All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 15 July 2017

"आठवणीतला पाऊस "


             पावसाळा सुरु झाला कि माझ्या Facebook वॉलवर , Gmail मध्ये मेसेजचा पाऊस सुरु होतो. " पाऊस सुरु झाला कि तुझी/ तुमची आठवण येते. " असे आणि याप्रकारचे बरेचसे मेसेज असतात. ( माझ्या कथांमध्ये बहुतेक वेळेस पावसाचे दर्शन होतं असते .... त्यामुळे बहुदा ) अर्थात ते मेसेज माझे मित्र आणि वाचक पाठवत असतात , तुमच्या या प्रेमाबद्दल मी सदैव आभारी राहीन... 

             पावसाळा हा ऋतू मला अगदी लहानपणापासून आवडतो. त्यामुळेच कदाचित माझ्या कथांमधून पाऊस जरा जास्तच डोकावतो. बऱ्याच लोकांना वाटते , कि पावसात भिजायला आवडते म्हणून मला पाऊस आवडतो. काहींना मला कथा लिहायला आवडतात म्हणून पाऊस आवडतो असे वाटते. मात्र माझं आणि पावसाचे एक वेगळेच नातं आहे. 

            माझं बालपण जरा, काहीश्या हालाखीच्या परिस्थितीत गेलं. माझे बाबा ,मी इयत्ता २ रीत असतानाच देवाघरी निघून गेले. आम्ही ३ भावंडं... त्यात मी सर्वात लहान.. ज्या वयात काहीच कळायचे नाही.. वडिलांच्या आजारपणात खूप खर्च झाला, आई कशीबशी घर चालवायची. त्यात शाळा ऐन पावसाळ्यात सुरू व्हायची. रेनकोट घेण्याइतपत पैसे नव्हतेच. त्यात तीन जणं शाळेत जाणारे, दोघे भाऊ सकाळी शाळेत जायचे.... माझी वेळ दुपारची. कुठून आणणार एवढ्या छत्र्या.... मला आठवते, माझ्या बाबांची एक तुटकी छत्री होती, तीच मला आईने दिली होती. जरा तुटलेली होती तरी मी वापरायचो.... बाबांची एक आठवण म्हणून. बालवयात ,बाबांची "ती" आठवण सुद्धा खूप होती माझ्यासाठी.. ती तशी तुटकी छत्री घेऊनच मी शाळेत जायचो... भिजायला व्हायचे. कदाचित तेव्हा पासून सवय लागली असावी भिजायची. 

            अर्धा -अधिक भिजलेला युनिफॉर्म, तसाच कुडकुडत बसायचो वर्गात. युनिफॉर्म सुद्धा जुना, मोठा भाऊ त्याचा युनिफॉर्म २ नंबर भावाला देयाचा. आणि त्याचा युनिफॉर्म ३ नंबरला म्हणजे मला मिळायचा. मळका नसायचा परंतु शुभ्रही नसायचा. आईला जास्त कष्ट पडू नयेत म्हणून पावसात उडणाऱ्या चिखलापासून जमेल तोपर्यंत बचाव करायचो युनिफॉर्मचा. दुसऱ्या मुलांनी, मित्रांनी युनिफॉर्म वरून कधी मस्करी केली नाही माझी,पण छत्री बघून हसायचे कधीतरी... तेव्हा आपण तुटकी छत्री वापरतो याची जाणीव व्हायची. 

            नवीन पावसाळी चप्पल सुद्धा आठवत नाहीत , जुनेच असायचे बहुदा. ७ वीत ,८ वीत असताना proper पावसाळी चप्पल आईने घेऊन दिले असतील, स्वतःचे बरं का... तोपर्यंत भावाचेच वापरायचो. मोठे व्हायचे ते चप्पल. मग पावसात चालताना , मागून चिखल उडायचा... शाळेची पॅन्ट भरून जायची चिखलाने... कधी पडायला होयाचे त्या चप्पलांमुळे... पण युनिफॉर्मला चिखल लागू दिला नाही कधी... सुरुवातीला शाळेत जाताना आणि घरी येताना पाऊस नकोसा वाटायचा... नंतर नंतर पाऊस फक्त शाळेत जाताना आणि घरी येतानाच यावा असा वाटायचं... (ते अजूनही वाटते )

          कधी कधी शाळेत सुद्धा ऐन पावसाळ्यात "शाळेचे शूज " घालून यायला सांगायचे. का ते कळलंच नाही कधी.... पुन्हा तेच, तीन जणांना एकदम कुठून आणणार "शाळेचे शूज "... तेच पुन्हा... मोठ्या भावाचे दोन नंबरला , आणि त्याचे मला... अश्याच एका पावसात, शूज सांगितले होते. जुनेच शूज छानपैकी साबण लावून धुवून टाकले. आधीच ते जुने होते... किती वापरणार अजून... वरून जरी चांगले दिसत असले तरी ते खालून फाटत चालले होते. 

         फक्त लेस आणि वरचा आजूबाजूचा भाग सोडला तर खालून ते फाटलेच होते. पुढच्या तीन - चार दिवसात एका शूजचा खालचा उरला-सुरला भागही निखळून पडला. म्हणजे दिसायला तो पूर्ण शूज होता, वरून... खालून बघितल तर पायाचा पूर्ण मोजा दिसायचा. आईकडे नवीन शूज घेयाला पैसे नसणार, एवढी अक्कल होती माझ्याकडे तेव्हा. नाहीच सांगितलं आईला. एक आठवडा तसाच जायचो शाळेत आणि घरी आलो कि शूज लपवून ठेवायचो, आईने बघू नये म्हणून.. 

         अश्याच एका दिवशी, पायाला काहीतरी लागलं. रक्त येतं होते, वेदना पचवायची सवय झाली ती तेव्हा. वर्गात जाईपर्यंत पायातला मोजा रक्ताने भिजला होता. त्यामुळे लाल रंगाचे अस्पष्ठ असे ठसे वर्गापर्यत दिसत होते. एका बाईंनी ते बघितलं, वर्गात येऊन विचारलं तेव्हा बाजूला बसलेल्या मित्राने सांगितलं बाईंना. बाई कोण होत्या एवढं नीट आठवत नाही आता. परंतु त्या रडल्या होत्या एवढं अस्पष्ठ आठवते. पायाला मलमपट्टी कोणी केली तेही आठवत नाही,पण बाईंनी नवीन शूज आणून दिलेले हे आठवते. असा होता माझ्या शाळेतला " आठवणीतला पाऊस" 

        तेव्हा घरसुद्धा लहानसं होतं. आम्ही तीन भावंडं आणि आई, अश्या चौघांसाठी तरी खूप होतं ते. तेव्हाचं कौलारू घर. त्यात आमच्या घराला लागूनच पिपळाचं एक मोठ्ठ झाड होत. झाडानेच घराचा आधार घेतला होता, एवढं ते आमच्या घराला टेकून होते. ( आता तोडलं झाड ते ) ;पाऊस सुरु झाला कि त्या झाडावरून पाणी घरात यायचे. मग प्लास्टिकचे मोठे तुकडे लावून ते पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयन्त सुरु व्हायचा... दोन नंबर भाऊ (रविश ) त्यात माहीर होता. 

          पिंपळाचे झाडं खूप मोठ्ठ होते, त्याच्या फांद्या अधून-मधून कौलारू घरावर पडायच्या... कौले तुटायची. मग पावसाळा सुरु झाला कि पावसाचे दर्शन घरातूनच व्हायचे. पाऊस भेटीलाच यायचा जणूकाही. खूप ठिकाणांतून पाऊस घरात यायचा. मग मिळेल ते भाडं घेऊन त्या ठिकाणी उभं राहायचे किंवा ते भांडं "त्या पाण्याखाली " ठेवून दुसरी गळणारी जागा बघायची. कधी कधी पाऊस जेवणाच्या ताटात यायचा, कधी जुन्या टीव्हीवर काही बघत असताना शेजारी बसायला यायचा, कधी झोपलेले असताना अंथरुणात सोबतीला झोपायलाही यायचा. रात्रीचा पाऊस आला कि अजूनही आठवते अगदी... सगळे कसे जागे व्हायचो आम्ही. कधी कधी जास्तच पाऊस आला कि जमिनीतल्या , आम्हाला माहित नसलेल्या , उंदीर मामाच्या घरातून पाणी, आमच्या घरात पाहुणा म्हणून जबरदस्ती घुसायचे. तेव्हा तर अवस्था आणखी वाईट होयाची.. असो, आता तो काळ ओसरला तरी येणाऱ्या प्रत्येक पावसात त्या आठवणी हमखास येतात. 

          शाळेनंतरचा पाऊस म्हणजे कॉलेजमधला पाऊस... तेव्हासुद्धा परिस्तिथी चांगली नव्हती, पण बालपणाइतकी वाईटही नव्हती. तुटकी छत्री नव्हती तरी जुनीच असायची. कॉलेज समुद्राजवळ... पावसात वाऱ्याचीही सोबत असायची. अर्थात शाळेत, पावसात भिजायची सवय लागलेली, म्हणूनच कि कॉलेजमध्ये जाताना पावसाची गाठभेट ठरलेली. तिथे पाऊस कडकडून भेटायचा. छत्री फक्त नावाला असायची. लेक्चर बंक करून मित्रांसोबत मुद्दाम पावसात त्या समुद्र किनारी जायचो, छान वाटायचे.. तेव्हा पासून पावसातला खवळलेला समुद्र जवळचा झाला. कॉलेजमधला पाऊस मला कविता करायला सांगायचा... करायचो सुद्धा... कवितांची वही सुद्धा पावसाने भिजवून खराब करून टाकली... जवळ ठेवून काही फायदा नव्हता, म्हणून एका पावसात ती समुद्रालाच " वाचायला " देऊन टाकली. 

            पाच पावसाळे समुदाच्या साक्षीने घालवले. कॉलेजच्या गॅलरीत उभं राहून बघत बसायचो पाऊस, पावसातला समुद्र. वरून छान द्रुश्य दिसायचे. काहीश्या गोडं, थोड्या कडू आठवणी पावसातल्या... एक मैत्रीण, खूप जवळची... खूपच जवळ होती मनाच्या.. १३ वी पर्यंत सोबत होती.. वेगळं शिकण्यासाठी कॉलेज बदललं तिने.. तेव्हा वाईट वाटलं होतं.. एकदा अशीच, तिचं तिथे admission झाल्याचे सांगायला आलेली, तेव्हाही पाऊस होता सोबतीला... पावसातून तिला जाताना बघितलं ते शेवटचं.. तिच्या डोळ्यातला पाऊस आठवतो... माझ्या मनात भरून राहिला तो पाऊस, कायमचा. 

           अश्याच एका पावसात, माणसांची दोन भिन्न रूपं बघायला भेटली होती. भर पावसात , एक आई आपल्या लहानग्या मुलाला घेऊन चालली होती. तो लहानगा, नवीनच घेतलेल्या रेनकोट मधून पाऊस "enjoy" करत होता. त्याच्यासमोरच, एक रस्त्यावर राहण्याऱ्यापैकी, एक लहान मुलगा त्याच्याकडे बघत होता. क्षणभरासाठी, नवीन रेनकोट मधला "तो" आणि अंगावर फक्त "चड्डी" सारखं काहीतरी असलेला ,जवळपास सारखंच वय असलेला "तो"... एकमेकांकडे बघत उभे राहिले.. त्या दोघांकडे बघून "यातला सर्वात सुखी कोण " हा प्रश्न मलाही पडला. 

            कॉलेज मधला पाऊस त्यामानाने तरुण होता माझ्यासाठी... इतरांसाठीही तसाच असेल, ते दिवसच मंतरलेले असायचे... कॉलेजमधल्या "त्या" पावसानेच कदाचीत मला कथा लिहिण्याची प्रेरणा दिली असावी. 

            पाऊस, फक्त शाळा, कॉलेज पुरता नव्हता. माझ्या बहुतेक, खाजगी गोष्टीतही पावसाने आपलं अस्तित्व जाणवून दिलं. वडिलांसोबत जास्त पाऊस अनुभवता आला नाही. आईसोबत , तिच्या शेपटीसारखा फिरायचो, पावसातसुद्धा... घरात पैश्याची चणचण असायची लहानपणी.. म्हणून तेव्हापासून लहानसहान, जमतील अशी कामं करायचो.. पहिली गाडी पुसली ती पावसात.. मज्जा आलेली... २ रुपये भेटले होते, आठवते ते अजून. 

           शाळेचा पहिला दिवस पावसाचा, कॉलेजच्या admission ची रांग पावसात लावलेली,  पहिली कविता लिहिली ती पावसात, पहिली कथा पावसावर, कोणालातरी दूर जाताना बघितलं ते पावसात, प्रेमात पडलो ते पावसात, पहिल्या जॉबचा पहिला दिवस पावसातला, पहिल्यांदा घाबरलो असेन ते पावसात चमकणाऱ्या विजेला. पहिली पिकनिक पावसातली, जन्म जरी फेब्रुवारी मधला असला तरी माझे मरण येईल तेव्हा पाऊस नक्की सोबतीला असावा असे वाटते नेहमी मला.

           तर असा हा पाऊस, किती त्याबद्दल लिहिलं तरी कमीच.... कितीतरी वेगळी रूपं आहेत पावसाची... रौद्ररूपातला पाऊस वेगळा, रिमझिमणारा पाऊस मनाला सुखावणारा.. प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा, मन जोडणारा, तर कधी मन कायमची तोडून टाकणारा.. एकच ऋतू आहे, ज्यात आनंदाश्रू आणि दुःखाने रडू येते. समुद्र किनाऱ्याजवळचा वेगळा पाऊस,रस्त्यावरचा चिखलातला वेगळा पाऊस, ट्रेन मधला पाऊस वेगळा,गड- किल्यावरच्या पाऊस वेगळा, दऱ्या-खोऱ्यातील पाऊस वेगळा,गळक्या घरातील पाऊस वेगळा,मरीन लाईन्स वरच्या चहातील पाऊस वेगळा, डोळ्यातला पाऊस वेगळा,मनातला पाऊस वेगळा.... किती रूपं त्याची... पण माझ्यासाठी, सर्वात जवळच्या मित्रासारखा.. माझ्या बालपणीचा मित्र, सवंगडी.... दरवर्षी येताना खूप आठवणी सोबत घेऊन येतो.. सगळ्यांच्या... काही ना काही आठवणी घेऊन बरसतो. 

          असा हा, ....... जरासा तुमचा.. पण बराचसा माझा... माझा सोबती,... तुमचा पाऊस... माझा पाऊस.... " आठवणीतला पाऊस " 




Saturday 8 July 2017

परिवर्तन



सकाळचे ७ वाजले... अलार्मने प्रियांकाला जाग आली. आळोखे -पिळोखे देत "फ्रेश" झाली. लगेच काहीतरी आठवलं तिला, मोबाईल घेतला... लगेच कोणाला तरी  FB वर बर्थडे मेसेज type केला... त्यानंतर लगेच कॉल केला...
" हॅपी बर्थडे डार्लिंग... खूप खूप वर्ष जिवंत राहा... आणि पार्टी देत राहा.. ",
"हो ग... पियू... थँक्स... पार्टी देणार ना... संध्याकाळी ये... सगळ्या एकत्र जाऊ... " पलीकडून आवाज आला....
" आणखी कोण येणार आहे.. तुझा BF येणार का... ? " ,
" तो कशाला ? आपली "गर्ल्स पार्टी" आहे फक्त... नक्की ये... आणि वेळेवर ये.. बाय " .. प्रियांकाने फोन ठेवला... आणखी काही मैत्रिणीना पार्टी बद्दल सांगितलं आणि अंघोळीसाठी गेली.

"प्रियांका... संध्याकाळी लवकर ये जरा... " आईने प्रियांकाला जाता जाता सांगितले. प्रियांका तयारी करून ऑफिसला निघतच होती. आईचे ते वाक्य ऐकून प्रियांकाचे तोंड वाकडं झालं.
"नाही आई... आज नको प्लिज.. आज बर्थडे पार्टीला जायचे आहे.",
"अगं.. मी कुठे अडवते आहे तुला... इकडचा प्रोग्राम झाला कि जा ना... " आईने समजावलं.
" नको ना यार.. " प्रियांका वैतागत म्हणाली.
" काय नको... तुझं ऐकते ना मी सगळं... एक दिवस नाही गेलीस बर्थडेला तर काय झालं... " आई रागावत म्हणाली. प्रियांका थांबली. 

"आई बस जरा... बोलूया आपण.. " प्रियांकाने खांद्यावरची बॅग काढली. आणि सोफ्यावर येऊन बसली. आई सुद्धा आली.
"हं बोल... काय बोलायचे आहे ते.. एका बर्थडे साठी नको बोलले तर राग आला. ",
"प्रश्न बर्थडेचा नाही... पण आता पर्यंत ८ वेळा हा "बघण्याचा कार्यक्रम" झाला. दोन वेळा आपण नकार दिला तर सहा वेळा मुलाने नकार दिला.आज सुद्धा असंच काहीतरी होईल आणि नकार येईल... त्यापेक्षा मी जाते ना बर्थडेला.. वर्षातून एकदा तर येतो. " प्रियांका...
"हो.. तरीसुद्धा ते तुला बघायला येणार आहेत.. मुलगा बिझनेसमन आहे... चांगल स्थळ आहे... " त्यावर प्रियांकाला हसू आले.

" आई.. एक सांग मला.. स्थळ 'चांगलं कि वाईट' हे कोण ठरवते. दोन वेळेला तुम्हाला मुलगा पसंत नव्हता म्हणून "माझ्याकडून" नकार कळवलात. सहा वेळा त्यांना मी आवडले नाही म्हणून मुलाने नकार सांगितला. याचा अर्थ, पहिल्या दोन वेळेस मुलगा "वाईट" होता.... नंतरच्या सहावेळेस मी "वाईट" झाले का... मग आता येणारे "चांगले स्थळ" , ते सुद्धा मला वाईट ठरवतील ना.. " आई काय बोलणार त्यावर...

" समोरून नकार आला कि काय फीलिंग होते.. तुला सांगायला नको.. तू सुद्धा अनुभवलं असणार ना, तुझ्यावेळी.. वाटते कि नकोच लग्न... मुलगी म्हणजे काय खेळणे वाटते का.. हि आवडली म्हणून ठेवूया... ती चांगली नाही म्हणून नकार... मन असते ना मुलींना सुद्धा... मग प्रत्येकवेळेस मुलगा कसं ठरवणार कि त्याला कोण जोडीदार हवा आहे ते.. शिवाय love marriage करताना ह्या गोष्टी कुठे कोण बघतात.... त्यात असतात ना... वाईट स्थळं ... ती तेव्हा चालतात ना... "  

" आई... चांगली-वाईट व्यक्ती नसते या जगात... ती मानसिकता असते लोकांची... अपंग,गरीब, बेरोजगार.. त्यांचीही होतात ना लग्न.. ते का वाईट असतात.. किंवा ती "स्थळं" वाईट असतात... नाही ना.. ६ वेळेस... माझा रंग सावळा आहे, गोरी मुलगी पाहिजे.. म्हणून नकार कळवला.का तर मला होणारे मुलं.. सावळं किंवा काळ्या रंगाचे होईल... " प्रियांका स्वतःच्याच बोलण्यावर हसली.

" काय लोकं विचार करतात ना.. मुलगी फक्त कमवती नसून पगार १५ ते २० हजार पाहिजे... रंग गोरा, दिसायला छान असावी... सडपातळ असावी.. मग सावळ्या,काळ्या, जाडसर मुलींनी स्वप्नचं बघू नये का.. जगण्याचा अधिकार सर्वांना सारखाच आहे, मैत्री करताना या गोष्टी बघतो का आपण.... मग लग्नाच्या वेळेस काय होते लोकांना.... " आईला प्रियांकाचे बोलणे पटले.

"तरीसुद्धा... लोकांच्या अपेक्षा असतात ना.. म्हणून हे सगळं बघावं लागते... ",

" तसंच असेल तर.. ज्यांना जन्मभर एकत्र राहायचे आहे त्यांना का विचारत नाहीत अपेक्षा. मला तुम्ही एकदा तरी विचारलंत का... तुला मुलगा कसा हवा ते... " आई गप्प झाली. 

"बरं... बाई, काय अपेक्षा आहेत तुझ्या मुलाकडून... " ,

"हं... आता कसं... मला कसलंही स्थळं चालेल... फक्त तो मला समजून घेणारा असावा... पैशाच्या मागे तर सर्वच धावत असतात...पण तो सुखासाठी प्रयन्त करणारा असावा.. मी आहे ना समाधानी... आहे त्यात समाधान असावा ..रंग गोरा,सावळा, काळा... कशाला हवे रंग... अगदी हिरव्या रंगाचा असेल तरी चालेल मला.. पण मनानी छान असावा. माझं आयुष्य जगायला देयाला हवे. माझीही life आहे ना... घरातल्या प्रत्येक कामात ५०-५० चा वाटेकरी हवा... मीही जॉब करते, मलाही थकायला होते, हे समजून मदत करणारा असावा... बस्स, एवढंच... बाकी काहीनको.. " 

आईला थोडे हसू आले. " माझ्या लग्नच्या वेळी मी असा विचार केलाच नाही ग... घरच्यांना तुझे बाबा आवडले आणि लावून टाकलं लग्न... पण खरंच तू खूप धीराची आहे.. thanks... " ,

" thanks for what ? " ,
" डोळे उघडलेस ना म्हणून... तीच ती जुनी विचारसरणी घेऊन जगत होते मी.. मनातले विचार बदलले आता.. म्हणून thanks... "
प्रियांकाने आईला मिठी मारली.
 "चल मी निघते ऑफिसला.. आणि प्लिज... त्यांना सांग.... आज तरी जमणार नाही मला.. सांगशील ना आई.. " प्रियांका लाडिक आवाजात म्हणाली.
" हो सांगते... मग, कधीचा प्रोग्राम ठरवूया.. " प्रियांका विचारात पडली पुन्हा..
" रविवार ?? ... चालेल ना तुला.. ",
"हो.... सुट्टीच असते ना... चालेल.. संध्याकाळी बोलावू त्यांना... " प्रियांका म्हणाली.
"इकडे कशाला.. या वेळेस आपणच जाऊ ... "मुलगा बघायचा" .... काय ? " आई हसत म्हणाली. प्रियांका पुन्हा घरात आली, आईला गच्च मिठी मारली आणि हसतच तिच्या ऑफिसला निघाली.   

----------------------------------------- The End--------------------------------------

Followers