All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Thursday 12 November 2015

दुष्काळ… (भाग १)

                  " मग… काय विचार केला आहेस निल्या… ? ", निलेशची तंद्री लागली होती कूठेतरी. यशवंतने त्याला पुढे काही विचारलं नाही. तोही इतरत्र नजर फिरवू लागला.सगळी जमीन तापली होती, गरम तव्यासारखी. सगळीकडून नुसत्या गरम वाफा निघत होत्या,गरम वाफा.… एवढ्या लांब बसलेला असून सुद्धा डोळ्यांना त्या जाणवत होत्या. निलेश मात्र कधीचा त्याच्या शेताकडे पाहत होता. मोकाट जमीन अगदी. निल्याचं शेत होतं म्हणून माहित सगळ्यांना, नाहीतर कोनालाही पटलं नसतं कि ते शेत आहे म्हणून. इतकं निर्जीव वाटत होती जमीन. गेलाबाजार, एक रानटी रोप पण नव्हतं शेतात.…. पाखरं सुद्धा फिरकत नसायची. काय होतं त्यात खाण्यासाठी. तेवढं ते एक बुजगावणं , येणाऱ्या वाऱ्याशी डोलत असायचं. त्याच्यावर फाटका हिरवा शर्ट होता, तेव्हढंच काय तो हिरवा टिपका शेतात. शेतातली विहीर…. त्यात फक्त दगड-धोंडे दिसायची. नाहीतर कोपऱ्यात कोळ्याने सुंदर असं नक्षीकाम करून विणलेलं जाळं होतं, जणू काही मोत्याचा दागिना…. एक-दोनदा निल्यासुद्धा बाचकला होता ते बघून. सकाळचं ऊन त्यावर पडलं कि कसं लखाकून जायचे ते… शेवटी जाळचं ते… निल्याने नाही तोडलं कधी ते. बाकी विहिरीत, पाण्याचा वास सुद्धा आला नाही कधी. एक वर्षापूर्वी कर्ज काढून, स्वतः मेहनत करून त्याने विहीर खणली होती. पाणी तर लागलं नाही कधी, त्यावर कर्ज अजून वाढवून ठेवलं. 

               यशवंतने पुन्हा विचारलं निल्याला," निल्या… अरे काय ठरवलं आहेस… ? ", तेव्हा निलेश भानावर आला.
" हं… हो… जातो आहे शहरात… म्हातारा मागे लागला आहे ना. म्हातारी बी सारखी टोचून बोलत असते… ती तरी काय करणार म्हना… जीव आहे ना तिचा… बाळावर … " निल्या बोलता बोलता थांबला. 
" काय झालं रे… ", येश्याने विचारलं. 
" नाही रे… आठवण झाली बाळाची…. कसा लहानपणी दंगा करायचा…. आठवतंय ना तुला पण ",
"हो रे… पण आता मोठा झाला ना तो… ",
"हो… माझ्यासाठी अजून लहानच आहे तो. चल मग… जाऊ आपण बाळाकडे… येशील ना तू… ",
" अरे मी कशाला… ? ",
"बघ येश्या… मला शहरात जास्त कळत नाही… १०-१२ वर्ष झाली शहरात जाऊन. बाळ… तेव्हा १० वीला असेल. तेव्हा गेलेलो. त्याच्या लग्नाला पण जाता आलं नाही. तुला माहित आहे ना शहरातलं म्हणून चल बरोबर जरां. ",
" तसं मला पण जास्त माहित नाही रे, पण तुझ्यासाठी येईन…. नाहीतरी इथे आता काय काम आहे आपलं… " त्यावर दोघेही हसले. 

                  यशवंत आणि निलेश, दोघेही लंगोटी यार…. गावातल्या एकाच वाडीत राहायचे. गावापासून ४ मैल अंतरावर असलेल्या शाळेत दोघे पायी-पायी जायचे. तालुक्याची शाळा लांबच होती तशी. १०वी पर्यंतच शिक्षण होतं तिथे. तिथून आणखी पुढे ४ मैल एक कॉलेज होतं १२ वी पर्यंत. एवढया लांब कोण पायपीट करणार. म्हणून गावातली ४-५ डोकीच तेवढी शिकलेली. यशवंत आणि निलेश दोघेही शिकलेले. अभ्यासात दोघांची डोकी चांगली. दोघांचं कुटुंब शेतीत गुंतलेलं. येश्याचे वडील लहानपणीच वारलेले. त्याचा काका आणि आई राबायचे शेतात. त्याने १२ वी शिकून शिक्षण सोडून दिलं. निल्याला पुढे शिकायचं होतं. ऐनवेळेला त्याच्या वडिलांना अपघात झाला आणि ते जागेवर बसले. सगळं घर शेतावर चालायचं. घरात लहान भाऊ सुद्धा होता. त्याचं शिक्षण होतं. १२ वी शिकून त्याने शिक्षणाचा निरोप घेतला. आणि स्वतःला शेतात जुपलं. दोघे शिकलेले होते. म्हणून दोघांची भाषा गावरान वाटायची नाही कधी… गावात काही कागदपत्राचं काम असेल तर गावकरी या दोघांकडे जायचे.    

                 " अवं… झोपताय न आता… " निल्याच्या बायकोने त्याला हाक मारली. निल्या झोपडी बाहेर बसला होता. बायकोचा आवाज ऐकला त्याने. दुर्लक्ष करत त्याने गोधडी घेतली खांदयावर. " आये… जरा येश्याकडं जाऊन येतु गं… " निल्याने बाहेरून आवाज दिला. " आता कूटं चाललास मरायला… इतक्या रातीचा… " म्हातारी आतून ओरडली. त्याकडे सुद्धा लक्ष न देता निल्या निघाला. १० पावलांवर येश्याचं घर… घर कसलं, झोपडीच ती.… गावात पक्क घर फक्त गावच्या सरपंचाचं. श्रीमंत माणूस, तेवढाच मनाने बी श्रीमंत. कोनालाबी पैशाची मदत करायचा,व्याज न घेता. कितीतरी गावकऱ्याच्या जमिनी त्याकडे गहाण ठेवलेल्या. सरपंच चांगला माणूस होता, पण त्याची बायको कपटी होती. सगळ्या गावकऱ्यावर तिचा काय राग होता काय माहित. तशी ती लहानच होती, १५ वर्ष लहान सरपंचापेक्षा. म्हणून तिचं काही चालायचं नाही त्यापुढे. मुग गिळून गप राहायची. येवढा चांगला होता सरपंच. पण देवाला ते बघवलं नाही बहुदा. तापाचं कारण झालं आणि चालता-बोलता माणूस अचानक गेला. खूप लोकं रडले तेव्हा. देवापुढे काय चालणार कोणाचं. थोडे दिवस दुःख केलं त्या बाईने. बारावं झालं तसं तिने रंग दाखवायला सुरु केलं. सरडयाची जात ती. जेवढे पैसे सरपंचाने दिले होते, त्यावर व्याज लावून दामदुपटीने ती परत घेऊ लागली. गाववाले काय करणार… जमिनी परत पाहिजे तर पैसे तर दयावेच लागणार. त्यात पाऊस कमी झालेला. काही जणांनी शेती-जमिनी गमावल्या. त्यात येश्याचं शेत पण होतं. लग्नासाठी शेतं उसनं ठेवलं होतं. शेतावर २ वर्ष काही पिकलंच नाही. पैसे कसे देणार. गेलं शेतं. पोट भरण्यासाठी येश्या असंच कूठेतरी काम करायचा गावात. 

                   निल्या, येश्याच्या झोपडीजवळ आला. एक दिवा तेवढा जळत होता. जना ( येश्याची बायको ) बाहेर चुलीजवळ भाकऱ्या थापत बसली होती. " जना… ये जना, येश्या हाय का घरात… " निल्याने लांबूनच विचारलं. " ते व्हय… दगडाच्या झाडावर गेलं असतील… " भाकरी तव्यावर टाकत जना बोलली. भाकरीचा खमंग वास निल्याच्या नाकात शिरला. येश्याची जना, जेवण चांगलं बनवायची. निल्या मुद्दाम यायचा कधी येश्याकडे जेवायला. आपली बायको काय जेवण करते.… नुसतं जेवायचं म्हणून जेवण ते. ना त्याला चव ना ढव.… ढकलायचं नुसतं पोटात. भाकरीचा वास अजून त्याच्या नाकात तसाच होता. निल्या जरा घुटमळला तिथे. जनाला कळलं ते. " या भावजी… एक तुकडा टाका तोंडात भाकरीचा." ,"नको… राहू दे." म्हणत निल्या पुढे आला. तिथूनच थोडं वर असलेल्या पठाराकडे त्याने नजर टाकली. येश्या झाडाजवळ बसला होता. दगडाचं झाड. दोन मोठया खडकामधून ते झाड वर आलं होतं. बऱ्यापैकी मोठं झाडं होतं. कधीपासून होतं ते माहित नाही. पण निल्यापेक्षातरी मोठं होतं ते. किमान त्याच्या आजोबाच्या वयाचं तरी असेल. आजोबा आता नव्हता,तरी झाडं होतं. निल्या आणि येश्याचं आवडीचं ठिकाण. कितीही आग होतं असली तरी या झाडाखाली शांत सावली असायची. झाडाखाली बसलं कि सगळ गाव दिसायचा. दूरवर पसरलेली शेतं दिसायची, कोणाकोणाची.  त्या दगडावर झोपलं कि फक्त निळे आकाश दिसायचे, अन रात्री लाखो चांदण्या. दोन झाडं आणि त्यातून आलेलं झाड, म्हणून त्याला दगडाचं झाडं म्हणायचे सगळे. ३ वर्ष पाऊस नसूनही त्या झाडाला कुठून पाणी मिळायचं काय माहित. निल्या आणि येश्या लहानपणापासून यायचे तिथे. कधी झोपायला, कधी नुसत्या गप्पा मारायला. 

                   निल्या येश्याच्या बाजूला येऊन बसला. येश्या लांब कूठेतरी पाहत होता. हा… येश्याच शेत दिसायची तिथून. येश्याने शेत दिल्यापासून एकदाही फिरकला नव्हता तिथे. एक वर्ष झालं असेल शेतावर जाऊन त्याला. जाणार तरी कसा आणि कश्याला जाणार. त्याची जमीन थोडीच होती ती आता. मग कधी कधी या दगडावर येऊन लांबूनच बघत बसायचा शेत… दुरूनच. निल्याला माहित होतं ते दुःख काय असते ते. येश्याला थोडयावेळाने कळलं, निल्या आला ते. 
" काय रे … कधी आलासं.",
" मी ना… ते शेताकडे बघत होतास तेव्हा आलो." त्यावर येश्या जरासं हसला. 
" का बघत असतोस रे … एवढं वाटतं तर जाऊन येना तिकडे. " ,
" नको यार… सवय सुटली आहे ती बरं आहे.… ती जागा आता आपली नाही ना. " निल्याने येश्याकडे पाहिलं, डोळ्याच्या कडा ओल्या वाटल्या त्याला. 
" छान चंद्र आहे ना आकाशात. मस्त उजेड पडला आहे… " येश्याने विषय बदलला. 
" अरे हो… तुला दुपारपासून शोधतो आहे मी. कूठे होतास… सकाळी तेवढा होतास नंतर कूठे गेलेलास… ", निल्याने विचारलं.
" पलीकडच्या वाडीतला शंकर माहित आहे तुला… ",
"कोण रे… ",
"तो रे… गेल्या महिन्यात त्याचा बैल मेला तो… ",
"हा हा … शंकर गुरव ना… ",
"हो… तोच, त्याने गळफास लावून घेतला ना… तिथे गेलो होतो. " निल्या काय बोलणार त्यावर. रोज, एक दिवस आड अशी बातमी यायची. " किती कर्ज केलं होतं त्याने. पाऊस नाही. त्यात बैल मेला. घरी खाणारी पाच डोकी. वैतागला होता अगदी. " मक्ख चेहऱ्याने येश्या सांगत होता. 
" तुला कोणी सांगितला, तो गेला ते. " ,
" अरे … माझा मित्र आहे त्या वाडीत. त्याच्या शेजारीच राहायचा. शंकराची जमीन पण त्याच्या शेताच्या बाजूलाच. एकत्र जायचे दोघे शेतावर. मित्र सांगत होता, रोज जाऊन बसायचा शेतावर. करपलेल्या जमिनीकडे बघत शिव्या देत बसायचा.देवाला शिव्या दयायचा,नशिबाला… घरच्यांना… कधी स्वतःलाच शिव्या दयायचा. आज पण एकत्र गेले दोघे शेतावर. मित्र, शेतातलं कुंपण तोडलं होतं गुरांनी. ते लावायला लांब गेला तेवढा. लांबून त्याला झाडावर काही हलताना दिसलं, त्याला वाटलं, वानरच आलं झाडावर. पण वानर कूठे येणार वडाच्या झाडावर. म्हणून धावत गेला तिथे. तर शंकर होता तो. पोहोचेपर्यंत, जीव गेला होता… काय करणार ना… देवाला पण दया येत नाही शेतकऱ्याची आजकाल. " निल्या फक्त ऐकत होता. त्याची परिस्थिती तीच होती ना, कर्जाचा डोंगर होता डोक्यावर. 

" चल… मी जेवून घेतो.… जाऊया ना उद्या शहरात… बाळाकडे… पत्ता वगैरे माहित आहे ना तुला." निल्या भानावर आला. 
" हो… पत्ता आहे, उद्या सकाळी निघूया. ",
"चल मग… " येश्या निघाला. निल्या दगडावर बसून." निल्या… चल. " येश्याने हाक मारली. 
" नाही तू जा… मी झोपतो आहे इथेच." येश्या निघून गेला. निल्याने गोधडी पसरली. अंग टाकलं त्याने खाली. वर आभाळात पसरलेल्या चांदण्याकडे बघत राहिला आणि विचारात गढून गेला. 

                  १२ वी पर्यंत शिक्षण झालं होतं. अजून पुढे शिकलो असतो तर शहरात चांगली नोकरी भेटली असती. पण वडिलांमुळे शेतात काम करायला लागलं. चांगली ५ एकर जमीन होती. वडिलांना अपघात झाल्यामुळे त्यांना शेतीची काम जमत नव्हती. निलेशला नाईलाजास्तोवर शेतीत उतरावं लागलं. त्यावेळी उत्पन्न बऱ्यापैकी असायचं शेतीतून. निलेश शेती करायला लागल्यापासून जरा चांगलं उत्पन्न यायला लागलं होतं. यशवंत सुद्धा शेती करायचा ना, दोघे एकमेकांना मदत करायचे. छान दिवस जात होते. शेत नुसतं डोलायचं वाऱ्यावर. हिरवं हिरवं गार… येश्या सुद्धा खुश असायचा. निलेशचा लहान भाऊ, रोहित… त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च, निल्याने शेतीतून केला. शहरात शिकावं अशी रोहितची इच्छ्या होती. आपण शिकलो नाही,पण बाळाला खूप शिकवावं असं निल्याने ठरवलं. शहरात निल्याचे नातेवाईक होते. तिथे त्याने रोहितची राहण्याची व्यवस्था केली, दरमहा ५००० रुपये दयायचा निल्या त्यांना, रोहितच भाडं म्हणून. रोहित सुद्धा हुशार होता, भावाच्या कष्टाचं चीज केलं त्याने. चांगले टक्के काढायचा प्रत्येक वेळेस. इकडे निल्या शेतात राबायचा आणि रोहित अभ्यासात.   


                शिक्षण पुढे वाढत गेलं तसा खर्चही वाढत गेला. त्यात पाऊससुद्धा कमी झाला होता एक-दोन वर्षात. एवढ उत्पन्न नाही आले होते शेतीतून. रोहितला engineering ला जायचे होते, तिथे होस्टेलची व्यवस्था होती. त्याचा खर्च होता. कसं करणार होता निल्या ते. खूप विचार करून त्याने २ एकर जमीन विकून टाकली. आणि मिळालेले सगळे पैसे रोहितच्या शिक्षणात खर्च केले. वडिलांबरोबर खूप मोठ्ठ भांडण झालं होतं तेव्हा निल्याचं. पण आपला बाळ नक्की मोठ्ठा होईल असं वाटायचं निल्याला. आणि तसंच झालं. रोहितने engineering चे शिक्षण पूर्ण केलं. किती आनंद झाला होता तेव्हा निल्याला. त्यादिवशी, रोहित पेढे घेऊन आला होता गावाच्या घरी, इतक्या वर्षांनी. बाळा आता मोठा झालेला. उंच, देखणा अगदी. आईला तर तोच आवडायचा पहिल्यापासून. त्याचेच लाड नेहमी. पण आता रोहित बदलला होता, शहरात राहून. गावच्या घरात त्याला जरा अवघडल्या सारखं वाटत होतं. निल्याला कळलं ते. २ दिवस तेवढा राहिला रोहित. तिसऱ्या दिवशी निघताना बोलला, 
"दादा… जरा बोलायचं होतं तुझ्याशी.",
"हा बाळा… बोल ना मग. " ,
"इकडे नको… चल, मी निघतो आहे आता. S.T. stand बोलू." निल्याला काही कळलं नाही. S.T. stand आले तसा त्याने लगेच विषय सुरु केला,
" दादा… आता मला गावात राहणं काही जमणार नाही. शहरात नोकरी मिळेल. गावात राहून काही होणार नाही.",
"मग… ",
"मग मला आता होस्टेलमध्ये राहता येणार नाही. मला एखादी रूम घेऊन देतोस का शहरात. ? ", निल्या चाट पडला. 
" बाळा… तू बघतोस ना… काय परिस्तिथी आहे इकडे. शेतात पिक उभं आहे, त्यातून किती पैसे मिळतील माहित नाही. त्यात बाबांना वरचेवर बर नसते. कूठून पैसे आणू सांग मी." रोहित रागावला. 
" मग…. एवढं का शिकलो मी.…. शेतात काम करण्यासाठी का.… ठीक आहे, करतो मी पण शेती." म्हणत त्याने हातातली सामान फेकून दिलं. 

               निल्याला वाईट वाटलं. सामान उचललं त्याने. धूळ झाडली." नको रे बाळा… असं नको बोलूस… एवढा शिकवला तुला ते काय गावात राहायला.… नाही ना, तुझा दादा आहे अजून… थोडे दिवस थांब, करतो काहीतरी व्यवस्था पैशाची.","ठीक आहे दादा." रोहितने किस्यामधून एक कागद बाहेर काढला." पैसे जमले ना कि या पत्त्यावर पाठवून दे. सध्या मी इथेच राहतो, भाड्यानी…. जेवढे जमतील तेवढे पाठवून दे. घर घेण्यासाठी एक रक्कम द्यावी लागते. बाकीच बँक लोन देते. ते काम मी करतो, फक्त अनामत रकमेचे बघ जरा." म्हणत रोहित निघून गेला. निल्या संभ्रमात, काय करायचे… खूप विचाराअंती त्याने आणखी उरलेल्या जमिनीचा तुकडा विकण्याचा निर्णय घेतला. १ एकर जमिनीत जास्त पैसे येत नव्हते. म्हणून २ एकर जमीन गेली. पुन्हा म्हातारा चिडला निल्यावर.५ एकर जमीन आता १ एकर वर आली. पण बाळाचं चांगलं होते आहे यावर निलेश समाधानी होता. जेवढी रक्कम आली, तेवढी त्याने रोहितला पाठवून दिली. त्यातून रोहितने एक छानशी रूम बूक केली. लवकरच चांगला जॉबही मिळाला. रोहीतच छान चालू होतं तिथे. कधी कधी निल्या तालुक्याला  जाऊन फोन करायचा रोहितला, त्याची खुशाली विचारायला. मोबाईल होता ना बाळाकडे. त्यावर निल्या फोन लावायचा त्याला. 


            रोहितच छान जमलं होतं शहरात. पण इकडे गावात दुष्काळ पडत होता. मोजकाच पाऊस व्हायचा. त्यात जी काही शेती व्हायची तेवढीच. त्यातून फारच कमी पैसे मिळायचे. तरी बर, नदी जवळ होती. तिथूनच शेतीला पाणी द्यायचा मग निल्या. तरीसुद्धा १ एकर जमिनीतून किती उत्पन्न मिळणार. वरून सुर्य आग ओकायाचा नुसता. पाणी जमिनीत मुरायच नाही. शेत कसं उभं रहाणार मग. रोहित सुरुवातीला दरमहिना थोडे पैसे पाठवून द्यायचा. हळूहळू ते २ महिने, ३ महिने असे पैसे येऊ लागले. आता आता तर सहा महिन्यांनी यायचे पैसे. ते पण जरासे. रोहितने लग्नही केलं होतं ना. फक्त निलेशला आमंत्रण होतं गावातून. निल्या काही गेला नाही लग्नाला. जाणार कसा… काय होतं द्यायला त्याच्याकडे. रोहित पैसे पाठवायचा त्यावर घर चालायचं कसं तरी. निल्या सुद्धा येश्याप्रमाणे गावात काही काम करत दिवस ढकलत होता. पाऊस झाला कि थोडी पेरणी करायचा. नाहीतर नदीच पाणी होतंच. 

            पण गेली तीन वर्ष पावसाचा एक थेंब पडला नाही जमिनीवर. शेतीवर पोट असणाऱ्याचे तर हाल झाले. किती शेतकऱ्यांनी कर्ज काढून काढून शेती केली होती. सगळी जळून गेली. नदी आटून गेली. शेतीला पाणी कूठून येणार … कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करू लागले. एकामागोमाग एक. घराचांचे हाल कसे बघवणार कोणाला. जणू देव रुसला होता माणसावर. तीन वर्षात एकदाही पाऊस नाही. एखादा काळा पुंजका यायचा डोक्यावर कधीतरी. त्यातून किती पाणी मिळणार… तरी लोकं आशेवर असायची. थोडातरी बरसेल म्हणून. तो काळा ढग आला तसा निघून जायचा. निल्याच्या वाडीपासून थोडया अंतरावर एक झरा होता. तिथून गावातल्या बायका पाणी भरून आणायच्या. तसा लांब होता तो. पण तिथून शेतीला पाणी आणू शकत नव्हतं. ते एक बरं, कि झरा आटला नाही. नाहीतर पिण्याच्या पाण्याची बोंब झाली असती. गावातले सगळेच एक-दोन दिवस आड आंघोळ करायचे. पाणी तसं होतं या गावात. बाजूच्या गावात ते पण नव्हतं. शहरातून tanker यायचा पाण्याचा, दोन दिवस आड. त्यावरून किती भांडण, मारामाऱ्या. एकाचा तर खून झाला होता, पाण्याच्या नंबरवरून. इतकं पाणी गडद झालं होतं. 


           निल्या अजून जागा होता. रात्र खूप झाली होती. त्या झाडाखाली शांत झोप लागायची. पण आज निल्या जागाच होता. अचानक त्याला हल्लीच , शेजारच्या गावातली घटना आठवली. पाण्याचा tanker यायचा, तो एका विहिरीत पाणी सोडायचा. रिकामीच विहीर ती. त्यात खाली माती असायची. पाणी जोराने पडायचं, सगळं पाणी गढूळ व्हायचं. पिणार कसं ते. तरी लोकं ते लाल, मातकट पाणी भरून भरून घेऊन जायचे. पुन्हा २ दिवसांनी tanker यायचा. मग लोकांनी कल्पना लढवली. हंडा किंवा कळशीला दोरी बांधलेली असायची. तर तसंच पाणी वरचे वर भरून घेयाचे. सगळे तसंच करू लागले मग. tanker ने पाईप विहिरीत सोडला कि सगळेच त्या पाईपच्या खाली हंडा,कळशी भरून घेऊ लागले. स्वच्छ पाणी मिळायचे, पिण्यासाठी. त्यादिवशी, tanker नेहमी सारखाच आला. सगळ्याची झुब्बड उडाली. पटापट सगळ्यांनी दोऱ्या लावलेली भांडी सोडली. एका आजीचा हंडा पहिलाच पाईपच्या खाली आला, जोरात पाण्याचा भपका आला पाईपमधून. म्हातारीला तोल सांभाळता आला नाही. थेट विहिरीत म्हातारी, डोक्यावर पडली. मोठी जखम डोक्याला. सगळी बोंबाबोंब. गाडीवाल्याला माहितच नाही म्हातारी पडली ते. त्याने पाणी चालूच ठेवलं. खूप वेळाने त्याने पाणी बंद केलं. तरुण पोरांनी पटपट उड्या मारल्या विहिरीत. म्हातारीला बाहेर काढलं. जीव होता अजून. लगेच घेऊन गेले तालुक्याला. लोकं हळहळली थोडी,… म्हातारीसाठी नाही तर… पाण्यासाठी. गढूळ पाणी तर वापरू शकत होते, या पाण्यात रक्ताचा लाल रंग होता. ते पाणी कोणीच वापरू शकत नव्हतं. दुसरी विहीर नाही जवळपास. उरलेला tanker मधलं पाणी किती जणांना पुरणार ना. होतं तेवढं पाणी देऊन tanker निघून गेला. काय ना… जिवापेक्षा पाणी महत्त्वाचं झालं होतं. 

            आतातर , ५ दिवस झाले तरी tanker यायचा नाही. गावातले बाप-माणूस मिळून जायचे दूरवर. तिथे नदी होती. नदी कसली …. लहानसा ओढा… मातकट पाणी, तेसुद्धा ५ मैल लांब. तेच पाणी भरून आणायचे मग. उन्हा-तानाची पायपीट. तालुक्यात तरी कूठे पाणी होतं,असलं तरी ते देणार का… शाळा बंद झाल्या. मुलंच नाही शाळेत तर कशी चालणार. सगळी मुलं सकाळपासून पाणी भरण्याच्या कामावर. शाळेत कोण कशाला जातेय मग. बायका तेवढया दिसायच्या गावात. पाण्याची गाडी आली तर कोणीतरी पाहिजे ना म्हणून. पहिली लहान पोरं जायची मोठ्या बरोबर पाण्याला. पण एक दिवशी, एक पोरगं… असेल ७-८ वर्षाचं. पाणी घेऊन येता येता चक्कर येऊन पडलं. किती उन्हं ते. दवाखान्यात नेता नेता वाटेतच जीव सोडला होता. म्हणून आता लहान मुलं जात नसायची. गावातचं रहायची. वाऱ्यासोबत धुरळा उडाला कि वाटायचं tanker आला, सगळी पोरं भांडी घेऊन धावत जायची. एकाद-दुसरा रिकामा tanker जायचा कधी कधी गावातून. त्यामागेही पळत जायची पोरं, रोज कोणना कोण ढोपरं फोडून घ्यायचे. माणसं वेडी झाली होती पाण्यामागे. जनावरं काय करणार मग… काही जणांनी विकून टाकली आपली. काहीजणांनी अशीच सोडून दिली होती वाऱ्यावर. कूठे कूठे जाऊन मारायची ती… हा वास यायचा गावात मग. त्यांना पुरायला कोण जाणार पुढे…. जमीन कठीण झाली होती उन्हाने. ती खोदायला कष्ट पडायचे खूप…. पुन्हा तहान लागणार, अंघोळ करावी लागणार… पाणी होतं कूठे एवढं… 

           निल्याच्या वाडीत तर पिण्यासाठी पाणी होतं.त्यावर चालायचं. पण आता त्याला खरंच गरज होती पैश्याची. म्हातारीच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता. म्हाताऱ्याच्या औषधांचा खर्च होता. त्यासाठी किमान २०,००० ची गरज होती. निल्या पुरता रिकामा झाला होता. त्यामुळे बाळाकडून थोडी मदत मागायला तो शहरात जात होता. रोहितने एव्हाना मोठ्ठ घर घेतलं होतं. लग्नानंतर तो तिथेच राहत होता. ५ वर्ष झाली असतील. तेव्हा निल्याला त्याने नवीन पत्ता दिला होता, काही गरज लागली तर. बाळा नक्की मदत करेल… असा सगळा विचार करत करत निल्याला कधी झोप लागली ते कळलचं नाही.                  

----------------------------------------------------- to be continued-----------------------




Followers