All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Sunday, 12 April 2020

भटकंती .... नव्या वळणावरची !! .......( भाग ५ - अंतिम )" या रानातून भटकताना , पायवाटांवरून चालताना एक वेगळीच भावना मनात उमटते. कोणी बनवल्या असतील या पायवाटा... गावातल्या जुन्या - जाणत्या म्हाताऱ्यांनी कि आपल्या पूर्वजांनी... नाही कळत ना !! थांगपत्ता न लागावा इतके गूढ आहे ना .... काय माहित, माझ्या सारखाच कोणी भटकंती करायला निघाला असेल आणि या पायवाटा तयात झाल्या असतील. रान-वनात चालताना .... या निसर्गात मिसळून जाताना ... या पायवाटा जन्माला घातल्या असतील त्याने. कदाचित महाराजांच्या शूर मावळ्यांनी यावरून आपले घोडे पळवले असतील, गनिमी कावा करताना स्वतः महाराजांच्या पावन चरणांचा स्पर्श या  पायवाटांनाही झाला असावा , कोणी सांगावे... !!! अशीच एखादी ..... अस्पष्ट , धूसर का होईना .... एखादीच पायवाट माझ्याकडूनही निर्माण व्हावी , तेव्हाच इतक्या वर्षांच्या भटकंतीचे सार्थक होईल , हीच या निसर्गाकडे प्रार्थना !! "  

सुप्रीने आकाशची डायरी आणली होती सोबत. त्यानेच हे असे लिहून ठेवले होते. आज पहाटेच जाग आलेली तिला. अगदी पहाटे ४ वाजता ..... आज त्या किल्यावर जायचे होते ना. रात्र संपून कधी पहाट होते असे झालेलं तिला. तिथला सूर्योदय आकाशचा favorite.... कदाचित आकाशची भेट तिथेच व्हावी, कोणी सांगावे. तिच्याच तंबूत बसून ती आकाशची डायरी वाचत होती टॉर्चच्या प्रकाशात. आकाशचे अक्षर, त्यावर हात फिरवला तिने. आपोआपच तिला समाधान लाभले. ती आता फक्त तिथे जाण्याची वाट बघत होती.

ठरल्याप्रमाणे, सर्व पहाटे ५ वाजता उठले. आवरले सर्वानी आणि निघाले. पूजाचा अंदाज बरोबर होता. १५ मिनिटांनी ते त्या अर्धवट असलेल्या किल्ल्यावर पोहोचले. अजूनही सूर्योदयाला बराच अवधी होता. वातावरण फारच थंड झालेलं. " काही वेळाने पावसाला सुरुवात होईल असे वाटते... " कादंबरी नाराज झाली. सुप्री मात्र शांत होती. सुप्रीने टॉर्च सुरु केला. त्या उजेडात कळत होते कि आजूबाजूला धुकं होते. हळूहळू पूर्वेकडील डोंगराची शिखरे नारंगी होऊ लागली. तेव्हा कळलं कि गुडगाभर धुकं पायाशी आहे. पायाखाली जमीनच नसावी हेच खरे. आजूबाजूचे अर्धवट बांधकाम, त्याभोवती धुकं बिलगून बसलेलं. त्यामुळे काही वेळ का होईना... त्या बांधकामाला शुभ्र रंग चढला होता. थोड्यावेळाने सूर्यदेवाचे आगमन झाले तसे विरुद्ध दिशेला असलेल्या काळ्या ढगांच्या सैन्याकडे साऱ्यांचे लक्ष गेले.

आकाशला इथला सूर्योदय का आवडतो याचे वर्णन पूजाने आधीच केलेलं होते. आता ते प्रत्यक्ष समोर दिसत होते. भारावून जाण्यासारखे असेच काहीसं. स्वर्ग काही अंतरावरच आहे , असे भासावे असेच ते दृश्य. कादंबरीच्या डोळ्यात पाणी आले ते बघून. काही काळ सर्वानी ते पाहिल्यावर , वाऱ्याची एक अति थंड वाऱ्याची झुळूक आली. त्यानेच मग पावसाचा अंदाज सांगितला. तिथेच असलेल्या एका आडोसा खाली सर्व जाऊन बसले. पावसाच्या सरी रिमझिम बरसू लागल्या. त्यात दूरवर झालेलया सुर्योदयाने , ते पावसाचे थेंब सोनेरी केले होते. सुप्री- कादंबरी पावसाकडे पाहत होत्या. पूजा त्या दोघींजवळ आली.
" डब्बू आला असावा इथे... कदाचित काल ....." सुप्रीने चमकून पूजाकडे पाहिलं.
" तुला कस माहित... " , पूजाने एका दिशेनं बोटं करून तिथे बघायला सांगितलं. तिथे अर्धवट जळलेली लाकडं होती.
" शेकोटी पेटवलेली..... जास्त दिवसाचे नाही वाटतं... काल किंवा परवाचे वाटते ते... आकाशलाच माहिती आहे हि जागा... तो येतोच इथे... तोच आला असावा... " पूजा आत्मविश्वासाने बोलत होती. छानशी smile आली सुप्रीच्या चेहऱ्यावर. तिने पुन्हा आकाशची डायरी उघडली. सर्वच बसून होते. छान थंड वारा वाहत होता. पावसाची रिमझिम सुरूच होती. या वर्षांचा नवा पाऊस. नुकतीच सुरुवात होती ती पावसाळा ऋतूची. मातीचा ओला गंध अजूनही मोहवून टाकत होता. आकाशने त्याच्या डायरीत लिहिलेले काही वाचायला सुरुवात केली.
" पाऊस म्हटलं कि किती विषय निघतात. सुख-दुःखाचे , आनंदाचे , हसण्याचे , रडण्याचे सुद्धा. वाहवत जातात त्यातच सगळे. मलाही खूप काही सांगतो हा पाऊस. गप्पा मारतो माझ्याशी. त्याच्याही गोष्टी असतात बरं का... पहाटेचा पाऊस , मला जागे करायला यायचा... पहाटेच्या कोवळ्या उन्हातला पाऊस , झाडांना नवीन पालवी येणाचे दिवस , त्यांना नवीन चैतन्य देऊन नकळत निघून जायचा तो. कधी सांगून तर कधी फसवून. कधीच चिंब करून जायचा... मलाही तो हसवून , सूर्य देवाच्या चरणांना स्पर्श करून रात्रीला स्वतः सोबत घेऊन निघून जायचा.

दुपारचा पाऊस .... खास करून त्या उन्हालाही मिठीत घेणारा पाऊस.... तो डोळ्यांना सुखावणारा... कोणी किती काहीही बोलू दे... तो यायचाच वाऱ्याला सोबत घेऊन...कधी सुतासारखा सरळ रेषेत... तर कधी नशेत चालणाऱ्या माणसासारखा.... तिरका... तिरप्या रेषेत येणारा पाऊस... झाडेही डोलायची त्याच्या सोबत. ऊन-सावलीचा खेळ आणणारा दुपारचा पाऊस...

संध्याकाळचा पाऊस.... मला जास्त सुखावणारा..... कातरवेळी पाहुण्यासारखा येणारा.... सोबतीला मनात कालवाकालव करणाऱ्या आठवणींना सोबत घेऊन येणारा.... घराच्या खिडकीतून पाऊस बघताना.... हातात वाफाळलेला चहा आणि डोळ्यात जुन्या आठवणी... काय तो संगम ना !! संध्याकाळी भरून येणारं आभाळ त्यामुळे जरा जास्तच काळंभोर वाटायचे. पाऊस नसला तरी त्या भरलेल्या आभाळाने , सोबतीला असलेल्या थंड वाऱ्याने ... अंगभर शिरशिरी यावी !! आठवणीत जायचे उत्तम ठिकाण आणि वेळही. कधी कधी त्या भरलेल्या ढगांसोबत विजांचा अस्पष्ट प्रकाश आणि कडकडाट ... या संध्याकाळच्या पावसाला फक्त बघावे... मनात काहूर माजवणाऱ्या आठवणी सारखा उदास वाटतो कधी कधी तो... असा हा ओल्या सांज वेळी आलेला पाऊस , मित्रा सारखा एखादी कविता करवून घेयाचा किंवा न सुचलेली एखादी ओळ सुचवून निघून जायचा.

रात्रीचा पाऊस ... सहसा मला पुढच्या पहाटेची तयारी करायला सांगायचा. माझ्याच गुज-गोष्टी मला सांगायला रात्रीचा पाऊस यायचा...... मनात उरलेले काही चांदण्यांचे आवाज....  चंद्राची सुरेल गाणी.... रातकिड्याची गुणगुण.... हे ऐकायला रात्रीचा पाऊस माझ्या उशी शेजारी यायचा. आभाळभर तारका पसरून , पहाटेच्या झुंजूमुंजूच्या अर्धवट झोपेत .... माझी सोबत अर्धवट सोडून .. रात्रीचा पाऊस माझ्या पापण्यांआड निघून जायचा...

पावसाचं पाणी .... कधी डोळ्यातून तरळते .... ते सांगू शकत नाही. कोणीच सांगू शकत नाही.... पाऊस समजावा असे काही नाही. पावसाची पारायणं करावी लागतात.... पावसात मन रमावे असे काही नाही... मनात पाऊस असावा लागतो... पावसाला शोधावे असेही काही नाही, स्वतःला पावसात शोधावे .. आणि ..... आणि पावसाचे वेड असावे असे काही नाही...... त्यासाठी स्वतः पाऊस होयाला लागते.... "

सुप्रीचे वाचणे संपले. किती सुंदर लिहिले होते आकाशने. पूजा डोळे मिटूनच ते सर्व ऐकत होती. एकंदरीत सर्वच मंत्रमुग्ध झाले होते. बाहेर पाऊस आणि मनात शब्दांची मोहक वर्षा... पावसाला सर्व फक्त ऐकण्याचा प्रयन्त करत होते. पूजाने डोळे उघडले. काही विचार करूनच ती बोलली.
" हि सर्व ठिकाणे... आकाशची ' personal favorite'  ... त्यात पाऊस... या सर्व ठिकाणी त्याला ' त्याचं स्वतःचे ' काही सापडते ... म्हणून तो येतो इथे.. एकटाच... मला वाटते , त्याच ते ' मी पण ' असं हिरावून घेऊ नये कोणी... " पूजाच्या या बोलण्यावर सुप्री तिच्याकडे बघू लागली.
" कळलं नाही मला.... " ,
" मला वाटते ... तू , मी आणि कादंबरी ... आपण तिघीनीच राजमाची कडे निघायला हवे... फक्त आपण तिघी.. ",
" मग हा तुमचा ग्रुप ... ते कुठे जाणार... ",
" माझं इतकंच म्हणणं आहे कि तिथे गर्दी होऊ नये... इतके सर्व जाणार... त्याला ... डब्बूला त्याचा दिवस जगू दे.... ११ जून... सगळे जाऊन त्याचा आनंद का हिरावून घेयाचा... या बाकीच्या ग्रुपला सांगते मी ... कुठे जायचे ते .. एकदा का आकाशची भेट झाली कि आम्ही दोघी पुन्हा त्यांना जाऊन भेटूच... " पूजाचा प्लॅन पटला सुप्रीला. पाऊस थांबल्यावर बाकीच्या ग्रुपला सोडून तिघी निघाल्या.

========================================================================

" एक काम करूया का .... " आकाशने चालता चालता सलीमला विचारलं. नुकताच पाऊस पडून गेलेला. एक नवं चैतन्य घेऊन दोघे राजमाचीच्या दिशेनं निघालेले.
" कोणते काम ... " ,
" आज ९ तारीख... ११ जूनला पोहोचायचे आहे तिथे... आपण चालतो ही जलद.... ",
" मग थांबूया का .... " सलिमने विचारलं.
" बोलणे तर पूर्ण करू दे.. ",
" हा .... बोल बोल ... " ,
" मी बोलतो आहे कि मला त्याच दिवशी पोहोचायचे आहे... लवकर पोहोचून काय फायदा.. म्हणून विचार करत होतो.... जरा नव्या वाटेने गेलो तर... तुलाही परिसर पाहता येईल.... time pass होईल " ,
" चालेल ना ... तुझ्या मागोमाग निघालो ... तू बोलशील तिथे जाणार.... चल ... कुठल्या वाटेने जायचे ते सांग... " आकाशने आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेतला. एका बाजूने पुढे जंगल लागत होते. तिथूनच प्रवास करायचे ठरले.

सलीम तर आकाशच्या मागोमाग होता. जंगलच्या वेशीवर आले तस सलिमने आकाशला थांबवले. " मला वाटतं ना ... मी आधी या जंगलात येऊन गेलो आहे... " सलीम म्हणाला. आकाशला आधी तो गंमत करतो आहे असेच वाटले. पण जेव्हा ते जंगलात शिरले तेव्हा सलीम अगदीच सराईत पणे चालू लागला. पायवाटा त्याच्या ओळखीच्या होत्या, असं तो चालत होता. " कदाचित १-२ वेळा आलो असेन इथे... मला राजमाची ऐकून माहित आहे.... पण या रानात नक्कीच आलो आहे मी... " सलीमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता ते बोलताना. आणखी पुढे चालून आल्यावर सलीम थांबला. " हो .... माहित आहे हा प्रदेश... ओळखीचे आहे हे सर्व... " त्याच्या चेहऱ्यावर जुनं काही सापडल्याचा आनंद होता.

" छानच ... इकडचे माहित आहे तुला... किती बरं वाटलं... " सलिमचे बोलण्याकडे लक्ष नव्हते.
" काय झालं मित्रा... कसला विचार करतो आहेस.. " आकाशने सलीमला विचारलं.
" मी इथल्या जागा आठवतो आहे... " पुन्हा तो बोलायचा थांबला. आकाशकडे पाहिलं त्याने.
" तू दाखवतोस ना पाऊस ... हे निसर्ग सौंदर्य... चल .... आता तू माझ्या विश्वात आला आहेस... " आकाशला काही कळेना ....
" काय नक्की " ,
" या जंगलात मी वर्षभर होतो. इथली सर्व झाडं ... पक्षी ... माझे मित्र आहेत... " आकाशला त्याचे तसे बोलणं आवडलं,
" चल... एका ठिकाणी जाऊ... बघू काही आहे का तिथे.... " आता आकाश ... सलीमच्या मागे मागे चालत होता. पुढे जंगल आणखी गर्द होतं गेले. सलीमला पुढील प्रत्येक जागा माहित होती. गर्द झाडी असली तरी सलीम सराईतपणे चालत होता. १०-१५ मिनिटे चालून झाल्यावर थांबले. " इथे बसुया... " आकाशने तिथली जागा साफ केली आणि दोघे बसले.
" या ठिकाणी ना ... खूप पक्षांची घरटी आहेत... निरखून बघितलंस ना तर तुला दिसतील. " आकाशने वर झाडांच्या फांद्यांवर नजर टाकली. खरंच !! किती घरटी होती वर. " इथे जवळपास वर्षभर होतो. एकदा असाच प्रवास करता करता संध्याकाळ झाली म्हणून आता बसलो आहोत ना , तिथेच थांबलो. इथून पुढे एक लहानसा झरा आहे. वर्षभर पाणी असते त्याला. तिथे गेलेलो संध्याकाळी. तिथे असलेल्या एका झाडावर, खालच्या फांदीवर एक पक्षाचे घरटे आकारास येत होते. पक्ष्याचे नाव नाही माहित, पण ते दोघे... नर-मादी .. दोघेही त्या अंधुक होतं चाललेल्या प्रकाशात सुद्धा घरटे पूर्ण करण्यात गुंतलेले. आवडलं मला. काहीतरी वेगळं दिसलेल. चल तो झरा दाखवतो. " म्हणत सलीम निघाला. आकाश मागे होताच. सलिमने एका झाडाकडे बोट दाखवलं.
" त्या फांदीवर होते ते घरटे..... मी ना .... त्याच्या बरोबर समोर एक झोपडी बांधली होती.... पहिले एक-दोन दिवस असाच बघत बसायचो ... मग कुतूहल निर्माण झाले आणि झोपडी बांधून त्यातून बघायचो त्यांना.... या आजूबाजूच्या झाडाच्या पानांची , लाकडाची एक झोपडी उभी केली होती. " फारच छान सांगत होता तो. आकाशला आवडलं
" अजून सांग ना ... अनुभव "

" आणखी ... अजून म्हणजे इथेच होतो वर्षभर, त्या नर- मादीच्या घरटे बांधणीपासून त्याच्या अंड्यातून आलेली इटुकली पिल्ले ... त्यांचे संगोपन ... सर्व बघितले. अश्या लहान लहान चोची... त्यांच्या आईने चोचीतून आणलेला खाऊ... तो खाऊ खाण्यासाठी चाललेली इवलीशी धडपड... त्यांचा छोटासा आवाज... छानच वाटायचे.... काही महिन्यांनी छोटी पिल्ले मोठी झाली. हळूहळू उडायचा प्रयन्त... पण लवकर शिकले ते उडायला. पंखात बळ आलं तसं घर सोडले त्यांनी... तेही बघितले मी... पुढील काही दिवस त्यांचे आई-वडील यायचे घरट्यात.. २ घटका थांबायचे. निघून जायचे... असे त्यानी ३-४ दिवस केले. नंतर तेही येईनासे झाले.... मग मीहि माझी झोपडी तोडून निघून गेलो पुढच्या भटकंती साठी... " ,
" राहिला कसा तू इतके दिवस... जेवण वगैरे... कसं काय जमवलंस तू " , सलीम स्वतःशीच हसला.
" जेवणाचं काय घेऊन बसलास... फळं - कंदमुळं खाऊन राहिलो ... या झऱ्याचं पाणी ... ते पियाचो... इतकंच !! हा भाग खूप आतमध्ये आहे ... कळलं असेलच तुला... वर्षभरात एकाही माणसाचे दर्शन झाले नाही मला. विचार कर ... त्यातून इथल्या बऱ्याच पक्षांचे आवाज काढायला शिकलेलो.. आता काही काहीच आहेत लक्षात. ते कसं बोलतात .. त्यांच्या भावना काय , ते कसे व्यक्त होतात हेही शिकलो होतो ... म्हणून तर इतका वेळ राहू शकलो. किती प्रकारचे पक्षी आहेत इथे .... तू कल्पनाही करू शकत नाहीस. कमाल !! हा एकच शब्द येतो या सर्वासाठी. " आकाश सुद्धा भारावून ऐकत होता.

" तू बोलतोस ते बरोबर ..... तूच खरे आयुष्य जगतो आहेस... मानलं तुला " आकाश म्हणाला. सलीम पुन्हा हसला.
" आज थांबू इथेच... तू छान छान दाखवतोस ना ... उद्या पहाटे मी दाखवतो काही छान ... निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा जादू.... बघण्यासारखे आहे ते ... " दिवस दुपारकडे झुकलेला.
" चालेल ... आपण आताच काही तरी बघू ....रात्री जेवणासाठी... आणि शेकोटी साठी लाकडे ही लागतील. " सलीमला पटलं ते. दोघे कामाला लागले.

================================================================
       संध्याकाळ झाली चालता चालता. या तिघीनी थांबायचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी थांबले होते तिथून एक सुंदर दृश्य नजरेत येतं होते. सूर्यास्त दिसत नव्हता तरी त्याची चाहूल तेवढी लागलेली. आभाळात आता पावसाचे ढग नव्हते. जवळपास मोकळे आभाळ. पावसाच्या दिवसात तरी असे मोकळे आभाळ दिसणे म्हणजे नवलच. संद्याकाळच्या सूर्याचे रंग आभाळात दूरवर पसरले होते. यांचे तंबू उभे करून झाले. आणि सुप्री ते आभाळातले रंग पाहत पुढे असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसली. एकटीच !!  पूजाला कळलं ते. कादंबरी तिच्याकडे निघालेली . पूजाला आता सुप्रीची ही सवय माहीत झाली होती. " थांब कादंबरी... तिला अशी एकटी बसायची सवय आहे. नको डिस्टर्ब करुस तिला.." कादंबरीला समजावलं तिने. या दोघी मग मागेचअसलेल्या दगडावर जाऊन बसल्या. कादंबरीने तिथून तिची फोटोग्राफी सुरू केली. पूजा सुदधा तो समोरचा नजारा बघत होती.

          सुप्री स्वतःच्याच विचारात. आकाशची उणीव प्रकर्षाने जाणवत होती तिला. उद्याचा दिवस सोडाला तर परवा ११ जून. ४ वर्षांनी भेट होईल त्याची. कसा असेल. नेहमीच तो वेगळा वाटायचा. प्रत्येक वेळेस नव्याने भेटायचा. सुप्री स्वतःच्या विचारात , मधेच हसत होती. त्याच्या येण्यानेच आपल्या आयुष्यात आनंद आलेला. सूर्याच्या सोनेरी किरणासारखा आलेला आकाश. रात्रीचं आभाळभर चांदणं आलेलं त्याच्या सोबत. आणखी काय हवे होते मला. सुखावून गेलेली मी. आता सुद्धा ४ वर्षांनी भेट होणार... पुन्हा एकदा एक नवीन भेट होईल. कशी असेल ना भेट ती... बोलू दोघे कि फक्त आमचे श्वास बोलतील एकमेकांशी.... पाऊस असेल का तेव्हा... नसेल तरी आकाश घेऊन येईल सोबतीला. त्याच तर ऐकतो ना पाऊस. निदान भरलेल्या आभाळाखाली भेटू... येशील ना आकाश ... पाऊस घेऊन... वाट बघेन..... नाहीतर असे कर ना ... इंद्रधनू सुद्धा घेऊन ये सोबत.... पाऊस , वारा , दाटलेलं आभाळ , ऊन - सावली ... सर्व घेऊन ये ... तुझ्या सोबत हे सर्व अनुभवायचे आहे. बघ !! इवलीशी आठवण आली तरी डोळ्यात मेघ दाटून येतात. निदान या डोळ्यातल्या पावसासाठी तरी येशील ना ... वाट बघते आहे.

          सुप्री स्वतःशीच बोलत होती. त्या कातरवेळी मनाचा मनाशी संवाद सुरु होता. सुप्रीला दाटून आलेलं. सूर्य मावळला तरी तिचा "संवाद" अजून तरी संपला नव्हता. सुप्री साठी आजची रात्र मोठी असणार होती.

================================================================
आज सलीमने आकाशला जागे केले. " सॉरी !! मला वेळ माहित नाही. अंदाजने जागे केले तुला. निघूया का ... " आकाशने घड्याळात पाहिले. पहाटेचे ६ वाजत होते. आकाश पटकन तयार झाला.
" सामान राहू दे इथेच. आपल्याला त्या कड्यावर जायचे आहे. काम झालं कि पुन्हा खाली येऊ ..... " सलीम म्हणाला. आकाशला आठवलं. " काहीतरी छान दाखवतो" असं म्हणाला होता हा काल. तयार झाले तसे दोघे निघाले. हळूहळू चालत ते त्या कड्यापाशी आले. आकाशने पाहिलं , तिथे एक लहानशी गुहा होती.
" आत वाकून बघूया का ... " आकाशने सलीमला विचारलं.
" नाही .... नको ... थांब थोडावेळ.... " पहाट होत होती. सलीमने पहाटेचा अंदाज लावला.
" काही क्षणात सुरु होईल .... " सलीम पुटपुटला. आकाशने ते ऐकलं.
" काय ... सुरु .... " आकाश त्याला विचारत होता कि त्या गुहेतून एक पक्षी उडत उडत वेगाने बाहेर आला.
आकाशने त्या प्रकारचा पक्षी आधी कधी पाहिलं नव्हता. आसपासच त्याने वेगाने गोलाकार फेरी मारली आणि पुन्हा त्या गुहेत आला तसा निघून गेला. आता आकाशला प्रश्न पडला. यात काय छान होते..... सलीमला त्याने तसे विचारलेही....
" थांब जरा .... वाट तर बघ... तुम्हा शहराच्या लोकांना जरा धीर नाही... " आकाश शांत बसला. १० मिनिटे अशीच गेली. फक्त वाऱ्याचा आवाज. आकाशची चलबिचल सुरु झाली. पुन्हा काही बोलणार तर कसलासा आवाज येऊ लागला. बहुदा पंख फडफडण्याचा आवाज असावा. आधी अस्पष्ट असणारा आवाज हळूहळू मोठा होत गेला.
" काय .... " आकाश पुन्हा काही बोलणार इतक्यात त्या गुहेतून ... पंखांची प्रचंड फडफड करत एक मोठाच्या मोठा थवा बाहेर पडला. किती ते पक्षी.... बापरे !! जवळपास २-३ मिनिटं तरी तो थवा , या दोघांच्या डोक्यावरून जात होता. म्हणजे विचार करा किती मोठा थवा होता तो. ते सर्व सरळ रेषेत उडत गेले. " आता बघ ...... यांच्या कसरती... " सलीम उभा राहिला. तसा आकाश सुद्धा उभा राहिला. तो समोर उडत गेलेला थवा आकाशला दिसत होता. सलीमने त्याचा उजवा हात समोर धरला आणि डाव्या दिशेने नेला. त्या पक्षांनी सुद्धा आपला मार्ग त्याच दिशेनं केला. मग सलीमने हात खाली नेला तसे ते पक्षीही खालच्या दिशेने गेले. जणू काही सलीमचं त्यांना कसरती करायला सांगत होता. खाली जाऊन आणखी एका गोलाकार फेरी मारून ते पक्षी पुढे जात पुन्हा वरच्या दिशेने गेले. आणि पुन्हा त्या थव्याने एकदम खाली सूर मारला. आकाशला कळेना, सर्व गेले कुठे. जरा वाकून बघायला म्हणून पुढे वाकला. आणि सलीमने त्याच्या हाताने खालून वर अशी खूण केली. आकाश पट्कन मागे झाला तसा तो थवा... खालून वरच्या दिशेने वेगाने उडत गेला. किती तो पंखांचा आवाज , त्यातून निर्माण होणारी हवा... आकाश मागच्या मागे झाला. " बस खाली पट्कन ... " सलीमने त्याचा हात पकडून खाली बसवलं. तो वरच्या दिशेने गेलेला एवढा मोठा थवा.... त्याच वेगाने पुन्हा खाली येतं पुन्हा त्या गुहेत दिसेनासा झाला.

काही मिनिटांचा थरार !! आकाश स्तब्ध झालेला. काय बोलावे... शब्दच सुचत नव्हते. सलीम आकाशला बघत हसत होता.
" काय होतं हे ... भारी एकदम !! " आकाश म्हणाला.
" हा ना .... बरोबर बोलत होतो मी.... छान आहे ना हे ... " आकाश आता सलीमकडे वळला.
" तुला कस माहित.... आणि ते हाताने... तू जसा हात वळवत होतास तसे ते उडत होते.... i mean ... डोक्यात काही गेलेच नाही. " सलीमला कळलं आकाशला काय बोलायचे होते ते.
" अरे ... इथे वर्षभर होतो.... एकदा पहाटे असा खूप पंखांचा आवाज आला... बघतो तर हा मोठा थवा... मग काय ... पुन्हा कुतूहल... खूप निरीक्षण केले त्यांचेही. वेगळेच पक्षी आहेत ना .. हे ठिकाण माहित नाही कोणाला म्हणून ठीक.. नाहीतर इथं ही गर्दी केली असती माणसांनी... " सलीम हसून बोलला.
" किती महिने हे बघत होतो. सकाळ झाली कि इथे आणि या कसरती झाल्या कि खाली ते घरटे .... असा दिनक्रम असायचा. तो सर्वात आधी बाहेर आलेला ना ... तो त्यांचा लीडर ... म्होरक्या !! तोच आधी पहाट झाली का किंवा आजूबाजूचा परिसर बघायला बाहेर येतो आणि आत जातो.... मग त्याला ठीक वाटलं तरच तो या सर्वांना बाहेर घेऊन येतो ... एकत्र... त्या कसरती त्यांचा व्यायाम असेल किंवा काही वेगळे... ते करतातच... तो लीडर जसा उडतो , त्याच्या मागून बाकीचे उडतात... त्याचा एक ठराविक पॅटर्न आहे.... तोही इतक्या वेळा बघितला म्हणून कळला मला. तेच तर करत होतो मी.... थोड्यावेळाने ... जास्त उजाडलं कि येतील सर्व पक्षी ... एक एक करून .... दिवसाच्या कामाला लागतील. उदया पहाटे पुन्हा या कसरती... " ,
" wow !!! great !! amazing !!! काय बोलू.... बरोबर बोलतोस तू... माणसे येत नाहीत इथे तेच बरोबर... तरी सुप्रीला दाखवायला पाहिजे होते हे ... " आकाश चट्कन बोलून गेला.

==================================================================

" मी काय बोलते पूजा ..आकाश कुठे पोहोचला असेल आता .... " कादंबरीने पूजाला विचारलं.
" उद्या ११ जून आहे... हम्म , आज तो पायथ्याशी पोहोचला असेल. पहाटे त्याला राजमाची वर पोहोचायचे असते. आता तो खालीच थांबला असेल. " पूजा बोलली. तशी सुप्री आनंदली.
" म्हणजे आजच भेटेल ना तो आपल्याला.... " सुप्री आनंदाने बोलली. पूजाही हसली. आजच भेटेल , उद्या एकत्र गडावर जाता येईल मग, सुप्री मनात असा अंदाज लावत चालत होती.

सकाळचे ८ वाजत होते. यांचा प्रवास सुरु होता . निघाल्या तेव्हा कोवळे ऊन अंगावर घेऊन चालत होत्या. आताशा कुठे सकाळ झालेली आणि अंधारून आलं. तिघी थांबल्या.
" पावसाच्या मनात काय आहे ते देव जाणे... " पूजा पुटपुटली.
" नाही येणार पाऊस.. अंधार झाला आहे फक्त ... " सुप्रीने लगेच अंदाज लावला. तरी कादंबरी जरा घाबरली.
" वादळ वगैरे नाही ना .... गार वारा ही सुटला आहे... बाकी काही नाही .... कॅमेरा भिजायचा माझा ... " तिने लगेच कॅमरा झाकून ठेवला.
" पाऊस नाही संध्याकाळ पर्यंत तरी... पण आपल्याला जलद चालावे लागेल आता... " पूजाने सुद्धा तिच्या चालण्याचा वेग वाढवला.

===================================================================

इथे आकाश वेगळ्या वाटेने निघालेला. सोबत सलीम. पावसाने अंधार केला असला तरी पावसाचे कोणतेच चिन्ह नव्हते. आकाश अजूनही पहाटे बघितलेल्या पक्ष्याच्या कसरतीने भारावून गेला होता.
" तू ... मघाशी नाव घेतलेस ना एक .. " सलीमने आकाशला विचारलं.
" हा .... हो .... सुप्री ... सुप्रिया नावं तिचं .... " ,
" बायको ??? " ,
" नाही ... मैत्रीण .... पण होणारी बायको बोलू शकतोस ... " ,
" असं आहे तर .... मग तीही फिरत असते का ... " ,
" नाही... माझ्या सोबत फिरते तेवढंच.... खूप प्रेम करते... तिला सोडूनच तर ..... " आकाश पुढे बोलूच शकला नाही. कदाचित त्याला त्याची चूक कळली होती. आकाशने चालणेही थांबवले. जंगल संपून माळरान सुरु झालेले.
" का थांबलास ??? " सलीमने विचारलं.

" आठवण आली तिची. " आकाश बोलता बोलता आभाळाकडे पाहू लागला.
" तुला माहीत आहे का ... तिलाही आता अंदाज लावता येतो... ",
" तुझ्यासारखीच आहे का ती ... " सलीमच्या बोलण्यावर आकाश छान हसला. पायाखाली हिरवे , लुसलुशीत गवत होते. त्यातच बसला. समोर असलेले डोंगर आता त्या पावसाच्या काळ्या ढगात गुडूप होऊन जात होते. आकाश बोलू लागला.
" सुप्री !! देवाला पडलेलं एक सुंदर स्वप्न.... गणू .... गणपती बाप्पा ला गणू बोलते ती , बरं का ... त्याचीच कृपा आहे तिच्यावर. माझ्यासारखी काय .... कोणासारखीच नाही ती. एकुलती एक म्हणालास तरी चालेल.... गणूने सुद्धा तिला बनवले आणि तिच्या प्रेमात पडला. इतका कि तिच्या सारखं त्याला दुसरं बनवता आलंच नाही. या अश्या भटकंतीमुळेच माझ्या आयुष्यात आली ती. काय स्तुती करू तिची. रात्रीची चांदणी किंवा तारा तुटतो म्हणतात ना... तस झालं तर , तारा पडता क्षणीच तो लगेच टिपून घ्यावा. त्या चंद्रालाही त्याचा थांगपत्ता लागू नये याचा. त्या चांदणी सारखीच आहे ती ... तिचे सौंदर्य डोळ्यात काजळासारखं भरावे किंवा नाकातल्या नथे सारखे सजवावे. परी आहे ती. स्वप्नांत तर येतेच. पण स्वप्नांत सुद्धा स्वप्न दाखवते. स्वप्नाळू सुद्धा आहे हा ती. आवडते खूप मला... खूप प्रेम , ती आहेच सुंदर... मोठी असली तरी कधी कधी लहान गोंडस मुली सारखी भासते... इतकी गोड... बोलके डोळे... डोळ्यात तर अगदी बुडून जायला होते. रुसून बसते कधी ... ऐकत नाही ... त्यातही लाड करून घेते स्वतःचे.... भांडण तर नाही होतं , पण कधी कधी एकदम शांत होऊन जाते ... तेव्हा भीती वाटते .... आपलीच काही चूक झाली का , असे वाटतं राहते ... पण येते काहीवेळाने जवळ.... अशी आहे ती... पण बडबड खूप करते... मला तर बोलायला देतच नाही. माझा एक शब्द तर तिचे चार शब्द.. कधी कधी ६-७-८ शब्द ... हा ... हा ... हा ... !! तरी तिची smile .... कमाल !! त्या smile मुळेच तिच्या प्रेमात पडलो. मलाही आधी माणसं आवडायची नाहीत. तिच्यामुळे विचार बदलले माझे. एकदा तिने साडी नेसली होती. तेव्हाच माझ्या मनात भरली होती ती. तेव्हा पासूनच प्रेम तिच्यावर... तिला आवडायचो मी. माझ्या मनातलं सांगायला वेळ लावला मी. पण जेव्हा सांगितले होते तेव्हा डोळ्यात पाणी आलेलं.... तिच्याही आणि माझ्याही. खूप भावुक आहे ती... किती साऱ्या भावना आहेत तिच्याकडे .... मधेच एखादा जोक करते .. मधेच डोळ्यात पाणी... माझ्याकडे आहेत ना या सर्व feelings ... त्या सर्व तिच्यामुळेच ... ४ वर्ष झाली तिला आता बघून... कशी असेल , काय करत असेल... काय माहित... शेवटचे बघितले तेव्हाही तिने स्वतःचे रडणे सावरले होते. निघून गेली तेव्हा मन घट्ट केले होते. इतकी strong आहे ती....  अशी आहे माझी सुप्री ... माझा पाऊस .. !! "

" जाऊन भेट तिला .. माझ्यासारखा नको राहूस... इतकं प्रेम ... नको सोडू तिला... " सलीम म्हणाला.
" हो ... जाणारच आहे... उद्या राजमाची ची भेट झाली कि थेट तिला भेटायला जाणारा... तुझ्यामुळे जाणीव झाली मला... आधीच जायला पाहिजे होते मी... ते देखील येशील का शहरात... सोबत... " आकाशच्या स्वप्नावर सलीम काही बोलला नाही. खूप वेळाने सलीम बोलला.
" नाही... मी इथेच बरा आहे. आणि शहरात जाऊन काय करू सांग. कोण ओळखीचे नाही.... जे आधी ओळखत होते तेही आता ओळखणार नाहीत मला.... इतकी वर्ष झाली. आणि खरं सांगू .... हेच माझं घर आता... ते तिथे जाऊन .... नकोच ते... शिवाय तू आता एक नवीन स्वप्न दाखवलं आहेस मला ...या निसर्गात इतकी वर्ष फिरत असून सुद्दा मला त्याचे सौंदर्य बघता आले नाही, तू ते दाखवलंस... तेच आता नव्याने शोधीन... शहर नकोच ... " आकाश जाणून होता ते. त्याने जबरदस्ती केली नाही. त्यालाही आता कधी हा प्रवास पूर्ण करतो आहे असे झाले होते. संध्याकाळ झाली आणि पावसाची चाहूल लागली. आकाशने पटापट तंबू उभे केले... पावसाची चाहूल लागली असली तरी पावसाची चिन्ह दिसत नव्हती. आकाश त्याच विचारात. सलीम सुद्धा आभाळाकडे बघत होता.
" काय झालं ... " त्याने आकाशला विचारलं.
" पाऊस नुसता धरून राहिला आहे.. ",
" कदाचित उद्या तुला राजमाची वर भेटणार असेल तो ... " सलीमच्या बोलण्यावर हसू आलं आकाशला.
================================================================

संध्याकाळ होतं आलेली. पावसाने काळोख केलेला. या तिघी राजमाचीच्या पायथ्याशी आल्या. सुप्रीला तर आकाशची ओढ लागली होती. पूजा बोलल्याप्रमाणे आता तो पायथ्याशी असायला हवा होता. पण तो नव्हताच. पूजालाही नवल वाटलं.
" पूजा .... आकाश कुठे..... " सुप्रीने विचारलं. पूजा काय बोलणार.
" थांब... माझ्या आठवणीत तरी आणखी एक जागा आहे.... तिथे थांबायचो आम्ही..... चल... " पूजाच्या मागोमाग सुप्री पटपट चालू लागली. तिथेही आकाश नव्हता.
" कस काय .... आकाश गेला कुठे नक्की... " कादंबरीने पूजाला विचारलं.
" डब्बूच्या मागे तर आहोत आपण ... आणि तो इथे येण्यासाठी निघाला आहे हेही तितकेच खरे... " पूजा म्हणाली. सुप्रीला आता रडू येतं होते.
" थांब .. सुप्री ... रडू नकोस... कदाचित तो वेगळ्या वाटेने गेला असेल.. आपण किती शक्यता मांडल्या आधीही... हेही खरं असू शकते ना ... " पूजाने सुप्रीला धीर दिला.
" पण तो येईल ना उद्या .. " ,
" येणारच तो .... तो नाही चुकवत हा दिवस... आपणच त्याची वाट बघूया उद्या... आधी आपणच गडावर जाऊ... तू नको काळजी करुस ... " पूजा सुप्री शेजारीच उभी होती. सुप्रीचं लक्ष भरलेल्या आभाळाकडे गेलं.
" आज तर नुसता भरून राहिला आहे हा पाऊस ... कुठे आहे रे तुझा मित्र .... तुला तरी माहित असेल ना .... " तिच्या मनात कालवाकालव सुरु होती. आजची रात्रही संपता संपत नव्हती.

================================================================

पहाटे पहाटेच , आकाशने सलीमला जागे केले.
" काय झालं.... इतक्या लवकर जागं केलंस... " सलीम डोळे चोळत जागा झाला.
" अरे ... पाऊस येणार आहे ... जोराचा... तो येण्याआधीच जाऊ ना आपण .... म्हणून ... " सलीम पूर्ण जागा झालेला , वारा तर जोराचा होता ... सू .... सू.... करत जोराने वाहत होता.
" चालेल ना ... निघूया आताच.. " ,
" पावसात चालू शकतोस ना ... " आकाशने सलीमला विचारलं...
" अरे ... हा काय प्रश्न झाला का ... चल रे ... पावसाला नाही घाबरत मी... " सलीम म्हणाला. दोघांनी पटापट सामान आवरले. निघावे म्हणत होते तर पावसाला जोराची सुरुवात झाली. सोबत जोरदार वारा.... कसे निघायाचे... आकाशनेच मग " जरा पाऊस कमी होऊ दे .. मग जाऊया... " असं ठरवलं. निघणे थोडे लांबणीवर पडले.
                वारा - पावसाने आणखी एक तास घेतला. वाऱ्याचा वेग थोडा कमी झाल्यावर हे दोघे निघाले. निघताना आकाशने घड्याळात पाहिलं. पहाटेचे ६:३० वाजले होते. एक तास वाया गेला. नाहीतर आता पोहोचलो असतो. सूर्योदय झालेला तरी पावसाचे इतके गडद ढग आलेली कि सूर्याचे अस्तित्व नसल्यासारखे होते. शिवाय ज्या बाजूने ते चढत होते ती बाजूही आकाशला नवीन होती. वेगळ्या वाटेने आलेले हे. एक बरं कि पावसाचा मारा कमी झालेला. सलीम - आकाश चिंब भिजलेले. थोड्याच वेळात ते गडाच्या दुसऱ्या बाजूने वर पोहोचले. आकाशने खाली जमिनीचे चुंबन घेतले. सलीम तर राजमाची काय आहे , ते बघतच राहिला. असा हा पसरलेला डोंगर , त्यावर गड... तिथून दिसणारा आसपासचा हिरवा निसर्ग... काय वर्णावा.. हा माणूस .... आकाश ... इथे दरवर्षी न चुकता का येतो , ते सलीमला कळलं आता. आसपासच्या डोंगरावरून येणारे काळे ढग... हत्ती प्रमाणेच भासत होते. एकच गर्दी केली त्या ढगांनी. काही पक्षी ... जे पावसाच्या मेघांसोबत प्रवास करतात तेही मध्ये मध्ये " आम्हीही आहोत " म्हणत उडताना दिसत होते. समोरच्या दऱ्यामधून काही झरे ... आधीच ओसंडून वाहत होते. त्यांच्याही सफेद रंगाच्या रांगा लागल्या होत्या डोंगरांवर.... सलीमला कुठे बघू आणि काय काय बघू असं झालेलं. स्वप्नवत होते सर्व. अश्यातच पावसाने त्याचा वेग पुन्हा वाढवला.

" आकाश ... खूप खूप thank you .... मला इथे घेऊन आलास ... " सलीम आकाशला सांगत होता काही. आकाशचं लक्ष त्याच्याकडे नव्हते. त्याला दिसलेलं कोणीतरी.
" थांब सलीम .... तिथे आहे कोणीतरी... मी आलोच बघून... तू थांब इथेच.... " आकाश भरभर निघाला. त्याने दुरूनच जो अंदाज लावला होता तो खरा ठरला.... पूजा आणि तुझ्या सोबत कादंबरी ...
" निरू !! " पूजाला आकाशने मिठी मारली. " तू काय करते इथे... आणि कादंबरी ... तुही आलीस ...ग्रेट !! वाटलं नव्हतं तुम्ही इथे भेटाल ते.. ४ वर्षांनी भेटतो आहोत आपण ..... कशी आहेस निरू... " , पूजालाही आनंद झाला आकाशला पाहून.
" डब्बू .... वाळलास रे.... कसा दिसतोस बघ... माझं सोड ... माझ्यापेक्षा आणखी एक व्यक्ती तुझी खूप आतुरतेने वाट बघत आहे...गेली ४ वर्ष... " पूजाच्या बोलण्याचा अर्थ आकाशला कळला.

पूजाने त्याला समोर बघायला सांगितलं. पुढे कड्याजवळ कोणीतरी उभे होते. पाऊस प्रचंड वेगाने कोसळायला लागला होता. आकाशने ओळखलं तिला ... " सुप्री !! " मोठ्याने आवाज दिला आकाशने. त्या सोसाटाच्या वाऱ्यात , विजांच्या कडकडाटात कुठे जाणार आवाज....... म्हणतात ना ... मन जुळली असली कि काही वेळा बोलायची गरज पडत नाही.... का कुणास जाणे , सुप्रीने मागे वळून पाहिलं. त्याला पाहिलं आणि दोघे एकमेकांकडे चालत जवळ आले. दोघे काही न बोलता बराच वेळ एकमेकांना बघतच होते. पावसाच्या पाण्यात सुद्धा आकाशला सुप्रीचे भरलेले डोळे दिसून आले. आणि मिठी मारली तिला. दोघे एकमेकांना बिलगले. पावसानेही मेहरबानी केली. यांच्या प्रत्येक भेटीला हाही असतोच सोबत. किती ती घट्ट मैत्री आकाश आणि पावसाची.

पूजा - कादंबरी या दोघांजवळ आल्या. " आम्हीही आहोत इथे... " कादंबरी बोलली. पावसाने आवरतं घेतलं. गप्पा - गोष्टी सुरु झाल्या यांच्या. सलीम त्यांना दूरुनच बघत होता. आकाशच्या फार वेळाने लक्षात आलं. सलीमला त्याने जवळ बोलावलं.
" हा सलीम .... अर्थात त्याचं नाव वेगळं आहे... पण माझ्यासाठी सलीमच ... हा नित्य भटकंती करत असतो.. याने खूप मदत केली या प्रवासात ... खूप जवळचा मित्र झाला आहे माझा .... " कादंबरीने त्याला ओळखलं.
" तुम्ही जर त्या देवीच्या यात्रेत सांगितलं असत कि आकाश आहे सोबत ... एवढी धावपळ झाली नसती आमची... पण ठीक आहे .... सॉरी वगैरे बोलू नका आता ... " कादंबरीने आधीच सर्व बोलून टाकलं. सलीम बिचारा काय बोलणार .... गप्पच होता आणि हसत होता. बराच वेळ यांच्या गप्पा सुरु होत्या.

निघायची वेळ झाली. पूजा-कादंबरी भावुक झालेल्या. " निरू ... तुझ्यामुळे सुप्री पुन्हा भेटली... कसे आभार मानू... " ,
" वेडा आहेस का डब्बू .... गप्प ... काही काय बोलतोस .... हा पण एक वचन दे मला... यापूढे सुप्रीला कधीच सोडायचे नाही... अंतर नाही देयाचे तिला. दे वचन !! " आकाशने वचन दिलं.
" आणि तुही प्रॉमिस कर ... जेव्हा जेव्हा आजीला भेटायला येशील ना , तेव्हा तेव्हा मला जरूर भेटायला यायचे. आणि ११ जून ... आजचा दिवस... दरवर्षी आपण इथे भेटायचेच... " पूजाने प्रॉमिस केले आणि पुन्हा मिठी मारली आकाशला.
" मला विसरली लोकं ... एकतर शेवटी जेव्हा भेटलो होतो तेव्हा सांगितल नाही , तुम्ही ग्रेट फोटोग्राफर आहेत ते .... फोटोग्राफी शिकवायची नाही ते सांगायचे ना आधी .... " आकाशला हसू आलं कादंबरीच्या बोलण्यावर.
" नाही नाही... शिकवीन हा फोटोग्राफी..... जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा जरूर ये शहरात ... मी शिकवीन तुला... " कादंबरी आनंदली. राहता राहिला सलीम.
" तू शहरात आला असता तर बरं झालं असत ... पण फोर्स नाही करणार तुला.... " ,
" तुझ्यामुळे नवीन आयुष्य मिळालं आहे मला..... पुन्हा भेट होईल ना आपली... तेव्हा मी तुला घेऊन जाईन , निसर्ग सौंदर्य बघायला ... आणि हो ... पाऊस बघायला सुद्धा... " सलीमने हात मिळवला आकाश सोबत. सर्व आपापल्या वाटेने निघाले. तरी आकाशने धावत जाऊन सलीमला अडवलं.
" काय झालं ... " सलीमने विचारलं.
" एक राहिलेलं ... " म्हणत आकाशने सलीमला मिठी मारली. सलीमलाही भरून आलं.
" तू नेहमीच लक्षात राहशील मित्रा.. " सलीम इतके बोलून निघून गेला. पूजा - कादंबरी ही नजरेआड झाल्या. आकाशने सुप्रीकडे पाहिलं. तिचा हात हातात घेतला आणि शहराकडे निघाले.
 शहरात आल्या आल्याचं पुढच्या ४ दिवसातच... अर्थात पावसाच्या साक्षीने या दोघांचा साखरपुडा पार पडला. लग्नही पुढल्या महिन्यात ठरवून टाकलं. आता आकाश सुप्रीचाच होता. त्यात आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या मॅगजीन साठी आकाश फोटोग्राफी करायचा , " wild india " त्यांचेही यंदाचे हे पंचविसावे वर्ष होते. ग्रेट !! आकाशने खास विनवणी करून त्याने त्यावर्षीच्या मॅगझीनचे मुखपृष्ठ निवडण्याची परवानगी मागितली. मॅगजीन इंग्लिश होते तरी आकाशच्या डोकयात काही वेगळंच होते. सुप्रीलाही काय नक्की special होते ते माहित नव्हते. आकाशनेही सांगितलं नव्हते. आणि तो दिवस आला, मॅगजीन छापून तयार झाले आणि बुक शॉपमध्ये विकायला आले. आकाशला तर असेच मिळाले असते ते मॅगजीन तरी आकाशने ते घेतले नाही.

सुप्रीला घेऊन तो एका बुक शॉपमध्ये गेला. तिथूनच त्याने मॅगजीन विकत घेतले. सुप्रीला किती उत्सुकता ... मुखपृष्ठ बघायची. तिनेच आधी पाहिलं. सलीमचा फोटो होता तो. एक कच्चा रस्ता.... त्या पलीकडे अशी उभी हिरवी शेतं ... दूरवर पसरलेली... नुसता हिरवा रंग... या दोघांमध्ये एक पिंपळाचे मोठ्ठे झाड...आणि त्या झाडाखाली सिगारेट पेटवत उभा असलेला सलीम .... काय सुंदर फोटो होता तो... अप्रतिम !! .... त्याही पेक्षा जास्त छान होते ते, त्याखाली आकाशने लिहिलेलं ... तेही मराठीत ......यासाठीच आकाशने खास परवानगी मागितली होती. काय लिहिलं होतं फोटोखाली....
" काही माणसं खरंच जगतात .... " ...

सुप्री ते वाचून भारावून गेली. " माझी आणि त्याची पहिली  भेट झाली होती , तेव्हाचा फोटो आहे हा ... तुला नाही कळणार , काय माणूस आहे तो ... खरं प्रेम केलं ते त्यानेच .... आणि त्याचे ते तसं जगणं ... त्याला मनापासून सलाम माझा ....त्यासाठी काही करायचे होते.. यापेक्षा जास्त काय चांगले करू शकतो मी... " सुप्रीने आकाशला मिठी मारली. दोघे चालत चालत समुद्र किनाऱ्याकडे चालत निघाले... हातात हात घालूनच. नवीन प्रवास सुरु झालेला आकाशचा. एक नवीन वळण आलेलं त्याच्या आयुष्यात. लग्नाच्या आधीच त्यांनी कुठे कुठे फिरायचे ... कोणते गड - किल्ले पादांक्रात करायचे हे ठरवले होते. नवीन स्वप्न आणि नवीन वाटा घेऊन आकाश आता पुन्हा एका नव्या भटकंती साठी तयार होत होता. खरंच !!! एक नव्या वाटेवरची भटकंती आता सुरु होणार होती. भटकंती .... नव्या वळणावरची. !!!


================================== समाप्त =================3 comments:

  1. वा वा काही शब्द नाहीत पुढच्या भटकंती साठी शुभेच्छा

    ReplyDelete
  2. Great... superb...outstanding... and awesome...Khup Chan Bhatkanti Zali.. pravas khuup chan hota.. carry on...

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर...

    ReplyDelete

Followers