All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Monday 6 February 2017

झुंज.....


( खालील कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्ती किंवा प्रसंगाशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

         युद्ध आणि झुंज..... या दोन्ही शब्दांचा अर्थ वरचेवर सारखा वाटत असला तरी त्यात खूप फरक आहे. युद्ध हे दोन्ही समान ताकद असण्याऱ्या किंवा जवळपास सारखे  सैन्यबळ असणाऱ्या परस्पर विरोधी पक्षांमध्ये होते. पण झुंज हि फक्त आणि फक्त जगण्यासाठी केलेली धडपड असते. अश्याच एका झुंजीची हि कथा आहे. 

        कथा आहे खूप जुन्या काळातली. राजे-रजवाडे यांच्या काळात घेऊन जाणारी. त्यावेळी बहुदा सगळ्या प्रत्येक राज्यात सुबकता होती. लोकं गुणागोविंद्याने नांदत होती. एक राज्याचा राजा , दुसऱ्या राजाची सुद्धा विचारपूस करायचा. देवाण -घेवाण नित्य-नियमाने होतं असे. त्यामुळे सगळीच राज्य एकमेकांना समजून घेत असतं. एकाने दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचा तर प्रश्नचं नव्हता. सगळीकडेच शेती चांगली होत होती, वेळेवर पाऊस , कारभार योग्य रीतीने चालू होता. व्यवहारात प्रगती होती. एकंदरीत सगळीकडे शांतता आणि समुर्द्धि होती. 

          त्यात एक राज्यं होतं, विक्रमवीर नावाच्या राजाचे. लहानसं राज्य होतं ते. राज्याचा कारभार अगदी सुरळीत चालू होता. विक्रमवीर राजा , एक उत्तम असा राज्यकर्ता होता. राज्यात काय काय चालू आहे , याची माहिती त्याला बरोबर असायची. जनता नेहमी आनंदी राहील , याकडे त्याचं नेहमी लक्ष असायचं. युद्धातही पारंगत होता तो. राज्य लहान असला तरी त्याचे युद्धबळ , युद्धसामुग्री प्रगत होती. त्या काळात इतर राज्यांकडे फक्त तलवार आणि भाले वापरले जायचे. फक्त विक्रमवीर राजाकडे तिरंदाजी करणारे सैन्यबळ होते. विक्रमवीराला त्याचा खूप अभिमान होता. राजाला एक मुलगा होता. लाडाने वाढवला त्याला. वडिलांप्रमाणेच किंवा त्याच्या पेक्षा जरा जास्तच म्हणा, तो युद्धकलांमध्ये तरबेज होता. दररोज व्यायाम करून शरीरयष्टी बळकट केली होती युवराजने. सहा -साडे सहा फूट उंच अशी ताडमाड शरीरयष्टी. तलवारबाजी, तिरंदाजी, मल्लयुध्द यात त्याचा हात पकडणारा , शेजारी-पाजारी असलेल्या राज्यात तरी कोणी नव्हता. मल्लयुध्द करताना चार -चार पहिलवानांना एका फटक्यात खाली लोळवायचा. असा होता युवराज आणि त्याचे वडील विक्रमवीर.  

          सगळं कसं छान चालू होतं. एक दिवस त्याच्या गुप्तहेराने एक बातमी आणली, कि त्याच्या शेजारी असलेल्या राज्यावर काही अफगाणी सैन्याने हल्ले सुरु केले आहेत. हि बातमी जरा चिंताजनक होती. देशाच्या बाहेरील शत्रूने हल्ला केला होता. माहिती नुसार, त्यांचे सैन्यबळ प्रचंड होते. साहजिकच त्या राज्याचा निभाव लागणं अशक्य होतं. अफगाणी राजाने त्या राजाला युद्धकैदी करून राज्य हस्तगत केले होते. विक्रमवीर चिंतेत पडला. कदाचित पुढचा हल्ला त्याच्याच राज्यावर होईल , हे तो कळून चुकला. विक्रमवीर राजाचे राज्य तसं लहानचं, त्यामानाने शेजारील राज्य बरीच मोठी होती.  त्यांचा निभाव लागला नाही, तर आपली काय गत होईल, याची चिंता वाटू लागली. 

           तसं त्याच्या राज्याचा भौगोलिक इतिहास बघितला तर एक बंदिस्त राज्य होतं ते. एका बाजूलाच राज्य होतं ते. पाठीमागे उंचचउंच पर्वतरांगा होत्या. त्या पर्वतरांगा दक्षिण-उत्तर दिशेला पसरल्या होत्या. तिथून कोणतंच आक्रमण होऊ शकत नव्हतं. नैसर्गिक तटबंदी होती ती. पश्चिम दिशेस , दोन राज्यांना मध्ये विभागणारी एक मोठी नदी वाहत होती. त्यावेळेस नदीतून आक्रमण करण्या इतपत कोणाकडे सामुग्री नव्हती. राहिला प्रश्न पूर्व दिशेचा, हो.... तिथूनच आक्रमण होऊ शकत होतं. 

          विक्रमवीर राजाने तातडीची बैठक बोलावून घेतली आणि सर्व मंत्राबरोबर सल्ला मसलत केली. शत्रू फार मोठा आहे आणि त्याच्या समोर निभाव लागणं शक्य नाही. तरी काहीतरी करावे लागेल , यासंबंधी विचार सुरु झाले. खूप वेळानंतर असं ठरलं कि , तातडीने तो पूर्व मार्गही बंद करावा. तिथे काही भिंतीवजा बांधकाम करून शत्रूला जेव्हढा वेळ थोपवता येईल तेव्हढा प्रयन्त करावा. नाहीतरी शेजारी असलेल्या राज्यांनी मदत करायचे आश्वासन दिले होते. सर्व ठराव संमत झाले आणि लागलीच सुरक्षा भिंतीचे काम सुरु झाले. आक्रमण कधीही होऊ शकते , यानुसार त्यांनी सैन्यबळाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. स्वतः विक्रमवीर त्याकडे जातीने लक्ष देत होता. युवराज ,सुरक्षा भिंतीचे काम कुठंवर आलं आहे याकडे बघत होता. 

        यात पाच-सहा महिने निघून गेले. प्रत्येक वेळेस एक भीती असायची मनात. कधीही हल्ला होऊ शकतो. तणावांचे दिवस होते ते. एक-एक दिवस असाच जात होता. अश्याच एका दिवशी, अफगाण सैन्याकडून त्यांचा संदेशवाहक एक पत्र घेऊन आला. त्यात "शरणागती पत्करा नाहीतर युध्दास तयार रहा. " या आशयाचा संदेश होता. शरणागती म्हणजे आपण त्यांचे गुलाम होण्यासारखेच. विक्रमवीर राजाला त्याच्या प्रजेची चिंता होती. त्यांना गुलाम करायचे नाही, हाच विचार मनात ठेवून त्याने शरणागती नाकारली. संदेशवाहक फक्त हसला आणि तसाच निघून गेला. 

        दुसऱ्याच दिवशी, विक्रमवीर स्वतः त्याच्या संपूर्ण सैन्यासह निघाला, जिथे सुरक्षा भिंती बांधली होती. भिंत तर होतीच, शिवाय व्यूहरचनेप्रमाणे सर्व सैन्य आपापल्या जागी स्थिर झाले. तिरंदाजी करणारे मध्यभागी , तलवारबाजी करणारे पुढे, अशी काहीशी ती रचना होती. जवळपास सर्वच सैन्य तिथे ठाण मांडून बसलं होतं.फक्त राजवाड्यात सुरक्षेसाठी ७० सैनिक तेवढे मागे ठेवले होते. युवराजची युद्धात भाग घेण्याची कितीही इच्छया असली तरी वडिलांसमोर तो काहीच बोलू शकत नव्हता. त्यालाही सर्वांबरोबर राजवाड्यात राहावे लागले. पुढचे दोन दिवस तरी हल्ला झाला नाही, तरी संपूर्ण सैन्य डोळ्यात तेल घालून आक्रमणासाठी तयारीत होते. विक्रमवीर तयारीनिशी होता. फक्त हल्ला कधी होणार हे ठाऊक नव्हते. राजवाड्यात , युवराज विचारात पडला होता. दोन दिवस झाला तरी ते अजून कसे आले नाहीत युद्धासाठी. आक्रमण होणार हे नक्की, पण दोन दिवसात कोणतीच हालचाल नव्हती. काहीतरी गडबड असावी, अशी शंका त्याच्या मनात आली. समोरून हल्ला झाला नाही तर मागच्या बाजूने तरी एक नजर टाकू ,असं ठरवून , आईची आज्ञा घेऊन युवराज निघाला. बाकी असलेल्या ७० पैकी ५० जणांना त्याने सोबत घेतले होते. 

         सायंकाळ होत आलेली. राज्यातली जनता त्यांचे काम संपवून घराकडे निघाली होती. पक्षीसुद्धा त्यांच्या घराकडे परतत होते. पूर्वेकडे विक्रमवीर राजा , सैन्यसह हल्ल्याची प्रतीक्षा करत होता. तर इकडे युवराज ,५० जणांसह घोड्यावरून भरधाव निघाला होता. प्रथम ते उत्तर दिशांना असणाऱ्या पर्वत रांगांच्या दिशेने गेले. तिथे असलेल्या किल्ल्यावरून दूरपर्यंत नजर जात असे. तिथून पाहिले असता सर्व शांत होते. तरी एवढ्या मोठया पर्वतरांगा पार करून युध्द करायला येण्याचा विचारच कोणी करू शकत नाही. तरीही युवराजने बारकाईने नजर टाकली. सर्व ठीक आहे, हे पाहून तो पश्चिम दिशेला असलेल्या सीमेकडे निघाला. 

          एका मोठ्या नदीने दोन राज्यांमध्ये सीमा आखली होती. नदीचा विस्तार बऱ्यापैकी मोठा होता. त्याशिवाय आजूबाजूला असलेल्या मोठमोठ्या खडकांनी, दगडांनी ती सीमाही बिकट बनवली होती. नदीपासून त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी एकचं वाट होती. त्याचं वाटेवर देखरेख करण्यासाठी एक लहानसा किल्ला बांधलेला होता. तिथेही त्यांची एक सैन्य तुकडी असायची. परंतु सर्व सैन्याला पूर्वेला जमायला सांगितल्याने त्या किल्यावर कोणीच नव्हते. युवराज तिथे पोहोचला तेव्हा बरीचशी रात्र उलटून गेली होती. धावून धावून घोडेसुध्दा दमलेले होते. त्याचं बरोबर त्याचे सैन्यही. त्या किल्यावर थोडेफार खाण्यास पदार्थ होते. , ते त्यांनी पटापट खाल्ले आणि आराम करत बसले. सगळेच थकलेले असल्याने पटकन झोपी गेले. 

          सर्व प्रथम युवराजला जाग आली, तेव्हा सूर्योदय होण्यास थोडा अवधी बाकी होता. त्याने इतर सहकाऱ्यांना जागं केलं. सगळेच उठून तयार झाले. आपापले घोडे तयार केले. " इथून थोड्याच अंतरावर तर नदी आहे. घोडे राहू दे असेच, सर्वच पायी पायी जाऊ. " युवराजने सुचवलं. "असं म्हणता तर तसं करू. " सगळयांना पटलं ते. घोडे तसेच बांधलेले ठेवून युवराज त्या " लहान सैन्या" बरोबर निघाला. छान थंड हवा वाहत होती. थोडयावेळाने सूर्योदय होईल, तसं पटकन निघून राजवाड्यात न्याहारी करू, असा विचार करत होता युवराज. 

           जसे ते नदी समीप येऊ लागले , तसं त्यांना कसलेसे आवाज येऊ लागले. कोणालाच कळतं नव्हतं कि ते आवाज कसले आणि कुठून येतं होते ते. कूठेतरी मोठया प्रमाणात माणसं जमा होतं होती, त्याची कुजबूज होती ती ,याशिवाय बाकीचेही कसले कसले आवाज येत होते. " युवराज जी, आपण इथेच थांबूया. मी चार - पाच जणांना घेऊन पुढे जाऊन बघून येतो. " एक जण बोलला. " ठीक आहे, पण मी सुध्दा येतो आणि तिथे जवळ जाण्यापेक्षा , एका खडकावर चढून पाहूया." युवराज म्हणाला, तेही पटलं सगळ्यांना. युवराज, चार जणांसह पुढे गेला. एका मोठया खडकावर चढले आणि लपूनच ते नदीच्या किनारी , तो आवाजाच्या दिशेने पाहू लागले. उजाडलं नसलं तरी बऱ्यापैकी समोरचं दिसत होतं. नदीच्या किनाऱ्यावर जिथंपर्यत नजर पोहोचत होती, तिथपर्यंत लाकडी तराफे लागले होते, मोठे तराफे. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून येतं असावेत ते. आणि त्या तराफ्यावरून माणसं येत होती. ती कूजबूज त्यांच्या बोलण्याने होतं होती. ते कसलेसे आवाज त्यांनी सोबत आणलेल्या तलवारी आणि ढाली, खाली जमिनीवर ठेवल्याने होतं होते. सगळं किती विचित्र होतं. युवराज ते सगळं पाहत होता. " युवराज जी, हे काय आहे ? ", " मलाही तोच प्रश्न पडला आहे. हे नक्की काय चाललंय ते... " युवराज विचार करू लागला. हल्ला या दिशेने होईल , असं कोणाच्या स्वप्नात देखील आलं नसेल. तरीही जे समोर दिसतं होतं ते घडतं होतं आणि खरं होतं. 

            सूर्योदय होतं होता. काळोख दूर होऊन आता आभाळ लालसर दिसू लागलं होतं. त्याचबरोबर, त्या सैन्याचा विस्तारही लक्षात येत होता. " साधारण २ ते ३ हजार माणसं असतील. " त्यापैकी एक जण बोलला. "हम्म .... पण त्यांनी इथून का हल्ला केला असेल... म्हणजे, पूर्वेकडील सीमेवरून या पेक्षा जलद आणि मोठया प्रमाणावर सैन्य येऊ शकले असते ना... " युवराजने विचारलं. त्यातल्या एकाला युध्दाची चांगली माहिती होती, " हा जो किल्ला आहे ना, तो फार महत्वाचा आहे. यावर जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांना आपल्या राज्यात प्रवेश करणे अगदी सोप्प जाईल. कारण हा किल्ला तसा दुर्गम आहे, एकदा का तो आपल्या हातातून गेला , तर पुन्हा मिळवणे जवळपास अशक्य. आणि एक गोष्ट, त्यांची हल्ला करण्याची हीच पद्धत आहे सगळीकडे, दोन बाजूंनी हल्ले करतात ते, मागून आणि पुढून... त्यामुळे दुसरा पक्ष गोंधळून जातो, तसाच हल्ला असेल हा... " युवराजने खूण केली तसे त्याच्या सोबत आलेले ते चारही जण खाली उतरले. धावतच ते उरलेल्या सैन्याजवळ आले. त्या सगळ्यांना नदीकिनारी काय चालू आहे याची माहिती दिली.  

       "काय करायचे युवराज जी... " एकाने विचारले. युवराज विचार करू लागला. काहीतरी करून यांना इथेच थांबवलं पाहिजे. त्याशिवाय, हि जागा महत्वाची होती. एकदा शत्रूने घेतली तर पुन्हा मिळवणे कठीण. हा विचार त्याने सहकाऱ्यांना बोलून दाखवला. " कसं शक्य आहे युवराज जी, नाही म्हटलं तरी त्यांची संख्या २ ते ३ हजाराच्या घरात आहे. आपण किती काळ त्यांच्या समोर उभं राहणार. मदत तर लागणारच आपल्याला.... राजांना हे सांगायला हवं. " ," हे सगळं ठीक आहे. राजांना ते सांगावे लागेलच... तरीसुद्धा आपण पश्चिमेला आहोत. ते अगदी बरोबर आपल्या विरुध्द दिशेला, पूर्वेला आहेत. अंतर मोजलं तरी येथून ,कोणीतरी त्यांना सांगायला आता निघाला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत दुपार होणार. आणि त्यांना सेनेनीशी इथे यायला संद्याकाळ... निदान तोपर्यत तरी आपल्याला उभं राहावे लागेल. " असं युवराज म्हणेपर्यंत शत्रू सैन्यांच्या जोरदार आरोळ्यांनी आसमंत भरून गेला. हल्ल्याची घोषणा किंवा पूढे चाल करण्याची तयारी, यापैकी काहीतरी असावं, असा कयास युवराजने लावला. 

           सूर्योदय झाला होता, तरीही अजून म्हणावं तसं उजाडलं नव्हतं. युवराजने एका सैनिकाला निवडलं.    " जेवढ्या लवकरात लवकर तुला वडिलांपर्यंत पोहोचता येईल असा प्रयन्त कर.... आणि मदत घेऊन ये.",     " जी युवराज जी... " म्हणत तो सैनिक , घोडयावर स्वार होऊन निघाला. तो नजरेआड झाला आणि युवराज इतर सैनिकांकडे वळला. " आपली संख्या कमी असली तरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. सगळे तयार आहात का लढण्यासाठी.... " सगळेच एकमेकांकडे बघू लागले. त्यावर युवराज म्हणाला, " तुम्ही सोबत नसलात तरी मी इथेच उभा राहीन, माझ्या जनतेसाठी, माझ्या घरासाठी." ते ऐकून सगळ्यांना हुरूप आला. "आम्ही तयार आहोत युवराज जी... " युवराज सगळ्यांकडे बघू लागला. " ठीक आहे. ज्या कोणाला अजून भीती वाटत आहे किंवा लढायची हिंमत नसेल त्याने आत्ताच निघून जावे, एकदा का युद्ध सुरु झाले तर कोणालाच मागे वळता येणार नाही.... आणि कोणी युध्द सोडून पळालाच तर तोही माझा शत्रू असेल.... कळलं का सगळ्यांना. "

           युवराज आता त्या " ४९ जणांची " रचना करू लागला. एकच वाट..... वाट म्हणण्यापेक्षा त्याला रस्ता म्हणणे जास्त सोयीचे पडेल. १० माणसे एका सरळ रेषेत , एकाच वेळी जाऊ शकतील एवढा मोठा रस्ता तो.... त्यात शत्रूची संख्या मोठी.... किल्ल्यात सुद्धा युद्धसामुग्री मोजकीच, होती तेवढी पुरेशी नव्हती. हा... त्यांच्याकडे एक मोठी गोष्ट होती, तिरंदाजी. जी अजून पर्यंत कोणाकडेच नव्हती. ४९ पैकी ४९ जणांना तिरंदाजी येत होती. मग युवराजने त्यापैकी ७ जणांना डाव्या बाजूला आणि ७ जणांना उजव्या बाजूच्या खडकांवर वर चढायला सांगितले. उरलेले ३५ जण तलवार आणि ढाली घेऊन खाली उभे राहिले. युवराज सर्वात पुढे उभा. 

            हल्ला होताच सर्वप्रथम तिरंदाजांनी हल्ला करायचा अशी योजना होती. त्यातून उरलेले जे पुढे येतील त्यांना तलवारबाज बघून घेतील. त्यातून वर चढलेल्या सैनिकांनी वरून मोठं-मोठ्या शिळा आधीच खाली ढकलून दिल्या होत्या. जेणेकरून तो रस्ता अधिकच बिकट होऊन जाईल. अशा तऱ्हेने , युवराजसह सगळेच तयार होते. बऱ्यापैकी उजाडलं होतं. कोणत्याही हल्ल्यासाठी सगळे तयार होते. हळूहळू पायाचे आवाज, कुजबूज ऐकू येऊ लागली.शत्रू सैन्याची पहिली फळी येत होती. वरील सैनिक लपून बसले होते. त्यांनी युवराज ला खूण करून तयारीत राहायला सांगितले. दुरूनच आता ते अफगाणी सैन्य नजरेस पडत होते. त्यांनी सुद्धा या युवराजच्या सैन्याला बघितले असावे, कारण त्यांची गती हळूहळू कमी कमी होतं थांबली. कदाचित , ते युवराजच्या सैन्याचा अंदाज घेत असावेत. वर लपून बसलेल्यापैकी एकाने हळूच त्या सैन्यावर नजर टाकली. फक्त ते उभे होते, त्याच्या पुढची जमीन तेवढी दिसत होती, त्यामागे फक्त आणि फक्त सैनिकच होते. हातात तलवारी, भाले आणि ढाली घेऊन... डोळ्यात पाणी आलं त्याच्या...... त्याला त्याचे कुटुंब आठवले... कारण यातून सुटका होणे तर शक्य नाही. पण राज्यासाठी एवढं तरी करू शकतो ना आपण, या भावनेने त्याने डोळे पुसले आणि धनुष्य-बाण तयार करून लपून बसला. 

            छानशी सकाळ होतं होती. राज्यातले नागरिक हळूहळू आपापल्या कामाला निघत होते. कोणी बैलगाडी तयार करत होतं, शेतावर शेती करायला निघाले होते, घरात बायका दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. पूर्व दिशेला, सीमेवर विक्रमवीर राजा , नव्या दिवसाची तयारी करत होता. पुन्हा एकदा त्याने आपली व्यूहरचना बरोबर आहे कि नाही ते पाहिलं. एक घोडेस्वार वेगाने त्यांच्या दिशेने निघाला होता. पश्चिमेला , नदीवर सुध्दा पहाट झाली होती. आजूबाजूच्या जंगलातील पशुपक्षी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी निघाले होते. थंड हवा वाहत होती. सगळीकडे पहाट झालेली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता. आणि नदीपासून राज्याकडे जाणारा रस्ता मात्र भयाण शांततेत हरवला होता. युवराज आणि त्याचे ४९ सहकारी तयारीत होते. समोर अफगाणी सैन्य तयार होते. काही काळ असाच गेला. ...... आणि एका क्षणाला, अफगाणी सैन्याने आक्रमण केलं. पहिली फळी पुढे आली. अर्ध्या वाटेवर आले असता वरून सपासप तिर येऊ लागले. कोणालाच काही कळेना. वरील तिरंदाज पटापट बाण सोडत होते, अचुक नेम साधून. एकही तिर वाया जाऊ नये, हेच त्यांना पाहिजे होते आणि तसंच घडत होते. प्रत्येक तिरानिशी एकएक जण खाली पडत होता. त्या हल्याने सैरभैर झालेली ती पहिली तुकडी पुढे आली तशी युवराज आणि त्याच्या सैन्याने आपलं काम चोख बजावलं. समोर आलेला फक्त खाली पडला पाहिजे हेच त्यांना ठाऊक. अफगाणी सैन्य बिथरून गेलं अगदी.... हल्ला तरी कसा करणार.   

          युवराज आणि त्याचे सहकारी त्याचं काम करत होते. तलवारींचा खणखणाट होत होता,ढालींवर तलवारी आढळत होत्या. अफगाणी सैन्याची पहिली तुकडी कापून निघाली होती. त्यातले बरेचशे सैन्य धारातीर्थी पडले होते. युवराजचे सैन्य जसच्या तसं होतं. तो हल्ला बघून त्या शत्रू सैन्याच्या पहिल्या तुकडीने माघार घेतली. ते पाहून युवराजच्या "त्या" सैन्याचा हुरूप अजून वाढला. युवराजने सगळ्यांना पुन्हा एकत्र केले. पुन्हा सगळ्यांनी आपल्या जागा घेतल्या. पुन्हा सगळे तयार झाले. थोड्याच वेळात अफगाणी सैन्याच्या दुसऱ्या तुकडीने हल्ला केला. आक्रमण दमदार होते. तिरंदाजानी वरून तीर सोडायला सुरुवात केली. यावेळीही खूप जणांना त्यांनी टिपलं होतं. त्यातून जे पुढे गेले होते त्यांचे स्वागत करायला युवराज होताच. कोणालाच कळतं नव्हतं कि नक्की काय करायचे ते. अफगाणी सैन्यासमोर ,युवराजचे सैन्य लहान असलं तरी ते आता त्यांच्यावर "भारी" पडू लागलं होतं. 

        अफगाणी सैन्याची दुसरी तुकडी सुध्दा माघारी परतली होती. दोन्ही तुकडयामधले बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले होते. युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शत्रू सैन्याच्या दोन तुकडयांना अडवलं होतं, मोठया जिद्दीने , पराक्रमाने. हे सगळं छान वाटतं असलं तरी ते सगळे आता थकले होते. हात चालवून तरी किती चालवणार ना. त्यात ते होते फक्त ४९ जण. वर बसलेले, तिरंदाजी करणाऱ्याचे तीर सुध्दा संपत आलेले होते. अफगाणी सैन्य जसं मागे हटलं , तसं युवराजने मागच्या सैनिकांना पुढे यावयास सांगितले. युवराजही थकला होता. त्यानेही विश्रांती घेतली. दोनच तुकड्यानी एवढं दमवलं, पुढे कसं होणार या विचार गढून गेला तो. 

           थोडया अवधी नंतर तिसऱ्या तुकडीने हल्ला चढवला. यावेळेस मात्र त्यांची संख्या मोठी होती. तिरंदाजानी आपलं काम सुरु केलं. पुन्हा अचुक मारा. शत्रू तीर लागताच खाली कोसळत होते. पण संख्याच एवढी मोठी होती कि कोणाला मारू आणि कोणाला नको असा प्रश्न तिरंदाजांना पडला. दोनदा मिळालेल्या अपयशाने ते पुरते खवळले होते. तुटून पडले ते युवराजच्या सैन्यावर. सगळीकडेच कापाकापी सुरु झाली. कोणीच मागे हटायला तयार नाही. त्यात तीर संपल्याने तिरंदाजानी आता खाली येऊन तलवारी हातात घेतल्या होत्या. युवराजचे दमलेले सहकारी मागे आले आणि मागे असलेले पुढे गेले. चेहरे बदलले, काम फक्त एकचं.... समोरच्याला मारायचं. 

           दुपार होतं आलेली. " तो " निरोप घेऊन निघालेला सैनिक अर्ध्या वाटेवर पोहोचला असेल, त्याचवेळी त्याचा घोडा ,एका दगडाला अडखळून पडला. एवढं अंतर धावून धावून तोही थकला होता. एवढ्या जोरात तो जमिनीवर आदळला कि पडताक्षणीच त्याने प्राण सोडला. त्याच्या मालकाला दुःख झालं.  क्षणभरासाठी तो घोड्याशेजारीं बसला. पण तेथे युवराज ,मोजक्या सैन्यानिशी लढतो आहे, हे राजांना सांगितलंच पाहिजे, यासाठी तो स्वतःच धावत सुटला.

          तिसऱ्या अफगाण तुकडीशी युध्द चालू होतं. त्यात चौथ्या तुकडीने हल्ला केला. कसं जमणार होतं ते. तो हल्ला जबरदस्त होता. पहिलं तरी एक सैनिक एका बरोबर लढत होता, पण आता एकास तीन या ओघाने सैनिक येत होते. दमले-भागलेलं युवराजचे सैन्य आता मागे हटू लागलं. एक-एक जण धारातीर्थी पडू लागला. सैन्य कमी होऊ लागलं. युवराज मात्र त्वेषाने लढत होता. परंतु त्याच्याकडे सहकारी कमी पडू लागले होते. ते सुध्दा किती उभे राहणार. प्रेतांचा नुसता खच पडला होता. तरी शत्रू त्याच्यावर उभं राहून लढत होते. युवराजने किती जणांना यमसदनी पाठवले होते. आता तोही कमी पडू लागला होता. अचानक एक भाला हवा कापत तीव्र गतीने युवराजच्या दिशेने आला. पटकन त्याने तो ढालीने अडवला. परंतु त्यानंतर लगेचच आलेल्या दुसऱ्या भाल्याला युवराज अडवू शकला नाही. खांद्यांच्या आरपार गेला भाला. तो आघात एवढा जबरदस्त होता कि धिप्पाड देह असलेल्या युवराजचा सुध्दा तोल गेला. आणि खाली असल्याला दगडावर डोकं आढळल्याने बेशुद्ध झाला. काही सैनिकांनी त्याला उचलून मागे नेले. त्याची जागा दुसऱ्या सैनिकांनी घेतली. 

          युवराज किती वेळ बेशुध्द होता ते माहिती नाही. जागा झाला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतं होता. युवराज रथातून जात होता. उठून उभा राहिला तेव्हा त्याने पाहिलं, सगळी जनता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभं राहून , टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करीत होते. स्वतः विक्रमवीर राजा, युवराजचे स्वागत करण्यासाठी राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी उभे होते. सगळी कडून फुलांचा वर्षाव चालू होता. आपण युध्द जिंकलो वाटते असा विचार युवराजच्या मनात आला आणि तो मनोमन आनंदाला. डोळे भरून आले त्याचे, डोळे मिटले त्याने. 

          थोडयावेळाने पुन्हा त्याने डोळे उघडले तर समोर ढगाळलेले आभाळ दिसत होतं. आजूबाजूला लोकं टाळ्या वाजवत नव्हती तर त्याचे मृत्युमुखी पडलेले सहकारी होते. टाळ्यांचा आवाज नसून तलवारींचा खणखणाट होता. युवराज भानावर आला. आपण राजवाड्यात नसून युद्धभूमीवर आहोत आणि युध्द अजूनही सुरु आहे, याची जाणीव युवराजला झाली. तसा तो उठून बसला. लागलीच एक कळ त्याच्या मेंदूपर्यंत गेली. डोक्यातून रक्त वाहत होतं. आपल्या खांद्यात एक भाला घुसला होता, हीच काय ती आठवण. त्यातूनच ती कळ आली होती. खांदा पकडून तो उभा राहिला. त्याचे सहकारी अजूनही लढत होते. "युवराज जी , तुम्ही बसा.... शत्रूला आम्ही बघतो. " एक सैनिक त्याला बोलला. " नाही... मला लढलेच पाहिजे.... एक काम कर, माझ्या खांद्याला काहीतरी बांध. " तसं त्याने आपली पगडी सोडली आणि युवराजच्या खांद्याला बांधली. 

         हात वगैरे मोकळे करत युवराज पुन्हा उभा राहिला. तलवार आणि ढाल घेत स्वतःच सैन्यापुढे आला. आणि अंगातली सगळी शक्ती एकवटून त्याने लढायला सुरुवात केली. काय आलं होतं त्याच्या अंगात माहिती नाही, समोर येईल त्याला मारू लागला, एकटाच. इतका वेळ लढाई करणारे ते अफगाण सैन्य, युवराजचा आवेश पाहून घाबरलं. ते बघून युवराज अधिक जोराने वार करू लागला. तलवारीच्या एका फटक्यात तो समोरच्याला लोळवू लागला. अफगाण सैनिक मागे होऊ लागले. तेसुद्धा थकलेले.... अश्यावेळी थांबलेलंच बरं असतं. तेच त्यांनी केलं. अफगाणी सैन्याची आणखी एक तुकडी माघारी परतली.   

       तो निरोप घेऊन निघालेला सैनिक, शेवटी दुपार उलटून गेली तेव्हा पोहोचला. धावून धावून तोही थकला होता. विक्रमवीर राजा जवळ पोहोचताच तो कोसळला. इतर सैनिकांनी त्याला सांभाळून बसवलं. थोडयावेळाने शुद्धीवर येताच त्याने सांगितलं, " शत्रूने पश्चिमेकडून हल्ला केला आहे. युवराजजी तिथे त्यांचा प्रतिकार करत आहेत. मोजकेच सैन्य आहे महाराज. " एवढच बोलून त्याने प्राण सोडला. " युवराज !! " विक्रमवीर राजाच्या तोंडून शब्द बाहेर पडले. युवराजला वाचवायला हवं, या उद्देशाने राजा आपल्या घोडदळासह निघाला. 

        दुपार होऊन गेली तरी प्रकाश अंधुक होतं होता. आभाळ भरून येत होतं. युवराज सुध्दा तेच न्याहाळत होता. अवेळी कसा पाऊस आला, याचा विचार त्याच्या मनात आला. खूप थकलेला होता तो. समोरच्या वाटेवर किती जण मरून पडलेले होते याची गणतीच नव्हती. त्यात त्याचे सहकारी सुद्धा होते. अफगाणी सैन्य मागे हटले होते, पुढच्या हल्ल्याच्या तयारी साठी बहुदा. ३-४ तुकड्याचं आल्या त्यांच्या इथे. पहाटे पाहिलं तेव्हा किती सैन्य होते याची कल्पनाच केली नाही मी, अजून किती माणसं येणार काय माहित, युवराज सगळं मनात बोलत होता. आपल्या सैन्याकडे त्याने नजर वळवली आणि माणसं मोजली. ४९ पैकी फक्त ८ जण बाकी होती, तेही रक्तबंबाळ. वडिलांना निरोप भेटला असेल तर त्यांना इथे यायलाच संध्याकाळ होईल, ८ जणांसह कसा थोपवू यांना इथपर्यंत, युवराजच्या डोळ्यात पाणी आले . 

       दुसरीकडे, अफगाणी सैन्याचा सेनापती प्रचंड संतापला होता. एक एवढासा किल्ला जिंकता येत नाही म्हणजे काय, त्यामुळे त्याने आता एक मोठी सैन्य तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला. आता स्वतः युद्धात भाग घेणार होता तो. त्याला त्याच्या सैनिकांनी युवराजबद्दल सांगितलं होतं. त्याच्या पराक्रमाबद्दल. तो योद्धा कोण आहे, हे पाहण्यासाठी तो निघाला होता. विक्रमवीर राजा ,त्याच्या १०००-१५०० घोडेस्वारांसहित अर्ध्यावाटेवर पोहोचला होता. अजूनही अर्ध अंतर बाकी आहे, युवराजला काही झालं नाही पाहिजे, हाच विचार त्याच्या मनात. 

       अफगाणी सैन्याची पुढची तुकडी आता संथपणे पुढे येत होती. युवराजला ते दुरूनच दिसलं. तो काही बोलणार , त्या अगोदर एक जण बोलला." युवराज जी , तुम्ही किल्याच्या द्वारापाशी थांबा. आम्ही बघतो यांचे काय करायचे ते." ," अरे पण.... " ," युवराजजी... वेळ फार कमी आहे... वेळ दवडू नका. जगलो, वाचलो तर पुन्हा भेटू... " युवराजने पटकन त्याला मिठी मारली. ते झाल्यावर आपापले शस्त्रे उचलली सगळ्यांनी. एकमेकांकडे पाहिलं सगळयांनी. समोरून शत्रू सैन्य दिसत होतं. युवराज किल्ल्याकडे जायला निघाला. तिथून वाट अजून चिंचोळी होतं होती. तिथेच जाऊन तो उभा राहिला. बाकीच्या ८ जणांनी आपापली जागा घेतली. शत्रू सैन्य जसं नजरेत आलं तसं कसलीही वाट न बघता, " महाराजांचा विजय असो... " अशी आरोळी ठोकत ते सर्व ८ जण त्याच्यावर धावून गेले. एक प्रकारची आत्महत्या होती ती. दुसरा काही पर्यायच नव्हता. मनात कसलाही विचार न ठेवता निव्वळ राज्यांसाठी ते शत्रू सैन्यात घुसले होते. समोर येईल त्यावर हल्ला करू लागले. अफगाणी सैन्यात पुन्हा अफरातफरी माजली. अर्थातच ते काही वाचणार नव्हते, तरी लढत होते. 

         त्या ८ जणांच्या हल्ल्यातून वाचलेले शत्रू सैनिक युवराज समोर आले. वाट अधिकच लहान झाल्याने, आता फक्त एकावेळेस ४ जण जाऊ शकत होते. त्यात युवराज समोर उभा ठाकला होता. भीषण युध्द सुरु झालं. युवराज समोर कोणाचा निभाव लागणार. मारत सुटला तोही मग. थोड्यावेळात ते आठही जणं धारातीर्थी पडले. अफगाण सेनापतीला त्यांचे ते शौर्य बघून अजब वाटले. त्यात तो वीर योद्धा नसावा, असं त्याला मनोमन वाटत होते. आता उरलेलं सैन्य किल्याकडे निघालं. 

        पण कोणालाही पुढे जाता येईना, कारण युवराज कोणालाच पुढे जाऊ देत नव्हता. अंगात भयानक ताकद आली होती त्याच्या. त्याच्यासमोरही शत्रू सैनिक पटापट मरून पडत होते. युवराजचे शरीर सुद्धा खूप जखमी झालं होतं. दुपारपासून धरून राहिलेल्या पावसाने आता सुरुवात केली होती. पाऊस पडू लागल्याने अफगाण सैन्य जरासे बिथरले. तरी लढण्याचे आदेश चालूच होते. त्यात थोडीशी उसंत मिळाली युवराजला. हातातली ढाल त्याने छातीला लावली. तलवार पकडून, पकडून त्याच्या दोन्ही हातातून रक्त येत होतं. आपलाच अंगरखा फाडला, दोन्ही हातांना गुंडाळला. बाजूलाच पडलेली अजून एक तलवार त्याने उचलली. दोन्ही हातात तलवार घेऊन पुन्हा सज्ज झाला. 

          अफगाण सेनापती हे सगळं दुरूनच पाहत होता. किती शूर योद्धा आहे हा, तो युवराजला बघतच राहिला. पुन्हा एकदा हल्ला झाला. युवराज दोन्ही तालवारींनींशी , एकावेळेस चार जणांसह लढत होता, विचित्र ताकदीनिशी. जणूकाही दहा हत्तीचे बळ घेऊन लढाई करत होता. पावसाचे पाणी, अंगावरच्या जखमांवर पडून ते अधिक झोबंत होते युवराजला. त्यामुळे अधिकच त्वेषाने तो समोरच्यावर वार करत होता. पावसामुळे रक्ताचा नुसता चिखल झाला होता. तेच रक्ताळलेलं पाणी नदीत मिसळत होते, नदीचा रंग लाल करत होते. 

         पावसाचा वेग वाढला तरी विक्रमवीर राजा, न थांबता पश्चिम सीमेला निघाला होता. डोळ्यात युवराज साठी काळजी... राज्य गेलं तरी चालेल, पण युवराज.... मनात वाईट विचार येत होते. अजूनही बरेच अंतर बाकी होतं. इकडे धुवांधार पावसात युवराज अजूनही उभा होता. केवढा मोठा पराक्रम, देवांनी सुद्धा कधी पाहिला नसेल. हे युध्द आता तरी थांबावे असाच त्यांना वाटत असणार हे नक्की. होताच मोठा पराक्रम तो. अफगाण सेनापती चाट पडला. त्याने त्याच्या सैन्याला मागे हटायला सांगितलं. स्वतः पुढे आला आणि युवराजला पाहून म्हणाला, " मै सेनापती , दिलावर खान... तुम्हारी मर्दानगी देखी मैने.... एक उमदा सैनिक हो तुम..... कौन हो तुम.... " ,युवराज तसाच दोन्ही तलवारी हातात घेऊन उभा त्याच्यासमोर , थकलेला तरी युद्धासाठी सज्ज ... " मी.... या राज्याच्या महान राजा, विक्रमवीर राजाचा मुलगा.... युवराज... " ,"हम्म... तो तुम युवराज हो.. देखो, तुम ने बडी हिंमत के साथ युध्द किया, तुम्हारे साथीयोने भी जी जानसे लढाई कि, पर अब तुम अकेले रह गये हो..... तुम्हारे युध्द कौशल्य से मे बहुत प्रसन्न हूं.... मैं तुम्हे जिंदा छोड देता हूं.... अभी लढाई करने का कोई मतलब नहीं युवराज.... " त्यावर युवराज हसला. " माझ्या अंगात जोपर्यंत प्राण असतील तोपर्यंत मी उभा राहणार तुमच्या समोर..... घाबरला असाल तर तुम्हीच मागे जा... मी तुम्हाला जिवंत सोडीन.... " 

          त्याचं ते उत्तर ऐकून सेनापती संतापला. " देखता हूं.... अब कितना जोर बाकी हैं तुम मे... " म्हणत सेनापती त्याच्या अंगावर धावून गेला. युवराज तयारच होता. सेनापती जेवढ्या जोरात प्रहार करेल, तेवढ्या ताकदीने युवराज तो प्रहार परतवून लावत होता. दोघांमध्ये भीषण युध्द सुरु झालं. कोणीच मागे हटत नव्हतं. अशातच एक वार युवराजच्या डाव्या हातावर झाला, पाठोपाठ मांडीवर. क्षणभरासाठी युवराज खाली बसला. सेनापतीला वाटलं आता युध्द संपलं म्हणून. इतक्यात युवराज उभा राहिला. आता तर सेनापती अधिकच चवताळला. एका पाठोपाठ एक असे तलवारीचे वार करू लागला. पावसाचा वेग प्रचंड वाढला होता. वर विजा एकमेकांवर आढळत होत्या. आणि खाली हे दोघे. 

         एका क्षणाला , सेनापतीचा वार चुकवून युवराजने त्याच्या पाठीवर वार केला. तसं त्याचं चिलखत खाली गळून पडलं. चिलखताशिवाय कसं लढणार ना, तरीही तो प्रहार करतच राहिला. दुसऱ्याक्षणी, युवराजने चलाखी करत त्याची तलवार लांब उडवून दिली. तसं बघायला गेलं तर युवराज त्याला तिथेच मारू शकत होता. तरीसुद्धा युद्धकला शिकताना युवराज," निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करू नये " हे शिकला होता. युवराज बोलला,"सेनापती, तुम्ही आता निशस्त्र आहेत... मी हल्ला करू शकत नाही... तुम्ही जिवंत जाऊ शकता... " त्यावर तो अफगाणी सेनापती बोलला," तलवार नही तो क्या.... मेरे हात तो हैं ना... " युवराजला कळलं होतं कि तो मल्लयुध्दाचे आव्वाहन देत होता. तसं युवराजने स्वतःच्या अंगावरचे चिलखत, ढाल काढून बाजूला ठेवली. आणि मल्लयुद्धासाठी सज्ज झाला. 

        अश्याप्रकारे, पुन्हा एकदा युध्द सुरु झालं. वेगळंच युद्ध, ठोश्यांवर ठोशे पडत होते शरीरावर, दोघांच्याही. एकमेकांना नुसते मारत होते दोघे. त्या लाल चिखलात अगदी माखलेले होते दोघे. एकदा युवराज त्याच्यावर भारी पडत होता, तर दुसऱ्या क्षणाला, सेनापती दिलावर खान.... दोघेही थकलेले तरी मागे हटायला कोणीच तयार होईना. अश्यातच सेनापतीचा एक ठोसा युवराजच्या खांदयावर बसला, जिथे आधी त्याला भाला लागला होता तिथे. कळवळला युवराज. खांदा पकडून जरासा मागे हटला. ते सेनापतीच्या नजरेतून सुटलं नाही. वारंवार तो युवराजच्या त्याचं ठिकाणी मारू लागला, युवराज कितीही वाचायचा प्रयन्त करत असला तरीही. आधीच खूप रक्त गेलं होतं तिथून. त्यात हे सगळं. वेदना असह्य होऊन युवराज खाली कोसळला, लाल चिखलात. 

            विक्रमवीर राजा, त्याच्या घोडदळासह कधीचा निघाला होता. पावसाचा व्यत्यय आला म्हणून त्यांचा वेग मंदावला तरी न थांबता ते धावत होते. थोडेसे अंतर बाकी होते आता. युवराजचे काय झालं असेल, या विचारातच राजा होता. अफगाणी सेनापती दिलावर खान आता, गुडघ्यांवर बसला होता. थकलेला.... युवराजची ताकद त्याने अनुभवली होती. खाली पडलेल्या युवराजकडे तो पाहत होता. युध्द संपले म्हणून तो उभा राहिला आणि आपल्या सैन्याकडे येऊ लागला. तर मागून एक आवाज आला." मी अजून जिवंत आहे. " मागे वळून बघितले असता युवराज त्याचा खांदा पकडून उभा राहत होता. काय ताकद आहे या मुलात, सेनापती मनोमन म्हणाला. युध्दाचा पवित्रा घेऊन युवराज ,सेनापतीला मल्लयुध्द करण्यासाठी खुणावू लागला. सेनापती पुन्हा त्याला मारायला धावतच त्याच्या अंगावर गेला. मल्लयुध्दाला पुन्हा सुरुवात. जेवढी शक्ती बाकी होती, तेवढ्या ताकदीने युवराज सेनापतीला मारू लागला. एक ठोसा एवढ्या ताकदीने लगावला कि दिलावर खान खाली पडला. तसंच जाऊन युवराजने त्याच्या मानेभोवती हाताने घट्ट पकड केली. अशी पकड जी अजूनतरी कोणाला सोडवता आली नव्हती. सेनापतीचा श्वास कोंडू लागला. धडपड सुरु झाली त्याची. युवराज जिंकणार असं वाटत असतानाच सेनापतीने उलट्या हाताने युवराजचा खांदा जोरात दाबून धरला. त्याबरोबर पुन्हा वेदना सुरु झाल्या. त्याची पकड हळूहळू सुटू झाली. हेच पाहिजे होतं त्याला. तसंच तो युवराजचा हात पकडून गर्रकन वळला तसा " काड "  असा जोरात आवाज आला. युवराज जोरात ओरडला आणि खाली पडला. खांद्यांपासून हात निखळला होता त्याचा, खांद्याची हाडे तुटण्याचा आवाज होता तो.

           अफगाणी सैन्य ते युद्ध पाहत होते. काहींचे डोळे तर युवराज साठीच वाहत होते.... असं ते भयानक युध्द सुरु होते. युवराज तिसऱ्यांदा खाली पडला होता. काहीवेळ असाच गेला. युवराज पुन्हा उभा राहिला. निदान वडील येईपर्यंत तरी आपल्याला उभं राहावे लागेल. एका हातानिशी कसं युध्द करणार, तरी तो उभा राहिला. तुटलेल्या हातातून प्रचंड वेदना, त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. सेनापती दिलावर खान, त्यालाही आता वाईट वाटत होतं. परंतु त्याने जर असं केलं नसतं तर तो मृत्युमुखी पडला असता. युवराजला लवकरात लवकर बाजूला करून आपल्याला पुढे जायला हवं म्हणून त्याने युवराजकडे पाहत म्हटले. " बेटे... अब बस हो गया.. मुझे तुम्हे मारना नहीं हैं.... तुम अभीभी अपने पिताजी कि पास जा सकते हो... " , वेदना लपवत युवराज म्हणाला," ते तर मी जाणारच आहे.... पण तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही... असेल हिंमत तर करा आक्रमण... " 

          नाईलाजाने, सेनापतीने त्याला जोरात धक्का दिला. त्याच्या छातीवर वार केला, हृदयाजवळ. जरासा मागे झाला युवराज, तरीही उभा होता. अजून एक जोरदार लाथ त्याच्या घुडघ्यावर बसली. यावेळेस त्याचा पाय निकामी झाला. काय युवराजची शरीरयष्टी होती, पिळदार शरीर, तसंच धिप्पाड अंग. पण सकाळपासून युध्द करून ते शरीर आता थकलं होतं. चौथ्यांदा पडला होता युवराज. आता उभं राहण्याची शक्ती त्यात नव्हती. डोळे मिटत आलेले त्याचे... कदाचित त्याचा आत्माही निघून जात असावा. एक पाय आणि एक हात निकामी. तरी वडील अजून आले नाहीत, या विचाराने डोळे त्याने मिटू दिले नाहीत. एका हाताने सावरत तो पुन्हा उठला. कसाबसा घुडग्यावर बसला. दिलावर खानच्या डोळ्यात पाणी आलं. किती ती निष्ठा आपल्या राज्यांवर, आपल्या जनतेसाठी. मोठा राजा होऊ शकला असता युवराज. आपल्या सैन्यासमोर निभाव लागणार नाही तरीही झुंज देतो आहे. त्याला रडू आलं. हे युध्द आता संपायला हवं आणि युवराजला मुक्त करायला हवं, असं सेनापतीने ठरवलं. एव्हाना युवराज कसातरी उभा राहिला होता. 

          अफगाणी सेनापती पुढे आला. त्याने युवराजच्या पोटात ठोसे मारले. तोल जात होता तरी कसाबसा युवराज उभा होता. दिलवारने पुन्हा त्याच्या छातीवर प्रहार केला. युवराज कळवळला. पुन्हा एकदा तिथेच... युवराज अडखळत मागे गेला.... तोंडातून रक्त येऊ लागलं . छातीवर हात ठेवला त्याने. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोळे मिटू लागले.. दिलावर खान ते बघत होता. युवराज समोर रडू लागला तो. युवराजने ते पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं .कदाचित शेवटचं. छातीवरचा हात त्याने बाजूला काढला. दिलावर खानने पुन्हा एकदा त्याच्या हृदयाजवळ , पूर्ण ताकदीनिशी प्रहार केला. युवराज खाली पडला, बहुदा शेवटचा. कधीही न उठण्यासाठी. सेनापती दिलावर खान, एवढा मोठा, धिप्पाड माणूस.... लहान मुलासारखा रडत होता. युवराज निपचित पडला होता.

           संध्याकाळ होत होती. पावसाचा जोर ओसरला तरी अजून रिमझिम चालू होती. थोड्याचवेळात, विक्रमवीर राजा, त्याच्या सैन्यासह पश्चिम दिशेला पोहोचला. समोर बघतो तर प्रेतांचा खच. त्यात सगळीकडे लाल रंगाचे पाणी, चिखल. आणि किल्ल्यानजीक चिखलात पडलेला युवराज. युध्द नियमाप्रमाणे, सूर्यास्त होताच युध्द थांबवायचे असते. त्यामुळे आता कोणताच हल्ला होणार नव्हता. विक्रमवीर राजा तसाच घोड्यावरून उतरला आणि युवराज शेजारी जाऊन बसला. अफगाण सेनापती दिलावर खान अजून निपचित पडलेल्या युवराजकडे पाहत होता. विक्रमवीर युवराजच्या डोक्यावरून हात फिरवत होता. भावनाशून्य नजरेने तो बघत होता. दिलावर खान उभा राहिला, " आपका युवराज... सच मै एक बडा योद्धा था... ऐसा योद्धा मैने आजतक कही नहि देखा... अपने राज्य के लिये ऐसा बलिदान फिरसे नहि होगा.... मै सेनापती दिलावर खान.... ये प्रतिज्ञा लेता हूं कि ये राज्य युवराज का था और उसका ही रहेगा... फिरसे कभीभी मै एसपर आक्रमण नही करुंगा... ये वादा रहा. " असं म्हणत तो निघून गेला. विक्रमवीर राजा त्याच्या सैन्यासह तिथेच बसून राहिला. सेनापती बोलल्याप्रमाणे आपले सैन्य मागे घेऊन गेला. त्याशिवाय भविष्यात पुन्हा कधी आक्रमणही केले नाही. 


        असं म्हणतात कि जिंकणारेच शेवटी इतिहास लिहितात किंवा रचतात. युद्धात हरलेल्यांना तो हक्क नसतो किंवा ते इतिहास रचण्यासाठी जिवंतच राहत नसावेत. त्यामुळेच कदाचित युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही युद्धगाथा लिहिली नसावी. युवराजने त्याच्या ४९ सहकाऱ्यांसमवेत, युध्दाचा कोणताच अनुभव नसताना, २ ते ३ हजार शत्रू सैन्यासमोर उभं राहून ती झुंज दिली होती. झुंज अपयशी होऊन देखील त्यांनी राज्यावर आलेलं आक्रमण थोपवून ठेवलंच नाही तर शत्रूला त्यापासून दूर राहण्यास भाग पाडलं. काळाच्या ओघात, युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांची नावे विसरली गेली, हवेत विरून गेली. लक्षात राहिली ती एका राजपुत्राने एकाकी दिलेली झुंज .....देहात प्राण असेपर्यंत दिलेली झुंज..... मरण समोर असतानाही मरणालाही लाजवेल अशी दिलेली झुंज..... फक्त " झुंज "...... 

------------------------------------------- The End ---------------------------------------



2 comments:

  1. Katha vachat astana vatlech nahi ki hi ek kalpanik katha ahe.. Itihasatil ekhada prasang jivant dolyasamor anubhavtoy asach vachtana vatle.. chan lihili ahe story.. thanks..

    ReplyDelete
  2. Khup sunder katha lihli aahe..

    ReplyDelete

Followers