All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday 29 October 2019

तिच्या मनातला " तो " आणि त्याच्या मनातली "ती " (भाग दोन )

तो :-   शीट यार !! या पावसाने तर कमालच केली. इतके ट्रॅफिक करून काय मिळवले याने ,देव जाणे. आणि किती तो कोसळतो आहे. माझी बस तरी येईल का माहित नाही... चालत जाऊ का ... छत्री तर आहे ... नाही , नको .... चिखल झाला असेल पुढे. त्यापेक्षा वाट बघतो बस ची.... ह्म्म्म .... तीही किती वाट बघायला लावायची. जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा तेव्हा उशीर करायची... कमीत कमी एक तास तर ठरलेला तिचा. पण आवडायचे तिची वाट बघणे. आली कि छान smile दिली कि झालं. वाट बघणे सार्थकी लागायचे. जॉबला लागल्या पासून आमचे बंद झालेलं " भेटणे ", पुन्हा सुरु झाले. पण भेटणार कधी , हा मोठा प्रश्न... कारण ठरलेल्या वेळेत घरी गेलो नाही तर घरी कळणार.... तेव्हा तर लग्न फिक्स सुद्धा झाले नव्हते. मग काय करावे , मीच आयडिया काढली मग. शनिवार , रविवार सुट्टी ... दोघांनाही....तर ऑफिसचा बहाणा करून निघायचो भटकायला. एकच ठिकाण असे नव्हते. कुठे कुठे फिरत बसायचो, हा ... पण आमच्या एरिया पासून दूर.

कधी कधी मॉल मध्ये सकाळी जायचो... तिथेच गप्पा -टप्पा , खाणे ... मग कंटाळा आला कि मॉलभर फिरणे... पाय दुखले कि पुन्हा कुठेतरी जागा पकडून पुन्हा गप्पा. तिला बोलायला जास्त आवडायचे... आता फारच कमी बोलते, तरी तेव्हा प्रचंड बडबड... मी नुसता ऐकत रहायचो आणि तिला बघत. एव्हडे बोलायची ती. ice-cream चे भारी वेड तिला .... एका वेळेस २ -२ फस्त करायची. मला थंड चालायचे नाही , खोकला होणारच ना .... तरी तिला आवडते म्हणून खायचो आणि घरी गुपचूप खोकत बसायचो..... इतके त्या ठिकाणी आणि इतका वेळ असायचो ना , कि त्या मॉल मधल्या लोकांची ओळख सुद्धा झालेली..... फिरून , खाऊन झालं कि वेळेवर निघायचो ... आणि वेळेत घरी. कधी कधी कोणतीही ट्रेन पकडायची आणि त्यात बसून दिवसभर फिरत बसायचे... तिच्या गप्पा तर कधीच संपायच्या नाहीत.... सोबत छानच होती तिची. शाळेत असताना बस आणि आता ट्रेन .... इतकाच काय तो फरक. ... पण घरी फसवून असे निघण्यात सुद्धा एक वेगळी मज्जा यायची ना !! 


ती :-   शी बाबा !! पावसाने तर कहर केला अगदी. केवढा तो उशीर .... माझा छकुला वाट बघत असेल माझी. नाहीतर बोलतोच तो कधी कधी... किती वाट बघायला लावतेस आई..... हीहीही !! .. सवयच आहे मला ती... त्यालाही अशीच वाट बघायला लावायची. पण तोच लवकर येऊन उभा राहायचा स्टेशनला. कोणी सांगायचे. मग मी आली कि कुठून यायचा काय माहित. त्याला बघून नेहमीच surprise होयाची मी. एकदा ठरवलं , त्यालाच आपण surprise देऊ. माझ्या नेहमीच्या वेळेला पोहोचले. आणि त्याला कॉल केला. मी नेहमीच्या जागी उभी न राहता , वेगळीकडे उभी होती. तो आला आणि मी दिसलीच नाही. शोधता होता कसा मला ... बघितलं ..... छान वाटलं... मनात बोलले कि जास्त वाट बघून नये अजून, कॉल करून सांगितलं , अजून कशी दिसत नाही मी तुला ... तो बोलला , नाहीच दिसत तू .... आहेस कुठे... , तेव्हा बोलले ... मागे वळून बघ... त्याने लगेच मागे वळून पाहिलं. आणि ..... !!! माझे कडे बघून तोंडाचा किती मोठा " आ " केला त्याने. full surprise !! आवडले त्याचे expression, हेच तर पाहिजे होते मला.


तो : - एकदा तर कमाल केलेली तिने , एकतर उशिरा आली आणि दुसरं , नेहमीच्या जागेवर उभीच नव्हती. आली तर बोलली मग गेली कुठे.... स्वतःच कॉल करून बोलते कशी , अजून कशी दिसत नाही तुला. पागल मुलगी !! ... मागे वळून बघ बोलली , तेव्हा येताना दिसली.... कसले भारी वाटले होते , काय सांगू.... एकदम समोर आली ना ती .... सफेद कुडता होता तो ... अजूनही आठवते.... डोळ्यावर चष्मा ... केस मागे बांधलेले... बघून वाटलंच तिला मिठीत घेऊ , पण तिला असं कोणी उगाचच touch केलेलं आवडलं नाही , माझा स्पर्श ही नाही... मिठी वगैरे सगळं लग्नानंतर... शहाणी बस मध्ये झोपायची बरोबर , माझ्या खांद्यावर... असो, तिला तसही सारेच रंग खुलून दिसायचे... किंबहुना तिच्यामुळे रंग खुलायचे. पण त्यादिवशी वाटलं मिठी मारावी तिला .... दिवसभर फिरणे झाले आणि निघताना बोललो कि एक मिठी मारू शकतो का .... नाराजीने तिने मिठी मारली , घट्ट नाही हा .... हलकीशी मिठी... मला छान वाटलं , तरी जाताना पोटात टोसा मारला होता तिने.


ती : - बस मध्ये किती वेळ अजून ... !! झोप यायला लागली. त्याची आठवण येते ना अशी ..... त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायला छान वाटायचे. आमचे प्रेम असले तरी आमच्यात अंतर होते. जे काही करायचे , लग्न झालं कि ... मला उगाचच कोणाचा स्पर्श आवडला नाही. माझा भावाचाही !!! त्याला आधीच सांगितले होते हे... त्यामुळे आमचे प्रेम असले तरी त्याने माझ्या पासून नेहमीच एक अंतर ठेवले होते. सुरुवातीचे आमचे सेल्फी ... ते कधी बघत असायचे , तेव्हा कळायचे... actually सेल्फी नसायचा तो ... मी मोबाईलने क्लिक करायचे , तो मात्र माझ्या मागे किंवा असा शेजारी .... जवळ आलाच नाही कधी .... फोटोसाठी सुद्धा नाही... त्यादिवशी मिठी मारली तेव्हा मला आवडलं नव्हते. हे त्यालाही कळलं नंतर... सॉरी बोलला होता दुसऱ्या दिवशी.



तो : - वाट बघायला स्थायी स्वभाव तिचा. नेहमीचेच... हा ... दिवाळी पहाट ... आठवते ती .... लग्नाच्या आधीची... म्हणजे आम्ही जेव्हा लपून भेटायचो ना .. तेव्हा... घरी ऑफिसचे कारण सांगून पुन्हा निघालो.. तिची आयडिया हि... पहिल्या दिवशी फिरायला जाऊ. मी आधी निघून वेळेत पोहोचलो. हि मात्र , तयारी नाही अजून , म्हणून वाट बघ आणखी असा मेसेज केला. किती वाट बघावी माणसाने... २ तास  !! ... २ तास त्या स्टेशनवर बसलेलो. आली तेव्हा हि तसे... मला घेऊन जायला ये .... उलट सुलट प्रवास.... तरी केला. आणि २ तासाने आली. पुन्हा तेच.... समोर आली नाहीच... मागून आली. आणि आली ती काय !!!  पुन्हा डोळ्याचे पारणे फिटावे असे ...


मोरपिशी बोला किंवा निळा रंग .... त्या रंगाची साडी परिधान केलेली तिने. दागिने नव्हते जास्त तरी खुलून दिसत होती. इतकी सुंदर दिसत होती कि क्षणभर माझे हृदय थांबले असे वाटले मला. किती बघू तिला असे झालेलं... तिचे मात्र नेहमीच बडबड.... अरे दागिने नव्हते या साडीवर......  त्यात घरात अंघोळीची गडबड... तयारी करायला वेळ लागला... म्हणून उशीर ..... मला तर ते ऐकूच येतं नव्हते. तिलाच तर बघत होतो मी कधीचा... क्षणभर का होईना .... डोळ्यात पाणी आलेल... दाखवल नाही तिला.... घाम पुसण्याच्या बहाण्याने डोळे पुसून घेतले. कारण एवढे सौंदर्य कधीच पाहिले नव्हते कधी.... देवालाही हेवा वाटावं अशी ती दिसत होती तेव्हा.... माझ्याशी लग्न केले तिने हेच किती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी..... तरी त्या दिवशी ... बहुतेक लोकांच्या नजरा तिच्याकडे होत्याच... कोणाला आणि किती जणांना अडवू.... माझीच नजर लागू नये असे वाटून गेले. त्यादिवशी फार कमी फिरलो... फोटो काढले... तिचेच ... माझा एकही नाही... किंवा तिला माझा लाल रंगाचा कुडता दिसला हि नसेल.... तिचे सर्व लक्ष तिच्या साडीकडे.... ती सावरण्यात.... देवळात गेलो तिथून.... गणपतीच्या देवळात... असे ऐकलं होते कि लग्न ठरण्याआधी गणपतीचे दर्शन घेऊ नये... जुळणारे लग्न तुटते.... त्यात किती खरं ते त्या गणरायाला माहीत.... आमचे तर झालेल लग्न..... देवळात गर्दी होती... दिवाळी पहाट ना ... एकच दिवस आठवण येते बहुतेक लोकांना देवाची.... असो. गर्दी होती म्हणून बाहेरच उभं राहून पाया पडली ती देवाला.... मला वाटलं तिच्या समोर नतमस्तक व्हावे .... पाया पडलो तिच्या.... पायाला हात लावून... जमलेल्या गर्दीने ते बघितले. काही लोकांच्या चेहऱ्यावर ... याला काय वेड लागले आहे का , असे भाव.... पण त्यादिवशी निश्चित ती त्या गणरायाच्या एक पाऊल पुढे होती.

ती : - वाट बघायचा तो ..... दिवाळी पहाट आठवते... २ तास पेक्षा जास्त वेळ थांबला होता तो... पण जेव्हा समोर गेले तेव्हा तर मला पाहून तोंड लपवले होते त्याने... इतक्या भावना त्याच्या चेहऱ्यावर.... माहित नाही का ... पण वाटून गेलं कि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं. त्यानंतर तो गप्प होता आणि माझी बडबड... दिवाळी पहाट आणि गर्दी... माझी चिडचिड झाली.... तो मला छान सांभाळायचा तरी त्यावरच राग माझा.... त्यानेच मग गर्दी पासून दूर नेले. किती काळजी त्याची. माझ्या पुढे राहात होता सारखं सारखं... माझी पुढची वाट मोकळी करण्यासाठी.... ओरडली त्याच्यावर.... मागे राहून काळजी करतात .... पुढे पळून नाही.... पण नंतर कळलं होते मला ते... का करतो माझ्यासाठी... माझ्या पायावरून जाणारी bike स्वतःच पाय पुढे करून स्वतःला इजा करून घेतली. मला वाटलं होते कि मला पडतो आहे कि काय.... नंतर पाय सुजलेला त्याचा.... सांगितलं नाही त्याने तेही.

मला कोण कोण बघत होते... त्याला आवडत नव्हते ते... jealous feeling असतात ना अगदी तश्या.... हॉटेल मध्ये जेवायला गेलो तिथे सुद्धा ... एक जण बघत होता तर माझ्या मागे मेनू कार्ड घेऊन उभा कधीचा.... मी बोलले कि साधे ऑर्डर सुद्धा करता येत नाही तुला .... तिथेही चिडचिड माझी.... शहाण्याने घरी गेल्यावर सांगितलं तसा का उभा होता ते.... हा ... रिक्षाने घरी येताना .... सिंग्नल लागला होता. तेव्हा समोर एका ट्रक मध्ये बसलेला मुलगा मला बघत होता. त्याला आवडलं नाही. ऑफिसची बॅग होती सोबतीला. काय करावे त्याने.... माझ्या समोरच बॅग ठेवून दिली, जेणेकरून त्या मुलाला मी दिसू नये.... तेव्हा कळलं किती काळजी करतो माझी.... देवळात गेलो तर गर्दी... बाहेरूनच पाया पडावे तर डोळे मिटून हात जोडले देवासमोर... तर पायाला हातांचा स्पर्श झाला, बघते तर हा पाया पडतो आहे... विचारलं तर बोलला , देवी लक्ष्मी सारखी भासतेस ... म्हणून.... नंतर पुन्हा थोड्यावेळाने गर्दी कमी झाल्यावर आत जाण्यास मिळेल , तेव्हा सुद्धा मी देवाकडे बघत होते आणि हा माझ्याकडे बघून हात जोडून उभा....  गणरायाला एक फेरीही मारली तेव्हा ही माझ्या मागूनच.... काय बोलावे त्याला .... हसायला आले. तोच दिवस ..... त्यानंतर देवाकडे कधी मुद्दाम गेले असेन असे आठवत नाही.... आम्हीही एकत्र कधी गेलो नाही मग .... लग्न झाले तेव्हा गेलो होतो तेवढेच.... त्यानंतर त्या गणरायाशी अबोला धरला मी ... तो अजून पर्यंत........ !!


=========================================== to be continued



1 comment:

  1. खूपच छान कथा आहे.मी प्रत्येक कथा वाचलेली आहे.आणि येणारा भागची वाट पाहत असतो .अगदी मनापासून,वाट पाहतो येणाऱ्या भागाची

    ReplyDelete

Followers