All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Thursday 31 December 2020

जिवलगा ..... !! ( भाग १)

 


आदित्यची नजर तशी नेहमीच भिरभिरत असायची. तसा त्याचा स्वभावच...... स्वच्छंदी, अगदी कोणी उनाड पक्षी म्हटले तरी वावगे ठरू नये. खरे तर त्याला उडायला आवडायचे. फिरायला आवडायचे. एका जागी थांबणे पटत नसे त्याला. त्याच्या अश्या स्वभावामुळे मित्रांची संख्या सुद्धा जास्त... मनमौजी .... friend list मध्ये मैत्रिणी ही होत्या. पण फक्त ' मैत्रिणी ' हा , आदित्यला प्रेम वगैरे या गोष्टीचा वैताग होता. प्रेमावर विश्वास असला तरी त्यात न पडलेले बरे , असे त्याचे मत. त्यामुळे मैत्रिणीना " मैत्री " पुरतेच. आदित्य कॉलेज मधला हिरो, पण त्याने त्याची अशी कोणी " हिरोईन " बनू दिली नव्हती. त्याचे नाव , गेल्या ४ वर्षात कितीतरी मुलींसोबत जोडले गेले होते , तरी ते सर्वच खोटे होते हे प्रत्येक मुलीला माहित असायचे.

कॉलेजचे शेवटचे म्हणजेच १५ वी चे वर्ष सुरु झाले. ऐन पावसाळ्यात नवीन वर्ष. बाकीच्यांना आवडत असला तरी आदित्यला पावसाचा पार कंटाळा यायचा. पावसाळी पिकनिक , पावसात भिजणे हे तो मुद्दाम टाळायचा. पण पावसाळ्यात सुरु झालेलं कॉलेज , तिथे तर जावेच लागणार. कॉलेजचे सुरुवातीचे दिवस असल्याने जास्त कोणी यायचे नाही. lecture सुद्धा तसे सुरु झाले नव्हते. एक आठवडा तर तसेच होते. त्यानंतर मात्र कॉलेज गजबजू लागले. आदित्यचा ग्रुप सुद्धा जमू लागला. छान दिवस सुरु झाले. त्यात शेवटचे महत्वाचे वर्ष, आदित्यचा अभ्यास तर पहिल्या दिवसापासून सुरु झालेला. lecture संपली कि जरा वेळ कॉलेजमध्ये टाईमपास करून घरी जाणे , असे सुरु होते.

अश्याच एक सकाळी आदित्य कॉलेज साठी निघाला. पाऊस नव्हता त्या सकाळी. शिवाय गेले काही दिवस पावसाचे दर्शन झाले नव्हते. आदित्यला हेच हवे होते. घरापासून कॉलेज अर्ध्यातासाच्या अंतरावर , रोज चालतच जायचा. आपल्याच धुंदीत चालणे त्याचे. कानाला मोठे हेडफोन , मोबाईल वर सुरु असलेली आवडती गाणी आणि सोबतीला थोडी मंद हवा.. आदित्यची भिरभिरती नजर  त्याच्या पुढे पुढे धावत होती. तेवढ्यात वादळ यावे ,असेच अचानक आकाशात काळे ढग जमा होऊ लागले.

" याला काय झालं आता ... इतके छान वातावरण होते .... काही गरज का पावसाची आता ... मंद कुठला .. " येणाऱ्या पावसाला नावे ठेवत आदित्यने त्याचा चालण्याचा वेग वाढवला. पुढल्या वळणावर कॉलेजकडे जाण्याचा रस्ता. आभाळ अधिकच गडद झाले.

आणि ...... आणि अचानक एक जोराची वीज कडाडली. त्याचसोबत एका मुलीचा मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला. ते किंचाळणे आदित्यला त्याच्या हेडफोन मधून ऐकायला आले. समोरचं उभ्या असलेल्या मुलीकडे त्याचे लक्ष गेले. चेहरा झाकून ती उभी होती. बहुदा त्या विजेच्या आवाजाला घाबरली असावी. वाराही आता वेगाने वाहू लागला होता. का कुणास ठाऊक ...आदित्य तिच्याकडे बघत उभा राहिला. पण काहीतरी विचित्र होते आहे असे त्याला जाणवले.

त्याच्या आजूबाजूला असलेले सर्वच " slow motion " मध्ये आहेत , असे त्याला वाटले. वाटले काय .... तसेच तर होते सर्व. तो अजूनही त्या मुलीकडे पाहत होता. तर तीही आता " slow motion " मध्ये... तिने हळूच स्वतःच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला केले. स्वतःला सावरत नीट उभी राहिली. चेहऱ्यावर येणारे केस मात्र वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नीट होतं नव्हते. तरी ती खूप प्रयत्न करत होती. हे सर्व "slow motion " सुरु होते ... बरं का !!! शेजारच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या , बाईक .... फुटपाथ वरून चालणारी माणसे , पावसामुळे वेळेआधीच जागे झालेले आणि उडणारे पक्षी, वाऱ्याने हलणारी झाडाची पाने , फांद्या .... सर्वच कसे मंदगतीने ..... शेवटी तिच्या चेहऱ्यावरचे केस सुद्धा वाऱ्याने दूर केले, तेही slow motion मधेच...... आदित्य तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिने स्वतःला सावरले आणि धावत ( slow motion मध्ये ) कॉलेजच्या दिशेने निघून गेली. पावसाचे थेंब आदित्यच्या गालावर पडले तेव्हा भानावर आला. तोही पळत पळत कॉलेज मध्ये शिरला. lecture सुरु होण्यास अद्याप ३० मिनिटे बाकी होती. वर्गात न जाता बाहेर गॅलरीत आदित्य उभा राहून विचार करत होता. " नक्की काय झाले आता .... आधी असे कधी झाले नव्हते .... आणि ते slow motion ..... काय प्रकार होते नक्की... " विचार करून करून डोक्याचा भुगा झाला.

आदित्य तसाच डोक्याला हात लावून उभा, " काय हिरो .... डोके दुखते आहे वाटते... " त्याचा मित्र , गौरव आलेला तोपर्यंत.

" काही नाही रे .... सहजच ... बाकीचे कुठे आहेत ... आले नाही ते ... " ,

" हे काय ..... येतच आहेत... " गौरवने मागे बघायला सांगितले. आदित्यने मागे नजर टाकली, त्याचाच ग्रुप येत होता. " Hi !! " त्यापैकी एकाने आदित्यला दुरूनच हात केला. आदित्यने हि " Hi " करण्यासाठी हात वर केला आणि अचानक मगाशी दिसलेली मुलगी त्याला त्याच्या मागून चालत येताना दिसली. पुन्हा सर्व slow motion ..... पुन्हा वारा वाहू लागला. पुन्हा तिचे मोकळे असलेले केस तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले. आदित्यचा ग्रुप slow motion मध्ये चालत येत होते , त्यामागून ती... एका क्षणाला सर्व ग्रुप आदित्यच्या समोर उभा होता , त्यामागून चालत चालत ती गायब झाली.


आदित्य तसाच हात वर करून उभा, गौरवने त्याच्या डोळयासमोर टिचकी वाजवली. एकाने त्याच्या हातावर टाळी दिली. आदित्य जागा झाला.

" तुम्ही सर्व slow motion मध्ये का चालत होता ? " आदित्यचा प्रश्न.

" काय बोलतो आहेस तू... " जुई... त्याची एक मैत्रीण ... तिने विचारलं.

" मला एक सांग ... काल रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करत बसला होतास ... " गौरवने विचारलं.

" हम्म ... साधारण १२ .... maybe १२:३० वाजलेले होते... का रे ... " आदित्यने सांगितले.

" चला रे .... lecture सुरु होईल..... बघा .... जास्त अभ्यास केला कि असेच होते.. " गौरव सर्वाना उद्देशून बोलला. तसे सर्वच हसले आणि वर्गात जाऊन बसले. मॅडम यायला अजूनही वेळ होता. वर्गात सर्वांच्या एकमेकांशी गप्पा सुरु होत्या.

" च्यायला !!! काय होते आहे मला .... कि मलाच हे सर्व slow motion मध्ये दिसते... १ मिनिट .... मग आता कसे सर्व नॉर्मल स्पीड मध्ये दिसते आहे... काय खरे ... काय खोटे ... " आदित्य विचार करत होता. बाजूलाच बसलेल्या गौरवच्या गालाला त्याने स्पर्श केला. गौरव दचकला.

" काय रे ..... काय होते आहे तुला... ... आणि तसे काही मनात असेल तर सॉरी ..... !! मला मुली आवडतात , माझी GF पण आहे. तुला सांगतो ना .... जास्त अभ्यास केला कि असेच डोके फिरते. आता कुठे १५वी सुरु झाली आहे आणि इतका अभ्यास .... त्यापेक्षा मीच दुसरीकडे जाऊन बसतो. " गौरव जाण्यासाठी उभा राहिला , तर आदित्यने त्याला खाली बसवले.

" बस रे .... नाटकी नुसता .... मी पण ' straight ' आहे.... समजलं ना ... नौटंकी.... " आदित्य , गौरव दोघेही हसू लागले. जुई मागच्याच बेंचवर बसलेली. तिचे लक्ष मोबाईलमध्ये. या दोघांचा आवाज ऐकून तिथे लक्ष दोघांकडे गेले.

" ये मलाही सांगा ना जोक ... मला पण हसायचे आहे. " ,

" हसायचे असेल तर मोबाईल मधून डोके वर काढायचे मॅडम... " आदित्य तिला बोलला. बोलताना सहज मागे नजर गेली. हसता हसता त्याचे लक्ष वर्गात सर्वात शेवटी असलेल्या बेंचवर गेले. एक मुलगी बसलेली तिथे.... तीच !! तीच ती .... एकटीच बसलेली. यावेळेस डोळ्यांना चष्मा लावलेला. वर्गात सुरु असलेल्या गोंधळात न पडता काहीबाही वाचत बसलेली. मोकळे सोडलेले केस तिने बांधून ठेवलेले. " अरेच्या !! हि कधी आली वर्गात.... १ मिनिट !! हि आमच्या वर्गात काय करते.... " आदित्य आणखी confused..... गौरवला काही माहित आहे का ,ते विचारू असे म्हणत आदित्य त्याला विचारणार तर मॅडम आल्या.  

lecture सुरु झाले. साधारणतः , आदित्यचा स्वभाव स्वच्छंदी असला तरी अभ्यासात त्याचा टाईमपास कधीच नव्हता. कॉलेजमध्ये आले कि सर्व lecture बसायचा , वर्गात सुद्धा त्याचे लक्ष फक्त अभ्यासाकडे असायचे. टाईमपास , मज्जा-मस्ती सर्व कॉलेज सुटल्यावर. आज वेगळे होते. दिवसच वेगळा उजाडला होता ना. चालू lecture मधेच कितीतरी वेळा त्याने " त्या " मुलीकडे चोरून बघितले होते. मध्ये मध्ये मागे बसलेल्या जुईशी बोलायचा बहाणा करत , त्याची नजर मागे लक्ष टाकून येतं होती.

" मिस्टर मनमौजी !! " मॅडमने आदित्यला हाक मारली. आदित्य तसा फेमस मुलगा , त्यामुळे सर्व शिक्षकांना माहित होता त्याचा स्वभाव, त्याशिवाय अभ्यासातही पुढे असायचा. lecture सुरु असताना काही प्रश्न पडले कि हमखास विचारणारा आदित्य .... त्याची चुळबुळ मॅडमच्या नजरेत आली.

" जुई सोबत बोलायचे आहे तर तिच्या शेजारी जाऊन बस ना ... सारखे सारखे मागे बघतो आहेस .. " आदित्य ओशाळला.

" सॉरी ma'am !!" ,

" तू मागेच जाऊन बस ... आणि काय ते बोलून घे .... मलाही डिस्टर्ब होते ना .... " मॅडमने आदेश दिला तर काय करणार. आदित्य जुईच्या शेजारी जाऊन बसला. तरी त्याचे मध्ये मध्ये मागे बघणे सुरूच होते. त्या पूर्ण lecture मध्ये काय शिकवले , त्यातले काही म्हणजे काही कळले नाही. तो lecture संपला आणि दिवसभराचे सर्व lecture सुद्धा " तसेच " संपले. आदित्यचे लक्ष नव्हतेच आज. शेवटचा lecture संपला , आदित्यचा ग्रुप वर्गातून बाहेर आला. घरी निघणार होते तर काही मित्र अजूनही वर्गात होते म्हणून सर्वच थांबले. एकमेकांशी गप्पा मारत तिथेच उभे राहिलेले. आदित्य नेहमीप्रमाणे गप्पा मारत आपली नजर इथे - तिथे भिरभिरवत होता. उजवीकडे बघून झाल्यावर डावीकडे नजर गेली असता , " ती " दिसली... यावेळेस ती सरांसोबत बोलताना दिसली. जुईला कळलं , आदित्यचे बोलण्याकडे लक्ष नाही ते. तिने त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवला आणि हातानेच " कुठे लक्ष आहे " असे खूण करून विचारलं.    

आदित्यने त्या मुलीकडे बोट दाखवत विचारले.

" तिला आजच ... पहिल्यांदा वर्गात बघितले. नवीन आहे हे नक्की... कि चुकून आपल्या वर्गात येऊन बसली. ",

" नाही रे ... " जुई बोलली. " आपले थोरात सर आहेत ना ... त्यांची कोणी नातेवाईक आहे. नवीनच आहे ती... " ,

" हे तुला कसे माहित. " आदित्य ,

" सकाळी lecture ला येताना ती भेटली होती आम्हाला. आपल्याच वर्गात आहे ती... हे सर्व तिनेच सांगितले.तिला माहित नव्हते कोणत्या वर्गात lecture आहे ते ... म्हणून मला विचारले तिने... नाव पण बरच काहीसं आहे तिचे... " जुई आठवू लागली. तिला आठवेना .." ये राहूल .... ती सकाळी आपल्याला lecture कुठे आहे ते विचारत होती ... तिचे नाव काय रे .... तुला हसायला आलेलं ते नावं ऐकून .... " राहुल सुद्धा नाव आठवू लागला.

" काहीतरी ' S ' वरून नाव आहे तिचे... साई ... सायली... नाही ... असेच काही आहे .. " राहुल सुद्धा आठवू लागला.

" हा ..... आठवलं ... सिद्धता !! .... हेच नाव तिचे ... सिद्धता .... " आदित्यने पुन्हा तिच्या दिशेनं पाहिले. एव्हाना ती तिथून निघून गेलेली. " सिद्धता !! " आदित्य नाव मनात घोळवत राहिला.

==========================================================================

सिद्धता actually ओशाळली होती. लाज वाटत होती तिला. सकाळी आभाळातील विजेच्या आवाजाने ज्या मुलासमोर किंचाळली होती , तोच मुलगा आपल्या वर्गात असेल असे तिला वाटले नव्हते. अधून मधून तिची नजर त्या मुलावर जात होती. त्यालाच तर मॅडमने दम दिला ना. कदाचित तो आपल्याबद्दल सांगत असेल त्याच्या मित्र-मैत्रीणीना , काय करू .... भीती वाटते पावसाची , कडाडणाऱ्या विजेची... पण किंचाळले कशाला .. तेही त्या मुलासमोर .... त्याला काय वाटले असेल ... एवढी मोठी झाली आणि घाबरते .... नक्कीच तो हसला असणार माझ्यावर.


सिद्धता .... तिच्या वडिलांची मुंबईत बदली झाली म्हणून तीही आली. शेवटच्या वर्षाला कुठे admission मिळणार आणि तेही इतके लगेच ... तरी ओळख निघाली. कॉलेजला उशिरा का होईना admission झाले. साधी सरळ मुलगी तरी मॉडर्न ... हुशार , दिसायला कशी .... ते गाणे आहे ना " गोरी गोरी पान , फुलासारखी छान ... " अगदी तशी नसली तरी देखणी होती. तिचे ही तसेच .... पूर्ण फोकस फक्त अभ्यास आणि पुढचे करिअर वर... अभ्यास एके अभ्यास... मित्र नाहीच ... मैत्रिणी हि कमीच ... वडील पोलीस खात्यात असल्याने बदली ठरलेली, त्यामुळे मैत्रिणीही कमीच. बोलणे कमी.... त्यात आज झालेली गमतीशीर घटना.. कॉलेजचा पहिला दिवस असा , त्याने कोणाला सांगितले असेल तर काय होईल आपले , उद्या हसतील का वर्गात , असा विचार करत सिद्धता घरी आली.  

रात्री अभ्यास करायला घेतला पण आदित्यचे मन लागेना.

" तिला येताना बघितले कि सर्वच slow motion मध्ये कसे दिसायला लागते...... आणि अचानक गायब कुठे होते ती... काही कळत नाही बाबा... " आदित्यला काही सुचले.

" बाबा वरून आठवले... पप्पाला विचारू का हे ... नाही ... नको... उगाचच काही तर्क वितर्क लावेल पप्पा.... " मनात बोलत आदित्य झोपायला गेला.

पुढच्या दिवशी तेच रुटीन ..... मोबाईलवर आवडती गाणी , कानात मोठे हेडफोन ... त्याच धुंदीत चालत कॉलेजला निघाला. आज काय पाऊस नव्हता. पुन्हा त्या " कालच्या " ठिकाणी येऊन त्याची पावले आपोआप थांबली. " सिद्धता ....  आली नाही वाटते , थांबूया का .... कशाला थांबायला पाहिजे... आणि ती आधीच निघून गेली असेल तर कॉलेजमध्ये... तर ... तर काय .... जाऊ दे ना ... आपली कुठे ओळख आहे.... आपण अभ्यास करायला येतो कॉलेजमध्ये .... टाईमपास करायचा नाही.... समजलं ना ... " आदित्यची दोन मने एकमेकांशी हुज्जत घालत होती. शेवटी पोहोचला तो कॉलेज मध्ये. घड्याळात पाहिले तर अजून ३० मिनिटे होती lecture सुरु होण्यास. आदित्यला आधीच पोहोचायची सवय. lecture असलेला वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता, " वरती जाऊन तरी काय करणार ... गौरव येईल इतक्यात , तो आला कि जाऊ त्याच्यासोबत वर ... " मनात बोलून आदित्य तिथेच गेटसमोर असलेल्या कठडयावर गाणी ऐकत बसला. १० मिनिटे झाली असतील , आदित्य त्याच्या मोबाईल मध्ये काही बघत होता.

त्याचवेळी त्याला काही जाणवले. त्याने समोरच दिसणाऱ्या वाटेकडे पाहिले. सिद्धता चालत येतं होती. पुन्हा तेच. वाराही slow motion मध्ये वाहू लागला. समोर रस्त्यावर पडलेली वाळलेली पाने त्यासोबत उडू लागली. तिच्या आजूबाजूने चालणारे , कॉलेज मध्ये येणारे बाकीचे विद्यार्थी , गेटवरचे watchman काका... इतकंच काय , कॉलेज शेजारी असलेल्या इमारतीत येणारा दूधवाला सुद्धा slow motion मध्ये सायकल चालवत येत होता. कॉलेजच्या बाहेर पार्किंग वरून सुरु असलेली मारामारी सुद्धा slow motion मध्ये .... सिद्धता हलके हलके पावले टाकत कॉलेजच्या गेटमधून आत शिरली. चालता चालता केसाची एक बट तिच्या कानामागे घेत तिने एकवार आदित्यकडे नजर टाकली. आणि पुढे निघून गेली. जशी ती नजरेआड झाली तसे पुन्हा सर्व नॉर्मल स्पीड मध्ये आले.


" भुताटकी आहे कि काय ... " आदित्य विचार करत होता आणि गौरव आला.

" चला सर ... आज काय इथंच बसून आहेस ... lecture ला जायचे आहे ना .. " ,

" हा रे .... तुझीच वाट बघत होतो. " दोघे मित्र दुसऱ्या मजल्यावर आले. आदित्य लगेचच वर्गात शिरला. हे गौरव साठी नवीन होते.

" काय रे .... रोज तर सगळ्या ग्रुप साठी बाहेर थाबतोस ... आज काय विशेष " ,

" बस रे ....  काही विशेष- बिशेस नाही... असाच आलो ... बसलो .. त्यात काय " गौरवला आदित्य बोलला तरी त्याची नजर सिद्धताला शोधत होती. ती वर्गात नव्हती. थोड्यावेळाने आदित्यचा ग्रुप आणि इतर विद्यार्थी वर्गात येऊन बसले. मॅडम येण्याआधी , ५ मिनिटं आधी सिद्धता कालच्याच बेंचवर येऊन बसली. आदित्यला ती आली तर कळले. आदित्यने बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि तिला बघण्यासाठी पाणी पिण्याचा बहाणा केला. अगदी त्याच वेळी सिद्धताने त्याच्याकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली. आदित्यला जोराचा ठसका लागला आणि तोंडातले सर्व पाणी शेजारी बसलेल्या गौरवच्या तोंडावर उडाले. वर्गात एकच हशा पिकला. गौरवने एकवार आदित्यकडे पाहिले आणि रुमालाने चेहरा पुसत म्हणाला,

" अरे भाई .... अंघोळ करतो मी ... रोजच करतो... ",

" सॉरी सॉरी .... ठसका लागला. ",

" तुला एवढ्या सकाळी कसली तहान लागली. आणि शांतपणे पाणी पियाचे ना ... इतका ठसका लागेपर्यंत ... "

" सॉरी ना बाबा .... मुद्दाम नाही केले.. " आदित्यला कसे तरी झाले. सर्व वर्ग हसला म्हणून नाही, तर सिद्धताने ही बघितले म्हणून... मॅडम आल्या आणि lecture सुरु झाला.

आणि हे असे रोजच सुरु झाले. आदित्य लवकर येऊन तिथे कॉलेजच्या गेटसमोर बसून असायचा. पुन्हा पुन्हा ते slow motion अनुभवायचा, त्याला ते आवडू लागलेलं. lecture ला गेल्यावर तिच्याकडे चोरुन बघणे .... वगैरे वगैरे ... सर्व सुरु होते. सिद्धताला हे सर्वच समजत होते. कारण तीही कधी कधी त्याच्याकडे बघायची. सुरुवातीला मागच्या बेंचवर बसणारी सिद्धता .... आता तिच्या वर्गात २-३ मैत्रिणी झालेल्या , त्याच्यासोबत पुढे बसायची. अर्थात आदित्य बद्दल तिला कळले होते. तो तर सर्वांचा मित्र , सर्वाना मदत करण्यात पुढे असणारा , त्याच्या बद्दल आदर निर्माण झालेला. पण कधी प्रत्यक्ष बोलण्याचा क्षण आलेला नव्हता. कधीतरी तशी वेळ यावी , असा आदित्य विचार करत होता. जोपर्यंत ती बोलायला येत नाही , तोपर्यंत मी स्वतःहून कसा बोलायला जाऊ, असे आदित्यचे म्हणणे होते. दुसरीकडे सिद्धता तशी फारच कमी बोलणारी. त्यातल्या त्यात , कॉलेज मध्ये ... मुलांशी बोलणे टाळायची. तिचा संवाद फक्त आणि फक्त तिच्या भोवती असणाऱ्या मुलींसोबत. या दोघांचे बोलणे होणार तरी कधी...

======================================================================

रविवारचा दिवस. सकाळपासून धोधो पाऊस.... कुठे जाणार पावसात , आदित्यच्या ग्रुपने तर मस्तपैकी पिकनिकचा बेत केलेला. आदित्यला ते तसे पावसात भिजणे अजिबात आवडत नसायचे. त्यामुळे घरीच अभ्यास करत बसलेला. २-३ तास अभ्यास केल्यावर त्याला कंटाळा आला. स्वतःच्या रूममधून बाहेर आला. त्याचे पप्पा हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेले. आदित्य त्यांच्या शेजारी जाऊन बसला.

" कोणता movie लागला आहे. " आदित्यने पपांना विचारले.

" व्वा !! आज काय एकदम movie बघायला आलास .... ",

" अरे पप्पा .... बाहेर बघ पाऊस पडतो आहे... उगाचच .... शहरात सगळ्याना भरपूर पाणी मिळते. पावसाने गावात पडले पाहिजे... तिथे दुष्काळ वगैरे असतो... तिथे जावे पावसाने ....आता अभ्यास पण झाला... कंटाळा आला म्हणून आलो बाहेर  " ,

" तुला आवडत नाही म्हणून बाकी लोकांना आवडत नसेल का पाऊस ,.... पडू दे त्याला ... त्याचे दिवस आहेत सध्या ... ",

" हम्म ... कोणता movie आहे... " ,

" माहित नाही ... मलाही काही काम नाही , काहीतरी बघत बसलो आहे. " मग दोघेही टीव्ही वर सुरु असलेला movie बघू लागले. 


आदित्य आणि त्याचे पप्पा , एकमेकांचे Best friend , आदित्य सर्व गोष्टी त्याचा पप्पाना सांगायचा. आणि त्याचे पप्पा ही मनमोकळेपणाने ते ऐकून घेयाचे. टीव्ही वर सुरु असलेल्या movie मध्ये एक असा क्षण आला कि हिरो - हिरोईन एकमेकांच्या दिशेने चालत येतं होते..... slow motion मध्ये. आदित्यला त्याचे क्षण आठवले. पप्पाला विचारू का ... आज विचारू .... , असे मनात म्हणत आदित्यने पप्पाना विचारलं.

" पप्पा , हे असे फक्त movie मध्ये होते ना ...",

" म्हणजे कसे ... " ,

" slow motion वगैरे ... ",

" नाही रे ... होते ना असे real life मध्ये ..." ,

" ह्या .... पप्पा काय पण .... तुला काय मीच भेटलो का ... " पप्पाने त्याच्याकडे पाहिलं.

" तुझी मातोश्री आणि मी ... आमचे love marriage, माझा पहिला जॉब होता ना ... ",

" आता हे काही पण बोलतो आहेस तू पप्पा .. जॉब म्हणे ... आपला तर बिजनेस आहे .. ",

" अरे हो बाळा ... मी आधी जॉब करत होतो. तिथेच तर तुझी आई आणि माझी भेट झाली. सुरुवातीला मलाही हे movie मध्ये आहे ना slow motion ... तुझी आई जेव्हा जेव्हा समोर यायची ना , मलाही तसाच अनुभव होयाचा. काही वेळाने कळलं कि ते प्रेम आहे. तीच व्यक्ती नजरेसमोर राहावी असे वाटत राहते. आपले मन ना वेडे असते. नजरेसमोरून ती व्यक्ती जाऊच नये असे वाटते म्हणून आपल्याला तसे भास होतात. " आदित्यला उत्सुकता.

" हे भास कधी बंद झाले ... " ,

" नंतर ... म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो , त्यानंतर . तिलाही मी आवडत होतो. प्रेमाची कबुली दिली , एकत्र आलो. मग कशाला असे भास होणार. ",

" पप्पा . एक सांग , तू मम्मा ला बघितल्या बघितल्या प्रेम झालेल का ... " ,

" नाही नाही ... तिला आधी खूप वेळा बघितले होते मी. एकदा अचानक ती इतकी सुंदर भासली कि थेट मनात भरली. हा .... पण तसेही असते हा ...  love at first sight... ",

" असे कसे शक्य आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला कधीच पाहिले आहे.....  अचानक कोणी समोर येते ..... आणि त्या व्यक्तीवर प्रेम होते. ",

" असते बाबा असे .... मनाची चाल असते ती.... तसे झाले कि ते मखमली हाल सुरु होतात. सारखी तीच व्यक्ती डोळ्यासमोर रहावी असे वाटते. रात्री झोप लागत नाही , त्याच व्यक्तीचा विचार. असे असते प्रेम. कधी एकटा बसलेला असायचो ना , तेव्हा तर विचित्र भास होत असत. तिची आठवण काढली ना कि अचानक आजूबाजूचे वातावरण बदलून जायचे. कुठून कुठून रंगीबेरंगी फुलपाखरे यायची , विविध रंगाचे इंद्रधनुष्य दिसायचे... आणखी किती तरी वेगवेगळे भास होत असत मला. प्रेमाचे जग असेच असते. तुला काय कळणार ते.... गेल्या चार वर्षात एवढ्या मैत्रिणी केल्यास , एकही GF नाही. प्रेम केले नाहीस ... काय फायदा कॉलेजला जाऊन. " पप्पाने त्याच्या डोक्यावर टपली मारली. आदित्य मुद्दाम हसला. टीव्ही वर सुरु असलेला movie बघत होता तरी डोक्यात वेगळेच विचार ... खरच आपण प्रेमात पडलो आहोत का.


खरंतर रविवारचा दिवस संपलेला, परंतु आदित्यच्या life मध्ये काही वेगळेच सुरु झालेलं. सिद्धता त्याला अजाणतेपणी का होईना , आवडू लागली होती. अर्थातच अभ्यासाला पहिले प्राधान्य. अभ्यासात त्याने खंड पडू दिला नव्हता. फक्त त्याचे बोलणे ते काय होत नव्हते. त्यात गेल्या आठवड्यात मंगळवारी कॉलेजला आलेली सिद्धता , बुधवार ते शनिवार , या दिवसात कॉलेजला आलेली नव्हती. आदित्यचा तो आठवडा कसा गेला हे त्यालाच माहित. तिच्या मैत्रिणींना तरी कसे विचारणार, आदित्य समोर मोठा पेच . रविवार जाऊन सोमवार उजाडला, सिद्धता नव्हतीच. आदित्य लय टेन्शन मध्ये. गेली कुठे हि. याच टेन्शन मध्ये आदित्य कॉलेज सुटल्यावर घरी निघालेला. त्याला थोरात सरांनी हाक मारली.

" अरे आदित्य ... एक काम होते , तुझी मदत हवी होती. ",

" बोला ना सर ... " थोरात सरांना विचारू का ... सिद्धता कॉलेजला का येतं नाही ते ...

" तुझ्या नोट्स मिळतील का .. गेल्या आठवड्यात काढलेल्या सर्व नोट्स पाहिजे होत्या मला... " ,

" हा सर , देतो ना ... आता माझ्याकडे नाही आहेत, घरी आहेत. तुम्हाला पाहिजे होत्या का ... " ,

" मला नको आहेत. तुला माहित आहे ना सिद्धता ... तिला पाहिजे होत्या. " ,

" हो का ... बरेच दिवस दिसली नाही ती .... " आदित्य उगाचच बोलायचे म्हणून बोलला.

" तब्येत ठीक नाही तिची. सर्व अभ्यास राहून गेला. माझ्या विषयाच्या नोट्स मी देईन तिला , पण बाकीच्या कुठे जमवत राहू, वर्गात एक तूच आहेस ज्याचा अभ्यास वेळेआधी पूर्ण असतो. म्हणून मी तुझ्याकडे नोट्स मागत आहे. " हे म्हणजे सोन्याहून पिवळे. आदित्य मनात म्हणाला.

" सर्व नोट्स घरी आहेत. तिला कश्या देऊ , तिच्या घरी जाऊ का ... पण मला तिचे घर नाही माहित... एक काम करा , तिचा whatsapp नंबर द्या. तिला msg करतो किंवा कॉल करून विचारतो कोणत्या नोट्स पाहिजे आहेत त्या.. " नंबर मिळाला कि काय ... मज्जाच आहे एका मुलाची , आदित्य मनोमन खुश झालेला पण त्याने सगळा आनंद लपवून ठेवला.

" तिचा नंबर आहे माझाकडे , पण कालपासून माझा मोबाईल बिघडला आहे. नंबर पाठ नाही माझा. असं करूया , तुझा mail लिहून दे , ते नोट्स तिला मेल कर. " यांचा मोबाईल काय नेमका आताच बिघडला , नाराजीने आदित्यने त्याचा मेल लिहून दिला.    

घरी आल्या आल्या आदित्यने त्याच्या मागच्या आठवड्यातील नोट्सचे फोटो काढण्यास सुरुवात केली. नोट्सचे फोटो ते , त्यात इतके काय बघायचे , तरीही प्रत्येक फोटो छानच आले पाहिजे , जरासा वाईट आला असे वाटले कि पुन्हा फोटो काढायचा. असे जवळपास २ तास फोटो काढण्यात खर्ची घातल्यावर आदित्य समाधानी झाला. पण तिचा मेल अजून का आला नाही , याचा विचार करत होता. तिचाच मेल घेतला असता तर ... सर पण ना ... उलट-सुलट कामे ... असा विचार करत असताना , finally सिद्धता चा मेल आला.

" Hi ... मला तुमच्या नोट्स मिळतील का ?? " इतकाच मेल आलेला. आदित्यला किती आनंद !! त्याने भरभर तिला मेल पाठवायला सुरुवात केली. सर्व नोट्स चे मेल पाठवून झाल्यावर , शेवटच्या मेल मध्ये मुद्दाम स्वतःचा मोबाईल नंबर लिहून " आणखी काही मदत हवी असल्यास हा माझा नंबर आहे. " असे लिहून टाकले. तिला मदत करून त्याला एक प्रकारची मनःशांती मिळाली.

परंतु मेल करून आता एक तास होत आला तरी तिच्याकडून " thank you ..... thanks ... आभारी आहे !! " असा कोणत्याच प्रकारचा मेल आला नाही.

" याला काय अर्थ आहे. मी एवढे मेल केले, तेही माझा स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून ..... साधं thank you लिहायला किती वेळ लागतो. मी बरोबर होतो आधी , हे प्रेम वगैरे काही नसते. " आदित्यने हातातला मोबाईल बेडवर फेकून दिला आणि बाहेर निघून गेला.

रात्री ९ वाजता घरी आला , आईने त्याला थेट जेवायला बसवले. जेवून वगैरे झाल्यावर टीव्ही बघण्यात गुंग झाला. झोपायला त्याच्या रूममध्ये आला तेव्हा बेडवरचा मोबाईल दिसला. त्याचा PC , तो तसाच सुरु ठेवून निघून गेलेला बाहेर. पुन्हा त्याने मेल पाहिला. तिचा रिप्लाय नव्हता. तसंच नाराजीने त्याने PC बंद करून टाकला. झोपणार होता तर गौरव चा कॉल आला. उद्या कॉलेजला येताना तुझाकडे एक बुक आहे , ते घेऊन ये. हे सांगायला गौरवने कॉल केलेला. बोलणे झाले आणि कॉल कट्ट झाला. मोबाईल खाली ठेवणार तर त्याला whatsapp वर आलेला मेसेज दिसला. अनोळखी नंबर. " Thank you friend ...... from सिद्धता " असा मेसेज होता.

आदित्यने आनंदानं उडीच मारली. नाचू लागला. पुन्हा पुन्हा , तोच तोच मेसेज वाचू लागला. आणि त्याच्या लक्षात आले कि आपण जेव्हा बाहेर गेलो , त्याच्यानंतर लगेचच हा मेसेज आलेला. " shit !! shit !! shit !!... खाल्ली ना माती ... मोबाईल घेऊन गेलो असतो तर काय झाले असते ... लवकर रिप्लाय करायला पाहिजे " त्याने पटपट " most welcome !! " असा मेसेज पाठवून दिला. आता तिचा काही रिप्लाय येतो का ते , वाट बघू लागला. तोपर्यत त्याने तिचा नंबर save करून ठेवला. तिचा मेसेज काही आला नाही , पण आदित्य आनंदात होता. ३० मिनिटांनी मोबाईल वाजला. मेसेज आल्याची रिंग होती. सिद्धताचा मेसेज ... " Good night , take care " आदित्य पुन्हा नाचू लागला. जग जिंकल्याचा आनंद जणू काही. नजरेसमोर पुन्हा धुंदी आली. बेडवर तसाच अलगद पडला.... डोळ्यासमोर एक गाणे आले...

" पहला नशा.. पहला खुमार..,
नया प्यार है.. नया इंतज़ार ,
कर लू मैं क्या अपना हाल,
 ऐ दिल-ए-बेकरार,
 मेरे दिल-ए-बेकरार, तू ही बता
पहला नशा.. पहला खुमार.."

आदित्य आनंदात हसत होता. त्याच धुंदीत त्याला झोप लागली.

जागा झाला तेव्हा वर्गात बसलेला आणि lecture सुरु होता. समोर साक्षात सिद्धता उभी होती. आदित्य तिच्याकडे बघत राहिला. तीही छान हसली आणि आदित्यच्या जवळ येऊन त्याच्या गालावर हात फिरवला. आदित्य खाड्कन जागा झाला. आपण अजूनही घरात आहोत , हे त्याच्या लक्षात आले. " सकाळी पडलेली स्वप्ने खरी होतात , असे म्हणतात. " आदित्य मनातल्या मनात बोलला, स्वतःला गुदगुल्या झाल्या सारखे वाटले त्याला. कॉलेजला जाण्याची तयारी करू लागला. नेहमीप्रमाणे वेळेआधी निघाला आणि कॉलेजमध्ये येऊन बाकी ग्रुपची वाट बघू लागला. त्याचा ग्रुप आल्यावर सर्व वर्गात जाऊन बसले.

पहिला lecture सुरु झाला. आदित्य आज फारच  खुश होता , शिवाय खूप दिवसांनी आज त्याचे अभ्यासावर लक्ष होते. सिद्धता काही आज पण येणार नाही , हे नक्की होते. तब्येत ठीक नाही ना बिचारीची, आजही तिला नोट्स पाठवू. उगाच अभ्यास मिस होयाला नको. आदित्य स्वतःशीच बोलत होता. अश्यातच दुसरा lecture सुरु झाला. आदित्यचे लक्ष अचानक पहिल्या बेंचवर बसलेल्या सिद्धता कडे गेले.उडालाच तो .

" हि येते तरी कशी .... आलेली दिसलीच नाही. कमाल करते हा हि.. " आदित्य यावेळेस मनात न बोलता  पुटपुटला. गौरवने बरोबर ऐकले.

" या वर्गातील नक्की कोणाबद्दल बोलत आहेस.. " आदित्यने लगेचच त्याची मान धरली.

" तुला बर सर्व चौकश्या .... गप्प .... कोणाबद्दल बोललो नाही. अभ्यास करा अभ्यास .... " गौरवला हसू आलं. आदित्यचे काम सुरु झाले. इतकी मदत केली आहे तिला .... एकदा तरी ती माझ्याकडे बघणारच, असे आदित्यला वाटत होते. तसे काही झाले नाही. सर्व lecture संपले , कॉलेज सुटले.



सर्व घरी जाण्यासाठी निघाले. बाहेर पावसाने काळोख केलेला, उगाच भिजू नये म्हणून बहुतेक विध्यार्थी घरी निघाले. सिद्धता वर्गातून कधी गेली ते आदित्यला कळेल नाही. त्यात भरलेले आभाळ बघून त्याच्या सर्व मित्रानी टाईमपास न करता घरीच जाऊ असे ठरवले. निघाला होता तर आदित्यला काही आठवलं. " तुम्ही जा पुढे ..... मला लायब्ररी मधून एक पुस्तक घेयाचे आहे... bye ... " म्हणत आदित्य पुस्तक आणण्यासाठी गेला. कधीचे त्याला ते पुस्तक पाहिजे होते , ते आज मिळाले , म्हणून आनंदात आदित्य बाहेर आला. बघतो तर पावसाने नुकतीच धो - धो सुरुवात केलेली. आदित्यने डोक्याला पुस्तक लावले. छत्रीचे ओझे वाटायचे म्हणून तो कधीच सोबतीला ठेवत नसे. काय करणार , एका बाजूला उभा राहून पाऊस बघू लागला. त्याच्या आजूबाजूला छत्री न आणणारे , त्याची गर्दी जमू लागली. आदित्य स्वतःच्या विचारात रमलेला. पाऊस गेल्या शिवाय मी निघणारच नाही , असं आदित्यने ठरवले होते. थोड्यावेळाने पाऊस कमी झाला , पण थांबला नव्हता. त्याच्या शेजारी उभी असलेली गर्दी हळूहळू कमी झाली. आता आदित्यला जाणवलं कि बाजूच्या कोपऱ्यात कोणी एकच व्यक्ती उभी आहे. त्याने हळूच पाहिले .... सिद्धता !!! पुन्हा उडाला तो.

" देवा.... तुझा काय प्लॅन आहे एकदा सांग तरी .... heart attack वगैरे देशील कधी तरी " आदित्य मनात बोलला.  पावसाचा वेग पुन्हा वाढला. सोबतीला अंगावर शहारे आणणारा बोचरा थंड वारा ... प्रत्यक्षात आज ती त्याच्या शेजारी उभी होती. अर्थातच तो एका टोकाला आणि ती दुसऱ्या , दोघांमध्ये अंतर होते तरीही तिथे ते दोघेच उभे होते.

सिद्धताने त्याला पाहिले. " आदित्य उभा आहे.... बोलूया का त्याच्याशी.... पण काय बोलू.... कशी सुरुवात करू .... thank you बोलूया का .... एवढे नोट्स दिले... कि आजचे नोट्स पण मागून घेऊ ... मुद्दाम .... त्या निम्मिताने बोलणे होईल... " सिद्धता मनात इतके बोलत होती , समोर बोलायला जमत नव्हते. आदित्यही तसाच. " चांगला चान्स दिला पावसाने... thanks पावसा ... !! बोलूया ... कोणीच नाही आहे, कोणाला कळणार नाही..... काय विषय , कसे सूरवात करू...... हा ... तब्येत कशी आहे, किंवा .... बरे वाटले का .... नको .... Hi .... how are you .... मूर्खां .. तेच ते झाले ना .... नीट बोलता ही येतं नाही तुला मुलींशी... जीव दे जा .. " आदित्य स्वतःलाच मनातल्या मनात ओरडत होता.

 दोघेही तसेच , कोणीतरी बोलायला सुरुवात करावी तर नाही. दोघेही स्वतःशीच मनात बोलत होते. तिरक्या नजरेने एकमेकांना चोरून बघणे सुरु होते. " अरे ... बोलशील का आता.. कि असच उभे राहणार ... " आदित्य स्वतःला. शेवटी न राहवून त्याने बोलायला तोंड उघडले, " Hi " असे बोलत होता आणि तिचा मोबाईल वाजला. आदित्यने तोंडातून येणारे " Hi " तसेच गिळून टाकले. तिने कॉल उचलला.

" हो पप्पा , मी इथेच उभी आहे. तुम्ही बाहेर आला आहात का .. " आदित्यने गेटबाहेर पाहिले. एक गाडी उभी होती." आले आले पप्पा.. " म्हणत ती पळत पळत त्या गाडीजवळ गेली. पट्कन गाडीचा दरवाजा उघडला, जलद गतीने सिद्धता गाडीत बसली आणि गाडी भुर्रकन निघून गेली.

पाण्याचा नळ जसा बंद करावा , सिद्धता गेल्यावर पाऊस सुद्धा तसाच पटकन बंद झाला. आदित्यने स्वतःला टपली मारली. " चला आदित्य राव ... आता इथे उभे राहून काही फायदा नाही. " आदित्य चालत चालत गेटजवळ येतं होता. आणि मोबाईल वाजला. कोणाचा तरी मेसेज आलेला. त्याने पाहिले , सिद्धताचा मेसेज. " Hi .... मला आजच्या नोट्स मिळतील का ... " आदित्यने मेसेज वाचला आणि जागच्या जागी उडी मारली. धावत जाऊन गेटवरच्या watchman काकांना मिठी मारली. त्यांना काहीच कळेना , याला काय झाले ते.

त्याच आनंदात आदित्य घरी धावत आला. त्याने त्याची वही बघितली. नोट्स काढल्या होत्या , परंतु भरभर लिहले होते म्हणून खाडाखोड झालेली. पुन्हा लिहू सर्व ... छान अक्षरात... आदित्य कामाला लागला. आई त्याला बघायला आली.

" काय रे ... आल्या आल्या अभ्यासाला बसलास .. ते कपडे तरी काढ ना ... घरातले घाल. ",

" मम्मा ... तू थांब जरा ... मला डिस्टर्ब नको करुस... ",

" एवढा कसला महत्वाचा अभ्यास आहे कि पायातले शूज काढायला विसरलात साहेब ... " आदित्यने दाताने जीभ चावली. मागे वळून पाहिले तर चिखलाने माखलेल्या शुजचे ठसे दारापासून त्याच्या रूमपर्यंत आलेले.

" सॉरी मम्मा !! " आदित्यने आईला मिठी मारली.

" करते साफ. आधी ते कपडे धुवायला टाक. शूज कोण घालते रे पावसात.. ते धुवून ठेव आणि उद्या पासून पावसाळी चप्पल घालून जा पायात. " ok मम्मा ... love you मम्मा ... " आदित्यने आईच्या गालावर kiss केले आणि फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होऊन पुन्हा नोट्स लिहायला बसला. मनात आनंद , डोळ्यात आनंद ... आनंदी आनंद गडे ... जिकडे तिकडे चोहीकडे !! 


या दोघांचे समोर बोलणे नाही, जे काही होते ते whatsapp वर. आदित्यला ते मान्य होते. सिद्धता कधीतरी समोर येऊन बोलेल, हे आदित्यने मनातून आधीच काढून टाकलेलं. दोघांची कधी नजरानजर झाली तर फक्त एकमेकांना smile तेवढी देयाचे. त्याच्या ग्रुपमधला एकटा गौरव तेव्हढा शहाणा होता. त्याला या दोघांचे ट्युनिंग जमले आहे, हे फार आधीच कळले होते. आदित्यला रंगेहात पकडायचे होते. परंतु हे दोघे एकमेकांसमोर कधी येत नाही, बोलत नाहीत , पकडणार कसे. गौरव वाट बघत होता आणि friendship day आला. ऑगस्ट महिन्यातला friendship day, बर का !!

त्यादिवशी , अर्धेच lecture होते. त्यानंतर मुलांना थोडी मोकळीक दिलेली. सर्व एकमेकांना बँड बांधत होते. आदित्यने खूप बँड आणले होते , मित्र-मैत्रिणीना बँड बांधत होता. परंतु गौरव सिद्धताला शोधत होता. दिसली नाही कुठे. आदित्य थोड्यावेळाने एका बाजूला जाऊन उभा राहिला. आणि त्या सर्व गर्दीकडे एकटाच बघत उभा राहिला. गौरव त्याच्या जवळ गेला.

" कोणाला शोधत आहेस ... सिद्धताला ना ... " गौरवने थेट विचारलं. आदित्य आधी हसला , नंतर त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.

" काय ... confused झालास ..... मला कसे कळले... " गौरव आदित्यकडे बघून बोलत होता. सिद्धता आता सर्व वर्गात ओळखीची झालेली, कारण गेल्या महिन्यात झालेल्या surprise test मध्ये तिने चक्क आदित्यला मागे टाकले होते. आदित्य पेक्षा कोणीतरी हुशार आले आहे , हे सर्व वर्गात कळले होते.

" हे बघ मित्रा .... उगाचच कशाला तिचे नाव जोडतोस ... तिला शोधतो आहे हे तुला कोणी सांगितले. " आदित्य बोलला.

" तुझ्या डोळ्यात दिसते ते , कोणाला शोधत आहेस ते ... " गौरव.

" फिल्मी डायलॉग ... हा ... " आदित्यने गौरवला चिमटा काढला.

" अबे .... तुझा मित्र आहे मी . ११ वी पासून एकत्र आहोत , तेव्हा पासून एकाच बेंचवर बसतो आपण. इतरांपेक्षा तुला मी जास्त ओळखतो. आणि सध्या वर्गात lecture सुरु असताना तुझे लक्ष कुठे असते , कोणाकडे बघत असतोस .. मला काय कळत नाही का... " गौरवने आदित्यच्या पोटात गुद्दा मारला.

"चल चल .... आता सांगून टाक ... काय सुरु आहे.... प्रेम वगैरे .. बोल ना ... बघ , खोटे बोललास तर उद्या वर्गात ब्लॅकबोर्ड वर लिहून ठेवीन , सर्व वर्गाला कळेल. " गौरवने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

आदित्य जरासा लाजला. पण गौरवला आता कळले होते , मग लपवण्यात काहीच अर्थ नव्हता.

" तस ... प्रेम आहे का माहित नाही.. ",

" मग " ,

" मग काय .... मला आवडते ती , बस्स !! तिच्या फीलिंग माहित नाही मला. " गौरवने कपाळाला हात लावला.

" तुला आवडते , हे तिला सांगितले ना ... " ,

" नाही , कधी सांगू तिला. बोलते तरी का माझ्याशी ती. ",

" अरे माणसा .... तिला स्वतःहून बोलायला आवडत नसेल. वर्गात बघतोस ना ... २-३ मुलीसोबत बोलते तितकंच ... तू जा ना स्वतःहून बोलायला. ",

" केला प्रयत्न .... ते तरी कुठे जमते. lecture संपले कि कधी निघून जाते कळतच नाही. कधी तरी whatsapp वर मेसेज करते. ते पण असेच तुटक तुटक असतात. आज विचार केलेला , friendship band बांधू... lecture संपला , ती गेली लगेच. मला वाटलं कि इथे खाली कॅम्पसमध्ये असेल. नाही आहे. एव्हाना घरी पण पोहोचली असेल. " आदित्यच्या बोलण्यावर गौरव विचार करू लागला.

" काय यार .... एव्हड्या वर्षात कोणी आवडली आहे. तर तिचे असे नखरे... " गौरव बोलून गेला.

" नखरे नाहीत .... ती career oriented आहे. असं आपल्या सारखे टाईमपास करायला आवडत नाही. ",

" हो ... तसा तर तुही career oriented आहेस. तरी अभ्यास करून बाकीच्या गोष्टीही करतो ना .. ",

" तिचे वेगळे आहे रे , आणि तिला कॉलेजमध्ये कोणाशी नाव जोडायचे नाही. मग सांग ... कशी काय तिच्याशी मैत्री करू.... मैत्री तर झाली आहे म्हणा , वरवरची मैत्री !! आमच्यात त्यापुढे काही गोष्टी जातील, असे मला तरी वाटत नाही. " आदित्यचे बोलणे संपले.

" तूच रे ... खरा हिरो ... " म्हणत गौरवने त्याला मिठी मारली. दोघे गप्पा मारत घरच्या दिशेने निघाले. गौरव सच्चा दोस्त ... त्याने हे प्रकरण त्याच्या पुरतेच ठेवले.      


सिद्धता घरी आली. तिच्या रूमला एक छान अशी बाल्कनी होती. तिथे बसून विचार करत होती. " का निघून आली अशीच... थांबले पाहिजे होते ना मी. आदित्य बघत होता माझ्याकडे... त्याला काय वाटले असेल , किती गर्विष्ठ आहे मी. एक दिवस असा टाईमपास केला असता तर चालले असते. आता हे सर्व बोलून काय फायदा... " सिद्धता तशीच बसून होती. मोबाईल वर मेसेज करू , म्हणत तिने लगेच आदित्यला मेसेज केला. " happy friendship day .... dear !! " . तोपर्यंत आदित्य घरी पोहोचत होता. दारावरची बेल वाजवली आणि मेसेज तेव्हाच आला. मेसेज वाचून आनंदाला आदित्य. आईने दरवाजा उघडला. मोबाईल स्वतःच्या खिशात ठेवून त्याने आईचा हात हातात घेतला आणि आई सोबत नाचू लागला. तिला कळेना याला इतका कसला आनंद झाला आहे , तीही हसत हसत त्याच्या सोबत नाचू लागली.

इकडे , सिद्धता आज फक्त आदित्यचा विचार करत होती. " त्याला मी आवडते हे नक्की. पण हे त्याच्याकडूनच ऐकले पाहिजे ना.... कि त्याला फक्त मैत्री करायची असेल तर ...... कॉलेजमध्ये सर्वच बोलतात ना , सर्वांचा तो best friend आहे. कोणत्याच मुलीला त्याने " मैत्री " पुढे नेले नाही. मग मला कशाला स्पेशल वागणूक देईल तो..... सिद्धता ... आपण कोणता विचार करत आहोत. अजून नीट मैत्री नाही आणि प्रेमाचा विचार... वेडबिड लागले आहे का... अभ्यास महत्वाचा ... हम्म .... मलाही आवडतो आदित्य ... शी बाबा !! काय करायचे कळतच नाही. " सिद्धताने सर्व विचार गुंडाळून ठेवले आणि अभ्यास करायला निघून गेली.

आदित्यला मात्र छान वाटले. तिने मेसेज केला. तोही " Friend " म्हणून .... व्वा !! तिच्या मनात नक्की असेल काही... माझ्याबद्दल. कदाचित मैत्री पुढे गेलो तर. आदित्य तिचा विचार करत घराबाहेर आला. त्याच्या सोसायटीमध्ये एक छानसे गार्डन होते. तिथेच असलेल्या एका लाकडी बेंचवर जाऊन बसला. कदाचित कॉलेजमध्ये असणाऱ्या इतर गोष्टीमुळे घाबरत असेल ती. मी ... मी काय करतो ... तेच .. करिअर महत्वाचे ... ती माझ्या पेक्षा जास्त फोकस वाटते. अभ्यासात माझ्यापुढे आहे. सोडून देऊ का प्रेमाचा विचार... सुरुवातीला ते कसे छान वाटायचे ना ... सर्व कसे slow motion ... छान आहेत त्या भावना.... आम्ही whatsapp वर बोलायला लागलो आणि ते बंद झाले. पप्पा बोलला होता ना , अचानक सुरु होते आणि अचानक बंद होते. ती दिसली कि अजूनही बहुदा हवेतच फिरत असतो मी. स्वतःशीच हसला. त्याला ती पहिल्यांदा दिसली होती ते आठवलं. तेव्हा पासूनचे दिवस त्याला आठवले. अचानक एक थंड हवेची झुळूक आली. आदित्यने त्या दिशेने पाहिले. समुद्राच्या लाटा !! ... हे कसे .... आपल्या सोसायटीमध्ये समुद्र कसा काय... एक अस्पष्ठ असा सुवास आला तर दुसऱ्या दिशेने पाहिले. नजर जाईल तिथे विविध रंगांची फुले फुलली होती. त्यावर हाताच्या पंजाहून मोठी अशी वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे उडत होती. काय होते आहे नक्की... आदित्य विचारात पडला. समोरून सिद्धता चालत येत होती, तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करत , आदित्यकडे एकवार पाहत त्या फुलांमध्ये निघून गेली.

आता सिद्धताला बघितले ना मी... आदित्य डोळे चोळत होता. असा विचार सुरु होता तोच त्याच्या डोक्यावरुन पक्षांचा एक मोठा थवा उडत गेला. आदित्य भारावून गेला. त्याच्याकडे बघत होता , बघता बघता ते समोर उडत चालले आहेत , त्या दिशेने बघितले. तर समोर सिद्धता अभ्यास करत बसलेली. चोरून एक नजर तिने आदित्यकडे पाहिले. ... हे तर कॉलेजच्या वर्गातले, आदित्यने ओळखले. आणि क्षणार्धात तिची असंख्य अशी छोटी छोटी फुलपाखरे झाली. आदित्यला उमगले. पप्पा बोलला होता ना ... त्या प्रेमाच्या जगात आहोत. छान वाटलं त्याला. समुद्रात त्याला दूरवर पाण्यातून बाहेर मुसुंडी मारणारे डॉल्फिन दिसले.त्यांना बघत असताना ... बाजूलाच पावसात उभे असलेले हे दोघे दिसले. दोघेही एकमेकांना चोरून बघत , आधी कोण बोलणार याची वाट पाहत होते. मधेच सिद्धता तिच्या मैत्रिणी सोबत जाताना दिसली. लगेच पावसाने त्यावर इंद्रधनूष्य धरले. आदित्यने त्या इंद्रधनुला हात लावला. सप्तरंग त्याच्या हातावर उमटले. त्या रंगाच्या मध्ये सिद्धताचा फोटो.... दुसऱ्या हाताने स्पर्श करायचा प्रयन्त करताच पुन्हा त्याच्या असंख्य फुलाच्या पाकळ्या झाल्या. आलेल्या वाऱ्यासोबत त्या पाकळ्यांनी फेर धरला आणि आभाळात निघून गेल्या. काही आदित्यच्या गालावर विसावल्या. आभाळ रंगेबेरंगी झाले. एक पक्षी आदित्यच्या शेजारी येऊन बसला. मघाशी दिसलेले डॉल्फिन आता त्याच्या मागे येऊन कसरती करत होते. काही फुलपाखरे त्याच्या शेजारी उडत होती. आदित्यने हात पुढे केला. त्याच्या बोटांवर एक फुलपाखरू येऊन बसले. आणि आदित्य , त्या प्रेमाच्या जगात जी जादू सुरु होती , ते डोळे भरून बघू लागला.


=================================  क्रमश : ==============================

Followers