All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday 22 May 2018

भटकंती.... पुन्हा एकदा ( भाग पहिला )


              सूर्यास्त होतं होता. ढगांची धावपळ सुरु होती घरी पोहोचण्यासाठी. खाली नदीचं विस्तीर्ण पात्र, गाढ झोपेत असावी अशी भासावी इतकी शांत होती ती. शेजारी असलेल्या वनात पक्ष्यांचे थवे दिसतं होते.... घरी परतलेले. सूर्याची किरणे झाडा-झाडात दिसत होती अजूनही .... काय फोटो होता तो. असं वाटतं होतं कि समोरच उभा राहून पाहत आहोत सगळे. 
" wow !!! amazing.... शब्दच नाहीत माझ्याकडे काय बोलू ते... means ... एवढं feel होते आहे ना हा फोटो बघून... " कोमलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. लगेच तिने पुसूनही टाकलं. संजनाने सहानुभूतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. 
" होते असं.. जे जे हा फोटो बघतात तेव्हा.. ",
" आनंदाश्रू !! " कोमलने डोळे कोरडे केले. " किती बरं वाटते ना , हे असं बघताना... मी तर फोटो बघूनच असं feel केलं..प्रत्यक्षात फोटोग्राफरला काय वाटतं असेल असे फोटो काढताना... " कोमल भारावून बोलली. 

"त्याला तर काहीच वाटायचं नाही.. भराभर फोटो काढत बसायचा.. त्याला रोजच्या सारखं होतं ते... " संजना बोलली. 
" कोण तो... नाव वगैरे असेल ना काही तरी... " ,
" आकाश .... wild India चा फेमस फोटोग्राफर.... " ते ऐकून कोमलला केवढा मोठा आश्च्यर्याचा धक्का बसला. 
" म्हणजे ..... म्हणजे तू ओळखतेस का त्याला... म्हणजे तू त्याला बघितलं आहेस... तो तर कधीच समोर येतं नाही... कुठेच त्याचा स्वतःचा फोटो नाहि.. कधी पासून त्याला बघायचा आहे मला... " अचानक तिच्या मनात काही आलं.. " By the way.... त्याचे फोटोज तर मॅगझीन मध्ये असतात ना... तुझ्याकडे कसे.. म्हणजेच तू त्याला नक्की ओळखतेस... बरोबर ना.. " संजनाने लगेच पुढचा फोटो तिच्यासमोर धरला. एक मुलगी एक खडकाच्या टोकावर बसली होती. कुठेतरी एकटक बघत.. आणि आजूबाजूला धुकं पसरलेलं ...किती छान फोटो तोही.... 
" किती मस्त ना.. असा माझाही फोटो कोणी काढला असता तर... कोण आहे हि.. " ,
" का आवडला नाही फोटो... ?? " संजनाने लगेच विचारलं. 
" तसं नाही... आकाशने आतापर्यंत फक्त आणि फक्त निसर्गाचेच फोटो काढले आहेत.. म्हणून विचारलं.. "   कोमलने हळू आवाजात विचारलं. 

" ती बघ ... समोर.. " संजनाने एका दिशेने बोट दाखवत म्हटलं. 
" हो गं... तिचं आहे हि.. म्हणजे आकाश सुद्धा इथेच काम करतो का... wow !! कुठे आहे तो... एकदाच भेटू का त्याला... " कोमल उभी राहिली , मान उंच करून ऑफिस पाहू लागली. 
" आधी खाली बस.. " संजना जरा रागीट स्वरात बोलली. " नीट ऐकून घेयाचे नाही... हाच प्रॉब्लेम असतो सगळ्यांचा... बस खाली... " ,
" सॉरी..सॉरी.. " कोमल खाली खुर्चीवर बसली. आणखी काही फोटो होते त्या album मध्ये.. ते बघू लागली. एकाच मुलीचे त्यात जास्त फोटो होते. 
" किती लकी आहे ना हि मुलगी.. काय फोटोग्राफी केली आहे आकाशने... हॅट्स ऑफ.... !! " कोमल अजूनही ते फोटो बघत होती. " एक प्रश्न विचारू का... ",
" हो विचार " ,
" तिचेच फोटो का एवढे... means .. हे निसर्गाचे फोटो आणि इतर काही फोटो सोडले तर तिचेच जास्त फोटो आहेत.. दोघांचे काही relation... " ,
" हम्म ... " संजना...
" सुप्री नावं तिचं.. सुप्रिया... माझी Best friend....आकाश आणि सुप्री... दोघे एकमेकांना "like" करायचे... छान होते दोघांचे relation... हा photo album सुद्धा तिचाच आहे... पर्सनल photo album आहे तिचा... आकाशने हे फोटो खास तिच्यासाठी क्लिक केलेले... ",
" असं आहे तर... म्हणून हे फोटो त्या मॅगझीन मध्ये आले नाहीत... बरोबर ना... ",
" हो " , 
" मग आकाश येतो का आताही इथे... " ,
" छान सुरु होते सगळं... पण नजर लागली कोणाची तरी... " ,
" का ... काय झालं.. ",
" जेमतेम २ वर्ष टिकलं दोघांचे relation... ",
" so sad... ना " कोमलचा चेहरा एवढासा झाला... संजनाही काही वेळ शांत झाली. तिच्या डोळ्यात जमा झालेलं पाणी बघून कोमलने पुढे काही विचारलं नाही.

            कोमल... कोमल एका मॅगजीन साठी लिखाण करायची. त्यात तिचा विषय होता, पर्यटन... भारतात आणि भारताबाहेर पर्यटन करून यायची आणि ते मॅगजीन साठी लिहायची. तिचे अनुभव, त्या ठिकाणाची माहिती, प्रवासात भेटलेली माणसं .. वगैरे. तिने लिहिलेल्या लेखाबाबत संजनाने तिला भेटायला बोलावलं होतं. 

कोमल अजूनही फोटोच बघत होती. मधेच संजनाकडे बघत होती. ती जशी नॉर्मल झाली तसं तिने लगेच विचारलं." हे सर्व फोटो ग्रेट आहेत... आकाश आणि सुप्रिया बद्दल ऐकून जरा वाईट वाटलं... पण मला तू कश्यासाठी बोलावलं ते सांगितलं नाही अजून.. " संजनाने तोपर्यंत रुमालाने डोळे पुसून घेतले. संजना पुढे काही बोलणार इतक्यात कोमलची नजर एका ग्रुप फोटो वर खिळली. " एक मिनिट... " कोमलने फोटो जरा जास्त निरखून पाहिला. " hey ... wow !!! ... हा मुलगा तुमच्या ग्रुप मध्ये कसा... " फोटो मधल्या एका मुलाकडे बोट दाखवतं कोमलने संजनाला विचारलं. 
" ओळखलंस त्याला ?? ", 
" ओळखलं ?? अगं अशी माणसं कधीतरीच भेटतात... जबरदस्त माणूस... काय बनवलं आहे देवाने त्याला... खरंच... तुला सांगते... आतापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी फिरले. खूप लोकांना भेटले... बोलले त्याच्याशी.... पण हा... शब्दच नाहीत.. तीन -चार दिवस एकत्र होतो आम्ही.... कुठून आलेला काय माहित, आम्ही १०-१५ जण फिरत होतो.. तर हा कधी आला काय माहित... एकच वाट होती आमची, एकत्रच प्रवास केला आम्ही... पूर्ण आयुष्यभरावर छाप पडून गेला.. तुमच्या ग्रुपमध्ये असतो का... ओह्ह !! आता कळलं .. त्यानेच बोलावलं ना भेटायला मला... By the way ... नाव काय त्याचं.. कारण त्या ४ दिवसांत एकदाही त्याने नाव सांगितलं नाही त्याचं... विचारलं कि फक्त हसायचा.. " 

"कोणाला सांगणार नाहीस ... प्रॉमिस ?? " संजना हात पुढे करत म्हणाली. 
" गॉड प्रॉमिस !! आता तरी सांग.. " कोमलने संजनाच्या हातात हात दिला. 
" त्याचं नावं आकाश ... तू जे फोटो बघत आहेस ना... त्यानेच क्लिक केले आहेत ते.. " ते ऐकून कोमलला काय react व्हावे तेच कळत नव्हतं. तोंडावर हात ठेवून बसली होती. ओरडावेसे वाटत होते, म्हणून तोंड बंद करून बसली होती, इतका आनंद.. 
" Means.. एवढे ४ दिवस त्याच्या सोबत होतो आम्ही.. तो आकाश होता.. फेमस फोटोग्राफर... wow .... ग्रेट... कॅमेरा तर होता त्याच्याकडे.. पण काही वाटलं नाही तो आकाश असेल असा.. " कोमलने पुन्हा तो ग्रुप फोटो उचलून निरखून पाहू लागली. 
" यांच्यावरच तर यावेळचा लेख आहे माझा... आमच्या मॅगजीनच्या एडिटर ला एवढा आवडला लेख, बोलले त्याला घेऊन ये एकदा भेटायला... ",
" हो ... त्याच्यासाठीच बोलावलं तुला... " कोमलचे वाक्य मधेच तोडत संजना बोलली. " तुझा लेख वाचला त्या मॅगजीनमधला... माझी एक मैत्रिण बोलली , सध्या एक लेख खूप गाजतो आहे... म्हणून मुद्दाम तो लेख वाचला.. वाचल्यावर लगेच कळलं, हा आकाशच आहे... ",
" थँक्स !! ... but कुठे आहे आकाश.... मला भेटता येईल का त्याला... " ,
" तेच विचारायचे होते तुला.. तुला कधी भेटला होता आकाश... आणि कुठे... " संजनाच्या प्रश्नात काळजी होती. 


" गेल्यावर्षी ... पावसा आधी... जून महिना बहुदा..... नाही, नाही... मे मध्ये भेटला होता " ,
" मे महिन्यात... ? गेल्यावर्षी.. मग लेख या महिन्यात कसा .. " संजना विचारात पडली. 
" आमचं मॅगजीन वार्षिक आहे ना.. वर्षभरात एकदाच येते.. मी पण तसंच करते.. जानेवारी पर्यंत लेख लिहीत असते... त्यानंतर ते मॅगजीनमध्ये प्रिंट करतात... मे महिन्यात वार्षिक अंक प्रकाशित करतात.... शाळा - कॉलेजला सुट्टी असते ना म्हणून हा सुट्टी विशेषांक आहे ..." ,
" ठीक आहे ... सॉरी , मला माहित नव्हतं हे.. " आणि संजना रडू लागली. 
" काय झालं रडायला... ? " कोमलला कळे ना का रडते ते. 
" रडतेस का... त्या दोघांचे ब्रेकअप झालं म्हणून ... ",
" नाही.." संजना रडू आवरत म्हणाली. " त्यांचा ब्रेकअप नाही झाला.. ",
" मघाशी तर बोललीस... जेमतेम २ वर्षच टिकलं त्यांचं relation... मग ?? " कोमल confused... 
" आकाश , सुप्रिया आणि आमचा ग्रुप... सगळे एकत्र फिरायचो... दोन - तीन दिवस लागून सुट्टी असेल तर आकाश कुठे कुठे घेऊन जायचा फिरायला. त्यात या दोघांचे खूप छान जमलं होतं. आकाशला फिरायला खूप आवडायचे, त्यात फोटोग्राफी... फिरायला लांब जायचा, १५-२० दिवसासाठी... पण शहरात आला कि नक्की भेटायला यायचा सगळ्यांना.. " , 
" मग ? " ,
" गेल्यावर्षी असाच... एप्रिल महिन्यात , भटकंती करायला निघून गेला. जुलै मध्ये " फिरायला " जाण्याचा प्लॅन करून गेला. आलाच नाही... " ,
" कुठे गेला मग.. मला तर भेटला होता... but मे महिन्यात... " कोमल टेन्शन मध्ये. 
" जुलै महिन्यात , १ तारखेलाच, एक बातमी आली.. त्याच्या ऑफिस वर.. एका ठिकाणी गाडीचा मोठा accident झाला होता. ३-४ जण जखमी झालेले... गाडी थेट नदीत कोसळली होती. त्या गाडीत एकूण १२ जण होते. मिनी बस म्हणतात तसं काहीशी गाडी होती ती. जे जखमी भेटले तेवढेच, बाकीचे कुठे गेले कोणालाच कळलं नाही.. ",
" बापरे !! मग याचा आणि आकाशचा काय संबंध.. " ,
" आकाश होता त्या गाडीत .. " ,
" what !!!!!!!! " कोमल केवढ्याने ओरडली. सुप्रिया सहित सगळं ऑफिस तिच्याकडे पाहू लागलं. 

तसं लगोलग, संजना... स्तब्ध झालेल्या कोमलचा हात पकडून बाहेर आली. थोडावेळ कोमल तशीच थिजून जागेवर उभी. " याचा अर्थ... " कोमलचा अजूनही विश्वास बसत नव्हता. 
" हो... आकाश नाही या जगात आता.. पाण्यातून गाडी बाहेर काढली... काही मिळते का ते बघत होते तिथले पोलीस.. तेव्हा त्यांना आकाशच्या मॅगजीनचं कार्ड सापडलं... सोबत आकाशचं कार्ड होतंच... तेच पोलीस आलेले सांगायला इथे.. " संजनाचे डोळे पुन्हा पाणावले. 
" मग तुम्ही प्रयत्न नाही केलात का त्याला शोधायचा... " कोमल... 
" खूप... आम्ही सगळेच गेलो होतो तिथे... पहिलं वाटलं आकाश नसावा गाडीत... पण जे वाचले होते , त्यांना आकाशचा फोटो दाखवला... तो त्यावेळी गाडीतच होता... शिवाय काय शोधणार आणि कसं शोधणार त्या नदीत... महापूर काय असतो ते ती नदी बघून कळलं.. तरी विश्वास होता तो भेटेल म्हणून... सतत २ महिने आम्ही त्याला शोधत होतो. नाहीच भेटला. त्याचे वडील सुद्धा होते आमच्यासोबत.. मग काय करणार... नशिबाला दोष देतं आलो पुन्हा शहरात. त्या दोघांचे ब्रेकअप झालंच नाही. पण असे वेगळे होतील हे कधीच वाटलं नव्हतं. " कोमलला ऐकतानाच रडू आलं. 
" सुप्रिया कशी आहे आता ? " ,
" तिच्यासाठी तर आभाळच कोसळलं होतं ते... कुठे नवीन आयुष्याची सुरुवात झालेली..आणि काय झालं, स्वतःला सांभाळलं तिने, आकाश नेहमी बोलायचा, कितीही प्रयन्त केले मानवाने... तरी निसर्गापुढे कधीच जाऊ शकत नाही. तेच झालं. ती पुन्हा नॉर्मल , जशी पहिल्यासारखी होती तशी झाली आहे. परंतु एक तिच्या मनात कायमच कोरलं गेलं... आवडत्या व्यक्ती तिला कायमच्या सोडून जातात.. " कोमल काय बोलणार त्यावर. 

" तुझा लेख वाचला आणि एक अंधुकशी आशा मनात आली. तिने तर " तो आता नाही " हेच मान्य केलं आहे. मी अजूनही आशावादी आहे. लेख वाचून वाटलंही , तो अजून आहे. आता तुलाही तो एक वर्षांपूर्वी भेटला होता ना. म्हणून तुला बोलावलं इथे... " संजना डोळे पुसत बोलत होती. कोमल निःशब्द झालेली. फक्त ४ दिवस होतो एकत्र... एवढं impress केले त्याने कि त्याच्यावर लेख लिहिला मी... आणि त्याने असं निघून जाणं. नाही पटत हे... कोमल स्वतःच्या विचारात. 
" तरी तो अजूनही असला तर ... " कोमल खूप वेळाने बोलली. संजना नॉर्मल झाली. 
" मला हि तसंच वाटायचं. पण आता एक वर्ष होतं आलं. एकदातरी आला असता ना तो शहरात... ",
" त्याचा मोबाईल track केलात का तुम्ही.. ? " ,
" तेच तर.. एवढ्या वर्षांत.. त्याच्याकडे काही modern वस्तू असेल, तर तो त्याचा कॅमेरा... जंगलात कुठे range असते, हे एकच कारण नेहमी पुढे करायचा. त्याला मोबाईल आधीपासूनच आवडायचा नाही. सारखं सारखं काय डोकं खुपसून बसतात त्यात लोकं, असं म्हणायचा. " ,
" मग त्याला काही emergency मदत लागली तर काय करायचा... " कोमलचा पुढचा प्रश्न. 
" त्याच्याकडे एक डायरी होती, त्यात महत्त्वाचे फोन नंबर आणि पत्ते लिहून ठेवले होते त्याने. शहरात आला कि त्याचाच वापर... कमालीची गोष्ट बघ ना, शेवटी जाताना... डायरी सुप्रीकडे... म्हणजे सुप्रियाकडे देतं म्हणाला, सांभाळून ठेव.. मी परत आलो कि दे मला... कुणास ठाऊक काय आलेलं मनात त्याच्या तेव्हा... आधी, इतक्या वर्षात कधी डायरी स्वतः पासून दूर ठेवली नव्हती. " संजना दुसरीकडे बघत बोलत होती. 
" मग... सुप्रिया... तिला आठवण येत नाही का आकाश ची... " ,
" येते... पण आता दाखवत नाही.. पहिलं १-२  महिने रडत बसायची आठवण आली कि. परंतु लगेच स्वतःला सांभाळलं तिने. आकाश म्हणायचा, आठवणी पाळीव करू नयेत... actually , आकाशमुळेच सुप्री strong झाली आहे.. आधी होती त्यापेक्षा, आकाश भेटल्यानंतरची सुप्री खूप वेगळी आहे... रडत बसत नाही... तरी आठवण तर येते त्याची.. " 

" झालं का रडून मॅडम.. " मागून आवाज आला. दोघीनी मागे वळून पाहिलं. सुप्रिया मागेच उभी. 
" कधी आलीस ? कळलंच नाही " संजना सावरत बोलली. 
" माझी स्टोरी सुरु होती ना तेव्हाच.. " सुप्री पुढे आली. " हल्ली सारखी रडत असते हि पोरगी.. " सुप्रीने संजनाला मिठी मारली. " जादू कि झप्पी दिल्याशिवाय हसतच नाही. " घट्ट मिठी मारली. कोमल कडे लक्ष गेलं. 

" तुम्ही मघाशी ओरडलात ना... ऑफिसमध्ये.. नक्कीच हिने चिमटा काढला असेल.. " सुप्रीने संजनाच्या पाठीवर हळूच चापटी मारली. 
" तुम्ही कोण ? ",
" मी कोमल... travel blogger आहे. एका मॅगजीन साठी लिहिते मी. ",
" खूप छान... फिरायला आवडते वाटते... बरं आहे.. मी सुप्रिया... हिची लहानपणापासूनची मैत्रिण.. हिचं जास्त मनाला लावून घेऊ नका.. आणि मला माहित आहे, तुमचा कोणता विषय सुरु आहे ते.... ह्या संजूला ना वेडं लागलं आहे... काहीही करते, कोणालाही बोलावते आणि डोळ्यांचा नळ सुरु करते. ये रडू बाई.. हसतेस कि करू गुदगुल्या... " सुप्रिया संजनाकडे पाहत बोलली. तशी संजनाने हलकीशी smile दिली. 
" मी हिला जेवायला बोलवायला आलेले.. तुम्ही येता का आमच्यासोबत.. ",
" नाही ... नको.. मी निघतच होते.. " कोमल .. 
" आम्ही गरीब आहोत ना... आमच्याकडे कसं खाणार तुम्ही.. " कोमलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह... 
" येडे.. ती तुला ओळखते का... तुझे हे डायलॉग माझ्यापुरते ठेव.. कोमल, तुला बोलली ना... वेडी आहे हि... " संजना हसत म्हणाली. 
" चला, मी निघते मग.... छान वाटलं बोलून.... " कोमल निघाली. 
" गणू तुमचं भलं करो.. " सुप्री बोलली. कोमल "Bye " करून निघून गेली.   

कोमल निघून गेली. सुप्रीने तिच्या फोटोज चा album नीट लावून ठेवला. संजना चुपचाप बघत होती तिच्याकडे. काही बोलणार इतक्यात अमोल आला. 
" काय... दोघींना भूक लागली कि नाही... कधीपासून वाट बघतो आहे मी... जेवायचं तरी आहे ना... ",
" हो, हो ... आलो... व्हा पुढे तुम्ही.. " सुप्रिया हसत बोलली. " चल गं.. काही बोलू नकोस.. सरळ जेवायला चल... भूक लागली आहे. नाहीतर तो येईल परत .... साहेब आपला " 

अमोल आधीपासूनच टेबलावर टिफिन घेऊन बसला होता. " काय यार !! वेळेचं काही आहे कि नाही तुम्हाला . मग पुन्हा घाई करणार. वेळ झाला , वेळ झाला , बोलायचं मग... ", 
" हो हो सर.. आलोच आम्ही. या संजूचे नखरे... तीची मैत्रीण आलेली ना, म्हणून या पोरी मुळे उशीर झाला. मी सांगते ना सर तुम्हाला.. या पोरीचा पगारच कट्ट करा.. मग येईल वेळेत जेवायला... " सुप्री संजनाला चिडवत बोलली. 
" आयडिया छान आहे हा सुप्रिया ... " अमोल हसत म्हणाला. 
" का सर... तुम्ही कशाला नादाला लागता हिच्या... डोक्यावर पडलेली माणसं अशीच असतात. " संजनाने सुप्रीला चिमटा काढला. 
" झालं का दोघींचे सुरु पुन्हा ...जेवायचं कि नाही... " त्या ग्रुपमधला एक जण बोलला. 
" नाही... आज डब्बे उघडून त्याच्याकडे बघत बसू .. आपोआप पोट भरेल.. " सुप्रीने त्याला वेडावलं. अमोलला आणखी हसू आलं. तोवर त्याने त्याचा डब्बा उघडला. काय सुगंध त्या पदार्थाचा. अमोलच्या डब्यातील जेवण नेहमी चवदार असायचं. सगळेच तुटून पडायचे त्यावर. आजही तेच झालं. अमोल ऑफिसला जॉईन झाल्यापासून सर्व एकत्रच जेवायला बसायचे. नेहमीप्रमाणे त्याचा टिफिन सर्वाकडे फिरला. सरतेशेवटी त्याच्याकडे येईपर्यंत अर्धा-अधिक संपला होता. 

" ओ.. अमोल सर, कशाला एवढे दानशूर होता.... कशाला वाटता एवढं, तुम्हालाच तुमचा टिफिन खाता येत नाही. " सुप्री. 
" काय आहे ना.. मला दुसऱ्यांना ' वाटायला ' खूप आवडते. आईसुद्धा बोलते , अश्या गोष्टी वाटत राहायचे. छान असतं. " अमोल भरभरून बोलला. 
" मग तुमचा मिक्सर बिघडला असेल. " सुप्रीचा डायलॉग. थोडावेळ कोणाला काहीच कळलं नाही. नंतर  मिक्सरमध्ये पदार्थ बारीक करतात म्हणजेच ' वाटतात ' हे अमोलला समजलं. आणि किती मोठयाने हसला तो. बाकीचेही मनापासून हसत होते. असंच हसत -खिदळत वेळ जायचा त्यांचा. 

                   अमोल.. एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व... उंच, धिप्पाड, देखणा... गोरा रंग, पाणीदार डोळे, केसांची modern style... इंग्लिश बोलण्यात तरबेज तरी मराठीवर प्रचंड प्रेम.. आणि सर्वात महत्वाचं, सुप्री-संजनाच्या बॉसचा मुलगा. ६ महिनेच झालेले त्याला हे ऑफिस जॉईन करून. दिल्ली ऑफिसला होता तो आधी. तिथेच शिकलेला. ४ वर्ष तिथे काढली त्याने. आता मुंबईत जॉईन होतो बोलला आणि आला देखील. कामात चोख. दिसायला हिरो प्रमाणे होता , त्यात सिंगल... त्यामुळे मुंबई ऑफिस मधल्या मुली already फिदा झाल्या होत्या त्याच्यावर.. फिरण्याची भारी आवड. स्वभाव एकदम friendly.. सर्वांशी हसून -बोलून असायचा. " बॉसचा मुलगा " असा कधी वागलाच नाही. सुरुवातीला सगळेच दूर असायचे त्याच्यापासून. म्हणूनच त्याने दुपारचं जेवण एकत्र करायचं , असा नियम काढला. तोही त्यांच्यात यायचा. ओळख झाली ती अशी. ऑफिसमधले सगळेच त्याचे मित्र , सगळ्याच मैत्रिणी.... पण या दोघीना जास्त पसंत करायचा अमोल. संजना आणि सुप्रीला.. त्यातल्या त्यात सुप्रीला... तिचा sense of humor, स्वभाव, सारखं हसत राहणं, मस्करी करणं , दुसऱ्यांना मदत करणं... आवडायचं त्याला... infact, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलायला यायचा या दोघी बरोबर. छान मैत्री आकारास येत होती. परंतु अमोलला सुप्री बाबत काही माहिती नव्हती. किंवा कोणी तिच्याबद्दल अमोलला काही सांगितलं नव्हतं. अमोल येण्याआधीच " आकाश " च उरकलं होतं. शिवाय ऑफिसमध्ये सगळ्या ग्रुपने ठरवलं होते कि आकाशचा विषय निदान सुप्री समोर तरी काढायचा नाही. सगळ्यांनी ती काळजी घेतली होती. त्यामुळेच अमोलला काहीच माहित नव्हतं. अमोल म्हणाल तर तसाच होता. भूतकाळापेक्षा वर्तमानात रमणारा. त्याला कळलं असतं तरी त्याला काही वाटलं असतं,हा विचार करण्यासारखा प्रश्न होता. तरी सगळं नीट सुरु होतं. मुख्य करून, अमोल आल्यापासून ऑफिस जरा जास्तच खुश आणि आनंदी वाटायला लागलं होतं.  

" Hiiiii.. सुप्रिया.. निघत आहेस का... ? " अमोल सुप्रिसमोर येऊन उभा राहिला. 
" हो... अजून १० मिनिट आहेत निघायला. का असा विचारलं ?? " ,
" मी निघत आहे. तुला घरी सोडतो आज. " ,
" नको बाबा... आमच्या एरियात कोणी बघितलं ना.. तर डायरेक्ट घरी जाते बातमी.... breaking news सारखी... कोणाकोणाला सांगणार तुमच्या बद्दल... ",
" अरे !! मित्रच आहोत ना... मग त्यात काय घाबरायचे एवढे... " ,
" तुम्हाला काय कळणार ते... शिवाय हे संजू... तिच्याबरोबर बसली नाही ना scooty वर... तर घाबरते आणि balance जातो तिचा... खरंच हा... त्यात हिला रस्ते कळत नाहीत, समोर कोणी आलं ना.. सरळ अंगावर घालायची गाडी... म्हणून सर्व करावं लागते हा मला बिचारीला.. " सुप्रीने उसासा सोडला. 
" गप्प गं येडे... पकाव कुठली... तुम्ही जा अमोल सर.. " संजनाने सुप्रीला चापटी मारली. 
" एक मिनिट !! सर काय बोलता सारखं सारखं.. तुमच्या एवढाच आहे ना मी .. अमोल बोला फक्त... only अमोल.. माझ्या पप्पांना सर बोलता तेव्हढं पुरे... " अमोल हसत बोलला. 
" नको बाबा... उगाच तुमच्या बाबांनी , अमोल बोलताना ऐकलं तर पगार कापायचे, एकतर गरीब माणसं आम्ही.. त्यात पैसे कापले तर काय करायचं.. " सुप्री . अमोलला हसायला आलं. तसे या दोघीही हसू लागल्या. 

                      बोलत बोलत तिघेही ऑफिसच्या बाहेर आले. यांची scooty तर अमोलची मोठी , वजनदार बुलेट... त्याची भटकंतीची जोडीदार होती ती बुलेट. एकटाच तर कधी ग्रुपने फिरायचा तो. इतकंच काय, आई शिवाय त्याने त्या बुलेट वर कोणा दुसऱ्या स्रीला बसू दिलं नव्हतं त्यावर. आज प्रथमच कोणा वेगळ्या मुलीला म्हणजेच सुप्रीला तो मान मिळत होता. नाही म्हणाली ना.. अमोल बिल्कुल वाईट वाटलं नाही. दोघी गेल्या त्याला Bye करून. नजरेआड होईपर्यंत तो सुप्रीला पाहत होता. " कशी मुलगी आहे ना... वेगळीच.... नकार सुद्धा एवढ्या style ने दिला कि दिल खुश हो गया... " मनोमन खुश होतं त्याने हेल्मेट घातलं आणि खुशीतच घराकडे निघाला. 

                     संजनाने सुप्रीला घरी सोडलं. ऑफिसमधे जरी काही दाखवलं नसलं तरी तिने कोमल-संजनाचं बोलणं ऐकलं होतं. आकाशची आठवण झाली तिला. आणि तो दिवसही आठवला. फ्रेश होऊन खिडकीसमोर बसली होती सुप्री. आकाशच्या आठवणी जाग्या झाल्या. " आई !! मी गच्चीवर आहे. " म्हणत ती गच्चीवर आली. मे महिन्याची संध्याकाळ ती. थोडासा वारा वाहत होता. ढगांचे तर नामोनिशाण नाही आभाळात. सुप्री पुन्हा तेच आठवू लागली... " तो " दिवस.. !! 

                     गेल्यावर्षी जून मध्ये पाऊस कमी पडलेला , त्यामुळे वातावरणात म्हणावा तसा थंडावा नव्हता. आकाशने सुद्धा "भटकंती" ला जाण्याआधीच... " जूनमध्ये पाऊस कमी असेल " असं भाकीत केलं होतं. म्हणूनच जुलै मध्ये सर्व ग्रुप सोबत फिरायचा प्लॅन तयार होता त्याचा. परंतु जून महिन्यात १५ तारखे पर्यंत येतो म्हणून सांगून गेलेला आकाश, १ जुलै उजडाला तरी आलाच नाही. सुप्री त्याचाच विचार करत तिच्या सोसायटी बाहेर उभी होती, संजनाची वाट बघत. त्यात आभाळ काळवंडलेले होते. वारा हळूहळू वेग पकडत होता. आकाश सोबत २ वर्षांचा अनुभव होता तिला. त्यावरून तिने " वादळाची शक्यता आहे " असं स्वतःलाच सांगितलं. संजना जरा उशिराने आली scooty घेऊन. ट्राफिक लागलेलं ना. दोघी निघाल्या तस पुढेही ट्राफिक लागलं. या सर्वामुळे ऑफिसला अर्धा - पाऊण तास उशीरा पोहोचल्या दोघी.  

" काय ग संजू !! जरा लवकर आली असती तर काय झालं असतं. जवळ जवळ १ तास उशीर झाला आपल्याला आज. आता बॉस पासून गणूचं वाचवेल आपल्याला... " सुप्रीने डोळे बंद करत हात जोडले. " ये नौटंकी.. चल... आधीच उशीर झाला आहे. त्यात तुझी नाटक नको सुरु.. काय... " संजनाने गाडी पट्कन स्टँडला लावली. दोघी धावत वर आल्या. पण काहीतरी विचित्र होतं आज. कुजबुज... त्याचाच आवाज पहिला आला कानावर. वर येईपर्यंत सगळीकडे गर्दी दिसली त्या दोघींना. गर्दी होती आकाशच्या ऑफिस बाहेर. त्या गर्दीत तर सुप्री, संजनाच्या ऑफिस मधले. मित्र -मैत्रीणी सुद्धा होत्या. मुलींच्या डोळ्यात पाणी. मुलांचे चेहरे दुःखी. काहीतरी झालंय नक्की. सुप्रीने अंदाज लावला. दोघी जश्या या गर्दी समोर आल्या, तसे काही डोळे आणखी पाझरू लागले. खास करून , सुप्रीच्या ऑफिसच्या मैत्रिणी. 

काय चाललंय... सुप्री पुढे आली, गर्दीतून वाट काढत. समोर आकाशची आई रडत बसली होती. वडील सुद्धा दुःखी-कष्टी वाटतं होते. म्हणजे आकाश !! .... सुप्री तडक आकाशच्या आई जवळ गेली. " आई .... काय झालं ... का रडतं आहात तुम्ही... " आई सुप्रीला बघून आणखी रडू लागली. बाकीचे सुद्धा शांत झाले अचानक. " अरे !! काय झालं .. का रडत आहात तुम्ही.. " सुप्री मोठयाने ओरडली. तसं, तिच्या मागून... सुप्रीच्या ऑफिस मधली, त्यातल्या त्यात मोठी असलेली एक मुलगी पुढे आली. तीही रडत होती. पण त्यावेळेस तिने अश्रू थांबवले. सुप्री जवळ आली. " सुप्रिया... आकाश... आकाश नाही राहिला आपल्यात.. सोडून गेला तो सर्वाना ... " ती पुन्हा रडू लागली सांगताना. 

" मैत्रीण आहेस म्हणून काही पण बोलू नकोस हा... मस्करीची हद्द असते... पार करू नकोस... समजलं ना. " सुप्रीने तिला दूर केलं. एव्हाना संजनाला कळलं होतं ते. तिचाही विश्वास बसेना. शब्दच येतं नव्हते तिच्या तोंडातून. पण सुप्रीला किती मोठा धक्का बसला असेल. हा विचार करून तिने स्वतःला सावरलं. त्यात सुप्रीचा चढलेला आवाज ऐकला तिने. आपणचं सांभाळू शकतो तिला. जलद गतीने पुढे आली संजना. 
" सुप्री !! ऐक... खरं सांगत आहेत ते.. मान्य कर.. " ,
" गप गं... तो जाईलच कसा... तुझी पण चेष्टा -मस्करी खूप झाली. संजू.. शांत बस.. " पुन्हा चढलेला आवाज. डोळ्यात पाणी तर जमा झालेलं होतं तिच्या. पण तयारच होतं नव्हती सुप्रिया. शेवटी आकाशची आई तिच्या समोर आली. दोन्ही हातांनी सुप्रीचे खांदे घट्ट पकडले. 
" सुप्रिया !! नीट ऐक.... आकाश नाही आहे या जगात आता. माहिती आहे, हे पचवणं कठीण आहे... पण हेच खरं आहे... तू नाही बदलू शकत त्याला... " तशी सुप्रीला भोवळ आली. पायातले त्राणच निघून गेले. मट्कन खाली बसली. संजनाने तिला पकडलं. तिच्या बाजूला बसली. सुप्रीची नजर शून्यात.. संजना धीर करून बोलली. " पण काय झालं नक्की ?? " आकाशचे बॉस होते तिथे... त्यांनाही अपार दुःख. कोणीतरी बोलावं म्हणून बोलले. 
" काल रात्री मला अनोळखी नंबर वरून फोन आलेला. पोलिसांचा फोन होता तो... रात्री १२.३० ला फोन आलेला. भेटायचं होतं त्यांना, तरी एवढ्या रात्री नको म्हणत ऑफिसचा पत्ता मागितला आणि उद्या सकाळी ८ वाजता येतो असं सांगितलं. तसे ते बरोबर ८ वाजता आले आज. एका ठिकाणी मिनी बसला अपघात झाला होता.. १५ जूनला.. नदीत कोसळली बस.. फक्त ४ लोकं वाचले. बाकीचे सर्व वाहून गेले. त्यात आकाश सुद्धा होता. त्याची ऑफिसची बॅग सापडली त्यांना त्या बुडालेल्या बस मध्ये.. जी बॅग फक्त आकाशला दिली होती... बॅग मध्ये कार्ड सापडलं... ते पोलीस तिथून आलेले सांगायला.. " आणि ते सर रडू लागले. 

               कोणाला काय बोलावं आणि कोणी काय बोलावं, तो बोलल्याप्रमाणे शहरात येण्यास निघाला असावा, असा संजनाने मनातच अंदाज लावला. " आकाश येईल ना परत. " सुप्री खूप वेळाने बोलली. संजना तिच्याकडे पाहून रडत होती. " येईल बोलला होता तो... असा कसा जाईल ... त्याची डायरी सांभाळून ठेव बोलला जाताना... सांभाळली ना... मग येणार तो... खूप फोटो काढूया बोलला होता, म्हणून नवीन मोठा फोटो अल्बम घेतला आपण ... मला नाही पटतं.. तो येईल पुन्हा.... माझ्यासाठी " सुप्री ,संजनाला मोठी मारून रडू लागली. भयानक वातावरण झाले होते. सगळे पांगले थोड्यावेळाने. दोन्ही ऑफिसचं काम बंदच ठेवलं. वाईट झालं ना. काही वेळाने सर्व नॉर्मल झाले. नक्की काय झालं तिथे....  ते विचारण्यासाठी काही जण पोलीस स्टेशनला निघाले. हट्ट करून सुप्री ही सोबत निघाली. पोलिसांनी सांगायला सुरुवात केली. 

" नदीला मोठा पूर आलेला. त्यात रस्ते निसरडे... अचानक ड्रायव्हरचा ताबा सुटला गाडीवरचा. बस पुलावरून जात असताना झालं हे, बस थेट नदीत... पाण्याची ताकद माहीतच असेल सर्वाना... पूर्ण बस वाहून नेली त्या पाण्याने... ",
" मग प्रेतं... I mean ... डेड बॉडी... सापडल्या का तुम्हाला... " आकाशच्या वडिलांनी प्रश्न केला. 
" शक्यंच नव्हतं... तरी गेले १५ दिवस प्रयत्न सुरु आहेत. बस तेवढी सापडली. तिघे -चार जण तेवढे वाचले... कसे ते त्यांनाच माहित... ती बॅग सापडली तुमच्या ऑफिसची... त्यात कार्ड सापडलं ... म्हणून कळवायला आलो तुम्हाला... " पोलिसांनी सांगितलं. 
" म्हणजे तुम्हाला डेड बॉडी सापडल्याचं नाहीत... " एकाने विचारलं. 
" कश्या मिळणार ... सांगा मला तुम्ही... ती नदी अजूनही ओसंडून वाहते आहे.... काय उतरणार पाण्यात ... तरी जीवाची बाजी लावून ती बस तरी बाहेर काढली आमच्या माणसांनी.. मेलेली माणसं एव्हाना खूप दूरवर वाहून गेली असतील. नाहीतर पाण्यातल्या माशांनी खाऊन टाकली असतील. ते वाचले ना... त्यांच्या ओळखीची होती माणसं त्या गाडीत... पट्टीचे पोहोणारे होते त्यात काही... झाले ते पण गुडूप... निसर्ग आणि देवापुढे कोणाचंच काही चालत नाही.. हेच खरं.. " पुन्हा काही डोळे पाणावले. 

" चला .. आम्ही निघतो... ती बॅग सापडली बसमध्ये, एका ठिकाणी अडकून बसली होती. म्हणून कळलं तुमचा माणूस गेला ते... ते सांगायला आलेलो. डेड बॉडी मिळाली तर कळवू. एक फोटो देऊन ठेवा त्याचा. " आकाशच्या वडिलांनी त्याचा फोटो आणला होता सोबत. देऊन टाकला. सगळे निघाले. सुप्री एका ठिकाणी तशीच उभी. 
" काका... मी येऊ का तुमच्या सोबत... " सुप्री त्या पोलिसांना उद्देशून बोलली. 
" कुठे ? " ,
" आकाशला शोधायला.. " ,
" काय वेड-बीड लागला आहे का तुम्हाला... महापूर आला आहे तिथे... ",
" प्लिज .. प्लिज... काका मला सुद्धा घेऊन चला... " सुप्री त्यांच्या पाया पडू लागली. 
" अहो मॅडम... काय तुम्ही हट्ट करता... कुठे सांभाळणार तुम्हाला आम्ही... आमचे प्रयत्न सुरु आहेत ना.. ",
" मी येते तरीही... चला ना घेऊन... " सुप्री रडत रडत बोलत होती. तसे संजना आणि इतर सगळा ग्रुप पुढे आला. 
" हो.. हो.. आम्ही सुद्धा येतो सोबत... तुमच्या मदतीला, घेऊन चला ना.. " सर्वच बोलले. 
" तुमचा कोण लागायचा तो... ? " त्या पोलिसांनी विचारलं. 
" खूप जवळचा होता तो आमच्या ..." संजना ,सुप्रीच्या खांद्यावर हात ठेवतं बोलली. " मित्रांसाठी जीवाला जीव देणार होता तो.. त्याच्यासाठी एवढं तरी केलं पाहिजे ना आम्हाला... तुम्ही घेऊन नाही गेलात तर आम्हाला पत्ता द्या. आम्ही जातो त्याला शोधायला. " सर्वच तयार झाले. पोलिसांनी एकदा सर्वाकडे पाहिलं. 
" ठीक आहे. चला सोबत. पण जास्त अपेक्षा ठेवू नका... आणि स्वतःला अडचणीत टाकू नका. एका व्यक्तीसाठी एवढ्या जीवांची बाजी लावू शकत नाही आम्ही. "  

            पुढच्या दिवशी, सुप्री-संजनाचा सगळा ग्रुप , आकाशचे वडील आणि ते पोलीस असे सगळे निघाले. मजल-दरमजल करत पोहोचले. खरंच नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. अनेक गावे पाण्याखाली गेलेली. कुठे जाऊन शोधणार आकाशला. जवळजवळ १ महिना होतं आलेला आता. त्यात आकाशला पोहोता येत नव्हतं. त्याच्या जिवंत असण्याच्या शक्यता अंधुक झालेल्या. तरी नदीच्या काठा-काठाने रोज सगळेच शोधकार्य करायचे. सरतेशेवटी, दोन महिन्यांनी पोलिसांनी शोधकार्य थांबवलं. पुढे शोधण्यात काहीच अर्थ नव्हता. शहरातले सर्व पुन्हा घरी निघाले. जाता - जाता वाचलेल्या लोकांना भेटून जाऊ असं ठरलं. 

" एक होता बस मध्ये... त्याने वाचवलं आम्हाला... " एकाने सांगितलं. 
" कोण होता... ",
" माहित नाही.. त्या बस मध्ये एकच होता शहरातला.. मोठी बॅग पाठीला.. गळ्यात कॅमेरा.. बस पाण्यात गेल्यावर त्यानेच तर मागचा दरवाजा उघडला. स्वतः बाहेर जाऊ शकला आता तो, पण त्याने आम्हाला बाहेर काढलं आधी. पाण्याचा वेग एवढा होता कि आम्ही ३-४ जणच बाहेर आलो. बाकीचे त्या बस बाहेर आले पण वाहून गेले. आम्हाला वाचवणारा सुद्धा वाहून जाताना पाहिलं मी... " संजनाने ओळखलं. आकाश असावा. आकाशचा फोटो दाखवला तिने. 
" हो... हाच होता तो, वाचला पाहिजे होता. " खात्री पटली होती. आकाश खरंच नाही आपल्यात, सर्वात महत्त्वाचं कि सुप्रीने मान्य केलेलं. निर्विकार चेहऱ्याने सर्वच शहरात आले. 

                  सुप्रीच्या डोळ्यासमोरून तो कालावधी , एखाद्या सिनेमा प्रमाणे झर्रकन निघून गेला. डोळ्यात पाणी आलं. आकाशने सांगितलं होतं ना, रडायचं नाही कधी... प्रॉमिस केलेलं ना... सॉरी आकाश... नाही रडणार.. तिने वर आभाळाकडे पाहत मनात म्हटलं. तसंच डोळ्यात आलेलं पाणी पुसून टाकलं. आणि गच्चीवरून खाली आली. 

                  तिकडे , कोमलला करमत नव्हतं. संजनाला भेटून आल्यापासून, ती तळमळत होती. शिवाय काही माहिती तिला मिळाली होती. संजनाला भेटलंच पाहिजे, म्हणत तिने फोन लावला. 
" हॅलो संजना, मी कोमल.. ओळखलं का.. १५ दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो... ",
" हो हो... आठवलं ना.. बोल तू... " ,
" मला भेटायचं होतं.. येऊ का... " ,
" हो.. ये ना.. ऑफिस मधेच ये.. ",
" उद्याच येते.. " कोमल आणि संजनाचे संभाषण जलद संपले. दुसऱ्या दिवशी, सकाळीच कोमल संजनाला भेटायला आली. 
" सुप्रियाला बोलवतेस का ? " कोमलने पहिला प्रश्न केला. 
" ती कशाला ? " ,
" तीची गरज आहे... प्लिज.. बोलावतेस का तिला " संजनाने सुप्रियाला बोलावलं. 

" थेट पॉईंट वर येते. " कोमल. " माझी एक मैत्रीण आहे, ती आताच २ दिवसापूर्वी शहरात आली, गावाला गेली होती. " ,
" बरं .. पुढे.. " सुप्री. 
" तर ती सांगत होती... एका व्यक्तीबद्दल,.......  म्हणे तिथे तो फेमस आहे सध्या... " ,
" कोण.. आकाश का... " संजनाने घाईत विचारलं. 
" नाही...  but वाटलं तसं... म्हणून सांगायला आले तुला...वेडा भटक्या बोलतात गावात त्याला सगळे...",
" वेडा भटक्या ?? " सुप्री. 
" हो... वाढलेली दाढी, मानेपर्यंत वाढलेले केस, कधी कधी समोर चेहऱ्यावर येतात केस , एवढे मोठे वाढलेले केस... कपडे, जीन्स आणि शर्ट... ते हि मळलेले... म्हणजे एखाद्या साधूला जर शहरातले कपडे घातले ना... तर तो कसा दिसेल हे इमॅजिन कर... पाठीला सॅक... ते ट्रेकिंग साठी असते ना तशीच... त्यात त्याचे कपडे असतात असं लोकं बोलतात. आणि गळ्यात एक तुटलेला, बिघडलेला कॅमेरा. शिवाय काही जुनं लक्षात नाही त्याच्या. म्हणून वेडा... काही पण बडबडत असतो......  आणि एका गावातून दुसऱ्या गावात असा फिरत असतो तो... म्हणून भटक्या... असा तो वेडा भटक्या.. " कोमलने बोलणं पूर्ण केलं. 
" कॅमेरा !! कॅमेरा बोललीस का तू... " संजना आनंदात बोलली. 
" हो ... पण बिघडलेला आहे तो.. तिने जसं वर्णन केलं तसंच सांगितलं मी. ", 
" त्याचा फोटो वगैरे. " संजना.... सुप्री एवढा वेळ शांत ऐकत होती फक्त. 
" नाही.. तो जास्त थांबत नाही एका ठिकाणी... आणि ती बोलली कि , मराठी एवढा छान बोलतो कि गावातला किंवा साधू वाटत नाही तो.. गावा - गावात फिरून लोकांना मदत करतो, चांगली काम करायला सांगतो. झाडं लावायला सांगतो.. पाणी कसं वाचवायचे ते सांगतो.. आता पर्यंत किती तरी ठिकाणी त्यांनी असं छान छान कामे करून ठेवली आहेत.. म्हणून फेमस झाला आहे तो... लोकांना पटते त्याचे बोलणे... पण त्याचं काम झालं कि निघून जातो. अचानक गायब होतो... कसा जातो माहित नाही. गावातल्या बसमधले ड्रायव्हर सुद्धा त्याला ओळखतात आता, तिकीट न काढताच फिरत असतो तो. असा आहे तो... फोटो काढायचा प्रयन्त केला तिने.. पण तोपर्यंत गेलेला तो... " ,
" म्हणजे तुझं म्हणणं आहे कि तो आकाश.... " संजना मधेच बोलली. सुप्रीने थांबवलं तिला. 
" थांब संजू... मला बोलू दे... पहिली गोष्ट, कोमल.... गेल्या एका वर्षातली , हि पाचवी घटना आहे. कोणीतरी येते सांगत, आकाश सारखा दिसला होता... मग पुन्हा शोध सुरु... हातात अपयश येते फक्त. त्यानंतर , हे जे वर्णन सांगितल ना तू... वेडा भटक्या वगैरे... तर तो आकाश असणं शक्यच नाही... दाढी , ती पण साधू एवढी... आकाश , तो किती clean असायचा.. तुम्ही होता ना ४ दिवस एकत्र.. तुही बघितलं असशील ना.. केस वगैरे कापलेले, दाढी केलेली असायची... चल , ते एक वेळ मानू शकते. but तुटलेला , बिघडलेला कॅमेरा... ते possible च  नाही. जिवापेक्षा जास्त जपायचा तो कॅमेरा... त्याचा जीवच होता त्या कॅमेरा मध्ये... so, मी आधीच मान्य केलं आहे आकाशचे नसणे. तुम्ही हि तसंच समजा . " , 
" तरीही.. " कोमल 
" मला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी निघाली आहे... मला वाटलं तुम्ही येणार माझ्या सोबत... ",
" हो.. मी तयार आहे .. " संजना 
" तुम्हाला जायचे असेल तर जा तुम्ही ... " सुप्री बोलली.  

" कोण कुठे निघालं आहे ? " अमोल आला तितक्यात. अमोलला काहीच सांगायच नव्हतं. तो आला समोर, काय सांगावं... सुप्री समोर प्रश्न..
" काही नाही सर , फिरायला निघायचा प्लॅन करतो आहे. ... पिकनिक... " ,
" wow  !! very nice.. जाऊ या ना सगळेच... कुठे जायचे आहे... मी सुद्धा येतो... " अमोल खुशीत बोलला. 
आली का पंचाईत . अमोलला काय सांगावं आता. तरीही सुट्टी घ्यावी लागेलच ना, जायचे असेल तर... 
" हि माझी मैत्रीण कोमल... travelling करत असते. ती निघाली होती पुन्हा... तर तिच्यासोबत जायचा विचार होता. " संजना अडखळत बोलली. 
" चालेल ना... जाऊया सर्वच... कोण कोण येणार आहे ते ठरवा. मी पप्पांची permission घेऊन येतो. " अमोल गेला. संजनाने लगेच तिच्या भटकंतीच्या ग्रुपची मिटिंग घेतली. सोबत कोमल होतीच. सुप्री मात्र या सर्वापासून अलिप्त होती. 

संजनाने तिचं म्हणणं , सर्व ग्रुप समोर मांडलं. निदान एक शेवटचा प्रयत्न म्हणून सगळेच तयार झाले. फक्त अमोल काय बोलतो त्यावर मात्र हे सगळं अवलंबून होते... अमोल काही वेळाने बॉसच्या म्हणजे त्याच्या वडिलांच्या केबिनमधून बाहेर आला. सगळ्यांसोबत बसला. 
" काय झालं अमोल सर... " संजनाने विचारलं. 
" खूप मोठी गुड न्यूज आहे.. आपल्याला permission मिळाली. " अमोल आनंदांत बोलला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. 
" आणि किती दिवस माहित आहे का... २० दिवस... कदाचित महिनाभर सुद्धा... " ,
" कसं काय ? " एकाने विचारलं. 
" पप्पा , महिन्याभरासाठी दिल्लीला निघाले आहेत.. आपल्या दिल्ली ब्रांचला... तर महिनाभर नाहीत ते... त्यात आपल्या ब्रांच चा बिसनेस गेल्या ६ महिन्यात इतर ब्रांच पेक्षा जास्त झाला आहे. मग सुट्टीच विचारलं तर पप्पा बोलले, घ्या सुट्टी... खूप दिवस सगळेच वेळेवर ,आणि विना सुट्टी येतात... बोलले कि मीच सांगणार होतो जा फिरायला कुठेतरी.. बंद राहू दे ऑफिस... काहीच टेन्शन नाही... मस्त ना...  " साऱ्यांना आनंद झाला. इतके दिवस मिळतील शोध-शोध करायला. बरं झालं... 

" मग कुठे जायचे... एखाद्या हिल स्टेशन वर.... मज्जा येईल... " अमोल आता पासूनच उत्साही होता. 
" actually .... आमचा प्लॅन ठरला आहे कुठे जायचा ते... " कोमल बोलली. 
" आपण सगळे राना-वनात जाणार आहोत... " एक मुलगी मागून बोलली. 
" मी जरा confused आहे.. आपण पिकनिकला चाललो आहोत ... right ??  मग जंगलात .. मला काही कळलं नाही.... " अमोल. 
" मी सांगते... " संजना. " आम्ही आधीही असे फिरलो आहे खूप.. जंगलातून, रानातून... सांगायचं झालं तर एक प्रकारचं ट्रेकिंग.. ",
" wow !! मी सुद्धा फिरलो आहे खूप... but हे जरा वेगळं आणि adventures वाटते... By the way, इतके दिवस जाणार आपण... राहायची सोय, जेवणाचे... अंघोळ... या गोष्टी...  ?? " अमोलने प्रश्न विचारून टाकले. 
" गावागावातून फिरणार ना... तिथे अंघोळ , जेवणाची सोय होते... राहायचे सांगायचे तर tent मध्ये राहायचे... " कोमलने माहिती पुरवली. 
" ग्रेट... सॉलिड होणार आहे हि पिकनिक... मी आताच्या आता तयार आहे निघायला..... बोला कधी निघायचं... " अमोल. 
" आज तारीख आहे २२ मे.... आपण तयारी करूया सर्व... या येत्या ३-४ दिवसात ... ह्म्म्म.... २६ मे ला निघूया... " कोमलने तारीख ठरवली. 

आणखी काही बोलणी करून , कोमल निघून गेली. अमोल सहित सगळेच उत्साहात. अमोल "पहिल्यांदा असं ट्रेकिंग"  करणार होता म्हणून, बाकीचे... आकाशसाठी आणि खूप दिवसांनी फिरायला मिळणार म्हणून आनंदांत. एकटी सुप्री तेवढी गप्प होती. अमोलने ओळखल. सर्व आपापल्या कामाला लागले. जेवणाच्या वेळी सुद्धा नेहमीपेक्षा शांत होती ती. जेवणाच्या सुट्टी नंतर पुन्हा सगळे कामाला लागले. अमोल आला सुप्री समोर. 

" काय मॅडम ... बरं वाटतं नाही का... " सुप्रीने कामातून डोकं वर काढलं. 
" हो... बरी आहे मी... मला कशाला आजारी पडता. ", 
" मग, एवढे सर्व खुश आहेत पिकनिक साठी... तुझ्या चेहऱ्यावर साधीशी smile सुद्धा नाही. असं का ? " अमोलने विचारलं. सुप्रीला या विषयावर बोलायचं नव्हतं. काही कारण द्यावे लागेल याला , बोलावं लागलं. 
" मी गरीब आहे ना ... मला सोडणार नाहीत घरातले... एवढा खर्च जमणार नाही मला. " तोंड कसनुसं करत बोलली सुप्री. अमोलला पुन्हा हसायला आलं. 
" हो, गरीब आहेस ना... माहित आहे मला.. " हसला परत. 
" हसा... अजून हसा... बघ रे गणू... गरीब माणसांवर हसतात लोकं... " सुप्री. हसू आवरत अमोल बोलला मग, 
" टेन्शन घेऊ नकोस... पैशाची व्यवस्था मी करतो... तुझ्या घरी येतो पाहिजे तर ... तुझ्या घरच्यांना तयार करतो. झालं मग.... address दे तुझा... " ,
" कमी असली तरी अक्कल आहे ... बरं का... address मागायची चांगली आयडिया होती... but डिटेक्टिव्ह सुप्री को फसाना आसान नही... " सुप्रीच हे बोलणं ऐकून केवढ्याने हसला अमोल.... खरच कमाल आहे हि मुलगी... 
" ok.... ok, तू नाही जात ना... मी हि cancel करतो मग.. या बाकीच्या लोकांना जाऊ दे... " अमोल हसू आवरत बोलला. 
" अरे ... काय होतंय नक्की... मला खरंच नाही वाटत , मी जाऊ शकेन या पिकनिकला.. " सुप्री. 
" चालेल ना... मी सुद्धा घरीच थांबतो... " इतक्यात संजना आली. 
" का घरी थांबता सर... सकाळी तर तयार होतात तुम्ही... आता काय झालं.. " संजना विचारात पडली. 
" तुझी best friend येतं नाही... म्हणून मी सुद्धा cancel करतो आहे... खरं सांग सुप्रिया.... मी येतो आहे म्हणून तू जात नाहीस ना... तसेही सांगू शकतेस... तुम्ही जा... मी थांबतो... " अमोल बोलला.  
" प्लिज... सर, misunderstanding करू नका , असं काही नाही... आणि हे मनात आणूच नका कधी... कि तुमच्यामुळे असं आहे... ",
" असेल सुद्धा... " ,
" नाही.... ठीक आहे... मी माझा विचार कळवते २ दिवसात .. " सुप्री मान खाली करत म्हणाली. 
" अमोल सर, आज पासूनच तयारी करा हा... वेळ मिळत नाही... सुप्री येईल नक्की... मी तयार करते तिला. " संजना कडून प्रॉमिस घेऊन अमोल निघाला. सुप्री ना संजना कडे बघत होती ना कोणाकडे. उगाचच काम करायचं नाटक करत होती. पण लक्ष दुसरीकडेच होतं. 

अखेर २५ मे आला. सर्वानी तयारी तर भक्कम केलेली. तरीसुद्धा शेवटच्या दिवशी काम केलेच पाहिजे , म्हणून सर्व ऑफिस मध्ये आलेले. अमोल सुप्रीचीच वाट बघत होता. त्या दोघी जश्या आल्या तसा तो लगेच त्याच्याशी बोलायला आला. 
" काय मग ... येणार ना उद्या... " सुप्रीलाच पहिला प्रश्न. 
" येते आहे.. माझ्यामूळे लोकांना misunderstanding होते. म्हणून तयार झाले. उगाच गरीब आहे म्हणून नावं ठेवतात लोकं . " अमोलला काय बोलावं कळेना, हसू लागला. 
" बरं ... सॉरी बाबा.. पण थँक्स... तू तयार झालीस... तुझ्याशिवाय मज्जाच आली नसती तिथे " ,
" मी काय जोकर आहे का ? " सुप्रीच्या त्या डायलॉग वर पुन्हा हसू लागला अमोल. कुठेतरी फिरायला जातो आहे , त्याही पेक्षा सुप्री असेल इतके दिवस सोबत याचाच आनंद जास्त होता त्याला. 

काही मुलं-मुली ," उद्या कुठे आणि किती वाजता भेटायचं " हे ठरवून दुपारीच निघून गेले. अमोल सुद्धा जेवून निघून गेला. सुप्री-संजना आणि काही मंडळी होती अजूनही. त्यात आज आभाळात ढगांची लगबग सुरु झाली होती. यंदा पाऊस लवकर आहे , असा सुप्रीचा अंदाज. अमोल आनंदात घरी परतला. आज घामाच्या धारा नव्हत्या चेहऱ्यावर, वेगळाच अस्मानी आनंद होता चेहऱ्यावर. सुप्रीला अजूनही जवळून अनुभवायला मिळेल. असा विचार त्याच्या मनात आला. तयारी करत होता घरी, मधेच काही आठवून हसे अमोल. अमोलची आई कधी पासून पाहत होती .
" काय गं आई... काय बघतेस... " अमोलने विचारलं. 
" काय करतो आहेस नक्की.. " आईने विचारलं. 
" काय म्हणजे... लगेच विसरलीस का ,.... ट्रेकिंग , पिकनिकला जातो आहे मी... काय यार आई... लक्षात राहत नाही तुझ्या... म्हातारी झालीस , वय झालं तुझं .." अमोल आईला चिडवत म्हणाला. 
" मी म्हातारी झाली आणि तू तरुण झालास.. " आई हसत म्हणाली. " कधी पासून बघते आहे तुला.. मधेच काय हसतोस... एकटाच... हल्ली स्वतःच्याच विश्वात असतोस. आणि पहिल्यापेक्षा जास्त खुश, आनंदी असतोस... कोण भेटली आहे तुला.. " आईने सरळचं विचारलं. 

" ohh, come on आई.. असं काही नाही... तू पण ना... " अमोलच्या चेहरावर दिसतं होतं सगळं. 
" हे बघ.. एवढ्या उत्साहात तुझी तयारी सुरु आहे. तू काही पहिल्यांदा चालला नाहीस कुठे फिरायला. पण या वेळेस लक्षण वेगळी आहेत. तुझी आई आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त ओळखते तुला... तू काही वेगळं म्हणत असशील, पण मला माहित आहे... तुला काय झालं आहे ते.. " आई मोठ्या खुशीने बोलत होती. अमोलने तयारी थांबवली. 
" डॉक्टर साहेब ... सांगा काय झालं आहे मला... " अमोल हाताची घडी घालून उभा राहिला. 
" प्रेमात पडला आहेस, प्रेमरोग म्हणतात याला... " आईने अमोलच्या केसातून हात फिरवला आणि 
हसतच आत निघून गेली. काय बोलून गेली आई, खरंच का.. असं झालं आहे का... अमोल विचारात हरवून गेला. 

संध्याकाळचे ५ वाजले तसे, ऑफिसमध्ये जे थांबले होते ते निघाले घरी. सुप्री, संजना सर्वात शेवटी निघाल्या. संजना scooty सुरु करत होती. 
" संजना... बोलू का जरा... " सुप्री 
" बोल .. " संजनाने सुरु केलेली गाडी बंद केली. 
" खरचं गरज होती का.. " ,
" कसली गरज.. ? " ,
" हेच ... सर्व पुन्हा, तेच तेच... " सुप्री.. 
" स्पष्ट बोल सुप्रिया... " संजना हाताची घडी घालत बोलली. 
" ६ महिन्यापुर्वीच आपण पाचवा आणि शेवटचा प्रयन्त केला. त्याआधी पासूनच आपल्याला यात अपयश येते आहे. आणि उद्या पुन्हा आपण निघत आहोत. खरंच गरज होती का याची...आकाशचे नसणे , हे मी कधीच मान्य केलं आहे.. तू का करत नाहीस. " सुप्री जरा रागात बोलली. 
" मला माहित होतं कि त्यादिवशीही राग आलेला तुला आणि आजही रागात आहेस... आकाशचे असे जाणे , तुला धक्का बसला तसा मलाही... माझासुद्धा तो होता ना कोणीतरी.. म्हणून हे सगळं.. देवापुढे कोणाचं चालत नाही, तरी १ टक्का शक्यता असली तरी मी प्रयन्त करणार. कारण आकाशच बोलायचा ना ट्रेकिंग करताना... प्रयन्त केले तर अगदी १ टक्क्याने सुद्धा यश मिळते... ९९ टक्के अपयशापेक्षा १ टक्का यश ग्रेट असते. आठवलं ना तुला... हेचं... असचं बोलायचा तो... असा मित्र मला गमवायचा नाही आणि गमावणार सुद्धा नाही... यापुढे तुझा निर्णय... यायचं असेल तर उद्या सकाळी ठरलेल्या ठिकाणी ये... " संजनाने गाडी सुरु केली. सुप्रीचा चेहरा नाराजीने भरलेला. शांतपणे संजनाच्या मागे बसली.  

                 पाचचं मिनिटे झाली असतील. एका वळणावर सुप्रीने संजनाला थांबायला सांगितलं. तिथे एक कॅफे होता. संजनाने गाडी थांबवली. " सॉरी सुप्री.. पण जमलं तर ये उद्या वेळेवर .. " संजना निघून गेली. वारा सुटलेला.. थंडगार.. खाली जमलेला पाला-पाचोळा उडवत होता वारा... पाऊस नव्हता तरी वर आभाळात जमलेल्या ढगांमुळे वातावरण थंड झाले होते. सुप्री कॅफेकडे निघाली. हे आकाशचे , शहरातले आवडते ठिकाण. actually, कॅफे नावालाच.... मोठी library होती ती... हवं ते पुस्तक निवडायचं... एक कॉफी घेयाची आणि जितका वेळ वाटेल तेवढा वेळ पुस्तक वाचत बसायचं. त्यात ऐसपैस जागा होती. मागे बगीच्या, त्यात झाडं सुद्धा होती. विचित्र होता काहीसा तो कॅफे, त्यामुळे जास्त कोणी नसायचं तिथे. म्हणून आकाश यायचा तिथे... कधी पुस्तक वाचायला तर कधी स्वतःच काम करायला यायचा... त्याने क्लिक केलेल्या फोटोवर काम करत बसायचा. शिवाय, तिथे एक आवडीची जागा होती आकाशची... एका झाडाखाली, एक लहानसं ,छानसं टेबल होते ते. दोन वर्षात सुप्री आकाश सोबत खूप वेळा येऊन गेली होती तिथे. त्यामुळे तीही ओळखीची झाली होती. कॅफेच्या मालकाने तर ते टेबल " Reserved table " म्हणूनचं ठेवलं होतं. आकाशने सांगून ठेवलं होतं, मी नसताना सुप्री आली तर तीला या टेबलवर बसू द्या. आणि तसेच होते, आकाश गेल्यावर सुद्धा सुप्री  यायची इथे.. त्याची आठवण झाली कि... 

             आजतर, सोबतीला भरलेलं आभाळ सुद्धा होतं. सुप्री त्याच ठिकाणी येऊन बसली. कॉफीचा कप न सांगताच हजर झाला. तसं आकाशने सांगून ठेवलं होतं. किती वेळ बोलत बसायचो आम्ही... सुप्रीने कॉफीचा कप ओठांना लावला. 

" काय गं.. आल्या आल्या कॉफी पिण्यास सुरवात का... " आकाश बोलला. 
" का... ओ... मिस्टर 'A'.... चुकीच आहे का काही... " सुप्री लाडात बोलली. 
" चुकीचं नाही... पण कसं आहे ना.. कॉफी कशी, आपल्याआप मिसळू द्यावी... त्याला जरा वेळ लागतो... छान सुवास येतो त्यानंतर... जराश्या गरम गरम वाफा चेहऱ्यावर घेयाच्या... मग, त्यानंतर पहिला घोट घ्यावा.. हि एक प्रकारची style आहे .. " आकाश डोळे बंद करून , स्वतः feel करत बोलत होता.
" हो का सर.... पुढच्या वेळेला अक्कल दे रे गणू मला... " सुप्रीने वर आभाळाकडे पाहत हात जोडले. दोघेही हसू लागले. 

               अचानक आठवण झाली त्या प्रसंगाची. कप हातातच राहिला तिच्या, प्रत्येक वेळेस काही वेगळं शोधायचा.. प्रत्येक गोष्टीत... वेगळ्याच जगात निघून गेला. एकदा रात्रीचे येऊन बसलेले दोघे... साधारण रात्रीचे ९ वाजले असतील.... पौर्णिमा होती, त्यात कॅफे मधले दिवे गेलेले. या दोघांना कुठे जायचे नव्हते, शेवटी मालकाने मेणबत्ती लावून दिली. काय रोमँटिक वातावरण होतं ते... ती रात्र संपूच नये असं वाटतं होते सुप्रीला. पण काय करणार ना... वेळ पुढे धावतचं असतो ना... घरी जावंचं लागणार ना... तशी सुप्री निघाली.. " चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले.... " मागून आकाश गाणे गात होता. " गप्प रे... घरी ओरडतील नाहीतर... तुही जा घरी... उद्या जायचे आहे ना तुला... फोटोग्राफीला.. " सुप्री निघाली. तसा त्याने सुप्रीचा हात पकडला. सुप्रीने गाणं सुरु केलं. " चांदण्यात फिरताना माझा धरलास हात... सखया रे... आवर हि सावर हि चांद रात... " 

               पुन्हा आठवण, त्यात पावसाच्या ढगांनी आभाळ भरत चाललं होतं. थंड गार वारा... मागे असलेल्या झाडाच्या पानांची प्रचंड सळसळ... " आठवणी काढू नये... किती वेळा सांगितलं तरी आमच्या येडीला कधी कळणार हे त्या गणूलाच माहित... " आकाशने टपली मारली सुप्रीच्या. क्षणभरासाठी, तिला आकाश शेजारीच बसला आहे असा भास झाला. सर्वच आठवणी उफाळून बाहेर येण्याचा प्रयन्त करत होत्या. नको थांबायला येथे... घड्याळात पाहिलं... संध्याकाळचे ५:३० वाजतं होते. सुप्री उभी राहिली, पुढे जाणार तर कोणीतरी ओढणी पकडून ठेवलेली... आकाश मुद्दाम कधी सुप्रीची ओढणी गुपचूप टेबलला बांधून ठेवायचा... आनंदाने सुप्रीने मागे पाहिलं. मगाशी आलेल्या वाऱ्याच्या झोताने , ओढणी टेबलाला गुंडाळली होती. पुन्हा थंडगार हवा आली. शहारून गेली सुप्री. कॉफीच्या कपातील वादळ.. तिने तसंच अर्धवट सोडलं आणि निघून गेली ती.  

            अमोलची तयारी होतं आलेली. आनंदात तर होताच, त्यात आईने वेगळीच सुई टोचली होती त्याच्या मनाला. प्रेमाची सुई... बाहेर थंड वारा सुटला होताच.." आई !! एक कप कॉफी प्लिज... " अमोलने ऑर्डर सोडली. पाचच मिनिटात आई कॉफी घेऊन आली.. " घ्या साहेब !! " अमोल वेगळ्याचं दुनियेत... आईने टपली मारली त्याच्या डोक्यावर. अमोल कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत आला. त्याला तर अजूनही कळतं नव्हतं, खरंच....  हे प्रेम आहे का..आधी कसं कळलं नाही मला.. . एवढा मूर्ख आहे का मी... असेल प्रेम... सांगून टाकू का तिला..नको... एवढ्यात नको... तिला अजून समजून घेऊ.. अमोल स्वतःच्या विचारात... एका थंड हवेच्या झोताने त्याला शहारून टाकलं. तसा अमोल जागा झाला. हसला स्वतःशीच. हातातला कॉफीचा कप, आभाळात भरून आलेल्या ढगांकडे करत ," cheers " केलं त्याने... आणि पुन्हा हरवून गेला कुठेतरी. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------

म्हणतात, गावात शहरापेक्षा आधीच पाऊस सुरु होतो... गावातला खडबडीत रस्ता, त्यात आपल्याच धुंदीत सुरु असलेली लाल रंगाची S. T. ची बस... वातावरण पावसाळी, बसमध्ये बसलेली मंडळी पावसाची वाट बघत होते. " यंदा चांगला पावूस व्हायला पायजेल ना..." ,
" व्हयं व्हयं... " तसा मागून एक जण उठला. 
" व्हयं रं भटक्या... तुजा ठिकाणं यायला टाइम हाय अजून.. " एक गावकरी बोलला. 
" आजोबा... पाऊस येतो आहे ना... म्हणून दरवाजात जाऊन उभा राहतो.. तुम्ही कधी पाऊस बघितला आहे का... " म्हणत "भटक्या" पुढे गेला. 
" हे येडं कधी आलं बसमध्ये .. पावूस बघितला काय म्हणतंय... काय बोलायचं येडयाला... " एक जण... 
" आरं ... मागे झोपलं होतं ते बेणं... पावूस येतो हाय ना... पावसात जीव अडकला हाय त्याचा.. म्हणून गेला पावूस बघायला.. " दोघेही हसले. 

वेड्या भटक्याने ऐकलं ते. पाऊस आणि मी खूप आधी पासून मित्र आहोत .. यांना काय कळणार फरक. पाऊस कसा बघायचा असतो ते. त्याने चालत्या गाडीचा दरवाजा उघडला. समोर सूर्यास्त होतं होता आणि गाडीच्या मागून पाऊस येतं होता. दोन वेगळे ऋतू एकाच वेळेस.. पुढच्या ५ मिनिटात पावसाने गाठलं गाडीला. त्याने हात बाहेर काढून पावसाला "स्पर्श" केला. नंतर चेहरा बाहेर काढून गालावर, डोळ्यावर पावसाचे थेंब झेलले.          " पाऊस बघायची " सवय , नजर सगळ्यांकडे नसते... त्याला अनुभव लागतो... भटकंतीचा... त्याच्या चेहऱ्यावर केस आलेले.. वाऱ्याच्या एका थंडगार झुळूकेने केस बाजूला केले. हसला भटक्या... ओळखीची smile... डोळ्यात ओळखीचा वेडेपणा.... गावातले काहीही नावे देऊ दे त्याला.. पावसाने, त्याच्या मित्राने बरोबर ओळखलं होतं त्याला... आकाश !!




to be continued......................................

Followers