर हसू लागला.
" चोर बोलला .... कमाल आहे संदीप तुझी ... " अरुचे वडील बोलले.
" होते असे ... जाऊ दे ... " निनाद म्हणाला.
" तरीही ... चक्क चोर म्हणाला .... " अरुचे वडील पुन्हा ...
" जाऊ दे ... सोडून द्या ... " निनाद...
" OK .. ठीक आहे .. सोडून द्या तर सोडून द्या ... पण चोर म्हणाला ... " ,
" बस झालं .... " अरुच्या आईने त्यांना थांबवलं.

हेमांगीला गंमत वाटली. " तुम्ही काय करता पोटासाठी .. " हेमांगीने संदिपाला विचारलं.
" जेवतो आम्ही पोटासाठी.. " संदीपने चट्कन उत्तर दिले. तशी संदीपाने त्याला कोपरखळी मारली.
" माफ करा हा ताई ... याला मस्करी करायची सवय आहे. आमच्या दोघांचा बिजनेस आहे... अरुचे वडील आणि संदीप... यांचा import - export चा बिजनेस आहे... " ,
" व्वा !! छानच ... काय करतात  import - export .... पण हे विसरतात ना .. मग कस जमते... " ,
" मी पण असते यांच्या सोबत ... घरात बसून काय करायचे .... माझाही हातभार ... आम्ही ना फळ-भाज्या ... दूध ... म्हणजे सर्व खाण्याचे पदार्थ , वस्तू  import - export  करतो. " संदीपा बोलली.
" शिवाय आम्ही कधी कधी प्रदेशातून महागड्या वस्तू आणायचे कामही घेतो ..." अरुचे वडील म्हणाले.
" म्हणजे तुम्ही एकमेंकाना छान ओळखत असणार .... " निनादने दोघांना विचारलं.
" हो तर .... आम्ही आधी पासून शेजारी आहोत. पहिल्या सोसायटीचे काम सुरु झाले. शिवाय ती जागा आमच्या ऑफिस पासून जरा लांब होती. मग विचार केला कि नवीनच जागा घेऊ... इथून ऑफिस जवळ आहे , जागा मोठी आहे ... मीच निवडली जागा हि ... " संदीपने कॉलर वर केली स्वतःची.

" खूप छान .... " निनादचं लक्ष अरुकडे गेलं. आल्यापासून गप्प.
" तू का गप्प बसून आहेस .. बोल कि काही ... " निनाद म्हणाला.
" नको ..... " अरूचे वडील म्हणाले पण तोपर्यत उशीर झालेला.

" काय बोलू ..... " अरुने विचारलं.
" काहीही सांग ... म्हणजे तुमच्या जुन्या घरी ... तिथे तुझ्या मैत्रिणी असतील ना ... आठवण येतं असेल ना तुला ... मला तर माझ्या फ्रेंड्सची खूप आठवण येते .. " हेमांगी बोलली. तिने अरुला विचारलं खरं पण तीच लक्ष अरुच्या आईकडे गेलं. तिने कपाळाला हात लावला होता . अरुने बोलणे सुरु केले.
" हो ,हो ... मला माझ्या मैत्रिणीची खूप आठवण येते... छान आहेत सर्व ... पण तिथे एक मुलगा होता ना ... मी हळूहळू चालायची म्हणून मला गोगलगाय बोलायचा... गोगलगाय हळू हळू चालते ... कारण तिचे पायच नसतात... तिच्या अंगाखाली काही तरी चिकट चिकट असते... चिंगम पण चिकट असते. म्हणून मी ते खात नाही..... मला खायला खूप आवडते ... पण आई कशी बोलते कधी कधी... माझं डोकं नको खाऊस ... तुम्हीच सांगा ताई .. डोकं कस खाणार ... त्यापेक्षा मी आंबा खाईन .... मला आंबा खूप आवडतो खायला... पण तो आता मिळत नाही..... आता पेरू मिळतात ... पण पेरूला आंब्याची चवं नसते...माझे पप्पा पण बोलतात कधी कधी... हिच्या जेवणाला काहीच चव नाही... हॉटेल मधले बरे त्यापेक्षा.... " अरु बोलत होती तर तिच्या वडिलांनी तिच्या तोंडावर हात धरला .

" हिला बोलायला देत नाही आम्ही... एकदा सुरु झालं कि असंच तोंड बंद करावे लागते.. अरु .... चूप..... एकदम शांत... " अरुचे वडील तिला ओरडले. हेमांगीला किती हसायला आलं ते बोलणे ऐकून. तिच्यासोबत सर्वच हसू लागले. अरुला कळेना सर्व का हसतात ते. चहा वगैरे झाली.
" चला ताई .... मी तुम्हाला मदत करते. " संदीपा म्हणाली.
" कशाला मदत ... आणि ताई काय ... अरु लहान आहे , म्हणून ताई बोलते .. आपण तर एकाच वयाच्या आहोत ना .... नावाने बोलू शकतेस ... निनाद हेमा बोलतो मला... तुही बोल .... " ,
" चालेल ... हेमा .... मी करते मदत ... मलाही घरी काही काम नाही.... आणि मी बघितले , तुमचे सामान लावायचे आहे अजून... त्यात आम्हा सर्वाना चहाला बोलावले तू .... आल्या आल्या... एवढं छान स्वागत केले आमचे... जरा मदत केली तर कुठे बिघडलं.... आता तर मैत्रीण झाली आहे ना मी.. मदत तर हक्काने मागायची आता... " हेमांगीला किती बर वाटलं. अगदी जुनी मैत्रिण भेटली पुन्हा , असच वाटलं तिला. छान हसली ती संदीपाला बघून. अरुच्या आईने ही मदत करायला सुरुवात केली. हसत खेळत , गप्पा सोबत घर लावून झालं. निघाले सर्व आपल्या घरी.

जास्त करून हेमांगीला छान वाटलं.
" चहा छान झाला ... आता पुढचा प्लॅन आमच्याकडे ... जेवायचा.... " संदीपाने हेमांगीला सांगितलं.
" नक्की !! .. " ,
" नाही म्हणूच शकत नाहीस... मैत्रिण आहोत... मघाशी बोलले तसंच ... काही लागलं तर नक्की यायचं माझ्याकडे ... " ,
" प्रॉमिस गं....प्रॉमिस.... " हेमांगी हसत म्हणाली.
" आणि अनिकेत ... तुही ये घरी ... असाच ... गप्पा मारू ..... वेळ मिळेल तेव्हा नक्की ये .... " , संदीप म्हणाला.
" अनिकेत नाही रे बाबा .... निनाद ... ",
" तेच ते ... " सर्वच हसले. निघाले. अरु पुन्हा मागे आली.
" काय झालं ग .. " हेमांगीने विचारलं.
" काही नाही .. निनाद दादाला काही विचारायचे होते ... " ,
" विचार कि ... " ,
" मी लहान होते ना ... तेव्हा कधी रक्षाबंधन आले ना ... कि वाटायचे ... माझ्या सर्व मैत्रिणीना भाऊ आहे ... मलाही वाटायचे , माझाही भाऊ असावा ... मोठा भाऊ .... तुला सकाळी बघीतले ना तेव्हाच दादा सारखा वाटलास... म्हणून दादा बोलले. चालेल ना ... " ,
" हो तर ... हि ताई आणि मी दादा ... सकाळीच तर दादा बोललीस ना .... " निनाद म्हणाला. अरु थांबली थोडी...
" मी ना लहानपणीचं ठरवलं होते ... माझा कोणी मोठा दादा असेल ना ... तर त्याला डुग्गु बोलणार मी .... सर्वापासून वेगळं नाव काहीतरी... माझाच डुग्गु असेल तो ... मी बोलू की डुग्गु तुला .... चालेल ना तुला ... " मगाशी लहान मुलीसारखी बोलणारी अरु असे काही बोलेल असे वाटलं नव्हतं दोघांनाही. दोघे इमोशनल झाले.
" ठीक आहे हा ..... आजपासून मी तुझा डुग्गु .... हा पण जास्त बडबड नाही करायची हा ... नाहीतर बघ ... " ,निनाद म्हणाला.
" thank you डुग्गु ... " म्हणत अरुने निनादला मिठी मारली. आणि उड्या मारतच घरी गेली.


हेमांगीने हळूच डोळ्यातून आलेलं पाणी पुसले. निनादने बघितलं.
" काय गं .. काय झाल.... आता काय केले मी ... " हेमांगी रडता रडता हसत होती.
" काही केलं नाहीस रे ... सुखाचे पाणी आहे ते .... सकाळी वाटतं होते.. कोण हे ... कशाला हवेत शेजारी ... सहा महिने एकटे होतो ... तेच छान होते ... आता बघ, मला एका नवीन मैत्रीण भेटली. संदीप आहे जरा विचित्र तरी तुला मित्र भेटला. मोठ्या बहीण - भावासारखे अरुचे आई-वडील... आणि तुला लहान बहीण भेटली... एका दिवसात किती नवीन नाती तयार झाली ना ... " ,
" हो मग .... माझा अंदाज चुकतो का कधी ..... माझी निवड छानच असते .... हे शेजारी छान .. तुही छान ... सर्व कस छान छान ... खरतर मला thank you बोललं पाहिजे तू .... " निनाद पट्कन बोलून गेला. हेमांगीकडे घाबरतच पाहिले त्याने... हेमांगी हसत होती....
" thank you ... नवे शेजारी भेटले तुझ्यामुळे.... thank you डुग्गु !!!! .... " पट्कन गालावर एक kiss घेत हेमांगी आत पळाली... निनाद हसला. name plate जरा धूळ जमली होती, हाताने त्याने साफ केली , हसला आणि दरवाजा लावला.


============== the end ===============



Sunday 12 April 2020

भटकंती .... नव्या वळणावरची !! .......( भाग ५ - अंतिम )



" या रानातून भटकताना , पायवाटांवरून चालताना एक वेगळीच भावना मनात उमटते. कोणी बनवल्या असतील या पायवाटा... गावातल्या जुन्या - जाणत्या म्हाताऱ्यांनी कि आपल्या पूर्वजांनी... नाही कळत ना !! थांगपत्ता न लागावा इतके गूढ आहे ना .... काय माहित, माझ्या सारखाच कोणी भटकंती करायला निघाला असेल आणि या पायवाटा तयात झाल्या असतील. रान-वनात चालताना .... या निसर्गात मिसळून जाताना ... या पायवाटा जन्माला घातल्या असतील त्याने. कदाचित महाराजांच्या शूर मावळ्यांनी यावरून आपले घोडे पळवले असतील, गनिमी कावा करताना स्वतः महाराजांच्या पावन चरणांचा स्पर्श या  पायवाटांनाही झाला असावा , कोणी सांगावे... !!! अशीच एखादी ..... अस्पष्ट , धूसर का होईना .... एखादीच पायवाट माझ्याकडूनही निर्माण व्हावी , तेव्हाच इतक्या वर्षांच्या भटकंतीचे सार्थक होईल , हीच या निसर्गाकडे प्रार्थना !! "  

सुप्रीने आकाशची डायरी आणली होती सोबत. त्यानेच हे असे लिहून ठेवले होते. आज पहाटेच जाग आलेली तिला. अगदी पहाटे ४ वाजता ..... आज त्या किल्यावर जायचे होते ना. रात्र संपून कधी पहाट होते असे झालेलं तिला. तिथला सूर्योदय आकाशचा favorite.... कदाचित आकाशची भेट तिथेच व्हावी, कोणी सांगावे. तिच्याच तंबूत बसून ती आकाशची डायरी वाचत होती टॉर्चच्या प्रकाशात. आकाशचे अक्षर, त्यावर हात फिरवला तिने. आपोआपच तिला समाधान लाभले. ती आता फक्त तिथे जाण्याची वाट बघत होती.

ठरल्याप्रमाणे, सर्व पहाटे ५ वाजता उठले. आवरले सर्वानी आणि निघाले. पूजाचा अंदाज बरोबर होता. १५ मिनिटांनी ते त्या अर्धवट असलेल्या किल्ल्यावर पोहोचले. अजूनही सूर्योदयाला बराच अवधी होता. वातावरण फारच थंड झालेलं. " काही वेळाने पावसाला सुरुवात होईल असे वाटते... " कादंबरी नाराज झाली. सुप्री मात्र शांत होती. सुप्रीने टॉर्च सुरु केला. त्या उजेडात कळत होते कि आजूबाजूला धुकं होते. हळूहळू पूर्वेकडील डोंगराची शिखरे नारंगी होऊ लागली. तेव्हा कळलं कि गुडगाभर धुकं पायाशी आहे. पायाखाली जमीनच नसावी हेच खरे. आजूबाजूचे अर्धवट बांधकाम, त्याभोवती धुकं बिलगून बसलेलं. त्यामुळे काही वेळ का होईना... त्या बांधकामाला शुभ्र रंग चढला होता. थोड्यावेळाने सूर्यदेवाचे आगमन झाले तसे विरुद्ध दिशेला असलेल्या काळ्या ढगांच्या सैन्याकडे साऱ्यांचे लक्ष गेले.

आकाशला इथला सूर्योदय का आवडतो याचे वर्णन पूजाने आधीच केलेलं होते. आता ते प्रत्यक्ष समोर दिसत होते. भारावून जाण्यासारखे असेच काहीसं. स्वर्ग काही अंतरावरच आहे , असे भासावे असेच ते दृश्य. कादंबरीच्या डोळ्यात पाणी आले ते बघून. काही काळ सर्वानी ते पाहिल्यावर , वाऱ्याची एक अति थंड वाऱ्याची झुळूक आली. त्यानेच मग पावसाचा अंदाज सांगितला. तिथेच असलेल्या एका आडोसा खाली सर्व जाऊन बसले. पावसाच्या सरी रिमझिम बरसू लागल्या. त्यात दूरवर झालेलया सुर्योदयाने , ते पावसाचे थेंब सोनेरी केले होते. सुप्री- कादंबरी पावसाकडे पाहत होत्या. पूजा त्या दोघींजवळ आली.
" डब्बू आला असावा इथे... कदाचित काल ....." सुप्रीने चमकून पूजाकडे पाहिलं.
" तुला कस माहित... " , पूजाने एका दिशेनं बोटं करून तिथे बघायला सांगितलं. तिथे अर्धवट जळलेली लाकडं होती.
" शेकोटी पेटवलेली..... जास्त दिवसाचे नाही वाटतं... काल किंवा परवाचे वाटते ते... आकाशलाच माहिती आहे हि जागा... तो येतोच इथे... तोच आला असावा... " पूजा आत्मविश्वासाने बोलत होती. छानशी smile आली सुप्रीच्या चेहऱ्यावर. तिने पुन्हा आकाशची डायरी उघडली. सर्वच बसून होते. छान थंड वारा वाहत होता. पावसाची रिमझिम सुरूच होती. या वर्षांचा नवा पाऊस. नुकतीच सुरुवात होती ती पावसाळा ऋतूची. मातीचा ओला गंध अजूनही मोहवून टाकत होता. आकाशने त्याच्या डायरीत लिहिलेले काही वाचायला सुरुवात केली.
" पाऊस म्हटलं कि किती विषय निघतात. सुख-दुःखाचे , आनंदाचे , हसण्याचे , रडण्याचे सुद्धा. वाहवत जातात त्यातच सगळे. मलाही खूप काही सांगतो हा पाऊस. गप्पा मारतो माझ्याशी. त्याच्याही गोष्टी असतात बरं का... पहाटेचा पाऊस , मला जागे करायला यायचा... पहाटेच्या कोवळ्या उन्हातला पाऊस , झाडांना नवीन पालवी येणाचे दिवस , त्यांना नवीन चैतन्य देऊन नकळत निघून जायचा तो. कधी सांगून तर कधी फसवून. कधीच चिंब करून जायचा... मलाही तो हसवून , सूर्य देवाच्या चरणांना स्पर्श करून रात्रीला स्वतः सोबत घेऊन निघून जायचा.

दुपारचा पाऊस .... खास करून त्या उन्हालाही मिठीत घेणारा पाऊस.... तो डोळ्यांना सुखावणारा... कोणी किती काहीही बोलू दे... तो यायचाच वाऱ्याला सोबत घेऊन...कधी सुतासारखा सरळ रेषेत... तर कधी नशेत चालणाऱ्या माणसासारखा.... तिरका... तिरप्या रेषेत येणारा पाऊस... झाडेही डोलायची त्याच्या सोबत. ऊन-सावलीचा खेळ आणणारा दुपारचा पाऊस...

संध्याकाळचा पाऊस.... मला जास्त सुखावणारा..... कातरवेळी पाहुण्यासारखा येणारा.... सोबतीला मनात कालवाकालव करणाऱ्या आठवणींना सोबत घेऊन येणारा.... घराच्या खिडकीतून पाऊस बघताना.... हातात वाफाळलेला चहा आणि डोळ्यात जुन्या आठवणी... काय तो संगम ना !! संध्याकाळी भरून येणारं आभाळ त्यामुळे जरा जास्तच काळंभोर वाटायचे. पाऊस नसला तरी त्या भरलेल्या आभाळाने , सोबतीला असलेल्या थंड वाऱ्याने ... अंगभर शिरशिरी यावी !! आठवणीत जायचे उत्तम ठिकाण आणि वेळही. कधी कधी त्या भरलेल्या ढगांसोबत विजांचा अस्पष्ट प्रकाश आणि कडकडाट ... या संध्याकाळच्या पावसाला फक्त बघावे... मनात काहूर माजवणाऱ्या आठवणी सारखा उदास वाटतो कधी कधी तो... असा हा ओल्या सांज वेळी आलेला पाऊस , मित्रा सारखा एखादी कविता करवून घेयाचा किंवा न सुचलेली एखादी ओळ सुचवून निघून जायचा.

रात्रीचा पाऊस ... सहसा मला पुढच्या पहाटेची तयारी करायला सांगायचा. माझ्याच गुज-गोष्टी मला सांगायला रात्रीचा पाऊस यायचा...... मनात उरलेले काही चांदण्यांचे आवाज....  चंद्राची सुरेल गाणी.... रातकिड्याची गुणगुण.... हे ऐकायला रात्रीचा पाऊस माझ्या उशी शेजारी यायचा. आभाळभर तारका पसरून , पहाटेच्या झुंजूमुंजूच्या अर्धवट झोपेत .... माझी सोबत अर्धवट सोडून .. रात्रीचा पाऊस माझ्या पापण्यांआड निघून जायचा...

पावसाचं पाणी .... कधी डोळ्यातून तरळते .... ते सांगू शकत नाही. कोणीच सांगू शकत नाही.... पाऊस समजावा असे काही नाही. पावसाची पारायणं करावी लागतात.... पावसात मन रमावे असे काही नाही... मनात पाऊस असावा लागतो... पावसाला शोधावे असेही काही नाही, स्वतःला पावसात शोधावे .. आणि ..... आणि पावसाचे वेड असावे असे काही नाही...... त्यासाठी स्वतः पाऊस होयाला लागते.... "

सुप्रीचे वाचणे संपले. किती सुंदर लिहिले होते आकाशने. पूजा डोळे मिटूनच ते सर्व ऐकत होती. एकंदरीत सर्वच मंत्रमुग्ध झाले होते. बाहेर पाऊस आणि मनात शब्दांची मोहक वर्षा... पावसाला सर्व फक्त ऐकण्याचा प्रयन्त करत होते. पूजाने डोळे उघडले. काही विचार करूनच ती बोलली.
" हि सर्व ठिकाणे... आकाशची ' personal favorite'  ... त्यात पाऊस... या सर्व ठिकाणी त्याला ' त्याचं स्वतःचे ' काही सापडते ... म्हणून तो येतो इथे.. एकटाच... मला वाटते , त्याच ते ' मी पण ' असं हिरावून घेऊ नये कोणी... " पूजाच्या या बोलण्यावर सुप्री तिच्याकडे बघू लागली.
" कळलं नाही मला.... " ,
" मला वाटते ... तू , मी आणि कादंबरी ... आपण तिघीनीच राजमाची कडे निघायला हवे... फक्त आपण तिघी.. ",
" मग हा तुमचा ग्रुप ... ते कुठे जाणार... ",
" माझं इतकंच म्हणणं आहे कि तिथे गर्दी होऊ नये... इतके सर्व जाणार... त्याला ... डब्बूला त्याचा दिवस जगू दे.... ११ जून... सगळे जाऊन त्याचा आनंद का हिरावून घेयाचा... या बाकीच्या ग्रुपला सांगते मी ... कुठे जायचे ते .. एकदा का आकाशची भेट झाली कि आम्ही दोघी पुन्हा त्यांना जाऊन भेटूच... " पूजाचा प्लॅन पटला सुप्रीला. पाऊस थांबल्यावर बाकीच्या ग्रुपला सोडून तिघी निघाल्या.

========================================================================

" एक काम करूया का .... " आकाशने चालता चालता सलीमला विचारलं. नुकताच पाऊस पडून गेलेला. एक नवं चैतन्य घेऊन दोघे राजमाचीच्या दिशेनं निघालेले.
" कोणते काम ... " ,
" आज ९ तारीख... ११ जूनला पोहोचायचे आहे तिथे... आपण चालतो ही जलद.... ",
" मग थांबूया का .... " सलिमने विचारलं.
" बोलणे तर पूर्ण करू दे.. ",
" हा .... बोल बोल ... " ,
" मी बोलतो आहे कि मला त्याच दिवशी पोहोचायचे आहे... लवकर पोहोचून काय फायदा.. म्हणून विचार करत होतो.... जरा नव्या वाटेने गेलो तर... तुलाही परिसर पाहता येईल.... time pass होईल " ,
" चालेल ना ... तुझ्या मागोमाग निघालो ... तू बोलशील तिथे जाणार.... चल ... कुठल्या वाटेने जायचे ते सांग... " आकाशने आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेतला. एका बाजूने पुढे जंगल लागत होते. तिथूनच प्रवास करायचे ठरले.

सलीम तर आकाशच्या मागोमाग होता. जंगलच्या वेशीवर आले तस सलिमने आकाशला थांबवले. " मला वाटतं ना ... मी आधी या जंगलात येऊन गेलो आहे... " सलीम म्हणाला. आकाशला आधी तो गंमत करतो आहे असेच वाटले. पण जेव्हा ते जंगलात शिरले तेव्हा सलीम अगदीच सराईत पणे चालू लागला. पायवाटा त्याच्या ओळखीच्या होत्या, असं तो चालत होता. " कदाचित १-२ वेळा आलो असेन इथे... मला राजमाची ऐकून माहित आहे.... पण या रानात नक्कीच आलो आहे मी... " सलीमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता ते बोलताना. आणखी पुढे चालून आल्यावर सलीम थांबला. " हो .... माहित आहे हा प्रदेश... ओळखीचे आहे हे सर्व... " त्याच्या चेहऱ्यावर जुनं काही सापडल्याचा आनंद होता.

" छानच ... इकडचे माहित आहे तुला... किती बरं वाटलं... " सलिमचे बोलण्याकडे लक्ष नव्हते.
" काय झालं मित्रा... कसला विचार करतो आहेस.. " आकाशने सलीमला विचारलं.
" मी इथल्या जागा आठवतो आहे... " पुन्हा तो बोलायचा थांबला. आकाशकडे पाहिलं त्याने.
" तू दाखवतोस ना पाऊस ... हे निसर्ग सौंदर्य... चल .... आता तू माझ्या विश्वात आला आहेस... " आकाशला काही कळेना ....
" काय नक्की " ,
" या जंगलात मी वर्षभर होतो. इथली सर्व झाडं ... पक्षी ... माझे मित्र आहेत... " आकाशला त्याचे तसे बोलणं आवडलं,
" चल... एका ठिकाणी जाऊ... बघू काही आहे का तिथे.... " आता आकाश ... सलीमच्या मागे मागे चालत होता. पुढे जंगल आणखी गर्द होतं गेले. सलीमला पुढील प्रत्येक जागा माहित होती. गर्द झाडी असली तरी सलीम सराईतपणे चालत होता. १०-१५ मिनिटे चालून झाल्यावर थांबले. " इथे बसुया... " आकाशने तिथली जागा साफ केली आणि दोघे बसले.
" या ठिकाणी ना ... खूप पक्षांची घरटी आहेत... निरखून बघितलंस ना तर तुला दिसतील. " आकाशने वर झाडांच्या फांद्यांवर नजर टाकली. खरंच !! किती घरटी होती वर. " इथे जवळपास वर्षभर होतो. एकदा असाच प्रवास करता करता संध्याकाळ झाली म्हणून आता बसलो आहोत ना , तिथेच थांबलो. इथून पुढे एक लहानसा झरा आहे. वर्षभर पाणी असते त्याला. तिथे गेलेलो संध्याकाळी. तिथे असलेल्या एका झाडावर, खालच्या फांदीवर एक पक्षाचे घरटे आकारास येत होते. पक्ष्याचे नाव नाही माहित, पण ते दोघे... नर-मादी .. दोघेही त्या अंधुक होतं चाललेल्या प्रकाशात सुद्धा घरटे पूर्ण करण्यात गुंतलेले. आवडलं मला. काहीतरी वेगळं दिसलेल. चल तो झरा दाखवतो. " म्हणत सलीम निघाला. आकाश मागे होताच. सलिमने एका झाडाकडे बोट दाखवलं.
" त्या फांदीवर होते ते घरटे..... मी ना .... त्याच्या बरोबर समोर एक झोपडी बांधली होती.... पहिले एक-दोन दिवस असाच बघत बसायचो ... मग कुतूहल निर्माण झाले आणि झोपडी बांधून त्यातून बघायचो त्यांना.... या आजूबाजूच्या झाडाच्या पानांची , लाकडाची एक झोपडी उभी केली होती. " फारच छान सांगत होता तो. आकाशला आवडलं
" अजून सांग ना ... अनुभव "

" आणखी ... अजून म्हणजे इथेच होतो वर्षभर, त्या नर- मादीच्या घरटे बांधणीपासून त्याच्या अंड्यातून आलेली इटुकली पिल्ले ... त्यांचे संगोपन ... सर्व बघितले. अश्या लहान लहान चोची... त्यांच्या आईने चोचीतून आणलेला खाऊ... तो खाऊ खाण्यासाठी चाललेली इवलीशी धडपड... त्यांचा छोटासा आवाज... छानच वाटायचे.... काही महिन्यांनी छोटी पिल्ले मोठी झाली. हळूहळू उडायचा प्रयन्त... पण लवकर शिकले ते उडायला. पंखात बळ आलं तसं घर सोडले त्यांनी... तेही बघितले मी... पुढील काही दिवस त्यांचे आई-वडील यायचे घरट्यात.. २ घटका थांबायचे. निघून जायचे... असे त्यानी ३-४ दिवस केले. नंतर तेही येईनासे झाले.... मग मीहि माझी झोपडी तोडून निघून गेलो पुढच्या भटकंती साठी... " ,
" राहिला कसा तू इतके दिवस... जेवण वगैरे... कसं काय जमवलंस तू " , सलीम स्वतःशीच हसला.
" जेवणाचं काय घेऊन बसलास... फळं - कंदमुळं खाऊन राहिलो ... या झऱ्याचं पाणी ... ते पियाचो... इतकंच !! हा भाग खूप आतमध्ये आहे ... कळलं असेलच तुला... वर्षभरात एकाही माणसाचे दर्शन झाले नाही मला. विचार कर ... त्यातून इथल्या बऱ्याच पक्षांचे आवाज काढायला शिकलेलो.. आता काही काहीच आहेत लक्षात. ते कसं बोलतात .. त्यांच्या भावना काय , ते कसे व्यक्त होतात हेही शिकलो होतो ... म्हणून तर इतका वेळ राहू शकलो. किती प्रकारचे पक्षी आहेत इथे .... तू कल्पनाही करू शकत नाहीस. कमाल !! हा एकच शब्द येतो या सर्वासाठी. " आकाश सुद्धा भारावून ऐकत होता.

" तू बोलतोस ते बरोबर ..... तूच खरे आयुष्य जगतो आहेस... मानलं तुला " आकाश म्हणाला. सलीम पुन्हा हसला.
" आज थांबू इथेच... तू छान छान दाखवतोस ना ... उद्या पहाटे मी दाखवतो काही छान ... निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा जादू.... बघण्यासारखे आहे ते ... " दिवस दुपारकडे झुकलेला.
" चालेल ... आपण आताच काही तरी बघू ....रात्री जेवणासाठी... आणि शेकोटी साठी लाकडे ही लागतील. " सलीमला पटलं ते. दोघे कामाला लागले.

================================================================
       संध्याकाळ झाली चालता चालता. या तिघीनी थांबायचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी थांबले होते तिथून एक सुंदर दृश्य नजरेत येतं होते. सूर्यास्त दिसत नव्हता तरी त्याची चाहूल तेवढी लागलेली. आभाळात आता पावसाचे ढग नव्हते. जवळपास मोकळे आभाळ. पावसाच्या दिवसात तरी असे मोकळे आभाळ दिसणे म्हणजे नवलच. संद्याकाळच्या सूर्याचे रंग आभाळात दूरवर पसरले होते. यांचे तंबू उभे करून झाले. आणि सुप्री ते आभाळातले रंग पाहत पुढे असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसली. एकटीच !!  पूजाला कळलं ते. कादंबरी तिच्याकडे निघालेली . पूजाला आता सुप्रीची ही सवय माहीत झाली होती. " थांब कादंबरी... तिला अशी एकटी बसायची सवय आहे. नको डिस्टर्ब करुस तिला.." कादंबरीला समजावलं तिने. या दोघी मग मागेचअसलेल्या दगडावर जाऊन बसल्या. कादंबरीने तिथून तिची फोटोग्राफी सुरू केली. पूजा सुदधा तो समोरचा नजारा बघत होती.

          सुप्री स्वतःच्याच विचारात. आकाशची उणीव प्रकर्षाने जाणवत होती तिला. उद्याचा दिवस सोडाला तर परवा ११ जून. ४ वर्षांनी भेट होईल त्याची. कसा असेल. नेहमीच तो वेगळा वाटायचा. प्रत्येक वेळेस नव्याने भेटायचा. सुप्री स्वतःच्या विचारात , मधेच हसत होती. त्याच्या येण्यानेच आपल्या आयुष्यात आनंद आलेला. सूर्याच्या सोनेरी किरणासारखा आलेला आकाश. रात्रीचं आभाळभर चांदणं आलेलं त्याच्या सोबत. आणखी काय हवे होते मला. सुखावून गेलेली मी. आता सुद्धा ४ वर्षांनी भेट होणार... पुन्हा एकदा एक नवीन भेट होईल. कशी असेल ना भेट ती... बोलू दोघे कि फक्त आमचे श्वास बोलतील एकमेकांशी.... पाऊस असेल का तेव्हा... नसेल तरी आकाश घेऊन येईल सोबतीला. त्याच तर ऐकतो ना पाऊस. निदान भरलेल्या आभाळाखाली भेटू... येशील ना आकाश ... पाऊस घेऊन... वाट बघेन..... नाहीतर असे कर ना ... इंद्रधनू सुद्धा घेऊन ये सोबत.... पाऊस , वारा , दाटलेलं आभाळ , ऊन - सावली ... सर्व घेऊन ये ... तुझ्या सोबत हे सर्व अनुभवायचे आहे. बघ !! इवलीशी आठवण आली तरी डोळ्यात मेघ दाटून येतात. निदान या डोळ्यातल्या पावसासाठी तरी येशील ना ... वाट बघते आहे.

          सुप्री स्वतःशीच बोलत होती. त्या कातरवेळी मनाचा मनाशी संवाद सुरु होता. सुप्रीला दाटून आलेलं. सूर्य मावळला तरी तिचा "संवाद" अजून तरी संपला नव्हता. सुप्री साठी आजची रात्र मोठी असणार होती.

================================================================
आज सलीमने आकाशला जागे केले. " सॉरी !! मला वेळ माहित नाही. अंदाजने जागे केले तुला. निघूया का ... " आकाशने घड्याळात पाहिले. पहाटेचे ६ वाजत होते. आकाश पटकन तयार झाला.
" सामान राहू दे इथेच. आपल्याला त्या कड्यावर जायचे आहे. काम झालं कि पुन्हा खाली येऊ ..... " सलीम म्हणाला. आकाशला आठवलं. " काहीतरी छान दाखवतो" असं म्हणाला होता हा काल. तयार झाले तसे दोघे निघाले. हळूहळू चालत ते त्या कड्यापाशी आले. आकाशने पाहिलं , तिथे एक लहानशी गुहा होती.
" आत वाकून बघूया का ... " आकाशने सलीमला विचारलं.
" नाही .... नको ... थांब थोडावेळ.... " पहाट होत होती. सलीमने पहाटेचा अंदाज लावला.
" काही क्षणात सुरु होईल .... " सलीम पुटपुटला. आकाशने ते ऐकलं.
" काय ... सुरु .... " आकाश त्याला विचारत होता कि त्या गुहेतून एक पक्षी उडत उडत वेगाने बाहेर आला.
आकाशने त्या प्रकारचा पक्षी आधी कधी पाहिलं नव्हता. आसपासच त्याने वेगाने गोलाकार फेरी मारली आणि पुन्हा त्या गुहेत आला तसा निघून गेला. आता आकाशला प्रश्न पडला. यात काय छान होते..... सलीमला त्याने तसे विचारलेही....
" थांब जरा .... वाट तर बघ... तुम्हा शहराच्या लोकांना जरा धीर नाही... " आकाश शांत बसला. १० मिनिटे अशीच गेली. फक्त वाऱ्याचा आवाज. आकाशची चलबिचल सुरु झाली. पुन्हा काही बोलणार तर कसलासा आवाज येऊ लागला. बहुदा पंख फडफडण्याचा आवाज असावा. आधी अस्पष्ट असणारा आवाज हळूहळू मोठा होत गेला.
" काय .... " आकाश पुन्हा काही बोलणार इतक्यात त्या गुहेतून ... पंखांची प्रचंड फडफड करत एक मोठाच्या मोठा थवा बाहेर पडला. किती ते पक्षी.... बापरे !! जवळपास २-३ मिनिटं तरी तो थवा , या दोघांच्या डोक्यावरून जात होता. म्हणजे विचार करा किती मोठा थवा होता तो. ते सर्व सरळ रेषेत उडत गेले. " आता बघ ...... यांच्या कसरती... " सलीम उभा राहिला. तसा आकाश सुद्धा उभा राहिला. तो समोर उडत गेलेला थवा आकाशला दिसत होता. सलीमने त्याचा उजवा हात समोर धरला आणि डाव्या दिशेने नेला. त्या पक्षांनी सुद्धा आपला मार्ग त्याच दिशेनं केला. मग सलीमने हात खाली नेला तसे ते पक्षीही खालच्या दिशेने गेले. जणू काही सलीमचं त्यांना कसरती करायला सांगत होता. खाली जाऊन आणखी एका गोलाकार फेरी मारून ते पक्षी पुढे जात पुन्हा वरच्या दिशेने गेले. आणि पुन्हा त्या थव्याने एकदम खाली सूर मारला. आकाशला कळेना, सर्व गेले कुठे. जरा वाकून बघायला म्हणून पुढे वाकला. आणि सलीमने त्याच्या हाताने खालून वर अशी खूण केली. आकाश पट्कन मागे झाला तसा तो थवा... खालून वरच्या दिशेने वेगाने उडत गेला. किती तो पंखांचा आवाज , त्यातून निर्माण होणारी हवा... आकाश मागच्या मागे झाला. " बस खाली पट्कन ... " सलीमने त्याचा हात पकडून खाली बसवलं. तो वरच्या दिशेने गेलेला एवढा मोठा थवा.... त्याच वेगाने पुन्हा खाली येतं पुन्हा त्या गुहेत दिसेनासा झाला.

काही मिनिटांचा थरार !! आकाश स्तब्ध झालेला. काय बोलावे... शब्दच सुचत नव्हते. सलीम आकाशला बघत हसत होता.
" काय होतं हे ... भारी एकदम !! " आकाश म्हणाला.
" हा ना .... बरोबर बोलत होतो मी.... छान आहे ना हे ... " आकाश आता सलीमकडे वळला.
" तुला कस माहित.... आणि ते हाताने... तू जसा हात वळवत होतास तसे ते उडत होते.... i mean ... डोक्यात काही गेलेच नाही. " सलीमला कळलं आकाशला काय बोलायचे होते ते.
" अरे ... इथे वर्षभर होतो.... एकदा पहाटे असा खूप पंखांचा आवाज आला... बघतो तर हा मोठा थवा... मग काय ... पुन्हा कुतूहल... खूप निरीक्षण केले त्यांचेही. वेगळेच पक्षी आहेत ना .. हे ठिकाण माहित नाही कोणाला म्हणून ठीक.. नाहीतर इथं ही गर्दी केली असती माणसांनी... " सलीम हसून बोलला.
" किती महिने हे बघत होतो. सकाळ झाली कि इथे आणि या कसरती झाल्या कि खाली ते घरटे .... असा दिनक्रम असायचा. तो सर्वात आधी बाहेर आलेला ना ... तो त्यांचा लीडर ... म्होरक्या !! तोच आधी पहाट झाली का किंवा आजूबाजूचा परिसर बघायला बाहेर येतो आणि आत जातो.... मग त्याला ठीक वाटलं तरच तो या सर्वांना बाहेर घेऊन येतो ... एकत्र... त्या कसरती त्यांचा व्यायाम असेल किंवा काही वेगळे... ते करतातच... तो लीडर जसा उडतो , त्याच्या मागून बाकीचे उडतात... त्याचा एक ठराविक पॅटर्न आहे.... तोही इतक्या वेळा बघितला म्हणून कळला मला. तेच तर करत होतो मी.... थोड्यावेळाने ... जास्त उजाडलं कि येतील सर्व पक्षी ... एक एक करून .... दिवसाच्या कामाला लागतील. उदया पहाटे पुन्हा या कसरती... " ,
" wow !!! great !! amazing !!! काय बोलू.... बरोबर बोलतोस तू... माणसे येत नाहीत इथे तेच बरोबर... तरी सुप्रीला दाखवायला पाहिजे होते हे ... " आकाश चट्कन बोलून गेला.

==================================================================

" मी काय बोलते पूजा ..आकाश कुठे पोहोचला असेल आता .... " कादंबरीने पूजाला विचारलं.
" उद्या ११ जून आहे... हम्म , आज तो पायथ्याशी पोहोचला असेल. पहाटे त्याला राजमाची वर पोहोचायचे असते. आता तो खालीच थांबला असेल. " पूजा बोलली. तशी सुप्री आनंदली.
" म्हणजे आजच भेटेल ना तो आपल्याला.... " सुप्री आनंदाने बोलली. पूजाही हसली. आजच भेटेल , उद्या एकत्र गडावर जाता येईल मग, सुप्री मनात असा अंदाज लावत चालत होती.

सकाळचे ८ वाजत होते. यांचा प्रवास सुरु होता . निघाल्या तेव्हा कोवळे ऊन अंगावर घेऊन चालत होत्या. आताशा कुठे सकाळ झालेली आणि अंधारून आलं. तिघी थांबल्या.
" पावसाच्या मनात काय आहे ते देव जाणे... " पूजा पुटपुटली.
" नाही येणार पाऊस.. अंधार झाला आहे फक्त ... " सुप्रीने लगेच अंदाज लावला. तरी कादंबरी जरा घाबरली.
" वादळ वगैरे नाही ना .... गार वारा ही सुटला आहे... बाकी काही नाही .... कॅमेरा भिजायचा माझा ... " तिने लगेच कॅमरा झाकून ठेवला.
" पाऊस नाही संध्याकाळ पर्यंत तरी... पण आपल्याला जलद चालावे लागेल आता... " पूजाने सुद्धा तिच्या चालण्याचा वेग वाढवला.

===================================================================

इथे आकाश वेगळ्या वाटेने निघालेला. सोबत सलीम. पावसाने अंधार केला असला तरी पावसाचे कोणतेच चिन्ह नव्हते. आकाश अजूनही पहाटे बघितलेल्या पक्ष्याच्या कसरतीने भारावून गेला होता.
" तू ... मघाशी नाव घेतलेस ना एक .. " सलीमने आकाशला विचारलं.
" हा .... हो .... सुप्री ... सुप्रिया नावं तिचं .... " ,
" बायको ??? " ,
" नाही ... मैत्रीण .... पण होणारी बायको बोलू शकतोस ... " ,
" असं आहे तर .... मग तीही फिरत असते का ... " ,
" नाही... माझ्या सोबत फिरते तेवढंच.... खूप प्रेम करते... तिला सोडूनच तर ..... " आकाश पुढे बोलूच शकला नाही. कदाचित त्याला त्याची चूक कळली होती. आकाशने चालणेही थांबवले. जंगल संपून माळरान सुरु झालेले.
" का थांबलास ??? " सलीमने विचारलं.

" आठवण आली तिची. " आकाश बोलता बोलता आभाळाकडे पाहू लागला.
" तुला माहीत आहे का ... तिलाही आता अंदाज लावता येतो... ",
" तुझ्यासारखीच आहे का ती ... " सलीमच्या बोलण्यावर आकाश छान हसला. पायाखाली हिरवे , लुसलुशीत गवत होते. त्यातच बसला. समोर असलेले डोंगर आता त्या पावसाच्या काळ्या ढगात गुडूप होऊन जात होते. आकाश बोलू लागला.
" सुप्री !! देवाला पडलेलं एक सुंदर स्वप्न.... गणू .... गणपती बाप्पा ला गणू बोलते ती , बरं का ... त्याचीच कृपा आहे तिच्यावर. माझ्यासारखी काय .... कोणासारखीच नाही ती. एकुलती एक म्हणालास तरी चालेल.... गणूने सुद्धा तिला बनवले आणि तिच्या प्रेमात पडला. इतका कि तिच्या सारखं त्याला दुसरं बनवता आलंच नाही. या अश्या भटकंतीमुळेच माझ्या आयुष्यात आली ती. काय स्तुती करू तिची. रात्रीची चांदणी किंवा तारा तुटतो म्हणतात ना... तस झालं तर , तारा पडता क्षणीच तो लगेच टिपून घ्यावा. त्या चंद्रालाही त्याचा थांगपत्ता लागू नये याचा. त्या चांदणी सारखीच आहे ती ... तिचे सौंदर्य डोळ्यात काजळासारखं भरावे किंवा नाकातल्या नथे सारखे सजवावे. परी आहे ती. स्वप्नांत तर येतेच. पण स्वप्नांत सुद्धा स्वप्न दाखवते. स्वप्नाळू सुद्धा आहे हा ती. आवडते खूप मला... खूप प्रेम , ती आहेच सुंदर... मोठी असली तरी कधी कधी लहान गोंडस मुली सारखी भासते... इतकी गोड... बोलके डोळे... डोळ्यात तर अगदी बुडून जायला होते. रुसून बसते कधी ... ऐकत नाही ... त्यातही लाड करून घेते स्वतःचे.... भांडण तर नाही होतं , पण कधी कधी एकदम शांत होऊन जाते ... तेव्हा भीती वाटते .... आपलीच काही चूक झाली का , असे वाटतं राहते ... पण येते काहीवेळाने जवळ.... अशी आहे ती... पण बडबड खूप करते... मला तर बोलायला देतच नाही. माझा एक शब्द तर तिचे चार शब्द.. कधी कधी ६-७-८ शब्द ... हा ... हा ... हा ... !! तरी तिची smile .... कमाल !! त्या smile मुळेच तिच्या प्रेमात पडलो. मलाही आधी माणसं आवडायची नाहीत. तिच्यामुळे विचार बदलले माझे. एकदा तिने साडी नेसली होती. तेव्हाच माझ्या मनात भरली होती ती. तेव्हा पासूनच प्रेम तिच्यावर... तिला आवडायचो मी. माझ्या मनातलं सांगायला वेळ लावला मी. पण जेव्हा सांगितले होते तेव्हा डोळ्यात पाणी आलेलं.... तिच्याही आणि माझ्याही. खूप भावुक आहे ती... किती साऱ्या भावना आहेत तिच्याकडे .... मधेच एखादा जोक करते .. मधेच डोळ्यात पाणी... माझ्याकडे आहेत ना या सर्व feelings ... त्या सर्व तिच्यामुळेच ... ४ वर्ष झाली तिला आता बघून... कशी असेल , काय करत असेल... काय माहित... शेवटचे बघितले तेव्हाही तिने स्वतःचे रडणे सावरले होते. निघून गेली तेव्हा मन घट्ट केले होते. इतकी strong आहे ती....  अशी आहे माझी सुप्री ... माझा पाऊस .. !! "

" जाऊन भेट तिला .. माझ्यासारखा नको राहूस... इतकं प्रेम ... नको सोडू तिला... " सलीम म्हणाला.
" हो ... जाणारच आहे... उद्या राजमाची ची भेट झाली कि थेट तिला भेटायला जाणारा... तुझ्यामुळे जाणीव झाली मला... आधीच जायला पाहिजे होते मी... ते देखील येशील का शहरात... सोबत... " आकाशच्या स्वप्नावर सलीम काही बोलला नाही. खूप वेळाने सलीम बोलला.
" नाही... मी इथेच बरा आहे. आणि शहरात जाऊन काय करू सांग. कोण ओळखीचे नाही.... जे आधी ओळखत होते तेही आता ओळखणार नाहीत मला.... इतकी वर्ष झाली. आणि खरं सांगू .... हेच माझं घर आता... ते तिथे जाऊन .... नकोच ते... शिवाय तू आता एक नवीन स्वप्न दाखवलं आहेस मला ...या निसर्गात इतकी वर्ष फिरत असून सुद्दा मला त्याचे सौंदर्य बघता आले नाही, तू ते दाखवलंस... तेच आता नव्याने शोधीन... शहर नकोच ... " आकाश जाणून होता ते. त्याने जबरदस्ती केली नाही. त्यालाही आता कधी हा प्रवास पूर्ण करतो आहे असे झाले होते. संध्याकाळ झाली आणि पावसाची चाहूल लागली. आकाशने पटापट तंबू उभे केले... पावसाची चाहूल लागली असली तरी पावसाची चिन्ह दिसत नव्हती. आकाश त्याच विचारात. सलीम सुद्धा आभाळाकडे बघत होता.
" काय झालं ... " त्याने आकाशला विचारलं.
" पाऊस नुसता धरून राहिला आहे.. ",
" कदाचित उद्या तुला राजमाची वर भेटणार असेल तो ... " सलीमच्या बोलण्यावर हसू आलं आकाशला.
================================================================

संध्याकाळ होतं आलेली. पावसाने काळोख केलेला. या तिघी राजमाचीच्या पायथ्याशी आल्या. सुप्रीला तर आकाशची ओढ लागली होती. पूजा बोलल्याप्रमाणे आता तो पायथ्याशी असायला हवा होता. पण तो नव्हताच. पूजालाही नवल वाटलं.
" पूजा .... आकाश कुठे..... " सुप्रीने विचारलं. पूजा काय बोलणार.
" थांब... माझ्या आठवणीत तरी आणखी एक जागा आहे.... तिथे थांबायचो आम्ही..... चल... " पूजाच्या मागोमाग सुप्री पटपट चालू लागली. तिथेही आकाश नव्हता.
" कस काय .... आकाश गेला कुठे नक्की... " कादंबरीने पूजाला विचारलं.
" डब्बूच्या मागे तर आहोत आपण ... आणि तो इथे येण्यासाठी निघाला आहे हेही तितकेच खरे... " पूजा म्हणाली. सुप्रीला आता रडू येतं होते.
" थांब .. सुप्री ... रडू नकोस... कदाचित तो वेगळ्या वाटेने गेला असेल.. आपण किती शक्यता मांडल्या आधीही... हेही खरं असू शकते ना ... " पूजाने सुप्रीला धीर दिला.
" पण तो येईल ना उद्या .. " ,
" येणारच तो .... तो नाही चुकवत हा दिवस... आपणच त्याची वाट बघूया उद्या... आधी आपणच गडावर जाऊ... तू नको काळजी करुस ... " पूजा सुप्री शेजारीच उभी होती. सुप्रीचं लक्ष भरलेल्या आभाळाकडे गेलं.
" आज तर नुसता भरून राहिला आहे हा पाऊस ... कुठे आहे रे तुझा मित्र .... तुला तरी माहित असेल ना .... " तिच्या मनात कालवाकालव सुरु होती. आजची रात्रही संपता संपत नव्हती.

================================================================

पहाटे पहाटेच , आकाशने सलीमला जागे केले.
" काय झालं.... इतक्या लवकर जागं केलंस... " सलीम डोळे चोळत जागा झाला.
" अरे ... पाऊस येणार आहे ... जोराचा... तो येण्याआधीच जाऊ ना आपण .... म्हणून ... " सलीम पूर्ण जागा झालेला , वारा तर जोराचा होता ... सू .... सू.... करत जोराने वाहत होता.
" चालेल ना ... निघूया आताच.. " ,
" पावसात चालू शकतोस ना ... " आकाशने सलीमला विचारलं...
" अरे ... हा काय प्रश्न झाला का ... चल रे ... पावसाला नाही घाबरत मी... " सलीम म्हणाला. दोघांनी पटापट सामान आवरले. निघावे म्हणत होते तर पावसाला जोराची सुरुवात झाली. सोबत जोरदार वारा.... कसे निघायाचे... आकाशनेच मग " जरा पाऊस कमी होऊ दे .. मग जाऊया... " असं ठरवलं. निघणे थोडे लांबणीवर पडले.
                वारा - पावसाने आणखी एक तास घेतला. वाऱ्याचा वेग थोडा कमी झाल्यावर हे दोघे निघाले. निघताना आकाशने घड्याळात पाहिलं. पहाटेचे ६:३० वाजले होते. एक तास वाया गेला. नाहीतर आता पोहोचलो असतो. सूर्योदय झालेला तरी पावसाचे इतके गडद ढग आलेली कि सूर्याचे अस्तित्व नसल्यासारखे होते. शिवाय ज्या बाजूने ते चढत होते ती बाजूही आकाशला नवीन होती. वेगळ्या वाटेने आलेले हे. एक बरं कि पावसाचा मारा कमी झालेला. सलीम - आकाश चिंब भिजलेले. थोड्याच वेळात ते गडाच्या दुसऱ्या बाजूने वर पोहोचले. आकाशने खाली जमिनीचे चुंबन घेतले. सलीम तर राजमाची काय आहे , ते बघतच राहिला. असा हा पसरलेला डोंगर , त्यावर गड... तिथून दिसणारा आसपासचा हिरवा निसर्ग... काय वर्णावा.. हा माणूस .... आकाश ... इथे दरवर्षी न चुकता का येतो , ते सलीमला कळलं आता. आसपासच्या डोंगरावरून येणारे काळे ढग... हत्ती प्रमाणेच भासत होते. एकच गर्दी केली त्या ढगांनी. काही पक्षी ... जे पावसाच्या मेघांसोबत प्रवास करतात तेही मध्ये मध्ये " आम्हीही आहोत " म्हणत उडताना दिसत होते. समोरच्या दऱ्यामधून काही झरे ... आधीच ओसंडून वाहत होते. त्यांच्याही सफेद रंगाच्या रांगा लागल्या होत्या डोंगरांवर.... सलीमला कुठे बघू आणि काय काय बघू असं झालेलं. स्वप्नवत होते सर्व. अश्यातच पावसाने त्याचा वेग पुन्हा वाढवला.

" आकाश ... खूप खूप thank you .... मला इथे घेऊन आलास ... " सलीम आकाशला सांगत होता काही. आकाशचं लक्ष त्याच्याकडे नव्हते. त्याला दिसलेलं कोणीतरी.
" थांब सलीम .... तिथे आहे कोणीतरी... मी आलोच बघून... तू थांब इथेच.... " आकाश भरभर निघाला. त्याने दुरूनच जो अंदाज लावला होता तो खरा ठरला.... पूजा आणि तुझ्या सोबत कादंबरी ...
" निरू !! " पूजाला आकाशने मिठी मारली. " तू काय करते इथे... आणि कादंबरी ... तुही आलीस ...ग्रेट !! वाटलं नव्हतं तुम्ही इथे भेटाल ते.. ४ वर्षांनी भेटतो आहोत आपण ..... कशी आहेस निरू... " , पूजालाही आनंद झाला आकाशला पाहून.
" डब्बू .... वाळलास रे.... कसा दिसतोस बघ... माझं सोड ... माझ्यापेक्षा आणखी एक व्यक्ती तुझी खूप आतुरतेने वाट बघत आहे...गेली ४ वर्ष... " पूजाच्या बोलण्याचा अर्थ आकाशला कळला.

पूजाने त्याला समोर बघायला सांगितलं. पुढे कड्याजवळ कोणीतरी उभे होते. पाऊस प्रचंड वेगाने कोसळायला लागला होता. आकाशने ओळखलं तिला ... " सुप्री !! " मोठ्याने आवाज दिला आकाशने. त्या सोसाटाच्या वाऱ्यात , विजांच्या कडकडाटात कुठे जाणार आवाज....... म्हणतात ना ... मन जुळली असली कि काही वेळा बोलायची गरज पडत नाही.... का कुणास जाणे , सुप्रीने मागे वळून पाहिलं. त्याला पाहिलं आणि दोघे एकमेकांकडे चालत जवळ आले. दोघे काही न बोलता बराच वेळ एकमेकांना बघतच होते. पावसाच्या पाण्यात सुद्धा आकाशला सुप्रीचे भरलेले डोळे दिसून आले. आणि मिठी मारली तिला. दोघे एकमेकांना बिलगले. पावसानेही मेहरबानी केली. यांच्या प्रत्येक भेटीला हाही असतोच सोबत. किती ती घट्ट मैत्री आकाश आणि पावसाची.

पूजा - कादंबरी या दोघांजवळ आल्या. " आम्हीही आहोत इथे... " कादंबरी बोलली. पावसाने आवरतं घेतलं. गप्पा - गोष्टी सुरु झाल्या यांच्या. सलीम त्यांना दूरुनच बघत होता. आकाशच्या फार वेळाने लक्षात आलं. सलीमला त्याने जवळ बोलावलं.
" हा सलीम .... अर्थात त्याचं नाव वेगळं आहे... पण माझ्यासाठी सलीमच ... हा नित्य भटकंती करत असतो.. याने खूप मदत केली या प्रवासात ... खूप जवळचा मित्र झाला आहे माझा .... " कादंबरीने त्याला ओळखलं.
" तुम्ही जर त्या देवीच्या यात्रेत सांगितलं असत कि आकाश आहे सोबत ... एवढी धावपळ झाली नसती आमची... पण ठीक आहे .... सॉरी वगैरे बोलू नका आता ... " कादंबरीने आधीच सर्व बोलून टाकलं. सलीम बिचारा काय बोलणार .... गप्पच होता आणि हसत होता. बराच वेळ यांच्या गप्पा सुरु होत्या.

निघायची वेळ झाली. पूजा-कादंबरी भावुक झालेल्या. " निरू ... तुझ्यामुळे सुप्री पुन्हा भेटली... कसे आभार मानू... " ,
" वेडा आहेस का डब्बू .... गप्प ... काही काय बोलतोस .... हा पण एक वचन दे मला... यापूढे सुप्रीला कधीच सोडायचे नाही... अंतर नाही देयाचे तिला. दे वचन !! " आकाशने वचन दिलं.
" आणि तुही प्रॉमिस कर ... जेव्हा जेव्हा आजीला भेटायला येशील ना , तेव्हा तेव्हा मला जरूर भेटायला यायचे. आणि ११ जून ... आजचा दिवस... दरवर्षी आपण इथे भेटायचेच... " पूजाने प्रॉमिस केले आणि पुन्हा मिठी मारली आकाशला.
" मला विसरली लोकं ... एकतर शेवटी जेव्हा भेटलो होतो तेव्हा सांगितल नाही , तुम्ही ग्रेट फोटोग्राफर आहेत ते .... फोटोग्राफी शिकवायची नाही ते सांगायचे ना आधी .... " आकाशला हसू आलं कादंबरीच्या बोलण्यावर.
" नाही नाही... शिकवीन हा फोटोग्राफी..... जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा जरूर ये शहरात ... मी शिकवीन तुला... " कादंबरी आनंदली. राहता राहिला सलीम.
" तू शहरात आला असता तर बरं झालं असत ... पण फोर्स नाही करणार तुला.... " ,
" तुझ्यामुळे नवीन आयुष्य मिळालं आहे मला..... पुन्हा भेट होईल ना आपली... तेव्हा मी तुला घेऊन जाईन , निसर्ग सौंदर्य बघायला ... आणि हो ... पाऊस बघायला सुद्धा... " सलीमने हात मिळवला आकाश सोबत. सर्व आपापल्या वाटेने निघाले. तरी आकाशने धावत जाऊन सलीमला अडवलं.
" काय झालं ... " सलीमने विचारलं.
" एक राहिलेलं ... " म्हणत आकाशने सलीमला मिठी मारली. सलीमलाही भरून आलं.
" तू नेहमीच लक्षात राहशील मित्रा.. " सलीम इतके बोलून निघून गेला. पूजा - कादंबरी ही नजरेआड झाल्या. आकाशने सुप्रीकडे पाहिलं. तिचा हात हातात घेतला आणि शहराकडे निघाले.
 शहरात आल्या आल्याचं पुढच्या ४ दिवसातच... अर्थात पावसाच्या साक्षीने या दोघांचा साखरपुडा पार पडला. लग्नही पुढल्या महिन्यात ठरवून टाकलं. आता आकाश सुप्रीचाच होता. त्यात आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या मॅगजीन साठी आकाश फोटोग्राफी करायचा , " wild india " त्यांचेही यंदाचे हे पंचविसावे वर्ष होते. ग्रेट !! आकाशने खास विनवणी करून त्याने त्यावर्षीच्या मॅगझीनचे मुखपृष्ठ निवडण्याची परवानगी मागितली. मॅगजीन इंग्लिश होते तरी आकाशच्या डोकयात काही वेगळंच होते. सुप्रीलाही काय नक्की special होते ते माहित नव्हते. आकाशनेही सांगितलं नव्हते. आणि तो दिवस आला, मॅगजीन छापून तयार झाले आणि बुक शॉपमध्ये विकायला आले. आकाशला तर असेच मिळाले असते ते मॅगजीन तरी आकाशने ते घेतले नाही.

सुप्रीला घेऊन तो एका बुक शॉपमध्ये गेला. तिथूनच त्याने मॅगजीन विकत घेतले. सुप्रीला किती उत्सुकता ... मुखपृष्ठ बघायची. तिनेच आधी पाहिलं. सलीमचा फोटो होता तो. एक कच्चा रस्ता.... त्या पलीकडे अशी उभी हिरवी शेतं ... दूरवर पसरलेली... नुसता हिरवा रंग... या दोघांमध्ये एक पिंपळाचे मोठ्ठे झाड...आणि त्या झाडाखाली सिगारेट पेटवत उभा असलेला सलीम .... काय सुंदर फोटो होता तो... अप्रतिम !! .... त्याही पेक्षा जास्त छान होते ते, त्याखाली आकाशने लिहिलेलं ... तेही मराठीत ......यासाठीच आकाशने खास परवानगी मागितली होती. काय लिहिलं होतं फोटोखाली....
" काही माणसं खरंच जगतात .... " ...

सुप्री ते वाचून भारावून गेली. " माझी आणि त्याची पहिली  भेट झाली होती , तेव्हाचा फोटो आहे हा ... तुला नाही कळणार , काय माणूस आहे तो ... खरं प्रेम केलं ते त्यानेच .... आणि त्याचे ते तसं जगणं ... त्याला मनापासून सलाम माझा ....त्यासाठी काही करायचे होते.. यापेक्षा जास्त काय चांगले करू शकतो मी... " सुप्रीने आकाशला मिठी मारली. दोघे चालत चालत समुद्र किनाऱ्याकडे चालत निघाले... हातात हात घालूनच. नवीन प्रवास सुरु झालेला आकाशचा. एक नवीन वळण आलेलं त्याच्या आयुष्यात. लग्नाच्या आधीच त्यांनी कुठे कुठे फिरायचे ... कोणते गड - किल्ले पादांक्रात करायचे हे ठरवले होते. नवीन स्वप्न आणि नवीन वाटा घेऊन आकाश आता पुन्हा एका नव्या भटकंती साठी तयार होत होता. खरंच !!! एक नव्या वाटेवरची भटकंती आता सुरु होणार होती. भटकंती .... नव्या वळणावरची. !!!


================================== समाप्त =================







Followers