All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Thursday, 24 October 2019

भटकंती .... नव्या वळणावरची !! .......( भाग १)



" काय गं .... कुठे लक्ष आहे तुझे.... कधी पासून हाका मारतो आहे मी. " आकाश सुप्रीला मोठ्याने आवाज देतं होता. सुप्री भानावर आली. " कुठे हरवलात मॅडम..... " आकाश सुप्री जवळ आला. सुप्रीने हलकीशी smile दिली. आणि समोर बघायला सांगितलं आकाशला. सूर्यास्त !! सुप्री तेच बघत होती कधीची. आताही , तिची नजर त्याकडेच गेली पुन्हा. आकाश हलक्या पावलांनी हळूच मागे चालत गेला. योग्य अंतरावर पोहोचला. सुप्रीकडे कौतुकाने पाहत होता. छान , मंद वारा सुटला होता. सुप्रीने हळूच मागे वळून पाहिलं. तोच क्षण !! आकाशने पटकन तो क्षण त्याच्या कॅमेरात कैद केला. सुप्रीने जवळ जाऊन तो फोटो बघितला.

सुप्री मागे वळून पाहत होती. काही केस वाऱ्याने चेहऱ्यावर आलेले. मागे सूर्यास्त. त्याचा नारंगी , सुवर्णमयी प्रकाश सुप्रीच्या केसांवर , पाठमोऱ्या शरीरावर. चेहऱ्यावर प्रसन्न भाव , हलकेसे हास्य. दूरवर अस्पष्ट पक्षांचे आकार आणि काहीसे ... कापूस पिंजल्या सारखे ढग..

किती सुंदर फोटो होता तो... बोलायचे झाले तर Amazing !!! आकाशनेच असे क्लिक करावेत. सुप्री कधीचा तो फोटो बघत होती. निरखून अगदी. तिचेच किती फोटो काढले होते आकाशने. सुप्रीनेच ते एका लॅपटॉप मध्ये भरून ठेवले होते. आकाशचाच तो लॅपटॉप. त्यानेच सुप्रीला दिला होता. त्यात त्याने क्लीक केलेले सर्व फोटो असायचे. खास करून सुप्रीचे काढलेले फोटो , त्यासाठी एक वेगळी जागा होती त्यात. सुप्रीने तो फोटो बघत कॉफीचा एक घोट घेतला. आज ती पुन्हा त्या कॅफे मध्ये आलेली. आकाशची आवडती जागा. शहरामधील.... त्यांच्या ठरलेल्या जागीच ती बसली होती.

आकाश !! कसा आहे ना तो .... पाखरा सारखा... हे असे फोटो बघितले कि हमखास आठवण येते त्याची. त्याला मोकळे सोडणे , हा आपलाच निर्णय होता ना.. चार वर्ष होतील आता येणाऱ्या पावसात. एकदाही फिरकला नाही शहरात. अर्थात माझी आठवण तर असेल त्याला. बोलला हि होता तसंच , कधी विसरणार नाही... कुठे असेल ना तो या वेळेस. विचार करता करता सुप्रीचे लक्ष वर आभाळात गेलं. मोकळं होते आभाळ. त्यात संध्याकाळची वेळ. पावसाला अजून वेळ आहे... दीड महिना तरी.. आणि गावात यायला साधारण एक महिन्याचा अवधी. पावसासारखा होता आकाश.... आहे. एकदा तरी ये ... तुझं आभाळ घेऊन ये .... शहरात... माझ्या आयुष्यात !! सुप्री कॉफी घेत मनात बोलत होती. पुन्हा त्या फोटो कडे नजर गेली. डोळ्यावरचा चष्मा सावरला तिने. लॅपटॉप बंद केला. तिथे असलेलं स्वतःचे सामान आवरले. मागे वळून काही राहिले आहे का ते पाहिलं. पुढे निघाली. पुन्हा थांबून वळून पाहिलं. काही सामान तर राहील नव्हते. आठवणी तेवढ्या रेंगाळत होत्या मागे त्याजागी. सुप्रीच्या ओठांवर थोडंसं हसू आले. चष्मा पुन्हा बोटांनी सावरला. निघून गेली तिच्या वाटेने घरी.

===============================================================================

आकाश- सुप्री !! शेवटची भेट ४ वर्षांपूर्वी. चार वर्ष झाली त्याच्या भेटीला, त्या पावसात, प्रवासात... त्यानंतर कुठे भटकत होता आकाश, हे त्यालाच माहित. त्या चार वर्षात खूप काही बदललं. संजनाचे लग्न ठरलेले. तेही गावाला. त्यामुळे गेले काही महिने ती तिच्या गावाला राहायला गेलेली. सुप्री तशी एकटी पडलेली. बोलायला कोणी नसायचे सोबत. संजना कधी कधी करायची फोन. तेव्हडेच... तिचे हसू तर आकाश सोबतच निघून गेलेलं जणू . तरी आकाशला तिने प्रॉमिस केलेलं ना... आकाशच्या घरी जायची ती वरचेवर. आजही ती तिथेच निघालेली.

" Hi सुप्रिया.... ये .. ये ... " आकाशच्या आईने दरवाजा उघडला.
" कश्या आहात आई... " सुप्रीने विचारलं.
" आधी आत तर ये.. काय घेणार ... चहा , कॉफी... " ,
" नाही नको आई... कॉफी घेऊनच आले. तुम्हाला भेटायला आले. " ,
" हो , मलाच भेटणार ना .... आकाश नाही आहे इथे... " आई पट्कन बोलून गेल्या. चेहरा पडला आईंचा.
" असो ... चल गॅलरीत बसू... ते आकाशने गुलाबाचे रोपटे लावले होते ना , आज सकाळीच त्याला कसे सुंदर फुल आले आहे बघ ... चल ... " दोघी गॅलरीत आल्या. त्या फुलाकडे पाहू लागल्या.
" आठवण येतं नाही का तुला आकाशची.... " आईने अचानक सुप्रीला विचारलं. अपेक्षित प्रश्न तरी अनपेक्षित वेळी....
" येते ... अशी सहजच त्याची आठवण येते.... त्यात त्याने काढलेले फोटो आहेत ना , आठवण आली कि बघत बसते फोटो... " सुप्रीने उगाचच smile दिली.

" सॉरी सुप्रिया ... मला माहित आहे तुला कसे वाटतं असेल ते... पण तुमच्या दोघांचा निर्णय होता ना तो .... मलाही विचारलं नाही जाताना त्याने... तसही त्याला आधी कधी अडवलं नाही आणि तो थांबला हि नाही कधी... आता परिस्थिती जरा वेगळी आहे ना... आधी कसे ... भटकायला गेला कि यायचा घरी काही दिवसांनी... चार वर्ष होतं आली आता... फक्त पत्र काय ती येतात त्याची... आता तर गेल्या ५ महिन्यात एकही पत्र आले नाही त्याचे. तो फिरतो , रमतो निसर्गात... ठाऊक आहे सगळे..... तरी ... मी आई आहे ना... काळजी वाटते... " जरा त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. सुप्रीने त्यांच्या खांदयावर हात ठेवला.
" असाच आहे ना तो लहानपणापासून.... " आईंनी डोळे पुसले.
" हो गं ... अगदी तसाच... वाऱ्यासारखा, नुसता इकडून तिकडे उड्या मारत राहायचा.... आमचे ना ... गावाला एक छानसं घर होते. तिथे जायचो कधी कधी... शनिवार- रविवारी.... घराच्या मागे ... असे मोठे जंगल..... तिथे जास्त आवडायचे त्याला... नंतर काही वर्षांनी ते घर विकून टाकलं त्याच्या पप्पानी, तेव्हा तर २ दिवस जेवला नव्हता तो. आधीपासूनच अबोल. कमी बोलतो. मोठ्या भावाशी छान जमायचे.... त्यानेही त्याचा बिझनेस सुरु केला आणि त्याचा वेळ त्यातच जाऊ लागला. आकाशचा मित्रच होता तो. आणखी अबोल झाला. हा ... इथे एक पूजा नावाची मैत्रिण होती. तीही त्याच्या सारखीच.... भटकंती करणारी... दोघांचे छान जमायचे. दोघे जायचे फोटोग्राफी साठी... एक दिवस तिनेही शहर सोडून दिले. आता आकाशने ..... " आई पुन्हा थांबल्या बोलायच्या. " बघ ना सुप्रिया ... आकाशला पुन्हा आणता येईल का शहरात... त्याला सांग तू आधी सारखाच येत - जात राहा शहरात... पण असा दूर नको जाऊस... " आईंना आता रडू आवरलं नाही. " आई ... येते मी ... सांभाळा स्वतःला... " त्यांच्या खांदयावर हात घट्ट दाबून ठेवला होता सुप्रीने.. आई शांत झाल्या तशी निघाली ती. आईंना काय माहित, माझ्या मनातला पाऊस... गेली चार वर्ष थांबतच नाही. सुप्रीने पुन्हा एकदा गॅलरीत बसलेल्या आकाशच्या आईकडे पाहिलं. बोटांनी डोळ्यावरचा चष्मा नीट केला. घरी निघाली स्वतःच्या.

===============================================================================

"आज्जी !!............ कशी आहेस... " कादंबरीने पूजाच्या आजीला मिठी मारली.
" अगं हो हो .... काय कुठे पळून जाते आहे का मी... " आजींना हसू आवरत नव्हते.
" तू नाही गं ..... आजी ..... मी गेली तर पळून , हि तुमची पूजा ..... मला पळवून नेईल कधी .... कळणार नाही... " कादंबरी तोंड वाकडं करत म्हणाली. आजीने तिचा गालगुच्चा घेतला.
" किती गोड आहेस ग तू ... त्या माझ्या पूजा इतकी नाही ... तरी आहेस गोड... " ,
" हो का ..... आजी बरी आहेस तू ... तुझ्या नातीची बाजू घेणार तू ... " उगाचच लटका राग आणत कादंबरी बोलली.
" अगं ... पण आहे कुठे माझी निरू ...तुझ्या सोबत असते ना ... " ,
" काय गं आजी ... " कादंबरीने आजीच्या गळ्यात हात टाकले. " तू आधी मला काही खायला दे ... ती येते आहे मागून .... तशीही ... कुचकीच आहे ती , मला असं भेटता आले नसते तुला... ती आधी आली असती तर.... आहे मागे ती... मी धावत आली पुढे... " ,
" अगं थांब जरा पोरी ... निरुला येऊ दे .... " आजी कादंबरीला थांबवत म्हणाली.
" बघ आजी .... उद्या तुझा वाढदिवस आहे... हे तिच्या लक्षात पण नव्हते. मी आहे म्हणून हो ... तुझ्या नातीची काळजी घेणारी... मीच आठवण केली तुझ्या बिर्थडे ची... तेव्हा कुठे आलो आम्ही... मग माझेच लाड केले पाहिजे तू ..... " कादंबरी म्हणाली.
" आजी ... !! हि कादंबरीच कुचकी , खडूस आहे ... माझेच लाड कर... " पूजाही आली तितक्यात. तिला बघून कादंबरीने आजीला मिठी मारली. पूजाही काही कमी नव्हती. तिने या दोघीना मिठीत घेतले.


सकाळ सकाळी आलेल्या दोघी. दुपारची जेवणे झाली तशी झोपून गेली कादंबरी. रात्रीचा मोठा प्रवास करून आलेल्या ना .... कादंबरी दमलेली, झोपून गेली. पूजा मात्र आजीच्या घरामागे झाडं - झुडुपे होती, तिथे जाऊन बसली. थोड्यावेळाने , पाठोपाठ आजीही आली.
" काय गं निरू , का बसलीस अशी... " आजीने पूजाला विचारलं.
" अशीच बसली आहे आजी... छान वाटते " आजी शेजारी येऊन बसली.
" तुला लहानपणापासून ओळखते... सांग ... काय विचार सुरु आहेत मनात... " पूजा आजीच्या मांडीवर डोके ठेवून निजली.
" एक जुना मित्र आहे .... त्याला भेटून येऊ का , असा विचार करते आहे.. आता आलीच आहे इथे , तर जाऊन भेट घेऊ असं विचार करत होती. " ,
" जा ना मग .... इतका काय विचार .... " ,
" नाही ग आजी... त्याच लग्न झालं असेल आता.. ४ वर्षांपूर्वी भेटला होता ... तेव्हाच त्याचे सुरू होते... " ,
" काय ? " ,
" माझ्या सारखा भटकायचा तो ... एवढी वर्ष भटकत होता. भेटली छान जोडीदार.... मग सुरु झालं ते मनातलं युद्ध.... तिला वेळ दयावा कि निसर्गाला.... शेवटी मला भेटून गेला तेव्हाच बोलत होता कि शेवटची भटकंती.... आता कसा आहे कोण जाणे.. मी गेले आणि पुन्हा त्याला ते जुने दिवस आठवले तर... हि भीती वाटते.. " आजी तिच्या केसांतून हात फिरवत होती.


" बाळ .... काही होणार नाही ... जाऊन ये तू... निदान त्या निमित्ताने शहर तर बघशील... नीट समजावले कि समजेल तो ... बरं !! तू किती दिवस आहेस आता ... " ,
" माहित नाही ... कदाचित ४-५ दिवस .. ",
" मग घरी .... " आजी पुढे बोलणार होती तर पूजाने थांबवलं तिला.
" आजी .... उद्या तुझा वाढदिवस ... दरवर्षी तुझ्यासाठी येते मी... पप्पा-मम्मी चा विषय नको " ,
" बर बाबा ... नको जाऊस ... पण आता आराम तर कर ... ",
" नको आजी ... जरा वेळ आणखी बसते ... ",
" ठीक आहे... तुला वाटलं झोपावे कि ये ... एव्हडा मोठा प्रवास करून आलीस .. आराम करावा माणसाने... " आजी आत जाऊन निजली.
" आराम कसला आजी... पावसाने कोसळणे आणि भटक्याने भटकणे .... हाच खरा धर्म.... नाहीतर आभाळातील ढग सुद्धा भटकत असतात ... त्यांना असतो का कधी आराम ... आराम कुठे कोणाला ... " पूजा मनात बोलली.

===============================================================================

" काय ... कशी आहेस गं " आकाश सुप्रीकडे पाहत म्हणाला. सुप्रीचे expression बघण्यासारखे.
" बरा आहेस ना ... बघ रे गणू... लोकांना वेड लागत चालेल आहे.. " संजनालाही हसायला आले.
" काय रे ... हे तुलाच विचारलं पाहिजे... कसा आहेस ... अचानक काय झालं... " ,
" असंच ... विचारावे वाटलं.. आठवण आली तिची... " आकाशच्या या वाक्यावर संजना - सुप्री दोघीही हसू लागल्या.
" खरच ... लोकं वेडी झालीत " सुप्रीला हसू आवरेना.
" अरे भेटतो कि आपण... जवळपास रोजच भेट होते. मग आठवण काय... " सुप्री....
" सहजच ... किती प्रेम तुझ्यावर ते सांगू शकत नाही. तुला कधी बोललोच नाही आधी.... इतके प्रेम आहे तुझ्यावर .... ",
" बाई बाई !! किती ते प्रेम ... " सुप्री जागेवरून उठली. आणि आकाशला मिठी मारली. आकाशला शहारून आलं.
" अरे !! एक गोष्ट विसरली... कॅमेराने फोटो काढतो... कधी सेल्फी घेतलाच नाही. " ,
" एव्हडे तर काढतेस सेल्फी संजना सोबत .... म्हणे सेल्फी घेतला नाही कधी... " ,
" तुझ्या सोबत रे लाडू .... तुझ्यासोबत एकही सेल्फी नाही माझा... चल ये संजना... लवकर ये ... " म्हणत तिघांनी छान pose घेतली आणि सुप्रीने पटकन सेल्फी काढला.

या तिघांचा एकमेव सेल्फी. सुप्री, आकाश काम करत असलेल्या मॅगजीनच्या ऑफिस मध्ये आलेली. आकाशच्या आईने सांगितलं होते ना ... जरा चौकशी कर आकाशची. त्यासाठी आलेली ती. त्याचे बॉस आलेले नव्हते अजूनही. तर सुप्री time-pass करण्यासाठी मोबाईल मधले फोटो बघत होती. तसेही आकाशने मोबाईल वर सुद्धा किती फोटो काढले होते. पण हा एकच सेल्फी आकाश सोबत. तोच बघत होती. इतक्यात सर आले.
" Hi सुप्रिया .... कशी आहेस ... किती महिन्यांनी आलीस ... यायचे ना वरचेवर " ,
" thank you सर ... सहजच आले... आकाश बद्दल विचारायचे होते. " ,
" चल , बाहेर नको... आता केबिन मध्ये बसू .... "

दोघे बसले केबिनमध्ये. " बोल ... काय सुरु आहे सध्या .... " ,
" काही नाही .... तेच रुटीन life सुरु आहे. काल आकाशच्या आईला जाऊन भेटले... तिनेच सांगतील कि जरा आकाश बाबत माहिती विचारून ये ... पत्र येतात त्याची. पण गेल्या ५ महिन्यात नाही आलं पत्र... " ,
" ठीक आहे... त्याचा शेवटचा मेल आला तो ३ महिन्यापूर्वी. त्यांनी काढलेले फोटो काढतो ना .. त्याचा मेल. त्यांनंतर नाही. " ,
" बर .... सर .... एक request करू का .... त्याला एकदा सांगा ना इथे यायला.... माझ्यासाठी नाही... त्याची आई... सारखी आठवण काढत असते ती... ",
" सुप्रिया... जसा तो तुमचा जवळचा माणूस ... आमच्याही कुटुंबातला आहे तो ... मलाही वाटते काळजी त्याची. मीही ४ वर्षांपूर्वी बघितलं होते त्याला... त्याचे फक्त मेल येतात .... ना मोबाईल जवळ कि लॅपटॉप .... कुठून मेल करतो देव जाणे.... जेव्हा जेव्हा मेल येतात त्याचे... त्या प्रत्येक मेल ला मी रिप्लाय करतो.... तेच तर लिहितो, इथे येऊन काम कर... एकदा तरी ये भेटायला... त्याचे उत्तर देतच नाही. " सुप्री काय बोलणार यावर.
" ठीक आहे सर ... काही कॉन्टॅक्ट झाला तर कळवा ... निघते मी... " सुप्रिया निघाली.
" सुप्रिया ... " सरांनी थांबवलं. " पहिल्या सारखी नाही वाटत तू ... आधी किती गोड हसायचीस.. बडबड ... उत्साही... आता काहीच नाही. साधीशी smile सुद्धा येत नाही तुझ्या चेहऱ्यावर. ते डोळे ... सतत काही शोधत असतात.... बरोबर ना ... " सुप्री त्यावर काही न बोलता साधंसं हसली आणि निघाली. सरांना काय सांगू.... माझं "आभाळ " हरवून गेलं आहे कुठेतरी. काळोखी दाटली आहे.... सर्वत्र ... सुप्री मनात बोलत निघून गेली.

===============================================================================

" चल गं कादंबरी .... किती तो मेकअप करतेस .. कोणी येणार आहे का बघायला " पूजा कादंबरीला हाका मारत होती. शेवटी आली कादंबरी घराबाहेर. सोबत आजी होतीच.
" बघ गं आजी ... कधी मेकअप करते का मी ... जराशी पावडर आणि केसांना तेल लावलं... याला काय मेकअप म्हणतात का ... किती कुचकी असतात माणसं ...." कादंबरी पूजाला वेडावत बोलली.
" अगं .... केकच आणायला जायचे आहे ... त्यात एवढे काय सजायचे... ",
" चल ... तुला ना कसली आवडच नाही.... " कादंबरीने पूजाचा हात पकडला आणि रागातच तिला पुढे घेऊन आली. पूजाला गंमत वाटली.
" किती तो राग ... नाकाचा शेंडा हलतो आहे बघ ... " पूजा किती हसत होती...
" जा....  ना .... आता का येतेस .... " कादंबरीला अजून राग आला.
" चल ... तुला आज माझ्याकडून ट्रीट ... almond चे ice cream..... " त्यावर कादंबरी खुश...
" ठीक आहे ... पण त्यानंतर सीताफळचे ice cream ... नाहीतर राग कमी होणार नाही .... समजलं ना ... " ,
" हो हो ... देवीजी... " पूजाने हात जोडून नमस्कार केला तिला. तिनेही तथास्तु केले हाताने. दोघी हसू लागल्या आणि निघाल्या आजी साठी केक आणायला.    

त्यांच्या ओळखीच्या दुकानात आल्या, दरवर्षी इथूनच आजीच्या बर्थडेचा केक घेऊन जायच्या. तिथेच वेगवेगळ्या फ्लेवरची ice-cream मिळायचे. खात बसल्या दोघी. ice-cream खाता खाता पूजा हरवून गेली विचारात पुन्हा.
" कसला विचार करते आहेस .. " कादंबरीने टपली मारली तिच्या.
" काही नाही ... चल निघू... " पूजाचा मूड एकदम बदलला. केक घेऊन बाहेर आल्या दोघी. तरी पूजा वेगळ्याच विचारात. कादंबरीने थांबवलं तिला.
" काय झालं ... निरू... " तरी पूजा शांतच .... " आकाशचा विचार करते आहेस ना ... " पूजाने कादंबरीकडे पाहिलं.
" हो ग ... डब्बूला भेटू का ... इथे आल्यापासून तोच विचार घोळतो आहे मनात... " ,
" एवढंच ना ... चल जाऊन येऊ मग ... " ,
" तसं नाही गं ... " पूजाने जे आजीला explain केलं तेच कादंबरीला सांगितलं.
" सारे कळते .... पण एकदा भेटायला काय हरकत आहे.. " पूजाला पटलं तेही.
" एक काम करू मग.. आता घरी जाऊन केक कापू ... बर्थडे सेलेब्रेट करू ... संध्याकाळी निवांत जाऊ ... आताही तो त्याच्या ऑफिसमध्ये असला तर ... संध्याकाळी ऑफिस मधून येण्या आधी जाऊ आणि surprise देऊ त्याला. "  कादंबरी पूजाचे हे बोलणे छान वाटले.

ठरल्याप्रमाणे , आजीचा वाढदिवस साजरा झाला. संध्याकाळी उरलेली कामे संपवून , बरोबर ५च्या सुमारास पूजा कादंबरी सोबत निघाली. किती वर्षांनी ती या एरियामध्ये येत होती. नाहीतर कधी शहरात आलीच तर कादंबरी जायची पूजाच्या आई-वडिलांना भेटायला. आज तीच आठवण आली पूजाला. आकाशचे घर पूजाच्या घरापासून थोड्या अंतरावर. तीच जुनी वाट... आता काही नवीन बांधकामे झालेली..... डब्बू आणि मी ... एकत्र जायचो ना या वाटेनं ... शाळेत. पूजाला आठवलं. तिथे एक मोठा वड होता. तिथे रात्री बसून असायचा आकाश. रात्री जेवून झालं कि बाहेर यायचा. पाय मोकळे करायला. तेव्हा बोलायचो आम्ही. या अश्या आठवणी माझ्या.... छान वाटतात.

चालत चालत दोघी आकाशच्या घरासमोर आल्या. कादंबरीला भारी हौस. पटकन जाऊन बेल वाजवली. " काय ... काही आहे कि नाही डोक्यात... तू ओळखतेस का डब्बूच्या आईला... " ," नाही ... पण माझी निरू ओळखते ना .. " त्याचवेळेस आकाशच्या आईने दरवाजा उघडला. " कोण ... " त्यांनी कादंबरीला विचारले. " मी ... कादंबरी आणि हि तुमची निरू .. i mean ..पूजा !! " कादंबरीला ओळखले नाही , पण पूजाचे नाव ओळखीचे. पूजाला बघितलं.

पूजाला बघून गहिवरून आलं त्यांना. मिठी मारली तिला. ५ -१० मिनिटे तशीच गेली. कादंबरीला राहवत नव्हते.
" किती वेळ ते .... इथे दारातच उभे राहणार का ... आत तरी चला कि ... " तेव्हा कुठे या दोघींची मिठी सुटली.
" किती वर्षांनी आलीस... " आकाशची आई तिच्या गालावरून हात फिरवत होती.
" आई .... कश्या आहात... " ,
" मी छानच ... पण तू गेलीस ... ती आलीच नाहीस गं ... निदान आकाशला भेटायला यायची तू... तेही बंद केलेस .. ,मला तरी यायचे ना भेटायला.. ",
" तसे नाही आई... मी कधीच शहर सोडले होते. ... " ,
" हो .. डब्बू सांगायचा तुझ्याबद्दल.... भटकत असतेस ते .... " या दोघीचे बोलणे सुरु होते , तोपर्यंत कादंबरी त्याचे घर बघत फिरत होती. आकाशने काढलेले काही फोटो होते तिथे भिंतीवर ...
" Wow !!! तुमचा डब्बू ... भारी फोटो काढतो... " कादंबरी मोठ्याने बोलली.
" हि कोण .... " पूजाला आकाशच्या आईने विचारलं.
" हि कादंबरी .. म्हणजे तिचे खरे नाव माहीत नाही... मला भेटली होती तेव्हा हेच नाव सांगितलं होते.... माझ्या सोबतच फिरत असते हि... " ,
" हो काकी ... आम्ही दोघी एकत्र फिरतो ... bestie आहे ना मी तिची... ",
" आई ... पागल , वेडी आहे हि खूप ... लोकांना काय वाटेल कधीच विचार करत नाही. तरी किती चांगली आहे मनाने... " ,
" ते राहू दे गं .... तुझा डब्बू ... म्हणजे आकाश... इतके छान फोटो काढतो... लास्ट वेळेला भेटला होता... तेव्हा मीच त्याला सांगत होते कि कसा use करायचा कॅमेरा.... तेव्हा तर एका शब्दाने बोल्ला नाही .... किती छान फोटोग्राफि करतो .... खडूस माणूस ... "

" तुला माहीतच नाही वाटते मग .... आकाश स्वतःहून काहीच सांगत नाही... " ,
" हो ... डब्बू तसाच आहे.. विचारलं तर सांगेल असेही नाही... मोठा , फेमस फोटोग्राफर आहे माझा डब्बू .... " आई बोलल्या. कादंबरी फोटो निरखून बघत होती.
" पण हे फोटो ना .... कुठंतरी बघितले आहेत असे वाटते मला... ",
" अरे ... मॅगजीन मध्ये .... wild India .... बघतेस ते फोटो ... online बघत असतेस ना ... "
त्यावर कादंबरीचा विश्वास बसेना. ज्या फोटोग्राफरला follow करते, ज्याचे हे असे सुंदर क्लीक बघून बघून मी फोटोग्राफी शिकले.... आणि तो .... आमच्यासोबत प्रवासात होता... तो हा आकाश.... आणि मी त्याला सांगत होते कसे फोटो काढतात ते ..
" O .... M .... G.... किती पागल आहे मी ... इतके दिवस सोबत होता तो .... ते काही नाही .... काकी बोलावा ना त्याला... कुठे आहे ... " कादंबरी लाडात आलेली.
" हा आई ... त्यालाच भेटायला आलेली... तो संध्याकाळी ऑफिसमधून येईल आणि मी त्याला surprise देईन... असा प्लॅन हिनेच केला... म्हणून आता आलो आम्ही. आकाश आला ऑफिसमधून कि यायचा आहे. " पूजाने हे विचारलं आणि आईचा चेहरा पडला. पूजाला समजलं. " आई काय झालं ... " आकाशच्या आईला रडू आवरलं नाही.

पूजाने सांभाळले. " आई ... काय झालं .. सांगा मला. " आईने डोळे पुसले.
" तुला कधी भेटला होता आकाश...",
" म्हणजे ४ वर्ष... हा ..तेव्हाच भेटला होता . पण असे का विचारता ... " ,
" तेच .... तेव्हा पासून आलाच नाही घरी तो .... " ,
" पण निघाला तेव्हा सुप्री होती सोबत त्याच्या .... एकत्र तर गेले .. " कादंबरी पटकन बोलली.
" सुप्री - संजना ... त्या दोघीच आल्या शहरात..... आणि आकाशने सुप्रीकडे निरोप पाठवला कि तो तिथे राहणार आहे... कधी येईल ते सांगू शकत नाही... " ,
" हे तर माहीतच नाही .... त्या दोघांनी असा का निर्णय घेतला ... " ,
" त्याने असा का निर्णय घेतला माहित नाही.... पण तेव्हा पासून आलाच नाही... सुप्री येते भेटायला कधी कधी .... आकाश नाही... " पुन्हा रडू लागली.

पूजासाठी तरी हा मोठा धक्का होता. " अगं .. पुजू .... काय झालं हे ... " कादंबरी विचारात पडली. आपण surprise देयाला आलेलो .... आपणच surprised झालो. पूजाला समजत नव्हते काय करावे पुढे.
" आई ... आकाशने काय सांगितलं.....सुप्रीला... म्हणजे त्याचे काय बोलणे झाले ते .... काय बोलली सुप्री " ,
" मघाशी सांगितले तेच ... " आईंना पुढे बोलणे जमलं नाही. पूजा कादंबरी जवळ आली.
" काय यार ... कुठे गेला आकाश... आणि शाने ... मला का सांगितलं नाहीस तो एवढा मोठा फोटोग्राफर आहे ते ... " ,
" थांब ग .... कादंबरी ... मधेच काय तुझे .... आता काय करावे ते सांग " ,
" मला वाटते ना .... आपण सुप्रीला भेटावे ... तिलाच माहित आकाश कुठे आणि का गेला ते ... " ,
" Good idea ... " पूजा आकाशच्या आईजवळ आली.
" सुप्री येते ना भेटायला .... ती काही बोलते का आकाश कुठे आहे ते ... " ,
" नाही ... तिला कसे माहित असणार .. तिला मी किती वेळा विचारते ... तिला नाही माहित.. " ,
" मग तिला आम्ही भेटू शकतो का ... नाहीतर तुम्ही तिचा मोबाईल नंबर द्या... " आकाशच्या आईने सुप्रीचा नंबर दिला. " आई ... मी आता निघते ... काही करून सुप्रीला भेटावे लागेल. " ,
" बघ ना पूजा , जमल्यास आकाशला सांग ना ... इथे यायला .... डोळे भरून बघायचे आहे त्याला ... "

पूजा कादंबरी बाहेर आल्या. पूजाने लगेच सुप्रीला कॉल लावला. पहिल्यांदा उचलला नाही. दुसऱ्या वेळेस उचलला.
" हॅलो सुप्री... " ,
" सुप्रिया बोलते आहे ... आपण कोण ... ",
" मी पूजा .... सुप्रिया म्हणजे आकाशवाली सुप्री ना .... " ,
" हो... तीच .. पण तुम्हाला ओळखले नाही मी ... " ,
" सुप्री .... मी .... पूजा .... आकाशची मैत्रीण.... आपण भेटलो होतो प्रवासात ... आठवलं का ... " प्रवासाचे नाव काढलं आणि सुप्रीने ओळखलं तिला. तिनेच तर सांगितलं होते, आकाश कसा आहे ते.
" हो हो ... आठवलं ... पूजा - कादंबरी .... जिप्सी ... right !! " ,
" हो ... तीच मी ... ",
" कशी आहेस ? " ,
" मी ठीक आहे ग ... पण ते जाऊ दे .... तुला भेटायचे आहे... " ,
" मला ..... कशाला .... आणि तू काय शहरात आली आहेस का ... " ,
" हो... शहरातच आहे .... आकाशच्या घरी जाऊन आले. तिथे जाऊन वेगळंच कळलं.... तू भेट मला आधी ... " सुप्री त्यावर काही बोलली नाही.
" हॅलो .... सुप्री .... सुप्री.... आहेस ना ... कॉल चालू आहे ना .... हॅलो ... " तेव्हा पुन्हा सुप्रीने विचारलं तिला.
" तुला का भेटायचे आहे मला .... माहित नाही ... भेटू तरीही... ",
" कुठे येऊ ... ",
" मी आता ऑफिसमधून निघते आहे... तुला msg करते एक पत्ता ... तिथे ये ... ",
" ठीक !! " म्हणत तिने कॉल कट्ट केला. सुप्रीने बोलल्याप्रमाणे एक पत्ता पाठवला होता , पूजा-कादंबरी लगेच पोहोचल्या तिथे.

सुप्री ५ मिनिटांनी पोहोचली. पूजा तिला बघून जरा चाचपली. तेव्हा पाहिलेली सुप्री आणि आता समोरून चालत येणारी सुप्री, प्रचंड तफावत दोघीमध्ये. डोळ्यावर चष्मा , केस मोकळे सोडलेले, गळ्यात स्कार्फ , खांदयावर छोटीशी बॅग , साधासा ड्रेस आणि निस्तेज चेहरा... " Hi पूजा .... " सुप्रीने आल्या आल्या तिला मिठी मारली. " कशी आहेस " कादंबरीने विचारलं. " चला .. बाहेर बोलण्यापेक्षा बसून बोलू. इथे एक cafe आहे ....आकाशची आवडीची जागा.... तिथे जाऊन बसुया... " आकाशचे नाव सुद्धा तिने निरसपणे घेतलं.

" हि आकाशच्या आवडीची जागा ... आम्ही इथे बसायचो ... " सुप्री खुर्चीवर बसत म्हणाली. कॉफी आली.
" तू कधी आलीस शहरात... " सुप्रीने कादंबरीला विचारलं.
" आम्ही कालच आलो." कादंबरी बोलली. पूजा अजूनही सुप्रीकडे पाहत होती. तिला न्याहाळत होती. सुप्रीचे लक्ष गेलं तिच्याकडे.
" काय झालं पूजा ... कधी पासून माझ्याकडे बघते आहेस.... " ,
" काही फरक आहे नक्की .... आपण जेव्हा भेटलो होतो , तेव्हाची तू .... आणि आता माझ्या समोर जी व्यक्ती बसली आहे... त्यात खूप फरक आहे. " सुप्री पूजा काय बोलते आहे हे जाणून होती. " आकाशच्या घरी जाऊन आले मी ... तेव्हा कळलं कि आपण जो प्रवास केला त्यानंतर आकाश माघारी परतला नाही... असं का ... काय बोलणे झाले तुमचे ... " सुप्री काही न बोलता तशीच पूजाचे बोलणे ऐकत होती. छान हवा सुटली होती. सुप्रीचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर येतं होते. सुप्री वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेनं पाहत होती. 

" आकाशला मोकळे जगणे पसंद होते. माझ्यामुळे तो स्वतःला बंदिस्त करून ठेवणार... माझाच निर्णय होता कि त्याला आयुष्य जगायला मिळाले पाहिजे. मीच बोलले कि तू जा भटकंती ला... गेला तो ... जातच नव्हता... मी बोलले म्हणून... गेला .... मी विचारले त्याला ... पुन्हा कधी येशील... माहित नाही बोलला... कुठे गेला माहित नाही. कारण त्याला जाताना बघू शकत नव्हते. मी , संजनाचा हात पकडून पुढे आली. आकाश त्याच्या वाटेने निघून गेला. " ,
" अगं ... पण थांबवले का नाही त्याला... " कादंबरी.
" नाही थांबवू शकली. एवढा भावुक झालेला कि मलाच पहावले नाही. " पूजा काय बोलणार यावर.

थोडावेळ शांततेत गेला. " सध्या तो कुठे असतो ... हे माहित आहे का तुला ... " पूजाचा प्रश्न.
" नाही "
" एक प्रश्न पडला आहे मला. आकाश ... म्हणजे एक फेमस फोटोग्राफर आहे. हे मला आधी माहित नव्हतं. इतर फॅन्स सारखी मीही त्याची मोठी फॅन आहे. त्याचे येणारे फोटो .. मी नियमित बघत असते. गेली ४ वर्ष ... तो शहरात नाही. मग त्याचे फोटो तर असतात त्यांच्या site वर ... ते कसे .... " ,
" तो जिथे फिरतो , भटकतो ... तिथले फोटो क्लिक करतो आणि जिथून इंटरनेटची सुविधा मिळेल तिथून त्याच्या ऑफिसमध्ये मेल करतो. तसेच करतो तो गेली ४ वर्ष. शेवटचा मेल आला तेव्हा तो केरळमध्ये होता. ३ महिन्यापूर्वी.... आता त्याच्या सरांना देखील माहित नाही तो कुठे असतो ते ... " ,
" तुम्ही त्याला कधी इथे बोलवायचा प्रयत्न केला नाही का... " कादंबरीच्या या प्रश्नावर सुपारीला उगाचच हसू आलं.
" त्याचे सर .... जेव्हा जेव्हा आकाश मेल करतो , तेव्हा त्याला ते इथं यायला सांगतात. गेल्या ४ वर्षात एकदाही कॉल केला नाही .... ना मला ... ना त्याच्या आईला ... फक्त पत्र पाठवतो. त्यातच लिहितो ... कुठे असतो , काय करतो .... त्या पत्रात शेवटी १ ओळ असते , सुप्री कशी आहे...बस्स !! एवढाच काय तो त्याच्याशी कॉन्टॅक्ट " सुप्रीने पुन्हा बोटांनी चष्मा सावरला.
   
चार वर्ष , मोठा कालावधि.... कादंबरी विचार करू लागली. " आणखी एक प्रश्न आहे ... जरा पर्सनल आहे ... विचारू का ... " सुप्रीने होकारार्थी मान हलवली.
" ४ वर्ष ... एवढा मोठा काळ तू त्याची वाट बघत आहेस. पुढे तो कधी येईल हे माहित नाही. तुला वाटलं नाही का ... काही वेगळा विचार करावा... " ,
" तुझे म्हणणे काय ते कळलं मला. आकाशशी ब्रेकअप ... बरोबर ना ... " ,
" हो ... " , पुन्हा हसली सुप्री उगाचच.
" त्याला अपघात झालेला. एक वर्ष तो तिथे रानावनात फिरत होता. तेव्हाही त्याचे माझ्यावर प्रेम होते. आता तर तो कुठे तरी आहे सुखरूप .... तरी त्याचे माझ्यावरच प्रेम आहे हे माहित आहे मला. त्या अपघातात सर्व विसरलेला, त्याला आठवत होते मी फक्त. हे असे प्रेम कुठे मिळते. त्याने खरं सुख दाखवलं मला. आणि त्याला सोडून देऊ. फरक इतकाच कि तो नजरेसमोर नाही. माझे मनापासून प्रेम आहे त्यावर. आणि तो येईल परत माझ्यासाठी.... हि खात्री आहे मला. " 

कोण काय बोलणार यावर. बोलण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही. " निघूया का .... मला माझ्या घरी जावे लागेल.. काही काम आहे... " सुप्री बोलली. " भेटू पुन्हा ... शहरात आलीस कि कॉल करत जा .. भेटू आपण .. " सुप्री बोलून निघून गेली.
" डोळ्यात पाहिलं मी तिच्या ... आकाशला शोधतात तिचे डोळे. " पूजा कादंबरीला बोलली.

या दोघीही घरी आल्या. रात्रभर पूजा तळमळत. आकाशला तेव्हा सोडले नसते तर. मनात एकच विचार. सकाळ झाली तरी तेच विचार. कादंबरी सकाळीच फोटोग्राफी साठी निघून गेलेली. पूजा आजीच्या घरामागे बसून होती. आजींना कळलं ते पण पूजाला काही बोलली नाही. कादंबरी जशी आली तशी तिने बाजूला बसवलं.
" आपण आकाशला पुन्हा शहरात घेऊन येऊया का ... " ,
" possible आहे का पूजा ... " ,
" माहीत नाही ... पण try तर केले पाहिजे ना... " ,
" नक्की काय करायचे .. " ...कादंबरी.. 
" सुप्रीला आज पुन्हा भेटूया ... तिला आपण सोबत घेऊन गेलो तर... " कादंबरीला प्रश्न पडला.
" ती येईल का ... आपल्या सोबत... " ,
" ते आपण नको ठरवूया ... तिलाच जाऊन विचारु... " म्हणत पूजाने सुप्रीला लगेच कॉल लावला. तिथे संध्याकाळी भेटायचे ठरले.

पूजा - कादंबरी आधीच पोहोचल्या होत्या. सुप्री आली. " Hi .... कालच तर भेटलो ना ... लगेच पुन्हा भेट... काय झालं .... असो , चला आत जाऊन बसू... " सुप्री पुन्हा कॅफेमध्ये घेऊन जात होती.
" नको ... आत नको ... जास्त वेळ लागणार नाही. बोलायचे आहे फक्त... " कादंबरी बोलली.
" हो ... मग आत जाऊन बोलू ना ... बाहेर कशाला. ? " ,
" नको ... थांब सुप्री.. थेट मुद्द्यावर येते मी... " पूजा ...
" मला माहित आहे , आकाशचे तुझ्यावर किती प्रेम आहे ते... आणि त्याच्या सुखासाठी तुझा निर्णय घेतला तू ... पण आता त्याला पुन्हा इथे ... घरी यावे लागेल .... असे वाटते मला... " सुप्रीला यावर काही बोलायचे नव्हते.
" बोल सुप्री ... बोल ना काही... " ,
" काय बोलू पूजा ... हे सर्व किती वेळा करावे... आधी त्याला अपघात झाला होता, तेव्हा किती ठिकाणी शोधलं... त्यानंतर त्याची इथे शहरात घुसमट होते, म्हणून त्याला photography competition साठी पाठवलं तर भलतीकडेच गेलेला. त्यासाठी पुन्हा शोधाशोध... आताही तेच करू का ... " ,
" तुला त्याची गरज आहे कि नाही... " कादंबरी बोलून गेली. सुप्रीने एकदा पाहिलं तिच्याकडे
" गरज ?? आहे ना ... खूप .... मलाही आठवण येते त्याची.... कोण आहे इथे माझ्याशी बोलायला... त्याच्याशीच तर बोलायचे ना .... पण किती वेळा मी त्याग करायचा..... " सुप्री पटपट बोलली.   
" बघ सुप्री ... आकाशला त्याचे जीवन जगता यावे म्हणून तू केलंस. आता त्याला पुन्हा यावेच लागेल. निदान तुझ्यासाठी तरी .... " पूजा...
" कुठे शोधणार आहेस... त्याचा काहीच पत्ता नाही. " सुप्रीने विचारलं.
" आता कुठे असेल तो... ते त्यालाच माहित, पण पावसाळा एका महिन्यावर आला आहे. आणि पावसात तो नक्की येईल .. त्याची अशी एक जागा मला माहित आहे ... तिथे तो दर पावसाळ्यात एकदा तरी जातोच ... आपण पाऊस सुरु होण्याआधी तिथे जाऊ... " सुप्रीला काय रिऍक्ट व्हावे ते कळत नव्हते.
" बोल सुप्री ... पुढच्या ४-५ दिवसात आम्ही निघणार आहोत.. आकाशला पावसात त्या गड - किल्ल्यावर जायला आवडते... तो येईल ... मला वाटत तुही आमच्या सोबत यावंसं... तुला बघून येईल तो परतुनी " पूजा एवढे बोलली तरी सुप्री काही बोलेना . " विचार करायला तुझ्याकडे ४ दिवस आहेत .. मी नक्की त्याला घेऊन येणार ... " असे बोलून पूजा कादंबरीला घेऊन निघाली

सुप्री घरी आली. फ्रेश होऊन वर गच्चीवर गेली. आजकाल घरी आली कि तिचा बराचसा वेळ गच्चीवर जायचा. आज जरा आभाळ भरून आलेलं. पावसाला तर अजून एक महिना बाकी आहे. कदाचित , या ढगांची वाटचाल गावाच्या दिशेने असावी. आता जरा आराम करण्यासाठी थांबले असावेत सारे. सुप्री त्या ढगांकडे पाहत विचार करत होती. कदाचित आकाशच्या भेटीला तेही आतुर असतील. पावसात भेटतो आकाश सर्वाना.... मलाही पावसात भेटला ना....  या विचारानेच तिच्या ओठांवर हसू आले. त्याच्या सारखा तोच.... काय बोलायचा , नाव विचारलं कि .... " मिस्टर A "... छान वाटायचे त्याच्या सोबत... माझा भूतकाळ सांगितला होता त्याला... माझे तेव्हा नुकतेच ब्रेकअप झालेलं.. कशी राहायची मी... त्याने किती छान समजावून सांगितली life .. त्याला विसरू शकत नव्हते , तरी निव्वळ आकाशमुळे मी  ' move on ' करू शकले, नंतर त्यानेच मला माझ्या भूतकाळासहित आपलेसे केले.  

सुप्री आठवणीत रमली. अचानक वाऱ्याचा एक झोत तिच्याकडे झेपावला. वाऱ्याने सर्व केस विस्कटून टाकले तिचे . तेव्हा कुठे ती वर्तमानात आली . केस सावरले तिने. गेल्या ४ वर्षात आयुष्याच्या सर्व घड्या अश्या विसकटून गेल्या आहेत. किती try केलं मी , तरी आकाश शिवाय सर्व उणे , रिकामेच वाटते. त्याच्याशिवाय प्रत्येक पाऊस कोरडाच होता , आभाळ निळेशार करणारा तोच... पाऊस आणणारा हि तोच... रात्रीचा चंद्र लपवून चांदण्यांची रात्र करणारा हि तोच... कुठे निघून गेलास ... भास होतात तुझे.. सगळीकडे .....  आरशात सुद्धा बघितले कि तूच दिसतोस.... तुला भेटायचे किती प्रयत्न केले मी मनातून.... पण बंधने.... किती ती ... नाही तोडू शकले त्यांना..... तू बोलायचास ना ... शहरात जीव घुसमटतो ... आता तू गेल्या पासून मीही तेच अनुभवते आहे रे... तूच माझा श्वास होतास ना... काय रे आकाश... असं का वागतोस तू ... माझी काळजी का वाटत नाही तुला.... प्रत्येक वेळेस मीच का विरह सहन करायचा... दरवेळेस ... मीच यायला पाहिजे का तुला घेऊन यायला... स्वतःहून ये ना कधी .... माझ्याकडे... नाही आठवण येतं का माझी.... पत्रात दोन ओळी लिहिल्या कि झालं का ... मला नाही का मन ... प्रेम तर आहे ना इतकं.. तुझ्याकडचं प्रेम तू मला दिसलं ... अगदी भरभरून .... वेड्यासारखं प्रेम ... कितीही रागावली तरी मनवायचा मला... रुसली कि हसवायचा ... माझी चूक असली तरी किती वेळा सॉरी बोलायचा तू .... माझ्या एका मेसेजची वाट बघत राहायचा... पण प्रेम देणारा सोबत नसेल तर काय फायदा त्याचा. कुठे आहेस तू आकाश.. इतका का वैतागलास आम्हाला. तुझ्याशिवाय अधुरी आहे रे हि सुप्री.  माझे हसू तुझ्यासोबत घेऊन गेलास... पाहिजे आहे मला ते पुन्हा... माझी नजर ... तीही घेऊन गेलास .... पाऊस आहेस ना माझा तू .... सोबतीची सर बनून राहीन ....ये ना आकाश... नाही करमत तुझ्याशिवाय.... त्या गणू साठी तरी ये ना ..... ये ना यार ... तुझं भरलेलं आभाळ घेऊन ये... तहानलेली आहे मी... ये ना रे ..... यंदाच्या पावसात तरी ....  सुप्रीला भरून आलेलं. चष्म्याच्या काचांमधून तिचे भरलेले डोळे आता स्पष्ट दिसत होते. मात्र त्या अश्रूंना रोखायला ना संजना होती, ना आकाश.... पावसाची सर यावी तस सुप्रीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. गेल्या ४ वर्षात रडली नव्हती ती. इतक्या वर्षाचे दुःख .. अचानक बाहेर आलं. रडू लागली सुप्री. 

===============================================================================

डोंगरातील रानावनातून .... ७-८ जणांचा घोळका चालत होता कधीच... अगदी पहाटेपासूनच.... कदाचित कुठेतरी निघालेले..... त्यांचा म्होरक्या सर्वात पुढे... बाकीचे , त्याच्या मागून येणारे .... अडखळत , धडपडत चालत होते. तो मात्र अगदी नेहमीची वाट असावी असा सराईतपणे चालत होता , त्या झुडुपातून... दगडांतून, पुढे आणखी अर्धा तास चालल्यानंतर सारेच त्या जंगलातून बाहेर आले. त्यांचा म्होरक्या सोडून बाकी सर्वच दमलेले.

बाहेर आले तशी सर्वांनी आराम केला. त्यातल्या एकाने विचारलं... " सर ... दमला नाही तुम्ही... अजूनही ताजे -तवाने वाटता... आणि किती भरभर चालता तुम्ही .... कस काय ... " त्यावर तो हसला फक्त.
" तुम्ही जास्त बोलत नाही का ... काही विचारलं कि फक्त smile देता ... आणि तो कॅमेरा .... चालू आहे ना ... गेले २ दिवस सोबत आहात आमच्या, एकदाही त्याचा वापर झालेला बघितला नाही मी... " एका मुलीने विचारलं.
" चालू तर आहे ... पण काही छान दिसलं तरच फोटो काढतो... बर ... ते राहू दे ... जरा आराम करा ... मग निघू... पुढे ... "

पुढे आणखी अर्धा तास आराम करून सारे तयार झाले पुढे निघायला. त्या म्होरक्याने सांगितले आणि सर्व निघाले. साधारण १ तास चालून आल्यावर त्याने सर्वांना थांबायला सांगितलं.
" काय झालं सर .... थांबलो का ... " ,
" तुमचा मार्ग आला .... " ,
" म्हणजे ... ?? " ,
" माझा तुमच्या सोबतचा प्रवास संपला. हि समोर जी पायवाट आहे ना ... तिथून पुढे १० मिनिटांवर डांबरी रस्ता लागेल.... तिथून तुम्हाला शहरात जाणारी वाहने मिळतील... " हे ऐकून साऱ्यांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना मिठी मारून झाल्या.

" खूप खूप थँक यू सर.... तुम्ही होता म्हणून वाचलो .... जंगलात वाट चुकलो ... आणखी पुढे गेलो असतो तर आणखी संकटात सापडलो असतो. तुम्ही देवा सारखे भेटलात ... " ,
" पुढल्या वेळेस कोणी जाणकार असेल अश्या जंगलाचा ... तरच या ... मी नसेन प्रत्येक वेळेस.... " ,त्याने हसून उत्तर दिले. एका मुलीला प्रश्न होताच.
" तुम्ही तर शहरातले आहात ना .. तसेच वाटता ... आमच्याच सोबत चला ना ... एकत्र जाऊ ... " त्या प्रश्नावर उत्तर आले नाही त्याचे ... शहराकडे जाणारी पायवाटच हरवून गेली आहे माझी.... अनोळखी झाल्या आहेत त्या पायवाटा...
" सर !! " तिने पुन्हा हाक मारली.
" नाही ... माझी वाट वेगळी आहे आणि तुमची वेगळी.... ",
" मग पुन्हा होईल का भेट ... शहरात ... " ,
" भेट होईल .... पण अश्या रानात - वनात ... " त्याने हसून उत्तर दिलं.
" कधीतरी येणार तुम्ही शहरात ... तेव्हा नक्की भेटणार मी.... by the way.... तुमचे नाव सांगितले नाही तुम्ही .... सगळेच " सर,  सर " करतात... " ,
" नाव जाणून काय होणार आहे .... मी तसाच आणि तुम्हीही तसेच राहणार ना .... " ,
" तरी ..... सर नाव सांगा कि ... " नाव न सांगताच तो त्याच्या वाटेकडे वळला ... पुन्हा त्या झाडीत... त्या रानात जाणाऱ्या वाटेकडे ... बाकीचा ग्रुप त्यांच्या वाटेने निघाला , शहराकडे..... तरी त्या मुलीला नाव जाणून घ्यायचेच होते ... तिने दुरूनच त्याला हाक मारली.

" ओ !!! ... स ...... र ..... !!! नाव ........ सांगा ........ ना ...... तू .... म..... चे ...... " तो थांबला . मागे हसतच बघत होता. पाठीवरली बॅग सरळ केली. आणि मोठ्या आवाजात बोलला .... " मिस्टर A " !!

============================== to be continued ...............................

3 comments:

  1. Jayshree R. Thukarul26 October 2019 at 07:29

    Mastch.....
    punha Mr. A la Shodhayla Majja yeil

    ReplyDelete
  2. sir,

    tumhala Akash bhetla tar pls tyala sangal ka ya Varshi paus khup zala baba ata pudhchya varshi ye mhanav

    ReplyDelete

Followers