All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Friday 1 March 2019

" भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली " (भाग पहिला )



      मे महिन्याचा शेवटचा आठवडा,... तारीख.. कोणाला माहित.... तरीही काय फरक पडणार होता तारीख जाणून. ना तारीख माहित , ना वार .... त्यात सकाळ होतं होती. आकाश तर आधीच जागा झालेला. घड्याळात न बघताच हल्ली त्याला वेळेचाही अंदाज बांधता यायचा. यावेळेसही त्याने अंदाज लावला. पहाटेची ६:१५ ते ६:३० ची वेळ... डोंगर -दऱ्यात रात्रीची वस्ती असली कि सूर्य देवाची पहिली किरणे अंगावर घेणं आलेच. आकाश तर कधी पासून सूर्य देवाची वाट पाहत होता. उंच ठिकाणी उभा होता... गेल्या १०-१५ मिनिटांपासून. आज उशीरच झाला ना.... सूर्यदेवाला... आकाश मनातल्या मनात बोलला. आभाळात नजर फिरवली त्याने. समोरचे आभाळ रिकामंच होतं. पाठीमागे पहिले त्याने, मागे काही काळ्या ढगांच्या रांगा लागलेल्या... आभाळ भरेल एवढे नाही.... तरी सूर्य झाकावा इतके त्याचे अस्तित्व. थोडासा छान गार वारा, आकाश मनोमन हसला ते बघून... पटकन त्याने एक क्लिक केले. " वाटलं नव्हत.... तरी यंदा लवकर आलास मित्रा... " आकाश त्या ढगांकडे पाहत म्हणाला. " एकटे बडबड करणाऱ्या माणसांना आमच्याकडे वेडं म्हणतात... " सुप्रीचा मागून आवाज आला. आकाश शेजारीच येऊन उभी राहिली. " काय करतो आहेस ... आणि असा एकटा का बडबडतो आहेस.. " आकाशने त्या काळ्या ढगांकडे बोट दाखवलं. " मित्र !!..... पाऊस यंदा लवकर आहे बघ ...... आलाच ना भेटायला मला ... " आकाश अजूनही त्याकडेच पाहत होता. 
" Welcome back !! ....My friend !! " 

============================================================


" Yo !! " आजीला काहीच कळलं नाही. " काय गं हे Yo !! " आजी तिच्या सारखंच , तिने बोटांनी काहीतरी केलं होते , तसे चाळे करण्याचा प्रयत्न करत होती . 

" अगं आजी तस नाही ग... मी दाखवते ... " आजीला तिने कशी बोटे करायची ते दाखवलं. 
" Yo ... म्हणजे yes ... ती एक style असते बोलण्याची.... Yo... " आजीला तिने explain केले. 
" ते मरू दे..... किती वाळली आहेस ... खातेस कि नाही काही...... कॅमेरा दिसत नाही तो तुझा ... विसरलीस कि काय ... ", 
" आहे ग सगळं माझं त्या बॅग मध्ये .... " थोडा pause घेतला तिने बोलताना 
" चल आजी... निघते मी .. " आजीने तिचा हात पकडला. 
" कालच आलीस ना .. पुन्हा कुठे निघालीस... " थोडा वेळ आजीकडे बघत तशीच उभी होती ती. मग आजीच्या शेजारी बसली. 
" आजी !! ..... माहित आहे ना तुला.. नाही करमत मला इथे... " ,
" थांब ना.. का भटकत असते अशी... इतके छान घर आहे इथे... माझं घर आहे... नाहीतर गावाला वाडा आहे आपला. आई-वडील , असे आहेत कि शोधून सापडणार नाहीत... तरी .... " ,

" थांब आजी... " तिने आजीचं वाक्य मधेच तोडलं. " मी आधीही सांगितलं आहे तुला... नको अडवत जाऊ मला... तरी जेव्हा जेव्हा येते तुझ्याकडे , तेच तेच सारखं तुझं ... " ,
" अगं पण .... " ,
" आजी .. मी येते ना तुला भेटायला .... वेळ काढून... ", 
" हो का ..... मग सांग.. तुझ्या बापाला ... कधी गेलेली शेवटचं भेटायला ... नाही आठवत ना ... ते जाऊदे ... तुझी आई, तिला कधी वेळ काढून भेटायला गेलेली तू... " आजीच्या या वाक्यावर ' ती ' च्याकडे काहीच उत्तर नव्हेत. काहीही न बोलता तिने आजीकडे पाहिलं. उभी राहिली. आजीची पाठ थोपटली. आणि तशीच कानात हेडफोन लावून जरा पाय मोकळे करायला निघून गेली.

============================================================

आकाश - सुप्री , एव्हाना शहरात परतले होते. विचार करावा तर हे विचित्र होते. कारण पावसाळा सुरु होतं होता आणि आकाश चे शहरात परतणे. यांची सांगड लागत नव्हती. त्याचे कारण सुप्रीच्या अटी. 

अट क्र. १ = पावसात , जास्त करून धुवांधार पावसात फिरायला जायचे नाही. नाहीतर सोबत मला घेऊन जायचे. 

अट क्र. २ = जायचे झालेच , काहीच पर्याय नसेल तर १ दिवस , जास्तीत जास्त २ दिवस जायचे आणि 

अट क्र. ३ = मोबाईल सोबत ठेवायचाच. 

या सर्व अटी मुळे गेले २ वर्ष आकाश कुठे गेलेलाच नाही. २ पावसाळे तर शहरातच गेले त्याचे. सांगायचे झाले तर फक्त २ दिवस , तेही शहरा जवळच्या "monsoon spot" वर जाऊन आलेला. सुप्री होतीच सोबत, कारण एकच.... तिला आकाशला पुन्हा गमवायाचे नव्हते. 

तरी, आता सारेच नॉर्मल झालं होते. या दोघांची मने आणखी जवळ आलेली. ग्रुप तर होताच सोबत. संजना सारखी जवळची मैत्रीण. आकाश ... " जुन्या आकाश " सारखा नव्हता आता. 'शहरात दिसायचा' आता तो. शिवाय माणसासोबत बोलायला शिकला होता तो. निसर्गाचा सहवास त्याला आवडायचा. तरी मागील आठवणी अजूनही ताज्या होत्या. निसर्ग त्याला बोलवतं होता, निसर्गाने मारलेल्या हाका त्याच्या मनापर्यंत पोहोचत होत्या. परंतु सुप्रीचा विचार येताच मनाला आवर घालावा लागत होता. शेवटी , एकदा जाऊन भेटावे, सर्व गड - किल्ले... हे कधी पासून मनात घोळवत ठेवले होते. एका संधीची वाट बघत होता आकाश.

============================================================

तिने अंदाज लावला. घरातले एव्हाना झोपले असतील. दबक्या पावलांनी घरात आली. तिची सॅक तयारच होती. उचलली, निघणारं तर आजीने तिला आवाज दिला. 

" पूजा !! " तिने मागे वळून पाहिलं. " न सांगताच जाणार होतीस का ?? " आजीने अडवलं तिला. पूजा वळली. 
" काय आजी " ,
" निघालीस का....  असं विचारलं..." पूजा तशीच मान खाली घालून उभी. आजीने जबरदस्ती पूजाला खाली बसवलं. 
" का पळते आहेस अशी... सर्वांपासुन... आवडत नाही का इथली लोकं... निदान , तुझे आई - वडील.. त्यांनाही विसरली का तू.. ",
" नाही आजी.... पण नाही आवडत त्यांच्याकडे जावेसे.. ", 
" अगं पण .... बाकीचे तर आहेत ना... त्यांच्यापासुन तरी का दूर राहतेस.. " पूजा त्यावर काहीच बोलली नाही. 

" ये .... बाहेर अंगणात बसू .. " आजीने बळेच तिला बाहेर अंगणात आणले. रात्रीच छान चांदणं आभाळात. त्यात मे महिन्याची अखेर, काही रेंगाळलेले ढगच चांदण्याच्या साथीला,  सोबतीला हळूवार , कानात गुणगुणणारा वारा. आजीच्या दारासमोर छोटे पण छानसे अंगण. आजोबांची आवड. आता आजोबा नव्हते तरी आजीने सांभाळलं होते ते अंगण. चार-पाच प्रकारची , वेगवेगळ्या रंगाची फुले... सोनचाफ्याचा कालच्या फुलांचा पुसटसा सुंगंध अजूनही दरवळत होता त्या वातावरणात. पूजाला हे काही नवीन नव्हते. तरी आजी सोबत बसलेली. 
" पूजा !! ऐकशील माझं.. नको जाऊस कुठे.. इथंही काल माझा वाढदिवस होता म्हणून आलीस आणि आता न सांगताच निघाली होतीस... " ,

" काय करू सांग... सांग आजी, त्या लोकांना काहीच फरक पडत नाही.... मी असल्याचा आणि नसल्याचा ही... आधी पासूनच तशी मला वागणूक मिळत आली आई - वडिलांकडून, मग मला का वाटते त्याच्याकडे जावे असे. ",
" मग तुला ते तसं कुठंही भटकत राहणे.... ते आवडते का... " पूजा आताही शांतच बसून होती. 

आजीला काळजी होती. पण पूजाची काळजी सुद्धा होती. थोडावेळ कोणी काहीच बोललं नाही. " तुझ्या आजोबांना सवय होती, असं फिरत राहायची. पाऊस नाही आवडायचा, पावसाचे चार महिने तर नुसता राग राग करायचे पावसाचा. कामावर लक्ष असायचे तरी जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा जायचे फिरायला. त्यांचीच नात तू.... रक्तातच आहे. " पूजाला छान वाटलं ऐकून ते. 
" आजी.. नको थांबवू मला..... जीव घुसमटतो शहरात..... आणि आता तर सवय झाली आहे हिरव्या रंगाची... इथे एक झाडं तरी नीट दिसते का... हिरवळ तर फक्त बागेतच दिसते... श्वास घेण्यास... शुद्ध हवा तरी कुठे आहे इथे... " ,
" बरं ... कधी निघणार.. " आजीने दीर्घ श्वास घेत म्हंटल. 
" आता निघत होती पण उद्या जाईन. सकाळी... तुझा निरोप घेईन... " आजीला घट्ट मिठी मारली पूजाने. 

====================================================================

"बघ ..... कसं होते ते बघ ... " संजना म्हणाली. सुप्री आणि आकाशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह... 
" काय बोलते आहेस तू नक्की " , 
" म्हणजे तुमच्या लग्नाचे बोलते आहे रे.... त्यात फोटोग्राफी तूच करणार असशील ना... " संजना हसत म्हणाली. तसे सुप्री, आकाश दोघेही हसू लागले. 
" तू पण ना संजना... म्हणून सांगतो, जास्त राहत जाऊ नकोस या येडी बरोबर... लागली ना सवय... " ,
" ओ मिस्टर A ..... लहानपणापासूनच एकत्र आहोत आम्ही... या संजू मुळेच माझ्यात वेडेपणा आला आहे.." ,

" हो का .... " ,
" हो ... ".... आकाश. 
" मग काय ... हिच्यामुळे मला माझ्या घरी सुद्धा अर्ध्या डोक्याची समजतात. " संजनाच्या या वाक्यावर आकाश किती जोराने हसला. 

" हो का ... तुझाच जय महाराष्ट्र... " सुप्री बोलली. आकाशला हा डायलॉग नवीन होता. 
" हे काय नवीन ... ' जय महाराष्ट्र ' वगैरे... " ,
" जुना डायलॉग आहे आकाश बाबू ... कधी कधीच वापरायचा असतो तो ..." सुप्री आकाशच्या पाठीवर चापट मारत बोलली. तिघे कॉफी शॉप मध्ये बसले होते. आकाशचं आवडतं ठिकाण. अचानक त्याचे लक्ष आभाळाकडे गेलं. तुरळक अश्या काळ्या - पांढऱ्या ढगांच्या रांगा, कुठे कुठे मागे सुटलेले ढगांचे पुंजके, आकाश त्याच्याच विचारात ते बघत नकळत उभा राहिला. त्या ढगांना बघतच या दोघींपासुन चालत पुढे आला. 

सुप्री - संजना त्याकडेच पाहत होत्या. संजनाला माहित होते, २ वर्षांपासून सुप्रीने त्याला कुठेच जाऊ दिले नव्हते. आधीच इतक्या मोठ्या अपघातातून आलेला आकाश, त्यामुळे सुप्री ची काळजी बरोबरच होती. तरी तीही किती वेळा त्याच्या सोबत भटकंती करायला जाणार ना... तिचाही जॉब होता. शनिवार - रविवार किंवा जोडून २-३ दिवस सुट्ट्या आल्या कि ते दोघे जायचे कुठेतरी बाहेर, आकाशच्या फोटोग्राफी साठी. नाहीतर नाहीच. आकाश नक्कीच मिस करत असणार त्याचे जुने दिवस. संजना - सुप्री कधी एकमेकींकडे बघत तर कधी समोर आभाळाकडे टक लावून बघणाऱ्या आकाश कडे. 

आकाश सुद्धा कधीचा बघत होता. शांत वारा वाहत होता. त्यावर स्वार होऊन आलेल्या काळ्या ढगांनी त्याचे लक्ष वेधलं होते. दुसरीकडे नजर टाकली असता. पक्षांचा एक लहानशा थवा नजरेस पडला. " निघाले वाटते हे सुद्धा पावसाला भेटायला... एव्हाना गावात पाऊस सुरु झाला असेल ना... " स्वतःच्या मनाशीच बोलला आकाश. " जमिनीतून गवताचे इवलेसे कोंब डोकावू लागले असतील... झऱ्याना नवीन पाणी येऊन मिळत असेल. धुक्याची चादर पडत असेल तिथे पहाटे...किंवा पावसाची वाट बघत असतील सर्व सुकलेली झाडे...  मी मात्र इथे..." जरासं वाईट वाटलं त्याला. 

==============================================================

सकाळी आजीला जाग आली तेव्हा ८ वाजले होते. पूजाच्या खोलीत गेली तेव्हा नव्हतीच ती तिथे. गेली असावी पूजा... असा मनाचा समज करत आजी अंगणात देवासाठी फुले आणायला आली. बघते तर अंगणात पूजाची फोटोग्राफी सुरु होती. एका कोपऱ्यात तिची सॅक ठेवली होती. 

" कसले गं फोटो काढतेस... " , पूजाने आजीकडे वळून पाहिलं. 
" किती सुंदर फुले आहेत तुझ्या बागेत... इतके वेळा आली तुझ्याकडे... आज पहिल्यांदाच पाहिली.. " पूजाने आणखी एक फोटो क्लीक केला. आजी तिच्या मागेच येऊन उभी राहिली. 

" दर आठवड्याला येऊन बघ.... रोज आलीस तरी चालेल... जवळपास रोजच फुलतात ती.... तूच नसतेस तिथे. " पूजा काहीच बोलू शकत नव्हती यावर. " तुझे आजोबा सांगायचे.... त्यांचाही एक मोठा वाडा होता. तिथे तर केवढे मोठे अंगण होते त्यांचे. वाडा काही कारणाने गेला , सोबत अंगणही... त्याचीच आठवण म्हणून इथे हे छोटंसं अंगण उभं केलं. तरीही जुन्या आठवणी काढत बसायचे तुझे आजोबा ... " आजीने साडीचा पदर डोळ्यांना लावला. पूजाने आईचे डोळे पुसले. गालावर पट्कन एक kiss केलं आणि बोलली. 

" ये हिरोईन .... हसतानाच छान वाटतेस तू... रडली कि आणखी म्हातारी दिसतेस ... " आजीला हसू आलं त्यावर. " चल ... निघताना तरी निदान हसून निरोप द्यावा... चल निघते मी.... " पूजाने सॅक पाठीवर लावली. 
" पुन्हा काही दर्शन तुझं ... " आजीच्या या वाक्यावर सुंदर smile दिली पूजाने. आजीला एका सलाम ठोकला . हाताने " Yo " केले. आणि निघाली. 

" पूजा " ...कोणत्या शब्दात तिचे वर्णन करता येईल ते माहित नाही. दिसायला नाकी - डोळस नीटसं. हसायची छान. चेहरा हसरा होता ना तिचा. फोटोग्राफीची आवड. अशी ती. कदाचित एवढ्या छान मुलीला नजर लागू नये, म्हणून डाव्या डोळ्याखाली एक मोठा तीळ, असं काही म्हणता येईल अशी जन्मखूण . सडसडीत बांधा, चपळ, काटक...  शहरी भाषेत बोलावे तर Fit and Fine.... पण शहरात न राहणारी. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालं आणि एका मोठ्या कंपनीत software engineer म्हणून जॉबला लागली. दोन वर्ष  ' Routine life ' सुरु होतं तीच. अचानक काय झालं, काय माहित. " मी आता शहरात राहू शकत नाही. " असं सणसणीत वाक्य घरच्यांवर टाकून आणि सोबत काही कपडे, काही पैसे आणि सोबतीचा मित्र ... कॅमेरा घेऊन निघून गेली..... वाट मिळेल तिथे.

==================================================================

आकाश खूपच अस्वस्थ असायचा आजकाल. चेहऱ्यावर नाराजी दिसायची त्याच्या. त्यात भरीसभर जून महिना सुरु झालेला. शहरात जरी पाऊस सुरु झालेला नसला तरी संध्याकाळी आभाळ भरून यायचे. चलबिचल व्हायचा आकाश अगदी. सुप्रीला समजत होते ते. तरी काय करणार,  तसे हे तिघे ऑफिस सुटलं कि एकत्रच निघायचे. आकाशचे ऑफिस - सुप्रीचे ऑफिस शेजारीच होते ना. त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत गप्पा- टप्पा सुरूच. संजनालाही आकाश मधला फरक कळू लागला होता. 

एक दिवस, संजना सुप्रीच्या घरी आली. " चल ग ..... गच्चीवर गप्पा मारू. " संजनाने घरी गेल्या गेल्या सांगितल. 

" इथे बोल कि .... आमच्या घरात काय काटे टोचतात का... कि काही पर्सनल आहे .... उम्म्म्म्म !!!!! " सुप्रीने संजनाचे गाल ओढले. 
" येडे .... येतेस कि बोलू मोठ्याने ...... थांबच ... काकी ... " सुप्रीने लगेच संजनाचे तोंड हाताने बंद केलं. 
" चल चल ..... तुझाच जय महाराष्ट्र... " दोघी गच्चीवर आल्या. " हा बोल .... संजू.... एवढं काय होते... जे घरात बोलू शकत नव्हती. " संजनाने सुप्रीच्या समोर एक कागद धरला. 

" हे काय ... " सुप्री.. 

" वाचता येते ना ... " संजना . सुप्री लक्षपूर्वक वाचू लागली. नंतर संजना कडे बघू लागली. 
" मला काय बोलायचे होते , ते कळलं असेल तुला ... " संजनाने सुप्रीच्या खांदयावर हात ठेवला. 
" अगं पण ..." सुप्रीला तिने बोलायला दिलेच नाही. 

" हे बघ सुप्री... आकाश कधीच समोर दाखवत नाही त्याच्या feelings , तरी सुद्धा कळतात. खूप मिस करतो आहे तो , त्याचे जुने दिवस.... आणि हि तर त्याची आवड आहे ना ... करू दे मग त्याला.. " सुप्री पुन्हा त्या पेपरकडे पाहत होती. एका photography compition चे पत्रक होते ते . " Wild photography " हा विषय. आकाशचे त्यात प्राविण्य. 
" तोच जिंकणार .... यात शंकाच नाही.... पण हे जिंकण्यासाठी नाही , तर त्याचा हरवलेला ' तो ' पुन्हा भेटण्यासाठी .... बघ , तिथे गेला तर तो एकटा नसेलच , बाकीचे हि असतील , म्हणजे त्याच्या सुरक्षितेची काळजी मिटली, शिवाय निसर्गात जायला मिळेल त्याला... जरा फ्रेश होईल तोही... बघ , तिथे लिहिले हि आहे , ग्रुप मध्ये असणार आहेत सर्व स्पर्धक ... विचार कर .... जाऊ दे त्याला ... " संजना सुप्रीचा निरोप घेऊन निघून गेली. 

पुढच्या दिवशी , ऑफिस सुटल्यावर नेहमी सारखे हे तिघे एकत्र निघाले. घरीच जाणार होते, वाटेत सुप्रीने थांबवलं. 
" आकाश ... कॉफी घेऊया का ... छान थंड हवा आहे , मूड झाला आहे माझा कॉफीचा ... " ,
" मूड झाला तर चलो .... " आकाश सुद्धा तयार झाला. 

संजना होतीच सोबत. नेहमीच्या ठिकाणी आले. बसले थोडावेळ. यांचे टेबल सुद्धा ठरलेले. संजनाने त्यातल्या त्यात एक पुस्तक शोधून काढलं. ते वाचत बसली एका कोपऱ्यात. या दोघांना मोकळीक म्हणून. कॉफी साठी वेळ होता. आकाशचे लक्ष पुन्हा आभाळाकडे लागलं होतं. आणि सुप्री त्याच्याकडे पाहत होती. गुपचूप तिने , काल संजनाने दिलेला पेपर आकाशच्या पुढयात ठेवला. त्याचे तर अजूनही लक्ष नव्हते. 

" खो .... खो ..... " सुप्रीने मुद्दाम खोकला काढला. आकाश अजूनही वरती पाहत होता. " खो .... खो ..... खो " पुन्हा सुप्रीच. 

" उगाच कशाला खोकला काढते आहेस .... नाही जमत acting तुला .... येडू बाई ... " आकाश स्वतःच हसू लागला.
" मग बघ ना माझ्याकडे ... वर काय बघतो आहेस कधीपासूनचा.... नाही पडणार पाऊस आज ... " आणि कॉफी आली . 
" सर ... तुमचा पेपर बाजूला घेता का ... कॉफीचे डाग पडतील त्यावर . " वेटर बोलला तसं आकाशचे लक्ष त्या पेपरवर गेलं. 

" हे काय .... " आकाशने सुप्रीला विचारलं. " तुझ्यासाठी आहे..... " ,

" माझ्यासाठी .... अगं वेडे ... हे compition आहे ... मी कुठे कधी भाग घेतो का .. त्या मॅगजीन साठी करतो ना फोटोग्राफी... तेच खूप आहे मला ... " आकाश हसत म्हणाला. 

" तरीही .... २ वर्ष झाली तुला, कुठे गेला नाहीस तू .. तुझी होणारी तगमग दिसते मला. फक्त माझ्यासाठी थांबला आहेस.. निदान या निम्मिताने जाशील तरी, तिथे खूप जण असतील ना ... एकटा ही राहणार नाहीस ... म्हणजे मला जास्त काळजी वाटणार नाही तुझी... " सुप्री बोलताना भावुक झालेली. संजनाही आली. 

" हो... जा आकाश, खरच जा... स्पर्धेच्या निमित्ताने तरी... तुझे असे बैचेन होणे बघवत नाही, गेली २ वर्ष ... पावसाळा "कोरडाच " आहे तुझ्यासाठी.... म्हणून तुला छान वाटावे या साठी मीच सुप्रीला सांगितलं. " आकाश सुद्धा त्या पेपर कडे पाहत होता. त्याला कसं रिऍक्ट व्हावे तेच कळत नव्हतं. बसल्या जागेवरून उठला आणि मागे जाऊन उभा राहिला. पुन्हा त्याचं लक्ष आभाळाकडे लागलं होते.

==================================================================

पूजा तिच्या ठरलेल्या जागी पोहोचली. तीच जागा ठरलेली. तिथेच भेटणार होते सगळे, यांचा ग्रुप. यांचा एक ग्रुप होता ना, १०-१५ जणांचा. त्यातले आतातरी दोघेच आलेले होते. त्यांना " Hi , Hello " करून पूजा एका बाजूला आली. पाठीवरची सॅक खाली ठेवली आणि तिथेच असलेल्या एका कठड्यावर बसली. थोडावेळ गेला. 

" भौ.... " मागून अचानक आवाज आला. केवढ्याने दचकली पूजा. मागे बघते ते ' हि ' .... 
" तुला ना .... आता बघते थांब ... " पूजा मागेच पळाली तिच्या. 
" wait !! wait !! थांब .... थांब .... " ती पूजाला थांबवत म्हणाली. 
" करशील ..... करशील पुन्हा असं... " पूजा तिला गुदगुल्या करू लागली. 
" प्रॉमिस ... प्रॉमिस .... ना ... नाही करणार पुन्हा ... " 'तिने ' पूजा समोर हात जोडले. पूजाने मिठीच मारली तिला. 
" कुठे गेलेली ... " ,
" पप्पा - मम्मी ला भेटून आली... गेल्या वर्षी भेटली होती. मग आठवण आली तशी गेली.. तुला विचारत होते. यायला पाहिजे होते तू ... " पूजा काहीच बोलली नाही. 

"ती" .... ती म्हणजे कादंबरी. खरं नाव तर वेगळेच होते. तरी तिला कादंबरी हेच नावं पसंत होते. पूजाची घट्ट मैत्रिण. गेल्या ४-५ वर्षांपासूनची मैत्री. बडबडी, फिरायची आवड, फोटोग्राफी, निसर्गाची आवड. या सर्व गोष्टी आणि शहरी जीवनाचा आलेला कंटाळा. त्यात पूजाची ओळख. झाली मैत्री दोघींमध्ये. या दोघी कश्या भेटल्या..... एकाच 'ग्रुप' मध्ये होत्या दोघी. पूजाने शहर सोडल्यापासून , तिचे हेच सवंगडी , आणि हाच ग्रुप.. "जिप्सी " लोकांचा ग्रुप. भटकत राहायचे कुठे कुठे, लागली तर लोकांना मदत करायचे, पण शहरात नाही. निसर्गाचा आनंद लुटायचे. या ग्रुप मध्ये असेच सगळे होते, ज्यांना शहरी जीवनाचा कंटाळा आलेला. कादंबरीही तशीच होती. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायची. ते धावपळीचे जीवन, सततचे टेन्शन, कादंबरीला पसंत नव्हतेच. घरी कोणीचं नाही. थांबवायला , अडवायला कोणीच नाही. निघाली एक दिवस. आणि वाटेत पूजा भेटली. लगेचच ओळख आणि काही दिवसात मैत्री. तशीच होती कादंबरी. पुजाशी छान जमायचं तीच. इतकं कि पूजाच्या आई - वडिलांशी , कादंबरी स्वतःचे आई-वडील असल्या सारखं वागायची. पूजा मात्र त्यांच्याकडे जाळे टाळायची. आताही , कादंबरी पूजाच्या घरूनच आली होती. 

" आठवण येतं नाही का तुला आईची.... " कादंबरीने पूजाला विचारलं. चहा पीत बसल्या होत्या दोघी.  अजूनही त्यांच्या ग्रुप मधले काही यायचे होते. हा यांचा ग्रुप. अगदी सगळेच शहरातले होते असे नाही. तरी वर्षातून एक - दोनदा फेरी असायची या सगळ्यांची. कुटुंबाला भेटण्यासाठी, जुने मित्र - मैत्रीणी सोबत काही क्षण घालवण्यासाठी आणि काहींना.....  जे शहरातले नव्हते, ते फक्त शहरी जीवन काही काळ जगण्यासाठी येत. त्यासाठीच आता हा ग्रुप आलेला शहरात. पूजाने चहाचा एक घोट घेतला. जमलेल्या वर नजर टाकली. 

" नाही येत आठवण, आठवणी काढून तरी काय करू.... नकोशा असतात त्यांच्या सोबतच्या आठवणी. " पुन्हा तिने कादंबरी कडे नजर टाकली. " तू आलीस ना भेटून ... झालं ... " पूजाने चहा संपवला. 
" त्याची तरी आठवण येते का... "  कादंबरी चहा पिता पिता विचारत होती. त्या प्रश्नावर मात्र पूजा थांबली. 

" तो .... तो कुठे असतो तेच माहित नाही. हा , त्याची म्हणालीस तर येते आठवण... " ,

" आणि त्याला ..... त्याला येतं असेल का तुझी आठवण. " कादंबरीच्या त्या प्रश्नावर हसली पूजा. 
" तेही माहित नाही.... त्याला आठवणी आवडायच्या नाहीत. बोलायचा, आठवणी काढूच नये कधी, त्यांचा त्रासच जास्त होतो. कदाचित, पुढे कधी आमची भेट झालीच , तर त्याला मी आठवेन कि नाही ते सुद्धा माहित नाही. " पूजा बोलता बोलता जरा पुढे आली. दुपार होतं होती, तरी दुपारचे ऊन असे नव्हते. मळभ आलेलं आभाळात. वाराही होता हलकासा. पूजा ते अनुभवत होती. " तो बोलल्याचा आठवणी बद्दल विचारलं तर.... आठवणींचे असे गर्द रान असते, दाटी-वाटी केलेल्या आठवणींचे घनदाट जंगल.... त्यात हरवून गेलं कि माणूस स्वतःला विसरतो... म्हणून दुरूनच बघायचे असे आठवणींचे गर्द रान... " 

==============================================================
 
आकाश त्याच्या घरी तयारी करत होता निघायची. २ वर्षांनी तो कुठेतरी भटकायला निघाला होता. संध्याकाळ होतं होती. आकाशला काही आठवलं. तसा तो गच्चीवर आला. एक वेगळंच फीलिंग होतं होते त्याला. जून महिन्याची सुरुवात.... अगदी मुहूर्त काढावा तसा निघालो आहे मी. माझ्या मित्रांना भेटायला. आकाश मनोमन खुश होतं होता. वेगळाच प्रवास सुरु होईल आपला. 

===================================================================

" त्याचं नाव का सांगत नाही कधी...... सारखं सारखं ' तो.....' ... नाव सांग कि त्याचं. " कादंबरी मागेच लागली पूजाच्या. पुजाचं लक्ष तिच्या ग्रुप कडे होतं. अजूनही २ जण यायचे बाकी होते. कादंबरीच्या या प्रश्नाचे उत्तर पूजाने दिलं नाही. 

" बरं, राहू दे... मला का सांगशील तू... मी कुठे bestie आहे तुझी... " कादंबरीने उगाचच रुसण्याचे नाटक केलं. 
" नौटंकी.... खूप करतेस हा तू... तुला blogger पेक्षा actor व्हायला पाहिजे होते... बरोबर ना ... " पूजाने कादंबरीचे नाक ओढले. 

पूजा आणि कादंबरी जरी भटकत असल्या तरी उपजीविकेसाठी आणि रोजच्या , नित्याच्या वस्तू , कपडे यासाठी पैसे लागणारच. " Travel blog " लिहायची आयडिया कादंबरची. actually, लिहणारी पूजाच. पूजा अगदी लहानपणासूनच छान लिहायची. अक्षर तर मोत्याचे दाणे, कविताही करायची कधी. हा ग्रुप भारतात जिथे जिथे जाईल, त्या जागेची माहिती पूजा , एका वेगळ्याच , म्हणालं तर काळजाला हात घालणाऱ्या शब्दात लिहून काढायची. त्या जागेचे फोटो रूपात दर्शन घडवायची ते कादंबरी. असा दोघींचा मिळून एक "Travel blog " बनला. एका नामांकित ' TV channel ' ला त्यांचा ब्लॉग आवडला आणि झालं सुरु. प्रत्येक महिन्याला एका जागेची माहिती , फोटोसहित या दोघी ब्लॉग वर पोस्ट करायच्या आणि त्या चॅनलला देयाच्या. त्यासाठी, शहरात यायची गरज नव्हती, त्यांनीच लॅपटॉप आणि वायफाय ची सोय केलेली होती. असतील तिथूनच या माहिती , फोटो पाठवून देयाच्या. ठरलेली रक्कम , सांगिलेल्या बँक अकाऊंट मध्ये ट्रांसफर केली जायची. एकंदरीत हे सर्वच छान सुरू होते, आणि त्या दोघीही खुश होत्या , त्या ग्रुप सोबत. 

कादंबरीच्या प्रश्नाचे उत्तर अजूनही पूजाने दिलं नव्हते. " ठीक आहे सांगते... पण जरासेच सांगेन , कारण तो आठवणीत आहे ना माझ्या .... त्याच्या आठवणी फक्त आणि फक्त माझ्यासाठीच राखून ठेवल्या आहेत मी. " पूजा भारावून बोलत होती. 

" बर  बाबा, राहू दे तुझ्याकडेच ' तो ' ... " कादंबरीने हात जोडले. पूजाने तिच्या डोक्यावर टपली मारली. आता ग्रुपचे उरलेले आले होते. यांची एक बस ठरलेली होती. ती बस आली तसे सारेच त्या बस मध्ये जाऊन बसले. एका ठराविक ठिकाणी सोडून बस तिच्या मार्गाने पुढे जाणार होती. पूजा-कादंबरी एकत्रच बसल्या. कादंबरीला झोप आलेली. पूजाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. बस सुरु झाली. पूजा मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती. दुपारचे काम संपवून सूर्यदेव विश्रांती साठी निघाले होते. संध्याकाळ त्याचीच वाट बघत होती. उन्ह परतू लागली होती. झाडे झोपायची तयारी करत होती. सांजवेळ झालेली. शहरातले उरले - सुरलेले पक्षी घराकडे परतत होते. पण पूजाचे लक्ष, आभाळात भरकटलेल्या काळ्या ढगांकडे होते. जास्त नसले तरी दिसून येतं होते. पूजाला बरं वाटलं. 

" तो ना.. असाच अंदाज लावायचा पावसाचा. आणि अगदी बरोबर असायचा त्याचा अंदाज..... अश्या या ढगांना बघून ना... छान हसायचा..... काय आनंद होयाचा त्याला काय माहित...... त्याचंही कुटूंब होतं शहरात, माणसं नाही आवडायची त्याला.... निसर्गात जास्त रमायचा..... सतत भटकत राहायचा..... " ,

" प्रेम होतं का तुझं.... त्याच्यावर... " कादंबरीने डोळे न उघडताच पुढला प्रश्न केला. पूजा अजूनही बाहेरच बघत होती. 

" प्रेम म्हणता येणार नाही... प्रत्येक वेळेला प्रेमाचाच का आधार असावा ... एखाद्या नात्याला,......... त्याचं आणि माझं नातं असंच काहीसं वेगळं होतं. त्या वेगळ्या नात्याने एकत्र होतो आम्ही. कधी बहीण व्हायचा तो, कधी आई, कधी वडील, आजोबा, आजी, मित्र.... कधी कधी पाऊसच वाटायचा तो.... वाटाड्या होता.. कधीच वाट चुकला नाही, मलाही माझी वाट दाखवून निघून गेला. " कादंबरी ऐकता ऐकता झोपी गेली. शहर एव्हाना मागे पडत चाललं होते. काळोखाचे साम्राज पसरत होते. पावसाच्या ढगांमुळे हवेत आलेला ओलसर थंडावा, खिडकीतून आत येतं पूजाचे केस उडवत होता. पूजाने हळूच बसमध्ये नजर फिरवली. दमले, भागलेले जीव शांत झोपी गेलेले. पूजा पुन्हा तिच्या विचारात गढून गेली. आणि आठवणींच्या गर्द रानात हरवून गेली.  

========================================================

रात्रभर आकाशला झोप लागली नाही. कधी एकदा सकाळ होते असं वाटतं होते त्याला. सकाळ झाली आणि तो निघाला. आई-वडिलांचा निरोप घेतला आणि चालतच निघाला. photography compition मध्ये भाग घेण्यासाठी निघाला होता ना, त्यांच्या अटीनुसार , एका विशिष्ठ ठिकाणी , आधी सर्वांनी जमायचे होते. आकाश तिथेच निघाला होता. रेल्वे स्टेशन वर आला. घड्याळात पाहिले तर सकाळचे ६ वाजत होते. कपाळाला हात मारला त्याने. गाडी ८ वाजताची आणि आलो २ तास आधीच. स्वतःशीच हसला आकाश. एवढ्या लवकर कोण येते स्टेशनला. काय करावे, घरी जाऊ का पुन्हा... नको. एका रिकाम्या बेंचवर डोकं ठेऊन शांत डोळे मिटून बसला. कधी झोप लागली कळलंच नाही. 

" ओ काका ... उठा ... उठा .... गाडी आली तुमची... " आवाज ऐकून खडबडून जागा झाला आकाश. बघतो तो सुप्री समोर. 
" गेली कि काय ट्रेन... " आकाश डोळे चोळत आजूबाजूला बघू लागला. 
" वाजले किती ? " सुप्री -संजना तिथेच उभ्या. आकाशने घड्याळात पाहिलं. ७ वाजले होते. म्हणजे अजूनही एक तास बाकी आहे गाडी यायला. 
" तुम्ही कधी आलात ... " ,
" तुझा मोबाईल कुठे आहे ते सांग आधी... " सुप्री रागात बोलत होती जरा. 
" का .... काय झालं... " आकाशने त्याच्या बॅग मधून मोबाईल बाहेर काढला. ३० मिस कॉल.... 
" सॉरी .... !! मी बघितलाच नाही मोबाईल... " आकाशने कान पकडले. 
" पूजा तरी घालूया त्या मोबाईलची... निदान त्याला तरी शांती लाभेल .... " ....सुप्री. 
" सॉरी ना ... रागावू नकोस .... येडू .... " आकाशने सुप्रीला मिठी मारली. 
" काही कळते कि नाही तुला... किती टेन्शन मध्ये आम्ही दोघी. " आता संजना ओरडत होती. 
" का ? " ,
" का म्हणजे... किती कॉल लावले. काहीच रिप्लाय नाही.... घरी गेलो तर कळलं निघालास कधीच... मग विचार केला... तू इथेच असणार.... इथे बघितलं तर झोपला आहेस आरामात... ", 
" अगं ते .... excitement मध्ये लवकर आलो... " बोलत असतानाच अचानक थंड हवेची झुळूक आली. उन्हाळ्याची गर्मी अजूनही बघावं तशी ओसरली नव्हती. त्यामुळे या इतक्याश्या थंड हवेने तिघेही शहारले. 
" मला ना ..... कळतच नाही काय करतो आहे ते... काल रात्रभर झोपलो नाही... ",
" का रे ... " , सुप्रीने विचारलं. 
" दोन वर्ष.... दोन वर्ष झाली , मी कुठे गेलोच नाही. " बोलता बोलता आकाश पुन्हा त्या बेंच वर बसला. त्याच्या बाजूला या दोघी. 
" खूप मिस केलंस का ... " सुप्रीने विचारलं.  

हसतच आकाशने सुप्रीकडे पाहिलं. " मिस केलं ? .... श्वास होता तो माझा, निसर्ग... शहरात तसही मला जमायचं नाही. २ वर्ष कशी काढली ते मलाच माहित.... " ,
" मग बोलायचं ना मला ..... वेडा कुठला... " ....सुप्री . 
" कसं बोलणार... तेवढी हिंमत झाली नाही कधी... तुला वाईट वाटलं असतं, आणि उगाचच कोणाला दुखवायला आवडत नाही मला... " सुप्रीने आकाशचा हात हातात घेतला. " बघ ना .... आता कसं वाटते, एकदम जुने दिवस आठवले.... जेव्हा मी नव्याने भटकंती सुरु केलेली.... किती वर्ष मागे गेलो मी .... क्षणात ... " यावर मात्र सुप्री बोलली. 

" तू नक्की आकाशच आहेस ना .. मला तर बोलतोस ... आठवणी काढू नये... आणि आता स्वतःच जुनं आठवत बसला आहेस .. "  

" काय आहे ना ... माझ्याही आहेत काही आठवणी... फक्त मी कधी त्या व्यक्त करत नाही. या दोन वर्षात ... आठवणीवरच तर होतो मी.. आठवायाचे मला ते गड - किल्ले .... डोंगराच्या रांगा..... कडे-कपारी... दऱ्या.. पावसाने ओथंबलेले ढग.... उंचावरून कोसळणारे झरे.. असा सुस्साट वारा... झाडाच्या पानांची सळसळ .... पक्षांचे थवेच्या थवे.... ती विजांची काळ्या आभाळात होणारी नक्षी..... होणार कडकडाट..... असा अंगभर शहारा आणणारा बोचरा वारा... " आकाश कसा अगदी भरभरून बोलत होता. 

" कधी कधी तर असा भास व्हायचा.... आपण कुठंतरी उंच ठिकाणी उभे आहोत... आपण म्हणजे मी एकटाच , बरं का .... समोर नजर जाईल तीत पर्यंत पसरलेलं फेसाळणाऱ्या नदीचं पात्र... उधाणलेला वारा... त्यात मुसळधार पाऊस... हे सर्व बघत असतो मी आणि एका क्षणाला मी स्वतःला झोकून देतो त्या पाण्यात... उंचावरून खाली येतं असतो मी , आजूबाजूला वरून कोसळणाऱ्या झऱ्यांचे पांढरे शुभ्र पाणी.... सोबत पाऊस तर असतोच... वाराही येतो मग साथीला.. आणि एकदम आम्ही तिघे त्या थंड पाण्यात खोल डुबकी मारतो.... हे असं व्हायचं मला... कधी कधी तर सकाळी उठलो कि डोळ्यासमोर एखादा हिरवा कंच डोंगर शोधायचो...  नजरेसमोरून एखादा मोठ्ठा पक्ष्यांचा थवा जातो का त्याची वाट पाहायचो...  किंवा ते शाळेत लहान मुले कशी रांग लावतात तशीच ढंगांची रांग दिसते का ते बघायचो..... नंतर कळायचे.. आपण घरात बेडवर आहोत.. तुम्हाला हे सर्व विचित्र वाटेल. म्हणजे असे काही वेगळेच भास होयाचे मला... तुला कळलं असेलच .... मी या क्षणाची किती वाट पाहिली .... आजच्या दिवसाची..." सुप्रीच्या डोळ्यात सुद्धा आभाळ भरून येतं होते. " ये वेडा बाई .... इतकं इमोशनल नाही व्हायचे... वेडी कुठली.. " आकाशने पुन्हा तिच्या डोक्यावर टपली मारली. 

" किती साठवून ठेवलं होते तू .... " संजनाही डोळे पुसत म्हणाली. 
" काही नाही ग ... जुने दिवस आठवले... मी जेव्हा निघालो होतो ना .... एकटाच .... तेव्हा , पहिल्यांदा निघालो तेव्हा हेच स्टेशन होते. असाच निघालो होतो.... फक्त आई आलेली निरोप देयाला ... जश्या तुम्ही दोघी आला आहात... " बोलता बोलता आकाशची ट्रेन आली. 

" बघ ... वेळ कसा निघून गेला... सुप्री, बोललो ना आठवणी काढू नयेत ... हे आठवणींचे गर्द रान असते .... त्यात गेलो कि हरवून जातो आपण .... " सामान घेऊन आकाश गाडीत जाऊन बसला. खिडकीजवळच त्याची सीट होती. गाडी सुरु होईल म्हणून या दोघी बाहेरच थांबल्या. आकाश खिडकीजवळ येऊन बसला. या दोघीकडे पाहत होता. 

" बरं ... १०-१५ दिवस ती स्पर्धा आहे... तेवढेच दिवस राहायचे तिथे... संपले कि लगेच घरी.... आणि मोबाईल.... त्याचा वापर बोलण्यासाठी करतात माणसं. उगाच खेळणे म्हणून दिला नाही आहे तो. त्याचा वापर कर... मी करतच राहीन फोन.... फोन उचल ... समजलं ना ... " सुप्रीच्या सूचना.... 

" हो हो ... माझी आई.. आहे सर्व लक्षात... विसरू नकोस हा मला... " आकाश हसला स्वतःच्या वाक्यावरच.. 
" हो का .... तुमचाच जय महाराष्ट्र्.... " सुप्रीच्या या वाक्यावर तिघेही हसले. 

गाडी सुरु झाली हळूहळू... " काळजी घे ... फोन करत राहा.... पोहोचला कि फोन कर .... " सुप्रीचं सुरूच.... गाडीने वेग पकडला. आकाश, सुप्री डोळ्याआड होई पर्यत तिला बघत होता. निरोप घेताना सुप्री- संजना भावुक झालेल्या. गाडीने स्टेशन सोडले आणि finally, दोन वर्षांपासून कुठेतरी भावनांच्या बंधनात थांबलेला आकाशचा प्रवास सुरु झाला.  

=================================================================

पूजा - कादंबरीचा ग्रुप त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. सर्वच त्या बसच्या प्रवासाने थकलेले होते. जमलेल्या ठिकाणीच कुठेतरी जवळपास आज वस्ती करून पुढे वाटचाल करावी , असं सगळयांचे ठरले. कादंबरीने कॅमेरा बाहेर काढला आणि " क्लिक क्लीक " सुरु झाले. पूजा आणि तिच्या सहकाऱ्यांनी एक छान जागा निवडली. आणि तंबू लावायला सुरुवात केली. कादंबरी आपल्याच विश्वात.... फोटो काढत. खूप वेळाने तिला आठवलं कि आपल्याला हि त्यांना मदत करायला हवी. तशी घाईघाईत मदत करायला पळाली. काही वेळातच काम झाले.  मग उरलेले जेवणाची तयारी करायला लागले. जिप्सीच होते ते... मिळेल त्यात आनंद.... पण यावेळेस सर्वांनीच काही ना काही आणले होते शहरातून. तेच खाऊन सगळे आराम करू लागले. सर्वांच्या शहरातल्या गप्पा - गोष्टी सुरु झाल्या. पूजा मात्र एकटीच या सर्वांपासुन वेगळी बसली होती. कुठेतरी एकटक पाहत होती. कादंबरी येऊन बसली तिच्या शेजारी. " दमली वाटते माणसं .. " तिच्या त्या डायलॉग वर पूजाने फक्त एक छानशी smile दिली. " पू .... काय झालं .... इतकी शांत का... " ," असंच ... समोर बघ... " पूजाने कादंबरीला समोर बघायला सांगितलं. 

समोर मोकळी जागा होती. तिथून खाली एक गाव दिसत होते. भर दुपारी सुद्धा तिथे सावली होती. पाऊस सुरु झालेला नसला तरी एखादा वाट विसरलेला ढग ... पाण्याचा शिडकावा करून जायचा. त्यामुळे उन्हाळ्यात रखरखीत झालेल्या जमिनीला थोडासा दिलासा मिळायचा. गवताचे कोंब वर येऊ लागले होते. त्यामुळे थोडी सुकलेली जमीन आता हळूहळू हिरवा रंग धारण करू पाहत होती. गाव सुरेखच होते, तिथे शहरीपणा रुजू होतं होता. तरी निसर्गाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. झाडांनाही चाहूल लागलेली पावसाची. एकंदरीत सर्वच तयार होते पावसाला. 

कादंबरीने फोटो काढला. " पावसाचा गंध दाटला आहे ना अवती भवती ... आभाळात सुद्धा आहे त्याचे अस्तित्व... काही दिवसांनी स्वतःच अवतरेल... " पूजा एकटीच बडबडत होती. 

" कसलं भारी बोलतेस तू... हे लिहिणार आहेस का कुठे ब्लॉग मध्ये.. " कादंबरीने विचारलं. 
" नाही ग ... तो बोलायचं असं ... त्याचे शब्द आहेत हे .... मला त्याचं असं बोलणं खूप आवडायचं... जास्त कोणाशी बोलायचा नाही तो...  स्वतः मधेच असायचा तो. पण असे आभाळ भरून आलं ना ...  कि कवी - लेखक बनायचा. आणि असंच छान छान बडबडत राहायचा. जवळची माणसं होती त्याची... परंतु त्याचा एकच सोबती.... त्याचा कॅमेरा.. हे फोटो , कॅमेरा .... त्याच्याकडून आलं ते वेडं ... " पूजा हसत होती बोलताना. कादंबरी तर तिच्या चेहऱ्याकडेच पाहत होती. 
" किती वर्ष झाली त्याला शेवटचं भेटली होतीस... " कादंबरीचा प्रश्न. 
" ५ वर्ष... तू भेटलीस ना... त्याच्या थोडे आधी... म्हणजे कसं झालं माहित आहे... तो वेगळ्या वाटेने गेला. हा आपला ग्रुप आणि मी , वेगळ्या वाटेने... त्यानंतर बरोबर २ दिवसांनी तुझी भेट झाली. " पूजाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. 
" तुला माहित आहे .. मी किती लकी आहे ते.... " कादंबरी म्हणाली. 
" का ग ... " पूजाचा प्रतिप्रश्न. 
" मला ना.... life मध्ये खूप चांगली चांगली माणसं भेटली. नेहमीच .... देवाकडे न मागताच... म्हणून मी देवाकडे काहीच मागत नाही कधी... पण .... ' त्याची '  एकदा तरी पुन्हा भेट व्हावी, असं मी मागते देवाकडे ... तुझ्यासाठी.... " ,
" लाडाची बाय माझी ती .... " पूजाने तिचा गालगुच्चा घेतला. दोघीही हसू लागल्या. 


================================================================

आकाश तसाही रात्रभर झोपला नव्हता. ट्रेन मध्ये झोप लागली. ट्रेन थांबली तेव्हा जागा झाला. स्टेशन ओळखीचे. आधीही किती तरी वेळा तो निघायचा आणि इथेच उतरायचा. याच स्टेशन वरून भटकंती सुरु व्हायची. पण आता फरक होता. दोन वर्षांपासून थांबवलेलं त्याने स्वतःला. दीर्घ श्वास घेतला आकाशने. थोडंसं पुढे चालत आला. पावसाळा ऋतू सुरु व्हायला अवधी आहे अजून. त्यामुळे अजूनही काही करडा रंग डोंगरांवर रेंगाळत आहे. थोड्या दिवसांनी त्यालाही माघार घ्यावी लागेल. हिरव्या रंगाची भूल पडेल सर्वांना. आकाश आजूबाजूला निरीक्षण करत पुढे जात होता. चालता चालता एका माळरानावर पोहोचला. पुढे फक्त आणि फक्त , डोंगरांच्या रांगा दिसत होत्या. उभ्या असलेल्या जागेवरून एक वाट ती स्पर्धा होती, त्याच्या कॅम्प कडे जात होती. आणि दुसरी वाट , त्या निसर्ग सौंदर्याकडे.... आकाशने खाली वाकून त्या ओल्या मातीला हात लावला. आजचं भल्या पहाटे थोडा शिडकावा झाला असावा पावसाचा....ती ओली माती त्याने हातात उचलून घेतली आणि मन भरून मातीचा गंध मनात भरून घेतला. इतके दिवस दूर होता ना तो .. या सर्वापासून.... आणि आज समोर इतकं भरभरून निसर्ग सौंदर्य... टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यातून.... हातातली माती त्याने कपाळाला लावली. एक नजर त्याने कॅम्प कडे जाणाऱ्या वाटेकडे टाकली. छान हसू आलं त्याच्या चेहऱ्यावर. आठवणी सुद्धा दाटून आलेल्या त्याच्या. गड - किल्ले, डोंगर , कडे - कपारी... त्याचे मित्र त्याला बोलवत होते. दुसऱ्या हातात असलेला तो स्पर्धेचा कागद, त्याकडे त्याने हसून पाहिलं. आणि पुन्हा त्याच्या पाठीवरच्या सॅक मध्ये टाकला. डोळ्यात साठवलेल्या आठवणी सहित निघाला दुसऱ्या वाटेने.... त्याच्या मित्रांना भेटायला... 

============================================= to be continued


Followers