All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday 28 February 2017

चेकमेट.....!! (भाग पहिला )


                "कसा आहेस ? " inspector अभिषेकने तुरुंगात येत म्हटलं. " ठीक आहे... तुमचीच कृपा... " सागर उभा राहत म्हणाला. सागर तुरुंगात कैदी म्हणून होता. inspector अभिषेक आज पुन्हा चौकशी साठी आला होता, आज काहीतरी माहिती मिळावी म्ह्णून... सागर, inspector अभिषेकची वाटच बघत होता जणू. " मी येणार हे तुला माहित होतं वाटते... " अभी आतमध्ये जात म्हणाला. 
"बसा साहेब... तुम्ही येणार हे मला माहित नव्हतं तर माझं तसं अनुमान होतं.... असो, आज असेच आलात... आज रेकॉर्डिंग करत नाहीत का ,माझं स्टेटमेंट..... " सागर अभीकडे बघत म्हणाला. inspector अभिषेक , आत ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. सागर त्याच्या समोरच बसला. 
" गेल्या ४ मिटिंगमध्ये जे काही रेकॉर्डिंग झालं... त्यात काहीच नव्हतं. तू काहीच सांगितलं नाहीस... म्हणून आज असाच आलो. " अभि शांतपणे म्हणाला. 

त्यावर सागर हसला. " मी खरं सांगितलं असतं, तुम्ही रेकॉर्ड केलं असतं, पण त्याचा काही फायदा झाला नसता.... मी बोललो असतो कि तुम्ही बळजबरीने माझ्याकडून बोलवून घेतलंत.... " सागर अगदी शांतचित्ताने बोलत होता. अभिला काय बोलावं ते कळत नव्हतं. थोडावेळ अभि, सागर कडे बघत राहिला. विचार करून बोलला. 
" हे बघ सागर... हे तुलाही माहित आहे आणि मलाही... त्या दोघांना तू मारलं आहेस... तुझी शिक्षा त्या बाकीच्यांना का देतो आहेस... " त्यावर सागर पुन्हा हसला. आजूबाजूला बघितलं. 
" तुम्ही एकटे आहेत म्हणून सांगतो... दोघांना नाही पण एकाला नक्की वर पाठवलं आहे.... आता तो कोण आहे ते तुम्ही शोधा... " तसा अभि खुर्चीवरून उठला आणि सागरची कॉलर पकडली. 
" गेले २ महिने झाले... तुझ्यामुळे त्या बाकी ४ जणांना आत टाकला आहे... त्याचे काहीच वाटत नाही तुला.... " सागरने त्याचे हात झटकले.
"inspector.... हात मलाही उचलता येतो... पण चांगल्या माणसांवर हात उचलत नाही मी... " अभि त्याच्यापासून जरा लांब जाऊन उभा राहिला. थोडावेळ तिथे थांबून मग आपल्या केबिन मध्ये आला. 

             दोन महिन्यापूर्वी, ५ खून ,५ दिवशी असे एका मागोमाग झाले. मिळालेल्या पुराव्यानुसार, ५ जणांना अटक झाली. केस inspector अभिषेक कडे आली होती. सोबत महेश होता. जेव्हा केस सोडवणं अशक्य झालं तेव्हा या दोघांकडे केस आली. आधीच्या inspector ने ५ जणांना पकडलं होतं. अर्थात पुरावे बक्कळ नसले तरी खूप काही मिळालं होतं. महत्वाचं म्हणजे,CCTV चे विडिओ.. ५ हि खुनांच्यावेळी, त्यांना भेटलेल्या शेवटच्या व्यक्तीमध्ये या पैकी कोणी ना कोणी होतंच. 

अभि वैतागून त्याच्या केबिनमध्ये आला. आणि असाच बसून विचार करू लागला. थोड्यावेळाने डॉक्टर महेश त्याचं काम संपवून भेटायला आला. 
" काय झालं अभी... सकाळी सकाळी टेन्शन मध्ये... " महेश अभिच्या केबिन मध्ये आला. 
" सावंत.. जरा दोन चहा सांगा.. " महेश खुर्चीवर जाऊन बसला. 
" काही नाही रे... हि नवीन केस... त्या inspector ने त्या ५ जणांना कश्यावरुन पकडलं तेच कळत नाही. ",
" हम्म... ते जरा विचित्र आहे ना... एकाचेही फिंगर प्रिंट्स नाहीत... " महेश बोलला. तोपर्यंत चहा आली. अभिने पुन्हा केस फाईल उघडली. ५ खून, प्रत्येक वेळेला पकडलेल्या आरोपी पैकी, मृत व्यक्तीला भेटलेला शेवटचा व्यक्ती... फक्त त्यांचे फिंगर प्रिंट्स नाहीत किंवा असा ठोस पुरावा नाही... बाकी खुनाची पद्दत एकच... सागर सोडून बाकीचे ४ जण मुके... बोलताच येत नाही. त्यात सागर काही कबूल करायला तयार नाही. 
" त्यात आज बोलतो कसा... मी एकालाच मारलं आहे... ते कोणाला आणि कसं ते तुम्ही शोधा... शहाणाच आहे मोठा... " आता अभि हसत म्हणाला. 
" बरं... त्याची पुढची सुनावणी कधी आहे.... " महेशने चहा संपवली. 
" दोन दिवसानी.... तू येणार आहेस ना.. " ,
"बघू... काम नसेल तर येईन... चल मी निघतो... " महेश गेल्यावर अभि कोर्टात जाण्याची तयारी करू लागला.  

               २ दिवसांनी, कोर्टात केस उभी राहिली... आधीही २ महिन्यात , ३ वेळा त्यांची सुनावणी झाली होती. परंतु त्यातून काहीच निकाल हाती आला नव्हता. म्हणून यावेळेस काय निकाल लागतो याची सर्वांना उत्सुकता होती. ५ पैकी ४ आरोपी अपंग (मुके) असल्याने केसला वेगळाच अर्थ प्राप्त झाला होता. खून करताना वापरलेलं हत्यार मिळालं नव्हतं. ५ हि खून गोळी मारून झाले होते. खूप शोधून सुद्धा ते हत्यार सापडलं नव्हतं. त्यात सागरने सगळे आरोप फेटाळून लावले होते. वकील सुद्धा नाकारला होता त्याने. सागरला वकिलीची चांगली जाण होती बहुतेक. म्हणून स्वतःच, स्वतःची केस लढत होता. तशी मुभा असते ना कोर्टात. तर... आतापर्यंत झालेल्या तीन सुनावणीत झालेल्या आरोपांत , सागरने सगळ्या आरोपातून नकार दिला होता. फक्त CCTV फुटेजमुळे यांना पकडलं होतं. म्हणून यावेळेस कोणते नवीन पुरावे भेटले आहेत यासाठी सर्व जमले होते. जज अजून यायचे होते. सागर आणि त्याच्या सोबत असलेले ४ आरोपी एकत्र बसले होते. महेश आला आणि अभिच्या बाजूला जाऊन बसला. 

"ऐक जरा... बाहेर ये... बोलायचे आहे जरा... " महेश अभिच्या कानात कुजबुजला... 
" अरे.....  आता सुरु होईल केस... नंतर बोलू... " अभि, महेशला खाली बसवत म्हणाला. 
" त्याच संबंधी बोलायचं आहे... " ते ऐकून अभि लागलीच बाहेर गेला. 
"बोल... काय सांगायचं आहे..." ,
" मला एक सांग... या ५ जणांची केस एकत्र का चालू आहे... ",
"म्हणजे काय बोलायचे आहे तुला... ",
"अरे... यांचा काही संबंध आहे का... ५ खून झाले... मग ५ वेगवेगळ्या केस का केल्या नाहीत...एकच सुनावणी का.... असं विचारतो आहे मी.. ",अभि विचारात पडला. 
"हो रे... ते मलाही माहित नाही... आधीच्या ३ पैकी २ सुनावणी तर केस माझ्याकडे येण्या आधीच झालेल्या होत्या. तेव्हापासून हि एकच केस आहे." ,
"बरं... मग ऐक...मी थोडा तपास केला. आधीच्या inspector म्हणजे inspector पाटील यांनी... ५ वेगवेगळ्या केस उभ्या करण्यापेक्षा एकच केस फाईल केली. कारण एकच पद्दत होती खुनाची... त्यांनी ते लॉजिक वापरलं.  पण या ५ जणांचा खरोखर संबंध आहे... " ,
"काय ? " ,
" हे पाचही एकमेकांचे मित्र आहेत.. " हे तर अभिला माहीतच नव्हतं.
" आणखी एक गोष्ट... हे सगळं मागच्या केस सारखं वाटत नाही तुला... ?",
"काय ते ? " ,
"CCTV फुटेज... त्यावरून यांना अटक केली ना.. या सर्वाना खून करायचा होता तर वेश बदलून, मेकअप वगैरे करून आले असते ना... किंवा लपून आले असते. पण इथे तर सगळेच कॅमरा समोर येतात. " महेशने आणखी माहिती पुरवली. 
" काय बोलायचे आहे नक्की.. ",
" मला वाटते ना... या पैकी कोणीच खून केलेला नाही... " महेशने मत मांडलं. 
" ते बघू... तू बोलतोस तेही बरोबर आहे... बाकी... आज काय होते ते कळेल आता.. "दोघे आत आले.  

                 १० मिनिटांनी केसच्या सुनावणीला सुरुवात झाली. पुन्हा एकदा CCTV फुटेजचा पुरावा उभा करून वकिलाने सागर सहित चार जणांवर आरोप केला. यावेळेस सागरकडून कोणताच बचाव  झाला नाही. सागर काहीच बोलत नाही म्हणून जज नेच त्याला विचारलं. 
" मिस्टर सागर, यावेळेस तुम्हाला काही बोलायचे नाही का ? " सागर आता आरोपीसोबत जाऊन उभा राहिला. " नाही जज साहेब, एक सांगायचे होते.... आम्हा, ५ हि जणांना गुन्हा कबूल आहे... ते खून आम्हीच केले... " या सागरच्या वाक्याने, कोर्टात एकच खळबळ उडाली. 
" मिस्टर सागर... तुम्ही काय बोलत आहेत ते कळते आहे का तुम्हाला... " जज साहेबांनी पुन्हा विचारलं. 
" हो सर, मी स्वतः सांगतो आहे... आणि या सर्वांच्या वतीने सुद्धा... ",
"ठीक आहे... पण तसं सर्वानी लेखी लिहून द्यावे लागेल. कारण काही जणं अपंग आहेत... " हे खूपच विचित्र होतं. सागर अचानक कसा बदलला. ३ वेळेस तर निर्दोष आहे असंच सांगत होता. अभि ला जास्त धक्का बसला होता. अचानक कसं हे घडलं. सगळ्यांनी लेखी लिहून दिलं. जज साहेबांनी सगळं वाचून घेतलं. 
" आरोपींनी स्वतःच गुन्हयांची कबूली दिली असल्याने केस पुढे चालवण्यात अर्थ नाही. तरी यातील काही आरोपी अपंग असल्याने त्यांना कोर्ट थोडी कमी शिक्षा देत आहे. त्या चार आरोपींना ५० वर्ष सक्तमजुरी तर सागर यांना आजन्म कारावासची शिक्षा सुनावण्यात येत आहे." केस संपली... आरोपींना पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं. शिक्षेची सुनावणी झाली असली तरी त्या सगळ्या क्रियेला २ दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत तरी आराम होता अभिला. एकदम आरामात बसला होता तो त्याच्या केबिनमध्ये... महेश आला. 
" काय साहेब... एकदम आरामात,... " महेश हसत म्हणाला. 
" हा रे... बघ ना... त्या सागरने केसच संपवून टाकली. असं का केलं त्याने याचा विचार करतो आहे.. ",
"आता कशाला विचार करतो आहेस... शिक्षा तर भेटली त्यांना... ",
"तरी पण... २ महिने काही बोलत नव्हता... आणि आता अचानक खुनाची कबुली... विचित्र वाटते ना... " अभि उभा राहत म्हणाला. 
" जाऊ दे ते... त्याला भेटायला जाणार होता ना... गेला नाहीस... " महेश त्याचं सामान उचलत म्हणाला. 
" जातच होतो..." महेश त्याच्या घरी आणि अभि , सागर ज्या तुरुंगात होता... तिथे निघाला. 

सागर आणि त्या चार जणांची त्या तुरूंगातून ,दुसऱ्या मोठ्या तुरुंगात रवानगी होण्यास आठवडा जाणार होता. तोपर्यंत ते तिथून जवळच असलेल्या तुरुंगात होते. सागर त्याच्या तुरुंगात बुद्धिबळ खेळत बसला होता. याआधी सुद्धा तो असा एकटाच बुद्धिबळ खेळत असे. inspector अभिषेकला त्याने बघितलं नाही,एवढा तो त्या खेळात मग्न झाला होता. अभि त्याला कधीपासून बघत होता. थोड्यावेळाने सागरची नजर अभिषेक वर पडली. तसा तो उभा राहिला. 
" या या inspector साहेब ...आज इकडे कसे आलात ? " ,
"असाच... तुला भेटायला आलो. " अभिने हवालदाराला हाताने खूण करून टाळ उघडायला सांगितलं. आणि अभि आत गेला. 
"तुझ्याबरोबर बोलायचं होतं म्हणून आलो. " अभि आत ठेवलेल्या खुर्चीवर बसला. 
"असं आहे तर.. अजूनही काही बोलायचे आहे का... मला वाटलं निकाल लागला तसं तुमचं काम संपलं... " सागर बुद्धिबळाच्या पटाकडे पाहत म्हणाला. 
" असं का केलंस ?... हे जर तू आधी सांगितलं असतं तर तुझा आणि पोलिसांचा... दोघांचा वेळ वाचला असता... " अभि बोलला तसा सागर त्याच्याकडे न बघताच हसू लागला. खूप वेळ हसत होता तसाच.  "तुम्हाला येतो का हा खेळ खेळता... " सागरने विचारलं. 
" पहिला खेळायचो... आता नाही... का " ,
"नाही... तुम्ही विचारलं ना... आधी का नाही सांगितलं... सेम... अगदी या खेळासारखं... यात घाई करून चालत नाही. सावकाश... डोकं लावून, योग्य ती चाल रचुन खेळावं लागते.. " सागर बोलला. 
" पण तू एकटाच का खेळत असतोस.. " अभिच्या पुढच्या प्रश्नावर सुद्धा सागर हसला. 
"एकटा नाहीच आहे... समोरची चाल खेळल्याशिवाय ते शक्य नसते. आणि आता या खेळात समोरच्या चाली रचून झाल्या आहेत. आता आमची वेळ आहे, योग्य त्या चाली रचायची." अभिला अजिबात कळत नव्हतं ,सागर काय बोलतो आहे ते... अभि बाहेर आला, हवालदाराने टाळ लावलं. सागरकडे बघत म्हणाला,
" मला वाटते, कि हे तू आधीच सांगायला पाहिजे होतं... Anyways... केस तशीही close झाली आहे... " ते ऐकून सागर मोठयाने हसला.
" केस close झाली नाही सर... आता कुठे केसला सुरुवात झाली आहे. आराम करायचा असेल तर तो आताच करून घ्या... हे डॉक्टर महेशला सुद्धा सांगा... कारण नंतर झोपायला तरी मिळेल का ते माहित नाही तुम्हाला... " पुन्हा मोठयाने हसत बुद्धिबळ खेळू लागला. आधीच्या हसण्यावर एवढं लक्ष नाही दिलं अभिने, पण शेवटी जो हसला. ते विकृत हास्य होतं. सागरकडे शेवटचा एक कटाक्ष टाकून अभि घरी निघाला. 

                    आणखी ६ दिवसांनी, त्या चार आरोपींना एका ठिकाणी तर सागरला जन्मठेपेची दुसऱ्या तुरुंगात नेण्यात आलं. आता अभिषेककडे दुसरी केस आलेली. त्यात तो गुंतला होता. महेश त्याच्या कामात बिझी झालेला. सागर त्याची शिक्षा भोगत होता. normal routine सुरु झालेलं. यातच आठवडा उलटला. अभिची आणखी एक केस सोडवून झाली. नवीन केस सुरु करणार इतक्यात एका खुनाची केस हाती आली. अभि लगेचच घटनास्थळी पोहोचला. महेश अर्ध्या तासाने आला. गोळी मारून हत्या केली गेली होती. त्यांच्या राहत्या घरात... Dead body महेशच्या लॅबमध्ये पाठवली. सोबत महेश निघून गेला. अभि काही पुरावा वगैरे मिळतो का ते बघत होता. फिंगर प्रिंट्स... आणि बाकी... ते त्याची टीम बघत होते. अभि तसं काही संशयास्पद मिळालं नाही. CCTV ची व्यवस्था नसल्याने watchman ला विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. 

" कोणीच आलं नव्हतं त्यावेळेस सर.. "अभिने ते ऐकून घेतलं. दुसरं काय होतं हातात त्याच्या. तो दिवस तर नुसता पुरावे गोळा करण्यात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश post mortem चे रिपोर्ट घेऊन आला. 
" इंटरेस्टिंग गोष्ट आहे अभि... " महेश धावतच त्याच्या केबिनमध्ये पोहोचला. 
"काय झालं एवढं धावायला... " अभि हातातलं काम सोडून उभा राहिला.
"बस... बस अभि... सॉलिड माहिती मिळाली आहे.. पवारांचा खून झाला ना... गोळी मारून... त्यांच्या शरीरातून जी बुलेट (गोळी) मिळाली ना... ती अगदी same to same.... त्या पाच खुनात वापरलेल्या सारखीच आहे... " महेशने माहिती पुरवली. 
" काय बोलतोस !! " अभि लगबगीने ते रिपोटर्स बघू लागला. 
" मी जेव्हा पहिली ,हि गोळी बघितली ना... तेव्हाच मला संशय आला होता. मी लगेच match सुद्धा करून बघितली... तेव्हाच मला संशय आला होता. तर उत्तर एकच.. ",
" ह्म्म... पण त्या पाच खुनांचा आणि याचा काय संबंध.... " अभीचा पुढचा प्रश्न... 
" मला वाटलंच होतं... म्हणून लगेच मी यांचा काही संबंध आहे का ते माहिती काढली. तर त्या मृत व्यक्तीपैकी एकाचे हे मानलेले भाऊ होते. " आता अभिला विचार करायला भाग पडले. 
" शिवाय मला त्यांच्या शर्टाच्या खिशातून काही सापडलं... " आणि डॉक्टर महेशने एका लहान पिशवीतून एक बुद्धिबळाची सोंगटी बाहेर काढली. अभिने ती हातात घेतली... 
" याला "प्यादं" म्हणतात ना... याचा काही संबंध आहे का... " अभिने महेशला विचारलं.
" ते तुला शोधायचं आहे... पण मला तरी वाटते कि यांचा आणि त्या पाच खुनांचा काहीतरी संबंध असावा नक्की... " आता खरंच अभि विचारात पडला. 

महेश थोडयावेळाने एक कॉल आला तसा निघून गेला. अभि एकटाच त्याच्या केबिनमध्ये विचार करत बसला होता. महेशने रिपोर्ट आणले होते, बाकीचे रिपोर्ट यायचे बाकी होते. त्याशिवाय काही हालचाल करता येणार नव्हती. त्याचं फाईल पुन्हा पुन्हा बघत होता अभि. समोर ते "बुद्धिबळातलं प्यादं" होतं. त्याने ते हातात उचलून घेतलं आणि बोटांमध्ये फिरवू लागला. अचानक त्याला सागर आठवला आणि त्याचं बोलणं... तसाच उठला , गाडी काढायला सांगितली आणि तडक सागर जिथे होता तिथे पोहोचला. सागर त्याचं नेहमीच काम संपवून पुन्हा एकदा बुद्धिबळाचा डाव मांडून बसला होता. अभिला बघितलं त्याने पण उभा राहिला नाही. 

"सागर ... काय संबंध आहे सांग मला... " अभिने त्याला बाहेरूनच विचारलं. 
" अरे व्वा !! सुरवात झाली वाटते.. छान " सागर हसत म्हणाला. " आणि तुम्हाला पुढचा क्लू भेटला असेल ना... प्यादं " यावरून अभिला नक्की समजलं कि याला खूप काही माहित आहे.. 
" सागर... सांग... काय चाललंय नक्की... तुला ते माहित आहे, हे मला कळलं आहे... " ,
"तुम्ही तसे हुशारच आहेत... चला.. आत येता का... सांगतो सगळी गोष्ट.. " सागरने अभिला आत बोलावलं. अभि आत आला तसा सागर पुन्हा म्हणाला... 
" वेळ आहे ना.. कथा जरा मोठी आहे.. चालेल ना... ",
"तू सुरु कर.... मी बघेन वेळेचं... " एका हवालदाराला सांगून त्याच बोलणं रेकॉर्ड करायला सांगितलं.

"चला सुरुवात करू... पहिलं सांगतो कि आम्हा ५ जणांचे अटक होणे... it's a part of the plan... परफेक्ट जमला.. आधी वाटलं होतं कि तसं होणार नाही... पण छान जमलं. त्यानंतर , हे तुमचं इकडे येणे... ते सुद्धा प्लॅन प्रमाणेच... मला माहित होतं कि हे प्यादं घेऊन तुम्ही इकडेच येणार.... तो actually मला इशारा आहे... पुढचा क्लू तुम्हाला देण्यासाठी... तो नंतर देतो... आधी स्टोरी... बुद्धिबळाचा खेळ आहे ना.. तसंच काहीसं झालं आहे... फक्त आमच्याकडेच सैन्य थोडं कमी होतं म्हणून... सांगायचं झालं तर असं.. " सागरने बुद्धिबळाच्या एक -एक सोंगट्या बाजूला काढून ठेवल्या. फक्त राजा आणि ६ प्यादे.. एवढंच सफेद सैन्य ठेवलं. 
" हा... आता बरोबर आहे.. त्यातले आम्ही ५ प्यादे.. " सागर बोलला. 
" म्हणजे... तू खून केलास ना.. मग एवढे दिवस का कोर्टात नकार देत राहिलास... " सागर पुन्हा हसला. 
" तेव्हा सुद्धा सांगितलं... या खेळात वेळ खर्च करावा लागतो. तेव्हा result मिळतो. अजून एक गोष्ट... आमच्यापैकी कोणीच खून केलेला नाही... हा सुद्धा प्लॅन चा भाग आहे... " अभि उठला आणि सागरची मान पकडली. 
" काय खेळ समजला का तुम्ही.. पोलीस, कोर्ट वगैरे... मज्जा येते का खून करायला... " सागर फक्त हसत होता. थोड्यावेळाने अभि खाली बसला. 
" कोणी मारलं त्यांना... " ,
"सांगतो.. आधी पुढच्या क्लू ची तयारी करतो. " आता सागर, काळ्या सैन्याची एक-एक सोंगटी बाहेर ठेवू लागला. बुद्धिबळाचा पटावर आता २ प्यादे, १ हत्ती, १ घोडा, १ उंट , वजीर आणि राजा होता. 
" काय समजायचे... एवढ्या सगळ्यांना मारलं तुम्ही... " अभि ते बघून म्हणाला. 
" नाही नाही सर... फक्त ५ जण आधी आणि आता एक... हे जे मेले आहेत ना, ते सगळे प्यादेच होते... ",
"तू मारलं नाहीस, मग कोणी मारलं... " ,
"आमच्या एका उरलेल्या प्याद्याने... तुम्हाला अजिबात माहिती नाही हा खेळ... " सागर पुन्हा हसत म्हणाला. 
" बाकी मोठे योद्धे जरी गेले असले तरी एक प्यादा... योग्य ठिकाणी, पण दुसऱ्या राजाच्या पटावर पोहोचला तर तो वजीर होतो... माहित नसेल तर विचारा कोणालाही... प्यादं एक एक पाऊल चालतो... तसंच चाल करत करत तो तिथे पोहोचला... म्हणून एवढा वेळ मी कोर्टात time pass करत होतो.  " अभिच्या सगळं डोक्यावरून गेलं. 
" काय बोलतो आहेस ते तुला तरी कळते का... " 
"तुम्हाला पुढचा क्लू देयाचा आहे... हा घ्या... " काळ्या सैन्यातील हत्ती उचलून त्याने अभिच्या हातात दिला. "शोधा... " म्हणत सागर पुन्हा खेळण्यात मग्न झाला. हा खरं बोलतो आहे कि काहीतरी बरळतो आहे उगाच. पण त्याला मी सांगण्याआधीच , माझ्याकडे "प्यादं" आहे हे माहिती होतं.... काय करायचं नक्की. सागरची आधीची history कोणालाच माहिती नव्हती. आधीच्या inspector ने सुद्धा ती माहिती काढायचा प्रयन्त केला नाही. अभिने लगेच माणसं कामाला लावली. ५ हि जणांचा काही संबंध आहे का... त्यांचा फॅमिली background काय... तो बोलतो तसा ६ वा कोण असेल, जो खून करतो आहे... एवढे आणि बरेचशे प्रश्न अभिला पडले. 

पहिली माहिती मिळाली ती अशी, कि ६ व्या खुनाच्या आधी एक पोस्टमन आलेला, त्यांना काही देयाला. अभि पुन्हा घटनास्थळी पोहोचला. निदान त्याने आणलेलं पत्र किंवा काही पार्सल मिळते का ते बघण्यासाठी... "साधारण किती वाजता आलेला पोस्टमन... " अभिने watchman विचारलं. 
" सकाळी १०.३० ते १०.४५ च्या सुमारास, आणि हो... तो याच area चा पोस्टमन आहे... त्याला ओळखतो मी. " wow !! अभि मनातल्या मनात म्हणाला. watchman ने सांगितल्याप्रमाणे, त्या पोस्टमनला बोलावून घेतलं. 
" हा बोला... तुम्हाला कळलं असेल... तुम्ही ज्यांना पार्सल दिलंत ,त्यांचा खून झाला.. " अभिने त्या पोस्टमनला विचारलं. 
" हो सर, पण मला का बोलवलं... " तो घाबरत म्हणाला. " मी काही नाही केलं सर... ",
"ते आम्ही ठरवणार... पहिलं सांगा... तुम्ही त्यांना काय दिलं नक्की... " अभीचा पुढचा प्रश्न... 
" पार्सल होतं ते... लहानसं पाकीट.. " ,
" ओळखाल का ते ? ",
"हो नक्की.. ", अभिने तिथे सापडलेलं एक पार्सल, त्यांना दाखवलं. 
" हा सर... हेच पार्सल मी दिलं होतं.. " अभिने निरखून पाहिलं. देणाऱ्याचा पत्ता,नावं  वगैरे काहीच नव्हता.
" हे पार्सल... ते पोस्टात देताना समोरच्या व्यक्तीचा पत्ता लिहिता ना... ",
"हो... आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये लिहून घेतला असेल... " पोस्टमनने सांगितलं. तसे अभि आणि दोन हवालदार, पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले. 

" काय प्रोसेस आहे साधारण... एखादं पार्सल पोस्ट करताना... " अभिने तिथे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला विचारलं. 
" पहिलं काय पार्सल आहे ते चेक करतो... वजन करून किती पैसे होतात ते सांगावे लागते... देणाऱ्याला पटलं तर मग त्याचा पत्ता आणि जिथे पोहोचवायचे आहे तो पत्ता आणि नावं... लिहून घेतो... पॅकिंग नसेल तर तेही करतो आम्ही.. " ,
"ok.. मग हे पार्सल तुमच्याकडून गेलं आहे का... " त्याने ते निरखून पाहिलं. स्टॅम्प याच पोस्ट ऑफिसचा होता. त्याने नोंद वही काढली.
" हा सर... हे पत्ते आहेत दोन्ही... " अभिने वही पाहिली. पत्ता तर खोटाच असणार हे माहित होतं, तरी अभिने एकाला त्या पत्यावर पाठवलं. नावं होतं " रहिमा शेख. " नाव वाचून अभिने विचारलं.. 
" यांचा चेहरा आठवतो का... " ,
"बुरखा होता सर.. " अभिला तेच अपेक्षित होतं. 
" आणि पार्सल आठवते का... काय होतं.. " तो जरा विचार करू लागला...त्या पार्सलकडे एकदा पाहिलं. 
" हो सर... आठवलं... त्यांना स्पीड पोस्ट करायचं होतं... बुद्धिबळात असते ना ते... प्यादं... ते होतं... " अच्छा... म्हणजे इथूनच गेलेलं ते... पुढे काय करणार.. पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आला.  

केबिनमध्ये महेश वाट बघत बसला होता. " काय अभि... काही भेटलं का.. ",
"नाही रे.. त्या सागरला माहित आहे... हे सगळं कोण करते आहे ते... तो काही सांगायला तयार नाही... बुद्धिबळाचा खेळ चालू आहे सगळा... हा बघ... पुढचा क्लू दिला त्याने... " सागरने त्याला दिलेला " बुद्धिबळातील हत्ती" महेशला दाखवला. आणि अभिने सगळी माहिती सांगितली. 
" अरे बापरे !! म्हणजे आणखी किती खून होणार... " महेश घाबरला. 
"तेच तर माहित नाही.. ",
"मग आता काय करायचे .. " महेशचा प्रश्न... 
" आता काय... वाट बघायची.. पुढचा खून होण्याची... कारण कोणाला प्रोटेक्ट करायचं तेच माहिती नाही." अभि हताश होऊन म्हणाला. 

पुढचा दिवस, जास्त काही माहिती मिळाली नाही. पुरावे जास्त काही नव्हतेच. फिंगर प्रिंट्स सुद्धा नाही. अभिला चैन पडत नव्हता. केबिनमध्ये येरझाऱ्या घालत होता. थोड्यावेळाने , त्या पाच खुनांची आणि आता झालेल्या खुनाची फाईल पुन्हा बघू लागला. सगळीकडे एकचं... गोळी मारून हत्या... सहाही खूनाच्या वेळी हत्यार मिळालं नव्हतं... कुठे गेलं हत्यार... विचार करून डोकं दुखायची वेळ आली. त्यातच , अभिचं लक्ष त्या "हत्ती" वर गेलं.... हाच क्लू दिला ना त्या सागरने.. अभिला राग आला.. इतक्यात महेश आला. 
" बरं झालं तू आलास ते.. चल... " अभिने त्याला बघताच म्हणाला. 
"कुठे ? " ,
"सागरकडे.. त्याला माहित आहे खरा खुनी कोण आहे ते.. " दोघे तडक.. सागरला भेटायला पुन्हा त्या तुरुंगात आले. यावेळेस सागर आरामात पहुडला होता. 
" आज बुद्धिबळ खेळत नाही वाटते.. खेळ संपला का.. " अभि त्याला झोपलेला बघून बोलला. त्यावर सागर न उठताच बोलला. 
" नाही... खेळ तर आता सुरु झाला आहे... inspector अभिषेक... मज्जा येणार आता... " हसत म्हणाला. अभि त्याला मारणारच होता, पण महेशने त्याला थांबवलं. 

अभि ऐकायला तयार नव्हता. त्याच आवेशात तो तुरुंगात शिरला.. सागरला जबरदस्ती उठवलं. आणि तिथे असलेल्या खुर्चीवर ढकलून दिलं. सागर धडपडत बसला खुर्चीवर. पुन्हा महेशने अभिला अडवलं. 
" सांग लवकर... कोण आहे तो... कुणाचा खून होणार आहे.. " अभिला त्या आवेशात पाहून सागर घाबरला. महेशने अभिला शांत केलं. त्याला बाहेर पाठवलं. तो बाहेर गेला तसा महेशने सागरकडे मोर्चा वळवला.
" हे बघ सागर.. मी डॉक्टर आहे.. पोलीस नाही, मी काही करू शकत नाही... असं तुला वाटत असेल ना... तर ते विसरून जा... मी राग दाखवत नाही, याचा अर्थ मला तो येत नाही असा नाही आहे. मुकाट्याने सांग, काय चाललंय नक्की... नाहीतर पुढल्या वेळेस अभिला मी अडवणार नाही... " सागर चिडीचूप झाला. 

सागर काही बोलत नाही, ते बघून महेश बाहेर जाऊ लागला.
" थांबा सर... सांगतो.. पण मी क्लू देईन.. जास्त काही सांगू शकत नाही... कारण हा प्लॅन त्याचा आहे... आणि त्याला वचन दिलं होतं आम्ही, म्हणून... " महेश ते ऐकून जागच्या जागी उभा राहिला. 
" सांग... काय माहिती आहे तुला... " सागरने एक दीर्घ श्वास घेतला. 
" मी कोड्यात सांगेन.. कारण प्लॅन यशस्वी झालाच पाहिजे.... सांगतो आता... तो एक silent person आहे... शांतपणे ऐकून घेतो सगळ्याचे... यशस्वी होण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. आपल्या माणसांसाठी जीव देऊ शकणारा असा तो... आणि घेतलेलं काम पूर्ण करूनच सोडतो." सागर बोलायचं थांबला. " का करत आहे तो... आणि कोण आहे नक्की तो... " ,
" तो हे का करतो आहे.. हे नंतर सांगेन तुम्हाला... तो कोण आहे हे तुम्हाला शोधायचे आहे... " महेशला कळलं कि हा अजून काही बोलणार नाही... म्हणून महेश बाहेर आला. हवालदाराने टाळ लावलं. 
" शेवटचं सांगतो... त्याचा नेम कधीच चुकत नाही... " सागर बोलला. महेशने ते ऐकलं. सागर पुन्हा जाऊन झोपला. अभि बाहेर बसला होता. महेशने त्याला सगळं संभाषण सांगितलं. 
" मग... काय करूया पुढे आता... याला ना चांगला चोप दिला पाहिजे... सगळं सांगून टाकेल." अभि आताही रागात होता. 
" नाही... तरीही तो सांगणार नाही... बोलतो प्लॅन प्रमाणे झालंच पाहिजे सगळं... तू बोललास तसंच करावं लागेल.. पुढच्या खुनाची वाट बघावी लागेल. "  

                  पुढचा दिवस, सकाळी अभि लवकर पोलीस स्टेशनमध्ये आला.. झोपच लागली नाही त्याला. पुन्हा त्याच फाईल बघत बसला होता. चहा पित होता तेव्हाच कॉल आला. आणखी एक खून... महेशला घेऊन तिथे लगेच पोहोचला. खून झालेला तो , त्या व्यक्तीच्या इमारतीच्या गेटजवळच... कोणी बघितलं नाही त्यांना मारताना... CCTV फुटेज मिळालं, पण त्यात फक्त ते खाली पडताना दिसत होते... गोळी कुठून आली मग... महेश dead body घेऊन त्याच्या लॅबमध्ये गेला. पुरावा काहीच नाही. अभि थोडावेळ थांबून पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये आला. संध्याकाळ पर्यंत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची चौकशी झाली. रात्री उशिरा महेशचा कॉल आला म्हणून अभि थांबला. 
" अभि... सेम वेपन आहे... सागर बोलतो तोच खून करत आहे... पण त्याला कसं पकडायचं.. " अभि आधीच थकला होता. 
" उद्या सकाळी बघू... आता माझं डोकं भयानक दुखते आहे... " दोघे आपापल्या घरी निघून गेले. 

सकाळी अभि तयारी करून पोलीस स्टेशनला पोहोचला तर महेश आधीच तिथे बसला होता. 
" काय रे... झोपला नाहीस का.. " अभि खुर्चीवर बसत म्हणाला. 
" अरे ... बसू नकोस.. चल, निघायचे आहे... ",
" कुठे ? " ,
"गाडीत तर बस.. " अभिने गाडी सुरु केली. 
" सांग आता... " अभि म्हणाला. 
" पहिल्या ५ खुनाच्या ठिकाणी जाऊ.. " अर्थात त्या सगळ्या जागा सील केलेल्या होत्या... कोणाचे येणे-जाणे नाही. 
" महेश.. आपण आधीच खूप वेळा आलो आहे इथे.. आता काही मिळणार नाही... " अभि बोलला. 
" थांब जरा... आधी एक काम कर... त्यातील फोटोग्राफ बाहेर काढ.... या रुममधले... डेड बॉडी कुठे होती ते दाखव.. " तिथे already मार्किंग करून ठेवलं होतं. महेशने ,अभिला त्याप्रमाणे उभं राहायला सांगितलं. 
" बघ... तू समज, तो मृत व्यक्ती आहेस.. तसा उभा राहा... " अभिने पोझिशन घेतली. 
" आता तुला मी गोळी मारणार... म्हणजे तुझ्या समोर उभा असणार मी... बरोबर ना.. " महेश बोलला. 
" हो मग... " अभि... महेशने काही लिहून घेतलं.
" आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ चल... " अभिला काही कळलं नाही... दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा तसेच केलं दोघांनी. अभिने पोज घेतली. महेशने नोंद केली. असं करत करत ४ ठिकाणे झाली. पाचव्या ठिकाणी जेव्हा पोहोचले तेव्हा अभि वैतागून बोलला.. 
" काय चाललंय तुझं नक्की... ",
"पहिली तू पोज घे... मग सांगतो... " अभिने पुन्हा पोज घेतली. 
" आता बघ... तुला जर मी गोळी मारणार असेन तर दारात किंवा जरा आत येऊन मारिन ना.. इकडे का मारिन.. ",
"म्हणजे... ",
" शिवाय तुला हत्यार मिळाला नाही... ते मिळणार सुद्धा नव्हतं... " ,
"काय बोलतो आहेस.. ?",
"या पाच जणांकडे ते नव्हतच...कारण ती बुलेट (गोळी) एका Rifle ची आहे...आणि Rifle .... long range shooting साठी वापरतात. सागर चे बोलणे काल रात्री आठवलं मला... "त्याचा नेम कधीच चुकत नाही "...  अभि..हे फोटो बघ... मृत व्यक्ती खिडकीसमोरच उभी होती... किंवा या पाच जणांनी त्यांना खिडकी समोर आणलं असेल. सर्व फोटोमध्ये खिडक्या उघडया आहेत... सहावा खून तशाच झाला. आणि आता सातवा खून, तेव्हा तर ते बाहेरच होते. हत्यार मिळणार कसं... तो sniper आहे अभि ....दुरून नेम लावून गोळी झाडतो." अभिच्या सगळं ध्यानात आलं. 
" म्हणजे तो सगळयांना आधी पासून ओळखतो.. यांच्यावर पाळत ठेवून असणार तो... त्याशिवाय त्याला कसं माहित कोण कुठे राहतो ते... " महेशला पटलं ते... 
" चल निघूया... " दोघे गाडीत बसले तर गाडी सुरु होण्याचे नाव घेत नव्हती. 
" काय झालं रे... " ,
"बहुदा बंद पडली... काल पासून त्रास देत होती... काय करूया... " दोघे गाडीतून उतरले. "टॅक्सी करूया का... ",
"नको... ट्रेनने जाऊ.. किती वर्ष झाली असतील.. कॉलेजमध्ये असताना ट्रेनचा प्रवास करायचो... आठवलं का.. " महेश जुन्या आठवणीत रमला. 
" हो... चालेल... ट्रेनने जाऊया.. " दोघे तिकीट कडून ट्रेनने निघाले.  

गर्दी नव्हतीच. बसायला सुद्धा जागा होती... तरी दोघे दरवाजातच उभे राहून गप्पा मारत होते. एकच स्टेशन गेलं असेल. डब्यात चॉकलेट विकणारा मुलगा चढला. पुढे काही चॉकलेट विकून तो या दोघांजवळ आला. "साहब.. ",
"नको आहे आम्हाला... पुढे जा... " अभि त्याच्याकडे न बघताच बोलला. 
" चॉकलेट नही साहब... ये देना था... " म्हणत त्याने "बुद्धिबळातील उंट " अभि समोर धरला. 

अनपेक्षित !!! ... अभि चकित झाला. " किसने दिया... बोल जल्दी !!... " अभिने त्याचा हात पकडला... तो मुलगा घाबरला. " मैने कुछ नही किया साहब... वो आदमी ने ५० रुपया दिया और आपके तरफ इशारा किया... देने को.. " ,"कहा है वो.. " अभि ट्रेनच्या डब्यात इकडे तिकडे बघू लागला. तोपर्यंत पुढचं स्टेशन आलं. तो मुलगाही बघू लागला. " वो... वो रहा साहब... लाला टीशर्ट... टोपी वाला... " अभिने पाहिलं. एक जण होता दारात उभा... लाल टीशर्ट, डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर रुमाल गुंडाळलेला... अभि त्या मुलाला सोडून झपकन त्याच्याकडे निघाला. अभिला जवळ आलेलं बघून "त्याने" पटकन प्लॅटफॉर्म वर उडी मारली. आणि पळू लागला. अभिने तेच केलं. पडता -पडता वाचला. स्वतःला सावरलं आणि त्याचा पाठलाग करू लागला. पण "तो" इतका चपळ होता कि बघता बघता गर्दीत निघून गेला. कुठे शोधणार... अभि रेल्वेच्या ब्रिजवर उभा राहून बघत होता... महेश आला थोडयावेळाने. " जरा.. जरासाठी निसटला तो... " अभि श्वासांवर नियंत्रण ठेवत बोलला. " महेश... तो त्यांच्यावरच नाही... तर आपल्यावर सुद्धा नजर ठेवून आहे.... " अभि आजूबाजूला बघत म्हणाला. 

पोलिस स्टेशनकडे न जाता ते दोघे पुन्हा सागरला भेटायला गेले. 
" अरे व्वा !!... पुढचा क्लू मिळाला वाटते. छान.. " या दोघांना बघून सागर बोलला. 
" तू आता बऱ्या बोलाने सांग... कोण आहे तो.. नाहीतर.. " अभि रागात बोलला. सागर हसला... 
" ते तर तुम्हाला शोधायचे आहे... एवढं सांगितलं तुम्हाला सर... चला अजून एक क्लू देतो... त्याला गणित खूप आवडते.. number games.. वगैरे... आताही एक number game सुरु आहे... तो तुम्हाला कळला तर उत्तम.. " महेशने अभिला पुन्हा अडवलं. 
" अरे पण का करत आहात तुम्ही हे... " महेशचा प्रश्न 
" हा... मी बोललो होतो ना... सांगेन म्हणून... सांगतो.. २ वर्षांपूर्वी हा खेळ त्यांनी सुरु केला होता... आणि बुद्धिबळाचा नियम आहे... कि खेळ अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही... बुद्धिबळ सगळ्यांना छान वाटतो ना खेळ.. पण याचा सारखा रक्तरंजित खेळ दुसरा कोणता नाही. या खेळात फक्त समोरच्याला मारायचं, एवढंच शिकवलं जाते... बरोबर ना... तर आता पुरतं एवढाच क्लू... number game कळला तर पुढचा खून कधी होणार हे कळेल तुम्हाला... फक्त कोणाचा खून होणार ते शोधा.. जमलं तर वाचवा... " सागर हसत म्हणाला.. आणि झोपायला गेला. 

अभि, महेश त्यांच्या पोलिस स्टेशनमध्ये आले.... "उंट" हा क्लू होता. number game कसला ते माहित नाही.. " ok... एक काम करू... तू त्या सगळ्यांची मागील माहिती काढ... आणि मी तो number game काय आहे ते बघतो... " महेश अभिला म्हणाला. " आणखी एक... २ वर्षांपूर्वीची अशी एखादी घटना बघ... मोठी... जिचा या सगळ्यांशी काही संबंध असेल.. " अभि लगेचच कामाला लागला. महेश ते केस पेपर्स घरी घेऊन गेला. 

दोन दिवस खूप डोकं घालून सुद्धा महेशला काहीच कळलं नाही... तिथे अभिला मोठया ५ ते ६ केसेस मिळाल्या होत्या, पण एकाचाही संबंध त्या केसेस शी नव्हता लागत. सातव्या खुनानंतर तिसरा दिवस, महेश पुन्हा त्यात काही शोधत होता. अभि मिळालेल्या माहितीच्या आधारे, या सगळ्यांचा काही संबंध आहे का ते बघत होता. आणि फोन खणाणला.... खून... पुन्हा पळापळ. यावेळेस चक्क एका ऑफिसमध्ये खून... लंच टाईमला... अभि ,तिथे पोहोचताच त्याच्या काही लक्षात आलं. मृत व्यक्ती, जेवायला खिडकी जवळ बसली होती. 
" हे नेहमी इथे बसायचे का जेवायला.. " अभिने त्यांच्या सहकाऱ्यांना विचारलं. 
" हो.. ठरलेली जागा होती त्यांची... " ,
" एकटेच बसायचे का जेवायला.. म्हणजे टिफिन share नाही करायचे का... " ,
" नाही... जरा तापट होते... एकटेच येऊन बसायचे... " अभिने पुढे काही विचारलं नाही. त्या खिडकीपासून काही अंतरावर तीन इमारती होत्या.. गोळी तिथूनच आली असेल.. शिवाय त्या इमारती, under construction होत्या. CCTV कॅमेरा तिथे नसणारच हे अभिला माहित होतं, तरी दोन हवालदारांना तिथे चौकशीसाठी पाठवलं. जागा सील करून, पुन्हा पोलिस स्टेशनला आले.   

" काय सॉलिड आहे ना तो... किती study केली आहे त्याने या सगळ्यांचा ...मानलं पाहिजे त्याला... " अभि महेशला बोलला. महेशचं लक्ष खाली पेपर्सकडे होतं. 
" रिपोर्ट आहेत का महेश.. ",
" रिपोर्ट्स जाऊदे रे... ते नाही महत्वाचं... मला वाटते , त्याचा number game मला कळला आहे... yes... मला समजला... "महेश उत्साहात म्हणाला. 
" लवकर... लवकर सांग... " अभि त्या पेपर्स कडे बघत म्हणाला. 
" हे बघ... पहिले पाच खून... त्यांच्या date बघ... १० जानेवारी, ११ जानेवारी, १२ जानेवारी, १३ जानेवारी आणि १४ जानेवारी.... OK " ,
"हा पुढे... " ,
"आता सहावा खून.... ११ मार्च... सातवा, १४ मार्च... आणि आज १७ मार्च... ",
" पुढे सांग रे.. " ,
"जानेवारी म्हणजे १... .... १० जानेवारी, म्हणजे.. १० + १ केलं त्याने... म्हणून ११ मार्च... यातच वेळ सुद्धा आहे... सकाळी ११ वाजता... " अभि समजला. 
" त्यानंतर ११ मार्च म्हणजेच... ११+३ = १४... १४ मार्चला खून... दुसऱ्या खूनाची तारीख... ११ जानेवारी... means ११+१ = १२ ..... , सातवा खून १४ मार्च, वेळ दुपारी १२ वाजता... आता, आजचा खून... १४ मार्च, १४ + ३ = १७ , आज १७ मार्च... तिसऱ्या खूनाची तारीख.. १२ जानेवारी, १२ + १ = १३... १३ म्हणजे दुपारी १.... आजचा आठवा खून... १७ मार्च, दुपारी १ वाजता.. " महेशने कोडं सोडवलं. 
" शाब्बास !!... महेश... यांचा अर्थ पुढचा खून होणार तो २० मार्च ,दुपारी २ वाजता..  " अभिने लगेच आकडेमोड केली. 

संध्याकाळ झालेली.. अभि आणि महेश, शेजारी असलेल्या कॉफी शॉप मध्ये गेले. 
" आणखी अभि.. मला काही कळलं आहे असं वाटते... " ,
" काय ? " अभि कॉफि घेत बोलला. 
" त्यांच्या size नुसार त्यांना नावं दिली असतील... हत्ती म्हणजे ते जरा जाड होते... उंट म्हणजे त्यांची height बघितली ना तू.. असं असेल बहुदा.... " ,
"तसं असेल तर... मग प्यादं.. ते कसं सांगशील.. " महेश पुन्हा विचारात पडला. आणखी अर्धा तास गप्पा मारत बसले होते दोघे. बिल देण्यासाठी दोघे काउंटर जवळ आले. तर महेश चे लक्ष शेजारीच ठेवलेल्या वस्तू वर गेलं. " अभि !! " महेशने अभिचे लक्ष तिथे वळवलं. एक काळ्या रंगाचे "बुद्धिबळातील प्यादं " ...तिथे ठेवलं होतं. आणि खाली कागदावर " only for inspector अभिषेक " असं लिहिलं होतं. अभिने लगेच तिथे विचारपूस केली. 
" कोणी ठेवलं हे इथे.... " काउंटर वर असलेल्या मुलगीला अभिने मोठयाने विचारलं . 
" सर,... खरंच मला माहित नाही... " ती रडू लागली. 
"CCTV तरी चालू आहे ना... " महेशने विचारलं. 

दोघेही CCTV चे फुटेज बघू लागले. चेहरा तर दिसत नव्हता त्याचा... पुन्हा रुमाल लावला होता त्याने.. पण अभिने ट्रेनमध्ये बघितलेल्या मुलासारखाच वाटत होता तो. लाल टीशर्ट... डोक्यावर टोपी... " हे फुटेज... पोलिस स्टेशन मध्ये पाठवून द्या... " अभि आणि महेश बाहेर आले. " प्रत्येक movement वर लक्ष आहे त्याचं... आता तर पोलिस स्टेशन जवळ पण आला तो... कमाल आहे ना... " महेश एकटाच बडबड करत होता. अभि मात्र विचारात होता... प्यादं हातात होतं त्याच्या.... २० मार्च... वेळ दुपारी २ वाजता... तारीख आणि वेळ तर समजली... कोण मरणार असेल आणि कोण मारत असेल या सगळयांना ..... अभि विचार करत करत घरी निघाला.


------------------------------to be continued ---------------------------------------

Monday 6 February 2017

झुंज.....


( खालील कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्ती किंवा प्रसंगाशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

         युद्ध आणि झुंज..... या दोन्ही शब्दांचा अर्थ वरचेवर सारखा वाटत असला तरी त्यात खूप फरक आहे. युद्ध हे दोन्ही समान ताकद असण्याऱ्या किंवा जवळपास सारखे  सैन्यबळ असणाऱ्या परस्पर विरोधी पक्षांमध्ये होते. पण झुंज हि फक्त आणि फक्त जगण्यासाठी केलेली धडपड असते. अश्याच एका झुंजीची हि कथा आहे. 

        कथा आहे खूप जुन्या काळातली. राजे-रजवाडे यांच्या काळात घेऊन जाणारी. त्यावेळी बहुदा सगळ्या प्रत्येक राज्यात सुबकता होती. लोकं गुणागोविंद्याने नांदत होती. एक राज्याचा राजा , दुसऱ्या राजाची सुद्धा विचारपूस करायचा. देवाण -घेवाण नित्य-नियमाने होतं असे. त्यामुळे सगळीच राज्य एकमेकांना समजून घेत असतं. एकाने दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचा तर प्रश्नचं नव्हता. सगळीकडेच शेती चांगली होत होती, वेळेवर पाऊस , कारभार योग्य रीतीने चालू होता. व्यवहारात प्रगती होती. एकंदरीत सगळीकडे शांतता आणि समुर्द्धि होती. 

          त्यात एक राज्यं होतं, विक्रमवीर नावाच्या राजाचे. लहानसं राज्य होतं ते. राज्याचा कारभार अगदी सुरळीत चालू होता. विक्रमवीर राजा , एक उत्तम असा राज्यकर्ता होता. राज्यात काय काय चालू आहे , याची माहिती त्याला बरोबर असायची. जनता नेहमी आनंदी राहील , याकडे त्याचं नेहमी लक्ष असायचं. युद्धातही पारंगत होता तो. राज्य लहान असला तरी त्याचे युद्धबळ , युद्धसामुग्री प्रगत होती. त्या काळात इतर राज्यांकडे फक्त तलवार आणि भाले वापरले जायचे. फक्त विक्रमवीर राजाकडे तिरंदाजी करणारे सैन्यबळ होते. विक्रमवीराला त्याचा खूप अभिमान होता. राजाला एक मुलगा होता. लाडाने वाढवला त्याला. वडिलांप्रमाणेच किंवा त्याच्या पेक्षा जरा जास्तच म्हणा, तो युद्धकलांमध्ये तरबेज होता. दररोज व्यायाम करून शरीरयष्टी बळकट केली होती युवराजने. सहा -साडे सहा फूट उंच अशी ताडमाड शरीरयष्टी. तलवारबाजी, तिरंदाजी, मल्लयुध्द यात त्याचा हात पकडणारा , शेजारी-पाजारी असलेल्या राज्यात तरी कोणी नव्हता. मल्लयुध्द करताना चार -चार पहिलवानांना एका फटक्यात खाली लोळवायचा. असा होता युवराज आणि त्याचे वडील विक्रमवीर.  

          सगळं कसं छान चालू होतं. एक दिवस त्याच्या गुप्तहेराने एक बातमी आणली, कि त्याच्या शेजारी असलेल्या राज्यावर काही अफगाणी सैन्याने हल्ले सुरु केले आहेत. हि बातमी जरा चिंताजनक होती. देशाच्या बाहेरील शत्रूने हल्ला केला होता. माहिती नुसार, त्यांचे सैन्यबळ प्रचंड होते. साहजिकच त्या राज्याचा निभाव लागणं अशक्य होतं. अफगाणी राजाने त्या राजाला युद्धकैदी करून राज्य हस्तगत केले होते. विक्रमवीर चिंतेत पडला. कदाचित पुढचा हल्ला त्याच्याच राज्यावर होईल , हे तो कळून चुकला. विक्रमवीर राजाचे राज्य तसं लहानचं, त्यामानाने शेजारील राज्य बरीच मोठी होती.  त्यांचा निभाव लागला नाही, तर आपली काय गत होईल, याची चिंता वाटू लागली. 

           तसं त्याच्या राज्याचा भौगोलिक इतिहास बघितला तर एक बंदिस्त राज्य होतं ते. एका बाजूलाच राज्य होतं ते. पाठीमागे उंचचउंच पर्वतरांगा होत्या. त्या पर्वतरांगा दक्षिण-उत्तर दिशेला पसरल्या होत्या. तिथून कोणतंच आक्रमण होऊ शकत नव्हतं. नैसर्गिक तटबंदी होती ती. पश्चिम दिशेस , दोन राज्यांना मध्ये विभागणारी एक मोठी नदी वाहत होती. त्यावेळेस नदीतून आक्रमण करण्या इतपत कोणाकडे सामुग्री नव्हती. राहिला प्रश्न पूर्व दिशेचा, हो.... तिथूनच आक्रमण होऊ शकत होतं. 

          विक्रमवीर राजाने तातडीची बैठक बोलावून घेतली आणि सर्व मंत्राबरोबर सल्ला मसलत केली. शत्रू फार मोठा आहे आणि त्याच्या समोर निभाव लागणं शक्य नाही. तरी काहीतरी करावे लागेल , यासंबंधी विचार सुरु झाले. खूप वेळानंतर असं ठरलं कि , तातडीने तो पूर्व मार्गही बंद करावा. तिथे काही भिंतीवजा बांधकाम करून शत्रूला जेव्हढा वेळ थोपवता येईल तेव्हढा प्रयन्त करावा. नाहीतरी शेजारी असलेल्या राज्यांनी मदत करायचे आश्वासन दिले होते. सर्व ठराव संमत झाले आणि लागलीच सुरक्षा भिंतीचे काम सुरु झाले. आक्रमण कधीही होऊ शकते , यानुसार त्यांनी सैन्यबळाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. स्वतः विक्रमवीर त्याकडे जातीने लक्ष देत होता. युवराज ,सुरक्षा भिंतीचे काम कुठंवर आलं आहे याकडे बघत होता. 

        यात पाच-सहा महिने निघून गेले. प्रत्येक वेळेस एक भीती असायची मनात. कधीही हल्ला होऊ शकतो. तणावांचे दिवस होते ते. एक-एक दिवस असाच जात होता. अश्याच एका दिवशी, अफगाण सैन्याकडून त्यांचा संदेशवाहक एक पत्र घेऊन आला. त्यात "शरणागती पत्करा नाहीतर युध्दास तयार रहा. " या आशयाचा संदेश होता. शरणागती म्हणजे आपण त्यांचे गुलाम होण्यासारखेच. विक्रमवीर राजाला त्याच्या प्रजेची चिंता होती. त्यांना गुलाम करायचे नाही, हाच विचार मनात ठेवून त्याने शरणागती नाकारली. संदेशवाहक फक्त हसला आणि तसाच निघून गेला. 

        दुसऱ्याच दिवशी, विक्रमवीर स्वतः त्याच्या संपूर्ण सैन्यासह निघाला, जिथे सुरक्षा भिंती बांधली होती. भिंत तर होतीच, शिवाय व्यूहरचनेप्रमाणे सर्व सैन्य आपापल्या जागी स्थिर झाले. तिरंदाजी करणारे मध्यभागी , तलवारबाजी करणारे पुढे, अशी काहीशी ती रचना होती. जवळपास सर्वच सैन्य तिथे ठाण मांडून बसलं होतं.फक्त राजवाड्यात सुरक्षेसाठी ७० सैनिक तेवढे मागे ठेवले होते. युवराजची युद्धात भाग घेण्याची कितीही इच्छया असली तरी वडिलांसमोर तो काहीच बोलू शकत नव्हता. त्यालाही सर्वांबरोबर राजवाड्यात राहावे लागले. पुढचे दोन दिवस तरी हल्ला झाला नाही, तरी संपूर्ण सैन्य डोळ्यात तेल घालून आक्रमणासाठी तयारीत होते. विक्रमवीर तयारीनिशी होता. फक्त हल्ला कधी होणार हे ठाऊक नव्हते. राजवाड्यात , युवराज विचारात पडला होता. दोन दिवस झाला तरी ते अजून कसे आले नाहीत युद्धासाठी. आक्रमण होणार हे नक्की, पण दोन दिवसात कोणतीच हालचाल नव्हती. काहीतरी गडबड असावी, अशी शंका त्याच्या मनात आली. समोरून हल्ला झाला नाही तर मागच्या बाजूने तरी एक नजर टाकू ,असं ठरवून , आईची आज्ञा घेऊन युवराज निघाला. बाकी असलेल्या ७० पैकी ५० जणांना त्याने सोबत घेतले होते. 

         सायंकाळ होत आलेली. राज्यातली जनता त्यांचे काम संपवून घराकडे निघाली होती. पक्षीसुद्धा त्यांच्या घराकडे परतत होते. पूर्वेकडे विक्रमवीर राजा , सैन्यसह हल्ल्याची प्रतीक्षा करत होता. तर इकडे युवराज ,५० जणांसह घोड्यावरून भरधाव निघाला होता. प्रथम ते उत्तर दिशांना असणाऱ्या पर्वत रांगांच्या दिशेने गेले. तिथे असलेल्या किल्ल्यावरून दूरपर्यंत नजर जात असे. तिथून पाहिले असता सर्व शांत होते. तरी एवढ्या मोठया पर्वतरांगा पार करून युध्द करायला येण्याचा विचारच कोणी करू शकत नाही. तरीही युवराजने बारकाईने नजर टाकली. सर्व ठीक आहे, हे पाहून तो पश्चिम दिशेला असलेल्या सीमेकडे निघाला. 

          एका मोठ्या नदीने दोन राज्यांमध्ये सीमा आखली होती. नदीचा विस्तार बऱ्यापैकी मोठा होता. त्याशिवाय आजूबाजूला असलेल्या मोठमोठ्या खडकांनी, दगडांनी ती सीमाही बिकट बनवली होती. नदीपासून त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी एकचं वाट होती. त्याचं वाटेवर देखरेख करण्यासाठी एक लहानसा किल्ला बांधलेला होता. तिथेही त्यांची एक सैन्य तुकडी असायची. परंतु सर्व सैन्याला पूर्वेला जमायला सांगितल्याने त्या किल्यावर कोणीच नव्हते. युवराज तिथे पोहोचला तेव्हा बरीचशी रात्र उलटून गेली होती. धावून धावून घोडेसुध्दा दमलेले होते. त्याचं बरोबर त्याचे सैन्यही. त्या किल्यावर थोडेफार खाण्यास पदार्थ होते. , ते त्यांनी पटापट खाल्ले आणि आराम करत बसले. सगळेच थकलेले असल्याने पटकन झोपी गेले. 

          सर्व प्रथम युवराजला जाग आली, तेव्हा सूर्योदय होण्यास थोडा अवधी बाकी होता. त्याने इतर सहकाऱ्यांना जागं केलं. सगळेच उठून तयार झाले. आपापले घोडे तयार केले. " इथून थोड्याच अंतरावर तर नदी आहे. घोडे राहू दे असेच, सर्वच पायी पायी जाऊ. " युवराजने सुचवलं. "असं म्हणता तर तसं करू. " सगळयांना पटलं ते. घोडे तसेच बांधलेले ठेवून युवराज त्या " लहान सैन्या" बरोबर निघाला. छान थंड हवा वाहत होती. थोडयावेळाने सूर्योदय होईल, तसं पटकन निघून राजवाड्यात न्याहारी करू, असा विचार करत होता युवराज. 

           जसे ते नदी समीप येऊ लागले , तसं त्यांना कसलेसे आवाज येऊ लागले. कोणालाच कळतं नव्हतं कि ते आवाज कसले आणि कुठून येतं होते ते. कूठेतरी मोठया प्रमाणात माणसं जमा होतं होती, त्याची कुजबूज होती ती ,याशिवाय बाकीचेही कसले कसले आवाज येत होते. " युवराज जी, आपण इथेच थांबूया. मी चार - पाच जणांना घेऊन पुढे जाऊन बघून येतो. " एक जण बोलला. " ठीक आहे, पण मी सुध्दा येतो आणि तिथे जवळ जाण्यापेक्षा , एका खडकावर चढून पाहूया." युवराज म्हणाला, तेही पटलं सगळ्यांना. युवराज, चार जणांसह पुढे गेला. एका मोठया खडकावर चढले आणि लपूनच ते नदीच्या किनारी , तो आवाजाच्या दिशेने पाहू लागले. उजाडलं नसलं तरी बऱ्यापैकी समोरचं दिसत होतं. नदीच्या किनाऱ्यावर जिथंपर्यत नजर पोहोचत होती, तिथपर्यंत लाकडी तराफे लागले होते, मोठे तराफे. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून येतं असावेत ते. आणि त्या तराफ्यावरून माणसं येत होती. ती कूजबूज त्यांच्या बोलण्याने होतं होती. ते कसलेसे आवाज त्यांनी सोबत आणलेल्या तलवारी आणि ढाली, खाली जमिनीवर ठेवल्याने होतं होते. सगळं किती विचित्र होतं. युवराज ते सगळं पाहत होता. " युवराज जी, हे काय आहे ? ", " मलाही तोच प्रश्न पडला आहे. हे नक्की काय चाललंय ते... " युवराज विचार करू लागला. हल्ला या दिशेने होईल , असं कोणाच्या स्वप्नात देखील आलं नसेल. तरीही जे समोर दिसतं होतं ते घडतं होतं आणि खरं होतं. 

            सूर्योदय होतं होता. काळोख दूर होऊन आता आभाळ लालसर दिसू लागलं होतं. त्याचबरोबर, त्या सैन्याचा विस्तारही लक्षात येत होता. " साधारण २ ते ३ हजार माणसं असतील. " त्यापैकी एक जण बोलला. "हम्म .... पण त्यांनी इथून का हल्ला केला असेल... म्हणजे, पूर्वेकडील सीमेवरून या पेक्षा जलद आणि मोठया प्रमाणावर सैन्य येऊ शकले असते ना... " युवराजने विचारलं. त्यातल्या एकाला युध्दाची चांगली माहिती होती, " हा जो किल्ला आहे ना, तो फार महत्वाचा आहे. यावर जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांना आपल्या राज्यात प्रवेश करणे अगदी सोप्प जाईल. कारण हा किल्ला तसा दुर्गम आहे, एकदा का तो आपल्या हातातून गेला , तर पुन्हा मिळवणे जवळपास अशक्य. आणि एक गोष्ट, त्यांची हल्ला करण्याची हीच पद्धत आहे सगळीकडे, दोन बाजूंनी हल्ले करतात ते, मागून आणि पुढून... त्यामुळे दुसरा पक्ष गोंधळून जातो, तसाच हल्ला असेल हा... " युवराजने खूण केली तसे त्याच्या सोबत आलेले ते चारही जण खाली उतरले. धावतच ते उरलेल्या सैन्याजवळ आले. त्या सगळ्यांना नदीकिनारी काय चालू आहे याची माहिती दिली.  

       "काय करायचे युवराज जी... " एकाने विचारले. युवराज विचार करू लागला. काहीतरी करून यांना इथेच थांबवलं पाहिजे. त्याशिवाय, हि जागा महत्वाची होती. एकदा शत्रूने घेतली तर पुन्हा मिळवणे कठीण. हा विचार त्याने सहकाऱ्यांना बोलून दाखवला. " कसं शक्य आहे युवराज जी, नाही म्हटलं तरी त्यांची संख्या २ ते ३ हजाराच्या घरात आहे. आपण किती काळ त्यांच्या समोर उभं राहणार. मदत तर लागणारच आपल्याला.... राजांना हे सांगायला हवं. " ," हे सगळं ठीक आहे. राजांना ते सांगावे लागेलच... तरीसुद्धा आपण पश्चिमेला आहोत. ते अगदी बरोबर आपल्या विरुध्द दिशेला, पूर्वेला आहेत. अंतर मोजलं तरी येथून ,कोणीतरी त्यांना सांगायला आता निघाला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत दुपार होणार. आणि त्यांना सेनेनीशी इथे यायला संद्याकाळ... निदान तोपर्यत तरी आपल्याला उभं राहावे लागेल. " असं युवराज म्हणेपर्यंत शत्रू सैन्यांच्या जोरदार आरोळ्यांनी आसमंत भरून गेला. हल्ल्याची घोषणा किंवा पूढे चाल करण्याची तयारी, यापैकी काहीतरी असावं, असा कयास युवराजने लावला. 

           सूर्योदय झाला होता, तरीही अजून म्हणावं तसं उजाडलं नव्हतं. युवराजने एका सैनिकाला निवडलं.    " जेवढ्या लवकरात लवकर तुला वडिलांपर्यंत पोहोचता येईल असा प्रयन्त कर.... आणि मदत घेऊन ये.",     " जी युवराज जी... " म्हणत तो सैनिक , घोडयावर स्वार होऊन निघाला. तो नजरेआड झाला आणि युवराज इतर सैनिकांकडे वळला. " आपली संख्या कमी असली तरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. सगळे तयार आहात का लढण्यासाठी.... " सगळेच एकमेकांकडे बघू लागले. त्यावर युवराज म्हणाला, " तुम्ही सोबत नसलात तरी मी इथेच उभा राहीन, माझ्या जनतेसाठी, माझ्या घरासाठी." ते ऐकून सगळ्यांना हुरूप आला. "आम्ही तयार आहोत युवराज जी... " युवराज सगळ्यांकडे बघू लागला. " ठीक आहे. ज्या कोणाला अजून भीती वाटत आहे किंवा लढायची हिंमत नसेल त्याने आत्ताच निघून जावे, एकदा का युद्ध सुरु झाले तर कोणालाच मागे वळता येणार नाही.... आणि कोणी युध्द सोडून पळालाच तर तोही माझा शत्रू असेल.... कळलं का सगळ्यांना. "

           युवराज आता त्या " ४९ जणांची " रचना करू लागला. एकच वाट..... वाट म्हणण्यापेक्षा त्याला रस्ता म्हणणे जास्त सोयीचे पडेल. १० माणसे एका सरळ रेषेत , एकाच वेळी जाऊ शकतील एवढा मोठा रस्ता तो.... त्यात शत्रूची संख्या मोठी.... किल्ल्यात सुद्धा युद्धसामुग्री मोजकीच, होती तेवढी पुरेशी नव्हती. हा... त्यांच्याकडे एक मोठी गोष्ट होती, तिरंदाजी. जी अजून पर्यंत कोणाकडेच नव्हती. ४९ पैकी ४९ जणांना तिरंदाजी येत होती. मग युवराजने त्यापैकी ७ जणांना डाव्या बाजूला आणि ७ जणांना उजव्या बाजूच्या खडकांवर वर चढायला सांगितले. उरलेले ३५ जण तलवार आणि ढाली घेऊन खाली उभे राहिले. युवराज सर्वात पुढे उभा. 

            हल्ला होताच सर्वप्रथम तिरंदाजांनी हल्ला करायचा अशी योजना होती. त्यातून उरलेले जे पुढे येतील त्यांना तलवारबाज बघून घेतील. त्यातून वर चढलेल्या सैनिकांनी वरून मोठं-मोठ्या शिळा आधीच खाली ढकलून दिल्या होत्या. जेणेकरून तो रस्ता अधिकच बिकट होऊन जाईल. अशा तऱ्हेने , युवराजसह सगळेच तयार होते. बऱ्यापैकी उजाडलं होतं. कोणत्याही हल्ल्यासाठी सगळे तयार होते. हळूहळू पायाचे आवाज, कुजबूज ऐकू येऊ लागली.शत्रू सैन्याची पहिली फळी येत होती. वरील सैनिक लपून बसले होते. त्यांनी युवराज ला खूण करून तयारीत राहायला सांगितले. दुरूनच आता ते अफगाणी सैन्य नजरेस पडत होते. त्यांनी सुद्धा या युवराजच्या सैन्याला बघितले असावे, कारण त्यांची गती हळूहळू कमी कमी होतं थांबली. कदाचित , ते युवराजच्या सैन्याचा अंदाज घेत असावेत. वर लपून बसलेल्यापैकी एकाने हळूच त्या सैन्यावर नजर टाकली. फक्त ते उभे होते, त्याच्या पुढची जमीन तेवढी दिसत होती, त्यामागे फक्त आणि फक्त सैनिकच होते. हातात तलवारी, भाले आणि ढाली घेऊन... डोळ्यात पाणी आलं त्याच्या...... त्याला त्याचे कुटुंब आठवले... कारण यातून सुटका होणे तर शक्य नाही. पण राज्यासाठी एवढं तरी करू शकतो ना आपण, या भावनेने त्याने डोळे पुसले आणि धनुष्य-बाण तयार करून लपून बसला. 

            छानशी सकाळ होतं होती. राज्यातले नागरिक हळूहळू आपापल्या कामाला निघत होते. कोणी बैलगाडी तयार करत होतं, शेतावर शेती करायला निघाले होते, घरात बायका दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. पूर्व दिशेला, सीमेवर विक्रमवीर राजा , नव्या दिवसाची तयारी करत होता. पुन्हा एकदा त्याने आपली व्यूहरचना बरोबर आहे कि नाही ते पाहिलं. एक घोडेस्वार वेगाने त्यांच्या दिशेने निघाला होता. पश्चिमेला , नदीवर सुध्दा पहाट झाली होती. आजूबाजूच्या जंगलातील पशुपक्षी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी निघाले होते. थंड हवा वाहत होती. सगळीकडे पहाट झालेली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता. आणि नदीपासून राज्याकडे जाणारा रस्ता मात्र भयाण शांततेत हरवला होता. युवराज आणि त्याचे ४९ सहकारी तयारीत होते. समोर अफगाणी सैन्य तयार होते. काही काळ असाच गेला. ...... आणि एका क्षणाला, अफगाणी सैन्याने आक्रमण केलं. पहिली फळी पुढे आली. अर्ध्या वाटेवर आले असता वरून सपासप तिर येऊ लागले. कोणालाच काही कळेना. वरील तिरंदाज पटापट बाण सोडत होते, अचुक नेम साधून. एकही तिर वाया जाऊ नये, हेच त्यांना पाहिजे होते आणि तसंच घडत होते. प्रत्येक तिरानिशी एकएक जण खाली पडत होता. त्या हल्याने सैरभैर झालेली ती पहिली तुकडी पुढे आली तशी युवराज आणि त्याच्या सैन्याने आपलं काम चोख बजावलं. समोर आलेला फक्त खाली पडला पाहिजे हेच त्यांना ठाऊक. अफगाणी सैन्य बिथरून गेलं अगदी.... हल्ला तरी कसा करणार.   

          युवराज आणि त्याचे सहकारी त्याचं काम करत होते. तलवारींचा खणखणाट होत होता,ढालींवर तलवारी आढळत होत्या. अफगाणी सैन्याची पहिली तुकडी कापून निघाली होती. त्यातले बरेचशे सैन्य धारातीर्थी पडले होते. युवराजचे सैन्य जसच्या तसं होतं. तो हल्ला बघून त्या शत्रू सैन्याच्या पहिल्या तुकडीने माघार घेतली. ते पाहून युवराजच्या "त्या" सैन्याचा हुरूप अजून वाढला. युवराजने सगळ्यांना पुन्हा एकत्र केले. पुन्हा सगळ्यांनी आपल्या जागा घेतल्या. पुन्हा सगळे तयार झाले. थोड्याच वेळात अफगाणी सैन्याच्या दुसऱ्या तुकडीने हल्ला केला. आक्रमण दमदार होते. तिरंदाजानी वरून तीर सोडायला सुरुवात केली. यावेळीही खूप जणांना त्यांनी टिपलं होतं. त्यातून जे पुढे गेले होते त्यांचे स्वागत करायला युवराज होताच. कोणालाच कळतं नव्हतं कि नक्की काय करायचे ते. अफगाणी सैन्यासमोर ,युवराजचे सैन्य लहान असलं तरी ते आता त्यांच्यावर "भारी" पडू लागलं होतं. 

        अफगाणी सैन्याची दुसरी तुकडी सुध्दा माघारी परतली होती. दोन्ही तुकडयामधले बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले होते. युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शत्रू सैन्याच्या दोन तुकडयांना अडवलं होतं, मोठया जिद्दीने , पराक्रमाने. हे सगळं छान वाटतं असलं तरी ते सगळे आता थकले होते. हात चालवून तरी किती चालवणार ना. त्यात ते होते फक्त ४९ जण. वर बसलेले, तिरंदाजी करणाऱ्याचे तीर सुध्दा संपत आलेले होते. अफगाणी सैन्य जसं मागे हटलं , तसं युवराजने मागच्या सैनिकांना पुढे यावयास सांगितले. युवराजही थकला होता. त्यानेही विश्रांती घेतली. दोनच तुकड्यानी एवढं दमवलं, पुढे कसं होणार या विचार गढून गेला तो. 

           थोडया अवधी नंतर तिसऱ्या तुकडीने हल्ला चढवला. यावेळेस मात्र त्यांची संख्या मोठी होती. तिरंदाजानी आपलं काम सुरु केलं. पुन्हा अचुक मारा. शत्रू तीर लागताच खाली कोसळत होते. पण संख्याच एवढी मोठी होती कि कोणाला मारू आणि कोणाला नको असा प्रश्न तिरंदाजांना पडला. दोनदा मिळालेल्या अपयशाने ते पुरते खवळले होते. तुटून पडले ते युवराजच्या सैन्यावर. सगळीकडेच कापाकापी सुरु झाली. कोणीच मागे हटायला तयार नाही. त्यात तीर संपल्याने तिरंदाजानी आता खाली येऊन तलवारी हातात घेतल्या होत्या. युवराजचे दमलेले सहकारी मागे आले आणि मागे असलेले पुढे गेले. चेहरे बदलले, काम फक्त एकचं.... समोरच्याला मारायचं. 

           दुपार होतं आलेली. " तो " निरोप घेऊन निघालेला सैनिक अर्ध्या वाटेवर पोहोचला असेल, त्याचवेळी त्याचा घोडा ,एका दगडाला अडखळून पडला. एवढं अंतर धावून धावून तोही थकला होता. एवढ्या जोरात तो जमिनीवर आदळला कि पडताक्षणीच त्याने प्राण सोडला. त्याच्या मालकाला दुःख झालं.  क्षणभरासाठी तो घोड्याशेजारीं बसला. पण तेथे युवराज ,मोजक्या सैन्यानिशी लढतो आहे, हे राजांना सांगितलंच पाहिजे, यासाठी तो स्वतःच धावत सुटला.

          तिसऱ्या अफगाण तुकडीशी युध्द चालू होतं. त्यात चौथ्या तुकडीने हल्ला केला. कसं जमणार होतं ते. तो हल्ला जबरदस्त होता. पहिलं तरी एक सैनिक एका बरोबर लढत होता, पण आता एकास तीन या ओघाने सैनिक येत होते. दमले-भागलेलं युवराजचे सैन्य आता मागे हटू लागलं. एक-एक जण धारातीर्थी पडू लागला. सैन्य कमी होऊ लागलं. युवराज मात्र त्वेषाने लढत होता. परंतु त्याच्याकडे सहकारी कमी पडू लागले होते. ते सुध्दा किती उभे राहणार. प्रेतांचा नुसता खच पडला होता. तरी शत्रू त्याच्यावर उभं राहून लढत होते. युवराजने किती जणांना यमसदनी पाठवले होते. आता तोही कमी पडू लागला होता. अचानक एक भाला हवा कापत तीव्र गतीने युवराजच्या दिशेने आला. पटकन त्याने तो ढालीने अडवला. परंतु त्यानंतर लगेचच आलेल्या दुसऱ्या भाल्याला युवराज अडवू शकला नाही. खांद्यांच्या आरपार गेला भाला. तो आघात एवढा जबरदस्त होता कि धिप्पाड देह असलेल्या युवराजचा सुध्दा तोल गेला. आणि खाली असल्याला दगडावर डोकं आढळल्याने बेशुद्ध झाला. काही सैनिकांनी त्याला उचलून मागे नेले. त्याची जागा दुसऱ्या सैनिकांनी घेतली. 

          युवराज किती वेळ बेशुध्द होता ते माहिती नाही. जागा झाला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतं होता. युवराज रथातून जात होता. उठून उभा राहिला तेव्हा त्याने पाहिलं, सगळी जनता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभं राहून , टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करीत होते. स्वतः विक्रमवीर राजा, युवराजचे स्वागत करण्यासाठी राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी उभे होते. सगळी कडून फुलांचा वर्षाव चालू होता. आपण युध्द जिंकलो वाटते असा विचार युवराजच्या मनात आला आणि तो मनोमन आनंदाला. डोळे भरून आले त्याचे, डोळे मिटले त्याने. 

          थोडयावेळाने पुन्हा त्याने डोळे उघडले तर समोर ढगाळलेले आभाळ दिसत होतं. आजूबाजूला लोकं टाळ्या वाजवत नव्हती तर त्याचे मृत्युमुखी पडलेले सहकारी होते. टाळ्यांचा आवाज नसून तलवारींचा खणखणाट होता. युवराज भानावर आला. आपण राजवाड्यात नसून युद्धभूमीवर आहोत आणि युध्द अजूनही सुरु आहे, याची जाणीव युवराजला झाली. तसा तो उठून बसला. लागलीच एक कळ त्याच्या मेंदूपर्यंत गेली. डोक्यातून रक्त वाहत होतं. आपल्या खांद्यात एक भाला घुसला होता, हीच काय ती आठवण. त्यातूनच ती कळ आली होती. खांदा पकडून तो उभा राहिला. त्याचे सहकारी अजूनही लढत होते. "युवराज जी , तुम्ही बसा.... शत्रूला आम्ही बघतो. " एक सैनिक त्याला बोलला. " नाही... मला लढलेच पाहिजे.... एक काम कर, माझ्या खांद्याला काहीतरी बांध. " तसं त्याने आपली पगडी सोडली आणि युवराजच्या खांद्याला बांधली. 

         हात वगैरे मोकळे करत युवराज पुन्हा उभा राहिला. तलवार आणि ढाल घेत स्वतःच सैन्यापुढे आला. आणि अंगातली सगळी शक्ती एकवटून त्याने लढायला सुरुवात केली. काय आलं होतं त्याच्या अंगात माहिती नाही, समोर येईल त्याला मारू लागला, एकटाच. इतका वेळ लढाई करणारे ते अफगाण सैन्य, युवराजचा आवेश पाहून घाबरलं. ते बघून युवराज अधिक जोराने वार करू लागला. तलवारीच्या एका फटक्यात तो समोरच्याला लोळवू लागला. अफगाण सैनिक मागे होऊ लागले. तेसुद्धा थकलेले.... अश्यावेळी थांबलेलंच बरं असतं. तेच त्यांनी केलं. अफगाणी सैन्याची आणखी एक तुकडी माघारी परतली.   

       तो निरोप घेऊन निघालेला सैनिक, शेवटी दुपार उलटून गेली तेव्हा पोहोचला. धावून धावून तोही थकला होता. विक्रमवीर राजा जवळ पोहोचताच तो कोसळला. इतर सैनिकांनी त्याला सांभाळून बसवलं. थोडयावेळाने शुद्धीवर येताच त्याने सांगितलं, " शत्रूने पश्चिमेकडून हल्ला केला आहे. युवराजजी तिथे त्यांचा प्रतिकार करत आहेत. मोजकेच सैन्य आहे महाराज. " एवढच बोलून त्याने प्राण सोडला. " युवराज !! " विक्रमवीर राजाच्या तोंडून शब्द बाहेर पडले. युवराजला वाचवायला हवं, या उद्देशाने राजा आपल्या घोडदळासह निघाला. 

        दुपार होऊन गेली तरी प्रकाश अंधुक होतं होता. आभाळ भरून येत होतं. युवराज सुध्दा तेच न्याहाळत होता. अवेळी कसा पाऊस आला, याचा विचार त्याच्या मनात आला. खूप थकलेला होता तो. समोरच्या वाटेवर किती जण मरून पडलेले होते याची गणतीच नव्हती. त्यात त्याचे सहकारी सुद्धा होते. अफगाणी सैन्य मागे हटले होते, पुढच्या हल्ल्याच्या तयारी साठी बहुदा. ३-४ तुकड्याचं आल्या त्यांच्या इथे. पहाटे पाहिलं तेव्हा किती सैन्य होते याची कल्पनाच केली नाही मी, अजून किती माणसं येणार काय माहित, युवराज सगळं मनात बोलत होता. आपल्या सैन्याकडे त्याने नजर वळवली आणि माणसं मोजली. ४९ पैकी फक्त ८ जण बाकी होती, तेही रक्तबंबाळ. वडिलांना निरोप भेटला असेल तर त्यांना इथे यायलाच संध्याकाळ होईल, ८ जणांसह कसा थोपवू यांना इथपर्यंत, युवराजच्या डोळ्यात पाणी आले . 

       दुसरीकडे, अफगाणी सैन्याचा सेनापती प्रचंड संतापला होता. एक एवढासा किल्ला जिंकता येत नाही म्हणजे काय, त्यामुळे त्याने आता एक मोठी सैन्य तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला. आता स्वतः युद्धात भाग घेणार होता तो. त्याला त्याच्या सैनिकांनी युवराजबद्दल सांगितलं होतं. त्याच्या पराक्रमाबद्दल. तो योद्धा कोण आहे, हे पाहण्यासाठी तो निघाला होता. विक्रमवीर राजा ,त्याच्या १०००-१५०० घोडेस्वारांसहित अर्ध्यावाटेवर पोहोचला होता. अजूनही अर्ध अंतर बाकी आहे, युवराजला काही झालं नाही पाहिजे, हाच विचार त्याच्या मनात. 

       अफगाणी सैन्याची पुढची तुकडी आता संथपणे पुढे येत होती. युवराजला ते दुरूनच दिसलं. तो काही बोलणार , त्या अगोदर एक जण बोलला." युवराज जी , तुम्ही किल्याच्या द्वारापाशी थांबा. आम्ही बघतो यांचे काय करायचे ते." ," अरे पण.... " ," युवराजजी... वेळ फार कमी आहे... वेळ दवडू नका. जगलो, वाचलो तर पुन्हा भेटू... " युवराजने पटकन त्याला मिठी मारली. ते झाल्यावर आपापले शस्त्रे उचलली सगळ्यांनी. एकमेकांकडे पाहिलं सगळयांनी. समोरून शत्रू सैन्य दिसत होतं. युवराज किल्ल्याकडे जायला निघाला. तिथून वाट अजून चिंचोळी होतं होती. तिथेच जाऊन तो उभा राहिला. बाकीच्या ८ जणांनी आपापली जागा घेतली. शत्रू सैन्य जसं नजरेत आलं तसं कसलीही वाट न बघता, " महाराजांचा विजय असो... " अशी आरोळी ठोकत ते सर्व ८ जण त्याच्यावर धावून गेले. एक प्रकारची आत्महत्या होती ती. दुसरा काही पर्यायच नव्हता. मनात कसलाही विचार न ठेवता निव्वळ राज्यांसाठी ते शत्रू सैन्यात घुसले होते. समोर येईल त्यावर हल्ला करू लागले. अफगाणी सैन्यात पुन्हा अफरातफरी माजली. अर्थातच ते काही वाचणार नव्हते, तरी लढत होते. 

         त्या ८ जणांच्या हल्ल्यातून वाचलेले शत्रू सैनिक युवराज समोर आले. वाट अधिकच लहान झाल्याने, आता फक्त एकावेळेस ४ जण जाऊ शकत होते. त्यात युवराज समोर उभा ठाकला होता. भीषण युध्द सुरु झालं. युवराज समोर कोणाचा निभाव लागणार. मारत सुटला तोही मग. थोड्यावेळात ते आठही जणं धारातीर्थी पडले. अफगाण सेनापतीला त्यांचे ते शौर्य बघून अजब वाटले. त्यात तो वीर योद्धा नसावा, असं त्याला मनोमन वाटत होते. आता उरलेलं सैन्य किल्याकडे निघालं. 

        पण कोणालाही पुढे जाता येईना, कारण युवराज कोणालाच पुढे जाऊ देत नव्हता. अंगात भयानक ताकद आली होती त्याच्या. त्याच्यासमोरही शत्रू सैनिक पटापट मरून पडत होते. युवराजचे शरीर सुद्धा खूप जखमी झालं होतं. दुपारपासून धरून राहिलेल्या पावसाने आता सुरुवात केली होती. पाऊस पडू लागल्याने अफगाण सैन्य जरासे बिथरले. तरी लढण्याचे आदेश चालूच होते. त्यात थोडीशी उसंत मिळाली युवराजला. हातातली ढाल त्याने छातीला लावली. तलवार पकडून, पकडून त्याच्या दोन्ही हातातून रक्त येत होतं. आपलाच अंगरखा फाडला, दोन्ही हातांना गुंडाळला. बाजूलाच पडलेली अजून एक तलवार त्याने उचलली. दोन्ही हातात तलवार घेऊन पुन्हा सज्ज झाला. 

          अफगाण सेनापती हे सगळं दुरूनच पाहत होता. किती शूर योद्धा आहे हा, तो युवराजला बघतच राहिला. पुन्हा एकदा हल्ला झाला. युवराज दोन्ही तालवारींनींशी , एकावेळेस चार जणांसह लढत होता, विचित्र ताकदीनिशी. जणूकाही दहा हत्तीचे बळ घेऊन लढाई करत होता. पावसाचे पाणी, अंगावरच्या जखमांवर पडून ते अधिक झोबंत होते युवराजला. त्यामुळे अधिकच त्वेषाने तो समोरच्यावर वार करत होता. पावसामुळे रक्ताचा नुसता चिखल झाला होता. तेच रक्ताळलेलं पाणी नदीत मिसळत होते, नदीचा रंग लाल करत होते. 

         पावसाचा वेग वाढला तरी विक्रमवीर राजा, न थांबता पश्चिम सीमेला निघाला होता. डोळ्यात युवराज साठी काळजी... राज्य गेलं तरी चालेल, पण युवराज.... मनात वाईट विचार येत होते. अजूनही बरेच अंतर बाकी होतं. इकडे धुवांधार पावसात युवराज अजूनही उभा होता. केवढा मोठा पराक्रम, देवांनी सुद्धा कधी पाहिला नसेल. हे युध्द आता तरी थांबावे असाच त्यांना वाटत असणार हे नक्की. होताच मोठा पराक्रम तो. अफगाण सेनापती चाट पडला. त्याने त्याच्या सैन्याला मागे हटायला सांगितलं. स्वतः पुढे आला आणि युवराजला पाहून म्हणाला, " मै सेनापती , दिलावर खान... तुम्हारी मर्दानगी देखी मैने.... एक उमदा सैनिक हो तुम..... कौन हो तुम.... " ,युवराज तसाच दोन्ही तलवारी हातात घेऊन उभा त्याच्यासमोर , थकलेला तरी युद्धासाठी सज्ज ... " मी.... या राज्याच्या महान राजा, विक्रमवीर राजाचा मुलगा.... युवराज... " ,"हम्म... तो तुम युवराज हो.. देखो, तुम ने बडी हिंमत के साथ युध्द किया, तुम्हारे साथीयोने भी जी जानसे लढाई कि, पर अब तुम अकेले रह गये हो..... तुम्हारे युध्द कौशल्य से मे बहुत प्रसन्न हूं.... मैं तुम्हे जिंदा छोड देता हूं.... अभी लढाई करने का कोई मतलब नहीं युवराज.... " त्यावर युवराज हसला. " माझ्या अंगात जोपर्यंत प्राण असतील तोपर्यंत मी उभा राहणार तुमच्या समोर..... घाबरला असाल तर तुम्हीच मागे जा... मी तुम्हाला जिवंत सोडीन.... " 

          त्याचं ते उत्तर ऐकून सेनापती संतापला. " देखता हूं.... अब कितना जोर बाकी हैं तुम मे... " म्हणत सेनापती त्याच्या अंगावर धावून गेला. युवराज तयारच होता. सेनापती जेवढ्या जोरात प्रहार करेल, तेवढ्या ताकदीने युवराज तो प्रहार परतवून लावत होता. दोघांमध्ये भीषण युध्द सुरु झालं. कोणीच मागे हटत नव्हतं. अशातच एक वार युवराजच्या डाव्या हातावर झाला, पाठोपाठ मांडीवर. क्षणभरासाठी युवराज खाली बसला. सेनापतीला वाटलं आता युध्द संपलं म्हणून. इतक्यात युवराज उभा राहिला. आता तर सेनापती अधिकच चवताळला. एका पाठोपाठ एक असे तलवारीचे वार करू लागला. पावसाचा वेग प्रचंड वाढला होता. वर विजा एकमेकांवर आढळत होत्या. आणि खाली हे दोघे. 

         एका क्षणाला , सेनापतीचा वार चुकवून युवराजने त्याच्या पाठीवर वार केला. तसं त्याचं चिलखत खाली गळून पडलं. चिलखताशिवाय कसं लढणार ना, तरीही तो प्रहार करतच राहिला. दुसऱ्याक्षणी, युवराजने चलाखी करत त्याची तलवार लांब उडवून दिली. तसं बघायला गेलं तर युवराज त्याला तिथेच मारू शकत होता. तरीसुद्धा युद्धकला शिकताना युवराज," निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करू नये " हे शिकला होता. युवराज बोलला,"सेनापती, तुम्ही आता निशस्त्र आहेत... मी हल्ला करू शकत नाही... तुम्ही जिवंत जाऊ शकता... " त्यावर तो अफगाणी सेनापती बोलला," तलवार नही तो क्या.... मेरे हात तो हैं ना... " युवराजला कळलं होतं कि तो मल्लयुध्दाचे आव्वाहन देत होता. तसं युवराजने स्वतःच्या अंगावरचे चिलखत, ढाल काढून बाजूला ठेवली. आणि मल्लयुद्धासाठी सज्ज झाला. 

        अश्याप्रकारे, पुन्हा एकदा युध्द सुरु झालं. वेगळंच युद्ध, ठोश्यांवर ठोशे पडत होते शरीरावर, दोघांच्याही. एकमेकांना नुसते मारत होते दोघे. त्या लाल चिखलात अगदी माखलेले होते दोघे. एकदा युवराज त्याच्यावर भारी पडत होता, तर दुसऱ्या क्षणाला, सेनापती दिलावर खान.... दोघेही थकलेले तरी मागे हटायला कोणीच तयार होईना. अश्यातच सेनापतीचा एक ठोसा युवराजच्या खांदयावर बसला, जिथे आधी त्याला भाला लागला होता तिथे. कळवळला युवराज. खांदा पकडून जरासा मागे हटला. ते सेनापतीच्या नजरेतून सुटलं नाही. वारंवार तो युवराजच्या त्याचं ठिकाणी मारू लागला, युवराज कितीही वाचायचा प्रयन्त करत असला तरीही. आधीच खूप रक्त गेलं होतं तिथून. त्यात हे सगळं. वेदना असह्य होऊन युवराज खाली कोसळला, लाल चिखलात. 

            विक्रमवीर राजा, त्याच्या घोडदळासह कधीचा निघाला होता. पावसाचा व्यत्यय आला म्हणून त्यांचा वेग मंदावला तरी न थांबता ते धावत होते. थोडेसे अंतर बाकी होते आता. युवराजचे काय झालं असेल, या विचारातच राजा होता. अफगाणी सेनापती दिलावर खान आता, गुडघ्यांवर बसला होता. थकलेला.... युवराजची ताकद त्याने अनुभवली होती. खाली पडलेल्या युवराजकडे तो पाहत होता. युध्द संपले म्हणून तो उभा राहिला आणि आपल्या सैन्याकडे येऊ लागला. तर मागून एक आवाज आला." मी अजून जिवंत आहे. " मागे वळून बघितले असता युवराज त्याचा खांदा पकडून उभा राहत होता. काय ताकद आहे या मुलात, सेनापती मनोमन म्हणाला. युध्दाचा पवित्रा घेऊन युवराज ,सेनापतीला मल्लयुध्द करण्यासाठी खुणावू लागला. सेनापती पुन्हा त्याला मारायला धावतच त्याच्या अंगावर गेला. मल्लयुध्दाला पुन्हा सुरुवात. जेवढी शक्ती बाकी होती, तेवढ्या ताकदीने युवराज सेनापतीला मारू लागला. एक ठोसा एवढ्या ताकदीने लगावला कि दिलावर खान खाली पडला. तसंच जाऊन युवराजने त्याच्या मानेभोवती हाताने घट्ट पकड केली. अशी पकड जी अजूनतरी कोणाला सोडवता आली नव्हती. सेनापतीचा श्वास कोंडू लागला. धडपड सुरु झाली त्याची. युवराज जिंकणार असं वाटत असतानाच सेनापतीने उलट्या हाताने युवराजचा खांदा जोरात दाबून धरला. त्याबरोबर पुन्हा वेदना सुरु झाल्या. त्याची पकड हळूहळू सुटू झाली. हेच पाहिजे होतं त्याला. तसंच तो युवराजचा हात पकडून गर्रकन वळला तसा " काड "  असा जोरात आवाज आला. युवराज जोरात ओरडला आणि खाली पडला. खांद्यांपासून हात निखळला होता त्याचा, खांद्याची हाडे तुटण्याचा आवाज होता तो.

           अफगाणी सैन्य ते युद्ध पाहत होते. काहींचे डोळे तर युवराज साठीच वाहत होते.... असं ते भयानक युध्द सुरु होते. युवराज तिसऱ्यांदा खाली पडला होता. काहीवेळ असाच गेला. युवराज पुन्हा उभा राहिला. निदान वडील येईपर्यंत तरी आपल्याला उभं राहावे लागेल. एका हातानिशी कसं युध्द करणार, तरी तो उभा राहिला. तुटलेल्या हातातून प्रचंड वेदना, त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. सेनापती दिलावर खान, त्यालाही आता वाईट वाटत होतं. परंतु त्याने जर असं केलं नसतं तर तो मृत्युमुखी पडला असता. युवराजला लवकरात लवकर बाजूला करून आपल्याला पुढे जायला हवं म्हणून त्याने युवराजकडे पाहत म्हटले. " बेटे... अब बस हो गया.. मुझे तुम्हे मारना नहीं हैं.... तुम अभीभी अपने पिताजी कि पास जा सकते हो... " , वेदना लपवत युवराज म्हणाला," ते तर मी जाणारच आहे.... पण तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही... असेल हिंमत तर करा आक्रमण... " 

          नाईलाजाने, सेनापतीने त्याला जोरात धक्का दिला. त्याच्या छातीवर वार केला, हृदयाजवळ. जरासा मागे झाला युवराज, तरीही उभा होता. अजून एक जोरदार लाथ त्याच्या घुडघ्यावर बसली. यावेळेस त्याचा पाय निकामी झाला. काय युवराजची शरीरयष्टी होती, पिळदार शरीर, तसंच धिप्पाड अंग. पण सकाळपासून युध्द करून ते शरीर आता थकलं होतं. चौथ्यांदा पडला होता युवराज. आता उभं राहण्याची शक्ती त्यात नव्हती. डोळे मिटत आलेले त्याचे... कदाचित त्याचा आत्माही निघून जात असावा. एक पाय आणि एक हात निकामी. तरी वडील अजून आले नाहीत, या विचाराने डोळे त्याने मिटू दिले नाहीत. एका हाताने सावरत तो पुन्हा उठला. कसाबसा घुडग्यावर बसला. दिलावर खानच्या डोळ्यात पाणी आलं. किती ती निष्ठा आपल्या राज्यांवर, आपल्या जनतेसाठी. मोठा राजा होऊ शकला असता युवराज. आपल्या सैन्यासमोर निभाव लागणार नाही तरीही झुंज देतो आहे. त्याला रडू आलं. हे युध्द आता संपायला हवं आणि युवराजला मुक्त करायला हवं, असं सेनापतीने ठरवलं. एव्हाना युवराज कसातरी उभा राहिला होता. 

          अफगाणी सेनापती पुढे आला. त्याने युवराजच्या पोटात ठोसे मारले. तोल जात होता तरी कसाबसा युवराज उभा होता. दिलवारने पुन्हा त्याच्या छातीवर प्रहार केला. युवराज कळवळला. पुन्हा एकदा तिथेच... युवराज अडखळत मागे गेला.... तोंडातून रक्त येऊ लागलं . छातीवर हात ठेवला त्याने. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोळे मिटू लागले.. दिलावर खान ते बघत होता. युवराज समोर रडू लागला तो. युवराजने ते पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं .कदाचित शेवटचं. छातीवरचा हात त्याने बाजूला काढला. दिलावर खानने पुन्हा एकदा त्याच्या हृदयाजवळ , पूर्ण ताकदीनिशी प्रहार केला. युवराज खाली पडला, बहुदा शेवटचा. कधीही न उठण्यासाठी. सेनापती दिलावर खान, एवढा मोठा, धिप्पाड माणूस.... लहान मुलासारखा रडत होता. युवराज निपचित पडला होता.

           संध्याकाळ होत होती. पावसाचा जोर ओसरला तरी अजून रिमझिम चालू होती. थोड्याचवेळात, विक्रमवीर राजा, त्याच्या सैन्यासह पश्चिम दिशेला पोहोचला. समोर बघतो तर प्रेतांचा खच. त्यात सगळीकडे लाल रंगाचे पाणी, चिखल. आणि किल्ल्यानजीक चिखलात पडलेला युवराज. युध्द नियमाप्रमाणे, सूर्यास्त होताच युध्द थांबवायचे असते. त्यामुळे आता कोणताच हल्ला होणार नव्हता. विक्रमवीर राजा तसाच घोड्यावरून उतरला आणि युवराज शेजारी जाऊन बसला. अफगाण सेनापती दिलावर खान अजून निपचित पडलेल्या युवराजकडे पाहत होता. विक्रमवीर युवराजच्या डोक्यावरून हात फिरवत होता. भावनाशून्य नजरेने तो बघत होता. दिलावर खान उभा राहिला, " आपका युवराज... सच मै एक बडा योद्धा था... ऐसा योद्धा मैने आजतक कही नहि देखा... अपने राज्य के लिये ऐसा बलिदान फिरसे नहि होगा.... मै सेनापती दिलावर खान.... ये प्रतिज्ञा लेता हूं कि ये राज्य युवराज का था और उसका ही रहेगा... फिरसे कभीभी मै एसपर आक्रमण नही करुंगा... ये वादा रहा. " असं म्हणत तो निघून गेला. विक्रमवीर राजा त्याच्या सैन्यासह तिथेच बसून राहिला. सेनापती बोलल्याप्रमाणे आपले सैन्य मागे घेऊन गेला. त्याशिवाय भविष्यात पुन्हा कधी आक्रमणही केले नाही. 


        असं म्हणतात कि जिंकणारेच शेवटी इतिहास लिहितात किंवा रचतात. युद्धात हरलेल्यांना तो हक्क नसतो किंवा ते इतिहास रचण्यासाठी जिवंतच राहत नसावेत. त्यामुळेच कदाचित युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही युद्धगाथा लिहिली नसावी. युवराजने त्याच्या ४९ सहकाऱ्यांसमवेत, युध्दाचा कोणताच अनुभव नसताना, २ ते ३ हजार शत्रू सैन्यासमोर उभं राहून ती झुंज दिली होती. झुंज अपयशी होऊन देखील त्यांनी राज्यावर आलेलं आक्रमण थोपवून ठेवलंच नाही तर शत्रूला त्यापासून दूर राहण्यास भाग पाडलं. काळाच्या ओघात, युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांची नावे विसरली गेली, हवेत विरून गेली. लक्षात राहिली ती एका राजपुत्राने एकाकी दिलेली झुंज .....देहात प्राण असेपर्यंत दिलेली झुंज..... मरण समोर असतानाही मरणालाही लाजवेल अशी दिलेली झुंज..... फक्त " झुंज "...... 

------------------------------------------- The End ---------------------------------------



Followers