All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday, 3 December 2019

तिच्या मनातला " तो " आणि त्याच्या मनातली "ती " (भाग चार)

ती : किती ट्राफिक केले या पावसाने उगाचच.... ते म्हातारे आजी-आजोबा ... चिखलातून चालता सुद्धा येतं नाही त्यांना. कोणी मदत सुद्धा करत नाही त्यांना.... " तो " असता ना सोबत आता ...असाच बसमधून उतरून गेला असता, त्यांच्या मदतीला. " तो " असाच आहे. कोणाचे दुःख पाहवत नाही त्याला. सतत कोणाची ना कोणची मदत करायला पुढे. कोणाकडून कधी काही परतफेड मिळेल, अशी अपेक्षाच कधी केली नाही त्याने. इतका हळवा. एकदा तर हॉटेल मध्ये बसलो होतो, एका माणसाने त्याच्या फॅमिलीसाठी बसायला जागा मागितली.... लगेच उठून जागा दिली वेड्याने. मला विचारलेही नाही.... लगेच उभा राहिला. " आम्ही निघतच होतो " म्हणत मलाही उठायला सांगितले. राग आलेला पण दाखवला नाही. ... हो .... तसाच करायचा तो. पुढच्या वेळेस सुद्धा ... तसंच... काय माहित , सर्वांना काय आम्हीच दिसायचो वाटते. असेच गप्पा मारत बसलो होतो... तर अशीच एक फॅमिली आली. आम्हाला जरा जागा देणार का बसायला... तो बोलण्याआधीच मी बोलून टाकले , मिळणार नाही ... आम्ही बसलो आहोत.


तो : एकदा कशी बोलली होती, त्या फॅमिलीला .... आम्ही बसलो आहोत ना ... नाही मिळणार जागा, ते गेलयावर माझ्यावर रागावली. माझ्या माणसासोबत बोलत असताना , मला कोणी मध्ये मध्ये आलेलं चालत नाही. आणि कोणाचा कॉल आलेला हि आवडत नाही. एवढा राग ... तरी खूप काळजी करायची. आताही करत असेल ... जवळ नसलो तरी असेल तिला काळजी. तिला आवडायचे सगळ्याची विचारपूस करायला , काळजी घेयाला. मी आजारी पडलो तेव्हा तर किती जगायची. किती रात्री तर माझ्या शेजारी बसून काढल्या आहेत तिने.


ती : व्वा !! किती छान वारा सुटला आहे. पावसाची रिपरिप थांबली वाटते. त्यामुळे वारा सुटला असावा. त्याचे केस किती छान होते ना ... असा वारा आला कि भुरुभुरु उडायचे केस..... मीच किती वेळा ते विस्कडायचे .... मुद्दाम... , मुलायम केस होते त्याचे. पण .... पण ती chemotherapy सुरु झाली आणि हळूहळू सर्वच केस गेले त्याचे. काही ऑपशनच नव्हता. तो महत्वाचा होता... त्याचे केस गेले तरी तो हवाच होता मला. पण ...... त्याने वेगळाच निर्णय घेतला , ... त्याला असे काही होईल , असा विचार कधी स्वप्नांत सुद्धा आला नसता.


तो : कॅन्सर चे निदान खूप उशिरा झाले. आधी कळले असते तर.... " जर - तर " ........ या जर-तर च्या गोष्टी जास्त त्रास देतात. मलाच जर आधी कळलं असते ... मला कॅन्सर होणार आहे, तिच्याशी लग्नच केले नसते मी... तिची होणारी फरफड... झालीच नसती. २ वर्षांच्या आमच्या सुखी संसारानंतर कळलं .. अचानकचं कळलं ते ... कसे जाणवले नाही मला कधी, तिला तर किती मोठ्ठा धक्का होता तो. मी तर सारखा आजारी पडायचो मग, सारखे ट्रीटमेंट साठी जावे लागायचे. साथ सोडली नाही तिने, खरं प्रेम होते ना ... रात्री जागी असायची सारखी. त्या गॅलरीत विचार करत. तिला कधी त्रास झालेला मला खपायचे नाही. कोणी तिच्याकडे चोरून बघितलेलं .... आवडले नाही कधीच. त्यामुळे तिला आता माझ्यामुळे होणार त्रास ... ते पटायचे नाही मला. मी तसाही वाचणार नव्हतो , या आजारातून. हे नक्की होते. माझी शिक्षा .... तिला का ... तिने का सोसावे ते, असे उपरे जगणे... तिचे इतके सुंदर आयुष्य , पुढे आणखी बहरावे .... या साठी , मीच निर्णय घेतला ... पूर्ण विचार करून. ..... मी निर्णय घेतला ... तो तिला मुक्त करण्याचा.


ती : आठवतो तो दिवस . मी तेव्हा नुकतीच हॉस्पिटल मधून आलेली. त्याचे रिपोर्ट घेऊन. बघते तर घरी, सर्वच... माझी फॅमिली ... त्याची फॅमिली... मिटिंग भरली होती. मी यायचीच वाट बघत होते.... सर्वच.. !! तो सुद्धा... त्यानेच विचारलं थेट.. .... आपण डिवोर्स घेऊ... !! तू तुझे नवीन आयुष्य सुरु कर. हे असे पट्कन बोलून गेला. अर्थात माझ्यासाठीच हा निर्णय घेतला होता त्याने..... पण मला विचारायचे तरी आधी.


तो : हृदयावर दगड वगैरे म्हणतात , तसंच झालं होते मला. मी बोललॊ ते प्रेमाखातर ... अजिबात आवडलं नव्हते तिला. डोळे रागाने लाल झालेले, सर्वासमोर ओरडली होती मला... अक्कल आहे का .... तेव्हा घाबरलो होतो, आता हसायला येते आठवलं कि... तिच्या लग्नाला आता ३ वर्ष तरी होतील ना .... तरी , तिच्या साठीच हा निर्णय घेतला होता. तिचे वय बघता पुढची वर्ष .... एकटीने जीवन जगणे, हे मी नसतानाही मला बघवले नसते. त्यामुळे तिने मला डिवोर्स देऊन नव्याने लग्न करावे , हे सगळ्यांचे मत ठरले. खरंतर, सगळयांना मीच समजवून सांगितले. आधी कोणीच तयार नव्हते. एक -एक व्यक्तीला समजावले तेव्हा सारे तयार झाले. सर्वात शेवटी तिला सांगितले.


ती : कशी तयार होणार होती मी.... नाहीच आवडला त्याचा तो निर्णय... पुढे ३ दिवस तरी त्याच्याशी बोलत नव्हते. इतका राग आलेला त्याचा. न बोलता त्याची कामे करायची मी. चौथा दिवस , त्याने खूप दिवसांनी जवळ घेतले प्रेमानं... किती वेळ तो बोलत होता.... भविष्याबद्दल.. !! मी ऐकत होते फक्त. किती प्लॅन केले होते आम्ही, आमच्या future साठी..... असे सोडून देयाचे का ... नाहीच !! पण शेवटी त्याने तयार केलेच मला. त्या रात्री गॅलरीत जाऊन खूप रडली होती. त्याला सोडायचे नव्हतेच ....आजारी असला तरी तो माझा होता ना ... " शेवटची इच्छा !! " असे ब्लॅकमेल केले आणि माझ्याकडून वचन घेतले.


तो : तिला मीच तयार केले..... तयार झाली... नाखुशीने... दोघांचे इतके प्रेम ... नजर लागू नये असेच... लागली नजर ... देवाच्या मनात काय होते काय माहित. दोन वर्षांनी वेगळे झालो. त्याआधीच बोलली होती. मला न विचारात ठरवलं ना सगळं, आता मीही .... जे ठरवीन ते मान्य करावं लागेल. तसही... नेहमी तिच्याच मनाचा विचार केला. त्यामुळे ती काही बोलण्याआधीच तिच्या पुढच्या सर्व अटी मान्य केल्या. एकच बोलली, एकदा या घरातून बाहेर पडली ना ... वळून सुद्धा बघणार नाही. दोन आठवडे गेले ... त्यानंतर डिवोर्स दिला. एकदम शांत होती तेव्हा. गॅलरीत जाऊन बसायची.... शांत ... त्या गुलाबाच्या फुलांकडे पाहत..... डिवोर्स झाला असला तरी नवीन लग्न होईपर्यंत ती माझ्या जवळचं राहणार होती. पुढल्या महिन्यात लग्न जुळले तिचे. माझ्याच वडिलांनी पुढाकार घेतला होता त्यात. register marriage करणार होती. आदल्या दिवशी , सामान भरले तिने. फक्त तिचेच सामान घेतले. माझी आठवण म्हणून आमच्या लग्नातला एक फोटो तेव्हडा घेतला सोबत. त्या रात्री, शेवटचे मिठीत घेतले तिला. मिठीत घेऊन माथ्यावर किस केले... तेच शेवटचे. दुसऱ्या दिवशी, सकाळीच निघून गेली..... मागे न बघता...

ती : शेवटी काय ..... तर प्रेमासाठी सारे !! इतके प्रेम हि त्याचे. अजूनही असेलच.... तसा तो मुलींच्या मागे कधी नव्हताच. मीच भेटली होती त्याला.... गुपचूप प्रेम करायचा... त्याला असे कधी एक्सप्रेस होता आलेच नाही. अर्थात त्यानेच propose केले होते मला, पण " तू मला खूप आवडतोस "... हे तर मीच बोलले होते त्याला. कारण खरच आवडायचा मला तो. आणि कोणी दुसऱ्या मुलीने विचारण्याआधीच मी विचारलेलं बरं , असा विचार केला मी, म्हणून स्वतःहून व्यक्त झालेले. कधीपासून प्रेम त्याचे.... !! शरीरापेक्षा मनावर प्रेम करणारा असा तो... खूप काळजी , खूप सपोर्ट केला त्याने आधीपासून. वेगळा होता. आताही दुसरे लग्न केले असले तरी , मनाने त्याच्यापाशी आहे मी. कायम राहीन.... त्याने शिकवलं , सुखाने जगणे काय असते ते. प्रेम फक्त त्याच्यावर होते , आहे आणि राहील... पण आता त्याच्याकडे बघवत नाही. कसा दिसतो आता तो .... आजारपणाने अगदी थकून गेला आहे. जमलं असत तर मीही त्याच्यासोबत प्राण सोडले असते.. तयारी होतीच माझी. परंतु तो बोलला मला.... " मरतात तर खूप जणं एकमेकांसाठी.... माझ्यासाठी जगशील का.... " त्याच्यासाठी जगते आहे आताही आणि जगत राहीन ... हेच खरे प्रेम !!


तो : माझ्याकडे जास्त दिवस नाहीत आता... खरे तर , ती गेली आणि माझा अर्धा जीव निघून गेला.... ३ वर्ष कशीबशी काढली त्या ट्रीटमेंटमुळे .... जगवत आहेत माझ्या घरातले मला... जबरदस्ती !! पण ती करत असेल का माझी विचारपूस. काळजी तर असायची माझी तिला. आम्ही इतके जवळ होतो ना ... कि कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नव्हते.... देवानेच डाव साधला. तेव्हापासून तिचा देवावर राग. एकदा तर देवळात जाऊन गणपती बाप्पाशी भांडली होती. रडत होती. अशीच ती. एकदा का राग आला कि शांत होयाचा नाही लवकर. देवावरचा राग... अजूनही मनात ठेवला आहे तिने.... अजूनही !!

खूप प्रेम होते माझ्यावर.... लाडोबा माझी..... चांदोबा ... बोलेल ते करायची. केलं हि. अजूनही बघत नाही माझ्याकडे कधी. ना आमच्या घराकडे. वाईट वाटते. तरी , हीच आता जिंदगी , हेच ठरवले आहे मी. तिच्या शिवाय कोणातच दिवस छान नसायचा. आताही नाही... आठवण तर नेहमीची तिची. कसा विसरणार !! आमची मस्ती , आमचे भेटणे, फिरणे , गप्पागोष्टी .... आमच्या बेडरूम मधली आमची फोटोफ्रेम.. तिचे ते मोठ्ठ कपाट.... तीही बडबड... तिची smile .... तिचे मिठीत येणे... तिचे राग ... गाल फुगवून फोटो काढणे... आवडायचे सारेच .... आठवते ..... !!! माणूस दूर गेला कि त्याची किंमत कळते, तिचे लग्न झाले असले तरी तिच्या नवऱ्यावर प्रेम करत नसेल ती. हे मी चांगले ओळखून आहे. कारण प्रेम जबरदस्ती कोणावर लादता येतं नाही किंवा ठरवूनही होतं नाही....

प्रेम मनातून होणे गरजेचं असते. माझे होते तिच्यावर ... अजूनही आहे. राहील .... मी जोपर्यंत या जगात असेन तोपर्यंत....आठवण येते तिची... बोलावेसे वाटते... पण जमत नाही. फोटो बघतो तिचे.... छान वाटते मग.. कधी कधी तिच्या घराकडे बघतो. तिथे नसली तरी वाटते, कधी तरी मला त्या दारातून " Hiii " करेल. मी रोज आमच्या गॅलरीत जातो... तिने लावलेली गुलाबांची रोपटी ... इतकी वर्ष मीच सांभाळली , यंदाच्या पावसात सर्व मरून गेली. तिच्या आठवणी होत्या त्यात. पण जास्वंदाचे रोपटे , ते तसेच आहे. जेव्हा जेव्हा जास्वंदाचे फुल उमलते ना ... तेव्हा नकळत का होईना , त्याला गुलाबाचा सुगंध येतो... तिच्या शरीराचा सुवास येतो त्या जास्वंदाला... मोहवून जातो मला. आमचे भेटणे .. जे अर्धवट राहिले ... ते कदाचित पुढल्या जन्मात होईल.. may be ... तरी आता... आमच्या दोघांमधली शांतता .. नेहमीच दरवळत असते .... अगदी न चुकता ... !!!


================================ समाप्त ===================

1 comment:

  1. chan aahe... comment lihayala kahi suchat nahi... pan best aahe... carry on...

    ReplyDelete

Followers