तो : पुढे गेली का माझी बस , या पावसाचे काही नक्की नाही... त्यापेक्षा आधीच टॅक्सी करून गेलो असतो तर.... टॅक्सी !! तिला भारी हौस ... गाडीतून फिरण्याची... कुठून कुठे प्रवास करायचो आम्ही.... एखादी टॅक्सी करायची आणि वाटेल ते ठिकाण सांगायचो. नाहीतर ट्रेनने जायचे दूरच्या स्टेशनवर. आणि तिथून टॅक्सी किंवा एखादी गाडी बुक करायची , तिथून घरी.... पैसे तर खर्च होयाचे पण तिच्या सोबत फिरताना छान वाटायचे.... वेडी होती अगदी... मलाही वेडं केले होते.
ती : बसमधून उतरून चालत गेले असते , पावसाने गोंधळ घातला ना ... नाहीतर एव्हाना चालत घरी पोहोचले असते. चालण्याचा विषय निघाला कि त्याची आठवण येते.... माझ्यामुळे फिरायला लागला तो , किंबहुना , मीच जबरदस्ती घेऊन जायचे त्याला... चालायचा किती कंटाळा. आणि म्हणे , तुला जिथे जायचे ते सांग... मी घेऊन जाईन, काय नी काय...तरी , जे बोलायचा ते करून दाखवायचा... घेऊन गेला हा फिरायला ..... नैनिताल , उटी ... पावसात गड -किल्ले... माझ्यासाठी ते तुटलेले गड - किल्ले सुद्धा चढला माझा हिरो. ... माझ्यासाठी काहीही करायचा...
तो : "बाली " ... तिचे स्वप्न ...... तिथे जायचे राहून गेले. बाकी मोठी मोठी स्वप्न .... अर्थात मी होतोच कि स्वप्न पूर्ण करायला. बहुतेक केली पूर्ण,.... बुलेट शिकायची होती... ती शिकवली. लग्नानंतर हातावर टॅटू ... दोघांच्या.... मला नको होता तरी... तो काढून घेतला. लग्नानंतर ... ' one piece dress ' काय म्हणतात ते... तो घेतला ... तिच्या घरी चालायचे नाही ... म्हणून नवऱ्याच्या घरी सगळी हौस पूर्ण करणार अशी बोलली होती. घरात एक कुत्रा पाहिजे होता .... तोही आणला ... बापरे !! मलाही आठवत नाही किती हट्ट पुरे केले तिचे. पण आवडायचे. तिच्या समोर पैसे ..... काय चीज !! .... हा .... हिरा आवडायचा तिला.. हिऱ्याची अंगठी.... ती घेणार होतो .... किती महाग असते माहित आहे ना .... तेव्हा स्वतःच ओरडली मला , नाही घेयाची ... बाकी .... तिच्या चपला .... किती त्या... वेडं नुसते त्याचे.... किती प्रकारचे फुटवेअर ... तिच्याच चपलासाठी एक वेगळे असे छोटे कपाट घ्यावे लागले होते. कपाटावरून आठवलं. आमच्या फ्लॅट मध्ये मोठे कपाट होते. मोठे असूनही मला फक्त एका कोपऱ्यात जागा .... माझ्या कपडयांसाठी..... बाकी तो इतका मोठा कपाट ... तिचेच कपडे, ड्रेस आणि साड्या... पैठणी , कांजीवरम ..... प्रत्येक सणाला एक नवीन साडी पाहिजे , असं वचनचं घेतले होते. कधी कधी मला भीती वाटायची... मलाच बाहेर काढते कि काय ... साड्यांना जागा पुरली नाही तर .... हाहाहा !!!!
ती : किती हट्ट पुरे केले त्याने ... लग्नानंतर... जवळपास सारेच. मागेल ते दिले त्याने. त्याचे एवढे प्रेम कोणी केले नाही माझ्यावर.... अगदी माझ्या आई-वडिलांनी ही.... कधी कधी जेवण करायचा कंटाळा यायचा मला.... सांगायला लागायचे नाही त्याला... स्वतःच तयारीला लागायचा. हा , एक मात्र सांगितले होते त्याने... रोज जरी मी जेवण , नास्ता बनवत असले तरी रविवारचा चहा , नास्ता ... तो स्वतः करायचा. माझ्याआधी उठून... मी जागी होण्याआधी नास्ता तयार ... मला तर बेडवर आणून देयाचा नास्ता... इतकं प्रेम कोण करते ....
तो : जेवण बनवायची आणि खाऊ घालायची भारी हौस तिला.... कॉलेजला असताना सुद्धा , काय काय घेऊन यायची माझ्यासाठी, एकत्र कॉलेजला निघालो कि माझ्या वाटणीचा टिफिन मला देयाची. घरी जाताना तिचा टिफिन रिकामा करून परत करायचो. जॉबला लागलो तेव्हाही तसंच... माझ्यासोबत लग्न झाल्यानंतर , किती आणि काय काय जेवणाचे प्रकार.... सगळे प्रयोग माझ्यावर... कधी कधी प्रयोग फसायचा , परंतु छान चव हाताला. चिकन बिर्याणी ... !!! ती बनवायची तर तिनेच... बिर्याणीचा रिकामी भांडी चाटून साफ करायचे , जेवायला येणारे... नॉनव्हेज तर तिचा जीव कि प्राण ... त्यातल्या त्यात दुसऱ्यासाठी जेवण बनवायला जास्त आवडायचे तिला. आता मात्र करते कि नाही माहित नाही.... तिचे मिस्टर , त्यांना फक्त veg आवडते ना... असे तिच्या आजीने सांगितले होते एकदा. इथे माहेरी आली कि खातं असेल नॉनव्हेज.
ती : तसं बघावं तर , त्याला फक्त पोट भरण्यात इंटरेस्ट होता. जे समोर येईल ते आनंदाने , समाधानाने खाणे हेच. मी त्याला वेगवेगळे पदार्थ देयाची... तेव्हा तोही शिकला करायला. पण त्यात इतका रस नव्हता त्याला. तरी रसिक माणूस.... आधी वाटलं नव्हता रोमँटिक ... पण लग्न झाले आणि कळले.... , किती रोमँटिक होता ते...किती काय काय सांगायचा .... असं स्वप्न पडलं ... तसे इमॅजिन केले. भारी !!! बोलायचा तेव्हाच किती धडधड व्हायची. चावट मुलगा !! हे सर्व होते तरी माझा रिस्पेक्ट करायचा नेहमीच.. मी तशी मुडी ... क्षणात मूड बदलतो माझा. तो मात्र प्रत्येक क्षणाला तयार.... माझा मूड सांभाळ्यासाठी... मला ना गुलाब प्रचंड आवडते... गॅलरीत खास माझ्यासाठी गुलाबाची रोपटी लावली होती.
तो : तिचं ना .... प्राण्यांसोबत फुलांवर ही प्रेम.... मलाही आवडायचे फुलं ... पण जास्वंद ... !! तेव्हा ना ... आमचा नुकताच साखरपुडा झालेला. तेव्हा पहिल्यांदा आलेली घरी.... आणि गॅलरीत येऊन बसली. त्यांचे घर खाली ग्राउंड फ्लोअरला ना .... मज्जा वाटली तिला गॅलरीत.... तेव्हाच प्रॉमिस घेतले होते.... लग्न झाले कि हि गॅलरी माझी.... आणि तसे केलेही तिने. गॅलरीभर नुसते गुलाबच गुलाब ....विविध रंगाचे गुलाब, तरी माझ्यासाठी एका जास्वंदचे रोपटे आणले होते तिने. मला जसे आवडायचे तसे... माझीही काळजी असायची तिला. नाहीतर का एवढे प्रेम ... !! आम्ही दोघेही जॉबला .. मी आधी निघायचो, तिथेही अट होतीच ... रोज निघताना ... मिठीत घेऊन माथ्यावर kiss पाहिजेच .... हो .. होतीच अट ... पूर्णही करून घेयाची रोज ... मी कधी विसरलो तर स्वतःच मिठी मारायची, मिठी मारली कि समजायचे मला. तिच्या माथ्यावर kiss करूनच निघायचो ऑफिससाठी.
ती : या वर्षी अंमळ जास्तच पाऊस झाला ना..... ती गॅलरीमधली गुलाबांची रोपटी, एकतर त्यांना पाणी कमी लागते. या वर्षीच्या... पावसात... तग धरला नसेल त्यांनी.. ते घर सोडले आणि त्यानंतर ... तिथे वळून बघितले नाही... माहेर - सासर एकाच सोसायटी मध्ये... पण शेवटची निघाली होती त्यांच्या घरातून ... तेव्हाही त्या गुलाबांकडे पाहिलं नव्हते. आताही ..... कधी माहेरी घरी गेले तरी त्या गॅलरीकडे नजर जातंच नाही.
तो : ती खूप प्रेमळ !! सगळ्यांची काळजी तिला ... तरी नाकावर राग कायम ... राग सांभाळत सांभाळत नाकी नऊ यायचे. पण ते सर्व फोनवर ... समोर आली कि राग कुठल्या कुठे पळून जायचा. होतीच तशी ती ... अगदी परी सारखी... कधी कधी परीचं बोलायचो तिला.... ती मला ' लाडू ' बोलायची. नावाने कधी हाक मारली कि लाडू हमखास बोलायची. .. लाडोबा !! आणि मी तिला चांदोबा !! हे असच चालायचे आमचे. किती मज्जा करायचो आम्ही. आठवले कि हसू येते .... पण ती जाताना वाईट वाटले होते. खूप !!! रडली होती तरी मनाची तयारी करूनच निघून गेली. जाण्याच्या आधी बोलली होती..... , मागे वळून बघणार नाही.... तशीच गेली. मागे वळून बघितलं नाही .... ते अजूनपर्यंत ... !!
========================= to be continued
No comments:
Post a Comment