All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Sunday 29 March 2020

भटकंती .... नव्या वळणावरची !! .......( भाग ४)


आज आकाशने सलीमला पहाटे ५ वाजताच जागे केले. एवढ्या सकाळी जागे केले. सलीमला तसा वैताग आलेला. तरी याच्या सोबत प्रवास करायचे ठरले होते ना.... नाईलाजाने तो आकाश सोबत होता. तसे त्यांनी ५:३० ला चालायला सुरुवात केली तरीही अपुरी झोप, शिवाय कुठे जात होते ते माहित नाही. या मुळेच आकाशचा प्रचंड राग आलेला सलीमला. काळोख असल्याने समोर काय आहे, आजूबाजूला कोण आहे तेही समजत नव्हते.

" कुठे चाललो आहोत आपण.... " शेवटी न राहवून सलीमने त्याला विचारलं. आकाश थांबला.
" दम लागला का ? " ,
" अरे माणसा !! एकतर इतक्या लवकर जागे केलेस. जवळपास एक तास होत आला आता. कुठे चाललो आहोत ते सांगत नाहीस. मी सोबत येतो आहे याचा अर्थ.... " आकाशने सलीमला पुढे बोलायला दिलेच नाही. आकाशने घड्याळात पाहिलं. मग सलीमकडे..
" पाऊस बघितला आहेस का कधी... " सलीमने डोक्याला हात लावला. आकाशला हसू आलं.
" चल.... मागे चालत रहा.. " आकाश बोलला आणि पुढे निघाला हि.
" मला जो प्रश्न विचारलास तो ... तुला तरी कळला का ... कि उगाच आपलं विचारलं... " सलीमने चालता चालता विचारलं. आकाशने त्याचे उत्तर दिले नाही.
" पाऊस बघितला का ... इतकी वर्ष फिरतो आहे ...... कोणी असं कधी विचारलं नाही... मूर्खांसारखा प्रश्न.... " सलीम एकटा बडबडत त्याच्या मागून चालत होता. एवढं तरी माहित होते कि डोंगर चढत आहोत. आणखी काही " वैतागलेल्या मिनिटानंतर " सलीम - आकाश थांबले.


" आता तू दमलास वाटते... निदान हे तर सांग , कुठे चाललो आहोत ते.. आणि मगाशी काय विचारलं ... पाऊस बघितला आहेस का .. काय नक्की " सलीम आकाशला किती काय काय विचारत होता.
" मागे बघ... " आकाश इतकंच बोलला.
सलीमने मागे वळून पाहिलं. डोंगर माथ्यावरून दिसणारा सूर्योदय पहिल्यांदा सलीम अनुभवत होता. ढगांच्या आडून... दूरवर होणारा सूर्योदय.... सोनेरी किरणे चेहऱ्यावर येतं होती. समोरचे छोटे शिखर, त्या सोनेरी रंगात न्हाऊन निघत होते. आकाशने त्याच्या खांदयावर हात ठेवला. " तूला विचारलं ना ...पाऊस बघितला आहेस का कधी ... तो बघ पाऊस.. " आकाशने सलीमला समोर बघायला सांगितले. समोर दिसणारं शिखर... ते सोनेरी उन्हात... त्यापासून दिसणारे... त्यांच्या उजव्या बाजूला... आणखी पुढे पावसाचे आगमन झालेलं... सलिमने लगेच त्याच्या डाव्या बाजूला पाहिलं, तिथेही पावसाची लगबग सुरु झालेली. बघितला पाऊस त्याने !!  डोळ्यासमोर दिसणारे खरेच .... कि ... स्पप्न !! सलीमला काय बोलावे , कसे रिऍक्ट व्हावे समजत नव्हते. डोळ्यातून पाणी कधी आले तेही कळलं नाही त्याला.

पुढली १० मिनिटे तशीच शांततेत गेली. आकाश तिथे खाली बसून सलीमकडे बघत होता. सलीम अजूनही स्तब्ध उभा तसाच. काही वेळाने सलीम , आकाशच्या शेजारी येऊन बसला. काही ना बोलता , जे समोर घडत होते त्याकडेच पाहत होता.
" Thanks !! " सलीम बोलला. आकाशही भानावर आला.
" thanks कशाला.... पाऊस का आवडावा त्याचे कारण दाखवले तुला... " ,
" त्यासाठी नाही बोललो thanks ... " सलीम डोळे पुसत म्हणाला.

" मग ... " आकाशने सलीमकडे पाहिलं. नुकताच दूरवर सूर्य दिसायला लागला होता. पावसांच्या ढगांच्या काहीसा वर ... एक अस्पष्ट असे इंद्रधनू तयार होतं होते. ते पाहून सलीमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य उमटले.
" तिची आठवण करून दिलीस ... " आकाशने त्याच्या खांदयावर हात ठेवला.

=====================================================================

" पूजा ... कुठे जायचे आहे ते तरी सांग.. " कादंबरी तिचे सामान भरत बोलत होती. पूजाच्या डोक्यात काही वेगळेच सुरू होते. ती सुप्रीकडे बघत सामान भरत होती. सुप्रीने सकाळी लवकर उठून तिचे सामान भरून ठेवले होते. आताही ती त्या मंदिराच्या वाटेकडे नजर लावून होती.
" ओ मॅडम .... तुम्हाला विचारल... कुठे निघालो आहोत आपण ... " कादंबरी पूजाच्या समोर येऊन उभी राहिली. पूजा अजूनही सुप्रीच्या विचारात. शेवटी , कादंबरीने पूजाचे दोन्ही खांदे पकडून तिला हलवले. "
काय.......  काय .... थांब ना ... " पूजा जागी झाली.
" कधी पासून विचारते आहे तुला... कुठे लक्ष आहे पोरीचे... " ,
" काही नाही गं ... सुप्रीचा विचार करत होते. ",
" काय झालं ... " ,
" तिला बोलले तर आहे ...आकाशला घेऊन येऊ ... पण डब्बूच्या मनात काय सुरु आहे हे त्यालाच माहित... तो तयार होईल कि नाही, हि पुढची गोष्ट... तो आधी भेटला पाहिजे गं ..... सुप्रीला पुन्हा नाराज नाही करायचे मला ...." ,
" गणू आहे ना सोबत आपल्या... टेन्शन नही लेने का बाबू ... " कादंबरीने पूजाला मिठी मारली. पूजा जरा शांत झाल्यासारखी वाटली.

" बरे .... आता सगळ्यांची तयारी झाली आहे, कुठे निघायचे , कधी निघायचे ठरवले आहेस ना... ",
" हो ..... निघायचे आताच... पण एक वेगळी भीती वाटते आहे. !!!! " ,
" काहीच मनात आणू नकोस.... बाप्पा आहे ना .. टेन्शनला सांग .... माझा गणू किती मोठा आहे ते...घाबरून पळून गेला नाही तर नाव बदलून टाकू ... " ,
" कोणाचं ... ",
" तुझ्या डब्बूचं .. "
कादंबरीच्या या बोलण्यावर खरच पूजाला हसू आलं. थोडावेळ हसण्यात गेला. सुप्री तोपर्यंत यांच्या जवळ आलेली.
" काय जोक सुरू आहेत... मला तरी सांगा .. " सुप्रीने विचारलं.
" हि बया ... डब्बूचे नावं बदलायला निघाली आहे. " पूजा हसत म्हणाली. पूजाने कादंबरीचा किस्सा सांगितला. तीही खदखदून हसू लागली. काही वेळाने सर्वांची निघायची तयारी झाली. हवामानाचा अंदाज बघून पूजा निघाली , पुढल्या प्रवासाला.

आज मात्र पूजा सर्वांच्या मागून चालत होती. पुढे चालणाऱ्या ग्रुपमेंबरला पुढची वाट सांगून पूजाने मागून चालण्याचा निर्णय घेतला होता. कादंबरी - पूजा पुढेच होत्या. कादंबरीने पूजाला आज एकटे सोडले होते. सुप्रीने एकदा विचारलं ही , पूजाचे मागे राहणे. तरी कादंबरीनेच तिला थांबवले होते. कदाचित आकाशचे असे जाणे , हा तिचा दोष होता असे मानत असावी पूजा. त्यामुळेच आज तिचा प्रवास नेहमी सारखा नव्हता. त्यात या मंदिरात झालेली चुकामुक.... किती विचार करावा अजून त्याचा.... पूजा त्यामुळे जरा शांत वाटत होती.

=====================================================================

सलीम - आकाशचा प्रवास सुरु झालेला. पण त्या दृष्याने सलिमची नजर बदलून टाकली होती. आताही तो आकाशच्या मागून चालत होता. तरी नेहमी सारखा वाटत नव्हता. आकाशला फरक कळत होता. काही न बोलता त्या दोघांचा प्रवास सुरु होता. दुपार झाली तसे दोघे थांबले. जवळच असलेल्या गावात दुपारचे जेवण मिळते का ते बघायला गेले. जेवण झाले. पोटभर नसले तरी मन भरावे इतके होते.

जेवण झाल्याने थोडावेळ विश्रांती घेऊन पुढचा प्रवास करू असे आकाशने ठरवले. गावापासून दूर असलेल्या एका टेकडीच्या पायथ्याशी आले दोघे. तिथेच असलेल्या एका मोठया दगडावर आकाश जाऊन बसला. त्याच्या सोबत असलेला सलीम , त्याच्या बाजूला न बसता ... खालीच बसला. " पाऊस बघितल्या " नंतर सलीम अजूनही शांतच होता. इतका वेळ शांतच. कोणी सुरुवात करावी तेच कळत नव्हते. आकाशने सलीमकडे एक नजर टाकली. सलीम समोर पाहत होता. आकाशने हि समोर बघायला सुरुवात केली.

दुपार असली तरी पावसाळी मेघांचे आगमन झाल्याने ऊन - पावसाचा खेळ सुरु होता कधी पासून. गावसुद्धा दुपारच्या जेवणाने सुस्तावलेले वाटत होते. एखादं -दुसरा सोडला तर गावात फक्त कौलारू घरेच आहेत असे भासत होते. पक्षांनी सुद्धा आराम करायचे ठरवलं असावं बहुदा. ढगांसोबत येणाऱ्या वाऱ्यासोबत सळसळणारी झाडेच तेवढी वातावरण जिवंत ठेवण्यास मदत करत होती. त्यांचाच काय तो आवाज....... इतकी शांतता.... आभाळात सुद्धा ढगांचे वेगवेगळे आकार, कधी-मध्ये डोकावणारा सूर्य.

" तीच नाव ... हेमलता ... " सलीम बोलला खूप वेळाने. आकाशने त्याकडे पाहिले, सलीम समोर बघूनच बोलत होता. " छान होती.... नाकी - डोळी नीटस... तब्बेतीने छान होती. अचानक आलेली आयुष्यात माझ्या.... जबरदस्ती करून बोललास तरी चालेल... तरी आवडायची सोबत तिची. बडबड तर किती करायची. मधेच एखादा जोक.... " सलीम स्वतःशीच हसला. आकाशला छान वाटलं सलीम बोलत होता ते.
" तिचे बोलणे आता आठवत नाही... इतकी वर्ष झाली ना... खूप बोलायचो आम्ही.... तीच जास्त बोलायची .. इतक्या वर्षे आलेल्या वादळाने तिचे बोलणे उडून गेले.... पण तिचे हसणे आठवते , अगदी स्पष्ट... हसताना गाल असे गुलाबी होयाची... गुलाबाचे फुल जसे.... " सलीम भारावून बोलत होता.
" तो सकाळी पाऊस दाखवलास ना... तसा पाऊस आला कि बसल्या जागेवरून उठून खिडकीकडे पळायची. ऑफिस मध्ये आहोत कि नाही , याचा विसर पडायचा तिला. काहीतरी होयाचे तिला. अशी ओझळ पुढे करून पावसाचे थेंब झेलायची... ओजळीतले इवलेसे तळे, मग पिऊन ... स्वतःची असलेली पावसाची तहान... काही काळ का होईना.... शमवायची.... तेवढ्यापुरती....  पुन्हा ते पावसाचे प्रेम .... प्रेम नाही वेड ... वेडेपणा.... प्रत्येक दिवशी असे ओथंबून यायचे तिचे पावसावरचे प्रेम... पावसाकडे बघत एक छान असे हास्य तिचे ओठांवर यायचे... गालावर खळी नसली तरी .... आनंदाने क्षणभर का होईना .... गाल गुलाबी होऊन जायचे तिचे.... " सलीमच्या गालावर आता त्याच्या डोळ्यातील पाणी होते.


आकाशला सुद्धा सुप्रीची आठवण झाली. सलीम बोलतच होता. " विचित्र वागायची कधी... पण मनात कधी काही नसायचे... शुद्ध मन म्हणतात तसे काही. न सांगताच खूप काही करायची माझ्यासाठी... कोण होती... आमचं नातं काय... काही कळायचे नाही. माझ्या सारख्या अनाथ.... कोणी नसलेल्या मुलाला... काय पाहिजे अजून... ऑफिस सुटले तरी आम्ही किती वेळ फिरत असायचो... दिवसातला जितका वेळ तिला देता येईल.... नाही.... जितका जास्त वेळ तिला देता येईल असा नेहमीच मी प्रयत्न करत असायचो..... पण काय करणार ... होते कधी कधी.... मीच कमी पडलो ना ... " सलीमच्या डोळ्यात अजूनही पाणी होते.

आकाश त्याच्या जवळ येऊन बसला. त्याला सावरलं. सलीमने डोळे पुसले.
" विषय बदलूया का ... " सलीमने मानेने होकार दिला. " तू इतकी वर्ष फिरतो आहेस ना ... मग फक्त गावात का फिरतोस.... या अश्या रानावनात का नाही.... तिथे का जात नाहीस.. " सलीमच्या चेहऱ्यावर थोडे हास्य परतले या प्रश्नावर...
" मी जंगलातच फिरत असतो.... मला नाही आवडत माणसं .... गर्दी.... भूक लागली तरच गावात जातो... " हि मात्र आकाशसाठी वेगळी माहिती होती.
" तू तर बोललास.... अश्या डोंगररांगापासून दूर राहतो... ",
" हो ... ते तर खरं आहे... डोंगरावर जात नाही मी... जंगले काय फक्त डोंगरावर असतात का... " सलीम बोलला तसं आकाशला हसू आलं. " बरोबर कि .... बरोबर बोललास... " आकाश त्याच्या खांदयावर हात टाकून तसाच बसून होता. आणखी गप्पा - गोष्टी रंगल्या... हसून बोलणे , एकमेकांना दाद देणे... छानच वेळ गेला.

=====================================================================

आज संध्याकाळ अंमळ लवकर झाली. पावसाच्या ढगांचे आगमन त्यामुळे सूर्य देवाला आपला कारभार लवकर गुंडाळावा लागला. पूजा आणि त्याच्या ग्रुपने आधीच तंबू उभारून ठेवले होते. चालून थकलेले... आराम हवाच ना... अजूनही थोडा प्रकाश होता सोबतीला. माळरानावर तंबू उभे केले होते यांनी. पूजा एकटीच पुढे जाऊन बसली होती. सुप्रीला कळण्या इतपत पूजाचा स्वभाव कळू लागला होता आता. आणि ती आता आकाशच्या विचारात होती हेही तिने ओळखले. कादंबरीला पाहिले तिने. ती तिचा कॅमेरा साफ करण्यात मग्न. सुप्री पुजाजवळ आली.

संद्याकाळची उन्हे परतू लागलेली. त्यात आभाळात गर्दी करणाऱ्या ढगांनी ती उन्हे आधीच परतून लावली होती. श्रावणात रंगणार पावसाचा खेळ आधीच रंगलेला जणू. काही ठिकाणी तर लख्ख ऊन आणि त्यातून दिसणारी ढगांची सावली. कसा विचित्र असतो हा निसर्ग. मावळतीलाही ऊन घेऊन येतो. पूजा तेच पाहत बसली होती. समोर पसरलेलं अफाट असे हिरवं माळरान.... त्यात हे सर्व खेळ सुरु होते निसर्गाचे... सुप्री कधी तिच्या शेजारी येऊन उभी राहिली कळलं नाही तिला.

" बस .... बस सुप्रिया....  कधी आलीस... कळलंच नाही... " पूजा बोलली.
" तू जेव्हा विचारात हरवली होतीस ना .. तेव्हा पासून उभी आहे मागे मी... " सुप्री तिच्या बाजूलाच बसली. " आकाशचा विचार करते आहेस ना... " यावर पूजाने सुप्री कडे पाहिलं. " बघते आहे तुला मी... त्या देवळातून निघालो आहोत आपण, तेव्हा पासून तुझा चेहरा सांगतो सर्व.... प्रचंड विचार करते आहेस... अर्थात आकाशचाच विचार असणार... बरोबर ना !! " ,
" मला वाटतं राहते सारखं... डब्बूने घेतलेला निर्णय ..... गेली ४ वर्ष... त्याने असे दूर राहणे.... माझ्यामुळे ... " सुप्रीने मधेच तिचे वाक्य तोडले.
" असं काहीच मनात आणू नकोस तू... तो निर्णय माझा आणि आकाशचा होता.... शिवाय त्याला त्याची space देणे .. हेही माझंच बोलणे होते. सांगायचे झाले तर तो .... माझ्यामुळे गेला... " सुप्रीला हे बोलताना भरून आलेलं.

" येणार पुन्हा डब्बू... देवळात भेटला नाही.... तरी पुढे गाठायचे त्याला.. हे नक्की.. " पूजा आत्मविश्वासाने बोलत होती.
" आपल्याला कुठे जायचे आहे आता... तू बोलली होतीस ना.. तिथेही आकाश न चुकता जातो का... तिथे जाण्याचा दिवस ठरला आहे का... जशी हि यात्रा होती ... तस आहे का काही .... "

" नाही .... तस काही नाही . माझ्या आठवणीत आहे जागा ती... अशी काही ठरलेली तारीख नाही ती... या देवळातून आम्ही तिथे जायचो.... अलिप्त अशी जागा आहे ती... एक लहानगी टेकडी.... सांगते कशी आहे ती... दोन मोठ्या डोंगराआड , एक लहानशी टेकडी..... त्यावर एक अर्धवट बांधकाम असलेला किल्ला.. छोटा किल्ला... कोणी असा अर्धवट किल्ला बांधला माहित नाही... तिथे कोणीच जात नाही. गंमतीची गोष्ट अशी कि हि जागा कोणालाच माहित नाही. डब्बू माहित आहे ना ... शोधत असतो काही ना काही... तसेच एकदा फिरताना त्याने तो किल्ला आणि ती टेकडी शोधून काढली. मग काय... आधी त्या देवळातली जत्रा , मग हा किल्ला आणि ११ जूनला राजमाची .... असा प्रवास सुरु झाला.... पण सर्वात आधी आम्ही गेलो होतो ते राजमाचीला....त्यानंतर पुढल्या वर्षांपासून बाकीच्या जागा सुरु झाल्या. आता त्या टेकडीचा रस्ता जरा विसरली आहे मी तरी जाऊ शोधत... निदान बघून तरी येऊ... " ,

" पण आकाश तिथे येऊन गेला का ते कळेल का आपल्याला... " सुप्रीचा पुढचा प्रश्न.
" नाही , ते नाही कळू शकत... तरी जर तो तिथे गेला आणि थांबला तर आपली भेट होऊ शकते. नाहीतर आपण ११ जूनला राजमाचीला गाठूच त्याला... " पूजाच्या या वाक्यावर सुप्री छान हसली.

===============================================================================
आजची रात्र जरा जास्तच थंड जाणवत होती. आकाश - सलीमचा आजचा मुक्काम डोंगरावर होता. जवळपास कोणताच गाव आजूबाजूला नव्हता. त्याचा अंदाज लावून आकाशने तिथे वर थांबण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून पहाट झाल्यावर पुढचा रस्ता दिसू शकेल.

शेकोटी पेटवून दोघे त्याच्या जवळच बसले. सलीम आभाळात प्रवास करणाऱ्या ढगांकडे पाहत पावसाचा अंदाज लावत होता. आकाशची नजर सलीमकडे, कुतूहल ... दुसरं काय !! सलीमचे  ' आकाश ' निरीक्षण झाले आणि त्याचेही लक्ष आकाशकडे गेले.
" काय बघतोस रे !! " त्याच्या प्रश्नावर आकाश हसला.
" काही नाही. " आकाशने उत्तर दिले. " मला सांग. इतकी वर्ष फिरतोस... प्रचंड माहिती असेल ना तुला.. " आकाशने सलीमला विचारलं.
" खूप काही... या निसर्गाने खूप शिकवलं. त्यानेच दाखवून दिले, माणसांची काय जागा असते ते. " हे मात्र आकाशला पटलं.
" तू सांग... तुही फिरतोस ना ... तुझा अनुभव सांग. ",
" तसं मी खूप आधी पासून फिरतो. त्यामुळे तू बोललास ना ... माणसाची किंमत शुन्य आहे निसर्गात , ते पटते मला. आणि खरच आहे ते , आपली काळजी निसर्गचं घेतो.. त्यापुढे कसे कोण जाणार.... " ,
" किती वर्ष सुरु आहे भटकंती तुझी..... " ,
" माहिती नाही..... कदाचीत गेली १२ वर्ष, पण तुझ्या सारखं नाही जमणार. तू तर गेला नाहीस परतून. मी माझे फोटो काढून झाले कि मी शहरात जायचो. फोटो मॅगजीनला देयाचो. काही पैसे घेयाचो आणि पुन्हा भटकायला बाहेर. एक सांग.... तू तर भटकत असतो ना... तेही इतकी वर्ष... पैसे .... ????? " सलीमला प्रश्न समजला.
" पैसे कुठून येणार... मी निघालो तेव्हा, होते काय ते पैसे... थोडे सोबतीला घेतले होते, उरलेलं दान देऊन टाकले. सोबतीला घेतलेले पैसे थोड्याच दिवसात संपले. त्यानंतर तुला बोललो तसे. गावात जाऊन जेवतो नाहीतर मंदिरात ... नाव बदललं कि पोट भरते. कपडयांचे सांगायचे झाले तर गावातच मिळतात. जुने - पुराणे कपडे मागितले तर देतात... फाटके - मळलेले.. काहीही चालतात मला. हि सिगारेट .... गावत मदत लागली, घर उभारायला मदत करायची, कधी लाकडं तोडून देणे, अंगणातला कचरा काढून देणे... काहीही मदत लागली कि करतो. पैसे न घेता खायला मागतो. आणि सिगारेटचे पाकीट मिळालं कि झाली माझी सोय. पैशाची गरजच पडत नाही मला. आणि खर सांगायचे तर .... इतक्या वर्षात खरच.... पैसे नाहीत तर काही जगणं विसरलो नाही मी.... निसर्ग देतो भरभरून. त्यातून जितके पाहिजे तितके घेतो. बघ ना ... आजारी पडत नाही सहसा. तरी तसेच काही वाटलं तर आजूबाजूला कितीतरी औषधी वनस्पती आहेत. त्यांचा उपयोग होतो. दवाखाना... डॉक्टर ... काय गरज आहे. हे असे जगणे . मला ' खरं जगणं ' वाटते. " सलीम छान बोलला.

" तू बोलतोस छान... फक्त कोणी बोलायला नसते तुझ्यासोबत... बरोबर ना !! "  आकाश बोलला. सलीमच्या चेहऱ्यावर खूशी जाणवली.
" मीही लिहायचो रे आधी. आधी मी एकटा , अनाथ... वाचायची सवय होती. आवड होती, त्यातुन लिहायची आवड लागली. खूप लिहायचो कविता... त्यात तिची ओळख झाली आणि कवितेला नवा रंग चढू लागला...... " सलीम थांबला बोलायचा. आकाश त्याच्याकडे बघत होता. खूप वेळाने बोलला.
" ती गेल्यावर तसही माझ्या आयुष्याचा रंग उडून गेला. लिहिण्यात काही अर्थ नव्हता. शिवाय हे असे जगणे. कुठे लिहिणार आणि काय.... बोलणे कुठे होणार कोणाशी... सारखा प्रवास आणि प्रवास...... माणसांना कुठे वेळ असतो कोणासाठी.... बोलायला तर नाहीच.... " ,
" तूला इथे बरेचसे ओळखत असशील.... ना " आकाशने मधेच विचारलं.
" हो तर ... मी तर फक्त या आसपास गावात फिरत असतो... या देवीच्या यात्रेला येतो तेवढा इथे.. नाहीतर पूर्ण महाराष्ट्र भर फिरत असतो मी. तू बाहेरही जातोस ना ... माझं कसं पोट भरले कि झालं... जास्तीत जास्त एक दिवस मुक्काम एका ठिकाणी... " बोलण्यात वेळ कसा गेला कळलं नाही. आकाशने घड्याळात पाहिलं.
" चल ... झोपूया आता ... उद्या लवकर निघू.... तुला एक आणखी छान असे काही बघायला मिळेल उद्या .... " आकाशच्या बोलण्यावर आता सलीमचा विश्वास होता. दोघेही झोपले.

पहाटे ५ वाजता आकाशने सलीमला जागे केले. गेल्या काही दिवसात सलीमला सवय झालेली याची. आकाश लवकर जागा करायचा त्याला. काहीतरी छान असणार हे नक्की. त्याचीच तयारी करून दोघे निघाले. " कुठे निघालो आहोत... " सलीमने चालता चालता विचारलं. " जास्त दूर नाही इथून... जवळच आहे.. मला तिथली पहाट... सूर्योदय सुखावतो. त्यासाठीच लवकर निघालो. पुढल्या अर्ध्या - पाऊण तासात पोहोचू... " आकाशने चालताना explain केले. बोलल्याप्रमाणे , वेळेत पोहोचले. आकाशने घड्याळात पाहिलं. सकाळचे ६:३० वाजलेले. काही वेळाने सूर्य देवाचे दर्शन होईल , असा अंदाज लावला आकाशने. " बसुया खाली .... " आकाशने सलीमला सांगितले.

आजूबाजूला , शेजारी... समोर.... सर्वत्र धुकं पसरलं होते. त्यामुळे काही दिसतं नव्हते. आकाशला ती जागा माहित होती म्हणून निव्वळ अंदाजाने ते तिथे आलेले होते. काही क्षणांचा अवधी, पूर्वेकडून सोनेरी किरणे फेकत सूर्यदेवाचे आगमन झाले. धुक्याची चादर हळू हळू मागे पडू लागली. एका अर्धवट बांधकाम झालेल्या किल्यावर आहोत , हे सलीमने चट्कन ओळखले.

जसा सूर्य वर येऊ लागला तसं आजूबाजूचे , समोरचे स्पष्ट दिसू लागले. समोर , दूरवर पसरलेली डोंगराची रांग... त्यावर विसावलेले , प्रवास करून दमलेले ढग ... दिसत होते. काही रात्रीचा प्रवास करणारे पक्षी .... पहाटेच्या कुंद वातावरणात सुद्धा थव्याने प्रवास करत निघालेले. सलीम भारावून गेला. उभा राहिला. आणि जरा पुढे आला. खाली पसरलेले धुके आता विरळ होतं होते. अस्पष्ट वाटा ... घनदाट झाडी दिसत होती. त्या झाडीतूनच उरलेलं धुकं वर येऊ लागले होते. जणू त्या रानात लपलेले काही ढग आता वर येऊ पाहत होते. वातावरण आणखी स्वच्छ होऊ लागले , सलीम लक्ष देऊन पाहू लागला.

खाली दूरवर नजर जाईल तिथे फक्त हिरवा रंग फक्त.... इतकी झाडे -वेली .. झुडुपे.... काही उंच झाडे , काही बुटकी... त्यातून एक लालसर रंगाची पायवाट. काही शेते उभी होती. माहित नाही कसली. पण त्यात एक-दोन बुजगावणे दिसली म्हणून ती शेतं असा अंदाज. आणि या सर्वात ... एकच घर होते तिथे. सफेद रंगाचे. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ते घर अगदी ताठ मानेने उभे होते. वडाचा विस्तार तो केवढा !!! एका वाऱ्याच्या झुळुकेने , त्याचे पान - पान सळसळून जायचे, तेव्हा वाटायचे कि तो वड जागा होऊन आजूबाजूला नजर फिरवत आहे. त्या वडाच्या थोडे मागे असलेल्या जागी कसलीशी उंच उंच झाडे रांगेत वाढलेली. त्यातून एखाद - दुसरा " लवकर " जागा झालेला पक्षी ... उगाचच त्या झाडाभोवती गोल फेऱ्या मारत होता. कुठेतरी दूरवर अनोळखी पक्षी... उगाचच केकाटत इतरांनाही जागे करत होता.

सलीमला काय बोलावे सुचत नव्हते. हा काय प्राणी आहे.... कळतच नाही. आपण इतकी वर्ष फिरतीवर आहोत. हे असे कधी ' बघण्यात ' का आले नाही माझ्या... सलीम त्या निसर्गाकडे पाहत स्वतःशीच हसला. कितीवेळ तो नजर न हटवता समोरचे पाहत होता. मन भरणार नाहीच, तरी आकाशच्या शेजारी येऊन बसला. नुसता बसला नाही तर त्याच्या खांदयावर हात ठेवून बसला. आकाशला कमाल वाटली आणि हसूही आलं.
" काय साहेब ...... आवडलं का ?? " सलीमने आकाशला सलाम ठोकला.
" कसं .. काय ..... बघ .... बोलायला शब्दही नाहीत... तुलाच कसे माहित .... हे असे काही ..... निसर्गात असते ते ...आधी तो पाऊस बघायचे शिकवले आणि आता हे... " ,
" शोधतो मी...... आणि हे दरवर्षीचे आहे.... मी इथे येतेच असतो. दरवर्षी न चुकता..... " आकाश बोलत होता. सलीम भारावलेला होता.


थोडावेळ शांतता. " यापुढे येणार आहेस का सोबत ?? " आकाशने सलीमला विचारलं.
" का रे ... ?? " ,
" तूच बोलला होतास ना... नाही आवडलं तर तुझी आणि माझी वाट वेगळी... " आकाशने मस्करीत विचारलं. सलीमला हसायला आलं.
" बरा आहेस तू ... गेलो का सोडून... ते सोड... पुढे कुठे जायचे आहे... " ,
" राजमाची !! ",
" हम्म ..... नाव ऐकलं आहे. बघितलं नाही कधी. " ,
" आवडेल तुला... मी तर म्हणतो , तुलाही वेड लागेल त्या ठिकाणाचे.... शिवाय या पावसात त्या ठिकाणाचे सौंदर्य अधिक खुलते. म्हणून मी दरवर्षी पहिल्या पावसात त्याचे दर्शन करण्यास येतोच. [ Note -: याचा पहिला संदर्भ येतो तो भटकंतीच्या अगदी पहिल्या कथेत .... " भटकंती - सुरुवात एका प्रवासाची " या कथेत. या कथेच्या अगदीच सुरुवातीला आकाश आणि राजमाचीचा उल्लेख आहे. कळले नसेल तर वाचावे. एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे आहे हे ] माझे या जगातील सर्वात आवडीचे ठिकाण .... राजमाची !! " ,
" कधी निघायचे " , सलीमला घाई झालेली.
" हो हो ... जाऊया .... अजून ११ जूनला २ दिवस बाकी आहेत... " ,
" ११ जून ? तेव्हा काय  आहे... " ,
" माझा हा प्रवास त्यादिवशी सुरु झालेला... पहिल्यांदा मी आणि माझी एक मैत्रीण.... ११ जूनला राजमाचीला होतो. तेव्हाच ठरले होते माझे ... अशी भटकंती करायची आणि सुंदर निसर्ग याची देही डोळा पाहायचा. ती देवीची यात्रा ... हा अर्धवट किल्ला... हे आम्ही पुढच्या वर्षी पासून सुरु केले. पण ११ जून म्हणजे राजमाची. हे पक्के केले तेव्हापासूनच.... " ,
" मग निघूया का आता .... मला घाई झाली आहे ... " सलीम ....
" आज दुपार नंतर निघू.... तसही जास्त दूर नाही आहोत.. " आकाशने वर आभाळात नजर टाकली. " वातावरण थंड होते आहे. आणि इथे उंचावर थंडी अधिक जाणवते. शेकोटी पेटवतो का ... थोडा नास्ता ही करू... तुला औषधी चहा पियाला देतो. पिणार ना ... " आकाशने विचारलं.
" औषधी ?? " ,
" अरे वनस्पतीचा काढा ... तुझ्या इतकी माहिती नाही मला वनस्पतीची तरी कोणता काढा घेतला कि थंडी पळून जाते ते माहित आहे मला... मी आलोच ....." आकाश निघून गेला. सलीम शेकोटी पेटवायचा कामाला लागला.
===============================================================================
मजल-दरमजल करत पूजा आणि तिचा ग्रुप " त्या " ठिकाणी पोहोचले. पोहोचले तेव्हा संध्याकाळ झालेली. पूजाने वेळेचा अंदाज बांधला, " चला पटपट तंबू बांधून घेऊ... " पूजाने पाठीवरली सॅक खाली ठेवली.
" आलो का आपण ... पण तो अर्धवर किल्ला का बुरुज दिसत नाही तो ... " कादंबरीने विचारलं.
" नाही ... " पूजाने शांतपणे उत्तर दिले.
" मग थांबलो का ?? " कादंबरीचा पुढचा प्रश्न. सुप्रीही विचारात पडली.
" आधी आपण तंबू उभारून घेऊ ... उशीर झाला तर पुन्हा काळोखात काम करावे लागेल. " पूजाचे म्हणणं ऐकून सगळे कामाला लागले. पुढल्या अर्ध्या तासात सर्व तंबू उभे राहिले.

" हं .... आता सांग... " कादंबरी पुन्हा आली.
" इथून १० -१५ मिनिटे लागतील तिथे जायला. जास्तीत जास्त अर्धा तास.." कादंबरीने कपाळाला हात लावला.
" मग आजच , आताच गेलो असतो ना .... " सुप्रीने पूजाचे बोलणे ऐकून रिप्लाय केला.
" आता गेलो असतो तर आकाश भेटला असता ना .. क ..... दा .... ची ...... त !! " सुप्री बोलली.
" तो थांबला असेल तर उद्याही भेटेल आपल्याला... " पूजा बोलली.
" पण आताही भेटू शकला असता ना ... " आता कादंबरी बोलली.


" थांबा दोघीनी.... मला बोलू तर दे ... " पूजा बोलली तश्या दोघी शांत झाल्या. " आपण जिथे जाणार आहोत ना.... तिथून एक सुंदर नजारा दिसतो, त्यातून तिथला सूर्योदय सुरेख , अवर्णनीय असतो.... आकाश त्यासाठी जातो तिथे. आम्ही यायचो ना इथे , तेव्हा रात्रीचा मुक्काम असा पायथ्याशी असायचा. मग पहाटे लवकर उठून सूर्योदयाचा अनुभव घ्यावा , हा डब्बूचा प्लॅन.... त्यामुळेच... आता जाऊनही तो थांबला असेल तर उद्या भेटलेच... नाहीतर पहाटेचा नजारा बघता येईल.... तिथे तंबू बांधून राहण्यासारखे सपाट जमीन नाही. आकाश थांबला असेल तर तो असाच पायाथ्याशी.... आणि सुप्री , तुला तर माहित आहे डब्बू , किती जलद चालतो तो... तो तिथे आता असेल तरी आपण त्याला गाठू शकत नाही... बरोबर ना !! " दोघीना पटलं ते. पूजा तिचे काम करायला गेली. या दोघीना काहीच काम दिले नव्हते. मग काही तरी टाईमपास करावा म्हणून कादंबरी तिच्या लॅपटॉपवर देवीच्या यात्रेतले तिने क्लीक केलेले फोटो बघत होती. शेजारी सुप्री.

" छान काढतेस गं फोटो... " सुप्रीने कादंबरीला दाद दिली.
" thank you !!  thank you !! ..... तुमच्या साहेबांची कृपा. त्याच्यामुळे शिकली... तो भेटू दे ... पायाच पडते त्याच्या ..... बघ तू.... " कादंबरीच्या बोलण्याचे हसू आलं सुप्रीला. छानच होते फोटो. देवीची यात्रा, छानच टिपली होती कादंबरीने. किती गर्दी होती.सुप्रीने तर प्रत्यक्षात अनुभवली होती गर्दी. सुप्रीला एक आयडिया सुचली.
" आपण एक करूया का ..... " ,
" काय ते ? " ,
" आकाश तर नक्की आला असेल तिथे, अशी पूजा बोलते. आपल्याला दिसला नाही. तू तर किती फोटो काढले आहेस..... वेगवेगळ्या अँगलने... किमान या फोटोत तरी दिसेल आकाश... try करूया ... " ,
" चालेल ना ... बेस्ट आहे हे ... मी प्रत्येक फोटो झूम करते....दोघीनी शोधलं तर दिसेल आकाश. " कादंबरी मग प्रत्येक फोटो झूम करू लागली. खासकरून गर्दीचे फोटो. कारण त्या गर्दीतच आकाश असावा असे वाटत होते.

खूप फोटो बघून झाले तरी आकाश काही दिसेना.... कसा सापडणार , गर्दी तर होतीच , पण गुलाल आणि भंडाराचा गुलाबी - पिवळा रंग इतका पसरला होता कि कोणा एकाला शोधणे तसे कठीण होते. सर्वच एका रंगाचे झालेले होते. उत्साहात सुरु झालेली " हि शोधमोहीम " पुन्हा निराशेच्या वाटेकडे वळली. अश्यातच एक वेगळा फोटो समोर आला. एक व्यक्ती सिगारेट ओढत उभा...
" हा कोण गं ... " सुप्रीने विचारलं.
" हा ..... काय माहित कोण ... " कादंबरीने सलीमचा फोटो काढला होता.
" एवढी मोठी देवीची यात्रा ... त्यात सगळे सामील झालेले, सर्वांना देवीचे दर्शन घेण्याची घाई.. हा आपला दूर उभा राहून आरामात सिगारेट ओढत उभा... आगाऊ कुठला .... खडूस !! विचारलं काही तर भलतीच उत्तर... त्यात त्याच्या पायाजवळ बघ... दोन मोठ्या सॅक.... आपल्याजवळ आहेत ना , त्यापेक्षा जरा मोठ्या.... एक घेऊन फिरताना किती दमतो आपण , याकडे दोन दोन .... विचित्र माणूस अगदी .... विचित्र वाटला म्हणून असाच फोटो काढला... " सुप्री बघत होती फोटो. अचानक तिला काहीतरी दिसलं. फोटो अगदी जवळून काढला होता म्हणून जास्त स्पष्ठ होता.
" त्याच्या सॅक झूम करशील का.... काही ओळखीचे दिसते. " तस कादंबरीने लगेच झूम केले. फोटो बघून सुप्रीचे डोळे विस्फारले.
" पूजा कुठे आहे... " सुप्री आनंदात ओरडली.
" काय झालं !!! " ,
" थांब ..... पूजाला घेऊन येते ... "
पूजा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. सुप्री तिला ओढतच घेऊन आली.
" आकाश आलेला यात्रेत... " सुप्री घाईने बोलली.
" तुला कस कळलं ... i mean तो तर दरवर्षी येतो तिथे... ते तर माहित आहे मला , मीच सांगितलं तुला... मग आता काय नवीन त्यात... " पूजा अचंब्याने बोलली.
" कादंबरी तो फोटो दाखव. " कादंबरीने लॅपटॉप पूजा समोर धरला.
" बघ ... ती मागे दुसरी सॅक आहे ना... त्यावर टॅग आहे बघ... " माझा गणू ... माझं आभाळ " ... तो मी आकाशला बनवून दिला होता. त्याच्या सॅकला लावलेला असतो तो नेहमीच. " पूजाने निरखून पाहिलं. सुप्रीने त्या टॅगचे वर्णन करून सांगितलं. तसाच होता तो टॅग. पूजाला पटलं.
" कादंबरी... तुला आकाश दिसला नाही का यांच्यासोबत.... किंवा आजूबाजूला.... " ,
" नाही ना .... याला विचारलंही मी... दोन - दोन सॅक कशाला ... बोलला कसं ... पाहिजे तर एक घेऊन जा .... आधीच सरळ उत्तर दिलं असतं तर आकाश तेव्हाच भेटला असता ना... " कादंबरीने नाक मुरडलं.
" may be ... डब्बूला देवीचे दर्शन करायचे असेल , त्यामुळे सॅक पाठीला न लावता या माणसाजवळ ठेवली असेल. गर्दीत चालता यावे म्हणून... जरा चुकामुक झाली ना आपली.... " पूजा सुप्रीकडे पाहत बोलली.
" पण अश्या अनोळखी व्यक्तीकडे आकाश सॅक कसा ठेवून गेला... " सुप्रीचा प्रश्न.
" हा गं .... हा हि मोठा प्रश्न आहे... " पूजा बोलली.
" कदाचित ... हे दोघे एकत्र प्रवास करत असतील.... may be ..." कादंबरीचा अंदाज...... सर्वांचे अंदाज लावून झाले.

" असेलही आणि नसेलही... " पूजा बोलली. " पण एक नक्की , आपण त्याच्या मागोमाग आहोत हे पक्के झाले. एक वेगळाच हुरूप आला आहे मला... " पूजाच्या अंगावर शहारा आला. शिवाय एक थंड हवेचा झोत आला, या तिघी सुखावून गेल्या.
" ११ जून आणि राजमाची ... दोन्ही दूर नाहीत आता...... मृग नक्षत्र लागले आहेच आता ..... पावसाची आणि पर्यायाने आकाशची सुद्धा चाहूल लागली आहे मला...लवकरच भेटू ... डब्बू !! " पूजा मोठ्याने बोलली. त्या मोकळ्या जागेत , शांत वातावरणात तिचा आवाज घुमत घुमत पसरत गेला. पूजा - कादंबरी - सुप्री ... तिघी एकमेकांचे हात हातात घेऊन उभ्या होत्या....... पावसाच्या ढगांआडून रात्रीचा चंद्र त्यांना लपून - छपून पाहत होता.


================== to be continued ===============================

Followers