All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday, 29 March 2014

चांदण्यात फिरताना.......( भाग २)

                     स्मिता हल्ली उदास उदास राहायची. तिच्या मैत्रिणींना सुद्धा कळलं होतं. " काय झालं स्मिता ...... गप्प गप्प असतेस.... " तशी स्मिता रडायला लागली. " अगं ... मी फक्त त्याला लग्नाचं विचारलं होतं ना..... कुठे गेला कळतंच नाही मला... " रडतच ती सांगत होती. " मग त्याला फोन करायचा ना... ", " नाही वापरत तो mobile .... " ," पहिलं तुझं रडणं थांबव.... आणि मला नीट सांग काय झालं ते " स्मिताने डोळे पुसले, जरा शांत झाली ती व सांगायला लागली," तुला सांगितलं होतं ना..... तसं त्याला विचारलं मी लग्नाबद्दल. त्याने उत्तरच नाही दिलं..... दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणाला.... तेव्हापासून आज आठवडा झाला.... तरी तो मला भेटलाच नाही.. "," अगं उशिरा निघत असेल तो "," नाही गं.  रोज एक तास तरी थांबते मी .... नाहीच येत तो ...." ," आणि mobile च काय बोललीस ?"," तो म्हणायचा गावात रेंज नाही येत.... मग mobile कशाला वापरायचा... घरीही फोन नाही... गावातच सगळे नातेवाईक आहेत म्हणतो... कोणाशी बोलायचे असेल तर त्यांना सरळ भेटायलाच जातो , अस म्हणाला तो...  " दोघीही गप्प झाल्या. " आता काय करायचं गं... पप्पा बोलले मी येऊ का गावात... त्याची चौकशी करायला.. " , " नको.... पप्पांना नको बोलावू... मला वाटते तो ना चोर असणार ... गावात असे खूप असतात गं फसवणारे.. तो घाबरून पळाला असणार तू लग्नाचं विचारल्यावर , तरी आपण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवूया. ..... हरवल्याची... " ," ठीक आहे. चल " असं म्हणत त्या दोघी हॉस्पिटल पासून जरा लांब असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्या. 
                    " सर.... आम्हाला एक व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवायची आहे. " ," ठीक आहे. फोटो आणला आहे का हरवलेल्या व्यक्तीचा ? " तश्या दोघी एकमेकांकडे बघायला लागल्या. " नाही .... फोटो तर नाही आहे... " स्मिताची मैत्रीण म्हणाली. " फोटो नाही ... मग त्याला शोधणार कसा..... बर नाव आणि पत्ता तरी आहे त्या व्यक्तीचा… " पोलिसांचा पुढचा प्रश्न..." त्याचं नाव आहे यश. " ," पूर्ण नाव सांगा बाई.. "," माहित नाही सर " , " बर... पत्ता ? "," तोही माहित नाही." तसा तो पोलिस त्यांच्याकडे बघायला लागला. तुमच्या ड्रेस वरून तुम्ही शिकलेल्या वाटता आणि तक्रार नोंदवताना काय माहिती दयावी एवढ साधं माहित नाही तुम्हाला... " दोघी शांत बसल्या. कोणास ठाऊक.... त्या पोलिसाला त्यांची दया आली... " बर... त्या यशला कोणी पाहिलं आहे का... ", " हं.... हो मी बघितलं आहे ..." स्मिता लगेच बोलली. " तो बघा , त्या खोलीत आमचा स्केच artist आहे ...  त्याचं वर्णन करून सांगा त्याला... तो काढेल चित्र त्याचं... मग आम्हालाही बरं पडेल शोधायला.. मी आता बाहेर जातो आहे,चित्र झालं कि तक्रार नोंदवून घ्या , आम्हाला भेटला तर तुम्हाला कळवतो. " असं म्हणून तो पोलिस निघून गेला. स्मिता लगबगीने त्या रूम मधे गेली. " मला सविस्तर वर्णन सांगा... तस मी स्केच काढतो." स्मिताने लगेच त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि त्याने स्केच काढायला. अर्ध चित्र झालं असेल तसा तो मधेच बोलला... " थांबा... "," का.... काय झालं ? "," तुम्ही ''आधार'' हॉस्पिटल मध्ये काम करता का …?" त्या प्रश्नाने दोघीही दचकल्या. " आणि तुम्ही नक्की डॉक्टरच असणार .. "," हो .. आम्ही आधार हॉस्पिटल मधे डॉक्टर आहोत. पण तुम्हाला कसं माहित ? " , " मग हे स्केच काढायची गरजच नाही. " अस म्हणत तो उठला आणि कपाटातून कसलीशी फाईल काढली. " हि फाईल बघा.... वेगळीच फाईल बनवली आहे मी.. " फाईल उघडताच एक स्केच होतं...... यशचचं.... अगदी हुबेहूब.... " हाच..... हाच यश आहे.. " स्मिता आनंदाने म्हणाली. तिच्या मैत्रिणीने तिला गप्प केलं आणि त्यालाच उलट प्रश्न केला ," पण याचं स्केच तुमच्याकडे कसं ?" तसा तो हसला," तुम्ही नवीन आहात वाटतं इकडे..... ?" ," हो ... आम्ही दोघीही ६ महिन्यापूर्वीच जॉबला लागलो."," मग बरोबर... तुम्हाला माहीतच नसणार.. " , " काय ते ? " , "तुमच्याच हॉस्पिटल मधल्या , आतापर्यंत ९ जणींनी येते " यश " संबंधी तक्रार नोंदवली आहे .. " तश्या त्या दोघीही आश्चर्यचकित झाल्या," बघा त्या फाईल मध्ये सगळ्या तक्रारी आहेत... ७ महिन्यापूर्वीच नवीन तक्रार नोंदवली एका महिला डॉक्टरने... " ," कोणी .... संगीता नाव होत का तिचं ? "," हो ... संगीताच नाव होत तिचं …. " ," आणि पुन्हा विचार करा ... या ९ तक्रारीपैकी कोणीच नंतर विचारला आले नाही... तुम्ही उगाच तक्रार करू नका," , " पण ... त्याचं काय झालं आणि कसल्या तक्रारी आहेत ? " ," सगळ्याच्या तक्रारी ..... तो हरवल्याच्या आहेत... " ,"हे कसं शक्य आहे.... " , " ते मला माहित नाही पण तुम्ही उगाच तक्रार नोंदवू नका. .... " स्मिताला तर काही कळतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची मैत्रीण बोलली," मग तुम्ही शोध नाही घेतला त्याचा ? " ," या ९ तक्रारी.... गेल्या १० वर्षातल्या आहेत... प्रत्येक वर्षी एक तक्रार आहे... आणि हे पोलिस स्टेशन तसं नवीन आहे, चार वर्ष झाली फक्त... जुन्या पोलिस स्टेशन मधले सगळे अधिकारी, शिपाई त्यांची बदली झाली... इकडे आता सगळेच नवीन आहेत.... त्यामुळे जुन्या तक्रारींच तसं काही माहित नाही... पण आम्ही आल्यापासून ४ तक्रारी आल्या… त्याची तपासणी केली आम्ही तरी त्याचा काही पत्ता नाही लागला आम्हाला.. आता एवढा माणूस जाणार कुठे.... तरी मला वाटते तो चोर असावा.... शहरातल्या मुलींना फसवत असावा आणि काम झालं कि पळून जात असेल... पुन्हा तिकडे घनदाट जंगल आहे... त्या जंगलातच तो लपत असेल कदाचित ..... आम्हाला permission नाही आहे जंगलात जाण्याची... नाहीतर गेलो असतो तिकडे पण... तुम्ही तसच करा.. तक्रार करू नका... तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा.... मी कळवतो काही कळल तर ...." त्या दोघींना काय चाललंय ते कळतच नव्हतं.
                 " हे कसं शक्य आहे…? जो माणूस मला रोज भेटायचा…तो १० वर्षापूर्वी कसा काय हरवू शकतो…?" स्मिता तिच्या मैत्रिणीला बोलली. " काही तरी नक्कीच गडबड आहे... मला तर वाटते... " , " काय ? " ," तो खरंच चोर असेल गं…. " ," अगं ... मग तो पोलिसांना कसा भेटत नाही. " , " माझं डोकं गरगरायला लागलं आहे आता .. " विचार करतच घरी पोहोचली ती. काहीच कळत नव्हतं तिला..... अचानक तिला आठवलं.... त्याच्या ऑफिस मधून त्याचा पत्ता मिळू शकतो. " काय नाव होतं.... कंपनीचं.. हा... " Eco" ... तेच नाव होतं..... त्याच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकलं होत मी.. "आठवून तिने दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय केला. सकाळीच निघाली स्मिता...त्याचं ऑफिस शोधायला. विचारत विचारत तिला कळल कि "Eco" नावाची एक कंपनी होती ,शहरापासून थोडी अलीकडे ...शेवटी पोहोचली एकदाची तिकडे. तिथे पोहोचल्यावर ज्याला त्याला विचारलं , त्यापैकी कोणालाच त्याची माहिती नाही.... अगदी बॉसलाही... तिलाच सगळ्यांनी वेडयात काढलं... स्मिताला रडूच आलं... आता कुठे शोधू मी त्याला... रडत रडतच ती कंपनी बाहेर आली.तेवढयात मागून " थांबा .. madam" असा आवाज आला. ... वॉचमननी हाक मारली होती . " काय झालं madam ? .. कशाला रडता… बसा इकडे .. उनाचा बाहेर नका जाऊ... पाणी प्या.. " स्मिता शांत बसली. आणि पाणी पिऊन बंर वाटलं " काका ... मी इकडे आले होते एकाला शोधायला .. पण इकडे कोणालाच माहित नाही"," कोणाला ? " ," यश नाव आहे त्याचं" ," यश साहेब .. " वॉचमन बोलला... तशी स्मिता आनंदाने उभीच राहिली. " तुम्ही ओळखता त्याला ? कुठे आहे आता तो " ," माहित नाही madam ... यश साहेब होते इकडे कामाला, पण १० वर्षापूर्वी ... नंतर कुठे गेले माहित नाही.. आणि इकडे मी सोडलो तर सगळेच नवीन आहेत .. " या बोलण्याने स्मिताचा आनंद नाहीसा झाला. " हा पण आमचे जुने साहेब ... त्याचा पत्ता आहे माझ्याकडे... त्यांनी यश साहेबांबरोबर काम केलं आहे... त्यांना माहित असेल " ते ऐकून थोडीशी आशा पल्लवीत झाली स्मिताची. वॉचमन कडून पत्ता घेऊन ती पोहोचली शहरात.खूप शोधाशोध केल्यानंतर तिला सापडलं त्याचं घर. 
                " नमस्कार सर .. तुम्ही Eco कंपनीत जॉबला होतात ना... ? " दरवाजा उघडताच स्मिताने प्रश्न केला," हो … पण तुम्ही कोण ? " आता त्यांना खर तर सांगू शकत नाही ... " मी स्मिता... यशची मैत्रीण ... तुम्ही ओळखता ना यशला .. " ," तुम्ही प्रथम आतमध्ये या... मग बोलू आपण ." तशी स्मिता त्यांच्या घरात जाऊन बसली," हं ... बोला आता... काय काम होतं तुमचं... आणि यशची कशी ओळख ... " ," मी त्याच्या college मधली मैत्रीण आहे." स्मिताला खोटंच बोलावं लागलं. " खूप वर्षांनी आली मी भारतात.. यशने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला होता मला ... मी जाऊन आले तिथे. तर यशला तिथे कोणीच ओळखत नाही. वॉचमनने तुमचा पत्ता दिला म्हणून आले मी तुमच्याकडे.. " ,"यश .... Actually .... मलाही माहित नाही तो कुठे असतो सध्या.. " , "म्हणजे .. ? "," तो होता माझ्या हाताखाली कामाला... चांगला होता.. पण १० वर्षापूर्वी.... " ," १० वर्षापूर्वी ? " , " हो ..... मग अचानक कुठे गेला ते माहित नाही.. "," नक्की काय ते मला कळलं नाही सर ... " तो अचानक जॉबला येईनासा झाला.. नंतर काही तो आला नाही कधी." सर बोलत होते. " मग तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का ? " ," केलेला ... एक - दोनदा त्याच्या घरी जाऊन आलो..... पण त्याच्या पप्पांनी सांगितलं कि त्यांनाही माहित नाही तो कुठे आहे ते."," तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा ."," आहे ना. " कुंभार " गावात सरकारी कॉटर्स आहेत ना... त्यापासून थोडयाच अंतरावर त्याचं घर आहे. " धर्माधिकारी " नाव आहे घराचं.. " ... " अरे.. माझ्या रूम च्या मागेच आहे घर वाटते.. " स्मिता मनातल्या मनात बोलली." तरी तुम्हाला काय वाटत सर..... कुठे गेला असेल तो... "," तसं नक्की काही सांगू शकत नाही. पण तो हुशार होता.त्याला परदेशातून नोकरीच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. आम्ही काही त्याला सोडू दिलं नव्हतं आमचं ऑफिस, म्हणून तो परदेशात गेला असेल न सांगता आणि परदेशात जाण त्याच्या कुटुंबाला सुद्धा मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील माहित नसेल ते... परंतू त्याच्या बायकोला माहित असेल कदाचित.. " ," बायको ?" स्मिता उडालीच.... ,"तशी बायको म्हणता येणार नाही... पण लग्न करणार होते ते लवकरच.... मग तिच्या बरोबर तो गेला असेल. " ," काय ... काय नाव होतं तिचं ? "," नाव ... सरिता... हा.... सरिताच नाव होतं तिचं..... डॉक्टर होती ती... इकडे पुढे " आधार " नावाचं हॉस्पिटल आहे ना... तिकडे डॉक्टर होती ती..... नंतर ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये दिसली नाही.. " ," बरं .... Thanks Sir " असं म्हणत यशचा गावातला  पत्ता घेऊन ती निघून आली.... सगळंच काही विचित्र होतं.... पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी आहेत. १० वर्षापूर्वी ऑफिस मध्ये, १० वर्षापूर्वी कामाला होता... बायको... काहीच नाही... कदाचित मग तो परत आला असेल परदेशातून,..... कदाचित.
                  त्यांनी दिलेल्या पत्तावर ती पुन्हा गावात आली , तिच्या सरकारी कॉटर्स पासून अर्ध्या तासावर " धर्माधिकारी" अस पाटी लावलेलं एक मोठ्ठ घर होतं. आणि घराला मोठ्ठ कुलूप.. आजूबाजूस चौकशी केल्यावर कळलं कि त्याचं नाव होते यशराज धर्माधिकारी... तो आणि त्याचं कुटुंब राहायचं येते. दोनच वर्षापूर्वी ते घर सोडून कुठेतरी शहरात गेले राहायला...  " आता काय करायचं.... सगळे रस्ते बंद झाले... कुठे शोधायचं यशला " अचानक तिला आठवलं ... त्यांनी सांगितलं होतं... सरिता नावाची डॉक्टर होती ,त्यांच्याच हॉस्पिटल मध्ये.. स्मिता लगबग करतच पोहोचली हॉस्पिटलमध्ये.... " काय झाल गं ? काही मिळाली का माहिती यशची ? " , स्मिताच्या मैत्रिणीने तिला विचारलं. " अगं... हा ... त्याचं घर सुद्धा आहे गावात.. पण ते गेले घर सोडून २ वर्षापूर्वी... "," हे कसं शक्य आहे... मग तो तुला कस काय भेटायचा…?","मला काहीच कळत नाही ,पण काहीतरी नक्कीच मोठ्ठी गडबड आहे... " ," आणि तू काय शोधते आहेस इकडे"," अगं त्याच्या जुन्या बॉसने पत्ता दिला मला आणि त्याच्या बायकोची माहिती सांगितली... " ,"त्याचं लग्न झालेलं होतं ... ?"," नाही गं होणार होतं .... पण ती इकडेच डॉक्टर होती,अस त्यांनी माहिती दिली... तिचा पत्ता तर भेटेल ना... " तेव्हा तिची मैत्रीण पण शोधायला लागली. खूप शोधल्यानंतर एका जुन्या फाईल मध्ये तिची माहिती मिळाली,फोटो सहित," तिची लास्ट entry पण १० वर्षापूर्वीचीच आहे गं ... हिची माहिती पण नाही मिळणार इथे... " स्मिताने तिचा पत्ता बघितला.. " अरे ... " स्मिता ओरडलीच जवळपास... " काय झालं गं ? " तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं ," अगं ... ही तर मी राहते तिथे रहायची ,सरकारी कॉटर्स मध्ये... हे बघ... " ," हो गं... पत्ता तर तोच आहे.. " स्मिताने तिचा शहरातला पत्ता बघितला,मुंबईतला होता तो.. " आमच्या मुंबईतल्या घराच्या बाजूलाच आहे घर याचं... स्मिताने पत्ता लिहून घेतला आणि तडक शहरात पळाली. एव्हाना , स्मिताने तिच्या घरीसुद्धा हे सगळं प्रकरण सांगितलं होत. त्यांनाही त्याच आश्चर्य वाटलं होतं.  
                  " हं ... सरिता इकडेच राहते.. का ? " सरिताच्या घरी जाऊन स्मिताने प्रश्न केला ." हो , आपण कोण ? " ," मी स्मिता.. " पुन्हा ती खोटं बोलणार होती, " मी यशची मैत्रीण आहे.. college मध्ये होती त्याच्या... त्याचा पत्ता नाही मिळाला मला.. सरिताचा भेटला तिच्या हॉस्पिटल मधून ... " ," पण सरिता राहत नाही इकडे ." ," मग कुठे राहते ती ?","तुम्हाला काय करायचं आहे तिचं ? " , अशी तिची आई बोलली आणि घरात आत निघून गेली. स्मिताला काय बोलायचं तेच कळलं नाही. तेवढयात एक मुलगा बाहेर आला... " Sorry , माझी आई बोलली त्याबद्दल माफी मागतो मी. "," It's OK ... पण त्या असं का बोलल्या... काही प्रोब्लेम आहे का " ,"सरिता ... हॉस्पिटल मध्ये असते... ", " हो . मला माहित आहे ती डॉक्टर आहे ते "," डॉक्टर होती ती , आता नाही आहे......  हॉस्पिटल मध्ये treatment चालू आहे तिची." , " का ... काय झालं तिला .. बरं नाही आहे का तिला ? "," तिची मानसिक अवस्था बरोबर नाही म्हणून तिला psychiatrist कडे admit केले आहे. " हे ऐकून स्मिताला shock च बसला. " कस ... काय झालं नक्की ? " ," नक्की काय झालं मलाही माहित नाही. मी तेव्हा पुण्याला होतो... यश बरोबर हीच लग्न ठरलं ठरलं होतं.... यशही तिच्या हॉस्पिटलच्या बाजूच्याच कंपनीत होता... लग्नाला २ दिवस बाकी असताना... अचानक तो कुठेतरी निघून गेला... तेव्हाही ती चांगलीच होती.. पण ४ दिवसानंतर काहीतरी घडलं तिकडे... त्यामुळे सरिता बेशुद्धच होती.... चार दिवस तरी ती शुद्धीवर नव्हती. नंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हापासून ती वेडयासारखी करायला लागली. म्हणजे इतकी वेडी की कोणालाच तिला control करता येत नव्हतं. तेव्हापासून ती हॉस्पिटल मध्ये आहे." ," अरे बापरे.... इतकं सगळ झालं ..... आता कुठे असते ती ? " ," कोल्हापूरला कुंभार गाव आहे.... तिकडून  जरा पुढे गेलं तर आधार नावाचं हॉस्पिटल आहे, तिकडेच होती ना ती डॉक्टर म्हणून.. त्याच्या मागेच त्यांचंच एक मनोरुग्णाच हॉस्पिटल आहे. तिकडे असते ती. माझे पप्पा सुद्धा त्याच गावात राहतात हल्ली,तिची देखरेख करण्यासाठी.", " आणि यश .... त्याचा काही पत्ता नाही लागला का...", " नाही ... त्याचे घरचे सुद्धा काही नीटसं सांगत नाहीत, तो कुठे आहे ते... मग आम्हीही त्यांच्याशी संबंध तोडून टाकले. "..... काय करायचं आता... स्मिता विचार करत होती..... " तुम्हाला यशचा शहरातला पत्ता हवा असेल तर देतो मी .. " ," हो .. हो .... नक्की.. " अस म्हणून तिने यशचा शहरातला पत्ता मिळवला. ... " आणखी एक... यश संबंधी काहीही माहिती मिळाली तर मलाही सांगा, माझ्या बहिणीची अवस्था त्याच्यामुळे झाली आहे, मला जाब विचारायचा आहे त्याला .. " ," नक्की कळवते तुम्हाला " अस म्हणत स्मिता घराबाहेर पडली. 
                  स्मिता स्वतःच्या घरी आली, मुंबईतल्या... आई-वडिलांना तिने काय काय घडलं ते सगळ सविस्तर सांगितलं.... " मला वाटते ना ... हा यश नक्की मुलींना फसवत असेल आणि त्यांच्याकडून पैसे वगैरे घेऊन पळून जात असेल. " स्मिताची आई बोलली. " अगं आई , .... मग माझ्याकडून त्याने कधीच पैसे मागितले कसे नाहीत."," पण एक गोष्ट आहे ... तो त्या गावातून नक्कीच शहरात आला असेल आता. पोलिसही मागावर आहेत ना त्याच्या." , " हो पप्पा ,...... ९ तक्रारी आहेत त्याच्या नावावर. " ," बरं... त्याचा पत्ता आहे ना .... चल... आम्हीही येतो तुझ्या बरोबर... आम्हालाही कळू दे नक्की काय भानगड आहे त्या यशची .. " आणि स्मिता बरोबर तिचे आई-वडील निघाले त्यांच्या घरी. पत्ता होता त्यामुळे घर शोधायला जास्त मेहनत करायला लागली नाही. दारावरची बेल वाजवली,"कोण पाहिजे आहे आपल्याला ? " ," धर्माधिकारींच घर आहे ना हे ? " ," हो .. आपण कोण ? " ," आम्ही ... आम्ही या मुलीचे पालक आहोत. हिला यश सोबत लग्न करायचे आहे." ," काय बोलताय तुम्ही ? " दारातल्या बाई किंचाळल्या. आवाज ऐकून घरातून एक माणूस बाहेर आला," काय झालं आणि कोण तुम्ही ? " , " यांना यश बरोबर बोलायचे आहे ","  बरं ... ठीक आहे... पहिलं तुम्ही घरात या... मग बोलू सविस्तर... " त्यांच्या अश्या बोलण्याने स्मिताच्या जीवात जीव आला.... म्हणजे यश नक्कीच इकडे असणार.... कदाचित आपल्या लग्नाचं बोलायला आला असेल गावातून …. स्मिता मनातल्या मनात बोलली. " मी यशचा पप्पा आहे आणि हि त्याची आई आहे. बोला ... काय बोलायचे आहे तुम्हाला… " , " माझी मुलगी आणि तुमचा यश .... दोघेही एकमेकांना पसंत करतात.... आणि त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. " , " यश बोलला का तुम्हाला तसं " यशच्या पप्पांनी त्यांना विचारलं . " तो बोलला नाही .... पण त्याला आवडायची मी. म्हणून मीच त्याला लग्नाचं विचारलं होतं. " , " तुला भेटायचा यश... " ," हो ... अगदी रोज भेटायचो आम्ही.... तेव्हाच ओळख आमची.. " , " कस शक्य आहे ते.. " यशची आई बोलली. " का शक्य नाही.. तो रोज हिला भेटायचा ... रोज एकत्र घरी यायचे.. प्रेम होत स्मिताचं यश वर.... आणि तो इकडे आला पळून लग्नाचं विचारल्यावर.... त्याला बोलवा आधी बाहेर " ........ " यश कोणाचीच फसवणूक करू शकत नाही. " , " का ... शक्य नाही ? " स्मिता चिडून बोलली. " तो कोणालाच फसवू शकत नाही . कारण ....... आता तो या जगातच नाही आहे. " यशचे पप्पा बोलले, तसे सगळे गप्प झाले. यशची आई रडतच घरात आत पळत गेली. 
                 सगळं कसं विचित्र वाटतं होतं," काय बोलताय तुम्ही .... तुम्हाला तरी कळत आहे का ? " स्मिताच्या आईने यशच्या पप्पांना प्रश्न केला. स्मितातर स्तब्ध झाली होती. यशचे पप्पा उठले आणि कपाटामधून त्यांनी एक फाईल काढली. त्यातून एक फोटो स्मिताला दाखवला. " हाच यश आहे ना.. " तिने फोटो पाहिला आणि होकारार्थी मान हलवली... " आजपासून १० वर्षापूर्वीची गोष्ट, आम्ही कुंभार गावात राहत होतो. यशही तिकडेच जॉबला होता ना म्हणून शहरात राहण्यापेक्षा गावातच राहणं पसंत होतं यशला... तिकडच्याच हॉस्पिटल मध्ये सरिताची ओळख झाली. तो डॉक्टर आणि हा इंजीनियर.. चांगली जोडी होती.. लग्नही ठरलं होतं दोघांच... दोघेही एकाच वेळेस घरी यायचे.. एकच वाट ना दोघांची.... त्या दिवशी सुद्धा रोजच्या सारखे निघाले घरी येण्यासाठी दोघेही... लग्नाच्या गप्पागोष्टी करत.... नेहमीचीच वाट त्यांची.. त्यामुळे जरा बिनधास्त होते दोघेही.... अचानक कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला... कोण होते माहित नाही ते .. डाकू , गुंड.. सरिताला कसबसं सोडवलं यशने.. आणि पुढे जाऊन मदत घेऊन ये अस सांगितलं सुद्धा त्याने... मात्र तो अडकला त्यांच्यात.... सरिता धावत धावत आली आमच्याकडे... तसे आम्ही लगेचच पोहोचलो तिकडे... तर कोणीच नव्हतं तिकडे.. खूप शोधलं आम्ही यशला त्या रात्री... मिट्ट काळोख तिकडे ... काहीच दिसत नव्हतं" , " मग पुढे काय झालं ? " स्मिताने धीर करून विचारलं.. " पोलिसात तक्रार केली तर ते म्हणाले तो आमचा एरिया नाही.. त्यांनीही हात वरती केले. गावात ना शहरात.. कोणीच तक्रार नोंदवायला तयार नव्हतं..... यश काही घरी आला नाही... ४ दिवसांनी मात्र एक हवालदार आला आमच्याकडे आणि सगळ्यांना घेऊन गेला... सरिताही होती आमच्या सोबत... जिथून यश बेपत्ता झाला होता .. तिथूनच खूप आतमध्ये .... जंगलात..... एक प्रेत सापडलं होतं.... त्याच्या कपड्यावरून आणि सामानावरून तो यशच होता , याची खात्री पटली आम्हाला." अस बोलले आही सगळे गप्प झाले. " संपूर्ण शरीर जंगली प्राण्यांनी ओरबाडलं होतं... चेहरा ओळखता येत नव्हता... पोलिसांना तिथे त्याच ओळख-पत्र मिळालं... तो यशच होता.... आमचा यश.. सरिताही होती तिकडे.... ते बघून ती बेशुद्ध झाली... मग तिला तिच्याच हॉस्पिटल मध्ये admit केलं. यशच प्रेत गावात घेऊन जाऊ शकत नव्हतो, दुर्गंध पसरला होता..... पोलिसांनी सांगितलं कि काहीच पुरावे नाही आहेत कि याचा खून झाला आहे..... जंगली प्राण्याचं ही काम असेल हे... त्याला तसंच टाकून जाता येत नव्हतं.... तरी त्याचे उरले सुरलेले शरीराचे अवयव आम्ही जंगलाबाहेर आणले आणि त्या वाटेवर एक मोठ्ठ मोगऱ्याच झाड आहे... त्याच्या शेजारीच यशला जमिनीत पुरल..... " आणि यशचे पप्पा रडायला लागले. स्मिता काही बोलतच नव्हती. तिच्या पप्पानी यशच्या पप्पांना आधार दिला. तेव्हा ते शांत झाले. " या फाईल मध्ये त्याची death certificate आहे " अस म्हणत त्यांनी ती फाईल स्मिता पुढे केली. .... त्या फाईल मध्ये होतं सगळं..... ,तो हरवल्याची तक्रार केलेले पेपर्स , त्याचे फोटो आणि death certificate... आता तर काहीच राहिलं  नव्हतं बोलण्यासारखं... तरी ती बोलली," पण .... मला अजूनही विश्वास बसत नाही आहे.... तो जर १० वर्षापूर्वी गेला आहे तर ..... तो मला कसा भेटायचा .... पुन्हा त्याच्या नावावर इतक्या तक्रारी आहेत पोलिस स्टेशन मध्ये..... आणि त्यांनी मला कसं सांगितलं नाही कि तो आता जगात नाही आहे .... death certificate पण त्यांनीच बनवली असेल ना..  " 
             " तुलाही कळलं असेल ... कि ते पोलिस स्टेशन नवीनच बांधलं आहे,कारण जुन्या पोलिस स्टेशनला आग लागली होती... त्यातच बरेचसे कागद जळून गेले.... योगायोगाने तो हरवल्याची फाईल तेवढी जळण्यापासून वाचली... शिवाय , त्या वेळेस जे पोलिस होते.... त्यापैकी एकही आता तिथे नाही .... नवीन आहेत त्यांना फक्त तो हरवला आहे यांचीच माहिती असेल.. " ," आता राहिला .... त्या तक्रारी आणि तुझा प्रश्न..... सरिता ४ दिवस बेशुद्ध होती... जेव्हा शुद्धीवर आली ... तेव्हा ती ठीक होती . पुन्हा कामालाही जाऊ लागलेली.... पुढच्याच दिवशी, आम्हाला फोन आला, तिच्या हॉस्पिटल मधून... तसे आम्ही लगबगीने पोहोचलो तिकडे.... सरिता एकदम hyper झाली होती.... वेड्यासारखं वागत होती.... "," नक्की काय झालं तिला ? " स्मिताच्या आईने विचारलं ," तिचं म्हणणं होतं कि तिने यशला पाहिलं होतं..... त्याच वाटेवर ... त्याचा तिचा मानसिक धक्का बसला होता मोठा " स्मिताला आता काय चाललंय ते हळूहळू कळत होतं. " आणि त्या तक्रारी सुद्धा त्याच सांगतात .... सगळ्यांनी त्याला बघितलं होतं.... कसं ते कळत नाही .... आम्ही गेलो तिथे..... आम्हाला तो दिसला नाही कधी ..... भूत , आत्मा ..... यावर आमचाही विश्वास नाही ... पण या सगळ्यांचे अनुभव आणि तुझा अनुभव हेच सांगतो ना ...... " सगळेच भेदरलेल्या अवस्थेत, त्या घराबाहेर पडले.... सगळच विचित्र होतं, जे होतं ते खरं होतं... कि भास तेच समजण्यापलीकडे होतं... स्मिताला आता तिकडे काम करणं शक्यच नव्हतं. तिने राजीनामा दिला आणि आपलं सामान आणण्यासाठी पुन्हा ती त्या हॉस्पिटल मध्ये आली. सामान घेऊन ती निघणार होती... इतक्यात तिला आठवलं कि .... सरिताची treatment इकडेच चालू आहे ... एकदा जाऊन भेटूया तिला... तशी ती गेली हॉस्पिटल मध्ये.
              तिला भेटण्याअगोदर तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरशी बोलावसं वाटलं तिला.... त्यासुद्धा महिला डॉक्टरच होत्या... स्मिताच्या मनात काही प्रश्न होते.. " डॉक्टर , हे सगळं खरं आहे का ... सरिताच्या बाबतीत घडले ते.. " , "हो .... खर आहे "," म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता ? " , " तसं नाही म्हणता येणार .. पण यांचे अनुभव ऐकून विश्वास ठेवावा वाटतो." ," तसे अनुभव मलाही आले आहेत. " , " खरंच ... ? " ," पण मला नक्की काय घडलं ते कळत नाही.... " ," तू एकटीच नाही आहेस... तुझ्यासारख्या अजून ९ आहेत. " , " म्हणजे त्या सगळ्या जणी , ज्यांनी पोलिसात तक्रार केली होती. " , " हो ... सगळ्याजणी इकडेच होत्या , treatment साठी..... त्यातल्या सात जणी ठीक होऊन निघून गेल्या. दोन आहेत अजूनही." ," पण इकडेच कश्या सगळ्याजणी " , " सगळी गोष्ट सांगते तुला मी समजावून..... सगळ्या गोष्टींची फाईल बनवली आहे मी.... मीही थोडा research केला सगळ्यांवर. " त्यांनी फाईल स्मिता पुढे केली... , " यात जर बघितलस ना... तर सगळ्यांचे अनुभव सारखेच आहेत... तुलाही तेच आले असतील अनुभव..... सगळ्यांच एकचं वर्णन यशच..... तो येण्याअगोदर थंड हवा यायची.. मग मोगऱ्याचा सुगंध...पौर्णिमेला तो नसायचा..... अमावस्येला चेहरा अधिक उजळलेला असायचा.. रोज संध्याकाळी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा..... हेच अनुभव असतील ना तुला..... " स्मिताने मानेनेच होकार दिला..... " अजून काही गोष्टी common आहेत..... त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव होतं सरिता..... तुझं नाव आहे स्मिता..... शिवाय बाकीच्या इतर जणींच नावही 'स' वरूनच सुरु होते... स्नेहा, सुषमा..... शेवटची तक्रार सुद्धा ' संगीता' चीच होती ना.... बरोबर ना.... " , " शिवाय…सरिता ' आधार ' हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती, ती त्या सरकारी कॉटर्स मध्ये रहायची.... त्यांच्या जाण्यायेण्याचा रस्ता एकच होता... इतर ८ जणीही त्याचं हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होत्या,त्याचं रूम मध्ये राहायच्या आणि तो रस्ता use करायच्या.... तुझं पण असंच असेल ना... " , " हो..... पण याचा अर्थ काय… "   
            " मी सुद्धा यशच्या घरी जाऊन आले. तेव्हा मला हे सगळं कळलं..... सगळ्यांनाच मानसिक धक्का बसला होता. सरिता अजून त्याचं अवस्थेमध्ये आहे.... तुझ्या अगोदरची डॉक्टर संगीता , तिही माझ्याकडे treatment घेत आहे. त्या सगळ्या इकडेच का treatment घेत होत्या ते तुला कळलं असेल ना..... कारण ज्याच्यामुळे सगळ घडलं ... त्याचं 'मूळ' इकडेच आहे ना. " स्मिता नुसतंच ऐकत होती.... " त्याला मोगऱ्याच्या झाडाखाली पुरलं होतं.... म्हणून तो येताना मोगऱ्याचा सुगंध यायचा.... मोगऱ्याची फुलं आणायचा... अशी संगीता म्हणते कधी कधी... त्यावर मी काही बोलत नाही. पण त्याने कोणाला फसवलं नाही गं... त्या मुलींना आणि तुला पण... जेव्हा तुम्ही अडचणीत आलात तेव्हाच तो आला तुमच्या मदतीला... " ," पण आम्हालाच का.... तिकडेच राहणाऱ्या,त्याचं हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्यांनाच का ... ? " , " मला वाटते........ तो त्याच्या बायकोला शोधात असेल…. तुझ्यामध्ये.... आणि त्या इतर मुलींमध्ये सुद्धा... त्यामुळे जेव्हा जेव्हा तू आणि त्यांनी त्याला लग्नाचं विचारलं .... तेव्हाचं तो गायब झाला... बरोबर ना... " स्मिता सरिताला भेटायला आली होती. तिला न भेटताच अनेक गोष्टी स्मिताला कळल्या होत्या. ती काहीही न बोलता तशीच निघाली. ...... " एक गोष्ट सांगू का.... स्मिता तुला... " डॉक्टरनी तिला थांबवत म्हटलं तशी स्मिता थांबली." या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत. प्रथम माझाही विश्वास नव्हता या गोष्टींवर ..... पण या सगळ्यांमुळे मला विश्वास ठेवावा लागतो... शेवटचं सांगते तुला... जर आपण देव आहे अस म्हणतो तर भूतांवर सुद्धा विश्वास ठेवावा लागेल आपल्याला.... " स्मिता तशीच निघून गेली... काहीही न बोलता... 
             स्मिताने राजीनामा दिला होताच... त्याचबरोबर तिने शहरही सोडलं आणि परदेशात गेली ती कुटुंबाबरोबर कायमची..... तिची जागा भरून काढण्यासाठी अजून एक महिला डॉक्टर आली… तिचं नाव होतं... " सायली " ... पहिलाच दिवस हॉस्पिटल मधला.... " काय गं ..... ती जुनी डॉक्टर .... एवढ्या लवकर गेली सोडून.. " ,"माहित नाही... पण ती परदेशात गेली. कदाचित तिकडून ऑफर आली असेल तिला... " ," किती छान ... मलाही भेटली पाहिजे अशी ऑफर... " तश्या दोघी हसू लागल्या... त्याचं सरकारी कॉटर्समध्ये राहायला आलेली होती... नवीन होती ती गावात.... त्यामुळे बसची वेळ विसरली..... धावतच बाहेर आली तेव्हा बस निघून जाताना तिने पाहिली..... आता चालण्याशिवाय पर्याय नाही. " त्याचं " वाटेवर आली ती आणि रस्ता विसरली.... वाट चुकली.... त्यात अमावस्येची रात्र.... आकाशात लाखो चांदण्या- तारे चमचम करत होत्या... मिट्ट काळोख.... कुत्रे भुंकत होते... रातकिडे आवाज करत होते... भयावह वातावरण अगदी... एकटीच होती ती ...... घाबरली..... तिथेच एका दिव्याखाली बसून ती रडू लागली.... ५-१० मिनिटं झाली असतील... थंड हवेची झुळूक आली…,त्याचबरोबर मोगऱ्याचा सुगंध.... किती छान वाटलं तिला... आणि अचानक तिच्यामागून आवाज आला....... ," Excuse me..... madam .. काही मदत करू का मी तुम्हाला ..... ?"

----------------------------------------------------------The End ---------------------------------------------------------- 

17 comments:

 1. Next part plz eager read.....

  ReplyDelete
 2. such a nice story......all the best.......!!!

  ReplyDelete
 3. such a nice story....all the best..!!!

  ReplyDelete
 4. ultimate story.......what an imagination........all the best...!!!

  ReplyDelete
 5. eagerly waiting for the next part, please upload.

  ReplyDelete
 6. this is the end of the story ..............Dhiraj Gadhave

  ReplyDelete
 7. chan ahe story :)

  ReplyDelete
 8. wow... Mastach.. Khupach chan lihitos... Chan vatat vachun.. :)

  ReplyDelete
 9. wonderful storyy........ek vegalach abhas hot hota vachtana

  ReplyDelete
 10. so nice story i like it so much.

  ReplyDelete
 11. Mast ahe story ............ nehamipramane chan

  ReplyDelete
 12. Story tar khup chan cha ahe. pan sir tumcha vishwas ahe ka bhut & all var?

  ReplyDelete
 13. very mysterious. I like it.

  ReplyDelete
 14. khuppp chhan ahe story

  superb.....

  ReplyDelete

Followers