थोडसं ........कधीतरी ............
नमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )
Saturday, 13 March 2021
भटकंती..... नव्या मनांची !! ( भाग २)
Saturday, 13 February 2021
भटकंती..... नव्या मनांची !! ( भाग १)
" आम्ही ना दरवर्षी काही दिवस शहरात येतो. आमचा ग्रुप आहे ना ,आम्ही सर्वच येतो. काहींना शहरात खरेदी करायची असते , काही मित्रांना - नातेवाईकांना भेटायला येतात. ",
" मग पुन्हा जाता का भटकायला ? " ,
" भटकायला म्हणजे ..... आम्ही , आमचा ग्रुप फिरतच असतो. तेच तर जगणे आहे आमचे. शहरात राहायला जमत नाही म्हणून तर निसर्गात जगणे पसंद केले आहे. "
" भीती नाही वाटत का , रानाची - प्राण्यांची.. "
" त्यात काय घाबरायचे, निसर्ग हाच तर खरा गुरु आहे. सर्व काही शिकवतो , जगायला तोच तर शिकवतो ना .... ",
" छानच आहे रे ... आता काही निघणार पुन्हा ... मलाही यायला आवडेल पण थोडेच दिवस हा .... मला तुमच्या सारखे जमणार नाही. "
" हे काय , आत्ताच निघालो आहे परतीच्या वाटेकडे. एका ठरलेल्या ठिकाणी जमतील सर्व. मग निघू. आणि थोडे दिवस का होईना , निसर्गात ये , रमशील तिथे ... तुला एक विचारू का ... "
" विचार ना "
" आमची ग्रुप लीडर आहे ना , तिचा एक मित्र आहे ... आकाश , तो एक प्रश्न विचारतो कधी कधी... तोच तुला विचारतो ",
" विचार कि मग ",
" तू कधी पाऊस बघितला आहेस का ... " या प्रश्नावर दोघेही हसले.
सौरभ कधीपासून या दोघांची बडबड ऐकत होता. बस मधून प्रवास करत होता. त्याच्या पुढच्याच सीटवर हे दोघे बोलत बसले होते. त्या बसच्या प्रवासाने आधीच वैतागलेला , त्यात या दोघांचे अखंड बोलणे. " किती बोर करत आहेत हे .... जरा गप्प बसत नाही. " सौरभ मनातल्या मनात बोलला. " म्हणे काही पाऊस बघितला आहे का .... फालतूची बडबड नुसती , उगाचच आलो भारतात " सौरभ स्वतःशीच बोलला.
' सौरभ अभ्यंकर ' जन्म कॅनडामध्ये झालेला. त्यामुळे तिथले नागरिकत्व , त्याच्या जन्मानंतर दुसऱ्यावर्षीच आई-वडील पुन्हा भारतात परतून आले. सौरभचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो कॅनडामध्ये गेला. इंजिनियर झाला आणि तिथेच राहू लागला. तिथे त्याचे घर होते , जॉब लागल्यावर पुन्हा भारतात आला नाही. अधून-मधून आई-वडिलांना भेटायला यायचा मुंबईत. त्याला भारतात येणे तितके आवडायचे नाही, सर्वच गोष्टीना नावे ठेवायचा. इथले राहणीमान मुळात त्याला पसंद नव्हते. याच कारणाने त्याला कॅनडात राहावे वाटायचे आणि तो तिथेच राहायचा.
आताही लग्न ठरले होते. परदेशी राहत असला तरी मुलगी मराठीच असावी असे त्याचे आणि पालकांचे मत. मुलगी सुद्धा आईने पसंद केलेली. आईने त्याला फोटो पाठवले होते. सौरभला आवडली. दोघांनी एकमेकांना पसंद केले. त्यावेळेस २-३ दिवस सौरभ आलेला मुंबईत तिला भेटायला. पुन्हा कॅनडात निघून गेल्यावर , रोजच्या रोज दोघांचे कॉल असायचे. दोन्ही देशांत वेळेचा फरक असल्याने दोघांना सोईची वेळ बघून , एकमेकांशी बोलणे होयाचे. ३ दिवसांनी साखरपुडा होता म्हणून त्याचे तिथले काम संपवून , सुट्टी घेऊन मुंबईत आलेला. परदेशात राहत असला तरी लहानपणापासून घरी मराठीच बोलले जायचे. सौरभचे मराठी अगदी उत्तम होते. मराठमोळा मुलगा. आज तो ' तिला ' भेटायला निघाला होता , तर गाडी अर्ध्या वाटेत बंद पडली. भर दुपारी , मे महिन्याचे कडक ऊन... थंड ठिकाणी राहणाऱ्या सौरभला सोसत नव्हते. तिला भेटायला पुढे जावे कि नाही , बंद पडलेल्या गाडीचे काय करायचे, १५ मिनिटे या विचारात गेली. त्या वेळेतच घामाने अर्धा शर्ट भिजून गेला. घरीच जाऊ , म्हणत टॅक्सी थांबवायचे असंख्य प्रयत्न करूनही टॅक्सी काही थांबेना. पपांना कॉल करून गाडी बंद पडली ते सांगितले.
" घरी कसे येऊ ते सांगा. ",
" टॅक्सी असतील ना "
" पप्पा ... अर्धा तास झाला, या टॅक्सी वाल्यांना कसला माज आहे एवढा, कळत नाही. ते private गाडीवाले तेही available नाहीत... तुम्ही दुसरा option सांगा. " ,
" चालत तुला जमणार नाही, मग एकच पर्याय आहे. " ,
" कोणता? ",
" best bus !! ",
" common पप्पा !! तुम्हाला माहित आहे ना ... मला public thansport आवडत नाही ते. आणि इथला तर बिल्कुल नाही. ",
" आता मी पुढे काय बोलू यावर... कुठे उभा आहेस ते सांग , मेकॅनिकला पाठवतो. ",
" ठीक आहे ."
सौरभने त्याची लोकेशन पपांना सांगितली , अर्ध्या तासाने मॅकेनिक आला. त्याने गाडी बघितली.
" किती वेळ लागेल. ? ",
" निदान आजचा दिवस तरी ... ",
" What !!! ",
" हो सर , खूप वर्ष याची सर्व्हिसिंग केलेली वाटत नाही, त्यामुळेच मोठा प्रॉब्लेम झाला आहे, काही पार्ट सुद्धा बदलावे लागतील. वेळ तर लागेल ना सर."
आता काय करणार , त्या उन्हाने सौरभ वैतागलेला. गाडी बंद पडली , त्याचा डोक्याला ताप. मॅकेनिक गाडी घेऊन गेला. पपांना कॉल करून त्याने घराजवळ येणाऱ्या बसचे नंबर घेतले. त्याच्या जन्मापासून ते आजच्या दिवसापर्यंत , एकदाही लोकल ट्रेन किंवा बसने प्रवास न केलेला सौरभचा world record आज तुटला. सौरभ finally , नाईलाजाने का होईना ... बसमध्ये जाऊन बसला. बसमध्ये पुढे बसलेल्या या दोघांमुळे त्याचे डोके उठले होते. घरी पोहोचता क्षणी , सर्वात आधी जाऊन त्याने अंघोळ केली. A.C. लावून झोपून गेला.
===========================================================================
" कसला ठार वेडा माणूस आहे हा " रचना नकळतपणे मोठयाने बोलून गेली.
" ओ मॅडम ... आपण ऑफिसमध्ये आहोत , हळू जरा ... " रचनाच्या शेजारी बसलेली अर्चना बोलली. रचनाने स्वतःची जीभ चावली.
" sorry ... sorry ... लक्षातच राहिले नाही. " रचना स्वतःवरच हसायला लागली. रचना म्हणजे सौरभची होणारी बायको. रचना सध्या एका मोठ्या कंपनीत HR पदावर कार्यरत होती. तिची मैत्रीण , अर्चना तिच्या शेजारीच बसायची.
" लक्ष आहे कुठे ... आणि कोणाला वेडे ठरवले आहेस... ", अर्चनाने रचनाला विचारलं.
" अगं मंद .... म्हणजे तसा वेडा नाही... असा वेडा ... हे बघ ... " रचनाने तिला तिच्या PC वर दिसत असलेला एक फोटो दाखवला. अर्चनाने तो फोटो बघून डोक्याला हात लावला.
" किती वेळा तेच ते फोटो बघत राहतेस...ते मॅगजीन तर आहे तुझ्याकडे , दर महिन्याला त्याचे मॅगजीन विकत घेतेस. तरी तेच फोटो पुन्हा त्याच्या web site वर जाऊन बघत असतेस. तो बरा आहे , तुलाच वेड लागले आहे. ",
" बघ ना ... कसले भारी फोटो काढतो हा... त्याहीपेक्षा... हे असे निसर्गसौंदर्य ... कसे काय शोधून काढतो , देव जाणे... !! " रचना पुन्हा त्या फोटोत हरवून गेली.
" प्रेमात वगैरे पडलीस कि काय त्या फोटोग्राफरच्या... ",
" excuse me .... फोटोग्राफर नाही... आकाश नाव आहे त्याचे... त्याला काही बोलायचे नाही हा ... ",
" दिसतो कसा ... तरुण कि म्हातारा ..काळा कि गोरा ... ते माहित नाही, आणि मॅडम प्रेमात आहेत त्याच्या... तुझे लग्न ठरले आहे आणि ३ दिवसांनी साखरपुडा आहे ... विसरलीस कि काय .. ",
" हो गं ... साखरपुडा, लग्न ... सर्व लक्षात आहे. आणि तू बोलतेस तसे प्रेम नाही , पण आहे प्रेम... बघ ना .... इतके छान फोटो काढतो , पण स्वतःचा फोटो काढता येतं नाही. निदान एक सेल्फी तरी काढायचा ना ... FB , Instagram ... सर्व ठिकाणी शोधले .. एक फोटो नाही स्वतःचा.. " रचना बोलत होती.
" By the way , सौरभ येतं होता ना तुला भेटायला. अजून कसा आला नाही. रस्ता हरवला कि तो हरवला .. ",
" त्याची गाडीचं बंद पडली. आणखी सांगायचे तर , त्याला आपल्याकडचे ऊन सहन होतं नाही. घरी गेला परत. ",
" तो कॅनडा मध्ये राहतो ना ... मराठी कसले भारी आहे त्याचे .. " एकदा video call वर रचनाने अर्चनाची ओळख करून दिलेली सौरभ सोबत.
" किती प्रश्न गं तुला... त्याचे शिक्षण मुंबईत झाले. आणि घरी पण मराठीच बोलतात. त्याचे आजोबा होते ना , ते इथून कॅनडामध्ये जॉबसाठी गेले होते. माझे सासरे .... त्यांचा जन्म कॅनडा मधला... लग्न इथे मुंबईत. ",
" म्हणजे तुझी सासू पण महाराष्ट्रातली... ",
" मुंबईतली म्हण ... लग्न करून ते दोघे तिथे गेले. सौरभ झाला त्यानंतर पुन्हा भारतात आले. मग सौरभ पुढच्या शिक्षणासाठी तिथे गेला , तिथली सवय लागली , तिथेच राहू लागला. ",
" भारी ना !! तू पण तिथेच राहणार ना आता " ,
" हा ... म्हणजे.... तो काय इथे राहणार नाही. मलाच जावे लागेल.",
" जा .. पण आम्हाला .... सर्वात महत्वाचे मला विसरू नकोस. ", अर्चनाने बसल्या जागी मिठी मारली तिला.
" वेडीच आहेस. मी येणार ना तुम्हाला भेटायला. आणि अजून वेळ आहे लग्नाला.",
" तरीपण ... तिथे बर्फ पडतो ना ... तिथल्या वातावरणात रमलीस कि इथले ऊन विसरून जाशील." अर्चना बोलत असताना रचनाचे लक्ष पुन्हा त्या फोटोवर गेले.
डोंगरावर असलेल्या कोणत्या तरी एका पडक्या गडाचा फोटो होता तो. अर्धवट पडलेला गड, स्वतःवर पांढऱ्या शुभ्र ढगांची चादर लपेटून निद्राधीन झालेला भासत होता. त्याच्या उशाला हिरव्याकंच रंगाची अभूतपूर्व हिरवाई , संपूर्ण डोंगरभर पसरलेली. पायथ्याच्या जरावर, एका कोपऱ्यात .... एक सफेद रंगाचा पाण्याचा झरा ... स्वतःला उंचावून झोकून देतं होता. कड्यावरील ढगांच्या सावलीतून कुठल्यातरी पक्षांचा एक मोठा थवा , त्या ढगात विरघळून जात होता. डोंगरावर पसरलेल्या हिरव्या जंगलात एक लहानसे देऊळ लक्ष वेधून घेत होते. अर्थात आकाशचा क्लीक होता, रचना तोच फोटो कधीपासून बघत होती. " कॅनडामध्ये बर्फ पडतो. हिमवर्षाव !! सौरभ सांगतो ना ... सगळीकडे नुसता पांढरा शुभ्र बर्फ ....पण त्याला या हिरवाईची सर कधीच येणार नाही. तिथे गेल्यावर तुम्हा सर्वांना मिस करेन. सर्वात जास्त मिस करेन ते या निसर्गाला आणि पावसाला !! " रचना काम विसरून त्या फोटोत हरवून गेली.
=====================================================================
सौरभने मित्राला कॉल केला. " Hi .... कब आया तू .... बताया भी नही !! " समोरून आवाज आला.
" मराठी आहेस ना ... मराठीत बोलायला काही प्रॉब्लेम आहे का तुला " सौरभने उत्तर दिले.
" सॉरी यार ... सवय लागली आहे. तू ना तसाच आहेस अजून , सरळ तोंडावर बोलतोस ... सॉरी पुन्हा , कधी आलास ? " ,
" कालच आलो , माझे एक काम होते तुझाकडे. माझी कार बंद पडली आहे. पप्पांची आहे ती त्यांना लागते. ती घेऊ शकत नाही. तुझी दुसरी कार उद्या मला देऊ शकतोस का.. ",
" देतो ... उद्या सकाळी ड्राइवर कार घेऊन तुझ्या घरी येईल. ",
" ड्राइवर नको आहे मला. मी स्वतः चालवणार आहे."
" अरे मित्रा ... गाडी काय आपोआप तुझ्याकडे चालत येणार आहे का ... तुला चावी देऊन पुन्हा तो आमच्याकडे येणार ना " ,
" ठीक आहे. thank you !! साखरपुड्याला येतो आहेस ना... २० मे ला आहे. address पाठवला आहे तुला. ",
" येणार ना ... नक्की येणार. बरं ... एक विचारू का... रागावू नकोस ... ",
" विचार ",
" इंडिया आवडत नाही, तरी मराठी आवडते ... असे का ... आता कॅनडात तर कोणी मराठी बोलायला येतं नसेल ... मी मघाशी हिंदीत बोललो तर पट्कन बोलून दाखवलेस.. " सौरभने शांतपणे ऐकून घेतले.
" जवळचा मित्र आहेस म्हणून ..... नाहीतर आता वेगळ्या भाषेत उत्तर दिले असते. मराठी असल्याचा अभिमान आहे मला. मराठी मला इतर कोणत्याही भाषेपेक्षा जास्त जवळची वाटते. आईने तसेच शिकवले आहे मला, स्वतःच्या मातृभाषेचा आदर असावा. आदर करावा. तो तुमच्या सारख्या लोकांना जमत नाही. मराठीत बोलणे कमीपणाचे वाटते, मला नाही वाटत. कॅनडात सुद्धा कोणा भारतीयाशी बोलण्याचा संबंध आलाच तर सर्वात आधी त्याच्याशी मी मराठीतच बोलतो. मग त्या व्यक्तीची मातृभाषा कोणतीही असू दे , मला नाही फरक पडत. राहिला प्रश्न तो इंडिया न आवडण्याचा. मला आवडत नाही , अश्यातला भाग नाही. इथले राहणीमान आवडत नाही. जे श्रीमंत आहेत ते अधिक श्रीमंत आणि जे गरीब आहेत ते गरीबच. रस्ते ठीक नसतात.... वाढत जाणाऱ्या झोपड्पट्टी...आणि किती तरी कारणे आहेत. आज सकाळीच बसने प्रवास करून घरी आलो. ५-६ वर्षांपूर्वी ज्या बसेस होत्या , ट्रेन बघितलेली ... सर्व तसेच आहे असे वाटते. म्हणजे कधी कधी असे वाटते की लोकांना बदलायचे नाहीच आहे. ज्यात जसे आहोत ... तसेच राहायचे आहे त्यांना. या गोष्टी आवडत नाही मला... आणि तू ... तुझ्यासारखे अनेक जण असतील .... जे इथल्या व्यवस्थेला नावे ठेवतात ... तरी कोणाला बोलायचे नसते. मला आवडत नाही , ते बोलून दाखवतो. कळलं .... उद्या सकाळी कार लवकर येईल ना.... " ," हो ... " दोघांचे बोलणे संपले.
========================================================================
रचना लग्नानंतर कॅनडात राहणार होती. तिचा आज जॉबचा शेवटचा दिवस होता. मोठी पार्टी झाली. निरोप देताना रडणे वगैरे सुद्धा झाले. दोन दिवसांनी असलेल्या साखरपुड्याचे सर्वाना आमंत्रण देऊन रचना आज घरी लवकर निघाली. कानात इअरफोन घालून , आवडती गाणी ऐकत ट्रेनच्या दरवाजात उभी होती. लवकर निघाली असल्याने ट्रेन तशी रिकामी. मागे पळणारे जग पाहत, गाण्यात धुंद झालेली रचना , तिचे लक्ष सहजच आभाळाकडे गेले. दिसत असलेल्या आभाळात एकच लहानसा पण काळ्या रंगाचा ढग तिला दिसला. रचनाला गंमत वाटली. " पाऊस तर पुढच्या महिन्यात आहे.... हा कुठे एकटाच पळून चालला आहे. " स्वतःशीच रचना बोलली. नजरेआड होईपर्यंत रचना त्या ढगाकडे बघत होती. घरी आल्या आल्या जरा फ्रेश झाली आणि साखरपुड्याच्या तयारीत गुंतून गेली.
२० मे... आज दोघांचा साखरपुडा. दोन्ही मुले आपापल्या घरी एकुलती एक... त्यामुळे चांगलाच खर्च केला होता. सौरभ साठी खास A.C. असलेला हॉल ठरवला होता. रचना तयार होऊन घरीच होती. दुपारी १२ वाजता सोहळा आयोजित केलेला. हॉल घरापासून जवळच होता. अगदी १० मिनिटावर. घरातले अजून तयार होत होते. रचना... तिच्या आवडत्या ठिकाणी , बाल्कनीत येऊन बसली होती. मे महिन्यातली दुपार , उन्हाचा पारा चढलेला. कडक ऊन. " सौरभला ऊन आवडत नाही.... पावसाबद्दल काय मत आहे त्याचे देव जाणे. काय बोलणार त्याला... " असा विचार करत असताना , ऊन जरासं कमी झाल्यासारखे वाटले. साहजिकच तिने वर पाहिले. वर आभाळात एक मोठ्या आकाराचा काळ्या रंगाचा ढग संथपणे मार्गक्रमण करत होता. कमाल वाटली तिला. त्यादिवशीही असाच ढग दिसला होता आपल्याला.... मनाशी बोलत होती रचना आणि आईने हाक मारली. सर्व तयारी झालेली तर निघाले.
छान झाला साखरपुडा. खूप जण आलेले. रचनाचे जवळपास पूर्ण ऑफिस आलेले, असे म्हणा हवे तर. सौरभचे मित्र - नातेवाईक... किती ती गर्दी. सजावट उत्तम , पाहुण्याचे स्वागत उत्तम , सर्व काही छान छान झाले. सौरभ - रचना दोघेही खुश. निघेपर्यंत संध्याकाळ झाली. सौरभ ... रचनाचा निरोप घेऊन त्याच्या आई-वडिलासोबत घरी निघून गेला. रचनाचे सर्व सामान वगैरे आटोपून निघणार होते. त्यामुळे ते थांबले होते. रचना फार आनंदात. त्या आनंदात ती हॉलच्या एका खिडकीसमोर येऊन उभी राहिली. सौरभ निघून गेल्यावर A.C. बंद केलेले, खिडक्या उघडल्या. पुढच्या आयुष्याची स्वप्ने रंगवत , स्वतःशीच हसत रचना तिथे उभी होती. सूर्यदेव परतीच्या वाटेकडे निघालेले. आभाळाचे नारंगी होत जाणारे रंग पाहताना रचनाला पुन्हा तो दुपारचा काळा ढग दिसला. अचंबित झाली. एक वेगळ्याच प्रकारची चलबिचल मनात सुरु झाली. " असे का होते आहे मला.... याआधी तर कधी असे वाटले नव्हते... आज अशी का हुरहूर मनाला लागून राहिली आहे. " रचना विचारात गुंतली.
========================================================================
२० मे ला साखरपुडा आणि ३० मे ला लग्न... असा सौरभचा प्लॅन होता. लग्नानंतर लगेच ३ दिवसांनी ते कॅनडाला निघणार होते. या दरम्यान दोघे खरेदी साठी जात , एकमेकांना वेळ देत होते. रचना तर भलतीच आनंदात , लग्न होणार होते ना. अश्यातच , २५ मे ला एक बातमी आली. सौरभच्या एका नातेवाईकाचा अपघात झाला. मोठा अपघात झालेला. अशात लग्न करणे बरोबर नव्हते. सौरभला काही प्रॉब्लेम नव्हता तरी त्याच्या आई-वडिलाना ते पटत नव्हते. रचना आणि तिच्या आई-वडिलांना सांगून योग्य निर्णय घ्यावा असे ठरवले. लग्न पुढे ढकलले. हा निर्णय दोघांच्या घरून घेण्यात आलेला.
रचनाला थोडे वाईट वाटले. काय करणार आता. असे म्हणत ती सकाळी सकाळी बाल्कनीत चहा घेऊन उभी होती. डोक्यात तेच विचार. बाकी, तिला खूप आधी पासून अशी बाल्कनीत चहा पिण्याची सवय. चहाचा एक एक घोट घेता घेता तिचे लक्ष सहजच आभाळात गेले. आज ढग दिसतात का ते बघू... असे म्हणत तिने वर पाहिले. यावेळेस तिला २ ढग दिसले. एकमेकांचा हात हातात घेऊन प्रवासाला निघाले असावे , असा भास झाला. याना मला नक्की काय सांगायचे आहे , ते कळत नाही.
अश्यातच सौरभचा कॉल आला. त्याने या सर्वाना घरी बोलवले होते. त्याच्या घरी पोहोचल्यावर मोठी मिटिंग झाली. विषय = लग्न. सौरभचे अपघात झालेले नातेवाईक... त्यांची तब्येत stable होती.
" ते बरे आहेत ना ... मग ३० मे ला करू ना लग्न. आता काय प्रॉब्लेम आहे. " सौरभ वैतागून मोठ्या आवाजात बोलला. त्याच्या आईने शांत केले.
" आपण लग्न पुढे ढकलले. हॉल cancle केला. आपण लग्न करणार नाही तर त्यांनी दुसऱ्यांना हॉल दिला. " आईने माहिती पुरवली.
" असे कसे ... मग दुसरा हॉल बघू.. " सौरभ.
" नाही बाळा ... तेव्हडे सोप्पे नसते ते. २-३ महिने आधी बुक करावा लागतो. " रचनाच्या वडिलांनी माहिती दिली.
" हो बरोबर बोलले ते. आणि हे महिने लग्नाचे असतात. सर्वच हॉल बुक असतात. "
" एकही नाही... " सौरभ.
" तुला एवढीच घाई असेल तर मी हॉल बघतो. पण non ac मिळेल ... तुला चालेल का .. " त्याचे वडील बोलले.
" come on पप्पा !! तुम्हाला माहित आहे ना .... माझे प्रॉब्लेम. ... ok .... ठीक आहे. मग तुम्हीच सांगा. हॉल कधी available असतील ते. " सौरभ
" ऑगस्ट महिन्यात.... " सौरभची आई बोलली.
" NO way ... एवढ्या महिन्यांनी... नाही चालणार.... मला सुट्टी तरी मिळेल का इतके दिवस. " सौरभ पुन्हा मोठ्या आवाजात बोलला.
" सौरभ .... ऐकून तर घे.... दुसरा काही option आहे का ... " खूप वेळ गप्प असलेली रचना बोलली.
" मग मी जातो ... जॉबसाठी... लग्नाची तारीख ठरवा ... हॉल बुक करा ... ४-५ दिवस आधी येईन मी... " सौरभ बोलला.
" अजिबात नाही... तू कुठे जाणार नाही आहेस. माझ्यासोबत राहायचे. मी काय करू घरी बसून... तुझ्यासाठी जॉब सोडला ना. आता तू मला कंपनी दे... " रचनाने सौरभला गप्प केले. बाकी सर्वाना हसू आलं.
" ठीक आहे ... आता काय बोलू .... पण ऑगस्ट महिना ... जमल्यास १ ऑगस्ट पण चालेल... आता एकच प्रॉब्लेम आहे. सुट्टीचा. " सौरभ बोलला.
" तुझ्या सुट्टीचे सांगूच नकोस... किती काम करतोस .. थोड्या दिवसांनी ती कंपनीपण तुझ्या नावावर करतील. गेल्या महिन्यात तर सांगत होतास मला... कि ५-६ महिन्याची सुट्टी बाकी आहे. तुला सुट्टी देणार नाहीत हे पटत नाही मला. " सौरभची आई बोलली. सौरभचे सर्व प्रश्न मिटले आणि लग्नाचे tension सुटले.
रात्री सौरभ सोबत कॉलवर बोलणे सुरु होते. तसे ते आता रोजच फोनवर बोलायचे. आजही. थंड हवेची झुळूक रचनाच्या गालावरून गेली. तस तिला कोणी तरी फुंकर मारल्याचा भास झाला. आजूबाजूला पाहिले. कोणीच नव्हते. आपसूकच तिने वर पाहिले. पावसाच्या ढगांचा रंग रात्रीच्या काळोखात सुद्धा ओळखता येतो. त्या ढगांची एक लांबच लांब रांग लागलेली होती. सौरभ सोबतचे बोलणे विसरून ती त्याकडे बघत राहीली. सौरभला नंतर कॉल करते सांगून कॉल कट्ट केला. इतके दिवस डोक्यात सुरु असलेला विचार तिच्या मनात शिरला. काही मनात ठरवून ती झोपायला आली.
सकाळी उठून तिने आपला विचार आधी तिच्या आई-वडिलांना सांगितला. ते सांगायला तिने तिची खास मैत्रीण , अर्चनाला बोलवले.
" प्लिज ...... प्लिज ..... प्लिज पप्पा !! जाते ना मी ... "
" तुला कधी अडवले आहे का ... आई कडून सुद्धा परवानगी आहे " तिच्या पप्पानी परवानगी दिली.
" हे खूळ अचानक कसे " अर्चनाने विचारलं.
" अगं .. गेले काही दिवस ना .... ते आभाळात पावसाचे ढग येतात ना .. प्रवास करणारे... त्यांना बघून सारखे काही वाटायचे ... नक्की ती भावना काय ते कळत नव्हते. काल रात्री पुन्हा ते काळे ढग दिसले आणि मी ते सारखे सारखे बघत असते ते , निसर्गाचे फोटो अचानक नजरे समोर आले. तेव्हा ती भावना कळली मला... हे ढग मला काही सांगतात असे भासले, आमच्या सोबत प्रवासाला ये , असे बोलवतात मला. लग्न पुढे गेले आहे. तर विचार केला... जाऊया त्यांच्या सोबत... ",
" एकटीने ?? ",
" सौरभला घेणार सोबत, त्याला सुट्टी आहे आता .. कधी फिरणार तो आपला महाराष्ट्र... " रचना बोलली.
" त्याला ऊन झेपत नाही ... असा फिरायला तयार होईल .... सांगणार कोण त्याला .... एकतर कडक स्वभाव... " अर्चना बोलली.
" अर्चना ... सौरभ बाहेर कडक वागत असला तरी रचना त्याला बरोबर गप्प करते. घाबरतो तिला " आई बोलली.
" काही काय आई .. " रचना लाजली. " आहे स्वभाव जरा कडक ... मनात येईल ते बोलतो... चांगले , नीटनेटके वागणे त्याला जास्त आवडते. त्याचा जास्त वेळ तिथे थंड ठिकाणी गेला म्हणून त्याला ऊन सहन होत नाही इतकेच... " ,
" तरी प्रवासाचे काय... तो तयार होणार नाही. " अर्चना.
" मी बोलते त्याच्याशी .... नाहीच तयार झाला तर एकटीने जाणार पण जाणारच .... " रचना आत्मविश्वासाने बोलली.
त्याच दुपारी तिने सौरभला कॉल केला. सर्व सांगितलं. तो तयार होईना. " कमीत कमी २ महिने आहेत लग्नाला. रोज रोज, त्याच त्या जागी किती फिरायचे. एक प्लॅन केला आहे. तिथे आपण दोघे फिरायला जाऊ. तुला पण आवडेल. " सौरभ फक्त ऐकत होता.
" हॅलो .... हॅलो... are you there .... " रचनाने त्याला पुन्हा विचारले.
" हो, ऐकतो आहे. ",
" मग बोल ना काही , मला वाटलं कॉल ठेवून दिलास. मी काय एकटीच बोलते आहे. "
" हम्म ",
" हम्म काय ..... प्लॅन कसा वाटला ते सांग "
" रचना.... मला एक urgent कॉल येतो आहे. तो घेऊ का... मी करतो तुला कॉल ... Bye ... ",
" ok ... मी ... " रचनाचे बोलणे सुरु होते तरी त्याने कॉल कट्ट केला.
त्याच्या कॉलची वाट बघत संध्याकाळ झाली. कंटाळून तिनेच कॉल लावला पुन्हा. " रचना.... तुला बोललो ना , मी करतो कॉल... माझे जरा काम सुरु आहे. सकाळपासून त्यातच आहे मी. "
" सुट्टीवर आहेस ... विसरलास वाटते. ",
" सुट्टीवर आहे. तरी त्यांना urgent पाहिजे होते. तुम्ही तर मला कॅनडाला जाऊ दिले नाहीत. काही काम नव्हते म्हणून करतो आहे , त्यांना तेवढीच मदत.. "
" छान ..... very nice ... कामच करत बस हा ... " रचनाने रागात कॉल कट्ट केला. मोबाईल switch off करून , मोबाईल घरीच ठेवून ती बाहेर एकटी फिरायला निघून गेली. रात्री थेट जेवायला घरी आली.
" आहेस कुठे तू .... " आई बोलली.
" का ... काय झालं ... " रचना घरात आली.
" तुझा मोबाईल का बंद आहे. सौरभने किती वेळा कॉल केला तुला , टेन्शन मध्ये आहे तो... शेवटी मला कॉल केला त्याने... तू आधी त्याला कॉल कर. " आई बोलली.
" दुपारी केलेला कॉल .... नंतर संध्याकाळी .... तो त्याच्या urgent कामात बिझी होता. मग कशाला कॉल करू त्याला. "
" जा गं .... बोल त्याच्याशी... कसे दोघांचे जमणार .... मला तर आता पासूनच टेन्शन आले आहे. " रचनाची आई बोलत बोलत किचनमध्ये निघून गेली. रचनाला हसू आलं. कसा टिपिकल आई सारखा डायलॉग मारला , असं म्हणत तिने सौरभला कॉल लावला.
" कधीपासून कॉल करतो आहे... मोबाईल switch off का केला होतास... " सौरभ जरा जास्तच मोठ्या आवाजात बोलला.
" गंमत सांगू का तुला ..... हा मोबाईल ना माझा आहे ... तो बंद ठेवावा कि सुरु .. ते मी ठरवणार ... आणि अजून एक गंमत सांगते , मला हळू बोलले तरी ऐकायला येते. हळू आवाजात बोलणार असशील तर ... नाहीतर माझे कान दुखवायचे नाहीत मला.... " रचनाचे बोलणे ऐकून सौरभ नरमला.
" झाले का काम ... नाहीतर पुन्हा बोलशील ..... urgent काम आहे , नंतर बोलू .. " ,
" आता वेळ आहे ... बोल .... सकाळी काय बोलत होतीस. "
" दुपारी बोलले ते ऐकले नाहीस वाटते ... "
" सॉरी बाबा ... सॉरी ... नको रागावू ... "
" हम्म ",
" तुझा प्लॅन समजला मला , पण ते मला जमेल असे वाटत नाही. "
" try केलेस तर जमेल .. ",
" कसे तू सांग "
" पण सुरुवात तर करू .... ",
" आणि कुठे फिरायचे... "
" इथेच .... आपल्या महाराष्ट्रात ... "
" महाराष्ट्र काय मुंबई इतका लहान वाटतो का तुला... "
" जास्त दूर नाही जायचे. मन भरले कि घरी परत. "
" आणि तुझे मन नेमके कधी भरणार. "
" ते गेल्या शिवाय कळणार का .. " रचनाकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते.
" बघू ... विचार करून सांगतो. "
" आता कसला विचार .. सुट्टी आहे ना , तर उपयोग करून घे . काम बाजूला ठेव जरा ..... मी important कि तुझे काम... "
" तसे तर तुम्ही दोन्ही माझ्यासाठी important आहात. "
" काम ठेव रे बाजूला ... "
" जर फिरायला जायचे आहे .. तर मग काश्मीर किंवा केरळला जाऊ... मला जायचेच आहे तिथे. "
" नाही... मला महाराजांचे गड बघायचे आहेत. "
" बापरे !! म्हणजे ट्रेकिंग करायला लावतेस कि काय... नाही हा ... मला उंचावर वगैरे जायचे नाही. आपण केरळला जाऊ ... नाहीतर काश्मीर बेस्ट आहे.... थंड हवेचे ठिकाण. "
" गप रे ... मला आता वाद घालायचा नाही. मी जाते जेवायला. तू विचार कर. मी उद्या सकाळी कॉल करते .. उत्तर तयार ठेव ... आणि ' हो ' हेच उत्तर पाहिजे आहे मला. " म्हणत रचनाने कॉल कट्ट केला आणि जेवायला गेली. सौरभचे टेन्शन वाढवले.
दुसऱ्या दिवशी , सौरभने कॉल केला. सुरुवातीचे good morning ...... चहा घेतला का ... वगैरे वगैरे ... विचारून झाल्यावर रचना पुन्हा मूळ मुद्दावर आली. कालच्या रात्रीचा विषय , सुरुवातीपासून सुरु झाला. रचनाने तिचा प्लॅन सविस्तर सांगितला.
"अगं ... तुझे सर्व म्हणणे ठीक आहे. माझंही विचार कर जरा. आपण कॅनडात गेलो कि जाऊ फिरायला. तुला पाहिजे तिथे , हवे तितके दिवस फिरू. तिकडचे सर्व main point मला माहित आहेत. तुला निसर्ग बघायचा आहे ना. तिथेही आहे कि निसर्ग सौंदर्य. एकतर इथला उन्हाळा मला जमत नाही आणि समज त्या अनोळखी ठिकाणी जाऊन हरवलो तर .... मला काहीच माहिती नाही इथली. म्हणून बोललो कि तुझा प्लॅन चांगला आहे पण मला जमणार नाही. " सौरभचे बोलणे रचनाने ऐकून घेतले.
" Fine ... तुला जमणार नाही , No Problem .... मी एकटी जाते .",
" अगं पण .... ",
" तुझे सर्व ऐकते ना मी, आतापर्यंत सर्वच गोष्टी तुझ्या मनासारख्या झाल्या ना ... एकच गोष्ट ... माझी मला करू दे. तुझ्यावर कुठे जबरदस्ती केली, येण्यासाठी. तुला जे जमत नाही , ते तू कधीच करत नाहीस ... हे सुद्धा मला माहित आहे. त्यासाठी बोलले कि मी एकटी जाते. तू नाही आलास तरी चालेल. " रचनाने सौरभला निरुत्तर केले.
" आपण संध्याकाळी भेटतो आहोत ना... ",
" हो मग ... ",
" हो हो .... रागवू नकोस .. ",
" मी कुठे रागावले ... तू ये संध्याकाळी घरी... " म्हणत रचनाने कॉल कट्ट केला. तस बघावे तर सौरभ तिला जरा घाबरायचा. त्यात आताच्या बोलण्यावरून तरी तिचा पारा नक्की चढला असणार , हेच त्याने गृहीत धरलेले. म्हणून संध्याकाळी भेटायला जाताना गुलाबाचा छान असा बुके घेऊन गेला. रचनानेच दरवाजा उघडला. आज घरी एकटीच होती. तिचे आई-वडील खरेदी साठी बाहेर गेलेले.
" चहा घेशील ना ... " रचनाने त्याच्याकडे न बघताच विचारले.
" चालेल ... "
"हम्म ... " रचना किचन मध्ये गेली. तिच्या पाठोपाठ सौरभ.
" ते बुके वगैरे आणायची काही गरज नव्हती. सकाळीच बोलले तुला... मी रागावली नाही. " सौरभ ओशाळला. त्याचा चेहरा बघून रचनाला हसू आले.
" लग्नाआधीच एवढा घाबरतोस. लग्नानंतर काय करशील. " रचनाचे हसणे बघून सौरभ सावरला. चहा घेऊन दोघेही बाहेर आले. सौरभ खुर्चीवर बसणार तोच रचना बॊलली.
" चल ना ..... बाल्कनीत उभे राहू. मला तशीच चहा घेयाला आवडते . " दोघेही बाल्कनीत येऊन उभे राहिले आणि चहा पिऊ लागले.
" पण खरं सांग ... सकाळी रागावली होतीस ना माझ्यावर ... ",
" नाही रे बाबा... आणि तू इतका काय घाबरतोस मला... chill !!! बाकी , इतर लोकांसमोर कसा कडक वागतोस .. तुझा स्वभाव तसाच आहे म्हणा ... तरी मला ... " रचना बोलता बोलता हसू लागली.
" मग काय .. तुझ्या बोलण्यावरून तसेच वाटले .... मी जाते एकटी ... तू नाही आलास तरी चालेल.... कशी पटकन बोललीस... घाबरलो मी... " चहाचा एक घोट घेत रचना त्याच्याकडे बघत होती. संध्याकाळची वेळ सूर्य अस्ताला जात होता. आभाळात काहीसे लहान - सहान काळे ढग प्रवासाला लागले होते.
" हे बघ .. एकदम सोप्पे करून सांगते. मी माझे ...... इकडचे सर्व मागे सोडून तुझ्यासोबत कॅनडाला यायला तयार झाली आहे. पुन्हा इथे कधी येणार ते माहित नाही. शिवाय पुन्हा असा वेळ मिळेल का ... ते सुद्धा माहित नाही. आता आपले लग्न पुढे गेले आहे , वेळ आहे तर वाटले.... जाऊ भटकायला. तुला विचारले, कारण तू माझा future partner आहेस. न सांगता गेली असती तर काय कळले असते तुला... ",
" तरी पण ... माझे प्रॉब्लेम सांगितले ना तुला.",
" तुझे प्रॉब्लेम खरे आहेत ,हि गोष्ट मी मानते , ते ऐकूनच मी एकटीने प्रवास करावा असे ठरवले तर त्यालाही तुझा नकार.... पुरुष-स्त्री एकसमान मानतोस ना ... मला हा प्रवास एकटीने जमणार नाही , असे तर वाटत नाही ना तुला.." सौरभची चहा संपली होती.
" असे काही नाही... अनोळखी ठिकाणी हरवलीस तर तुला शोधायला कुठे येणार. ",
" Exactly !! एवढा कामात बुडालेला असतोस कि कॅनडात किती ठिकाणी फिरला असशील ते माहित नाही. मुंबईत इतक्या वर्षात किती वेळेला आलास, ते सांग. आणि जेव्हा जेव्हा आला असशील तेव्हा तेव्हा पूर्ण दिवस घरातच A.C.बसून काढला असणार ... बरोबर बोलते आहे ना ... " सौरभ काहीच बोलला नाही.
" या अश्या अनोळखी ठिकाणी तुला घेऊन जायचे होते म्हणून तर एकत्र जाऊ , असा प्लॅन केला. तुला यायचे नाही. आमच्या इथे तुमच्यापेक्षा छान अशी ठिकाणे आहेत ... जिथे जाऊन मनःशांती मिळते. " रचना बोलत होती , सौरभ ऐकत होता.
" चहा संपला असेल तर कप देशील.... रिकामा कप हातात ठेवून तो काही पुन्हा आपोआप भरणार नाही... हवा आहे का चहा अजून .. " सौरभने नकार दिल्यावर रचना कप ठेवायला आतमध्ये गेली .
चहाचे कप धुवून झाल्यावर रचना बाहेर आली तरी सौरभ बाल्कनीत उभा. कोणत्यातरी विचारात गुंतलेला. तिने त्याच्या डोळ्यासमोरून हात फिरवला. सौरभ भानावर आला.
" कुठे हरवलात साहेब .... ",
" कुठे नाही. ",
" मग एवढा कसला विचार करत होतास. टेन्शन अजिबात घेऊ नकोस. मी सुखरूप घरी येणार. ",
" कधी निघायचे आहे. ? ", सौरभ पुटपुटला. रचनाला वाटले काही चुकीचे ऐकले.
" काय ... काही बोललास का .... कि मी चुकीचे ऐकले. कधी निघणार आहेस , असे विचारायचे आहे का तुला.... " रचनाने विचारले तसा सौरभने तिच्या हातावर चिमटा काढला.
" शहाणीच आहेस गं... जे ऐकलेस ते बरोबर... तुलाच पुन्हा ऐकायचे आहे ते सांग. ",
" अरे बाबा !! एवढ्या हळू आवाजात बोललास. काय ऐकायला येणार. बोल ना ... नक्की काय बोललास. "
" मी विचारले ... आपल्याला कधी निघायचे आहे ... तुझ्या भटकंती साठी. ",
" what !!! म्हणजे तू पण येणार ना .. ", रचना आनंदाने ओरडली. सौरभने मानेनेच होकार दिला.
" किती गोड !! thank you ..... thank you so much !! " म्हणत त्याच्या गालावर किस करत मिठी मारली.
" अगं .... हो ..हो ... किती तो आनंद, कधी निघायचे ते तरी सांग. " रचनाची मिठी सोडवत सौरभ बोलला.
" हा ... ते राहिले सांगायचे. " रचना सावरली.
" आज तारीख आहे २९ मे. साधारण पणे ७ जून नंतर पावसाळा सुरु होतो. पण गावच्या बाजूला , जिथे डोंगर वगैरे असतात तिथे आधीच सुरु होतो , एव्हाना सुरूही झाला असेल.",
" मग उद्या निघायचे का... ",
" नाही रे ... उद्या कसे लगेच जाणार. तयारी करायला नको का ",
" हा ... तयारी करावी लागेलच. मग तू कोणता दिवस ठरवला आहेस. ",
" मधल्या दिवशी जाऊ ... कॅलेंडर बघून सांगते. "
" अरे मोबाईल मध्ये असते ना कॅलेंडर.. " सौरभने लगेच मोबाईल बघितला. रचना सुद्धा बघत होती.
" थोडे दिवस ... सुरुवातीचा पाऊस पडून गेला कि हिरवळ दिसायला लागते. लवकर गेलो आणि पाऊस भेटलाच नाही तर... एक चांगला दिवस बघून जाऊ. " म्हणत रचना दिवस बघू लागली. " ११ जून ... मधलाच दिवस आहे. हा दिवस कसा वाटतो. "
" तुला जी सोयीची वाटते ते तारीख घेऊ." सौरभच्या वाक्यावर रचना आनंदली.
" पण एक प्रश्न आहेच माझा. "
" आता कोणता प्रश्न... आता भटकंतीला नकार देऊ नकोस हा ... ",
" नकार नाही गं.... किती दिवसांसाठी जायचे आणि सर्वात आधी .... पहिले ठिकाण कोणते... ते तरी ठरवले असशील ना.. " सौरभचा प्रश्न बरोबर होता. रचना विचारात पडली.
" किती दिवस जायचे ते ठरवले होते मी...... कमीत कमी ७ दिवस तरी.... पण आधी कुठे जायचे तेच माहित नाही मला... " रचनाच्या उत्तरावर सौरभने तिला एक टपली मारली.
" कुठे जायचे ते माहित नाही आणि मॅडम एकट्या निघाल्या होत्या. ",
" Sorry !! "
" एक काम करू.. निदान १० दिवस तरी आहेत अजून. तोपर्यंत तयारी करू. तू तुझे नक्की कर , कुठून सुरुवात करायची ते. त्याची माहिती काढ. मी बाकीच्या गोष्टी जमवतो."
" best !! चालेल चालेल ... thank you so much !! " म्हणत रचनाने पुन्हा त्याला मिठी मारली.
त्याच दिवसापासून सौरभ कामाला लागला. रचना इंटरनेट वर माहिती गोळा करू लागली. पुढच्या ७ दिवसात सौरभने सर्वच सामान गोळा केले. किमान आठवडाभर राहावे लागणार म्हणून दोघांना पुरेल असा एक मोठा तंबू , ४- ५ दिवसांसाठी लागणारे कपडे, मोबाईल साठी extra power backup , first aid box , शिवाय आजारी पडलो तर जास्तीचे औषध , गोळ्या, सुका खाऊ , आंघोळी साठी साबण , टूथब्रश , टूथपेस्ट... पाण्याची एक जास्तीची बाटली आणि कॅमेरा. सर्व तयारी झाली. त्याहून त्यांनी त्या दिवसात घरच्या घरी तो तंबू उभा करण्याची प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली. २ मोठया सॅक भरून तयार होत्या. सौरभ एकदम तयारीत फक्त रचना कोणते ठिकाण सांगते त्याची वाट बघत होता.
आदल्या दिवशी दोघांची मीटिंग झाली. " ठिकाण ठरले आहे... " रचनाच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. " कोणते ?? " सौरभ ही एकदम उत्साहात.
रचनाने wild india चे मॅगजीन सौरभ समोर धरले. " यातला पहिलाच फोटो बघ. " रचनाच्या हातातले मॅगजीन सौरभने घेतले.
आतल्या पहिल्याच पानावरचा फोटो त्याने पाहिला. आपसूकच त्याच्या ओठांतून शब्द बाहेर पडले.
" Amazing click !! " सौरभने त्या खाली लिहिलेले ठिकाणचे नाव वाचले. " राजमाची !! इथे जायचे आहे का ... "
" हो ... मी सर्वात पहिला बघितलेला हा फोटो... तेव्हापासून निसर्गाच्या प्रेमात..... आणि हे जास्त दूरही नाही मुंबईपासून.. कर्जतला ट्रेनने जायचे. आणि तिथून काही अंतरावर आहे... आज रात्री निघू. "
" काय ..... आज रात्री .... आणि ट्रेन कशाला.... गाडी आहे ना माझी. ",
" साहेब .. गाडी कुठे पार्क करणार... आणि आपण भटकंती साठी निघाल्यावर गाडीकडे कोण बघणार. ट्रेनने जलद प्रवास होईल. ",
" आज रात्रीच निघायला पाहिजे का .... उद्या सकाळी.... ",
" बघ ... इथून कर्जतला पोहोचायला कमीत कमी २ तास .... त्यापेक्षा जास्तही लागू शकतो वेळ. कर्जतला पोहोचल्यावर आजची रात्री एखाद्या हॉटेलमध्ये थांबू. मग पहाटे राजमाचीसाठी निघू . वर पोहोचेपर्यंत किती वेळ लागेल ते मला माहित नाही. पहाटे पहाटे निघालो तर तुला उन्हाचा त्रास होणार नाही. पुढे ऊन आले कि खाली पायथ्याशी येऊ शकतो ना.... मग पुढचा प्रवास... कशी वाटली प्लॅनिंग ... " सौरभला ट्रेनचा वैताग पण आता निघायचे ठरले तर जावेच लागणार. काही पर्याय नव्हता.
ठरल्याप्रमाणे , दोघे ट्रेनने सर्वात आधी कर्जत साठी निघाले. कसाबसा ट्रेनमध्ये शिरला. आधी गर्दी बघून पुन्हा घरी जावे असेच त्याच्या मनात आलेले. आणि एवढी मोठी सॅक घेऊन त्याला आतमध्ये सुद्धा चढू देतं नव्हते. ते झाले. उभ्या उभ्याने प्रवास .... सोबत भरलेली सॅक, ३ तासाने कर्जतला उतरला तेव्हा अंगात ताकद नव्हती त्याच्या. रचनाला ट्रेनची सवय , त्यामुळे तिचा प्रवास छानच झाला. रात्री ११ वाजता ते एका हॉटेलमध्ये गेले , एका रात्रीसाठी रूम बुक केली. पहाटे ५ वाजता निघू असे रचनाने सौरभला सांगितले. सौरभने डोक्याला हात लावला आणि तसाच काही न खाता झोपूनही गेला. रचना मात्र पहाटे .... भटकंतीला सुरुवात होणार , याच विचारात रात्री उशिरापर्यंत जागी होती.
सकाळी बरोबर ५ वाजता रचना जागी झाली. आणि तिने सौरभला सुद्धा जागे केले. त्याला एवढ्या लवकर उठायची सवय नव्हती.
" झोपू दे ना थोडावेळ... " डोळे न उघडताच सौरभ बोलला.
" नाही .... उठ लवकर. " रचना
" १० मिनिट ..... ५ मिनिट ... २ मिनिट.. " सौरभ तसाच झोपेत बडबडत होता असे वाटत होते.
" ठीक आहे.... झोप तू .... ५ मिनिटे कशाला ... चांगला १ तास ... २ तास झोपा काढ. मी जाते एकटीच.... झोप पूर्ण झाली कि तुझ्या घरी निघून जा... " रचनाचे ते बोलणे ऐकले आणि सौरभ खाड्कन जागा झाला. झोपच उडाली.
" न .... नको .... नको ...... एकटी नको .... मी येतो ..... थांब.... " डोळे चोळतच तो उठला. बघतो तर रचना पाठीवर सॅक घेऊन तयार.
" अगं..... ब्रश करू दे , अंघोळ करू दे .... पाचच तर वाजले आहेत. " सौरभचे बोलणे ऐकून तिने पाठीवरची सॅक खाली ठेवली.
" मिस्टर सौरभ अभ्यंकर .... आपण डोंगर चढणार आहोत. तिथे जाऊन कपडे खराब होणार , हाता - पायाला माती लागणार. तू काय प्रत्येक वेळेस अंघोळ करणार कि काय... ",
" ब्रश तरी करू दे मला ... ",
" तोंड धुवा... पाण्याने चूळ भर आणि पटकन चल. "
" come on रचना .... ब्रश केल्याशिवाय मला जमत नाही , एकतर झोप अपूर्ण... तो कालचा ट्रेनचा प्रवास ... अजून अंग दुखते आहे " सौरभ बोलत होता. रचनाने घड्याळात पाहिले.
" पुढच्या २ मिनिटात ती तुझी सॅक ..... तुझ्या पाठीवर नसेल ना.... तर बघ ... मी एकटी जाईन ... " रचनाची धमकी ऐकून सौरभ बाथरूम मध्ये पळाला. थंड पाण्यानेच तोंड धुतले.तशीच चूळ भरली. पुढच्या क्षणाला रचना समोर सॅक घेऊन हजर.
यावेळेस रचनाला हसू आले. " असाच अनवाणी येणार आहेस का. शूज घाल कि ... त्याला मनाई नाही आहे. " सौरभने पायाकडे बघितले. पायात फक्त सॉक्स होते. हसला तोही. पटापट शूज घातले आणि दोघांनी हॉटेल सोडले. हॉटेल बाहेर आले तर थंड हवा वाहत होती. अंगावर शिरशिरी आली. नुकताच पाऊस पडून गेला असावा, रचनाने अंदाज लावला. आता प्रश्न होता कि इथून कोणत्या दिशेने जायचे. कारण दोघेही प्रथमच तिथे आलेले. अश्या प्रवासाचा अनुभव नाही. रचना पुन्हा हॉटेल मध्ये शिरली. हॉटेल मालकाला विचारले, " समोर बघा .. रिक्षावाले असतील. त्यांना सांगितले तर पायथ्याशी सोडतील तुम्हाला. " दोघे हॉटेल बाहेर येऊन रिक्षा दिसते का बघू लागले. समोरच दोन रिक्षा उभ्या असलेल्या दिसल्या. एका रिक्षात एक जण झोपलेला होता.
" त्याला कसे जागे करणार... झोपला आहे तो... इतक्या लवकर घेऊन जाईल , असे वाटत नाही मला.... एक काम करू , पुन्हा हॉटेल मध्ये जाऊ ... आराम करू . ६ वाजता निघू .... तोपर्यत हा जागा झाला असेल... अजून रिक्षा आल्या असतील. ",
" तूच जा आराम करायला.... " रचनाने त्याच्याकडे रागाने बघितले. या दोघांच्या बोलण्याने तो झोपलेला जागा झाला.
" काय पाहिजे ... " त्याने आळस देतं विचारले.
" आम्हाला राजमाचीला जायचे होते. ते समोरचे हॉटेल आहे ना , त्यांनी सांगितले कि रिक्षावाला घेऊन जाईल. " रचना भरभर बोलली. रिक्षावाला आता पूर्णपणे जागा झालेला.
" या बसा ... सोडतो तुम्हाला.. " त्याने रिक्षा सुरू केली.
" सॉरी हा ... तुमची झोप मोड झाली. " रचना बोलली.
" सॉरी कशाला .. आमचे कामच आहे ते. तुम्ही तरी उशिरा आलात. शनिवार - रविवार असले ना .... तुमच्या सारखे फिरायला येणारे ... पहाटे ३:३० - ४ वाजता पण येतात... ",
" एवढ्या लवकर .. !! ", सौरभला आश्यर्य वाटले.
" हो.. तिथे वर कड्यावर जायला वेळ लागतो ना... तुम्ही काय पहिले कधी आला नाहीत का इथे ... " ,
" हो ... पहिलेच आलो आहोत. साधारण किती वेळ लागतो ... तिथे चढाई करायला... माहित असेल ना तुम्हाला ... " रचना माहिती काढत होती.
" मी कधी गेलो नाही वरपर्यंत ... पण रिक्षात बसतात ना त्याच्याकडून ऐकले आहे, २-३ तास तरी लागतात. " त्याचे बोलणे ऐकून सौरभने कपाळाला हात लावला. पुढच्या २० मिनिटात रिक्षा पायथ्याशी होती.
" नवीन आहात म्हणून सांगतो. सरळ वर चढत गेलात तर गडावर पोहोचाल नाहीतर हरवून जाणार... आणि पायाखाली लक्ष असू द्या... " उपयुक्त माहित देऊन रिक्षावाला निघून गेला. रचना ठीक होती पण सौरभला त्या थंड हवेत सुद्धा घाम फुटला.
रचनाने दीर्घ श्वास घेतला .. " चलो .. !! " असे मोठयाने बोलत , सौरभचा हात पकडून वर चढू लागली. दोघांकडे टॉर्च होते. दोघेही सांभाळून चालत होते. मध्ये मध्ये पायाखाली लक्ष देत होते. पावसाने इथे आगमन करून आठवडा तरी झाला असावा, पायाखाली गवत आहे , हे दोघानांही कळत होते. असेच चालता चालता , सौरभला टॉर्चच्या उजेडात एक मोठा साप दिसला.
" साप !! साप !! " म्हणत त्याने रचनाला स्वतःजवळ ओढून घेतले. त्यांनी पहिल्यांदा असा नजरेसमोर साप बघितला होता. घाबरले. थोडा श्वासांवर नियंत्रण आले तेव्हा सौरभ बोलला , " म्हणून सांगत होतो , नको असा प्रवास ... किती घाबरली तू .. ",
" शू ... !! ... एकदम चूप !! जसा काय तू घाबरला नाहीस .... आणि मला हा प्रवास करायचा आहे. " सौरभला कळले होते , हि काही आपले ऐकणार नाही.
" तो साप कोणत्या दिशेने गेला ते तरी बघितले का तू ... ",
" हो ... त्या वाटेने नको जायला ... आपण दुसऱ्या बाजूने जाऊ .. " म्हणत रचना उजव्या बाजूने निघाली. सौरभ मागेच तिच्या. मघाशी साप दिसला , तेव्हा चढण होती. उजव्या बाजूने थोडा उतार होता. ती वाट पकडून दोघे चालत होते. सापाच्या नादात , जवळपास १५- २० मिनिटांनी सौरभला कळले कि आपण वर न जाता , खालच्या बाजूने चालत आहोत. रचनाला थांबवले.
" रिक्षावाला बोलला होता कि सरळ वर चढाई करत जा ... आपण तर समांतर चालत आहोत. ",
" तुला कस माहित ... तू कधी आला आहेस का इथे .. ",
" तसं तर तु सुद्धा first time येते आहेस. आपण कधी पासून असेच चालत आहोत ..... उंचीवर आलो आहोत असे वाटत नाही. आपण वाट चुकलो हे नक्की ." रचनाला पटले ते. आता आपण कुठे आहोत , हे त्यांना कळत नव्हते. चालून चालून दोघे थकलेले.
" एक काम करू ... आता वाजले आहेत ५: ५०.... थोड्यावेळाने सूर्योदय होईल. उजाडले कि समोर काय आहे ते दिसेल ना. आता पुढे अजून हरवलो तर .... त्यापेक्षा इथे बसू ... " रचनाला सौरभचे ऐकावे लागले. दोघे सकाळ होण्याची वाट बघू लागले.
सकाळचे ६:१५ वाजता थोडे उजाडले. सौरभ उभा राहून बघू लागला. सर्वत्र धुकं पसरलेलं, वरपर्यंत नजर पोहोचत नसली तरी काही अंतरावरचे दिसत होते. " चल " म्हणत सौरभने यावेळी रचनाचा हात पकडला आणि पुढे चालू लागला. चढाई तितकी सोप्पी नव्हती. दोघांनाही सवय नसल्याने , हळू हळू चालत... थांबत थांबत ... एकमेकांचा आधार घेत .... ६: १५ ला निघालेले हे दोन शहरी जीव .... सकाळी ११ च्या सुमारास , एका सपाट जागी येऊन पोहोचले. रचना दमलेली , त्याहून जास्त सौरभ. १० मिनिट जागच्या जागी आराम करू , म्हणत दोघे बसले. बिस्कीटचा एक पुडा काढून मिळून खाऊ लागले. रचनाचा अंदाज बरोबर होता. सुरुवातीच्या पावसानेच किती हिरवळ निर्माण केलेली. डोंगर चढाई करताना त्यांना याचा अनुभव आलेला. डोंगर चढून आलो , आता पुढे कुठे जायचे याचा विचार सौरभच्या डोक्यात सुरु होता. ११ वाजून गेले तरी ऊन नव्हते, छान थंड वारा सुटला होता. आजूबाजूने पांढरे ढग जाताना दिसत होते. एकंदरीत एवढा कष्ठाने प्रवास करून वर आल्याचे चीज झाले हीच भावना रचनाच्या मनात. तरी काही मनात आले तिच्या. रचनाने तिच्या सॅक मधून मॅगझीन बाहेर काढले. पुन्हा तो राजमाची चा फोटो बघितला, ते बसलेल्या ठिकाणापासून नजर पोहोचेल तिथपर्यंत हिरवळ होती , परंतु फोटोत दिसत असलेले ठिकाण नक्की कोणत्या दिशेला तेच कळत नव्हते. दोघे confused !! विचारणार कोणाला. देवा कोणाला तरी पाठव ना मदतीला , रचना वर आभाळाच्या दिशेनं पाहत मनात म्हणाली.
असा विचार डोकयात सुरु होताच , तोच रचनाला दूरवर समोरून धुक्यातून कोणीतरी चालत येताना दिसला. " चल सौरभ ... तो निघून गेला तर आपण इथेच बसून राहू ... " दोघांनी पटपट पाठीवर सॅक लावल्या. धावतच त्या येणाऱ्या व्यक्तीकडे निघाले. " excuse me !! ओ .... सर .... थांबा .... थांबा ... " रचना धावता धावता ओरडत होती. तिचा आवाज ऐकून आणि या दोघांना धावताना बघून तो जागच्या जागी थांबला. त्याला थांबलेले बघून आणि तो आपल्याच दिशेने येतो आहे हे बघून रचना - सौरभ थांबले. तो या दोघांजवळ आला.
" Yes ... काही help हवी आहे का .. ",
" हा .. हो ... आम्ही नक्की कुठे आहोत आता... ", सौरभने विचारलं. त्याने यांच्याकडे निरखून पाहिले.
" म्हणजे ... तुम्हालाच माहित नाही... तुम्ही कुठे आला आहात ते.... हरवला आहात का .. " ,
" तुम्हाला जे विचारले ते सांगा ... " सौरभचा कडक स्वभाव जागा झाला. तो हसला.
" राजमाची ..... राजमाची असे म्हणतात या ठिकाणाला.. हे गावाचे नाव सुद्धा आहे. "
" राजमाची आहे हे ठाऊक आहे ... त्याने तसे नाही विचारले... थांबा.. " रचनाने पुन्हा मॅगजीन मधला फोटो उघडला.
" हे ठिकाण कुठे आहे... आम्ही बरोबर आलो आहोत ना ... " त्याने फोटो बघितला. पुन्हा रचनाकडे बघितले.
" तुम्ही मागच्या बाजूने आलात वाटते. तिथून चढाई करायला वेळ लागतो. तुम्ही हा फोटो बघून आलात वाटते. हे असे फोटो फसवे असतात. फोटोत दिसणारे नेहमीच तसेच्या तसे राहत नाही. निसर्ग आहे , बदल होतंच असतात... " , त्याने समजावून सांगितले. सौरभला पुन्हा राग आला.
" तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तिने जे विचारले तेच सांगा. असे ठिकाण आहे का इथे. माहित नसेल तर तसे सांगा , आम्ही शोधतो ... " सौरभचे बोलणे रचनाला पटले नाही. तिने त्याच्या पोटात चिमटा काढला.
" आहे असे ठिकाण ... जवळच आहे .... ५ मिनिटे लागतील .. चला दाखवतो. " म्हणत तो पुढे चालू लागला.
रचनाने सौरभला पुन्हा कोपरखळी मारली. " मारतेस काय .. " ,
" तू बोलतोस कसा... माझ्या समोर जसा बोलतोस , तसा बाकीच्या लोकांशी बोल ना .. तो मदत करतो आहे तर त्यालाच उलट ऐकवून दाखवतो आहेस .. स्वभाव कधी बदलत नाही हेच खरे... "
" पण जे विचारले ते सांगायचे ना सरळ... उगाचच ज्ञान पाजळत होता. " सौरभ हळू आवाजात बोलत होता.
" आपल्या महाराजांनी हे गड - किल्ले उभे केले ना... सुंदर तर आहेतच पण त्याचे एक वैशिष्ठ आहे. कोणी काही महत्वाची माहिती कुजबुजले तरी १० फुटांवर असलेल्या मावळ्याला ते बरोबर ऐकू जायचे. " तो चालता चालता बोलून गेला. त्यावरून याने आपले बोलणे ऐकले, हे दोघांना कळले. ५ मिनिटांनी तो बोलल्याप्रमाणे एका ठिकाणी घेऊन आला. समोर तर फक्त पांढरे ढग. " मी बोललो ना ... याला काही माहित नसणार. " सौरभ अगदी हळू आवाजात रचनाच्या कानात बोलला. रचना पुढे काही बोलणार तसा त्याने हाताने " थांबा " अशी खूण केली. काही मिनीटानी जोराचा वारा आला आणि समोरचे सर्व ढग आजूबाजूला पांगले.
आता समोर दिसणारे दृश्य बघून सौरभचे तोंड उघडे पडले. रचनाच्या हातातले मॅगजीन पायाजवळ पडले. नजरेसमोर फक्त हिरवा रंग... समोर किल्ल्याच्या खुणा ... बालेकिल्ला !! त्याच्या टोकावर एक भगवा झेंडा फडकत होता. त्याकडे जाणारी पायवाट हिरव्या गालिच्यातून जात होती, असा भास होत होता. रचना - सौरभ तसेच डोळ्याची पापणी न लवता , पुढे चालत जात होते. समोरच असलेल्या डोंगरातून झरे वाहत होते. मोठे झरे असावेत, कारण त्यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज त्यांनाही ऐकू येतं होता. आणखी पुढे गेलयावर कळले कि समोर दिसणारे ढग हे खालून वरच्या दिशेने येत आहेत... आभाळात फिरणारे ढग डोंगराच्या खालून कसे येतं आहेत हा प्रश्न रचनाला पडला. अनोखे दृश्य !! जे समोर होते त्यावर विश्वास ठेवावा कि नाही , तेच कळेना.
" जास्त पुढे जाऊ नका .. " मघाशी त्यांना घेऊन आलेला व्यक्ती बोलला. तेव्हा दोघे भानावर आले.
" सौरभ ... कॅमेरा ... कॅमेरा ... फोटो काढ ना ... " सौरभने पटापट फोटो काढले. " wow !! just wow !! " रचना बोलली. आनंद चेहऱ्यावर दिसत होता. तिला आठवलं , ते मॅगजीन मागेच पडले. पटकन जाऊन तिने ते आणले.
" बरोबर बोलला तुम्ही ... फोटोत दिसते , त्याही पेक्षा कित्येक पटीने ... हे समोरचे .... amazing आहे " रचनाच्या बोलण्यावर तो हसला.
" तुम्ही एकटे काय करता ... भीती नाही वाटत का ... " सौरभने त्याला विचारलं.
" एकटा नाही ... बायको आहे सोबत... तिच्याकडे जात होतो. तुम्ही भेटलात... ",
" तिला आवड नाही वाटते याची... हे असे निसर्गसौंदर्य वगैरे .. " , सौरभ
" आहे कि तिला आवड... ती मगाशीच गेली .... किती वेळ तेच ते बघत बसणार ... आणि तिलाही तिची space देयाला पाहिजे ना.. " सौरभ - रचना एकमेकांकडे बघू लागले.
" By the way...तुमचा कॅमेरा waterproof आहे का " सौरभला तो असं का विचारतो आहे ते कळले नाही.
" पाऊस येईल ना ... कॅमेरा भिजला कि खराब होतो. " तो बोलला. दोघांनी वर आभाळात पाहिले.
" पावसाचे ढग तर नाहीत. ऑटोमॅटिक बटन दाबले कि पाऊस सुरू होतो का .. " सौरभ स्वतःच्याच बोलण्यावर हसला.
" तुमच्या बोलण्यावरून तरी तुम्ही इथे पहिल्यांदा आला असे वाटते. या ठिकाणी पावसाला सुरुवात केली ना ... कि जोराचा वाराही असतो सोबतीला. म्हणून बोललो कि कॅमेरा आत ठेवा. "
" first time आलो हे खरे ... पण मला माझ्या कॅमेराची काळजी घेता येते. " सौरभ.
त्या व्यक्तीने अचानक वर आभाळात पाहिले. " निघूया ... चला ... पाऊस येईल ... " म्हणत तो जाऊ लागला. तरी रचना - सौरभ जागच्या जागी.
" काय झाले ... " त्याने विचारलं.
" आम्ही आणखी थोडा वेळ थांबतो आहे. तुम्ही जाऊ शकता. " रचना बोलली. त्याने पुन्हा वर आभाळात पाहिले.
" तुम्हाला काय हवामानाचे कळते का .. मघापासून वर बघत आहात. " रचनाने विचारलं. त्यावर तो नेहमी सारखा हसला. दोघांकडे नजर टाकून त्याने विचारलं.
" एक विचारू का .... दोघांनाही... " रचना - सौरभने मान हलवली. त्याने विचारलं.
" तुम्ही कधी पाऊस बघितला आहे का ... ? "
===================== क्रमश : ===============
Thursday, 31 December 2020
जिवलगा ..... !! ( भाग १)
आदित्यची नजर तशी नेहमीच भिरभिरत असायची. तसा त्याचा स्वभावच...... स्वच्छंदी, अगदी कोणी उनाड पक्षी म्हटले तरी वावगे ठरू नये. खरे तर त्याला उडायला आवडायचे. फिरायला आवडायचे. एका जागी थांबणे पटत नसे त्याला. त्याच्या अश्या स्वभावामुळे मित्रांची संख्या सुद्धा जास्त... मनमौजी .... friend list मध्ये मैत्रिणी ही होत्या. पण फक्त ' मैत्रिणी ' हा , आदित्यला प्रेम वगैरे या गोष्टीचा वैताग होता. प्रेमावर विश्वास असला तरी त्यात न पडलेले बरे , असे त्याचे मत. त्यामुळे मैत्रिणीना " मैत्री " पुरतेच. आदित्य कॉलेज मधला हिरो, पण त्याने त्याची अशी कोणी " हिरोईन " बनू दिली नव्हती. त्याचे नाव , गेल्या ४ वर्षात कितीतरी मुलींसोबत जोडले गेले होते , तरी ते सर्वच खोटे होते हे प्रत्येक मुलीला माहित असायचे.
कॉलेजचे शेवटचे म्हणजेच १५ वी चे वर्ष सुरु झाले. ऐन पावसाळ्यात नवीन वर्ष. बाकीच्यांना आवडत असला तरी आदित्यला पावसाचा पार कंटाळा यायचा. पावसाळी पिकनिक , पावसात भिजणे हे तो मुद्दाम टाळायचा. पण पावसाळ्यात सुरु झालेलं कॉलेज , तिथे तर जावेच लागणार. कॉलेजचे सुरुवातीचे दिवस असल्याने जास्त कोणी यायचे नाही. lecture सुद्धा तसे सुरु झाले नव्हते. एक आठवडा तर तसेच होते. त्यानंतर मात्र कॉलेज गजबजू लागले. आदित्यचा ग्रुप सुद्धा जमू लागला. छान दिवस सुरु झाले. त्यात शेवटचे महत्वाचे वर्ष, आदित्यचा अभ्यास तर पहिल्या दिवसापासून सुरु झालेला. lecture संपली कि जरा वेळ कॉलेजमध्ये टाईमपास करून घरी जाणे , असे सुरु होते.
अश्याच एक सकाळी आदित्य कॉलेज साठी निघाला. पाऊस नव्हता त्या सकाळी. शिवाय गेले काही दिवस पावसाचे दर्शन झाले नव्हते. आदित्यला हेच हवे होते. घरापासून कॉलेज अर्ध्यातासाच्या अंतरावर , रोज चालतच जायचा. आपल्याच धुंदीत चालणे त्याचे. कानाला मोठे हेडफोन , मोबाईल वर सुरु असलेली आवडती गाणी आणि सोबतीला थोडी मंद हवा.. आदित्यची भिरभिरती नजर त्याच्या पुढे पुढे धावत होती. तेवढ्यात वादळ यावे ,असेच अचानक आकाशात काळे ढग जमा होऊ लागले.
" याला काय झालं आता ... इतके छान वातावरण होते .... काही गरज का पावसाची आता ... मंद कुठला .. " येणाऱ्या पावसाला नावे ठेवत आदित्यने त्याचा चालण्याचा वेग वाढवला. पुढल्या वळणावर कॉलेजकडे जाण्याचा रस्ता. आभाळ अधिकच गडद झाले.
आणि ...... आणि अचानक एक जोराची वीज कडाडली. त्याचसोबत एका मुलीचा मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला. ते किंचाळणे आदित्यला त्याच्या हेडफोन मधून ऐकायला आले. समोरचं उभ्या असलेल्या मुलीकडे त्याचे लक्ष गेले. चेहरा झाकून ती उभी होती. बहुदा त्या विजेच्या आवाजाला घाबरली असावी. वाराही आता वेगाने वाहू लागला होता. का कुणास ठाऊक ...आदित्य तिच्याकडे बघत उभा राहिला. पण काहीतरी विचित्र होते आहे असे त्याला जाणवले.
त्याच्या आजूबाजूला असलेले सर्वच " slow motion " मध्ये आहेत , असे त्याला वाटले. वाटले काय .... तसेच तर होते सर्व. तो अजूनही त्या मुलीकडे पाहत होता. तर तीही आता " slow motion " मध्ये... तिने हळूच स्वतःच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला केले. स्वतःला सावरत नीट उभी राहिली. चेहऱ्यावर येणारे केस मात्र वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नीट होतं नव्हते. तरी ती खूप प्रयत्न करत होती. हे सर्व "slow motion " सुरु होते ... बरं का !!! शेजारच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या , बाईक .... फुटपाथ वरून चालणारी माणसे , पावसामुळे वेळेआधीच जागे झालेले आणि उडणारे पक्षी, वाऱ्याने हलणारी झाडाची पाने , फांद्या .... सर्वच कसे मंदगतीने ..... शेवटी तिच्या चेहऱ्यावरचे केस सुद्धा वाऱ्याने दूर केले, तेही slow motion मधेच...... आदित्य तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिने स्वतःला सावरले आणि धावत ( slow motion मध्ये ) कॉलेजच्या दिशेने निघून गेली. पावसाचे थेंब आदित्यच्या गालावर पडले तेव्हा भानावर आला. तोही पळत पळत कॉलेज मध्ये शिरला. lecture सुरु होण्यास अद्याप ३० मिनिटे बाकी होती. वर्गात न जाता बाहेर गॅलरीत आदित्य उभा राहून विचार करत होता. " नक्की काय झाले आता .... आधी असे कधी झाले नव्हते .... आणि ते slow motion ..... काय प्रकार होते नक्की... " विचार करून करून डोक्याचा भुगा झाला.
आदित्य तसाच डोक्याला हात लावून उभा, " काय हिरो .... डोके दुखते आहे वाटते... " त्याचा मित्र , गौरव आलेला तोपर्यंत.
" काही नाही रे .... सहजच ... बाकीचे कुठे आहेत ... आले नाही ते ... " ,
" हे काय ..... येतच आहेत... " गौरवने मागे बघायला सांगितले. आदित्यने मागे नजर टाकली, त्याचाच ग्रुप येत होता. " Hi !! " त्यापैकी एकाने आदित्यला दुरूनच हात केला. आदित्यने हि " Hi " करण्यासाठी हात वर केला आणि अचानक मगाशी दिसलेली मुलगी त्याला त्याच्या मागून चालत येताना दिसली. पुन्हा सर्व slow motion ..... पुन्हा वारा वाहू लागला. पुन्हा तिचे मोकळे असलेले केस तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले. आदित्यचा ग्रुप slow motion मध्ये चालत येत होते , त्यामागून ती... एका क्षणाला सर्व ग्रुप आदित्यच्या समोर उभा होता , त्यामागून चालत चालत ती गायब झाली.
आदित्य तसाच हात वर करून उभा, गौरवने त्याच्या डोळयासमोर टिचकी वाजवली. एकाने त्याच्या हातावर टाळी दिली. आदित्य जागा झाला.
" तुम्ही सर्व slow motion मध्ये का चालत होता ? " आदित्यचा प्रश्न.
" काय बोलतो आहेस तू... " जुई... त्याची एक मैत्रीण ... तिने विचारलं.
" मला एक सांग ... काल रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करत बसला होतास ... " गौरवने विचारलं.
" हम्म ... साधारण १२ .... maybe १२:३० वाजलेले होते... का रे ... " आदित्यने सांगितले.
" चला रे .... lecture सुरु होईल..... बघा .... जास्त अभ्यास केला कि असेच होते.. " गौरव सर्वाना उद्देशून बोलला. तसे सर्वच हसले आणि वर्गात जाऊन बसले. मॅडम यायला अजूनही वेळ होता. वर्गात सर्वांच्या एकमेकांशी गप्पा सुरु होत्या.
" च्यायला !!! काय होते आहे मला .... कि मलाच हे सर्व slow motion मध्ये दिसते... १ मिनिट .... मग आता कसे सर्व नॉर्मल स्पीड मध्ये दिसते आहे... काय खरे ... काय खोटे ... " आदित्य विचार करत होता. बाजूलाच बसलेल्या गौरवच्या गालाला त्याने स्पर्श केला. गौरव दचकला.
" काय रे ..... काय होते आहे तुला... ... आणि तसे काही मनात असेल तर सॉरी ..... !! मला मुली आवडतात , माझी GF पण आहे. तुला सांगतो ना .... जास्त अभ्यास केला कि असेच डोके फिरते. आता कुठे १५वी सुरु झाली आहे आणि इतका अभ्यास .... त्यापेक्षा मीच दुसरीकडे जाऊन बसतो. " गौरव जाण्यासाठी उभा राहिला , तर आदित्यने त्याला खाली बसवले.
" बस रे .... नाटकी नुसता .... मी पण ' straight ' आहे.... समजलं ना ... नौटंकी.... " आदित्य , गौरव दोघेही हसू लागले. जुई मागच्याच बेंचवर बसलेली. तिचे लक्ष मोबाईलमध्ये. या दोघांचा आवाज ऐकून तिथे लक्ष दोघांकडे गेले.
" ये मलाही सांगा ना जोक ... मला पण हसायचे आहे. " ,
" हसायचे असेल तर मोबाईल मधून डोके वर काढायचे मॅडम... " आदित्य तिला बोलला. बोलताना सहज मागे नजर गेली. हसता हसता त्याचे लक्ष वर्गात सर्वात शेवटी असलेल्या बेंचवर गेले. एक मुलगी बसलेली तिथे.... तीच !! तीच ती .... एकटीच बसलेली. यावेळेस डोळ्यांना चष्मा लावलेला. वर्गात सुरु असलेल्या गोंधळात न पडता काहीबाही वाचत बसलेली. मोकळे सोडलेले केस तिने बांधून ठेवलेले. " अरेच्या !! हि कधी आली वर्गात.... १ मिनिट !! हि आमच्या वर्गात काय करते.... " आदित्य आणखी confused..... गौरवला काही माहित आहे का ,ते विचारू असे म्हणत आदित्य त्याला विचारणार तर मॅडम आल्या.
lecture सुरु झाले. साधारणतः , आदित्यचा स्वभाव स्वच्छंदी असला तरी अभ्यासात त्याचा टाईमपास कधीच नव्हता. कॉलेजमध्ये आले कि सर्व lecture बसायचा , वर्गात सुद्धा त्याचे लक्ष फक्त अभ्यासाकडे असायचे. टाईमपास , मज्जा-मस्ती सर्व कॉलेज सुटल्यावर. आज वेगळे होते. दिवसच वेगळा उजाडला होता ना. चालू lecture मधेच कितीतरी वेळा त्याने " त्या " मुलीकडे चोरून बघितले होते. मध्ये मध्ये मागे बसलेल्या जुईशी बोलायचा बहाणा करत , त्याची नजर मागे लक्ष टाकून येतं होती.
" मिस्टर मनमौजी !! " मॅडमने आदित्यला हाक मारली. आदित्य तसा फेमस मुलगा , त्यामुळे सर्व शिक्षकांना माहित होता त्याचा स्वभाव, त्याशिवाय अभ्यासातही पुढे असायचा. lecture सुरु असताना काही प्रश्न पडले कि हमखास विचारणारा आदित्य .... त्याची चुळबुळ मॅडमच्या नजरेत आली.
" जुई सोबत बोलायचे आहे तर तिच्या शेजारी जाऊन बस ना ... सारखे सारखे मागे बघतो आहेस .. " आदित्य ओशाळला.
" सॉरी ma'am !!" ,
" तू मागेच जाऊन बस ... आणि काय ते बोलून घे .... मलाही डिस्टर्ब होते ना .... " मॅडमने आदेश दिला तर काय करणार. आदित्य जुईच्या शेजारी जाऊन बसला. तरी त्याचे मध्ये मध्ये मागे बघणे सुरूच होते. त्या पूर्ण lecture मध्ये काय शिकवले , त्यातले काही म्हणजे काही कळले नाही. तो lecture संपला आणि दिवसभराचे सर्व lecture सुद्धा " तसेच " संपले. आदित्यचे लक्ष नव्हतेच आज. शेवटचा lecture संपला , आदित्यचा ग्रुप वर्गातून बाहेर आला. घरी निघणार होते तर काही मित्र अजूनही वर्गात होते म्हणून सर्वच थांबले. एकमेकांशी गप्पा मारत तिथेच उभे राहिलेले. आदित्य नेहमीप्रमाणे गप्पा मारत आपली नजर इथे - तिथे भिरभिरवत होता. उजवीकडे बघून झाल्यावर डावीकडे नजर गेली असता , " ती " दिसली... यावेळेस ती सरांसोबत बोलताना दिसली. जुईला कळलं , आदित्यचे बोलण्याकडे लक्ष नाही ते. तिने त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवला आणि हातानेच " कुठे लक्ष आहे " असे खूण करून विचारलं.
आदित्यने त्या मुलीकडे बोट दाखवत विचारले.
" तिला आजच ... पहिल्यांदा वर्गात बघितले. नवीन आहे हे नक्की... कि चुकून आपल्या वर्गात येऊन बसली. ",
" नाही रे ... " जुई बोलली. " आपले थोरात सर आहेत ना ... त्यांची कोणी नातेवाईक आहे. नवीनच आहे ती... " ,
" हे तुला कसे माहित. " आदित्य ,
" सकाळी lecture ला येताना ती भेटली होती आम्हाला. आपल्याच वर्गात आहे ती... हे सर्व तिनेच सांगितले.तिला माहित नव्हते कोणत्या वर्गात lecture आहे ते ... म्हणून मला विचारले तिने... नाव पण बरच काहीसं आहे तिचे... " जुई आठवू लागली. तिला आठवेना .." ये राहूल .... ती सकाळी आपल्याला lecture कुठे आहे ते विचारत होती ... तिचे नाव काय रे .... तुला हसायला आलेलं ते नावं ऐकून .... " राहुल सुद्धा नाव आठवू लागला.
" काहीतरी ' S ' वरून नाव आहे तिचे... साई ... सायली... नाही ... असेच काही आहे .. " राहुल सुद्धा आठवू लागला.
" हा ..... आठवलं ... सिद्धता !! .... हेच नाव तिचे ... सिद्धता .... " आदित्यने पुन्हा तिच्या दिशेनं पाहिले. एव्हाना ती तिथून निघून गेलेली. " सिद्धता !! " आदित्य नाव मनात घोळवत राहिला.
==========================================================================
सिद्धता actually ओशाळली होती. लाज वाटत होती तिला. सकाळी आभाळातील विजेच्या आवाजाने ज्या मुलासमोर किंचाळली होती , तोच मुलगा आपल्या वर्गात असेल असे तिला वाटले नव्हते. अधून मधून तिची नजर त्या मुलावर जात होती. त्यालाच तर मॅडमने दम दिला ना. कदाचित तो आपल्याबद्दल सांगत असेल त्याच्या मित्र-मैत्रीणीना , काय करू .... भीती वाटते पावसाची , कडाडणाऱ्या विजेची... पण किंचाळले कशाला .. तेही त्या मुलासमोर .... त्याला काय वाटले असेल ... एवढी मोठी झाली आणि घाबरते .... नक्कीच तो हसला असणार माझ्यावर.
सिद्धता .... तिच्या वडिलांची मुंबईत बदली झाली म्हणून तीही आली. शेवटच्या वर्षाला कुठे admission मिळणार आणि तेही इतके लगेच ... तरी ओळख निघाली. कॉलेजला उशिरा का होईना admission झाले. साधी सरळ मुलगी तरी मॉडर्न ... हुशार , दिसायला कशी .... ते गाणे आहे ना " गोरी गोरी पान , फुलासारखी छान ... " अगदी तशी नसली तरी देखणी होती. तिचे ही तसेच .... पूर्ण फोकस फक्त अभ्यास आणि पुढचे करिअर वर... अभ्यास एके अभ्यास... मित्र नाहीच ... मैत्रिणी हि कमीच ... वडील पोलीस खात्यात असल्याने बदली ठरलेली, त्यामुळे मैत्रिणीही कमीच. बोलणे कमी.... त्यात आज झालेली गमतीशीर घटना.. कॉलेजचा पहिला दिवस असा , त्याने कोणाला सांगितले असेल तर काय होईल आपले , उद्या हसतील का वर्गात , असा विचार करत सिद्धता घरी आली.
रात्री अभ्यास करायला घेतला पण आदित्यचे मन लागेना.
" तिला येताना बघितले कि सर्वच slow motion मध्ये कसे दिसायला लागते...... आणि अचानक गायब कुठे होते ती... काही कळत नाही बाबा... " आदित्यला काही सुचले.
" बाबा वरून आठवले... पप्पाला विचारू का हे ... नाही ... नको... उगाचच काही तर्क वितर्क लावेल पप्पा.... " मनात बोलत आदित्य झोपायला गेला.
पुढच्या दिवशी तेच रुटीन ..... मोबाईलवर आवडती गाणी , कानात मोठे हेडफोन ... त्याच धुंदीत चालत कॉलेजला निघाला. आज काय पाऊस नव्हता. पुन्हा त्या " कालच्या " ठिकाणी येऊन त्याची पावले आपोआप थांबली. " सिद्धता .... आली नाही वाटते , थांबूया का .... कशाला थांबायला पाहिजे... आणि ती आधीच निघून गेली असेल तर कॉलेजमध्ये... तर ... तर काय .... जाऊ दे ना ... आपली कुठे ओळख आहे.... आपण अभ्यास करायला येतो कॉलेजमध्ये .... टाईमपास करायचा नाही.... समजलं ना ... " आदित्यची दोन मने एकमेकांशी हुज्जत घालत होती. शेवटी पोहोचला तो कॉलेज मध्ये. घड्याळात पाहिले तर अजून ३० मिनिटे होती lecture सुरु होण्यास. आदित्यला आधीच पोहोचायची सवय. lecture असलेला वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता, " वरती जाऊन तरी काय करणार ... गौरव येईल इतक्यात , तो आला कि जाऊ त्याच्यासोबत वर ... " मनात बोलून आदित्य तिथेच गेटसमोर असलेल्या कठडयावर गाणी ऐकत बसला. १० मिनिटे झाली असतील , आदित्य त्याच्या मोबाईल मध्ये काही बघत होता.
त्याचवेळी त्याला काही जाणवले. त्याने समोरच दिसणाऱ्या वाटेकडे पाहिले. सिद्धता चालत येतं होती. पुन्हा तेच. वाराही slow motion मध्ये वाहू लागला. समोर रस्त्यावर पडलेली वाळलेली पाने त्यासोबत उडू लागली. तिच्या आजूबाजूने चालणारे , कॉलेज मध्ये येणारे बाकीचे विद्यार्थी , गेटवरचे watchman काका... इतकंच काय , कॉलेज शेजारी असलेल्या इमारतीत येणारा दूधवाला सुद्धा slow motion मध्ये सायकल चालवत येत होता. कॉलेजच्या बाहेर पार्किंग वरून सुरु असलेली मारामारी सुद्धा slow motion मध्ये .... सिद्धता हलके हलके पावले टाकत कॉलेजच्या गेटमधून आत शिरली. चालता चालता केसाची एक बट तिच्या कानामागे घेत तिने एकवार आदित्यकडे नजर टाकली. आणि पुढे निघून गेली. जशी ती नजरेआड झाली तसे पुन्हा सर्व नॉर्मल स्पीड मध्ये आले.
" भुताटकी आहे कि काय ... " आदित्य विचार करत होता आणि गौरव आला.
" चला सर ... आज काय इथंच बसून आहेस ... lecture ला जायचे आहे ना .. " ,
" हा रे .... तुझीच वाट बघत होतो. " दोघे मित्र दुसऱ्या मजल्यावर आले. आदित्य लगेचच वर्गात शिरला. हे गौरव साठी नवीन होते.
" काय रे .... रोज तर सगळ्या ग्रुप साठी बाहेर थाबतोस ... आज काय विशेष " ,
" बस रे .... काही विशेष- बिशेस नाही... असाच आलो ... बसलो .. त्यात काय " गौरवला आदित्य बोलला तरी त्याची नजर सिद्धताला शोधत होती. ती वर्गात नव्हती. थोड्यावेळाने आदित्यचा ग्रुप आणि इतर विद्यार्थी वर्गात येऊन बसले. मॅडम येण्याआधी , ५ मिनिटं आधी सिद्धता कालच्याच बेंचवर येऊन बसली. आदित्यला ती आली तर कळले. आदित्यने बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि तिला बघण्यासाठी पाणी पिण्याचा बहाणा केला. अगदी त्याच वेळी सिद्धताने त्याच्याकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली. आदित्यला जोराचा ठसका लागला आणि तोंडातले सर्व पाणी शेजारी बसलेल्या गौरवच्या तोंडावर उडाले. वर्गात एकच हशा पिकला. गौरवने एकवार आदित्यकडे पाहिले आणि रुमालाने चेहरा पुसत म्हणाला,
" अरे भाई .... अंघोळ करतो मी ... रोजच करतो... ",
" सॉरी सॉरी .... ठसका लागला. ",
" तुला एवढ्या सकाळी कसली तहान लागली. आणि शांतपणे पाणी पियाचे ना ... इतका ठसका लागेपर्यंत ... "
" सॉरी ना बाबा .... मुद्दाम नाही केले.. " आदित्यला कसे तरी झाले. सर्व वर्ग हसला म्हणून नाही, तर सिद्धताने ही बघितले म्हणून... मॅडम आल्या आणि lecture सुरु झाला.
आणि हे असे रोजच सुरु झाले. आदित्य लवकर येऊन तिथे कॉलेजच्या गेटसमोर बसून असायचा. पुन्हा पुन्हा ते slow motion अनुभवायचा, त्याला ते आवडू लागलेलं. lecture ला गेल्यावर तिच्याकडे चोरुन बघणे .... वगैरे वगैरे ... सर्व सुरु होते. सिद्धताला हे सर्वच समजत होते. कारण तीही कधी कधी त्याच्याकडे बघायची. सुरुवातीला मागच्या बेंचवर बसणारी सिद्धता .... आता तिच्या वर्गात २-३ मैत्रिणी झालेल्या , त्याच्यासोबत पुढे बसायची. अर्थात आदित्य बद्दल तिला कळले होते. तो तर सर्वांचा मित्र , सर्वाना मदत करण्यात पुढे असणारा , त्याच्या बद्दल आदर निर्माण झालेला. पण कधी प्रत्यक्ष बोलण्याचा क्षण आलेला नव्हता. कधीतरी तशी वेळ यावी , असा आदित्य विचार करत होता. जोपर्यंत ती बोलायला येत नाही , तोपर्यंत मी स्वतःहून कसा बोलायला जाऊ, असे आदित्यचे म्हणणे होते. दुसरीकडे सिद्धता तशी फारच कमी बोलणारी. त्यातल्या त्यात , कॉलेज मध्ये ... मुलांशी बोलणे टाळायची. तिचा संवाद फक्त आणि फक्त तिच्या भोवती असणाऱ्या मुलींसोबत. या दोघांचे बोलणे होणार तरी कधी...
======================================================================
रविवारचा दिवस. सकाळपासून धोधो पाऊस.... कुठे जाणार पावसात , आदित्यच्या ग्रुपने तर मस्तपैकी पिकनिकचा बेत केलेला. आदित्यला ते तसे पावसात भिजणे अजिबात आवडत नसायचे. त्यामुळे घरीच अभ्यास करत बसलेला. २-३ तास अभ्यास केल्यावर त्याला कंटाळा आला. स्वतःच्या रूममधून बाहेर आला. त्याचे पप्पा हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेले. आदित्य त्यांच्या शेजारी जाऊन बसला.
" कोणता movie लागला आहे. " आदित्यने पपांना विचारले.
" व्वा !! आज काय एकदम movie बघायला आलास .... ",
" अरे पप्पा .... बाहेर बघ पाऊस पडतो आहे... उगाचच .... शहरात सगळ्याना भरपूर पाणी मिळते. पावसाने गावात पडले पाहिजे... तिथे दुष्काळ वगैरे असतो... तिथे जावे पावसाने ....आता अभ्यास पण झाला... कंटाळा आला म्हणून आलो बाहेर " ,
" तुला आवडत नाही म्हणून बाकी लोकांना आवडत नसेल का पाऊस ,.... पडू दे त्याला ... त्याचे दिवस आहेत सध्या ... ",
" हम्म ... कोणता movie आहे... " ,
" माहित नाही ... मलाही काही काम नाही , काहीतरी बघत बसलो आहे. " मग दोघेही टीव्ही वर सुरु असलेला movie बघू लागले.
आदित्य आणि त्याचे पप्पा , एकमेकांचे Best friend , आदित्य सर्व गोष्टी त्याचा पप्पाना सांगायचा. आणि त्याचे पप्पा ही मनमोकळेपणाने ते ऐकून घेयाचे. टीव्ही वर सुरु असलेल्या movie मध्ये एक असा क्षण आला कि हिरो - हिरोईन एकमेकांच्या दिशेने चालत येतं होते..... slow motion मध्ये. आदित्यला त्याचे क्षण आठवले. पप्पाला विचारू का ... आज विचारू .... , असे मनात म्हणत आदित्यने पप्पाना विचारलं.
" पप्पा , हे असे फक्त movie मध्ये होते ना ...",
" म्हणजे कसे ... " ,
" slow motion वगैरे ... ",
" नाही रे ... होते ना असे real life मध्ये ..." ,
" ह्या .... पप्पा काय पण .... तुला काय मीच भेटलो का ... " पप्पाने त्याच्याकडे पाहिलं.
" तुझी मातोश्री आणि मी ... आमचे love marriage, माझा पहिला जॉब होता ना ... ",
" आता हे काही पण बोलतो आहेस तू पप्पा .. जॉब म्हणे ... आपला तर बिजनेस आहे .. ",
" अरे हो बाळा ... मी आधी जॉब करत होतो. तिथेच तर तुझी आई आणि माझी भेट झाली. सुरुवातीला मलाही हे movie मध्ये आहे ना slow motion ... तुझी आई जेव्हा जेव्हा समोर यायची ना , मलाही तसाच अनुभव होयाचा. काही वेळाने कळलं कि ते प्रेम आहे. तीच व्यक्ती नजरेसमोर राहावी असे वाटत राहते. आपले मन ना वेडे असते. नजरेसमोरून ती व्यक्ती जाऊच नये असे वाटते म्हणून आपल्याला तसे भास होतात. " आदित्यला उत्सुकता.
" हे भास कधी बंद झाले ... " ,
" नंतर ... म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो , त्यानंतर . तिलाही मी आवडत होतो. प्रेमाची कबुली दिली , एकत्र आलो. मग कशाला असे भास होणार. ",
" पप्पा . एक सांग , तू मम्मा ला बघितल्या बघितल्या प्रेम झालेल का ... " ,
" नाही नाही ... तिला आधी खूप वेळा बघितले होते मी. एकदा अचानक ती इतकी सुंदर भासली कि थेट मनात भरली. हा .... पण तसेही असते हा ... love at first sight... ",
" असे कसे शक्य आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला कधीच पाहिले आहे..... अचानक कोणी समोर येते ..... आणि त्या व्यक्तीवर प्रेम होते. ",
" असते बाबा असे .... मनाची चाल असते ती.... तसे झाले कि ते मखमली हाल सुरु होतात. सारखी तीच व्यक्ती डोळ्यासमोर रहावी असे वाटते. रात्री झोप लागत नाही , त्याच व्यक्तीचा विचार. असे असते प्रेम. कधी एकटा बसलेला असायचो ना , तेव्हा तर विचित्र भास होत असत. तिची आठवण काढली ना कि अचानक आजूबाजूचे वातावरण बदलून जायचे. कुठून कुठून रंगीबेरंगी फुलपाखरे यायची , विविध रंगाचे इंद्रधनुष्य दिसायचे... आणखी किती तरी वेगवेगळे भास होत असत मला. प्रेमाचे जग असेच असते. तुला काय कळणार ते.... गेल्या चार वर्षात एवढ्या मैत्रिणी केल्यास , एकही GF नाही. प्रेम केले नाहीस ... काय फायदा कॉलेजला जाऊन. " पप्पाने त्याच्या डोक्यावर टपली मारली. आदित्य मुद्दाम हसला. टीव्ही वर सुरु असलेला movie बघत होता तरी डोक्यात वेगळेच विचार ... खरच आपण प्रेमात पडलो आहोत का.
खरंतर रविवारचा दिवस संपलेला, परंतु आदित्यच्या life मध्ये काही वेगळेच सुरु झालेलं. सिद्धता त्याला अजाणतेपणी का होईना , आवडू लागली होती. अर्थातच अभ्यासाला पहिले प्राधान्य. अभ्यासात त्याने खंड पडू दिला नव्हता. फक्त त्याचे बोलणे ते काय होत नव्हते. त्यात गेल्या आठवड्यात मंगळवारी कॉलेजला आलेली सिद्धता , बुधवार ते शनिवार , या दिवसात कॉलेजला आलेली नव्हती. आदित्यचा तो आठवडा कसा गेला हे त्यालाच माहित. तिच्या मैत्रिणींना तरी कसे विचारणार, आदित्य समोर मोठा पेच . रविवार जाऊन सोमवार उजाडला, सिद्धता नव्हतीच. आदित्य लय टेन्शन मध्ये. गेली कुठे हि. याच टेन्शन मध्ये आदित्य कॉलेज सुटल्यावर घरी निघालेला. त्याला थोरात सरांनी हाक मारली.
" अरे आदित्य ... एक काम होते , तुझी मदत हवी होती. ",
" बोला ना सर ... " थोरात सरांना विचारू का ... सिद्धता कॉलेजला का येतं नाही ते ...
" तुझ्या नोट्स मिळतील का .. गेल्या आठवड्यात काढलेल्या सर्व नोट्स पाहिजे होत्या मला... " ,
" हा सर , देतो ना ... आता माझ्याकडे नाही आहेत, घरी आहेत. तुम्हाला पाहिजे होत्या का ... " ,
" मला नको आहेत. तुला माहित आहे ना सिद्धता ... तिला पाहिजे होत्या. " ,
" हो का ... बरेच दिवस दिसली नाही ती .... " आदित्य उगाचच बोलायचे म्हणून बोलला.
" तब्येत ठीक नाही तिची. सर्व अभ्यास राहून गेला. माझ्या विषयाच्या नोट्स मी देईन तिला , पण बाकीच्या कुठे जमवत राहू, वर्गात एक तूच आहेस ज्याचा अभ्यास वेळेआधी पूर्ण असतो. म्हणून मी तुझ्याकडे नोट्स मागत आहे. " हे म्हणजे सोन्याहून पिवळे. आदित्य मनात म्हणाला.
" सर्व नोट्स घरी आहेत. तिला कश्या देऊ , तिच्या घरी जाऊ का ... पण मला तिचे घर नाही माहित... एक काम करा , तिचा whatsapp नंबर द्या. तिला msg करतो किंवा कॉल करून विचारतो कोणत्या नोट्स पाहिजे आहेत त्या.. " नंबर मिळाला कि काय ... मज्जाच आहे एका मुलाची , आदित्य मनोमन खुश झालेला पण त्याने सगळा आनंद लपवून ठेवला.
" तिचा नंबर आहे माझाकडे , पण कालपासून माझा मोबाईल बिघडला आहे. नंबर पाठ नाही माझा. असं करूया , तुझा mail लिहून दे , ते नोट्स तिला मेल कर. " यांचा मोबाईल काय नेमका आताच बिघडला , नाराजीने आदित्यने त्याचा मेल लिहून दिला.
घरी आल्या आल्या आदित्यने त्याच्या मागच्या आठवड्यातील नोट्सचे फोटो काढण्यास सुरुवात केली. नोट्सचे फोटो ते , त्यात इतके काय बघायचे , तरीही प्रत्येक फोटो छानच आले पाहिजे , जरासा वाईट आला असे वाटले कि पुन्हा फोटो काढायचा. असे जवळपास २ तास फोटो काढण्यात खर्ची घातल्यावर आदित्य समाधानी झाला. पण तिचा मेल अजून का आला नाही , याचा विचार करत होता. तिचाच मेल घेतला असता तर ... सर पण ना ... उलट-सुलट कामे ... असा विचार करत असताना , finally सिद्धता चा मेल आला.
" Hi ... मला तुमच्या नोट्स मिळतील का ?? " इतकाच मेल आलेला. आदित्यला किती आनंद !! त्याने भरभर तिला मेल पाठवायला सुरुवात केली. सर्व नोट्स चे मेल पाठवून झाल्यावर , शेवटच्या मेल मध्ये मुद्दाम स्वतःचा मोबाईल नंबर लिहून " आणखी काही मदत हवी असल्यास हा माझा नंबर आहे. " असे लिहून टाकले. तिला मदत करून त्याला एक प्रकारची मनःशांती मिळाली.
परंतु मेल करून आता एक तास होत आला तरी तिच्याकडून " thank you ..... thanks ... आभारी आहे !! " असा कोणत्याच प्रकारचा मेल आला नाही.
" याला काय अर्थ आहे. मी एवढे मेल केले, तेही माझा स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून ..... साधं thank you लिहायला किती वेळ लागतो. मी बरोबर होतो आधी , हे प्रेम वगैरे काही नसते. " आदित्यने हातातला मोबाईल बेडवर फेकून दिला आणि बाहेर निघून गेला.
रात्री ९ वाजता घरी आला , आईने त्याला थेट जेवायला बसवले. जेवून वगैरे झाल्यावर टीव्ही बघण्यात गुंग झाला. झोपायला त्याच्या रूममध्ये आला तेव्हा बेडवरचा मोबाईल दिसला. त्याचा PC , तो तसाच सुरु ठेवून निघून गेलेला बाहेर. पुन्हा त्याने मेल पाहिला. तिचा रिप्लाय नव्हता. तसंच नाराजीने त्याने PC बंद करून टाकला. झोपणार होता तर गौरव चा कॉल आला. उद्या कॉलेजला येताना तुझाकडे एक बुक आहे , ते घेऊन ये. हे सांगायला गौरवने कॉल केलेला. बोलणे झाले आणि कॉल कट्ट झाला. मोबाईल खाली ठेवणार तर त्याला whatsapp वर आलेला मेसेज दिसला. अनोळखी नंबर. " Thank you friend ...... from सिद्धता " असा मेसेज होता.
आदित्यने आनंदानं उडीच मारली. नाचू लागला. पुन्हा पुन्हा , तोच तोच मेसेज वाचू लागला. आणि त्याच्या लक्षात आले कि आपण जेव्हा बाहेर गेलो , त्याच्यानंतर लगेचच हा मेसेज आलेला. " shit !! shit !! shit !!... खाल्ली ना माती ... मोबाईल घेऊन गेलो असतो तर काय झाले असते ... लवकर रिप्लाय करायला पाहिजे " त्याने पटपट " most welcome !! " असा मेसेज पाठवून दिला. आता तिचा काही रिप्लाय येतो का ते , वाट बघू लागला. तोपर्यत त्याने तिचा नंबर save करून ठेवला. तिचा मेसेज काही आला नाही , पण आदित्य आनंदात होता. ३० मिनिटांनी मोबाईल वाजला. मेसेज आल्याची रिंग होती. सिद्धताचा मेसेज ... " Good night , take care " आदित्य पुन्हा नाचू लागला. जग जिंकल्याचा आनंद जणू काही. नजरेसमोर पुन्हा धुंदी आली. बेडवर तसाच अलगद पडला.... डोळ्यासमोर एक गाणे आले...
" पहला नशा.. पहला खुमार..,
नया प्यार है.. नया इंतज़ार ,
कर लू मैं क्या अपना हाल,
ऐ दिल-ए-बेकरार,
मेरे दिल-ए-बेकरार, तू ही बता
पहला नशा.. पहला खुमार.."
आदित्य आनंदात हसत होता. त्याच धुंदीत त्याला झोप लागली.
जागा झाला तेव्हा वर्गात बसलेला आणि lecture सुरु होता. समोर साक्षात सिद्धता उभी होती. आदित्य तिच्याकडे बघत राहिला. तीही छान हसली आणि आदित्यच्या जवळ येऊन त्याच्या गालावर हात फिरवला. आदित्य खाड्कन जागा झाला. आपण अजूनही घरात आहोत , हे त्याच्या लक्षात आले. " सकाळी पडलेली स्वप्ने खरी होतात , असे म्हणतात. " आदित्य मनातल्या मनात बोलला, स्वतःला गुदगुल्या झाल्या सारखे वाटले त्याला. कॉलेजला जाण्याची तयारी करू लागला. नेहमीप्रमाणे वेळेआधी निघाला आणि कॉलेजमध्ये येऊन बाकी ग्रुपची वाट बघू लागला. त्याचा ग्रुप आल्यावर सर्व वर्गात जाऊन बसले.
पहिला lecture सुरु झाला. आदित्य आज फारच खुश होता , शिवाय खूप दिवसांनी आज त्याचे अभ्यासावर लक्ष होते. सिद्धता काही आज पण येणार नाही , हे नक्की होते. तब्येत ठीक नाही ना बिचारीची, आजही तिला नोट्स पाठवू. उगाच अभ्यास मिस होयाला नको. आदित्य स्वतःशीच बोलत होता. अश्यातच दुसरा lecture सुरु झाला. आदित्यचे लक्ष अचानक पहिल्या बेंचवर बसलेल्या सिद्धता कडे गेले.उडालाच तो .
" हि येते तरी कशी .... आलेली दिसलीच नाही. कमाल करते हा हि.. " आदित्य यावेळेस मनात न बोलता पुटपुटला. गौरवने बरोबर ऐकले.
" या वर्गातील नक्की कोणाबद्दल बोलत आहेस.. " आदित्यने लगेचच त्याची मान धरली.
" तुला बर सर्व चौकश्या .... गप्प .... कोणाबद्दल बोललो नाही. अभ्यास करा अभ्यास .... " गौरवला हसू आलं. आदित्यचे काम सुरु झाले. इतकी मदत केली आहे तिला .... एकदा तरी ती माझ्याकडे बघणारच, असे आदित्यला वाटत होते. तसे काही झाले नाही. सर्व lecture संपले , कॉलेज सुटले.
सर्व घरी जाण्यासाठी निघाले. बाहेर पावसाने काळोख केलेला, उगाच भिजू नये म्हणून बहुतेक विध्यार्थी घरी निघाले. सिद्धता वर्गातून कधी गेली ते आदित्यला कळेल नाही. त्यात भरलेले आभाळ बघून त्याच्या सर्व मित्रानी टाईमपास न करता घरीच जाऊ असे ठरवले. निघाला होता तर आदित्यला काही आठवलं. " तुम्ही जा पुढे ..... मला लायब्ररी मधून एक पुस्तक घेयाचे आहे... bye ... " म्हणत आदित्य पुस्तक आणण्यासाठी गेला. कधीचे त्याला ते पुस्तक पाहिजे होते , ते आज मिळाले , म्हणून आनंदात आदित्य बाहेर आला. बघतो तर पावसाने नुकतीच धो - धो सुरुवात केलेली. आदित्यने डोक्याला पुस्तक लावले. छत्रीचे ओझे वाटायचे म्हणून तो कधीच सोबतीला ठेवत नसे. काय करणार , एका बाजूला उभा राहून पाऊस बघू लागला. त्याच्या आजूबाजूला छत्री न आणणारे , त्याची गर्दी जमू लागली. आदित्य स्वतःच्या विचारात रमलेला. पाऊस गेल्या शिवाय मी निघणारच नाही , असं आदित्यने ठरवले होते. थोड्यावेळाने पाऊस कमी झाला , पण थांबला नव्हता. त्याच्या शेजारी उभी असलेली गर्दी हळूहळू कमी झाली. आता आदित्यला जाणवलं कि बाजूच्या कोपऱ्यात कोणी एकच व्यक्ती उभी आहे. त्याने हळूच पाहिले .... सिद्धता !!! पुन्हा उडाला तो.
" देवा.... तुझा काय प्लॅन आहे एकदा सांग तरी .... heart attack वगैरे देशील कधी तरी " आदित्य मनात बोलला. पावसाचा वेग पुन्हा वाढला. सोबतीला अंगावर शहारे आणणारा बोचरा थंड वारा ... प्रत्यक्षात आज ती त्याच्या शेजारी उभी होती. अर्थातच तो एका टोकाला आणि ती दुसऱ्या , दोघांमध्ये अंतर होते तरीही तिथे ते दोघेच उभे होते.
सिद्धताने त्याला पाहिले. " आदित्य उभा आहे.... बोलूया का त्याच्याशी.... पण काय बोलू.... कशी सुरुवात करू .... thank you बोलूया का .... एवढे नोट्स दिले... कि आजचे नोट्स पण मागून घेऊ ... मुद्दाम .... त्या निम्मिताने बोलणे होईल... " सिद्धता मनात इतके बोलत होती , समोर बोलायला जमत नव्हते. आदित्यही तसाच. " चांगला चान्स दिला पावसाने... thanks पावसा ... !! बोलूया ... कोणीच नाही आहे, कोणाला कळणार नाही..... काय विषय , कसे सूरवात करू...... हा ... तब्येत कशी आहे, किंवा .... बरे वाटले का .... नको .... Hi .... how are you .... मूर्खां .. तेच ते झाले ना .... नीट बोलता ही येतं नाही तुला मुलींशी... जीव दे जा .. " आदित्य स्वतःलाच मनातल्या मनात ओरडत होता.
दोघेही तसेच , कोणीतरी बोलायला सुरुवात करावी तर नाही. दोघेही स्वतःशीच मनात बोलत होते. तिरक्या नजरेने एकमेकांना चोरून बघणे सुरु होते. " अरे ... बोलशील का आता.. कि असच उभे राहणार ... " आदित्य स्वतःला. शेवटी न राहवून त्याने बोलायला तोंड उघडले, " Hi " असे बोलत होता आणि तिचा मोबाईल वाजला. आदित्यने तोंडातून येणारे " Hi " तसेच गिळून टाकले. तिने कॉल उचलला.
" हो पप्पा , मी इथेच उभी आहे. तुम्ही बाहेर आला आहात का .. " आदित्यने गेटबाहेर पाहिले. एक गाडी उभी होती." आले आले पप्पा.. " म्हणत ती पळत पळत त्या गाडीजवळ गेली. पट्कन गाडीचा दरवाजा उघडला, जलद गतीने सिद्धता गाडीत बसली आणि गाडी भुर्रकन निघून गेली.
पाण्याचा नळ जसा बंद करावा , सिद्धता गेल्यावर पाऊस सुद्धा तसाच पटकन बंद झाला. आदित्यने स्वतःला टपली मारली. " चला आदित्य राव ... आता इथे उभे राहून काही फायदा नाही. " आदित्य चालत चालत गेटजवळ येतं होता. आणि मोबाईल वाजला. कोणाचा तरी मेसेज आलेला. त्याने पाहिले , सिद्धताचा मेसेज. " Hi .... मला आजच्या नोट्स मिळतील का ... " आदित्यने मेसेज वाचला आणि जागच्या जागी उडी मारली. धावत जाऊन गेटवरच्या watchman काकांना मिठी मारली. त्यांना काहीच कळेना , याला काय झाले ते.
त्याच आनंदात आदित्य घरी धावत आला. त्याने त्याची वही बघितली. नोट्स काढल्या होत्या , परंतु भरभर लिहले होते म्हणून खाडाखोड झालेली. पुन्हा लिहू सर्व ... छान अक्षरात... आदित्य कामाला लागला. आई त्याला बघायला आली.
" काय रे ... आल्या आल्या अभ्यासाला बसलास .. ते कपडे तरी काढ ना ... घरातले घाल. ",
" मम्मा ... तू थांब जरा ... मला डिस्टर्ब नको करुस... ",
" एवढा कसला महत्वाचा अभ्यास आहे कि पायातले शूज काढायला विसरलात साहेब ... " आदित्यने दाताने जीभ चावली. मागे वळून पाहिले तर चिखलाने माखलेल्या शुजचे ठसे दारापासून त्याच्या रूमपर्यंत आलेले.
" सॉरी मम्मा !! " आदित्यने आईला मिठी मारली.
" करते साफ. आधी ते कपडे धुवायला टाक. शूज कोण घालते रे पावसात.. ते धुवून ठेव आणि उद्या पासून पावसाळी चप्पल घालून जा पायात. " ok मम्मा ... love you मम्मा ... " आदित्यने आईच्या गालावर kiss केले आणि फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होऊन पुन्हा नोट्स लिहायला बसला. मनात आनंद , डोळ्यात आनंद ... आनंदी आनंद गडे ... जिकडे तिकडे चोहीकडे !!
या दोघांचे समोर बोलणे नाही, जे काही होते ते whatsapp वर. आदित्यला ते मान्य होते. सिद्धता कधीतरी समोर येऊन बोलेल, हे आदित्यने मनातून आधीच काढून टाकलेलं. दोघांची कधी नजरानजर झाली तर फक्त एकमेकांना smile तेवढी देयाचे. त्याच्या ग्रुपमधला एकटा गौरव तेव्हढा शहाणा होता. त्याला या दोघांचे ट्युनिंग जमले आहे, हे फार आधीच कळले होते. आदित्यला रंगेहात पकडायचे होते. परंतु हे दोघे एकमेकांसमोर कधी येत नाही, बोलत नाहीत , पकडणार कसे. गौरव वाट बघत होता आणि friendship day आला. ऑगस्ट महिन्यातला friendship day, बर का !!
त्यादिवशी , अर्धेच lecture होते. त्यानंतर मुलांना थोडी मोकळीक दिलेली. सर्व एकमेकांना बँड बांधत होते. आदित्यने खूप बँड आणले होते , मित्र-मैत्रिणीना बँड बांधत होता. परंतु गौरव सिद्धताला शोधत होता. दिसली नाही कुठे. आदित्य थोड्यावेळाने एका बाजूला जाऊन उभा राहिला. आणि त्या सर्व गर्दीकडे एकटाच बघत उभा राहिला. गौरव त्याच्या जवळ गेला.
" कोणाला शोधत आहेस ... सिद्धताला ना ... " गौरवने थेट विचारलं. आदित्य आधी हसला , नंतर त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.
" काय ... confused झालास ..... मला कसे कळले... " गौरव आदित्यकडे बघून बोलत होता. सिद्धता आता सर्व वर्गात ओळखीची झालेली, कारण गेल्या महिन्यात झालेल्या surprise test मध्ये तिने चक्क आदित्यला मागे टाकले होते. आदित्य पेक्षा कोणीतरी हुशार आले आहे , हे सर्व वर्गात कळले होते.
" हे बघ मित्रा .... उगाचच कशाला तिचे नाव जोडतोस ... तिला शोधतो आहे हे तुला कोणी सांगितले. " आदित्य बोलला.
" तुझ्या डोळ्यात दिसते ते , कोणाला शोधत आहेस ते ... " गौरव.
" फिल्मी डायलॉग ... हा ... " आदित्यने गौरवला चिमटा काढला.
" अबे .... तुझा मित्र आहे मी . ११ वी पासून एकत्र आहोत , तेव्हा पासून एकाच बेंचवर बसतो आपण. इतरांपेक्षा तुला मी जास्त ओळखतो. आणि सध्या वर्गात lecture सुरु असताना तुझे लक्ष कुठे असते , कोणाकडे बघत असतोस .. मला काय कळत नाही का... " गौरवने आदित्यच्या पोटात गुद्दा मारला.
"चल चल .... आता सांगून टाक ... काय सुरु आहे.... प्रेम वगैरे .. बोल ना ... बघ , खोटे बोललास तर उद्या वर्गात ब्लॅकबोर्ड वर लिहून ठेवीन , सर्व वर्गाला कळेल. " गौरवने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
आदित्य जरासा लाजला. पण गौरवला आता कळले होते , मग लपवण्यात काहीच अर्थ नव्हता.
" तस ... प्रेम आहे का माहित नाही.. ",
" मग " ,
" मग काय .... मला आवडते ती , बस्स !! तिच्या फीलिंग माहित नाही मला. " गौरवने कपाळाला हात लावला.
" तुला आवडते , हे तिला सांगितले ना ... " ,
" नाही , कधी सांगू तिला. बोलते तरी का माझ्याशी ती. ",
" अरे माणसा .... तिला स्वतःहून बोलायला आवडत नसेल. वर्गात बघतोस ना ... २-३ मुलीसोबत बोलते तितकंच ... तू जा ना स्वतःहून बोलायला. ",
" केला प्रयत्न .... ते तरी कुठे जमते. lecture संपले कि कधी निघून जाते कळतच नाही. कधी तरी whatsapp वर मेसेज करते. ते पण असेच तुटक तुटक असतात. आज विचार केलेला , friendship band बांधू... lecture संपला , ती गेली लगेच. मला वाटलं कि इथे खाली कॅम्पसमध्ये असेल. नाही आहे. एव्हाना घरी पण पोहोचली असेल. " आदित्यच्या बोलण्यावर गौरव विचार करू लागला.
" काय यार .... एव्हड्या वर्षात कोणी आवडली आहे. तर तिचे असे नखरे... " गौरव बोलून गेला.
" नखरे नाहीत .... ती career oriented आहे. असं आपल्या सारखे टाईमपास करायला आवडत नाही. ",
" हो ... तसा तर तुही career oriented आहेस. तरी अभ्यास करून बाकीच्या गोष्टीही करतो ना .. ",
" तिचे वेगळे आहे रे , आणि तिला कॉलेजमध्ये कोणाशी नाव जोडायचे नाही. मग सांग ... कशी काय तिच्याशी मैत्री करू.... मैत्री तर झाली आहे म्हणा , वरवरची मैत्री !! आमच्यात त्यापुढे काही गोष्टी जातील, असे मला तरी वाटत नाही. " आदित्यचे बोलणे संपले.
" तूच रे ... खरा हिरो ... " म्हणत गौरवने त्याला मिठी मारली. दोघे गप्पा मारत घरच्या दिशेने निघाले. गौरव सच्चा दोस्त ... त्याने हे प्रकरण त्याच्या पुरतेच ठेवले.
सिद्धता घरी आली. तिच्या रूमला एक छान अशी बाल्कनी होती. तिथे बसून विचार करत होती. " का निघून आली अशीच... थांबले पाहिजे होते ना मी. आदित्य बघत होता माझ्याकडे... त्याला काय वाटले असेल , किती गर्विष्ठ आहे मी. एक दिवस असा टाईमपास केला असता तर चालले असते. आता हे सर्व बोलून काय फायदा... " सिद्धता तशीच बसून होती. मोबाईल वर मेसेज करू , म्हणत तिने लगेच आदित्यला मेसेज केला. " happy friendship day .... dear !! " . तोपर्यंत आदित्य घरी पोहोचत होता. दारावरची बेल वाजवली आणि मेसेज तेव्हाच आला. मेसेज वाचून आनंदाला आदित्य. आईने दरवाजा उघडला. मोबाईल स्वतःच्या खिशात ठेवून त्याने आईचा हात हातात घेतला आणि आई सोबत नाचू लागला. तिला कळेना याला इतका कसला आनंद झाला आहे , तीही हसत हसत त्याच्या सोबत नाचू लागली.
इकडे , सिद्धता आज फक्त आदित्यचा विचार करत होती. " त्याला मी आवडते हे नक्की. पण हे त्याच्याकडूनच ऐकले पाहिजे ना.... कि त्याला फक्त मैत्री करायची असेल तर ...... कॉलेजमध्ये सर्वच बोलतात ना , सर्वांचा तो best friend आहे. कोणत्याच मुलीला त्याने " मैत्री " पुढे नेले नाही. मग मला कशाला स्पेशल वागणूक देईल तो..... सिद्धता ... आपण कोणता विचार करत आहोत. अजून नीट मैत्री नाही आणि प्रेमाचा विचार... वेडबिड लागले आहे का... अभ्यास महत्वाचा ... हम्म .... मलाही आवडतो आदित्य ... शी बाबा !! काय करायचे कळतच नाही. " सिद्धताने सर्व विचार गुंडाळून ठेवले आणि अभ्यास करायला निघून गेली.
आदित्यला मात्र छान वाटले. तिने मेसेज केला. तोही " Friend " म्हणून .... व्वा !! तिच्या मनात नक्की असेल काही... माझ्याबद्दल. कदाचित मैत्री पुढे गेलो तर. आदित्य तिचा विचार करत घराबाहेर आला. त्याच्या सोसायटीमध्ये एक छानसे गार्डन होते. तिथेच असलेल्या एका लाकडी बेंचवर जाऊन बसला. कदाचित कॉलेजमध्ये असणाऱ्या इतर गोष्टीमुळे घाबरत असेल ती. मी ... मी काय करतो ... तेच .. करिअर महत्वाचे ... ती माझ्या पेक्षा जास्त फोकस वाटते. अभ्यासात माझ्यापुढे आहे. सोडून देऊ का प्रेमाचा विचार... सुरुवातीला ते कसे छान वाटायचे ना ... सर्व कसे slow motion ... छान आहेत त्या भावना.... आम्ही whatsapp वर बोलायला लागलो आणि ते बंद झाले. पप्पा बोलला होता ना , अचानक सुरु होते आणि अचानक बंद होते. ती दिसली कि अजूनही बहुदा हवेतच फिरत असतो मी. स्वतःशीच हसला. त्याला ती पहिल्यांदा दिसली होती ते आठवलं. तेव्हा पासूनचे दिवस त्याला आठवले. अचानक एक थंड हवेची झुळूक आली. आदित्यने त्या दिशेने पाहिले. समुद्राच्या लाटा !! ... हे कसे .... आपल्या सोसायटीमध्ये समुद्र कसा काय... एक अस्पष्ठ असा सुवास आला तर दुसऱ्या दिशेने पाहिले. नजर जाईल तिथे विविध रंगांची फुले फुलली होती. त्यावर हाताच्या पंजाहून मोठी अशी वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे उडत होती. काय होते आहे नक्की... आदित्य विचारात पडला. समोरून सिद्धता चालत येत होती, तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करत , आदित्यकडे एकवार पाहत त्या फुलांमध्ये निघून गेली.
आता सिद्धताला बघितले ना मी... आदित्य डोळे चोळत होता. असा विचार सुरु होता तोच त्याच्या डोक्यावरुन पक्षांचा एक मोठा थवा उडत गेला. आदित्य भारावून गेला. त्याच्याकडे बघत होता , बघता बघता ते समोर उडत चालले आहेत , त्या दिशेने बघितले. तर समोर सिद्धता अभ्यास करत बसलेली. चोरून एक नजर तिने आदित्यकडे पाहिले. ... हे तर कॉलेजच्या वर्गातले, आदित्यने ओळखले. आणि क्षणार्धात तिची असंख्य अशी छोटी छोटी फुलपाखरे झाली. आदित्यला उमगले. पप्पा बोलला होता ना ... त्या प्रेमाच्या जगात आहोत. छान वाटलं त्याला. समुद्रात त्याला दूरवर पाण्यातून बाहेर मुसुंडी मारणारे डॉल्फिन दिसले.त्यांना बघत असताना ... बाजूलाच पावसात उभे असलेले हे दोघे दिसले. दोघेही एकमेकांना चोरून बघत , आधी कोण बोलणार याची वाट पाहत होते. मधेच सिद्धता तिच्या मैत्रिणी सोबत जाताना दिसली. लगेच पावसाने त्यावर इंद्रधनूष्य धरले. आदित्यने त्या इंद्रधनुला हात लावला. सप्तरंग त्याच्या हातावर उमटले. त्या रंगाच्या मध्ये सिद्धताचा फोटो.... दुसऱ्या हाताने स्पर्श करायचा प्रयन्त करताच पुन्हा त्याच्या असंख्य फुलाच्या पाकळ्या झाल्या. आलेल्या वाऱ्यासोबत त्या पाकळ्यांनी फेर धरला आणि आभाळात निघून गेल्या. काही आदित्यच्या गालावर विसावल्या. आभाळ रंगेबेरंगी झाले. एक पक्षी आदित्यच्या शेजारी येऊन बसला. मघाशी दिसलेले डॉल्फिन आता त्याच्या मागे येऊन कसरती करत होते. काही फुलपाखरे त्याच्या शेजारी उडत होती. आदित्यने हात पुढे केला. त्याच्या बोटांवर एक फुलपाखरू येऊन बसले. आणि आदित्य , त्या प्रेमाच्या जगात जी जादू सुरु होती , ते डोळे भरून बघू लागला.
================================= क्रमश : ==============================