" तुम्ही कधी पाऊस बघितला आहे का ? " या प्रश्नावर सौरभ जरा विचार करू लागला. आपण त्या बसमध्ये होतो. तेव्हा माझ्या पुढच्या सीटवर बसलेले .... असेच काही बरळत होते.
" हा काय प्रश्न आहे .. " रचना बोलली.
" इथे ... या जागी जरी नवीन असलो तरी याआधी पावसात खूप वेळा भिजली आहे. पाऊस आवडतो मला. हा सौरभ , यालाही अनुभव आहे पावसाचा. त्यामुळे पाऊस पाहिला आहे , हा प्रश्न चुकीचा आहे. " रचना भरभर बोलली.
" पाऊस पाहणे आणि बघणे यात खूप फरक आहे. ते मी नंतर सांगतो. पण आता .... तुम्हाला भिजायचे नसेल आणि सर .... तुम्हाला कॅमेरा पुढे , भविष्यात वापरायचा असेल तर .... तुम्हाला आडोशाला जावे लागेल ... आत्ताच. !! "
" पावसाचे ज्ञान घेऊन आला आहात का तुम्ही... " सौरभ मुद्दाम बोलला.
" ठीक आहे .... no problem !! " असं म्हणत तो निघाला. सौरभला स्वतःच्या बोलण्याचा अभिमान वाटला. रचनाला मात्र त्याचा चढलेला आवाज आवडला नाही. सौरभला काही बोलली नाही कारण तिला निसर्गात आणखी काही काळ रमायचे होते. पुढे दोनच मिनिटे झाली असतील. थंडगार वारा वाहू लागला. वातावरणात झालेला बदल दोघांनी अनुभवला. हळूहळू आभाळातले रंग काळपट होऊ लागले. हि नक्कीच पावसाची लक्षणे असावीत असे रचनाला वाटले.
" सौरभ .. चल लवकर .... तो बरोबर बोलत होता.. पाऊस येतो आहे , कुठे गेला तो ... " रचनाने मागे पाहिले. तो आपल्याच धुंदीत पुढे चालत होता. सौरभ - रचना पळत पळत त्याच्या मागे गेले.
" Excuse me सर .... थांबा ... थांबा ... आम्हाला तुमच्या सोबत घ्या..... " रचनाचा आवाज ऐकून तो थांबला. दोघांकडे नजर टाकली.
" चला मग ... इथे थांबू नका. "
" कुठे जायचे. " सौरभने विचारलं.
" माझा टेन्ट आहे... त्यात तुम्ही तिघे बसू शकता .. माझी बायको आणि तुम्ही दोघे... मी बाहेर थांबतो . "
" आमच्याकडे टेन्ट आहे. " सौरभ बोलला.
" Very good !! चला भरभर. tent उभा करू , पाऊस येण्याआधी. " तिघेही चालत चालत त्यांच्या तंबू जवळ आले. सौरभने त्याच्या सॅकमधून तंबू बाहेर काढला. त्याच्या तंबू पासून जरा लांब त्याने तंबू उभा करायला सुरुवात केली.
" तुम्हाला किती वेळ लागतो ..... टेन्ट उभा करायला... सराव आहे का त्याचा. " या दोघांचा वेग बघून त्याने विचारलं.
" अर्धा तास ... आम्ही निघायच्या आधी खूप प्रॅक्टिस केली आहे. ३० मिनिटात टेन्ट उभा राहतो , असे त्या पुस्तकात सुद्धा दिले आहे. " सौरभने लगेच तंबू कसा उभा करायचा , त्याचे पुस्तक त्याच्या समोर धरले.
" इतका वेळ नाही. " म्हणत त्याने पुढाकार घेऊन तंबू उभा करायला घेतला. त्याने एकट्याने अगदी १० मिनिटात तंबू उभा केला. हे दोघे अवाक झाले.
" काय कमाल स्पीड आहे तुमचा. मानलं पाहिजे ... " रचना म्हणाली. बोलता बोलता पावसाचे काही टपोरे , थंडगार थेंब तिच्या हातावर पडले. " पाऊस गेला कि भेटू ... " असे म्हणत सर्व तंबूत विराजमान झाले.
" आपण काय असे टेन्ट मध्ये बसण्यासाठी आलो आहोत का.. फिरायला म्हणून बाहेर आलो ना... " सौरभ रचनाकडे पाहत बोलला.
" हो .... पाऊस आला म्हणून आत आलो ना... " रचना
" तरी .... पाऊस गेला असेल आता. चल बाहेर जाऊ. " सौरभ पुन्हा बोलला.
" अरे बाळा... थांबशील का जरा... बाहेर एवढा पावसाचा आवाज येतो आहे.... त्या वाऱ्याने टेन्ट किती हलतो आहे बघ. म्हणे पाऊस गेला असेल. ते सर बोलले ना ... पाऊस गेला कि सांगतो , येतील सांगायला. "
" त्याचे का ऐकायचे आपण. आपण दोघांनी भटकंती करायचे ठरले आहे ना ... मग तो कशाला...त्याचे मत तरी कश्यासाठी... "
" शू !! एकदम चूप ... " रचना भडकली.
" किती बडबड .... श्वास तरी घे.... तो माणूस नसता तर आता आपण भिजत असतो. समजलं ना ... जरा स्वतःचा स्वभाव बदल.... आणि इतरांसाठी जी वाक्य तुझ्या तोंडातून बाहेर येतात ना .... विचार करून बोलत जा.. राहिला प्रश्न भटकंतीचा... तर ती करायची आहे. आता आराम करू , पाऊस थांबला कि पुढचा विचार करू. " म्हणत रचना तंबूत झोपली. सौरभ चुपचाप तिच्या शेजारी झोपला. सकाळची अपूर्ण झोप , त्यानंतर एवढी चढाई... दोघांना लगेचच गाढ झोप लागली.
" हॅलो .... या बाहेर.... पाऊस थांबला आहे , हॅलो !! " तंबूच्या बाहेरून कोणी आवाज देते आहे असे रचनाला वाटले. डोळे चोळत रचना जागी झाली. लगेच तिने सौरभला जागे केले. तंबू बाहेर आली. सौरभ बाहेर आला. बाहेरचे वातावरण कमालीचे थंड झालेले. समोर धुके असल्याचा भास होत होता. रचना त्याच धुंदीत पुढे चालत गेली. सौरभ तिच्या मागोमाग. मंद वारा वाहत होता. थंडगार !! रचनाच्या अंगावर शहारा आला. सौरभने घड्याळात पाहिले. संध्याकाळचे ६:३० वाजले होते.
" Oh My God! इतका वेळ झोपलो आपण ... रचना .... निघायला हवे आता. " तिनेही घड्याळात पाहिले.
" हो रे ... खूपच उशीर झाला. एव्हाना आपण पुढच्या वाटेवर असायला हवे होते ... " रचना बोलली आणि त्यांच्या तंबू जवळ गेली. सौरभ तिला बघत होता. रचना तंबू जवळ जाऊन थांबली.
तिला तसे उभे बघून सौरभ तिच्यापाशी आला. " काय झालं... "
" निघायचे आहे .... पण जायचे कुठे. पुढचे काही ठरवले नाही मी. " सौरभ - रचना विचारात. " तो " या दोघांजवळ आला.
" Hi ..... तुम्हाला काही हरकत नसेल तर मी काही बोलू का... " रचनाने मानेने होकार दिला. " आता कुठेही निघायचे ठरवू नका. आजची रात्र इथे काढा. पहाट झाली कि निघा. "
" आणि असे का करावे आम्ही... " सौरभचा उर्मट प्रश्न, रचनाने सौरभला चिमटा काढला.
" तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतो. आता समोर ही बघू शकता ... धुके पडायला सुरुवात होईल. त्यात तुम्हाला वाटा माहित नाहीत . रात्रीचा प्रवास नेहमीच धोकादायक. असे वातावरण असले कि हरवणे सोप्पे होऊन जाते. त्यासाठी बोललो कि आजची रात्र इथे थांबा , आम्ही आहोत सोबतीला. " रचनाला त्याचे बोलणे पटले. तोपर्यत त्याच्या तंबू मधून एक मुलगी बाहेर आली.
" ये...ये.. तुझी ओळख करून देतो. हि माझी ट्रॅव्हल पार्टनर .... माझी बायको... " सौरभ - रचनाने तिला " Hi " केले.
" तुम्ही याला कुठे शोधले. " तिने पहिला प्रश्न केला. रचना - सौरभ दोघेही confused.
" हा माणूस सापडत नाही कोणाला.. मुळात तो माणसात नसतोच. हा .... पण पावसात भेटतो... देवासारखा... " त्याची बायको काय बोलली ते या दोघांना कळेना. थोडावेळ " confused " मध्ये गेल्यावर रचना बोलली.
" आम्ही थांबतो. एक प्रश्न आहे. " ,
" कोणता ",
" काळोखात कसे राहणार ... आम्हा दोघांना सापाची भीती वाटते... सकाळी येताना मोठा साप दिसला होता.... काळोखात तर टेन्टमध्ये आला तर... आता ७ वाजत आहेत , सकाळी ६-७ वाजता निघायचे ठरवले तरी अजून १२ तास आहेत. ",
" त्याचे टेन्शन नका घेऊ.. जा गं .. घेऊन ये ... " त्याची बायको भरभर तिच्या टेन्ट कडे गेली.
" चला "
" कुठे जायचे "
" कुठे नाही.... शेकोटी पेटवतो आहे ... थंडी वाजेल , त्यासाठी. "
या दोघांच्या तंबू पासून थोडे दूर शेकोटी पेटवली होती. त्याच्या बायकोने लगेचच आगीवर चहा बनवला. थंड वातावरण , काळोख आणि बोचरा वारा.... गरमागरम चहाने अंगात थोडी गर्मी निर्माण झाली. " चहासाठी thanks .... मानले पाहिजे तुम्हाला ... पट्कन चहा सुद्धा बनवला तुम्ही... " रचनाने आभार मानले.
" welcome !! मला सवय आहे.... असे थंड वातावरण असले कि काही गरम मिळेल तर छानच असते ना " तिने हसून रिप्लाय दिला.
" आणि तुम्ही मघाशी सापाबद्दल बोललात... असतात साप , त्यांना कोणीही घाबरू शकतो.. साहजिक आहे ते. निसर्गाचे नियम त्यांनाही लागू पडतात. साप असो वा कोणताही इतर प्राणी ... त्यांचे नियम असतात. आपल्या पेक्षा आकाराने मोठ्या प्राण्यावर कोणताही प्राणी कधीच स्वतःहून हल्ला करत नाही. किंबहुना प्राणी उगाचच कोणाच्या वाटेला जात नाहीत. त्याच्यावर कोणी हल्ला केला तरच ते प्रतिकार करतात..... माणूस प्राणीच बाकीच्या प्राण्यांना त्रास देत असतो ... नाही का ....घाबरू नका ... सापांना कळते कुठे जायचे , कुठे नाही... आणि टेन्ट बंद आहे सर्व बाजूनी ... आत येणार नाहीत. " त्याने आपले मत मांडले.
" हो ते तर आहे... " सौरभला पटले.
" By the Way , मी रचना आणि हा माझा होणार नवरा .... सौरभ " रचनाने ओळख करून दिली.
" wow .... लग्नाआधी असे फिरायला बाहेर पडलात ... छानच ... कल्पना आवडली मला. माझे नाव सुप्रिया... पण हा मला सुप्री असे हाक मारतो. तेच जवळचे वाटते. " सुप्री बोलली.
" आणि यांचे नाव ?? " सौरभने विचारलं.
तसे ते दोघे एकमेकांकडे बघू लागले. " म्हणजे नाव काही विचित्र आहे का ... नावच तर विचारलं. इतका वेळ काय उत्तर देयाला. " सौरभ सुप्रीकडे पाहत बोलला.
सुप्रीला हसू आलं.
" त्याला अनेक नावे आहेत. त्याला जी जी माणसे भेटतात ना , प्रत्येक जण आपापल्या परीने त्याच नाव ठरवतो. मीच त्याला २-३ नावाने हाक मारते. त्यातले कोणे नाव सांगावे हा विचार करत होते. " सुप्री बोलली.
" काय वैताग आहे. " सौरभ मनातल्या मनात बोलला.
" How sweet!! " रचना बोलली. " मग तुम्हाला जे नाव आवडते ते सांगा. "
" मला ना , माझी आणि त्याची पहिली भेट झाली , तेव्हा याने जे नाव सांगितले होते, ते खूप आवडते. तेव्हा हा खूपच खडूस होता .... कुचकी माणसे .... तेव्हा नाव विचारलं तर तेच सांगितले होते ..... मिस्टर A " सुप्री बोलली आणि आकाशला ही हसू आलं. तो तरी कधी कोणाला त्याचे खरे नाव सांगायचा.
" चालेल... मीही त्यांना मिस्टर A म्हणू शकते ना... if you don't mind "
" त्यालाच विचारा .... " सुप्री आकाशकडे पाहत म्हणाली.
" मिस्टर A ......... चालेल मला .... आणि प्लिज .. एकेरी बोलू शकता , आम्ही दोघे काय म्हातारे दिसतो का तुम्हाला... एकेरी बोला. " आकाश.
" आणि तुम्ही हि , एकेरी बोलू शकता. " रचनाचे बोलणे ऐकून सौरभ सोडून बाकी सर्व हसले. तो आधीच वैतागलेला.
" तुम्ही जास्त हसत नाही का ... " आकाश सौरभकडे बघत बोलला.
" हसतो.. पण उगाचच हसायचे का... " सौरभ.
" असो ... उगाचच हसले तरी चालते. आयुष्य वाढते असे म्हणतात. " सुप्री लगेच बोलली. सौरभने एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकला.
" तुम्ही टेन्ट वगैरे घेऊन आलात. म्हणजे कुठून लांबून आला आहात का... " रचनाने सौरभला राग आलेला पाहून विषय बदलला.
" आमचे हेच घर ... जीना यहाँ मरना यहाँ..... इसके सिवा जाना कहाँ ... " सुप्री बोलली.
" गप गं ... हि ना ... लहानपणी डोक्यावर पडलेली.... म्हणून असे काही पण बडबडत असते... " आकाशने सुप्रीला गप्प केले.
" एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवायचे ना मग " सौरभ अजूनही रागात.
" असो ... तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. आम्ही सारखे भटकत असतो. आमचा बराचसा वेळ टेन्ट मध्ये जातो. " आकाश.
" असं आहे तर ... म्हणूनच १० मिनिटात टेन्ट उभा केलात तुम्ही .... व्वा !! " रचना बोलली. सौरभला अजून काही प्रश्न.
" घरी जाता कि नाही ... घर तरी आहे का ... आणि जॉब वगैरे आहे का .... कि नुसते भटकत राहायचे. " सौरभच्या प्रश्नावर आकाश उत्तर देणार तर सुप्री लगेच बोलली.
" याला ना .... , घरच्यांनी टाकून दिले आहे. वैतागलेले..., पुढे माझ्या सोबत लग्न झाले. मग मलाही टाकून दिले. " सुप्रीच्या बोलण्यावर रचनाला किती हसू आलं. आकाश देखील हसू लागला. सौरभने डोक्याला हात लावला.
" सॉरी हा .... हि येडपट काहीही बोलते. आमचा फ्लॅट आहे , मुंबईत. आणि माझा हा जॉब आहे , त्यासाठी मी भटकत असतो. " आकाशने हसू आवरत उत्तर दिले.
" असा कोणता जॉब आहे ... फिरायचे पैसे देतात. " रचनाला आश्चर्य वाटलं.
" साहेब फोटोग्राफर आहेत. " सुप्री बोलली. रचना काही क्षणासाठी आकाशकडे बघत राहिली. हा तो नसावा , असे तिच्या मनात आले. काही आठवलं तिला , तशी " आलेच " असे म्हणत तिच्या तंबूकडे निघून गेली. ५ मिनिटात काही घेऊन आली.
हातात ते मॅगजीन होते. रचनाने ते शेकोटी समोर धरले. " काय झालं " सौरभने विचारलं.
" सकाळी हातातून जमिनीवर पडले ते. ओल्या गवतावर खूप वेळ पडून होते. भिजले. आता सुकवते आहे. उपयोगी पडेल. " रचना मॅगजीन सुकवत होती. सुप्रीने ते मॅगजीन पाहिले.. हसू आलं तिला. आकाशचे फोटो यातच तर असतात.
" का हसलीस ... " रचनाला प्रश्न पडला.
" ते मॅगजीन कशाला सुकवता.. दुसरे मिळेल कि... "
" नाही... माझे सर्वात आवडते मॅगजीन आहे हे... यांचे सर्वात पहिले घेतले मॅगजीन आहे, ते फोटो बघून तर प्रेमात पडले... " रचना.
" कोणाच्या " ... सुप्री
" निसर्गाच्या ... आणखी कोणाच्या ... " रचना हसत म्हणाली.
" मला वाटले.. " सुप्रीचे वाक्य तोडत रचना बोलली.
" कि फोटोग्राफरच्या प्रेमात ... असेच म्हणायचे आहे ना तुला... प्रेम तर आहे , हे सौरभला सुद्धा सांगितले आहे मी... प्रेम आहे ते वेगळ्या प्रकारचे. कधीच न बघितलेल्या व्यक्तीवर प्रेम होऊ शकते.... त्याची कधी भेट व्हावी असे ही नाही... तशी अपेक्षा नाहीच आहे, त्याने क्लिक केलेल्या प्रत्येक फोटोवर प्रेम आहे, प्रेम करण्यासारखेच त्याचे फोटो असतात... मनात भरून राहतात. ते बघून तर इथे आले. आणि यांनी ... मिस्टर A सरांनी ... दाखवले कि निसर्गसौंदर्य ... " रचना भरभरून बोलत होती.
" स्वतः आली आणि मलाही जबरदस्ती घेऊन आली. " सौरभ पुटपुटला.
" हे फोटो ना फसवे असतात .. " आकाश बोलला.
" सकाळचा डायलॉग आहे हा ... फसवे असतात ते कसे ... explain करून सांगितले तर बर होईल .. " सौरभ.
" निसर्ग बदलत असतो. निसर्गाचा नियम आहे तो. जस आज , आत्ता दिसते.... तसेच उद्या , परवा .... दोन दिवसानी किंवा महिन्यानी ... जसेच्या तसे असेल , असे नसते. बदल होत असतात आणि झालेच पाहिजे. चांगले बदल. निसर्ग जसा बदलतो तसे माणसाने हि बदल करावेत. जागा बदलावी. सर्वात महत्वाचे... स्वभाव बदलावा. " आकाश सौरभकडे पाहत म्हणाला. सौरभला कळलं तो आपल्याबद्दल बोलतो आहे.
" तुम्ही दोघेही नवखे आहात अश्या प्रवासाला .. मग एक दिवसासाठी टेन्ट घेतला .. जरा नवल वाटते ना .. " आकाशने छान प्रश्न केला.
" हा सौरभ कॅनडात राहतो. आमचे लग्न झाले कि आम्ही कायमचे तिथे राहायला जाणार. मला निसर्गाचे फोटो बघायला खूपच आवडते... आता वेळ आहे तर विचार केला ... जाऊ भटकंतीला... आजच पहिला दिवस , तुम्ही भेटला म्हणून नाहीतर हरवलो असतो. " रचनाने उत्तर दिले.
" छानच कि .... मग इथून पुढे कुठे जाणार.. " सुप्री खूप वेळाने बोलली.
" तेच माहित नाही... राजमाची जवळ होती... म्हणून इथे येण्याचे ठरवले. " सौरभ बोलला. " एकटीच निघाली होती. मला तर काहीच माहित नाही. हरवली असती तर , त्यासाठी मला सोबत आणले. आता सकाळी बहुदा घरीच जावे लागेल असे वाटते. माझे पाय तर किती दुखत आहेत. "
" चूप ... मी जाणार नाही घरी... " रचना सौरभला चिमटा काढत म्हणाली.
" एक विचारू का मिस्टर A .. तुम्ही भटकत असता ना ... आम्हाला पुढे कुठे जायचे ते सांगता का .... " रचना बोलली.
" तशी खूप ठिकाणे आहेत. मी सांगीन , पण तुम्हाला समजली पाहिजेत. त्या वाटा , पायवाटा ... तिथून वाट चुकलात तर.. आणि पुन्हा सांगतो , ते फोटो बघून तर अजिबात प्रवास करू नका. जितके सुंदर , मनोहर .... तितकेच फसवे आणि खडतर प्रवास असतो. " आकाशचे बोलणे ऐकून दोघांना टेन्शन आले.
" जरा घड्याळात बघा कि कोणी तरी ... झोपायचे नाही का ... " सुप्री बोलली.
" हो हो ... मला तर कधी पासून झोप आली आहे. " सौरभ बोलला. रचना कसला तरी विचार करत होती.
" चल .... झोपायचे नाही का... " सौरभ उभा राहत म्हणाला.
" आम्हालाही सकाळी निघायचे आहे , मुंबईच्या वाटेने जाणार. तुम्हाला निघताना जागे करतो. शहरात परत जायचे असेल तर एकत्र निघू. आता आराम करा ... Good night !! " आकाशने शेकोटी विझवली. दोन्ही जोडपी आपापल्या तंबूत आली.
" कसले छान कपल आहे ना... सौरभ जरा तिरकस वाटतो. रचना छानच आहे बोलायला. " सुप्री आकाशला म्हणाली.
" त्याचा स्थायी स्वभाव आहे तो ... तो तसाच बोलणार... समोरच्या व्यक्तीने समजून घेणे महत्वाचे , रचना तेच करते. बरं .. झोपा मॅडम आता ... उद्या घरी निघायचे आहे .. " आकाश सुप्रीला बोलला . दोघे निद्राधीन झाले. तिकडे रचना जागीच होती.
" काय गं ... झोप येतं नाही का ... " सौरभने विचारलं.
"ह्म्म्म ... डोक्यात विचार सुरु आहेत. "
" कसले विचार ... "
" झोप तू ... मीही झोपते ... Good night " रचनाने कूस बदलली , सौरभ पाचच मिनिटात झोपी गेला. रचना मात्र जागी होती.
सकाळी ६ वाजता आकाशने बाहेरून आवाज दिला. तेव्हा रचना जागी झाली. सौरभ गाढ झोपेत. रचना बाहेर आली. " Good morning " रचना आकाशला बघून बोलली.
" शुभ प्रभात !! तुमचा जोडीदार उठला नाही वाटते अजून. झोपू द्या त्याला , आम्ही निघतो आहे म्हणून जागे केले तुम्हाला. "
" आता लगेच निघालात का.. " रचनाने विचारलं.
" नाही , अजून सामान आवरायचे आहे. १५ -२० मिनिटे आहोत अजून. "
" ok ... " रचनाने smile दिली. आकाश त्याच्या तंबू कडे गेला आणि रचना सौरभला जागे करायला तंबूत शिरली.
" झोपू दे गं .... १० मिनिट ... ५ मिनिट.. "
" आता उठतोस कि पाणी टाकू .... " रचना बोलली तसा सौरभ पटकन उठून बसला.
" ५ मिनिट झोपलो असतो तर ... नाहीतर घरीच जायचे आहे ना .. "
" कोण बोलले तुला ... पटापट सामान आवरायला घे.. "
" कशाला ... "
" मी सांगते आहे म्हणून .. " सौरभ काय करणार ... जांभई देत सामान आवरायला लागला. १० - १५ मिनिटात सामान भरून झाले. रचना लगेचच तंबू बाहेर आली. आकाश - सुप्री निघायची तयारी करत होते.
" मिस्टर A सर ... " रचनाने हाक मारली . " जरा टेन्ट कसा आवरायचा ते दखवता का एकदा.. "
" हा ... दाखवून ठेवतो , पुढे तुम्हाला उपयोगी पडेल " आकाशने लगेच तंबू कसा उघडायचा त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तो घडी घालून सॅकमध्ये भरून दिला. निघायची तयारी झाली.
" चला ... आम्ही निघतो. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा !! " आकाशने हसून निरोप दिला.
" आणि सांभाळून जा ... पाऊस आला कि थांबा. थांबला कि पुढे जा .. असा प्रवास केला तर छान होईल प्रवास.. " सुप्रीने माहिती दिली. " Bye " करून आकाश - सुप्री त्यांच्या वाटेने निघाले.
" सर ... सर .... मिस्टर A सर .... " रचनाने हाक मारून थांबवले. आकाश थांबला,
" आणखी काही मदत हवी आहे का ... " आकाश थांबला तशी सुप्री थांबली.
" हो सर .... actually इथून पुढे कुठे जायचे , हे ठरलेच नव्हते. " रचना बोलत होती.
" मग एक काम करू शकतेस ... आधी इथून खाली उतरलात कि ... पुढे सरळ ४० मिनिटे चालल्यावर .... " आकाश बोलत होता तर रचनाने थांबवले.
" सर सर .... थांबा जरा ... मी काही बोलू शकते का ... "
" हा बोल ना ... "
" तुम्ही वाटा , रस्ते सांगाल मला... ते बरोबरच असणार... तुम्हाला इतका दांडगा अनुभव आहे.. तसा मला नाही किंवा या सौरभला तर काहीच माहित नाही. मी माझी कार घेऊन बाहेर निघाले तरी कितीदा रस्ते चुकते म्हणून मी ट्रेनने प्रवास करते. शहरातच इतकी गोंधळून जाते , इथे काय लक्षात राहणार ... "
" बरं ... मग "
" माझी request होती कि तुम्ही आमच्यासोबत प्रवास केलात तर... " रचना हात जोडून उभी होती.
" कसे जमणार .. आम्ही आता घरी निघालो आहे. " आकाशने नकार दिला.
" प्लिज सर ... बघाना.... जमते का .. एकदा का कॅनडात गेली तर पुन्हा इंडियात , महाराष्ट्रात कधी येईन ते माहित नाही. त्यासाठी अशी भटकंती करायचे ठरवले कदाचित शेवटची असेल हि भटकंती माझी ... तुम्हाला तर किती रस्ते , पायवाटा माहीत आहेत ... प्लिज सर .... " रचना आर्जव करू लागली.
" एव्हडं बोलते आहे तर ऐकू ना तिचे... " सुप्री रचनाकडे पाहत बोलली.
" सुप्री ... आपल्याला घरी जायचे आहे... पुन्हा कुठे भटकंती... " आकाश सुप्रीला बोलत होता तर रचना पुन्हा मध्ये बोलली.
" सर ..... प्लिज .... प्लिज .... प्लिज .... प्लिज , चला ना आमच्यासोबत ... आमचा कसलाच त्रास होणार नाही तुम्हाला... .... प्लिज सर ... " रचनाने पुन्हा हात जोडले.
" चल ना .... चल ना .... चल ना .... च .... ल .... ना .... !! " सुप्रीने सुद्धा सुरु केले.
" अरे ... वेडी बिडी झालीस कि काय ..... आपले ठरले आहे ना .... जुलै महिन्यात निघायचे ते ... त्यासाठी आता घरी जावेच लागेल. " आकाश सुप्रीला गप्प करत म्हणाला.
" ती एवढी बोलते आहे तर आताच चल ना .... जुलै महिन्यात जाणार तर आता जाऊ... पाऊस नुकताच सुरु झाला आहे .... चल ना .... एवढा कसला भाव खातोस... " सुप्री आकाशला मस्का लावत बोलली.
" रचना ... त्यांना दुसरी कामे असतील ... आपल्या सारखे सर्व रिकामटेकडे नसतात... " सौरभने टोमणा मारला.
" अरे ते नवीन आहेत ..... एकटे गेले आणि हरवले कुठे ... तर तू येणार आहेस का शोधायला. " सुप्रीने पुन्हा जोर दिला.
" दोघीनी जरा शांत व्हा ... " म्हणत आकाश या तिघांपासून जरा दूर जाऊन उभा राहिला.
" काय झालं .... सर रागावले का .. " रचनाने हळूच सुप्रीला विचारलं.
" नाही नाही ..... काळजी नसावी ... त्याला राग येतच नाही कधी... हि त्याची सवय आहे. काही विचार करायचा असेल ना , तर असा एकटाच जरा दूर जाऊन उभा रहातो ... येईल तो , जरा वाट बघ. " सुप्रीने समजावलं. १० मिनिट आकाश तसाच उभा होता. त्यानंतर तो यांच्याजवळ आला.
" ठीक आहे ... निघूया.... " आकाश असे बोलल्यावर सुप्रीने आकाशला आणि रचनाने सौरभला मिठी मारली.
" १ मिनिट ... १ मिनिट ... मी तुमच्यासोबत यायला तयार आहे ... पण काही अटी आहेत... " आकाशने सुप्रीची मिठी सोडवत म्हटले.
" कोणत्या अटी .. " सौरभचा प्रश्न.
" सर .. तुमच्या सर्व अटी मान्य. " रचना खुशीत होती.
" ऐकून तर घ्या आधी. आपण प्रवासाला निघालो कि तुमच्या दोघांपैकी कोणीच विचारणार नाही , आपण याच वाटेवरून का निघालो आहोत..... आणि प्रवासात किंवा थांबल्यावर जी कामे असतील.... ती मिळून करायची .. चालेल ना .... " आकाशचा प्रश्न.
" कोणती कामे .... मला सवय नाही.. " सौरभ पुढे अजून बोलणार होता तर रचनाने त्याच्या तोंडावर हात ठेवला.
" याचे काही ऐकू नका ... मला मान्य आहे तर तो तयार होणार ... " रचना बोलली.
" अगं पण... " सौरभला बोलूच दिले नाही.
" काही बोलू नकोस... तुला आधीच बोलले होते , मी एकटी जाऊ शकते. आता तू विचार कर ... जाऊ का एकटी सांग .... " सौरभ गप्प.
" चला मग ... निघूया का ... " आकाशने विचारलं.
" चला सर ... " रचना किती आनंदात होती.
" माझ्या मागोमाग चालायचे, बाकी कुठे .... दुसऱ्या वाटेने जायचे नाही. ",
" एस सर ... " रचना हसत म्हणाली. सौरभला हे आवडले नव्हते.
" आणखी एक .... चालता चालता झाडाच्या फांद्या , काड्या दिसल्या कि लगेच बॅगमध्ये भरून घेयाच्या ... शेकोटी साठी उपयोगी पडतात. हि सवय मला आणि सुप्रीला आहे. तुम्हीही मदत करू शकता. " आकाश चालता चालता बोलला.
" तरीच विचार करत होतो... पावसात यांना सुकी लाकडे कुठून मिळतात ... " सौरभ मनातल्या मनात बोलत होता.
" आणि हो ... पायाखाली लक्ष असू द्या, सापावर चुकून पाय पडला तरच तो दंश करतो... नाहीतर त्याची वाट वेगळी आणि आपली वेगळी.... समजलं ना ... "
" एस सर .... " आता रचना सोबत सुप्री ही बोलली आणि दोघीही हसू लागल्या.
" बस ...हे नियम पाळा ... आता मी काही बोलणार नाही.. आजूबाजूचा निसर्ग काय सांगतो ते ऐकण्याचा प्रयन्त करा. "
आकाशचे बोलणे संपले. तेव्हा रचना - सौरभला आजूबाजूच्या शांततेचा आभास झाला. ते चौघेच त्या गवतातून चालत आहेत असे वाटत होते. शहरातल्या ट्राफिक , गडबड - गोंधळाची सवय असलेल्या दोघांना हा अनुभव नवीन होता. त्यात आज सकाळी पावसाचे ढग नव्हते. आजूबाजूने ... तरी दूरवर उडणारे पक्षी आवाज करत उडत होते , त्यांचा अस्पष्ठ आवाज... मधेच दूरवर झाडाच्या पानांची होणारी सळसळ...., वाऱ्याचा कानात भरणारा " सू .... सू .... " असा आवाज. मधेच उनाड वारा , खाली वाढलेल्या गवतातून वेगाने वाहत जात , त्यातून एक वेगळाच असा आवाज निर्माण करत होता.
थोडे पुढे गेल्यावर , गवत आणखी मोठे .... गुडघ्या पर्यंत पोहोचले. बरेच अंतर पार केले , आकाशने या दोघांकडे पाहिले. दोघे चालून थकलेले. " आपण १० मिनिट ब्रेक घेऊ..." आकाश या दोघांना बोलला.
" कशाला ब्रेक ..... मला असा टाईमपास आवडत नाही. " सौरभ घाम फुसत बोलला.
" टाईमपास नाही... तुमचा फिटनेस बघून थांबायचा निर्णय घेतला. नवीन आहात. त्यामुळे दमायला होणार. लगेच कोणी हिमायल पादाक्रांत करू शकत नाही. हळू हळू सुरुवात केली तर प्रवास सोपा होतो आणि पायांना सवय लागते. १० मिनिटाचा ब्रेक म्हणजे टाईमपास नाही. " आकाशने सौरभला उत्तर दिले. रचनाने पाठीवरील सॅक खाली ठेवली. थकलेले दोघे. गार वारा आला. बरे वाटले. पाणी पिऊन तहान भागवली.
" कधी कधी आपल्या डोळ्यासमोर सौंदर्य असते.. तरी नजर त्यापुढे धावत असते. " आकाश समोर बघत बोलला.
वारा वरून खालच्या दिशेने वाहत होता. तो गुडघाभर गवतातून जाताना त्या गवताला समुद्राच्या लाटांचे रूप देऊन जात होता. रचना - सौरभ बघतच राहिले. बघावे तर लाटाच आहेत असेच दिसत होते, हिरव्या रंगाच्या लाटा... असे ते गवत वाऱ्यासोबत डोलत होते. वर स्वच्छ निळ्या रंगाचे आभाळ, आजूबाजूने येणारे विविध आवाज आणि पायाखाली हिरवा रंग. रचना - सौरभ स्थिमित झाले. डोळ्याची पापणी न लवता ते बघत होते. सर्व थकवा कुठच्या कुठे पळाला. वेळ सुद्धा न सांगता निघून गेली.
" चला.. " आकाशने त्याची सॅक पाठीला लावली. " निसर्गाच्या मोहजालात तुमचे स्वागत आहे.. " आकाश निघाला ..
सर्वानी आपल्या सॅक पाठीवर लावल्या आणि निघाले. आणखी काही वेळ ते पुढे चालत जात होते. बरेच अंतर पार केलेले. रचना - सौरभला पुन्हा आराम मिळाला पाहिजे. उतरण असूनही त्यांना दम लागलेला. आकाशने घड्याळात पाहिले, सकाळचे १० वाजत होते. त्यामानाने यांना खूप चालवले मी ... आकाश स्वतःशीच बोलला. " आपण थोडावेळ थांबू ... आताही बरेच अंतर पार केले .... well Done !! " आकाशचे बोलणे ऐकून रचनाला बरे वाटले. सर्वानी आपापल्या सॅक खाली ठेवल्या आणि जागच्या जागी बसले.
" थांबलो का सर .... " रचना चा प्रश्न.
" आधी बोललो ना ... लगेच सवय होत नाही... पायांना हि आराम हवा ना ... सौरभ तर मघापेक्षा आता जास्त थकला आहे असे वाटते... " आकाश त्याच्याकडे बघत हसत बोलला.
" नाही सवय ... सारखे सारखे बोलायची काही गरज नाही... " सौरभ त्यावरही चिडला. रचनाने त्याला चिमटा काढला.
आकाश हसला त्यावर , " दमला आहात म्हणून थांबलो. इथून पुढे एक गाव आहे. तिथे जाणार आहोत. जरा आराम करू मग जाऊ... , असे म्हणतो. "
" गावात कशाला... भटकंती करायची आहे ना ... " सौरभ रागात होता.
" तुम्ही काल पासून काही खाल्ले आहे का , ते आठवा जरा .... " आकाश या दोघांकडे बघत म्हणाला. खरच त्याचा विचार केलाच नाही. सौरभ मनात बोलला.
" मला तर प्रचंड भूक लागली आहे. " सुप्री बोलली.
" मग गावात जाऊन काय ... " रचनाचा प्रश्न.
" तिथे आपल्याला दुपारचे जेवण मिळू शकते. "
" पैसे ??.....किती रुपये लागतील. मी जास्त पैसे घेतले नाही सोबत " सौरभ बोलला.
" पैसे कशाला .... " सुप्री बोलली.
" जेवायला काय फुकट देणार आहेत का ... " सौरभ. एकमेकांवर नुसते प्रश्न - उत्तरांचे बाण सुटत होते.
" शांत व्हा सर्वानी... " आकाश वैतागला. तसे सर्व शांत झाले. " मी आधीच बोललॊ होतो , भटकंती सुरु झाली कि असे प्रश्न नकोच. तुम्हाला कशाला त्रास होणार नाही , याची खात्री दिली होती मी , त्यामुळे तुम्हाला असे आणि कोणतेच प्रश्न पडायलाच नको .... बरोबर ना !! " आकाश या दोघांकडे पाहत म्हणाला.
" सॉरी सर ... " सौरभ आकाशला प्रतिउत्तर करणार होता , त्याआधी रचना बोलली. खरतर , रचना आणि स्वतः सौरभ फिरायला जाणार हे त्याला आवडले होते. त्याच्यात तिसरा नको होता सौरभला. त्यात आकाशचे शांत वागणे , बोलणे त्याला रुचत नव्हते.
साधारण , अर्ध्यातासाने यांचा आराम संपला. आकाशने सांगितल्याप्रमाणे , पायथ्याशी एक गाव होते. गाव लहान असले तरी सुधारलेले होते. " इथून शहर जवळ आहे , त्यामुळे बरीच सुधारणा झाली आहे गावात. आपण दुपारी थांबू. जेवण झाले कि पुढचा प्रवास करू. " आकाश .
" बरं ... " सौरभ आकाशच्या मागे चालून , त्याचे बोलणे ऐकून वैतागला होता. स्वतःला मोठा शहाणा समजतो. जस काय यालाच सर्व माहिती आहे... असा वागतो. सौरभ मनातल्या मनात आकाशला बोलत होता. आकाशने त्या तिघांना गावच्या वेशीवर उभे केले आणि स्वतः पुढे गेला.
१० मिनिटानी आकाश त्यांच्या दिशेने येताना दिसला. दुरूनच त्याने हाताने खूण करत " पुढे या " असे सांगितले. आकाशने त्यांना एका घराजवळ आणले. " आजचे दुपारचे जेवण इथे करू. यांच्या ओट्यावर आपल्या सॅक ठेवू शकतो. " सर्वानी सामान ठेवले. सौरभ चुळबुळ करत होता. आकाशच्या नजरेतून सुटले नाही.
" सौरभ काही बोलायचे आहे का ... "
" त्याला बाथरूमला जायचे आहे. त्यांना विचारा ना ... त्याचे टॉयलेट use करू शकतो का ... " रचना बोलली.
" हा ... वापरू शकतो ... त्यांना विचारून जा कि .. " सौरभ आकाशचे बोलणे संपता क्षणी पट्कन आत गेला.
" जेवणाचे किती पैसे द्यावे लागतील त्यांना..." रचनाने पुन्हा प्रश्न केला.
" पैसे कशाला ... " आकाश.
" जेवणाचे ... "
" काही गरज नाही ... ते पैसे घेत नाहीत. " आकाश.
" इतकी दानशूर असतात गावातली लोकं ... कधी ऐकले नाही मी " रचना हसत म्हणाली.
" दानशूर बोलू शकतेस , पण मदत मागितली कि मदत करतात .... अन्न दान तर नक्कीच करतात... असे गावातच बघायला मिळते. शहरात शेजारी बसलेल्या माणसाकडे बघायला वेळ नसतो. सर्वच नुसते पळत असतात... " सौरभ आलेला तोपर्यत.
" तुम्हा दोघांना मघाशी सांगायचे राहून गेले. आपल्या जेवणाचे असेच आहे , चमचमीत - मसालेदार वगैरे नेहमी मिळेल असे नाही. शिळे सुद्धा खावे लागेल. आणि हे अंघोळ , नैसर्गिक विधी ... सर्व निसर्गात करावे लागेल. " आकाश.
" का .... गावात जाऊन करू शकतो ना ... अंघोळ .... etc. " सौरभ.
" कधी कधी तर गाव सोडून दे , माणसे नजरेस पडत नाही. तेव्हा तर निसर्ग हाच ऑपशन आहे... आम्हा दोघांना सवय आहे. भटकंती करताना असा काही गोष्टीचा त्याग करावा लागतो. जमत असेल तर पुढच्या प्रवासाची बांधणी करतो. नाहीतर याच गावातून तुम्हाला शहरात जाणारी वाहने मिळतील. "
" काही प्रॉब्लेम नाही सर... असे जीवन तरी कधी जगणार... सर्व अटी मान्य. " रचना बोलली. सौरभला आवडले नसेल ते तिने ओळखले.
दुपारची जेवणे झाली . " सामान राहू दे इथेच. तुम्हाला कोणाला कॅमेरा , टॉर्च चार्ज करायचे असतील तर करू शकता. गावात काही दुकाने आहेत, सुप्री घेऊन जाईल तुम्हाला. काही सुका खाऊ घेयाचा असेल तर घ्या. मी शेकोटी साठी लाकडे मिळतात का ते बघतो. आता १२ वाजले आहेत ... १ वाजता इथंच भेटू. " आकाश बोलला आणि सर्व निघाले. सुप्रीने त्यांना दुकानात नेले. जास्त खरेदी करायची नव्हती , त्यामुळे गावात फेरफटका मारून आले. आकाश आधीच आलेला. त्याच्या शेजारी लाकडाची मोळी होती. याना आलेलं बघून तो तयार झाला. " आता कुठे जायचे आहे सर " रचना पाठीवर सॅक लावत बोलली.
आकाशने मागच्या दिशेनं बघायला सांगितले. एक बऱ्यापैकी मोठा डोंगर होता. त्या प्रवासाला सौरभ आधीच वैतागलेला होता. रचना साठी आलेला फक्त. त्यात हा उभा डोंगर पाहून कपाळावर आठ्या आल्या.
" एवढा मोठा डोंगर... तोही उन्हात चढायचा. मला जमणार नाही हा ... " सौरभ रचनाकडे पाहत म्हणाला.
" मोठा तर आहे... पण जास्त चालायचे नाही. संध्याकाळ पर्यंत जितके चालू तेवढाच प्रवास... आणि सौरभ , उन्हाचे बोलतोस ना. इतका वेळ उन्हातून चालत आहेस... त्रास जाणवला का ... " आकाश बोलला ते बरोबर , सौरभला थोडे तरी पटले. सर्वानी आपले सामान घेतले आणि गावाचा निरोप घेऊन ते चालू लागले.
" या गावचे नाव काय ... " रचनाने आकाशला विचारलं.
" ते काही विचारू नकोस हा ... मी फक्त प्रवास करतो... वाटा , पायवाटा ... कोणती वाट कुठे जाते .... कोठे गेले कि निसर्गसौंदर्य दिसते. ते सांगू शकतो. पण गावचे नाव , कोणता किल्ला ... गडाचे नाव ... माझ्या लक्षात राहत नाही.. राजमाची जवळची म्हणून त्याचे नाव माहित , बाकी पाय घेऊन जातील , तिथे जायचे एवढेच माहित मला... " आकाशने उत्तर दिले.
" माझे हि same आहे ... मलाही नावे माहित नाहीत ... पाय नेतील तिथे आणि हा घेऊन जाईल तिथे जाते मी.. " सुप्री हसत बोलली.
त्यांच्या हसण्याचा सुद्धा सौरभला राग. " सारखं काय हसायचे... आणि हरवलो तर कोणाला काय सांगायचे.... आपण कुठे आहोत ते.. unprofessional सारखे नाही का हे ... " सौरभ बोललाच शेवटी.
" तुम्ही हरवणार नाही , याची गॅरंटी माझी. त्याचे टेन्शन घेऊ नका. आणि हसायचे बोलतोस ना ... ते सुप्रीला विचार. तिनेच हसायला शिकवले मला. " आकाश सुप्रीकडे पाहत म्हणाला.
" बघतो आहेस ना गणू... मी गरीब बिचारी भेटली आहे तर कसा बोलतो ते ... " सुप्री वर आभाळात बघत बोलली.
" गणू कोण ... " रचनाने चालता चालता विचारलं,
" गणू म्हणजे गणपती बाप्पा... मी गणू बोललेले त्याला आवडते. त्याने सांगितले मला , गणू बोल असे.... त्याचे कसे ऐकणार नाही मी .." सुप्रीच्या बोलण्यावर रचना हसू लागली.
" नुसता वैताग आणला आहे या जोडीने .. मंदच वाटतात .. हि रचना पण हसत बसते वेड्यासारखी ... यांच्यासोबत यायलाच नको होते ... " सौरभ मनातल्या मनात बोलत यांच्या मागून चालत होता.
चालत - थांबत - चालत , असे करत ते डोंगरच्या एका सपाट भागात आले. आकाशने घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे ५ वाजत होते. " आपण इथे थांबू , टेन्ट उभा करायला घ्या. " आकाशने पाठीवरील सॅक खाली ठेवली.
" इतक्यात थांबलो !! कमाल आहे ... मला वाटते तुम्हीच दमला , मिस्टर A... " सौरभला बोलायला अजून काय हवे.
" तसे काही नाही , मी आताही चालायला तयार आहे , परंतु संध्याकाळ होते आहे. काळोख लवकर होईल, त्याआधी शेकोटीची तयारी , टेन्ट उभा हवा. या गोष्टी आहेत. आता उजेड आहे तर कामे करून घेऊ .. "
" आणि पाऊस आला तर ... "
" पावसाची काहीच चिंता नाही ... आणि तुम्हीही चिंता करू नका .. " म्हणत आकाशने तंबू उभा करायला घेतला. रचना -सौरभ कामाला लागले कारण आज आकाश त्यांना मदत करणार नव्हता. अर्ध्या पाउण तासात त्यांचा तंबू उभा राहिला. सौरभ लागलीच आत जाऊन आराम करू लागला. रचना सुप्रीला बघायला त्यांच्या तंबू जवळ आली.
" सर दिसत नाहीत ते ... " रचनाने विचारलं तर सुप्रीने वरच्या दिशेनं बघायला सांगितले, आकाश वर चढताना दिसला, " ते आता कुठे गेले ? "
" तो लाकडे जमवायला गेला आहे , आणि पुढे कसे जायचे ते बघायला गेला आहे, " सुप्रीने माहिती दिली.
" सर किती जलद चालतात ... थकत कसे नाहीत . "
" तो तसाच आहे, कोणी सोबत नसताना एका रात्रीत पूर्ण डोंगर चढू शकतो. स्टॅमिना भारी आहे त्याचा. " सुप्री बोलत असताना रचनाला सौरभचे बोलणे आठवले.
" सॉरी " रचना बोलली , सुप्रीला काही कळेना.
" सौरभ पट्कन बोलून जातो ... त्यासाठी सॉरी. " सुप्रीला हसू आलं.
" अगं , सॉरी काय त्यात ... त्याचा स्वभाव आहे .... लगेच कसा बदलणार .. आता तुझे लग्न झाले कि कळेल तुलाही ... वेळ लागतो आणि वेळ दयावा... नाती हळूवार पणे फुलवावीत. हे ... मी या वेड्यासोबत राहून शिकले. " रचनाने सुप्रीला मिठी मारली. " तुम्ही दोघे किती cute आहात. " सुप्रीने तिलाही मिठीत घेतले.
आकाश परत आला तेव्हा संध्याकाळ झालेली. अस्ताला जाणाऱ्या सूर्याने आभाळ नारंगी केलेलं. एक - दोन मागे राहिलेले मोठे ढग .... अंगावर शालू मिरवावा , तसेच ते रंग अंगभर मिरवत होते. पक्षांचे थवेच्या थवे घरी निघालेले. त्याच्या आवाजाने तिथल्या शांततेचा भंग होत होता. रचना तेच बघत होती. सौरभ तिच्या शेजारीच उभा राहून फोटो काढत होता. आकाशने त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि शेकोटीची तयारी करू लागला.
संध्याकाळ होऊन काळोख पसरला तसे हे दोघे शेकोटी जवळ आले. पाऊस नसला तर थंड हवा , त्यामुळे शेकोटीची उब हवी हवीशी. त्याच वेळेस , सकाळी गावातून आणलेलं जेवण सुप्रीने वाढायला घेतले. चालून चालून भूक लागलेली. जे होते ते पटापट पोटात ढकलले. सर्व आवरून पुन्हा गप्पा सुरू झाल्या.
" तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर आहात कि नुसता छंद म्हणून .. " आकाश कॅमेरा साफ करत बसला होता , ते बघून सौरभने विचारलं.
" मी सांगितले की फोटोग्राफर म्हणूनच जॉबला आहे. "
" ते कळले मला , पण नुसते फोटो काढून पोट भरते का ... मोठे मोठे फोटोग्राफर , फेमस फोटोग्राफर ते जास्त कमवतात ना ... " सौरभ
" मोठे मोठे फोटोग्राफर , फेमस फोटोग्राफर म्हणजे कसे नक्की ... " सुप्रीने प्रश्न केला.
" ते actor , celebrity चे फोटोशूट करतात ते ... हि रचना त्या मॅगजीन मधले फोटो सारखे बघत असते .. तो फोटोग्राफर कसा आहे... मीही बघितले आहेत त्याचे फोटो ..... तसे फोटोग्राफर ... " सौरभ बोलला. सुप्री आकाशकडे बघू लागली.
" हा.... म्हणजे आमच्या दोघांचे पोट भरण्याइतके कमावतो मी.. जास्त अपेक्षा नाहीत आणि गरजाही जास्त नाहीत आमच्या.. आमचा बराच काळ असा फिरण्यात जातो... सांगायचे झाले तर महिन्याला आमचा दोघांचा मिळून होणारा खर्च ... २ -३ हजारांच्या पुढे जात नाही. मग जास्त पैसे हवेत कशाला. " आकाश कॅमेरा साफ करत बोलला.
" काय मिळते असा प्रवास करून .... " सौरभ विचारत होता. आकाश त्यावर हसला.
" योगायोगाने आज अमावस्या आहे ... " आकाश बोलला. ते या दोघांना कळेना.
" काय .... what do you mean ?? " सौरभने पुन्हा विचारलं,
" तू विचारलं ना .. असा प्रवास करून काय मिळते. तेच सांगतो आहे मी .... योगायोगाने आज अमावस्या आहे . " रचनाला जरा कल्पना आली. तिने हळूच वर आभाळात पाहिले. अन सौरभला हात घट्ट पकडला. सौरभला कळेना , हिला काय झालं. तिच्याकडे पाहिले तर ती वर बघत होती. त्यानेही वर पाहिले.
आभाळात चंद्र नसल्याने चांदण्याचा नुसता पूर आला आहे असे आभाळ दिसत होते. नजर जाईल तिथे काही ना काही चमकत होते. लहान तारका - मोठ्या तारका... सर्वत्र , चोहीकडे तेच ... शहरात एखादं - दुसरा तारा दिसला तर नशीब, या दोघांनी असे कुठे बघितले नव्हते. रचनाला काही बोलायचे होते पण शब्द निघत नव्हते तोंडातून... अजब - गजब बघितल्या सारखे काही. सौरभ सुद्धा तोंड उघडून ते बघत होता. आकाशने हळूच शेकोटी विझवली. एक छानच दोघांचा फोटो काढला. " चला ... good night .. " सुप्रीने आवाज दिला. तेव्हा दोघे भानावर आले.
" उत्तर मिळाले असेल ना .... नाही तर पुन्हा देतो उत्तर ... असा प्रवास करून काय मिळते .... जे तुम्हा दोघांना या क्षणाला मिळते आहे ... समाधान .. " आकाश सुद्धा वर बघत होता. सौरभ काही बोलला नाही त्यावर.
" आता झोपूया ... उद्या सकाळी लवकर निघू .... मी जागे करायला येतो .... good night " म्हणत आकाश त्याच्या तंबूकडे गेला. रचना अजूनही त्या तारकांनी भरलेल्या आभाळाकडे पाहत होती. सौरभने तिला ओढतच तंबूमध्ये नेले.
===================================================================
सौरभ गाढ झोपेत होता. अचानक त्याला बाहेर कोणीतरी , त्यांचा तंबू हलवतो आहे , असा भास झाला. रचनाला त्याने जागे केले.
" उठ रचना... उठ ..... बाहेर वाघ आला आहे असे वाटते. " सौरभ घाबरलेला. तीही घाबरली.
" कोण ..... कोण आहे बाहेर... " रचनाने घाबरत आवाज दिला.
" मी ..... सुप्री ... " सुप्रीचा आवाज ऐकून दोघांना बरे वाटले. रचना बाहेर आली. सौरभ आतमध्ये बसून होता.
" Hi ... काय झाले... " रचनाने विचारलं.
" निघायचे आहे ना ... म्हणून उठवायला आले. .. " रचनाने लगेच घड्याळात बघितले , मध्यरात्रीचे ४ वाजले होते.
" इतक्या लवकर ?? " रचनाने प्रश्न उपस्थित केला.
" हा ... तो बोलला कि निघायचे आहे ... त्यांना जाऊन जागे कर ... म्हणून आली मी... "
" निघायचे तर आहे ... तरी हे खूपच लवकर नाही का ... " रचना
" मी त्याला विचारून येते .. " म्हणत सुप्री पुन्हा आकाशकडे गेली.
या दोघींचे बोलणे ऐकून सौरभ बाहेर आला. " वेडा - बिडा झाला कि काय तो ... ४ वाजले आहेत... " सौरभचा आवाज चढला.
" हळू बोल ना ... त्यांनी ऐकले तर.. " रचना त्याला शांत करत बोलली.
" तूच सर ... सर करतेस ना ... म्हणून स्वतःला ग्रेट समजायला लागला आहे तो ... तुमचा मिस्टर A .... मी येणार नाही , आधीच सांगून ठेवतो. गेले ३ दिवस माझी झोप झालेली नाही.... तू सांग त्याला ... उजाडले कि निघू .... " सौरभला आवाज चढलेला होता. तोपर्यत आकाश - सुप्री आलेले होते.
" Hi सर ... एवढ्या लवकर निघायचे ठरवले तुम्ही... सकाळ झाली कि निघूया ना ..." रचनाने request केली.
" actually .... पुढे आपल्याला चढण लागेल. इथला सूर्योदय फारच सुंदर असतो. त्याआधी माथ्यावर पोहोचू. दीड तास तरी लागेल. त्यासाठी , आत्ताच निघावे लागेल. " आकाशने समजावून सांगितले. रचना सौरभकडे बघू लागली.
" काही अडचण आहे का ... " आकाश सौरभकडे पाहत म्हणाला.
" नाही सर ... काहीच प्रॉब्लेम नाही.... आम्ही सामान आवरतो. " रचना बोलली.
" good .. टेन्ट उघडता येतो ना आता... तुम्ही तुमचे सामान भरभर आवरा. " आकाश त्याच्या तंबू कडे निघून गेला.
" रचना ... तुला बोलता येते ना ... त्याला सांगून टाकायचे ना ... जमणार नाही म्हणून .. " सौरभ वैतागला.
" तुला जमणार नाही , हे माहित आहे. मी माझे सांगितले , मला जमेल म्हणून. तू एकटाच थांब इथे... आणि हो , मी टेन्ट घेऊन जाते आहे. तू आराम कर. नंतर जागा होशील ना ... तेव्हा थेट घरी निघून जा ... " रचना पुढे सौरभ काय बोलणार. आळश देत , झोप झटकून तयारीला लागला.
अर्ध्या तासाने , चौघेही निघायला तयार होते. रचना जाम excited !! तर सौरभ नाराज. आकाशचा त्याला प्रचंड राग येतं होता. परंतु रचना समोर सौरभ गप्पच. पहाटे ४:३० ला हा छोटा ग्रुप , आकाशच्या पावलांवर पाऊल टाकत प्रवास करू लागला. चढण अति तीव्र नसल्याने आणि आकाश .... या दोघांच्या सोईचा प्रवास होईल अश्या वाटेने चालत होता. चौघांचे टॉर्च सुरु होते. मध्ये मध्ये थांबत ते चालत असले तरी यावेळेस रचना - सौरभने चांगलाच वेग पकडला होता. शिवाय पावसाळी चिन्ह नसली तरी उंचावर असल्याने आजूबाजूचे वातावरण थंड होते. वाराही असल्याने दमणे , थकणे ह्या गोष्टी नव्हत्या. बरोबर ६ वाजता चौघे एका ठिकाणी पोहोचले.
" थांबा " आकाशने सर्वांना थांबवले.
" काय झालं .. मी दमलो नाही ... आणखी चालू शकतो. " सौरभ आकाशला बोलला.
" हो हो ... किती तो उत्साह !! " आकाश हसत बोलला.
" आपल्याला जिथे पोहोचायचे होते , तिथे आलो आहोत... " आकाश बोलला.
" आलो पण ... " सौरभ आजूबाजूला टॉर्चच्या उजेडात बघू लागला.
" छान काय आहे इथे .... हा काळोख दाखवायला आणले का ... " सौरभला राग आला.
" आता थोड्यावेळाने सूर्योदय होईल ... ते दाखवण्या साठी आणले तुम्हाला... " आकाश बोलला. " आपण एक काम करू... आपण वेगवेगळे म्हणजे एकमेकांपासून थोडे अंतर ठेवून बसू... " आकाश.
" त्याने काय होणार ... " यावेळेस रचनाने विचारलं.
" try तर करू ... असे अनुभव एकट्याने अनुभवले तर जास्त मनात भरतात. " सुप्री मधेच बोलली.
" नाही हा ... मी रचनाला एकटे सोडणार नाही. " सौरभ रचनाचा हात पकडत म्हणाला.
" अरे बाबा ... मी काय कुठे पळून जाणार आहे का ... सुप्री .... मला आवडली कल्पना .... तसेच करू... फक्त कोणती जागा पकडू ते सांगा... " मग आकाशने प्रत्येकाला एक - एक जागा बघून तिथे तिथे बसवले.
सौरभला आकाशचे हेही वागणे आवडले नाही. " एवढं काय दिसणार आहे देव जाणे.. " सौरभ स्वतःशीच पुटपुटला आणि रचनाकडे पाहू लागला. ते ज्या जागी आलेले होते , ती जागा खूपच पसरलेली , मोठी होती ... चौघे एकमेकापासून बऱ्याच अंतरावर बसलेले. आधी सुप्री ... तिच्यापासून काही अंतरावर रचना , मग सौरभ आणि सर्वात शेवटी आकाश .... अश्या क्रमाने ते बसलेले होते. हाच डोंगरमाथा असावा ,असा रचनाने अंदाज लावला. खूपच उत्सहात होती ती . आकाश त्याचा कॅमेरा सेट करत होता.
थोडावेळ शांततेत गेला. रचना - सुप्री - आकाश ... नजरे समोर काय दिसते , ते बघत होते. सौरभ मधेच रचनाकडे बघे , मग पायाखाली काही आहे का ते पाही ,पुन्हा रचनाकडे .... सूर्योदय , निसर्गसौंदर्य ... यात त्याला काहीच रस नव्हता ,असं वाटत होते. काही वेळाने पूर्वेकडील क्षितीजाचा रंग नारंगी - तांबूस होऊ लागला. आणखी काही मिनिटांनी , रात्रीच्या काळ्या रंगाची जागा ... हलका निळा रंग घेऊ लागला. सोबतीने कडेला नारंगी रंग भरून गेलेला. पांढऱ्या ढगांचे - धुक्याचे आच्छादन असल्याने , त्यातून वाट काढत सूर्याची किरणे जागा मिळेल तिथे पसरत होती. सूर्योदय होत असला तरी सूर्याच्या आधीच काही कोवळी किरणे त्या धुक्याच्या मिठीतून मोकळी होत सैरावैरा पळत होती. त्यांचाच नारंगी - गुलाबी रंग त्या ढगांना लागला आहे असे भासत होते. वाराही उनाड मुलासारखा त्या धुक्यात खेळत होता. मध्ये मध्ये ढगांना गोल गिरकी घेण्यास भाग पाडत होता. नारंगी - गुलाबी रंगाचा भोवरा तयार करून एक वेगळाच रंग तयार करत होता. वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे , धुके आता एका तालात - लयीत वाहत होते, धुक्याची नारंगी रंगाची नदी डोंगर माथ्याला वळसा घालून कुठे लांब विरघळून जात होती. हळूहळू सूर्यदेवाची रथ पुढे सरकला आणि ढग - धुक्याची पांगापांग झाली. रचना कडे बघता बघता सौरभचे लक्ष समोर गेलेले ... अवाक झालेला ते बघून.
ती धुक्याची नदी नाहीशी झाल्यावर खालचे दृश्य दिसू लागले. रचना तेच बघत होती. पायथ्याशी असलेली गावे अजूनही झोपेत होती. तिथले धुक्याचे साम्राज्य आपली ओळख अजूनही जपून होते. धुक्यातून अस्पष्ट दिसणारी कौलारू घरे... तिथं कोणीतरी रहाते , हे सांगत होती. सूर्यदेव अजून तळपू लागले आणि गावे , गावातली घरे स्पष्ठ दिसू लागली. गावातल्या पायवाटा इतक्या उंचावरून ही त्यांना दिसत होत्या. लालसर - करड्या रंगाच्या पायवाटा ... दूरवर जाताना काळ्या डांबरी रस्त्यांना जाऊन मिळत होत्या. काही उलट्या दिशेला असलेल्या पायवाटा , शेताकडे वळलेल्या. अजूनही शेतात पीक उभे राहायला अवधी होता. आता कुठे पावसाला सुरुवात झालेली , त्यामुळे नांगरलेली शेते होती तशीच दिसत होती... एक वेगळीच नक्षी बनवत होते. त्या शेतांपासून थोडे लांब एकाकी असलेले मंदिर... उंचावरून बघताना.... थोडी लगबग दिसत होती. चार-पाच डोकी मंदिराच्या आवारात घुटमळताना नजरेस पडत होती. ते बघत असताना , सकाळी सकाळी दाणा गोळा करण्यास निघालेला पक्षांचा एक मोठा थवा एका शेतावर विसावताना दिसला. किती सुंदर होते सर्व.
आकाश त्याचे फोटो काढायचे काम चोख बजावत होता. सौरभला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. नजरे समोर जे घडत आहे ते खरे आहे कि कोणी आपल्या समोर एखादा मूवी सुरु केला आहे तेच कळत नव्हते. इतका सुंदर असतो निसर्ग !! मन मानायला तयार होईना.... तरी ते खरे होते ना ... आपण काय काय बोललो याला ... उगाचच त्याच्या बद्दल मनात राग भरून ठेवतो आहे मी ... सौरभला स्वतःचीच लाज वाटली. त्याने आकाशकडे पाहिलं. तो फोटो काढण्यात गुंग झालेला. " सॉरी मिस्टर A ... " सौरभ आकाशकडे बघत मनातल्या मनात बोलला. सुप्री कधी पासून तेच बघत होती. मन भरले. तसे तिचे लक्ष रचना कडे गेले. रचना अजूनही त्यातच अडकून. सुप्री तिच्या जागेवरून उठली आणि रचना शेजारी जाऊन बसली. रचनाच्या गालावर पाणी दिसले तिला.
" Hi ... " सुप्रीला बघून तिने उत्तर दिले.
" Hi ... तू कशी आहेस ते सांग ... तुझ्या डोळ्यातून पाणी दिसते आहे ... म्हणून आले तुझ्या शेजारी. " सुप्री बोलली. रचनाने हसत हसत ते अश्रू पुसले.
" आनंदाश्रू आहेत ते. इतकं छान .... कधी नजरेस पडेलच नाही. ते मॅगजीन बघते ना .. त्यात फोटोमध्ये दिसतात...त्यात बघत असते ... अपेक्षा नव्हती , त्याहून काही सुंदर असेल काही ... " बोलतानाही तिच्या डोळ्यातून पाणी येतं होते.
" हे असेच होते.. मी जेव्हा पहिल्यांदा प्रवासाला निघाली होती. या मिस्टर A ने असे काही सुंदर दाखवले होते ना ... माझेही डोळे भरून आलेले... मनातले असे डोळ्यातून बाहेर येते मग ... " सुप्री छान बोलली.
" पण खरच ... अशी अपेक्षा नव्हती ... इतके सुंदर , शब्द नाहीत...सरांचे खूप आभार ... पहिले ते राजमाची चे सौंदर्य.... नंतर तो गवताला होणारा समुद्रचा आभास .... रात्रीचे ताऱ्यांनी भरलेले आभाळ आणि आता हे ... विश्वास तरी कसा ठेवावा यावर ... इतके सौंदर्य निसर्गात भरून राहिले आहे... " रचना पुन्हा समोर बघत बोलली.
" हा माझा भटक्या आहे ना ... सारखे बोलत असतो .... निसर्गाची काळजी घेतली ना कि तो न मागताच भरभरून देतो आपल्याला. " तिने पुन्हा एकदा रचनाकडे नजर टाकली. डोळ्यात आनंदाश्रू होतेच तिच्या.
" डोळ्यातले पाणी जपून ठेव. असे क्षण भेटीला येतील अजूनही. आता कुठे भटकंतीला सुरुवात झाली आहे. " सुप्री हसत बोलली आणि पुन्हा त्या सूर्योदयाकडे बघू लागली.
================================ क्रमश: ====================