"पण तिला कसं सांगू ..... मी तिच्यावर प्रेम करतो ते... " आदित्य मधेच बोलला.
" तरी सुद्धा तू , ते तिच्या पासून लपवू शकत नाही ना... बोलून टाक.... " संयुक्ताने सरळ आदित्यच्या तोंडावर सांगून टाकलं.
" असं कसं सांगू तिला.. तू माझी Best friend आहेस ना म्हणून तुला सांगितलं... आणि तसंही तुझ्या शिवाय माझी कोणी दुसरी friend नाहीच आहे... " आदित्य बोलता बोलता थांबला.
" मी खरंच वाईट आहे का... means लोकांना मी आवडत नाही... वेडा म्हणतात मला... विचित्र, विक्षिप्त म्हणतात मला... खरंच आहे का मी तसा... म्हणून लोकं लांब राहतात का... " त्यावर संयुक्ता हसली.
"तसं नाही हा ... तू चांगलाच आहेस... स्वतःच्या पायावर उभा आहेस... चांगला कमवतोस... successful आहेस... हि लोकं जळतात तुझ्यावर म्हणून, तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे... तू छान आहेस... " ,
"thanks संयुक्ता... फक्त एक सांग... बाकीचे जाऊ दे.... तुला का वाटलं माझ्यासोबत मैत्री करावी म्हणून... खरं सांग हा... " आदित्य तिचं बोलणं मधेच तोडत बोलला. त्यावर संयुक्ता हसली फक्त...
" माझ्या लहानपणापासून तूच एकटी सोबत आहेस... का.... तुला मी वेडा वाटत नाही का... " आदित्य एका मागोमाग एक प्रश्न विचारत होता.
" हे बघ... तुला शाळेतच मित्र मानलं होतं मी.. आणि असं म्हणतात कि शाळेतली मैत्री खूप वर्ष टिकते.... तुला लहानपणापासून ओळखते.. लोकांपेक्षा मी जास्त चांगली ओळखते तुला.. मला माहित आहे ना.. तू किती चांगला आहेस ते.. म्हणून तुझ्या बरोबर एवढी वर्ष मैत्री आहे.. शिवाय तुही संभाळतोस ना मला... मग बाकीचे तुला किंवा आपल्या friendship ला काय बोलतात त्याकडे कशाला लक्ष देऊ... " संयुक्ताने तिचे मत मांडलं.
"थँक्स संयुक्ता.. पण माझ्याशी मैत्री केलीस म्हणून तुझ्याबरोबर कोणी मैत्री करत नाही... त्यासाठी सॉरी.. ",
"अरे !! वेडा आहेस का तू... तू आहेस ना.. तेच खूप आहे माझासाठी... ते जाऊदे सगळं... तू "तिला" कधी सांगणार आहेस मनातलं... ",
"सांगेन गं.. पण मला जरा भीती वाटते... " आदित्य बोटांची नखं कुडतडु लागला.
"का... सांगून तर बघ तिला.. " संयुक्ता हसत म्हणाली. आदित्य मनाची तयारी करत होता.
" पण तुला भेटली कुठे ती... ते तर सांगितलं नाहीस मला... नावं तर माझंच आहे.. म्हणून आवडली का.. " त्यावर आदित्य मोठ्याने हसला.
" तिचं नावं "संयुक्ता" च आहे, हे मला आधी माहीतच नव्हतं. खूप नंतर कळलं तिचं नावं. पण आधी पासून आवडायची मला ती. मी आता जॉब करतो ना.. तिथे नवीनच जॉब ला लागली होती ती. तेव्हापासून ओळख.. ती सुद्धा जास्त बोलत नाही.. माझ्याशी हि नाही... ",
"जास्त बोलत नाही मग ओळख कशी.... आणि हे प्रेम वगैरे कधी झालं... " संयुक्ताला उत्सुकता लागली होती.
" सांगतो ... सांगतो.. धीर धर जरा.... तर, ती माझ्या बाजूच्याच डेस्कवर बसते काम करत... म्हणून सर्वात आधी माझ्याशी ओळख झाली. त्यानंतर, आम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये.... त्यामुळे मिटींग असली कि भेट होते, बोलणे होते सतत... एकदा ती टिफिन विसरली होती, मी माझा टिफिन दिला तिला, तेव्हापासून friendship झाली.. त्यानंतर तिच्या घराचा address काढला.. माझ्या फ्लॅटच्या १५ मिनिटं पुढे राहते ती.. " आदित्यच्या गालावर खळी पडली सांगताना...
" हो.. हो.. किती लाजतो आहेस... तुला खूप आवडते म्हणजे ती.. पण ती बोलली का तुला.. " संयुक्ताने आदित्यला विचारलं.
" बोलायला कशाला पाहिजे... संयुक्ता तशी पहिल्या पासून आवडते मला.. ऑफिसमध्ये ती एकटीच माझ्याशी बोलते... कधी कधी मी तिला माझ्या कारने घरी सुद्धा सोडतो. माझ्यासोबत टिफिन share करते... छान वाटते तिच्याबरोबर बोलताना... म्हणजे माझ्या बद्दल काहीतरी नक्की असेल ना तिच्या मनात.. " आदित्य हसत म्हणाला.
" बघ... त्या संयुक्ताला पटवण्यात... या संयुक्ताला विसरू नको हा.. " संयुक्ता हसत म्हणाली.
आदित्यने संयुक्ताचे म्हणणे ऐकले. स्वतःच्या घरी आला. चांगले नवीन कपडे घातले. छानसा perfume लावून तो, त्याची नवीन मैत्रिण... संयुक्ताला भेटायला निघाला . मनात किती आनंद झाला होता त्याच्या... चेहऱ्यावर दाखवला नाही त्याने. संयुक्ताच्या घरी पोहोचला. आज सांगूनच टाकतो मनातलं तिला..... आदित्य तयारी करूनच आलेला. दारावरची बेल वाजवली त्याने. एका वयस्कर माणसाने दरवाजा उघडला. आदित्यला बघून संतापला.
" तुला किती वेळा सांगितलं मी... संयुक्ता बरोबर बोलत जाऊ नकोस म्हणून... आणि इथेही येत जाऊ नकोस... समजलं ना.. ",
"अहो.. आजोबा... ऐकून तर घ्या माझं... मला तिच्याशी महत्वाचं बोलायचं आहे... " आदित्य मनापासून बोलला.
" नाही... आणि पुन्हा यापुढे इथे दिसलास ना... तर पोलिसात तक्रार करिन.. विक्षिप्त माणूस.. चालता हो... " आणि त्यांनी धाड्कन दरवाजा बंद केला.
आदित्यचे तोंड एवढंसं झालं. घरी येऊन शांतपणे निजला. रात्री झोप येत नव्हती म्हणून, best friend.. संयुक्ताला कॉल लावला... " Hi.. आदित्य.. कशी झाली मीटिंग... संयुक्ता बरोबर... " आदित्य काहीच बोलला नाही त्यावर... " आताच्या आता भेटायला ये मला... " संयुक्ताने पलीकडून कॉल कट्ट केला.
" काय झालं आदित्य ... संयुक्ता काही बोलली नाही का... " संयुक्ताने विचारलं.
" तिचे आजोबा... दरवेळेस, सारखे मध्ये येतात.. भेटूच दिलं नाही त्यांनी.. काय प्रॉब्लेम आहे त्यांना... कळतंच नाही मला... " आदित्य उदास होता.
" तुझं प्रेम आहे ना.. आणि तिलाही तू आवडतोस ना... " आदित्यने होकारार्थी मान हलवली.
"मग तू त्या आजोबांचे tension घेऊ नकोस.. माझ्या मित्राला उदास झालेलं नाही बघवतं मला.. तू संयुक्ताला विचार लग्नासाठी... त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते बघते मी.. " संयुक्ता रागात म्हणाली.
" काय करणार तू ? " आदित्य....
" ते मी बघून घेईन... जा, घरी जा आता... " आदित्य विचार करतच घरी आला. रात्रही झाली असल्याने लगेच झोपी गेला.
सकाळी उशिराने त्याला जाग आली. ऍम्ब्युलन्सच्या आवाजाने त्याची झोप मोड झाली. तसाच उठून तो बाल्कनीत गेला. आणि तिथून त्याने पाहिलं. संयुक्ताचे घर त्याला तिथूनही दिसायचे. तिथेच ऍम्ब्युलन्स थांबली होती. तसा आदित्य धावतच संयुक्ताच्या घरी पोहोचला. गर्दी जमली होती. संयुक्ता,तिचे आई-वडील रडत होते.
" काय झालं.. " तिथे उभ्या असलेल्या एकाला विचारलं आदित्यने...
" आजोबा.... morning walk साठी घराबाहेर पडले होते. तेव्हाच कोणीतरी त्यांना गोळी मारली... "
बापरे !! हे काय... संयुक्ताने तर केलं नसेल ना हे.. आदित्यला तिचे कालचे बोलणे आठवले.. आदित्य हळूच मागच्या मागे आला. घरी आला. संयुक्ताला कॉल लावला तर फोन बंद.
आज ऑफिसला जाऊन तसा पण फायदा नाही.. संयुक्ता तर जाणारच नाही ऑफिसला... त्यात हि संयुक्ता... कुठे गेली कळत नाही... फोन पण बंद येतो आहे... बराच वेळ विचार करून तो तडक , त्याची Best friend..... संयुक्ता कडे आला.... ..
" कुठे आहेस तू... आणि कॉल का लागत नाही तुझा.. " आदित्य रागात होता.
"अरे.. नेटवर्क प्रॉब्लेम आहे माझ्या फोनचा.. तूच बघ... एक तरी सिग्नल आहे का ते.. " तेव्हा आदित्यचा राग शांत झाला.
" संयुक्ताच्या आजोबांना कुणीतरी शूट केलं सकाळी... तुझा काही संबंध नाही ना... " आदित्यने घाबरत संयुक्ताला विचारलं.
"असं का वाटते तुला... ? " संयुक्ताने मिस्कीलपणाने विचारलं.
" काल बोलत होतीस ना म्हणून वाटलं... " त्यावर संयुक्ता मोठयाने हसली.
" हो... मीच मारलं त्या म्हाताऱ्याला... तुझ्या आणि संयुक्ता मध्ये येत होता ना... तरीही आणखी किती दिवस जगणार होता.... जरा लवकर वर गेला तर कुठे बिघडलं.. " आदित्य ते ऐकून घाबरला.
" का... का केलंस आणि पोलीस वगैरे आले तर.... ",
"तुझ्यासाठी केलं ... आणि पोलिसांचे tension तू नको घेऊस... ते मला कधीच पकडू शकत नाहीत...... तर, मी तुझा मार्ग मोकळा केला... संयुक्ताला गमावू नकोस... लवकर तिला विचारून टाक... मी आहेच पाठीशी तुझा... " हे ऐकून आदित्य खुलला जरा... आपल्याला कोणीतरी एवढी मदत करते आहे, हेच खूप होते त्याच्यासाठी... खुशीतच तो घरी आला.
पुढच्या दिवशी, ऑफिसमध्ये संयुक्ता आलेली नव्हती. आदित्य हिरमुसला. " आज सुद्धा वेळ जाणार नाही ऑफिसमध्ये... उगाचच आलो. " आदित्य मनातल्या मनात बोलला. संध्याकाळी ऑफिस सुटलं तसाच तो, संयुक्ताच्या घरी तिला बघायला आला. आज काही आजोबा नव्हते ओरडायला. एकदम बिनधास्त त्याने दारावरची बेल वाजवली. संयुक्ताच्या आईने दरवाजा उघडला.
" काकी.. संयुक्ता आहे का घरात... " आदित्यने हळूच विचारलं.
" आहे.. पण तुला कशाला पाहिजे आहे... तुला आधीही सांगितलं आहे कितीवेळा... संयुक्ता बरोबर बोलत जाऊ नकोस म्हणून.. तरी पुन्हा पुन्हा का येतोस... " संयुक्ताची आई चिडली होती. तो आवाज ऐकून संयुक्ताचे वडील बाहेर आले.
" तू !!.... तू परत आलास.. एक-दोनदा सांगून कळत नाही का... दूर राहा संयुक्ता पासून.. निघ इथून... " ते सुद्धा चढया आवाजात बोलले.
" पण काका... माझी friend आहे ती... माझ्या सोबत असं का वागता तुम्ही सगळे... " आदित्य..
" कारण... वेडया, विक्षिप्त माणसाबरोबर संयुक्ताने मैत्री केलेली आम्हाला आवडणार नाही. " पुन्हा दरवाजा बंद केला त्यांनी.
आदित्यला भलताच राग आला... मी विक्षिप्त काय !!! साल्यांनो... तुम्हीच आहात विक्षिप्त... वेडे... महामूर्ख .... आदित्यने रस्त्यावरचा दगड उचलला आणि भिरकावला त्यांच्या घरावर... बरोबर तो खिडकीवर जाऊन लागला. त्या आवाजाने, त्या घरातले सगळे बाहेर आलेच.. शिवाय, आजूबाजूच्या घरातील लोकांचे लक्षही वेधले.
" काय रे !!! सरळ सांगून कळत नाही तुला ... माज आलाय का.. " संयुक्ताचे वडील तावातावाने बाहेर आले. आदित्यची कॉलर पकडली. दोन-चार थोबाडीत लागवल्या. संयुक्ता हे सर्व आतूनच बघत होती. आदित्यचे डोके भणभणलं. पुन्हा दोन-तीन थोबाडीत लगावून त्यांनी आदित्यला खाली ढकलून दिलं.संयुक्ताच्या वडीलांनी पोलिसांना फोन लावला. १०-१५ मिनिटांची पोलीस तिथे पोहोचले.
" inspector.... हा वेडा... मतिमंद माणूस.. आम्हाला... माझ्या मुलीला रोज त्रास देतो... आणि आज दगडफेक केली माझ्या घरावर... घेऊन जा याला... " inspector ने तुटलेली काच पाहिली.
" एक दगड फेकला तर दगडफेक म्हणत नाही त्याला... " inspector ने उत्तर दिलं...
" मग काय वाट बघू.. दगडफेक करायची... याला आता.. तुम्ही अटक करा. " ते अजून रागात होते.
" कोणतीही तक्रार अशीच घेत नाही आम्ही... शिवाय तुमच्या वडिलांना गोळी मारली कोणीतरी..त्याचा तपास करू दे आम्हाला.. हि असली फालतू भांडण सोडवायला बोलावू नका आम्हाला.. " inspector चा ही आवाज वाढला. तसे संयुक्ताचे वडील तरतरत आत घरात गेले.
" आणि तू रे... समजत नाही का तुला... कि खरंच वेडा आहेस... " inspector ने आदित्य कडे मोर्चा वळवला.
" मी.. वेडा... नाही आहे.. !!! " आदित्य चिडून ओरडला.
" आवाज नाही करायचा.... गुपचूप घरी निघायचे... समजलं ना.. हिरोगिरी.... घरीच ठेवायची आपल्या... " inspector गाडीत बसत म्हणाले.
आदित्य आपल्या घरी न जाता, best friend... संयुक्ताकडे आला. " बघितलंस... किती मारलं मला ते.. म्हणे बिनधास्त जा... तो आहे ना राक्षस... तिचा पप्पा... मला वेडा म्हणतो... " आदित्य चाचपडत होता.
" तुला वेडा म्हणाला... चरबी वाढलीय वाटते त्याची.. नालायक माणूस... एक वेळ माझा अपमान सहन करिन.. पण तुला कोणी काही बोललं तर नाही शांत राहू शकत मी. बघते त्याला आता... दिवस भरले आहेत त्याचे... " संयुक्ता रागाने लाल झाली.
" प्लिज संयुक्ता... आधीच त्या आजोबांना मारलस तू.. परत असा वेडेपणा करू नकोस.. ",
"ठीक आहे.. जा घरी तू... आराम कर.. मी काही करणार नाही.. " ते ऐकून आदित्य घरी आला. पडल्या पडल्या झोपला.
पुढल्या दिवशी, सकाळी पुन्हा ऍम्ब्युलन्स च्या आवाजाने आदित्य जागा झाला. पुन्हा एकदा संयुक्ताच्या घराबाहेर ऍम्ब्युलन्स थांबली. संयुक्ताच्या आई -वडिलांचा खून झाला होता. संयुक्ता एकटीच रडत बसली होती एका कोपऱ्यात... आदित्यला पुन्हा संयुक्ताचा संशय आला. ऑफिसमधून घरी येता येता तो तिच्या घरी आला. खुर्चीवर बसला. आदित्यला बघून संयुक्ता हसली.
" का करते आहेस अस... बिचारी संयुक्ता आता एकटी राहिली ना.. कशी तिची हालत झालेली... बघितलिस का तू... ",
"असू दे...... आता तुला कोणी वेडा म्हणणार नाही.. संयुक्ता आणि तुझामध्ये आता कोणीच नाही.... आणि पोलिसांना मी घाबरत नाही.. तू उद्याच विचारून टाकं तिला... जास्त वेळ दवडू नकोस " आदित्य ते ऐकून सुखावला.
सकाळी पुन्हा आदित्य, संयुक्ताकडे निघाला. " Hi... संयुक्ता... " दरवाजा उघडा बघून आदित्य आत गेला. संयुक्ता एकटीच उदास बसली होती. आदित्यला आत आलेलं बघून दचकली.
" तू... तू कशाला आलास घरात.. " ,
"अगं.... तू एकटी आहेस ना म्हणून आलो... आणि मला काहीतरी सांगायचे होते तुला... ",
"नको... मला काही ऐकायचे नाही ... निघ इथून... " संयुक्ता दूर होत म्हणाली.
" माझं प्रेम आहे तुझ्यावर... आणि तुझंही आहे माझ्यावर... मला वाटते आपण लवकरच लग्न केले पाहिजे... तसंही तुला आता जोडीदाराची गरज आहेच... किती दिवस एकटी राहणार तू " आदित्य तिच्या जवळ जात म्हणाला.
" दूर राहा... खरंच... लोकं बोलतात ते बरोबर... मम्मी-पप्पा पण बोलायचे... विक्षिप्त आहेस.. वेडा आहेस... " बोलता बोलता संयुक्ताने बाजूला असलेली फुलदाणी उचलून धरली.
" दूर राहा माझ्यापासून... नाहीतर मारिन तुला... " संयुक्ता थरथरत होती.
" थांब थांब... जातो मी... एकटी राहिलीस ना.. म्हणून तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे.. आराम कर तू... उद्या विचार करून उत्तर दे... तशी तयारी करावी लागेल लग्नाची.. " आदित्य घरी आला.
आज तो आनंदात होता. कारण त्याने त्याच्या मनातलं संयुक्ताला सांगितलं होते. Wow !!! आता आपलं लग्न होणार... पण तरीही त्याला एक प्रश्न पडला होता. त्याचं उत्तर शोधण्यासाठी तो संयुक्ताला भेटायला गेला.
" मला सांग....तिला मी मनातलं सांगितलं तर ती एवढी का hyper झाली.. म्हणजे अगदी वेड्यासारखं वागू लागली... मला फुलदाणी मारणार होती... पळालो म्हणून वाचलो... पहिली अशी कधी वागली नाही ती.. ऑफिसमध्ये तर कशी टापटीप असते ती..... छान बोलते... आणि घरी.. वेड्यासारखी... काय नक्की कळत नाही.. " आदित्य विचारात पडला. " याचा अर्थ... split personality... जगासमोर एक आणि घरी एक.. " संयुक्ता म्हणाली.
"म्हणजे ? " ,
"अशी माणसं... दोन व्यक्ती असल्या सारख्या वागतात.. ",
"अशी माणसं असतात का खरोखर... ? " आदित्य..
" असतात अशी माणसं.. पण ती असेल का ते माहित नाही... किंवा त्या हरामखोरांनी... खऱ्या संयुक्ताला कुठेतरी लपवून ठेवलं असेल.. हि कोणी भलतीच असेल.. " ,
"असं पण आहे का ? " आदित्य घाबरला.
" तू किती साधा आहेस रे.. पण घाबरू नकोस.. तिला तुझ्यापासून दूर ठेवीन मी... तुझ्यासाठी काहीपण... " आदित्य घरी आला.
दुसऱ्या दिवशी, सकाळीच पोलीस आदित्यच्या घरी पोहोचले.
" काय झालं inspector ? " ,
"चल.. काय झालं ते दाखवतो... तुला.. " inspector ने ओढतच त्याला घराबाहेर काढलं. आदित्यच्या फ्लॅट बाहेर रक्त सांडलेले होते. दरवाजावर रक्ताळलेले हाताचे ठसे होते.. ते बघून चक्रावला आदित्य...
" हे काय आहे .... Mr. आदित्य.. " ,
"मला काय माहित ... आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं.. " ,
"तुझाकडे साफसफाई करायला येतो ना... त्याने आम्हाला कळवलं हे.. " inspector ने खुलासा केला.
" मला काही माहित नाही हे... मी काही केलं नाही." आदित्य..
" काही केलं नाही !! " एक सणसणीत थोबाडीत बसली आदित्यच्या...
" संयुक्ताने रात्री आम्हाला कॉल करून सांगितलं होते तुझ्याबद्दल... तिला त्रास देतोस ते.. आणि आज ती गायब झाली आहे... तुझ्यावर संशय आहे आमचा.. " inspector ने आणखी मारलं आदित्यला. आदित्यने खूप सांगायचा प्रयन्त केला त्यांना.. पण त्यांनी त्याचं ऐकूनच घेतलं नाही. गाडीत घालून पोलीस स्टेशनला आणलं.
" बोल.. संयुक्ता कुठे आहे ते.. " inspectorने आदित्यची कॉलर पकडत विचारलं.
" मी खरंच सांगतो आहे.. मला माहिती नाही... " गाल लाल केला inspector ने आदित्यचा.
" मी बोललो ना एकदा.. मला माहिती नाही काही.. आणि कोणत्या पुराव्या वरून मला पकडून आणलात तुम्ही.. " आदित्य रागात म्हणाला.
" पुरावा... पुरावा पाहिजे का तुला... " inspector ने आदित्य समोर एक फाईल धरली.
" हि तुझ्याबद्दल तक्रार.. तीन - तीन कंप्लेंट आहेत तुझ्यावर.. त्यात काल, रात्री संयुक्ताने सांगितलं कि तू तिच्या वर बळजबरी केलीस.. जबरदस्ती तिच्या घरात शिरलास... तिने प्रतिकार केला म्हणून तू निघून गेलास... मग पुन्हा येऊन तिला घेऊन गेलास ना कुठेतरी... बऱ्याबोलाने सांग.. संयुक्ताला कुठे लपवलंस ते.. मला तर वाटते त्या तीन खुनांमागे सुद्धा तूच असणार " आदित्यला सगळा प्रकार कळला...
" inspector कळलं मला... हे सगळं संयुक्ता करते आहे...मी नाही केलं काही... " ,
" means... संयुक्ताने.. स्वतःच्या आजोबांना आणि नंतर आई-वडिलांना मारून टाकलं.. तक्रार सुद्धा नोंदवली... आणि आता स्वतःला लपवून ठेवलं आहे का.. हि लोकं बोलतात ते बरोबर.. वेडा " inspector हसत म्हणाले. आदित्य चिडला...
" मी वेडा नाही आहे... " मोठयाने ओरडला.. सणकून एक काठीचा फटका त्याच्या पाठीवर पडला. आदित्य कळवळला. डोळ्यात पाणी आलं त्याच्या.
" मी खरंच सांगतो आहे.. ",
" मग संयुक्ता.. आपल्या कुटुंबाला का संपवेल... ते सांग.. " inspector ने आदित्यला विचारलं.
" ती संयुक्ता वेगळी... आणखी एक संयुक्ता आहे.. माझ्या बालपणीची मैत्रिण... तिचंही नावं संयुक्ता.. " हे जरा इंटरेस्टिंग होते...
" पुढे सांग... " ,
" संयुक्तावर माझं प्रेम आहे.. तिचं हि माझ्यावर... पण तिच्या आजोबांना, आई-वडिलांना ते आवडत नव्हतं... त्यात तिच्या पप्पानी मला मारहाण केली... माझी बालमैत्रिण संयुक्ता... तिला हे आवडलं नाही... तीच बोलली कि तू फक्त संयुक्ताकडे लक्ष दे.. बाकीच्यांना मी बघते... inspector.. मला बोलायला नको... पण हे सगळं तिनेच केलं आहे.. मला यात अडकवत आहे ती... " आदित्यने संयुक्ताचा मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता लिहून दिला inspector ला. त्याच्या त्या बोलण्याने सगळेच confused झाले. नक्की कोणत्या संयुक्ता बद्दल बोलतो आहे, कळत नव्हते. एक हवालदार बोलता बोलता बोलून गेला.. " वेडा कुठला... " आदित्य पुन्हा चिडला. आणि त्याला मारायला धावला. गळाच पकडला आदित्यने.. किती जोर लावला होता त्याने.. पकड सुटत नव्हती म्हणून एकाने त्याच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. आदित्य बेशुद्ध झाला. खूप वेळ झाला तरी तो शुद्धीत आला नाही म्हणून जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.
आदित्य , संयुक्ताबद्दल बोलतो आहे तर बघूया... संयुक्ता कोण आहे ते.. म्हणून ते आदित्यच्या घराजवळ आले. शेजारी विचारपूस केली.
" वेडसर आहे जरा... एकटाच राहतो.. शांत... शांत राहतो... पण कधी कधी मोठयाने ओरडायचा.. " ,
"हम्म... आणि आई-वडील... फॅमिली वगैरे... " inspector ने पुढचा प्रश्न केला.
" नाही... इथेच तो दोन वर्षांपूर्वी राहायला आला. त्याच्या नोकराला माहिती असेल.. " ,
"बरं ... हा address माहिती आहे का... इकडचा वाटतो पण भेटला नाही आम्हाला.. " inspector ने पत्ता दाखवला. त्यांनी नकारार्थी मान हलवली.
" संयुक्ता नावाची एकच राहते या इथे.. जिथे खून झाले ते.. दुसरी कोणीच नाही.. " inspector ने आदित्यच्या नोकराला विचारलं.
" तुला माहित असेल ना.... त्याच्या बालपणीची मैत्रीण... संयुक्ता... तिला तो रोज भेटायचा... आणि हा पत्ता.. तो सुद्धा बघ... माहिती आहे का.. " त्याने पत्ता वाचला.
" नाही साहेब... पत्ता तर इकडचा आहे.. पण संयुक्ता नावाची कोणीच मैत्रीण नाही त्यांची.. एकटेच तर राहायचे. " त्या पत्ताखाली संयुक्ताचा मोबाईल नंबर होता. नोकराने बघितला.
" हा नंबर तर आदित्य साहेबांचा आहे... " काय नक्की चालू आहे ते कळत नाही.
" तुला कधी वाटलं का.. आदित्य वेडा आहे ते.. " ,
" हो.. साहेब... वेड्यासारखे वागायचे.. कामात मात्र हुशार होते.. त्यांच्या ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर आहेत... घरी असले कि वेड्यासारखे वागायचे... कधी कधी TV लावायचे.... आणि कपडे करून बाहेर निघून जायचे... TV तसाच चालू.. जेवण करायला सांगायचे आणि बाहेर जाऊन जेवायचे.. मोबाईल वर कोणाबरोबर तरी बोलत असायचे... पण मोबाईल बंद असायचा. आणि हो.... मागच्या रूममध्ये तासनतास जाऊन बसायचे.. कधी कधी तर नवीन कपडे करून तिथे जाऊन बसतात.. " inspector ला जरा संशय आला.
" तुला माहीत आहे का... काय आहे त्या रूममध्ये... " ,
" भीती वाटते मला... एकदा जात होतो तर कसले ओरडले होते.. तेव्हापासून नाही जात... ",
"चल .. दाखव ती रूम... "
आदित्यच्या फ्लॅटच्या बरोबर मागच्या बाजूला, जिथे खूप झाडं-झुडूप होती.. तिथेच एक रूम होती... त्या रूमच्या दरवाजावर " संयुक्ता " नावाची पाटी होती. inspector चे डोकं चक्रावल. शिवाय तिथे काही रक्त सुद्धा पडलं होते.. ताबडतोब inspector दरवाजा तोडून आत शिरले. रक्ताच्या खुणा होत्या तिथे. कोणाला तरी, ओढत... फरफटत आतल्या खोलीत घेऊन गेल्याच्या खुणा.. आत गेल्यावर, तिथे संयुक्ता बेशुद्ध पडलेली दिसली. म्हणजे आदित्य.. त्याच्या बालमैत्रीण संयुक्ता बद्दल खरं बोलतो आहे... तिच्या डोक्यावरचा जखमेतून अजूनही रक्त येत होते. पण जिवंत होती ती... तसंच उचलून पोलीस व्हॅन मधून हॉस्पिटलला घेऊन गेले. inspector त्या रूमची आणखी झडती घेऊ लागले. एक रक्ताळलेली फुलदाणी होती.. जी inspector नी आधी संयुक्ताच्या घरी पाहिली होती. एक गन सापडली.. ती एका बॅगमध्ये घेतली inspector नी. बाकी रूममध्ये काहीच नव्हते बघण्यासारखे... बाहेरच्या खोलीत एक आरामखुर्ची होती आणि त्यासमोर एक मोठ्ठा आरसा... त्याच्या बाजूला एक बंद पडलेला मोबाईल... आणखी काही शोधणार त्यात inspector चा मोबाईल वाजला. "सर.. सर !! आदित्य पळून गेला.. हॉस्पिटलमधून ... " ते ऐकून inspector तसेच धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
"एक साधा माणूस सांभाळता येत नाही तुम्हाला... " inspector तिथे ड्युटीवर असलेल्या हवालदाराला ओरडले.
" काय करणार साहेब... एकाच्या डोक्यात ती काचेची औषधाची बाटली मारली त्याने... त्याला सांभाळायला गेलो तेव्हा आदित्य पळून गेला... "
inspector ला काय करावं ते कळतं नव्हतं. दोन - दोन संयुक्ता... एक बेशुद्ध... ती सापडली... दुसरी त्याची बालमैत्रिण.. संयुक्ता.. ती तर भेटलीच नाही... त्यात हा पळून गेला.. काय करू... आदित्यच्या नावाने search warrant काढून ते त्याच्या शोधात निघणार तर एका डॉक्टरचा फोन आला.. भेटायचे होते असं म्हणाला.
१० मिनिटांनी, तो डॉक्टर ,पोलीस स्टेशनला आला. त्याच वेळेस , त्या ठिकाणेच CCTV कॅमेरा चे विडिओ आले. पहिला डॉक्टरचे म्हणणे ऐकून घेऊ म्हणून inspector थांबले.
" तुम्ही आदित्यला कसे ओळखता... " पहिला प्रश्न..
" आदित्यची treatment माझ्याकडेच चालू आहे... लहानपणा पासून... " डॉक्टर...
" म्हणजे त्याला खूप आधी पासून ओळखता तुम्ही... मग आजच का आठवण झाली त्याची... " inspector... " हि news कळली ना.. म्हणून आलो भेटायला तुम्हाला... ",
" मग ... तुम्ही त्याची... बालमैत्रीण... संयुक्ता... तिला सुद्धा ओळखत असणार ना... " डॉक्टरने नकारार्थी मान हलवली.
" पहिलं म्हणजे.. आदित्य एकटाच... त्याला कोणी मित्र-मैत्रीण नाही.. आई-वडिलांनी तो "वेडा " आहे हे स्वतःच ठरवून माझ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं होते.. लहानपणीच... तेव्हापासून हा एकटाच... " ,
" मग तो सांगतो ते... संयुक्ता वगैरे.. ",
" तो खूप हुशार आहे तसा.. पण जेव्हा एकटा राहतो ना.. तेव्हा होते काहीतरी त्याला... म्हणजे कोणालातरी शोधतो तो बोलण्यासाठी... त्याला एक सवय आहे... एकटं बडबडायची... लहान असताना एकटाच कुठेतरी बोलत बसायचा... मोठा झाला तेव्हा कळलं कि, आता तो आरश्यासमोर बसून बोलत असतो. " inspector ला त्या रूममधल्या आरश्याची आठवण झाली. मोबाईल मध्ये सुद्धा आपण स्वतःला बघू शकतो ना... नोकर बरोबर बोलला. फोन बंद असुनही बोलत बसतो.
" आणखी एक सवय त्याला.. तुम्ही बोललात ना... संयुक्ता... तशी कोणी नसेलच... कारण त्याला सवय आहे हि... जी व्यक्ती त्याला आवडते ना... तिच्याच नावाने स्वतः बरोबर बोलत बसतो.... आधी माझ्या हॉस्पिटलमध्ये मीना नावाची नर्स होती... त्याला आवडायची ती... तर त्याचीही कोणी मीना नावाची बालमैत्रिण आहे, असं सांगायचा. ती जॉब सोडून गेल्यावर निखिल नावाचा एक मुलगा त्याचा मित्र झाला. तर आपलाही निखिल नावाचा जुना मित्र आहे असं सगळ्यांना सांगितलं होते. हि संयुक्ताची केस समजली म्हणून आलो मी. त्याला संयुक्ता आवडत असेल म्हणून त्याने स्वतःची बालमैत्रिण तयार केली असावी.. आणि हो... तो खूप deeply प्रेम करतो हा.. त्या त्या व्यक्तीचे काल्पनिक नंबर, त्यांच्या नेम प्लेट बनवून कुठल्यातरी दरवाजावर लावतो.... तर माझं म्हणणे आहे कि त्याच्याशी जरा जपून वागा... एकदम hyper होतो... त्याला वेडा तर अजिबात म्हणू नका... आवडत नाही त्याला ..... काय करेल ते सांगू शकत नाही... कुठे आहे तो... " डॉक्टर....
" पळून गेला.. आम्हाला चकवून... " inspector ला सगळी स्टोरी कळली. त्याने लगेचच तो विडिओ बघायला सुरुवात केली. आजोबांना मारणार तोच आदित्य.... संयुक्ताच्या आई-वडिलांचे खून झाले तेव्हा आदित्यचं त्यांच्या घरातून बाहेर पडत होता. आणि संयुक्ताला देखील ओढत घेऊन जाणारा आदित्यचं.... संयुक्ता.... त्याची बालमैत्रिण नव्हतीच कोणी... तो आदित्यचं होता.. स्वतःच्या प्रतिबिंबाला Friend मानणारा..
------------------------------ ------ ------------------------------ ------------------------------ ------------------------
(आदित्य एका नवीन शहरात .... ) तीन महिन्यानंतर,.............
" अगं.. दीक्षा.... मला ना एक मुलगी आवडते ग.. योगायोग बघ ..... तिचं नावं सुद्धा दीक्षाचं आहे... " आदित्य आरशा समोर बसलेला.
" अरे.. मग सांगून टाक तिला... तुझ्या मनातलं.. आणि काही काळजी करू नकोस.... मी तुझी बालमैत्रिण आहे ना.. तुझ्यासोबत नेहमी... बिनधास्त विचार तिला.. " दीक्षा समोरून म्हणाली.
------------------------------------------------- ------- The End ------------------------------------ ----------------
Khup Chhan story ahe.... adi pratilipi vr vachali... tri pn tumchya sarv stories chhan astat manun minimum 5 times tri read krtech....
ReplyDeleteSTORY TASHI CHHAN AHE...PN VINIT TUMHI ITKA MOTHA BREAK GHETLA TR STORY PN TASHICH EXPECTED HOTI.... swarali..
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletechan hoti story.. mast..
ReplyDeletesahi story aahe
ReplyDeleteBest example of psychiatric personality...carry on...
ReplyDelete