All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Friday, 27 April 2018

" अनूजा ... !! (भाग दुसरा - अंतिम ) "


             " अनू !! " पुन्हा त्याचं अस्पष्ट आरोळ्या, अनूजा बेडवरच पडून होती. बेशुध्द झालो होतो... धावत होती.... साहेबराव, नंदा, आदित्य आणि सन १८९९ , अनू अजूनही बेडवर पडूनच विचार करत होती. हे सर्व खरं आहे का.. बाहेरून पावसाचा आवाज येतं होता. कमाल आहे ना.. एवढे दिवस पाऊस पडतच आहे. अनुजा बेडवर उठून बसली. एकटीच रूम मध्ये. 

              बाहेर आली. सकाळच्या मानाने , रात्री काळोखच सगळीकडे. दिवे असूनही ते बंद होते. एखाद-दुसरा तेव्हडा चालू होता. त्याचा प्रकाश सुद्धा अंधुक असा. कसला आवाज नाही , का काही नाही. हळूच पुढे होऊन तिने खाली वाकून पाहिले. हॉलमध्ये सुद्धा कोणी नाही. फक्त आणि फक्त पावसाचा आवाज. कुठे गेले सर्व. मधेच दिव्याची ये-जा सुरु होती. विजेचा आवाज मधेच. एकदा पक्षी , त्या रात्रीत सुद्धा केविलवाणा ओरडत होता. भीतीदायक वातावरण.. अनू घाबरली. 

               पुढे जाऊया का.. कि सरळ बाहेर पळत जाऊया. अनुजा मागे वळली. नंदा हातात बॅटरी धरून उभी. काळोखात त्या अंधुक प्रकाशात नंदाचा चेहरा किती भयावह दिसत होता. अनूजा केवढ्याने दचकली. " काय झालं बाईसाहेब ... काही हवं आहे का ? " नंदा निर्विकार चेहऱ्याने उभी होती. " क... काही नाही.. " अनूजा घाबरत म्हणाली. पट्कन धावत ती तिच्या खोलीत शिरली. दरवाजा लावून घेतला. हळूच दरवाजा उघडून पाहिला. नंदा बाहेर नव्हतीच. अरेच्या !! आता तर बाहेर होती. इतक्या जलद कुठे गेली नंदा. 

               अनु पुन्हा बाहेर आली. कानोसा घेऊ लागली. तिच्या खोलीपासून बरोबर उलट्या दिशेला असलेल्या रूमचा एक दरवाजा जरासा उघडा आहे असं अनूला वाटलं. हलक्या पावलांनी अनू दरवाजापाशी पोहचली. हळूच डोकावून पाहिलं तिने आत. नंदा केस सोडून बसली होती, पाठमोरी होती. मघाशी अंगावरची साडी वेगळी होती, आता हि मळकी साडी कशी.. अनू विचार करत राहिली. ती रूमसुद्धा पडीक वाटत होती. संपूर्ण रूममध्ये एकच दिवा... तोही अंधुक प्रकाश... त्या प्रकाशात , खोलीचा बकालपणा अंगावर येत होता. अस्थाव्यस्थ सामान , भिंतीवर कोळ्यांची जळमटे, कुठे भिंतीचे बांधकाम पडलेलं , एक कपाट ... त्याचा एक दरवाजा नाही, उरलेल्या दारातून कपडे नुसते कोंबलेले...उघड्या खिडकीतून आत येणार पाऊस... विचित्र सगळं....   म्हणजे ... इतर हॉटेल स्वच्छ , टापटीप... आणि हिची खोली अशी कशी... त्यातही नंदा वेगळी का भासते , काही कळायला मार्ग नाही...  .

                 आणखी डोकावण्याचा नादात अनूचा दरवाज्याला धक्का लागला. हलकासा आवाज झाला. नंदाने पट्कन मागे वळून पाहिलं. इतक्यात जोराची वीज चमकली बाहेर... भयंकर आवाज.. अनुचं लक्ष नंदाच्या चेहऱ्यावर गेलं. नंदाचा तर चेहराच नव्हता.. नाक , डोळे , कान , तोंड .. काही काहीच नव्हतं. सपाट चेहरा. अनूला दरदरून घाम फुटला. तशीच अडखळत मागे आली.पण एवढी घाबरली होती कि तोल गेलाच तिचा, मागेच असलेल्या खोलीच्या दारावर आदळली. त्या धक्क्याने दरवाजा उघडला. आतील व्यक्ती समोर आली. कपड्यावरून साफसफाई करणारा... पुन्हा तसंच... मळके कपडे.. परंतु जसा बाहेर आला , तेव्हा दिसलं.. त्याचाही चेहरा नव्हता. अनूजा आणखी घाबरली. ओरडावे वाटतं होते, आवाज कुठे निघत होता तोंडातून.. पुन्हा उठली आणि पळत सुटली. आजूबाजूला आदळत पळत होती, पडत होती. फुलदाण्या.. चिनी मातीच्या.. पडून फुटत होत्या. त्या आवाजाने , बंद असलेले खोल्यांचे दरवाजे उघडत होते. बाहेर येणारी प्रत्येक व्यक्ती चेहरा विरहित होती.. अनू जोर काढून ओरडत होती.. आवाज का नाही फुटत तोंडातून माझ्या... अनू विचित्र अडचणीत होती. स्वतःची खोलीसुद्धा विसरली ती. धावत धावत दुसऱ्या टोकाला असलेल्या खिडकीपाशी पोहोचली. त्यात तिला दम लागलेला.. समोरच्या खिडकीच्या काचेत स्वतःच प्रतिबिबं दिसलं. आणखी एक धक्का !! अनू ओरडू शकत नव्हती कारण ... कारण तिला तिचं तोंडच दिसत नव्हतं. हो.. अनूने हात लावून पाहिलं. नाकाच्या खाली पूर्ण सपाट त्वचा.. जबदस्त धक्का होता हा.. अनू पुन्हा स्वतःची खोली शोधू लागली. धावता धावता पुन्हा एकदा एक फुलदाणीला आपटून खाली पडली आणि बेशुद्ध झाली.       

                   सकाळ झाली नेहमीप्रमाणे. अनुजाने डोळे उघडले तर बेडवर होती. कालची रात्र आठवली तिला. ताड्कन उठून बसली बेडवर. स्वप्न होतं का ते. पण हातावर फुलदाणी लागल्याची नाजुकशी जखम होती. म्हणजे माझं तोंड ????? .... लगेच हात लावून पाहिला तिने.. होते तोंड जागेवर.. उठून आरश्यासमोर आली. ओठ ,दात सगळं तपासून बघितलं. परंतु मनगटावर काही दिसलं तिला. कसलीशी खूण , नक्षी होती. शाईने केलेली खूण असावी. हाताने पुसण्याचा प्रयत्न झाला करून, नाहीच गेली. पक्का रंग असावा. कोणी लावला पण, काही समजत नाही. खिडकीतून बाहेर पाहिलं ... पाऊस !! .. अरे.. मला इथे येऊन ३ दिवस तरी झाले. पाऊस थांबत कसा नाही. इतक्यात नंदा आली. " नमस्कार बाईसाहेब ... कश्या आहात तुम्ही.. नास्ता करून घ्या.. " नंदाला बघून अनूजा दचकली. नंदा तर नीटनेटकी दिसत होती. मग काल रात्री काय झालं नक्की... नंदा नास्ता ठेवून निघूनही गेली. अनूजा तिला बाहेर जाई पर्यत बघत होती. नास्ता करू कि नको या विचारात अनू.. एका मागोमाग विचित्र घटना. नास्ता तसाच सोडून ,हिंमत करून बाहेर आली अनूजा. 

                    काल रात्री तर किती ठिकाणी धडपडलो, फुलदाणी ... ४-५ तर फुटल्याच... हाताला त्यानेच जखम झाली माझ्या... मनात बोलत अनूजा बाहेर आली. परंतु बाहेर सगळंच वेगळं. सर्व फुलदाण्या.. तश्याच्या तश्या अगदी. कुठे फुलदाणी तुटल्याचे निशाण नव्हतं. बाहेर साफसफाई सुरू होती रोजची. कालचे चेहरा नसलेली माणसे , आता नेहमीसारखी हसून स्वागत करत होती.... काय नक्की, मी काल बघितलं ते काय होते... हाताला तर जखम आहेच.. म्हणजे मी नक्की जागी होते... तशीच चालत चालत अनूजा खाली आली. खाली हॉलमध्ये कामे सुरु होती नेहमीची. आदित्य दिसला तिला. तशी ती त्याच्या जवळ पोहोचली. 
" नमस्कार !! कश्या आहात आता. बरं वाटते आहे ना.. " आदित्यने हसून स्वागत केलं. 
" मी ठीक आहे.. " अनू बोलली पण लगेच तीच लक्ष त्याच्या मनगटावर गेलं. त्याच्याही मनगटावर तशीच खूण होती, जी अनूच्या मनगटावर होती. 
" जरा बोलायचं होतं.. एका कोपऱ्यात जाऊन बोलूया का ?? " आदित्य तयार झाला आणि दोघे हॉलच्या कोपऱ्यात एका टेबल होते, तिथे जाऊन बसले. 

" बोला .. काय बोलायचे आहे.. " आदित्य... 
" आधी सांग, हे हातावर काय आहे ? " आदित्य मनगटाकडे बघत राहिला. 
" हि नक्षी ना.. माहीत नाही मला सुद्धा, मी इथे आल्यानंतर किंवा आधी असावी. नक्की माहित नाही. ",
" माहित नाही म्हणजे ? ",
" माहित नाही म्हणजे लक्षात नाही.. ",
" कसं काय ? ",
" तेच... मी इथे कधी आलो ते सुद्धा लक्षात नाही माझ्या. जास्तीत जास्त ३ दिवसापूर्वीच राहते लक्षात. बाकी नाही आठवत,  कदाचित त्याआधी कोणी हातावर गोंदवले असेल  " अनूजा चिडली. 
" काय बोलतोस ते कळते का तुला.. एकतर आधीच काय घडते आहे ते कळत नाही.. त्यात तू असा विचित्र बोलतो आहेस.. असं कसं विसरलास.. मग या लोकांची नावे कशी माहित तुला... " ,
" अरे !! हे रोज भेटतात .. म्हणून आहेत ध्यानात.. तुम्हीपण बघा आठवून आधीचे... बघा काही आठवते का... " आदित्यने शंका व्यक्त केली. अनूजा मेंदूवर जोर देऊन आठवू लागली. खरंच तिला आठवत नव्हतं. फक्त इथे आलो ती सकाळ तिला आठवत होती. कमाल आहे... कसं आठवत नाही मला... आणखी डोक्यावर ताण देऊ लागली... डोकं दुखायला लागलं. परंतु काही आठवलं नाही तिला.. आणखी एक धक्का... मला वेड लागणार बहुतेक... डोकं धरून बसली... आणि तेव्हाच तिला कालची रात्र आठवली. 

" हा... आणखी एक... तू कधी रात्रीचा या हॉटेलमध्ये फिरला आहेस का ..कसं विचित्र असते सगळं.... ",
" म्हणजे कसं ?",
" तू कुठे होतास रात्री काल... ",
" खरं सांगायचं झालं तर तेही आठवत नाही... संध्याकाळ होतं आली कि सगळं हॉटेल रिकामी होते.. ",
" नक्की काय.. " ,
" संध्याकाळी ७ वाजले कि बाहेरची मंडळी साहेबरावांचा निरोप घेऊन निघून जातात  आणि जे इकडचे आहेत ते येतेच राहतात. ते आपापल्या खोलीत जाऊन झोपतात. मला तर ७ नंतर काय होते ते पण मला माहित नाही. " अनूजा घाबरली. 
" थोड्यादिवसांनी तुलाही सवय होईल. आमच्यातली एक होईन जाशील ना तूसुद्धा... " 
आदित्यच्या या बोलण्याने अनूजा सुन्न झाली. खरंच होतं का असं... अनूजा अजूनही आठवायचा प्रयन्त करत होती. पण व्यर्थ सगळं. हॉटेलमध्ये सकाळी जाग आली तेच आठवत होतं तिला. पाणी आलं डोळ्यात. 
" रडतेस का ... माफ करा... रडता का तुम्ही.. " आदित्य....  
अनूजा काही बोलली नाही. लक्ष हॉलला असलेल्या खिडकी बाहेर गेली. पाऊस सुरूच. 

अनूजा चालत खिडकीपाशी आली. 
" हा पाऊस थांबत का नाही. " ,
" काय ? ", आदित्य.. 
" हा पाऊस.. मला आठवते आहे... मी इथे आल्यापासून पडतो आहे. म्हणजे ३ दिवसापासून पाऊस थांबलाच नाही का... आणि जर एवढा पाऊस पडतो तर पूर वगैरे यायला पाहिजे होता ना.. तर तेही नाही.. मी पळायचा प्रयत्न केला होता तेही आठवते मला. मग पाऊस कसा थांबत नाही. " 
आदित्यकडे उत्तर नव्हतं याचे. शांत उभा होता. अगदीच शांत वारा होता, पावसासोबत. अनुचं लक्ष पुन्हा त्या मनगटावर असलेल्या नक्षीकडे गेलं. आदित्यकडे वळली. 
" मी पळायचा प्रयन्त केला तेव्हा तुही होतास ना तिथे..",
" हो.. ",
" तुही इथे खूप दिवस आहेस ना.. तुला तुझ्या घरी जावेसे वाटतं नाही का... ",
" सुरुवातीला वाटलं ... आता तर आठवतं पण नाही माझं घर , कुटुंब होतं का ते.... एवढंच काय..... मला माझं नावं सुद्धा लक्षात नाही." 
"मग मला तुझं नावं सांगितलंस ते.. ",
" ते... हे इकडचे सगळे हाक मारतात या नावाने .. तुम्हाला तुमचं नावं आठवते का.. ", प्रश्न तर बरोबर होता आदित्यचा. अनूला तिचं "नाव" आठवत नव्हतं. नावं आठवायचा एक -दोनदा प्रयन्तही झाला... पण नाहीच. एक आठवलं, त्या अस्पष्ट हाका.. 
" नाव तर नाही आठवत पण काही वेळेस "अनू " या नावाच्या हाका ऐकू येतात मला.. तू ऐकलं आहेस का असं कधी ",
" नाही.. तरी अनू नाव छान आहे. " आदित्य हसत म्हणाला तरी अनू विचार करत होती. 

                 म्हणजे मी खरंच इथलीच होणार का.. जसा हा आदित्य झाला आहे. म्हणजे याला तर काही वाटतंच नाही आता. निदान नाव तरी लक्षात राहिलं माझ्या. तरी मला इथून बाहेर जायचेच आहे. 
" इथून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. असं काही ऐकलं होतं मी.. कोणाकडून आठवत नाही. मग कोणीच प्रयन्त करत नाही का बाहेर जायचा... " अनुचा पुढचा प्रश्न... 
" चांगला प्रश्न आहे... जास्त आठवत नाही, परंतु या हॉटेलच्या बाहेर कोणी जात नाही. कारण रोजचीच मंडळी असतात. हे इंग्रज लोकं येतात कधी कधी, ते काही वेळेपुरते दिसतात.. नंतर माहित नाही कुठे आणि कसे बाहेर जातात.. " अनुजा त्या बोलण्याकडे लक्ष देत खिडकीतून बाहेर बघत होती. 
" दिवसभर काय करतोस मग ? ", 
" काही नाही.. सकाळचा वेळ वृत्तपत्र वाचण्यात जातो. तोपर्यत दुपारचं जेवण तयार होते. जेवून झालं कि सगळेच झोपतात दुपारचे. संध्याकाळ होतं आली कि बरेचशे लोकं असतात हॉलमध्ये.. नंतर ७ वाजत आले कि सर्वच स्वतःच्या खोलीत जाऊन बसतात. " अनूजा सर्व ऐकत विचार करत बसली होती.   

                     त्यानंतर आदित्य अनुजाला तिथेच सोडून बाकीच्या लोकांसोबत बोलण्यासाठी निघून गेला. अनू मग तशीच बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत बसली. खरंच आठवणार नाही का आधीचं काही.. हे कसं शक्य आहे ना.. कसं,कोणी आपलं आयुष्य , आठवणी विसरू शकते.. आदित्य बोलला , त्यालाही आठवत नाही काही... त्यात हा पाऊस.. का थांबत नाही.... सारखा सारखा पाऊस, हे सुद्धा शक्य वाटत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे या जागेत.. अनूने सगळं हॉटेल बसल्याजागी बघून घेतलं. सर्व काही जुन्या काळात असल्या सारखं... म्हणजे हे खरं आहे. स्वप्न नाही. हि माणसं खरी आहेत.. पाऊस खरा आहे.. फक्त या सर्वामध्ये काहीतरी चुकीचे होते आहे.. एक मिनिट... या सर्वामध्ये मीच वेगळी आहे.. याचा अर्थ, मी इथे नसायला पाहिजे... मी चुकून आलेली आहे. किंवा हा काळ चुकीचा आहे. काहीतरी केलंच पाहिजे... त्यापेक्षा , आपल्याला इथून निघायचं आहे , हे लक्षात ठेवलं पाहिजे. अनूने नंदाकडे एक वही आणि लिखाणासाठी पेन मागितला. पेन नव्हता.. शाईचे दौत आणि काही जुनाट कागदाची पाने तेवढी मिळाली. चालेल हे सुद्धा.. मनात म्हणत अनुने एका कागदावर " मला इथून निघायचे आहे.. " असं लिहून ठेवलं. तिच्या खोलीतच बसली होती. तर संध्याकाळ होण्याच्या आत, गेल्या ३ दिवसांचे जेवढं आठवलं तेवढं लिहून ठेवलं. रात्री, ती बाहेर आलीच नाही.. एका रात्रीचा "अनुभव" पुरेसा होता तिला. 

                    पुढचा दिवस, सकाळ झाली. नेहमीचीच सकाळ... नेहमी सारखी उजाडली. नास्ता बेडवरच, तोही नेहमी सारखा. नास्ता, अंघोळ करून अनू खाली हॉलमध्ये आली. आदित्य होताच खाली. आदित्यला पाहिल्यावर कालची गोष्ट आठवली. आपण जुनं विसरलो आहे हे तिला "आठवलं ". पुन्हा आठवण्याचा प्रयन्त, आता तर ती इथे कशी आली तेच विसरली. म्हणजेच इथला पहिला दिवस.. तोही लक्षात नाही. भयानक आहे हे. परंतु तिने लिहून ठेवलं आहे हे आठवलं. आपल्याला निघायचे आहे तर आधी एक हॉटेल पूर्ण बघितलं पाहिजे, म्हणत अनूजा हॉटेलचा फेरफटका मारू लागली. वरच्या मजल्यावर तर ती फिरली होती. हॉलमध्ये कमीच... हॉल तरी बराच मोठा होता.बऱ्याच ठिकाणी सुंदर पेंटिंग्स लावली होती. चालत चालत हॉलच्या दुसऱ्या टोकाला पोहोचली. खिडकीतून बाहेरच द्रुश्य पाहत राहिली. जागोजागी ठेवलेल्या टेबल, खुर्च्यावर लोकं चहा, कॉफी घेत गप्पा मारत होती. मोठठंच मोठा पसरलेला बगीच्या.. मोठमोठी झाडे... काही दगडी खांब... आणि एक मोठ्ठा लोखंडी गेट.. सोबत पाऊस बाहेर होताच. एकच दरवाजा बाहेर जाण्याचा .. पुन्हा आल्यापावली , हॉलच्या दुसऱ्या टोकाकडे निघाली. सर्व भितींवर हात फिरवत चालत होती. चित्र, फुलदाण्या.. छान छान फुलं... सुगंधी वातावरण... किती छान वाटतं होतं ते. पुन्हा हॉलच्या एका टोकाला पोहोचली. 

                सगळंच तर परफेक्ट होतं. मग गडबड कश्यात आहे... तिथल्या एका खिडकीतून बाहेर बघितलं असता, काही इंग्रज अधिकारी बाहेर निघाले होते. ते कसे बाहेर जातात, हे बघत होती अनूजा. गेटजवळ येताच त्यांच्याभोवती धुक्यासारखं काही जमा झालं. त्यापुढे काही दिसलं नाही. धुकं विरळ झालं तर कोणीच नव्हतं तिथे.. कमाल आहे.. विचार करत अनू पुढे आली. विचारांच्या धुंदीत चालत होती, तर एका नोकराला , जो नास्ता घेऊन जात होता .. त्याला आपटली.. सगळा नास्ता खाली.. " माफ करा.. माझं लक्ष नव्हतं. " तोच म्हणाला आधी. जमीन साफ केली आणि लगबग करत निघून गेला. अनूने फक्त नजर दुसरीकडे वळवली असेल.. अगदी २-३ सेकंदांचा अवधी, तोच पुन्हा तसाच नास्ता घेऊन येताना दिसला.  ऑ !! कसं शक्य आहे हे.. अनूला वेगळाच प्रश्न... 

               अरेच्या !! एक लक्षातच आलं नाही.. किचन कुठे दिसलंच नाही आपल्याला.. या हॉलभर फिरली... वरच्या मजल्यावर फक्त खोल्या आहेत.. मग किचन कुठे... आणि किचनच नाही तर नास्ता , जेवण कसं बनवतात. काय सुरू आहे नक्की... काय जागा आहे हि... पुन्हा एकदा तिने हॉलभर फेरी मारली. नाहीच.. चक्रावून गेली.. समोर नंदा दिसली. नंदाला काहीतरी सांगू.. " नंदा... मला काहीतरी खायला घेऊन ये .. " नंदा टेबल साफ करत होती. " हो बाईसाहेब... आणते.. " नंदा निघाली तशी अनूजा तिच्या मागोमाग निघाली. काही पावलं चालली तशी नंदा थांबली.. मागे अनू... " काय झालं बाईसाहेब... आणते तुम्हाला खायला... " म्हणत झपझप निघून गेली. इतकी अचानक कुठे गेली हि.. विचार करत होतीच. इतक्यात " बाईसाहेब !! " असा मागून आवाज आला. अनूजा दचकली. नंदा मागेच उभी.. समोरून गेली आणि काही सेकंदात मागून कशी काय.. " न.. नको मला... घेऊन जा परत... "," ठीक आहे.. " म्हणत नंदा पुन्हा लगेच दिशेनाशी झाली. काहीतरी भयंकर आहे हे.. आदित्य समोरच वृत्तपत्र वाचत होता. पळत त्याच्याकडे गेली. 

" आदित्य !! अरे तू काय पेपर वाचत बसला आहेस.. इथे काहीच बरोबर नाही. ", 
" काय झालं एवढं ओरडायला.. " ,
" तुला कळते का.. इथे किचनच नाही आहे.. मग हे सर्व नास्ता , जेवण कुठून आणतात... " ते ऐकून आदित्य उभा राहिला.
" काय !! कसं शक्य आहे.. " ,
" हो रे... मी बघितलं सगळं हॉटेल... नाहीच आहे कुठे " आता आदित्य सुद्धा चक्रावला. धावतच त्याने हॉटेलभर फेरी मारली. 

आदित्यला पटलं अनुजाचे बोलणे, " खरंच ग... तू बरोबर बोलतेस.. पण काय करणार आपण.. साहेबरावच्या परवानगी शिवाय कोणी बाहेर जाऊ शकत नाही. ",
" हो.. तेही माहित आहे मला.. तरी काही करून मला या हॉटेलच्या बाहेर जायचे आहे.. तू मदत करशील का ? " अनुजा काकुळतीने बोलली. 
" पण कसं.. इथे ३-४ दिवसापूर्वीचच आठवते.. काही ठरवलं करायचे तरी ते विसरून जाणार... त्यात आता हे नवीन समोर आले... डोकं चक्रावून गेलं अगदी.. ",
" चल...  काही दाखवते तुला.. " आदित्यचा हात पकडून त्याला स्वतःच्या खोलीत घेऊन आली. तिने जे लिहून ठेवलं होतं ते आदित्यला दाखवलं. त्याला ती कल्पना आवडली. 
" एक विचार केला इथून बाहेर जाण्याचा तरी ते शक्य वाटत नाही. त्या गेटजवळ काय झालं तुझं हे आहे आठवणीत माझ्या... तुझा श्वास कोंडला होता. मग त्याच्या पलीकडे कसं जाणार... " आदित्य बोलला तेही बरोबर होते. 

" एक काम करूया.. हे मी तरी असं रोज लिहिणार आहे, म्हणजे लक्षात राहील.. तू सुद्धा असंच लिहायला सुरुवात कर.. आणि यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग असेलच... काहीतरी कमजोरी शोधली पाहिजे. ",
" ठीक आहे... मी करिन मदत.. " आदित्यने विश्वास दिला अनूला. पुढच्या दिवसापासून सकाळ झाली कि दोघांचे एकच काम.. हॉटेलभर फिरून काहीतरी शोधायचे... अर्थात कोणाला समजणार नाही असं.. रोजच्या घडामोडी लिहून ठेवायच्या.. असा पुढे एक आठवडा गेला. दोघांचे प्रयन्त सुरु होते. पण वेगळं तरी काय भेटणार.. ते लिहून ठेवायचे म्हणून सर्व गोष्टी लक्षात राहिल्या. अश्याच एका दिवशी, दोघे सकाळचे "फिरून" आल्यावर निराश होऊन एक टेबलावर बसले. अनुचं लक्ष टेबलावर असलेल्या मेणबत्ती कडे गेलं.. तिला काही वेगळं जाणवलं. तसं आजूबाजूच्या टेबलावर पाहिलं. सर्व ठिकाणी मेणबत्या होत्या. पण होत्या तश्याच होत्या.. 
" विचित्र आहे ना.. " ,
" काय ते ",
" या मेणबत्या.. सर्व आहे तश्याच आहेत, कधी वापरात नाहीत.. शिवाय रात्री तर कोणी नसते इथे .. मग कश्यासाठी ठेवल्या आहेत... कळलं ना तुला.. " आदित्यने नजर फिरवली. 
" हो गं.. लक्षात नाही आलं माझ्या.. " 

आदित्यने एका नोकराला आवाज दिला.. " या मेणबत्या पेटवत का नाहीत.. " त्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले.. 
" का.. कशाला पाहिजे तुम्हाला नसत्या चौकश्या... ",
" पण विचारलं तर काय झालं... " अनूजा.. तेव्हड्यात साहेबराव येताना दिसले. 
" शोभेच्या आहेत त्या... छान दिसतात म्हणून ठेवल्या आहेत.. मिळालं उत्तर... " साहेबराव उत्तरले. 
" हे उत्तर नाही आहे.. मला खरं उत्तर पाहिजे आहे.. ",
" हेच उत्तर आहे.. जास्त शहाणपणा करायचा नाही... तुम्हा दोघांना गेला आठवडा भर बघतो आहे.. मला काही समजत नाही तुमच्या बद्दल.. असं वाटतं असेल ना , तर ते काढून टाका मनातून.. जेवायला मिळते ना... ते गिळायचा आणि चुपचाप राहायचं इथे.. " साहेबरावांचा आवाज चढला. 
" नाही राहायचं आहे इथे... सोडत का नाही आम्हाला... " अनुचा आवाज सुद्धा चढला.
" सोडीन... वेळ आली कि.. " साहेबराव मोठयाने हसला आणि निघून गेला. 

आदित्यने अनुला जबरदस्ती खाली बसवलं. 
" शांत हो.. त्यांच्याकडे काहीतरी आहे.. म्हणून आपण बाहेर जाऊ शकत नाही. " अनुजा शांत झाली. थोड्यावेळाने बोलली. 
" तू अश्या किती लोकांना ओळखतॊस जे आपल्यासारखे रोज दिसतात.. " ,
" खूप जण आहेत.. " ,
" तुला कसं माहित तेही अडकले आहेत.. " ,
" एक अंदाज लावला. कारण हे इंग्रज लोक येतात ना.. त्यांनाच खूप वेळेला बाहेर जाताना पाहिलं आहे मी.. हि आपल्या मनगटावर नक्षी आहे ना, तशी त्यांच्या हातावर नसते.. आपल्या सारखे भारतीय आहेत ना.. जे रोज दिसतात... त्यांच्या हातावर अशी नक्षी आहे. ते कधीच बाहेर जात नाहीत.. " नवीन शोध.!! अनूजा तिच्या मनगटावरील नक्षी निरखून पाहू लागली. सापाची नक्षी होती ती. जणू काही सापाने, विळखा घातला आहे अशी.. म्हणजे टाळे लावावे असे भासले तिला. आदित्यच्या मनगटावर तशीच नक्षी.. अचानक तिला तो बाहेरचा गेट आठवला. त्या लोखंडी गेट वर सुद्धा अशीच एक मोठी नक्षी बनवली आहे.. शिवाय आजूबाजूच्या भिंतीवर सारख्याच नक्षी होत्या. 

" काहीतरी ध्यानात येते आहे माझ्या... हे असं काही मनात नाही मी.. पण कोणत्यातरी शापाने , दुष्ट शक्तीने हि जागा प्रभावित आहे असं वाटते.. या सापाचं काहीतरी असणार .... या मेणबत्या.. त्याचंही कळलं.. किचन नाही इथे... मेणबत्या तश्याच शाबूत.. कधी पेटवल्याचं नाहीत.. आगच नाही वापरात हे... नास्ता , जेवण जादूने करतात वाटते." यावर मात्र अनु स्वतःवरच हसली. 
" मग पुढे काय ? ",
" अजून एक गोष्ट... साप आगीला घाबरतो.. तसं करून बघू... आग लावण्यासाठी काही साहित्य आहे का... मेणबत्ती पेटवून बघितली असती.. " ,
" माहित नाही.. कधी विषयच आला नाही... जेवण , नास्ता मागितला कि लगेच पुढ्यात आणून देतात... किचन मध्ये जाण्याचा संबंध आलाच नाही कधी.... त्यात ते नाहीच आहे हे तुझ्यामुळे कळलं.. " त्यावर अनुचा चेहरा पडला. 
" एक मिनिट.. ते इंग्रज येतात ना.. त्याकडे काही असलं तर.. त्यांच्याकडे काहीतरी नक्की मिळेल.. ,"
"चालेल " अनुजा खुश झाली. " नक्की बघ.. एक काम करूया. मी जाते खोलीत.. तुझ्या ओळखी आहेत इथे बऱ्यापैकी.. बघ काही मिळते का.. " म्हणत अनुजा तिच्या खोलीत गेली.. विचार करता करता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. 

               कसलातरी आवाज येतं होता. अनुने हलकेच डोळे उघडले. बघते तर मागे एक गुहा.. खाली बघते तर ट्रेनचे रूळ.. याचा अर्थ तो रेल्वेचा भोगदा होता. दुरून ट्रेन येण्याचा आवाज.. आणि आपण बरोबर समोरच बसलो आहे, हे अनुच्या लक्षात आलं. उठायचा प्रयन्त केला तिने.. परंतु तिचे हात-पाय बांधलेले... गाडी जवळ येतं होती. जोर लावून तिने दोऱ्या तोडल्या. उभी राहत होती. इतक्यात ट्रेन जवळ आलीच. अनुने डोळे मिटून घेतले. 

                  काही वेळ असाच गेला.. काही घडते आहे का ते पाहण्यासाठी तिने एक डोळा उघडून बघितलं. एका किल्ल्याच्या टोकावर उभी होती ती. खाली खोल दरी... कसाबसा तोल सांभाळला तिने, सोबतीला सुसाट वारा.. इतका कि अनुचा तोल गेलाच.. खोल दरीत पडू लागली ती. मोठयाने किंचाळली.. " वाचवा !! " जमिनीपासून काही अंतरावर असताना, कपाळमोक्ष होणार आता.. म्हणत तिने डोळे मिटून घेतले. 

                    पुन्हा एकदा डोळे मिटून बसली होती. " अनू !! ", " अनू !! "... दोन वेळेस तिला हाक ऐकू आली. एका डोळ्याने बघितलं तिने. अस्थाव्यस्त सामान, एक मुलगी.. जवळपास तिच्याच वयाची.. सामान आवरत होती. कोण हि, हिला ओळखते का मी.. " अनू !! बाई उठ ग... किती झोपणार अजून.. " अशी ती मुलगी सारखी सारखी बोलत होती. खूप वेळ तिच्याकडे बघून सुद्धा "ती" नक्की कोण ते आठवतं नव्हतं. कोणीतरी नक्कीच ओळखीची आहे असं वाटत होतं सारखं.. खूप जोर दिला मेंदूवर , तेव्हा काही आठवते आहे असं वाटू लागलं.. आणखी एकाग्र करण्यासाठी डोळे मिटून आठवू लागली. 

" अनू मॅडम  , अनू मॅडम .. " असा शेजारून आवाज आला.तसे अनुने डोळे उघडले. आदित्य शेजारी बसून होता. 
" काय झालं.. डोळे मिटून का बसलात.. " आदित्य विचारात होता. अरे !! मी तर झोपले होते ना.. मग इथे कशी.. स्वप्न आहे कि काय हे सुद्धा... 
" मी तर माझ्या खोलीत झोपली होती ना..", अनुने आदित्यला विचारलं. 
" नाही, आपण तर जवळपास एक तास गप्पा मारत बसलो आहोत इथे. " अनुजा पुन्हा विचारात.. 
" आपण आग लावण्याचे साहित्य या विषयावर बोलत होतो. आणि मधेच तुम्ही डोळे मिटून बसलात.. " जाऊदे .. हि जागाच विचीत्र आहे.. असो 
" तुला भेटलं का काही.. " ,
" हो " आदित्य आजूबाजूला पाहत म्हणाला. " हि काडेपेटी मिळाली एकाच्या खिश्यातुन.. ",
" व्वा !! कशी काय मिळाली.. " ,
" ते राहूदे .. आता पुढे काय.. ",
" अरे पण इथे .. आग हा प्रकारच नाही ना.. मग त्याने काडेपेटी कशी आणली. ",
" अहो.. ते इंग्रज लोक काही तरी ओठात धरून तिला आग लावतात.. मला माहित नाही काय असते ते... ते बाहेर तसं करत असतात... हॉटेलमध्ये परवानगी नाही त्याला.. म्हणून एकाच्या नकळत घेतली हि काडेपेटी.. ते जाऊ दे ना.. पुढे काय करायचं आपण.. ".
"थांब ... विचार करू दे मला.. " अनु विचार करू लागली.. काहीच सुचलं नाही.. " मी माझ्या खोलीत जाऊन विचार करते.. तेथे सुचेल काहीतरी.. " म्हणत अनुजा तिच्या खोलीत जाऊन बसली. 

                        काडेपेटी कितीतरी वेळ हातात धरून विचार करत बसली होती. काय करूया ... काय करूया.. अचानक तीच लक्ष मनगटावर असलेल्या सापाच्या नक्षीकडे गेलं. काही विचार करून तिने खोलीचा दरवाजा बंद केला. दरवाजा बंद आहे हे नक्की करून ते बेडवर येऊन बसली. एक काडी काढून भुर्रकन पेटवली. हळूच सापाच्या नक्षी जवळ नेली. अजबच !! ... सापाने हळूच त्याचा विळखा सोडला..आणि धूसर होतं होतं... नाहीसा झाला साप.. जणूकाही जिवंत साप असावा असंच झालं. अनुला किती आनंद झाला. पण जशी काडी विझली, तसा तो साप पुन्हा दिसु लागला आणि मनगटावर पुन्हा होता तसा विळखा घातला.अनुला समजलं... इथून बाहेर जायचे असेल तर आगीचा वापर करावाच लागेल.. त्याशिवाय पर्याय नाही. 

                       दुपार नंतर , अनुजा पुन्हा खाली आदित्यला भेटायला आली. आदित्यशी छान जमलं होतं तिचं. आदित्यला बघत होती. कुठे दिसत नाही.. झोपला असेल म्हणत एकटीच खाली येऊन बसली. बाहेर बघत बसली. आदित्य आला काही वेळाने... 
" मग काय ठरवलं पुढे... ",
" हा.. " अनूजा भानावर आली. " मी एक प्रयोग करून बघितला. काडी पेटवली आणि या सापाच्या नक्षीजवळ नेली. तर ती गायब झाली, काडी विझल्यावर पुन्हा होती तशी परत हातावर आली. म्हणजेच आगीचा उपयोग केला तर मी बाहेर जाऊ शकते... सोबत तूसुद्धा.. बाहेर पडशील यातून.. " अनूजा आनंदात सांगत होती. 
" हो हो.. पण काडेपेटी किती वेळ राहणार.. संपेल ना.. " ,
" मग मशाल बनवीन मी... पण बाहेर जाईनच.. " अनूजा आनंदात.. 
" मशाल ?? .. बाहेर पावसात राहील का आग.. " यावर अनूजा शांत बसली. 

               खरंच यार.. किती दिवस.. पाऊस पडतोच आहे.. पूर्ण तयारी वाया जाणार पावसामुळे.. खूप विचार करून अनूजा बोलली. 
" एकच पर्याय आहे.. संपूर्ण हॉटेललाच आग लावायची. " यावर आदित्य "आ" वासून तिच्याकडे पाहत राहिला. 
" बऱ्या आहात ना तुम्ही.. कसं शक्य आहे हे... ",
" सगळ शक्य आहे.. फक्त मला मदत कर.. " आदित्य कसा बसा तयार झाला. आग मोठी लावली पाहिजे.. तरच शक्य आहे याच्या नजरेतून सुटायला, हे अनूजाला चांगलंच समजलं होतं. परंतु आगीला पसरायला मदत करेल असं पाहिजे काहीतरी.... मेणबत्या.. त्याकडे कोणाचंच लक्ष नसते. हो.. त्याचाच वापर करायचा. दोन-तीन तरी पुरेशा होतील. मनात आलं तसं तिने बघता बघता टेबलावरची एक मेणबत्ती लपवून खोलीत नेली सुद्धा. आदित्यला हि तिने तसेच करायला सांगितलं. पुढच्या दोन दिवसात अनूने चांगली तयारी केली. आदित्य तयार होता. कोणीच मेणबत्त्या गायब होतं आहेत, याची तसदी घेतली नाही. 

अखेर त्यांनी ठरवलं, हॉटेल पेटवायचे.. पण सुरुवात कुठून आणि कधी करायची..... ते ठरत नव्हतं. 
" कधी लावणार आग.. " अनु आदित्यला विचारत होती. 
" हे बघा अनू मॅडम.. मी आधीच घाबरलो आहे या विचाराने... पण तुम्हाला मदत करायचे ठरवले आहे मी.. " ,
"अरे आदित्य ... घाबरू नकोस...काही वाईट होणार  नाही. उलट, इथे सर्व अडकले आहेत ना.. ते सर्व आपापल्या घरी जातील.. तूही.. " त्यावर आदित्यला थोडा धीर आला. 
" वेळ दुपारची ठीक असेल आपल्यासाठी.. कारण तेव्हा सर्वच झोपलेले असतात... तुमच्या आणि माझ्या खोलीत आग लावायला सुरुवात करूया.. आणि या हॉटेलमध्ये पाहिलंत ना.. सर्व बांधकाम लाकडी आहे.... त्यात सगळीकडे मोठे मोठे पडदे आहेत.. आग झटक्यात पसरेल.. फक्त काळजी घ्या, आग लावताना.. मी दोन मशाली बनवल्या आहेत.. अशीच लाकडे जमवून.. त्यात मेण लावून ठेवलं आहे. म्हणजे खोलीच्या बाहेर आलो कि आग लावायला बरं पडेल. शिवाय.. आपल्या मजल्यावर.. ती शेवटची खिडकी आहे ना.. त्याच्या बाजूला एक लहानशी खोली आहे..अडगळीची.. तिथे सर्व जुनं सामान, हे रोजचे वृत्तपत्रे.. ठेवलेले असतात.. शिवाय ती खोली उघडीच असते... तिथूनच मशाली साठी लाकडं मिळाली.. त्यात जर आग लावली तर मग आग चांगलीच भडकेल. " आदित्यने एका दमात सर्व सांगितलं. 

" खूप छान !! किती तयारी केलीस तू.... मग ठरलं..आपण आजच हे करायचं सर्व.. ",
" चालेल ... नक्की करायचं.. ",
" पण साहेबरावला कळलं तर.. " अनुजाला प्रथमच भीती वाटली. 
" आता तुम्ही घाबरत आहात मॅडम.. घाबरू नका... त्याचीही तयारी केली आहे मी.. साहेबराव दुपारी बरोब्बर २ वाजता झोपायला जातात... त्याचवेळेस मी त्याची खोली बाहेरून बंद करिन..येणेंकरून ते बाहेर येणार नाहीत,.. ते येतील बाहेर तोपर्यंत आपण वरचा मजला पेटवला असेल.. " मग अनुजाला धीर वाढला. छान प्लॅन होता. दुपारची वेळ झाली. सगळ्यांची जेवणे वेळेवर म्हणजे १२.३० ला झाली. रोजचीच दुपार..रोजप्रमाणे जेवून झाल्यावर सगळे झोपायला आपापल्या खोलीत गेले. आदित्य , अनुजा फक्त जागे होते आपल्याला खोलीत... २.१५ वाजले तसे दोघे बाहेर आले. अनुने हळूच दरवाजा उघडून पाहिलं. बाहेरचा कानोसा घेतला , कोणीच नव्हतं बाहेर.. आदित्यने एक मशाल अनु कडे सोपवली. हळू हळू पावलं टाकत आदित्य , साहेबरावच्या खोलीबाहेर येऊन उभा राहिला. आजूबाजूला कोणी नाही बघून त्याने ती खोली बाहेर कडी लावून बंद केली. 

                        अनूजा आधीच तिच्या खोलीत जाऊन बसली होती. आदित्य आला तसं तिने एक मशाल पेटवली. त्यावर दुसरी मशाल पेटवून आदित्यला बोलली. " तुझ्या खोलीत सुरु कर .. मी माझ्या.. आणि एक एक मेणबत्ती पेटवून बाहेरच्या पडद्याखाली ठेवून देऊ.. जळतील ते स्वतःच.. शिवाय तुला त्या अडगळीच्या खोलीत आग लावायची आहे... आहे ना लक्षात.. ",
" हो " आदित्य ते ऐकून निघू लागला. अनुने थांबवलं. " आदित्य... घाबरू नकोस.. होईल सर्व ठीक.. ".
" हो नक्की... सगळ्यांना वाचवू... स्वतःच्या घरी जाऊ.. " म्हणत आदित्य धावतच त्याच्या खोलीत निघून गेला. 

                     अनुजाने तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला आतून.. एक दिर्घ श्वास घेतला तिने आणि "कामाला" सुरुवात केली. प्रथम पडद्यांना जळती मशाल टेकवली. त्यानंतर दुसरा पडदा.. किती मलमली स्पर्श त्या कापडाचा... भरभर जळू लागलं ते.. त्यानंतर तिने बेडवर मशाल टेकवली... इतके दिवस यावर आपण झोपत होतो.. आठवणी जाग्या झाल्या.. त्यात अनुने खिडकी उघडली. वाऱ्याने आगीचा जोर आणखी वाढला. लाकडी सामानाने आग पकडली. आता इथे थांबणे शक्य नाही म्हणत ती खोलीच्या बाहेर आली. आदित्यही त्याच वेळेस बाहेर आला. अनुजाने एक एक मेणबत्ती पेटवत बाहेरील मोठ्या पडद्याखाली ठेवायला सुरुवात केली. आदित्यने एक मेणबत्ती पेटवून त्या अडगळीच्या खोलीत टाकून दिली.. कागदांनी पट्कन आग पकडली. सगळं अगदी ठरल्याप्रमाणे झालं... अनुने तिचा काम चोख बजावलं.. बघता बघता वरचा सगळा मजला पेटू लागला. जशी आग आजूबाजूच्या खोलीत पसरू लागली तसे सर्व लोकं बाहेर येऊ लागले. 

                  किती मोठ्ठी आग लागली वरती.. सर्वच खाली पळू लागले.. साहेबरावची खोली अजूनही बंदच होती. अनुने आदित्यला खूण करून " खाली जाऊया " असं सांगितलं. दोघे खाली पोहोचले.. कोणाचेच लक्ष नाही या दोघांकडे.. पळापळ नुसती.. त्याचा फायदा घेत दोघे हॉलच्या एकेका टोकाला गेले. आणि दोघांनीही लगेच आपलं काम सुरु केलं. त्यात ते दोघे हॉलमधील खिडक्याही उघडत होते.. बाहेर पावसासोबत वारा होताच.. खालीसुद्धा आग पसरू लागली. सर्वचजण आग विझवण्याचे प्रयन्त करत होते. पण व्यर्थ... अनुजाने मनगटाकडे लक्ष दिलं.. सापाची नक्षी... साप विळखा सोडून होता, पण गेला नव्हता.. एका खिडकीजवळच्या पडद्याजवळ आली. त्याबाजूलाच एक दरवाजा दिसला तिला.. हा तर कधीच दिसला नाही एवढ्या दिवसात.. तिने दरवाजा उघडून पाहिलं.. थोडी खालीच होती ती खोली. मिट्ट काळोख होता आत. तळघर असावे.. मग दरवाजा का उघडा ठेवला यांनी.. कदाचित कोणी गेलं असेल आत.. आग लागली तेव्हा राहून गेलं बंद करायचं... स्वतःशीच बोलत ती २-३ पायऱ्या उतरली. आत मध्ये दारुगोळा.. शस्त्रसाठा... खूप होतं आतमध्ये.. बापरे !!.. किती आहे हे... म्हणून इथे आगीचा वापर करत नाहीत तर... अनुजा पटकन बाहेर आली. अचानक विजेचा मोठा आवाज झाला. अनुने खिडकीतून बाहेर पाहिलं.. पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. आभाळसुद्धा अधिक काळे आणि भयावह दिसत होते. वाऱ्याने भयानक जोर पकडला होता. वादळ येणार बहुदा.. अनु विचार करत होती. आणि पुन्हा वीज चमकली.. डोळे दिपून गेले. किती लख्ख प्रकाश !! तसे तिने आत पाहिलं... वरची आग आता खाली येतं होती. आजूबाजूला सगळंच जळत होतं. आणि समोर साहेबराव... आदित्यला एक हाताने पकडून ठेवलं होतं आणि रागात अनुकडे पाहत होते.     

" दोघेही जिवंत राहत नाही तुम्ही आता.. " साहेबराव दात-ओठ खात होता. " दरवाजा तर आधीच बंद केला आहे.. बघतोच कोण कसं बाहेर जाते ते.. " आदित्यला त्याने मानेकडून पकडलं होतं. या साहेबरावला कळलं बहुदा.. आम्ही आग लावली ते.. अनुने हातातली जळती मशाल बाजूलाच असलेल्या पडद्यावर फेकून दिली. 

" सोडा त्याला.. त्याने काहीच केलं नाही... मी जबाबदार आहे या सर्वाला.. " अनुजा बोलली. 
" तुम्हा दोघांना आता याच आगीत ढकलून देणार मी ...आणि तुमच्या सोबत बाकीचे सुद्धा जळू दे जिवंत... " असं साहेबराव बोलतो न बोलतो,  तोच  वरच्या मजल्याचा काही भाग त्या दोघांच्या अंगावर पडला. " आदित्य !! " अनूजा जोराने ओरडली. आणि धावत त्या दोघांजवळ पोहोचली. दोघेही वाचलेले.. तरी साहेबराव बेशुद्ध... आणि आदित्य जखमेने कण्हत होता. " चल आदित्य.. चल... निघूया बाहेर... " अनुने आदित्यला त्याचा पायावर उभं केलं. 

               बाकी सर्व आग विझवण्याचा प्रयन्त करत होते. आग भयंकर पसरली होती. आग विझवणं शक्य नव्हतं. अनुजा ,आदित्य दरवाजासमोर आले. आगीने विराट रूप धारण केलं होतं. वरचा मजला काही वेळाने कोसळणार , खाली हॉलसुद्धा पेटत होता.. एक विचित्र होतं यात.. बाहेर जाण्याचा कोणीच प्रयन्त करत नव्हतं. साधा बंद दरवाजा उघडण्याची तसदी कोणी घेतली नव्हती. आदित्यने जोर लावून दरवाजा उघडला. बाहेर तुफान वारा , पाऊस... दरवाजा उघडता क्षणी, त्या वाऱ्याने आग आणखी भडकली. आता जास्त वेळ राहणार नाही हॉटेल, हे दोघांना कळून चुकलं. भर पावसात दोघेही त्या लोखंडी गेट कडे धावू लागले. आतमध्ये होते तेव्हा ती सापाची नक्षी अस्पष्ठ होती. जसे आगीपासून दूर आले, तर ती पहिल्यासारखी होऊ लागली. मुख्य लोखंडी गेट जवळ जसे येऊ लागले... तसा दोघांचा श्वास कोंडू लागला.. एवढी मेहनत करून देखील हे असं कसं.. दोघेही आश्यर्यचकित झाले. एका जागी थांबले श्वास ठीक होईपर्यत... पुढे जाणे शक्यच नव्हते. काय करावे आता... विचार करत असताना.. मागून मोठयाने आवाज आला.. " मी जिवंत असेपर्यंत कोणी बाहेर जाऊ शकत नाही.. " 

                  साहेबराव !! हॉटेलच्या दरवाजापाशी उभा होता.. डोक्यातून रक्त वाहत होतं त्याच्या.. मागे हॉटेल जळत होतं... भयानक द्रुश्य... खरंच का .. आपली सुटका होणार नाही या पासून... अनुच्या मनात आलं. आदित्यकडे पाहिलं तिने. आदित्यने एकदा अनुकडे आणि नंतर साहेबराव कडे नजर टाकली. " भेटू पुन्हा...कधीतरी " आदित्य हसला आणि साहेबरावच्या दिशेने धावत सुटला. " आदित्य !! थांब !! " अनूजा ओरडली. पण त्याआधीच तो पुढे निघून गेला होता. हॉटेलमध्ये तेव्हाच एक लहानसा स्फोट झाला.. अनुच्या लक्षात आलं. आग त्या दारुगोळ्यापर्यत पोहोचली. साहेबरावने मागे वळून पाहिले. आणि आदित्यने पूर्ण ताकदीनिशी , मागे बघत असलेल्या साहेबराव सहित आत उडी घेतली.. अगदी ५ ते १० सेकंद झाली असतील. अनूजा हॉटेलच्या दिशेने पळत होती. 

              आणि प्रचंड मोठा धमाका झाला... एवढा मोठ्ठा कि त्या धक्कयाने अनूजा मागे उडाली. त्यामागोमाग अनेक छोटे छोटे धमाके होतं राहिले. अनुजा उठून बसली. डोक्याला जखम झालेली... हॉटेल पूर्णपणे कोसळलं होतं. यात कोणीच वाचणार नाही, हे अनूला कळून चुकलं. आपल्यासाठी आदित्यने जीव दिला. काय केलं आपण... अनूजा पावसात रडू लागली. मनगटावर लक्ष गेलं. मनगटावरचा साप.....  निघून गेला. वारासुद्धा हळूहळू होतं कायमचा थांबला. जो इतका दिवस न थांबलेला पाऊस .. तोही कमी कमी होतं थांबला. काळवंडलेले आभाळ स्वच्छ झालं. काही जादू व्हावी असंच सगळं होतं होते. 

                उरलेलं हॉटेल आता मोठया-मोठयाने जळत होते. अनूजा उभी राहून पाहत होती. रडणं अजून सुरूच होतं. हळूच तिला पायाखाली जमीन हलल्याचा भास झाला... भासचं होता का... नाही... पडलेलं हॉटेल आता जमिनीखाली जातं होतं. त्यासोबत त्याच्या आजूबाजूची जमीन सुद्धा खाली जात होती. बागेत असलेले दगडी खांब.. झाडे... सगळी कोसळत होती. अनुला कळेना .. पुन्हा काय होते आहे हे... पायाखालची जमीनच पृथ्वीच्या पोटात जात होती. अनुजा ते बघून मागे पळू लागली. जेवढा जोर शिक्कल होता शरीरात , तेवढा जोर लावून अनु त्या लोखंडी गेटच्या दिशेने पळत होती. तो गेट तर कधीच जमीनदोस्त झाला होता. अनुचा श्वास कोंडला नाही यावेळेस.. एका क्षणात अनूजा , त्या बगीच्या सोबत खाली जाणार , त्याचवेळी अनूने एक मोठी उडी मारली... त्या सर्वा पासून दूर अशी.. आणि तशीच पडून राहिली जमिनीवर.. 

                 त्या लोखंडी गेटपर्यंतचीच जमीन खाली गेली होती. अनूजा तशीच पडून बघत होती.. हातापायाला लागलं होतं.. पुन्हा एकदा पावसाची रिमझिम सुरू झाली. अनूला काही आठवू लागलं. तिचं घर... तिची मैत्रीण.. सई.. सागर... सगळं हळूहळू आठवत होतं तिला. घरी जायला पाहिजे आता. अंगात त्राण नव्हते. डोक्यावर झालेल्या जखमेतून खूप रक्त गेलं होते. त्राण नव्हते अंगात, तरी कशी बशी उभी राहिली. घरी जाण्याची ओढ लागली होती तिला. एक -दोन पावलं चालली असेल. शुद्ध हरपली आणि जमिनीवर कोसळली. 

                 सुगंधी सुवासाने तिला जाग आली. वरून फुलांचा पाऊस होतं होता. वेगळंच काहीतरी होतं ना ते.. छानच वाटत होते तिथे.... आणखी एक सुवास अनुकडे झेपावला. डोळे बंद करून त्याचा आस्वाद घेऊ लागली. पुन्हा डोळे उघडले तर एका बंदिस्त खोलीत होती ती. कोणीतरी तिला जखडून ठेवलं होते.. समोरच्या भिंतीतून मोठ्या आकाराच्या मुंग्या तिच्या दिशेने येतं होत्या.. हे स्वप्नच असावे.. म्हणत पुन्हा तिने डोळे मिटले. डोळे उघडले तर पाऊस पडत होता. आदित्य साहेबरावच्या दिशेने धावत होता.. साहेबरावचे डोळे रागाने लाल झाले होते... अरे !! हे पुन्हा कस घडते आहे.. आपण तर यातून बाहेर आलो..तरी आदित्यला थांबवण्यासाठी अनूजा जोरात ओरडली... " आदित्य !! " 

आणि अनूजा बेडवर उठून बसली. आजूबाजूचे सर्व तिच्याभोवती गोळा झाले. काहीवेळ अनूला कळलंच नाही काय सुरु आहे ते.. जशी भानावर आली , तेव्हा कळलं ... आपण हॉस्पिटल मध्ये आहोत.. आजूबाजूला डॉक्टर, नर्स... उभ्या होत्या. ओळखीचं कोणीच नाही.. १-२ मिनिटात कोणीतरी बाहेरून तिच्याजवळ धावत आली. हीच ती मुलगी.. मला एकदा स्वप्नात दिसली होती ती.... सई !! सईच होती ती. अनूला हळूहळू आठवतं होतं. गर्दीत सागर सुद्धा होता. " अनू !! " सईने अनुजाला घट्ट मिठी मारली. आणि रडू लागली... तसे आणखी काही चेहऱ्याचे डोळे पाणावले. 
" अनू .. बोल काहीतरी.. बोल ना.. " एक बाईसुद्धा रडत होत्या.. 
" अनू !! ... बोल काही.. आई आहे तुझी मी... ओळखत नाही का मला.. हे तुझे बाबा.. आहे ना लक्षात आम्ही.. " अनूला काही आठवत नव्हतं. 
" एक मिनिट.. " डॉक्टर बोलले. " ती आताच शुध्दीवर आली आहे ना ती.. तिला लगेच काही आठवणार नाही.. थोडावेळ आराम करू दे.. कोणीतरी एकाने थांबा... तिच्याजवळ.. " ,
" मी थांबते.. " सई लगेच बोलली. तसे सगळे पांगले. 

" अनु .... किती miss केलं तुला... आता किती बरं वाटते आहे मला.. explain करू शकत नाही माझा आनंद.. " सई अजूनही रडत होती. अनूला जाणवलं काही. डोक्याला जखम झाली होती काल... अनूजा डोकं चाचपडू लागली. " हो.. तुझ्या कपाळावर जखम झालेली. पण आता बरी झाली आहे " सईने उत्तर दिलं. 
" लगेच कशी बरी होईल... काल तर झालेली होती जखम.. " अनूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. त्यावर सई , अनूकडे बघतच राहिली. डॉक्टर काही औषध घेऊन आले. गुंगीचे औषध होते त्यात.. अनू पुन्हा झोपी गेली. 

पुढचा दिवस, अनु सकाळीच उठून बसलेली. काही चेहरे पुन्हा तिला आठवू लागले होते. जवळचे चेहरे... आई-बाबा.. सई - सागर.. तिच्या बाकीच्या मैत्रीणी.. आणि हो.. आदित्य सुद्धा.. तो खरंच जिवंत असेल का.. थोडयावेळाने , तिचे आई-वडील.. मित्र - मैत्रिणी सर्व भेटून गेले. सई मात्र तिच्याजवळच थांबली. 
" काय गं.. तुला काल विचारलं मी काहीतरी... माझ्या डोक्यावर जखम झालेली... ती इतक्या जलद कशी भरली..  तेव्हा चेहरा कसा विचित्र झालेला तुझा " सर्व गेल्यावर अनुने सईला विचारलं. 
" बस आधी बेडवर.. सांगते.. " सई बोलली. 

" तुला वाटते तस काही नाही. " सई बोलली.
" काय वाटते तसं नाही.. जखम एका दिवसात कशी भरेल.. सांग ना.. ", अनुच्या मनात पुन्हा ते हॉटेलचे दिवस येऊन गेले.. 
" एका दिवसात नाही.. एका वर्षात... ", 
" काय बोलते आहेस तू ... ती जखम भरायला एक वर्ष लागलं.. काय वेडी-बिडी झालीस का तू.. " सई शांतपणे तिची चिडचिड ऐकत होती. 
" अनूजा ... तू एक वर्ष कोमात होतीस.. ",
" काय ? " अनूजा उडालीच. " कसं शक्य आहे.. ? " ,
" हो.. तुझं accident झालेलं... तू जॉब वरून घरी जाताना... तुझ्या कपाळावर ज्या जखमेच्या खुणा आहेत ना त्याच.. तुझ्या मेंदूला मार लागला होता. कुणीतरी तुला इथे आणून ऍडमिट केलं. operation झालं पण तू कोमात गेलीस. सांगायच झालं तर.. १ वर्ष १ महिना ... तू कोमात होतीस.. " सांगताना सुद्धा सईच्या डोळ्यात पाणी आलं. शेजारीच अनुचे रिपोर्ट होते. पट्कन घेऊन वाचू लागली.. एक वर्षांपूर्वीची तारीख.. आणि बरंच काही लिहिलं होतं. त्यात " patient कोमामध्ये आहे " हे सुद्धा लिहीलं होतं. धक्काच बसला तिला.. म्हणजे... ते हॉटेल.. न थांबणार पाऊस.. नंदा.. आदित्य.. साहेबराव... ती आग.. काय होतं... झुरर्कन डोळ्यासमोरून गेलं तिच्या. 

                   धक्काच होता तो. पुढचे २ दिवस तरी ती कोणाशी काही बोलली नाही. पण ते दिवस... हॉटेलमधले.. ते कसे खोटे.. खूप प्रश्न होते. डॉक्टर एकदा औषध देयाला आला तेव्हा अनुने विचारलं. 
" कोमामध्ये असताना patient त्याच्या दुनियेत असतो असं म्हणतात. नक्की कोणाला माहिती नाही... तरी कोमात जाण्याआधी तो जे अनुभवतो... त्यातच तो झोपते जगत असतो. असं मोठे डॉक्टर बोलतात. " डॉक्टरचे उत्तर.. अनुला काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या.तिला तिचे वाचनाचे वेड आठवले.  सईला विचारलं काही तिने. 
" मी शेवटचं कोणतं पुस्तक , कादंबरी वाचत होती. तुला सांगितलं होतं का काही... " ,
" का... परत वाचायचं आहे का.. ",
" हो.. इथे कंटाळा येतो खूप..." , 
" आणते उद्या..  तुझी ती भाड्याची रूम तशीच आहे अजून.. जशी तू एक वर्षांपूर्वी ठेवून गेली होतीस... उद्या आणते नक्की ते पुस्तक... " 

दुसऱ्या दिवशी, पहाटेच.. सईने ते पुस्तक तिच्यासमोर ठेवलं. 
" आता कसं वाटते तुला... आठवली ना माणसं सगळी."  सईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु अनु वेगळ्या जगात होती. 
" मी कोमात असताना, नक्की माझी हालचाल होयाची नाही का.. " अनुने प्रश्न केला.
" कशी होणार.. सांग.. तू निस्तेज झोपून होतीस... कधी कधी वाटायचं तू झोपली आहेस.. ती वाईट स्वप्न पाहते आहेस.. मी हॉस्टेल वर जशी जागी करायची ना तुला.. तशी इथे मग " अनू ...अनू ... " असं ओरडत बसायची.. तू जागी होण्यासाठी... तू जागी नाही झालीस कधी.. " समजलं अनुला... त्या हॉटेलवर असताना... आवाज, अस्पष्ठ आरोळ्या ऐकू यायच्या... " अनू !! " अश्या... म्हणजे सईचा आवाज ऐकायला यायचा मला... तो हॉटेलच्या बाहेर न थांबणारा पाऊस... शेवटी पावसातच अपघात झाला होता ना माझा... तेच डोक्यात राहिलं.. पण ते आदित्य , साहेबराव... ते काय प्रकरण होते... ते अद्याप कळलं नव्हतं अनूला. सईने आणलेलं पुस्तक बघितलं तिने... पुस्तकाचे नावं.. " सन १८९९ " अनुचे डोळे विस्फारले. मी तर याच कालावधी मध्ये होते... 
" नक्की हेच पुस्तक होतं का... मी शेवटचं वाचलेलं.. " अनुने प्रश्न केला. 
"हो गं... मीच दिलेलं पुस्तक तुला.. आपली आदल्या रात्री चर्चा सुद्धा झाली होती या पुस्तकावर... ",
" तू वाचलंस ना.. काय आहे स्टोरी.. " सई आवरून बसली. 

"१८९९ मधली गोष्ट आहे... एक मुलगी वाट चुकते आणि जंगलात हरवते.. शुद्धीवर येते तेव्हा एका हॉटेलमध्ये असते... हॉटेल छान असते पण मंतरलेले असते.. एक पिंजराच असतो तो जणूकाही.. एकदा आत आलं कि बाहेर पडू शकत नाही. साहेबराव ते हॉटेल चालवत असतात.. ती मुलगी बाहेर जायचा खूप करते.. पण काही होतं नाही.. मग आदित्य नावाचा मुलगा तिला तिथेच भेटतो.. त्याच्या मदतीने हॉटेलला आग लावते ती.. आदित्य साहेबरावला मारतो... आणि ती मुलगी पुन्हा free होते... छान आहे स्टोरी.. " सईने एका दमात सांगितले. 


म्हणजे आदल्या रात्री आपण जे वाचत होतो.. त्याच जगात मी जगत होते.. काल्पनिक सगळं.... साहेबराव.. नंदा.. ते हॉटेल आणि आदित्यही.. काल्पनिक... " तुझा सगळं पुस्तक तेव्हा वाचून झालं होतं... त्या मुलीचं नाव आहे काहीतरी.. त्यावरच आपण कॉल करून बोलत होतो... काय नाव होते तिच..." सई विचार करू लागली. अनुला राहवलं नाही. तिने पुस्तकचे शेवटचे पान उघडले. जे तिने अनुभवलं होते, तसेच त्या पुस्तकात लिहिलं होतं. सगळेच खोटं होतं ते... आणि एका क्षणी, अनुजा पुस्तक वाचायची थांबली. " भेटलं का नाव तुला त्या हिरोईनचे... " अनुने पुस्तक तिच्यासमोर धरलं. त्या पुस्तकातील ... काल्पनिक कथेतील मुख्य स्त्री पात्राचे नावं होते......  " अनूजा !! "  

--------------------------------------------- The End -------------------------------------------


Wednesday, 28 February 2018

" अनूजा ... !! (भाग पहिला ) "



           आळसावलेली सकाळ... त्यात गुलाबी थंडी... मऊ मऊ गादी, जाड मोठ्ठी चादर.. कशाला कोण जागे होईल मग. परंतु घडयाळाच्या काटा सांगत होता. " वेळ झाली जागे होण्याची " .. थोड्याश्या नाखुशीने अनुजा त्या " स्वर्गीय आनंदातून " बाहेर आली. खिडकी जवळ आली तर समोर पांढरी शुभ्र बर्फाची चादर .. खिडकी उघडली असता, थंड वारा शिरला आत... जणू काही आत शिरायची वाटच बघत होता तो खोडकर वारा... अनुजाचे अंग थंडीने शहारलं. रोमांचित झाली अगदी. बघता बघता "बर्फवृष्टी" सुद्धा सुरु झाली. किती छान !! वातावरण आणखीच थंड झालं. अनुजाने बर्फ झेलायला खिडकी बाहेर हात काढला... त्याच वेळेस मागून तिला कोणीतरी मोठयाने हाक मारली.. " अनू !! " 

            त्या मोठ्या हाकेने अनुजा खाड्कन जागी झाली. क्षणभरासाठी काहीच कळलं नाही तिला. आजूबाजूला बघू लागली. पडकी-तुटकी लाकडाची झोपडी.. बाहेर तुफान वारा, पावसाचा आवाज. तुटक्या छप्परातून खूप ठिकाणातून "पाऊस" डोकावत होता. त्या तुटक्या पलंगावरून अनुजा दरवाजाकडे आली. क्षणभरासाठी पूर्ण झोपडी हलते -डुलते आहे असा भास झाला तिला. दरवाजा उघडताच समोर विशाल , अथांग समुद्र.. खवळलेला समुद्र... मुसळधार पाऊस.. पावसाचे मोठे मोठे थेंब, टाचण्यासारखे टोचत होते शरीराला. झोपडीत नसून आपण एका नावेवर आहोत , हे अनुजाच्या ध्यानात आलं. समोर वादळ.. नावं (बोट ) किती वेळ त्यात तग धरून राहिलं ते ठाऊक नाही. लाटांवर लाटा आदळत होत्या. नावं तर नुसते हेलकावे खात होती. आता काही खरं नाही आपलं, अनुजाला कळून चुकलं.. देवाची प्रार्थना करण्याशिवाय पर्याय नाही आता. म्हणून ती गुढग्यावर बसली. आणि देवाचा धावा करू लागली. समोरून एक राक्षसरुपी मोठ्ठी लाट येताना दिसली तिला. तशीच उभी राहिली. काहीतरी करावेच लागेल, असा विचार मनात येईपर्यंत लाटेने तिला त्या नावेसकट गिळून टाकलं... कशीतरी अनुजा पाण्यातून स्वतःच डोकं बाहेर ठेवण्याचा प्रयन्त करत होती. एक लाडकी फळी हाताला लागली. त्याचा आधार घेत ती पोहत होती. समुद्र काहीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याला आज अनुजाला पोटात घेयाचेच होते. इतक्यात "अनू !! " एक जोरदार हाक तिला ऐकू आली तिला.. लगेच तिने मागे वळून बघितलं. 

                पुन्हा एकदा अनुजाला जाग आली. एका तंबूत झोपली होती ती.समुद्र कुठे गेला.. काय चाललंय नक्की.. म्हणत ती तंबूतून बाहेर आली. एका डोंगरमाथ्यावर उभी होती अनुजा. समोर उगवता सूर्य.. किती छान द्रुश ते !! एवढ्या उंचावर उभी होती कि, पायाखालून ढगांच्या रांगा लागल्या होत्या. जणूकाही शाळाच भरते आहे त्यांची.. अनुजाला गंमत वाटली. पक्षांची सुद्धा पहाट झालेली. थवेच्या थवे निघाले होते. डोंगर -दऱ्या, झाडे-झुडुपे... सर्व काही जागं होतं होते. हे सर्व अनुजा इतक्या उंचावरून पाहत होती. ढगांना हात लावायचा मोह तिला आवरता आला नाही. खाली वाकून ती एका ढगाला स्पर्श करणार तर पुन्हा " अनू !! " अशी हाक ऐकू आली. 

                 जागी झाली अनूजा. यावेळेस चादरीत होती. डोळे किलकिले करून बघू लागली. कुठे आहोत आपण. एक मोठी खोली. त्यात अस्ताव्यस्त पडलेलं सामान. "अगं अनू !! उठं गं बाई ... उठं.. अजून किती झोपणार आहेस ... उठं लवकर नाहीतर पाणी मिळणार नाही आंघोळीला... " अनूजा झोपूनच आवाजाच्या दिशेने पाहू लागली. एक तिच्याच वयाची मुलगी... सामान आवरत होती. अनूजा बेडवर उठून बसली. " झालं .. हि आणि हिची स्वप्न.. " ती मुलगी अनूजा जवळ आली. " अनूजा मॅडम... आपण आता हॉस्टेलवर आहात. तुम्ही बेडवर आहात. हि खरी परिस्तिथी आहे. " अनूजा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. " last year.. शेवटचा पेपर... result... !! " असं ती मुलगी अनूजा समोर ओरडत होती. "Result... !! " हे ऐकून अचानक अनूजा भानावर आली. स्वप्न बघत होतो परत. तीच ती विचित्र स्वप्न. आता खऱ्या अर्थाने अनूजा वर्तमान काळात जागी झाली. 

              " थँक्स सई !! जागं केलंस .. खूप खूप थँक्स... " अनूजाने सईला मिठी मारली. " ते जाऊ दे... पहिली अंघोळीला जा.. " अनूजा गेली अंघोळीला. अनूजा....शांत स्वभाव, फारच कमी बोलणारी.. पण एकदा ओळख झाली कि कितीही वेळ न दमता, न थांबता बोलणारी...अशी मुलगी. आवाज लहानपणापासून गोड अगदी.. गाणी गाण्याची आवड, मुळात स्वभावच गोड तिचा, त्यामुळे ते तिच्या आवाजातूनही दिसून यायचे. नृत्यातही निपुण. कितीतरी पुरस्कार मिळालेले तिला. मनापासून नृत्य केले तर त्याचे फळ मिळणार ना... वाचनाची आवड सुद्धा प्रचंड. अभ्यासू होतीच, पण बाकीचे , अवांतर वाचन त्याहून जास्त. पुस्तकी किडा म्हणा हवे असेल तर. भटकायला तर सांगूच नये कोणी तिला. मनात आलं तर कॉलेजला दांडी मारून ,स्वारी निघाली फिरायला. सोबतीला रूम-पार्टनर सई आणि सईचा बॉयफ्रेंड सागर.. जबरदस्ती दोघांना फिरायला घेऊन जायची. हे दोघे तिच्या खूप जवळ होते. सागर तर तिला शाळेपासून ओळखायचा. सईची ओळख नंतर कॉलेजमध्ये झाली , ती सुद्धा " सागरची गर्लफ्रेंड" म्हणून... पुढे शिक्षणासाठी तिघेही पुण्यात आले आणि सई अनूजाची रूम-पार्टनर झाली. सागरनेही तिथेच जवळपास एक रूम भाड्याने घेतली होती. १२ वी नंतर तिघेही त्यांच्या कुटुंबापासून दूर, पुण्यात आले होते. 

               अनूजाचा स्वभावच छान होता. त्यामुळे एक वेगळीच ओढ असायची तिच्याबद्दल लोकांना. म्हणूनच लहानपणीचे मित्र-मैत्रीण आताही तिच्या "contact" मध्ये होते. ज्या लोकांना भेटायची, त्यासोबत एक आपलेपणा होऊन जायचा तिला. अनूजाचा देवावर खूप विश्वास.. देव असतो सदैव आपल्यासोबत, असं तिचं म्हणणं. सई आणि सागरला तिच्यामुळे सवय लागलेली देवळात , चर्चमध्ये जायची. अशी हसरी अनूजा. "अनू " हे तिचे लाडाचे नाव.. आडनाव तर कधीच कळू दिलं तिने. कॉलेजच्या रजिस्टर वर सुद्धा " स्वतःच नावं, वडिलांचे नावं " इतकंच... विचारलं कि बोलायची, आडनाव लावलं कि लोकं लगेच धर्म ठरवतात. मग त्यावरून लोकांच्या नजारा बदलतात. वगैरे... वगैरे. देवळात जायची , तशी चर्च मध्ये जायची. तिथून तर तिला खास बोलवायचे... गाणी गाण्यासाठी... चर्चमध्ये "Prayer" साठी... एवढ्या छान आवाजात कोणाला आवडणार नाही ऐकायला प्रार्थना... अनूजा आवडीने करायची सर्व.   

               ३ वर्ष झाली या तिघांना पुण्यात येऊन. पण पुण्यात येऊन एक विचित्र सवय लागली होती अनूला, वाचनाची... ती सवय तर आधीपासून होती तिला, परंतू पुण्यात ग्रंथालये खूप सापडली तिला. त्यातून काहीतरी भयंकर , गूढ, शापित , भयकथा , कादंबरी वाचनाचे वेड लागले. सतत काहीतरी असंच वाचत बसलेली असायची. अभ्यास झाला कि तेच काम.. सईसुद्धा ओरडायची तिला, अनूजा कसली ऐकतेय तिचं. या सर्वांचा परिणाम , रात्री झोपेत तिला कसलीही , विचित्र स्वप्न पडायची. वेगळ्या जगात निघून जायची. अर्थात या सर्वांचा परिणाम तिने अभ्यासावर होऊ दिला नाही कधी. वर्गात पहिल्या ३ मध्ये तिचा नंबर असायचा. तरीसुद्धा हि सवय वाईट होती ना.. सईचे गेल्या २ वर्षांपासून सकाळचे हेच काम. अनूला जागं करायचे. मग तिच्या समोर सध्याची परिस्थिती मोठयाने बोलायची. कारण कधी कधी अनू जागी झाली तरी आता आपण कुठे आहोत हेच समजायचे नाही तिला. पूर्ण भानावर येईपर्यंत सई तिच्यासमोर ओरडत बसायची. मग एक एक "Link" लागली कि अनू वर्तमानात यायची. 

                आजही सकाळचा "कार्यक्रम" आटोपून दोघी तयार झाल्या. त्यांना आता बाहेर फिरायला जायचे होते...भटकायला नाही , तर एखादी रूम बघायला. शेवटच्या वर्षाचा निकाल लागला होता. नेहमी प्रमाणे अनूला छान टक्के मिळाले होते. कॉलेजमध्ये येणाऱ्या काही कंपनी मधून तिला जॉबची ऑफर सुद्धा मिळाल्या होत्या. प्रॉब्लेम होता तो राहत्या जागेचा. तीन वर्ष कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होत्या. कॉलेज संपलं. जागा खाली करावी लागले. त्यासाठी हे तिघे फिरत होते. सागर, सई पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी , कुटूंबासोबत राहणार होते व तिथेच जॉब वगैरे करणार होते. अनूजा मात्र इथेच राहून काहीतरी , स्वतंत्र करणार होती. तसं तिने घरी सांगून परवानगी मिळवली होती. 

अशातच दोन महिने गेले. कॉलेजने आणखी दहा दिवस मुदत वाढवून दिली अनूजाला .
" काय करायचं अनू ?" सईचा प्रश्न. " तू तुझ्या घरीच जा ना.. तिथेही मिळेल तुला चांगला जॉब. तसही इथे जागा मिळणार नाही.असं वाटते आहे. मग इथे थांबून काय फायदा. " सईने छान मुद्दा मांडला. 
" सई, मला जरा फील करू दे हे सगळं... एकट्याने राहायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. हे सगळं काय असते ते समजून घेऊ दे मला. ",
" पण... गेली ३ वर्ष तर स्वतंत्रच आहेस ना... " सागर सुद्धा होता तिथे. बोलून घेतला पट्कन त्याने. 
" हो, तरीसुद्धा ... मला actually पुणे आवडू लागलं आहे... so, मी इथेच जॉब करिन. घर काय मिळेल कुठेतरी राहायला. " अनूजा confidence ने बोलली. सागर, सई काही बोलू शकले नाही पुढे. त्यांना पुढच्या दिवशीच निघायचे होते. जास्त वाद न घालता , अनूजा साठी बाकी काही सामान वगैरे घेऊन दोघे आपापल्या घरी निघाले. 

               पुढचा दिवस, अनूला जाग लवकर आली. स्वप्न येऊन सुद्धा ,आपण स्वतः जागे झालो.. लवकर उठलो. याचाच जास्त आनंद झाला तिला. सकाळची कामे आटोपून , एकटीच "रूम" बघायला निघाली. दोन -तीन ठिकाणी जाऊन सुद्धा काही हाती आलं नाही. निराश होऊन हॉस्टेलवर आली. आणखी पुढच्या दोन दिवसात , अनूजाला ऑफिस जॉईन करायला सांगितलं होते. काय करणार मग. पहिलाच जॉब.. झाली रुजू. पहिल्याच दिवशी छान ओळख झाली खूप जणांशी. दुसरा दिवसही छान गेला. काम सुरु झालं अनुचे. अनूला फक्त चिंता होती ती जागेची. इतक्या दिवस फिरूनही, मनासारखी जागा कूठे मिळतच नव्हती. 

                तिसरा दिवस, अनू वेळेवर पोहोचली ऑफिसमध्ये. नवीन मैत्रिणी बरोबर चहा , कॉफी झाल्यावर आपल्या कामाला सुरुवात केली. जेवणाच्या वेळेला अनू भेटली सर्वाना. परंतु जरा तणावात होती. एकीने विचारलं तेव्हा अनू बोलली. " तीन दिवस राहिले आहेत फक्त माझ्याकडे. कॉलेजचे हॉस्टेल सोडावे लागेल. किती दिवस झाले, रूम शोधते आहे.. कोणी देतच नाही rent वर रूम ..म्हणून जरा tension आहे. ",
" इतकंच ना.. माझ्या माहितीची एक काकू आहेत.. त्या देतील जागा राहायला.. छान बाल्कनी सुद्धा आहे... फक्त आपल्या ऑफिसपासून दूर आहे खूप " ,
" चालेल.. निदान राहायला जागा तरी मिळेल.. " मैत्रिणीने पत्ता दिला.
तिने सांगितल्याप्रमाणे राहायला जागा मिळाली. भाडे कमी असले तरी जागा इतकी मोठी नव्हती. बाल्कनी मात्र होती. ऑफिसपासून अंतर खूप. बसनेच १.३० तास लागायचा. पर्याय नव्हता ना.. पहिला पगार झाला कि एक "scooty" बुक करू आणि E.M.I. ने पैसे भरू , असा विचार अनूजाने केला. 

              विचार केल्याप्रमाणे केलंही तिने. actually, scooty मुळे प्रवास अधिक सुखकर झाला होता. त्यात मनात आलं तर कुठेही भटकायची , वर scooty असल्याने कशासाठी थांबायची गरजच नव्हती आता. सांगायचं झालं तर अनूजा settle होतं होती. पहाटेच्या स्वप्नाचा त्रास सोडला तर बाकी सर्व छान सुरु होते. दोन महिने झाले. सकाळी ऑफिसमध्ये छान वेळ जायचा. संध्याकाळी उगाचच वेगळ्या रस्त्याने, scooty वर भटकत -भटकत घरी जायचे. रात्री जेवण करायचे. जमलं तर स्वतःच्या घरी कॉल करायचा आणि सगळी कामे आटोपली कि झोपून जायचे. शनिवार , रविवार सुट्टी असल्याने आणखी फिरायला भेटायचे.. कारण ३ वर्ष अभ्यास आणि कॉलेज शिवाय तितकंसं पुणे अनू फिरलीच नव्हती. तर यासाठी हा खटाटोप.

             अश्याच एका दिवशी, अनू घरी निघाली. यावेळेस तिने, ऑफिसच्या मागच्या बाजूचा रस्ता निवडला भटकण्यासाठी.पाच मिनिटं झाली असतील, सिग्नल लागल्याने एका ठिकाणी scooty थांबली. या रस्त्याने प्रथमच निघाली होती ती. तर आजूबाजूला बघणं सुरु झालं. पुढे एक रस्ता दिसला. काहीतरी वेगळं वाटलं म्हणून  scooty  तिथे वळवली. 
" ये पोरी !!! कुठे जातेस तिथे ... " ट्रॉफिक पोलिसाने हटकलं. 
" काही नाही काका. त्या वाटेने निघाली होती. ",
" कशाला... कोणी वावरत नाही तिथे... हा सरळ रस्ता दिला आहे ना.. तिथून जा कुठे जायचे तिथे... " पोलीस ओरडला तिला. जराश्या नाखुशीने अनूजाने scooty  पुढे घेतली. घरी आली तरी तेच विचार तिच्या डोक्यात. काय असेल त्या वाटेवर... का अडवलं मला. 

               दुसऱ्या दिवशीही तेच, पोलिसाने पुन्हा अडवलं.काहीच कळायला मार्ग नाही. का जाऊ देत नाहीत. नक्कीच काहीतरी असणार तिथे. पुन्हा एकदा तिथे यायला हवे , असा विचार करून पुढच्या दिवशी , ऑफिसच्या लंच टाईम ला तो चालत निघाली. त्या वाटेजवळ आली. जाऊ का पुढे असा विचार करत होतीच , कि मागून आवाज आला .
" काय पाहिजे मॅडम.. " मागे तोच ट्राफिक पोलीस. 
" काही नाही.. फक्त बघत होते. " म्हणत अनूजा निघाली. 
" तुम्ही त्याच मॅडम ना.. दोन दिवस सारखा प्रयन्त चालू होता.. या रस्त्याने जाण्याचा.. तुम्हीच ना त्या... ",
" हो.. मीच ती.. पण का अडवता मला... ",
" अहो मॅडम.. तो रस्ता वापरत नाही कोणी... इथून पुढे जंगलात जाते वाट... खूप वेळाने , दुसरा रहदारीचा रस्ता सुरु होतो.. ",
" मग कुणीच वापरत नाही का रस्ता ",
" पायी जाणारे सुद्धा वापरत नाहीत . पावसात तर झाडं पण पडतात त्या वाटेने.. ऐका माझं.. नका जाऊ... ",
"ठीक आहे.. " म्हणत अनू ऑफिस मध्ये परतली. 

                     नंतर मात्र तिने त्या रस्त्याचा विषय सोडून दिला. आणखी पुढे दोन गेले. छान सुरु होते अनूचं. मधेच दोन-तीन वेळेला स्वतःच्या घरी जाऊन , आई-वडिलांना भेटून आली होती. पगार वेळेवर बँकेत जमा होतं असल्याने , हातात पैसे येत होते. scooty चं हप्ते तिने फेडून टाकले. त्यात पावसाळा तोंडावर आलेला. अनूजाचा आवडता विषय. कॉलेजमध्ये असताना सई ,सागर बरोबर खूप फिरलेली पावसात. यावर्षी एकटीच होती ती पुण्यात. आता सागर ,सई फक्त भिजायला तर पुण्यात येणार नव्हते ना... एखादी सुट्टी काढून जाऊ एकत्र फिरायला, मनातच विचारांच्या इमारती बांधत होती अनू.  

                   पावसाळा सुरु झाला एकदाचा , त्यात पहिला पाऊस रविवारीच अवतरला... एखाद्या मित्रासारखा, surprise घेऊन.. अगदी सकाळीच... अनूजा जाऊन मनसोक्त भिजली... मन भरलं तशी आत येऊन फ्रेश झाली. बाहेर येऊन बघितलं तरी पाऊस सुरूच.. कॉफीचा वाफाळता कप आणि आवडीच्या लेखकाचे पुस्तक, त्यात आवडीची कथा उघडून अनूजा बाल्कनीत बसली होती. किती छान वातावरण ना.. !! रमायची अश्याच वातावरणात अनू . पावसाशिवाय आपण जगूच शकत नाही असं वाटायचं तिला. 

                तर आवडीचा ऋतू सुरु झाला, तसं पायाला भिंगरी लागली पुन्हा अनूच्या. ऑफिस सुटलं कि नुसतं भटकत राहायचं. असं सुरु असताना, एके दिवशी पुन्हा अनूजा ऑफिसच्या मागच्या रस्त्याने गेली, भर पावसात.. त्यात आज लवकर सोडलं होते ना ऑफिस. खूप पाऊस होता आज. त्या सिंगलवर गाडी थांबली अनूची. "त्या" रस्त्याकडे नजर गेली तिची. विजेचा लखलखाट, अगदी त्याचं वेळेस. सकाळची ११ ची वेळ, तरीसुद्धा खूप अंधारून आलेलं. त्यात विजांचे नृत्य चालू होते. अनूने निरखून पाहिलं. ट्राफिक पोलीस नव्हता जागेवर. आजूबाजूला कोणाचं लक्ष नाही बघून अनूने गाडी त्या वाटेकडे वळवली. जरासा उतारचं होता. त्यात पाण्याने निसरडा झालेला. अनू गाडी सावकाश चालवत होती. 

                 सुरुवातीचा रस्ता तरी चांगला म्हणावा, इतका पुढचा रस्ता खराब होता. त्यात त्या पोलिसाने सांगितलं ते खरं होतं. जंगल सुरु झालं. आपण उगाचंच आलो या रस्त्याने असं वाटू लागलं. मागे वळून जाऊया , असा विचार केलाच होता तिने, तर मागे एक मोठ्ठ झाड बरोबर रस्त्याच्या मधेच पडलं. आता पुढे जावेच लागणार. त्यात वेगाने वारे वाहत होते. आता तर डोक्यावर झाडांच्या लहान-सहान फांद्या पडू लागल्या होत्या. वाटेवरचे खड्डे आणि हेल्मेट वर पडणाऱ्या फांद्या चुकवत अनूजा वेगाने पुढे जात होती. त्याचवेळेस समोरून अधांतरी आलेली एक फांदी आणखीच खाली आली. ते टाळणे अनूजाला शक्य नव्हतं. जोरात धडकली. थेट डोक्याला लागलं. त्या धक्क्याने मागेच उडाली अनू. डोक्यावर हेल्मेट असून सुद्धा खूप लागलं अनूला. scooty पुढे जाऊन पडली. अनूच्या डोक्यातून रक्त वाहत होते. थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. 

                  डोळे उघडले तर बर्फाळ प्रदेशात, बर्फावर झोपली होती. उभी राहिली तर दूरवर नजर जाईल तिथे बर्फच बर्फ. कोणाला हाक देणार. पुढे जाऊन बघू , म्हणत पाय पुढे टाकला तर खाली कोसळली. पडली ती थेट फुलांच्या चादरीवर... किती वेगवेगळ्या प्रकारची फुले... असंख्य फुले... दुसरा काहीच नाही तिथे..सुगंध दरवळत होता सगळीकडे. कुठे बघू  नी कुठे नको असं झालं अनूला. एक लक्षात आलं तिच्या, या एवढ्या फुलात गुलाब नव्हता कुठेच. एक वेडी आशा असते ना मनात.. आणखी छान , उत्तम मिळावे.. अशी.. अनूला तसेच वाटले. इतकी फुले होती समोर तरी गुलाबच पाहिजे होता तिला. शोधू लागली. जरा पुढे आली तर थोड्याच अंतरावर एक गुलाब दिसला. एकच गुलाब होता समोर, त्या फुलांच्या गालिच्यावर उठून दिसत होता. अनूजा धावतच त्याच्याकडे पोहोचली. पट्कन गुलाब हातात घेतला. गुलाबाचे काटे टोचले. " आई गं !!! " अनूजा कळवळली. गुलाब हातातून पडला. बोटातून रक्त यायला लागले. अनूजाने बोट तोंडात पकडले, डोळे आपोआप मिटले. 

                     यावेळेस अनूजाचे डोळे उघडले ते विचित्र आवाजाने.. हळूच डोळे उघडले तिने. कुठे होती कळतंच नव्हतं. अंधार सगळीकडे... बहुदा गुहेत आहोत,असा अंदाज अनूजाने लावला. मघाशी इतकी फुले होती, कूठे गेली सर्व. त्यात त्या फुलांच्या सुगंधाची जागा, आता कसल्याश्या कुजकट वासाने घेतली होती. सगळीकडे बंदिस्त... समोरचा हात दिसत नाही इतका काळोख. अनूजा अंदाज लावत , चाचपडत जात होती पुढे. काहीश्या अंतरावर प्रकाश दिसला तिला. त्याच्या रोखाने पुढे निघाली. उजेडा समीप आली. गुहाच होती ती. वरच्या बाजूला असलेल्या , एका भगदाडातून सूर्याचा प्रकाश खाली पोहोचत होता. अनूजा वर बघू लागली. अचानक, समोरून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. समोरून, काळोखातून दबक्या पावलांनी कोणीतरी चालत येतं आहे हे अनूजाने ओळखलं. गुरगुरण्याचा आवाज आता अधिक जवळ आला. 
                  
                       काळोखातून एक मोठी आकृती हळूहळू समोर येतं होती. प्रथम पिवळसर, लाल डोळे दिसले. त्यानंतर नाक, भरदार आयाळ ,भव्य माथा , टवकारले कान आणि रक्ताने माखलेले दात....अनूजा त्या सिंहाकडे बघतच राहिली. काय देखणं रूपं त्याचे... त्याहीपेक्षा देखणं शरीर... प्रचंड ताकद असणार यात. अनूजाला बघूनच तो गुरगुरत होता. नुकताच शिकार करून आला असावा, पण आपण इथे कुठे आलो, विचार करू लागली अनूजा. आणि सिहांने मोठयाने डरकाळी फोडली. केवढा मोठ्ठा आवाज.. कान दडपून गेले अनुचे. शिवाय एवढा मोठ्या आवाजाने अनूजा खाली पडली. अनू सावरत होती स्वतःला, कि सिहांने पवित्रा घेतला. आणखी एक डरकाळी फोडली आणि अनू कडे धावला. मोठी उडी घेतं अनूकडे झेपावला. भीतीने अनूने डोळे मिटून घेतले आणि जिवाच्या आकांताने ओरडली. 

                        शांतता..... अनूने डोळे उघडले. बेडवर झोपलेली... आजूबाजूचा कानोसा घेऊ लागली. बेडजवळच खिडकी होती. बाहेर पाऊस पडत होता. उघड्या खिडकीतून , पावसाचे काही थेंब , वाऱ्यावर स्वार होऊन उगाचच आत येतं होते. त्याचं थेंबानी अनूला जागं केलं होते. अनूजा बेडवर उठून बसली. इतका वेळ स्वप्न सुरु होती तर... अनूजा आळस देत विचार करत होती. तरीही आजूबाजूला पाहिलं असता आपण वेगळ्याच ठिकाणी आहोत ते लक्षात आलं तिच्या. डोक्यावर मलमपट्टी केलेली. त्यातून कळा यायला लागल्या. आपण पडलो होतो, एका फांदीला आपटून , हे अनूला आठवलं. पण नक्की कूठे आहोत हे उमजत नव्हतं.  

                       ती खोली देखील मोठी होती. बेड ३ माणसांना पुरेल एवढा मोठा. खोलीच्या भिंतीवर, सुंदर नक्षीकाम केलेल्या तस्वीर, भरजरी पडदे... स्वच्छ गालिच्या.. पूर्ण खोली स्वच्छ होती. कूठे नाव ठेवायला जागाच नाही. इतकं सगळं नीटनेटके आणि छान... अनूजा बेडवरुन खाली आली. अंगावरचे कपडे सुद्धा तिचे नव्हते. माझे तर नक्की नाहीत हे कपडे ... कोणाचे आहेत... कोणी आणले मला इथे... त्याहीपेक्षा कुठे आहोत आपण...पुरता भुगा झाला डोक्याचा विचार करून.. त्या खोलीचा  दरवाजा उघडून अनू बाहेर आली. फक्त खोलीच मोठी नव्हती, ती इमारत एखादा महाल वाटावा इतकी मोठी होती. बहुदा हॉटेल असावं असा अंदाज लावला तिने. 

                        अनूजा आणखी पुढे आली. आणखीही खोल्या होत्या तिथे. स्वच्छता तर खरचं !! , अनूजा खुश झाली. प्रत्येक खोली बाहेर एक मोठी फुलदाणी. त्यात वेगवेगळ्या रंगाची, प्रकारची फुले.. छान सुगंध सगळीकडे. फक्त कोणी माणसं दिसत नव्हती. एवढं छान, मोठ्ठ हॉटेल आणि एकही माणूस नाही, कमाल आहे... अनूजा सगळं न्याहाळत पुढे जात होती. हॉटेलचं होतं ते. खाली बघितलं असता, छान गालिच्या होता जमिनीवर.. एक मोठ्ठ काचेचे झुंबर छताला लावलेले. खाली हॉलमध्ये काही खुर्च्या लावलेल्या, निवांत बसण्यासाठी. छान ना एकदम. पण अनुचं लक्ष तिच्या समोर असलेल्या खिडकीकडे गेलं. बाहेर अजूनही पाऊस होता. खिडकी मोठी होती, बंद होती. खिडकीच्या काचांवर , पावसाचे थेंब जोराने आदळत होते. त्याचा वेगळाच ध्वनी निर्माण होतं होता. आणखी एक, " अनू !! " असं एक अस्पष्ट आवाज तिला ऐकू येत होता. खिडकी उघडण्यासाठी अनू पुढे आली. खिडकी उघडणार , इतक्यात " शुभ प्रभात बाईसाहेब " असा मागून आवाज आला. दचकली अनूजा. मागे वळून पाहिलं तर एक मुलगी, साधारण २५ - २६ वर्षाची असावी, तिच्या मागे उभी होती. तिनेच आवाज दिला होता. 
" कश्या आहात तुम्ही.. " अनूजा तिच्याकडे जरा संशयाने बघत होती. 
" मी ठीक आहे.. जरा डोकं दुखते आहे पण आहे बरी मी ..  " अनूजाने उत्तर दिलं. 
" तुम्ही बाहेर का आलात... आराम करायचा ना... आणि त्या खिडकीजवळ काय करत आहात.. " ती मुलगी बोलली. 
" खिडकी उघडत होते. " 
" नका उघडू... पावसाचे पाणी आत येईल... चिखल होईल... मग साहेब ओरडतील आम्हाला... तुम्ही आत जा.. " 


अरे !! कोण आहे हि.. मला ओरडते कशी.. " आधी सांग. मी कुठे आहे.. हि जागा कोणती .. कोणी आणलं मला इथे ... ",
" बाईसाहेब... सगळं सांगते.. आधी आत चला तुम्ही. " काय चाललंय नक्की, काही कळत नव्हतं अनूला. ती मुलगी अनूला पुन्हा त्याच रूममध्ये घेऊन आली. 
" बसा. तुम्हाला वैद्यांनी आराम करायला सांगितला आहे.. " ती मुलगी बोलतच होती. 
" एक मिनिट... कोण आहेस तू ... आणि त्याआधी सांग.. कुठे आहे मी. ",
" मी नंदा.. इकडे साफसफाई करते... लोकांची सेवा करते. ",
" पण मी आहे कुठे नक्की.. ??" ,
" तुम्ही,  या आमच्या हॉटेलमध्ये आहात. दोन दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलात. डोक्याला जखम.. मग धावपळ करत तुम्हाला इथे आणलं. वैद्यांनी मलमपट्टी केली. ",
" म्हणजे दोन दिवस.... " ,
" हो...  दोन दिवस बेशुद्ध होता तुम्ही... " ,
"आणि माझी scooty.... helmet.... ते कुठे आहे.. " अनूजाच्या या प्रश्नावर नंदाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. 
" काय बोललात.. हेम... आणि दुसरं... सकू... काय असते ते... " ,
"common yaar.... scooty, helmet माहित नाही... कुठे ठेवलं आहे ते सांग.. ",
" बाईसाहेब.. खरंच माहित नाही तुम्ही काय बोलत आहात ते.. आणि तुम्ही इंग्लिश सुद्धा बोलता... इकडच्या नाही वाटते तुम्ही... ",
" इकडच्या म्हणजे... पुण्यातच आहे ना मी.. इकडे बाहेरच्या रस्त्यावर तर माझा accident झाला ना... बरोबर ना... ते आठवते मला.. ",
" हो, पुण्यातच आहात तुम्ही.. परंतु तुम्ही काय बोलता ते नाही कळत मला... ",
" पण कोणत्या हॉटेल मध्ये आहे.. त्या रस्त्यावर हॉटेल तर नव्हतंच... ",
" कसं शक्य आहे... गेली ३०-४० वर्ष हॉटेल इथेच आहे... " नंदा बोलली. काय बावळटासारखं बोलते आहे हि. 
" मॅनेजर कडे जाऊ चल... " पुन्हा प्रश्नचिन्ह... हिला इंग्लिश कळत नसावं. 
" अगं ... हे हॉटेल कोण चालवते... त्या साहेबांकडे घेऊन चल मला.. " ,
" हा.. तसं बोला ना.. चला जाऊया.. " म्हणत नंदा अनुजाला घेऊन एका दुसरा रूममध्ये गेली.   

                  ती रूमसुद्धा छानपैकी सजवली होती. खिडक्यांना किंमती पडदे लावलेले होते. भितींवर छान छान पेंटिंग, भिंतींना लागून मोठी कपाटे, त्यात पुस्तके भरलेली... समोर एक मोठठं टेबल आणि त्याबाजूला एका खुर्चीवर, एक गृहस्थ काहीतरी लिहीत बसले होते. डोक्यावर पगडी सारखं काहीतरी. मिश्या एवढ्या मोठ्या कि ओठ आहेत कि नाही तेही दिसत नव्हतं. पोशाख तर एखाद्या राजाच्या दरबारातील सेनापती सारखा... फक्त तलवार नव्हती इतकंच... असो, आपण ज्या कामासाठी आलो आहोत ते करू.. अनूजा मनात म्हणाली. 

"अहो साहेब !! या बाईसाहेबाना तुम्हाला भेटायचे होते. " नंदा साहेबांकडे पाहत बोलली. त्या माणसाने अनूजाकडे पाहिलं. 
" अरे व्वा !! तुम्हाला जाग आली.. खूप बरं वाटलं. बसा , बसा खुर्चीवर.. ",
" ते जाऊ दे.. आधी सांगा.. मी कुठे आहे... इथे कोणी आणलं मला... माझी scooty कुठे आहे... " ,
" या बाईसाहेब...तेच ते बोलत आहेत सारखं.. तो शब्द सुद्धा किती कठीण आहे बोलायला. शिवाय इंग्लिश सुद्धा बोलतात बाईसाहेब... ", नंदाने लगेच माहिती पुरवली. 
" हो का.. बरं.. मी सांगतो सगळं... दोन दिवसापूर्वी, आमच्या राखणदाराला जंगलाच्या बाजूने एक मोठी किंकाळी ऐकू आली. भर पावसात , तेही सगळंच्या वेळी.. असं कधीच ऐकलं नव्हतं त्याने.. धावत गेला तर तुम्ही निपचित पडलेल्या होता.. डोक्याला जखम... आजूबाजूला कोणी नाही... तसंच उचलून आणलं त्याने... हि नंदा... तीच सेवा करते आहे गेले दोन दिवस तुमची... ",
"हो.. ते आठवते .. मी पडली होती ते.. तिथेच माझी scooty होती.. ",
" पुन्हा तेच.. तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात.... कोणत्या प्रकारचा दागिना आहे का तो ... " अनूजाने कपाळावर हात मारला. जखम झालेली ना.. कळ सुद्धा गेली डोक्यात. 
" अरे... two wheeler... दुचाकी वाहन... " यावर ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. 
" तुमच्याकडे दुचाकी होती.. ?? " त्या साहेबांनी विचारलं ,
" का... कधी बघितली नाही का... ",
" ऐकलं आहे फक्त... भारतात कुठे आहे... चार चाकी आहेत, त्या सुद्धा त्या इंग्रजांकडे.. परदेशात आहेत असं म्हणतात दुचाकी.. तुम्ही परदेशातून आला आहात का ? " त्या साहेबांनी उलट अनूला प्रश्न केला. 
" काय चाललंय तुमचं.. माझा मोबाईल... पाठीला लावलेली बॅग.. ते तरी कूठे आहे.. " अनुचा पुढचा प्रश्न.. 
" बॅग तर नव्हती.. " नंदा बोलली. 

" हा...आता कसं पकडलं.. इंग्लिश समजतं नाही ना, बॅग तर इंग्लिश शब्द आहे.. मग आता कसं कळलं.. " अनूजा.. 
" बाईसाहेब, हे हॉटेल इंग्रजांनी बांधले. त्यांची ये-जा असते इथे.. म्हणून काही शब्द कळतात. हॉटेल, बॅग, रूम, कार... हे शब्द रोजचे आहेत... " अनूजा वेडी होणार होती आता. काही कळलं तिला.. 
" हा... आता समजलं मला... कोणीतरी मला फसवत आहे ना... बकरा करत आहे ना... कोण आहे... सई, सागर.. या बाहेर या.. बस झालं आता.. हरले मी..कॅमेरा कुठे आहे... आणि तुम्ही दोघे... किती छान acting करता... व्वा !! " अनू टाळ्या वाजवू लागली. ते दोघे पुन्हा आश्चर्यचकीत.. 
" नंदा, या बाईसाहेबाना घेऊन जा रूममध्ये... डोक्याला लागलं म्हणून परिणाम झाला असं वाटते.. " नंदा अनूला घेऊन जाऊ लागली. 

" ये सोड !! " अनूने नंदाचा हात झटकला. " मला माहित आहे.. तुम्हीच कुठेतरी माझं सामान, scooty विकून टाकली आहे.. पोलिसांकडे तक्रार करते.. बघते तुम्ही कसे वाचतात ते.. " अनूजा स्वतःच बाहेर आली. 
" तुम्ही नाही जाऊ शकत... थांबा बाईसाहेब.. थांबा... !! " नंदा तिच्या मागोमाग.. अनूजा धडाधड जिने उतरत खाली आली. मघाशी रिकाम्या असलेल्या खुर्च्या आता माणसांनी भरलेल्या होत्या. अनूजाकडे सगळेच बघत होते. अनूजा हॉटेलच्या दरवाजाकडे निघाली... धावतच.. अचानक समोरचं सगळं भोवती फिरायला लागलं. अनूजा जागच्या जागी थांबली. चक्कर आली होती तिला. तोल गेला... " बाईसाहेब !! " मागून नंदा जोरात ओरडली.   

                  पुढचं काही आठवलं नाही अनूला. तिला जाग आली तेव्हा त्याचं मोठ्या बेडवर झोपली होती. शेजारी खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत आत येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी तिला जाग आली. अनूजा बेडवर उठून बसली.. कालसुद्धा असंच तर झालेलं. कालपासून पाऊस थांबलाच नाही का, अनूजा खिडकीबाहेर पाहत मनात म्हणाली.पण जे अनुभवलं ते स्वप्न होतं कि खरंच तसं घडलं होतं.. कदाचित स्वप्न असावं, परंतु हि रूम तर तीच आहे, जिथे मी काल झोपले होते. इतक्यात नंदा आली.म्हणजे कालचे सगळं खरं होतं. " कश्या आहात तुम्ही.. आता बरं वाटते आहे ना... काल धावता धावता भोवळ आली तुम्हाला.. पोटात काही नाही ना तुमच्या... म्हणून ताकद नाही शरीरात... हा घ्या नाश्ता... " अनूला खरंच भूक लागली होती. नाश्ता खूप रुचकर होता, तरीही अनूच्या डोक्यात तेच विचार. 

                  नाश्ता करून , फ्रेश होऊन अनूजा हॉटेलमध्ये फेरफटका मारू लागली. भिंतीवर मोठी मोठी पेंटिंग्स होती. बहुदा हाताने काढली असावी. त्यात जास्त करून इंग्लिश सरदार, मान्यवर लोकांचे फोटो. फिरता फिरता अनूजा खाली आली. खाली साफसफाई सुरु होती. नोकराचे कपडे देखील राजेशाही. डोक्यावर पगडी वगैरे. त्यात नंदा सुद्धा होती. तिचे कपडे सुद्धा बघण्यासारखे.. काल पासून जास्त लक्ष दिलं नाही तिच्याकडे.. साडी परिधान केली होती तिने. त्या साडीवरचे नक्षीकाम बघण्यासारखे... सुरेख अगदी. आज खाली काही माणसे पण होती. चहा, कॉफी घेत असावेत. अनूजाकडे लक्ष न देता, आपापल्या पेल्यातील गोष्टी संपवत होते. टेबलावर काही newspaper ठेवले होते. बरेचशे इंग्लिश, एकच मराठी वृत्तपत्र दिसतं होतं. अनूजाने उचललं. 

"केसरी !! " अनूजाला धक्का बसला. " असा का वाटतो आहे हा पेपर... paper quality अशी का... खूप जुना असल्या सारखा वाटतो.. " अनूजा एकटीच बडबडत होती. 
" आजचाच आहे तो... " मागून एक तरुण बोलला. " तुम्ही त्या मानाने नवीन वाटता इथे... " तोच तरुण पुन्हा बोलला. 
" आजचा आहे हा पेपर.... मग यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लेख का लिहून आले आहेत.. हे फोटो वगैरे.. " अनूने पटकन वाचून घेतलं. 
" आजचाच आहे.. तारीख बघा... " अनूजाने तारीख बघितली. 

" १८ ऑगस्ट १८९९ ".... काय !!... हे काय अशी तारीख.. तिने बाजूला असलेले इंग्लिश पेपर बघितले. सगळीकडे एकच तारीख... आणखी धक्कादायक, अनूजाला चक्कर येते आहे असं वाटलं. परंतु सावरलं स्वतःला तिने . 

तो तरुण तिला पकडण्यासाठी पुढे आला. खुर्चीवर बसवलं त्याने अनूला. 
" नंदा !! पाणी घेऊन ये पट्कन... यांना चक्कर आली " नंदा धावतच गेली. 
" मी बरी आहे.... ठीक आहे.. " अनूजा आजूबाजूला पाहत म्हणाली. नंदा पाणी घेऊन आली. 
" बाईसाहेब !! औषध नाही घेतलं ना तुम्ही.. मी घेऊन येते... " नंदा पुन्हा धावत गेली. 
" तुम्हाला बरं नाही तर कशाला फिरता अश्या.. रूममध्ये आराम करायचा ना... पण झालंय काय नक्की... अशक्तपणा आला आहे का.. " त्या तरुणाने पुन्हा विचारलं. 
" अशक्तपणा नाही.. हि तारीख बघून चक्कर आली. ",
" का .. काय झालं.. ? " ,
"  १८ ऑगस्ट १८९९... सगळ्या पेपर्स मध्ये हीच date आहे... ",
" मग त्यात काय.. आजचीच तर तारीख आहे ना ..." ,
" हेच तर.. हे कसं possible आहे.. ? ",
" तुम्ही इंग्लिश छान बोलता.. परदेशातून आलात का... तरी भारतीय वाटतात.. ",
" अरे यार !! पुन्हा तेच.. इंग्लिश मध्ये बोलता वगैरे.. काय चाललंय.. पुण्यात कोणी इंग्लिश बोलत नाही का.. scooty माहित नाही.. असं वागतात कि काही माहीतच नाही... खूप झाला खोटारडेपणा, फसवणूक... वैताग आला आता.. मला आताच्या आता निघायचे आहे. " इतक्यात नंदा आली. 
" आधी ठीक व्हा तुम्ही.. " ,
" नको आहेत गोळ्या मला... " अनूने नंदाच्या हातातल्या गोळ्या फेकून दिल्या. 
" साहेबांच्या परवानगी शिवाय कोणीच बाहेर जाऊ शकत नाही. " नंदा बोलली. 
" मी आदित्य " तो तरुण बाहेर आला. " नंदा खरं बोलते आहे.. इथे जो एकदा येतो, तो पुन्हा बाहेर जाऊ शकत नाही.. ",
" काय सुरु आहे... " अनूला खूप राग आला. " सगळी फालतुगिरी सुरु आहे.. बाहेर जाऊ देत नाहीत... आणि ती तारीख... आजची तारीख कशी असू शकते. ",
" म्हणजे ? " आदित्य बोलला. 
" मी ऑफिस मधून निघाली होती. या वाटेने scooty वरून निघाली होती. एका फांदीला डोकं आदळलं आणि बेशुद्ध झाली. शुद्ध आली तेव्हा इथे होते.. मला चांगलं आठवते, तेव्हा तारीख होती... १० ऑगस्ट , २०१८... मग इथे , पेपर्स... १८९९ ची तारीख का दाखवत आहेत.. ?? " अनूजा रागात ओरडली. 
" कारण हीच तारीख आहे आजची.. " हॉटेलचे "साहेब " पायऱ्या उतरत बोलले. 

" तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे... तुम्हाला आरामाची गरज आहे.. तर गुपचूप तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा .. " जरा मोठ्या आवाजातच बोलले साहेबराव. 
" नाही जाणार.. आणि मला आता इथे थांबायचेही नाही... मी निघाले आत्ताच.. " अनूजा पुन्हा मोठ्या आवाजात बोलली. त्यावर साहेबराव मोठयाने हसले. 
" इथे पाहुणे येतात, ते त्यांच्या मनाने.. जातात ते माझ्या मनानी... ",
" हो का !! ... बघते आता कोण अडवते मला ते.. " म्हणत अनूजा धावत सुटली. 

              आजूबाजूला बसलेले सर्वच उभे राहिले. अनूजा धावत दरवाजापाशी आली. रखवालदाराने दरवाजा उघडला. बाहेर पाऊस.. तरी अनू धावत गेली बाहेर. समोर मोठ्ठा बगीच्या... त्यातून समोर असलेला मोठा लोखंडी गेट.. अनूने धावण्याचा वेग वाढवला. आता १०-१२ पावलात गेट जवळ पोहोचणार, तर एकाएकी अनूचा श्वास कोंडू लागला. तरी अनूजा थांबत नव्हती. हळूहळू चालत, श्वास घेण्याचा प्रयत्न करत गेटपाशी पोहोचत होती. दोन हाताचे अंतर राहिले असता... आता श्वास घेऊच शकत नाही.. असं वाटलं अनूला आणि अनू खाली कोसळली. पाऊस कोसळतच होता. अनूजा श्वास घेण्याचा प्रयन्त करत होती. आभाळाकडे डोळे लागलेले... विजा चमकत होत्या. आभाळ आणखी अंधारु लागलं होतं.... विजेच्या लखलखाटामुळे डोळे दिपून जात होते अनूचे. थोडयावेळाने "साहेब" बाजूला येऊन उभे राहिले. नंदा छत्री धरून उभी होती. विजांच्या प्रकाशात साहेबांचा चेहरा भयावह वाटत होता. " मी बोललो ना... इथून कोणी जाऊ शकत नाही.. " साहेब हसले. वर आभाळात विजा एकमेकांवर आदळत होत्या... पावसाचा जोर वाढत चालला होता... " कोणीच जाऊ शकत नाही... " साहेब पुन्हा हसले.  


--------------------------------------To be continued --------------------------------------

Followers