" शट् यार…. चार्जर कुठे राहीला…. " अक्षता तिच्या मोबाईलचा चार्जर शोधत होती घाईघाईत. कुठे ठेवला ते तिला आठवतंच नव्हतं. तशी अक्षता विसळभोळी नव्हती. तरीही आज तिला चार्जर भेटतच नव्हता. खूप शोधला पण चार्जर समोर येण्यास तयार नव्हता.
आता अचानक चार्जरची आठवण कशी झाली ? . काल ऑफिसमधून उशिरा घरी आली अक्षता. मोबाईल तसाच बेडच्या बाजूला ठेवून झोपी गेली. खूप दमलेली ती ना. नाहीतर रोज ऑफिस मधून आल्या आल्या , खूप लोकांसारखी ती सुद्धा प्रथम मोबाईल charging ला लावते. बरं, रात्री मोबाईल charge केला तरी, सकाळी सुद्धा ऑफिसला जाण्याआधी तिला मोबाईल charge करण्याची सवय. त्यात आज रविवार. सुट्टीचा दिवस म्हणून रोज लवकर उठणारी अक्षता, आज जरा बेडवरच झोपून Time-pass करत होती. आज काही घाई नाही, धावपळ नाही. मस्त time-pass करायचा आज. बेडवर पडल्या पडल्याच मोबाईल वरून तिची chatting चालू होती , friends नी काय काय post केलं आहे FB वर ते चेक करत होती, कोणाचा वाढदिवस आहे वगैरे. सगळी काम झोपूनच चालू होती.
थोडयावेळाने तयार होऊन घरातली कामे सुरु झाली. आवराआवर , केरकचरा वगैरे गोष्टी झाल्या आरामात. ऑफिस नसल्याने डब्बा करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुपारचे जेवण बाहेरून मागवले , छानपैकी एकदम. त्यात मध्ये मध्ये मोबाईल बरोबर चाळे चालू होते तिचे. भरपेट जेवून , TV बघत बघत छान दिवस गेला. दुपारची मस्त झोप काढून झाली होती तिची. संद्याकाळचे ५ वाजले तेव्हा तिच्या मोबाईलच्या रिंगने तिला जाग आली. मित्राचा call आला होता. त्याच्या बरोबर जरा वेळ बोलून झाले आणि तिचे लक्ष मोबाईलच्या Battery indicator गेलं. " १६%" एवढीच charging राहिली होती मोबाईल मध्ये. तेव्हा तिला चार्जरची आठवण झाली आणि लागलीच ती चार्जर शोधायला लागली.
अर्धा - पाऊण तास कसा गेला कळलंच नाही , चार्जर नव्हताच घरात. ऑफिसच्या bag मध्ये नव्हता. रोजच्या ठिकाणी नव्हता. मोबाईल charge तर केलाच पाहिजे नाहीतर तो बंद होईल. आणि एकदा का मोबाईल बंद झाला कि जवळपास सगळ्या जगाशी संबंध तुटण्यासारखे. सगळे contacts त्यात save केलेले, पाठ कशाला करायला पाहिजे. chatting बंद होईल, FB Update कुठे पाहणार ? , news कश्या कळणार ? . अक्षताला काहीच आठवत नव्हतं. मेंदूवर जरा ताण देऊन तिने आठवण्याचा प्रयन्त केला. काल रात्री, उशिरा आले म्हणून charging लावलं नव्हतं. मग चार्जर bag मधून काढलाच नाही. bag मध्ये तर चार्जर नव्हताच. म्हणजे तो bag मध्ये ठेवलाच नाही. ऑफिस मधून निघताना घाईघाईत तिकडेच राहिला वाटते चार्जर.
आता ती काहीच करू शकत नव्हती. शेजारच्या काकूंकडे असा चार्जर आहे, हे तिला आठवलं तशी ती काकूंकडे धावत गेली. पण काकूंचा दरवाजा बंद…… बाहेर गेल्या होत्या कुठेतरी . आता आली ना पंचाईत… आता कुठे जाणार ? , …. मोबाईल तर charge करावाच लागेल नाहीतर तो बंद होईल. निराश होऊन अक्षता तिच्या रूममध्ये आली. मोबाईलचा वापर आता कमीतकमी करावा लागेल, battery फार कमी राहिली आहे. कोणाचा call आला तरी battery कमी होणार, काय करायचं ? काय करायचं ? अक्षता विचार करत बसली होती.
घड्याळाकडे पाहिले तिने…. संद्याकाळचे ६.१५ वाजले होते. काकू आल्या कि पटकन चार्जर घेतला पाहिजे त्यांच्याकडून……… नाहीतर उद्या direct ऑफिसमधे गेल्यावरच चार्जर मिळणार…. " काकू लवकर या…लवकर या…" अक्षता मनातल्या मनात बोलत होती. इतक्यात मोबाईल वाजला.…. अनोळखी नंबर , " कोणी call केला आता ? " त्रासिक चेहऱ्याने अक्षता मनातल्या मनात बोलली…. " Hello… कोण बोलतंय… " , " हेलो… बाळा… कुठे आहेस तू ? " , बाळा … ? कोण बाळा …. ?.. " Hello, कोण पाहिजे तुम्हाला ? " , " अरे… तू कोण…. सून बाई का ? " , " नाही …. तुमचा wrong number लागला आहे…sorry. " म्हणत अक्षताने call, cut केला. पाचंच मिनिटे झाली असतील, पुन्हा call आला. " हेलो… मंदार…. कुठे आहेस रे तू … " , अक्षताने ओळखलं…. तोच आवाज होता… " Hello,…… हा Wrong Number आहे. तुम्ही चुकीचा Number लावला आहे. ", म्हणत अक्षताने पुन्हा call , cut केला.
१० मिनिटे गेली असतील… अक्षता बाल्कनीत उभी होती. मोबाईलची रिंग वाजली पुन्हा, अनोळखी नंबर. परंतू मघाशी आलेल्या २ call पेक्षा वेगळा नंबर होता. म्हणून अक्षता ने call उचलला. " हेलो… " , " Hello …… कोण बोलतंय ? " , अक्षताने विचारलं. " हेलो, मंदार आहे का ? " अक्षताने यावेळीही ओळखलं , तोच आवाज होता. एका वयस्कर अश्या , जवळपास ६०-६१ वय असलेल्या बाईंचा आवाज होता. पण यावेळी अक्षताला जरासा राग आला.
एकतर मोबाईलची battery कमी, त्यात चार्जर ऑफिसमध्ये राहिला, वरून तिसऱ्यांदा तोच Wrong Number.…" अहो.... तुम्हाला काही कळते का नाही…. दोनदा सांगून सुद्धा… हा Wrong Number आहे , मस्करी खूप झाली हा तुमची…. ", पलीकडून काहीच आवाज आला नाही. थोडयावेळाने मात्र पलीकडून कोणीतरी बोललं, " माफ करा हा…. मला काही सुचत नाही आहे म्हणून हा एकच नंबर पुन्हा पुन्हा लावत आहे…. माफ करा मला. " यावेळीस पलीकडचा आवाज जरा घाबरा-घुबरा वाटला. अक्षताला जरा गडबड वाटली, तिनेच विचारलं , " Hello madam, …………आहात का …. काही प्रोब्लेम आहे का तुम्हाला ? " पलिकडून आवाज आला , " काही नाही…मी जरा घरचा रस्ता विसरले आहे गं " , " रस्ता विसरलात …. अरे बापरे…. काही आठवते आहे का ते बघा. " अक्षता म्हणाली. " नाही गं पोरी…. मला आठवतच नाही आहे कुठे जायचे ते… आणि आता वय पण झाले आहे , कुठे राहणार या वयात लक्षात. " अक्षताला त्याच्या आवाजावरून कळत होते कि , आजी खरं बोलत आहेत ते. त्यांच्या आवाजात कमालीची भीती जाणवत होती. " ठीक आहे आजी ………… तुम्हाला आजी बोललं तर चालेल ना " , " हो गं पोरी …. चालेल ."," तुम्ही असं करा…. थोडं आठवण्याचा प्रयन्त करा,…… नक्की आठवेल काहीतरी तुम्हाला . ठीक आहे ना ." अक्षता म्हणाली. " आठवते हा पोरी…. बरं वाटलं गं तुझ्यासोबत बोलून " आणि आजींनी फोन cut केला.
अक्षताने लगेच मोबाईलच्या " battery indicator " वर लक्ष टाकलं. " १४%" शट्ट यार…. काकू लवकर यायला हव्या… , नाहीतर मोबाईल बंद होईल माझा.…. अक्षता मनातल्या मनात बोलत होती. अजून काही मिनिटे गेली असतील… अक्षताचा मोबाईल पुन्हा वाजला. अनोळखी नंबर…. call उचलला. " Hello… ? " ," Hello Madam, नमस्कार…मे Loan के बारे मे आपसे २ मिनिट बात कर सकता हुं ? " ते ऐकून अक्षताच्या डोक्यात आग गेली. काहीही न बोलता तिने call cut केला. यांना काय दुसरं काम नसते वाटते, कोणालाही कधीही call करतात. एकतर मोबाईलची battery कमी, त्यात call वर call. पुन्हा फोनची रिंग वाजली. Unknown Number…. काहीही न बोलता तिने मोबाईल कानाला लावला, " हेलो …. हेलो … मंदार आहे का ? " , अक्षताने ओळखलं पुन्हा…. त्याच आजी…
" Hello…. आजी, तुम्ही परत मलाच फोन लावला आहात. तुमच्या मुलाचा नंबर वेगळा आहे. हा माझा नंबर आहे, माझं नावं अक्षता , तुमच्या मुलाचा नंबर वेगळा असेल, हा नाही. " , " माफ कर हा पोरी…. अगं हाच नंबर आहे ना माझ्याकडे . म्हणून पुन्हा लावला फोन. " , "असं करा . तुमच्या मुलाचा दुसरा नंबर असेल तो मला द्या.…. मी करते call त्याला. " , " नाही आहे गं. " , आजी म्हणाल्या. " नाही आहे म्हणजे ? , असेल बघा . तुमच्या मोबाईलमध्ये असेल बघा. " अक्षता म्हणाली. " मोबाईल कुठे आहे गं पोरी माझ्याकडे…आणि तो मला कळतच नाही कसा वापरायचा…" , " मग तुम्हाला हा नंबर कोणी दिला ? " , " अगं …मंदारने तो माझ्या बटव्यात ठेवला होता कधी …. ऐका कागदावर लिहून ठेवला होता. म्हणून तो नंबर पाहून मी फोन करते आहे. "
अक्षताला आता काहीतरी आहे हे वाटायला लागलं होतं. या आजी खरंच हरवल्या आहेत आणि इकडून तिकडे फिरत आहेत… बापरे ! … " आजी !! तुमच्याकडे मोबाईल नाही, मग घरातून बाहेर कशाला पडलात आणि एकट्या कशाला आलात बाहेर ? …. बघा ना काहीतरी आठवेल तुम्हाला , घर कुठे आहे ते …. " , " नाही गं आठवत मला …. माझं वयही झालं आहे आता आणि सध्या तर काहीच लक्षात राहत नाही.… रोजच्या औषधांच्या गोळ्या घ्यायला विसरते, कधी कधी सकाळी आठवतच नाही कि देवपूजा केली ते , मग दोनदा - तीनदा देवपूजा करते मी . ते सगळं लांब राहिलं.…. मला माझचं नावं आठवत नाही आता. " असं म्हणत त्या आजींना जरा हसायला आलं. पण इकडे अक्षताला tension आलं होतं.
" आजी …. तुम्हाला आठवत नाही ना काही…मग घरातून कशाला एकटया बाहेर आलात. कोणाला तरी घ्यायचे ना सोबत… " , " होता गं मंदार बरोबर… पण आमची गर्दीत चुकामूक झाली आणि तो कुठे गेला ते कळलंच नाही मला… तेव्हा पासून शोधते आहे त्याला मी. " जरा विचित्र होतं ते , मुलगा सोबत असताना आजी हरवल्या कश्या ?…. काय करायचं आता , " OK …. आजी ठीक आहे… तुम्हाला घरी जायचे आहे ना, मी सांगते तुम्हाला पत्ता. आता तुम्ही कुठे आहात ते सांगा पहिले… " पलीकडून आजींचा आवाज आला नाही… थोडयावेळाने आजी बोलल्या, " माहित नाही गं , …… मला नाही कळत मी कुठे आहे ते … ", " आजी , आजूबाजूला कोणी असेल त्याला विचारा ना …. नाहीतर कूठे काही लिहिलं असेल ते वाचून सांगा मला . " , " पोरी…. मी गावची राहणारी… मला काही लिहिता वाचता नाही येत गं आणि या शहरात तर सगळेच अनोळखी मला. कोणाला विचारू मी. भीती वाटते मला." …. अडचणींवर अडचणी., आजींना काय सांगू आता…. खूप वेळ झाला होता बोलता बोलता. तिने battery indicator नजर टाकली. " १० % " … आजींचे बरोबर होते, गावची जुनी लोकं शिकलेली नसतात. त्यात ती सहसा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलत नाहीत.
" Hello आजी…. चालेल, नका बोलू कोणाशी…. असं करा… तुमच्या आजूबाजूला काय आहे ते सांगा मला… आणि फोन करा मला. " आजींनीच फोन बंद केला.…. काय नक्की कळत नव्हतं अक्षताला…. कदाचित त्यांचा मुलगाही हरवला असेल… नाही, मोठा असेल मुलगा त्यांचा, मघाशी त्या सूनबाई पण बोलल्या होत्या… म्हणजे लग्न झालेलं आहे मुलाचं. तरी ते दोघे हरवले…. विचार करत होती अक्षता आणि फोन वाजला , " हेलो… अक्षता का … ? " , " हा …. हेल्लो , बोला आजी…आता कूठे आहात तुम्ही, ते सांगा मला. " , " हा… इकडे ना एक बाग आहे… तिकडे उभी आहे मी. " , " तसं नाही, तुम्ही नाशिक मध्येच आहात ना… ? " , " हो… हो… " , "ठीक आहे , पण नाशिक मध्ये खूप बागा आहेत. असं काही वेगळं आहे का ? ", "हा… हा… , बागेच्या तोंडावर ना एक हत्तीची मूर्ती आहे गं , पांढरी. ", अक्षताला एकदम आठवलं. एक बाग होती अशीच , नाशिक रेल्वेस्टेशन पासून जवळच. म्हणजेच आजी स्टेशन परिसरात आहेत कुठेतरी…. आजी कूठे आहेत ते कळलं. " OK, आजी, मग तुम्ही कुठे राहता ते आठवा जरा पुन्हा एकदा. ", " नाहीच आठवत गं , खरचं . ". काय करावं…आजी बोलल्या होत्या कि त्यांना देवपूजेची आवड आहे.…. " आजी , तुमच्या घराच्या आजूबाजूला काही आहे का , एखादी इमारत , मंदिर वगैरे… आठवा जरा . " . थोड्यावेळानंतर आजी बोलल्या , " हो… गं, माझं घर आहे ना, ते एका इमारतीत आहे. त्या इमारतीचं नाव नाही आठवत मला पोरी. त्या इमारतीच्या शेजारी एक मोठ्ठ मंदिर आहे , गणपतीचं…. गोल मंदिर आहे ते . " , " ठीक आहे, आजी. मला थोडयावेळाने फोन कराल का , मी आठवते कुठे मंदिर आहे ते . आणि तुम्ही कुठे जाऊ नका हा … असाल तिकडेच राहा. " म्हणत अक्षताने call cut केला.
अक्षता सुद्धा नाशिकला राहायची. पण स्टेशनपासून खूप लांब राहायची. तसं तिला नाशिकला येऊन ५ वर्ष झाली होती. आई-वडील कोल्हापूरला राहायचे. अक्षता जॉबसाठी नाशिकला राहत होती, एकटीच. ती राहत असलेली रूमसुद्धा भाडयाची होती. अक्षता जरी एकटी राहत असली तरी ती खंबीर होती. कितीही कठीण परिस्तिथी समोर आली तरी घाबरून जायचे नाही हे तिला माहित होतं. त्यामुळेच ती स्वतंत्र, एकटी राहू शकली होती. तशी ती जॉब मधेच बीझी असायची, तरीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती शहरात भटकायला जायची एकटीच . अक्षताला नाशिक शहर बऱ्यापैकी कळलं होतं आता. कोणता रस्ता कुठे जातो , एखादा short-cut वगैरे तिला चांगलं माहित झालं होतं. असचं एकदा फिरता फिरता ती त्या गोल मंदिराजवळ गेलेली हे तिला आठवलं… जरा मेंदूवर अधिक ताण दिला तेव्हा तिला आठवलं ते , " हो…. अगदी बरोबर… मी गेले होते तिथे, दोनदा. आणि एक short-cut पण शोधला होता मी तिथे जाण्याचा… " … आणि तेव्हाच त्या आजींचा विचार तिच्या मनात आला, शट्ट यार…म्हणजे आजी कित्ती लांब आहेत त्यांच्या घरापासून. … बापरे !! … अक्षता विचार करत होती आणि फोन वाजला. " हेल्लो अक्षता, " , " हा आजी… मला कळलं आहे कि तुमचं घर कुठे आहे ते … " , " कळलं का !!! …. खूप खूप आभारी आहे गं पोरी तुझी… " , किती आनंद होता त्या आवाजात. " आजी , एक अडचण आहे पण … " , " काय गं पोरी … ? " , " मला त्या Area चं , त्या विभागाचे नावं नाही माहित… मग तुम्हाला काय सांगू मी " आजींना बहुतेक वाईट वाटलं असावं , कारण त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. " Hello…. आजी…. आजी… " , " हो...ग… पोरी…. काय करायचं आता ? " , अक्षता विचारात पडली. " कुठे आहे गं घर माझं, सांग मला मी जाते … " आता आजींना कसं सांगायचं कि त्या किती लांब आहेत घरापासून…. काय सांगू …काय सांगू …
आजी मघाशी बोलल्या होत्या, त्यांच्याकडे बटवा आहे. बटवा म्हणजे म्हाताऱ्या, जुन्या लोकांची पर्स, पाकीट. त्यात पैसे तर असतीलच. शिवाय मघापासून त्या call करत होत्या, कदाचित टेलिफोन बूथ वरून. असतील त्यांच्याकडे पैसे मग… " हेलो आजी…. तुम्ही म्हणालात ना मघाशी… तुमच्या मुलाने फोन नंबर लिहून ठेवला होता बटव्यात … "," हो " ," मग तुमच्या बटव्यात पैसे पण असतील ना… "," आहेत गं … पण एक- दोन रुपयाची नाणी आहेत… जास्त नसतील गं… तेच वापरते आहे फोन करायला… "," तरी सुद्धा किती असतील … मोजता का जरा… "," थांब जरा… फोन नाही बंद करत मी … थांब. " म्हणत आजी नाणी मोजू लागल्या. " अक्षता … ? आहेस का ग पोरी " ," हा बोला आजी… किती आहेत ? ", " जास्त नाही… १६ रुपये आहेत फक्त. "
१६ रुपये…. या आजी पण ग्रेट आहेत. आणि त्यांचा मुलगा त्यांच्याहून ग्रेट… १६ रुपयात काय होते… ते सुद्धा चिल्लर. रिक्षावाला, तो घेणारसुद्धा नाही रिक्षात. आजी खूप मोठ्या संकटात आहात तुम्ही. अक्षता मनातल्या मनात बोलत होती , " हेल्लो पोरी… बोल काही… पैसे कशाला पाहिजे होते. " ," आजी , मला नाही. रिक्षाने घरी गेला असता ना तुम्ही. आता १६ रुपयात कश्या घरी जाणार तुम्ही ? " , " अगं… रिक्षाने मंदार असला तरच जाते मी, ते रिक्षावाले अजिबात आवडत नाहीत मला . मला बस सांग ना एखादी…. बसने जाते मी… " , " आजी तुम्ही राहता तिथे बस नाही जात कोणती…. एक जाते, ती सुद्धा खूप लांब थांबते… आता मलाच tension आलं आहे आजी. तुम्ही जाणार कश्या घरी…. " थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. आजीचं बोलल्या मग. " पोरी, मला सांगशील का रस्ता… ? तुला माहित आहे ना… मी जाते चालत चालत… " , " अहो… आजी. , तुम्हाला माहित नाही , तुम्ही किती लांब आहात ते घरापासून. आणि मी सुद्धा राहते , ती विरुद्ध दिशेला. नाहीतर मीच आले असते तुम्हाला घरी सोडायला. " , " नको गं पोरी … , तू सांग मला कसं जायचे ते , मी जाते चालत चालत. " अक्षता काय बोलणार आता. दुसरा option च नव्हता., " आजी , …. तुमचं घर खूप लांब आहे, सरळ रस्त्याने जरी चालत गेलात तरी ४५ मिनिटे लागतात. आणि short cut ने गेलात, म्हणजेच गल्ली-बोळातून गेलात तर ३० मिनिटे लागतील. तुम्ही चालू शकता का एवढं ? " , " हो… गं, गावाला असताना मी खूप चालायची. आता पण चालते. वय झालं असलं तरी पायात ताकद आहे अजून माझ्या. तू सांग मला कसं जायचे ते. मी जाते चालत. " , ते ऐकून अक्षताला जरा हुरूप आला. , " चालेल आजी, मी सांगते तुम्हाला तुमच्या घरी कसं जायचे ते." , " पण सगळा रस्ता नको सांगूस मला. माझ्या काही लक्षात राहत नाही. तू सांगशील पण विसरून जाईन मी. " , हो… ते सुद्धा बरोबर आहे. त्यांना लक्षात राहत नाही काही. आणि त्यांना सांगितलेले short-cuts जर त्या विसरल्या तर कुठल्या कुठे जातील भटकत. पुन्हा प्रोब्लेम.
अक्षताला पुन्हा आठवलं काहीतरी… त्या वेगवेगळया गल्यांमध्ये , short-cuts मध्ये, कुठे ना कुठे , एखादं दुसरा टेलिफोन बूथ आहेच. लगेच तिने आजीना सांगितलं , " आजी… आपण असं करूया…, मी तुम्हाला लहान लहान वाटा सांगते. म्हणजे तुम्ही विसणार नाही. " , " हो… चालेल चालेल. " , " मग तुम्ही मी सांगितलेल्या गल्लीत किंवा रस्त्यावर पोहोचलात कि तिथून मला फोन करा. तिथे वाटेवर खूप टेलिफोन बूथ आहेत. मला फोन केलात कि मग तुम्हाला पुढचा रस्ता सांगेन. चालेल ना. " , " चालेल चालेल पोरी … " आजींच्या आवाजात खूप आनंद होता, अक्षताला सुद्धा बरं वाटलं जरा. " चला आजी , मग सुरुवात करूया… तुम्ही तयार आहात ना ? " , " हो… " , " तुमचं काही सामान वगैरे असेल तर ते घ्या बरोबर.… तुमचा बटवा, bag, चष्मा… " , " सामान नाही आहे गं आणि बटवा… तर कमरेला बांधलेला आहे. चष्मा वाटते मी घरीच विसरली . " म्हणजे आजींकडे चष्मा सुद्धा नाही. मग चालत कश्या जाणार घरी आता. " आजी… चष्माशिवाय दिसते का तुम्हाला ? . " , " तसं दिसते गं… पण रात्रीच नीटसं दिसत नाही… कोणी बाजूला उभा असलं तरी नाही दिसणार मला. " अक्षताने घड्याळाकडे पाहिलं. संद्याकाळचे ६.३० वाजले होते. अर्ध्या तासात अंधार होईल आता. घाई करायला हवी. " आजी, आपल्याला घाई करायला हवी आता…. अर्ध्या तासात रात्र होईल , त्या अगोदर घरी पोहोचायला हवं तुम्हाला. " , " हो गं पोरी…. तू सांग मला कुठे कसं जायचे ते लवकर. " आजींच्या आवाजात लगबग होती.
" ठीक आहे आजी…. आपण सुरुवात करूया. मी सांगते तश्याच चालत जा म्हणजे आपण लवकरात लवकर पोहचू. " , " हो… हो . " , "चला… नीट लक्ष देऊन ऐका… तुमच्या समोर बाग आहे ना… पांढरा हत्ती. " ," हा… मग तुम्हाला, त्या हत्तीच्या बाजूला एक रस्ता दिसत असेल ना. " , " हो… आहे एक रस्ता. " , " हा… मग त्या रस्त्याने चालायला सुरुवात करा. तो बहुतेक ५ मिनिटात संपेल.… तो रस्ता संपेल ना , तिकडे गेल्यावर अजून चार रस्ते आहेत. तुम्ही असं करा, तो रस्ता संपला कि मला तिथूनच फोन करा. आणि नक्की फोन करा. चला. " , " करते हा मी फोन तुला… " म्हणत आजींनी फोन बंद केला.
फोन अक्षताने बेडवर ठेवला. " ८%" battery राहिली होती मोबाईलची…. या आजी जातील ना बरोबर, वयस्कर आहेत. थोडयावेळाने काळोख पडेल. कश्या जातील. ते जाऊ दे, रस्ता पूर्ण आठवायला पाहिजे आपल्याला. Laptop असता तर Map वरून शोधून काढला असता ना… पण Laptop कुठे घरी आणायला देतात ऑफिसवाले… आठवं रस्ता अक्षता. short-cut , आठवं… आठवं, या काकू कधी येणार काय माहित ? … चार्जर तरी घेतला असता ना… आजींचा call कसा आला नाही अजून… पोहोचल्या का बरोबर… , कि विसरल्या पुन्हा. कितीतरी विचार अक्षताच्या डोक्यात एकाच वेळेस. १-२ मिनिटे गेली असतील, फोन वाजला अक्षताचा, " हेल्लो अक्षता , पोहोचले गं मी… बरोबर अगदी. " ,अक्षताच्या जीवात जीव आला. " छान आजी… आता मला सांगा , समोर काय दिसते ते. " , समोर ना … चार रस्ते आहेत अजून , कुठे जाऊ नक्की. ? " अक्षताने डोळे बंद केले आणि विचार करू लागली.
चार रस्ते… आपण पण असेच गोंधळलेलो होतो तेव्हा, त्यातला एक रस्ता हा त्या मंदिरापर्यंत जायचा, short-cut होता. तिथूनच मग वेगवेगळे लहान रस्ते त्या मंदिरापर्यंत सोडतात. पण चारपैकी नक्की कोणता ? . आजींना काही वाचता येत नाही. नाहीतर कळलं असतं काहीतरी., " आजी , तुम्हाला त्या चार रस्त्यांच्या आजूबाजूला काय दिसते आहे ते सांगा मला. " , " हा… हो … हो. सांगते. हा एका रस्त्याच्या बाजूला एक मोठी काचेची इमारत आहे. दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला , ते रस्त्यावरचे पोलिस असतात ना, त्यांची बसायची जागा आहे वाटते, तिसऱ्या रस्त्याच्या बाजूला , एका ठिकाणी लोकं रांगा लावून उभी आहेत, काहीतरी आहे वाटते तिथे. आणि चौथा रस्ता खूप्प मोठ्ठा आहे गं… " , " बरं आजी ", अक्षता विचार करू लागली. तिच्या नजरेसमोर तो रस्ता येऊ लागला हळूहळू. चौथा रस्ता म्हणजे महामार्ग. , तिसऱ्या रस्त्यावर लोकांनी रांगा लावल्या आहेत, पण कशाला ? . जाऊ दे. दुसऱ्या रस्त्यावर ट्राफिक पोलिसांची चौकी आहे. आणि पहिल्या रस्त्यावर काचेची इमारत म्हणजे बँक आहे…. यापैकी कोणत्या रस्त्याने मी गेले होते… ?
तेव्हाच तिला काहीतरी आठवलं… चालता चालता तिला तहान लागली होती. आणि तिथेच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन तिने कोल्ड ड्रिंक घेतलं होतं. Yes…. बरोबर , त्या हॉटेलमध्ये गर्दी असते, खाण्यासाठी. आणि हॉटेल लहान असल्याने तिथे बाहेरच लोकांच्या रांगा लागतात. तोच रस्ता … तिसरा रस्ता !! , " आजी… आजी !! तुम्ही तिसऱ्या रस्त्यावरून पुढे चालत राहा. त्या रस्त्यावरून जरा पुढे गेलात कि एक मोठ्ठ वडाचे झाड दिसेल तुम्हाला… मला तरी आठवते कि तिकडे एक झाड होते. कळलं ना कसं जायचे ते… " , " हो… हो , तू पुढे सांग " , " हा… मग त्या झाडाच्या अगदी बाजूलाच एक वाट दिसेल तुम्हाला. तिथून पुढे चालत जा… आणि ती वाट संपली कि तिथूनच मला पुन्हा फोन करा. चालेल ना, आहे ना लक्षात सगळं… ? " , " हो…ग अक्षता , आहे लक्षात. " , " माझा नंबर तेवढा विसरू नका… नक्की फोन करा मला , वाट पाहते आहे मी तुमच्या फोनची. " आणि फोन cut केला अक्षताने.
battery - : ७ % , प्रत्येक call बरोबर battery ही कमी होत होती.… काकू आल्या आहेत का ते बघू. अक्षता बाहेर आली. अजूनही काकूंचा दरवाजा बंद. तशीच रूम मध्ये आली अक्षता. पण आजींकडे माझा नंबर कसा ? त्या तर बोलल्या , कि हा नंबर त्यांच्या मुलाने एका कागदावर लिहून त्यांच्या बटव्यात लिहून ठेवला होता, कधी गरज लागली तर call करण्यासाठी. मग त्याच्याकडे तरी माझा नंबर कसा ? का त्याने असाच उगाचच काहीतरी नंबर लिहायचा म्हणून लिहिला असेल. पण तो असं का करेल ? शिवाय आजींना माहित असेल कि या नंबर वर फोन केला कि त्यांच्या मुलाला फोन लागतो ते . म्हणजेच आजींनी या नंबर वरून आधीसुद्धा call केले असतीलच ना… त्याचं आणि त्यांच्या मुलाचं या नंबर वरून बोलणं झालं असेलच आधी कधीतरी. म्हणूनच आजी सारखा हाच नंबर लावत होत्या. अक्षताचं डोकं भणाणून गेलं अगदी. डोकं शांत झालं तसं तिच्या लक्षात आलं काहीतरी. एका वर्षापूर्वी, तिचा मोबाईल हरवला होता. आणि नवीन मोबाईल सोबत नंबरही नवीनच घेतला होता तिने. बरोब्बर… !!! आता कळलं मला, आजींच्या मुलाने सुद्धा नवीन नंबर घेतला असेल सीम कार्ड चा. आणि त्याचा जुना नंबर माझ्याकडे आला असेल. त्याने आजींना नवीन नंबर दिला नाही किंवा विसरला. आजींकडे तोच जुना नंबर आहे. आणि त्यामुळेच त्या मला फोन लावत होत्या. असा प्रकार आहे सगळा. अक्षता मनातच खूप बोलत होती.
लवकरच आजींचा फोन आला, " हेलो अक्षता… पोहोचले गं मी… आता पुढे सांग… " , " आजी… आता समोर काय दिसते आहे ते सांगा मला. " , " समोर ना… दोन लहान गल्ल्या आहेत वाटते. " , " बरोबर… त्यांच्या आजूबाजूला काय आहे ते सांगा मला. " , " मला वाटते ना, एका गल्लीच्या तोंडावरच साड्यांचे दुकान आहे. " , " तुम्हाला दिसते आहे का ते तिथून. ? " , " हो… गं, समोरच साड्या दिसत आहेत मला, काचेतून. ", आजींच्या आवाजावरून त्या खूष वाटतं होत्या. आजीबाईना साड्या आवडतात वाटते. " आज्जी… तुम्हाला आवडतात वाटते साड्या. " , " हो… खूप आवडतात. आज बघ ना, मंदारने नवीन साडी आणून दिली. " अक्षताला जरा गंमत वाटली. किती खूष होत्या आजी. तिलाही जरा विचारावंसं वाटलं. " कोणत्या रंगाची साडी दिली मंदारने तुम्हाला ? ". " अगं अक्षता… मला ना निळा रंग खूप आवडतो. म्हणून त्याने निळ्या रंगाची साडी आणली, त्याला ना छान अशी मोराची नक्षी पण आहे. तीच साडी नेस म्हणाला, आपण फिरायला जाऊ, छानपैकी नेसली साडी, फिरायला आलो आणि हरवली मी. " बोलताना आजींच्या आवाजात जरा दुःख जाणवलं. " काळजी करू नका आजी. " यावेळात अक्षताने पुढचा रस्ता आठवला होता. तिनेही ते साडीचे दुकान पाहिले होते. ती गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीतून जायचे होते. " आजी , तुम्ही पोहोचाल घरी लवकर. …. तुम्ही त्या दुसऱ्या गल्लीतून चालत जा. आणि गल्लीच्या शेवटी पोहोचलात कि फोन करा. " , " बरं … बाई . " म्हणत आजींनी फोन ठेवून दिला.
मोबाईलची battery " ५ %"… घड्याळात संद्याकाळचे ६.४५ …अक्षता पुढचा रस्ता आठवू लागली. आता १५ मिनिटांचा रस्ता राहिला आहे फक्त. आजी काळोख व्हायच्या आत घरी पोहोचतील. त्यांच्या Area मध्ये पोहोचल्या तरी खूप झालं. तिथे कोणीतरी ओळखीचं भेटेल त्यांना. मग जातील घरी. अक्षता फोनची वाट पाहत होती. अक्षताला करमत नव्हतं. T.V. लावू का ? नको उगाच… लक्ष विचलित होईल माझं. ती तशीच बाल्कनीत आली. रस्त्यावरून चालणाऱ्या गर्दीकडे उगाचच बघत उभी राहिली. काही वयस्कर मंडळीही चालत होती , फुटपाथ वरून. त्यांना पाहून , त्या फोनवरच्या आजींची प्रतिमा तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ६० च्या आसपास असेल वय… , आवाजावरून तसंच वाटते, केस पिकलेले असतील. चष्मा तर घरीच राहिला. निळ्या रंगाची साडी, आवडता रंग. त्यावर मोराची नक्षी. छानच एकदम… मुलासोबत फिरायला आल्या आणि हरवल्या. गावात राहणाऱ्या , शहरात मुलाकडे आल्या असतील कदाचित भेटायला. लिहिता - वाचता येत नाही. आणि अनोळखी व्यक्ती बरोबर बोलायची सवय नाही. नाहीतर, एव्हाना विचारत विचारत घरी पोहोचल्या असत्या. बटव्यात असतील २० - २२ रुपयांची चिल्लर, फोन करण्यात ४-५ रुपये गेले असतील, उरले १६ रुपये. , १६ रुपयात रिक्षावाले त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत, बस तर जातंच नाही तिकडे . शिवाय आजींना रिक्षावाले आवडत नाहीत. त्यात आजीबाईना विसरण्याची सवय.…. या वयात नाहीच राहत काही लक्षात… मला वाटते त्यांची स्मरणशक्ती कमी असावी. घराचा पत्ता माहित नाही, इमारतीचं नाव माहित नाही… स्वतःच नावं विसरल्या… मुलाचं नावं तेवढं लक्षात आहे, शेवटी आई कसं विसरणार मुलाचं नावं…
आजींचा फोन आला , अक्षताने लागलीच तो उचलला. " हेल्लो अक्षता … आहेस का गं ? " , " हो… आजी, बोला… तुम्ही कूठे पोहोचलात ? " , " हो गं… आले मी… इकडे गल्लीच्या तोंडावर.","ठीक आहे आजी , पुन्हा सांगा काय आहे समोर ? " , " हो … हो, समोर ना , ३ गल्ल्या आहेत.… कुठे जाऊ ? " , अक्षता विचार करू लागली. ३ तीन गल्ल्या कुठे होत्या.… दोनच तर होत्या. आजी चुकल्या तर नाही ना… " आजी… मी सांगितलं तसंच गेलात ना . " , " हो गं पोरी , साडीच्या दुकानाची गल्ली सोडून दुसरी गल्ली… बरोबर ना… " ," हो " . मग तिसरी गल्ली कुठून आली… माझ्या आठवणीत तर २ रस्ते होते, नवीन रस्ता बनवला वाटते. " OK … काय आहे ते सांगा समोर तुमच्या. " , " तसं काही सांगता येत नाही गं. " , " काय झालं आजी… " , " अगं काळोख होतो आहे ना . मला जरा भीती वाटायला लागली आहे. " बरोबर होतं… काळोख होत होता. " आजी , घाबरू नका तुम्ही. तुमचं घर आता जवळ आलं आहे. "," मलाही घरी जायचे आहे गं पोरी . " , " जायचे आहे ना… मग सांगा , काय आहे समोर ?" , " एका ठिकाणी ना, विहीर आहे बहुतेक , कदाचित … दिसत नाही एवढं स्पष्ट, दुसऱ्या वाटेवर… लहानसं घर आहे. तिसरी वाट फारशी नीट दिसत नाही मला. काय करू ? " , अक्षताला नीटसं आठवत नव्हतं. कोणती वाट नेमकी ? विहीर तर होती तिकडे. तिला ते आठवलं. तिसरी वाट ? आणि ते दुसऱ्या वाटेवरच घर. ते कधी पासून होते तिकडे. मोठी पंचाईत. अक्षताला हे आठवत होतं कि एका वाटेवरून गेलं कि त्या वाटेच्या शेवटी , एक गोलाकार बाग लागते. परंतू कोणती वाट ते कळत नव्हतं.
" आजी, मला नीटसं आठवत नाही आहे आणि तुम्हाला काळोखात दिसत नाही आहे. एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला आजी आता . " , " काय गं ? " , " तिथे आसपास , शेजारी कोणी असेल ना. त्यांना विचारावं लागेल. ", आजी त्यावर काही बोलल्या नाहीत. " हेल्लो… हेल्लो , आजी आहात ना ? " , पलीकडून काहीच आवाज नाही. " आज्जी … आज्जी … " , मग आजी बोलल्या. " कोणाला विचारू… मला भीती वाटते गं. " , " आजी , घाबरू नका. तुम्हाला घरी जायचे आहे ना. आणि मला तिकडे नेमकं काय आहे ते माहित नाही. म्हणून तुम्हाला कोणाला तरी विचारावं लागेलच. " , " कसं विचारू आणि काय विचारू ? ". आजी आता खूप घाबरल्या होत्या. अक्षताला आजींचा राग आला.
च्यायला … मी यांना पत्ता शोधून देते आहे आणि यांना एवढंसं हि करता नाही येत.पण तिचा राग लगेच मावळला. संकटात सापडलेले कोणीही घाबरणार. आणि या आजी तर गावात राहणाऱ्या आहेत. त्या अजून घाबरल्या. " आजी… शांत व्हा… " , अक्षताने आजींना धीर दिला. " तुम्हाला नाही विचारायचे ना कोणाला… नका विचारू कोणाला, मी जरा आठवण्याचा प्रयन्त करते पुन्हा. " तेव्हाचं मोबाईल वर message आला. " connect your charger " बघते ते मोबाईलची battery " ३ % " , बापरे !! जास्त वेळ नाही आहे आता. ती घाई करू लागली.
" हेल्लो आजी, तुम्ही जिथून फोन करत आहात ना, तिथे कोणी आहे का बसलेले… म्हणजे टेलिफोन बूथ मध्ये कोणी व्यक्ती आहे का बसलेली ? ", " हो… हो, एक बाई आहेत बसलेल्या. " , " हा … मग त्यांना देता का फोन जरा . " , " देते हा. " , आजींनी टेलिफोन बूथमध्ये बसलेल्या बाईकडे फोन दिला. " हॆलो ? " , " हेल्लो. नमस्कार. त्या आजी आहेत ना, त्या रस्ता विसरल्या आहेत त्यांच्या घराचा. त्यांना जरा मदत कराल का ? " , " अहो पण… मी त्यांना ओळखत नाही आणि टेलिफोन बूथ सोडून मी नाही जाणार कुठे. ", आता अक्षताला त्या बाईंचा राग आला.
काय माणसं आहेत आत्ताची. जरा कोणाला मदत नको करायला.सगळा राग अक्षताने कंट्रोल केला आणि बोलली. , " ठीक आहे. तुम्ही नका जाऊ त्यांना सोडायला. पण रस्ता तर सांगू शकता ना तुम्ही त्यांना. " , " हा … रस्ता सांगू शकते त्यांना. " , " OK, मग मला सांगा, तुम्हाला समोर ३ गल्ल्या दिसत आहेत ना. " , " हो. आहेत ना. " , " OK. मग यातली कोणती गल्ली त्या गोल बागेजवळ जाते. तुम्हाला माहित आहे ना , ती बाग. गोलाकार बाग आहे ती. " , " हो . माहित आहे मला. ह्या मधल्या गल्लीतून पुढे चालत गेलं कि ती बाग लागते. " , " मधली म्हणजे कोणती गल्ली ती त्या आजींना सांगा जरा, प्लीज. " थोडावेळ काहीच आवाज नाही आला फोनवर. नंतर आजीच बोलल्या. " सांगितलं हा मला त्या बाईनी, कसं जायचे ते. " , " OK आजी, तुम्ही त्या गोलाकार बागेजवळ पोहोचलात कि मला तिथून फोन करा. " या आजी कधीपासून फोन करत आहेत मला. पैसे तरी आहेत ना त्यांच्याकडे आता, " आजी … पैसे आहेत ना फोन करायला. " , " ६-७ रुपये आहेत अजून. चल मी जाते आणि तिकडे पोहोचले कि फोन करते तुला. " म्हणत आजींनी फोन बंद केला.
Battery " २ % " , अक्षता बाहेर आली पुन्हा. शेजारच्या काकू अजूनही आलेल्या नव्हत्या. Battery संपत आली आहे मोबाईलची आणि तिकडे आजींचे पैसे संपत आले आहेत. या सगळ्या गोंधळात घड्याळाकडे बघायचे राहून गेले. बघते तर ६.५० झालेले.… बाहेरचा प्रकाश बऱ्यापैकी कमी झाला होता. रस्त्यावरचे दिवे हळूहळू चालू होत होते. मोबाईल वर पुन्हा " connect your charger " चा message आला. काय करू… काय करू… मोबाईल बंद झाला तर आजींना रस्ता कसा सांगू ?…. एक विचित्र गोष्ट होती. आजी कधीपासून फिरत आहेत , घरी जाण्यासाठी. त्यांचा मुलगा काय झोपला आहे अजून… तो कसा शोधत नाही आपल्या आईला ?, काहीतरी गडबड आहे. नाहीतर तो मोठया रस्ताने शोधत असेल. आणि आजी चालल्या आहेत short-cut ने. … पण या काकू कश्या आल्या नाहीत अजून.
अक्षता पुन्हा बाल्कनीत आली. मोबाईल हातातच होता तिच्या. ती विचार करू लागली. पुढचा रस्ता कसा होता ते. गोलाकार बाग होती तिकडे, तशी ती बाग जरा मोठीच होती. तिथून आजींना नीट रस्ता सांगितला पाहिजे.नाहीतर तिथे रस्ता चुकण्याची हमकास तयारी. कारण तिथून वेगवेगळे ६ मोठे रस्ते लागायचे. कोणत्या रस्त्याने जायचे माहित नसेल तर तिथे राहणाऱ्या लोकांचाही गोंधळ उडायचा. मी ही गांगरली होती तिथे गेल्यावर. आणि एका माणसाला विचारलं होतं मी , त्या गोल मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता.… हो… तिथे तेव्हा एक झाड होतं, पेरूचं झाड.… आताही असलं पाहिजे. नाहीतर आजींना रस्ता कसा सांगू… असलच पाहिजे. मोबाईलची battery अजूनही " २ % " .
काळोख तर झालाच होता. आजींचा फोन कसा आला नाही अजून… विचार करत होती अक्षता. इतक्यात फोन वाजला. " हेल्लो… आजी … पोहोचलात का ? " , " Hello… अक्षताच आहेस ना… ? " , " हो… हो, मीच बोलते आहे." , " अरे मी शलाका बोलतेय… कोण आजी ? माझ्या मोबाईलचा नंबर save आहे ना तुझ्याकडे " , " अगं… तू होय… मी घाईघाईत फोन उचलला, न बघता. " , " OK , माझं काम होतं जरा तुझ्याकडे अक्षता. " , " आता नको गं प्लीज… माझ्या मोबाईलची battery फार कमी आहे… मी तुला नंतर call करते हा, प्लीज जरा. BYE . " म्हणत अक्षताने call , cut केला. हिने पण आताच call करायला पाहिजे होता का…"१ % "
आणि अक्षताला बाल्कनीतून शेजारच्या काकू येताना दिसल्या. त्याचबरोबर आजींचा फोनही आला. " पोहोचले मी अक्षता… समोर बाग आहे मोठ्ठी. " , " आजी… कुठे थांबल्या होता का तुम्ही… वेळ लागला फोन करायला तुम्हाला.? " , " अगं, काळोखात नीट दिसत नाही ना. म्हणून हळूहळू चालत होते. " ," ठीक आहे . " म्हणत अक्षता मोबाईल घेऊन रुमच्या बाहेर आली. काकू जश्या आल्या, तसं तिने लागलीच त्यांच्याकडे चार्जर मागितला. " काकू… या मोबाईलचा चार्जर असेल तर त्या ना लवकर, प्लीज. " , "अगं थांब… दरवाजा तर उघडू दे मला. आणि तुझा कुठे गेला चार्जर ? " , " तो ऑफिसमध्ये राहिला. हा मोबाईल बंद होतं आला आहे, बंद झाला तर मोठा प्रोब्लेम होईल. प्लीज काकू… घाई करता का जरा. " तश्या काकूं दरवाजा उघडून आत पळाल्या.
" हेल्लो आजी, आता जरा सांभाळून जा हा… अंधार झाला आहे आणि पुढचा रस्ता गोंधळून टाकणारा आहे." , " सांग मला तू… जाते मी बरोबर. " आजीच्या आवाजात उत्साह होता. " बरं आजी, समोर जी गोलाकार बाग दिसते आहे ना. तिथे तुम्ही जा पहिले.… तिकडे सहा रस्ता लागतात. त्यातला एक रस्ता, त्या गोल मंदिराकडे जातो. त्या रस्ताच्या बाजूला…. " आणि फोन cut झाला. आजींनी फोन cut का केला ? … " हेल्लो… हेल्लो, आज्जी… ". फोन cut झाला होता. अक्षताने मोबाईलकडे पाहिलं. आजींनी फोन cut केला नव्हता , अक्षताचाच मोबाईल बंद झाला होता. Battery संपली होती. अक्षता तशीच उभी राहिली मोबाईलकडे पाहत. काकू चार्जर घेऊन बाहेर आल्या. " अक्षता… हा घे चार्जर. " , अक्षता तशीच उभी मोबाईल घेऊन, अक्षताच्या डोक्यात विचार चालू होते.…. तो रस्ता खूप वर्दळीचा आहे, प्रचंड ट्राफिक , मोठ्या गाड्यांची वाहतूक…. त्यात आजींना काळोखात दिसत नाही. घर तसं लांबच आहे अजून त्यांचं… अक्षता काहीच बोलत नव्हती, तशीच उभी होती. काकूंना काहीच कळत नव्हतं. " काय झालं अक्षता… बोल काहीतरी… बोल ना… " , अक्षताच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं…… " आज्जी… !!!! " .
to be continued..............................
It's nice story. ..kuthun suchatat hya story tumhala
ReplyDeletePlz next part lvkr blog vr aan.mla ha part thodasa bor vatla..pn tshi chan aahe
ReplyDeleteMastt aahe story....mobile charge nasel tar kashi reaction aste he tu khoop chaan lihala aahes..charge karnysathi kelele pratyana...sunderr...story vachatana imagine hi kartya yete....chaan lihali aahes...thodasa kadhitari lihavai...thodishi vegli story.
ReplyDeleteKhup chan aahe....." , अक्षताच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं…… " आज्जी… !!!! " .
ReplyDeletethis line is very Heart Touching
shit,
ReplyDeletechukichya thikani thamblat rao tumhi.
aata ithe malach kalgi vatayla lagli aahe. :) :)
sunder sunder. ati sunder.
kharach mast, pudcha bhag lavkr post kara.
ReplyDeleteKhup mast
ReplyDeletenice
ReplyDeleteNice story .... but please continue kara na sir story....
ReplyDelete