All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 18 April 2020

" माझं - तुझं .... " ( season 1 - episode २ - मोबाईल )


" तू जाने ना.......तू ....... जाने ना......." निनाद तार स्वरात गाणं गात होता. हेमांगी जेवण बनवत होती. आज शनिवार ... weekly off , दोघांनाही... दुपारी जेवणासाठी इडलीचा बेत ठरवला होता हेमांगीने. निनादचा आवाज ऐकला आणि त्याला " नक्की काय झालं " हे बघायला किचन मधून बाहेर आली. कानात इअरफोन लावून निनाद गाणं गात होता. हेमांगी बाहेर आलेली बघून त्याने पट्कन कानातून इअरफोन काढले.

" बघ ... तुलाही माझा आवाज आवडला ना ... ",
"आवाज ऐकूनच बाहेर आली मी...... " ,
" शेवटी तुलाही मान्य करावं लागलं ... मी किती छान गातो ते .... " निनाद स्वतःची स्तुती करण्यात मग्न. हेमांगीने टाळ्या वाजवल्या.
" मी मोठा गायक होणार बघ.... तुला काय वाटते , मला आणखी तालीमीची गरज आहे ना ... मी काय बोलतो, गाण्याचा क्लासच लावतो उद्यापासून ....... उद्यापासून कशाला ... आताच जाऊन चौकशी करतो , जमल्यास admission पण घेऊन टाकतो. काय म्हणतेस ... " निनाद भुवया उडवत म्हणाला.
" काही नको .... " हेमांगी म्हणाली. " मला वाटलं , स्वतःच स्वतःचा गळा दाबतो आहेस कि काय ... म्हणून बघायला बाहेर आली. " हेमांगी हसतच किचनमध्ये गेली पुन्हा. निनाद तिच्या मागोमाग.

निनाद नाराज झालेला... " कसली आवड नाही तुला .... नवऱ्याचं कौतुक करावं जरा .... " हेमांगी इडली काढत होती.
" कौतुक तर आहे तुझं ..... पण गाणं .... नाही जमणार तुला ..... हे खरं .. " पुन्हा नाराज झाला निनाद .... मोबाईल किचन मधेच ठेवून बाहेर गेला. हेमांगीला गंमत वाटली. गॅसवर इडलीचे भांडे ठेवून बाहेर आली. रुसलेल्या नवऱ्याला हसवूया म्हणून बाहेर येतं होती. तर निनादचा मोबाईल वाजला. तो तर किचन मधेच ठेवून गेलेला. तिने बघितला. " निनाद ....निनाद ....तुला कॉल आला आहे कोणाचातरी... " तिने आतूनच आवाज दिला.

मोबाईल घेऊन हॉलमध्ये आली.  " नि .... ना .... द .. !! कोणाचा तरी कॉल आहे ... " निनाद हॉलमध्ये सोफ्यावर गाल फुगवून बसला होता. हेमांगीच्या हातात मोबाईल बघितला.
" तुला मी १०० वर्षपूर्वी सांगितलं आहे... माझ्या मोबाईलला हात लावू नकोस म्हणून..... " निनाद बोलला आणि हेमांगी जागच्या जागी थांबली.
" ok .... जिथे होता तिथे ठेवते .... येऊन घे " तुझा मोबाईल ".... " केस उडवत हेमांगी किचन मध्ये निघून गेली.
" थांब....थांब....हेमा ... अगं मस्करी केली ... हे बघ हसते आहे मी .... हि...हि...हि...!! सहज बोललो , दे मोबाईल... "
निनाद तिच्या मागोमाग ... हेमांगी कसली ऐकते त्याचं.. किचनमध्ये इथे होता तिथेच ठेवून दिला तिने. निनाद मोबाईलपर्यंत पोहोचला तोवर कॉल बंद झालेला. निनादने बघितला.
" बॉसचा कॉल आलेला... बापरे !!! ..... हेमा ...दिला असता वेळेत तर बोललो असतो ना ... काय तू .... " निनाद नकारार्थी मान हलवत म्हणाला. हेमांगीने कमरेवर हात ठेवले.
" बघ ... माझ्याकडे वेळ नाही ... जेवण करायचे आहे... एकदाच सांगते, .... इडली सोबत चटणी पाहिजे ना ... मिक्सरमध्ये वाटायची आहे... जास्त बोललास ना अजून त्या चटणी सोबतच तुझा मोबाईल मिक्सर मध्ये टाकीन.... चालेल तर सांग... " निनाद मोबाईल घेऊन बाहेर पळाला.

हेमांगीने तिचे काम संपवले आणि निनाद कुठे गेला हे बघायला बाहेर हॉलमध्ये आली. नव्हता तिथे ... रागात बोलली त्याला ... नाराज झाला असेल ...... गेला कुठे हा ... हेमांगी विचार करत बेडरूममध्ये गेली. बघते तर बेडरूमच्या गॅलरीत मान खाली घालून बसलेला. खरच नाराज झाला हा ... हेमांगी जवळ जाऊन बघते तर पुन्हा कानात इअरफोन लावून बसलेला. हेमांगीने बाहेर काढले ते...
" मला वाटलं नाराज झाला आहेस ... म्हणून बसला असा तू ... हातात पुन्हा खेळणं घेऊन बसला आहेस .. " ,
" हि... हि... हि... " , निनाद खोटे खोटे हसला ...
" सारखं सारखं काय मोबाईल... सकाळी उठल्या पासून ... रात्री बेडवर सुद्धा .... तेच "  ,
" cool down !! cool down !!.... ठेवतो बाजूला मोबाईल ... " निनादने लगेच मोबाईल खिशात टाकला.
" खिशात नाही ..... " हेमांगी ओरडली.
" मग हातात ठेवतो ... " ,
" तरी पण तेच .. " आता निनाद घाबरला.
" सॉरी सॉरी ... हा बघ ... ठेवला बाजूला ... " तिथे शेजारीच असलेल्या टेबलावर ठेवून दिला.
" आता कस ... शाब्बास !!! good boy ..... " हेमांगीने त्याच्या पाठीवर शाबासकी दिली. " इडली तयार आहे.... अरु आणि संदीप कडे घेऊन जा जरा ... " निनादला बोलली पण निनाद गाल फुगवून उभा. तिला हसू आलं.
" काय झालं रे ... " ,
" दिसत नाही का ... राग आला आहे मला.. हे बघ .... रागाने गाल फुगले आहेत माझे.. ",
" हो का .... बर ... मग गाल फुगवून बोलता येते का माणसाला..... " हेमांगी स्वतःच्या बोलण्यावर हसू लागली.
" शी यार ..... रागावू पण देत नाहीस .. जरा तरी घाबर मला .... मी किती घाबरतो तुला .... " ,
" शाब्बास पोरा .... असाच घाबरत रहा .... " हेमांगीने पुन्हा पाठीवर थाप मारली.
" जाऊन ये आधी .... इडली गरम आहे , लवकर देऊन ये ... तू आलास कि घाबरते हा तुला ..... " तिने हातात २ डबे ठेवले निनादच्या.
" कमाल आहे तुझी .... " म्हणत संदीपकडे गेला. एका हाताने बेल वाजवली. संदीपाने उघडला दरवाजा.
" Hi वहिनी ... कमाल आहे का ... " निनाद बोलला. संदिपा confused... " सॉरी सॉरी ... संदीप आहे का .... " ,
" असं बोला ना भावोजी .... संदीप आताच बाहेर गेला आहे ... पाय मोकळे करायला ... " ,
" वा !! तुम्हाला पण सुट्टी असते शनिवार - रविवार ... पण बिजनेस आणि सुट्टी ... " ,
" अहो भावोजी... आम्हीच ठरवलं आहे अशी सुट्टी घेण्याचे.. रविवारी फक्त सुट्टी असते सर्वांना... आज सुरू असते ऑफिस.. बाकीचे आहेत ना काम करणारे ... ते सांभाळतात एक दिवस... " ,
" छान छान ... पण मला भावोजी बोलू नका ... खूप मोठा असल्यासारखे वाटते... नावाने बोलू शकता.... " संदिपाने मान डोलावली.
" एकेरी बोलीन हा .... " ,
" thank you .... इडली दिली आहे हेमाने ... संदीपला पण द्या ... येतो मी... अरुच्या घरीही असतील ना सर्व आज .... ",
" हो हो ... सर्वच भेटतील तुला .... " निनाद अरुकडे गेला.

अरुनेच दरवाजा उघडला. " Hi डुग्गु .... " ,
" Hi अरु .... आज चक्क घरात तू .... आईने बाहेर काढलं नाही तुला ... " निनाद तिची मस्करी करत म्हणाला.
" हो .... असणारच ना मी घरी....हे नवे घर आहे .... जुने घर सोडून आलो ना आम्ही... तसं तर माझ्या पप्पानी सिगरेट तर कधीच सोडून दिली. तुला सांगते ना डुग्गु ... सिगरेट मुळे खूप धूर होतो... मला नाही आवडत धूर .. तो ना ... आमच्या जुन्या सोसायटी मध्ये कधी कधी धुरवाला यायचा.. ते मच्छर असतात ना त्यांना पळवण्यासाठी ..... धूर आला कि मीही पळायचे.... एकदा तर माझा दुसरा नंबर आलेला पळण्याच्या शर्यतीत .... " अरु बोलतच होती आणखी पूढे , निनादने एक इडली पट्कन तिच्या तोंडात कोंबली. " आई - पपांनाही दे ... एकटी नको खाऊस.... " निनाद सटकला तिथून.

निनाद आला घरी पण मोबाईल जवळ नाही हे लक्षात आलं. घाबरला. " हेमा !! हेमा !! "  ओरडतच तो आत आला. हेमा किचन मधून जेवण बाहेर घेऊन येत होती.
" एवढी भूक लागली तुला ..... वाढतेच आहे ... तुला आवडते म्हणून इडली केली मी... " ,
" अगं तस नाही... " ,
" इडली नको ..... कमाल करतोस हा तू ... सकाळीच सांगायचे होते मग ... केली नसती इडली .... " ,
" अगं आई ..... ऐकून तर घे ... एकतर अरु पासून कशी सुटका केली ते मलाच माहित ... निदान तू तरी थांब... बोलू देशील का मला.... " ,
" म्हणजे तुला काय म्हणायचे आहे .... मी तुला बोलू देत नाही ... हे साफ चुकीचे आहे ... " निनाद आता खरच वैतागला.

" एकच सांग ... माझ्या डोक्यावरचे केस तू उपटतेस कि मी स्वतः उपटू ... " निनाद म्हणाला. हेमांगी हसत होती. मुद्दाम करत होती ती.
" अगं , माझा मोबाईल कुठे आहे ते विचारत होतो मी.... ",
" आधी जेवून घे ... मग मोबाईल ..... " .
" दे ना गं .. प्लिज .... कोणाचा तरी कॉल आला असेल... दे ना ... पाया पडतो तुझ्या... प्लिज.....प्लिज.....प्लिज.....!!  " ,
" आधी पाया पड .. मग देते... " शेवटी निनादला पाया पडायला लागलेच.
" दे आता .. " ,
" माझाकडे नाही मोबाईल .... तू विसरलास... तू मघाशी बेडरूम मध्ये ठेवला तिथेच आहे. " हेमांगी बोलली. निनाद आत जाता जाता थांबला. हेमांगीला जीभ काढून दाखवली आणि बेडरूममध्ये गेला.

हेमांगीने वाढायला घेतलं. निनाद मोबाईल घेऊन आला.
" वाईट ...... अगदी वाईट असतात काही माणसं ... " निनादने हेमांगीला टोमणा मारला.
"असू दे वाईट .... तूच नाही का सांगितलं मला ... १०० वर्षांपूवी , मोबाईलला हात लावू नकोस म्हणून.. " हेमांगीने उलट टोमणा मारला.
" पाप लागते असे ... समजलं ना ... कोणाच्या भावनांशी खेळायचे का ... " ,
" हो का ... मग काय तुझ्यासारखं सारखे सारखे मोबाईल वर खेळायचे असतं का ..." इडली खात हेमांगी म्हणाली.
" एक तर game आहे ... त्यात पण ५ life संपल्या कि खेळू शकत नाही.... म्हणे सारखा सारखा game ... " ,
" मोबाईलला तर चिकटलेला असतोस... दिवस रात्र .... आणि किती जुना आहे तो ... इतके नवीन नवीन फोन आले आहेत... घे ना नवीन .... एवढ्या मोठ्या पोस्ट वर आहेस ना ... तुला तुझे office colleagues काही बोलत नाहीत .. " ,
" असू दे ..... जुना असला तरी माझा पहिला मोबाईल आहे हा ... एक मिनिट ..... तरीच ... ऑफिसमधला एक जण त्यादिवशी बोलला...ऑफिसची इमारत जुनी आहे कि माझा मोबाईल... थांब.... त्याला बघतोच सोमवारी.... " निनाद हातातली इडली चुरगळत म्हणाला.
" तरी बरा चालतो.... तुझा जुना मोबाईल... " हेमांगीने पुन्हा टोमणा मारला.
" असू दे हा ... जुना ...... old is gold .... ",
" बघत काय असतोस इतका त्यात ... " ,
" मी जास्त काही ठेवतच नाही यात काही ... एक game .... you tube , आणि whatsapp .....  मेमरी कमी आहे ना म्हणून... you tube वरच गाणी ऐकतो.... एक मिनिट... तू संशय घेते आहेस का माझ्यावर ..... तुला काय वाटते ... सारखा मोबाईल वापरतो म्हणजे माझं काही लफडं सुरु आहे ... असच वाटते ना ... बोल ... " हेमांगी हसली त्यावर...
"चल ... झालं ना खाऊन ... मी आवरते .... " हेमांगी भांडी आवरू लागली.
" ओ हेमा मॅडम ... उत्तर दिले नाही तुम्ही.... " ,
" तुझे काही बाहेर सुरू असेल ... असे वाटणे काय .... स्वप्नांत सुद्धा विचार येणार नाही कधी... " हेमांगी भांडी किचन मध्ये घेऊन गेली.


दारावरची बेल वाजली. निनादने पट्कन हात धुतले आणि दरवाजा उघडायला गेला. दारात अरुचे वडील आणि संदीप होता.
" काय करतो आहेस प्रीतम... " संदीपने निनादला विचारलं.
" निनाद ... निनाद .. नाव आहे माझं.... " ,
" तेच ते ... ये बाहेर गप्पा मारायला....काही करतो आहेस का  " ,
" नाही तस काही नाही ... हेमाला जरा मदत करतो आहे आवरायला. " निनाद बोलत होता तर हेमांगी बाहेर आली.
" Hi वहिनी.... इडली कमाल झालेली... " अरुचे वडील बोलले.
" thank you !! thank you !!..... दारात का उभे तुम्ही..... आत या ना ... " ,
" नको नको .... आम्ही याला घेऊन जायला आलो आहोत.. याला आवडते ना बोलायला .... गप्पा मारायला घेऊन जातो.... " ,
" जरूर घेऊन जा ... सारखा मोबाईल - मोबाईल .... निनाद जा तू ... मी आवरते..... " ,
" आणि हो .. वहिनी... आज रात्रीचे जेवण आमच्याकडे आहे हा .... तेच सांगायला आलो होतो. " , अरुचे वडील म्हणाले.
" कशाला उगाचच त्रास तुम्हाला ... " हेमांगीला बोलूच दिलं नाही पुढे.
" आग्रह करत नाही... तुमच्या मोठ्या बहिणीची ऑर्डर आहे असे समजा ... " अरुचे वडील हसत म्हणाले.

" जाऊ गं हेमा .... एवढा आग्रह करतात तर ..... नको करू रात्रीच जेवण.... " निनाद म्हणाला.
" चल मग ... येतो आहेस ना ... छान पैकी गप्पा मारू... " निनाद या दोघांसोबत निघून गेला. मोबाईल मात्र घरातच ठेवून गेला. हेमांगी तिच्या कामात गुंतून गेली.

तब्बल ३ तासांनी निनाद घरी आला. आला तोच मोबाईल , मोबाईल करत ...
" हेमा कुठे आहे माझा मोबाईल ... दे बरं ... " ,
" मी नाही घेतला... " हेमांगी म्हणाली. निनाद तिच्या पाया पडला.
" दे आता ... पाया पण पडलो. " हेमांगी हसू लागली.
" मी खरच सांगते आहे... मी नाही घेतला मोबाईल ... " ,
" दे ना यार ... खरं बोलते आहेस का ... " निनादच्या या बोलण्यावर तिने कमरेवर हात ठेवले.
" सॉरी सॉरी ... बघतो मीच कुठे आहे मोबाईल ते .... इथेच असेल .... " निनाद शोधाशोध करू लागला.
" थांब ... मी कॉल लावून बघते... रिंग तर वाजेल ना .... " हेमांगीने कॉल लावला तर स्विच ऑफ....
" बंद आहे तुझा मोबाईल... कुठे ठेवला होतास नक्की... ",
" नाही आठवत मला .... आपल्या घरात कोणी आलेलं का.... " ,
" नाही ... कोण कसं येणार ... दरवाजा तर बंद असतो आपला.... तू ना ... बाहेर विसरून आला असणार ... ",
" हो गं .... मी जाऊन येतो .... " निनाद धावतच बाहेर गेला.

संध्याकाळ झाली. काळोख झाला तेव्हा निनाद घरी आला. " गेला माझा मोबाईल .... आता काय करू मी.. "  रडक्या आवाजात निनाद म्हणाला. हेमांगीने त्याचा आवाज ऐकला. ती कोणतेतरी पुस्तक वाचत होती.
" मोबाईल शिवाय बाकी खूप गोष्टी आहेत..... पुस्तक वाच... TV बघ. " हेमांगी पुस्तक वाचतच म्हणाली. पुन्हा गाल फुगवून बसला निनाद.
" कोणाची तरी वाईट नजर लागली.... माझा बिचारा मोबाईल.... " निनाद पट्कन बोलला.
" पुस्तक फेकून मारिन हा ... समजलं ना ... आणि हे काय रडका चेहरा ... असं येणार आहेस जेवायला... " ,
" न...... को...... आ...... हे......  म...... ला...... जे...... वा...... य...... ला.... " निनाद हळूच पुटपुटला.
" मी काही केले नाही आहे... मी बाबा जाणार आहे जेवायला.... कोणाला माझ्या सोबत यायचे असेल तर येऊ शकतात... " पुस्तक बंद करून हेमांगी बेडरूममध्ये गेली.
" माझा मोबाईल ..... " निनाद रडक्या आवाजात सोफ्यावर हात पसरून झोपला.

काही वेळाने हे दोघे अरुकडे जेवायला आले. निनाद तसाच पडक्या चेहऱ्याने आलेला. " welcome !! या या .... तुमचीच वाट बघत होतो सर्व .... " अरुचे वडील होते स्वागत करायला. निनाद खोटे खोटे हसला.
" सर्व ... ?? म्हणजे .... " हेमांगीने विचारलं.
" संदीप आणि संदिपा सुद्धा आहेत... त्यांनाही बोलवतो आम्ही ..... एकत्र जेवलो कि जिव्हाळा वाढतो ना .... तसंही ते आणि आम्ही काय वेगळे आहोत का .... फॅमिली आहे तीही आमची... आणि तुम्हीही फॅमिली मध्ये आहात आता." अरुचे वडील बोलले ते ऐकून हेमांगीचे डोळे चमकले. निनाद आणि ते एकमेकांकडे बघू लागले. छान smile आली तिच्या चेहऱ्यावर. संदिपा आली किचन मधून बाहेर आली.
" हेमा ... दारातच उभी राहणार का ... आत ये ... निनाद .. तुला काय वेगळे सांगावे का ... चल .... " हेमांगी गेली किचन मध्ये. निनाद तसा नाराज होता, मोबाईलचा विचार सारखा... उगाचच बोलत बसला होता या दोघांसोबत. अरु मात्र गॅलरीत मोबाईलवर बोलत होती. निनादचे लक्ष राहून राहून तिच्याकडेच जात होते. जुने दिवस आठवले त्याला... बसल्या बसल्या स्वप्नांत गेला. त्याला दिसू लागलं, मोबाईल वर गाणी ऐकत आहे, game ची एक level पूर्ण केल्यावर नाचत होता slow motion मध्ये... कानात इअरफोन लावून मोबाईल सोबत डान्स करत होता... काय ते दिवस होते ....
" मित्रा .... अरे काय बोलतो आहे मी .... लक्ष आहे कि नाही.... " संदीपने त्याला त्या slow motion स्वप्नातून बाहेर काढलं.
" चला जेवायला.... " हेमांगीने सर्वांना आवाज दिला. सर्वांनी हात धुतले आणि जेवणाच्या टेबलावर जमले. छान बेत जमवला होता. निनादचा मूड नव्हता. त्याने सर्व जेवणाकडे एकदा नजर टाकली. डोळे विस्फारले त्याचे...... मोबाईलची बिर्याणी.... हा काय प्रकार आहे. त्याने बाजूच्या भांड्यात पाहिलं. भरलेला मोबाईल... दुसरीकडे मोबाईलचा ज्युस... मोबाईलचे सलाड.... मोबाईलची कढी ... निनाद डोळे चोळू लागला.
" काय झालं संदीप... " संदीपने निनादला विचारलं.
" त्याच नाव निनाद आहे ... संदीप ... तुझे नाव आहे रे ... " अरुच्या वडिलांनी संदीपला सांगितलं.
" हा तेच ते ... " सर्वच निनाद कडे पाहू लागले. " मी जरा तोंड धुवून येतो ... " निनाद वॉश बेसिन कडे जाऊन तोंड धुवून आला. जागेवर बसला. पुन्हा त्याने सर्व पदार्थाकडे नजर टाकली. आता सर्व नॉर्मल दिसत होते. " करा सर्वांनी जेवायला सुरुवात.. " निनादच बोलला.

जेवत तर होता. तरी त्याचं फारसे लक्ष नव्हते त्यात. संदिपाला कळलं ते.
" काय झालं निनाद .. जेवणात लक्ष नाही... " ,
" काही नाही ... असंच .. " निनाद खोटं खोटं हसला.
" मी सांगतो ... " संदीप म्हणाला. " त्याचा मोबाईल हरवला आहे. " हेमांगीने निनाद कडे पाहिलं.
" तो पण माझ्या सोबत मोबाईल शोधत होता. " निनाद हळू आवाजात म्हणाला.
" हरवला म्हणजे .... " अरुच्या आईने विचारलं.
" हरवला म्हणजे हरवला ... दुसरे कसे सांगणार ... " निनाद म्हणाला.
" जुनाच होता ... हरवला ते बरंच झाल. " हेमांगी भरली वांगी खात म्हणाली.
" मोबाईल हरवला म्हणजे कमालच झाली. " अरुचे वडील म्हणाले.
" होय .... आता काय करणार... " निनाद म्हणाला.
" हो ..... कोण काय करणार ... तरी मोबाईल हरवला म्हणजे.... " अरुचे वडील म्हणाले.
" जाऊ द्या ओ ... फारच दुःख वाटते मला ... " ,
" दुःख तर होणारच ना ... मोबाईल हरवला म्हणजे.... " अरुचे वडील पुन्हा बोलले.
" पुरे ... " अरुची आई बोलली.

" तसा हि जुना होता ... actually , मोबाईल जास्त वापरणे म्हणजे वाईट सवय .... हो ना अरु .. " हेमांगीने चुकून शांतपणे जेवणाऱ्या अरुचे नाव घेतलं.
" हो तर .... मोबाईल जास्त वापरणे म्हणजे वाईट सवयच... , मला बघ डुग्गु... एकही वाईट सवय नाही.. सर्वच चांगल्या सवयी आहेत. आईला कामात मदत करते, कॉलेजचा अभ्यास करते, देवळात जाते. देवळाच्या शेजारी एक गाय असते, तिला खाऊ घालते. गाय चांगली असते. ती दूध देते. दूध मला आवडते म्हणून गाय मला आवडते. तशी म्हैस पण दूध देते. तो आमच्या कॉलेज मध्ये एक मुलगा आहे ना .. निशांत ...तो त्याच्या आईला म्हैस म्हणतो ... मारकुटी म्हैस .... " अरु बोलणे पुढे वाढवत होती तर अरुची आई मधेच बोलली.
" अरु बाळा .... जरा पाणी घेऊन येतेस का ... मी आणले आहे ते कमी वाटते मला... जरा घेऊन येतेस का "  अरु लगेच गेली.

" निनाद भावोजी .... नका टेन्शन घेऊ, मिळेल मोबाईल... घरात असेल तर .... नाहीतर नवीन घ्या... एका वस्तूसाठी आताची वेळ नका वाया घालवू...... " अरुची आई म्हणाली , ते निनादला थोडेतरी पटलं. नंतर छान पंगत जमली. छान झालं जेवण. हेमांगीने आवरायला मदत केली. गप्पा मारत मारत रात्रीचे १०:३० कधी वाजले कळलंच नाही. सर्व कामे झाली तसं निनाद-हेमांगी घरी आले. घरात आल्या आल्या दोघे झोपायला गेले.
" आठवण येते गं ... थोडीथोडी ... " निनाद हळूच म्हणाला.
" आईची का ... " हेमांगी केस बांधत होती.
" मोबाईलची ... " ,
" निनाद .... पुरे आता... उद्या नवीन घे , गेला ना तो जुना .... उद्या घरची साफसफाई करायची आहे... आहे ना लक्षात ... " हेमांगी बोलत होती.
" तेरे बिना भी क्या जीना.... " निनाद रडक्या आवाजात गाणं गात होता. हेमांगीने त्याला उशी फेकून मारली.
" चुपचाप झोप आता... नाटकं नकोत ... उद्या लवकर उठून सफाई करायची आहे... फिरून आल्यापासून जरा साफसफाई केली नाही आपण , चल झोप .. " हेमांगीने त्याला दम देऊन झोपवलं.
सकाळी ८ चा अलार्म लावला होता. हेमांगी जागी झाली. हेमांगीने बघितलं , निनाद नव्हता शेजारी. गेला कुठे. डोळे चोळत ती त्याला बघू लागली. बघते तर गॅलरीत बसलेला. हेमांगी जवळ आली.
" काय रे .... किती वाजता उठलास .... कि झोपलाच नाहीस .... " निनादच चेहरा प्रसन्न वाटत होता.
" झोपलो होतो कि ... किती दिवसानी अशी पूर्ण झोप झाली... " ,
" कसं काय ... रोज तर झोपतोस ना ... " ,
" रोज उशिरा झोपतो ... १२: ३० तरी होतात ..... ते you tube वर गाणी ऐकत असतो किंवा विडिओ बघत असतो. मित्रांसोबत whatsapp वर chatting ..... उशिराने झोप आली कि मोबाईल बाजूला ठेवतो. काल यातलं काहीच झालं नाही... ११ वाजताच झोपलो, रात्रीच जेवण खूप छान झालं आणि मोबाईलही नव्हता. पट्कन झोपलो. आताच म्हणजे ७:३० ला जाग आली. आपोआप .... छानच झोप मिळाली. " निनाद अंघोळीशिवाय प्रसन्न वाटत होता.
" चला देव पावला. काहीतरी डोक्यात गेलं .... " निनाद छान हसला. " कामाला लागू या ... दुपारच्या आत पूर्ण करू ... मग जेवणाचे बघता येईल. " हेमांगीचा प्लॅन पटला त्याला. दोघे लगेचच साफसफाईला लागले. आधी दोन्ही बेडरूम साफ करून झाले. त्यानंतर बाथरूम-टॉयलेट ... सर्वात शेवटी हॉलकडे आले. दोघेही दमलेले.

निनाद त्या सोफ्यावर झोपला. " निनाद यार !! एकतर घामेजलेला आहेस... सोफा खराब करशील ना ... " हेमांगी ओरडली त्याला.
" दमला गं तुझा नवरा ... सुपरमॅन नाही मी. तुझ्याकडे इतकी ताकद कुठून येते... कळत नाही. जरा विश्रांती घेतो मी. " ,
" नको ना निनाद ... घड्याळ बघ.. ११:३० वाजले... मला जेवणही बनवायचे आहे... उठ ना रे ... तेवढा सोफाच राहिला आहे फक्त... त्यावरच झोपला आहेस .. चल .. उठ .... दोघे मिळून साफ करू... " निनाद उठला शेवटी.
" ती सोफ्यावरची गादी... धूळ असेल त्यात.. बाजूला काढून दे ... मी झाडते. " निनादने ती गादी उचलली. आणि निनादचे लक्ष लगेचच त्या गादी खाली असलेल्या मोबाईल कडे गेलं.


" मिळाला !!! " निनाद केव्हढ्याने ओरडला. हातातली गादी त्याने खाली टाकली. हेमांगीने कपाळाला हात लावला. निनादने मोबाईल उचलून हातात घेतला. त्याचा किती वेळा kiss घेतला.
" शी ... निनाद ... !! मूर्खां .... धूळ - घाण लागली असेल त्याला.. त्याचा काय kiss घेतोस..... घाणेरडा कुठला .... ठेव तो आधी बाजूला.. " हेमांगी बोलली पण निनाद आनंदाने उड्या मारत होता.

" तरीच ... याची बॅटरी संपली, म्हणून कॉल लागत नव्हता. हा .... आठवलं.. मी काल मोबाईल सोफ्यावर ठेवून बाहेर गेलो होतो... या गादीच्या फटीतून खाली गेला असणार... thank you देवा ... माझा मोबाईल दिलास मला... हेमा ... चार्जिंग ला लावतो हा मोबाईल... " निनाद गेला बेडरुम मध्ये.
" करायचं का काम साहेब .... कि तुला game खेळायचा आहे... " हेमांगीने निनादला आल्या आल्या विचारलं.
" सवाल काय ... चार्जिंग झालं कि लगेच game सुरु .. अजून काय पाहिजे life मध्ये... " निनादच्या बोलण्यावर हेमांगीचा चेहरा बदलला.
" मस्करी केली गं पोरी ... चल काम संपवू ... " दोघांनी लगेच काम संपवले.

निनाद फ्रेश होऊन त्याच सोफ्यावर बसलेला. हेमांगी सुद्धा तयार झालेली. " साधंसं बनवते जेवायला... दुपारचे १२ वाजून गेले ना.. नाहीतर वेळ होईल जेवायला.... " हेमांगी त्याला सांगून किचन मध्ये जातच होती तर निनादने तिचा हात पकडून शेजारी बसवलं.
" नको काळजी करुस .... बाहेरून मागवू ... दमली असशील ना ... super woman असली तरी थकायला होते ना ... बाहेरून मागवतो मी ... माझ्या मोबाईल वरून .... " निनाद खुश होता.
" व्वा !! आज भलताच खुश आहेस... हा .... मोबाईल मिळाला म्हणून ना... असणारच खुश .... " ,
" मोबाईल मिळाला म्हणून नाही ... काही नव्याने कळलं ... अरुची आई बोलली ते , एखाद्या वस्तूत इतके गुंतणे वाईटच ... काल संध्याकाळ पासून मोबाईल हरवला.. त्या कालावधीत ... अरुचे पप्पा - संदीप ... यांच्या सोबत किती गप्पा मारल्या मी. नंतर अरुकडे जेवलो... तिथेही छान वेळ गेला. थोडावेळ आठवण आली मोबाईलची , तरी तो नव्हता तर जास्त काही फरक पडला नाही. आज बघ... झोप पूर्ण झाली. नंतर इतके काम केले. नाहीतर सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसतो मी.... कोणाचे msg आले का बघण्यासाठी.. आताही मोबाईल पूर्ण charge झाला आहे तरी अजिबात वाटत नाही तो हातात घ्यावा.. amazing feeling आहे हि ... त्यासाठी खुश आहे... " ,
" सुधारला नवरा माझा .... नजर काढू का ... नाहीतर तुझ्या मोबाईलचीच नजर लागेल तुला .. "
हेमांगीच्या बोलण्यावर हसला निनाद. मोबाईल बेडरुममधेच ठेवून हे दोघे एकमेकांसोबत खरोखरची " chatting " करू लागले.


======================== The end ================




1 comment:

Followers