All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday, 7 January 2017

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग तिसरा )

                पुढचा stop म्हणजे आकाशने बघितलेलं गावं ... ते सुद्धा तसं लांबच होतं, पण आकाशच्या calculation नुसार संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. तसाच आकाशचा अंदाज होता. परंतु निसर्गाला ते मान्य नसावं बहुदा. तो लहान डोंगर उतरून ते खाली येतंच होते. तेवढयात ,कुठून कोणास ठाऊक, जोरदार वारा सुरु झाला,अगदी अचानक. सगळेच घाबरून गेले. आकाश सुद्धा बावरून गेला. थोडयावेळाने सावरलं स्वतःला त्याने. पण तो वारा काही कमी होतं नव्हता.त्यात पावसाने सुद्धा सुरुवात केली. अजूनच भांबावून गेले सगळॆ. काय करायचे ते सुचत नव्हते आकाशला. गावं तसं लांबच होतं ते. तिथे पोहोचणं तर गरजेचं होतं. शिवाय त्या वादळापासून सुद्धा या सगळ्यांना वाचवायला हवे. आकाशने वर आभाळात बघितले. ढगांची अजूनच गर्दी होत होती. पावसाचा वेग वाढतच चालला होता. 

             यावेळेस कोणतातरी आडोसा घ्यावा हेच आकाशच्या ध्यानात आलं. परंतू एवढा मुसळधार पाऊस होता कि डोळेही नीट उघडता येत नव्हते. पावसाचे थेंब नुसते टोचत होते चेहऱ्यावर. एका हाताने चेहरा झाकत आकाश आजूबाजूला बघू लागला. थोडया अंतरावर , एका खडकाच्या , पुढे आलेल्या भागाने ,त्याखाली एक आडोसा निर्माण झाला होता, नैसर्गिक छप्पर. त्यावेळेस तीच काय ती सुरक्षित जागा होती. आकाशने हाताने खूण करून सगळ्यांना तिथे जमायला सांगितले. प्रचंड वारा, वादळ होतंच... त्या नैसर्गिक छप्पराखाली ते जमा झाले. अजूनही ते भिजतच होते,फक्त कमी प्रमाणात. एव्हडंस चालले होते ते, त्यात वाऱ्याचा ,पावसाचा सामना करून दमून गेले सगळे. 

           "शी !! यार.... आताच तर अंघोळ केली होती ना... लगेचच भिजवलं पावसाने. " संजना उगाचच चिडत म्हणाली. "असंच पाहिजे एका मुलीला... " सुप्री हसत म्हणाली. एवढच काय ती मस्करी आणि तेवढच हसू.. बाकी सगळे कुडकुडत उभे होते. गारठलेले ना सगळे. आकाशचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तो वर आभाळात बघत होता. मोठ्ठ वादळ येणार बहुदा. बाजूला कोण आहे ते नीट दिसत नाही, एवढा पाऊस... त्या गावात कसं पोहोचणार... मागे गावात जाऊ शकत नाही... आणि पाऊस इतक्यात थांबेल असं पण वाटत नाही... आकाश विचार करत होता. पाऊस थांबला तरी इथे तंबू उभे करू शकत नाही. वरून डोंगरावरून काहीही खाली येऊ शकते. आकाशला काय करावं ते सुचत नव्हतं. थोड्यावेळाने एका मुलाने विचारलं,
" कधी निघायचं, काय करायचं... हे ठरवलं आहे का ?" आकाशने काही उत्तर दिलं नाही. 
" मला वाटते, आत्ताच पुढे जाणे, बरोबर नाही. इथेच कुठेतरी थांबावं लागेल. " थोडयावेळाने आकाशच उत्तर आलं. तसा अजून एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला. 
" हे जर असंच चालत राहिलं ना... तर घरी पोहोचणारच नाही आम्ही..."
आकाशने फक्त एकदाच पाहिलं त्याच्याकडे... जसं काही मीच यांना इथे पिकनिकला यायला सांगितले होते. 
" ठीक आहे... चला मग, सरळच जायचे आहे आपल्याला... सांभाळून पाय ठेवा.. पाय घसरेल... so be careful... " आणि त्या मुसळधार पावसात पुन्हा निघाले सगळे. सगळीकडेच पाणी वाहत होतं. निसरडं झालेलं सगळं. सगळेच पडत होते, धडपडत होते. खरचटलं खूप जणांना. पण सांगणार कुणाला. आकाशचं न ऐकण्याचा परिणाम होता तो. 

                खूप जणांच्या पायाला लागला होतं, हातातून रक्त येत होतं. त्यात पावसाचा जोर अजूनच वाढत चालला होता. तरीही ते सगळे पुढे चालत होते. तर समोर अजून एक संकट उभं... नदी.... नदीच्या पलीकडे ते गावं. in fact, नदीपासून खूप दूर होतं ते गावं, नदीचं पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं. आकाश नदी ओलांडण्यासाठी रस्ता शोधू लागला. नदी पासून हे सगळे खूप लांब उभे होते. तरीदेखील पाण्याच्या होणाऱ्या आवाजाने घाबरून गेले. " तुम्ही जरा वेळ इथेच थांबा... मी बघून येतो पुढचं.. " डाव्या बाजूला निघाला आकाश... थोडयाच अंतरावर पोहोचला आकाश.. जिथून पाणी खाली पडत होतं... एक लहानसा उभार होता तिथे... आकाश काळजीपूर्वक निरीक्षण करत होता. इतरवेळेस, पाऊस नसताना, तिथून प्रवास करणं अगदीच सोप्पं होतं. पलीकडल्या गावातली माणसं हाच रस्ता वापरात असतील नदी पार करण्यासाठी... पण पावसात तर ते निव्वळ अशक्य होतं. आकाश पुन्हा सगळ्यांजवळ आला. तिथून ती जागा दिसत होती. तिथे बोट दाखवत आकाश म्हणाला,
" तिथून जाणं खूप त्रासदायक होईल... शिवाय एवढं पाणी असताना तो रस्ता वापरणे धोकादायक आहे.. " आकाशचे ते बोलणं ऐकून सगळेच नाराज झाले. 
" हा,  पण पुढे एकदा पूल तरी असावा.. कारण नदी पार करण्यासाठी पूल असावा लागतो नदीवर.. तर आता सगळे उजव्या बाजूला चालत जाऊया.. पूल भेटला तर पलीकडे जाता येईल. " आकाश म्हणाला. पावसाचा जोर तसाच होता अजून. सोबत वारा. तो आधीच मुलगा परत म्हणाला. 
" पण तुम्हाला माहिती आहे का... इथून पूल किती अंतरावर आहे ते किंवा पूल तरी आहे का ते माहिती आहे का ......" आकाशने नकारार्थी मान हलवली. 
" मग इथूनच जाऊ ना... काय प्रॉब्लेम आहे... " शेवटी न राहवून आकाश बोलला. 
" प्रॉब्लेम असा आहे कि तिथून आता तरी नदी पार करणं अशक्य आहे.. पाण्याला वेग प्रचंड आहे... नीट उभं सुद्धा राहू शकत नाही त्या वेगात... ",
"आता एवढं आलो ना, तर तेवढं तरी पार करू शकतो आम्ही... चला लवकर... ",
" हे बघा घाई करू नका.... पाऊस कमी झाला कि जाऊच आपण... ऐका माझं.... प्लिज... ",
" किती दिवस ऐकतोच आहे ना तुमचं... ते काही नाही.... मला लवकर घरी पोहोचायचे आहे बस्स... कोणी येत असेल तर चला माझ्यासोबत .... मी निघालो. " अस म्हणत तो निघाला. त्याला जाताना बघून अजून दोन मुली त्याच्या मागून निघाल्या. 


             आकाश त्याच्याकडे फक्त बघत राहिला. ते पुढे गेले तसा आकाश बाकीच्यांकडे बघत म्हणाला,
"अजून कोणाला जायचे असेल तर जाऊ शकतात ..... आणि ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी चला... " म्हणत आकाश निघाला. बाकी सगळे विचारात पडले. नक्की कुठे जायचे.... आकाश पुढे जाऊन थांबला. मागे वळून बघितलं तर बाकी सगळे अजून तिथेच थांबलेले... त्यांना बघून आकाश पुन्हा थांबला, त्या सर्वांकडे बघत. अचानक त्याला लांबून कोणीतरी पळत येताना दिसलं. अरेच्या !! हि तर मघाशी गेलेल्या मुलींपैकी एक आहे...आकाशने ओळखलं तिला. तसा तोही तिच्याकडे धावत पोहोचला. प्रचंड घाबरलेली ती, रडत होती. " काय झालं.....  काय झालं..... आणि ते दोघे कुठे आहेत.. " संजनाने विचारलं. ती काहीच बोलत नव्हती. फक्त रडत होती आणि "त्या" दिशेला बोट दाखवत होती. आकाशने क्षणाचाही विलंब न करता , आपली पाठीवरील सॅक खाली टाकून दिली आणि त्या दिशेला पळत सुटला. 

                 काहीच वेळात तो पोहोचला ,तसं समोरच द्रुश्य बघून स्तिमित झाला. ते दोघे, नदीच्या प्रवाहात होते. नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या एका लाकडी ओंडक्याला कसेबसे धरून होते ते. आकाशला बघताच दोघेही ओरडू लागले... "वाचवा !! वाचवा !!! "... डोकंच चालत नव्हतं आकाशचं... कदाचित नदी पार करताना... पाय घसरून दोघेही पाण्यात पडले... एक मागे राहिली म्हणून वाचली. पाण्याचा वेग वाढत होता. काहीतरी करावं लागेलंच... पट्कन नदीच्या पात्रात शिरला. सावकाश.... सांभाळून... हळूहळू... नदीतल्या दगडांना पकडत... त्यालाही उभं राहता येत नव्हतं त्या प्रवाहात... कसाबसा तो पोहोचला, तरी ते थोडे लांबच होते. पुन्हा बाहेर आला. आजूबाजूला बघितलं त्याने. समोरच एक मोठी वेल होती. तीच जोर लावून तोडली त्याने. तसाच पुन्हा नदीत शिरला. तोपर्यंत बाकीचे तिथे आलेले. ते सुद्धा घाबरले... " त्या वेलीच टोक घट्ट पकडून ठेवा... " आकाशने ओरडून सांगितलं. चार-पाच मुलांनी वेल पकडून ठेवली. आकाश त्या दोघांजवळ पोहोचला आणि वेलीचं दुसरं टोक त्याने त्या मुलीजवळ फेकलं. "पकड लवकर.. " तसं त्या मुलीने वेल पकडली. " घट्ट पकड.. " म्हणत आकाशने तिला ओढून घेतलं. त्याच्याजवळ आली तसं तिची बॅग पकडून तिला तसंच खेचत बाहेर आणलं आकाशने.... तिला काठावर आणलेलं बघून बाकीच्या मुलींनी तिला नदीपासून लांब नेलं. 


                 परंतु तो ओंडका अजून त्या प्रवाहाचा वेग सहन करू शकला नाही. मधेच तुटला आणि त्या मुलासोबत वाहून जाऊ लागला. बिकट प्रसंग... आकाश ती वेल तिथेच टाकून धावत सुटला, नदीला समांतर असा.... त्याची नजर होती त्या मुलावर... तो मुलगा प्रवाहात तसाच खडकांना आपटत जात होता, मधेच पाण्याखाली जात होता, वर येत होता... आकाश पळतच होता, कसा बाहेर काढू याला... असा विचार चालूच असताना समोर नदीवर एक पूल दिसला... आकाशने पळण्याचा वेग वाढवला. तरीदेखील पूल लांबच होता. तोपर्यंत तो मुलगा वाहत वाहत पुलाजवळ पोहोचला देखील. आकाश आता पुलाजवळ पोहोचला होता. एका क्षणाला तो मुलगा पुलाखालून वाहत गेला. आकाशने ते पाहिलं आणि त्याने उडी मारली.... 

               पावसाचा वेग वाढला होता. वारा थोडा कमी झाला होता , तरी नदीला पूर आलेला होताच... पाणी वेगाने वाहत होते... वर आभाळात ढगांची अजूनच गर्दी होत होती. नदीचं पाणी आता पुलापर्यंत पोहोचत होतं. आणि पुलाच्या दुसऱ्या बाजूला , आकाशने त्या मुलाला एका हाताने पकडून ठेवलं होतं....  दुसऱ्या हाताने पुलाची लाकडी फळी पकडली होती. एक पाय पुलाच्या दोरीत अडकला होता तर दुसरा अधांतरी लटकत होता. आकाशने त्याला कसंबसं पकडून ठेवलं होतं आणि तोही त्या पुलाच्या दोरीत अडकला होता. बिकट अवस्था दोघांची... त्यावेळात बाकीचेही धावत पोहोचले. ते द्रुश्य बघून थरकाप उडाला सगळ्यांचा... तसेच ते पुढे गेले. आणि त्या दोघांनाही बाहेर काढले. तो मुलगा तर घाबरून बेशुद्ध झाला. आकाशहि खूप दमला होता. सगळ्यांनी मिळून दोघांना नदीपासून दूर नेले. पावसाचा वेग कमी झाला तरी रिपरिप चालूच होती... तात्पुरता एक आडोसा उभा केला आकाशने आणि त्या खाली जाऊन बसले सगळे. दमलेले, भिजलेले, काही जणांना खरचटलेलं.. त्यात हे दोघे बुडता-बुडता वाचलेले. आकाश त्यांच्यापासून जरा लांबच बसला होता. सगळ्यांकडे बघत विचार करत होता... इथून आतातरी शक्य नाही पलीकडे जाणे, यांना कधी पोहोचवणार त्या गावात... आकाश टेन्शनमध्ये होता. 

                 अर्ध्या-पाऊण तासाने पावसाने विश्रांती घेतली. तोपर्यंत आकाश तसाच विचार करत बसला होता. सुप्री दुरूनच बघत होती. काहीच हालचाल होत नाही म्हणून स्वतः आकाश जवळ गेली. 
" निघूया का पुढच्या प्रवासाला... म्हणजे आता पाऊस सुद्धा थांबला आहे म्हणून म्हटलं... " आकाश भानावर आला.
" ते दोघे तयार आहेत का पण... " आकाशने उलट प्रश्न केला. 
" त्यांना तयार करतो आम्ही... आपण निघूया... " सुप्रीने बाकी सगळ्यांना तयार केलं निघण्यासाठी. आकाशसुद्धा तयार झाला. फक्त प्रश्न होता कि जायचे कुठे . समोरचा रस्ता जवळपास बंद... पूल असून सुद्धा तिथे आता जाणे धोकादायक होते कारण नदीचं पाणी काठापासून खूप आत शिरलं होतं. आकाश पुन्हा काही आठवू लागला. नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेलं कि प्रवाहाचा वेग कमी असतो, शिवाय नदीचं पात्र सुद्धा रुंदीने कमी होत जाते, जे आकाशने कुठेतरी वाचलं होतं. तसा विचार करून त्याने सर्वांना कुठे जायचे ते सांगितले. तसंच पुढे जाऊन नदी पार करता आली तर तोही प्रयन्त करायचा ठरवलं. त्यांनी प्रवास सुरु केला. आकाशच्या मागून चालत होते... झालेल्या प्रकाराने घाबरलेले... थोडं पुढे गेल्यावर घनदाट झाडी दिसली, म्हणजे पुढे जंगल सुरु होते... घड्याळात बघितलं त्याने... दुपारचे १२ वाजत होते. एवढा वेळ कधी निघून गेला ते कळलंच नाही... त्यात आभाळ अजून काळवंडलेलेच होते. जंगलात एखादी जागा भेटली पाहिजे, जिथे तंबू उभे करता येतील. असं विचार करतच तो चालत होता. 

                     इतक्यात समोरून काही माणसं येताना दिसली. त्याच्या एकंदरीत पेहरावरून ते आदिवाशी असावेत असा अंदाज आकाशने बांधला. आकाशने सगळ्यांना थांबायला सांगितलं. चार माणसं आलेली. या सर्वाना त्यांनी दुरूनच बघितलं, हे एवढे सगळी माणसं कोण आहेत, कुठे निघाले आहेत हे बघण्यासाठी ते स्वतःहून आले होते. आकाशला प्रश्न पडला कि कोणत्या भाषेत बोलावं. त्यामुळे कोणीच बोलत नव्हतं. एकाने या सर्वांकडे एक नजर फिरवली. थकलेले, भिजलेले, काही थंडीने कुडकुडत होते. आकाश सगळ्यांत पुढे होता. त्यालाच विचारले, " कुठं निघालात तुमी... ? " हे मराठी पण बोलतात याचे आकाशला आश्चर्य वाटलं, पण बरं सुद्धा वाटलं. लगेच त्याने उत्तर दिलं. " शहराच्या दिशेने निघालो आहोत... त्यासाठी त्या पलीकडच्या गावात जात होतो... तर पाऊस सुरु झाला. भिजलो आम्ही सगळे... " पुन्हा त्याने या सगळ्या ग्रुपवर नजर टाकली. " तुमा समदयाना आदी आमच्या पाडयात नेतो... लई थंड लागली हाय त्या पोरींना... " आकाशला हे माहित होतं, सगळयांना थंडी वाजत असणार, त्यांच्या सोबत जायलाच पाहिजे नाहीतर कोणीतरी आजारी पडायचं. असं आकाशने सगळ्यांना सांगितलं,ते तर आधीच तयार होते.

                  आदिवासी पाडा तिथून जवळच होता. जास्त चालावं लागलं नाही त्यांना. तो ग्रुप पोहोचल्या पोहोचल्या त्यांच्याभोवती सगळ्यांनी गर्दी केली. हे सगळे दमलेले, थकलेल्या मुलांना त्यांनी लगेच मदत केली. आधी सर्वाना गरम-गरम पाणी दिलं अंघोळीसाठी... त्यानंतर पोट भरण्यासाठी खूप काही आणून दिलं. त्या दोंघाचे लगेच उपचार सुरु केले. गावात डॉक्टर कुठे मिळतात, त्यात हा आदिवासी पाडा.... इथे कोण असणार... त्यांच्याकडे जो वैद्य होता त्यानेच सगळ्यांची मलमपट्टी केली... आकाशच्या पायाला सूज आलेली. त्याचा पाय त्या लाकडी पुलात अडकला होता ना, त्याचा पाय त्या वैद्याने औषधी पाला लावून बांधून टाकला. " दोन दिवस तरी ते काढायचा नाही " असं बजावून वैद्य गेला. आकाशने खाऊन घेतलं. दमलेला खूप... लगेच झोपी गेला. 

                  आकाश जागा झाला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. तसाच उठायचा प्रयन्त केला तर लगेचच एक कळ त्याच्या सर्वांगात फिरली. पायातून प्रचंड वेदना येत होत्या. मग काय करणार, बसून राहिला. त्याला सकाळी जी माणसं भेटली होती, आकाशला जागा झालेलं पाहून तो आत , झोपडीत आला.  
" झाली का झोप पावनं... " आल्या आल्या त्याने विचारलं. 
" हो .. हो, पण पाय दुखतो आहे जरा... " आकाश पाय सावरत म्हणाला. 
" सूज आलेली न पायाला... व्हयलं बरा... दोन दिस मदे... आराम करा तुमी... " म्हणत तो जाऊ लागला.
" थांब जरा... मलाही बाहेर जायचे आहे... एखादी काठी देता का आधारासाठी... " आकाशने त्याला थांबवत म्हटलं. त्यावर तो हसला. 
" अवो... आराम करा जरा... लगीच कुठं निघाला... " ,
"तसं नाही, मला बसून रहायची सवय नाही म्हणून. शिवाय माझ्यासोबत आलेले, ते कुठे आहेत, ते सुद्धा बघावं लागेल ना.. " तशी त्याने आकाशला एक काठी दिली. आकाश काठी पकडून कसाबसा उभा राहिला आणि त्याच्या खांदयावर हात ठेवूनच झोपडीबाहेर आला. 

                 संद्याकाळचे पाच-सव्वा पाच वाजले असतील. सकाळी आलेल्या वादळाने सगळ्यांना झोडपलं होतं. या आदिवासी पाड्यात काही झोपड्यांची पडझड झाली होती. ते पुन्हा उभारण्याचे प्रयन्त चालू होते. काही बायका रात्रीच्या जेवणाच्या तयारीत गुंतल्या होत्या. आकाशच्या ग्रुप मधल्या काही मुली, सुप्री-संजना धरून... त्यांना मदत करत होत्या. मुलंसुद्धा काहीबाही मदत करत होते. हे बघून आकाशला बरं वाटलं. मदत करायला शिकवावं लागत नाही वा कोणाकडून शिकवलं हि जात नाही.. ते असं मनातून यावं लागते... तेच घडत होतं समोर. 
" कुठं निघालसा तुमी .... " त्याने विचारलं आकाशला.. आकाशच लक्ष त्याच्याकडे गेलं.
" हं.. हो... मला पाहिलं तुमचं नावं सांगा... आणि मला एक मोठा प्रश्न पडला आहे, तुम्ही एवढं चांगलं मराठी कसं बोलता, म्हणजे मी खूप आदिवासी पाड्यात जाऊन आलेलो आहे. त्यांची मराठी तोडकी-मोडकी असते, त्यांच्या वेगळ्याच भाषेत बोलतात... मग तुम्ही एवढं चांगलं मराठी... ",
"या बसा इकडं... " आकाशला त्याने एका दगडावर बसवलं. " माज नावं सखा... आमचा हा पाडा, लई वरीस झालीत... इकडचं हाय... ते समोर गावं हाय ना... तीत आमचं येन-जान आसत... आनखी, गावात शाला हाय ना... तीत जावून शिकतात इतली पोरं.. मग त्यांची भाषा तर यनारच ना साहेब... " त्याने उत्तर दिलं. " माजा आजा (आजोबा )आला व्हता इथं,तवा पासून इथं गावाजवळच समदयानी पाडा बांधायचा ठरवलं... तवापासून इथंच हायत सगळे... आता तुमी सांगा... कुठं निगाला व्हता... एवढ्या पाऊस-पाण्यात... " ,
"त्यांना सगळयांना शहरात जायचे आहे, त्यासाठी निघालो होतो.. ",
"म्हजे... तुमाला नाय जायचं का... ? " .
" तसं नाही, ते वाट हरवले होते, मागच्या गावातल्या लोकांनी सांगितलं कि या गावात, शहरात जाण्यासाठी वाहन मिळू शकेल... तर नदीला पूर आला... जाऊ शकलो नाही पलीकडे, त्यात तुमच्या वैद्याने दम दिला.. दोन दिवस काढू नका मलमपट्टी... " आकाश हसत म्हणाला.   

"बराबर हाय त्याच... वैद्य हायत ते... आनी तसा पन पावसात या नदीला पूर येतोच... शहरात जाणाऱ्या वाटा पन बंद होतात... वाहन कुटून मिलनार तुमाला... " सखा बोलला. 
"म्हणजे कोणताच वाहन जात नाही शहरात... " आकाश चिंतेत पडला. 
" व्हय... आनी त्या गावातली मानस पन गेली आसतील दुसरीकडं... पानी गेलं असलं ना गावात... " सखा आकाशकडे बघत म्हणाला. 
"खूप दिवस झाले आता, या सगळ्यांना शहरात सोडायचा वायदा केला आहे मी... आता कसं जमणार ते... " आकाश बोलला. 
" साहेब... घाबरू नका...उद्याचा दिस थांबा इथं... तुमचा पाय पन बरा व्हईल... मग मी दावतो वाट... ",
"म्हणजे ? " ,
" इतुन ... काही अंतरावर आजून एक गाव हाय.. तिथं मिलतील, गाड्या.... मी नेईल तुमाला... आता आराम करा... " असं बोलून सखा त्याच्या कामाला गेला. आकाश जरा रिलॅक्स होऊन आजूबाजूचं द्रुश्य बघू लागला. सगळेच कामात गुंतले होते. संजनाने त्याला तसं एकटं बसलेलं पाहिलं आणि त्याची विचारपूस करायला आली. 
"कसे आहात तुम्ही... मी बघितलं मघाशी तुम्हाला... तुम्ही झोपला होता ना... पायाला लागलं आहे का फार... ? " संजनाने पटापट विचारून टाकलं. 
" लागलं नाही.... सुजला आहे ना पाय म्हणून बांधून ठेवला आहे पाय... बाकी काही नाही... आणि मी एकदम ठीकठाक आहे... फक्त जरासं अंग दुखते आहे.. " संजना ऐकत होती. चुळबुळ करत तिथेच उभी होती. आकाशला समजलं ते. 
" काही बोलायचे आहे का तुम्हाला ... ?" ,
" तुम्ही... त्याला वाचवण्यासाठी उडी मारलीत ती... कशाला... त्याने तर तुमचं ऐकलं तरी होतं का.. " आकाश त्यावर हसला. 
" म्हणजे तो संकटात सापडला तरी मी ते मनात ठेवावं असं वाटतं का तुम्हाला ? " ,
" तसं नाही, पण केवढं ते पाणी वाहत होतं. मी पहिल्यांदा एवढं पाणी बघत होते. त्यात तुम्हाला पोहता येते म्हणून... नाहीतर तो तर वाहूनच गेला असता.. " संजना घाबरत म्हणाली. 
" मला पोहता येत नाही.. ", आकाश शांतपणे म्हणाला.
" काय?" संजना उडालीच. " मग... ते... कसं काय एवढं केलंत.... पाण्यात पडला असता तर ... कोणी बाहेर काढलं असतं .. म्हणजे तुम्ही पण safe नव्हता त्याला वाचवताना.. " ,
" पण मी तसं केलंचं नसतं तर तो आज वाचलाच नसता ना, मला फक्त त्याला वाचवायचं होतं आणि ते मी केलं, कारण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे ना, आपण प्रत्येक गोष्टीला घाबरत बसलो ना,  तर कोणतंच काम कधीच पूर्ण होणार नाही.... मलाही काही गोष्टीची भीती वाटते आणि ते स्वाभाविकच आहे, पण एका मर्यादेपर्यंत घाबरणे ठीक असते.... त्याला डोक्यावर बसवलं ना, तर ती भीती नेहमी, प्रत्येक कामात पुढे येते आणि माणूस limited होऊन जातो. स्वतःला मर्यादा घालून घेतो.... हा, हि एक चांगली गोष्ट आहे कि प्रत्येकाला आपली मर्यादा, limitations माहित असाव्यात..... आणि safe वगैरे म्हणालात ना... ते काही नसते. safe होण्यासाठी , आधी मनातली भीती काढून टाकावी लागते, ते तरी कोणाला शक्य नाही. " संजनाला मनोमन पटलं ते. 

बोलता बोलता अंधार होऊ लागला. " बाकी, ते दोघे आहेत ना बरे... " आकाश उभा राहत म्हणाला. 
" हो... चांगले ठणठणीत आहेत... फक्त तुम्ही चांगले व्हा... ',
"हो... उद्या जमलं तर निघू... " आकाश म्हणाला. 
" नको नको... तुम्ही चांगले व्हा... मग जाऊ... कोणाला घाई नाही आहे आता.. " संजना हसत म्हणाली. आकाशने संजनाला "बाय" केलं आणि त्याच्या झोपडीकडे निघाला. वाटेत सुप्री समोर. 
" काय मग... झाली का हिरोगिरी करून... ",
"म्हणजे ? ",
"पाय वगैरे तोडून घेतलात म्हणून विचारलं.. " सुप्री म्हणाली. त्यावर आकाशाला हसायला आलं. 
" सूज आली आहे फक्त.. ",
"हा .. मग कशाला करायचं हे सगळं... कोणाला इंप्रेस करायचा आहे का... ", 
" काही पण.... होईल बरा पाय, या एक दिवसात.. तुम्ही टेन्शन घेऊ नका... लवकर घेऊन जाईन शहरात तुम्हाला... आता मी विश्रांती घेतो. ",
"मस्करी केली ओ.... लवकर ठीक व्हा... नाहीतर उचलून घेऊन जायला लागेल तुम्हाला... आणि हो... एवढीच हौस असेल ना... पाय वगैरे तोडून घेण्याची तर आधी आम्हाला शहरात सोडून या, मग हवे तेवढे पाय तोडून घ्या.. " सुप्री हसत म्हणाली आणि निघून गेली. आलटून-पालटून सगळ्यांनी आकाशची चौकशी केली . रात्र सुद्धा मजेत गेली सर्वांची.      

            पुढचा दिवस, आकाशचा पाय आता दुखत नव्हता तरी देखील मलमपट्टी तशीच ठेवली होती. त्यामुळे आकाश आतातरी, स्वतःच्या पायावर उभा राहू शकत होता. जाग आली तसा तो झोपडी बाहेर आला. पाड्यातली बहुतेक मंडळी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी निघत होती. आकाशचा ग्रुप तेव्हढा एकत्र बसून गप्पा-गोष्टी करत होता. आकाशला बाहेर आलेलं बघून ,सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. आकाशला त्या दोघांनी "Sorry, thank you " बोलून झालेलं. 
" पण तुम्हाला घरी जायला अजून उशीर होणार... कारण माझा पाय बरा झाला नाही , तर हे सोडणार नाहीत. " आकाश बोलला. 
" हो सर... तुम्ही काही टेन्शन घेऊ नका... ज्याला घरी जायचे असेल ना त्याला आपण नदीत टाकून देऊ. " सुप्री म्हणाली. तसे सगळे हसू लागले. इतक्यात सखा आला.
" काय साहेब... झाली का झोप... आराम करायचा ना अजून... "सखा आकाशला म्हणाला. 
" नको रे आराम... एक काम करूया... तू जरा आम्हाला फिरवून आणतोस का... काही लोकांना "छान" बघायचं असते ना... या कोणाला माहित नाही जंगल कसं असते ते. " ,
" चाललं... पन सांबालून चला... पायाखाली साप असतात हा इथं.. " सखाने बजावून सांगितलं  

                  सखा सगळ्यांना घेऊन चालत होता. कितीतरी प्रकारची झाडं-झुडुप त्याने दाखवली असतील या सगळ्यांना. काही झाडं तर त्याने स्वतःच लावली होती , तो लहान असताना. त्या झाडांमधून गार वारा वाहत होता. विविध प्रकारचे पक्षी ओरडत होते. मधेच माकडांचा आवाज कानावर पडत होता. असेच पुढे पुढे जात होते. एका ठिकाणी ते येऊन थांबले. " बघा.. इथून कस दिसतं ते नदीचं रुपडं... " सखाने सगळ्यांना एका दिशेला बघायला सांगितले. अथांग पसरलेला निळा रंग. जसा काही समुद्रच.... एवढी मोठी नदी... थोडीशी मातकट रंगाची किनार होती त्या निळ्या रंगाला... दोन्ही काठांना प्रचंड हिरवाई.. ,झाडे-झुडुपांनी भरलेले काठ... त्यात पाऊस नसल्याने आभाळ मोकळंच होतं. त्याचंच प्रतिबिंब खाली पाण्यात पडलं होतं जणू. एखाद-दुसरा पाखरांचा थवा खाली झेपावत पाण्याला स्पर्श करून निघून जात होता. आकाशने पटपट दोन-तीन फोटो क्लिक करून घेतले. लगेच प्रश्न पडला त्याला.. 
" सखा... पण मी ऐकलं होतं कि नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला गेलो कि त्याची रुंदी कमी होत जाते. पण इकडे उलटं कसं.. जो प्रवाह आम्ही पार करत होतो... त्यापेक्षा याची रुंदी खूपच जास्त आहे . " ,
"कस असतं ना साहेब.... हा निसर्ग हाय... यात लय गोष्टी आपल्याला माहीतच नसतात... त्यातलीच हि समजा... " हे बोलणं चालू असताना , अगदी अचानक , पक्षांचा जो किलबिलाट चालू होता, तो बंद झाला. चिडीचूप सगळे. सगळयांना कळलं ते, सखाला पण. 
" हम्म... त्यांचा राजा येत असलं... " सखा वर बघत म्हणाला. 
" म्हणजे ? " एका मुलीने विचारलं. 
"गरुड... " असा बोलतो न बोलतो तोच समोरच्या झाडावर गरुड येऊन बसला. सखाचं बोलणं एकदम बरोबर होतं. 
" तुला कसं कळलं रे... ?" आकाशने कुतूहलाने विचारलं. 
"म्या इकडचं राहतो ना... जुन्या -जाणत्या लोकांनी शिकवलं हे.. हे पक्षी आपल्या राजाला खूप मान देतात... म्हणून तर.... तो आला कि सगळेच गप होतात... " सखा म्हणाला. पुढची २-३ मिनिटे तो झाडावर बसून होता. टेहळणी केली आणि आला तसा निघून गेला. केवढा तो रुबाबदार पक्षी.. डोळ्यात मावणार नाही असं त्याचं रूप.. तो गेला , तसे सगळे अजून पुढे आले. 

"तुला पावसाचं सुद्धा कळत असेल ना सखा... " आकाशने विचारलं. 
" जास्त नाय.. पन कलत थोडं थोडं.. " ,
"मग आता येईल का पाऊस... " एका मुलाने विचारलं. 
" ते तिथं ... वर जाऊन बघायला पाहिजे.. " सखाने एका ठिकाणी बोट दाखवत म्हटलं. त्या ठिकाणी एक मोठ्ठा दगड होता. 
" तिथून ना... सगलं रान दिसतं... नदी दिसते... आजूबाजूची गाव दिसतात... छान वाटत तिथं... " आकाशने ती जागा बघून ठेवली. थोडयावेळाने सगळे खाली आले. चालून चालून भूक लागली. दुपारची जेवणं वगैरे आटपली. सुप्री जेवून बाहेर आली, तर तीच लक्ष आकाशकडे गेलं. आकाश गळ्यात कॅमेरा अडकवून , लंगडत लंगडत कुठेतरी निघाला होता. 
" ओ.... मिस्टर A .. कुठे निघालात ? " सुप्री त्याच्याकडे धावत पोहोचली. 
" फोटोग्राफी.... अजून काय येते मला.. ",
"अहो... पण पाय दुखतो आहे ना... ",
"चालते सगळं... " म्हणत आकाश पुढे निघाला. सुप्री त्याला बघत होती चालताना. काय मनात आलं तिच्या, तीसुद्धा त्याच्या मागाहून चालू लागली. 


" अरे... तुम्ही कुठे निघालात.. " आकाश सुप्रीला बघून बोलला. 
" तुमच्या पायाला लागलं आहे तरी निघालात... अजून काही झालं तर आम्हाला घरी कोण सोडणार....म्हणून तुमचा पाठलाग करते आहे. ",
"हो का... चांगली गोष्ट आहे मग... करा पाठलाग.. " दोघेच वरच्या बाजूला निघाले होते. थोड्यावेळाने एका जागी येऊन पोहोचले. सुप्री लगेच म्हणाली, 
" अरे... सकाळी तर येऊन गेलो ना इथे ... परत कशाला आलात ? " आकाशने तिच्याकडे बघितलं... 
" तुम्ही कधी पाऊस बघितला आहे का.. " आकाशचा प्रश्न... 
" हा हा हा... nice joke .... खूप हसायला आलं... anyways.... हा प्रश्न होता कि joke.... " सुप्रीने उलटं विचारलं. 
"सांगा तर... पाऊस बघितला आहे का कधी... ? " ,
"अरे हा काय प्रश्न आहे.... एवढे दिवस तर भिजतो आहे ना आणि घरी असली कि पण भिजते मी... ",
"भिजणं आणि बघणं... यात खूप फरक आहे मॅडम.. " ,
" हो का... गणूने कमी दिली असली ना तरी थोडी अक्कल आहे माझ्याकडे... म्हणे फरक असतो... " सुप्री वेडावत म्हणाली. 
" चला मग... दाखवतो फरक... सखाने सांगितलं मगाशी... पाऊस येइल म्हणून... " आकाश, सखाने सकाळी दाखवलेल्या त्या मोठ्या दगडाकडे निघाला. मागोमाग सुप्री होतीच. 

                 ५ - १० मिनिटात ते पोहोचले त्या दगडावर. मोठ्ठा दगड होता तो. शिवाय वरही होता थोडा. सखाने सांगितल्याप्रमाणे , तिथून संपूर्ण जंगल दिसत होतं. नदी दिसत होती. " बसा खाली, पाऊस दिसेल आता... " दोघेही त्या दगडावर बसले. सुप्री आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत होती. आकाश फोटो काढण्यात गुंतला होता. १५-२० मिनिटे गेली असतील. " बघा...तुम्हाला पाऊस बघायचा होता ना.. समोर बघा.. " सुप्री मागे एक पक्षी आवाज करत होता, तिथे बघत होती. आकाश बोलला तसं तिने  समोर पाहिलं. समोर नदीचं विशाल पात्र होतं. समोरून काळे ढग येताना दिसत होते. वाराही वाहत होता... काहीतरी वेगळंच होतं होते तिथे... सुप्रीने निरखून पाहिलं. ते ढग पुढे येत येत पाऊस पाडत होते. मधेच एखादी विजेची शुभ्र लकेर चमकून जात होती, त्या काळ्या ढगात... मधेच ती वीज पाण्यावर पडून त्यात विरघळून जात होती. सुप्री हरखून गेली. एकाच वेळेस दोन ऋतू दिसत होते तिला. ते बसले होते तिथे ऊन पडलं होतं. आणि समोर नदीवर ,दूर काळ्या ढगांची गर्दी झाली होती, पाऊस पडत होता. एका बाजूला मोकळं आभाळ आणि दुसऱ्या बाजूला सुंदर पाऊस... काय सुरेख नजारा होता तो. आकाशने फोटो काढून घेतले. सुप्रीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आकाशने बघितले ते. काही बोलला नाही तो. 

 समोर पाऊस तसाच पडत होता. सुप्रीने डोळे पुसले. आकाशने रुमाल पुढे केला.
 " झालं का रडून... कशाला एवढं इमोशनल व्हायचं... " आकाशने विचारलं. 
" येते पाणी आपोआप.. " सुप्री सारवासारव करत म्हणाली. 
" तुम्ही असं मनात नका ठेवू काही..... मनात ठेवलं ना कि असं बाहेर येते कधी कधी... " सुप्री गप्प होती. डोळ्यात पुन्हा पाणी साठलेलं. आकाशने बघितलं. 
" चला... आता तुम्ही आजचा दिवस तरी बोलणार नाही कोणाशी... मी जातो खाली... तुम्ही या सावकाश, रडून झालं कि... " आकाश उभा राहिला.. 
" सॉरी... बसा खाली, मला काही share करायचे आहे तुमच्या बरोबर..... " आकाश पुन्हा खाली बसला. सुप्री शांत बसली होती. 
" सांगायचे नसेल तर राहू दे... " आकाश उभा राहत होता. 
" त्याचं नाव नाही सांगणार मी... पण होता कोण तरी माझ्या life मध्ये... माझ्या सारखाच होता.... जरासा वेडा, जरासा शहाणा... छान जमायचं आमचं, छान वाटायचं त्याच्यासोबत असताना... कॉलेज मधली ओळख. तेव्हा एकत्रच असायचो आम्ही..नंतर जॉबला लागलो तरी जवळपास रोज भेटायचो. तो माझी वाट बघत बसायचा. मग घरापर्यंत सोडायला यायचा. सकाळी ऑफिसला असले कि चॅटिंग करायचो. वीकएंडला तर फिरायला पण जायचो आम्ही. मस्त दिवस होते ते... ",
"मग आता नाही आहेत का ते दिवस.. ? " , आकाश.. 
" माहित नाही त्याला काय झालं अचानक... नकोशी झाली त्याला मी... बोलणं बंद केलं...  मला भेटायचं बंद केलं.....  चॅटिंग, कॉल.. सर्व बंद झालं अचानक... मी स्वतःहून मॅसेज केला तरच रिप्लाय करायचा... तोही थोडंच बोलायचं... कॉल केला तर बोलायचं कि जास्त बोलता येणार नाही... भेटणं तर बंदच झालं... खूप महिन्यांनी, गेल्या महिन्यात तो समोर आलेला... असाच अचानक समोर आला, माझ्या मैत्रिणी बरोबर बोलत होता, मला फक्त एकदाच "Hi " केलं, त्यानंतर एकदाही माझ्याकडे बघितलं नाही. काहीच न बोलता निघून गेला समोरून... माझं नक्की कुठे चुकलं ते अजून पर्यंत कळलं नाही मला... त्यालाही अशी निसर्गाची आवड आहे... आम्ही फिरायला जायचो ना ... समुद्रकिनारी, पावसात.... तेव्हा तो पण असे फोटो काढायचा... माझे पण फोटो काढायचा गुपचूप... म्हणून हे असं काही बघितलं कि त्याची आठवण येते मला...मला माहित आहे, त्याच्या life मध्ये मी आता कुठेच बसत नाही... यातून खूप प्रयन्त करून बाहेर आले मी... पण अशी आठवण आली कि येते डोळ्यातून पाणी... " हे बोलताना सुप्री डोळे पुसत होती. 

आकाशने ऐकून घेतलं. " हम्म ... तर हा प्रॉब्लेम आहे... भूतकाळ.... आता मी काही philosopher नाही, पण मला एवढं कळते कि एखाद नातं तुटलं कि काय वाटते मनाला... तो अचानक का निघून गेला किंवा तुमचं काही चुकलं... ते मला माहित नाही. तुम्हीच बोलला ना, कि त्याच्या life मध्ये मी कुठेच बसत नाही... मग तुम्ही तरी कशाला ते भूतकाळाचं ओझं मनावर घेऊन फिरता... भूतकाळाला कुरवाळत बसलं ना, कि तो पाळीव होतो... जसे पाळीव प्राणी असतात ना अगदी तसाच.... मग आपण जिथे जाऊ ना.. तिथे तो आपल्या मागून येतो... जीवन बघा किती सुंदर आहे.. " आकाश समोर बघत म्हणाला.. " अश्या सुंदर जीवनात कशाला असं काही मागे लागून घेयाचं... त्यापेक्षा, भूतकाळ अनुभवासाठी आठवावा.. भूतकाळात केलेल्या चुकांपासुन शिकायचं. भूतकाळाला बँकेच्या ATM सारखं बघावं... म्हणजे एखाद्या प्रसंगात अनुभवाची गरज भासल्यास, पाहिजे तेवढा अनुभव ATM card, swipe करून काढून घेयाचा... उरलेल्या अनुभवाचे व्याज बँकेत जमवून ठेवावं. ते नंतर उपयोगी पडतेच. काय .... समजलं ना ,सुप्री ma'am .... " आकाशने बोलणं संपवलं... सुप्री हसत हसत डोळे पुसत होती. छान समजावलं आकाशने तिला.

"मलाही फोटो काढायला शिकवाल का... माझ्या मनात आहे खूप फोटोग्राफी शिकायचं... " सुप्रीने विषय बदलला. 
"शिकवीन.. पहिलं शहरात जाऊ... मग शिकू खूप काही...आता चला खाली ,नाहीतर सगळे शोधत राहतील...  " आकाश उभा राहिला... 
" एक प्रॉमिस करा... हे कोणालाच सांगायचं नाही हा... संजनाला सुद्धा नाही... " सुप्री म्हणाली. 
" असं आहे तर... निदान तिला तरी सांगायचं ना.. after all, ती तुमची जवळची मैत्रिण आहे. " चालता चालता आकाश सुप्रीला म्हणाला. 
" माझ्यापेक्षा तिला सांगितलं असत तर जास्त छान झालं असतं .. ",
" सांगेन तिला... काय माहित, पण तुम्हाला सांगावस वाटलं... चालेल ना... मी share केलेलं तुमच्या सोबत... ",
"हो.. नक्की.. चला आता पटपट खाली जाऊ... " आणि दोघे खाली आले.
 सुप्री बऱ्यापैकी नॉर्मल झालेली. खाली आल्या बरोबर ती तिच्या मैत्रीणीबरोबर गप्पा मारायला गेली. आकाश त्याने काढलेले फोटो बघत बसला. छान छान फोटो होते सगळे...  अचानक एका फोटोवर त्याची नजर खिळली. सुप्रीचा फोटो होता तो. मघाशी पाऊस बघतानाच फोटो.. तिला कळू न देता त्याने क्लिक केलेला. किती छान हसते हि... स्वभाव सुद्धा छान आहे...  पण जरा भूतकाळात हरवली आहे. त्यातून बाहेर आली तर खूप छान होईल. आकाश किती वेळ तिचा फोटो बघत होता. Actually, त्याला सुप्रीचा स्वभाव आवडायला लागला होता. गेल्या महिन्यात, त्या ऑफिसच उदघाट्न होतं, तेव्हापासूनची ओळख फक्त... काही लोकं चटकन मनात घर करून राहतात. त्यातलीच एक सुप्री.... आकाशला तिच्या बरोबर बोलायला आवडायचं. फक्त तो कधी असा कोणाशी मोकळेपणाने बोलला नाही आधी कधी. 

                       इथे सुप्रीला सुद्धा आकाशची सोबत आवडायला लागली होती. बऱ्याच वेळा तीच आकाशची विचारपूस करायची. त्याच्या सारखं वागायला बघायची. त्याचं फिरण्याचं वेड, विचार करण्याची पद्द्त तिला आवडायची. फक्त तो कमी बोलायचा हे तिला खटकायचं... तरी गेल्या काही दिवसांपासून जी भटकंती सुरु होती, तेव्हा पासून खुप बदलली होती ती. आकाश छान समजावयाचा तिला. म्हणून आजकाल जास्तच आनंदी राहायला लागली होती. 

                        दुपार होऊन संध्याकाळ झाली. आकाशने request करून त्याच्या पायाची मलमपट्टी काढायला सांगितली. आता त्याचा पाय अगदी बरा झाला होता. सखाला विचारून त्याने पुढचा रस्ता देखील बनवला होता. उद्या सकाळी निघायचे म्हणून सगळ्यांची तयारी झाली होती. इथे दोन दिवस कसे गेले, कळलंच नाही. त्या पाड्यातील रहिवाश्यांना सुद्धा खूप मज्जा आली या शहरी पाहुण्यांबरोबर... आता उद्या सगळे जाणार म्हणून एक छोटी "पार्टी" त्यांनी आयोजित केली. छानपैकी जेवण केलं होतं. त्यानंतर मोठी शेकोटी रचून त्या भोवती त्याचे आदिवासी नृत्य करू लागले, त्यांची गाणी म्हणू लागले. त्यात या शहरी पाहुण्यांना सुद्धा सामील करून घेतलं. आकाश फोटो काढत होता.. पाय आताच बरा झाला म्हणून त्याला कोणी नृत्यासाठी आग्रह केला नाही. पाऊस नव्हता तरी थंड हवा वाहत होती. वर आभाळात चांदण्या चमकत होत्या. आणि खाली शेकोटी भोवती, छान फेर धरला होता सगळ्यांनी.. आकाश खूप आनंदात होता... मनोमन हसत होता. enjoy करत होता. सुप्री नाचत होती... आकाशला हसताना बघून तिला आनंद झाला. आकाश सुप्रीकडे हळूच बघत होता... किती उत्साहाने नृत्य करत होती... भूतकाळाच ओझं दूर फेकून दिल्यासारखी वाटत होती... सगळेच छान... रात्री उशिरापर्यत "पार्टी" चालू होती. नाचून नाचून दमलेले सगळे पटकन झोपून गेले. सकाळी लवकर निघायचे आहे, हे आकाशने आधीच सांगून ठेवलं होतं.

                 पुढचा दिवस, कोंबडयाच्या अरवण्याने तो आदिवासी पाडा जागा होत होता. प्रथम आकाश जागा झाला. त्याला एक वेगळीच झोपडी दिली होती झोपण्यासाठी... दोन दिवसांत पहिल्यांदा तो एवढ्या पहाटे जागा झाला होता. सकाळचे ७ वाजले असतील. अजूनही सूर्य देवाने दर्शन दिले नव्हते. आकाश झोपडी बाहेर आला. धुकं पसरलेलं होतं. अगदी वेगळंच द्रुश्य.... धुकं जमिनीलगतच राहिलं होतं. जणू काही हि झाडं, झोपड्या ढगांच्या वर तरंगत होती... काय एक-एक चमत्कार असतात ना निसर्गात... आकाशने पटकन कॅमेरा काढला आणि फोटो क्लीक केला. अजून पुढे गेला थोडा, एका झाडाच्या फांदीवर एक पक्ष्यांचं जोडपं एकमेकांना बिलगून बसलं होतं. कदाचित यांची पहाट अजून झालेली नाही. तो क्षणही त्याने कॅमेऱ्यात टिपला. येणाऱ्या वाऱ्यासोबत ते पायाखालचे धुकं हलायचं.. एक वेगळीच लहर उठायची तिथे, अगदी समुद्रात येणाऱ्या लाटांसारखी. आकाश त्या धूक्यातुन वाट काढत जात होता. आजूबाजूची मंडळी अजून गाढ झोपेत होती,कोंबडा आरवला तरी. थंड वातावरण होते ना तिथे.... आकाशच्या मनात काय आले कोणास ठाऊक... तो त्या दगडाच्या दिशेने निघाला. छान फोटोज मिळतील तिथून सकाळचे, असा विचार करत तो झपझप चालत निघाला. धुक्यातून वाट काढत आकाश तिथे पोहोचला, तर तिथे आधीच कोणीतरी बसलं होतं. दुरुनच बघितलं त्याने. निरखून बघितलं.. सुप्री !!! कमाल आहे... प्रत्येक वेळेस वेगळीच भासते हि... कुठेतरी एकटक बघत होती... चेहऱ्यावर कमालीचं समाधान होतं तिच्या ... त्यात तिच्या आजूबाजूनी धुकं वाहत होतं... वेगळीच वाटली आकाशला ती.... फोटोत साठवण्यासारखा क्षण... क्लीक केला त्याने. हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. 

" बसू का इथे... if you don't mind... " आकाशने विचारलं. 
" हो... हो, बसा ना... " सुप्री म्हणाली....
" एवढ्या सकाळी सकाळी... तेही एकट्याच... भीती नाही वाटत का... आणि डोळ्यात पाणी नाही आज... कि झालं रडून .... " आकाश सुप्रीकडे बघत म्हणाला. सुप्रीला हसायला आलं त्यावर.. 
" नाही... कशाला रडायचं... भूतकाळ पाळीव करू नये, असं कोणीतरी म्हणालं मला. पाळीव प्राणी तसे पण मला नको असतात मागे मागे " सुप्री छान बोलली. 
" हो का... पण एकट्या काय करत आहेत इथे.. ",
"अशीच आली... कोणी उठलं नव्हतं ना... मग हि जागा आठवली, बसली येऊन... छान वाटते ना इथे.. धुकं पसरलं आहे.. एवढया उंचावरून सगळं कसं छोटं छोटं वाटते ना... Like top of the world... " बोलता बोलता सुप्रीला शहारल्यासारखं झालं. 
" very nice thoughts.... पण मला एवढया उंचीवर आलं कि आपली खरी किंमत कळते. आपण केवढेसे आहोत , आपली जागा किती शुल्लक आहे या निसर्गात याची जाणीव होते. " आकाश म्हणाला. 
p" किती वेगळे विचार आहेत तुमचे... या जगातले वाटतच नाही तुम्ही... " दोघेही मनापासून हसले. पुढे १५-२० मिनिटे गप्पा चालू होत्या त्यांच्या. 

७.३० वाजले तसा आकाश बोलला. " निघायचे आहे ना आपल्याला... चला खाली जाऊ... सखा बोलला आहे ना, पुढल्या गावात वाहन मिळेल शहरात जाण्यासाठी...आजच भेटलं तर खूप बरं होईल... " ते ऐकून सुप्री हिरमुसली. 
" तुम्ही लक्षात तरी ठेवाल ना आम्हाला... कि विसरून जाणार आम्हाला... मिस्टर A ... " ,
"नाही विसणार ... आणि तुम्हाला तरी नाही विसणार कधी.... चला आता " दोघे निघाले.. 
" तुम्ही काढलेले फोटोज तरी दाखवा.. किती फोटो काढलेत ,एक पण नाही दाखवला.. " आकाशने कॅमेरा सुप्रीकडे दिला.. एक -एक फोटो एवढे छान होते... सुप्री हरखून गेली... काहीतरी वाटलं तिला... हि फोटोग्राफीची style तर एकाशी खूप जुळते.... आकाश... एकदा तिने त्याकडे बघितलं... पुन्हा फोटो बघू लागली. तिचाच फोटो समोर आला तिच्या. फोटोत तर कित्ती वेगळी दिसत होती ती. स्वतःचा फोटो बघून , स्वतःच्याच प्रेमात पडली ती.. एवढी छान दिसते मी.. 
" कधी क्लिक केलात.. समजलंच नाही मला ...",
" फोटो अजाणतेपणी काढले ना कि ते original expression मिळतात, असे फोटो नेहमी छान असतात... त्यात तुमचे फोटो छान येतात, माझी काहीच creativity नाही त्यात... so thank you.. " आकाश म्हणाला. 
" मी थँक्स बोललं पाहिजे... आज वेगळ्याच सुप्रीला बघितलं मी तुमच्यामुळे... थँक्स... " बोलता बोलता ते खाली आले. 
" तुमचं नावं कधीच कळणार नाही का मला... " सुप्री थांबत म्हणाली. 
" मिस्टर A.. ",
" खरं नावं... " ,
" सांगेन पण कोणाला सांगायचं नाही... ",
"प्रॉमिस !!! " तसं आकाशने त्याच्या कॅमेराच्या बॅगमधून एक कार्ड काढलं.. सुप्री समोर धरलं... 
" A फॉर आकाश... " आकाश हसत म्हणाला. आणि कॅमेराकडे बोट दाखवत निघून गेला... 

                 कार्डवर पण तेच नावं, तेच मॅगझीनच नांव.... सुप्रीला आनंदाचा मोठा धक्का बसला. तोंडावर हात ठेवून कसं express होयाचे तेच समजत नव्हतं तिला. एवढे दिवस ज्याला भेटायचा प्रयन्त करत होती, तोच आकाश त्यांच्यासाठी शहरात जाण्याची वाट शोधत होता. त्याने काढलेले फोटो बघून त्याची एक वेगळी प्रतिमा सुप्रीने मनात बनवून ठेवली होती. तसाच नाही पण एक वेगळा,त्याहून चांगला आकाश तिला भेटला होता. amazing feeling होतं ते.... काहितरी सापडल्यासारखं ... सुप्रीला अजून विश्वास बसत नव्हता. 

                   थोडयावेळाने सगळे जागे झाले. निघायची तयारी झाली. सखा तयारीत होता. सगळ्या ग्रुपनी  त्या लोकांचा निरोप घेतला. आणि निघाले पुढच्या प्रवासाला. आकाश ,सखा सोबत पुढे होता. सुप्री त्याच्याकडेच बघत होती चालताना... वेगळ्याच खुषीत होती. संजनाला समजलं ते. 
" काय गं... काय झालं... एवढी खूष का आहेस ... ",
"असंच... ",
"सांगतेस का आता " संजनाने परत विचारलं.. 
"असंच तर... एक ख़ुशी कि किमत तुम क्या जानो संजना बाबू... " दोघीही हसायला लागल्या. पुढच्या अर्ध्या तासात, सखा त्यांना एका ठिकाणी घेऊन आला. 
" ते दूरवर मंदिरं दिसतं का तुमाला... " आकाश , सखा दाखवत असलेल्या दिशेने बघू लागला. दूर एका मंदिराच्या कळसाच्या बाजूला असलेला झेंडा दिसत होता. 
" हो... दिसलं मंदिर... " ,
"हा.. तिथंच तो गाव सुरु व्हतो.. तीत तुमाला गाडी मिलेल .. शहरात जान्यासाठी... " ,
"खूप छान... पण ते तर खूप लांब वाटते... म्हणजे किती वेळ लागेल... माहिती आहे का तुला... " ,
"वेळ नाय माहित... पटपट चाललात ना तर दुपारची उन्ह उतरली कि पोहोचाल तुमी... " ,
" नदी वगैरे नाही ना या वाटेत.. " ,
" हाय... पन त्याबाजूला हाय... इथून सरल रान फक्त वाटेत... नाकासमोर चालत जा... बराबर जाल तीत.. म्या याच्या पुढं जावू सकत नाय ना ... नायतर म्याच आलू असत गावापर्यंत... " आकाशला समजलं ते. प्रत्येकाची वेस असते, सीमा असते. त्या बाहेर सहसा जात नाहीत हे. 
" सखा .... खूप मदत झाली तुझी... खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचा... जमलं तर येईन पुन्हा तुला भेटायला... आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला... " सगळ्यांनी सखाचा निरोप घेतला आणि निघाले त्या गावाकडे...   

--------------------------------------------- to be continued---------------------------------------------

15 comments:

 1. Khup chhan Vinit nisargach varnan khup chhan kartos tu.
  Pudhacha bhag lavkar tak we r waiting

  ReplyDelete
 2. Kharch dada khup chan.....story vachtana sagl dolya samorun jate asa bhas hoto..really u r great...n awesome

  ReplyDelete
 3. Khup Chan dada...story vachtana sagl dolya samorun jate asa bhas hot hota....u r awesome dada.....

  ReplyDelete
 4. Atishyay sundar .....pudhe kay honar hyachi utsukta ahe��

  ReplyDelete
 5. Nice story..........................waiting for the next part..........its amazing

  ReplyDelete
 6. vinit khup chan..... pudhacha bhag lvkr lihi

  ReplyDelete
 7. Very nice... nisargach varnan bhari kelas.... waiting for next part.....

  ReplyDelete
 8. Good creativity, nisarg varnan apratim. Aakash aani supriya yanch nat chhan vyakta kelas.
  Pudhchya bhagasathi jast vat pahvays lavu naye. Lekhak Mahoday. :)

  ReplyDelete
 9. Nice story...... Waiting for next part

  ReplyDelete
 10. awesome story ahe.......khupch sunder ahe...pn story read karat astasna bhiti aste ti TO BE CONTINUED chi...!!!!!!!!plz next part lavkar post kara plzzzzzz

  ReplyDelete
 11. kharach khup mst story ahe......... waiting for new part, please please please lovekar post kara....

  ReplyDelete
 12. खूप सुंदर .
  पुढील भाग लवकर रिलीज करा

  ReplyDelete
 13. mastch vachatana haravun jayla hot..........
  next part sathi jast vel naka lau plz... lavkr post kara plz...

  ReplyDelete
 14. खूपच छान story, वाचताना हरवून जातो, एक नंबररररररररररररर................ :) वाट पाहतोय पुढच्या Part ची

  ReplyDelete

Followers