All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday, 11 July 2020

" वादळ..... !! " ( भाग २ )


" जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव अमेय .." विभा रागात बोलली. अमेयचा पारा आधीच चढलेला.

" काय बोलते आहेस विभा ... ",

" मी काय बोलते आहे ते तुला कळते आहे... बरोबर ना ... " विभा रागातच होती.

" किती खर्च करतोस तिच्यावर... सुरुवातीला मैत्रिण म्हणून खपवून घेतलं... आता लाखाचा दागिना .... कहरच केलास अगदी... " ,

" विभा ... !! तोंड बंद कर .. माझे पैसे आहेत .... मी कोणावर , किती खर्च करावा , ते मी ठरवणार ... तुला काही कमी पडू देत नाही ना ... हेच खूप आहे तुझ्यासाठी... ",

" हेच खूप आहे ... ???? आणि माझं अस्तित्व , ते नाहीच आहे का .... तुझ्या आयुष्यात माझे स्थान , तिला कसे दिलेस तू .... लाज नाही वाटली का तुला... जरा तरी विचार करायचा माझा ... " विभाच्या या वाक्यावर अमेय चांगलाच तापला.

" निघू शकतेस माझ्या आयुष्यातून .... माझे प्रेम आहे मयूरीवर ... लक्षात ठेव .... तिला सोडू शकत नाही मी... आणि तुही आमच्या दोघांत कधीही येण्याचा प्रयत्न करू नकोस .... तुझी जागा आहे ना या घरात , त्यातच राहण्याचा बघ .... नाहीतर दारे उघडी आहेत... तुझी इच्छा... !! " असं म्हणत अमेय तावातावाने बेडरूम मध्ये गेला. ते शेवटचे शब्द विभाला लागले कुठेतरी. सामान भरले आणि निघून गेली माहेरी.अमेय त्याच्या bike वर होता. विभाकडेच निघाला होता ना. डोळ्या समोरून भूतकाळ सर्रकन त्याच्या नजरे समोरून गेला. इतक्यात पावसाची एक बारीकशी सर भेटीस आली. तसही भिजण्यापासून दूरच रहायचा अमेय. शिवाय आता विभाचे गिटार आणि स्वतःचा कॅमेरा होता ना सोबतीला. भिजावे कसाला.... त्याने bike लगेचच रस्त्याच्या कडेला लावली. आणि शेजारचीच असलेल्या एका दुकानाच्या आडोशाला जाऊन उभा राहिला. ते दुकान उघडलेलं तरी कोणीच खरेदीला आलेलं दिसतं नव्हते. दुकानातल्या एका पोऱ्याने, त्याच्या मोबाईलवर गाणी लावलेली. " टिप-टिप बरसा पानी..... पानी ने आग लगाई " अमेयच्या कानावर आले ते गाणे... हसला किंचित .. पाऊस सुरु झाला नाही तर पावसाची गाणी आठवायला लागली लोकांना ......

" हो तर .... पाण्यानेच आग लावली .... माझ्या आयुष्यात ... " अमेय गाणे ऐकत जुने दिवस आठवू लागला.


अश्याच एका सेमिनारला अमेयला बोलवले होते. अर्थात तेव्हा सावली सारखी असलेली मयूरी सोबतच होती. वेळेच्या आधी १ तास तरी जाण्याची सवय अमेयला. ते सेमिनार सुद्धा अमेयच्या घरापासून अगदी जवळ. त्यामुळे अमेय सहज पोहोचला. मयूरीसुद्धा आलेली. पण आदल्या रात्री आलेला मुसळधार पाऊस आणि सकाळ पासूनच्या संततधार .... सेमिनारला ३-४ लोक आलेली फक्त. काय करणार , रद्द केले गेले सेमिनार.

" शी !! ... हा पाऊस ना ... भलत्या वेळी येतो आणि वाट लावतो... " अमेय चिडलेला.

" एवढा काय चिडतोस ... पाऊस किती रोमँटिक असतो ... " मयूरी लाडात म्हणाली. अमेयने एक त्रासिक नजर तिच्यावर टाकली.

" चल मग .. निघू ... तुही लवकर घरी जा ... नाहीतर अडकून पडशील ... " अमेय पावसाकडे पाहत बोलला.

" घरी काही काम नसेल तर ..... जाऊया का फिरायला ..... bike वरून ... " मयूरीने दबक्या आवाजात विचारलं.

" पावसाचे फक्त फोटो काढायला आवडतात मला. भिजायला नाहीच. मग ते सर्दी , खोकला , ताप ... कशाला हवे ते नसते ' ताप ' डोक्याला .... " ,

" चल ना .... एकतर आठवड्याने भेटतो आहोत .... तेही या सेमिनार मध्ये ... गेलोच नाही कुठे फिरायला..... प्लिज !! जाऊया ना .... मलाही कुठे आवडते भिजायला....आज वेळ आहे, जाऊया ना ... जास्त वेळ नको अगदीच १५ मिनिटे ..... प्लिज .... प्लिज .... प्लिज .... !! " मयूरीच्या मधाळ बोलण्याचा चांगला परिणाम झाला अमेयवर.

" चालेल ... चल ... पण जास्त नाही हा फिरायचे.... उगाचच आजारी पडलीस तर मला नावे ठेवशील. " अमेयने त्याचे सामान , कॅमेरा तिथेच सेमिनारच्या आयोजकांकडे ठेवायला दिले. ओळखीचे होते तेही. ठेवले सामान. bike सुरु केली आणि मयूरीला घेऊन निघाला.  


bike सुरु होती आणि यांच्या गप्पा ही .... आठवड्याने भेटत होते ना .... १५ मिनिटांसाठी बाहेर पडलेले , आता बरेच पुढे आलेले. समुद्रकिनाऱ्याच्या पाऊस अनुभवायला , अमेयने त्याची bike त्यादिशेने वळवली. छानच !! समुद्राचा धीर गंभीर आवाज .... त्यात मुरलेला थंडगार झोबणारा आणि वरून रिमझिम पाऊस ... अशी खमंग भेळ केलेली निसर्गाने ... अमेय सुखावला. मयूरीला दुरुनच काही दिसलं.

" ते बघ ... मला वाटते तिथे मक्याचे कणीस भाजत आहेत.. चल ना खाऊया... सॉलिड भूक लागली आहे मला... " अमेय तिचे सर्व ऐकायचा जणू... लगेच तिथे पोहोचला देखील. मस्त गप्पा मारत , मक्याचे २ - २ कणीस पोटात गेले सुद्धा. खाताना यांच्या लक्षात आलेच नाही कि पावसाचा जोर वाढलेला.

" निघूया घरी ... पाऊस चांगलाच कोसळतो आहे. " निघाले दोघे. bike जवळ आले आणि जोराची वीज कडाडली. मयूरीने अमेयला घट्ट मिठी मारली. अनपेक्षित होते ते. थोडावेळ दोघे तसेच पावसात. नंतर अमेय भानावर आला. मयूरीची मिठी सोडवली. तिनेहि " सॉरी " म्हटले. अमेयने bike सुरु केली आणि निघाले. पुन्हा एकदा वीज कडाडली आभाळात. मयूरी त्याला मागून घट्ट पकडून बसली. विभा अशी कधीच चिटकून , बिलगून बसत नाही, अमेयच्या मनात येऊन गेले.

" सॉरी यार ... मला या विजेची खूप भीती वाटते. अशीच बसून राहू का ... चालेल ना तुला... " ,

" एवढी घाबरतेस .... हाहाहा .... भित्री कुठली... " अमेय बोलला तशी मयूरी हसली. थोड्यावेळाने दोघेही एकमेकांच्या घरी पोहोचले , पण त्याच दिवसापासून दोघांना एकमेकांविषयी ... जास्त करून अमेयला तिच्या बद्दल काही खास वाटू लागलं.

आताही विजेचा अस्पष्ट असा आवाज त्याच्या कानी पडला. " त्या दिवशी सरळ घरी आलो असतो तर विषय पुढे वाढलाच नसता..... तरी काय .... या जर-तर च्या गोष्टी .... जाऊ दे .. " पावसाची सर आल्या पावली निघून गेली आणि पुन्हा विभाकडे जाण्यास निघाला. ५ मिनिटेच झाली असतील, जास्त पुढेही गेली नव्हती त्याची bike आणि पुन्हा पावसाची सर आली. करणार काय .... थांबला पुन्हा . " या पावसाचा ना असाच ताप असतो .... नुसता चिकटपणा .... चिखल ... सगळीकडे नुसतं ओलं ओलं ....  धड प्रवास सुद्धा करू देत नाही हा ... " मनातच पावसाला शिव्या घालत अमेय आडोशाला उभा होता.


१०-१५ पावलावर वडापावची गाडी , त्यावर त्याने कांदाभजी तळायला घेतलेली. वादळ येणार असले , तरी पोटातले वादळ आधी शांत करायला हवे , असे मानणारे ४-५ जण , गाडीच्या अवती-भोवती उभे राहून वडापाव - कांदाभजी वर ताव मारत होते. अर्थातच कांदाभजीचा खमंग सुवास अमेयच्या थेट मनात भरला. " एवढ्या सकाळी ... वडे - भज्या खात आहेत .... भूक तरी कशी लागते सकाळी सकाळी... " सकाळचे १० वाजत होते. तो म्हणाला खरा , पण त्याच्याही तोंडाला पाणी सुटलेले. नास्ता कुठे केलेला त्याने, विभा माहेरी गेल्यापासून नास्ता बंदच. कधीतरी सोसायटी खाली असलेल्या मिठाईवाल्याकडून सामोसा आणून खायचा . तोच नास्ता ... पण विभा सारखं कोणाला जमणार. असा पाऊस सुरु झाला कि कांदाभजी करायची ना ती... गुपचूप करायची. एकदम surprise देयाची मला . गरमा - गरम , कुरकुरीत कांदाभजी - वाफाळता , तिच्या हातचा चहा..... बाहेर पाऊस आणि मग खाण्यात रमलो कि गिटार घेऊन खिडकीपाशी बसायची...... वेडाच करून टाकायची ना ती... अमेयला खुद्कन असू आलं.विभा - अमेयचे arranged marriage... दूरच्या ओळखीने दोघांचे लग्न जुळले. अमेय तसा यात न पडणारा. तो त्यावेळेस बँकमध्ये जॉब करायचा. काम एके काम. लग्नाचे वय झाले म्हणून लग्न करावे, यासाठी पहिलेच स्थळ बघायला गेला अमेय. वरचेवर बोलणी झाली. विभाने होकार कळवला, कारण अमेय आधीच बोलला होता  कि जी मुलगी मला पसंत करेल , तिला मी पसंत करिन. त्यावेळी अमेयने विभाला फारसे निरखून पाहिले नव्हते. मोबाईल वर काय ते बोलणे होयाचे. भेटणे असे नाहीच. तेव्हा नवरात्रीचे " दिवस " होते. अमेयला भारी आवड गरबा खेळायची. रोजच जायचा. अमेयला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळायला आवडायचे. विभाही गरबा खेळायला जायची पण तिच्या सोसायटी समोर असलेल्या मैदानात.

दसऱ्याच्या दिवशी , सकाळीच विभाने मोबाईल वरून अमेयला दसऱ्याच्या शुभेछया दिल्या. नेहमी सारखे बोलणे झाले. गरब्याचा विषय ओघाने निघाला.

" मी जाते कि गरबा खेळायला.... आमच्या सोसायटी समोर मोठे मैदान बघितले ना तू .... आमच्याकडे आलेला तेव्हा... तिथेच जाते मी... ",

" मला तर गरबा आणि दांडिया .... दोन्ही खेळायला आवडतात.... मी तर दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जातो... मज्जा वाटते.. " ,

" गरबा खेळायला कि मुलींना बघायला जातोस ... " विभाने मजेदार टोमणा मारला. अमेयला आवडला टोमणा.

" तस समजू शकतेस... पण मी छान नाचतो हा ... बाकीच्या मुलांसारखा फक्त मुलींना बघत राहत नाही हा ... " दोघेही हसले. बोलणे झाले. दसऱ्याची पूजा झाली. संध्याकाळ होताच अमेय गरब्याची तयारी करू लागला. मित्र खाली bike घेऊन उभा होताच. त्यांचे आजचे जाण्याचे ठिकाण ही ठरलेले. अमेयच्या मनात काय आलं. त्याने मित्राला विभाच्या इथे जाऊ असे सांगितले. अमेयने रस्ता दाखवत मित्रालासुद्धा सोबत आणले. तेव्हा रात्रीचे ८ वाजत होते. गरबा ९ वाजता सुरु होणार अशी माहिती मिळाली. जास्त कोणी आलेले हि नाही. एक तास काय करावे , म्हणून त्याचा मित्र " मैदानात पाय मोकळे करून येतो " असे म्हणत निघून गेला. अमेय मात्र एका ठिकाणी उभा राहून त्या गेटमधून येणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवत होता. विभाला surprise देयाचे होते ना.  तो तरी तिथे किती वेळ उभा राहणार. अमेय अर्ध्या तासातच दमला. मित्राला शोधण्यासाठी तोही मग मैदानात फिरू लागला. आता तर बऱ्यापैकी गर्दी झालेली. नटून-थटून आले होते सर्वच. अमेय मित्राला शोधत शोधत मैदानाची एक फेरी मारून आला. " कुठे गेला हा... " म्हणत पुन्हा त्याच जागी येऊन उभा राहिला. घड्याळात पाहिले तर ९:१५ झालेले. मित्राला शोधण्याच्या नादात विभाचा विसरच पडला त्याला. नजर फिरवत मित्राला शोधत होताच, तीच त्याची नजर गेटमधून आत येणाऱ्या विभावर खिळली. सोबत २ मैत्रिणी होत्या.अमेय तर बघतच राहिला. पहिल्या भेटीत दिसलेली विभा आणि आता समोर दिसणारी विभा , किती फरक. छान चुडीदार , नक्षीकाम केलेला पायघोळ झगा , असे काय म्हणता येईल ते , असे परिधान केलेलं. मोरपंखी रंगाचा तो ड्रेस , विभावर आणखीच खुलून दिसत होता. त्याच रंगाची ओढणी तिच्या गळ्याभोवती. दुरूनच तिच्या गळ्यातील सुंदर अशी मोत्याची माळ अमेयच्या नजरेत भरली. त्यालाच शोभेसे असे कानातले डूल आणि हातात नाजूक अश्या बांगड्या. कपाळावर बरोबर मध्यभागी एक लहानशी चंद्रकोर बिंदी... मेकअप शिवायच होती ती, तरी इतकी सुंदर .... मैत्रीणी सोबत ती गप्पा मारत अमेयच्या अगदी बाजूने चालत गेली. तिने लावलेल्या सुगंधी अत्तराचा गंध अमेयच्या नाकात शिरला आणि एकंदरीत तिला बघून वेडा झालेला तो , आता पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडला. तीच वेळ होती, अमेयला पहिल्यांदा कोणी इतके आवडले होते. बोलता बोलता विभा त्या गर्दीत मिसळून ही गेली. नजरेआड झाली तसा तो भानावर आला. अमेय टाचा उंचावून तिला शोधू लागला. एव्हाना गरबा सुरु झालेला , त्याचबरोबर खूप गर्दीही वाढत चाललेली. विभा कुठेच दिसतं नव्हती.


तिला शोधतच अमेय फिरत होता. मध्ये मध्ये तिचे 'दर्शन' होयाचे, लगेच गर्दीत गायब. गरबा खेळायचे सोडून अमेय तिलाच शोधत फिरत होता. होणारी बायको असली तरी अमेय प्रथमच इतका उतावीळ झालेला. खरं तर , हे सर्व पहिल्यांदाच अमेयच्या बाबतीत घडत होते. विभा त्याला त्या गर्दीत दिसत तर होती , पण जवळ जाई पर्यंत दुसरीकडे निघून गेलेली असायची. शेवटी दमून तो गर्दीतून बाहेर आला. कपाळावरचा घाम पुसला. आणि तिथूनच विभाला शोधू लागला.

" भेटली का .... जिला मघापासून शोधतो आहेस ती ..." अमेयच्या मागून आवाज आला.

" नाही ना ..... क्षणभर दिसते आणि लगेच नजरेआड होते. शोधावे तरी कसे... " अमेय अजूनही विभाला शोधत होता. मागे न बघताच त्याने उत्तर दिले.

" ती एक म्हण ऐकली आहे का ... काखेत कळसा, गावाला वळसा... " मागून पुन्हा कोणीतरी बोलले.

" काय ...... कळले नाही मला ... " अमेय मागे बघत बोलला. मागे विभा ....हसत त्याकडे बघत होती. केव्हढ्याने दचकला अमेय. गडबडला... हातातल्या दांड्या उडाल्याच. विभाला केवढे हसू आले त्याची तशी स्थिती पाहून.

" म .... मी .... त.... ते ..... ब ... शो ... " अमेयला तिच्याशी धड बोलताही येतं नव्हते.

" हि कोणती भाषा ...   म .... मी .... त.... ते ..... ब ... शो ..  मला नाही कळत हि भाषा... " विभाच्या या वाक्यावर अमेयला हसू आलं. सावरला तो.

" तुला तर मी खूप आधीच बघितले होते. तू बोललास ना ... चांगला गरबा खेळतो मी , कसा खेळतोस ते बघायचे होते.... झाला असेल ना तुझा गरबा खेळून ... " विभाने हसतच त्याला टोमणा मारला.

" हो ना .... झाले नाचून .... किती वेळ नाचवलेस ... घाम काढलास अगदी... लग्नाआधीच इतकं नाचवलेस , लग्नानंतर काय होईल , देव जाणे ... " अमेय बोलला तसे दोघेही हसू लागले. arranged marriage चे love marriage मध्ये असे रूपांतर झाले.


अमेयला क्षणात सर्व आठवलं. पाऊसही थांबलेला , वाऱ्याने चांगलाच जोर धरलेला. वादळ जवळ येतं होते. रस्त्यावर एक वेगळीच शांतता होती. रस्त्यावर वर्दळ नव्हतीच. अमेयने bike वरचे पाणी पुसले. शेजारून एक टेम्पो त्याच्याच धुंदीत गेला. मोठ्या आवाजात लावलेली गाणी , साहजिक अमेयचे लक्ष वेधले त्याने. कानावर गाणे आले.

" देर ना हो जाए ,कहीं देर ना हो जाये...... आजा रे, के मेरा मन घबराए...... " अमेय तो टेम्पो नजरे आड होईपर्यत त्याला बघत होता. विचार आला मनात..

" हो .. हो ... लवकर निघायला हवे .... पाऊस पुन्हा येण्या आधी विभाकडे पोहोचू .... " पुढल्या १५ मिनिटात अमेय विभाच्या सोसायटी बाहेर होता. पावसाने बराच काळोख केलेला. थंड वाराही आता सोबत करत होता भरलेल्या पावसाला. विभाचा फ्लॅट समोरच, अगदी सोसायटीच्या गेटसमोरच. bike वरून उतरला. पाठीला गिटार लावली. खास विभासाठी आणलेली त्याने. हलके हलके पावले टाकत विभाच्या दारासमोर येऊन उभा राहिला. दाराची बेल वाजवायची हिंमत होत नव्हती. तरी आत जावेच लागणार. शेवटी बेल वाजवली त्याने. काळजातली वाढलेली धडधड त्याला स्पष्ठ जाणवत होती. विभाला भेटणे खूपच गरजेचे आहे. तिच्या वडिलांचा खास राग अमेयवर. त्यांनीच दार उघडले तर... काय बोलू आपण ... काही बोलू शकू का .... अमेय हेच विचार मनात घोळवत तिथे उभा होता. कोणीतरी दार उघडलं. " पप्पा .... इतका वेळ कुठे राहिलात .... पाऊस बघा .... " विभा दरवाजा उघडत बोलली पण तिचे बोलणे अर्धवट राहिले. अमेयला बघून पुढे बोलू शकली नाही. अमेय सुद्धा तिच्या कडे बघत उभा होता. अगदी दुसऱ्या भेटीत जसे एकमेकांना बघत होते , तसेच आताही उभे राहिलेले.

" आत नाही बोलावणार का मला ... येऊ शकतो ना आत... " अमेय बोलला. विभा भानावर आली.

" हो ..... हो .... ये ... ना .... आत.." विभा त्याला आत घेऊन आली. अमेय सोफ्यावर बसला.

" पाणी आणते थांब ... " म्हणत विभा आत पळाली.

अमेय घर न्याहाळू लागला. एका कोपऱ्यात असलेल्या खिडकीपाशी रेडिओ सुरु होता. सकाळी रेडिओ ऐकायची अमेयचीच सवय विभाला लागलेली. छान वाटलं अमेयला. विभाला घर सजवायची आवड होती, तिनेच सजवले असणार , अमेय मनात बोलला. अमेयने कानोसा घेतला, विभाचे आई-वडील घरात नाही वाटते. मघाशी ही दार उघडताना " पप्पा उशीर केलात " असंच विभा बोलली. अमेय विचार करत होता , तर विभा पाणी घेऊन आली. गटागटा पाणी पिऊन टाकले. ग्लास खाली ठेवला.

आता !!.....

काय बोलावे तेच कळेना दोघांना . विभा तिच्या ओढणीशी उगाचच बोटांनी खेळत होती. अमेयच बोलला मग.

" कशी आहेस विभा .... !! " ,

" कशी दिसते तुला ... " विभाने लगेचच विचारलं . अमेय पुढे काही बोलू शकला नाही कि विचारू शकला नाही. अमेयने आणलेली गिटार , विभाचे लक्ष गेले त्यावर.

" तुझी गिटार ..... विसरलीस तू .... घाईत निघालीस ना ... येताना घेऊन आलो... ",

" विसरली नव्हतीच मी ..... " अमेयला विभाने पुन्हा निरुत्तर केले. अमेय पुन्हा गप्प झाला. पुढे विभाने त्याला विचारलं,

" वाळलास तू ...जेवत नाहीस का वेळेवर ... " ,

" कधी आईकडे जाऊन जेवतो , घरी स्वतःहून करायला कंटाळाच करतो मी... कधी कधी न जेवताच झोपी जातो... ",

" इतकं काम करतोस .... कि वेळेचं भान रहात नाही... " त्यावर जरासं हास्य दिसलं अमेयच्या चेहऱ्यावर ...

" काम नाही ...... मन लागत नाही त्या घरात .... तू गेल्यापासून... " अमेय पट्कन बोलून गेला. खरच !! विभा गेल्यापासून अमेय फारच कमी खायचा. विभाला भरून आलं.

" गिटार देण्यासाठी आलास ... " ,

" नाही ..... तुझ्या पप्पांनी बोलावलं होते. कुठे आहेत ते .. " ,

" मम्मी - पप्पा मॉर्निंग वॉक साठी गेले आहेत. पाऊस पडतो आहे ना मध्ये मध्ये ..... थांबले असतील कुठेतरी ..... पण तुला इतक्या सकाळी भेटायला बोलवलं ... कशाला .. " विभाने विचारलं. बाहेर कमालीच काळोख पसरत चालला होता.

" परवा बोलले कि रविवारी डिवोर्सचे पेपर्स घेऊन ये.. त्यासाठी .... " अमेय पुढे बोलू शकला नाही. कारण त्याने विभाच्या डोळ्यात पाणी बघितले.

" वारा सुटला आहे खूप ..... खिडकी बंद करून येते ... " विभा काहीतरी बहाणा करून त्याच्या समोरून उठली. आणि खिडकी जवळ आली. तिला वाईट वाटले हे अमेयला कळलं.

" थांब विभा ..... " अमेयही तिच्या मागोमाग. " मला नाही गमवायचे तुला. डिवोर्सचे पेपर फक्त कारण आहे. माझी चूक तेव्हाच कळली जेव्हा तू सोडून इथे आलीस. किती try केले तुला भेटायला, तुझ्याशी बोलायला.... तुझ्या समोर यायला लाज वाटायची आणि तुझ्या पप्पानी बोलूच दिले नाही. तुझ्या आईशी तेवढे नीट बोलणे होते. खरच विभा ... नाही गमवायचे तुला. " विभा आता रडू लागली.

" मग .... इतके महिने ...... एकदा तरी आलास का भेटायला .... आज , एव्हडे वादळ येते आहे .... तेव्हा आलास ... जराही काळजी नाही स्वतःची... आणि किती बारीक झाला आहेस ... मी गेली म्हणून काय झालं .... जेवायचे ना पोटभर... " विभा रडतच बोलत होती. अमेयचे डोळेही पाणावले.

" कसा जेवू .... चवच निघून गेली माझी... चल ना विभा .... चल ना घरी... ते घर तुझी वाट बघते आहे.... " अमेय बोलत होता. विभा त्याच्या गालावरून हात फिरवत होती. प्रेम हे असेच असते. दोघानी एकमेकांचे डोळे पुसले.

शांत झाले दोघे. " फोटोग्राफी करत नाहीस हल्ली. तुझ्या social network वर गेल्या काही महिन्यापासून एकही फोटो टाकला नाहीस तू ... " विभा...

" मनच लागत नाही, ती नजर कुठेतरी हरवून गेली आहे. तुझ्या येण्याने सर्व काही ठीक होईल. येशील ना सोबत ... तुला सोबतच नेणार आहे मी. " अमेयच्या या बोलण्यावर हसली विभा. पण तिचे ते हसू फारच क्षणिक ठरले. विभाला मयूरी आठवली. अमेयला तिने थेट प्रश्न केला.

" आपल्या दोघात आलेल्या तिसऱ्या व्यक्ती मुळे आपल्यात दुरावा आला. तिचा प्रश्न तर अजूनही तुझ्या आयुष्यात असेल ना .... माझ्या येण्याने पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहील तुमच्या दोघात... " अमेयने हात जोडले.

" नाही नाही विभा ... हात जोडून सांगतो... खरच .... ती नाही आता माझ्या कोणत्याच गोष्टीत... आणि पुन्हा कधीच ती माझ्या आयुष्यात येणार नाही , किंवा अशी चूक पुन्हा नाही .... कधीच नाही.... वचन देतो तुला... " विभा काही बोलली नाही...

" पण पप्पाना कसे समजावशील.... " विभाने विचारलं.

" आधी सांग ... प्रेम आहे ना माझ्यावर ... " अमेयने उलट प्रश्न केला. विभाने त्याचे हात हातात घेतले...

" खूप ... खूप प्रेम करते तुझ्यावर ... घर सोडून आली तरी तुझाच विचार... मम्मी सांगायची ना तुमचे फोनवरचे बोलणे... रडायचा तू बोलताना ... तेही सांगायची... का वागलास असा तू .... मला नाही सोडायचे होते तुला .... " दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. थोडावेळ तसाच गेला.

सावरले दोघेही. " चहा ठेवू का ... " विभाने विचारलं.

" हो हो .... चालेल ना .... तुझ्या सोबत तुझ्या हाताचे जेवण , चहा ... खूप मिस केले मी. टोपभर चहा केलास तरी चालेल.... " अमेयच्या बोलण्यावर विभा हसतच किचन मध्ये गेली. अमेय खिडकीपाशीच उभा होता. चहा उकळत ठेवून विभा काहीतरी घेऊन बाहेर आली.

" हे बघ ... तुझी आठवण म्हणून तुझे डेनिमचे जॅकेट सोबत घेऊन आलेली मी... " विभा त्याला जॅकेट दाखवत म्हणाली.

" अगं ते .... " अमेय पुढे बोलणार तोच विभाचे आई-वडील आले. अमेयला बघून तिचे पप्पा संतापले.

" एवढ्या लवकर आलास ..... १०:३० च वाजत आहेत... एव्हडी घाई झाली आहे का तुला डिवोर्सची.... " ,

" तस नाही पप्पा... " पुन्हा त्यांनी अमेयला मधेच थांबवले.

" पप्पा अजिबात बोलायचे नाही.... " ,

"ok ... ok ... सर , माझे ऐकून घ्या... मी विभाला भेटण्यासाठी आलो फक्त... तिच्याशी बोलायचे होते मला.... " ,

" तिच्याशी बोलायला इथे बोलावले नाही.... डिवोर्सचे पेपर्स आणलेस का .. " विभाचे वडील ऐकायला तयारच नव्हते.

" अहो ... त्याचे ऐकून तर घ्या .... काय बोलतो ते बघा .. " विभाची आई बोलली.

" चूप बस्स तू ... या अश्या मुलींना फसवणाऱ्या माणसाला तर घरातही घेऊ नये कोणी.. " अमेयला याचा राग आला पण स्वतःला त्याने शांत केले.

" पप्पा ... सॉरी !! सर .... चूक झाली .... मान्यही केले. आणि त्याचा पश्चाताप सुद्धा होतॊ आहे. मला विभाला नाही सोडायचे. प्लिज ... !!! ऐकून तर घ्या.. तिला पुन्हा कधीच त्रास होणार नाही... " ,

" आणि झालेला त्रास ... तो विसरून जायचे का आम्ही..... विभाने.... ते काही नाही ... डिवोर्सचे पेपर्स दे आणि चालता हो माझ्या घरातून .... ",

" अहो सर .... पण तिला तरी विचारा .. तिच्या मनात काय आहे ते ... बोल विभा... " अमेयने विभाकडे पाहिलं.

" पप्पा .... मला नको आहे डिवोर्स... त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे... मीही त्याला माफ केले आहे .... नका ओरडू त्याला... " विभा बोलली. पण तिचे वडील रागातच.

" तू तर बोलूच नकोस .... त्याच्यावर विश्वास ठेवूनच लग्न लावून दिले होते , काय केले याने ..... चांगला जॉब सोडून घरी बसला होता. तू मदत केलीस म्हणून ..... आताही काय केले तुझ्याशी त्याने .... दुसरी बाई आणणार होता ना घरात ... " विभाला ओरडले. आता अमेयकडे बघत म्हणाले. " ये ... तू .... पेपर दे .... आणि निघ .... "

अमेयने त्याच्या बॅगमधून पेपर बाहेर काढले. बॅग उघडताच आत ठेवलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याने आपले अस्तित्व दाखवले. सुगंध दरवळला. अमेयने विभासाठीच आणलेले ते , बोलता बोलता विसरून गेला. विभाच्या वडिलांनी पेपर निरखून बघितले.

" हे काय ... अडाणी आहेस का ... सही करून आणायला सांगितले होते ना ... एकही केली नाहीस.... ",

" नाही केली सही .... आणि करणार हि नाही.. एवढं वाटते ना ,.... तर आधी विभाला सही करायला सांगा .... तिला मी नको आहे हेच मान्य करीन. तिने सही केली तरच मी सही करीन ... " इतकं बोलून अमेयने बॅग उचलली आणि घराबाहेर आला.  बाहेर सोसाट्याचा वारा ... संध्याकाळी ७ वाजता होणारा काळोख ... सकाळीच झालेला. वादळ आणखी जवळ आले वाटते , अमेय वर आभाळात बघत होता. विभाही दारात आली. तिथे खिडकीपाशी सुरु असलेल्या रोडिओ वर छान गाणे लागले.

" मेरा कुछ सामान......  तुम्हारे पास पड़ा हैं, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं..... " गाणं ऐकून अमेयला गजऱ्याची आठवण झाली.

" तुझ्यासाठी आणलेले... तुला आवडतात ना.... घे .... " विभाने ओंजळीत घेतले. पुन्हा पाणावले डोळे. तिलाही काही आठवलं. ते डेनिमचे जॅकेट बाहेर आणले तिने... " भिजत जाणार का .... " विभा पुढे काही बोलणार इतक्यात तिच्या वडिलांनी तिला जोराने हाक मारली. विभा रडतच आत गेली. तिच्या वडिलांनी त्याच्या समोरच दरवाजा धाड्कन बंद केला. अमेय थोडावेळ थांबला. विभाची वाट बघत. त्याला अपेक्षा होती, विभा येईल म्हणून.... आलीच नाही ती. एका चुकीची एवढी मोठी शिक्षा मिळेल असे वाटले नव्हते त्याला. विभा नाही माफ करणार , माफ केले तरी तिच्या वडिलांच्या पुढे जाईल असे नाही वाटत.. तिचे वडील आम्हा दोघांना वेगळे करूनच राहतील आता, असा विचार मनात घर करू पाहत होता. वारा प्रचंड वेगाने वाहत होता. अमेयने bike सुरु केली. पुन्हा एकदा त्याने मागे वळून पाहिलं. विभा आलीच नाही.... निघाला शेवटी.


डोळ्यात पाणी घेऊनच निघाला. १० मिनिटात पावसाने सुरुवात केली. पावसाचा तसाही कंटाळा करणारा अमेय , भिजणार नव्हताच. आता तर गिटारही नव्हती सोबतीला. कॅमेरा बॅगमध्ये सुखरूप होता. पावसाच्या पाण्याने भिजण्याचा काही प्रश्न नव्हता. तरी अमेय थांबला. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला पुढचा रस्ता अस्पष्ठ दिसत होता. bike एका बस स्टॉप पाशी उभी करत तिथेच जाऊन बसला. जोराचा पाऊस. अमेय पाऊस बघत बसला. अंगावर शिरशिरी येतं होती. त्यात विभाच्या आठवणीही गडद होऊ पाहत होत्या. त्या आठवणी त्याला आणखीच भावूक करत होत्या. पावसाचा जोर आणखीच वाढला. त्या बस स्टॉपच्या मागे असलेल्या चहाच्या टपरीवर रेडिओ सुरु होता. " कमाल आहे... आज सर्वाना सकाळीच गाणी ऐकायची आहेत का ... .. " मनात म्हणत कोणते गाणे लागले आहे ,ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. सुरु असलेले गाणे त्याच्या आवडीचेच....

" लगी आज सावन की फिर वो झड़ी है........ " खास आवडीच्या मोजक्या गाण्यातले हे एक ..... पण आज ते गाणे ऐकून त्याच्या मनात भलतीच कालवाकालव झाली. नकोच ऐकायला ते गाणे... अमेय डोळे मिटून बसला. अचानक त्याला कोणीतरी रडते आहे , असा भास झाला.त्याने बघितले , त्याच्याच पायाजवळ कुत्र्याचे एक लहान पिल्लू , स्वतःच्या अंगाचा गोळा करून बसलेले... पूर्ण भिजलेले ... थंडीने कुडकुडत होते... त्याच्याच रडण्याचा आवाज तो. अमेयने त्याला उचलून घेतले. अंगावरच्या डेनिमच्या जॅकेटची आठवण झाली. विभाला सांगायला विसरलो... जॅकेट माझे असले तरी ते मयूरीने गिफ्ट म्हणून दिलेले. तीची काहीच आठवण नको होती त्याला. जॅकेट अंगावरून काढले, त्या लहानग्या पिल्लाला अमेयने जॅकेट मध्ये गुंडाळले. थंडी कमी झाली त्याची. अमेयने पावसाकडे पाहिलं. विभा निघताना बोलली होती , " भिजत जाणार का ... " तिचे ते शब्द आठवले त्याला. बसल्या जागेवरून उठला. पावसाकडे पाहत म्हणाला,

" सकाळ पासून मला भिजवायचा प्रयत्न करतो आहेस ना ..... घे .... भिजव किती ते ... बघूया आधी कोण थकते ते ... तू कि मी ... " अमेय पावसात येऊन उभा राहिला. पाठीवर बॅग लावली. bike वर येऊन बसला. त्या पिल्लाकडे पाहिले एकदा , आता ते पिल्लू जॅकेटमध्ये छान बसलेले, चांगलीच ऊब मिळत होती त्याला.

अमेय किंचित हसला त्याला बघून.... लगेच विभाचे शब्द पुन्हा आठवले त्याला.... " भिजत जाणार का .... " विभाला काय बोलू आता.... कसे समजावू तिला .... अश्या आडोशाच्या काय फायदा .... घरचं गळते आहे माझे ... ती गेल्या पासून ... अमेयने पावसात सुद्धा येणारे अश्रू पुसले ओल्या हातानेच. घरी तरी कसा जाऊ .... काय राहिले आहे आता तिथे.... bike सुरु करून वेगळ्याच दिशेने निघून गेला. कदाचित ...... फाटलेले आभाळ जोडायचे होते .... त्यालाच... !!


============================= क्रमश:===================

2 comments:

  1. .
    सुंदर.
    पुढचा भाग लवकर टाका.

    ReplyDelete

Followers