" ओ मॅडम... उठायचे नाही का... सूर्य डोक्यावर आला.. " आकाशने सुप्रीला तंबू बाहेरूनच आवाज दिला.
" झोपू दे रे... या संजूने रात्रभर झोपूच दिलं नाही... वाघा सारखी घोरत होती. " आतूनच बोलत होती सुप्री.
" मंद !! " संजनाचा आतूनच आवाज. तंबूचा "दरवाजा " उघडून संजना बाहेर आली.
" काय बोलायचं ते कळतच नाही हिला कधी कधी.. हिचीच मस्ती सुरु होती रात्रभर. सकाळी कुठे डोळा लागला माझा. मी सांगते ना आकाश, हिला कुठे घेऊन जायचं नाही पुढे कधी... " संजना आकाशकडे पाहत म्हणाली.
" हो.. तरी आता तरी निघावं लागेल ना इथून... त्याशिवाय पुढचा प्रवास कसा सुरू करणार.. " सुप्री अजूनही तंबूमध्येच... " थांब हा... पाणीच ओततो आता.. " आकाशने हातात पाणी घेतलं आणि सुप्रीच्या चेहऱ्यावर फेकलं.
सुप्रीला जाग आली. खिडकीवर डोकं ठेऊन झोपलेली. बाहेर हलकासा पाऊस सुरु झालेला. त्याचेच काही थेंब तिच्या चेहऱ्यावर पडलेले. आपण तंबूत नसून एका बसमध्ये आहोत आणि कूठेतरी निघालो आहोत, याची जाणीव झाली सुप्रीला. घड्याळात पहाटेचे ६ वाजत होते. बसमधली बाकीची मंडळी तर अजूनही साखर झोपते होती. पाऊस आकाशमुळे आवडीचा झाला होता. तो गेल्यापासून तरी सुप्रीला पाऊस नकोसा झालेला. नाहीतर खिडकीतून हातात झेलला असता पाऊस तिने, खिडकी बंद करून शांतपणे पाऊस बघत बसून राहिली.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
कुठेतरी दूर पहाट होतं होती. सूर्यदेव डोंगराच्या कोनातून हळूच डोकावून पाहत होते. त्यांचा प्रभाव आता तरी जाणवणार नव्हता. कारण मोठे मोठे ढग मार्गक्रमण करत होते ना. वारा होता सोबत. काही ढग तर त्या डोंगरावर ,पडक्या किल्ल्यावर विसावत होते जरा. भटक्या तिथेच होता ना... त्या पडक्या किल्ल्यावर काल रात्रीच पोहोचला होता. त्याचंच घर ते... विसावला रात्रीचा. सकाळी जाग आली, तर ढगांची ओली चादर अंगावर..... भटक्या उर्फ आकाश, उठून बसला आणि समोरच द्रुश्य न्याहाळत बसला. चहुबाजूनी ढगांची सेना येतं होती. सूर्य आपला काही क्षणापुरता दर्शन देयाचा, मग गुडूप होऊन जायचा. आभाळ एवढं गच्च भरलेलं कि उरले -सुरलेले ढग ... समोरचं असलेल्या दरीत नाईलाजाने उतरत होते. " पावसाला अजूनही अवकाश आहे ." आकाश मनातल्या मनात बोलला. खाली नजर टाकली त्याने, काही "डोकी" चालत चालली होती कुठेतरी. बहुदा शेतकरी असावेत, अंदाज आकाशचा. बाकी हिरवळ होतीच . काही ठिकाणी अजूनही मातीचा करडा, मातकट लाल रंग नजरेस येतं होता. एकदा पावसाळा सुरु झाला कि हे सुद्धा दिसायचे नाही. आकाश विचार करून स्वतःशीच हसला. काय नातं आहे माझं या निसर्गाशी.. काहीच कळत नाही मला... सवयीप्रमाणे हातातल्या घड्याळाकडे पाहिलं त्याने. बंद पडलेलं घडयाळ. तो बापडा तरी काय सांगणार वेळ. अजून १५-२० मिनिटं लागतील पाऊस सुरु व्हायला. तोपर्यंत उतरू खाली आपण, अंदाज लावत आकाश तयारी करू लागला निघायची.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
कोमल , संजना ,सुप्री आणि मंडळी, शहरातून गावाकडे निघाली होती. काही तुटक माहिती आणि खूप सारा आत्मविश्वास घेऊन प्रवास सुरु झालेला. आता सकाळचे ८ वाजले आहेत, एका तासात पोहोचू , असा कोमलचा अंदाज. सुप्री गप्प, संजना तिच्या शेजारी झोपलेली. आणखी काही मंडळी इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत झोपलेलं बरं म्हणत निद्राधीन झालेली. अमोल मात्र भारी खुश होता. जाग आल्यापासूनच त्याचं "click... click... " सुरु झालेलं. बहुतेक बसच्या बाहेर दिसतं होतं तेच फोटो होते. गुपचूप १-२ सुप्रीचेही फोटो काढले होते त्याने. कॅमेरा तसा महागातला होता त्याचा. दूरवरचे फोटो सुद्धा स्पष्ठ दिसायचे. खुपचं फोटो क्लिक झालेले, नंतर एवढा मोठा पाऊस सुरु झाला कि फोटोत फक्त पाणीच दिसेल. अमोलने फोटोचा नाद सोडून दिला. काढलेले फोटोच बघू लागला. एका फोटोत त्याला अजब वाटलं काही. तसा तो कोमलला शोधू लागला.
" Excuse me !! कोमल मॅडम... " कोमल जागीच होती.
" अरे !! मॅडम काय... फक्त कोमल बोल.. चालेल मला. " ,
" ok ok.. तर कोमल ... हा फोटो बघ जरा... काही वेगळं वाटते का... ?? " कोमलने फोटो बघितला. एक पडका किल्ला, त्या आडून होणारा सूर्योदय आणि आजूबाजूला घेराव करणारे पावसाळी काळे ढग... किती सुंदर फोटो क्लिक केला होता अमोलने.
" Wow !! किती छान !! मस्तच रे ... ",
" मस्त काय ... वेगळं वाटत नाही का ? " ,
" काय ? " अमोलने कॅमेरा हातात घेतला आणि एका गोष्टीवर झूम केलं. " हे आहे वेगळं " कोमल पुन्हा निरखून पाहू लागली. अगदी स्पष्ठ नसलं तरी कोणीतरी एक व्यक्ती होता.
" हम्म " कोमल निरखून बघत होती. " नक्की सांगू शकत नाही.. तो खरंच कोणी माणूस आहे कि एखादं झाडं.... कधी कधी असा संभ्रम निर्माण होतो .. शिवाय एवढ्या पावसात कोण जाईल त्या पडक्या किल्यावर, तोही एकटा.. सोबतीला कोणी दिसत सुद्धा नाही. " कोमलने आपलं मत सांगितलं.
" तुला कसा दिसलं एवढ्या खालून ते... ",
" नाही... तो मागे पडका किल्ला दिसला तर काढला फोटो... मलाही तसंच वाटते , झाडं असावे ते.. कोणी वेडाच जाईल एकटा , एवढ्या वरती... " अमोल पुन्हा त्याच्या जागी जाऊन बसला. सुप्री मात्र एकटक पावसाकडेच पाहत होती कधीची.
अश्याप्रकारे, "फारच" चांगल्या रस्त्यामुळे आणि मुसळधार पावसाच्या साथीने, या सर्वाचा पुढचा प्रवास साधारण सकाळी ९:२० वाजता संपला. सगळेच आळसावलेले . इतके तास एकाच जागी बसून कंटाळलेले जीव, बस मधून उतरले तसे ताजेतवाने झाले. पावसाने तोवर विश्रांती घेतली होती. बस त्यांना सोडून पुढे निघून गेली. मोकळाच तो बसचा थांबा.. रस्त्याच्या एका कडेला. तिथून समोर असलेलं गावं नजरेस पडत होतं. लाल चिकणमातीची पायवाट. जागेवरूनच दिसणारी काही कौलारू घरे. सोबतीला अश्याच उभ्या केलेल्या झोपड्या. त्यामधून उभे असलेले मोठे डेरेदार वृक्ष. पावसाने आराम केल्याने घरातून बाहेर पडलेले गावकरी आणि घरट्यातून निघालेले पक्षी... या सर्वांच्या मागे अगदी दिमाखात उभे असलेले डोंगर आणि त्या डोंगरावरून प्रवास करणारे काही ढगांचे पुंजके... विलक्षण द्रुश्य ना.. अमोलने कॅमेऱ्यात कैद केलं ते. गावकरी सुद्धा या १५-२० जणांचा गोतावळा बघून या जवळ आले.
"नमस्कार !! " कोमलने पुढाकार घेतला. " आम्ही सर्व शहरातून आलो आहोत. " काही गावकरी होते जवळ, त्यात एक मंदिराचा पुजारी ही होता." नमस्कार , स्वागत आहे तुमचं.. " स्वागत करून झालं तोच आभाळातून विजेने गर्जना केली. साऱ्यांचे डोळे आभाळाकडे. " चला चला... तुम्ही सर्व माझ्यासोबत चला.. जवळच एक मंदिर आहे. तिथे थांबा तात्पुरतं, पाऊस थांबेपर्यंत. " पुजारी सर्वाना घेऊन मंदिरात आले. पुढच्या १० मिनिटात पाऊस पुन्हा सुरु झाला. मंदिरात सर्वाना आडोसाही भेटला आणि पायही मोकळे झाले.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
" Excuse me !!.. " सईने एका गावकऱ्याकडे पाहत हाक मारली. त्याने मागे वळून पाहिलं.
" इथे कुठे असं ठिकाण आहे का , जिथून चांगले फोटो काढता येतील. means ... पूर्ण गावं दिसावं असं ठिकाण... " सईने विचारलं. तो बुचकुळ्यात. काय बोलते हि..
" माहित आहे का तुम्हाला.. " तो काहीच बोलेना.. त्यांचं बोलणं ऐकून आणखी एक जण थांबला.
" तुम्ही कुठून आलात ... काही हवे आहे का तुम्हाला... " ,
" मी सई.. कर्नाटक ला असते. सध्या फोटोग्राफी शिकते आहे. आमच्या सरांनी सांगितलं कि महाराष्ट्रात पावसात , दऱ्या-खोऱ्यात छान फोटो मिळतील तुमच्या पोर्टफोलिओ साठी म्हणून आली इथे. मला वाटते आम्ही रस्ता चुकलो आहोत, पण ते जाऊ दे... तुम्हाला माहित आहेत का अशी ठिकाणं .. जिथे मला छान फोटो मिळतील. " सई बोलत होती. भर पावसात हे संभाषण सुरु होतं.
" तुम्ही आधी एका कडेला या.. " म्हणत त्याने या सगळ्यांना एका आडोशाला आणलं.
" इथे सगळी आपापल्या कामात असतात... कोणाला वेळ आहे हे सगळं बघायला... " सई त्या वाक्याने हिरमुसली. तिच्या सोबत आणखी ५ जण होते. तेही फोटोग्राफी साठीच आले होते. त्यांना मराठी एवढं येतं नव्हतं, तरी सईने सांगितल्यावर सगळ्यांचा हिरमोड झाला. शेजारीच चहाची टपरी होती. गरमा-गरम चहा आणि पाऊस.. काय मस्त combination ना !! चहा घेताना छान वाटतं होतं तरी फोटोग्राफिच काय ... हा मोठा प्रश्न उभा होता समोर.
" हा... एक जण होता... तो असता तर फिरवलं असत त्याने... ",
" कोण ? " ,सईने लगेच विचारलं.
" भटक्या .... तो फिरत असतो सगळीकडे... त्याला माहित आहेत खूप जागा... गेल्या महिन्यात होता ... आता नाही " ," छट्ट यार !! " सई मनातल्या मनात.. आता तर पुन्हा घरीच जावे लागेल वाटते... एकतर माहित नाही इथे काही, त्यात तो कोण होता तोही निघून गेला..
" आरं.. भटक्या नं... कालचं दोघे बोलत व्हते.. आला हाय परत गावात त्यो.... " कुठेतरी आशेचा किरण दिसला.
" कुठे असतो तो... ",
" हा.. ते तुमाला हुडकायला लागलं... गावात इचारात जावा..भटक्या कुठं हाय मनून ... कोणी बी नेऊन सोडलं तुमाला.. " ,
" can we trust him ? " सईच्या ग्रुप मधली एक मुलगी बोलली. त्या दोन्ही गावकऱ्यांना कळलं नाही ते.. सईने मराठी मध्ये सांगितलं..
" विस्वास .... त्यो एकच मानुस हाय त्या लायकीचा... लय चांगला गुणाचा मानुस हाय तो... त्याज्या सारका सोधून पण सापडायचा नाय... " पाऊस सुद्धा कमी झालेला.
" चला काका.. आम्ही निघतो. मदत केल्याबद्दल थँक्स .. " म्हणत सई आणि तिचा लहानसा ग्रुप पुढे गावात निघाले.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
पावसाचा वेग कमी झालेला. अमोल सोडून बाकी सर्व एका जागी शांत बसून होते. अमोलचं फोटो काढणं सुरूच होतं. पुजारीने फक्त एकदाच अमोल कडे पाहिलं. नंतर या सगळ्याकडे नजर टाकली.
" पहिल्यांदा आलात वाटते तुम्ही.... इथे " ,
" हो.. तुम्हाला कसं कळलं ते ... " ...संजना
" हे महाशय ... ज्याप्रकारे फोटो काढत आहेत त्यावरून... फिरायला आलात वाटते तुम्ही... " पुजारीने चौकशी केली.
" हो... फिरायचे तर आहेच.. पण आणखी एका कामासाठी आलो आहोत.. " कोमलने सांगितलं.
" असा कोणी व्यक्ती तुम्ही बघितला आहे का... जो या सर्व गावकरी , शेतकरी पासून वेगळा वाटतो. म्हणजे इथला वाटत नाही असा.. दाढी- केस वाढलेले... जो सारखा भटकत असतो .. " कोमल...
" तुम्ही 'वेडा भटक्या' बद्दल बोलत आहात ना.. " ,
" हो ... हो , तोच " संजना.
पुजारी हसला " तो कशाला पाहिजे तुम्हाला... ",
" सहज... त्याला भेटायचं होतं आम्हाला.. " कोमल...
" त्याला भेटायला तो काय कोणी प्रसिद्ध व्यक्ती आहे का ? " पुजारी हसू लागला.
" तसं नाही, पण त्याने काही गावात खूप कामे केली आहेत ना.. म्हणून " कोमल बोलली.
" असं आहे तर.. तर मग ठीक आहे.. " ,
" तुम्ही भेटला आहात का त्याला प्रत्यक्षात " ,
" हो तर.. गावात होता ना तो , तेव्हा बहुतेक वेळेस तो, रात्रीचा या मंदिरात असायचा मुक्कामाला... केवढी मोठी दाढी... वाढलेले केस .. पहिल्यांदा आला तेव्हा तो साधूच वाटला होता मला. त्याची भाषा एवढी छान... मग विचार केला , नक्कीच हा गावातला नाही. कुठून आला माहीत नाही पण गावात छान रुळला. त्याच्याबद्दल मी ऐकलं होता आधी. ",
" ते कसं ? " कोमल
" मागच्या गावातले येतात कधी कधी या मंदिरात, एकदा अशीच दोघा-तिघांची चर्चा सुरु होती..... भटक्या वगैरे. आहे कोणी अशी. खूप छान कामे केली गावात त्याने. असंच ऐकलं होतं , बघितलं नाही कधी. इथे आला तेव्हा पाहिलं. या गावात तर देवासारखं मानतात त्याला... ",
" का .. असं काय केले त्याने.. " ,
" या गावात , दारूचा नुसता सुळसुळाट झालेला... त्या भटक्याने काय केलं माहित नाही.. तीन महिन्यात सगळं बंद करून गावाला सुधारलं. शिवाय पावसाचे पाणी ... ते कसं साठवायचं.. झाडं कशी लावायची... त्यांची काळजी घेयाची ,ते सांगितलं. या गावात घरांची डागडुजी करण्यास सुद्धा मदत केली त्याने... सांगायचं झालं तर.. आता जे गाव तुम्हाला दिसते आहे ना.. ते त्याच्यामुळे... " पुजारी भारावून सांगत होता.
" आता कुठे आहे तो.. भेटायचं होतं त्याला... " संजना पटकन बोलली. अमोल अजूनही फोटो काढण्यात दंग. त्याला तर या सगळ्या संभाषणाची कल्पनाच नाही.
" तो... त्याला भटक्या का बोलतात कळलंच नाही तुम्हाला.. थांबत नाही कुठे तो... " ,
" म्हणजे ? " इतक्या संभाषणात न बोललेली सुप्री अचानक बोलती झाली.
" गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच गेला तो... दोन महिने होतं आले आता.. कुठून आलेला आणि कुठे गेला , कोणालाच माहित नाही. " यावर ऐकणारे सर्वच हिरमुसले. संजनाला काही आठवलं. बॅगमधून आकाशचा एका फोटो तिने बाहेर काढला.
" हा बघा... असाच होता ना तो.. " पुजारी फोटो पाहू लागले.
" शक्य नाही.. तो खरचं साधू सारखा दिसतो, त्याच्या दाढी आणि केसावरून... हा फोटोतील व्यक्ती तर किती वेगळा आहे ..शिवाय तो खूप बारीक आहे.. सडपातळ म्हणा.. हा फोटो मधला जरा धडधाकट तरी वाटतो. हा तो ,भटक्या असू शकत नाही. " ,
" निदान चेहरा तरी बघा... " त्यावर पुजारी हसू लागला.
" भटक्याचा चेहरा कसा होता , तो त्यालाच माहित... ते मागचे केससुद्धा तोंडावर यायचे कधी कधी... डोळे तेवढे दिसायचे... पण सांगू का तुम्हाला... त्याच्या मागे जाऊन काही फायदा नाही... कुठे असेल ते माहित नाही. तुम्ही कुठे शोधणार त्याला... " बोलणं संपलं.
" तरी मी आधीच सांगत होते, नको यायला म्हणून.. " सुप्री हळू आवाजात बोलली.
खरंच , सुप्रीच्या बोलण्यात तथ्य होतं , जाणार तरी कुठे. पुढे कि मागे... कोमल विचार करू लागली. " तरी तुम्हाला काय वाटते... कुठे गेला असावा तो... " ग्रुप मधल्या एकाने विचारलं.
" सांगू शकत नाही ... मागे तर जाऊ शकत नाही. तिथूनच आलेला तो. तो पुढच्या गावी गेला असेल. या गावातून एक वाट जाते, एका ठिकाणी २ फाटे फुटतात, तिथून पुढे २ गावं आहेत.. एवढंच सांगू शकतो. तिथून कोणत्या गावात गेला ते सांगू शकत नाही. " ,
" ठीक आहे .. आभारी आहे.. " कोमल ...
पाऊस सुद्धा थांबला होता. सगळे निघाले. " आताच निघू नका. पावसाळा सुरु झाला आहे ना, कधी येईल सांगू शकत नाही. एक दिवस तरी आराम करा गावात. तसं छान आहे गाव. " ,
" नक्की... विचार करतो आणि थांबायचं कि नाही ते ठरवतो... "..... संजना
" पण एक गोष्ट आहे त्याची. त्याचे डोळे दिसतात आणि त्या डोळ्यातून कळते.. काहीतरी शोधतो आहे तो , एवढं नक्की... शिवाय , तो जिथे जातो ना... तिथून निघताना काही खूण मागे ठेवून जातो... गावात थांबलात ना कि कळेल आपोआप... "
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
" हॅलो काका .... तुम्हाला भटका ... भटक्या माहित आहे का .. कुठे असतो तो... " सईने एका वयस्कर माणसाला हाक मारली. " भटक्या व्हय... तो तीत... त्या झाडाखाली बसला हाय बगा... " त्याने एका दिशेनं बोटं केलं आणि निघून गेला. समोर वडाचं मोठ्ठ झाड. त्याच्या कितीत्या पारंब्या.. विस्तार तो किती... मोजू शकत नाही इतका. समोर कसलीशी शेतं. दूरवर पसरलेली... हिरवीगार सगळीकडे जमीन... त्यात काही शेतकऱ्यांची डोकी सुद्धा दिसत होती. झाडावर पक्ष्यांची शाळाच भरलेली होती जणू. मधेच त्यातून , त्या झाडांच्या पानांतून एक - दोन पक्षी उगाचच ओरडत बाहेर उडत होते. दूरवर एक बैलगाडी जाताना दिसत होती. आणि त्या वडाच्या खाली असलेल्या पाडावर.. एक जण , त्या शेतांकडे बघत बसलेला... पाठमोरा..
सई , तिच्यासोबत आलेल्या मित्रांना घेऊन पुढे आली. " Hi .... " सईने आवाज दिला. त्याने काही मागे वळून पाहिलं नाही. " तु भटक्या आहेस का ... " यावेळेस त्याने मागे पाहिलं. या साऱ्यांकडे एकदा नजर टाकून पुन्हा त्या शेतांकडे पाहू लागला. " Excuse me... तुमचं नावं भटक्या आहे ना... ते तुम्हीच आहात ना .. जे सारखे फिरत असतात.. " त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं. " माझं नावं भटक्या नाही.... हे गावातले बोलतात, त्या नावाने हाक मारतात. " आकाशने हसत उत्तर दिलं. वाढलेली दाढी, केस.. मळके कपडे आणि एक मोठी सॅक. त्याचा तो अवतार बघून सईचा एक मित्र तिच्या कानात पुटपुटला. " इसे देख कर लगता नही.. इसे कूच मालूम होगा traveling का.. " ," wait ... let me ask him.. " सई आकाश जवळ आली.
" Hi .. मी सई .. फोटोग्राफी शकते आहे. मला अशी काही ठिकाणी जायचे आहे , जिथून छान छान फोटो काढता येतील. गावात विचारलं तर त्यांनी तुझं नावं सांगितलं... माहित आहे का तुला.. " आकाश पुन्हा हसला.
" कसं असते ना, माणूस एवढा गुंतलेला असतो ना आपल्या विचारात , कि गोष्ट समोर असली तरी दिसत नाही.. " आकाश स्वतःशीच बोलत होता.
" what.... ?? means काय समजलं नाही मला... " सईने लगेच बोलून दाखवलं.
" एवढं समोर... निसर्ग त्याचं सौंदर्य उधळत असताना, तुम्ही विचारत आहात... कुठे मिळेल चांगलं ठिकाण... " आकाश समोर पाहत बोलत होता. खरंच किती छान होतं ते द्रुश्य.. सई ने बघितलंच नव्हतं त्याकडे. लगेच कॅमेरा सरावून २-३ फोटो क्लीक केले. बाकीचेही सुरु झाले.
थोडावेळ सई समोरच द्रुश्य बघत राहिली. " तुमच्या कॅमेरात पाणी जाते का.. " आकाशने विचारलं.
" हं... काही बोललास का तू... लक्षच नाही माझं... " सईचं लक्ष समोर लागलेलं होतं ना.
" तुमच्या ........ कॅमेरात ........ पाणी ....... जाते .... का .. ?? " आकाशने पुन्हा एक-एक शब्द करून विचारलं.
" का... means ... water proof कॅमेरा नाही आमच्याकडे... पाणी जाणारच ना... " सई हसत म्हणाली.
" मग ते जरा वेळ बंद करावं लागेल, पाऊस येतो आहे ना.. पुढच्या १० मिनिटात येईल... त्याच्या आधी निघावं लागेल इथून.. " आकाश उभा राहिला.
" आताच तर थांबला पाऊस.. लगेच कसा येईल.. " सई ,
" आपको पता चलता है... बारिश कब आनेवाली है ... " त्यातली एक मुलगी हसू लागली.
" हो ... कळते मला... भिजायचं नसेल तर चला.... पटकन चला. इथे एक पडका वाडा आहे, तिथे थांबू शकता थोडावेळ... " बाकीच्यांना नाही पण सईला त्याचं बोलणं पटलं. हा किती वर्ष राहतो इथे काय माहित, यालाच जास्त माहिती इकडची. हा विचार करून सगळे निघाले त्याच्या मागे.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
सुप्री , वर आभाळात खूप वेळ बघत होती. चालता चालता थांबली. अमोलचं लक्ष होतंच तिच्याकडे.
" काय मॅडम... एवढ्यात दमलात का.. म्हणे आम्ही खूप फिरलो आहे आधी. " अमोल लागला हसायला. पण सुप्रीला पाहून बाकीचे सुद्धा थांबले.
" काय झालं सुप्री ? " संजनाने विचारलं.
" माहित नाही काय झालं ते... पण थांबावंसं वाटलं. कदाचित आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे... " ,
" का ? " अमोल आता विचारात पडला.. हिला काय झालं.
" मला वाटते पाऊस येतो आहे पुन्हा... " सुप्री अजूनही वर आभाळात बघत होती. आकाशने सवय लावली होती ना.. सुटणार का लगेच. मात्र अमोल त्यावर हसू लागला. " यात हसायचं काय आहे अमोल सर... " सुप्री जरा रागात बोलली.
" सॉरी.. सॉरी... " अमोल हसू आवरत बोलला. " म्हणजे तुला हवामानचं सुद्धा कळते तर... पाऊस कधी पडणार... यावर्षी किती थंडी असेल.. उन्हाळा किती प्रखर असेल... I mean........ seriously,......... खरंच कळते का तुला .. कि नुसतं मला दाखवण्यासाठी... " .....अमोल.
" बघितलं ... हे असं असते... कोणाला खरं वाटतं नाही... म्हणून येतं नव्हते मी... "..... सुप्री..
" ok ok... सॉरी बाबा... पण आताच पाऊस पडून गेला ना... म्हणून वाटलं तसं..नाही बोलणार, आता पुढे काय करायचं ते सुद्धा सांग ना.. "
कोमललाही पटलं ते. " आपण एखाद्या ठिकाणी थांबू.. नाहीतर एखाद्या घराचा आडोसा घेऊ. सुप्रिया बरोबर बोलते आहे. " अमोलला तरीही शंका होती. कॅमेरा बॅगमध्ये ठेवला त्याने. बाकी सगळे आत गावात आले. काही गाई-म्हशीचे गोठे होते. त्यात थोडावेळ आडोसा घेऊ असं ठरलं. अमोल तर अजूनहि बाहेर उभा होता. आता यांना उभे राहून १५ मिनिटं होतं आली. पावसाचं काही दर्शन नाही. " उगाच थांबलो ना.. कुठे आहे पाऊस.. " अमोल बाहेरूनच आवाज देत होता साऱ्यांना. आकाश असता तर त्याने एकदम बरोबर सांगितलं असतं पावसाचं, त्याला कळायचा ना पाऊस... सुप्री मनातल्या मनात बोलत होती. आकाशची आठवण आली आणि इकडे पावसाने सुरुवात केली. अमोल जरासा भिजला, पण पावसाला सुरुवात झाली हे नक्की. " मानलं पाहिजे सुप्रिया तुला... ५-१० मिनिटानंतर आला पाऊस तरी अंदाज जबरदस्त होता तुझा. " अमोल पावसाकडे पाहत बोलत होता. सगळे आता पाऊस थांबायची वाट बघू लागले.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
खरंच, जोरात सुरुवात झाली पावसाला. त्या पडक्या वाडयात खुप जागा होती. सई, तिचा ग्रुप आणि आकाश .. आतल्या भागात बसले होते. आकाश एका मोठ्या खिडकी समोर बसून पाऊस बघत होता. सईचे मित्र-मैत्रीण थोडा वेळ आराम करत बसले होते. सई , स्वतः काढलेले फोटो बघत बसली होती. नंतर तिने त्या पडक्या वाडयात फोटो काढायला सुरुवात केली. एका क्षणाला तिने कॅमेरा आकाशकडे रोखून धरला. मोठया खिडकीतून प्रकाश आत येतं होता. आकाश टक लावून बाहेरच्या पावसाकडे पाहत होता. थोडासा काळोख होता तिथे. बाहेर पाऊस आणि त्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात आकाश वेगळाच भासत होता. चांगला फोटो मिळाला सईला. थोडावेळ त्याच्याकडे पाहत बसली. काय life असेल ना याची.. नुसतं भटकत राहायचं. घरी कोण... फॅमिली कोण... काही नसेल का याला. अचानक तिचं लक्ष आकाशच्या सामानाकडे गेलं. ट्रेकिंगची सॅक... आणि त्याहीपेक्षा.. एक तुटलेला कॅमेरा... जरा कुतूहल वाटलं तिला. त्याच्याजवळ आली. " excuse me... भटक्या... हा कॅमेरा... तुझा आहे का.. " आकाशचं लक्ष सईकडे गेलं. कॅमेरा हातात घेतला. " माहित नाही मला... जेव्हा पासून फिरतो आहे.. सोबतच आहे माझ्या.. " आकाशने कॅमेरा जवळ घेतला. " पण हा तुटलेला , बिघडलेला आहे.. " सई बोलली. त्यावर आकाशने एक छानशी smile दिली आणि समोरच्या पावसाकडे पाहू लागला. सई त्याच्याकडेच कितीतरी वेळ बघत राहिली..
" तू दाखवशील ना आम्हाला... तुझ्यावर भरवसा ठेवून आम्ही थांबलो आहे... " सई खूप वेळाने बोलली.
" पण मी भटकत असतो... तुम्ही फिरणार का तेवढे .. ",
" हो... नाही थांबणार कधी... फक्त फोटो क्लीक करायचे आहेत खूप सारे... बघ ना.... फोटोग्राफी करायला आलो आणि पावसाने गाठलं आम्हाला...",
" फोटोग्राफी करायची आहे ना.. चला ना मग, आता थांबेल पाऊस... " आकाश त्याची सॅक घेऊन उभा राहिला... " मी घेऊन जाईन तुम्हाला .. फक्त माझं, मी सांगीन तसं वागायचं... " ,
" हो... ते ठीक आहे... पण पाऊस तर पडतोच आहे आता... कॅमेरा भिजणार ना... " ....सई.
" १० मिनिटात थांबेल... " बाकीचेही जागे झालेले. एकाने लगेच घड्याळात time लावला. खरंच १० मिनिटांनी पाऊस थांबला.
" आप क्या भगवान हो... पहिले भी बताया आपने बारिश होगी.... हो गयी... अभी बोले १० मिनिट मे बंद होगी... हो भी गयी बंद... कैसे... " एकाने कुतूहलाने विचारलं. त्यावर सुद्धा कधी बोलला नाही आकाश..
" माहित नाही... पण समजते मला. चला जाऊया आता.. तुम्हाला फोटो काढायचे आहेत ना.. " तसे सगळे त्याच्या मागोमाग निघाले.
" जास्त दूर जायची गरज नाही.. इथूनच एका ठिकाणी छान फोटो मिळतील. " आकाश बडबत चालत होता. त्याच्या मागोमाग सई आणि तिचा ५ जणांचा ग्रुप ... पुढे चढण होती जरा. सईचं लक्ष आजूबाजूला होतं. छान !! म्हणजे हा उंच जागी घेऊन जातो आहे तर...
" लहानसा डोंगर आहे... इथे एक-दोनदा येऊन गेलो हल्लीच... छान दिसते इथून सर्व.. " आकाश बोलत एकटाच पुढे गेला. सई त्याच्या मागे होतीच.. एक लहानशी भिंत असावी असा एक मोठा खडक होता उभा समोर.. त्याच्या एका बाजूने आकाश पुढे गेला. मागोमाग हे सर्व.. आणि एका क्षणाला सई जागच्या जागी स्थब्ध झाली.
समोर हिरवं -हिरवं गवत.. अगदी ढोपरापेक्षा हि उंच... जमिनीवर तरी तेच होतं सगळीकडे... आणि समोर... बरोबर समोर , आणखी एक डोंगर दिसतं होता... परंतु थोडा दूर होता. त्याच्या आजूबाजूला पांढरे ढग ,प्रवास करत होते. त्याचं वरचे टोक तेव्हढं दिसतं होतं. सारे ढग त्याच्या बाजूने जात होते... पांढरी शुभ्र नदी जणू काही... त्याला चिटकून , तर कधी त्याच्या माथ्याला स्पर्श करत पुढे निघाले होते. सईला समोर काय आहे त्यावर विश्वास नव्हता. आकाश एका जागी उभा राहिला. सईचे बाकी मित्र पटापट फोटो काढत होते. पण सई ... अजूनही ती भानावर आली नव्हती. समोर आहे ते खरं आहे का ... "आ" वासून ती कधीची बघत होती ते.
" ओ मॅडम.. फोटो काढून घ्या... " आकाश खाली बसत म्हणाला. " हो... हो..." म्हणत सई जागी झाली. पुन्हा तेच समोर द्रुश्य... ढोपराएवढं हिरवंकंच गवत .. पायाखाली जमीन नसावी एवढं गच्च .. समोर unbelievable गोष्ट.. नदीचं होती ती ढगांची... इतके ढग... मानलं पाहिजे या निसर्गाला.. सईची फोटोग्राफी सुरु झाली. मन भरेपर्यंत फोटो काढून झाल्यावरच सर्व त्या गवतात बसून समोरच जग बघू लागले.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
पाऊस तर थांबला होताच. शिवाय, त्या मंदिरातील पुजारी बोलले होते ना. आजचा दिवस थांबा गावात, भटक्याच्या खुणा मिळतील. तर कोमलनेच सगळ्यांना " थांबूया" असं सांगितलं. राहण्याची सोय करायला हवी. म्हणून सगळ्यांनी तंबू बांधायला सुरुवात केली. अमोल तर पुस्तकात काय लिहिलं आहे ते वाचत होता... पहिल्यांदा तंबू हा प्रकार त्याने घेतला होता ना सोबत. कोमल आणि अमोल सोडले तर बाकीच्या ग्रुपने तंबू उभे केले सुद्धा.. दोघेही त्या सर्वांचा वेग बघून अवाक झाले.
" कसं काय जमलं तुम्हाला.. " अमोलने संजनाला विचारलं.
" मी बोलले होते ना... सवय आहे आम्हाला फिरायची, त्यात हि सुद्धा सवय आहे.. " ,
" मग या सुप्रीला सुद्धा येतो का tent बांधायला. " अमोल सुप्रीकडे पाहत बोलला.
" येतो आणि चांगला उभा करते मी tent .. तुम्हाला येतं नाही तर दुसऱ्यांना हि येतं नसेल, असं वाटते का तुम्हाला... " सुप्री वेडावत म्हणाली.
" हो... " .....अमोल..
" मी दाखवीन , एकदाच... शिकून घेयाच... परत परत कोणी दाखवणार नाही.. समजलं ना .. " सुप्री पुढे गेली पटापट. जस आकाशने दाखवलं होतं .. अगदी तसंच , तिने पटापट तंबू उभा केला अमोलचा. पुन्हा चकित केलं अमोलला तिने. अमोलच तोंड उघडं... " तोंड बंद करा.. माशी जाईल तोंडात.. " सुप्री हसत मागे आली. अमोलला ओशाळल्यागत झालं. " थँक्स !! " अमोल चट्कन आत शिरला.
" मला वाटते, सर्वांनीच आराम करायला हवा... ".... कोमल...
" चालेल.. " सगळेच दमलेले होते प्रवासाने..
" मी जरा गावात फिरून येते... " कोमल निघून गेली गावात.
पावसाच्या पाण्याने ... धुवून निघालेल्या वाटा... मधेच डांबरी रस्ता... पाण्याने तर कसा चमकत होता. दूरवरून बैलगाडी येतं होती. त्यांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दूरवर येतं होता. कोमल त्याकडेच बघत होती तर मागून सुप्री-संजना येताना दिसल्या. " तुम्ही ... आराम करायचा ना.. " कोमल संजनाकडे पाहत म्हणाली. " नको... प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे इथे... " संजना बोलली. सुप्री अजूनही नाखूष होती. तरी संजनामुळे आली होती. तिघी फिरू लागल्या गावात. गाव जागं झालं होतं. सगळेच आपापल्या कामात गुंतले होते. शेतच्या शेतं पसरली होती एका बाजूला. गायी- बकऱ्या चरायला निघाल्या होत्या. काही बायका पाण्याची कळशी - हंडा कमरेवर , डोक्यावर घेऊन निघाल्या होत्या. सूर्य बऱ्यापैकी वर आलेला आणि दिसत होता... त्याचा आणि ढगाचा लपाछपीचा खेळ सुरु होताच. थंड वारा वाहत होता. सुप्री खूप दिवसांनी हे अनुभवत होती ना. बरं वाटलं तिला. शेजारीच नदी किनारा होता. या दोघीना सोडून एकटीच सुप्री तिथे निघाली.
आभाळ आता काही ठिकाणी मोकळं झालं होतं. पावसाच्या ढगांची ये-जा सुरु होतीच. दुपारचे १२ वाजत आले तरी म्हणावा तसा उजेड नव्हता. परंतु छान थंड हवा सुटली होती. नदी किनारा बऱ्यापैकी मोठा , पसरलेला होता. पावसाने आवरतं घेतलं म्हणून काही जणी नदीवर पाणी भरायला आलेल्या होत्या. सुप्रीने आजूबाजूला नजर फिरवली. समुद्र वाटावा इतकं भव्य रूप नदीचं. नदीचा दुसरा किनारा म्हणजे दुसरं गावं. असा अंदाज लावला तिने. कारण त्या दुसऱ्या किनाऱ्यावर काही घरं दिसत होती. नदी किनारी थोडीफार हिरवळ. आताच मासेमारी साठी निघालेल्या दोन-चार होड्या. काही ठिकाणी गायी-म्हशी अंघोळ करताना दिसल्या. सुंदर वातावरण. सुप्री तिथेच एका दगडावर बसली. मागोमाग कोमल,संजना आल्या. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. फक्त त्या निसर्गाशी एकरूप होता होते का ते पाहत होते सर्व. या तिघींना बघून , जवळपास त्याच्याच वयाची मुलगी त्याच्याजवळ आली.
" तुम्ही शहरातून आला आहात का .. " तिने विचारलं.
" हो.. "... संजना.
" तुम्ही इथे का बसला आहात मग.. कपडे खराब होतील तुमचे... ",
"असं काही नाही.. चालते आम्हाला.. " कोमल बोलली तशी ती हसली. " एक सांग मला.. गावात विहिरी आहेत ना.. मग हे नदीचं पाणी , तेही आता गढूळ आहे... ते का पिता तुम्ही... " संजनाने विचारलं.
" ते पाणी पिण्यासाठी नाही... धुणी-भांडी करण्यासाठी घेऊन जातो आहे.. पिण्यासाठी विहिरीचं पाणी वापरतो... पाणी वाचते ना असं, भटक्याने सांगितलं आम्हाला.. "....... 'भटक्या' हे नावं ऐकलं आणि पुन्हा त्याची आठवण झाली.
"बरं झालं आठवण झाली त्याची.. तो कुठे गेला माहित आहे का... त्यालाच शोधतो आहे आम्ही.. " ..कोमल..
" तो कुठे जातो कोणाला माहित नाही.. काही काम असलं तर नाहीतर भूक लागली कि यायचा.... पण खूप चांगला माणूस तो, गावात किती छान कामं केली त्याने... सुधारलं गावं त्याने.. आणि एक दिवस निघून गेला.. " ,
" ते पुजारी बोलले कि काही खुणा ठेवतो मागे तो ... ते काय आहे नक्की... " संजना...
" ते काय ... चला " तिच्या मागोमाग कोमल आणि संजना निघाल्या. सुप्रीला काहीच इंटरेस्ट नव्हता या गोष्टीत. ती फक्त ऐकत होती.
एका ओबड-धोबड , रंगहीन मूर्ती पाशी घेऊन आली ती. " हे, त्या भटक्याने बनवलं आहे. " ,
" गणपणी ? .... तो काय मूर्तिकार आहे का.. " कोमलने चट्कन एक फोटो काढून घेतला.
" माहित नाही... पण हे त्यानेच बनवलं आहे... गणपतीचा आकार येई पर्यंत बनवतो मूर्ती.. आणि खाली काही कोरून सुद्धा ठेवतो. ",
"काय ? " ,
" इथे खाली काही कोरून ठेवलं होतं. पण तो दगडच काही दिवसापूर्वी तुटला. " कोमलने पाहिलं. मूर्तीखाली दगडावर " मा.. " हा एकच शब्द दिसतं होता. बाकीचा दगड तुटला होता.
" हे असं ... तो ज्या गावात जातो ना... तिथे करून ठेवतो.. मागच्या गावातल्या माझ्या मैत्रिणींनी अशीच मूर्ती बघितली आहे त्याच्याकडे... असं का करतो ते माहित नाही. " हे सर्व झाल्यावर कोमल,संजना सुप्री जवळ आल्या.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
" मराठी छान बोलतोस तू .. म्हणजे इथला या गावातला वाटतं नाही " सईने मागूनच आकाशला विचारलं. अजूनही ते त्या डोंगरावरच बसलेले होते.
" Actually, मला माहीतच नाही मी कुठला आहे ते... " आकाश तिच्याकडे न बघताच बोलला.
" अरे व्वा !! इंग्लिश शब्द सुद्धा माहित आहे का .. very good .. पण नक्की राहतोस कुठे तू... " ,
" सांगतो, आता पुढे जाऊया. तुम्ही तुमच्या वाटेने... मी माझ्या वाटेने.. " ,
" अरे !! आम्हाला आणखी फोटो काढायचे आहेत.. असा कसा जातोस सोडून.. by the way... कुठे निघाला आहेस.. ",
" माहित नाही... पाय जातील तिथे... चला निघूया.. पावसाला सुरुवात झाली कि अवघड होईल उतरणे. " आकाशचं बोलणं बरोबर होतं. म्हणून सईचा ग्रुप त्याच्या मागोमाग खाली उतरला.
" आज राहण्याची सोय कुठे करावी... गावात तुझी ओळख असेल ना.. " सईने हळूच विचारलं त्याला.
" मी गावात राहत नाही जास्त. या पाठीवरच्या बॅगमध्ये एक तंबू आहे. त्यात राहतो कधी नाहीतर हे आहेत ना पडके वाडे, किल्ले... त्यात जाऊन रात्रीचा झोपतो... दिवसा फिरत असतो... तुमच्याकडे नाहीत का तंबू वगैरे. " आकाशने उलटं प्रश्न केला.
" आहेत... आणले आहेत.. पण कसे उभं करतात ते माहित नाही.. तुला येते ना... करशील मदत.. " सईने विनंती केली.
" करिन... मला येते ते .. पण आधी एका सपाट जागी जाऊया. कारण ते आताच उभे केले पाहिजे. नंतर संध्याकाळ झाली तर पुन्हा अडचण... इथे गावात आणि पावसाळ्यात तरी काळोख लवकर होतो. शिवाय पाऊसहि सुरु होईल एका तासाने... तर " ,
" how he knew that ?? " एका मुलीने कुतूहलाने विचारलं. सगळे खाली उतरत असताना गप्पा मारत होते.
" पाऊस आणि मी... कधी पासून एकत्र आहे माहित नाही... पावसातल्या गप्पा... वेगळ्याचं असतात ना !! कधी कधी काय बोलतो , कोणाशी बोलतो तेच कळत नाही पावसात. पावसाचा आवाज कानात घुमायला लागला कि वारं भिनते अंगात. घोड्यासारखं उधळून धावावे, वाऱ्यासोबत शर्यत करावी असं वाटून जाते कधी नाही ते. पावसाच्या थंड थेंबाचा स्पर्श झाला कि भलतीच शिरशिरी येते अंगात. जसा जसा पावसाचा जोर वाढत जातो, तसा तसा "तो" अंगात भिनतो नुसता. मग कोणाचं का ऐकावं.. सैरावैरा पळू लागते मन, शरीराच्या पुढे धाव घेते मन. पावसाच्या कविता , चारोळ्या, कथा... सगळं सगळं... कसं ओसंडून वाहू लागतं मनातून... डोळ्यातून, मनातून , अंगा-खांद्यावरून, चहाच्या पेल्यातून, पागोळ्यातून, डबक्यातून, चिखलातून, तुटक्या छत्रीतून ... फक्त आणि फक्त "पाऊस" च बाहेर येऊ लागतो. मीही मग स्वतःला थांबवत नाही...त्यात मिसळून जातो ... आणि एका क्षणाला , मी स्वतःच पाऊस होऊन जातो... " आकाश छान बोलला. बोलता बोलता कधी खाली आले ते कळलंच नाही...
" एक मिनिट !! " सईने थांबवलं आकाशला. " तिने तर इंग्लिश मध्ये प्रश्न केला ना... मग तुला कसं कळलं ते... तुला फक्त इंग्लिश शब्दच नाही ... तुला पूर्ण इंग्लिश कळते ना... सांग ना.. कळते ना.. " सईची उत्सुकता वाढली.
" हो... सांगतो.. पहिलं तंबू उभारून घेऊ... " आकाशने त्याच्या सॅक मधून तंबू बाहेर काढला. आणि पुढच्या १० मिनिटांत उभा राहिला सुद्धा तंबू. बाकीचे तर तंबू बाहेर काढतच होते अजून.
" superman आहेस का तू... " सई हसत म्हणाली.
" येतो पट्कन मला उभा करता.. एक काम करूया.. दुपार झाली आहे.. मी खाली गावात जाऊन काही जेवणास मिळते का ते बघतो... पाऊस येण्याआधी... तोपर्यंत तुमचं होईल असं वाटते... " आकाशने बॅग पाठीवर लावली. आणि हसत हसत निघून गेला. सई आणि तिचे मित्र तंबू उभे करण्यात गुंतले.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
" अगं सुप्री... काय बसून आहेस नुसती... काम कर जरा... " आकाशने तिला दुरूनच आवाज दिला. आकाश पाण्यात उभा होता. सुप्री किनाऱ्यापाशी बसून होती कधीची.
" मला हाक मारतो आहेस का... " सुप्रीने उलट प्रश्न केला. हातातली पाण्याची बाटली त्याने एका ठिकाणी ठेवली आणि आकाश पाण्याबाहेर आला.
" या नदीच्या दोन्ही बाजूंना बघ आणि कसं वाटते ते सांग. " सुप्रीने पाहिलं.
दूरवर पसरलेला किनारा. एका ठिकाणी , किनाऱ्याला लागलेली तुटकी होडी... त्यावर बसलेले दोन - चार कसलेशे पक्षी... दुसऱ्या बाजूला , नजर जाईल तोपर्यंत झाडं-झुडुपं.. किनाऱ्यावर लहानशे दगड सगळीकडे.. आणि थंड हवा.
" किती छान वाटते ना इथे... शांत शांत.. " सुप्रीला शहारून आलं.
" हो ना... मग आपल्या दोघांशिवाय कोणी आहे का इथे.. संजना आणि बाकीचे कधीच गेले ना.. ",
" हो... माहित आहे मला... ",
" आणि सुप्री तुझंच नाव आहे ना...मग कसले फालतू प्रश्न विचारतेस... पाणी भरायचं आहे.. चल ना लवकर... " आकाश पुन्हा पाण्यात जाऊ लागला.
" बस ना रे.. जरा शेजारी.... कुठे वेळ मिळतो आपल्याला आता... किती छान वातावरण आहे ना... त्यात तुला कामाचं पडलंय ... गणू शप्पत नाही देणार त्रास... प्लिज बस ना खाली... " आकाश तिच्या शेजारीच बसला. सुप्री त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली. किती वेळ तसेच बसून होते दोघे..
" सुप्री... सुप्री... झोपलीस का... सुप्री... " आकाशने आवाज दिला. सुप्री भानावर आली. समोर तसाच नदीकिनारा.. फक्त हाक मारणारी संजना होती. आकाशच्या आठवणीत गेलो होतो आपण. सुप्रीच्या लक्षात आलं. त्याचवेळेस तिला विजेचा अस्पष्ट असा आवाज आला तिला. दुपारचे १२ वाजून गेलेले, तरी दूरवरून काळे ढग येतं असल्याने काळोख होतं होता. पुन्हा पावसाची चाहूल लागलेली. " चला निघूया... पाऊस सुरु होईल परत.. " सुप्री बोलली. आभाळात पाहिलं. " अर्धा-पाऊण तास आहे आपल्याकडे... तोपर्यंत जेवणाची व्यवस्था करायला हवी. " सुप्रीनेच पुढाकार घेतला. थोडेच पुढे आले असतील. एक जोडपं उभं होतं बोलत. त्यांच्या बाजूनेच गेल्या तिघी. अचानक सुप्री थांबली. त्या दोघांजवळ आली.
" एक मिनिट !! तुम्ही काहीतरी बोललात ना हिला... " त्या मुलाकडे पाहत सुप्री बोलली.
" अहो... काही वाईट नाही बोललो... स्तुती करत होतो तिची... " मुलगा घाबरला.
" तसं नाही... तुम्ही एक वाक्य बोललात पावसाबद्दल.. ते ऐकून थांबली मी.. " ,
" काय झालं सुप्री... हा बोलला का तुला काही... " संजना त्या मुलाकडे रागात बघू लागली.
" नाही ताई... खरंच मी काही बोललो नाही यांना.. " सोबतची मुलगी हि घाबरली.
" अरे !! ... पावसाबद्दल काय बोलतात तुम्ही.. ते सांगा.. " सुप्री भरभर बोलली.
" काही नाही... हि नवीन आहे इथे.... तिला पाऊस बघायचा होता म्हणून आणलं. " ,
" हो.. मग काहीतरी बोललात ना तिला... ते ऐकलं म्हणून थांबली मी. ".... सुप्री.
" हो.. पाऊस बघितला आहेस का कधी... हे असं एवढंच बोललो. " त्या बोलण्यावर सुप्रीचा चेहरा विचारात पडला.
" याचा अर्थ माहित आहे का तुम्हाला.. " सुप्रीचा पुढचा प्रश्न.
" हो... तो काय पाऊस येतो आहे दुरून... इथे पाऊस नाही आणि तिथे पाऊस... दोन ऋतू एकाच वेळेस... " सुप्रीने वळून पाहिलं. खरंच तसं होतं. त्या उभ्या होत्या तिथे थोड़ का होईना ऊन होते, आणि दूरवर पाऊस येताना दिसत होता.
" काय झालं सुप्रिया.. " कोमलने विचारलं. सुप्री वेगळ्याच विचारात.
" हे तुम्हाला माहित होतं का ... कि कोणी सांगितलं " सुप्रीची अवस्था वेगळी झाली होती. तो मुलगा आणखी घाबरला.
" सांगा ना... कोणी सांगितलं हे सर्व... " सुप्रीचा आवाज जड झालेला.
" तो भटक्या आलेला ना गावात... तो बडबड करायचा असंच काही... एकदा त्याला विचारलं काय असते ते... तेव्हा आम्हा पोरांना घेऊन त्याने असं दाखवलं होतं. आणि बोलला, असा बघायचा असतो पाऊस.. " एवढा वेळ धरून ठेवलेले अश्रू मोकळे केले सुप्रीने. कोमल , संजनाने तिला एका बाजूला आणलं.
" काय झालं अचानक रडायला आणि त्याला एवढं काय विचारत होतीस. " संजना....
" आकाश !! " सुप्रीच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला.
" काय ? ".... कोमल..
" हे असं संभाषण फक्त आकाश आणि माझं होतं... 'पाऊस बघायला' तोच घेऊन जायचा मला... त्याच्याशिवाय असा विचार कोणीच करू शकत नाही. " सुप्री रडतच बोलत होती.
" म्हणजे भटक्या हाच आकाश आहे ... असं वाटते का तुला... " ....कोमल
" माहित नाही... पण वाटलं क्षणभरासाठी.. " सुप्रीने डोळे पुसले. " चला... जेवणाची तयारी करायची आहे ना... चला पाऊस येण्याआधी.. " पटापट निघाल्या तिघी. सुप्री-संजना मिळेल ते खाद्य घेऊन निघाल्या. कोमल , भटक्या संबंधी आणखी माहिती मिळते का ते बघायला पुढे गावात गेली.
" excuse me.... आज काय उपवास आहे का.. जेवणात काय fruits खायचे का... " अमोलने या दोघींनी आणलेल्या फळाकडे पाहत comment केली.
" काय पाहिजे होते... ऑर्डर देयाची ना आधी... " सुप्री वेडावत बोलली. आजकाल, मूड बदलायचं बटन सापडलं होतं तिला. काही क्षणापुर्वी डोळ्यातलं पाणी पुसरणारी सुप्री पुन्हा नॉर्मल झालेली.
" काहीही चाललं असतं मला .. तिखट पाहिजे होतं जरा.. " अमोल बोलला तसा तिला त्यांच्या पहिल्या भटकंतीची आठवण झाली. आकाशने असंच विचारलं होतं ना सगळ्यांना. आठवणीने हसायला आलं तिला. आवरलं लगेच.
" आहे ते खा... नाहीतर तुम्ही जाऊन आणा. बघ रे गणू... कशी असतात माणसं... " सुप्री हसत म्हणाली.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
बघता बघता संध्याकाळ झाली. दुपारचं जेवण आणि आराम, पावसासोबत झालं. संध्याकाळी पाऊस थांबला आणि सूर्य घरी निघाला.सकाळ पासून पडून पडून पाऊसही थकला होता. आकाश तंबू बाहेर बसला होता. सई कॅमेरा घेऊन बाहेर आली. अजूनही थोडा प्रकाश होता. संध्याकाळचे काही फोटो टिपले तिने.
" किती शांतता आहे ना... कसली धावपळ नाही, घाई नाही. घड्याळात बघून कामे नाहीत... कोणाला कसले रिपोर्ट देयाचे नाही... कसली deadline नाही... काही काहीच नाही. फक्त शांतता. " सईच्या अंगावर रोमांच उठले बोलताना.
" असंच पाहिजे ना आयुष्य. या सर्वाकडे पाहिलं कि वाटते इथेच रहावं. याकडे बघितल्यावर कळते, हि माणसं एवढी जास्त वर्ष कशी जगतात ते... खरंय ना.. " आकाशने स्वतःचा विचार सांगितला.
" तुझं काय ... कुठे राहतोस तू.. असा भटकत का असतोस.. " ,
" माहित नाही.. एवढं तर नक्की आहे कि मी गावातला नाही.. पण शहरातला असतो तर तिकडची लोकं एकदा तरी आली असती ना मला बघायला. "..... आकाश .
" म्हणजे??..... तुला आठवतं नाही तुझी फॅमिली ... कुठे राहतं होतास ते ... " सईने भरभर विचारलं.
त्याने एक नजर सईकडे बघितलं. पुन्हा समोर पाहू लागला. संध्याकाळ झालेली ना... सूर्यास्थ होतं होता. पक्षी घराकडे निघालेले.. गावकरी पुन्हा घराकडे परतत होते.
" मी एका नावाड्याला सापडलो.. जंगलात , नदी किनारी कुठेतरी... त्याने तिथेच राहणाऱ्या आदिवासी कडे सोपवलं मला. त्यांनी सांगितलं, ३ दिवस बेशुद्ध होतो... नदीतून वाहून आलेलो असं बोलले ते.. इथे कपाळावर जखम होती... त्यांनीच उपचार वगैरे केले. १० दिवस होतो त्या आदिवासी पाड्यात.. " ,
" मग तू नक्की कुठून आलास .. ते नाही माहित तुला ? " ,
" नाही आठवत काही.. काही वस्तू होत्या बॅगमध्ये, त्या पाड्यातील लहान मुलं घेऊन गेली मी बेशुद्ध असताना.. कागदाच्या वस्तू , पेपर्स .. पाण्यात भिजून खराब झाले.. बॅगमध्ये उरले ते फक्त कपडे आणि हा तंबू... त्याचा त्यांना काही उपयोग असता तर तेही घेऊन गेले असते.. " आकाश हसला त्यावर स्वतःशीच..
" हा कॅमेरा माझ्या गळ्यात होता असं बोलले ते. तो पण तुटलेला आणि बिघडलेला आहे. काय कळणार त्यातून.. " आकाशने सांगून टाकलं.
" तुला काहीच कसं आठवतं नाही.. " ,
" त्या आदिवासी पाड्यातील वैदू बोलला, स्मृती भ्रम झाला असेल. काही काळासाठी स्मृती नष्ट होते तशी. कशी ते माहित नाही... पण खूप प्रयन्त केला आठवायचा. धुरकट आठवते काही.... गणपती आठवतो, ' माझा गणू ' असं बोलायचं कोणीतरी... ते आठवते.. आणि एका मुलीचा चेहरा आठवतो... चष्मा लावणारी, गालावर खळी.. सुंदर हसणारी.. बडबड करणारी ... सतत हसणारी अशी एक मुलगी आठवते.. पुसट अशी आठवण... कधी कधी स्वप्नांत सुद्धा येते. नावं आठवत नाही काही.. तिला शोधलं पाहिजे म्हणून निघालो. गेल्या १०-११ महिन्यात किती फिरलो मी , ते मलाही माहित नाही. तशी कोणी दिसते का ते बघण्यासाठी. नाहीच भेटली. मग या गावा -गावातून फिरल्यावर समजलं... किती जुन्या काळात जगतात हे अजून.. काही गोष्टी सांगिल्या यांना... त्यांनीही सुधारलं पाहिजे म्हणून मदत करतो...निसर्गाची काळजी घेतली कि तो आपली सुद्धा काळजी घेतो , हे समजावून सांगितलं त्यांना... ऐकतात सगळेच... छान वाटते. भटकत असतो म्हणून भटक्या .... नाहीतर माझं नावं सुद्धा लक्षात नाही माझ्या.... एवढा फिरलो आहे ना, सगळेच ओळखतात आता इथे...पण मला जी लोकं हवी आहेत ते सगळे कुठे आहेत तेच कळत नाही. " आकाश छान बोलत होता. सईला मात्र वाईट वाटलं ते ऐकून.
" पण आता वाटते, हेच आयुष्य छान आहे. देवाची कृपा किती बघा. सर्व आठवणी पुसून टाकल्या. मी भटकायचो आणि तो चेहरा , तेव्हढा ठेवला डोक्यात. त्यात पावसाबद्दलच प्रेम सुद्धा तसंच आहे. आधी भिजायचो का माहीत नाही... पण आता पाऊस आला कि असं वाटते तो काहीतरी सांगतो आहे मला. म्हणून सारखा बघत बसतो त्याला. असो, एव्हाना माझी माणसं मला विसरून सुद्धा गेली असतील ना... मग हे असं जीवन का नाही आवडणार मला. सोबतीला आहेच ना हा निसर्ग.. नाहीतरी कुठे कोणाकडे वेळ असतो सध्या.. या निसर्गात आलो ना... कि मोकळं वाटते... त्याच्याकडे खूप वेळ असतो माझ्यासाठी... सोबतीला पाऊस आहेच.. खूप वर्ष एकत्र आहोत आम्ही असं आतून वाटते. म्हणून ते कळतो ना पाऊस मला. " आकाश स्वतःमधेच गुंतला बोलताना.
" मग .. त्या आठवणी.. त्या परत येतील का... " ...सई..
" माहित नाही.. एका गावात हॉस्पिटल होतं... तिथे जाऊन विचारलं ते एक डॉक्टर बोलले... ओळखीच्या व्यक्ती , जागा... वस्तू जर समोर आल्या तर आठवेल मला सगळं. तेव्हाच तेव्हा बघू.. " आकाशने सईकडे बघितलं. डोळ्यात पाणी दिसलं तिच्या.
" काय झालं.. ? " ,
" काही नाही... असंच काही आठवलं म्हणून पाणी आलं डोळ्यात.. " सईने डोळे पुसले.
" हेच.. आठवणी फक्त डोळे ओलं करायची कामे करतात. मलाही आलं असत रडायला कधी , पण त्या आठवणीच नाहीत माझ्याकडे.. आहेत त्याही मोजक्या , छान अश्या... जुन्या आठवणी काढायच्या कशाला... एवढं सगळं छान असताना रडत बसायचा... तेही मागे घडून गेलेलं आठवून... नाही पटतं मला. म्हणालं तर आतातरी या जगातला सर्वात सुखी माणूस मीच आहे... नाही का " आकाश हसत म्हणाला.
" हो " सई सुद्धा हसली.
" एक काम करूया आता.. आज रात्री इथेच थांबु.. उद्या पहाटे निघूया... खाली गावात जाऊया.. मंदिर आहे छानसं.. फोटो काढण्याइतपत छान आहे मंदिर... जेवणाची सोया सुद्धा होईल मंदिरात.. चला निघूया.. " सईने बाकीच्याना जमवलं आणि आकाश सोबत निघाले.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
"hi सुप्रिया .. कशी आहेस.. " अमोल सुप्री जवळ बसत म्हणाला.
" मला काय झालंय ... गणूने आतापर्यंत छान ठेवलं आहे मला.. " ,
" तसं नाही... आपलं बोलणंच झालं नाही ना सकाळ पासून.. आता बघ, रात्र सुद्धा झाली. दिवसभर तू फिरत होतीस.. आणि मी इथे.. " ,
" अरे मग यायचे ना माझ्यासोबत फिरायला... बसून काही मिळत नाही... आणि मी काही celebrity आहे का माझ्या बरोबर बोलायला " ,
" बाकीच्यांचे माहित नाही... but तू special आहेस माझ्यासाठी... " ,
" हो का.. ",
" हो तर... एवढ्या मुली बघिल्या... तुझ्या सारखी तूच... अशी कोणी दुसरी नसेल.",
" माझ्यासारखी म्हणजे... पागल ना... डोक्यावर पडलेली.. " ते ऐकून केवढयाने हसला अमोल.
" नाही गं.. तुझं बोलणं कसं छान असते.. तुझ्याशी बोलत राहवं आणि तुला ऐकत रहावं असं वाटतं राहते नेहमी. त्यात तुझा स्वभाव ... किती छान तोसुद्धा... सारखी हसत असतेस आणि हसवत असतेस.. तुझी smile ते वेडं लावते.. इतकी गोडं... " ,
" अरे बाबा .. इतना लाजवो मत... !! " सुप्रीने चेहरा झाकून घेतला हाताने. दोघांचं बोलणं सुरु असताना बाकीचे हि सामील झाले त्यांना. एकाने लाकडं जमवून आणली होतीच. शेकोटी पेटवली. छान गप्पा सुरु झाल्या सगळ्यांच्या. नंतर गाणी सुरु झाली. सारेच आपल्या धुंदीत मज्जा करत होते. गाणी गात होते. सुप्री थोडावेळ होती त्यात. नंतर कोणाचं लक्ष नाही बघून जागेवरची उठली. थोडी दूर आली सर्वापासून. तिथूनच एका जरा उंच ठिकाणी जाऊन बसली एकटीच. अमोलला दिसलं ते. तिच्यामागे जाण्यास निघाला तर संजनाने अडवलं तिला.
" थांबा अमोल सर, तिची सवय आहे जुनी.. एकटीच बसते काही आठवतं... अश्यावेळी कोणी नको असते तिला.. मीही नाही... " ,
" अरे पण रात्र झाली आहे.. आणि ती एकटीच.... " अमोल काळजीने बोलला.
" राहू दे सर.. बोलली ना.. सवय आहे तिची... आणि ती आल्याशिवाय मी जाणार नाही झोपायला.. तुम्ही जाऊन झोप सर्व.. "
अमोल सुप्रिकडे पाहत होता... खरंच , कुठेतरी दूर पाहत होती सुप्री. कोमलने सुद्धा " उद्या लवकर निघू.. " असं सांगितल्यावर सगळेच झोपायला गेले. संजना तेवढी राहिली बसून शेकोटी जवळ.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
आकाशने सवयीप्रमाणे ,पट्कन शेकोटी पेटवली. खाली देवळात काही छान फोटो मिळाले शिवाय भरपेट प्रसाद सुद्धा मिळाला. थोडा वेळ गप्पा मारून सगळे झोपायला गेले. आकाश जागाच... आकाशला एकट्याला बघून सई बाहेर आली तंबूमधून.
" झोप नाही येतं का तुला... " आकाशने बघितलं तिच्याकडे..
" या बसा.... असं आभाळ कुठे बघितलं आहे का तुम्ही.. " तेव्हा सई बघू लागली वर. खरंच... सौंदर्य काय असते ते हे... चंद्राची अर्धी कोर असुन सुद्धा... जे वर आभाळात दिसतं होते, त्याला कशाची उपमा नव्हती. सई तेच बघत बसली.
" कसा असतो ना निसर्ग... प्रत्येक वेळेस वेगळंच रूपं दाखवतो ना हा.... " आकाश सई कडे पाहत बोलला.
" झोपत नाहीस का तू... " सईने पुन्हा विचारलं त्याला.
" रात्री-अपरात्री झोप येते... मग झोपलो कि पुन्हा तो चेहरा स्वप्नात येतो. माहीत नाही कोण आहे ती... खरी आहे कि माझी रचना... तरी बहुदा रोजच येते ती..हसते छान.. बघत रहावं असं... मग जागं येते पहाटे पहाटे.. ",
" मग शहरात का जात नाहीस... तिथलाच आहेस असं वाटते... " ,
" शहरात ?? .... कोणत्या शहरात जाऊ... ते जाऊ दे.. तुम्ही कर्नाटकच्या ना... मराठी कसं बोलता एव्हढं छान.. " ,
" मी लहानपणी मुंबईत रहायचे. नंतर १०-१२ वर्षाची असताना आम्ही कामानिमित्त कर्नाटकला शिफ्ट झालो. आता सगळे तिथेच राहतात. मी मुंबईत जाते कधी कधी.. म्हणून मराठी येते... तू ना एक काम कर.. मुंबईत जा... तिथे नक्की असेल कोणीतरी... ओळखीचं.. " ,
" असेल का नक्की.. ?? एवढ्या महिन्यात कोणी आलंच नाही. मी तरी कुठे शोधणार माझ्या कुटुंबाला... जाऊ दे.. झोपा तुम्ही... उद्या सकाळी नवीन ठिकाणी घेऊन जातो.. तिथला सूर्योदय छान असतो. " ,
" ठीक आहे.. good night .. !! " म्हणत सई गेली झोपायला. पण आकाशचाच विचार तिच्या मनात.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
" झोपायचं नाही का .... ? "
" एवढ्या लवकर !! आता तर कुठे रात्र सुरु झाली.. " तरुण आहे रात्र अजुनी ... " .... आता कुठे चांदण्या बागडायला लागल्या आहेत... "
" काय आहे नक्की मनात ?? मला झोप येते आहे आणि कोडी कसली घालतोस ... "
" तुला पडलेली कोडी सोडवं ना मग ... जाऊ नकोस ना ... प्लिज !! "
" काय होतेय नक्की ... गणू बघ रे ... काय झालं या वेड्याला ... त्यापेक्षा बोलूयाच नको आपण ... गप्पपणे झोपायला जाशील मग... "
" राग आला का ... राग आला असेल तर भांडलीस तरी चालेल ... बोलणं सोडू नकोस कधी ... तुझी बडबड तर श्वास आहे माझा... "
" नक्की वेडं लागला आहे तुला ... "
" वेडं तर तू लावलंस ना.. पण छान आहे हा वेडेपणा ...हा आयुष्यभर वेडेपणा करायला तयार आहे मला... "
" किती नाटकी बोलायला लागलास हल्ली ... कोणी ऐकलं ना ... दोघांना हि वेडे बोलतील.. लहान आहोत का आपण असा भांडायला... पा... ग... ल.... "
" तुझ्या बरोबर प्रत्येक गोष्ट करायला आवडते ... वेडेपणा सुद्धा चालून जाईल.... फक्त सोबत रहा... तुला दूर जाताना बघायला आवडत नाही मला अगदी... म्हणून सांगतो... नको जाऊस ... थांब जरा... "
" पाऊस सुरू होईल ना रे बाळा !! "
" येऊ दे त्याला हि सोबत .... भिजू...मनातल्या मनात... कोणाला कळणार नाही... नाहीतर तू माझ्या मनातच राहतेस... काय लागते दोन जीवांना... दोन शरीर ना फक्त .... श्वास तर एकच असतो ना .... "
सुप्रीला अचानक आठवलं सगळं. अश्याच एका उंच ठिकाणी दोघेच जागे होते रात्रीचे. छान चांदणं पडलं होतं. आकाश रोमँटिक झालेला होता. हल्ली तो तसाच वागायचा. किती आठवणी होत्या त्याच्या.... सुप्री वर आभाळातील चांदण्या पाहत होती. " आहेस का तू... डोकं सांगते नाही.. पण आत, मनात कुठेतरी वाटते तू असावास अजूनही....येशील का मला भेटायला... तुला जावंसं कसं वाटलं रे मला सोडून.... एकदाही माझा विचार आला नाही का मनात तुझ्या..... सगळ्या जगाला फसवून एकदा तरी ये..... तुला डोळे भरून बघायचे आहे रे ... तुझ्यासोबत पावसात चिंब व्हायचे आहे.... मला अजूनही पाहिजे आहे तुझी सोबत... खरंच नाही त्रास देणार तुला.... सगळं ऐकीन तुझं... प्लिज ... प्लिज ... ये ना परत आकाश... " सुप्रीचे डोळे पाणावले. डोळे पुसून पुन्हा त्या शेकोटी जवळ येऊन बसली.
----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------
आकाश अजूनही त्या शेकोटीजवळ बसला होता. " कोण आहोत आपण... कधीच काढून टाकला होता मनातून हा प्रश्न... या सर्वामुळे पुन्हा आला समोर... कोण असतील माझी माणसं, कुठे असतील.. काय नातं असेल पावसाचं आणि माझं... " माझा गणू ", ... माझाच आहे कि कोणा दुसऱ्याचा... आणि तो चेहरा, सतत आठवण्याचा प्रयन्त करतो मी.. कोण असेल ती, काय अस्तित्व असेल माझं.. " स्वतःशीच विचार करत होता आकाश. दूरवर नजर गेली त्याची. या डोंगरावरच्या मिट्ट काळोखात आग दूरवर दिसत होती. कुठेतरी दूर डोंगरावर अशीच कोणीतरी आग पेटवली असावी. हे दोन डोंगर एकमेकांपासून खूप दूर होते. या दोघामध्ये पसरलं होतं विस्तीर्ण जंगल... गावे आणि एक मोठी नदी... दोन्ही बाजूला , दोन वेगळ्या दिशांना दोन डोंगर...फक्त काळोखामुळे आकाशला ती शेकोटी, धूसर तरी दिसत होती. काय माहित , कोणीतरी असेल माझ्यासारखाचं... भटक्या... त्यालाही झोप येतं नसेल.. कोणाला तरी शोधतं असेल... त्याचीही जवळची माणसं हरवली असतील का.. कि कोणी आपल्या माणसाला शोधायला आली असतील... आकाश स्वतःशीच हसला...... गणू... त्याला तरी भेटू दे त्याची माणसं... आकाशने आभाळाकडे पाहत हात जोडले. शेकोटी विझवली. पाऊस तर नव्हता , आजची रात्र कोरडीच असेल... अंदाज.... बसल्या जागीच जमिनीवर अंग टेकलं त्याने... थोड्याश्या धूसर आठवणी, तो चेहरा आणि ताऱ्यांनी भरलेलं आभाळ, बघत तसाच पडून राहिला.
-------------------------------------------------------------------- to be continued