" मुबारक हो…. मुबारक हो…. " अझर ऑफिसमध्ये ओरडतच आला. सगळं ऑफिस उभं राहून त्याच्याकडे बघू लागलं. संदेश त्याच्याकडेच बघत होता. आता तर बरा होता हा… काय झालं अचानक याला, आठवलं…. call आलेला ना याला, संदेशला आठवलं ते. सगळं ऑफिस अजूनही उभं होतं. अझर आत आला. संदेशने लांबूनच पाहिलं. काहीतरी वाटतो आहे… प्रत्येकाला… किती आनंद आहे चेहऱ्यावर… काय झालंय नक्की…. अझर थोड्यावेळाने संदेश जवळ आला. हातात पेढा ठेवला आणि पुढे जाऊ लागला.
" अरे… क्या हुआ…. वो तो बता दे… " संदेशने अझरचा हात पकडत थांबवलं.
" अरे बेटी हुई है… मेरे भाई को बेटी हुई है । " असं म्हणतच तो पुढे , पेढे वाटत गेला. संदेशला पेढा जरा कडूच लागला ते ऐकून. थोड्यावेळाने अझर जागेवर आला.अजून काही पेढे राहिले होते.
" संदेश… लो और पेढा लो….अच्छ्या है ना… " अजून आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
" नको, राहू दे… एक खाल्ला तो पुरे. ",
"ठीक है। ",
" अरे पण तुझ्या भावाला झाली ना, ती पण मुलगी… तर एवढा काय आनंद तुला… ",
"अरे… देख, लडका हो या लडकी… मुझे तो दोनो पसंद है… और मेरे भाई को तो लडकी ही चाहिये थी, इसलिये. ",
" अरे पण, आमच्यामध्ये मुलगा झाला कि पेढा आणि मुलगी झाली कि मिठाई वाटतात. तू पेढे कसे आणलेस." ,
" यार जाने दो ना वो बात, बेटी हुई है… वही बडी बात है हमारे लिये… " अझरला पुन्हा call आला आणि तो पुन्हा बाहेर गेला.
संदेश विचार करतच निघाला घरी. एक हे आहेत, मुलगी झाली तरी एवढा आनंद आणि आमच्याकडे… हम्म, संदेशच्या बायकोला सुद्धा आता मुलं होणार होतं. नववा महिना लागला होता त्याच्या बायकोला…. आईने तर आधीचं सांगितलं होतं…. मुलगाच पाहिजे. आता ते काय माझ्या हातात आहे का… तरी आई मागेच लागली होती तिला दिवस गेल्यापासून … सोनोग्राफी करून चेक कर म्हणून…त्याची आई गावची होती त्यामुळे तिचे विचारही तसेच होते. तसाही संदेश आईला खूप घाबरायचा. त्यामुळे त्याने तिच्या समोर बोलायची हिंमत दाखवलीच नाही कधी.
शिवाय आईने सांगूनच ठेवलं होतं, मुलगी झाली तर तिला घरी आणायचे नाही. संदेशचे खूप प्रेम होतं त्याच्या बायकोवर…. त्याला तर ते पटणारच नव्हतं. त्यावरही आईने एक उपाय सांगितला होता. बायकोला घरी आणायचे असेल तर तू पण तिच्याकडेच रहायला जा नाहीतर वेगळं घर घेऊन रहा… पण या घरात तिला आणायचे नाही.… एक वेगळचं tension संदेशच्या डोक्यावर… बायकोला तर सोडू शकत नाही आणि जर मुलगी झाली तर आई-बाबांना सोडून नवीन घर बघावं लागेल. एवढं सगळं tension, त्यात अझरने मुलगी झाल्याही बातमी सांगितली.… tension अजून वाढलं.
आणि तसंच होतं त्याच्या घरी. फक्त संदेशचे बाबा गावातून मुंबईला आले होते, कामासाठी. बाकी सगळे नातेवाईक गावातच रहायचे. त्याचे काका… त्यांना पहिली मुलगी झाली. तेव्हा किती आदळआपट केली होती त्यांनी, दुसऱ्या वेळेस जेव्हा काकी पुन्हा गरोदर होती, त्यांनी आधीच सोनोग्राफी करून तपासून बघितलं. तेव्हा पण मुलगीच दिसली. त्या दिवसापासून, त्यांनी काकीला माहेरी पाठवलं ते अजूनही घरी आणलं नाही. शिवाय संदेशला त्याच्या गावचं बरंच काही माहित होतं. फारच कमी मुली जन्माला यायच्या गावात. एक तर त्यांना पोटात मारलं जायचे, नाहीतर जन्माला आलीच तर त्या मुलीसकट आईला माहेरी पाठवायचे. बायकांना पुन्हा माहेरी जाणे किती कष्टदायक असते , ते का कळणार कोणाला. संदेश तसाच घरी आला. बसला जरावेळ. आईने थंडगार पाणी आणून दिलं. बरं वाटलं त्याला पाणी पिऊन. थोडावेळ गेला. आईने पुन्हा सुरु केलं.
" काय रं… कधी डीलवरी हाय तिची… ",
" माहित नाही मला. " संदेशचा थंड reply…
" आरं डाक्टर नं दिली असलं ना तारीख… " ,
" दिली आहे… पण तुला काय त्याचं एवढं… " असं म्हणत तो आतल्या खोलीत गेला. फ्रेश झाला. काय मनात आलं माहित नाही. कपडे घातले. आणि बाहेर निघाला. " कूट जातोस रे पोरा… " आईने जाता जाता विचारलं. " तुझ्या सुनेला भेटून येतो… " एवढंच बोलून तो बाहेर आला.
निशा, संदेशच्या बायकोचं नावं… दुसऱ्या गावातली होती ती, पण शिकलेली होती. गावातले होते तरी त्याचं कुटुंब मुंबईत रहायचे. तिलाही तिच्या सासूचा स्वभाव माहित होता आणि ती संदेशला काय बोलली होती तेही तिला कळलं होतं. संदेश अचानक आलेला बघून तिलाही आनंद झाला. परंतू संदेशच्या चेहऱ्यावर तसं काहीच नव्हतं. " काय झालं ?" निशाने त्याला विचारलं. "चल बाहेर जायचे होते… तयारी कर पटकन. " निशाला जरा आश्चर्य वाटलं. तरी खूप दिवसांनी तो भेटायला आलेला म्हणून काही न बोलता ती तयार झाली. दोघे चालतच निघाले. हळूहळू चालत होते दोघे. संदेशच्या डोक्यात खूप विचार चालू होते. काहीच बोलत नव्हता तो. निशाला कळत होता कि खूप काही चालू आहे त्याच्या मनात. " कूठे जातोय आपण ? " निशानेच प्रश्न केला. तसा संदेश थांबला. कूठेतरी बघत होता एकटक. निशाही काही बोलली नाही मग. खूप वेळाने संदेश बोलला.
" कूठे जाऊ तेच कळत नाही.",
" का … काय झालं ?",
" काय होणार अजून…. तुमच्या दोघींचं tension…. तुम्हा दोघींना ही मी सोडू शकत नाही. काय करू सांग मी ?" निशा काय बोलणार त्याला. संदेशने taxi थांबवली. "बस… " संदेश निशाला बोलला तशी ती पटकन आत जाऊन बसली. त्याने taxi driver ला सांगितलं काहीतरी आणि तोही गाडीत येऊन बसला. कूठे जात होतो ते निशाला माहित नाही. संदेश गप्पच होता. निशाने मग तिचं डोकं त्याच्या खांदयावर ठेवलं आणि डोळे मिटून घेतले.
१५ मिनिटांनी taxi थांबली. " चल… " संदेश बोलला तशी तिने डोळे उघडले. taxi तून निशा 'आपलं शरीर' सावरत उतरली. संदेशने taxi driver ला पैसे देत होता. निशाने आजूबाजूचा परिसर बघायला सुरुवात केली, आपण कूठे आलो ते कळण्यासाठी. अरेच्च्या !!!!!……… हे तर सासर आपलं. इथे कशाला आणलं याने.…. निशाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. संदेश पैसे देऊन पुढे आला.
" चल घरी… ",
" अहो…. पण काय झालंय ते तरी सांगा… " निशा बोलली. संदेश त्यावर काही बोलला नाही. आणि निशाचा हात पकडून तिला घरात आणलं. त्याची आई समोरच भाजी चिरत बसली होती. वडील TV वर काहीतरी "बघण्यासाठी " शोधत, channel बदलत होते. निशाला आलेलं पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले.
" बसं निशा… " निशा सोफ्यावर बसली.
" आरं… हिला काहून आणलं इथं… तिलाच भेटाया गेला हुता ना… " आई त्याला ओरडलीच. संदेश शांतपणे निशाच्या शेजारी बसून होता. " अरे पोरा… ती गरोदर आहे ना, मग इतका प्रवास करून कशाला आणायचे तिला इकडे ? " त्याच्या वडिलांनी सुद्धा विचारलं.
" नाही…. वाटलं मला… , हिला दाखवून घेऊया एकदा… शेवटचं… नंतर कूठे बघणार हिला तुम्ही… " संदेश बोललाच शेवटी.
" काय बोलतु हायस तू… डोकं हाय का ठिकानावर… " आई रागातच बोलली.
" मग… काय बोलू सांग… नाही, तूच सांग… " संदेश उभा राहिला. आणि मोठयाने बोलला.
" मला, एक तर ऑफिसचं tension असते, कामाचं… त्यात भर पडते ती घराच्या वादाची… तूच बोललीस ना, मुलगी झाली तर हिला आणायचे नाही घरी पुन्हा. त्याचसाठी, निशाला घेऊन आलो आज. तुम्हाला दाखवायला. बघून घ्या तिला आजच." संदेश रागातच बोलत होता.
" थांब रे बाळा …. ती अशीच बोलली होती." वडील हळू आवाजात म्हणाले.
" कसं शांत होणार बाबा… आईला जेव्हा कळलं कि निशा "आई" होणार आहे, तेव्हा पासून माझ्या मागे लागली होती…. सोनोग्राफी करून कोण आहे ते बघून घे म्हणून….आता, परवा पण बोलली कि मुलगा कि मुलगी कोण आहे ते बघून घे पटकन…. याला की अर्थ आहे… आणि मुलगा किंवा मुलगी झाली तरी मी काही इथे राहणार नाही आता.… तसही, सोनोग्राफी करून लिंग तपासणी केली कि तुरुंगात जावे लागते… त्यापेक्षा मी स्वतःच वेगळं घरचं घेऊन राहतो ना… विषयच संपला ना… तुम्ही ही बघा मग तुमच्या उपजीविकेचे साधन. " संदेश बोलला.
" नगं रं आसं बोलू… या वयात कूठ जानार नोकरी शोदाया… " आई बोलली.
" आता का… आम्ही तर नकोच आहे ना तुम्हाला… " तशी आई शांत बसली. थोडावेळ शांततेमध्ये गेला. संदेशने आईला विचारलं मग. " आई, खरं सांग… तूपण एक स्त्री आहेस ना… तरी असं मुलगा , मुलगी भेदभाव का करतेस… आई जर तिला मुलगी होणार असेल तर तो तिचा दोष नाही, माझा आहे… कारण बापावर अवलंबून असते… मुलगा कि मुलगी होणार ते, तसं असेल तर मीच जातो घराबाहेर… पण मुलगी का नको तुला ? "
"सांगते रं बाळा… तू शांत हो आधी… " संदेश खाली बसला. आईने पाणी आणून दिलं, निशाला ही दिलं. आणि दोघांच्या समोर बसली.
"बाळा, माझा तसा काही उद्देश नाय व्हता रं… ",
" मग असा विरोध का करतेस, मुलगाच पाहिजे , मुलगी नको असा … " तशी आई त्याच्या वडिलांकडे बघू लागली.
" सांगतो… तुला तुझ्या काकांची गोष्ट माहिती आहे ना… " खूप वेळाने त्याचे वडील बोलले.
" हो… त्यांनी तर काकीला माहेरीच ठेवलं ना, किती चुकीचे वागले ते… " संदेश निराश आवाजात म्हणाला.
" तेच सांगायचे आहे तुला… त्यांनी तिला माहेरी धाडलं. पण सोडून नाही दिलं. तिला जातात ते भेटायला.",
" म्हणजे… भेटायला जातात म्हणजे…. मग घरीच ठेवायची ना काकीला. ",
" तसं नाही चालत रे गावात… तुला गावाची परिस्तिथी माहित नाही." संदेशचे वडील त्याच्या समोर येऊन बसले. " तू गावात वाढला नाहीस म्हणून तुला बोलणं सोप्प वाटते. गावात बायकांना चांगली वागणूक मिळत नाही रे… मी स्वतः बघितली आहे ना… शेतात राबायचं, लांबून लांबून पाणी आणायला पण बायकाचं…शेतात, बाहेरून काम करून पण पुन्हा घरी काम करायचे ते बायकांनीच…. एवढं करून पण त्यांच्या वाट्याला की येते… उरली-सुरली भाकरी… आराम तर असा नाहीच त्यांना… त्यात नवऱ्याबरोबर रात्री… बोलायला पण लाज वाटते मला, त्यात सगळ्या पुरुषांना मुलगाच पाहिजे असतो… काय तर वंशाचा दिवा… गावातली सगळी तरणी पोरं नशेला लागलीत. काय दिवे लावणार ते माहित आहे सगळ्या गावाला… शिक्षण नाही ना काही कामधंदा करत…फक्त दारू पियाची आणि पडून राहायचं कूठेतरी… रात्र झाली कि हादडायला यायचे घरी….बस्स, आणि मुलगी झाली तर वर बायकोलाच मारायचे…. कशाला ते, तिचीच चूक काढून माहेरी पाठवून देयाचे कायमचं…. नाहीतर पुन्हा कामाला लागायचं , मुलगा काढायच्या…. अरे काय… मशीन हाय का ती बाई… तू बोलतोस ना, मुलगा, मुलगी हे वडिलांवर असते म्हणून, ते गावात सांगून बघ… कोणाला पटते का ते, दारात उभं नाही करणार तुला पुन्हा कोण… "
" एक गावातली गोष्ट सांगतो… हे सोनोग्राफी वगैरे गावात खूप चालते… तिथे आधीच बघतात आणि मुलगी सापडली तर direct तिला पोटातच मारतात… तिथे पोलिस वगैरे बघत नाहीत डॉक्टर… पैसे घेऊन सगळं चालते गावात… एका बाईच्या दोन मुली तर अश्याच गेल्या… तिसऱ्या वेळेस जेव्हा ती गरोदर होती अस समजलं , दुसऱ्या दिवसापासून ती गायबच झाली गावातून…. ",
" कूठे गेली ती ? ",निशाने विचारलं.
" कूठे गेली काय माहित… पळूनच गेली ती गावातून , ह्या घरच्यांनी, पुन्हा तिच्या माहेरच्या लोकांनी खूप शोधलं तिला… दोन वर्ष झाली , अजून सापडली नाही ती.",
" पण असं का करतात बाबा ? " संदेश खूप वेळाने बोलला.
" मुलीला कसं वाढवावं ते कळतच नाही कोणाला… अगदी लहानपणापासून जपावं लागतं मुलीला… ते मोठी होईपर्यत. आपल्या गावात मुलींना शिकायला शाळा पण नाहीत… १२, १३ वर्षीची होईस्तोवर सांभाळायचे आणि नंतर लग्न करून पाठवून देयाचे. त्यात तर हुंडा द्यावाच लागतो… तो नाही दिला तर छळ होतो मुलीचा सासरी . नाहीतर पुन्हा माहेरी…. हुंडाबळी काही कमी नाहीत गावात. त्यात पुन्हा मुलगी झाली तर गावातले नावं ठेवतात… काही अशुभ झालं तर 'मुलगी पांढऱ्या पायाची आहे' असं बोलून मोकळं होतात. ते का झालं एकदा, मग तीच लग्न तर होतंच नाही, पण घरात सुद्धा तिला कोणी नीट वागणूक देत नाहीत. जन्मभर तिला 'बांडगुळ' सारखं जगणं जगावं लागते. किती सहन करावं एका बाईने… शेवटी तिचा पण 'जीव' आहे ना." बाबा थांबले बोलायचे.
" पण बाबा, ते सगळं गावात ना…. इथे शहरात कूठे असतं असं. " संदेश म्हणाला.
" शहरात ?…… इथे काय वेगळी परिस्तिथी आहे का… रोज पेपरात एकतरी बातमी असते बलात्काराची, नाहीतर विनयभंगाची…. गावातल्या पेक्षातरी हे जास्तच आहे. लोकांच्या नजरा बघितल्या आहेत मी. एखाद्या मुलीकडे, बाईकडे कसे बघत असतात ते, जसं मिळेल तसं बघत असतात, कूठे कूठे बघत असतात, अगदी टक लावून… हे तूला माहित असेलच. चुकून ट्रेनमध्ये एखादी मुलगी, चुकून पुरुषांच्या डब्यात आली तरी सगळ्या लोकांच्या नजरा तिच्याकडेच वळतात ,जशी कधी मुलीला पाहिलीच नाही. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यावरच्या केसांपर्यंत बघत असतात. अगदी ती गाडीतून उतरेपर्यंत. कसं वाटते ते. मलाच एवढं वाटते, तर त्या मुलींना कसं वाटत असेल मग. खरंच लाज वाटते कधी कधी पुरुष असल्याचा." संदेश गप्पपणे ऐकत होता. " आणि तू बोलतोस , शहरात तसं काही चालत नाही. तू किती मदत करतोस रे निशाला… ऑफिस मधून घरी आलास कि अंघोळ करणार, कपडे बदलून बाहेर मित्राकडे जाणार नाहीतर TV समोर बसणार… निशा सुद्धा जाते ना ऑफिसला, ती दमत नाही का… तिला त्रास होतं नाही का… सकाळी तुझा डब्बा तयार करायला ,तुझ्या आईला मदत करते. तेव्हा कधी तुला दया आली नाही त्यांची…. मला माझ्या "नातीच्या" बाबतीत असा काही नको आहे म्हणून मीच बोललो… संदेशला मुलगा झाला तर बरं होईल. " संदेश मान खाली घालून ऐकत होता.
मग आई बोलली. " तुझ्यावेळेस पन, गावात असं हाय म्हनून… गाव सोडून मुंबय ला आनल मला… त्यांना मुलगी पाडायची नवती ना म्हनून… गाव सोडला तुझ्या बापानं, मला काय पोरगा,पोरगी सारखीच ना… मी पन आई हाय ना, कळत मला… बाळ पोटात असलं कि काय वाटतं ते… तुजी काकी तिथं, माहेरी सुखात हाय एकदम… म्हनून मीच बोलले कि मुलगी नको म्हनून… असंच बोलली रं…. तिच्यावर राग नाय माजा, निशा बी माजीच लेक हाय… "
संदेशच्या डोळ्यात पाणी आलं ते सगळं ऐकून. आपण काय विचार करत होतो आईबद्दल… तसाच उठला आणि आईला जाऊन मिठी मारली. वडिलांसमोर आला आणि त्यांनाही मिठीत सामावून घेतलं त्याने. खूप वेळाने शांत झाला. वडिलांनीच त्याचे डोळे पुसले. " रडू नकोस बाळा, मला "नात" नको होती म्हणून बोललो तसं, बाकी काही नाही माझ्या मनात." संदेशचे वडील बोलले. " हो बाबा, सगळं कळलं मला." संदेशने स्वतःला सावरलं. निशाच्या डोळ्यातही पाणी होतं. संदेश निशाजवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवले. " काहीही असो बाबा, मला पटलं सगळ… मुलगा झाला तर काहीच प्रश्न नाही, पण मुलगी झाली तरी चालेल मला. खूप मोठी करीन तिला, शिकवीन…. आणि तुम्हाला भीती वाटते ना ती…. तर तिला मजबूत करीन मी, कणखर बनवेन. सगळ्या प्रसंगांसाठी तयार करीन तिला, मग तुम्हालाही गर्व वाटेल तिचा…. तुम्ही छाती फुगवून सांगाल कि हि नात आहे माझी…. मलाही वाटेल मग " बाप " झाल्यासारखं…. " संदेश आनंदात सांगत होता अगदी… डोळ्यातून अश्रू… सगळं कसं छान झालं.
थोडयाच दिवसांनी, निशाला admit केलं हॉस्पिटलमध्ये… संदेशची आई होती सोबत तिच्या. पुढच्या ३ दिवसांनी "बाळ" होणार असं सांगितलं होतं डॉक्टरने, त्यामुळे संदेश आज ऑफिस आला होता. काम चालू होतं त्याचं… तेवढयात त्याचा मोबाईल वाजला. "हेलो…. " संदेश बोलत बोलत बाहेर गेला. २० मिनिटांनी ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात मोठी पिशवी होती. पहिला तो त्याच्या मित्राजवळ आला, अझरकडे…… " अरे भाई… क्या हुआ…चेहरेपर इतनी ख़ुशी…. " संदेशने मिठाई काढली आणि त्याच्या तोंडात कोंबलीच आणि मोठयाने ओरडला.
" मुबारक हो !!!!!!!!! ……. बेटी हुई है…. "
-------------------------------------------- The End ----------------------------------------------