All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 26 December 2015

दुष्काळ… (भाग २)

                   निल्याला सकाळी जाग आली ती पक्ष्यांच्या आवाजाने. खूप जणांचा घरोबा होता त्या झाडावर. पक्षी सकाळीच उडून जायचे दाण्या-पाण्यासाठी. त्यांना सुद्धा लांब जावे लागे. नाहीतर या गावात तसं काहीच नव्हतं खाण्यासाठी. निल्या जागा झाला, आज शहरात जायचे होते ना…. म्हणून त्याने जरा लगबग केली. घरी आला. आत हळूच डोकावून पाहिलं त्याने. सगळी मंडळी शांत झोपली होती. शहरात जायचं तर आंघोळ करावी लागेल म्हणून त्याने कालच जरा जास्तीच पाणी भरून ठेवलं होतं. तेच वापरणार होता तो. पण येश्या जागा झाला का ते बघायला गेला. येश्या नुकताच जागा झाला होता आणि मशेरी लावत बसला होता दाताला. 

                "येश्या…. तयारी झाली ना… निघूया ना… " येश्याने मान हलवून 'हो' म्हटलं. तसा निल्या आंघोळीसाठी घरी आला. थोडयावेळाने तयारी केली त्याने आणि आईला आवाज दिला. "ये आये… ".  आवाजाने म्हातारी जागी झाली." ये आये…. मी जाऊन येतू गं… बाळाकडं… ", तशी ती लगेच बाहेर आली. "हा… रं … बघ….जमलं तर घेऊन ये इत बाळाला… लय बरिस झालं… तोंड बी दावल नाय त्यान… " डोळ्यात पाणी आलं म्हातारीच्या. निल्याला पण वाईट वाटलं. " येतो गं… जा नीज तू… "म्हणत निल्या निघाला. येश्याची जना भाकरी बांधून देत होती. " भावोजी… तुमाला बी दिली हाय भाकर… पोटभर खा… " येश्याने डब्बा घेतला आणि दोघे निघाले संगतीने. जाता जाता जरा लांबच्या रस्त्यानेच गेले. निल्याने एक नजर फिरवली शेतावर. तसं काही नव्हतं शेतात बघायला. तरीसुद्धा बघून निल्या निघाला पुढे. शहरात जाण्यासाठी तालुक्यात जाऊन गाडी पकडावी लागे. दोघे तिथेच निघाले होते. 

              वाटेत काही रिकामी घरे होती. उजाड मोकळी शेतं होती. त्याकडे बघत बघत दोघे चालले होते. इकडच्या बऱ्याचश्या जमिनी,घरं सरपंचाकडे गहाण ठेवलेली. त्यानंतर त्याच्या बायकोने ती स्वतः काढून घेतली लोकांकडून. पैसे नाहीतर जमीन,सरळ हिशोब. काही जमिनी पडीक होत्या अश्याच. त्या जमिनीचा मालकच नाही राहिला तर कोण बघणार त्या जमिनीकडे. निल्या सुद्धा खूप वर्षांनी गावाच्या बाहेर पडत होता. गावाच्या वेशीपर्यंत आले दोघे. " किधर जा रहे हो बेटा … ? " मागून आवाज आला तसे दोघे थांबले. 

             येडा चाचा… त्याने आवाज दिला होता. गावाच्या वेशीवर घर होतं त्याचं. पण गावात राहायचा नाही कधी. गावभर भटकत असायचा तो. गावात सगळ्याच्या ओळखीचा होता चाचा. त्याच्या घरात कोणी नव्हतं. मग घरात जाऊन काय करणार तो… कधी वाटलं तर त्याच्या घराच्या बाहेर बसून असायचा नाहीतर गावात फिरत बसायचा. जरा वयाने होता चाचा. निल्याचे वडील आणि येडा चाचा, लहानपणीची संगती. एकत्र वाढलेले. फक्त चाचा मुसलमान होता. म्हणून त्याचं घर गावाच्या वेशीवर होतं. पण चाचाच्या घरचे सगळे खूप चांगले होते, पहिल्यापासून. हिंदू -मुसलमान असा भेद केला नाही कधी त्यांनी. सगळ्या सणामध्ये आनंदाने भाग घेयाचे. निल्याचा म्हातारा आणि चाचा , घट्ट मित्र. चाचाचे घर जरी वेशीवर असलं तरी त्याचं शेत आत गावात होतं. दोघे एकमेकांना मदत करायचे शेतीत. चाचाचं शेतं तसं खूप मोठ्ठ होतं, त्यात राबणारे हात सुद्धा खूप होते. १०-१२ माणसं होती हाताखाली. चांगलं चालायचं चाचाचे. चाचाला एक मुलगा होता. तो पण निल्याच्या वयाचा. पण लहानपणापासून शहरात शिकायला होता. कधी कधी सुट्टी असली कि घरी यायचा. चाचाच्या घरात तेव्हा तिघेच जण होते. त्याचे आई-वडील म्हातारे होऊन मेले आधीच. आता फक्त चाचा,चाची आणि त्याचा मुलगा. गावात दोघेच राहायचे. मुलगा चांगला शिकला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावात आला. चाचाचे खूप प्रेम त्याच्यावर. कोणताही हट्ट लगेच पुरवायचा. शेतावर कधी राबवला नाही त्याने त्याच्या मुलाला. थोडे महिने तो गावातच होता. नंतर म्हणाला, नोकरीसाठी शहरात जातो. तिथे पैसे लागतील. सेम निल्याच्या बाळासारखी गत. पण चाचानी त्याला पैसे दिले होते. गेला शहरात, ६ महिन्यांनी वापस गावाला. आणखी पैसे हवे म्हणून, चाचाला कळलं होतं कि त्याला शहरात वाईट संगत लागली आहे ते, तरी चाचाने पैसे दिले. गेला शहरात, यावेळी ३ महिन्यांनी आणखी पैसे मागायला दारात हजर. यावेळीस मात्र चाचाने पैसे दिले नाहीत. मोठ्ठ भांडण चाचा आणि मुलाचं. चाची मध्ये आली म्हणून भांडण थांबलं. मग काय करणार…. गावातच राहिला थोडे महिने. सुधारला गावात राहून . ६-७ महिने झाले असतील,चाचाला मदत करायचा कामात, चाचीला बरं वाटायचा. 

               एक दिवस कसलासा कागद घेऊन आला चाचासमोर, बोलला," शहरात नवीन ठिकाणी नोकरी भेटली आहे. त्यासाठी तुमचा अंगठा पाहिजे कागदावर." चाचाला  केवढा आनंद, त्यात चाचा शिकलेला नाही. पेपर न वाचताच अंगठा दिला त्याने. चाचा,चाची खूष एकदम. पेपर आणि सामान घेऊन तो गेला शहरात. ५-६ दिवसांनी , शहरातून काही मानसं आली. आणि चाचाला त्याच्याच शेतातून बाहेर काढलं. काय चाललंय कळेना. भांडण, मारामाऱ्या सुरु झाल्या. सगळे गावकरी आले धावून मदतीला. पोलिस पाटील आला. तेव्हा सगळा खुलासा झाला. चाचाच्या मुलाने सगळी जमींन विकून टाकली होती आणि चाचाने ज्या कागदावर अंगठा दिला होता तो कागद जमीन विकायचा होता. आता सगळी जमीन कायद्याने त्यांची होती, चाचा काही करू शकत नव्हता, ना गावकरी. मुलगा फसवून कायमचा शहरात गेला होता पळून. मोठा धक्का चाचाला.एवढं प्रेम केलं त्याने मुलावर, त्याने असं केलं. चाचीने तर धसका घेतला. अंथरुणावर खिळली ती कायमची. तिच्या औषधावर किती पैसे गेले चाचाचे. शेवटी मुलाचं नाव घेत मेली बिचारी. चाचा एकटा पडला. 

             शेत तर राहिलं नाही. घरात कोणी नाही. काय करणार घरात राहून. बाहेरचं बसून राहायचा तासनतास. वाटेकडे डोळे लावून. भूक लागली कि गावात फिरायचा. सगळ्या गावाला चाचाची कहाणी माहित होती. कोण ना कोण देयाचे खायला. कधी कोणी बिडी द्यायचं फुकायला.… एवढंच. बाकी तो एकटा कूठेतरी बघत , काही बाही बडबडत असायचा. बिडी ओढत निघणाऱ्या धुराकडे बघत बसायचा. हिंदीत कि कोणत्या भाषेत कविता नाही तर एखादा 'शेर' म्हणायचं. काही समजायचे नाही. जुन्या लोकांना माहित होता चाचा. नवीन मुलांना काय माहित त्याचं दुःख… त्या मुलांनीच त्याचं नावं "येडा चाचा" ठेवलं होतं. आणि गावात आता त्याला सगळे तसंच म्हणायचे. 

             चाचा निल्याला ओळखायचा. म्हणून त्याने त्याला हाक मारली. " हा चाचा… जरा शहरात जातो आहे." चाचाला मराठी कळायचे, बोलता यायचे नाही. निल्या बोलला ते कळलं त्याला. " हा बेटा… जाओ शहर में… पर वापस जरूर आना… किसको छोड के मत जाना । " चाचा बोलला आणि आल्या पावली निघून गेला बडबडत. निल्या आणि येश्याला त्याच्या मुलाची आठवण झाली. " काय रे… काय करत असेल तो शहरात ? " ,"काय माहित पण नक्की सुखी नसणार तो… हाय लागते रे अशी. बिचाऱ्या आई-बाबाला फसवून कोणाचं बरं होतं नाही कधी." बोलता बोलता दोघे S.T. stand वर आले. निल्याने शहराची दोन तिकीट काढली. गाडीदेखील वेळेत निघाली. ३ ते ४ तासाचा प्रवास. संध्याकाळ पर्यत पोहोचू असा साधा हिशोब. पण ऐनवेळी गाडी बंद पडली. driver लागला कामाला. " आता अर्धा-एक तास तरी गाडी काही हलायची नाही." कोणी एक प्रवाशी बोलला." हा…. हा…,जरा इंजिनाचा प्रोब्लेम झाला आहे. वेळ लागेल… सगळ्यांनी उतरून घ्या. " गाडीच्या driver ने सांगितलं. 

             सगळी मंडळी खाली उतरली. दोघा-तिघांनी घोळके बनवून इकडच्या- तिकडच्या गप्पागोष्टी सुरु केल्या. निल्या-येश्या असेच एका आडोश्याला उभे होते. कोणीतरी हाक दिली निल्याला लांबूनच, निल्या मागे बघू लागला कोण ते… अरेच्या… हा तर किसन… हा… हो, किसनच तो, हा पण याचं गाडीत होता, दिसला कसा नाही मग. किसन धावतच जवळ आला. किसन… निल्या आणि येश्याचा शाळेतला मित्र, दुसऱ्या गावातला.… तालुक्याच्या शाळेत तिघे एकत्र होते, तेव्हाची ओळख. "काय रे… निल्या, येश्या… किती वर्षांनी भेटतो आहे ना." किसनने आनंदाने मिठी मारली दोघांना. त्यांनाही बरं वाटलं जरा. "काय करता रे दोघे… कामाला वगैरे कूठे आहात ? " त्यावर दोघे एकमेकांकडे पाहू लागले. किसनला कळलं कि काहीतरी गडबड आहे ते. "काय झालं रे… ?" निल्याने सगळी कहाणी सांगितली. येशाची गोष्ट मांडली त्याच्यासमोर. साहजिकच वाईट वाटलं त्याला. 
" तू काय करतोस ? ",
" माझ्या वडिलाची अशीच गत झाली होती. मी नंतर शहरात गेलो शिकायला. तिकडेच असतो आता पण. इकडे वडिलांना शेतीची कामं जमायची नाही. सरळ जमीन विकून टाकली. आता इकडे काही नाही आमचं. आता सगळेच तिकडे राहतो आम्ही.",
"मग… आता इकडे कसा तू ? ".
"असाच येतो… कधी गावाची आठवण झाली कि.एक-दोन दिवस राहून पुन्हा शहरात जातो. काय ना… शहरात राहून गावपण विसरलो आहे… तेच जमवत असतो इकडे येऊन. " किसन हसत म्हणाला.  
"तुम्ही कूठे निघालात ? ",
"याचा भाऊ राहतो शहरात, त्याला भेटायला जातो आहे.",
"छान…" निल्याला काही विचारायचे होते कधी पासून. 
"किसन… विचारू का एक… ",
"विचार ना… ",
"शहरात जाऊन मानसं बदलतात का… ?",
"का रे… ",
"असंच.",
"बदलतात काही…. पण सगळी नाही बदलत… पण जास्त वर्ष राहिला एकदा तर काही सांगता येत नाही." तेवढयात गाडी सुरु झाल्याचा आवाज झाला. तसे सगळे गाडीत जाऊन बसले. 

              जरा उशिराच पोहोचली गाडी शहरात. निल्या आणि येश्याचा निरोप घेऊन किसन त्याच्या वाटेने निघून गेला. निल्या त्याच्या विचारात. 
"काय झालं निल्या ? " निल्या विचारात अजून. 
" तुला काय वाटते, आपला बाळा… बदलला असेल का शहरात जाऊन ",
" आणि असं का वाटते तुला ? ",
"जवळपास दोन वर्ष झाली. कितीवेळा त्याला फोन लावला मी, एकदाही त्याने उचलला नाही. सहा महिन्यांनी पैसे येतात तेवढेच… इकडे येऊन किती वर्ष झाली त्याला." येशाने त्याच्या खांदयावर हात ठेवला. 
"नाही रे…. असं काही वाटून घेऊ नकोस तू… चल पटकन जाऊ बाळाकडे, नाहीतर अंधार होईल." तसा निल्या तयार झाला. 

पत्ता होता त्यांच्याकडे, विचारत विचारत पोहोचले एकदाचे. मोठी सोसायटी होती ती. मोठया इमारती. इमारतींकडे बघत बघत ते गेटच्या आत शिरले. तसा watchman ने अडवलं दोघांना. 
" कूठे… आत नाही जायचं… चला बाहेर…. " watchman ने त्यांना बाहेरंच ढकललं.
" अहो… थांबा… थांबा, याचा भाऊ राहतो इथे." येश्या म्हणाला. तसं watchman ला हसायला आलं.
" हो… का, बरं… कूठे राहतो इथे तो…झोपडी नाही, सोसायटी आहे ही… ",
"अहो… खरंच याचा भाऊ राहतो इथे, रोहित पाटील… इकडेच राहतो ना… " ते नाव ऐकताच watchman ला आठवलं. 
"हा… हा, रोहित साहेब… त्यांच्याकडे आलात का तुम्ही… पण तुमच्याकडे बघून वाटत नाही कि ते तुमचे भाऊ आहेत असं…" निल्याला जरा वाईट वाटलं. 
"मग आम्ही जाऊ का तिथे… कूठे राहतात या इमारती मध्ये… " watchman ने समोर इमारतीकडे बोट दाखवत म्हटलं,"त्या इमारतीत,६ व्या मजल्यावर, दुसरी रूम… " जसे दोघे निघाले तेव्हा परत watchman ने अडवलं. " थांबा जरा… तिथे आता पार्टी सुरु आहे. त्यांना मी फोन लावून सांगू का… तुम्ही आलात ते. " तसे दोघे थांबले. त्याने वर रोहितच्या flat वर call लावला. " थांबा हा… रोहित साहेब येत आहेत खाली, स्वतः… "

                   १५ मिनिटे अशीच गेली. रोहित खाली आला नाही. watchman ने पुन्हा call लावला. यावेळी सुद्धा १० मिनिटे गेली. खूप वेळाने आला रोहित. निल्याला बघितलं तसं चाट पडला." दादा… तू… आणि इथे… " निल्याला तर किती आनंद झाला रोहितला बघून.जाऊन त्याला मिठी मारली. रोहितने त्याला जवळपास दूर लोटलं. येश्या त्याच्याकडे बघत राहिला. 
"Sorry दादा… महागातला कोट आहे रे… खराब होईल ना म्हणून…" रोहित थांबला बोलताना. येश्याला राग आला होता, पण निल्याने " काही नाही" असं खुण करून सांगितलं त्याला. 
"कसा आहेस बाळा… ", तसा रोहित त्याला बाजूला घेऊन आला. 
" दादा… please… बाळा बोलू नकोस, रोहित बोल फक्त. इथे खूप लोकं ओळखतात मला. " निल्याला हसायला आलं. 
"ठीक आहे… रोहितचं बोलीन आता, मग तर ठीक आहे ना…. बर चल… दमलो आहे ना… घरी जाऊ या का वरती…" रोहित जरा चुळबुळ करू लागला. 
" दादा… अरे, वर पार्टी चालू आहे रे… जागा नाही उभं रहायला सुद्धा… तुला कूठे घेऊन जाऊ आणि… शिवाय पाहुणे आहेत वर… त्यांना काय वाटेल तुला बघितलं कि… तू थांब ना… जरावेळ खालीच… मी काही व्यवस्था करतो तुझी.… " म्हणत रोहित watchman जवळ आला.
" हा बोला साहेब… ",
"एक काम कर… हे दोघे इकडेच थांबतील जरा वेळ… तुमची खोली रिकामी असेल ना आता.",
" हो साहेब… ", 
" मग दोघांना इकडेच बसू दे… पार्टी संपली कि बघू काय ते… " रोहितने watchman ला सांगितलं  आणि निल्याकडे आला. 
" दादा… थोडावेळ बस हा इकडे… वरून सारखे call येत आहेत, मी पार्टी संपली कि येतो.… Bye." रोहित झपझप निघून गेला. 

              निल्या आणि येश्या कधीच रोहितची वाट बघत बसले होते. येशाला तर रोहितचा राग आला होता. मी तर सोडा, निल्या तर सख्खा भाऊ आहे ना… त्याला साधं पाणी विचारलं नाही. काय भाऊ आहे… निल्या तिथूनच वर चाललेल्या पार्टीकडे बघत होता. रात्री ११.३० होते. येश्याला झोप येत होती. watchman आत आला आणि बोलला,
" हं… रोहित साहेब आले आहेत बाहेर… बोलावलं आहे त्यांनी." निल्या आणि येश्या बाहेर आले.… रोहित आणि त्याची बायको, अंजली बाहेर उभे होते. 
" किती वेळ झाला ना… जाऊ या का वर… " निल्या बोलला, अंजली त्यांच्याकडे बघत बोलली,
" No way रोहित… आताच पार्टी झाली आहे आणि यांना वर…. " म्हणत तरातरा निघून गेली. रोहित अंजलीला थांबवत होता.… ती कूठे थांबली… रोहित पुन्हा निल्याकडे आला. 
" sorry दादा… आता घरात खूप गडबड आहे… सापसफाई बाकी आहे… ",
"मग… ",
"आजची रात्र थांबशील का इथेच खाली… शिवाय आता खूप थकलो आहे मी, उद्या सुट्टी आहे मला, उद्याच बोलू… चालेल ना…" निल्या काय बोलणार त्यावर… 
" ठीक आहे बाळा… थांबतो खालीच. " रोहित रागावला. 
" please यार…. बाळा नको बोलूस… उद्या बोलू आपण… Good Night… " रोहित निघून गेला.

                येशाला अजून राग आला. निल्या गप्प watchman च्या खोलीत येऊन बसला. येश्या त्याच्या बाजूला बसला. " अरे… काय पद्धत आहे हि… मोठा भाऊ ना तू, एवढा धिंगाणा चालू होता वरती, जेवलास का ते तरी विचारलं का त्याने…" निल्याने येश्याला गप्प राहायला सांगितलं. " अरे… खरोखर दमला असेल तो… आणि जना वहिनींनी एवढं छान झुणका-भाकर दिली आहे ती… ती तर किती आवडते मला." येश्याने पुढे काही शब्द काढला नाही तोंडातून. गप गुमान झुणका-भाकर घेतली. त्याला तर आधीच झोप आली होती, जेवल्या जेवल्या लगेच झोपी गेला तो. निल्याही पडला जरा. दमलेला तोही… अनोळखी जागा, झोप लागेल तर शप्पत. येश्या आधीच गाढ झोपला होता. निल्या तसाच विचार करत राहिला पडून. उद्या बाळा सोबत मनसोक्त गप्पा मारू. त्याने पैसे दिले कि लगेच म्हातारीच operation करू मोतीबिंदूच… त्यातून बाबांच्या औषध बघू मग… पैसे उरलेच तर घेऊ काही बायकोसाठी… किती मोठा झाला ना बाळ आपला… केवढं मोठठ घर… सुनबाई पण इंग्रजीमध्ये बोलते. किती लोकं कामाला आहेत बाळाकडे काय माहित… खूप शिकलं कि असं होते… मी पण शिकलो असतो तर… कदाचित माझं सुद्धा असच मोठा घर असतं… जाऊ दे पण… बाळाकडे आहे ना सगळं… त्यात खूष आहे मी… 

                रात्रभर निल्या विचार करत राहिला. सकाळ होण्याची वाट बघत होता तो. सकाळ होता होताच त्याचा डोळा लागला. १५-२० मिनिटे झोपला असेल तो. येश्या उठला तसं त्याने निल्याला जाग केलं. " निल्या… ये निल्या… ऊठ लेका… " डोळे चोळत निल्या उठला. watchman कडून पाणी घेतलं आणि तोंड , हातपाय धुवून घेतले. बाळाकडे जायचे ना मग कसं ताजतवान झालं पाहिजे म्हणून दोघे झटपट तयार झाले. 
" जाऊ का वर आम्ही… " निल्याने watchman ला विचारलं. " थांबा जरा… वरती फोन लावून विचारतो मी. " त्याने फोन लावला… कितीवेळ फोन वाजत राहिला. उचलला नाही कोणी. असंच अजून ३-४ वेळा झालं. " बाळा झोपला असेल अजून… " मनात म्हणत निल्या खालीच थांबला. अर्धा-पाऊण तास झाला असेल. पुन्हा फोन लावायला सांगितला निल्याने. यावेळेस उचलला फोन. " हा… तुम्ही थांबा खालीच… साहेब येत आहेत खाली… " watchman म्हणाला. 

                 १५ मिनिटांनी रोहित खाली आला. " चल दादा… " रोहित म्हणताच निल्या, येश्या त्याच्या मागून चालू लागले. केवढी मोठ्ठी सोसायटी.… ऐसपैस अगदी, त्यात दोन swimming pool सुद्धा… निल्या क्षणभर जागीच थबकला. किती स्वच्छ पाणी… इतक्या वर्षात पहिल्यांदा तो तसं नितळ पाणी पाहत होता. गावात तर मचूळ पाणी असायचे, मातकट पाणी… कधी लाल रंगाचे पाणी… तसाच पुढे गेला आणि पाण्याला स्पर्श केला त्याने… आणि मागून आवाज आला. 
" Hey you… " निल्याने वळून बघितले. एक माणूस त्याला ओरडला होता. " काय चाललाय हे… कळत नाही का, पाण्यात काय हात घातलास… श्शी !!!!! …. काय कपडे ते… सगळं पाणी खराब करून टाकलस… watchman " तसा watchman धावत आला. " कूठे लक्ष आहे रे तुझं…. या भिकाऱ्यांना आत कसं येऊ दिलंस …. बाहेर काढ त्याला पहिला… ", 
" साहेब… ते रोहित साहेबकडे आलेत… " रोहितला मेल्याहून मेल्यासारखं वाटलं.
" Mr. Rohit…. is that true…. " रोहितने उसनं हसू आणलं चेहऱ्यावर. 
" yes…. actually... they are my new servant's…. ",
"ohh … i see… " दोघांचे 'english' संभाषण संपलं. 
" watchman…. पाणी बदलून घ्या सगळं लगेच… " म्हणत तो निघून गेला आणि अजून कोणी विचारायच्या आधी रोहित दोघांना घेऊन flat वर आला. 

                  निल्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण मराठीतून झालं असलं तरी " servant's" शब्दाचा अर्थ " नोकर " होतो, हे माहित होतं त्याला. जरा मनातून दुख्खी झाला तो. तरी बाळाची इकडची ओळख खराब होऊ नये म्हणून तो काही बोलला नाही. निल्या आणि येश्या जसे flat वर आले , तशी अंजली रोहितला ओरडलीच,
" what is this rohit,… आताच सफाई करून घेतली ना… आणि यांना घेऊन आलास वर… पुन्हा घाण होणार… कशाला आणलस त्यांना रूमवर… आहेत कोण एवढे हे दोघे…. " रोहितने तिला 'शांत राहा' अशी खूण केली. 
" हा… माझा दादा आहे… मोठा भाऊ… आणि हा येश्या दादा… " तेव्हा अंजली कूठे शांत झाली. 
" ठीक आहे… पण सोफ्यावर नको बसवूस… खराब होईल." म्हणत ती आत निघून गेली. निल्याला काय बोलू ते कळत नव्हतं. रोहित चुळबूळ करत होता. " बस ना दादा…" दोघे खाली जमिनीवर बसले. रोहित सोफ्यावर बसला. थोडयावेळाने अंजली बाहेर आली आणि रोहित च्या बाजूला news paper घेऊन बसली वाचत. कोणीच काही बोलत नव्हतं. थांबून निल्याने बोलणं सुरु केलं. 

" कसा आहेस बाळा…. ",
"दादा… बाळा नको बोलूस ना… ",
"ठीक आहे… कसा आहेस… ",
"मी… ठीक आहे… " एवढचं बोलला.
" आणि सुनबाई… तुम्ही कश्या आहात ? " तिच्याकडून कोणतंचं उत्तर आलं नाही. पुन्हा शांतता. यावेळेस रोहित बोलला," काही काम होतं का दादा… आणि फोन करून यायचे ना….  ",
"तुला आवडलं नाही वाटते… मी आलो ते… " ,
"तसं नाही दादा… इकडे पार्टी सुरु होती आणि तुला बघितलं असतं तर लोकांनी… " येश्याला राग आला. 
" मग काय… लाज वाटते का भावाची… " ,
"येश्या … गप्प जरा… राहू दे." निल्याने पुन्हा गप्प केलं येश्याला. 
" बाळा… जास्त वेळ घेत नाही तुझा…मला काही पैशांची गरज होती म्हणून आलो तुझ्याकडे…. " ते ऐकून अंजलीच्या कपाळावर आट्या आल्या. रोहितही काही बोलला नाही त्यावर. 
" रोहित बाळा… पैसे पाहिजे आहेत…. करशील ना मदत.".  त्यावर अंजली बोलली ,
" कशाला पाहिजे पैसे… आणि आधी सांगायचे ना… आताचं किती खर्च झाला आहे. आता नाही भेटणार पैसे. " निल्या , अंजलीकडे बघत राहिला. रोहितने बोलायला सुरुवात केली. 
" हा दादा… पार्टीत खूप खर्च झाला, त्यात flat च्या maintenance चा चेक देयाचा आहे उद्या. शिवाय २७ तारीख आहे. महिना अखेरीस पैसे मागायला आलास. कुठून देऊ पैसे तुला. फोन केला असतासं तर काहीतरी करता आलं असतं. तरी तुला पैसे पाठवले होते मी, तरी आता पुन्हा पैसे पाहिजे.",
" अरे बाळा… बाबांच्या औषधांचा खर्च असतो आणि आता आईच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे ना… त्याचं operation करायचे आहे म्हणून आलो रे… " 

रोहित त्यावर काही बोलला नाही, खूप वेळाने अंजली बोलली. 
" पण एवढया म्हाताऱ्या माणसाचे operation करून काय उपयोग आहे का… पुन्हा त्या operation चा success rate फार कमी असतो. उगाचच पैसे वाया जाणार.… ",
"काय म्हणायचे आहे तुला सुनबाई… " निल्या रागातच बोलला जरा.
" दादा… थांब जरा… " निलेशला राग आलेला बघून रोहित मध्ये बोलला. " दादा… थोडे दिवस थांब… आता लगेच पैसे देऊ शकत नाही तुला…. शिवाय अंजली सुद्धा बरोबर बोलते. या वयात  operation  करून आईला चांगलं दिसेल असं नाही ना… अजून किती दिवस आहेत नाहीतरी… " रोहित ओघातच बोलून गेला. त्याला कळलं होतं काय बोलला ते. 
" रोहित !!! " निल्या ओरडलाच." अजून किती दिवस राहिलेत म्हणजे…. असच मरू देऊ का तिला… पैसे देयाचे नसतील तर नको देऊस…. काय भिक मागायला आलो नाही तुझ्याकडे… माझ्याकडे नाही म्हणून वाटलं… तू तरी मदत करशील.… तर बोलतोस किती दिवस राहिले आहेत… " रोहित शांत… 
" तो बोलतो आहे ना, आता पैसे नाहीत आमच्याकडे…. नंतर या तुम्ही… " अंजली बोलली. 
" हा दादा…. please… समजून घे ना यार… खरंच पैसे नाही आहेत." पुन्हा निल्याचा पारा चढला.
" यार… ? काय रे… यार आहे का तुझा मी.… आणि पैसे नंतर घेऊन काय करू…… आता गरज आहे operation साठी.",
"मग तुला पाठवले होते ना पैसे… ",
" कधी… ? सहा महिन्यापूर्वी… आणि किती… २००० रुपये.…. २०,००० रुपये पाहिजे आहेत operation साठी, औषधांच्या खर्चासाठी… आणि बोलतो नंतर ये… पैसे संपलेत बोलतो, एवढया पार्टीसाठी पैसे आहेत. आणि operation साठी २०,००० नाहीत तुझ्याकडे.... गरज होती आता. " ,
" एवढीच गरज होती तर इकडे कशाला यायचं… तिकडेच गावात ते असतात ना सरपंच… नाहीतर बँका…गहाण ठेवतात ना इतर लोकं पण. तसं ठेवायचं काहीतरी… " अंजलीचे बोलणे ऐकले आणि निल्या भडकला. येश्या त्याला शांत करत होता तरी तो ऐकेनाच.
" गहाण… मीच राहिलो आहे आता… बाकी सगळं त्या सावकाराकडे आहे. माझ्या बायकोच्या अंगावर एक दागिना नाही. साधं मंगळसूत्र नाही गळ्यात तिच्या… का… विकलं ते … एवढं मोठ्ठ शेत होतं. कोणासाठी ते विकलं… म्हातारा भांडायचा… बोलायचा नको विकू जमीन, लक्ष्मी आहे ती. नाही ऐकलं त्याचं… मी स्वतः शिकलो नाही जास्त. किती होतं मनात… पण तुला काही कमी पडू दिलं नाही. केवढं वाटते तुझ्याबद्दल गावात…,  आई… दिसत नाही बरोबर तिला तरी येताना बोलली, जमलं तर घेऊन बाळाला… का… प्रेम आहे म्हणून ना… इकडे पैसे नाहीत म्हणून सांगतो आहे… "

रोहित निमुटपणे ऐकत होता. अंजली गप्पपणे बसून होती फक्त.
" बाबांना अजून वाटते कि तू परत येशील म्हणून गावात.… आणि बोलतोस किती दिवस राहिले आहेत… मघाशी काय बोललास… servant… आम्ही काय नोकर आहोत तुझे… एवढी लाज वाटते दादाची.… अरे, एवढासा होतास, तेव्हापासून वाढवलं तुला. त्या आई-बाबांनी कधी चंगळ केली नाही… तू पुढे जावसं म्हणून… आणि तू …,    सुनबाई बोलते.… गहाण ठेव, अरे त्या गावात येऊन बघ जरा…पाणी पियायला काय बघायला मिळत नाही. दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी खडकाळ झाल्या आहेत. सगळ्यांची घरं… शेतं… त्या बँकेत नाहीतर सावकाराकडे… सगळ्यांचे हाल होतात.… ज्याना बघवत नाही कुटुंबाची हालत, ते देतात जीव मग… कुठून आणणार पैसे… सांग मला… मला फक्त २०,००० पाहिजे होते ते. माझ्यासाठी नाही. त्या आईसाठी… बाबांसाठी, मीही आत्महत्या केली असती… पण हिम्मत होत नाही. माझ्यानंतर कोण बघणार त्यांच्याकडे..... म्हणून आलो तुझ्याकडे. कोणासमोर हात पसरायचे आता… तर तुझ्याकडे आलो… तर इकडे सोहळे चालू आहेत… आई-वडिलांना विसरलास का… ",
"पण सध्या… किती लोकं मदत करतात ना, शेतकऱ्यांना… मग suicide कशाला करायचं." अंजली बोलली. निल्या काही बोलला नाही त्यावर. थोडावेळ झाला. शांत झाला निल्या आणि म्हणाला,
" इकडे मोठ्या घरात राहून, सुखात राहून बोलता येते सगळं. तिथे येऊन बघा गावात.… मग कळेल, लोकं कशाला आत्महत्या करतात ते. मीही करू शकलो असतो, पण नाही करणार… ",
" मी ऐकलं आहे कि सरकार १ लाख देते… आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला… " अंजली पटकन बोलून गेली, निल्याला मनात लागलं ते. 

सामान उचललं आणि निल्या येश्याला बोलला, " चल… गावाला… " येश्या गपगुमान बाहेर पडला.
" दादा… दादा, थांब ना… प्रयन्त करू काहीतरी." निल्या थांबला. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता.
" प्रयन्त ?? इकडे माणसाची किंमत नाही… आणि म्हणे फोन का नाही केलास… २ वर्षापासून एकतरी फोन उचललास का… २०,००० पाहिजे होते फक्त… पण नको आता, म्हातारा असाच मेला तरी चालेल , म्हातारी आंधळी झाली तरी चालेल.… तुझ्याकडे येणार नाही पुन्हा… कधीच नाही. ते पैसे साठवून ठेव…. तुझ्या पार्टीसाठी… ",
"दादा… असं का बोलतोस… मला वाटलं , तुला पाहिजे असतील पैसे… थांब ना… ",
"बाळा, आता नको काही… भरलं मन… तुझं सुख बघून… आणि शेवटी… आम्ही नोकर ना तुमचे… जातो मी… गावात कधी येऊ नकोस आणि मी तुझ्याकडे येणार नाही परत.… सहा महिन्यांनी पैसे देतोस ना, तेही नको पाठवू… पाठवलेस तरी ते घेणार नाही मी… माझा भाऊ हरवला हेच  समजीन आता." म्हणत निल्या निघाला. त्या मागोमाग येश्या… रोहित तसाच पाहत राहिला दोघांकडे.  

               जी पहिली गाडी भेटली, गाडीने ते दोघे गावाला आले.… तालुक्याला… खूप काही इच्छ्या होत्या मनात निल्याच्या. खूप गोष्टी ठरवून तो रोहितकडे गेला होता. पैसे तर भेटलेच नाही. अपमान तेवढा पदरी पडला त्याच्या. नोकर बोलला त्याला रोहित. साधं जेवायला बोलावलं नाही त्याने. सुनबाई… अंजली, बोलली कि सोफ्यावर बसवू नका. खराब होईल… हीच का माझी लायकी, एवढं कष्ट करून वाढवलं त्याला. ते हे सगळं अनुभवायला का… किती विचार होते त्याच्या मनात… येश्या त्याच्या बरोबर चालत होता. त्यालाही माहित होतं कि किती त्रास होतं असेल निल्याला. तसेच गप्प चालत होते. चालता चालता येश्या बोलला,
" निल्या… जाऊ दे, जे झालं ते… असं एकदम नातं तोडू नकोस… " निल्या तरी गप्प. निल्याला थांबवलं त्याने," निल्या ऐक… भाऊच आहे ना… लहान आहे अजून… सोडून दे विषय… राग नको ठेवूस मनात हा… माफ कर त्याला." ,
"माफ करू… अरे , ती सुनबाई… काय बोलली, कशाला operation करता, पैसे वाया जाणार… आणि बाळा… तो काय बोलला, अजून किती दिवस उरलेत म्हातारीचे… हे ऐकण्यासाठी गेलो होतो का तिथे.… नोकर आहोत का आपण, बोल तू… " येश्या शांत होता. 
" जाऊ दे चल… घरी जाऊ… वाट बघत असतील सगळे.".
"काय सांगू रे घरी जाऊन… सांग आहे काही सांगायला… operation तर करायलाच पाहिजे… कूठून आणू एवढे पैसे मी… काही सुचत नाही." निल्या आणि येश्या एकमेकांकडे पाहू लागले. 

" ठीक आहे, येश्या तू घरी जा… हा, पण माझ्या घरी नको जाऊस. मी नंतर येतो घरी.",
"कूठे चाललास ?",
"डोके दुखते आहे खूप… शांत झालं कि जातो घरी." येश्याला माहित होतं, किती तणावात होता तो.
" चालेल पण लवकर घरी जा… " म्हणत येश्या निघाला घरी. निल्या तिथेच घुटमळत होता. अजूनही त्याला ते सगळं संभाषण आठवत होतं. खरंच पैसे हवे होते, नाहीतर म्हातारीला कधीच बघता येणार नाही. औषधाचे पैसे, ते सुद्धा आवश्यक होते.कुठून आणू पैसे. चालता चालता तो त्याच्या शेताजवळ आला. किती हिरवं असायचं एकेकाळी, किती छान वाटायचं तेव्हा…शेत उभं असतं तरी म्हातारीच operation झालं असतं. का असं वागला बाळा… खरंच , पैसा मोठा झाला आहे, माणसापेक्षा.

                कितीवेळ निल्या शेताकडे बघत होता.काहीच नाही राहिलं, गहाण ठेवायला. मी राहिलो आहे तेव्हढा आता. काय करू, काय करू… निल्या डोक्याला हात लावून बसला होता. तेवढयात त्याला अंजलीचे शब्द आठवलं." सरकार १ लाख देते, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला… " क्षणभर तो विचार मनात डोकावला त्याच्या. १ लाखात खूप काम होतील, operation होईल… बाबांच्या औषधाच्या खर्च निघेल. शिवाय माझं कर्ज माफ होईल. खूप काम होतील. फक्त मी नसेन, तसं पण मी जिवंत राहून त्यांच्या उपयोगात पडत नाही आहे.निदान माझ्या मरण्याने त्यांना काही फायदा होईल. नक्कीच होईल. तेवढं तरी करू शकतो मी. निल्याने नक्की केलं. दोरी तर नाही आपल्याकडे… शेतात एक पडकी झोपडी होती निल्याच्या. धान्य साठवण्यासाठी, पण गेली काही वर्ष एवढं पीक आलचं नव्हतं साठवण्यासारखं… तेव्हापासून ती जागा रिकामी असायची. निल्या काहीतरी शोधत होता तिथे. खुपवेळ… हा, सापडलं एकदाचं… कीटकनाशक, औषध… शेतात फवारणी करायचा, कीड लागू नये म्हणून… आता पिकचं नाही तर फवारणी कूठे करणार…तसचं पडून होतं ते. बाटली होती सगळी भरलेली.… तेच पिऊन झोपू, सकाळपर्यंत खेळ खल्लास…

                  निल्या ती बाटली घेऊन घरी निघाला. मधेच थांबला, घरी गेलो तर विचारत बसतील सगळे… कशाला आणली बाटली म्हणून, शिवाय त्यांच्यासमोर पिऊ शकत नाही मी. कूठे जाऊ… हा, दगडाचं झाड… तिथेच जाऊ… किती जवळच होतं ते झाडं त्याच्या. लहानपणापासून त्याने सावली दिली मला… प्रेम केलं, त्याच्या सोबतीनेच जीव सोडू… निलेश निघाला. शेवटचं त्याने शेताकडे बघून घेतलं. कंठ दाटून आला त्याचा. शेतातली माती त्याने उचलली आणि त्याचा कपाळाला टिळा लावला. थोडी माती त्याने त्याच्या सदऱ्याच्या खिशात भरून घेतली. पुन्हा एकदा पाहिलं शेताकडे आणि निल्या तडक दगडाच्या झाडाजवळ आला. 

                 रात्र झाली होती. निल्या झाडाजवळ पोहोचला. तिथून गावाकडे नजर टाकली आणि निर्णय पक्का केला त्याने. झाडाजवळ येऊन बसणार इतक्यात त्याला तिथे 'येडा चाचा' बसलेला दिसला. आता चाचाला एवढं दिसायचं नाही नीटसं तरी त्याने ती बाटली सदऱ्यात लपवली. निल्याजवळ येताच चाचाने त्याला ओळखलं.
"अरे बेटा… आगये तुम…",
"हा चाचा… " म्हणत निल्या त्याचा जवळ येऊन बसला. चाचा गेला कि ते पिऊ, असं निल्याने ठरवलं.
" बेटा… क्या हुआ…. चूपचाप बैठे हो… " ,
"काही नाही चाचा… शहरात गेलो होतो ना… दमलो आहे ना म्हणून. " चाचा वरती आभाळात कूठे तरी बघत होता. "शहर में… शहर सें याद आया… मेरा भी कूछ अपना खोगया हें शहर में… मिला कोई तुम्हे… मेरा… " काय बोलणार चाचाला… माझचं इकडे सगळं हरवलं आहे आज. शहरात जाऊन माणसं बदलतात हेच खंर… माणुसकी नाहीशी होते तिथे. नाती राहत नाहीत. असली तरी ती काचेसारखी असतात. एकतर ती तुटतात नाहीतर त्यावर कायमचे ओरखडे राहतात. येश्या बोलायचा, माणूस गेलं कि त्याची किंमत कळते सगळ्यांना. अशीच आज मी माझी किंमत ठरवली आहे… १ लाख… 
"चूप क्यो हो बेटा… बोलो, मिला कोई… " ,
"हा चाचा, मिळाला… पण तो आता आपला नाही राहिला. खरतर कोणीच नसते आपलं… फक्त सोंग घेतली असतात सगळ्यांनी." निल्याच्या डोळ्यात पाणी आलं.
" किती ठरवलं होतं मी… खूप शिकायचं, ते राहून गेलं…. नंतर ठरवलं, खूप मेहनत करून सगळ्यांना खूष ठेवायचं, ते जमलं नाही… म्हटलं, बाळाला शिकवून मोठ्ठ करू, आई-वडिलांना सुखात ठेवेल, तर तो अनोळखी झाला आता… किती अपेक्षा ठेवल्या होत्या आयुष्याकडून… काहीच झालं नाही चाचा. " निल्या ढसाढसा रडू लागला. चाचा अजूनही वर चमकणाऱ्या चांदण्याकडे बघत होता. खूप वेळाने चाचा बोलला. 
" हमने भी जिंदगी सें बहुत कूछ मांगा था,पर जिंदगीने ही बहुत कूछ ले लिया हमसें । हमने भी जिंदगी सें बहुत कूछ मांगा था,पर जिंदगीने ही बहुत कूछ ले लिया हमसें । बस खुदख़ुशी मत करना बेटा…. अच्छे लोंगो कि कमीसी हो गयी हें । " 

                 चाचा थोडसच बोलला. पण किती अर्थ होता त्यात. निल्या बघतच राहिला चाचाकडे. चाचा उठला आणि तसंच काही बडबडत निघून गेला. निल्याचे डोळे खाड्कन उघडले. काय करत होतो आपण. सदऱ्यात लपवून ठेवलेली कीटकनाशकाची बाटली त्याने बाहेर काढली. हातात धरून तिच्याकडे पाहू लागला आणि नजर गेली ती लांब चालत जाण्याऱ्या चाचाकडे… चाचाने तर सर्वस्व गमावलं होतं… मुलगा, चाची आणि त्याचं शेत, लक्ष्मी त्याची. त्याचं दुःख आपल्यापेक्षा किती मोठ्ठ आहे,  तरी त्याने स्वतःला संपवलं नाही. आणि आपण एवढे धडधाकट असून एवढ्याश्या कारणामुळे आत्महत्या करायला निघालो. किती पळपुटे आहोत आपण. अंगात जेव्हडा जोर होता , तो सगळा एकवटून त्याने ती बाटली दूर फेकून दिली. डोळे पुसले आणि घराकडे निघाला. 

            आता पडेल ते काम करायचे आणि पैसे साठवायचे… म्हातारीचं operation करायचे…. पण पुन्हा जीव द्यायचा विचार मनात आणायचा नाही. निल्या विचार करत करत घरी आला. खूप रात्र झाली होती आता. घरात बघतो तर सगळेच जागे… निल्याला येताना बघून त्याची बायको आत धावत गेली आणि एक ग्लास भरून पाणी घेऊन आली. निल्या बाहेरचं बसला. त्याची आई आली मागोमाग…. 
" काय रं… कसा हाय बाळा… ", निल्या मनातल्या मनात हसला. तो हिचे दिवस मोजतो आहे आणि हि अजून त्याची तब्येत विचारते.
" नाय भेटला बाळा तुझा… जा झोप आत … " म्हातारी कावरीबावरी झाली. 
" काय बोलतू हायस तू…. ",
" अगं…. त्याचा पत्ता नाय सापडला… जाईन नंतर कधी परत… जा झोप जा तू…. रात लय झालीय… ". म्हातारी आत गेली. 

निल्याची बायको त्याच्या बाजूला येऊन बसली. 
" अवं …. जेवला नसाल ना… घ्या काहीतरी खाऊन… ",
" नको आता… रात्र जास्त झाली… " निल्या सावकाश बोलला. 
" कसं असतं वं शहर… म्या कधी बी नाय गेली तीत… लय पानी असलं ना तीत… शेत बी डोलत असतील ना तीत… " निल्याला पुन्हा रोहितचे शब्द  आठवले. खूप वेळाने निल्याने उत्तर दिलं.
" पाणी , मानसं…. दोन्ही बी खूप आहे तिथं… तरीपण शहरात दुष्काळच आहे… आपल्या गावापेक्षा मोठा दुष्काळ आहे तीत… दुष्काळ…. माणुसकीचा… " 

--------------------------------------------------The End--------------------------------------   

18 comments:

  1. kup chan kupch,,,,,,,,,,,,,,,,,

    ReplyDelete
  2. Chaan lihile aahe. vaachatach rahaave ase vaatale.

    ReplyDelete
  3. Awesome, great Vinit, This is the reality.

    ReplyDelete
  4. kharach, shabdach sapdat nahiye! Vachtana sagle characters ani hya goshtitle sagle prasang dolya pudhe ubhe rahileyt.

    ReplyDelete
  5. Khupch Chan..... Apartim!!!!!

    ReplyDelete
  6. Ekdam khari paristhiti kathan keli ahe.

    ReplyDelete
  7. Dr.Manali Bhakare16 April 2016 at 21:19

    Apratim lihilay. Kalajacha thav ghenari katha!!!

    ReplyDelete
  8. खरोखर खूप छान
    हृदय स्पर्शी गोष्ट

    ReplyDelete

Followers