मुंबईला पोहोचले तेव्हा पहाट झालेली. पहाट म्हणजे १० वाजत आलेले. आता ऑफिसमध्ये जाऊन फायदा नाही , म्हणत विवेकने त्याच्या "भाडयाच्या" रूमवर जाण्याचा निर्णय घेतला. पोहोचले हि घरी... " Wow !! that is room... gorgeous.... is the.." संदीप , विवेकच्या राहत असलेल्या रूममध्ये येत म्हणाला. विवेक तसाही वैतागला होता, रात्रभर या दोघांची बडबड ऐकून.... आता पुन्हा संदीपने बोलणं सुरू केलं आणि विवेकने स्वतःच डोकं धरलं.
" काय झालं रे विवेक बाळा ? " प्रियाने लाडिक आवाजात विचारलं.
" डोकं... तुमच्या दोघांच्या बडबडीमुळे झोप लागली नाही... त्यामुळे डोकं दुखते आहे... " विवेक डोक्याला हात लावून बसला होता.
" आता कसलं डोकं दुखते.... डोकं आमच्या वेळेला दुखायचं... " संदीप बोलला.
" प्लिज... प्लिज यार बस कर रे.. खूप डोकं दुखते आहे.. गप्प राहायला काय घेणार... " विवेक वैतागत बोलला.
" हम्म.. चांगला प्रश्न आहे... मला ना... आता काहीतरी खायला दे.. भूक लागली आहे.. बाकी काही पाहिजे असेल तर ते नंतर सांगीन... समाजलाव काय... " संदीपच्या या उत्तराने प्रिया केवढ्या मोठ्याने हसायला लागली. प्रियाचा आवाज ऐकून " शेजारचे काका" गुपचूप आत डोकावून पाहू लागले. विवेक डोकं पकडून बसलेला, प्रिया, संदीप जोरात हसत होते. प्रियाचं लक्ष काकांकडे गेलं. झपकन बाहेर आली. काकांचा हात पकडला आणि त्यांना आतमध्ये ओढत म्हणाली.
" या या काका..... हसतोय आम्ही... बघायला या आत.. " सोबत संदीपसुद्धा, तिला मदत करायला पुढे..
" नको.. कशाला.... कशाला... राहू दे... राहू दे... सोडा मला... सोडा ... सोडा... वाचवा... " काका ओरडत होते.. बऱ्यापैकी काकांना आतमध्ये आणल्यावर सोडून दिला दोघांनी. काका... धडपडत, अडखळत पळूनच गेले.... दोन्ही चप्पला मागे सोडत.
काकांचा तो "अवतार " बघून विवेकलाही हसू आलं. सगळे मिळून हसू लागले. " आता पुन्हा कोणाच्या घरात वाकून बघणार नाहीत... " विवेक बोलला .
" असो.. ऑफिसमध्ये जाऊन सांगावं लागेल मला... सुट्टीसाठी...... शिवाय विमानाची तिकिटे बघावी लागतील, आजच... मला एकतर माहिती नाही विमान प्रवासाचं " विवेक विचार करत म्हणाला.
" एक मिनिट भाऊ... there is friend was of Mumbai... " संदीपचं इंग्लिश.... यावेळेस प्रिया , विवेक.. दोघांनाही काही कळलं नाही.
" अरे ...आपून का friend राहता है... मुंबई मे... वो बघता हे विमान का... " संदीप...
" great !! चला.... सगळी tension मिटली... आता तिकीट काढा आणि दिल्लीला चला.. " प्रिया हाताने " विमान उडायची " acting करू लागली.
" you have to... " संदीप ...
" जरा दोघांनीही शांत बसा.. प्लिज.. जरा सिरिअस व्हा.. " विवेक दोघांनाही शांत करत म्हणाला.
" दिल्लीला गेल्यावर केशव नक्की कूठे आहे... माहीत आहे का तुला... " विवेकने संदीपला विचारलं.
" थोडी माहिती आहे... पण तू tension नको घेऊ .. मी तिथे गेलो कि कळेल सगळं... " संदीप विश्वासाने बोलला.
" चला ना मग आत्ताच... " प्रिया पुन्हा बोलली.
" दिल्लीला गेल्यावर कुठेतरी रहावं लागेल ना... एका दिवसात भेटणार आहे का केशव... " विवेकचा पुढचा प्रश्न...
" त्याचेही tension घेऊ नकोस... मी तर दर महिन्याला जातो दिल्लीला.... माझ्या ओळखीचे खूप हॉटेलवाले आहेत... तिथे रूम मिळतील भाडयाने.... समाजलाव काय !! "
"छान.. मग मी जातो ऑफिसमध्ये... तू तिकिटाचे बघायला जा.. " विवेक..
" आणि मी काय करू एकटी... ?? मला पण सोबत घेऊन जा... कोणाबरोबर येऊ... " प्रियाचा प्रश्न
" विवेक सोबत ऑफिसला जा... कारण मी जरा बाकीची कामे करणार आहे... " बोलत संदीप बाहेर जाण्यास निघाला.
" अरे मित्रा... तिकीट काय फुकट मिळतात का.. पैसे नको तुला... " विवेक..
" Wow !! मला तर आताच कळलं, तिकिटासाठी पैसे लागतात ते.. " संदीप पुन्हा आत आला.
" मी पहिली चौकशी करणार रे पोरा... संध्याकाळ पर्यंत तुला सांगतो कि किती पैसे लागतील ते.. गावात राहत असलो ना.. तरी तुझापेक्षा जास्त दुनिया बघितली आहे... समाजलाव काय !! " म्हणत संदीप निघून गेला... विवेक संशयी नजरेने संदीपकडे पाहत होता.
संदीप गेल्याबरोबर , विवेक प्रिया सोबत निघाला. दुपारची वेळ , बॉस भेटला पाहिजे.. त्याहीपेक्षा सुट्टी मंजूर केली पाहिजे त्याने... बसमध्ये गर्दी नव्हती.. बसायला जागा भेटली... बसल्या बसल्या प्रियाची बडबड सुरु झाली. केशव असा आहे, केशव तसा आहे.. किती कमावतो... शहरात जागा घेऊन ठेवल्या आहेत.. किती प्रेम करतो माझ्यावर.. वगैरे वगैरे... विवेक तिचं बोलणं फक्त ऐकत होता... त्याच्या डोक्यात वेगळेच विचार.. ऑफिस मध्ये पोहोचेपर्यंत बडबड सुरु होती.
" तू बस इथे बाहेर... reception ला... मी येतो भेटून सरांना... " विवेक प्रियाला बाहेर बसवून आत गेला. विवेकचा बॉस एका मिटिंगसाठी बाहेरच निघाला होता. विवेकला बघून आनंदित झाला.
" बरं झालं आलास तू.. जा... काम सुरु कर... तुझ्याशिवाय कामच होतं नाही बघ... " एवढंसं बोलून बॉस निघाला बाहेर...
" सर.. सर... " विवेक त्याच्या मागोमाग... " सर.. सर... थांबा..",
" काय झालं... " बॉस थांबेपर्यंत ते दोघे बाहेर आले होते. " काम सुरु कर ना तुझं.. already आपण मागे आहोत नवीन प्रोजेक्ट मध्ये... " ,
" सर ... मी सुट्टीवर आहे... १० दिवस.. आणि तुम्ही मला काम करायला सांगत आहेत.. ",
" अरे हो... विसरलो.. पण आता आला आहेस तर बघून जा काय काम आहे ते.. ",
" तेच तर... मी माझी सुट्टी आणखी वाढवायला आलो आहे... निदान आणखी १० दिवस... किमान ५ दिवस तरी सुट्टी वाढवून पाहिजे होती... " बॉस ला आला राग...
" कशाला वाढवून पाहिजे... ती १० दिवस पण देयाला नको होती सुट्टी .. मी म्हणतो, उद्या पासूनच ये ऑफिसला.. " बॉस मोठ्या आवाजात बोलला. या दोघांचे संभाषण प्रिया कधीपासून बघत होती.
" सर , माझा मित्र आहे, त्याला भेटायला जायचे होते.. म्हणून सुट्टी मागतो आहे... " विवेक काकुळतीने बोलला.
" कोण आहे एवढा तो मित्र.. मित्र गेला उडत... उद्यापासून ऑफिसला ये... " यावर प्रियाला राग आला...
" ओ... हॅलो... मित्र उडत गेला म्हणजे काय... असं कसं बोलू शकता तुम्ही.. " प्रियाने entry घेतली.
" या कोण ? " बॉसचा प्रश्न...
" प्रिया शांत हो !! " विवेक तिला बाजूला घेत म्हणाला.
" थांब रे तू... " विवेकलाच तिने बाजूला केलं.
" सुट्टीच मागतो आहे ना तो.. आणि हा काय एकटाच काम करतो का... बाकीच्या लोकांना काय जेवण करायला ठेवलं आहे का .. ",
" कोण तुम्ही ? आणि इकडे काय करत आहेत ... " बॉस अजूनही confused..
" माझी friend आहे ती.. " विवेक मागून बोलला.
" तिला काय करायचं आहे आपलं ऑफिस आणि काम... हे बघ विवेक, जास्तीची सुट्टी काय... आता आहे ती सुट्टीपण cancel करतो मी... पाहिजे तर उद्या , एक दिवस सुट्टी घे.. तुझा कोण तो मित्र आहे.. त्याला उद्या भेटून घे... परवापासून ऑफिसमध्ये पाहिजे तू.. " बॉस अजूनही रागात होता. प्रियाचा आवाज आणखी वाढला.
" अरे !!! ... एवढा respect देते आहे तर आणखीनच करतो ... ये चिल्लर !!! तो काय नोकर नाही तुझा... जॉब करतो इथे... सुट्टी देऊ शकत नाही तर कसली कंपनी तुझी... फालतू आहे हि कंपनी... टाळे आणून देते... बंद कर ऑफिस तुझं... ",
" विवेक !! सांभाळून बोलायला सांग तिला.. " बॉस रागाने लाल झाला.
" सांभाळूनच बोलते आहे.. फालतू कंपनीचा फालतू बॉस... सुट्टी देऊ शकत नाही.. सोडून दे रे विवेक असली फालतू कंपनी... ",
" प्रिया ,... शांत हो ग !! " विवेक तिला मागे घेत म्हणाला.
" घेऊन जा विवेक तिला... आत्ताच्या आता " यावर प्रिया पुन्हा पुढे आली.
" जातोच आहे रे... असल्या फालतू कंपनीत कशाला थांबू.. तसं पण विवेक गेल्यावर बंदच होणार आहे हि कंपनी... ",
" विवेक !! मला आता पोलिसांना बोलवावं लागेल..... get out you both.... तुला सुट्टी पाहिजे ना.. कायमची सुट्टी घे.. get out !!! " ,
" जा रे... तू काय बोलावणार... मीच जाते आणि सांगते पोलिसांना... हि किती फालतू कंपनी आहे ते... " विवेक प्रियाला ओढत बाहेर घेऊन आला. बाहेर येताच प्रियाने एक दगडसुद्धा उचलला होता, ऑफिस वर फेकायला... विवेकने चपळाई करत दगड काढून घेतला हातातून... आणि प्रियाला ओढत ओढत बस स्टॉप वर आणलं.
"काय वेडं -बीड लागलं आहे का तुला... काय करत होतीस... भूत शिरलं आहे का अंगात.. " विवेक वैतागला होता.
" अरे सोडून दे रे ती कंपनी.. एवढं काम करतोस... सुट्टी देऊ शकत नाही तुला.. काय करायची असली कंपनी... " ,
" सोडून दे काय... आता गेलो तरी उभं करणार नाही बॉस... ऐकलंस ना काय बोलला... कायमची सुट्टी घे... तुझ्यामुळे.. थँक्स... " विवेकने हात जोडले आणि बसची वाट बघू लागला. बस स्टॉप वर दोघेच.. जाऊ का ऑफिसमध्ये.. बॉसला सॉरी बोलू ... नाहीतर नको.. डोकं गरम असेल अजून... इतक्यात बस आली. दोघांना जागा भेटली. प्रियाला तशी झोपच आली होती. गाडीत बसल्या बसल्या पेंगू लागली. हळूच विवेकच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली. प्रियाकडे नजर टाकली. कशी लहान मुलासारखी झोपली आहे.. अशीच असायची कॉलेजमध्ये पण.. बिनधास्त एकदम... मनात आलं ते करणारी... पण बदलली नंतर खूप.. केशव आल्यापासून... किती प्रेम करते त्याच्यावर... विवेकचे विचार संपत नव्हते. एकदाचे आले घरी.
दुपारचे जेवण वगैरे आटपून दोघे झोपी गेले. संध्याकाळी , संदीप आला तेव्हा प्रथम विवेकला जाग आली.
" काय रे... कुठे होतास दिवस भर.. जेवलास तरी का ? " ,
" भरपेट जेवून आलो.. तू नको काळजी करुस... " संदीप रिलॅक्स होता अगदी.
" आणि तिकीटे ? ... विमानाच्या तिकिटाचे काय... ",
" हो... मिळतील... उद्या दुपारची .. तेच विचारायला आलो... चालतील का.. जरा जास्त पैसे द्यावे लागतील... समाजलाव काय.. " ,
" जास्त म्हणजे किती ? ",
" तिकीटाची किंमत वेगळी आणि त्याचं कमिशन वेगळं... चालेल तर सांग...तसं त्याला जाऊन सांगावं लागेल आता... " विवेक पुन्हा विचार करू लागला. दिल्लीला तर लवकरच जावं लागेल... जाऊदे पैसे गेले तर... प्रियासाठी करावं लागेल...
" ठीक आहे.. ... जाऊन सांग त्याला ... परंतु पैसे नाही आहेत आता... पैसे सकाळीच ,बँक उघडल्यावर... चालेल ना त्याला... " ,
" यार .. काय तू... पैसे काय पळून चालले आहेत का... दे उद्या... मी तिकीट घेऊन येतो.. " ,
" थँक्स संदीप.. ",
" you have to.... " म्हणत संदीप पुन्हा निघून गेला.
संदीप येईपर्यंत प्रिया जागी झाली होती. विमानाची तिकीटे बघून किती आनंद झाला तिला. विवेकला तर गच्चं मिठी मारली तिने. डोळ्यातून आनंदाश्रू... विवेकलाही गहिवरून आलं. पण दाखवलं नाही त्याने.. थोडयावेळाने ,जेवायला बाहेर गेले तिघेही.. छान गप्पा करत जेवण झालं. घरी आल्याबरोबर, विवेकने जरुरीचे सामान घेतलं. पहिल्यांदा जात होते ना विमानाने... तर तशी तयारी करूनच झोपायची तयारी केली. प्रिया आत, बेडरूममध्ये झोपली. विवेक आणि संदीप ,बाहेर हॉल मध्ये..
" थँक्स संदीप... तुझ्यामुळे आज मोठ्ठ काम झालं माझं.. ",
" you have to... that is that.... ",
" असं का विचित्र बोलतोस मधे मधे... ",
" असंच रे... मज्जा येते.. समोरच्याला आवडते .. ",
"असं आहे तर.. आणि संध्याकाळ पर्यंत कुठे भटकत होतास... ",
" केशवसाठी... त्याच्या- माझ्या ओळखीचे आहेत ना मुंबईत... त्याची आणखी माहिती मिळाली.. " विवेकला आनंद झाला.
" तुला माहिती आहे का... दिल्लीला कुठे आहे केशव ते.. ",
" पूर्ण माहिती नाही... पण आहे... तिथे गेलो कि जरा शोधावं लागेल.. ... समाजलाव काय " ,
" किती मदत झाली तुझी.. मला कसा जमलं असतं हे... ",
" मदत... मदत आमच्यावेळेला करायचे.. आता कसली मदत... " ,
" हो रे... निदान प्रियासाठी तरी... थँक्स ",
" हा तेच... तेच विचारायचे होते... तुला कशी भेटली प्रिया... आणि कुठे... काय गडबड आहे.. लास्ट टाईम पण काहीतरी आत्महत्याचं बोलला होतास... नक्की काय " ,
" थांब.. थांब.. सांगतो.. " विवेकने आत वाकून पाहिलं... प्रिया झोपली होती.
" प्रिया मुंबईत केशवला भेटायला आली होती... त्यांचे आधी काय झालं ते माहित नाही मला.. ती आत्महत्या करत होती.. तेव्हा नशीब, मी होतो तिथे... तिला थांबवलं उडी मारण्यापासून... ",
" एक प्रश्न आहे.. ",
" काय ? ",
" पूर्ण मुंबईत तुलाच कशी दिसली हि.. कि आधीच प्लॅन केला होतास तू.. ",
" काय बोलतो आहेस तू.. मी तिथे असंच गेलो होतो तर प्रिया उडी मारण्याच्या तयारीत होती.. रात्रीची गोष्ट हि... कोणीच नव्हतं तेव्हा तिथे... ",
" तेच तर... तूच कसा तिथे होतास.. म्हणजे देवानेच तुला पाठवलं असेल, खास प्रियासाठी... बरोबर ना.. " विवेक काहीच बोलू शकला नाही... याला काय सांगू... मी सुद्धा जीव देयालाच गेलो होतो...
" एवढं का करतो आहेस प्रियासाठी... ",
" मैत्रीखातर... " ,
" नाही... माझीही मैत्रीण आहे... पण तुझा एवढं तरी केलं नसतं मी... यावरून जरा संशय आला मला.. ",
"कसला ? ",
" प्रिया तुला आवडते ना.. ",
" गप्प रे... दारू पिऊन आलास का ",
" मला काय माहिती नाही.. तुला लहानपणापासून आवडते ती... तू तिला propose सुद्धा करणार होतास... केशव मुळे राहून गेलं.. हे तू मला एकदा बोलला होतास कॉलेजमध्ये.. तुला आठवत नसेल... मला चांगलं लक्षात आहे.. ",
"तसे काही नाही ... झोप चल... उद्या जायचे आहे ना लवकर... " विवेकने विषय बदलला.. आणि विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला.
" एक सांगायचे होते... फक्त ऐक, काही विचारू नकोस.. ",
" सांग " विवेकने आहे तसं उत्तर दिलं.
" काहीतरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे केशव.. म्हणून तो असा पळतो आहे..",
" म्हणजे ? ",
" केशव काहीतरी चुकीची कामे करतो आहे.. त्यातचं काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असं वाटते.. नक्की नाही, तरी वाटते... कदाचित प्रियाला ते कळलं असेल.. म्हणून घाबरून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा... तो फक्त मुंबईत भेटला नाही, म्हणून ती स्वतःला संपवेल.. अस मला वाटतं नाही... फक्त हे तिला सांगू नकोस... मी काही सांगितलं ते .. झोप आता... " कहानी मे twist... विवेकला आणखी माहिती हवी होती... परंतु संदीप म्हणाला ना, विचारू नकोस म्हणून... तो झोपी गेला.
सकाळ होताच , बँक उघडताच संदीपचे पैसे देऊन आणि प्रवासात , दिल्लीला गेल्यावर पैश्याची अडचण भासू नये म्हणून त्याने आणखी पैसे काढले. पहिल्यांदा विमान प्रवास म्हणून प्रिया ,संदीप खुश... विवेक मात्र वेगळ्या विचारात... कसली चुकीची कामं करतो आहे केशव.. प्रियाला खरंच माहिती असेल, त्याच कारणास्तव आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असेल का... कि काहीच माहित नाही तिला... सांगावं का तिला.. कि दिल्लीला तिलाच खरं काय ते कळेल.. धक्का तर नाही ना बसणार तिला.. काय करू... विवेकचं लक्ष लागत नव्हतं.
विमानात बसल्यावर सुद्धा विवेकला काही समजत नव्हतं, तिथे गेल्यावर काय होईल नक्की ते...
" ये.. पाऊस.. पाऊस सुरू झाला.. " प्रियाच्या या आवाजाने विवेक भानावर आला.
" पहिला पाऊस ना.... किती मज्जा... " प्रिया टाळ्या वाजवू लागली.
" पहिला पाऊस... आमच्यावेळेला असायचा पहिला पाऊस... " संदीपसुद्धा विमानातील खिडकीतून बाहेर बघत म्हणाला.
" अवकाळी पाऊस म्हणतात याला.. या महिन्यात पाऊस पडतो का कधी.. " विवेक नाखुशीने म्हणाला. तशी विमानात घोषणा झाली, कि विमान १०-१५ मिनिटे उशिराने प्रयाण करेल... घोषणा ऐकून झाल्यावर तिघे पुन्हा "पाऊस" या विषयाकडे वळले.
" या महिन्यात म्हणजे... आहेस ना शुद्धीवर... " प्रिया आश्चर्याने विवेककडे पाहू लागली.
" का... कोणता महिना आहे हा... ",
" Month is there was June is the..... समजालाव काय... " काय बोलतोय हा...
" काय.... कोणता महिना ? " ,
" जून ... " ,
" जून ?? ... कधी सुरु झाला हा महिना... " विवेक वेड्यासारखा बघत होता.
" you have to... " ,
" अरे बाबा !! मला भेटला तेव्हा... १ जूनला मी आले होते मुंबईत.... काय तू.. काहीच लक्षात नसते वाटते तुझ्या... " प्रिया पुन्हा पाऊस बघू लागली.
खरंच का... कुठेच लक्ष नसते माझ... वार सुद्धा लक्षात राहत नाहीत. फक्त तारीख ;लक्षात असते.. कधी कधी ते पण नाही... तोही बाहेर बघू लागला... संदीप थोड्यावेळाने गुपचूप झोपी गेला.. प्रिया बाहेरच बघत होती.विवेक केशवबद्दल अजूनही विचार करत होता... विमान सुरु होताच प्रिया घाबरली आणि विवेकचा हात घट्ट पकडून बसली. " काही होणार नाही... आरामात बस... " विवेकने प्रियाला धीर दिला... तरीही प्रिया तशीच बसून होती. पुढच्या १५ - २० मिनिटात तिलाही झोप लागली. विवेकच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली. थोडयावेळाने , संदीपचं डोकंही विवेकच्या दुसऱ्या खांदयावर आपोआप आलं. एका खांद्यावर प्रिया आणि दुसऱ्यावर संदीप, मध्ये विवेक ... दोघांचे " ओझं " घेऊन बसलेला... त्याला कुठे झोप लागणार होती.. तसाच , जराही न हलता खिडकीबाहेर बघत राहिला.
साधारण २ तास लागतात, मुंबई ते दिल्ली... विमान प्रवासाने. परंतु खराब हवामानाने जरा जास्त म्हणजे ३ तास लागले. त्यात म्हणतात , दिल्लीला पाऊस खूप... संदीपला माहित होतं ते. दिल्ली विमान तळावर उतरताच "पावसाबद्दलची माहिती " त्यानेच दोघांना दिली. तिथे पाऊस जरा जास्तच कोसळत होता.. त्यामुळे आताच न निघता, थोडावेळ , पाऊस कमी होईपर्यंत विमानतलवार थांबावे, असे दोघांचे ठरले.. विवेक तर वेगळ्याच विश्वात होता. त्याची कुठेतरी तंद्री लागली होती. संदीप ,प्रिया पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. खरंच हि काही लपवते आहे का.. केशव काम काय करतो नक्की.. संदीपला माहित असूनही तो आपल्याला का घेऊन आला इथे.. असे बऱ्यापैकी प्रश्न विवेक समोर उभे होते. साधारण रात्रीचे ८ वाजत होते, तेव्हा पावसाने आवरत घेतलं. संदीपच्या ओळखीच्या हॉटेलवर जाऊन दोन रूम बुक केल्या. एक प्रिया साठी आणि एक संदीप,विवेक साठी.
संदीप जेवणाची व्यवस्था करून " बाहेर जाऊन येतो" असं म्हणत निघून गेला. विवेकला झोप आलेली, प्रियाला सांगून तोही झोपी गेला. प्रिया तिच्या रूममध्ये टाईमपास करत होती. रात्री १० वाजता संदीप आला, जेवण एकत्रच जेवले. प्रिया तिच्या रूममध्ये जाऊन झोपली. विवेकसुद्धा झोपायची तयारी करत होता... संदीप आला. " हे धर भाऊ... " एक चिट्टी त्याने विवेक समोर धरली...
" यात फोन नंबर आहे... केशव आता जिथे थांबला आहे ना... तिथला फोन आहे.. उद्या सकाळी फोन लाव केशवला ... " म्हणत संदीप झोपायला गेला.
" थांब संदीप.. काही लपवतो आहेस का तू... आणि प्रिया सुद्धा... " संदीप थांबला.
" काय बोलायचं आहे तुला... ? " , दोघे समोरासमोर उभे राहिले.
" तुला माहित होतं ना केशवबद्दल... तो चुकीची कामं करतो ते .. ",
" हो.. मग " ,
" मग मला का इथपर्यंत घेऊन आलास... त्यात प्रियाही सोबत... आणि जर तिला माहिती आहे, तर तिने का सांगितलं नाही मला... " संदीपने सगळं ऐकून घेतलं.
" बस.. सांगतो .. " दोघे खाली बसले. " हे बघ.. मला केशव काय कामे करतो ते माहित नाही.. तुला यात आणायचे हि नव्हते. पण प्रिया... तिच्यासाठी.... ती किती हट्टी आहे ते माहीत आहे तुला... माझं ऐकणार नाही म्हणून तू पाहिजे होतास सोबत बस्स !! " प्रियाचं कारण सांगून त्याने विवेकला गप्प केलं.
" उद्या सकाळी फोन कर त्याला ... जमल्यास भेटून ये त्याला... बघ काय बोलतो ते... " संदीप झोपायला गेला. विवेकने फोन नंबर जपून ठेवला. रात्री उशिराने त्याला झोप आली.
सकाळचा प्लॅन ठरला होता. विवेकने फोन लावला. सुरुवातीला केशवने ओळख दाखवली नाही, मात्र नंतर ओळखल्यावर बोलणं झालं.. भेटायला तयार झाला केशव. पत्ता लिहून ठेवला विवेकने. आता अडचण होती ती त्याला भेटायला कसे जायचे... दिल्लीचं माहिती नाही, संदीपला घेऊन गेलो तर प्रिया एकटी कशी राहिलं. या विचाराने पुन्हा डिस्टर्ब झाला. प्रियालाही सोबत घेऊन जायचे असा निर्णय झाला. फक्त तिला काही सांगायचे नाही एवढचं. " कुठे चाललो आहे आपण.. ? " प्रियाचा पहिला प्रश्न.. आली का पंचाईत..... विवेक ,संदीप एका कोपऱ्यात गेले.
" एक काम करू.. मी प्रियाला घेऊन जातो कुठेतरी... तू जाऊन ये..",
" पण मला कुठे कसा जायचे माहित नाही.. पहिल्यादा आलो दिल्लीला मी.. ",
" विचारत... विचारत जा... you have to... " हा प्लॅन विवेकला मान्य करावा लागला. विवेक काहीतरी बहाणा करून रूमवरच थांबला. जेणेकरून प्रियाचे प्रश्न सुरु होणार नाहीत... प्रिया जशी बाहेर गेली. तसा विवेक केशवला भेटायला निघाला.
जरा दूरचं होतं ते ठिकाण , तरीसुद्धा पोहोचला. त्याचवेळेला पावसाने सुरुवात केली... काय यार हा पाऊस... नको त्यावेळेला नको त्या ठिकाणी येतो, वैताग नुसता. विवेकला पाऊस तसा आवडायचा नाहीच. पावसातला चिखल, चिकचिकपणा.. अजिबात आवडायचा नाही. आजही ऐनवेळेला येऊन विवेकला अडचणीत आणलं त्याने. तरी केशव भेटेल म्हणून त्याने पावसाचा राग आवरता घेतला. विवेक त्याच्या घरी पोहोचला. केशवनेच दरवाजा उघडला. " पटकन आत ये. " विवेकला आतमध्ये घेतलं. आजूबाजूला कोणी नाही बघून दरवाजा बंद केला केशवने.
" आई... दोन चहा घेऊन येते का ? " केशवने आईला बाहेरून आवाज दिला. आणि विवेकला एका वेगळ्या रूममध्ये घेऊन आला. घर मोठ्ठ होतं. विवेक बघत होता.
" इकडेच राहणार का ? " विवेकचा पहिला प्रश्न
" काय ? " केशवला समजला नाही प्रश्न.
" म्हणजे इकडेच राहणार का.. कायमचं " ,
" नाही... हे भाडयाने घेतलं आहे... इकडचं काम झालं कि सोडणार हे घर.. बाकी ... तू कसा इथे... " ,
" तुलाच भेटायला आलो आहे... ",
" मला ? मुंबईवरून मला भेटायला आलास... एवढं काय काम आहे माझ्याकडे.. पण मी दिल्लीला आहे हे कोणी सांगितलं.. " बाहेर पावसाने छानपैकी सुरुवात केली होती...
" माझं काम नव्हतं... प्रियासाठी आलो... " प्रियाचं नावं ऐकताच केशव जरा वेगळ्याच प्रश्नार्थक नजरेने विवेककडे बघू लागला.
" प्रियाचा काय संबंध.. ",
" काय संबंध म्हणजे .. ती तुला भेटायला मुंबईत गेली होती. तिथे भेटला नाहीस म्हणून तुझ्या घरी, साताऱ्याला गेलो.. तिथे कळलं तू दिल्लीला आहेस.. म्हणून तिच्यासोबत दिल्लीला आलो. " ,
" काय वेडं -बीड लागला आहे का तुला.. तिला इथे आणायची काय गरज होती... इकडे एकतर किती tension चालू आहेत.. त्यात तिची भर नको... " या वाक्यावर मात्र विवेक संतापला.
" प्रिया काय tension आहे का.. कधीपासून तुला भेटायचा प्रयन्त करते आहे ती.. किती प्रेम करते तुझ्यावर.. तिचं घरीसुद्धा सोडलं तुझ्यासाठी तिने.. ",
" काय गरज होती... तिला घेऊन जा परत तिच्या घरी... मला नाही भेटायचं तिला.. " केशव जागेवरून उठला. केशवची आई चहा घेऊन आली. विवेकचा मूड नव्हता तरी चहा घेतला. थोडावेळ शांततेत गेला.
" आता थेट विचारतो... काय झालंय नक्की ... का पळतो आहेस तू.. " विवेकच्या या प्रश्नावर मात्र केशव चकित झाला.
" बोल.. मला जास्त काही माहित नाही.. पण एवढं माहित आहे कि तू काहीतरी चुकीची कामे करतो आहेस... प्रिया किती हट्टी आहे हे तुलाही माहित आहे.. तिला पुन्हा इकडून घेऊन जायचे असेल तर तिला खरं सांगावे लागेल... बोल केशव.. " केशव गप्प.
थोडयावेळाने बोलला तो... " मी सरकारी नोकरीत होतो.. सुरूवातीला छान सुरु होतं. नंतर मला "आतमध्ये" काय गोष्टी सुरु असतात ते समजलं. त्यातून पैसेही जास्त मिळतात तेही कळलं. खूप पैसे.. मलाही मोह झाला. पैसे घेऊन कामे करायचो. काही confidential गोष्टी बाहेर सांगायचो.. त्याचे पैसे वेगळे आणि जास्त... हे जे बघतो आहेस ना... ते त्या पैशाने.. अशीच एक फाईल मी बाहेर दिली.. यावेळेस ते माझ्यावर उलटलं.. पोलीस मागे लागले. ज्यांच्याकडून पैसे घेतले... त्यांची नावे बाहेर येऊ नये म्हणून तेही मागे लागले. जीवाला धोका होता म्हणून मुंबईतून घरी आली.. पूर्ण कुटुंबाला घेऊन दिल्लीला आलो.. हि कथा आहे.. आता नको आहे काही.. भीती वाटते सर्वांची.. ",
" मग प्रियाला माहित आहे का हे.. ",
" नाही.. तिला कशाला सांगू.. ",
" अरे !! पुन्हा तेच... तुमच्या दोघांचं प्रेम आहे ना... " केशव हसला त्यावर.
" तिचं असेल... माझं नाही... " , बाहेर पावसाचा जोर वाढला होता.
" काय बोलतो आहेस तू.. " विवेक पुन्हा संतापला.
" कॉलेजच्या गोष्टी, कॉलेज संपल्यावरच मी संपवल्या.. प्रिया फक्त मैत्रिण आहे.. फक्त मैत्रीण म्हणून तिचे फोन उचलायचो... नाहीतर तशीही ती irritating आहे. " विवेक उठला आणि केशवची कॉलर पकडली.
" हो.. तुला राग येणारच... best friend ना तिचा.. सॉरी.. पण मी फक्त मैत्री ठेवली... तिला माझ्यात गुंतण्याचे काही कारणंच नव्हतं. तिलाही ते कळायला हवे होते. तिच्याशी बोलणं सोडून दिलं तेव्हाच... तिला मुद्दाम टाळायचो मी.. तिच्या आई-वडिलांचा पत्ता नाही... काकांकडे वाढलेली, जॉब सुद्धा साधा.. मी सरकारी नोकरीत.. माझ्या घरी तिला पसंत केलीच नसती... तसही आता माझं लग्न होणार आहे.. घरच्यांनी मुलगी बघितली आहे.. so.. तिला आणलेस इथपर्यंत... पुन्हा गावाला घेऊन जा... काय.. " केशवने विवेकचे हात कॉलरवरून काढले. पावसाने अचानक सुरुवात केली तसा बंदही अचानक झाला. " आणि तुझ्या माहिती साठी सांगतो... पासपोर्टचे काम सुरु आहे.. ते झालं कि भारताबाहेरच जाणार कायमचा.. " विवेक काय बोलणार या सर्वांवर ... केशवचे ते बोलणे ऐकून निघाला परतीच्या वाटेवर.
हॉटेलवर आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. संदीप आणि प्रिया त्याचीच वाट बघत होते. विवेक जरासा भिजलेला. थंडीने कुडकुडत होता. संदीपने लगेच जेवणाची व्यवस्था केली. विवेक या वेळात पूर्णपणे शांत होता. जेवण झाल्यावर विवेक त्याच्या रूममध्ये जाऊन बसला होता. प्रिया त्याच्या रूममध्ये आली आणि बाहेर जोरदार वीज चमकून गेली. विवेक खिडकीतून बाहेर बघत राहिला. पाऊस पुन्हा सुरु...
" विवेक !! " प्रियाने हाक मारली.
" हम्म " विवेक तिच्याकडे बघत नव्हता.
" केशवला भेटायला गेला होतास ना.. संदीपने सांगितलं मला ... आधी सांगितलं असतं तर मीही आले असते " विवेक त्यावर काही बोलला नाही.
" चल ना.. आत्ताच जाऊ त्याला भेटायला.. मी तयारी करते... " प्रिया जाण्यास वळली.
" उद्या जाऊ... डोकं जड झालं आहे माझं.. " ,
" उद्या नको.. आताच जाऊ... " प्रिया जवळ येऊन विवेकचा हात ओढू लागली.
" प्लिज प्रिया... हट्ट करू नकोस.. उद्या जाऊ... " विवेक शांतपणे म्हणाला.
" नाही... आत्ताच जायचे आहे मला... चल ना रे... " विवेक आधीच वैतागला होता, त्यात प्रियाचा हट्ट.. संतापला.
" बोलतो आहे ना तुला उद्या जाऊ... कळत नाही का... कशाला हट्ट करतेस... " प्रियाचा हात झटकला त्याने. प्रियाला हे नवीन होते.. असा कधीच विवेक आधी वागला नव्हता....
" मला आताच भेटायचे असेल तर... " प्रियाचाही आवाज वाढला.
" पण त्याला , तुला भेटायचं नसेल तर... !! " विवेक केवढ्याने ओरडला... बाहेर सुद्धा मोठा आवाज झाला विजेचा.. प्रिया ऐकतच राहिली विवेक काय बोलला ते, क्षणासाठी पाणी आलं डोळ्यात तिच्या...
" आणि उद्या निघतो आहे आपण मुंबईला... " ,
" का... भेटायचं का नाही त्याला... तू तुझ्या मनाचं काही सांगतो आहेस... मी त्याला भेटणारच आहे... ", बाहेर तुफान पाऊस सुरु झालेला...
" प्रिया... ऐक... केशवला नाही भेटायचं तुला.. ",
" गप्प रे... असं काही नसेल... तुलाच भेटायला देयाचे नसेल मला, केशवशी... " यावर काय बोलणार विवेक... खिडकीतून बाहेर दिसणारा पाऊस बघत उभा राहिला...
" तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो आहे... " ,
" तुला न्यायचे नसेल तर राहूदे... मी जाईन... केलेस तेव्हढे उपकार खूप झाले.. " प्रिया रागात काहीही बोलली. "उपकार" हा शब्द ऐकून विवेक आणखी संतापला.
" उपकार ??? काय बोलते आहेस तू.. उपकार केले तुझ्यावर... तुला माहीत तरी आहे का केशव काय करतो ते..कुठून एवढे पैसे आणतो... पगार किती आणि पैसे किती कमवतो... चुकीच्या मार्गाला लागला आहे तो... " विवेक पट्कन बोलून गेला.
" खोटं आहे हे... केशव नाही करत काही तसं ... ",
" तुला माहित होतं ना हे ... ",
" हो.... पण त्याने कधीच सोडलं ते काम... आता नाही करत... प्रेम तरी करतो ना माझ्यावर तो... ",
" तुला माहित होतं तरी मला सांगितलं नाही तू.. सोडून दे त्याचा विचार... त्याच्या मागे पोलीस लागले आहेत, म्हणून असा पळतो आहे सगळीकडे...आणि प्रेमाचे बोलतेस... त्याने फक्त तुला मैत्रीण मानलं... केशव नाही बरोबर तुझ्यासाठी... विसरून जा त्याला... " यावर प्रिया खवळली.
" तू कोण ठरवणार केशव बरोबर नाही ते... तू नाही ओळखत त्याला.... खरं सांगायचं झालं तर, तूच त्याचा तिरस्कार करतोस... कॉलेजमध्ये असल्यापासून... तेव्हा सुद्धा सांगायचा तू... केशव सोबत राहू नको म्हणून.. तो तुझ्यापेक्षा पुढे गेला म्हणून जळतोस त्याच्यावर... आणि हो... उपकारच केलेस माझ्यावर...मित्र आहेस ना... मित्रच रहा.. देव बनण्याचा प्रयन्त करू नकोस... ",
" प्रिया !!! " विवेकचा हात उठला प्रियाला मारायला.. पुन्हा विजेचा जोरदार आवाज झाला.. थांबला विवेक तसाच. संदीप दारात उभा राहून बघत होता हे सर्व.
" ok... fine... उपकार केले ना...ठीक आहे... उद्या सकाळीच त्याला भेटायला जाऊ... हा शेवटचा उपकार केला कि माझी जबाबदारी संपली... " विवेक एवढं बोलून बाहेर निघून गेला. संदीप दारातच उभा.. प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेली. कोणाला समजावू मी.. संदीप मनात बोलला. संदीप विवेकची वाट बघत बसून राहिला. रात्री ११.३० सुमारास विवेक आला. तसाच झोपी गेला.. संदीपला बोलायचं होतं परंतु विवेक गप्प होता. संदीप झोपला. विवेक उशिरापर्यत जागा होता. बाजूच्या रूममध्ये प्रिया.. आधी केशवला भेटणार म्हणुन आणि नंतर विवेक बरोबर भांडण... यामुळे जागीच होती.. बाहेर पाऊस सुरूच... संदीप बरोबर बोलला, दिल्लीला पाऊस खूप... त्या पावसाकडे पाहत बेडवर पडून होती.. रात्री २-३ च्या सुमारास डोळा लागला तिचा.
सकाळी लवकर उठून तिघांनीही तयारी केली. संदीप तयार नव्हता तरीही विवेकने तयार केलं त्याला...
"तुला यावंच लागेल संदीप... प्रियाला केशवकडे सोडलं कि मी लगेच निघणार आहे...." ,
" विवेक... विसरून जा कालच.. प्रिया रागात बोलली... रागाला डोळे नसतात. कान नसतात आणि तोंडही नसते.. माहित आहे ना तुला... कशाला असं करतो आहेस... " संदीप विवेकला समजावत बोलला.
" संदीप ... प्लिज थांबवू नकोस... आणि मी थांबणार ही नाही... मी आजचं निघणार आहे मुंबईला.. कालच मी एका ठिकाणी चौकशी केली... ट्रेनने जाणार आहे... ",
"अरे पण !!! " ,
" हो.. माहित आहे.. खूप वेळ लागतो ते... तरीही जाणार आहे.. " विवेक बोलता बोलता रुमध्ये असलेल्या टेबलाजवळ आला.
" याच्या ड्रॉवर मध्ये १०,००० ठेवले आहेत.. विमानाचे तिकीट मिळून जाईल तुमच्या दोघांचे.. चल ... निघूया... " विवेक बाहेर जाऊ लागला... संदीपने त्याला अडवलं.
" तुझं काही चुकलं नाही विवेक.. केशव बद्दल जे काही बोललास ते ऐकलं मी... प्रियाला "फक्त मैत्रीण" मानतो , हेही माहित होतं मला.. खरंतर माझं चुकलं.. प्रियाला आधीच सांगायला पाहिजे होते... ",
" जाऊ दे... संदीप... तिला भेटायचं आहे ना... भेटू दे.. चल... मी खाली वाट बघतो आहे.. " विवेक त्याचं सगळं सामान घेऊन खाली गेला. प्रियाही बाहेर आली. संदीप तिची वाट बघत होता.
" प्रिया .. बोलू जरा... " प्रिया थांबली.
" केशव बद्दल काही बोलणार नाही... कारण तो कसा आहे.... हे तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो.. पण विवेक... त्याला तरी त्या भाषेत बोलायला नको होतास तू... ",
" what do you mean .... ?? " ,
" एवढ्या वर्षांची मैत्री तुमची.. कधीपासून सोबत आहे तुझ्या.. कधी काही तक्रार केली का त्याने.. तुझा बालिशपणा सदैव सहन केला त्याने.. विवेकची परिस्तिथी तुला माहित होती.. दोन वेळेचे जेवायला कसंबसं मिळायचं... तरीही तू जेवायला गेलीस ,तरी स्वतः वाढायचा जेवायला... काय गरज होती त्याला... आताही, तुझा जीव वाचवला... पोलीस स्टेशन, हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारल्या... कोणासाठी, मुंबई वरून सातारा, तिथून दिल्लीला... त्यातून तुझं सामान ,कपडे चोरीला गेले... त्यानेच नवीन घेऊन दिले ना... किती पैसे खर्च झाले असतील त्याचे... तुझा हट्ट म्हणून इथपर्यंत घेऊन आला.. हे काय फक्त "उपकार" म्हणून केलं का त्याने... उपकाराची भाषा.. त्याला काय वाटलं असेल... एवढी काळजी कोण घेतं... हे, प्रत्येक गोष्टीत फक्त " तुझं बरोबर आहे " असं म्हणणारे, मित्र कधीच नसतात... चुकीच्या वेळेला कान पकडणारे, दुःखात सुद्धा साथ देणारे मित्र असतात ... विवेक सारखे..." प्रियाला सगळं आठवलं .. लहानपणापासूनचे.. प्रिया काहीच बोलू शकली नाही.
" चल... विवेक वाट बघतो आहे खाली.. " दोघे खाली आले. बसने जावे लागणार होते ना... सकाळीच निघाले म्हणून बस मध्ये गर्दी भेटली. प्रियाला जागा भेटली बसायला. पुढच्याच बस स्टॉपवर विवेकला सुद्धा तिच्या शेजारी जागा मिळाली. दोघेही गप्पच. बाहेर पावसाने रिमझिम सुरुवात केली. रात्रीची अपुरी झोप आणि खिडकीतून येणार थंड वारा.. प्रियाला झोप लागली. सवयीप्रमाणे , विवेकच्याच खांद्यावर डोकं ठेऊन झोपली. संदीप बघत होता ते. केशवचे घर आणखी थोड्या अंतरावर होते , पण एका धक्क्याने बस थांबली. त्या धक्क्यानेच प्रियाला जाग आली. आपण विवेकच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपलो आहेत, हे लक्षात आलं तिच्या, पट्कन आवरून बसली.
बस बिघडली आहे, पुढे जाणार नाही... असं समजल्यावर सगळ्यांना उतरावे लागले. पाऊस थांबलेला तोपर्यंत... " पुढे १५ मिनिटावर घर आहे त्याचे.. चालत जाऊ आपण.. " विवेक संदीपकडे बघत म्हणाला. प्रियाकडे बघायचे नव्हते त्याला.. हातातली बॅग खांद्याला लावली आणि दोघांच्या पुढे चालू लागला. प्रियाला कळलं होतं कि विवेक रागावला आहे ते.. पण आता बोलून काय फायदा.. ५ मिनिटंच झाली असतील... पाऊस पुन्हा सुरु झाला... संदीपने छत्री उघडली. प्रियाकडे काहीच नव्हते. विवेकला आठवलं, संदीपने त्याच्या सामानात एक छत्री ठेवली होती.. पट्कन बाहेर काढली आणि प्रियाला दिली. स्वतः बाजूला एका टपरी खाली जाऊन उभा राहिला .. प्रिया बघत राहिली विवेककडे.. संदीप सुद्धा छत्री बंद करून विवेकच्या शेजारी जाऊन उभा राहिला. प्रिया जागच्या जागी छत्री उघडून उभी पावसात... एवढं काही बोलली त्याला, तरी मी भिजू नये म्हणून त्याची छत्री मला दिली त्याने... प्रियाला मनापासून वाईट वाटले.
पुढच्या १० मिनिटात पावसाने आटोपतं घेतलं.. तसे तिघेही निघाले... " केशवच्या घरी गेलो तर त्याच्या कुटुंबाला आवडेल कि नाही ते माहित नाही.. मी केशवला बाहेर बोलवतो.. " असं बोलून विवेकने त्या दोघांना पुढे एका मोकळ्या जागेत उभं राहायला सांगितलं. विवेकची बॅग बघितली प्रियाने.. संदीपला विचारलं तिने...
" तो निघतो आहे लगेच... म्हणून निघताना सामान घेऊनच निघाला. ",
" आणि मला कोण घेऊन जा.... " प्रिया बोलता बोलता थांबली. विवेककडे असं हट्टीपणाचे बोलणं करतो आपण... संदीप बरोबर नाही...
" त्याने पैसे ठेवले आहेत रूमवर... आपल्या तिकिटासाठी... तीही व्यवस्था करून ठेवली त्याने .. " प्रियाला आता कसंतरी वाटतं होते.
पुढच्या ५ मिनिटात समोरून विवेक, केशव येताना दिसले... केशवला बघून प्रथम संदीप पुढे गेला, प्रिया जागच्या जागी उभी. विवेक तिच्या जवळ आला. प्रियाने हातातली छत्री विवेक समोर धरली. " राहू दे.. तुला जास्त गरज आहे... मी निघतो.. सांभाळून राहा... " म्हणत विवेक त्याची बॅग उचलून झपझप निघून गेला. मागे वळून बघायचेही नव्हते त्याला.. मनात खूप विचार, जास्त करून प्रियाचे... काय होईल नक्की.. केशव काय बोलेल तिला... घरी जाईल ना नक्की ... या सर्व विचारांसहित त्याने मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेनचा प्रवास.. खुप वेळ घेणारा.. रात्री २- २.३० च्या सुमारास विवेक मुंबईच्या घरी पोहोचला.
सकाळी उशिराने जाग आली त्याला.. २ दिवस अपूर्ण झोपेमुळे असावं कदाचित... घड्याळात पाहिलं तर सकाळचे ९.३० वाजत होते. डोकं अजूनही जड होते. पहिला विचार आला तो प्रियाचा.. काय झालं असेल तिथे.. तसाच बेडवर बसून होता. पोटात भुकेची जाणीव झाली. आपण आता मुंबईत आहोत, घरी आईने बनवून दिला नास्ता, जेवण... इथे सर्व स्वतः करावं लागते.. हे लक्षात आलं त्याच्या... अंघोळ करून.. काहीतरी नास्ता आणि साधंसं जेवण सुद्धा बनवलं. बॅगेतलं सामान काढून व्यवस्थित लावू लागला. काही पैसे सापडले बॅग मध्ये..... किती खर्च झाला काय माहित.... खर्चावरून आठवलं.. नोकरी शोधावी लागेल आता... प्रियाने तिथे जो तमाशा केला, त्यावरून वाटतं नाही.. बॉस मला परत ठेवेल तिथे... तरी जाऊन बघायला काय हरकत आहे... बघूया सॉरी बोलून.... विवेकने लगेच नास्ता करून कपडे चढवले , तडक त्याच्या ऑफिसमध्ये गेला.
बॉस होता, विवेकने विनवणी केली जराशी... जराशे आढेवेढे घेत बॉसने विवेकला पुन्हा ठेवून घेतलं, उद्यापासून पुन्हा ये कामाला, सांगून बॉस निघून गेला. विवेक खुशीतच घरी आला. दुपारचे जेवण आटपून , मुंबईतली काही कामे करून टाकली त्याने. दुसऱ्या दिवसापासून, पुन्हा तेच " routine life " सुरु झालं विवेकचं. चार -पाच दिवस उलटूनही गेले. रोजचा दिनक्रम सुरु झाला.... सकाळी लवकर उठणे, नास्ता करणे... दुपारचा डब्बा बनवणे... सकाळपासून संध्याकाळ पर्यंत काम... घरी येऊन रात्रीच जेवण.. सगळं झालं कि झोपणे... तेच जुनं जगणं... बदललं होतं ते फक्त एक... आलेल्या प्रत्येक दिवसात प्रियाचा विचार यायचा त्याला... कुठे असेल ती ... दिल्लीला केशव सोबत कि साताराला घरी...
आज एक पूर्ण आठवडा झाला , विवेकला मुंबईत येऊन. प्रियाची काहीच खबरबात नाही.. विवेक ऑफिसला गेला. साधारण सकाळचे १० वाजत असतील. विवेकच्या बाजूचा फोन वाजला. reception वरून कॉल आलेला... विवेक आला.
" पोलिस स्टेशनमधून फोन आहे. " ,
" माझ्यासाठी ? ",
" हो... " विवेकने फोन कानाला लावला.
" विवेक साहेब !! ",
" हो.. बोलतो आहे ... ",
"ओळखलात का आवाज.... तुमची मैत्रीण आली आहे... परत जीव देयाला... येता का जरा... "
प्रिया ?? ... प्रिया मुंबईत आहे... ?? विवेक बुचकळ्यात पडला.. लागलीच निघाला. पोलिस स्टेशनमध्ये आला. प्रिया होती बसून. विवेक आलेला बघून inspector बोलले.
" या विवेक सर... तुमचीच वाट बघत होतो.. पुन्हा उभी होती तुमची मैत्रीण... जीव देयाला... आमच्या एका हवालदाराने पकडून आणलं... एक काम करा, आमच्याकडे एक दोरखंड आहे... घरात बांधून ठेव... मग घराबाहेर सुद्धा पडणार नाही.. " विवेक ओशाळला.. प्रिया त्याच्याकडे बघून हसत होती.
" तू कधी आलीस ... आणि हे काय परत आत्महत्या वगैरे.. " विवेक प्रियाजवळ येत म्हणाला.
" ते असंच रे.. तुझ्या ऑफिसचा फोन नंबर नव्हता ना माझ्याकडे... मग हि आयडिया आली डोकयात.. म्हणून समुद्राच्या कठड्यावर उभी होते. पोलिसांकडे असा नंबर मागितला असता तर दिला नसता.. म्हणून हे केलं.. उडी मारायला काय वेड लागला आहे का मला... बघ लगेच तुला फोन करून बोलावलं ... धावत आलास माझ्यासाठी... " विवेकला मिठी मारली प्रियाने...
" मिठी वगैरे अजिबात नको... दूर रहा.. केशवला काय वाटेल... तू दूर रहा.... आणि जा घरी तुझ्या परत... " विवेक प्रियाला दूर करत बोलला.
" सॉरी ना रे... केशव जाऊ दे उडत..... प्लिज... प्लिज .. माफ कर... आपण एकत्र राहू.. तुझी साथ कधीच सोडणार नाही मी.. " प्रिया विवेकच्या पाया पडू लागली. हे सगळं पोलिस स्टेशन मध्ये असलेले सगळे बघत होते.
" ओ... ते सात - आठ घरी... पोलिस स्टेशन आहे हे... सिनेमा हॉल नाही... निघा इथून.... " inspector ओरडले तसे दोघे बाहेर आले..
" कुठे थांबली आहेस.. आणि कधी आलीस मुंबईत... " विवेकचा पहिला प्रश्न..
" सकाळीच आले.... आणि इथे कोण ओळखते मला... तुझ्याच घरी थांबणार ना... " विवेकने डोक्याला हात लावला. ऑफिस अर्धवट सोडून आलो.तिथे घेऊन गेलो तर बॉस तापेल... घरीच घेऊन जावं लागेल.
त्याच्या रूमवर पोहोचला तर बाहेर संदीप, "त्या " काकांसोबत उभा... गप्पा-गोष्टी रंगलेल्या... जसे काही जुने मित्रच... " समाजलाव काय !! " विवेकला बघून संदीप बोलला. हा पण... !! म्हणजे याच्या बरोबर आली प्रिया..
" तू काय करतो इथे ? " ,
" you have to.... ",
" काय ? ",
" the room of चावी... is you... ",
" काय बोलतो आहेस तू... ? ", विवेकला काहीच कळलं नाही.
" या रूमची चावी तुझ्याकडे आहे ना.. म्हणून बाहेर उभा आहे .... समजालाव काय... " ,
" अरे मूर्ख माणसा... मुंबईत का आलास ते विचारलं... ",
" you have to... " यावर विवेक सोडून बाकी सगळी मंडळी हसली.
" विवेक... आत जाऊया का.. आणि या काकांनाही घे आत.. " प्रिया बोलली.
" राहू दे... राहू दे... " म्हणत काका पळून गेले. विवेकने दरवाजा उघडला. संदीप,प्रिया आत आले.
" मी सांगतो सगळं.. " संदीप. " तू गेलास.. त्यानंतर तिथे खूप वादावादी झाली केशवसोबत.. मीही भांडलो... प्रिया सुद्धा... केशवने खरं सांगून टाकलं... तिथे थांबण्यात काही अर्थ नव्हता... कारण केशवने त्याच्या घरी सुद्धा सांगितलं नव्हतं, तो अशी कामे करतो ते.. त्याच्या आईनेच प्रियाची समजूत काढली. केशवला स्वतःहून पोलिसांच्या हवाली केलं त्याच्या वडिलांनी.... आम्ही दोघे , तू निघालास त्याचदिवशी निघणार होतो. पण केशवच्या वडिलांनी थांबवून ठेवलं. दोन दिवस त्यात गेले. नंतर किती पाऊस सुरु झाला, ३ दिवस निघता आले नाही. केशवच्या आई-वडिलांना साताऱ्याला यायचे होते पुन्हा.. तर त्यांना मदत केली. मगच आम्ही निघालो. आणि ट्रेनने आलो बरं का... तुझे पैसे वाचवले.. हे घे... उरलेले पैसे.. " संदीपने एक पाकीट दिलं, पैसे होते त्यात.
" सॉरी विवेक... " प्रियाने बोलणे सुरु केले." मला माहीत नव्हतं इतकं केशवबद्दल.. शिवाय माझीही चूक झाली... आंधळ्या सारखं प्रेम केलं.. तू सांगत असतानाही.. खरंतर , मी अन्याय केला तुझ्यावर.. लहानपणापासून सोबत आहेस माझ्या.. काका -काकीने वाढवलं, पण तू.... तुझ्यामुळे मी माणसात राहू शकले.. प्रत्येक वेळेला माझ्यासोबत राहायचा तू... वेळोवेळी हट्ट पुरवले माझे... मी काय दिलं... फक्त त्रास... ",
" पण आता का आठवते आहे तुला हे सगळं. ? " ,
" केशव फक्त मैत्रीण मानायचा मला... खरं प्रेम तर तू केलं माझ्यावर.. बरोबर ना... " प्रियाच्या या वाक्याने विवेक गांगरून गेला.
" क... कोणी सांगितलं, माझं प्रेम आहे ते... ",
" एवढी काळजी करणार.. फक्त मित्र कसा असणार ना... मी ओळखू शकले नाही तुला... so sorry विवेक... " पुन्हा मिठी मारायला प्रिया पुढे आली.
" अजिबात नाही हा, मिठी वगैरे... जा ना.. त्या केशवला मिठी मार... एवढं सांगून पण ऐकलं नाही माझं कधी.. हट्टीपणा नुसता... तुझ्यामुळे झोप तरी लागते का.. उगाच ते प्रेम वगैरे... त्रास नुसता.. " विवेक एका बाजूला जाऊन उभा राहिला.
" प्रेम तर करतोस ना माझ्यावर अजून... ",
" मैत्रीखातर... प्रेमाखातर केलं ना एवढं तुझ्यासाठी... किती वर्ष, तुला कधीच कळलं नाही. " विवेकचे डोळे भरून आले. प्रियाचेही डोळे पाणावले. प्रिया तिच्या गुढघ्यावर बसली.
" खरंच माफ कर.. यापुढे तुला कधीच असा त्रास देणार नाही, अजिबात हट्ट करणार नाही. फक्त मला सोडून जाऊ नकोस कधी. तुझ्याशिवाय कोण आहे माझं. करशील माझ्याशी लग्न... ? " विवेक अवाक होऊन बघत राहिला.
" सांग ना... करशील का माझ्याशी लग्न... कि जाऊ पुन्हा जीव देयाला.. जातेच मी.. " प्रिया जाण्यासाठी उभी राहिली. पट्कन विवेकने तिला मिठी मारली.
" ये वेडाबाई.. करिन गं... करिन लग्न....फक्त एक अट आहे... तुझा हट्टीपणा कधी सोडायचा नाही ... प्रॉमिस का.. ",
" हो रे बाळा... प्रॉमिस !! प्रॉमिस !! " दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. संदीप टाळ्या वाजवू लागला.
" प्रॉमिस आमच्या वेळेला असायची... " म्हणत त्याने दोघांना मिठी मारली.
" चला....... झालं सगळं नीट... मी निघतो मग माझ्या घरी.. काय ना.. तिथे दुकान आहे माझं. तुमच्या या भानगडीत किती नुकसान झालं माझं काय माहित... समजालाव काय !! " संदीप हसत म्हणाला.
" आम्ही सुद्धा येतो आहे... तिथेच लग्न करायचं आहे ना... " प्रिया...
" अगं पण लगेच कसं... मुंबईत कामे... " विवेक बोलत होता काहीतरी. प्रियाने त्याचे वाक्य मधेच तोडलं.
" मला आताच निघायचे आहे... आत्ता म्हणजे आत्ताच... ",
" हो गं माझी आई... हो.. निघूया. सामान तरी आवरू दे. " प्रिया आनंदाने उडया मारू लागली.
" तुमच्या नावाचे पोस्टर बनवायला लागेल ना... Priya weds Vivek... इंग्लिशमध्ये बनवायला पाहिजे बरं का ...नवरा मुंबईचा आहे ना... " संदीप मस्करी करत होता. विवेकला हसायला आले.
" इंग्लिशमध्ये बनवायचा पण वेगळ्या नावाने. " प्रिया बोलली. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. विवेकचा हात तिने स्वतःच्या हातात घेतला.
" Priya weds Vivek नाही... Priya weds Friend... Best Friend... सखा... मित्र !! ... my friend ... "
------------------------------------- The End ---------------------------